Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तेराशे किमीसाठी फक्त ८५० पोलिस

$
0
0

Shrikrishna.Kolhe
@timesgroup.com

पुणे : पुणे लोहमार्ग पोलिस विभागाची हद्द सुमारे तेराशे किलोमीटर लांबीची असताना त्यांच्याकडे फक्त साडेआठशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर होणारे गुन्हे रोखण्यासाठी मनुष्यबळ खूपच कमी पडत आहे. तसेच, पुणे लोहमार्ग विभागात येणाऱ्या आठ जिल्ह्यांसाठी सध्या फक्त सहाच पोलिस ठाणी असल्यामुळे नवीन सहा रेल्वे पोलिस ठाणी देण्याचा प्रस्ताव लोहमार्ग पोलिसांनी सरकारला पाठवला आहे.

पुणे लोहमार्ग विभागाची हद्द मोठी असून ती पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या आठ जिल्ह्यांतून जाते. सध्या पुणे रेल्वे विभागामध्ये सहा पोलिस ठाणी आहेत. त्यासाठी आठशे कर्मचारी व ४० अधिकारी आहेत. मनुष्यबळाची कमतरतेमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करताना रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. पोलिस ठाण्याचे अंतर खूप असल्याने गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर लागतो. त्यामुळे पुणे लोहमार्ग पोलिस विभागाकडून नवीन सहा रेल्वे पोलिस ठाणी मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वेमधील प्रवाशांना लुटण्याचे अनेक प्रकार घडतात. सिग्नलला थांबलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामधील प्रवाशांचे साहित्य खिडकीतून चोरले जाते. त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांकडून मनुष्यबळ लावले जाते. पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वेत प्रवाशांची लूट होणारी शंभरपेक्षा जास्त ठिकाणे आढळून आली आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी यापैकी निम्म्याच ठिकाणी पोलिस तैनात करणे शक्य झाले आहे. सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये रेल्वे पोलिसांसाठी १९ जागा दिल्या आहेत.

याबाबत लोहमार्ग विभागाचे अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले, 'लोहमार्ग पोलिसांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. सध्या सहा पोलिस ठाणी असून नवीन सहा पोलिस ठाणी मिळावीत, अशी मागणी प्रस्तावामध्ये केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस भरतीसाठी ४४ हजार अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहर पोलिस दलात शिपाई पदाच्या २२१ जागांसाठी मंगळवारपासून पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या पोलिस भरतीसाठी ४४ हजारापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. एका दिवसाला तीन हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे. या पोलिस भरतीच्या निमित्ताने शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाचे मैदान मंगळवारी सकाळपासून गजबजले होते.

राज्यात पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे पोलिस दलात २२१ जागांसाठी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदनावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एका दिवसाला तीन हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे. सकाळी सहा, साडेआठ आणि अकरा अशा तीन वेळा एक-एक हजारांच्या बॅच चाचणीसाठी आत घेतल्या जात आहेत. भरतीसाठी सकाळपासून उमेदवरांनी गर्दी केली होती. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उंडी, लांब उडी, पुलअप, गोळा फेकची चाचणी घेतली जाणार आहे. तर, वीस गुणांसाठी घेतली जाणारी धावण्याची चाचणी बालेवाडी येथे होणार आहे. मुलींची आठशे मीटर धावणे, आणि मुलांसाठी सोळशे मीटर धावण्याची चाचणी राहणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाडके, उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, सहायक पोलिस आयुक्त गणपत मांडगुळकर यांच्या देखरेखेखाली भरती प्रक्रिया सुरू आहे.

नेहमीच शांतता असलेले शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाचे मैदान मंगळवारी पोलिस भरती मुळे गजबजले होते. सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. चार तंबूमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होती. पोलिस भरतीची चाचणी दिल्यानंतर तरुण घोळक्याने झाडांखाली गप्पा मारत होते. दुपारी उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर अनेक तरुणांनी झाडाच्या सावलीला विश्रांती घेतल्याचे चित्र दिसले.

लोहमार्ग पोलिस भरती सुरू

पुणे लोहमार्ग पोलिस विभागासाठी १९ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदासाठी भरती प्रक्रियेला मंगळवारी सकाळी खडकी येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयात सुरुवात झाली. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या देखरेखेखाली ही भरती प्रक्रिया सुरू आहे. १९ पदांसाठी अडीच हजार अर्ज आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे सांगून लुटणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आम्ही पोलिस असून पुढे खून झाला आहे, तपासणी करायची असे सांगून हॉटेलच्या कामगारांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड येथील मोहननगर येथे नुकतीच ही घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

नीलेश तुकाराम कसबे (२९) आणि प्रशांत विश्वनाथ बिस्वास (३३, दोघे रा. निगडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुजाबुद्दीन मंडल (१९, रा. चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाबुद्दीन आणि त्याचा मित्र खगेश मंडल हे दोघे काळभोरनगर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास काम संपवून घरी जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या कसबे व बिसवास यांनी मंडल याला अडविले. पोलिस असल्याची बतावणी करून दमदाटी करून मंडल व त्याच्या मित्राकडील पंधरा हजार रुपयांचे दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.

