Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मंदिर प्रवेश निर्णयाची अंमलबजावणी हवी’

0
0

पुणे : 'राज्यातील देवस्थानात महिलांना प्रवेश देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दीड तपाहून अधिक काळ पाठपुरावा केला होता. याबाबत हायकोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे,' अशी मागणी समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वात अंनिसने १९९८ मध्ये शनी शिंगणापूर देवस्थानाबाबत केल्या जाणाऱ्या चोरीच्या शिक्षेबाबतच्या चमत्कारांच्या दाव्याला आणि महिलांना मज्जाव करण्याच्या भूमिकेला आव्हान दिले त्याचबरोबर राज्यभर प्रबोधन संवाद यात्रा व जेलभरो आंदोलनही करण्यात आले,' असे पाटील म्हणाले.
'महिलांना मंदिरप्रवेश मिळावा, यासाठी अंनिसने २००२ मध्ये मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून शासन, धर्मादाय आयुक्त, शनी शिंगणापूर व कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाला प्रतिवादी केले होते. न्यायालयाने प्रतिवादींचे मत मागितल्यानंतर त्याची सुनावणी होऊ शकली नाही. शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अंनिसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती,' असे पाटील यांनी सांगितले. 'अंनिसच्या दीड तपाहून अधिक काळच्या लढ्याला यश आले,' असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण देऊ जगण्याचे

0
0

प्रणव बापट

घटना एक- फर्ग्युसन कॉलेज रोडला गुडलकच्या चौकात मी सिग्नलला थांबलेलो असताना भीक मागणारा एक तीन-चार वर्षांचा मुलगा माझ्याजवळ आला. अशा वेळी मी कधीच पैसे वगैरे देत नाही; कारण आपण चार दोन रुपये दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही हे मला पक्के माहिती आहे. पण त्या मुलांनी हात पाय धरल्यावर प्रत्येक वेळी मी स्वतःचीच हार झाल्यासारखी गाडी पुढे घेतो. अशीच गाडी मी पुढे घेतली. मग तो मुलगा दुसरीकडे भीक मागायला गेला. तिथे एका बाइकवर दोन मुले बसलेली. पोराने भीक मागितली की त्या बाइकवर मागे बसलेला मुलगा त्या मुलाकडेच त्याच्यासारखी तोंडे वेडीवाकडी करत भीक मागत होता आणि आपण जे काही करतोय ते फार भारी आहे असे वाटून की काय; पण ते दोघेही खिदळत होते. सिग्नल सुटेपर्यंत हे सारे असेच सुरू होते. घटना दोन - राजाराम पुलाच्या सिग्नलला घडलेली ही घटना. इथेही लहान लहान मुले भीक मागताना कायम दिसतात. असेच एकदा सिग्नलला थांबलो होतो. त्या वेळी शेजारच्या गाडीवरच्या पहिली दुसरीतल्या मुलाने त्याच्या आईला विचारलं, 'ही मुलं भीक का मागतात?' त्या बाईंचं म्हणाल्या, 'स्कूलमधील मॅथ्सचं होमवर्क कम्प्लिट केलं नाही तर असं होतं.' त्या बाईंचे उत्तर ऐकून मी अवाक झालो आणि मला हसावे की रडावे ते समजेना. सिग्नल सुटला. पण त्या बाईचे उत्तर काही डोक्यातून जाईना. घटना तीन- राजाराम पुलाचाच सिग्नल. भीक मागणारी ती लहान मुलगी केव्हाची एका फूटपाथवर उभ्या असलेल्या बाईकडे भीक मागत होती. बाई काही देत नाहीत हे बघून त्या तीन-चार वर्षांच्या मुलीने असेल नसेल, त्या शक्तीनिशी त्या बाईच्या हातातल्या पिशवीवर फटका मारला, ती पिशवी नुसती ओढली आणि पळून गेली. पहिल्या घटनेमुळे मला काही कारण नसताना राहून राहून अजूनही लाज वाटते आहे. भीक मागणे हे कोणीच स्वखुशीने स्वीकारत नसावे. हे मला कळते तर माझ्याच वयाच्या त्या दोन मुलांना का नाही कळाले? जरी भिकारी असला तरी एक व्यक्ती म्हणून, एक आपल्याचसारखा जिवंत माणूस म्हणून आपण त्यांना किंमत देऊ शकत नाही का? ना आपण पैसे दिल्याने प्रश्न सुटणार आहे, ना दुर्लक्ष केल्याने. असे म्हणूयात हवे तर की हा प्रश्न सोडवणे एका व्यक्तीच्या शक्तीबाहेरचे आहे. त्यासाठी एक अत्यंत कार्यक्षम यंत्रणा हवी जी बहुधा आता तरी अस्तित्वात नसावी, कारण असती तर जिथे तिथे भीक मागणारी लहान लहान मुले शहरात दिसली नसती. पण किमान त्यांची संवेदनशीलतेने दखल घेणं आपल्याला जमू शकणार नाही का? दुसऱ्या घटनेत तर मला खरोखर हसावे की रडावे कळेना. बाईंची भाषा, व्याकरण, उच्चार तूर्तास बाजूला ठेवूया. आपण एका नव्या पिढीसमोर नेमके कसले चित्र उभे करतोय, हे बाईंना कळलेच नाही का? मुलाला पडणारा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण दिसायला त्याच्याच एवढा असला, तरी दोघांच्या जगण्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. एकाची आई कॉलनीतला रहदारी नसलेला रस्ताही एकट्याला ओलांडू देत नाही आणि दुसरीकडे सुसाट पळणाऱ्या वाहनांच्या गर्दीत घुसून हात पसरल्याशिवाय, रडल्याशिवाय त्यांची दोन घासांची भ्रांत मिटायची नाही. जगण्यामधला विरोधाभास खरोखर इतका परस्परविरोधी असू शकतो, हे सत्य कधी कधी किती अंगावर येते नाही? विरोधाभास अंगावर वगैरे येणे फार दूर राहिले; पण तो जाणवण्यासाठी मुळातच आपल्यापैकी प्रत्येकाजवळ संवेदनशीलता असणे फार गरजेचे आहे. सहा-सात वर्षांच्या मुलाकडून हा प्रश्न आल्यानंतर पाच मिनिटे गाडी बाजूला घेऊन, भीक मागणाऱ्या मुलाचे निरीक्षण करायला लावून त्याला कळेल अशा भाषेत जर आहे ती परिस्थिती इतक्या कोवळ्या वयात त्याच्यापर्यंत पोहोचली तर पोराची त्यांची चेष्टा करायची जन्मात कधी हिंमत होणार नाही. 'मॅथ्सचं होमवर्क' नाही पूर्ण झालं तरी चालेल; पण जगण्याची गणितं सोडवण्याचा हा होमवर्क तेव्हा व्हायलाच हवा होता. तिसरी घटना मात्र मला अजूनही डोक्यातून बाजूला करता आलेली नाही. इच्छा कुणाला नसतात? चांगलेचुगले खायची इच्छा, चांगले राहायची, चांगले कपडे घालायची इच्छा, अशा किती तरी इच्छा आपल्याला होतात. काही वेळा सर्वच इच्छा पूर्ण होत नाहीत, पण त्या पूर्ण होणार नाहीत हे कळलं की आपल्याला राग येतो, खंत वाटायला लागते, केविलवाणी असहाय्यता उरते. त्या मुलीच्या पिशवीवर जोरात हात मारण्यामागे हे सारे मला दिसले. आजही काही खायची इच्छा झाली तरी आपल्या आया-आज्या तत्पर असतात, बाहेर हजारो रुपये घेऊन खायला घालणारी रेस्तराँ आहेत. वर आपले नखरे काही कमी नाहीत की सुरमई खायचा तर अमुक इथलाच, मग त्यासाठी पंचवीस किलोमीटर गाडी मारावी लागली तरी चालेल. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शब्दशः दोन घास मिळतील की नाही असे असणारे लोक आहेत. ते पाहिले की पंचवीस किलोमीटर जाऊन समोर आलेला सुरमई गोड लागत नाही. 'आता त्यांना मिळत नाही यात आपला काय दोष' असे साधसुधे, निरागस आणि खोटे स्पष्टीकरण देणारे अनेक आहेत. दोष ना आपला ना त्यांचा. पण तो आहे हे जाणवणे महत्त्वाचे. समाजातल्या प्रत्येक प्रश्नाकडे आपणही त्या समाजाचाच एक भाग आहोत, हे लक्षात ठेवून बघण्याची मुळातच गरज आहे. नुसते हळहळणे, कीव येऊन चार दोन शब्द एसी कारच्या बंद खिडक्यांमागून बोलणे कुठे तरी थांबायला हवे. अनेकदा आपण काय करणार, त्याने प्रश्न सुटणार आहेत का? असे वाटते. पण मुळात प्रश्न आहेत, हे समजले तरी काम खूप सोपे होईल. आपण आणि आपल्या भोवतीचा कोश यापलीकडेही एक जग आहे. ते जितके सुंदर आहे तितकेच ते कुरूपही आहे. सौंदर्य पटकन दिसते; पण आपल्याभोवतीचा तो कोश तोडून, डोळ्यावरची झापडे बाजूला करून सौंदर्याप्रमाणेच त्या कुरूपतेकडेही पाहता आले, तर जगणे समृद्ध होईल आणि मग माणूस म्हणून जगणे अधिक सुंदर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाणे ऐका...

