Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

होळी निमित्त एसटीच्या जादा गाड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले कोकणवासीय आणि पर्यटकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने होळीनिमित्त ८० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथून येत्या बुधवारपर्यंत या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवाबरोबरच कोकण होळी सणासाठीही प्रसिद्ध आहे. विविध कारणास्तव कोकण सोडून अन्य शहारत झालेले नागरिक या सणासाठी न चूकता परतत असतात. येथील होळी पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते. अपुऱ्या प्रवासी साधनांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटीकडून दर वर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. पुण्यातून रत्नागिरी, खेड, चिपळून, गुहागर आणि दापोली आदी ठिकाणांसाठी या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसांपासून या ८० गाड्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापैकी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, सण संपल्यानंतर परतणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे असल्याचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले.
'कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि औरंगाबादला होळी सणासाठी एसटीतर्फे जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्व मार्गांसाठी आरक्षणाव्यतिरिक्त शंभर गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, अधिक गाड्यांची गरज भासल्यास त्याची व्यवस्था केली जाणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.
..
'स्वारगेट ते बोरिवली नव्या फेऱ्या
मुंबईला जाणाऱ्या वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत, राज्य मार्ग पहिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने स्वारगेट ते बोरिवली या मार्गावर आता प्रत्येक अर्ध्या तासाला शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याची सुटीमुळे प्रवाशांची वाढती संख्या, परिणामी बसेसची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेला आहे. स्वारगेट-बोरीवली दरम्यान प्रत्येकी १७ नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील १७ फेऱ्या होत होत्या. त्यामुळे यापुढे एकूण ३४ फेऱ्या होणार आहेत,' अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निधी’अभावी आरोग्य विभाग ‘आजारी’

0
0

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करून गेल्या वर्षीच्या निधीच्या तुलनेत सुमारे १३ टक्के निधीची कपात करण्यात आली आहे. एकूणच आरोग्यासाठी निधीचा डोस कमी असताना त्यामध्ये कपात केल्याने राज्याचे आरोग्य खातेच या वर्षी 'आजारी' पडणार आहे. त्यामुळे आरोग्याला 'अच्छे दिन' यंदाही नाहीतच, अशी टीका होत आहे.
राज्यातील महागड्या वैद्यकीय सेवेचा सामान्य पेशंटला फटका बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याची सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु, सामान्यांना 'अच्छे दिन' दाखविण्याचे स्वप्न दाखवित आरोग्याच्या सेवा यंदाही पुरेशी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१५-१६ च्या सुधारित अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १२ हजार ०१५ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यात १५४३ कोटी रुपयांची कपात करून २०१६-१७ या वर्षासाठी १० हजार ४७२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आरोग्याचा निधी कपात केल्याने खात्याला नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, औषधे, तपासण्यांच्या सुविधेसाठी निधीची कमतरता भासणार आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या ०.४४ टक्के निधी आरोग्यासाठी अपुरा ठरणारा आहे. आरोग्यासाठी गेल्या वर्षी असलेल्या दरडोई निधीवरून १००१ यंदा ८६५ रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ५.१ टक्के तर यंदाच्या वर्षी ४.१ टक्के कमी तरतूद केली आहे. परिणामी, आरोग्याची स्थिती आणखी खालावणार आहे.
'निधीतील कपातीमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला सर्वाधिक फटका बसणार आहे. गेल्या वर्षीच्या सुधारित अर्थसंकल्पात अभियानासाठी ३१४२ कोटी रुपयांची तरतूद होती. कपात करून २०६७ कोटी रुपये केली. क्षयरोग, मलेरिया, डेंगी यासारखे कीटकजन्य आजार, मानसिक आरोग्य, अससंर्गजन्य आजार, अंधत्व कुष्ठरोग यासारख्या प्रमुख राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासाठी २१५ कोटीवरून ९३ कोटींचा निधी दिला आहे. केंद्राने केलेल्या कपातीचा राज्याच्या आरोग्यावर परिणाम होतील. राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी गेल्या वर्षी ३०७ कोटी दिले होते. त्यात वाढ करून तो निधी ८५३ कोटी करण्यात आला होता. त्यापैकी १७ मार्चपर्यंत ८०९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या वर्षी योजनेसाठी केवळ ३९७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याचाच अर्थ ५३ टक्के निधी कपात केला आहे,' अशी माहिती जन आरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके, डॉ. अभिजित मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