मंडल याने दिलेल्या वर्णनावरून पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार हरीष माने यांनी तपास सुरू केला. आरोपींनी वापरलेल्या लाल रंगाच्या पल्सरची माहिती घेतली. त्यावरून फौजदार माने, सहाय्यक फौजदार अरुण बुधकर, राजेंद्र भोसले, शिवराज कलांडीकर आणि नगनाथ लकडे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघटनांचे रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सराफ व्यावसायिकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड पोलिस ठाण्याजवळ मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पुणे-मुंबई व मुंबई-बंगलोर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या मार्गदर्शनाने व पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्या संयोजनाने सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन करण्यात आले.

उत्पादन शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या सराफांच्या बेमुदत बंद आंदोलनाचा एक भाग म्हणून हा रास्ता रोको करण्यात आला. 'एक्साइज हटाव व्यापार बचाव', 'मोदी सरकार हाय हाय', 'अरुण जेटली हाय हाय', 'व्यापारी एकता जिंदाबाद', 'एकही भूल कमल का फूल' अशा घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.

सेंट्रल चौक, देहूरोड पोलिस ठाण्याशेजारी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. एक तासानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा आणि सर्व सराफ सुवर्णकार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.

या आंदोलनामध्ये चाकण सराफ असोसिएशन, युवा सुवर्णकार संघटना, भोसरी सराफ असोसिएशन, देहूरोड सराफ असोसिएशन, खडकी सराफ असोसिएशन, चिखली सराफ असोसिएशन, मंचर सराफ असोसिएशन, दापोडी सराफ असोसिएशन, खेड सराफ असोसिएशन, आळंदी सराफ असोसिएशन, मावळ सराफ असोसिएशन, मोशी सराफ असोसिएशन, दिघी सराफ असोसिएशन आदी सराफ संघटना सहभागी झाल्या होत्या.

फत्तेचंद रांका म्हणाले, 'उत्पादन शुल्क वाढीला देशभरातील सराफ व्यावसायिकांचा तीव्र विरोध आहे. महिनाभरापासून सराफांची दुकाने बंद आहे. शुल्कवाढ मागे घेण्यासाठी सराफ संघटनांनी विविध मार्गाने आंदोलन छेडले आहे. तरीही सरकारकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे असंतोष वाढत असून सरकारने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू, भाजप सरकारला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचवडमध्ये वडिलांकडून मुलाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घरात लाइट फिटिंग अंडरग्राउंड का करून घेतली नाही, या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात वडिलांनी मुलींच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना चिंचवड येथे सोमवारी उघडकीस आली. नदीम अहमद शकील अन्सारी (२१) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी वडील शकील अहमद इमामउद्दीन अन्सारी (४७), व बहीण नाजीया बानू अहमद शकील अन्सारी (२४), शाहीन शकील अन्सारी (२४, सर्व रा. न्यू हिंदुस्थान बेकरी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे पोलिसांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे अन्सारी यांची न्यू हिंदुस्थान बेकरी आहे. काही दिवसांपूर्वी नदीम याने आपल्या वडिलांकडे घराच्या पहिल्या मजल्याचे काम करण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. या वेळी घरातील लाइट फिटिंगचे काम अंडरग्राउंड का केले नाही, या शुल्लक कारणावरून वडील आणि मुलात भांडणे सुरू झाली.या वेळी नदीम याने रागाच्या भरात त्याच्या दोन्ही बहिणी शाहीन आणि नाजीया या दोघींना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी झालेल्या झटापटीत दोन्ही बहिणींनी व शकील यांनी नदीमच्या गळ्यात ओढणी अडकवून त्याचा गळा आवळून खून केला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठक यांच्यानंतर कोण होणार पोलिस आयुक्त?

