Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उद्या ‘शोध अनुरूप जोडीदाराचा’चे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात सुरू झालेल्या 'अनुरूप विवाहसंस्थे'ला आज, शुक्रवारी एक्केचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. वर्धापनदिनाप्रीत्यर्थ 'अनुरूप'ने सर्व लग्नेच्छू मुले-मुली आणि त्यांच्या पालकांसाठी उद्या, शनिवारी 'शोध अनुरूप जोडीदाराचा' या आगळ्यावेगळ्या आणि अतिशय उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लग्न ठरवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याविषयी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे.

जोडीदाराबाबतच्या अपेक्षा कशा निश्चित कराव्यात, अनुरूप स्थळांचा शोध कसा घ्यावा, कुटुंब आणि व्यक्तिगत अपेक्षा यांचा समन्वय कसा साधावा, लग्न आणि करिअर आदी विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होईल. याच कार्यक्रमात 'अनुरूप'च्या संचालिका गौरी कानिटकर लिखित 'शोध अनुरूप जोडीदाराचा' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होईल. 'अनुरूप हा निव्वळ व्यवसाय नाही तर, सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन लग्नसंस्था आणि एकूणच कुटुंबव्यवस्था या विषयी चर्चा आणि मार्गदर्शन करण्याचे माध्यम आहे. त्यासाठी आम्ही वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. हे पुस्तक त्याचाच एक भाग आहे,' असे श्रीमती कानिटकर यांनी सांगितले. 'शोध अनुरूप जोडीदाराचा' हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लूटमारीच्या गुन्ह्याला २ वर्षांनी फुटली वाचा

$
0
0

गुन्हे शाखेकडून दोघांना अटक; आरोपींच्या वादात एकाचा खून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येरवडा येथे दोन वर्षांपूर्वी वीजबिल भरणा केंद्राची २५ लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या घटनेला वाचा फुटली असून, या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. लुटीतील रकमेच्या वाटणीवरून आरोपींमध्ये झालेल्या वादात एकाचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र, खून झालेल्या तरुणाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

गुन्हे शाखेचे युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या पथकाने विशाल लक्ष्मण भोले (वय २३, रा. ताडीवाला रोड) याला संशयावरून ताब्यात घेतले होते. पोलिस कर्मचारी रिजवान जेनेडी आणि तुषार खडके यांना मिळालेल्या माहितीनुसार भोले याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली होती. भोले याच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी २५ लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. त्यांच्यातील एका साथीदाराचा खून केल्याचेही सांगितले, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

बाबूराव अगरवाल (वय ५१, रा. विमान नगर) यांच्या वीजबिल भरणा केंद्रातील २५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा कट आरोपींनी रचला होता. अगरवाल यांचा चालक रमेश चौहान (रा. बोपोडी) हा सुद्धा कटात सहभागी होता. आरोपी भोले, रोहित चंद्रकांत गद्रे, योगेश नायडू आणि चौहान यांचा या लुटीत सहभाग होता. अगरवाल यांचा कॅशिअर राजू गायकवाड याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून २५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. या वेळी आरोपी चौहान याने लुटीतील काही रक्कम आपल्या पँटमध्ये लपवली होती. लुटीची रक्कम मोजल्यानंतर काही रक्कम कमी भरली. तेव्हा चौहान याची झडती घेण्यात आली. त्याच्याजवळ रक्कम मिळाली. आरोपींनी त्यानंतर त्याला कोंढवा परिसरात नेले आणि तेथे त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याचा मृतदेह अद्याप न सापडल्याने चौहान याचा खून झाल्याचा पुरावा नाही.

गद्रेला अटक

फुगे यांच्या पथकाला गद्रेचाही लुटीत सहभाग असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्याला मंगळवारी अटक करून येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लुटमार केल्यानंतर आरोपींनी चौहानचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहभागी असणारा आणखी एक आरोपी नायडू याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, तो फरारी आहे. सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, रवी कदम, संभाजी भोईटे, रमेश भोसले, मेहबूब मोकाशी,दिलीप मोरे, प्रकाश लोखंडे, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, इरफान मोमीन, मोहन येलपले यांचा तपास पथकात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसा चोऱ्या करणारे अल्पवयीन अटकेत

$
0
0

सोळा मोबाइलसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पेपर टाकण्याच्या बहाण्याने सोसायट्यांमध्ये घुसून चोऱ्या करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या मुलांकडून चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांनी चोरलेले दोन लॅपटॉप, १६ मोबाइल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सौरभ कुंजाराम बेडसे (वय १९, रा. सुदर्शननगर, बागल चाळ, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह इतर दोघे अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पी. आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.

राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गेल्या महिन्यांत 'ऑपरेशन मुस्कान' पुन्हा राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोरोटे यांच्या पथकाने अनाथ मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांना अल्पवयीन मुलांकडून चोरीचे गुन्हे करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.

..

चोरीची पद्धती

अल्पवयीन मुले सकाळच्या सुमारास हातात पेपर घेऊन ती सोसायटीत टाकण्याच्या बहाण्याने प्रवेश करत असत. उघडे दरवाजे पाहून फोन करण्याच्या बहाण्याने सोसायटीतील व्यक्तींकडे फोन मागत असत. फोन करत असल्याचे नाटक करून ते शिताफीने फोन घेऊन पोबारा करीत. अशा प्रकारे त्यांनी गेल्या तीन महिन्यांत नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, कर्मचारी गणेश काळे, प्रमोद वेताळ, संजय गवारे, शशिकांत ऊर्फ बाबा शिंदे, संतोष बर्गे आणि अमित गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दोन लॅपटॉप, १६ मोबाइल आणि चार दुचाकी असा तीन लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी बेडसे पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतो. त्याच्याविरुध्द एकही गुन्हा दाखल नाही.

..

इंजिनीअरला दिलासा

इंजिनीअरिंगचे शिक्षण नुकतेच पूर्ण केलेल्या विशाल संतोष चौधरी यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे असलेली फाइल आणि लॅपटॉप चोरण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना लॅपटॉपची माहिती मिळाली. आरोपींनी त्यांना शैक्षणिक कागदपत्रे असलेली फाइल कचराकुंडीजवळ टाकल्याचे सांगितले. आरोपींनी सांगितल्यानुसार ती फाइल शोधून पोलिसांनी चौधरींना संपर्क साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडून दिशाभूल

$
0
0

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला; महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'दुष्काळ, रोजगार हमी, चारा छावण्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित असताना भारतमाता की जयच्या मुद्द्याला महत्त्व देऊन राज्य सरकार जनतेचे लक्ष विचलित करीत आहे,' असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (सात एप्रिल) केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भोसरी येथे उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बोडके, पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आझम पानसरे या वेळी उपस्थित होते.

