Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘सोशल मीडिया’वर राहणार वचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे एका तासाच्या आत विद्यापीठात जमा... असा विद्यार्थी संघटनांकडून दिला जाणारा एक संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याचे 'सोशल मीडिया लॅब'मध्ये लक्षात आले... तशी माहिती तत्काळ चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याला मि‍ळाल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेऊन कायदा सुव्यस्थेची पाहणी केली. ... पुण्यासह राज्यातील कायदा सुव्यस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वाधिक अद्यावत अशी सोशल मीडिया लॅब सरू केली आहे. या लॅबच्या 'ट्रायल रन' दरम्यान घडलेली एक घटना उद्घाटनानंतर सांगण्यात आली. विद्यार्थी संघटनेकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या एका मेसेजची दखल घेऊन तत्काळ त्याची माहिती स्थानिकांना पोलिसांना देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. या लॅबचे औपचारिक उद्घाटन पोलिस आयुक्त के. के. पाठक, अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त दीपक साकोरे, पी. आर. पाटील, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि 'आयक्यूएसएस'चे हेरॉल्ड डिकोस्टा यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी झाले. सोशल मीडियावरील उमटणाऱ्या पडसादांचे विश्लेषण करून त्याचा कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. या लॅबमध्ये २४x७ प्रत्येकी सहा असे अठरा पोलिस कर्मचारी आणि एक अधिकारी काम करणार आहेत. फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब यासारख्या अनेक सोशल नेटवर्किंग साइटस् या लॅबमध्ये तपासण्यात येतात. आक्षेपार्ह अशा अनेक 'कीज्' तयार करण्यात आल्या आहेत. हे फिल्टर या साइटस् वर बसवण्यात आले आहेत. त्याआधारे कुठलेही आक्षेपार्ह मेसेज पोलिसांच्या नजरेत येतात आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाते. 'मुंबई पोलिसांच्या धर्तीवरच छोटी; पण चांगली लॅब बनविण्यात आली आहे. याचा पुणे शहर व जिल्ह्याला चांगला फायदा होणार आहे. या लॅबमुळे कायदा सुव्यवस्था, दहशतवादी कारवायांसारखे गंभीर प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. ही लॅब पुण्यासाठी पुणे पोलिसांसाठी एक मोठी 'अॅसेट' आहे', असे मनोगत अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे यांनी व्यक्त केले. ही लॅब पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीप्रमाणेच काम करेल. लॅबमध्ये काम करण्यासाठी नव्याने भरती झालेल्या १९ तरुण पोलिसांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. आमच्यासाठीही हे एक प्रकारचे हे शिक्षणच आहे. मात्र, या लॅबचा उपयोग पुण्यातील कायदा सुव्यस्थेसाठी मोठ्या प्रमाणात होईल, असे पोलिस आयुक्त पाठक म्हणाले.

६६ यूआरएल डिलिट केल्या पुणे पोलिसांनी या लॅबच्या माध्यमातून आक्षेपार्ह अशा ६६ यूआरएल डिलिट केल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त साकोरे यांनी दिली. एखादा आक्षेपार्ह मजकूर सापडल्यानंतर तो लगेचच डिलिट करण्यासाठी कार्यवाही केली जाते. पुढील सहा ते बारा तासांत या यूआरएल डिलिट करण्यात येतात. हा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे साकोरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भालचंद्र नेमाडेंना फर्ग्युसन गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अलौकिक कामगिरी करणाऱ्या फर्ग्युसोनियन्सला दिला जाणारा यंदाचा 'फर्ग्युसन गौरव' पुरस्कार ज्ञानपीठ विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना, तर 'फर्ग्युसन अभिमान' हा पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय केळकर, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, निर्माती-लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि जलतरणपटू रोहन मोरे यांना देण्यात येणार आहे. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता फिरोदिया सभागृहात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोड सर्वेक्षणात अडथळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध केला असून त्यावर मार्ग काढण्यासाठी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणातील अडथळे दूर होऊन त्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत रिंगरोडच्या सर्वेक्षणामध्ये येणाऱ्या अडथळ्यांबाबत मंगळवारी बैठक झाली. यामध्ये रिंगरोडचा प्रस्तावित मार्ग आणि त्याच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या विरोधावर उहापोह झाला. त्यानंतर या सर्वेक्षणाच्या कामासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी २००७मध्ये रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. रिंगरोडचा प्रस्ताव आल्यानंतर त्याची आखणी कशी असावी यावरून मतभिन्नता होती. त्यामुळे ही आखणी किमान चार वेळा बदलावी लागली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) जवळून हा रस्ता सुरुवातीला प्रस्तावित होता. पण त्याला एनडीएने आक्षेप घेतले. त्यानंतर अगदी खडकवासला धरणावर पूल उभारण्यापर्यंतची आखणी करण्यात आली. त्यानंतर एइकॉम एशिया लिमिटेड या कंपनीने रिंगरोडच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून त्याचा अहवाल रस्ते विकास महामंडळाला सादर केला. त्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग शक्य नसल्याचे कळविले होते. त्याऐवजी काही अंतरावरून नव्याने रिंगरोडची आखणी करावी, अशी सूचनाही या कंपनीने केली होती. त्यानुसार नवीन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.

तथापि, खेड आणि अन्य तालुक्यात रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावरील शेतकऱ्यांनी या सर्वेक्षणाच्या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबले आहे. रिंगरोडच्या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरीत काम विरोधामुळे थांबल्याने यासंदर्भात रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांची एक बैठक मध्यंतरी झाली होती. या बैठकीत संबंधित कंपनीने शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या विरोधाची माहिती दिली. त्यावर पोलिस संरक्षण घेऊन हे काम मार्गी लावावे, अशा सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिस बंदोबस्त घेऊनही काही भागातील सर्वेक्षणाचे काम होऊ शकलेले नाही.

यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकरी पाटील यांच्यासमवेत जालेल्या बैठकीत उर्वरित दहा ते बारा किलोमीटर लांबीचे सर्वेक्षण करताना तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची मदती घ्यावी. त्यांच्या माध्यमातून रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रिंगरोड प्रकल्प दृष्टिक्षेपात...
- १७० किमीचा प्रस्तावित मार्ग
- ९० मीटर रुंद रस्ता; सहा पदरी मार्ग
- थेऊर ते चिंबळी फाटा, निघोज ते पिरंगुट, पिरंगुट ते खेड शिवापूर आणि वेळू ते वडकीनाला असे चार टप्पे
- शहराच्या हद्दीच्या दहा किमीपासून लांब
- पुणे-सोलापूर, सोलापूर- नाशिक आणि मुंबई अशा चार प्रमुख महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार
- १५ ते २० हजार कोटी रुपये खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षक खोत यांची खातेनिहाय चौकशी

$
0
0

भोर : आठ महिन्यांपूर्वी येथील पोलिस ठाण्यात हजर झालेले पोलिस निरीक्षक श्रीधर खोत यांची कार्यपद्धती दिवसेंदिवस वादग्रस्त होत चालली असून त्यांच्या विरोधातील तक्रारींची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे.

खोत येथे हजर झाल्यापासून अवैध धंदे, गावठी दारूची विक्री यांना सुगीचे दिवस आले आहेत. वाळू आणि गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना वसुलीची धमकी देऊन तोडपाणी करणे, दुचाकी वाहन चालकांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने दंड वसुल करणे, शालेय विद्यार्थ्यांकडूनही चहापाण्याची अपेक्षा ठेवणे, गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्यावरून झालेली तक्रार, त्यावेळी झालेला तोडपाण्याचा प्रकार, तसेच त्यातून डीजेला दिलेली परवानगी याची चर्चा रंगली होती. नागरिकांसोबतच पोलिसही त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराज आहेत.

खोत यांच्या विरोधात गेल्या चार महिन्यापासून नागरिक आणि संस्थांनी अनेक तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस महासंचालकांपर्यंत लेखी निवेदनाद्वारे दिल्या आहेत. त्यामध्ये खोत यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यानुसार बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी खातेनिहाय प्राथमिक चौकशी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणवा लागण्याच्या घटना वाढल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जंगलांना ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटनांत सध्या वाढ होत आहे. यामध्ये मालकीच्या जागेतील वनांना आगी लावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत असून वन्यजीवांचा निवाराही नष्ट होत आहे.

डोंगरांना वणवे लावल्यास पावसाळ्यात अधिक चांगल्या प्रमाणात नवीन गवत उगवते हा समज स्थानिक नागरिकांमध्ये प्रचलित आहे. पाळीव जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी चांगले गवत उगवावे यासाठी अनेकवेळा असे वणवे लावले जातात. वन विभागाच्या, तसेच मालकीच्या डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार घडतात. विशेषतः रात्रीच्या वेळी वणवे लावले जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी जाणूनबुजून आगी लावल्या जातात. या वणव्यांमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील जंगल खाक होत आहे.

खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ आहे. येथील गावांच्या हद्दीत वन विभागासोबतच खासगी मालकीचे डोंगर आहेत. मालकीच्या अनेक डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षराजी आहे. बहुतेक सर्व मालकीचे डोंगर तालुक्यातील, तसेच बाहेरचे व्यावसायिक आणि धनदांडग्यांनी विकत घेतले आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक गावांच्या हद्दीतील घनदाट वृक्षराजी असलेले हे डोंगर आता ओसाड झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

प्रकल्पांच्या नावाखाली डोंगर पोखरून, तसेच वृक्षराजी जाळून जमीन सपाट केली जात आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या लगतच्या गावांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जंगलातील प्राण्यांना हुसकावून लावून त्यांची शिकार करण्यासाठी काहीजण डोंगरांना आगी लावतात. वणव्यातून जीव वाचवण्यासाठी हे प्राणी सैरावैरा मार्ग दिसेल तिकडे धावतात. शिकारी टोळ्या या पळणाऱ्या प्राण्यांची हत्या करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या तक्रारींसाठी २४ तास कॉलसेंटर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
वीज पुरवठ्यासह सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यासाठी, तसेच माहिती विचारण्यासाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरील सेवा २४ तास उपलब्ध आहेत. त्यावर ग्राहकांना मोबाइल किंवा फोनवरून क्रमांक नोंदविणे सुलभ झाले आहे. यापुढे वीज ग्राहकांनी नोंदणीकृत क्रमांकावरून कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही.

महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००-२००-३४३५ व १८००-२३३-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या मोबाइल व दूरध्वनी क्रमांकावरून यावर संपर्क साधता येतो. कॉल सेंटरमधील 'इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम'द्वारे (आयव्हीआरएस) वीजग्राहकांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संपर्क साधण्याची सोय आहे. ही कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक तक्रार निवारण केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत.

वीजग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. त्याशिवाय कॉल सेंटरच्या तांत्रिक प्रणालीमध्ये तक्रारीची नोंद होऊ शकत नाही. वीजग्राहकांनी स्वतःचे एक किंवा दोन मोबाइल क्रमांक किंवा एक दूरध्वनी क्रमांक कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यास कोणत्याही वेळी कॉल सेंटरशी संपर्क साधल्यानंतर तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही. कॉल सेंटरमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर वीजग्राहकांना तक्रार क्रमांकही देण्यात येतो. त्यानंतर दोन ते तीन मिनिटांत तक्रारीची माहिती संबंधित जनमित्र व अभियंता यांना 'एसएमएस'द्वारे दिली जाते, तसेच तक्रारींच्या निवारणाला सुरुवात होते. त्यामुळे वीजग्राहकांनी तक्रारी देण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या जागेवर गोठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
पुणे महापालिकेत बिगारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच पालिकेच्या जागेवर मागील दहा वर्षांपासून म्हशींचा गोठा उभारून अतिक्रमण करत जागा बळकावली आहे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमणविरोधी कारवाई करणारी पालिका आता एका कर्मचाऱ्याने केलेले अतिक्रमण का काढत नाही, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय हे आधी संगमवाडी क्षेत्रीय कार्यालय या नावाने ओळखले जात असे. हे कार्यालय गोल्फ चौकातील रस्त्यावर होते. त्यानंतर काही वर्षांनी गुंजन चौक रस्त्याच्या कडेला या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर या कार्यालयाचे नाव येरवडा क्षेत्रीय कार्यालय असे झाले. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रशासकीय कामे याच कार्यालयातून होत आहे. ढोले पाटील रोड, येरवडा आणि नगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमणविरोधी कारवाई करताना जप्त केलेले सामान, हातगाडी, लोखंड पत्रे आणि किरकोळ सामान ठेवण्यासाठी, तसेच पालिकेचे ट्रक, टेम्पो, जेसीबी वाहने लावण्यासाठी जुन्या संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या जागेचा वापर केला जातो. तसेच या जागेवर पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी वाचनालय बांधण्यात आले आहे.