0
0

संतोष घाटपांडे पुणे ः सध्या सगळीकडे परीक्षांची धामधूम चालू आहे. मात्र येत्या काही दिवसांत मुलांना सुट्ट्या लागतील आणि मग पालकांची त्यांना गुंतवून ठेवण्याची परीक्षा सुरू होईल. यामध्ये मुख्यतः विविध छंद वर्ग मदतीला येतात. संगीताकडे आजपर्यंत एक कला म्हणून आपण पाहत आहोतच. पण त्याहीपुढे जाऊन संगीत मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचे ठरू शकते, असे संशोधनामधून समोर आले आहे. आतापर्यंत संगीत हा विषय केवळ एक छंद म्हणून बघितला जात होता व त्याला इतर शैक्षणिक विषयांपेक्षा थोडेसे दुय्यम स्थान मिळत होते. परंतु जागतिक पातळीवर होणारे संशोधन लक्षात घेता ही परिस्थिती बदलू लागली आहे. आईच्या गर्भात असल्यापासून बाळांचा संगीताशी परिचय होत असतो आणि असे आढळून आले आहे की ज्या मुलांना अगदी लहान वयात संगीताची ओळख होते त्यांच्या इतर अनेक क्षमतांमध्ये (उदा. एकाग्रता, स्मरणशक्ती) वाढ झालेली दिसून येते. पुढे जाऊन असेही संशोधन झाले आहे की अशा मुलांमध्ये गणितज्ञ किंवा शास्त्रज्ञ होण्याची क्षमता इतर मुलांपेक्षा जास्त आढळून येते. मानवी मेंदूचे ढोबळमानाने डावा मेंदू व उजवा मेंदू असे दोन भाग पडतात व या दोन्ही मेंदूच्या क्षमता वेगवेगळ्या असतात हे आपल्याला माहिती आहेच. फार कमी क्रियांमध्ये डावा व उजवा मेंदूची क्षमता एकत्रितपणे वाढविण्यची शक्ती असते आणि संगीत ही अशीच एक क्रिया आहे. नुसते गाणे ऐकताना सुद्धा मेंदूचे दोन्ही भाग कार्यरत होतात. प्रयोगाअंती असे सिद्ध झाले आहे, की गाणे गाताना किंवा कुठलेही वाद्य वाजविताना मेंदूमधील तब्बल १७ केंद्रे जागृत होतात. याचबरोबर लहान मुलांसाठी कुठलाही सांगीतिक अनुभव मेंदूच्या वाढीमध्ये व पर्यायाने विविध इंटेलिजन्स कोशंट (Intelligence Quotients) वाढविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हे सर्व लक्षात घेता संगीताचा मुलांच्या क्षमता वाढीशी असणारा परस्पर संबंध आपल्याला लक्षात येईल. केवळ सुट्टीमध्येच नाही तर मुलांच्या दैनंदिन रुटीनमध्येसुद्धा सांगीतिक अनुभव किंवा सांगीतिक क्रिया यांचा समावेश आवर्जून केला गेला पहिजे. यासाठी मुलांच्या पालकांनी खाली दिलेल्या मुद्द्यांचा विचार केला तर हे सहज शक्य आहे. १. मुलांसाठी कुठलीही गोष्ट खेळांच्या माध्यमातून केली, तर ती कंटाळत नाहीत त्यामुळे मुलांशी आपण विविध सांगीतिक खेळ खेळू शकतो. उदा. गाण्याच्या सुरुवातीवरून गाणे ओळखा किंवा शब्द न म्हणता केवळ ला ला ला अशी चाल म्हणून गाणे ओळखा, रोजच्या संवादामधील वाक्यांना गाण्याची चाल लावा, संगीता च्या तालावर हालचाली असे कितीतरी सांगीतिक खेळ सुचू शकतात. २. लहान वयामध्ये मुलांना विविध वाद्ये हाताळू द्यावीत व त्यापासून त्यांना रोखू नये. सामान्यतः पालक वाद्य तुटेल या भीतीने मुलांना हात लावू देत नाहीत परंतु मूल जेव्हा वाद्य हाताळून ते वाजविण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती क्रिया मेंदूच्या क्षमता वाढविण्यासाठी मोलाची मदत करते. ३. मुलांना लहान वयात विविध सांगीतिक अनुभव द्यायचा प्रयत्न करावा. विविध प्रकारचे संगीत (शास्त्रीय, चित्रपट संगीत, भावगीते, बालगीते, वेस्टर्न म्युझिक (Western music) त्यांना ऐकविले जाईल याकडे लक्ष द्यावे. तसेच विविध सांगीतिक मैफिलींना मुलांना घेऊन जावे जेणेकरून संगीत त्यांना प्रत्यक्ष अनुभवता येइल. ४. सध्या लहान मुले संगीत 'ऐकत' नाहीत तर 'पाहतात' व बरोबरीने ऐकतात. असे केल्यामुळे मुलांचे क्रिएटिव्ह इमॅजिनेशिन (creative imagination) कमी होऊ शकते त्यामुळे शक्यतो संगीत ऐकण्याकडे जास्त कल ठेवला पहिजे म्हणजेच म्युझिकल व्हिसीडीपेक्षा ऑडिओ सीडीला प्राधान्य दिले पहिजे. ५. पालकांनी संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. शाळेतून शिकवलेली बालगीते घरी म्हणून दाखविण्याची सक्ती मुलाला करताना, पालकांनी आपण स्वतः त्या मुलासमोर अथवा घरी सहज कधीतरी गाणे मोठ्याने म्हटले आहे का, याचा मनोमन विचार करावा. मुलांच्या सांगीतिक प्रवासात पालक गात गात सहभागी झाले, तर तो प्रवास निश्चितच जास्त आनंद देणारा व पालक-मुलांच्या नात्याचा गोफ घट्ट विणणारा ठरेल.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुनवडी ते भीमथडी’ची चाळिशी

