Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षकांना लोकवर्गणीची सक्ती नाही

0
0

शिक्षकांना लोकवर्गणीची सक्ती नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसहभागाद्वारे राज्यातील शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षकांना लोकवर्गणी गोळा करण्याची सक्ती नसल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. समाजातील दानशूर नागरिक आणि पालकांच्या शिक्षण क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासोबतच, समाजात शिक्षण खात्याविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी ही योजना असल्याचेही डॉ. भापकर यांनी सांगितले. लोकवर्गणीच्या या चळवळीद्वारे राज्यभरातील शाळांसाठी जवळपास पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचेही या निमित्तानेच समोर आले.
प्रगत शैक्षणिक धोरणाचा पाठपुरावा करताना राज्यातील सर्वच्या सर्व शाळा ज्ञानरचनावादी आणि मोबाइल डिजिटल बनविण्याचा निर्णय शिक्षण खात्याने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी लोकसहभागातून निधी गोळा करण्याचे संकेत त्या विषयीच्या पत्रात देण्यात आले होते. खात्याचे हे पाऊल शिक्षण खात्यातील सरकारी गुंतवणूक कमी करत, शिक्षकांनाच त्यासाठी दारोदार फिरायला लावणारी आहे की काय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला होता. 'मटा'ने ही परिस्थिती समाजासमोर मांडली होती. राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी या प्रकाराला विरोध करत, शिक्षकांना सक्तीने याचक बनविणे रास्त नसल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी डॉ. भापकर यांनी ही बाब स्पष्ट केली.
भापकर म्हणाले, 'राज्य सरकारला शिक्षणावरील गुंतवणूक कमी करायची म्हणून असे धोरण आखले, असे अजिबात नाही. शिक्षण खात्याविषयीची सकारात्मक भावना समाजात तयार व्हावी, यासाठी खात्याने समाजामधील विविध घटकांच्या मदतीने काही धोरणांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहभागातून शाळांचा विकास साध्य करण्यासाठी हा उपक्रम योजला आहे.' राज्यातील ११ जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व शाळा पूर्णपणे ज्ञानरचनावादी आणि पूर्णपणे मोबाइल डिजिटल झाल्या आहेत. यात गडचिरोली, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, पालघर, नगर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. सोलापूर, रत्नागिरी आणि वाशिम जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळा ज्ञानरचनावादी झाल्या आहेत. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व शाळा ज्ञानरचनावादी आणि मोबाइल डिजिटल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही भापकर यांनी सांगितले.
................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग सुट्ट्यांमुळे एसटीला हातभार

0
0

सलग सुट्ट्यांमुळे एसटीला हातभार

म.टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठवड्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी २१ ते ३१ मार्च या कालावधीत सोडलेल्या जादा बसगाड्यांमधून एसटीच्या अतिरिक्त उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. राज्यात या कालावधीत दररोज सुमारे ५०० बसफेऱ्यांमधून १२ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
मार्च महिन्यात होळी, गुड फ्रायडेदरम्यान २४ ते २७ या कालावधीत सलग सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी एसटी बसगाड्यांना प्रतिसाद दिला. या काळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानेदेखील प्रवाशांनी एसटी बसगाड्यांमध्ये गर्दी केली. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी भारमानात पाच टक्क्यांची वाढ झाली.
या कालावधीत राज्यातील सहा प्रादेशिक विभागांपैकी मुंबई विभागाने सर्वाधिक एक कोटी ३० लाख अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे. कोकणातील नोकरदार वर्गाने दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मुंबई विभाग उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे. विभाग नियंत्रक कार्यालयांमध्ये रायगड कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, या कालावधीत पुणे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून शहरातील व जिल्ह्यातील बसस्थानकांहून दररोज एकूण १०० ते १५० जादा बसफेऱ्या सोडल्या. त्यामुळे उत्पन्नाबाबतीत विभाग नियंत्रक कार्यालयांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते जिरवणार पाणी

0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : शहराच्या सर्वच भागांत सध्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे पेव फुटले असल्याने जमिनीत मुरणारे पाणी पुन्हा वाढविण्यासाठी महापालिकेनेच पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने, काँक्रिटच्या मोठ्या रस्त्यांवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची संकल्पना राबवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. कोथरूड-पौड रस्त्यानंतर आता मध्यवस्तीतील काही प्रमुख रस्त्यांवर हा प्रयोग राबवला जात आहे.