पुणे महापालिकेत बिगारी काम करणाऱ्या शंकर देवकर या कर्मचाऱ्याने मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून जुन्या क्षेत्रीय कार्यालयाच्या या जागेवर पत्र्याचे शेड बांधून गाई, म्हशींसाठी गोठा उभारला आहे. पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून देवकर याने या गोठ्यात गाई, म्हशी आणि शेळ्या पाळल्या आहेत. पालिकेने वारंवार सूचना देऊनही गोठा हलविला जात नसल्याची तक्रार पालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. दहा वर्षांहून अधिक काळ पालिकेच्या जागेवर हे अतिक्रमण असताना आतापर्यंत त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या शिका शास्त्रीय, सुगम संगीत

$
0
0

घरबसल्या शिका शास्त्रीय, सुगम संगीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची अनेकांची इच्छा धकाधकीच्या जीवनामुळे राहून जाते. थोडा वेळ काढून ही कला आत्मसात करायला हवी, असा विचार अनेकांच्या मनात सतत डोकावत असतो, पण त्यास काही केल्या मूर्त रूप मिळत नाही. संगीतवेड्या रसिकांची ही सुप्त इच्छा आता घरबसल्या पूर्ण होणार आहे. त्यासाठी गानविश्वातील प्रख्यात पुणे भारत गायन समाज या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे चालविला जाणारा शास्त्रीय संगीताचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम प्रत्येकी दोन डीव्हीडीमध्ये चित्रित करून जतन करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये सावनी दातार-कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीत आणि शिल्पा दातार-पुणतांबेकर यांनी सुगम संगीत शिकविले आहे. पं. भास्करबुवा बखले यांच्या पणती असलेल्या या युवा गायिकांचे योगदान या प्रकल्पाला लाभले आहे. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना या दोघी संगीत शिकवीत आहेत, अशा स्वरुपाचे चित्रीकरण यामध्ये करण्यात आले आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम दोन डीव्हीडी संचामध्ये चित्रित केला असून, शास्त्रीय संगीताबरोबरच भास्करबुवांच्या परंपरेतील सुगम संगीत गायनकलेचा आनंद अभ्यासकांना मिळणार आहे. या डीव्हीडी संचाबरोबर अभ्यासक्रमाचे पुस्तकही विनामूल्य देण्यात येणार आहे.
'संगीत शिकण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी विद्यालयामध्ये येणे जमत नाही, अशांसाठी घरबसल्या संगीत शिक्षणाचे योग्य मार्गदर्शन मिळावे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. त्यातून ध्वनिफितींचीं निर्मिती करण्यात आली आहे,' असे सावनी दातार-कुलकर्णी यांनी 'मटा'ला सांगितले.
गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. पूर्वी विद्यालयामध्ये सहा दिवस संगीत शिक्षणाचा अभ्यासक्रम होत असे. मात्र, आता आठवड्यातून जेमतेम दोन-तीन दिवस संगीताचे वर्ग चालतात. त्या पार्श्वभूमीवर संगीताचा प्रसार थांबू नये व रसिकांना घरबसल्या संगीत शिकता यावे, या विचारातून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.
.................
संवादिनी आणि तबलावादनही
गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून विकसित झालेले शास्त्रीय संगीत या आधुनिक माध्यमातून शिकता येणार असून, रसिकही या डीव्हीडीद्वारे संगीत शिक्षण आणि श्रवणाचा आनंद लुटू शकतील. यापुढे संगीत विशारद आणि संगीत पारंगत या अभ्यासक्रमासह संवादिनी आणि तबलावादनाचा अभ्यासक्रम डीव्हीडीद्वारे चित्रित करून ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य परिषद जानव्यात अडकून पडली होती

$
0
0

साहित्य परिषद जानव्यात अडकून पडली होती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महाराष्ट्र साहित्य परिषद राजकीय कुरूपतेचा अड्डा न होता, सांस्कृतिक संचिताचा गड्डा बनायला हवी. साहित्य परिषद यापूर्वी जानव्यात अडकून पडली होती,' असा आरोप साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून केला.
साहित्यवेध प्रतिष्ठान व सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्यांनी परिषदेच्या कारभारावर टीका केली. नूतन कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रतिष्ठानचे प्रमुख कैलास भिंगारे व फाउंडेशनचे प्रमुख नेताजी खंडागळे याप्रसंगी उपस्थित होते.
'नवीन कार्यकारिणीमध्ये सर्व जातीची मंडळी आहेत. नवीन श्रमिक कवी, लेखकांना धुमारे फुटण्याचा हा काळ आहे, अशा काळात त्यांच्यासाठी साहित्य परिषदेचे दार बंद केले, तर साहित्यामध्ये वेदनेचे मूल्य येणार नाही. परिषद जानव्यामध्येच बंदिस्त आहे, असा आरोप होईल. त्यामुळे यापुढे परिषदेत सर्वांना प्रवेश असायला हवा. सर्व साहित्य प्रवाहांना सामावून घेता यायला हवे,' याकडे डॉ. सबनीस यांनी लक्ष वेधले.
'साहित्य संमेलनाचा वापर ब्रँडिंगसाठी होत आहे. संमेलनाचे आयोजन साहित्य संस्थांकडे न देता धनदांडग्यांकडे दिले जात आहे. त्यामुळे त्यातील सात्विकता आणि सत्व हरवले आहे. संमेलनाचा ब्रँडिंगसाठी वापर करणाऱ्या लोकांना यापुढे दूर ठेवण्यात येईल,' अशी टीका प्रा. जोशी यांनी केली. 'कोटींची उड्डाणे आणि पंचपक्वान्न यापेक्षा साहित्याची रसिकांशी नाळ टिकवायला हवी. संमेलनाध्यक्ष हे ११ कोटी मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा अवमान हा मराठी माणसाचा अवमान आहे. यापुढे संमेलनाध्यक्ष व साहित्यिकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल,' असे प्रा. जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन हनुमंत पवार यांनी केले.