दोन वर्षांपूर्वी अच्छे दिनचे आश्वासन देऊन देशात भाजप सत्तेवर आला, असे नमूद करून पवार म्हणाले, की, 'सध्या देशातील चित्र जनतेसमोर आहे. या पूर्वी देशात कधीही असहिष्णुतेचे मुद्दे उपस्थित झाले नव्हते, ही बाब लक्षात घ्यावी. पिण्याच्या पाण्याचा, दुष्काळाचा, रोजगार हमी, चारा छावण्या आदी महत्त्वाचे प्रश्न आहेत की भारतमाता की जय, हा विचार करण्याची गरज आहे. भारतमाता आपली आहेच ना, हा देश तुमचा-माझा आहेच ना..परंतु, लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नावरील लक्ष अन्यत्र विचलीत करण्याचे राजकारण सध्याचे राज्य सरकार करीत आहे.'

'पिंपरी-चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला नाही तरी, या भागात मुलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने नेटाने केला आहे. शहराला भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून पवनेसह भामा-आसखेड, आंद्रा धरणातून आवश्यक पाणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहराची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे,' असेही त्यांनी नमूद केले.

आमदार लांडगे यांचे या वेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक नितीन लांडगे यांनी केले. श्रद्धा लांडगे यांनी आभार मानले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.

..

हिंजवडीचा महापालिकेत समावेश?

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलतो आहे. झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडही मागे नाही. त्यामुळे गहुंजे, हिंजवडी भागाचा या महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर उड्डाणपूल जुलैमध्ये खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

हडपसरमधील गाडीतळ येथील वाय अकाराच्या उड्डाणपुलाचे रखडलेले काम जून महिन्याच्या अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पुल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. त्यामुळे गाडीतळ भागात रोज होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल.

गाडीतळ येथील वाय आकाराच्या उड्डाणपुलाचे काम मुदत संपल्यानंतर अनेकदा मुदतवाढ देऊनही या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे महापौरांनी पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यानंतर महापौरांनी ही माहिती दिली. पुलाचे काम सुरू असताना आवश्यक तेथे रिफ्लेक्टर व दिशादर्शन फलक न लावल्याबद्दल त्यांनी ठेकेदाराला त्यांनी खडसावले. सासवड रस्त्यावर उत्कर्ष सोसायटीसमोरील रस्त्याचे रखडलेले काम तातडीने करावे, असे त्यांनी सांगितले.

सासवड रस्त्यावर पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या दुकान मालकांना पर्यायी जागा दिली असतानाही अतिक्रमणे हटवली नसल्याने पालिका अधिकाऱ्यांना महापौरांनी धारेवर धरले. प्रलंबित कामे तातडीने करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेवाळवाडी येथील पीएमपी डेपोच्या रिकाम्या जागेत वाय आकाराच्या पुलावर टाकण्यात येणारे ७५ मीटर लांबीचे चार गर्डर तयार असून, ते १५ एप्रिलपासून सोलापूर रस्त्यावरील पुलावर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. रात्री दहा ते पहाटे पाच या दरम्यान सोलापूरकडे येणारी व जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हे गर्डर बसवण्यासाठी किमान पंधरा दिवस लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोर तालुक्यात पाण्यासाठी पायपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, भोर

भोर तालुक्याच्या भाटघर परिसरातील भूतोंडे व निरा देवघर धरणाच्या हिर्डोशी खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, महिला वर्गाला पाण्यासाठी दोन-तीन मैल पायपीट करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा असा प्रस्ताव या भागातील १२ गावे व २४ वाड्या-वस्त्यांनी पंचायत समितीकडे दिला आहे. परंतु अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. गृहिणी, भूतोंडे, डेरे येथील टँकर मंजूर झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. परंतु टँकर लाल फितीच्या कारभारात अडकलेले आहेत. पाण्यासाठीची वणवण वाढली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भूतोंडे खोऱ्यातील गृहिणी, डेरे, भूतोंडे, पसुरे, तळजाईनगर, कुरण गावठाण, डेहेणची जळकेवाडी, सोनारवाडी, हुंबेवस्ती येथे सध्या पाण्याची मोठी समस्या आहे. वीसगाव खोऱ्यातील बालवडी, नेरे, वरोडी डायमुख, वरोडी खुर्द, धनावडे वस्ती, महुडे खुर्द, ससेवाडी येथेही पाणीटंचाई सुरू झाल्याने त्यांनी टँकरची मागणी केली आहे.

हिर्डोशी खोऱ्यातील जयतपाडची हुंबेवस्ती, गोरेवस्ती, हिर्डोशीचा सोमजाई माळ, हरणीचा माळ, रायरीची धारांबे वस्ती, गुढे, निवंगण, कळंबाचा माळ, दुर्गाडी, वारंवड, कुडली खुर्द, कुडली बुद्रुक, शिळीमची राजिवडी, शिरगावची पातरटाकेवाडी, आशिंपीची उंबार्डेवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निवंगणमधील महिलांना तीन किलोमीटरवरील निरा देवघर धरणाच्या पात्रातून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पात्रात अनेक ठिकाणी खड्डे खणून भांड्याने पाणी हंड्यात जमा करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याची उलाढाल ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोन्या-चांदीची खरेदी करण्याची परंपरा यंदा सराफांच्या बंदमुळे खंडित झाली. बारामतीच्या इतिहासात प्रथमच सुवर्णालंकारांची दुकाने बंद राहिली असल्याने १० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

बारामतीचे शुद्ध सोने घेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक बारामतीत येत असतात. ग्राहकाची खरी गरज ओळखून राज्यातील अनेक प्रसिद्ध सुवर्णपेढ्यांनी बारामतीत भव्य व सुसज्ज अशा पेढ्या सुरू केल्या आहेत. बारामतीच्या सराफांनी आपले शुद्ध सोने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात नेत विविध ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत.

बारामतीतील सुवर्णालंकारांच्या दुकानांत कोणत्याही सणाला नेहमीच गर्दी असते; मात्र सराफांच्या बंदमुळे हा मुहूर्त ग्राहकांना साधता आला नसल्याने त्यांची निराशा झाली आहे. जवळपास १० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याचा दावा सुवर्णालंकार व्यावसायिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड, शिरूर तालुक्यांना जोडणारा पूल होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दौंड

टाकळी भीमा व टाकळी या दौंड व शिरूर तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवर पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली. या पुलास अंदाजे १५ कोटी रुपये एवढा खर्च येणार असून, त्यासाठी 'नाबार्ड'च्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाणार आहे.