0
0

पुणे : व्यापाऱ्याची तीन लाख रुपयांची रोकड लूटल्याप्रकरणी अटक केलेल्या चोरट्याने बिबवेवाडी पोलिसांच्या पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय प्रकाश निकाळजे (वय २३, रा. गल्ली क्रमांक ५, कोंढवा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील पूनम गार्डन येथे गुलसागर संपतलाल जैन यांची निकाळजे व त्याचा साथीदार कदम याने रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास तीन लाखांची रोकडची बॅग चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून निकाळजे व कदम या दोघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्यात निकाळजे याची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्याने बाथरूमला जायचे असल्याचे त्याने सांगितले. बाथरूममध्ये गेल्या नंतर त्याने खिडकीची काच काढून स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सहायक पोलिस निरीक्षक माळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसेवा बँकेवर नवे प्रशासकीय मंडळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसेवा सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळात बदल करून सहकार विभागाने नव्याने तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची, तर काका कोयटे आणि गणेश धारण यांची सदस्य म्हणून नेमणुक केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०१४ रोजी या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार बँकेवर सहकार खात्याकडून प्रशाकीय मंडळ नेमण्यात आले आहे. सध्याच्या प्रशासकीय मंडळात बदल करण्याबाबतचे आदेश सहकार आयुक्तांनी काढले आहेत. विभागीय उपनिबंधक अविनाश देशमुख हे प्रशासक होते. त्यांच्याकडून सोमवारी नवीन प्रशासकीय मंडळाने कार्यभार स्वीकारला. देशमुख यांच्याकडे विभागीय उपनिबंधकाचा पदभार आल्यामुळे या कामासाठी वेळ देता येणार नसल्याचे त्यांनी सहकार विभागाला कळविले होते.

बँकेचे खेळते भागभांडवल २६४ कोटी ४० लाख रुपये असून ठेवी १९७ कोटी ६७ लाख रुपये आहेत. ९५ कोटी ३८ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. बँकेच्या मंगळवार पेठ, पाषाण- सूस रोड, चंदननगर या ठिकाणी शाखा आहेत.

या बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी गेल्या आठवड्यात बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे यांच्यासह बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश पुणे जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील यांनी दिला आहे. बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट केले आहे.

पायगुडे यांच्याशी संबंधित संस्थेला ३२ कोटी रुपयांचे कर्ज विनातारण देण्यात आले. त्यामुळे बँक अडचणीत सापडली असून त्याबाबत सरकारी वकिलांचे मत मागवण्यात आले. त्यांनीही संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर पायगुडेंसह अन्य व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश बँकेचे सनदी लेखापाल के. के. खिराड यांनी दिले आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांच्या मदतीसाठी अनोखा ‘हात’

0
0

Yogesh.Borate
@timesgroup.com

पुणे : ग्रामीण भागातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवणाऱ्या पाबळच्या विज्ञानाश्रमाने आता कमीत कमी किमतीमध्ये अपंगांसाठीचे अवयव तयार करण्याच्या प्रकल्पांवरही काम सुरू केले आहे. विज्ञानाश्रमातील प्रशांत गाडे या संशोधकाने अवघ्या तीस हजार रुपयांमध्ये आवाजाच्या सहाय्याने नियंत्रित होणारा कृत्रिम हात विकसित केला आहे. जयपूर फूटने या कार्याची दखल घेत संस्थेशी सामंजस्य करार केला असून, या पुढील काळात संस्थेसोबतच काम करण्याची तयारीही दर्शविली आहे.