बाकीचे काय शेण खातात का?
'राजकारणाचा विटाळ मानायचे काही कारण नाही, पण साहित्य परिषद कुरूप राजकारणाचा अड्डा होऊ नये. साहित्याच्या विकासासाठी जरूर राजकारण व्हावे. मात्र, परिषदेतील राजकारणातून विकृती निर्माण होत असेल तर विचार करण्याची वेळ आहे,' अशा शब्दांत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी परिषदेतील राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. 'शेतकऱ्यांचा आणि साहित्याचा काय संबंध अशी मांडणी करणारे काही मूर्ख लोक साहित्य क्षेत्रात आहेत. साहित्य फक्त साहित्यिकांचे असेल तर बाकीचे काय शेण खातात का,' असा सवाल डॉ. सबनीस यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाला देशद्रोही किंवा निर्दोष ठरवणेही घातक

$
0
0

कन्हैयाला देशद्रोही किंवा निर्दोष ठरवणेही घातक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कन्हैयाला पुण्यात यायला बंदी करणे योग्य नाही. त्याला बोलू न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा असून तो घटनेचा अवमान ठरतो. कन्हैयावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्याला एका फटक्यात देशद्रोही अथवा निर्दोष ठरवून टाकणे घातक आहे,' असे मत मांडत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या हिंदुत्ववादी व डाव्या मंडळींना बुधवारी फटकारले. 'देशद्रोही अथवा निर्दोष या दोन भूमिकांपेक्षा तिसऱ्या विवेकाच्या भूमिकेतून आपण या घटनांकडे पाहायला हवे,' असा सल्ला त्यांनी दिला.
'जेएनयू' व 'भारत माता की जय' या घोषणेवरून सध्या देशात सुरू असणाऱ्या गोंधळाविषयी पत्रकारांनी डॉ. सबनीस यांना विचारले असता, 'घटनेचे भांडवल करून स्वार्थी राजकारण करण्याचे प्रकार सुरू आहेत. कन्हैयाने पक्षांसाठी व लोकांसाठी नव्हे, तर स्वत:साठी आपण राष्ट्रप्रेमी असल्याचे सिद्ध करून या मुद्द्यांतील हवा काढून टाकावी. तेंव्हाच हिंदुत्ववादी व डाव्यांचे राजकारण थांबेल,' अशी टीका डॉ. सबनीस यांनी केली.
'पुणेकरांनी कन्हैयाचे विचार ऐकले पाहिजेत. त्यानंतर कोणाला प्रतिवाद करायचा असेल, तर तो नंतर करता येतो. कन्हैयाला देशापासून नव्हे, तर जातीव्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे आहे. त्याच्या या मताशी मी सहमत आहे. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. कन्हैयावरील आरोप सिद्ध झाले नसल्याने, त्यास स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याला शहरात येऊ न देण्याची भाषा करणे, त्याला मत मांडण्यापासून रोखणे हे घटनेचा अवमान करण्यासारखे आहे,' यावर डॉ. सबनीस यांनी बोट ठेवले.
'कन्हैयाचे भाषण ऎकण्यास मी उत्सुक आहे. त्याच्याशी संवाद साधायला मला आवडेल,' असे ते म्हणाले.
-----------------------------------
'भारत माता की जय' म्हणण्याची सक्ती नको
'भारत माता की जय' म्हणण्याची सक्ती नाही, असे स्पष्टीकरण मोहन भागवतांनी केले आहे. भागवतांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. 'भारत माता की जय' म्हणण्याची सक्ती असूच नये. यावरून वाद थांबणे हे देशाच्या अंतर्गत शांततेसाठी गरजेचे आहे,' अशी भूमिका डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगातील शेवटच्या २५ भाषांमध्ये मराठी असेल

$
0
0

जगातील शेवटच्या २५ भाषांमध्ये मराठी असेल

सरहद संस्थेच्या वतीने महाराष्ट्र आणि पंजाबचा सांस्कृतिक दुवा साधणाऱ्या 'घुमान' या संत नामदेवांच्या कर्मभूमीत येत्या ३ व ४ एप्रिल रोजी 'भारतीय भाषांसाठी मराठीचा पुढाकार' या विचारातून 'घुमान बहुभाषिक साहित्य संमेलन' होत आहे, या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त चिंतामणी पत्की यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.
................

अनेक भाषा नष्ट होत आहेत. तुमचे निरीक्षण काय आहे?
समाजाला पर्यावरणाच्या नष्टतेची जाणीव करून दिली, तशी भाषेच्या बाबतीत करून द्यायला हवी. येत्या २०० वर्षांत सर्व भाषा नष्ट होतील. पुढील ३० ते ४० वर्षांत जगातील सहा हजारपैकी चार हजार भाषा नष्ट होणार आहेत. त्यामध्ये भारतातील ६०० भाषांचा समावेश असेल. दर महिन्याला एक भाषा नष्ट होत आहेत. भाषा मृत झाल्यानंतर तिचे स्मारक करावे लागेल. 'आमच्या डोळ्यादेखत या भाषा मृत झाल्या,' असे त्यावर लिहावे लागेल.