नाबार्ड योजनेच्या एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कामामध्ये या पुलाचा विचार प्राधान्याने केला जाईल. दौंड व शिरूर या दोन तालुक्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा पूल असून, सध्या या पुलाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. 'या पुलास मंजुरी कधी देणार, निधी कधी उपलब्ध करून देणार,' असा प्रश्न आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत विचारला होता. रांजणगाव औद्योगिक वसाहत व कुरकुंभ औद्योगिक वसाहत या दोन्हीही औद्योगिक वसाहतींना या पुलाचा फायदा होणार असून, त्यामुळे हा पूल होणे गरजेचे असल्याचे कुल यांनी सांगितले.

दरम्यान, रेल्वे फाटक क्रॉसिंगऐवजी आता उड्डाणपूल बांधण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. सरकार तातडीने यादी तयार करत असून, राज्य सरकारचा ५० टक्के व केंद्र सरकारचा ५० टक्के निधी घेऊन रेल्वे ओव्हरब्रिजचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दौंडच्या फायद्याचा निर्णय

रेल्वे फाटक क्रॉसिंगऐवजी उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयाचा दौंड तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. दौंड तालुक्यातून सुमारे ६० किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग गेला आहे. रेल्वे फाटकामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बराच काळ रेंगाळते. तालुक्यात साखर कारखाने, औद्योगिकरण व नागरीकरण झपाट्याने वाढल्याने वाहतूक वाढली आहे. रेल्वे फाटक जाऊन त्या ठिकाणी उड्डाणपूल आल्यास दळणवळणाची मोठी सोय होणार असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डोळ्यांवरील गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वी

$
0
0

'एनआयओ'च्या डॉक्टरांचे यश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मॉर्जेनेला मार्गनया' या दुर्मिळातील दुर्मीळ जंतूंमुळे डोळ्याला झालेल्या संसर्गामुळे दृष्टी जाण्याची शक्यता असताना, जंतूचे योग्य निदान करून गुंतागुंतीचे ऑपरेशन करून डोळा वाचवण्यात राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) नेत्रतज्ज्ञांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॅटरॅक्ट रिफ्रेक्टिव्ह सर्जरी' या नियतकालिकाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली.

'एनआयओ'चे संचालक आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर, डॉ. समीर दातार, डॉ. ऐश्वर्या मुळे यांनी पेशंटला दृष्टी मिळवून दिली. 'कॅटरॅक्ट रिफ्रेक्टिव्ह सर्जरी' या अमेरिकन, युरोपियन नेत्रतज्ज्ञांनी मान्यता दिलेल्या नियतकालिकाने दखल घेतल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

'मधुमेहाचा आजार झालेल्या एका ९० वर्षीय वृद्धाचा डोळा दुखत होता. उपचारांसाठी हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांच्या डोळ्याची तपासणी केली. डोळ्यात पू झाल्याचे दिसून आले. डोळ्यातील द्रव काढून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. डोळ्यात 'मॉर्जेनेला मार्गनया' हा जंतू असल्याचे निदान तपासणीत झाले. हा दुर्मिळातील दुर्मीळ संसर्ग असल्याचे समजले. डोळ्याच्या पापणीत नैसर्गिक जंतूमुळे जंतुसंसर्ग होतो. परंतु, दुर्मिळातील दुर्मिळ जंतुसंसर्गामुळे त्या वृद्धाच्या डोळ्याचा आजार गंभीर झाला होता. म्हणून बुब्बुळाचे रोपण, तसेच डोळ्यांच्या पडद्याचे (रेटिना) अशी दोन्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी डोळ्याच्या 'व्हिटिरस जेली'मध्ये अँटीबायोटिक इंजेक्शन देऊन गुंतागुंतीची दोन्ही ऑपरेशन करण्यात आली. ऑपरेशन यशस्वी झाल्याने डोळा वाचवणे शक्य झाले,' अशी माहिती डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

'वृद्ध पेशंट मधुमेहाने त्रस्त होते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. जंतुसंसर्ग झाल्याने त्याचे निदान करणे मोठे आव्हान होते. 'मॉर्जेनेला मार्गनया' या जंतुसंसर्गाचे जगात तीन ते चार पेशंट असावेत. संसर्गामुळे तीन पेशंटची दृष्टी गेली. जंतुसंसर्गाचे योग्य निदान झाल्याने दृष्टी वाचवण्यात यश आले,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

..................

'मॉर्जेनेला मार्गनया' हा जंतू दुर्मिळातील दुर्मीळ आहे. अशा जंतुसंसर्गानंतर ऑपरेशनमुळे डोळा वाचण्याची घटना ही दुर्मीळच म्हणावी लागेल. अन्य जंतूंमुळे झालेल्या संसर्गानंतरही ६० ते ७० टक्के नागरिकांची दृष्टी वाचवता येते.

- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि पाडवा गोड झाला

$
0
0

खरेदी, स्नेहभोजनातून सण उत्साहात साजरा; सोनेखरेदीला मुरड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुढीपाडव्याचे औचित्य साधून काहींनी कार, तर काही दुचाकी घेतल्या, तर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याचाही मुहूर्त अनेकांनी साधला. सकाळी गुढीची मनोभावे पूजा, दुपारी गोड पदार्थांच्या जेवणावर ताव अन् सायंकाळी खरेदीचा आनंद लुटून पुणेकरांनी गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. सराफांच्या संपामुळे सोने खरेदीला मात्र अनेकांना मुरड घालावी लागली.

हिंदू नववर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने पुणेकरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. वाहनांबरोबरच मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गुढीपाडव्यानिमित्त सकाळी घराघरांमध्ये गुढी उभारण्यात आल्या. सण आणि सुट्टी असल्याने दुपारच्या जेवणाला गोड पदार्थांचे बेत रचले होते. त्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच श्रीखंड, अंगूर रसमलई, जिलेबी, गुलाबजामच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ होती. आंब्याचे आकर्षण असले, तरी त्यांच्या किमती अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी इतर पदार्थांचीच नैवेद्यासाठी निवड केली. दुपारी कडक ऊन असल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरली आणि संध्याकाळी पाचनंतर लोकांची पावले बाजारपेठांकडे वळाली. सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोरूमध्येही मोफत भेटवस्तू, लकी ड्रॉ, सवलत अशा विविध आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये गर्दी होती. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कूलर यांसह विविध वस्तूंना चांगली मागणी होती.

वाहनांच्या दुकानात मात्र सकाळीच जास्त गर्दी पाहायला मिळाली. अनेक नागरिकांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्या खास गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून खरेदी केल्या. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गेल्या सात दिवसांत पाच हजार वाहनांची नोंद झाली आणि नागरिकांनी खरेदी मात्र शुक्रवारी केली. एरव्ही या दिवशी सोने खरेदीसाठीही सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. गुढीपाडवा आणि सोने असे समीकरणच जुळलेले आहे; मात्र सध्या सराफांनी आंदोलनामुळे दुकाने बंद ठेवल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. दुकान बंद आहे, हे माहिती असतानाही अनेक ग्राहक या दुकानांच्या बाहेर घुटमळताना बघायला मिळाले.