शहराच्या सर्व भागांमध्ये सध्या लहान-मोठे रस्ते काँक्रिटचे करण्याचा सपाटा सुरू आहे. उपनगरातील रस्त्यांसह मध्य भागातील छोटे-मोठे गल्ली-बोळही काँक्रिटचे होत आहेत. सर्वच भागांत काँक्रिटच्या रस्त्यांचा जोरदार धडाका सुरू असल्याने जमिनीत मुरणारे पाणी कमी होत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये अशीच वाढ होत राहिली, तर भविष्यात पुण्याच्या हद्दीत भूगर्भामध्ये पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी शंका सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, काँक्रिटचे रस्ते झाले, तरी जमिनीत पाणी मुरण्यासाठी आता पालिकेच्या पथ विभागानेच पुढाकार घेतला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असतानाच, तेथे 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी, तेथे पालिकेतर्फेच बोअरिंग घेतले जात असून, रस्त्यावरून वाहणारे पाणी बोअरिंगमध्ये जावे, यासाठीची व्यवस्था विकसित केली जात आहे.

'शहरात ठिकठिकाणी काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू असली, तरी रस्त्याच्या बाजूस पुरेशी जागा उपलब्ध असल्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवला जात आहे. लहान-लहान गल्लीमध्ये ही संकल्पना अमलात आणता येणे अवघड आहे; पण महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असतानाच, तेथे या पर्यायाची चाचपणी केली जात आहे,' अशी माहिती पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी दूधदरात वाढ

0
0

पुणे : चारा टंचाई आणि पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दूध दरवाढ दिली असली, तरी सामान्य ग्राहकांवर त्याचा कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही.

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा पाणी व चारा टंचाई जाणवत आहे. त्यातच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कात्रज दूध संघाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दूध खरेदीदर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाय व म्हशीच्या दुधात लिटरमागे एक रुपया दरवाढ दिली जाणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे व कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

या दरवाढीमुळे गायीच्या दुधाचा (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) खरेदीदर २१ रुपये ७० पैसे राहणार आहे. बल्क कुलर्ससाठी हा दर २३ रुपये राहणार आहे. म्हशीच्या दुधाचा दर आता (६ फॅट व ९ एसएनएफ) ३१ रुपये दिला जाणार आहे. या दूध खरेदीदराचा कोणताही फटका ग्राहकांना बसणार नाही. त्यांच्यासाठी दूध विक्रीचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेला सरकारची चपराक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने खरेदी केलेल्या क्षयरोग तपासणी उपकरणाच्या भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा सर्वसाधारण सभेचा निर्णय विखंडित करून राज्य सरकारने सणसणीत चपराक लगावली आहे; तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही चालूच ठेवावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

रुग्णांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी करण्यात आले होते. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून हे उपकरण विनावापर पडून असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत २०१३मध्ये विधानपरिषद आणि विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाले होते. त्याची दखल घेत तत्कालिन मंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन देऊन संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रकरणाची द्विदस्यीय समितीने चौकशीही केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तत्कालिन अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी, डॉ. राजशेखर अय्यर, डॉ. आनंद जगदाळे यांच्यावर दोषारोप निश्चित केले. हे सर्व अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीच्या कार्यवाहीसाठी पालिकेच्या आयुक्तांना नियुक्त करावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता.

या प्रस्तावावर ऑगस्ट २०१४च्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. त्यानंतर सदरचे अधिकारी सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा ठराव सभेने मंजूर केला. त्यावर आयुक्त राजीव जाधव यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून अशा ठरावामुळे प्रशासनावर अनिष्ठ परिणाम होतील, तसेच व्यापक जनहिताच्या दृष्टीने सभेच्या ठरावाची अंमलबजावणी योग्य होणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करावा, असा प्रस्ताव सादर केला. तो डिसेंबर २०१५मध्ये विखंडित केला. त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने सभेला ३० दिवसांत म्हणणे सादर करण्याचे कळविले होते. परंतु, मुदतीत कोणतेही निवेदन प्राप्त झाले नाही. त्यामुळे आयुक्तांनी सादर केलेला प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून सरकारच्या नगरविकास विभागाचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेला लेखी आदेश दिले आहेत. सरकारच्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही चालू ठेवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे डॉ. कुणचगी, डॉ. अय्यर आणि डॉ. जगदाळे यांच्याविरुद्धची चौकशीची कार्यवाही यापुढील काळात चालू राहणार आहे. या पैकी डॉ. कुणचगी मयत झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंग्रजी हटाव सेना हवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतामुळे इंग्रजीला किंमत असून या भाषेला बाहेर कोणी विचारत नाही. आपल्याकडे इंग्रजीचे फॅड आले आहे. इंग्रजी जागतिक भाषा नाही हे ठासून सांगण्याची आज गरज आहे. त्यासाठी इंग्रजी हटाव सेना निर्माण झाल्याशिवाय पर्याय नसून बाकीच्या सेनांना काही अर्थ नाही,' अशा शब्दांत 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

'द फर्ग्युसोनियन्स' या फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नेमाडे यांना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 'फर्ग्युसन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. ही संधी साधून नेमाडे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घालत शिवसेना व मनसेवर टीकास्त्र सोडले. या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, जागतिक जलतरणपटू रोहन मोरे व क्रिकेटपटू अमोल कर्चे यांना 'फर्ग्युसन अभिमान' पुरस्काराने गौरविण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार राहुल नार्वेकर, संघटनेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, अॅड. विजय सावंत, किरण शाळिग्राम या वेळी उपस्थित होते.