$
0
0

पाठक यांच्यानंतर कोण होणार पोलिस आयुक्त?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिस आयुक्त के. के. पाठक ३१ मार्च रोजी निवृत्त होत असल्याने पुण्याच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबतची उत्सुकता पोलिस दलात शिगेला पोहोचली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय बर्वे, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसळकर आणि नागपूर येथील पोलिस आयुक्त एस. पी. यादव यांची नावे त्यासाठी चर्चेत आहेत.
राज्य सरकारने अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांची नियुक्ती केली नसल्याने पुढील दोन दिवसांत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बदल होणे अपेक्षित आहेत. पुण्याचे सध्याचे आयुक्त पाठक यांना राज्य सरकाने गेल्या आठवड्यात पोलिस महासंचालकपदी बढती दिली आहे. ते निवृत्त होत असल्याने पुण्याला आता नवीन पोलिस आयुक्तांची नेमणूक होणे अपेक्षित आहे.
पुणे आणि मुंबई आयुक्तालयांच्या आयुक्तपदी पोलिस महासंचालक असल्याने राज्यातील तब्बल १४ पोलिस महासंचालक पुण्याच्या आयुक्तपदी नेमणूक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा असली, तरी सत्ताधारी पक्षाच्या पुण्यातील नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.
महापालिकेच्या निवडणुका पाहता महिला पोलिस अधिकारी नको, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे समजते. असे असले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असे शुक्ला यांच्याबाबत बोलले जात असल्याने त्यांची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय बर्वे, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसळकर आणि नागपूर येथील पोलिस आयुक्त एस. पी. यादव यांचीही नावे चर्चेत आहेत.
लाचलुचपत विभागाच्या महासंचालकपदावरून विजय कांबळे फेब्रुवारीअखेरीस निवृत्त झाले आहेत. तेव्हापासून ते पद रिक्त असून या पदाचा कार्यभार अप्पर पोलिस महासंचालक बर्वे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या ठिकाणी कोणाची नियुक्ती होणार यावरून बराच गोंधळ आहे. पोलिस महासंचालक सतीश माथूर वरिष्ठ असल्याने त्यांच्या नियुक्तीची चर्चा होती. मात्र, राज्य सरकारने त्यांनाही एक महिना 'वे​टिंग'वर ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडी रस्त्याचे रुंदीकरण कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

पुणे शहराचे आणि स्मार्ट सिटीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोपोडी गावातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गाचे, देहू-पंढरपूर पालखी मार्गाचे रुंदीकरण कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 'आरपीआय'चे पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून हा प्रश्न उपस्थित केला आहे. येत्या पाच महिन्यात आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी यांनी शनिवारी सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जाहीर केल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कामासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वाडेकर यांनी गडकरी यांना पत्र पाठवले आले. 'गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही देहू-पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी लढत आहोत. देहूतून पालखी निघाल्यावर पिंपरी-चिंचवडमार्गे पुण्यात येते. पिंपरी -चिंचवडमध्ये दापोडीपर्यंतचा पालखीमार्ग सहापदरी झाला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा हॅरिस पूल ओलांडल्यानंतर पुणे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोपोडी गावात आल्यावर रस्ता अरुंद होतो. यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या कोंडीचा फटका रोज हजारो वाहनचालकांना बसत असतो. तर, दर वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो,' असे पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षी वाडेकर यांनी देहूतील वारकऱ्यांना बरोबर घेऊन बोपोडी चौकात मोठे आंदोलन केल होते.

वस्तीवर कारवाईस टाळाटाळ

बोपोडी चौकातील रस्त्याच्या काँक्रेटीकरणासाठी पुणे महापालिकेने तीन कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहे. मात्र, रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वस्तीवर कारवाई करण्यास पुणे महापालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. केंद्र सरकार देहू-पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण करणार असेल तर, पिंपरी-चिंचवड भागातील पालखी मार्गाचे रूंदीकरण देहू ते दापोडी पर्यंत झाले आहे. त्यामुळे या कामाची सुरुवात बोपोडीपासून करावी, या भागातील रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, रस्त्यात येणारे अडथळे दूर करावेत, यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीपासुन नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी वाडेकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

पुणे शहराची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाली आहे. त्यामुळे या शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बोपोडीगावाला वेगळे महत्त्व येणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम बोपोडी गावातुन जाणारा पुणे-मुंबई महामार्ग, तसेच देहू- पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांच्यासमोर बोपोडीच्या रस्त्याचा प्रश्न मांडणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेने संयुक्त काम केल्यास पुणे शहराच्या प्रवेशद्वाराचे काम चांगले होण्यास मदत होईल, असेही वाडेकर यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार बँकांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करणार