0
0

दौंड-पुणे शटलला १२ एप्रिलला ४० वर्षे पूर्ण; दौंड स्टेशनवर वर्धापनदिनाचा कार्यक्रम
पुणे : गेल्या चार दशकांपासून दौंड आणि पुणे या दोन शहरांमध्ये नागरिकांचे शिक्षण, नोकरी, व्यवसायामध्ये वर्षानुवर्षे ऋणानुबंध निर्माण करण्यात मैलाचा दगड ठरलेली दौंड-पुणे शटल येत्या १२ एप्रिलला एक्केचाळिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. सुरुवातीला पाच डबे आणि वाफेच्या इंजिनानिशी सुरू झालेली ही शटल अर्थात प्रवाशांची 'फुलराणी' सध्या तेरा डब्यानिशी डौलात धावत असून आपल्या दीड-पावणेदोन तासांच्या प्रवासात या दोन शहरांतील नाते जुळविण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भीमा नदीकाठचा परिसर असलेल्या दौंडहून १९७०च्या सुमारास विविध कामांनिमित्त पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने वेगळ्या रेल्वेगाडीची मागणी होत गेली. त्यानंतर दौंड-पुणे शटलसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरवले. १२ एप्रिल १९७६ रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी तत्कालीन आमदार उषा जगदाळे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सुरू झालेला हा प्रवास आजतागायत कायम आहे. डेक्कन क्वीनप्रमाणेच या गाडीशीही प्रवाशांचे अनोखे नाते जुळले आहे.
त्यानंतर दौंड व्यतिरिक्त दौंड-पुणे रेल्वेमार्गावरील पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरळी, लोणी, मांजरी, हडपसर या रेल्वेस्थानकांहून शटलमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. प्रवाशांची संख्या वाढत गेल्याने शटलच्या डब्यांची संख्या पाचहून आठ, नऊ, दहा, बारा आणि तेरा अशी करण्यात आली. रेल्वे विभागात डिझेल इंजिन आल्यानंतर वाफेवरचे इंजिन काढून डिझेलवरचे इंजिन लावण्यात आले. त्यामुळे शटलचा वेग वाढला. सुरुवातीला शटलला दौंड ते पुणे या प्रवासाला साधारण दोन तास कालावधी लागत होता. काहींच्या मते या प्रवासाला दीड तासांचा कालावधी लागत होता. आता तो कालावधी कमी झाला आहे.
मध्यंतरी या शटलमधून अधिक प्रवाशांना जाता येण्यासाठी डबल डेकर शटल सुरू झाली. मात्र, प्रवाशांना हा बदल फारसा न पटल्याने त्यांच्या मागणीनुसार ती पूर्ववत करण्यात आली. पुणे विभागात प्रवाशांमध्ये शटलची लोकप्रियता वाढल्याने तिचा विस्तार एकीकडे दौंडपासून बारामतीपर्यंत, तर दुसरीकडे पुण्यापासून कर्जतपर्यंत करण्यात आला. तरीही ती दौंड-पुणे शटल या नावानेच अद्याप प्रसिद्ध असून सुरू झाल्यापासून अविरत नियोजित वेळापत्रकापणे धावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रा. ना. चव्हाणांचा वारसा