भाषा नष्ट होण्यामागे भाषांची स्पर्धा कारणीभूत आहे का?
मोठी भाषा छोट्या भाषेला खात नाही. भाषिक संघर्ष त्या अर्थाने मारक नसतो. स्मृती टिकवण्याचे काम आपण माहिती-तंत्रज्ञानाला दिले आहे. पूर्वी मेंदूचा वापर व्हायचा, आता मशीनचा वापर होतो. या व्यवस्थेमुळे भाषांचा आकृतीबंध कोसळत आहे. मेंदूच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. भाषा व्यवस्थेतून आपण दृष्यमाध्यमात जात आहोत. शब्दांची जागा हे माध्यम घेत आहे. त्यामुळे भाषा नष्ट होत आहेत.

हा धोका सध्या कोणत्या भाषांना संभवतो?
समुद्राच्या किनाऱ्याला राहणाऱ्या लोकांची आणि भटक्या लोकांची भाषा धोक्यात आली आहे. स्वत:ची भाषा सोडून दुसऱ्या भाषेत स्थलांतर करणे भयानक आहे. सिक्कीममधील माझी, महाराष्ट्रातील सिद्दी, खारवा, बहाली, मांगिणी, निहाली या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

भाषा नष्ट झाल्या तर संवाद आणि ज्ञानार्जनाचे काय?
भाषा नष्ट झाल्या, तर भाषांचा ७० हजार वर्षांचा इतिहास नष्ट होईल. त्याबरोबर ज्ञान व अनुभव संपुष्टात येईल. भाषेतच ज्ञान आणि अनुभव असतात. ते टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी भाषेकडे गांभीर्याने पाहाणे आवश्यक आहे.

भाषा टिकवण्यासाठी भाषा साक्षरता किती महत्त्वाची आहे?
अनेक भाषा एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. आपल्या मातृभाषेखेरीज इतर भाषांकडे जास्त आपुलकीने पाहायला हवे. संवाद वाढायला हवा. सध्या विसंवाद जास्त आहे. सर्व भाषांचे संमेलन व्हायला हवे. भाषा संवादाचे एकमेव साधन आहे. भाषेशिवाय संवाद होऊ शकत नाही. भाषा असेल तर कुटुंब, गाव टिकू शकेल. भाषिक समानता वाढवणे आवश्यक आहे. चित्तविस्तार हे साहित्याचे लक्षण आहे. मराठीवर प्रेम हवेच, पण इतर भाषांवरही प्रेम करता यायला हवे.

मराठीची स्थिती कशी वाटते?
ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास झाला आहे. त्यामुळे मराठीच्या भविष्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. जगात ज्या २५ भाषा राहतील, त्यामध्ये मराठी असेल. मराठीची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच हातपाय हलवायचे नाहीत. इतर भाषांचा तिरस्कार केल्याने मराठीचा प्रसार होणार नाही. भाषेवर प्रेम केले तरच तिची वाढ होईल.

जगाचा विचार करता इंग्रजी सर्वात सशक्त आहे का?
सक्षम अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाची भाषा अधिक सक्षम असते. जगात अमेरिकेचे प्रभुत्व असल्याने इंग्रजीचा बोलबाला आहे. उद्या चीन किंवा भारत शक्तिशाली झाला, तर चीनी अथवा हिंदी भाषा सशक्त होईल. इंग्रजी भाषेचा प्रसार झाला तरी आज त्या भाषेचे तुकडे होत आहेत. इंग्लंडमधील इंग्रजी दुसऱ्या देशातील लोकांना कळत नाही,अशी परिस्थिती आहे. इंग्रजी तणावाखाली असून तिचे तुकडे पडत आहेत. वरवर पाहाता इंग्रजीची स्थिती हेवा वाटावा अशी असली तरी संख्येच्या दृष्टीने हिंदी पुढे आहे.

हल्ली सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिकायचे असते.
मातृभाषेपेक्षा इतर भाषेतून शिक्षण ही पद्धत लवकरात लवकर बंद केली तरच योग्य आहे. मराठी भाषा सुदृढ आहे. मुद्रण, तंत्रज्ञान, साहित्य, लोकसंगीत, चित्रपट या माध्यमातून भाषा जिवंत आहे. सर्वांना इंग्रजी माध्यमात पाठवणे हे वेड असून मातृभाषेत शिक्षण झाले नाही, तर बुद्धी विकसित होत नाही.

भाषा तर नष्ट होत आहेत, तरी शब्दबंबाळता खूप आहे...
शब्दांमध्ये समाज अडकून पडतो. क्षमतेत कमी पडत असू आणि वैचारिक संधीचा फायदा उठवता येत नसेल, तर शब्दबंबाळता येते. बौद्धिक आळस असण्याचे हे लक्षण होय.

भाषा कशी जन्माला येते, याबाबतीत कोणत्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे का?
पाठीचा कणा व मेंदू जोडले गेलेले असतात ही रचना; तसेच आपल्या जीवनाप्रमाणे होणाऱ्या आपल्या शारीरिक हालचालींप्रमाणे भाषा निर्माण होते. भाषा जन्माला येण्याचे हे सूत्र आहे.

नवीन भाषा जन्माला येतात का?
नवीन सांकेतिक भाषा जन्माला येत आहेत. संगणकाच्या भाषा जन्माला येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात टँकरचा काळाबाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे टँकरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांच्या गरजेप्रमाणे रोज टँकरचे दर वाढ‌त असून प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी बाराशे, काही भागात पंधराशे रुपये तर काही ठिकाणी दोन ते अडीच हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरचा काळाबाजारही सुरू झाला असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने ही टँकरची मागणी वाढली आहे.