'प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे आवश्यक असताना आपल्याकडे इंग्रजीचे फॅड आले आहे. त्यामुळे आपली एकूण समज कमी झाला आहे. सर्वजण इंग्रजीमध्ये बोलत असल्याने ते चांगले ठरत आहे. पण अशाने मराठीचा लौकिक कमी झाला आहे,' अशा शब्दांत नेमाडे यांनी मराठीच्या आग्रहाचा पुनरुच्चार केला. 'फर्ग्युसनच्या वसतिगृहामुळे 'कोसला' आकार घेऊ शकली. या महाविद्यालयात आलो नसतो, तर मोठा झालो नसतो,' अशी भावना नेमाडे यांनी व्यक्त केली.

'शालेय शिक्षण मातृभाषेत असायला हवे. मी मराठीत शिकलो, त्यामुळे विविध देशांत भाषण देण्याचा आत्मविश्वास मला मिळाला. व्यक्तीमधील पूर्ण क्षमतांना वाव फक्त मातृभाषेच्या शिक्षणातून मिळतो. त्यामुळे शिक्षणाची त्याप्रमाणे रचना करायला हवी,' असे सांगत रेल्वेमंत्री प्रभू यांनी नेमाडे यांचा मुद्दा पुढे रेटला. सूत्रसंचालन स्वप्ना नायर यांनी केले.

देशात समता नाही
'देशात जे गोंधळाचे वातावरण आहे ते आमचीच मालकी, आमचाच इतिहास आणि आमचेच पुढारी या भूमिकांमुळे निर्माण झाले आहे. पूर्वी नेत्यांची जातीप्रमाणे वाटणी नव्हती. मराठी संस्कृतीला दर्जा होता. ती शिस्त आता नाही. स्वातंत्र्य-समता-बंधुभाव हे शब्द केवळ घरात पेंटिंग म्हणून लावण्यासाठी उरले असून प्रत्यक्षात स्वातंत्र्य, समता वगैरे नाही. स्वातंत्र्य ,समता नसले तरी बंधुभाव टिकवण्यासाठी सांगितला जातो,' अशा शब्दांत भालचंद्र नेमाडे यांनी देशातील परिस्थितीची खिल्ली उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एकत्रित कामामुळे प्रश्न सुटतील’

0
0

पुणे : मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे विकासात अडथळे येत आहेत. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी एकत्रित काम केले, तर जनतेचे प्रश्न सुटतील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथलयात अभ्यास करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉम्पीटिटर्स फाउंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, खासदार राजीव सातव, ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे, आनंदवनचे सरपंच काशीनाथ मेश्राम, राजेश नार्वेकर, संजय भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

'स्वातंत्र्यानंतर देशात काहीच कामे झाली नाहीत, हे विधान योग्य नाही. पण ही कामे जनतेच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने सरकार व जनतेमध्ये दरी निर्माण झाली. त्यातून असंतोषाची रूपे तयार झाली. हल्ली गुणात्मक अपेक्षा वाढत आहेत. त्या पूर्ण करणे, हे मोठे आव्हान सरकारपुढे आहे,' असे प्रभू यांनी नमूद केले.

'मराठवाड्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. कितीही टंचाई असली तरी आव्हान स्वीकारले पाहिजे. कठीण परिस्थितीत गुणवत्ता टिकून ठेवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे,' असे डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासाठी एकत्रित वाहतूक आराखडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गेल्या काही वर्षांमध्ये शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची झालेली बिकट अवस्था आणि त्यामुळे एकूण वाहतुकीवर त्याचा झालेला दुष्परिणाम यातून मार्ग काढण्यासाठी 'एकत्रित वाहतूक आराखडा' तयार केला जाणार आहे,' अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिली. एसटी, पीएमपी, रेल्वे, हवाई वाहतूक आणि अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा आढावा घेवून हा आराखडा तयार केला जाणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशन येथे नव्याने उभारलेल्या पादचारी पुलाचे प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, संजय पाटील, पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय आदी या वेळी उपस्थित होते.

'शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रभू यांनी दिली. पुढील तीन ते चार वर्षांत रेल्वेचे मोठे जाळे तयार करण्याचे ध्येय आहे. तसेच, रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र राज्य सरकार एकत्र येऊन एक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे रेल्वेचे जाळे वाढविले जाणार आहे,' असे प्रभू यांनी स्पष्ट केले.