$
0
0

चार बँकांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहनकर्ज घोटाळाप्रकरणी रुपी को. ऑप. बँक, राजगुरुनगर सहकारी बँक, महेश सहकारी बँक आणि कराड अर्बन को. ऑप. बँकेचे तत्कालीन संचालक आणि रुपी बँकेवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुप्रीम कोर्टातील याचिका फेटाळल्याने त्यांच्यावर येत्या दोन दिवसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी सहकार आयुक्त कार्यालयाने लेखापरीक्षकांना परवानगी दिली आहे.
या बँकांमध्ये २००८ मध्ये झालेल्या घोटाळ्यात बँकांचे तत्कालीन संचालक आणि 'रुपी'चे तत्कालीन महाव्यवस्थापक महेंद्र दोशी, उपमहाव्यवस्थापक प्रशांत गोरे आणि बुधवार पेठ शाखेचे शाखाधिकारी पुंजाजी पगारे यांच्यासह ४८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सहकार विभागाकडून करण्यात येणार आहे. या चारही बँकांमधील दोषींवर चार लेखापरीक्षक गुन्हे दाखल करणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रुपी बँकेच्या आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराबाबत बँकेचे तत्कालीन १५ संचालक, ५४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्या अहवालात जबाबदार धरण्यात आले आहे. संबंधितांकडून सुमारे १४९० कोटी ६० लाख रुपये वसूल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. सहकार विभागाने या वसुलीची तयारी केली आहे. मात्र, संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांना साकडे घातल्याने कारवाई लांबणीवर पडली आहे.
याशिवाय १९९७ ते २०१३ या कालावधीत रुपी बँकेच्या तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सुमारे ४० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणी संबंधितांनी याचिका दाखल केल्याने कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोटनिवडणुकीत चौरंगी लढत होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर (प्रभाग क्रमांक ८) पोटनिवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी नगरसेवक भीमा बोबडे, राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तात्रेय मोरे, शिवसेनेने राम पात्रे आणि काँग्रेसने सतीश भोसले यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे विद्यानगरमध्ये १७ एप्रिलला निवडणूक होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा आमने-सामने येणार आहेत. वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून प्रत्येक प्रमुख पक्षाने उमेदवार देऊन ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. एक एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

दरम्यान, नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खुनानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुजाता टेकवडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. त्या वेळीही बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न झाले होते. परंतु, तेव्हाही `राष्ट्रवादी`च्या स्थानिक नेत्यांना यश आले नाही. माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी खंबीरपणे साथ दिल्यामुळे टेकवडे यांचा विजय सुकर झाला. आता विद्यानगरच्या पोटनिवडणुकीतही पानसरे यांच्या भूमिकेला महत्त्व निर्माण झाले आहे. त्यामुळे चौरंगी लढत झाल्यास 'राष्ट्रवादी'ला विजयाचे आव्हान राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिसर्च स्कॉलर’साठी कार्यशाळेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे भारती विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रनरशिप डेव्हलपमेंट' (आय.एम.ई.डी.) च्या वतीने 'रिसर्च स्कॉलर'साठी सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्‍घाटन शुक्रवारी (१ एप्रिल) बीसीयूडीचे संचालक डॉ. पी. एम. बुलाख यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर व कार्यशाळेच्या सहसमन्वयक डॉ. किर्ती गुप्ता यांनी दिली. 'संशोधन पद्धती आणि शैक्षणिक लेखन कौशल्य' या विषयावरील ही कार्यशाळा पुण्यातील विविध महाविद्यालयातील रिसर्च स्कॉलरसाठी आयोजित केली आहे. प्रा. सोनिया सोरटे, पल्लवी चोपडे, डॉ. हेमा मिरजी यांनी कार्यशाळेचे संयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय काकडेला दिग्दर्शनाचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सूर्यदत्ता महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, संशोधन, माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रथमच चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. यामध्ये अॅनिमेशन विभागात अक्षय काकडे यास उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच नॉन फिक्शन विभागात भावेश पाटील यांच्या 'बळीराजा' चित्रपटास तर फिक्शन विभागात सुनील वंजारी यांच्या 'कोष' या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. फिक्शन, नॉन फिक्शन आणि अॅनिमेशन अशा प्रमुख तीन प्रकारात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार, संस्थेचे संस्थापक -संचालक संजय चोरडिया उपस्थित होते. वैभव ठाकरे, डॉ. चिन्मय खराडे आणि अवधूत नवले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची चुरस आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नूतन शहराध्यक्षांची निवड कोणत्याही क्षणी केली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. शहरातील एका अनुभवी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्याचे नाव अंतिम झाल्याची चर्चा असल्याने विरोधी गटाकडून अखेरचा प्रयत्न म्हणून मुंबईत वरिष्ठांच्या गाठी-भेटी सुरू असल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी नव्या नावाची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन-तीन इच्छुक कार्यकर्त्यांची नावे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यापैकी, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. विद्यमान शहराध्यक्षांसह पालिकेतील माजी गटनेते आणि प्रदेश चिटणीस यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. येत्या वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने पक्षाला ताकद देईल, असा अध्यक्ष निवडण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यात, पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्त्याचे पारडे सध्यातरी जड असल्याची चर्चा आहे. अशावेळी भाजपमध्ये गटा-तटाचे राजकारण नेहमीच वरचढ होत असल्याने आत्ताही, या नावाला विरोध केला जात आहे. हा विरोध व्यक्त करण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या गाठी-भेटी घेण्याचे सत्रही सुरू झाले आहे. तसेच, इतर नावांबाबत चाचपणी केली जावी, असा आग्रह धरण्यात येत आहे. ................. आमदार आणि गटनेत्यांचाही दावा शहराध्यक्षपदासाठी प्रदेश पातळीवरून एक नाव निश्चित केल्याचे समजताच, भाजपमधील विरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यांच्याकडून विद्यमान आमदारांचे नाव पुढे केले जात असून, पालिकेतील गटनेत्यांना संधी दिली जावी, अशी मागणीही समर्थकांकडून केली जात आहे. मुख्यंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले जात असून, पुढील दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भामा-आसखेडप्रकरणी आज महापौर-उद्धव ठाकरे भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्थानिक शेतकरी आणि शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधामुळे गेल्या काही महिन्यांपासून काम बंद असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, यासाठी महापौर प्रशांत जगताप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्या (बुधवारी) ३० मार्चला मुंबईत जाऊन महापौर ही भेट घेणार असून या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील पूर्व भाग असलेल्या नगर रोड, वडगावशेरी, खराडी भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. याचे कामही सुरू करण्यात आले आहे. ज्या भागातून पालिकेची पाइपलाइन जात आहे, तेथील शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय हे काम पूर्ण करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन काही स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच सेनेचे आमदार गोरे यांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जोपर्यंत हा प्रस्ताव मान्य होणार नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन आमदार गोरे यांच्या समर्थकांनी काम बंद केले आहे. या प्रकल्पाचे काम थांबल्याने प्रकल्पाच्या खर्चात वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना अशा पद्धतीने विकासकामांना विरोध करणे योग्य नाही, ही गोष्ट शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या कानावर घालून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी महापौर जगताप यांनी ही भेट घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या व्यंगचित्र कलादालनाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठीची वेळ या बैठकीत घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिप्र’च्या कार्यालयात कोऱ्या मतपत्रिका