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर महापालिकेचे स्वत:चे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी असे तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. शहराला एक दिवसाआड पाणी दिले जात असल्यामुळे ज्या भागांमध्ये आधीच कमी वेळ आणि अपुरा पाणीपुरवठा होत होता, त्या भागांमधून पाणी मिळत नसल्याबद्दल सातत्याने तक्रारी सुरू झाल्या आहेत. स्थानिक नगरसेवकांना नागरिकांनी हैराण केले आहे. पालिकेच्या; तसेच खासगी टँकरचीही मागणी वाढली आहे. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये वाट्टेल त्या दराने टँकरचालक पाणी देत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. खासगी टँकरचालकांकडून महापालिका पाचशे ते साडेसातशे रुपये दरम्यान शुल्क आकारते. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना हा टँकर देताना ठेकेदार परिस्थितीनुसार पैसे आकारत असल्याची तक्रार केली जात आहे. एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा इतर कोणत्याही ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जात असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकरचा पुरवठा करणारा ठेकेदार मागेल तो दर द्यावा लागत आहे. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार बाराशे ते पंधराशे रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.

पूर्व भागात मागणी जास्त

शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा आदी अनेक उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकरभरणा केंद्रांवरून पाणी घेतात तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. पालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकरभरणा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

तक्रार नोंदवा

नागरिकांना पाण्याचा टँकर देताना ठेकेदारांनी किती दर घ्यावा, याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईचा फायदा उठवित नागरिकांकडून टँकरचालकाने वाढीव दर घेतल्यास त्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करावी.

- विजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन आत्महत्यांमुळे पिंपरीत खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरात बुधवारी एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. दापोडी व मोशी येथे दोन महिलांनी, तर चिखलीत एका पुरुषाने गळफास घेऊन जीवन संपविले. अनेक दिवसानंतर शहरात पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. तिघांपैकी एका महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, तिघांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
स्नेहल प्रशांत सावंत (२८, रा. वरद रेसीडन्सी, दापोडी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल यांचा दोन वर्षापूर्वी प्रशांत यांच्याशी विवाह झाला होता. बुधवारी सकाळी स्नेहल फिरायला बाहेर गेल्या होत्या. घरी परत आल्यावर स्नेहल या बेडरूममध्ये गेल्या. सासू त्यांना नाष्टा देण्यासाठी गेल्या असता स्नेह यांनी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या उघड झाले. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. स्नेहल यांचे पती प्रशांत हे चाकण येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. स्नेहल यांना गेल्या काही दिवसांपासून मणक्याचा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
दुसरी घटना मोशी येथे घडली. ३५ वर्षीय अज्ञात महिलेने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास मोशी येथील टोलनाक्याजवळील मोकळ्या मैदानात हा प्रकार उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. तिसरी घटना चिखलीमध्ये उघडकीस आली. ताम्हाणेवस्ती येथे बालाजी नारायण गायकवाड (४३, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे चिखली येथे राहतात. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सगळे घरामध्ये झोपले होते. गायकवाड त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते. सकाळी त्यांना उठायला नेहमी पेक्षा उशीर झाला, तरी त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे घरच्यांनी निगडी पोलिसांना बोलविले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला असता गायकवाड गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर ऊर्जा प्रस्ताव दप्तरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मालकीच्या इमारतींवर केंद्र सरकारने नेमलेल्या ठेकेदाराकडूनच सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा हट्ट धरणाऱ्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना मंगळवारी स्थायी समितीने चांगलाच झटका दिला. आयुक्तांचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. हा विषय दप्तरी दाखल न करता मान्य करावा, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी घेतल्याने यावर मतदान घेऊन बारा विरुद्ध तीन मतांनी हा विषय दप्तरी दाखल करण्यात आला.
पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविण्यासाठी ठेकेदाराची मदत न घेता पालिकेने यामध्ये पुढाकार घेऊन टेंडर प्रक्रिया राबवावी, अशी उपसूचना देऊन फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीने आयुक्त कुमार यांना फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवून केंद्र सरकारने नेमलेल्या ठेकेदाराकडूनच हा प्रकल्प राबविण्याचा हट्ट धरून आयुक्तांनी जुनाच प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी आला असता, हा विषय मान्य करावा, अशी भू‌मिका भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी घेतली. तर काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, शिवसेनेच्या सभासदांनी याला कडाडून विरोध केला. अखेर मतदान घेऊन हा विषय दप्तरी दाखल करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.
केंद्र सरकारने नेमलेल्या ठेकेदाराकडून हा प्रकल्प राबविण्यात यावा, असे आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले होते. पालिकेने टेंडर प्रक्रिया राबविल्यास शासनाकडून मिळणारेअनुदान मिळणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले होते. स्थायी समितीने यापूर्वीच हा प्रकल्प पालिकेने राबवावा, अशी उपसूचना देत आयुक्तांनी फेरप्रस्तावसादर करण्यास सांगितले होते. मात्र आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा विषय दप्तरी दाखल करण्यात आला आहे. पालिकेने हा प्रकल्प राबवावा, यासाठी चालू वर्षाच्या (२०१६-१७) अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अध्यक्ष बोडके यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीचा ‘ऑफलाइन’ मार्ग खुला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारण्याचा निर्णयामुळे पोस्टातील खोळंबलेली गुंतवणूक काही प्रमाणात सुकर झाली. परंतु, काही पोस्ट ऑफिसमध्ये एका व्यक्तीकडून एकच अर्ज किंवा एका एजंटकडून दोनच अर्ज असा मनमानी कारभार सुरू झाल्याने वादावादीचे प्रसंग घडले. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत एकाच दिवसात पोस्टात पुणे शहरात एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
तांत्रिक बिघाडामुळे पोस्टातील सर्व्हर काही महिन्यांपासून सातत्याने डाऊन असल्याने ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यातच एक एप्रिलपासून पोस्टातील ठेवींवरील व्याजदर कमी होणार असल्याने तत्पूर्वी ठेव ठेवण्यासाठी ठेवीदार पोस्टात गर्दी करत होते.
त्या पार्श्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. प्रसाद यांनी तातडीने बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन लागू करण्याचे तसेच ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी पुणे, सोलापूर, नगर व सातारा या क्षेत्रांतील सर्व पोस्ट ऑफिसना ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारण्याचे आदेश दिले.
प्रत्यक्षात मंगळवारी दुपारपर्यंत काही पोस्ट ऑफिसमध्येच ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारल्या जात होत्या, तर काही ठिकाणी एका व्यक्तीकडून एकच अर्ज, एका एजंटकडून दोनच अर्ज अशा प्रकारचा मनमानी कारभार केला जात होता. काही ठिकाणी तर असे आदेशच आले नसल्याचेही सांगण्यात आल्याने ठेवीदार संतप्त झाले होते.