'रेल्वे भरतीमध्ये यापूर्वी अनेक गैरप्रकार झाले. नोकरीला लावतो, असे सांगून काही दलालांनी नागरिकांची फसवणूकही केली. या दलालीला चाप बसविण्यासाठी आणि भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच, रेल्वेच्या टेंडर प्रक्रियेतील गुंडगिरी हद्दपार करण्यासाठीही ऑनलाइन टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे,' असे प्रभू यांनी सांगितले. लोणावळा-पुणे या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. तर, ही तिसरी लाइन दौंडपर्यंत टाकावी, अशी मागणी बारणे यांनी केली. पुणे-जोधपूर या मार्गावर रोज गाडी सुरू करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली. पुणे आणि मिरज स्टेशनच्या विकासाठी निधीची मागणी पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भामा आसखेड’ला सेनेचा विरोधच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतरही भामा आसखेडमधून पाणी आणण्याच्या प्रकल्पाला खेडमधील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या कामासाठी राजी होण्यास तयार नाहीत. येत्या मंगळवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर बैठक झाल्यावरच हे काम करू देऊ, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार सुरेश गोरे यांनी शनिवारी घेतली. खुद्द पक्षप्रमुखांच्या सूचनेनंतरही या लोकप्रतिनिधींनी असा पवित्रा घेण्याचे कारण काय, असा प्रश्न महापालिकेत विचारण्यात येऊ लागला आहे.

प्रकल्पग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करावे, तसेच शेतकऱ्यांच्या सात बारावरील कालव्याचे शिक्के काढावेत, अशी मागणी करत गोरे आणि आढळराव यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कामाला विरोध केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बोलणी सुरू असूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा, यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी आमदार, खासदार, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, गटनेते, पालिकेतील अधिकारी उपस्थित होते. शहरासाठी हे पाणी महत्त्वाचे असल्याने प्रकल्पाला विरोध करू नका, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. त्यानंतर ३ एप्रिलपासून हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी खासदार आढळराव, आमदार गोरे, आळंदीचे नगराध्यक्ष, तसेच सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापौर कार्यालयात झाली. पालिका आयुक्त कुणाल कुमार हेही या वेळी उपस्थित होते. शहरात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी सौरव राव या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून अधिकाऱ्यांमार्फत बैठकीला पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव अपूर्ण असल्याने राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या दालनात बैठक झाल्यानंतरच भामा आसखेडचे काम सुरू करावे, अशी भूमिका सेनेने मांडली. ठाकरे यांनी शब्द दिल्यानंतरही सेनेच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या भूमिकेबाबत पक्षात एकवाक्यता आहे की नाही, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी सहकार्य करण्याची सूचना दिली होती. पण शनिवारी बैठकीत रविवारपासून काम सुरू न करता महसूलमंत्री खडसे यांच्या बैठकीनंतर काम सुरू करावे, अशी भूमिका सेनेने घेतली आहे, असे महापौर प्रशांत जगताप म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’ टर्मिनलला पुन्हा विघ्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
येरवडा ते खराडीदरम्यानच्या बीआरटी बस टर्मिनलसाठी वाघोलीमधील सरकारी गायरान जमीन देण्यास ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा महापालिकेला दिल्याचा निषेध वाघोली ग्रामपंचायतीने केला असून त्याविरोधात येत्या मंगळवारी (५ एप्रिल) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेने येरवडा ते खराडी या मार्गावर बीआरटी बस सेवेचे काम सुरू केले आहे. या बीआरटीसाठी बस टर्मिनल बांधावे लागणार आहे. या टर्मिनलसाठी वाघोली येथील गट क्रमांक ११२३ वरील ८० गुंठे सरकारी जमिनीची मागणी महापालिकेने केली. ही सरकारी गायरान जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. त्यासंदर्भात महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन मागणीचा प्रस्ताव दिला.

जिल्हाधिकारी सौरव राव यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच यासंबंधी वाघोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अन्य सदस्यांशी चर्चा केली. पालिकेचे तत्कालिक अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया या बैठकीला उपस्थित होते. ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन बस टर्मिनलची जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. ही जमीन देण्यासाठी ग्रामपंचायतीने महापालिकेकडे पाणीपट्टी माफीसह रस्ता रुंदीकरण व अन्य काही मागण्या केल्या होत्या. या मागण्यांविषयी कोणतीही चर्चा न करता जिल्हाधिकारी राव यांनी या सरकारी जमिनीचा आगाऊ ताबा महापालिकेला दिला.

यासंदर्भात वाघोली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा शनिवारी सकाळी झाली. वाघोलीच्या सरपंच संजीवनी वाघमारे, उपसरपंच कैलास सातव, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे, बाजीराव पाचर्णे आदी या वेळी उपस्थित होते. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला ही जमीन दिल्याचा निषेध करण्यात आला. या निर्णयाविरोधात मंगळवारी केसनंद फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्याला सहा तासांत अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुक्रवार पेठेतील एका घरातून अठरा लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने, परदेशी चलन चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. घरफोडी करून पळून जाताना पाय दुखावल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यावरून आरोपीचा माग काढत सहा तासांच्या आत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर या चोरट्याने लगेच घरफोडीचे गुन्हे सुरू केल्याचे समोर आले आहे.