0
0

अक्षर श्रद्धांजली हा खूपच विधायक प्रयत्न आहे, यामागची प्रेरणा काय आहे ?
वडिलांचे १० एप्रिल १९९३ रोजी निधन झाले. त्यांचे लिखित साहित्य खूप मोठ्या प्रमाणात होते, पण ते प्रसिद्ध झाले नव्हते. प्रकाशक व संपादकांसाठी खूप प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही. शेवटी मी व माझ्या पत्नीने यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले. आपल्याकडे वैचारिक साहित्याची ही अडचणच आहे, कोणीच पुढे येत नाही. वडिलांची ६० वर्षात फक्त सात पुस्तके प्रसिद्ध झाली. पण अप्रकाशित साहित्य खूप होते.
...
बँक व्यवस्थापक ते संपादक हा तुमचा प्रवास कसा होता ?
मी युनायटेड वेस्टर्न बँकेतून व्यवस्थापक या पदावरून २००२ मध्ये सेवानिवृत्त झालो. मी बँकिंग क्षेत्रातील असल्याने माझा या क्षेत्राचा अभ्यास नव्हता. माझे वाचन सुरू होते, त्यामुळे काही गोष्टी कळत गेल्या. पुढे वाचन वाढवले. पण लेखनाचा काही अनुभव नव्हता. असे असतानाही मी थेट संपादनाच्या प्रक्रियेत उतरलो. विचारांच्या शिदोरीवर हे साध्य करू शकलो.
..
- रा. ना. चव्हाण यांच्या साहित्याविषयी काय सांगाल ?
वडिलांच्या लिखाणाची सूची तयार करण्यात आली आहे. अशी सूची एकाही पुरोगामी लेखकाची नाही. आत्तापर्यंत ६०० लेख व सात हजार पाने प्रकाशित झाली आहेत. एवढेच साहित्य प्रकाशित व्हायचे बाकी आहे. वडिलांचे सर्व साहित्य मीही वाचलेले नाही. टप्प्याटप्प्याने वाचन होते, व त्यातून पुस्तक साकारते. रा. ना. चव्हाण लिहायचे त्या काळात बहुजन समाज व मराठा समाज वैचारिक साहित्यापासून बराच लांब होता. रा. ना. चव्हाण यांचे वैचारिक साहित्य आजही दिशादर्शक ठरू शकते. त्यावर संशोधक व्हायला हवे. आम्ही हे टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ही जबाबदारी विद्यापीठाने घ्यायला हवी.
..
- वैचारिक साहित्याची उपेक्षा होत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते का ?
आमचा यामध्ये कोणताही व्यावसायिक हेतू नाही. व्यावसायात आम्ही यशस्वी होऊ की नाही, हा विचार कधी नव्हताच. वडिलांची कायम उपेक्षा झाली. त्यामुळे किमान त्यांना 'अक्षर श्रद्धांजली' वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनादिवशी त्यांच्या लिखाणाचे एक पुस्तक प्रकाशित करणे एवढाच शुद्ध हेतू यामध्ये आहे. या साहित्यातून आता डी. लिट. मिळवणारे विद्यार्थी घडत आहेत. एकाला डी. लिट. मिळाली आहे तर पाच विद्यार्थ्यांचा साहित्याचा अभ्यास सुरू आहे. मला हे साहित्य आजच्या काळाशी जोडून पाहायचे आहे.
- रा. ना. चव्हाण यांना जाहीर झालेली डी. लिट. का मिळाली नाही ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. जाहीर केली. पण त्यांना मिळाली नाही. पुढे मरणोत्तर मिळावी म्हणून प्रयत्न केले, पण ही पदवी मिळू शकली नाही, त्यालाही आता २५ वर्ष पूर्ण झाली. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू असताना त्यांनी प्रयत्न केले. या विषयासाठी नेमलेल्या समितीने 'ही गंभीर चूक असून डी.लिट प्रदान करायला हवी,' असा अहवाल दिला, पण हा विषय पुढे सरकू शकला नाही. विद्यापीठाला काय अडचण आहे, सांगता येत नाही.
..
रा. ना. चव्हाण यांच्यावर घरातूनच मोठा संस्कार झाला. एकंदरित पार्श्वभूमी कशी होती ?
- वडिलांवर घरातून सत्यशोधक विचारांचे संस्कार झाले. आमचे आजोबा नारायण कृष्णाजी चव्हाण हे वाई येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. त्या काळी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आमच्या घरी चार महिने राहिले होते. त्यांनी तेथूनच वाई ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हा वारसा वडिलांनी घेतला. ते महर्षींचे शिष्य झाले. ते १३ वर्ष त्यांच्या बरोबर होते. ते पुढे हस्तलिखित मासिकात लिहू लागले. 'तू बहुजन समाजाच्या बाजूने लिहित राहा,' असे महर्षींनी त्यांना सांगितले. तेव्हापासून ते १९९३ पर्यंत लिहित राहिले. दरम्यान १९४४ नंतर ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बरेच लिखाण केले, पण ते गहाळ झाले. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी महात्मा फुलेंवर केलेल्या मार्मिक टीकेला बरीच वर्षे कोणी उत्तर दिले नव्हते. उत्तर देणार लिखाण आपण केले तर ते स्वीकारले जाईल का? ही भीती वडिलांना होती. म्हणून त्यांनी तर्कतीर्थांबरोबर 'ज्योतिनिबंध' हे पुस्तक लिहले. वडिलांना कधी प्रस्थापितांचे व्यासपीठ मिळाले नाही. १९७० नंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीपंपांना होणारा वीजपुरवठा खंडित

0
0

शेतीपंपांना होणारा वीजपुरवठा खंडित

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालल्याने धरणाकाठच्या गावांमधील शेतीपंपांना होणारा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या या निर्णयाचा पुणे जिल्ह्यातील १४० गावांना फटका बसणार आहे.
अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरमांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठाही आटत चालला आहे. त्यामुळे धरणांतील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनी धरणाकाठच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उजनी धरणातून सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि शेतीपंपांना पाणी देण्यात येते. या धरणात सद्यस्थितीत ४७ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा धरणाच्या उपयुक्त साठ्यापेक्षा सोळा टक्के कमी आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने पाण्याची मोठी गरज भासणार आहे. या पाण्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे बैठक झाली. या बैठकीला सोलापूर, नगर व पुण्याचे जिल्हाधिकारी; तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उजनी धरणाच्या काठावर असलेल्या गावांमध्ये सुमारे सात हजार ४४ शेतीपंप आहेत. या शेतीपंपांद्वारे उपसले जाणारे पाणी थांबविण्याची मागणी होत आहे. धरणातील पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्या दृष्टीने काही निर्णय गरजेचे होते. धरणातील पाण्याचा वापर करणाऱ्या गावांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच काही पंपांना आठ तास होणारा वीजपुरवठा दोन तासांवर आणावा, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. तसे आदेश महावितरण कंपनीला दिले देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील १४० गावांच्या पाणी पुरवठा योजना आणि शेतीवर परिणाम होणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
..
पुण्यातून पाणी सोडल्याचा फायदा नाही
पुणे जिल्ह्यातील चासकमान व भामा-आसखेड धरणांमधून उजनी धरणात तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला होता. त्यानुसार उजनीमध्ये पाणी सोडण्यातही आले. प्रत्यक्षात त्यातील एकच टीएमसी पाणी उजनीत पोहोचले व दोन टीएमसी पाण्याचा वहननाश झाला. शेतीसाठी हे पाणी सोडण्यात आले होते. पुण्यातून दोन टीएमसी पाणी सोडल्याने त्याचा फटका पुणे जिल्ह्याच्या शेतीला बसला आमि उजनीलाही त्याचा पुरेसा फायदा होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत मोरे यांच्या घरावर दगडफेक

0
0

वसंत मोरे यांच्या घरावर दगडफेक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कात्रज येथील नगरसेवक वसंत मोरे यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दगडफेक आणि हल्ल्यात एकजण जखमी झाला असून, एक रिक्षा आणि दुकानाचे नुकसान झाले आहे.
नंदकुमार मोरे (रा. कात्रज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजू लाटने, शंकर कोंढाळकर, बाळा माने, मॅडी तूपसुंदर, अप्पू बहिरट, स्वप्नील बहिरट आणि इतरांविरुद्ध हाणामारी, दंगल माजवणे, कोयत्याने वार करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
'माझे बंधू नंदकुमार यांचा विटांचा ट्रक; तसेच माझ्या मामाचा मुलगा राजू लाटने याच्या पाण्याच्या टँकरवरील चालकांमध्ये वाद झाला होता. या वादादरम्यान माझा पुतण्या तेथे गेला. त्याला लाटने याने शिवीगाळ केली. माझे बंधू नंदकुमार तेथे गेले आणि त्यांनी वाद मिटवले. त्यानंतर आरोपींनी अचानक मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हातात तलवारी, कोयते; तसेच सिमेंटचे ब्लॉक घेऊन हल्ला केला. या वेळी दोघांवर हल्ला झाला. त्यातील एकाच्या हाताचे बोट तुटले. सचिन खिंवसरा यांना दगड मारून जखमी केले, तर दुकानाच्या लोखंडी शटरवर कोयत्याने वार केले. या वेळी झालेल्या दगडफेकीत कुंडलिक जवळकर यांच्या रिक्षाची काच फुटली,' अशी माहिती नगरसेवक मोरे यांनी दिली.
या घटनेनंतर लगेचच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, त्यांना तत्काळ अटक करण्यात येईल, असे सुर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका स्वबळावर लढण्याचे भाजपचे संकेत