.....................

चौकट

गुढीपाडव्यानिमित्त मिरवणुका

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात असल्याने शहरातील विविध संस्था-संघटनांतर्फे मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भारतीय विद्यार्थी सेनेच्या निमंत्रक मनीषा धारणे यांच्यातर्फे पाडव्यानिमित्त पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी तुषार दोशी आणि शिवसेना उपशहरप्रमुख विशाल धनवडे यांच्या हस्ते या गुढीचे उद्घाटन झाले. या गुढीवर लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांची साडी आणि श्लोकांच्या पुस्तकांची गाठी आणि लेखकांचे फोटो लावले होते. या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, राधिका हरिश्चंद्रे, ज्योती साळुंखे, चंदन साळुंखे आदी उपस्थित होते.

माजी उपमहापौर आबा बागूल आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यातर्फे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या घरी शौर्य गुढी उभारण्यात आली. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या वेळी महाडिक यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा दिला. अमित बागूल यांच्यासह धनंजय कांबळे, सागर आरोळे, भरत तेलंग, बाबालाल पोलके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी निरनिराळे चित्ररथ केले होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा आढावा या चित्ररथांमध्ये घेण्यात आला होता. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. चित्ररथांमध्ये स्वच्छ भारत समर्थ भारत, झाडे लावा झाडे जगवा, जलयुक्त शिवार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता, श्रेष्ठ भारत रथ, स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्यावरण, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध विषयांवर आधारित देखावे सादर करण्यात आले होते.
....................

...............

तरुणाईची पुस्तक दिंडी

मांगल्याचे प्रतीक असणारी गुढी उभारून दिलेला सामाजिक संदेश... विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी...पारंपरिक वेशात सहभागी झालेली तरुणाई आणि पाणी जीवन आहे, असे सांगत पाणी बचतीची गुढी घेऊन सामाजिक संदेश देणाऱ्या चिमुकल्या अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी पुस्तक दिंडी निघाली. 'सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे' हे ब्रीद तरुणाईने गुढीपाडव्यानिमित्त या उपक्रमातून जपले.

गुढीपाडव्याच्या परंपरेला सामाजिकतेची जोड देत 'पाणी वाचवा' असा संदेश देऊन मैत्र युवा फाउंडेशनने गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. फाउंडेशनतर्फे 'गुढी पाणी बचतीची, गुढी परंपरेची, गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची' असा संदेश देत पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शि. द. फडणीस, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, चारुहास पंडित, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉ. राजन नाईक, 'बीएमसीसी'चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, स्वानंद लोमटे, चिंतामणी पटवर्धन, कल्पना वाघ, सुचेता फासे, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे या वेळी उपस्थित होते.

उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. कोथरूड बालसदन संस्थेतील अनाथ मुलींच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहापासून सुरू झालेल्या दिंडीत अश्वराज बँड, फुलांनी सजवलेली पालखी आणि तरुणाईचा मोठा सहभाग होता. महाराणा प्रताप उद्यानासमोर दिंडीचा समारोप झाला. तेंडुलकर म्हणाले, 'केवळ सण-उत्सवापुरतेच नव्हे, तर दररोज चांगले काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभक्षेत्राचे शिक्के काढणार

$
0
0

भामा-आसखेड धरणाचा डावा कालवा होणार नसल्याने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भामा-आसखेड धरणाचा डावा कालवा केवळ कागदावरच असल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांच्या सात-बारा उताऱ्यावरील पुनर्वसनाचे शेरे आणि लाभक्षेत्र वगळण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या धरणामध्ये जमीन गमावलेल्या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन मिळण्याचा मार्ग बंद होणार आहे.

भामा-आसखेड धरणाच्या बुडित क्षेत्रात जमीन गेलेल्या ३८८ धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये निकाल सरकारच्या विरोधात गेल्यास या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

भामा-आसखेड धरणामुळे १४१४ शेतकरी खातेदार विस्थापित झाले. त्यापैकी १११ खातेदारांनी ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमिनीची मागणी केली. त्यातील ११० खातेदारांना जमीनवाटप झाले आणि एका धरणग्रस्त खातेदाराला जमीनवाटपाचे काम सुरू आहे. धरणाच्या उभारणीनंतर खेडमधील चाकण परिसरात औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्यामुळे शेती कमी झाली. पर्यायाने शेतीसाठी लागणारे पाणीही थांबले. हा परिसर झपाट्याने विकसित होत गेल्याने धरणाचा डावा कालवा कागदावरच राहिला.

भामा-आसखेड धरणातून हवेली व दौंड तालुक्यातील २२ गावांना शेतीसाठी पाणी मिळणार होते. त्यासाठी या गावांतील जमिनींवर लाभक्षेत्राचे शेरे घालण्यात आले. ही जमीन धरणग्रस्तांना वाटप करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु डावा कालवा होणार नसल्याने या गावांना शेतीला पाणी मिळणार नाही. पाणी मिळणार नसल्याने जमिनींवरील शेरे व लाभक्षेत्र वगळण्याची मागणी संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारनेही लाभक्षेत्र वगळण्याची तयारी दाखवली. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयातून या गावांतील लाभक्षेत्र वगळण्याची व शेरे काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

.........

भविष्यात मोठा प्रश्न

या गावांतील लाभक्षेत्राच्या जमिनी वगळण्यात आल्यावर भविष्यात मोठा प्रश्न उभा राहणार आहे. पर्यायी जमीन मिळण्यासाठी ३८८ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर हायकोर्टाने संबंधित धरणग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमीन देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळली गेल्यास धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासाठी अडचण येऊ शकते. या धरणग्रस्तांना किमान दहा हजार हेक्टर जमीन द्यावी लागेल असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत पुन्हा क्लीन सिटीचा संकल्प