अमित यशवंत अवसरे (वय २८, रा. कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश सिद्धाराम फुटाणे (वय ६५, रा. शुक्रवार पेठ, राष्ट्रभूषण चौक) यांनी तक्रार दिली आहे. फुटाणे हे विमा सल्लागार असून शुक्रवारी कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. आरोपी अवसरे याने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. फुटाणे यांच्या घरातील हिरे, सोन्याचे व चांदिचे दागिने असा एकूण १८ लाखांचा माल बॅगमध्ये भरून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फुटाणे घरात येत होते. त्यावेळी फुटाणे यांनी आरडा-ओरडा केल्याने पहिल्या मजल्यावर राहणारे रहिवासी बाहेर आले. त्यांनी पाहताच आरोपी पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार झाला. मात्र, उडी मारल्याने त्याच्या पायाल गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. सुभाषनगर येथील सणस प्लाझा येथील गल्लीत आरोपी अवसरे हा लंगडत चालत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणप्रकरणी तीन जण ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
अनैतिक प्रेमसंबंधांच्या वादातून विश्रांतवाडी भागात राहणाऱ्या एका तरुणाचे शेजारील काही आरोपींनी अपहरण केल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. चोवीस तासांनंतरदेखील या तरुणाचाशोध लागत नसल्याने शनिवारी नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.
जमावाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विश्रांतवाडी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशांत अशोक गुमानेकर (वय २७, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिकंदर अशोक गुमानेका यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी हैदर नूर शेख, मिर्झा नूर शेख, महंमद कुरेशी आणि शोएब शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात तापमानाची चाळिशी

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांतच राज्यातील उकाडा कमालीचा वाढला आहे. पुण्यात पारा ४० अंशांवर पोहोचला असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वोच्च तापमान आहे. राज्यातही कोकण वगळता सर्वत्र पारा ३८ अंशांपुढेच असल्याने राज्यभर तीव्र उकाडा आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात पुण्यातील कमाल तापमान ३५ ते ४० अंशांदरम्यान राहते. यंदा एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. कोकण आणि महाबळेश्वर वगळता अन्य सर्वत्र पारा ३८ अंशांच्या पुढेच आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान ४० अंशांपुढे आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला येथे (४३.७ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. सर्वांत नीचांकी किमान तापमान अहमदनगर येथे (१६.६ अंश सेल्सिअस) नोंदले गेले.

राजस्थानच्या काही भागांत उष्णतेची लाट असून, उत्तरेकडील अनेक राज्यांतही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तेथून वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


गर्दी कमी

पुण्यात शनिवारी ४० अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १९.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दीही कमी झाल्याचे जाणवत होते. घराबाहेर पडलेले नागरिक टोपी, सनकोट, छत्री, हेल्मेट घेऊनच आल्याचे दिसत होते. उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी रसवंतीगृह, आइस्क्रीम पार्लर, कलिंगड व फळविक्रेत्यांकडे गर्दी झाल्याचे चित्र होते. सिग्नललाही वाहनचालक झाडांचा आडोसा पाहून थांबत होते.

शनिवारचे कमाल तापमान (अंश से.)



अकोला : ४३.७



नांदेड : ४३



मालेगाव : ४३.२



सोलापूर : ४२.५



परभणी : ४२.४



नागपूर : ४२.२



उस्मानाबाद : ४१.८



सांगली : ४१.६



औरंगाबाद : ४०.८



रत्नागिरी : ३२.१


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिओ’ची लस इंजेक्शनद्वारे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातून पोलिओ हद्दपार झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बालकांना तोंडावाटे लस देण्यात येत असून येत्या २५ एप्रिलपासून महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये इंजेक्शनद्वारे आणखी एक लस बालकांना दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे (इंजेक्टेबल) देण्यात येणाऱ्या लसीमुळे पोलिओच्या विषाणूंचा नायनाट करणे शक्य होणार आहे.