विज्ञानाश्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने नवे डिझाइन इनोव्हेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून विज्ञानाश्रमामध्ये विविध प्रकल्प करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थ्री- डी प्रिंटर, लेझर कटिंग मशिन, पॉलिहाउस आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील थ्री-डी प्रिंटरचा प्रभावी वापर करत हा कृत्रिम हात विकसित करण्यात आल्याची माहिती प्रशांतने 'मटा'ला दिली.

प्रशांत म्हणाला, 'हात नसलेल्या व्यक्तींसाठी कमीत कमी किमतीमध्ये कृत्रिम हात तयार करण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. त्यासाठी ओपन सोर्स माहितीचा वापर करत हॅकबेरी प्रकारातील हा थ्री-डी प्रिंटेड हात तयार केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल या किमतीत हा हात विकसित करण्याचे आव्हान आम्ही डोळ्यासमोर ठेवले होते. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून हा हात विकसित झाला आहे.' हॅकबेरी प्रकारापूर्वी दोन वेगळ्या प्रकारच्या हातांवरही संस्थेमध्ये काम झाले, मात्र काही तांत्रिक अडचणी आणि वाढत्या किमतीचा विचार करता शेवटी हॅकबेरी प्रकारातील हात अंतिम करण्यात आल्याचे प्रशांतने सांगितले. बायो-सेन्सर्स वापरून हात नियंत्रित करणे शक्य असले, तरी त्यामुळे वाढणारा खर्च आणि कालांतराने मानवी क्षमता कमी होत असल्याने बायो- सेन्सर्सच्या अचूकतेमध्ये येणाऱ्या अडचणी विचारात घेत व्हॉइस सेन्सर्स वापरून हात नियंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने सांगितले.

ओपन सोर्स माहितीच्या प्रभावी वापरातून विकसित करण्यात आलेल्या या हातामध्ये तीन इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आल्या आहेत. तसेच हाताचे पहिले बोट आणि अंगठ्यामध्ये स्वतंत्र मोटारी बसविण्यात आल्या आहेत. हाताचे कार्य आवाजाच्या सहाय्याने नियंत्रित करण्यासाठी व्हॉइस सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. या हाताच्या निर्मितीची ही सर्व माहिती सर्व नागरिकांसाठी खुली ठेवणार असल्याचे प्रशांतने सांगितले. या प्रकल्पाची दखल घेत जयपूर फूटनेही संस्थेसोबतच काम करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये या पुढील तीन महिन्यांच्या काळात असे चार हात जयपूर फूटला तयार करून देण्याचे निश्चित करण्यात आल्याचेही त्याने नमूद केले.

लॅपटॉपचा सोलर चार्जर

याच निमित्ताने संस्थेमध्ये सुरू असलेल्या इतर प्रकल्पांचीही 'मटा'ने माहिती घेतली. संस्थेमधील एका प्रकल्पाचाच भाग म्हणून सौरऊर्जेच्या वापराद्वारे थेट लॅपटॉप चालू शकेल अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच, सॅनटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करणारे यंत्रही संस्थेमध्ये विकसित करण्यात आले आहे. स्थानिक बचतगटांच्या गरजा लक्षात घेत संस्थेने शंभर ते एक हजार क्षमतेची अंडी उबवणी यंत्रेही संस्थेमध्ये तयार केली आहेत. अशा नानाविध प्रकल्पांच्या माध्यमातून संस्थेने समाज उपयोगी प्रकल्पांचे केंद्रच विकसित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची खोदाई थांबवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील विविध भागात केबल टाकण्यासाठी खासगी कंपन्यांनी सुरू केलेली रस्ते खोदाई तातडीने थांबवून त्याची तपासणी करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. रस्ते खोदाईसाठी केबल कंपन्यांना दिलेली परवानगी, काम करताना होणारी रस्ते खोदाई, फूटपाथ खोदाई याची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करावी, स्थानिक नगरसेवकांना याची माहिती देऊन त्यांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत काम सुरू करू नये, असे आदेश जगताप यांनी दिले.

शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाईची कामे सुरू आहेत. केबल टाकण्याच्या नावाखाली अनेक कंपन्या बिनधास्तपणे मनमानी कारभार करत रस्ते खोदाई करत आहेत. अनेकदा तर रात्रीतून रस्ते खोदले जातात. दोन ते तीन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेले रस्तेही खोदण्यात‌ आल्याची तक्रार सर्वपक्षीय सभासदांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या रस्ते खोदाईची माहिती पालिका प्रशासनाला देऊनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. केबल कंपन्या चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदाई करत असल्याची वस्तुस्थिती असल्याची कबुली महापौर जगताप यांनी दिली. वानवडीमधील माझ्याच प्रभागात ३० लाख रुपये खर्च करून नव्याने तयार केलेला फूटपाथ एका कंपनीने एका दिवसातच खोदल्याचे महापौरांनी सभागृहात सांगितले.

केबल टाकण्यासाठी गेली वर्षेभर कंपन्यांकडून रस्ते खोदाई सुरू आहे. शहराच्या विविध भागात सुमारे अडीचशे किलोमीटरचे रस्ते खोदण्याची पालिकेने परवानगी दिली आहे. त्यापैकी निम्म्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्याने प्रशासनाने अनेक कंपन्यांना दंडही केला आहे. मात्र त्यानंतरही बेकायदा पद्धत‌ीने खोदाई सुरू असून नागरिकांच्या तक्रारी येत असल्याचे सभासदांनी सभागृहात सांगितले. प्रभागातील रस्ते खोदताना स्थानिक सभासदाला कोणतीही कल्पना दिली जात नाही, यामुळे नगरसेवकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. महिना, दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्ताही केबल टाकण्यासाठी कंपनी खोदून ठेवते, अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्याने शहरात सुरू असलेली केबल कंपन्यांची सर्व कामे तातडीने बंद करण्याचे आदेश महापौर जगताप यांनी प्रशासनाला दिले. या सर्व कामांची तपासणी करून त्याचा अहवाल सभागृहासमोर ठेवावा. स्थानिक नगरसेवकाचे कामाबद्दल समाधान होत नाही, तोपर्यंत काम सुरु करू नये, असे आदेश त्यांनी दिले.

परवानगीच्या नावाखाली ठेकेदार आणि त्याच्याकडील कर्मचाऱ्यांना पोलिस त्रास देतात. अनेकदा ठेकेदारला ब्लॅकमेल करत कामांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण पुढे करत पैसे घेतात. त्यामुळे महापालिकेच्या कामात पोलिसांचा हस्तक्षेप राहू नये, अशी मागणीही सभासदांनी सभागृहात केली.

'कारवाई सुरू राहील'

दरम्यान, नियोजन न करता अनेक ठेकेदार रस्ते खोदतात. पालिकेने रस्ता खोदण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव होण्यापूर्वीच रस्ते खोदण्याचे काम सुरू होते. तक्रारी आल्याने चुकीच्या पद्धतीने खोदाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास यापुढील काळातही ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच राहिले, असे वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका इमारतीच्या कामासाठी झऱ्याचे पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी या भागात खोदकाम करताना तयार झालेल्या झऱ्याचे पाणी वापरले जात असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने सोमवारी केला. भवन रचना विभागाचे प्रमुख सतीश खांदवे यांनी सर्वसाधारण सभेत हा खुलासा केला.

शहरातील बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्याची मनाई असताना महापालिकेच्या मुख्य इमारती शेजारी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी मात्र पिण्याचे पाणी वापरले जात असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संस्थांनी केली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटले. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कारवाई करणारी पालिका स्वत:च्या बांधकामासाठी पिण्याचे पाणी कसे वापरते, असा प्रश्न नगरसेविका रूपाली पाटील यांनी उपस्थित केला. बांधकामासाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर खुलासा करताना नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना तेथे झरा लागल्याचे भवन रचना विभागाचे प्रमुख खांदवे यांनी सांगितले. या झऱ्यातून दररोज २५ टँकर पाणी उपलब्ध होते. या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात आहे. या भागात आरसीसी पाइपलाइन टाकून जॅकवेल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पाइपलाइनद्वारे हे पाणी घेतले जाते असे वाटते. प्रत्यक्षात हे पाणी पिण्याचे नव्हे तर झऱ्याचे असल्याचे खांदवे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे पाणी मुरणार कुठे?