0
0

महापालिका स्वबळावर लढण्याचे भाजपचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महापालिकेची आगामी निवडणूक शतप्रतिशत भाजप या तत्त्वाने जिंकून पालिकेत भाजपचीच सत्ता आणायची. मात्र, मित्रपक्षाच्या प्रतिसादावरच युती अवलंबून असेल. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहणार आहोत,' असे विधान करत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मंगळवारी दिले. 'पालिकेत युती नव्हतीच, असे म्हणणे 'त्यांच्या' एकूण कार्यपद्धती व रचनेला धरूनच आहे,' असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.
'आगामी निवडणुकीनंतर पालिका पक्षाच्या ताब्यात असली पाहिजे,' असे धोरण असून युतीबाबत निर्णय झालेला नाही. निवडणुकीवेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल, पण कार्यकर्त्यांची मनस्थिती व मित्रपक्षाच्या प्रतिसादावरच युती अवलंबून असेल. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहणार आहोत,' असे गोगावले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पालिकेत एकत्र नांदणाऱ्या भाजप आणि शिवसेना युतीचा संसार संपुष्टात आला आहे. महापालिका स्तरावर यापुढे शिवसेनेचे सहकार्य घेणार नाही, असे भाजपतर्फे नुकतेच स्पष्ट करण्यात आले. त्यावर शिवसेनेकडून 'युती कधी नव्हतीच,' असे विधान करण्यात आले होते. याबाबत गोगावले यांना विचारले असता त्यांनी आश्चर्य व्यक्त केले व हे त्यांच्या रचनेलाच धरून असल्याचा टोला गोगावले यांनी लगावला.
दरम्यान, 'आज (बुधवार) भाजपचा वर्धापनदिन असून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शहरातील १२७ चौकांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे,' असे गोगावले यांनी सांगितले.
................
बैठक होत नसल्यानेच...
'मेट्रो प्रकल्प तातडीने मंजूर व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. सरकारने प्रकल्प लांबवला, असा कांगावा दोन्ही काँग्रेसकडून करण्यात येतो. त्यामध्ये तथ्य नाही. दोन प्रकल्पांपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा,' अशी भूमिका योगेश गोगावले यांनी मांडली. 'शहरात सर्वत्र रस्ते खोदाई सुरू आहे. रस्त्यांची कामे आवश्यक असली, तरी त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे. नवीन रस्ता १५ दिवसांत उखडला जातो. समन्वय समितीची बैठक होत नसल्यानेच हे होत आहे,' असा आरोप गोगावले यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा टीएमसी पाणी ‘उडाले’

0
0

सव्वा टीएमसी पाणी 'उडाले'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील सुमारे सव्वा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. एप्रिल व मे महिन्यात आणखी एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत सद्यस्थितीत २२ टक्के म्हणजे ६.४९ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
अपुऱ्या पावसामुळे धरणामध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. धरण शंभर टक्के न भरल्याने शेतीच्या पाण्यात कपात करण्याबरोबर शहरातही दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठ्याच्या नाजूक स्थितीमुळे शेतीला उन्हाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याचे आवर्तन रद्द करण्यापर्यंत पावले उचलण्यात आली आहेत.
खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचे पाणी आता फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत शिल्लक ठेवण्यात आला आहे; परंतु बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत उन्हाचा पारा वाढत गेला. परिणामी या दोन महिन्यांत जवळपास सव्वा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले.
उन्हाळ्याचे एप्रिल व मे हे दोन महिने उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. एप्रिल महिन्यात सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअस आणि मे महिन्यात ३५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. या दोन महिन्यांमध्ये आणखी एक ते सव्वा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. धरणांत सद्यस्थितीत ६.४९ टीएमसी पाणी असले, तरी त्यातील एक टीएमसी पाणी बाष्पीभवनात जाणार आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंतच्या साडेतीन महिन्यांसाठी धरणांत पाच ते सव्वापाच टीएमसी पाणी राहील असा अंदाज आहे. शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाणी द्यावे लागत आहे; तसेच शहरालगतच्या ग्रामपंचायती, एनडीएसारख्या लष्करी संस्था, नांदेड व अॅमनोरा सिटी यांना धरणांत पाणी द्यावे लागते. त्यामुळे शहराला चार ते सव्वाचार टीएमसी पाणी मिळू शकते. या पाण्यात पुढील साडेतीन महिने शहराला काढावे लागणार आहे. त्यातच ग्रामीण भागातून पिण्यासाठी पाण्याची मागणी झाल्यास कठीण प्रसंग उदभवू शकतो. कदाचित शहराचा पाणीवापर आणखी कमी करावा लागण्याची शक्यता आहे.
..
धरणांतील पाणीसाठा
पानशेत- ४.१९ टीएमसी (३९.३२ टक्के)
वरसगाव- १.४५ टीएमसी (११.३४ टक्के)
टेमघर- ०.२७ टीएमसी (७.१९ टक्के)
खडकवासला- ०.५० टीएमसी (२९.६७ टक्के)
यंदाचा एकूण साठा- ६.४९ टीएमसी (२२.२७ टक्के)
गतवर्षीचा याच काळाताली साठा- ११.१२ टीएमसी (३८.१६ टक्के)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र आयुक्तालयासाठी निकष तपासणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडसाठी स्वंतत्र पोलिस आयुक्तालय करण्याकरिता आवश्यक ते निकष तपासून पाहणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी (५ एप्रिल) विधानपरिषदेत दिले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी आणि स्वतंत्र आयुक्तालय याबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्वतंत्र आयुक्तालयासाठी सर्व निकष व आवश्यक नियम तपासून पाहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
औद्योगिकनगरीमधील वाढती गुन्हेगारी; तसेच वाढते शहरीकरण या पार्श्वभूमीवर ​पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज असल्याची बाब 'मटा'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली होती. गेल्या वर्षी 'पुणे सुपर फास्ट' कार्यक्रमात फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती.
आमदार नीलम गोऱ्हे यांनीही 'मटा'ची ही भूमिका आक्रमकपणे विधानपरिषदेत मांडली. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांत बलात्कार व विनयभंगाच्या; तसेच छेडछाड, महिलांच्या आत्महत्या यांचे प्रमाण वाढले आहे. सासरच्या लोकांकडून छळ, हुंड्यासाठी छळ आदींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर अंकुश मिळविण्यासाठी; तसेच सक्षम पोलिसिंग होण्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय गरजेचे असल्याचे आमदार डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता पिंपरी-चिंचवडसाठी नव्याने पोलिस आयुक्तालय होण्याची गरज आहे; परंतु त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे का, याकडे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
नवीन आयुक्तालयाची मागणी होत असून, त्यासाठी सर्वच निकष पडताळून पाहिले जात आहेत. सध्या सहा नवीन पोलिस ठाणी सुरू करण्यात आली आहेत; तसेच अजून दोन पोलिस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. शहरात अप्पर पोलिस आयुक्तसारख्या अतिमहत्त्वाची तीन पदे अद्याप रिक्त आहेत. उत्तर व दक्षिण विभागासह अन्य दोन विभागांचा पदभार एकाच अप्पर आयुक्तांकडे सोपविला आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि पोलिस या दोघांवर याचा परिणाम होत असल्याबाबतदेखील आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तरादाखल लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनदेखील सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.
......
'सीसीटीएनएस' अपूर्ण
'सीसीटीएनएस' प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नसल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील सर्वच पोलिस ठाणी आणि वरिष्ठ कार्यालय सीसीटीएनएस प्रणालीने जोडली जाणार आहेत. याचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच राज्य आणि कालांतराने देशातील सर्वच पोलिस ठाणी या प्रणालीने जोडली जातील. ज्यामुळे गुन्हेगार, एफआयआर, लावण्यात आलेली कलम यावर सर्वांचेच लक्ष राहणार आहे. स्वतंत्र आयुक्तालय आणि शहरातील गुन्हेगारी याबाबतचा सरकारने मागविलेला अहवाल सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन विधाते माहिती देण्यासाठी मुंबई येथे गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’च्या संशयिताला पुणे विमानतळावर अटक