'पोलिओचे पी-१, पी-२ आणि पी-३ अशा प्रकारचे तीन विषाणू आहेत. जगात पी-२ हा विषाणू आढळून आला नाही. सध्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत 'ट्रायव्हॅलंट' लसीचा वापर होत आहे. ही जीवंत लस आहे. त्यात पी-१, पी-२ आणि पी-३ या तीन विषाणूंचा समावेश आहे. पोलिओ लसीत असलेल्या पी-२मधील जीवंत विषाणूचे रूपांतर काही वेळेला अन्य विषाणूंमध्ये होत असल्याने पेशंटमध्ये पोलिओ सदृश्य लक्षणे दिसतात. त्यामुळे 'ट्रायव्हॅलंट' ऐवजी पी-२ विषाणूचा समावेश नसलेली 'बायोव्हॅलंट' लस देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार राज्यात नियमित लसीकरणामध्ये तोंडावाटे देण्यात येणाऱ्या लसीबरोबर इंजेक्शनद्वारे देखील लस देण्यात येणार आहे. येत्या २५ एप्रिलपासून ही लस राज्यातील २० लाख बालकांना दिली जाईल,' अशी माहिती आरोग्य खात्याच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

इंजेक्शनद्वारे अर्थात 'इनअॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस व्हॅक्सिन' (आयपीव्ही) ही लस प्रथमच देण्यात येणार आहे. इंजेक्शनद्वारे लसीचे दोन डोस बालकांना पोलिओच्या पहिल्या व तिसऱ्या डोस बरोबर वयाच्या सहाव्या व चौदाव्या आठवड्याच्या वेळी देण्यात येणार आहेत. लसीकरणापासून वंचित असलेल्या अथवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन लसीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा तिसरा टप्पा येत्या एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. येत्या ७ ते १५ एप्रिलदरम्यान हा तिसरा टप्पा राज्यातील १२ जिल्हे आणि १६ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाकी ज्येष्ठही आता होणार ‘कुक’

0
0

केटरिंगचा अल्प मुदतीचा विशेष अभ्यासक्रम सुरू

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : 'माझ्या पत्नीचा नुकताच अपघात झालाय, ती सध्या झोपून असते. मला तिच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे,' किंवा 'माझ्या पत्नीचे निधन झालेय. घरी मी एकटाच असतो; मात्र मला स्वयंपाक येत नाही..' अशा विवंचनेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सध्या वाढते आहे. त्यामुळे त्यांना स्वयंपाक शिकवण्यासाठी राज्याच्या 'हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट'ने पुढाकार घेतला आहे.

'महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी'ने (एमएसआयएचएमसीटी) खास ज्येष्ठ नागरिकांसाठी केटरिंगचा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. दहा दिवसांच्या या सशुल्क अभ्यासक्रमातून ज्येष्ठांना नाश्त्यापासून कुकर लावण्यापर्यंत आणि सूपपासून पोळी-भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम ज्येष्ठांसाठी असला, तरी ४५ वर्षांपुढील कोणालाही त्याचा लाभ घेता येणार आहे.

अनेकदा घरातील ज्येष्ठ महिलाच स्वयंपाकाची जबाबदारी पेलत असते; मात्र अचानक तिची तब्येत बिघडल्यास किंवा तिचे निधन झाल्यास स्वयंपाकाचे काय करायचे, असा प्रश्न पुरुषांपुढे उभा राहतो. त्यांच्याही तब्येतीच्या तक्रारी आणि पथ्य असल्याने बाहेर मेस किंवा हॉटेलमध्ये जेवता येत नाही आणि स्वतः कधीही स्वयंपाक केलेला नसतो, अशी अडचण त्यांच्यापुढे उभी राहते. स्वयंपाकासाठी बाई नेमल्यास स्वयंपाकाच्या पद्धतीत फरक पडण्याची शक्यता असतेच. त्यामुळे अनेकांना स्वतः स्वयंपाक शिकण्याची इच्छा निर्माण होते. त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरणार आहे.

'आम्हाला स्वयंपाक शिकवाल का, अशी विचारणा एकट्या राहणाऱ्या पुरुषांकडून गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. पूर्वीही अशी चौकशी होत असली, तरी अलीकडे त्यांची संख्या वाढली आहे. पत्नीचे निधन किंवा आजारपण आणि मुले परदेशात असणे, अशा कारणांमुळे एकट्याने राहणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली आहे; मात्र त्यांना स्वतःलाच स्वयंपाक करण्याची इच्छा आहे. त्यामुळे स्वयंपाक शिकवण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. त्यासाठीच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे,' असे संस्थेच्या प्राचार्या डॉ. कालिंदी भट यांनी सांगितले.

कुकर लावणे, भाज्या चिरून भाज्या करणे, विविध सूप, सॅलड, तसेच पोळ्या करण्याबाबत या अभ्यासक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. पास्ता, नूडल्ससह काही नाश्त्याचे पदार्थही त्यांना शिकवण्यात येतील. रोजच्या स्वयंपाकात त्यांचे कुठे अडू नये, त्यांना स्वतः बनवलेल्या घरगुती जेवणाचा आस्वाद घेता यावा, हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे.