$
0
0


शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवडने 'शहर क्लीन'चा संकल्प पुन्हा एकदा जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या रविवारी (दहा एप्रिल) शहरात क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मोहिमेत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक संस्था, मंडळे, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, स्वयंसेवी संस्था सहभागी होतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन समितीची पालिकेत नुकतीच बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, विकास पाटील, आय. एम. मर्चंट, हिरामण भुजबळ, सुर्यकांत मुथीयान, सिकंदर घोडके, दत्तात्रेय भालेराव, बी. बी. कांबळे, प्रकाश गायकवाड, एस. गायकवाड, मंगेश जावरानी उपस्थित होते.
या बैठकीत पर्यावरण संवर्धन समितीतर्फे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठक घ्यावी, उद्यान आणि पर्यावरण विभागाने धोरण जाहीर करावे, राहत्या घराच्या सभोवताली कचरा करणाऱ्या नागरिकांना दंड आकारावा, चिकन सेंटर, न्हावी, हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणारे व्यापारी, चायनीज वाले, उसाचा रसवाले यांच्याबाबत नियंत्रण आणि कारवाईची भूमिका जाहीर करावी, पानाच्या टपऱ्या सभोवताली थुंकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, पावसाळ्यापूर्वीचे नालेसफाईचे काम आत्ताच चालू करावे, रोजचा कचरा मोठ्या कचरा कुंडीतच जाळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, भूगर्भात जल पुनर्भरण करण्यासाठी मोठ्या घर प्रकल्पांना अनिवार्य करावे आणि त्यांची गुणवत्ता तपासणी व्हावी, अशा सूचना समितीने केल्या आहेत.
आयुक्त राजीव जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील रिकाम्या भूखंडावर स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने मोहिमा राबविण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृतीसह मोहीम राबविण्यात आली. आता या पुढील काळातही कार्यरत राहून शहराचा स्वच्छतेसाठीचा लौकीक कायम राखण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. त्याला शहरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 'शहर स्वच्छतेसाठी एक तास' या पर्यावरण संवर्धन समितीच्या उपक्रमात पालिकेबरोबरच नागरिकांनाही सहभागी व्हावे. त्यासाठी ७७९८८११५१२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.
......
दहा एप्रिलला स्वच्छता अभियान
क्षेत्रीय कार्यालय / अभियानासाठी ठिकाण

अ / मुकाई चौक ते समीर लॉन्स, मुंबई-बंगळूर हायवे

ब / भूमकर चौक ते पवा नदी पूल, मुंबई-बंगळूर हायवे

क / एच. ए. मैदान दक्षिण आणि उत्तर बाजू

ड / पिंपरी पोलिस चौकीशेजारील ग्राउंड ते शगून चौक

ई / इंद्रायणीनगर, पोलिस लाइन मैदान

फ / सेक्टर १६ सीएनजी पेट्रोलपंपासमोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाची उद्दिष्टापेक्षाजास्त महसूल वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतजमीन महसूल, अनधिकृत बिगरशेती, गौण खनिज, करमणूक कर या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने यंदा ६५६ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. राज्य सरकारने पुणे जिल्ह्याला दिलेल्या ६२५ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा ३१ कोटी रुपये अधिक महसूल सरकारी तिजोरीत जमा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पुणे जिल्ह्याने प्रथम साडेसहाशे कोटी रुपयांच्या वसुलीचा टप्पा गाठला आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्याला ६२५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४६ टक्के महसूल डिसेंबर २०१५ अखेर वसूल झाला होता. त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये उद्दिष्टाच्या शंभर टक्क्यांहून अधिक महसूल गोळा करण्यात आला.
शेतजमीन महसूल, अकृषिक आकारणी, पोटहिस्सा, फाळणी फी यामधून प्रशासनाला तब्बल ३२२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. अनधिकृतपणे बिगरशेती वापर केल्याप्रकरणी चार कोटी रुपयांचा दंडही तिजोरीत जमा करण्यात आला. करमणूक कर विभागामार्फत डीटीएच, केबल कर, सिनेमा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नववर्ष व अन्य पार्ट्यांच्या माध्यमातून १३६ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी गौण खनिजातून ८९ कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी वाळू लिलाव व दगड खाणी आणि मुरुम- मातीवरील रॉयल्टी वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे १६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली.
...
करमणूक कर विभागामार्फत डीटीएच, केबल कर, सिनेमा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नववर्ष व अन्य पार्ट्यांच्या माध्यमातून १३६ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी गौण खनिजातून ८९ कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी वाळू लिलाव व दगड खाणी आणि मुरुम- मातीवरील रॉयल्टी वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे १६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पस्तिशीत टाइप २ मधुमेहाचे पेशंट जास्त

$
0
0

जागतिक आरोग्यदिनानिमित्त अभ्यासातील निष्कर्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बैठे कामाच्या पद्धतीमुळे पस्तिशी चाळिशीतील २५ ते३० टक्के नोकरदारांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक वाढला असून त्यांच्यात 'टाइप २' मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत. मधुमेहींमध्ये ७० टक्के पेशंटना बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे तसेच ३० टक्के पेशंटना अनुवंशिकतेमुळे मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वर्षभरात पुण्यातील पेशंटचा अभ्यास केला. पुणेकरांना मधुमेहाबरोबर रक्तदाब, हृदयविकार तसेच स्थूलपणाचा त्रास अधिक असल्याचे निष्कर्ष आढळून आले आहेत. आरोग्यास अपायकारक ठरणारी जीवनशैली, शारिरीक हालचालींचा अभाव, व्यायामाचा अभाव, आणि ताणतणाव या सारख्या कारणामुळे मधुमेहासह रक्तदाब, कॅन्सर, हृदयविकार असे जीवनशैलीशी निगडित आजाराचे प्रमाण वाढले आहेत. पुण्यातील नोकरदारांमध्ये लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील २३ हजार १४५ पेशंटचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी १३ हजार ९१७ पुरुषांचा सहभाग आहे. ९ हजार २२८ स्त्रियांचा समावेश आहे. पेशंटच्या अॅनेमिया, मधुमेह, हृदयविकार, अतिताण, व्हिटॅमिन १२, स्थूलपणा यांची तपासणी करण्यात आली. ३० ते ४० वर्ष वयातील जवळपास १५ ते २० टक्के पेशंटना उच्च कोलेस्टरॉलचा त्रास असून त्यामुळे हृदयविकारांचा व मधुमेहाचा धोका वाढला. ३५ टक्क्यांहून अधिक स्त्री पुरुषांना चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा आजार वाढल्याचे निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आले आहे.
मधुमेहाचा त्रास असलेल्या १५ ते १७ टक्के मध्यमवयीन व्यक्तींना कानाच्या आणि पायाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मद्यपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे स्त्री पुरुषांमधील मधुमेहाचा आणि स्थूलपणाचा धोका पाच टक्क्यांनी वाढला आहे. १० ते १२ टक्के नागरिकांना डायबेटिक रेटिनापॅथीचा त्रास होण्याची शक्यता आहे. पुण्यातील नोकरदार स्त्रिया, २० वर्षांच्या तरुण युवतीही पुरुषांपेक्षा अधिक धुम्रपान करतात. निकृष्ट आहार आणि आहारातील लोहाचा अभाव असल्याने पुण्यातील नागरिकांमध्ये अॅनेमिया आणि व्हिटॅमिनचा अभाव असल्याची समस्या आढळून आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेच्या ध्यासामुळेच प्रगती