0
0

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असलेल्या संशयिताला पुणे विमानतळावरून मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. तो दुबईमार्गे सीरियाला जाण्याच्या प्रयत्नात होता. रौफ अहमद असे या संशयिताचे नाव असून, तो उत्तर कर्नाटकातील भटकळ येथील रहिवासी आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे काही काळापूर्वी अहमदविरोधात 'लूक आउट नोटीस' जारी करण्यात आली होती. त्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले, असे ही कारवाई करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' या संघटनेच्या सदस्यांशी इंटरनेटवरून सुरू असलेल्या चॅटमध्ये अहमद याचे नाव वारंवार येऊ लागल्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर पाळत ठेवून होत्या. या इंटरनेटवरील हालचालींवर हेरांचे बारीक लक्ष आहे. 'आयएस'शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या वर्षी आतापर्यंत १४ तरुणांना ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या घोषणांचे झाले काय?

0
0

uttamkumar.indore
@timesgroup.com
पुणे : लोकप्रतिनिधींबरोबरच शहरातल्या प्रशासकीय यंत्रणांच्या घोषणाही हवेत विरून गेल्या आहेत. विशेष करून महापालिका आणि पोलिस प्रशासन या दोन्ही महत्त्वाच्या यंत्रणांच्या केवळ घोषणाबाजीमुळे पुणेकर मात्र, जीवघेण्या त्रासाला सामोरे जात आहेत.
महापालिकेने सर्व रस्त्यांवरचे अशास्त्रीय गतिरोधक (स्पीडब्रेकर्स) उखडून सुसंगत आणि योग्य ठिकाणीच ते टाकण्याचे जाहीर केले होते. ही योजना कुठे अडकली माहीत नाही. याच रस्त्यांच्या कडेला मोठ्या दिमाखात सायकल ट्रॅक बांधले, पदपथ बांधले; पण या दोन्ही गोष्टी इतक्या वेळा उखडल्या, की त्या सुविधा दाखवायला आता फार थोड्या ठिकाणी शिल्लक आहेत. रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपयांचा दंड आकारण्याची घोषणाही तशीच. काही दिवस कारवाई झाली. रस्ता धुवायला लावल्याच्या बातम्याही फोटोसह प्रसिद्ध झाल्या; पण नंतर योजना गुंडाळली. त्यामुळेच आता कुठेही, कसेही थुंकणारे महाशय दिसतात. शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग कमी करण्यासह स्थानिक स्तरावर सार्वजनिक शौचालयांची योग्य निगा राखण्यास प्रोत्साहन देण्यासाठीही महापालिकेने 'यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियान' ही प्रभाग स्तरावरील स्वच्छतेची मोहीम सुरू केली होती; पण तीही अवघ्या दोन वर्षांत गुंडाळण्यात आली. कुठल्याही रस्त्यावर चटकन स्वच्छतागृह सापडेल, अशी सोय नाही. जिथं आहेत, ती बसवल्यापासून कधी स्वच्छ केलीत की नाहीत, अशीच शंका येते. या योजना अचानक बंद करून पुणेकरांच्या थेट आरोग्याशीच खेळण्याचा निर्णय कोण घेतं, असा संतप्त सवाल नागरिकांच्या मनात आहे.
...
कोणत्या घोषणा बारगळल्या?
* अशास्त्रीय गतिरोधक (स्पीडब्रेकर्स) उखडून सुसंगत करणार
* सायकल ट्रॅकचा वापर सायकलसाठीच करणार
* रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपयांचा दंड करणार
* यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियान
* पोलिसांची लेन शिस्तीची घोषणा
* 'दादा, बाबा' लिहिलेल्या गाड्या, काळ्या काचांवर कारवाई
...
तुम्हाला काय वाटते?
या केवळ काही ठळक योजना आहेत. अशा अनेक योजना गुंडाळल्या गेल्या आहेत. कर्मचारी कमी असल्याने किंवा त्यांच्या अंमलबजावणीचा योग्य विचार न झाल्याने त्या बारगळल्या. याबाबत तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला १०० शब्दांत कळवा punemata1@gmail.com वर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी तापमानात अल्पशी घट झाली असली, तरी हवेतील उकाडा मात्र कायम होता. शहराच्या काही भागात अत्यंत हलक्या स्वरूपाचा शिडकावा झाला. शहराबरोबरच राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची घट नोंदली गेली. शहरात बुधवारी काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात मंगळवारी ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तर, २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान सरासरीइतके असले तरी, किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून उकाडा कायम होता. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास शहराच्या काही भागात अतिशय हलक्या स्वरूपाचा शिडकावा झाला. मंगळवारी राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात घट झाली. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान मराठवाड्यातील परभणी येथे (४२ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. विदर्भासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात घट झाली होती. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. जळगाव येथे एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शहरातही काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युरो स्कूलसमोर पालकांचा गोंधळ