- डॉ. कालिंदी भट, प्राचार्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेकरांना गंडवणारी ठकसेन टोळी अटकेत

0
0

चाळीस जणांना लाखोंचा लावला चुना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्ज, नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पुणेकरांना ठकवणारी दिल्लीतील आणखी एक टोळी सायबर सेलने गजाआड केली. गेल्या महिनाभरात पुणे सायबर सेलने दिल्लीतून अटक केलेली ही सहावी टोळी आहे. या टोळ्यांनी चाळीसहून अधिक पुणेकरांना वेगवेगळ्या कारणांनी लाखो रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे.
सांगवी येथील संदीप बबन शेडगे यांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ३५ हजार रुपयांना फसवण्यात आले होते. शेडगे यांना अॅक्सिस बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिषाने आरोपींनी फोन केला होता. शेडगे यांच्याकडून कर्जासंबंधी लागणारी कागदपत्रे तसेच सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ३५ हजार रुपयांचा चेक घेण्यात आला होता. आरोपींनी तो चेक वटवून शेडगे यांची फसवणूक केली होती. शिवनाथ मदोशिया (रा. इब्राहमपुर, दिल्ली) आणि पंकजकुमार गुलाटी (रा. उत्तमनगर, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शेडगे यांना सात लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. त्या दरम्यान त्यांना मल्होत्रा नावाचा व्यक्तीचा फोन आला होता. त्याने आपण अॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून शेडगे यांचा विश्वास संपादन केला होता. शेडगे यांच्याकडून कागदपत्रे तसेच चेक घेण्यात आला. चेक वटल्यानंतरही त्यांना बँकेतून कुठलाही फोन आला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास सायबर सेलचे व​रिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने सुरू केल्यानंतर त्यांनी चेक कोठे आणि कोणी वटवला याची माहिती घेतली. चेक रवी मिश्रा या खातेदाराच्या नावावर वटवण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात ते खाते मदोशिया वापरत असल्याचे लक्षात आले. मदोशियाने बनावट कागदपत्रांच्या आधारे ते खाते उघडले होते. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.
या कारवाईत अप्पर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलिस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक, पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहायक निरीक्षक संजय ठेंगे, फौजदार प्रविण स्वामी, कर्मचारी मोहन साळवी, अजित कुऱ्हे, अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, शिरीष गावडे, बाबासाहेब कराळे, विजय पाटील, नितीन चांदणे, दीपक माने, भास्कर भारती, राजू भिसे, अविनाश दरवडे, अश्विन कुमकर, सरिता वेताळ यांचा पथकाचा सहभाग होता.
..
मदोशिया 'एचडीएफसी'चा कर्मचारी
मदोशिया 'एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स'मध्ये कार्यरत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मदोशिया याला बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक अकाउंट उघडण्याची माहिती होती. त्यानुसार त्याने खाते उघडले आणि त्याचा वापर फसवणुकीसाठी केल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी वाहनांसाठी वेग नियंत्रक सक्तीचे

0
0

साडेतीन टनापेक्षा अधिक वजनासाठी नियमावली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
साडेतीन टनापेक्षा अधिक वजन असलेल्या प्रवासी वाहनांना वेग नियंत्रक बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेग नियंत्रकांशिवाय या वाहनांची नोंदणी यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयांत केली जाणार नाही.
केंद्र सरकारने एक ऑक्टोबर २०१५ रोजी नव्याने नोंदणी केल्या जाणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसविणे बंधनकारक केले होते. तेव्हा मालवाहतूकदार संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस व साडेतीन टनांच्या आतील टेम्पोला एक एप्रिल २०१६ पर्यंत निर्णयातून वगळण्यात आले होते. आता ही मुदत संपली असून, या वाहनांनाही वेग नियंत्रक बंधनकारक करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनांच्या वेगाला नियंत्रण घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. वाहनांची निर्मिती करतानाच या वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याचे बंधन उत्पादक कंपन्यांना घालण्यात आले होते. मात्र, वेग नियंत्रक बसविल्यानंतर माल वाहतुकीवर त्याचा परिणाम होईल. तसेच, प्रवासी वाहतुकीचा वेळ वाढेल ही कारणे पुढे करून विरोध करण्यात आला होता. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे पुढील निर्णय येईपर्यंत वेग नियंत्रक नसलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
'वेग नियंत्रक बसविण्यासाठी किमान १६ हजारांपासून खर्च अपेक्षित आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ते न परवडणारे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेग नियंत्रकाच्या निर्णयातून माल वाहतूकदार आणि प्रवासी वाहतूकदारांना वगळावे,' अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या बाबा शिंदे यांनी केली आहे.
---------
सवलत दिलेली वाहने
- सर्व प्रकारच्या दुचाकी
- तीन चाकी
- चारचाकी वाहने (हलकी)
- आठ प्रवाशी आणि सामानासह साडेतीन हजार किलोपेक्षा कमी वजन असलेली वाहने
- अॅम्ब्युलन्स
- फायर ब्रिगेडची वाहने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या उद्देशाने कात्रजमध्ये खून