$
0
0

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला खळबळ म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये कोऱ्या मतपत्रिका आढळून आल्याने खळबळ उडाली. रात्री उशिरा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडीसाठी आज (बुधवार) पुण्यासह मुंबई आणि सोलापुरात होणाऱ्या मतदानावरही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. सुमारे तीन हजार सातशे सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. अन्य शहरांमधील ५०४ मतदारांना पोस्टाद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या व्यतिरिक्त इतर मतदारांना संबंधित मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष मतदान करावे लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित परिवर्तन पॅनल, दाढे-माटे शिक्षणप्रेमी पॅनल आणि लोकमान्य पॅनल यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे. मात्र मतदानापूर्वीच संस्थेच्या मुख्य कार्यालयात हे नाट्य रंगले. मंगळवारी सकाळी माजी अध्यक्ष अभय दाढे आणि शिक्षणप्रेमी पॅनलचे काही उमेदवार संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये असल्याचे लक्षात आले. त्याबाबत परिवर्तनने निवडणूक समितीकडे आक्षेप घेऊन, कार्यालयाची तपासणी करण्याची मागणी केली. त्यामध्ये काही कोऱ्या मतपत्रिका आढळल्याने परिवर्तनने दाढे यांच्या कार्यालयाची झडती घेण्याचीही मागणी केली. सुरुवातीला दाढे यांनी अशी तपासणी घेता येणार नसल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार ठरवून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. येथे गोंधळ वाढल्याने, पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत चर्चेअंती समितीने प्रशासक आणि धर्मादाय आयुक्तालयाच्या प्रतिनिधींच्या समोर झडतीचा निर्णय घेतला. त्यातून जवळपास चारशे छापील मतपत्रिका समोर आल्या. या मतपत्रिका बोगस आहेत, की पोस्टाद्वारे पाठविलेल्या मतपत्रिकाच परत कार्यालयात पोहोचल्या, याचा शोध समिती घेणार आहे.

'प्रशासकांच्या परवानगीने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसाठी मी संस्थेमध्ये येतो. ६३ संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे पगार येथून होतात. आमच्या जवळची माणसे, मित्र, नातेवाइक विश्वासाने कोऱ्या मतपत्रिका आम्हाला देऊ शकतात. अशा व्यक्ती पॅनलमधील इतरांना ओळखत नसल्या, तरी आम्हाला ओळखत असल्याने त्या विश्वासावर मतपत्रिका देतात. यापूर्वीच्या निवडणुकीमध्येही असे झालेले आहे'. - अभय दाढे, दाढे-माटे शिक्षणप्रेमी पॅनल