0
0

प्रशासनावर कारवाईचे उपसंचालकांचे आश्वासन म. टा. प्रतिनिधी, पिंपरी शाळेची फी न भरल्यामुळे दोन विद्यार्थ्यांना शाळेतील ग्रंथालयात कोंडणे आणि ई-मेलद्वारे मुलांना शाळेतून काढून टाकल्याचे सांगणारे दाखले पाठविण्यावरून पालकांनी मंगळवारी वाकड येथील युरो स्कूल समोर निदर्शने केली. पालकांच्या गोंधळात शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने फीवाढ करण्यात येत आहे. दरवर्षीच्या या जाचक फीवाढीला कंटाळून काही पालकांनी केवळ नियमानुसार ठरवून देण्यात आलेली फी भरण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे फी वसूल करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. शाळा व्यवस्थापनाने यावरच न थांबता फी न भरल्याचा शेरा मारून पालकांना ई-मेल केले. भरीसभर म्हणून काही दिवसांपूर्वी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी पुढे आलेल्या पालकांवर पोलिसांना हाताशी धरून गुन्हे नोंदविण्यात आले. त्यामुळे पालकवर्ग हतबल झाला आहे. युरो स्कूलकडून पालकांची पालकांची फसवणूक होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. पालक आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक पावित्र्यामुळे पुण्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी हरुण आतार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. या चर्चेनंतर उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'युरोस्कूलचे प्रशासन अरेरावीने वागते, पालकांशी दादागिरी करते, त्यांच्या समस्या समजून घेत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या असून, त्या खऱ्या असल्याची आमची खात्री पटली आहे. त्यामुळे आम्ही शाळेच्या प्रशासनावर कडक कारवाई करणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनआयआरएफ’मध्ये केवळ तीनच विद्यापीठे

0
0

टॉप १००मध्ये १४ इंजिनी​अरिंग कॉलेजे, ९ फार्मसींचा समावेश म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील केवळ तीन पारंपरिक विद्यापीठांनाच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार (एनआयआरएफ) देशातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविता आले आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या तीन पारंपरिक विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. राज्यातील १४ इंजिनीअरिंग कॉलेज, तीन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि नऊ फार्मसी कॉलेजनी आपापल्या गटातून देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळविले असल्याचेही यंदाच्या मानांकनामधून समोर आले आहे. देशभरातील उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची राष्ट्रीय पातळीवरील मानांकने निश्चित करण्यासाठी केंद्राच्या मनुष्यबळविकास मंत्रालयाने एनआयआरएफची आखणी केली आहे. त्यासाठी आवश्यक माहिती सादर करण्याचे आवाहन मंत्रालयाने देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांना केले होते. त्यानुसार देशभरातील एकूण तीन हजार ५६५ संस्थांनी मानांकनाच्या या प्रक्रियेसाठी आपली माहिती ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून मंत्रालयाकडे सादर केली होती. या माहितीच्या आधारे मंत्रालयाने विद्यापीठ, इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि फार्मसी या चार गटांमधून शैक्षणिक संस्थांची क्रमवारी सोमवारी जाहीर केली. या क्रमवारीतून राज्यातील संस्थांचे चित्रही समोर आले आहे. राज्यातील एकाही पारंपरिक विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर पहिल्या २५ संस्थांमध्ये स्थान नसल्याचे चित्र सोमवारीच स्पष्ट झाले होते. मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीत ६६.५३ गुणांसह २८ वे स्थान मिळविले आहे. जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ५७.२८ गुणांसह ५९ व्या, तर औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ५०.०७ गुणांसह ८७ व्या स्थानी आहे. विद्यापीठांच्या यादीत राज्यातील सात संस्थांचा समावेश असून आहे. पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेन्ट टेक्नोलॉजीने विद्यापीठांच्या या यादीत ६४.०५ गुणांसह ३८ वे स्थान पटकावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळ्यात करा आरामदायी प्रवास

0
0

'एसटी'तर्फे पाचशे जादा गाड्या सोडणार; हिरकणी, परिवर्तनचा समावेश म. टा. प्रतिनिधी, पुणे नुकतीच दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून, काही दिवसांत शाळांना सुट्ट्याही लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील ५९ मार्गांवर ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये हिरकणी आणि परिवर्तन गाड्यांची संख्या अधिक असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बहुतांश शाळांना सुट्ट्या लागणार आहेत. तसेच, जोडून सुट्या आल्या असल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ गृहीत धरून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे व त्यानंतर तीनशे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. जादा गाड्यांचे तिकीट आरक्षणास सुरुवात केली आहे. पुण्याहून प्रामुख्याने रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नंदूरबार, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा या प्रमुख मार्गांवर जादा गाड्या धावतील. या गाड्यांच्या माध्यमातून प्रतिदिन ६० हजार किलोमीटरचे अंतर पार करण्याचे ​उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर विद्यार्थ्यांकरीता चालविल्या जाणाऱ्या विशेष बस यासाठी वापरल्या जाणार आहेत. या सर्व बस स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथूनच सोडल्या जातील. -------------- आठ एप्रिलपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आठ, नऊ, १० एप्रिलला जोडून सुट्ट्या - २०० जादा गाड्या सोडणार १४, १५, १७ व १९ एप्रिलला सुट्या- २०० आणखी जादा गाड्या सोडणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन चौपाटीवर तरुणावर खुनी हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे डेक्कन चौपाटी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात बर्फ फोडण्याचा टोचा पोटात खुपसून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरतेश उर्फ बंटी खांदवे (रा. लक्ष्मी रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र शोधित चिवे (वय १८, रा. पर्वती दर्शन) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सनी नाझरे (पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिवे आणि खांदवे जेवणासाठी मंगळवारी रात्री डेक्कन चौपाटी येथील गोविंद हॉटेलमध्ये आले होते. जेवण केल्यानंतर ते पुलाची वाडी येथील मित्राला भेटायला निघाले. चौपाटीच्या बाजूला येऊन त्यांनी मित्राला बोलण्यासाठी आवाज दिला. त्यावेळी आरोपी त्यांच्या जवळ आला. 'तुम्ही दोघे इथून निघून जा, नाही तर, तुमचा खून करेन,' अशी धमकी दिली. त्यावरून चिवे आणि नाझरे यांच्यात वादावादी सुरू झाली. हा वाद सोडविण्यासाठी खांदवेने नाझरेला हात धरून बोलत-बोलत बाजूला नेले. त्यावेळी नागरे याने रागाच्या भरात बर्फ फोडायचा टोच्या खांदवेच्या पोटात खुपसला. त्यामध्ये खांदवे गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर नाझरेने तेथून पळ काढला. खांदवेला तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुयश जोशी हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेमुदत संप सुरूच राहणार