'अडचणी आल्यास संपर्क साधा'

सर्व पोस्ट ऑफिसना ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आलेल्या अडचणी त्वरित दूर केल्या गेल्या. दुपारी चारपर्यंत पुणे शहरातून पोस्टात एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. बुधवारीही पूर्ण क्षमतेने काम सुरू राहील, असे पुणे विभागाचे असिस्टंट पोस्ट मास्तर जनरल एफ. बी. सय्यद यांनी सांगितले. ठेवीदारांना काही अडचणी आल्यास जीपीओमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सय्यद यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांवर कारवाई करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे लोकप्रतिनिधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे, पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाला दिले. 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात कोणत्याही स्वरूपात लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी केले जाणार नाहीत, असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात कुणाल कुमार यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. या पत्राचा सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळात 'स्मार्ट सिटी' प्रकल्पावरील चर्चेत सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवून, त्यांना सहभागी करून घेण्याची गरज आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आयुक्तांसारख्या व्यक्तीने अशा स्वरूपाची भाषा वापरणे योग्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. त्यावर खुलासा करताना, आयुक्तांवर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसे झाल्यास आयुक्तांच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल, अशी अपेक्षा राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करणार नाही

लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, अनिल भोसले यांनी केला. तर, पुण्याच्या आयुक्तांनी 'स्मार्ट सिटी'शिवाय इतर कोणत्याही प्रश्नात लक्ष घालू नये, असे आदेश दिल्याची उपरोधिक टिप्पणी अनंत गाडगीळ यांनी केली. त्यावर स्पष्टीकरण देताना, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना कंपनीच्या संचालक मंडळावर स्थान देण्यात आले असून, कोणाचेही अधिकार कमी केलेले नाहीत, अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला क्रिकेटज्वराची बाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय संघ टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाल्यानंतर शहरातील क्रिकेटज्वर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गुरुवार हा बहुतेकांसाठी कामाचा दिवस असला, तरी मॅच पाहण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. अनेकांनी कामावरून लवकर बाहेर पडून, मित्र-मैत्रिणींसोबत एकत्रित मॅच पाहण्याचे ठरवले आहे. शहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही मॅचसाठी काही आकर्षक पॅकेज उपलब्ध आहेत.
शहरातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटनी खास मॅच पाहण्यासाठी मोठ्या टीव्ही किंवा स्क्रीन्सची सोय केली आहे. त्याचबरोबर डिनर आणि ड्रिंक्ससाठीही खास पॅकेज देऊ केले आहे. अगदी प्रत्येकी ३९९ रुपयांपासून सात ते दहा हजार रुपयांपर्यंत ही पॅकेजेस उपलब्ध आहेत. ग्रुप बुकिंगसाठी सवलतही देऊ करण्यात आली आहे. शहरातील अनेक प्रसिद्ध क्लबमध्येही त्यांच्या सभासदांसाना मॅच पाहताना जेवण व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील काही गणेश मंडळांनी प्रोजेक्टरच्या साह्याने मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. सोसायटीतल्या मित्रपरिवारांनीही सर्वात मोठी स्क्रीन असलेल्या मित्राच्या घरी एकत्र जमून मॅच पाहण्याची तयारी केली आहे. महिला वर्गातही मॅच पाहण्याबाबत मोठी उत्सुकता असून त्यांनीही मॅच पाहण्याचे नियोजन केले आहे. 'माझी दहावीची परीक्षा नुकतीच संपली आहे. त्यामुळे आम्ही सर्व मित्र एकत्र जमून मॅच पाहणार आहोत. कोल्ड ड्रिंक, खाऊ, फटाके अशी जय्यत तयारीही केली आहे,' असे सिद्धांत शहा याने सांगितले.
इयर एंडचे काम आणि मॅच
३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरतो. अनेकांना रात्री उशिरापर्यंत कामावर थांबावे लागते. याच दिवशी मॅचचा योगायोग जुळून आल्याने अनेकांनी ऑफिसमध्येच मॅच पाहण्याचे ठरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शि. प्र. मंडळी’साठीचे मतदान शांततेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शि. प्र. मंडळी'च्या नियामक मंडळाची बुधवारी झालेली निवडणूक पुण्यात शांततेत पार पडली. निवडणुकीपूर्वी समोर आलेला कोऱ्या मतपत्रिकांचा घोळ आणि मंगळवारी सायंकाळी झालेल्या अटकसत्राच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी संस्थेच्या ज्येष्ठ आणि वयोवृद्ध मतदारांनीही बुधवारी सकाळपासून जाणीवपूर्वक हजेरी लावल्याचे दिसून आले. गुरुवारी मतमोजणी होईल. शि. प्र.च्या नियामक मंडळातील १२ सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी मतदान झाले. पुण्यासह मुंबई आणि सोलापूरमध्ये त्यासाठी मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. संस्थेच्या इतिहासामध्ये यंदा पहिल्यांदाच सभासदांना मतदार केंद्रावर येऊन मतदान करण्याची संधी देण्यात आली होती. पुण्यात संस्थेच्या मुख्य कार्यालयात तळ मजल्यावरील सभागृहामध्ये सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत हे मतदान घेण्यात आले. पुण्यातील बहुतांश मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. पुण्यासह मुंबई आणि सोलापूरमधील केंद्रांवरही अत्यंत शांततेमध्ये हे मतदान झाल्याची माहिती निवडणूक समितीचे सदस्य आणि धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांनी मतदानानंतर दिली. जाधव म्हणाले, 'या निवडणुकीसाठी एकूण ३ हजार ५०५ सभासद मतदार होते. पुण्यातील एक हजार ७३८ मतदारांपैकी ८६० मतदारांनी बुधवारी मतदान केले. मुंबईमधील ७४४ मतदारांपैकी ५५, तर सोलापूरमधील एकूण ५६१ मतदारांपैकी १६४ मतदारांनी आपला हक्क बजावला. पोस्टाद्वारे नोंदणी केलेल्या एकूण ५०४ सदस्यांपैकी ७० सदस्यांनी आपल्या मतपत्रिका समितीकडे पाठविल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात धावणार इलेक्ट्रिक बस