$
0
0

पिंपरी : देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाच्या प्रक्रियेसाठी केंद्राच्या मनुष्यबळविकास मंत्रालयाने तयार केलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार (एनआयआरएफ) पुण्यातील भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीने चौथे स्थान पटकावले आहे. फार्मसीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या यादीत पहिल्या दहा संस्थांमध्ये आलेल्या या कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. आर. महाडिक यांनी या निमित्तानेच 'मटा'ला संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. महाडिक यांच्याशी योगेश बोराटे यांनी साधलेल्या संवादाचा हा गोषवारा...
..
'एनआयआरएफ'च्या रँकिंग प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतरचा अनुभव कसा होता ?
खरे तर या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच पारदर्शकता पाळली गेली. तसेच, रँकिंग जाहीर होईपर्यंत आम्हाला आमचे नेमके स्थान कितवे आहे, याची कोणतीही कल्पना नव्हती. मनुष्यबळविकास मंत्रालयाने रँकिंग जाहीर करण्यासाठी दिल्लीमध्ये एक अधिकृत कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर, कॉलेजचे नाव पुकारले गेल्यानंतर आम्हाला आमचे रँकिंग समजले. मानांकनासाठी शैक्षणिक संस्थांशी निगडीत वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. एखाद्या संस्थेने अगदी मोजक्या काळात केवळ मानांकन मिळविण्यासाठी म्हणून ठरवून प्रयत्न केले, तरी अशा संस्था या प्रक्रियेत टिकू शकणार नाहीत. सातत्यपूर्ण कामगिरी आणि गुणवत्तेचा ध्यास या बळावर हे रँकिंग निश्चित होत आहे. अशा प्रक्रियेत आम्ही पुढे आलो, हा आमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा मुद्दा आहे.
...
- राज्यातील पारंपरिक विद्यापीठे आणि इतर कॉलेज या 'एनआयआरएफ'च्या रँकिंगमध्ये मागे पडलेले असताना, आपल्या कॉलेजने या रँकिंगमध्ये स्थान कसे मिळविले ?
मुळात आमच्या कॉलेजमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम हे केवळ रँकिंगचाच विचार करून केले जात नाहीत, ही बाब या निमित्ताने मला नमूद करावीशी वाटते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू आणि कॉलेजचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या स्थापनेपासूनच आम्ही गुणवत्तेवर भर देत आलो आहोत. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात आमच्या कॉलेजला चौथे मानांकन मिळाले. यंदा पहिल्यांदाच हे रँकिंग होत असल्याने, आपल्याकडे अनेकांना त्या विषयीची पूर्वकल्पना नसावी. आम्ही सुरुवातीपासूनच त्यासाठी आवश्यक माहिती वेळोवेळी सादर केली. इतरांच्या तुलनेत आम्हाला या गोष्टीचा निश्चितच फायदा झाला आहे.
..
- कॉलेजमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आपण काय सांगाल ?
पूना कॉलेजमध्ये १९८१ साली बी. फार्म, तर १९८६ साली एम. फार्म सुरू झाले. आम्ही सुरुवातीपासूनच संशोधनावर भर दिला आहे. कॉलेजच्या प्राध्यापकांनाही आम्ही संशोधनासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच परिणाम की काय, कॉलेजला रुजू होताना सुरुवातीला केवळ एम. फार्म असणारे आमचे अनेक प्राध्यापक स्वतः पीएचडी केल्यानंतर सध्या आपल्या विद्यार्थ्यांनाही संशोधनासाठी मार्गदर्शन करत आहेत. संशोधनासाठी रुजू होतानाच, कॉलेजमध्ये केवळ आणि केवळ पूर्ण वेळ संशोधन करणाऱ्यांनाच आम्ही प्राधान्य दिले. कॉलेजमध्ये प्रत्येक विषयासाठी किमान पाच प्रयोगशाळा आहेत. प्रयोगशाळांमधील सुविधांचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि बाहेरच्या संस्थांनाही उपयोग होतो. सरकारी संस्थांसाठीही आम्ही संशोधनाशी निगडीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. औषध निर्मितीसाठीचे स्वतःचे यंत्र कार्यान्वित करणारे पूना कॉलेज हे पहिले ठरले होते. या सर्वच बाबींचा आम्हाला उपयोग होतो.
..
- औद्योगिक संस्थांसोबत सुरू असलेल्या कामांचा अनुभव कसा आहे ?
औषध निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ-मोठ्या कंपन्यांसोबतच आम्ही काम करत आहोत. आमचे अनेक विद्यार्थीही अशा कंपन्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या कंपन्यांसाठी नव्या औषधांसाठीचे मूलभूत संशोधन करण्यापासून ते अशा कंपन्यांना गरजेनुसार सल्ला- मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजमधील तज्ज्ञ आपली जबाबदारी पार पाडत आहेत. औद्योगिक कंपन्यांचा कॉलेज पातळीवर थेट संपर्क असल्याने आमच्या प्राध्यापकांमध्ये जवळपास प्रत्येकाकडे संशोधनपर प्रकल्प सुरू आहेत. औद्योगिक संस्थांसोबतच्या अशा प्रकल्पांचा कॉलेजच्या विकासासाठीही हातभार लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायन्स, कॉर्मसचे कॉलेज नाही