-- 'या मतपत्रिका खऱ्या आहेत, की बनावट याचा तपास होणार आहे. बाहेरगावच्या मतदारांसाठी आम्ही यापूर्वीच मतपत्रिका पाठविल्या आहेत. त्या नेमक्या गेल्या कुठे, याचाही आढावा घेतला जाईल. यंदापासून त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून होणारे मतदान बंद करण्यात आले. त्यानुसार सर्व कार्यवाही सुरू आहे. या प्रकारानंतर निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्याबाबत निर्णय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये घेतला जाईल'. - नितीन जाधव, धर्मादाय उपायुक्त आणि निवडणूक समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृहांसाठी देणार त्वरित परवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे शहरातील महिला स्वच्छतागृहाच्या प्रश्नाबाबत संबंधितांची बैठक घेण्यात येणार असून पेट्रोल पंप आणि मॉल्समधील स्वच्छतागृहे महिलांसाठी खुले करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. महिला स्वच्छतागृहांसाठी राज्य सरकारच्या जागांवर महापालिकेने परवानगी मागितल्यावर त्वरित परवानगी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पुणे शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या समस्येवर काँग्रेसच्या आमदार दीप्ती चवधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावेळी ​उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली. 'पुणे शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे ४० लाख आहे. त्यामध्ये सुमारे २० लाख महिला आहेत. मात्र, शहरात अवघी ६०० महिला स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असंतोषाची भावना आहे', असे आमदार चवधरी म्हणाल्या. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवेदन केले. ते म्हणाले, 'पुणे शहरामध्ये महिलांसाठी दोन हजार १३३ सार्वजनिक शौचालये (सीट्स) आहेत. 'पे अॅण्ड पार्क' योजनेअंतर्गत पाच हजार ९०६ शौचालये आहेत. बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी जागेअभावी स्वच्छतागृहे बांधण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून स्वच्छतागृहांसाठी जागा आरक्षित करण्याबाबत महापालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. पुणे महापालिकेकडून येत्या दोन वर्षांत २८ हजार ५७२ स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे दोन हजार स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे.' ................ महावितरणच्या कंत्राटदारावर कारवाई पुण्यात महावितरणकडून नागरिकांना उशिरा वीजबिलांचे वाटप करण्यात येत असल्याबाबत शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातून अशा प्रकारच्या ४५ तक्रारी आल्या होत्या. संबंधितांना बिलांचे वाटप करण्याऱ्या कंत्राटदाराकडून चार हजार १५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्या नागरिकांना तत्पर बिल भरणा रकमेची सूट वजावट करून सुधारित वीज बिले देण्याच्या सूचना दिल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपनीकरणाचा प्रस्ताव मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्मार्ट सिटी'पासून ते मेट्रोपर्यंत शहरातील मोठे प्रकल्प राबविण्याकरिता खासगी कंपनीचा पुढाकार घेण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध होत असल्याने तो मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवली. या प्रस्तावात सुधारणा करून तो पुन्हा मांडण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले असले, तरी महापालिकेची कामे खासगी कंपनीकडे सोपविण्यास बहुतेक पक्षांचा विरोध कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयातील 'वॉर रूम'च्या धर्तीवरच 'शहर परिवर्तन कक्ष' स्थापन करण्याची कल्पना आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली होती. हा कक्ष स्थापन करताना, पुणे सिटी कनेक्ट या कंपनीसोबत करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हा विषय चर्चेला येताच, तो दफ्तरी दाखल करण्याची सूचना मांडण्यात आली. प्रस्तावाला होणारा विरोध लक्षात घेऊन आयुक्तांनीच प्रस्ताव मागे घेत असल्याचा खुलासा केला. 'परिवर्तन कक्षाच्या प्रस्तावामध्ये काही सुधारणा करून पुढील आठवड्यात पुन्हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे, स्थायी समितीसमोरील प्रस्ताव मागे घेत आहे', अशी कबुली आयुक्तांनी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांमध्ये शहरात विविध प्रकल्पांतर्गत तब्बल ३० हजार कोटी रुपयांची कामे होणार असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 'पुणे सिटी कनेक्ट' या कंपनीशी करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. परिवर्तन कक्षातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांच्या कौशल्य आणि ज्ञानाचा उपयोग महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हावा, यादृष्टीने मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, ३० हजार कोटींचे प्रकल्प राबविण्यासाठी पालिकेतील अधिकारी सक्षम नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात होता.

शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना एका दिवसाचाही विलंब होऊ नये, यासाठी त्यावर देखरेख करण्यासाठी हा कक्ष स्थापन केला जाणार आहे. महापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून सुधारित प्रस्ताव मांडण्यात येईल. - कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शि. प्र.’चे माजी अध्यक्षअभय दाढे यांना अटक

$
0
0

पुणे : 'शिक्षण प्रसारक मंडळी'च्या निवडणुकीसाठीच्या कोऱ्या मतपत्रिका सापडल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संस्थेचे माजी अध्यक्ष अभय दाढे यांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली. 'शि. प्र.'च्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (बुधवारी) पुणे, मुंबई आणि सोलापूरमध्ये मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. याच निवडणुकीसाठी पोस्टाद्वारे मतदानाची प्रक्रियाही निवडणूक समितीने सुरू केली होती. मात्र, त्यासाठीच्या काही मतपत्रिका मंडळीच्या मुख्य कार्यालयामध्ये आढळून आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीअंती दाढे यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणी संस्थेचे माजी संचालक अनंत माटे आणि अॅड. जयंत शाळीग्राम यांच्या विरोधातही तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिप्लेक्सची फाइल निर्णयासाठी बंद