0
0

उत्पादन शुल्कमाफीपर्यंत लढा देण्यासाठी सराफ कृती समिती स्थापन म. टा. प्रतिनिधी, पुणे सोन्यावरील उत्पादन शुल्क माफ होईपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय देशभरातील सराफ संघटनांनी घेतला आहे. उत्पादन शुल्काच्या विरोधात कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी फत्तेचंद रांका यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती दोन दिवसात पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. 'मंगळवारी नवी दिल्लीत सराफ व्यावसायिकांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कृती समिती स्थापण्याचा तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली. 'आज दिल्लीत झालेल्या बैठकीत आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी कृती समिती नेमण्याचा निर्णय झाला. समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे. आगामी दोन दिवसांत दिल्लीत विविध मंत्र्यांची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत. तोपर्यंत संप सुरूच राहील,' असे रांका यांनी सांगितले. 'दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या प्रतिनिधींनी कृती समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने रांका यांची निवड केली आहे. ही समिती बुधवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्व प्रमुख केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहे. तसेच ही समिती पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, पाडव्यालाही दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे फेडरेशनचे उपाध्यक्ष नितीन अष्टेकर यांनी सांगितले. दरम्यान, पु. ना. गाडगीळ आणि सन्सची पेढी 'पुणे सराफ असोसिएशन'च्या आदेशानुसार काम करीत असून, असोसिएशनने दुकान उघडण्याची अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे आमची दुकाने सराफ असोसिएशनच्या निर्णयानुसारच उघडतील, असे 'पु. ना. गाडगीळ आणि सन्स'चे भागीदार अभय गाडगीळ यांनी स्पष्ट केले. ........ पाडव्यालाही दुकाने बंद ? सोन्यावरील उत्पादन शुल्क रद्द करेपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय सराफांच्या संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पाडव्यालाही दुकाने बंदच राहणार आहेत. बुधवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनची बैठक होणार असून त्यामध्ये पाडव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवायची की नाही, यावर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्विकास धोरण महिनाभरात ठरवणार

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात घोषणा म. टा. प्रतिनिधी, पुणे अर्बन लँड ​सिलिंग (यूएलएसी) कायद्याअंतर्गत झालेल्या राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास धोरण महिन्याभरात ठरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की 'यूएलसी कायदा रद्द करण्यात आला असला तरी, कलम २० अंतर्गत झालेल्या इमारतींना कायदा लागू असल्याचे सध्याच्या कायद्यानुसार दिसते. या संस्थांचा पुनर्विकास रोखला जाऊ नये म्हणून राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन महिनाभरात निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारसमोर सद्य परिस्थितीतील कायद्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढून कोणताही पुनर्विकास अडणार नाही याची काळजी घेण्यात येईल.' 'पुण्यातच नव्हे तर, संपूर्ण राज्यभरात हा प्रश्न गंभीर झाला आहे. यूएलसी कायद्यानुसार सूट मिळवून लाखो गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम झाले आहे. बांधकामाला ३५ ते ४० वर्षे झाल्याने या इमारती मोडकळीस आल्या आहेत. पुण्यात सुमारे ७०० इमारती या प्रश्नाने बाधित आहेत,' असे श्रीमती कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून यूएलसी खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत असल्याने होणाऱ्या अडचणीबाबत कुलकर्णी म्हणाल्या, 'यूएलसी कायदा २००७ मध्ये रद्द झाल्याने जागेची मालकी गृहनिर्माण संस्थांची आहे. मात्र, या इमारतींचा पुनर्विकास करताना अडचण निर्माण होत आहे. या इमारतींचा पुनर्विकास करायचा असल्यास यूएलसीच्या प्रमाणपत्राची मागणी पुणे महापलिकेकडून करण्यात येते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दीप विश्व कोऑप हौसिंग सोसायटीची ना हरकत प्रमाणपत्राची मागणी गेली तीन वर्षे नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. मात्र, अद्याप ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.' यूएलसी कायदा १९७६ मध्ये अंमलात आला. या कायद्यांतर्गत पुणे महानगर क्षेत्रामध्ये एका धारकास एक हजार चौरस मीटर रहिवासी क्षेत्र धारण करून उर्वरित क्षेत्र अतिरिक्त ठरून कलम २० अन्वये नमूद तरतुदींनुसार मिळकतधारकास मिळकत विकसित करता येणे शक्य होते. या योजनेप्रमाणे हे क्षेत्र सहकारी गृहनिर्माण संस्थांना विक्री करण्याचे मान्य केल्यास तेवढे रहिवासी क्षेत्र विकसित करण्यास परवानगी देण्यात येत होती. त्यानुसार शहरामध्ये असंख्य धारकांनी नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांना अशा जमिनी विकल्या आहेत. या जमिनींवर अनेक गृहरचना संस्थांच्या इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत,' असेही श्रीमती कुलकर्णी यांनी नमूद केले. .. शिक्के काढण्याची मागणी अर्बन लँड सिलिंग (यूएलसी) रद्द झाल्यानंतर मोकळ्या झालेल्या जमिनींच्या नोंदीवर अद्याप यूएलसीचे शिक्के आहेत. ते शिक्के काढून टाकण्याची मागणी भाजपचे आमदार विजय काळे यांनी विधिमंडळात केली. 'या जमिनींवर यूएलसीचे शिक्के असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्के काढण्याची गरज आहे,' असे काळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनजीओ’च्या प्रतिनिधीचे रामनदीवर अतिक्रमण

0
0

अहवाल 'एनजीटी'कडे सादर; २७ला सुनावणी होणार म. टा. प्रतिनिधी, पुणे राम नदीच्या पात्रात झालेली बांधकामे आणि अतिक्रमणांबाबतचा अहवाल महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (एनजीटी) सादर केला आहे. या अहवालामध्ये एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित प्रतिनिधीने नदीपात्रात अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी आता २७ एप्रिल रोजी होणार आहे. अतिक्रमणामुळे राम नदीचे पात्र आक्रसले आहे. या नदीतील अतिक्रमणे काढावी आणि नदीचा प्रवाह मोकळा करावा, या साठी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल झाली आहे. या सुनावणीत न्यायाधिकरणाने राम नदीचा श्वास मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रशासनाने राम नदीची मध्यंतरी पाहणीही केली. या पाहणीमध्ये नदीपात्रात भूगाव आणि बावधन परिसरात सात ते आठ ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये काही सोसायट्यांची सीमाभिंत आणि मंगल कार्यालयांचे अतिक्रमण झाले होते. ते अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने कारवाई करून हटविले. या अतिक्रमणांसंदर्भात केलेल्या कारवाईसंबंधीचे प्रतिज्ञापत्रही जिल्हा प्रशासनाकडून न्यायाधिकरणाला सादर करण्यात आले. राम नदीची पूररेषा निश्चित झाली नसल्याबद्दल हरित न्यायाधिकरणाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने ही पूररेषा कायम केली. जिल्हा प्रशासनाबरोबरच पुणे महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नदीपात्रातील अतिक्रमणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले होते. त्यानुसार महापालिका व पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राची पाहणी केली. या पाहणीनंतर पालिका, पीएमआरडीए तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागानेही अतिक्रमणांचा अहवाल न्यायाधिकरणाला सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images