0
0

झोपेतच केले डोक्यात वार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरासमोर झोपलेल्याच्या डोक्यात वार करून खून केल्याचा प्रकार कात्रज परिसरातील अंजलीनगर येथे रविवारी सकाळी उघडकीस आला. चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आला असून, चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कडी लावल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तानाजी नाना टकले (वय २७, रा. गल्ली क्रमांक चार, साईनगर, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मोठा भाऊ शिवाजी टकले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तानाजी आणि शिवाजी शेजारी राहतात. सांगोला तालुक्यातील घेरडी हे त्यांचे मूळ गाव असून कामाच्या निमित्ताने दोघेही पुण्यात राहात होते. तानाजी पौड येथील खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर, शिवाजी कंपनीतील मोटारीवर चालक म्हणून काम करतात. दोघांचे विवाह झाले असून तानाजीची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. त्यामुळे तो एकटाच राहत होता. शनिवारी रात्री तानाजीने जेवणानंतर खोलीला कुलूप लावले आणि तो मच्छरदाणी लावून झोपला. पहाटे तीनच्या सुमारास शिवाजी उठले असता, तानाजी मच्छरदाणीच्या बाहेरआल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याला व्यवस्थित झोपण्यास सांगितले.
सकाळी सात वाजता त्यांना शेजारी राहणारे इरफान मुलगे यांनी उठविले. शिवाजी बाहेर आल्यानंतर त्यांना तानाजीच्या डाव्या डोळ्यावर आणि कपाळावर हत्याराने वार केल्याचे दिसून आले. तानाजी निपचित पडला होता. त्याच्याजवळ घराचे कुलूप पडले होते आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरीच्या उद्देशाने पहाटे अज्ञात चोरट्यांनी तानाजीचा खून केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी तानाजी याच्या घराची कडीकोंडी तोडण्यापूर्वी शिवाजी आणि मुलगे यांच्या घराची बाहेरून कडी लावली होती. मुलगे यांना सकाळी जाग आल्यानंतर बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन परिसरातून मुलीचे अपहरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आजीसोबत देवदर्शनासाठी पंढरपूर येथे निघालेल्या तीन वर्षांच्या मुलीचे पुणे स्टेशन येथून अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करणारी व्यक्ती पुणे स्टेशन येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, तिचा शोध सुरू आहे.
तनिष्का कांबळे (वय ३) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तिची आई प्रियंका सचिन कांबळे (रा. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाकडे काही दिवस पाहुणचार घेतल्यानंतर तिची आई पुण्यात नातेवाइकांकडे आली होती. तिने सोबत प्रियंकाची मुलगी तनिष्काला आणले होते. पुण्यातून एक एप्रिलला आजी आणि नात पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. पुणे स्टेशन येथे आल्यानंतर रेल्वे नसल्यामुळे दोघी रेल्वे स्टेशनच्या आवारात थांबल्या. त्यावेळी आजीने मद्यपान केले. त्यामुळे त्यांना झोप लागली. त्यांना जाग आल्यानंतर तनिष्का जवळ नसल्याचे आढळून आले. तिने तत्काळ प्रियंकाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार प्रियंका आणि तिचा मामा पुण्यात आले. त्यांनी मुलीचा शोध घेतला. पण, ती आढळली नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, एक व्यक्ती तनिष्काला घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपत्रित अधिकारी अद्याप मानधनाविना

0
0

सरकारला पडला अध्यादेशाचा विसर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसभा आणि विधासभा निवडणुका होऊन सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांना मानधन देण्याचा अध्यादेश काढण्याचा विसर सरकारला पडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
कोणतीही निवडणूक झाल्यानंतर प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मानधन देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात येतो. राज्य सरकारने तृतीय अणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अध्यादेश काढला आहे. मात्र, राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी अध्यादेश काढला नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकाकडून अध्यादेश काढण्यात आल्यानंतर राजपत्रित अधिकाऱ्यांना मूळ पगार आणि ग्रेड वेतन इतके मानधन दिले जाते. तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी अध्यादेश काढण्यात आला असला, तरी त्यांनाही मानधन मिळू शकलेले नाही. राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणूक शाखेकडून मांडव, छपाई काम आदी प्रकारची सेवा देणाऱ्या कंत्राटदारांची बिले देण्यात आली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांचे मानधन का देण्यात येत नाही, असा सवाल अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेचे कामकाज करणाऱ्यांना मानधन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते; तसेच मार्च महिन्याअखेर मानधन मिळण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते, मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही पालन होऊ शकलेले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामध्ये सात हजार मतदान केंद्रांवर सुमारे ४० हजार कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामध्ये वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत या कामात गुंतले होते. या कर्मचाऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत थांब काम पूर्ण केले; पण मानधन देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा सरकारला विसर पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images