$
0
0

दुर्गम आदिवासी भागातील परिस्थिती; उच्च शिक्षणापासून विद्यार्थी वंचित
पुणे : सर्वांसाठी शिक्षण हा वसा घेतलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात आदिवासी दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील १३ आदिवासी आश्रमशाळांपैकी केवळ दोन आश्रमशाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज असून, तेथे केवळ आर्ट‍्स शाखेचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील १२० गावातील विद्यार्थ्यांना सायन्स व कॉमर्स शाखांचे शिक्षण घेता येत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील विद्यार्थीच तालुक्याच्या ठिकाणी किंवा पुण्यात शिक्षणासाठी येतात.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत (घोडेगाव) पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत एकूण २३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी १३ आश्रमशाळा या पुणे जिल्ह्यात असून, जुन्नर तालुक्यात सात आणि आंबेगाव तालुक्यातील सहा आश्रमशाळांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक व जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आश्रमशाळेत ज्युनिअर कॉलेज कार्यान्वित आहे.
आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पेसा कायद्याअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील ५६ व जुन्नर तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे सह्याद्रीच्या अतिदुर्गम भागात वसलेली आहेत. या गावांमधून दररोज तालुक्याच्या गावाला ये-जा करत कॉलेज करणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील मुले उच्चशिक्षणासाठी तालुक्याच्या गावी किंवा शहरात येतात. मात्र, परिस्थिती बेताची असलेल्यांना एक, तर नाइलाजास्तव आर्ट्सचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा दहावीनंतर शिक्षणच थांबवावे लागते, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, गोहे बुद्रुक व सोमतवाडी येथील आश्रमशाळांमध्ये विज्ञान शाखा सुरू करण्याची मागणी आदिवासी समाज कृती समितीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.
--------
मान्यतेअभावी कॉलेज बंद
गोहे बुद्रुक येथील शाळेतील विज्ञान शाखा शिक्षकांची बदली झाल्याने दोन वर्षांपूर्वी बंद झाली. तर, गेल्या वर्षी पुन्हा तेथे विज्ञान शाखा सुरू करण्याची जाहिरात करून, प्रवेश प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. तेव्हा १८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, कॉलेज सुरू होण्याच्या वेळेला विज्ञान शाखेला मान्यता न मिळाल्याने अभ्यासक्रम सुरू करता येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले होते.
---------
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना रुजविल्या जात आहेत. नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मात्र, आदिवासी मुलांना अद्याप विज्ञान शाखेचे शिक्षण देखील सहज उपलब्ध होत नाही.
- सीताराम जोशी, अध्यक्ष, आदिवासी समाज कृती समिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वायसीएम’ सेवेसाठी कि स्वार्थासाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण, स्वच्छतेचा मापदंड आणि आपुलकीचा झरा अशा प्रतिक्रियांनी एकेकाळी लौकीक मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) सद्यःस्थितीत अनागोंदी कारभाराने झाकोळले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, ढासळती रुग्णसेवा आणि चौकशीचा ससेमिरा या कारणांमुळे हे हॉस्पिटल सेवेसाठी आहे की स्वार्थासाठी तेच समजेनासे झाले आहे.
क्षयरोग तपासणी उपकरण खरेदीप्रकरणी राज्य सरकारने महापालिकेला सणसणीत चपराक दिल्यानंतर 'वायसीएम'मधील रुग्णसेवेचा दर्जा आणि भ्रष्टाचाराचे आरोप याबाबत आढावा घेतला असता अनेक आक्षेपार्ह बाबी स्पष्ट होतात. तपासणीसाठीचे यंत्रसामग्री असो किंवा औषध खरेदीची बाब असो या कारणास्तव 'वायसीएम' सातत्याने चर्चेत राहिले आहे. त्यामुळे रुग्णसेवेत लौकिक असतानाही या हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचारी संशयाच्या चक्रात अडकल्याचे दिसून येते. त्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयोग तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबविला. त्यांनी शहानिशा केल्यानंतर खरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्यावेळच्या द्विसदस्यीय समितीने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, क्षयरोग तपासणी उपकरण खरेदीच्या निविदा प्रक्रिया कामकाजात आढळलेल्या अनियमित बाबीस निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी आणि निवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २००७ मध्ये क्षयरोग तपासणी यंत्राची खरेदी मध्यवर्ती औषध व साहित्य भांडार वैद्यकीय विभाग यांच्यामार्फत झाली होती. या वेळी डॉ. आनंद जगदाळे वैद्यकीय अधिक्षक पदावर कार्यरत होते. त्यामुळे खरेदी प्रक्रियेमध्ये त्यांचा संबंध येत नाही, असा दावा डॉ. जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया आणि त्यातील अनियमितता तसेच मशिनची किंमत या बाबीशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. २०१४ मध्ये झालेल्या चौकशीत एचबीओटी मशीनची निविदा प्रक्रिया राबविण्यासून मशिन खरेदी करेपर्यंत संपूर्ण सहभाग डॉ. अय्यर यांचा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
'वायसीएम'मधील उपकरण खरेदीच्या मुद्यावरून माजी महापौर आर. एस. कुमार यांनी अनेकदा लक्ष वेधले आहे. सभागृहात पोटतिडकीने म्हणणे मांडलेले आहे. भ्रष्टाचार सभागृहासमोर आणूनही कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काही रुग्णांना रूबीकेअर मध्ये पाठविले तर ऑपरेशनच्या एका रुग्णामागे ५० हजार रुपयांचे कमिशन मिळत असल्याचा आरोपही कुमार यांनी सभागृहात केला होता. एक कोटी रुपयांचे मशीन तीन कोटी रुपयांना, दोन कोटींच्या टेंडरसाठी दहा कोटींची उपसूचना, ३६ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर आणि तितक्याच कोटींची उपसूचना अशा अनेक गंभीर बाबीही निदर्शनास आणून दिल्या. परंतु, त्याची किमान चौकशीही झाली नाही. त्यामुळे कुमारांना 'झिरो' ठरविण्यात आले तर अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे 'हिरो' ठरले. ठराविक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मिळून 'वायसीएम'ला किती लुटले? याविषयी न बोललेच बरे. त्याचा परिणाम आजच्या रुग्णसेवेवर नक्कीच झालेला दिसून येतो.
गरजूंसाठी आशेचा किरण आणि स्वस्तातील उपचार यामुळे 'वायसीएम'चा लौकीक होता. त्याला अलीकडच्या काळात धक्का पोचल्याचे दिसून येते. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी किंवा आयसीयूमध्ये दाखल करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. वशिल्याशिवाय दाखल करून घेतले जात नाही. रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. औषधे बाहेरून विकत आणण्यास सांगितले जाते. हॉस्पिटलमधील मोफत औषधे बाहेरील मेडिकलमधून विकत घेण्याची वेळ रुग्णांवर येते. अपवाद वगळता अनेक डॉक्टर मर्जीने वागतात. त्यांची खासगी हॉस्पिटल्स, दवाखाने जोरात चालतात. त्यामुळे 'वायसीएम' रुग्णांच्या सेवेसाठी आहे कि स्वार्थासाठी अशी शंका निर्माण होते. वास्तविक, सर्वसामान्यांच्या टॅक्सरूपाने जमा झालेल्या रकमेतूनच ही सेवा दिली जात आहे. त्यातच भ्रष्टाचार होत असेल तर दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यांना कोणी पाठीशी घालत असेल किंवा कायदेशीर पळवाटा काढून वाचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर चुकीचे आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनीही जागृत राहणे गरजेचे आहे. परंतु, तेच जर अनागोंदी कारभाराला पाठिंबा व्यक्त करत असतील आणि दोषांवर पांघरून घालत असतील तर उपयोगाचे नाही. त्यामुळेच राज्य सरकारला सर्वसाधारण सभेच्या निर्णयावर हस्तक्षेप करून गैरव्यवहाराच्या चौकशीबाबत आदेश देणे भाग पडले. आता तरी कारभार सुधारून निष्पक्षपातीने चौकशी व्हायला हवी. दोषींवर कारवाई व्हायला हवी. तसे न झाल्यास जनतेचा विश्वास गमविण्याची वेळ कारभारी आणि अधिकारी या दोघांवरही आल्याशिवाय राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा गांधी समजून घ्या