$
0
0

मल्टिप्लेक्सची फाइल निर्णयासाठी बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
करमणूक कर माफ असताना शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटरच्या मालकांनी ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा बेकायदा कर प्रेक्षकांकडून आकारल्याची फाइल महसूल मंत्र्यांच्या कोर्टात निर्णयासाठी बंद करण्यात आली आहे. यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
मल्टिप्लेक्समध्ये सिनेमासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकिटावर राज्य सरकारने करमणूक करमाफी जाहीर केली होती. मात्र, या करमाफीच्या कालावधीत शहरातील सिटीप्राइड, ई-स्क्वेअर, आयनॉक्स, गोल्ड अॅडलॅब, गोल्ड बिग सिनेमा व मंगला या मल्टिप्लेक्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून हा कर वसूल केला. हा कर सरकारजमा करण्याचा आदेश महसूल खात्याने मल्टिप्लेक्समालकांना दिला; तसेच ही रक्कम न भरल्यास जप्तीपर्यंत कारवाई करण्याची नोटीस बजावली. या कारवाईवर मल्टिप्लेक्सच्या मालकांनी महसूल मंत्र्यांकडून स्थगिती मिळविली. त्या संदर्भात नुकतीच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सुनावणी झाली.
या सुनावणीत जिल्हा प्रशासनाने मल्टिप्लेक्सने केलेल्या करमणूक कर वसुलीची माहिती दिली; तसेच प्रेक्षकांकडून आकारलेला हा कर वसूल झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. त्या पुष्ट्यर्थ मल्टिप्लेक्सकडून ताब्यात घेतलेले डीसीआर (डेली कलेक्शन रिपोर्ट); तसेच काही तिकिटेही महसूल मंत्र्यांच्या कोर्टात दाखल केली. मल्टिप्लेक्समालकांनी मात्र त्यास विरोध दर्शविला. डीसीआर हे कराच्या माहितीसाठी ठेवल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
दरम्यान, मल्टिप्लेक्सच्या फाइलवर स्थगिती आदेशामुळे गेली दीड वर्षे निर्णय होऊ शकला नाही. त्यासंबंधी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला वेळोवेळी स्मरणपत्रही पाठविले होते. त्यावर ही फाइल आपल्याकडे चार महिन्यांपूर्वी आली. तत्पूर्वी ती सचिवांकडे होती. त्यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्र्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले होते. मल्टिप्लेक्सने चुकीच्या पद्धतीने कर आकारला असेल तर तो वसूल करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. या फाइलवर महसूल मंत्र्यांच्या कोर्टात दोन्ही बाजूंची सुनावणी झाली आहे. ही सुनावणी झाल्यानंतर फाईल निर्णयासाठी बंद करण्यात आली आहे.
....
मल्टिप्लेक्सने आकारलेला बेकायदा करमणूक कर
सिटीप्राइड - २२.३४ कोटी रुपये (कोथरूड व सातारा रस्ता)
आयनॉक्स - ९.९४ कोटी रुपये
ई-स्क्वेअर - २१.९२ कोटी रुपये
गोल्ड अॅडलॅब - ७.३२ कोटी रुपये
गोल्ड बिग सिनेमा - ६४.७१ लाख रुपये
मंगला - ६.४६ कोटी रुपये
....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात आगीचे सत्र सुरूच

$
0
0

कात्रज आणि सहकारनगरमध्ये ३३ वाहने जळून खाक म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरू आहे. कात्रज येथील गणेश पार्क सोसायटीतील दुचाकी आणि मोटारींना मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत तीन मोटारी आणि पंधरा दुचाकी जळाल्या. त्यानंतर सकाळी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या आवारात लावलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी लागलेल्या आगीत अकरा चारचाकी, दोन तीनचाकी आणि दोन दुचाकी अशी एकूण १५ वाहने जळून खाक झाली. कात्रज चौकात पीएमपी थांब्यानजीक गणेश पार्क सोसायटी आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी वाहनांनी अचानक पेट घेतला. त्यांच्या शेजारी लावण्यात आलेल्या दोन मोटारींनीही पेट घेतला. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवाशी भयभीत झाले. या इमारतीत जोडून चार विंग आहेत. त्यातील 'ए' विंगच्या पार्किंगमध्ये आगीचे मोठे लोट उठून धुराने संपूर्ण इमारत अंतर्बाह्य व्यापली होती. वरच्या फ्लॅटमधील रहिवाशी धुरात कोंडले होते. बहुतांश जणांनी टेरेसवर धाव घेतली. काही रहिवाशी 'बी' व 'सी' विंगच्या जिन्यावरून खाली उतरले. 'ए' विंगच्या आठ सदनिकांमधील तब्बल तीस रहिवासी सुखरूप बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कात्रज आणि सिंहगड केंद्रातील अधिकारी संजय रामटेके आणि जवानांनी तेथे धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर तीन महिला धुरामुळे अडकल्या होत्या. जवानांनी त्यांची सुटका केली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे दोन रहिवासी मीनाक्षी व हेमंत शिर्के हे आगीमुळे किरकोळ जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती रखवालदाराने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या समोर लावलेल्या वाहनांना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आगी वाढली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. गाड्यांच्या शेजारी टपरीलाही आगाची झळ बसली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुमारे अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. ही आग उन्हामुळे लागल्याची शक्यता आहे. आगीत अकरा चारचाकी, दोन तीनचाकी आणि दोन दुचाकी वाहने जळाली. मालकांचा शोध न लागल्यामुळे ही बेवारस वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. --- आग लावल्याचा आरोप शॉर्टसर्किटमुळे आग लागली असती, तर मीटर बॉक्स संपूर्णपणे भस्मसात झाले असते; परंतु तसे झालेले नाही. कोणीतरी आग लावली असल्याचा आरोप नागरिक करत होते. याला 'महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. ---------- ओळ- कात्रज- संतोषनगर येथील गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झालेली वाहने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांनो... याचक व्हा !