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात सध्या डिझेलवर धावणाऱ्या बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याबाबतचे संशोधन सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील रस्त्यांवर प्रदूषणविरहित अशा इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

पारंपरिक इंधनाला पर्याय शोधणे आणि अधिकाधिक प्रदूषणविरहित पर्यायांची निर्मिती करणे याबाबत केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने शहरी भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेसचे इलेक्ट्रिकीकरण करण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या डिझेलवर धावणाऱ्या १० बसेसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यात 'पीएमपी'च्या तीन, मुंबईतील 'बेस्ट'च्या तीन आणि तेलंगणच्या चार बसचा समावेश आहे. यामध्ये संबंधित शहरातील बसची बॅटरी चार्ज करण्यासाठी सीआयआरटी आणि संबंधित यंत्रणांनी निश्चित केलेल्या ठिकाणी बस चार्जिंग डेपो विकसित केले जाणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील 'एमएच-१२, एफसी ३३४६', 'एमएच-१२, एफसी ३१८८', 'एमएच-१२, एफसी ३३४५' या सन २००९ मध्ये उत्पादित झालेल्या बस इलेक्ट्रिक केल्या जाणार आहेत. 'सीआयआरटी'तील संशोधक समीर सत्तीगेरी आणि मंगेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू आहे.

'सध्या रस्त्यावर धावत असलेल्या डिझेल बसची या संशोधनासाठी निवड करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकीकरण करताना डिझेल इंजिनमधील काही पार्ट काढून, त्या ऐवजी विजेवर इंजिन चालविण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश केला जाणार आहे. डिझेल बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केल्यानंतर एक किमी अंतरासाठी १ युनिट (एक किलोवॉट अवर्स) वीज लागणार आहे,' अशी माहिती पाठक यांनी दिली.

रूपांतर करण्याची ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. नुकतेच या प्रकल्पाचे इरादापत्र (इओआय) काढण्याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बसेस नियमित सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. त्यांची पाहणी करून, त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय पुढील धोरण निश्चित करणार आहे.



इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये

बसची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर किमान १०० किमी अंतर कापणार.

शंभर टक्के बॅटरी चार्जिंगसाठी चार ते सहा तासांचा अवधी लागणार, तर ५० टक्के चार्जिंगसाठी दोन तास लागणार.

बसचा कमाल वेग कमीत कमी ताशी ७० किमी

एक किमी अंतरासाठी १ युनिट (kwh) ऊर्जा लागणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सट्टा बाजारात भारत ‘फेव्हरिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत-वेस्ट इंडिज या सामन्यात सट्टा बाजारातील सध्याचा कौल तरी भारताच्या बाजूने आहे. मुंबई येथे होणाऱ्या या सामन्यात भारत 'फेव्हरिट' आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीपासून सट्टा बाजारात भारताच्या बाजूने अनुकूल वातावरण होते. मात्र, भारताचे बहुतांश सामने हे चुरशीचे झाल्याने त्याचा परिणामही सट्टा बाजारात दिसला आहे.

राज्यात मुंबईपाठोपाठ क्रिकेटवर सट्टा घेण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पुण्यात आहे. 'आयपीएल' सुरू झाल्यापासून सटोडियांकडून मोठ्या प्रमाणात पुण्यात सट्टा घेण्यात येतो. ढोले पाटील रोडवरील गणेश, मंडई परिसरातील ठक्कर, मंगळवार पेठेतील धनू, पिंपरी-चिंचवडमधील बबलू आणि दीपक तसेच येरवड्यामधील पवन यांच्याकडे सट्टा मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पिंपरी-चिंचवड आणि ढोले-पाटील रोडवरील सटोडियांकडून मोठ्या प्रमाणात सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती एका सट्टा व्यावसायिकाने 'मटा'ला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ऑनलाइन क्रिकेट बेटिंगमध्येही भारत फेव्हरिट असल्याचे चित्र आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा खेळाला कलाटणी देणारा असल्याने त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला आहे. भारताच्या विराट कोहलीने काढलेल्या प्रत्येक रनवर लाखो रुपयांचा सट्टा लागला आहे. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी सट्टा बाजारात वर्ल्डकप जिंकण्याच्या टीममध्ये सर्वाधिक फेव्हरिट टीम ही भारताची होती. भारतीय टीमचा भाव दोन रुपये दहा पैसे होता. टीमला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्कारावी लागल्यानंतर मात्र भारतीय टीमवरील भाव वाढू लागला होता.

शहरात पोलिस बंदोबस्त

भारताकडून सामना जिंकल्यानंतर क्रिकेट फॅन्सकडून फर्ग्युसन, जंगली महाराज रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येते. हॉर्न वाजवत, घोषणा देणारे उत्साही दुचाकीस्वारांकडून हॉटेल वैशालीसमोर गोंधळ घालण्यात येतो. सगल दुसऱ्यांदा या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या सामन्यानंतर पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. स्था​निक पोलिस ठाणे; तसेच वाहतूक पोलिसांकडून संयुक्तरीत्या बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images