$
0
0

महात्मा गांधी समजून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'वेगवेगळ्या धर्मांतील चुका दाखविण्याचा राजकीय खेळ आपल्याकडे सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत धर्माची पुनर्मांडणी करताना धर्म ठरविण्यासाठी व्याख्या निश्चित करू पाहणारे आणि सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या धर्माची चिकित्सा करण्याची संधी देऊ पाहणारे महात्मा गांधी समजून घेणे गरजेचे आहे,' असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
दिवंगत राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत यांनी लिहिलेल्या 'महात्मा गांधींची विचारसृष्टी - काही अलक्षित पैलू' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पळशीकर यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी किशोर बेडकीहाळ, विजय दिवाण, 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. चैत्रा रेडकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्या वेळी डॉ. सुमंत यांचे गांधींविषयीचे लेखन आणि महात्मा गांधींचे कार्य या विषयी बोलताना डॉ. पळशीकर यांनी हे मत मांडले.
डॉ. पळशीकर म्हणाले, 'हिंदू धर्माच्या आधारे राजकारण करणारे आणि हिंदू म्हटले की अॅलर्जी वाटणारे दोन गट सध्या समाजात निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत गांधींचे कार्य विचारात घ्यावे लागते. गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करताना वसाहतवाद्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला होता. त्यांनी वसाहतवाद्यांना आव्हान देताना इंग्रजी शिक्षणाला, पुरुषप्रधानतेला, हिंसेला आव्हान दिले होते. त्यांनी आधुनिकतावाद्यांना विरोध केला. त्यातून गांधींना परंपरावाद्यांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, गांधींनी परंपरा कोणत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. सर्व धर्मांचा आदर करताना, स्वतःच्या धर्माची नागरिकांनी चिकित्सा करण्याची त्यांची भूमिका होती. ही धर्मांतर्गत धर्मचिकित्सा आजच्या काळात महत्त्वाची ठरेल.'
दोन ऑक्टोबरची सूतकताई किंवा आजच्या सफाई मोहिमांमधील प्रतिमांमध्ये अडकवून ठेवलेले गांधी खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी सुमंतांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले विवेचन मोलाचे ठरणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
दिवाण, बेडकीहाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या काळातील गांधी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांशी शास्त्रज्ञ ‘कम्फर्ट झोन’मध्ये

$
0
0

बहुतांशी शास्त्रज्ञ 'कम्फर्ट झोन'मध्ये

म.टा.प्रतिनिधी, पुणे
'देशात माहिती संशोधनाचे काम करणाऱ्या इस्रो, डिआरडीओ यांसारख्या संस्थांमधील व्यवस्थापकीय विभागाकडून उत्तम दर्जाचे काम होत नाही. हीच परिस्थिती त्या संस्थांमधील कर्मचारी आणि शास्त्रज्ञांची आहे. बहुतांशी शास्त्रज्ञांना एका 'कम्फर्ट झोन'मध्ये काम करण्याची सवय झाली आहे,' अशी टीका संरक्षणमंत्र्यांचे माजी सल्लागार आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी गुरुवारी केली.
प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) २९ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात डॉ. सारस्वत बोलत होते. मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड कम्प्युटेशनल सिस्टीम्सचे महासंचालक डॉ. के. डी. नायक, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. बी. के. मूर्थी, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते.
डॉ. सारस्वत म्हणाले, 'माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना नेहमीच निधीची कमतरता भासते. विविध प्रकल्पांवर काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या कमतरतांवर मात करून खूप कमी शास्त्रज्ञ काम करतात. शास्त्रज्ञांना एका कम्फर्ट झोनमध्ये काम करण्याची सवय झाली असल्याने देशासाठी काम करत आहे, ही भावना खूप कमी शास्त्रज्ञांची आहे. त्यामुळे सी-डॅकसारख्या संस्थांनी आणि संस्थेतील शास्त्रज्ञांनी उत्तम दर्जाचे काम केले पाहिजे.'
डॉ. नायक म्हणाले, 'जगात कम्प्युटराइज्ड डेटा प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहे. त्याचा अभ्यास, देखभाल करण्यासाठी यंत्रणा आणि प्र‍णाली पुरेशा प्रमाणात अस्तित्वात नाही. त्यामुळे सायबर सिक्युरिटी, इन्स्ट्रुमेंट डिटेक्शन, फॉरेन्सिक, सोशल मिडीया या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाहीत; तसेच देशात संशोधनामधील प्रगतीदेखील फार धीम्यागतीने सुरू आहे. १९८४ वर्षामध्ये भारत आणि चीनची स्थिती सर्व बाबींमध्ये साम्य होती. मात्र, चीनच्या प्रगतीची वाढ नावीन्यपूर्ण संशोधनात ३.५ ते २७ टक्क्यांपर्यंत झाली आणि भारताची केवळ ४.५ टक्क्यांपर्यंत झाली. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी संशोधन वाढण्याची गरज आहे.'
केंद्र सरकारकडून सी-डॅकसारख्या संस्थांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी भरघोस निधी दिला पाहिजे, असे डॉ. मूर्थी यांनी सांगितले.
प्रा. मूना यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दरबारी यांनी सी-डॅकची माहिती दिली. डॉ. सारस्वत यांनी 'मोडी लिपी शिका' ही अॅप आणि 'इनक्लस' आणि 'एमजीए व्ह्युवर' या सॉफ्टवेअरचे उद्घाटन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराच्या मदतीने केले मुलाचे अपहरण

$
0
0

प्रियकराच्या मदतीने केले मुलाचे अपहरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनैतिक संबंधांतून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या दीड वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि आपल्या पतीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. काळेपडळ परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुलिंग शांतय्या स्वामी (वय २९, रा. म्हसोबा कॉलनी, काळेपडळ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जितेश प्रकाश जगताप (वय २१, रा. हिंगणेमळा, हडपसर) आणि स्वाती गुरुलिंग स्वामी (वय २५, रा. म्हसोबा कॉलनी, काळेपडळ) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस​ निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली.
स्वाती ही गुरुलिंग स्वामी याची पत्नी आहे. तिचे जितेश जगताप याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. स्वाती आणि गुरुलिंग यांना दीड वर्षांचा मुलगा आहे. स्वाती तिचा मुलगा वीर याला घेऊन दोन एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार गुरुलिंग याने पोलिसांत दिली होती.
पोलिसांकडून त्या दोघांचा शोध सुरू असताना गुरुवारी गुरुलिंग याच्या मोबाइलवर फोन आला होता. फोनवर जितेश बोलत होता. मुलगा हवा असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा वेगळा विषय होईल, असे त्याने धमकावले होते. गुरुलिंगने तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जितेशने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन बोलावले होते. आरोपीने अखेर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन बोलावले होते.
पोलिसांनी सापळा रचून स्वाती आणि जितेश यांना अटक केली, तर वीरची त्यांच्या तावडीतून सुटका केली. स्वातीकडे केलेल्या तपासात तिला मुलाबाबत फारशी आस्था असल्याचे जाणवले नाही. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत मुलाची सुटका केल्याने फार काही गंभीर घटना घडली नाही. दोघांनाही अटक करण्यात आली असून, कोर्टाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images