$
0
0

Shridhar.Loni@ timesgroup.com

पुणे : शिक्षणाच्या बाबतीत 'प्रगत' होण्याचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राने सरकारी शाळांमधील गुणवत्तावाढीची सर्व साधने लोकवर्गणीतून उभारण्याचा आदेश दिला आहे. शाळांच्या इमारतींपासून कम्प्युटर, टॅब्लेट, प्रोजेक्टर, मोबाइल फोन आदींसाठीची रक्कम लोकांकडून गोळा करून शाळांनी 'ज्ञानरचनावादी' पद्धतीने गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. उच्च शिक्षणापाठोपाठ आता प्राथमिक शिक्षणाच्या जबाबदारीतूनही अंग काढून घेण्याचा पवित्रा राज्य सरकारने घेतल्याने आता लोकांपुढे हात पसरण्याची वेळ सरकारी शाळांवर येणार आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात सध्या ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, कृतींवर आधारित अध्ययन (एबीएल), आयएसओ आदी उपक्रम राबविले जात असून, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमही जोरात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. तरीही गुणवत्तेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, लोकवर्गणीद्वारे निधी उभारण्याचा प्रयत्न काही शाळांनी आणि शिक्षकांनी केला आहे. त्यांचे कौतुक करतानाच त्यांच्यापासून आदर्श घेऊन सर्वच शाळांनी 'खासगी लोक आणि माजी विद्यार्थ्यांकडून' निधी उभारावा; तसेच गावाला मिळणाऱ्या अनुदानाच्या आणि पुरस्कारांच्या रकमेतील १५ ते २० टक्के रक्कम शाळांसाठी खर्च करण्यात यावा, असे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातील गुणवत्तेचा आग्रह पालकांच्या अपेक्षेशी थेट भिडत असल्यामुळे पालक या कार्यक्रमाशी एकरूप होत आहेत आणि त्यामुळेच ते शाळांना भरभरून मदत करीत आहेत,' असे नमूद करून या परिपत्रकात लोकवर्गणीतून झालेल्या काही कामांची उदाहरणे देण्यात आली आहेत. 'मुले इंग्रजीतून काही वाक्ये बोलायला लागली की पालक त्याकडे आकर्षित होतात आणि शाळेला मदत करायला सुरुवात करतात,' असा निष्कर्ष या परिपत्रकात काढण्यात आला आहे. जिल्हा परिषदा वा महापालिकांच्या शाळांना कितीही देणग्या दिल्या आणि मदत केली तरी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्कापेक्षा कमी खर्च होणार असल्याचे पालकांच्या लक्षात आल्याने ते मदत करायला तयार आहेत, असेही निरीक्षण या परिपत्रकात नोंदविण्यात आले आहे.

चिंताजनक बाब

निधीसाठी शिक्षकांना सतत लोकांकडे हात पसरायला लावण्याच्या सरकारच्या या धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'लोकसहभाग महत्त्वाचा असला, तरी प्रत्येक गोष्टीसाठी लोक निधी कसा देतील,' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 'शिक्षणक हक्क कायद्यानुसार (आरटीई) बंधनकारक असलेल्या किमान सुविधांपैकी अनेक बाबी सरकार 'समाजसहभागा'च्या माथी मारते आहे. सरकारी शाळातल्या मुलांच्या पालकानी कसलाही खर्च करणे अपेक्षित नसताना अनौपचारिकरीत्या पैसे मागणे आणि ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फीच्या तुलनेत कमी आहेत असे परिपत्रकात म्हणणे, ही बाब चिंताजनक आहे. दुसऱ्याचे दात कोरून आपले पोट भरल्याचा आव आणणे बहुजनांच्या शिक्षणाच्या मार्गात अडसर ठरणारे आहे. म्हणून पुरेशी आर्थिक तरतूद व्हायलाच हवी,' अशी मागणी शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images