0
0

भूजल पातळी घटण्याची समस्या भेडसावणार
पुणे : शहराच्या गल्लीबोळात वाढत असलेले काँक्रिटचे रस्त्यांमुळे हवेचे प्रदूषण, उष्णतेबरोबरच आता भूजल साठ्याच्या समस्येला पुणेकरांना सामोरे जावे लागणार आहे. वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण गेल्या पंधरा वर्षांत ३५ टक्क्यांवरून अवघ्या पाच टक्क्यांवर आले आहे. येत्या वर्षभरात तब्बल पाचशे कोटी रुपयांचे काँक्रिटचे रस्ते तयार झाल्यावर पावसाचे पाणी मुरणार तरी कुठे, याचा विचार पुणे महापालिकेने केलेला नाही.
शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेने घातलेला हा घाटामुळे पुण्यातील बहुतांश भागातील भूजल साठ्यावर दुष्परिणाम होणार असल्याचे अभ्यासकही सांगत असताना, अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. 'पुण्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस वर्षांपूर्वीपर्यंत भूजलसाठा चांगल्या प्रमाणात होता. पावसाचे ३५ टक्के पाणी हे जमिनीमध्ये विविध मार्गातून मुरत होते. गेल्या दहा वर्षात शहरांमध्ये पत्त्यासारख्या उभा राहिलेल्या इमारती, मोकळ्या जागांवर टाकलेले पेव्हिंग ब्लॉक्समुळे पाणी मुरण्याचे प्रमाण पाच ते सात टक्क्यांवर आले आहे,' अशी माहिती भूजल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग अभ्यासक कर्नल एस. जी. दळवी यांनी दिली. 'शहराच्या चोहोबाजूला होत असलेल्या काँक्रिटच्या रस्त्यामुळे नागरिकांना यापुढे जमीन दिसणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या अजब अधिकाऱ्यांनी हे रस्ते करताना पादचारी मार्ग सिमेंटच्या आवरणाने बंद केले आहेत. पर्यायाने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.
पुढील काही वर्षात नव्हे पुण्यातील काही भागात गेल्या काही महिन्यात काँक्रिटीकरणाचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक सोसायट्यांचे बोअरवेलचे पाणी जानेवारीतच संपले आहे. सदाशिव पेठेतील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, 'आमच्याकडे दोन बोअरवेल होत्या. एक दहा वर्षांपूर्वी तर दुसरी गेल्या वर्षीच खणली होती. सध्या दोन्ही कोरड्या झाल्या आहेत. बाणेर, विमाननगर, खराडी, कोंढवा या भागात एरवीच पाण्याचे वेळापत्रक कोलमडलेले असते. आता तर बोअरवेलनेही त्यांची साथ सोडली आहे.' 'प्रशासन आणि या मोठ्या सोसायट्यांनी पावसाचे पाणी जमिनीत साठवले नाही तर बोअरवेलला पाणी येणारच कुठून,' असा सवाल दळवी यांनी उपस्थित केला आहे.
..
पाण्याचे आउटलेट फक्त कागदावर
सिमेंटचे रोड बांधताना, त्याचा थर तीन ते चार फूट जाड असतो. त्यामुळे या थरातून पाणी झिरपत नाही. हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी त्याला दर काही अंतरावर वाट करून देणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या कंत्राटदारांनी कागदावर पाणी मुरण्यासाठी आउटलेट दाखविली असली तरी प्रत्यक्षात सध्या काम सुरू असलेल्या कोणत्याही रोडवर पाण्याची व्यवस्था झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या वादळी पावसातच याचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागणार आहेत.
..............
- वनक्षेत्राला लागून असलेल्या सहकारनगर परिसरात पंधरा वर्षांपूर्वी ५० ते ६०फूटावर पाणी होते. आता पाण्याची पातळी दीडशे फूट खोल गेली आहे.
- भूजल पातळी घटल्याने बाणेरमधील रहिवासी बोअरवेल कोरडी पडल्याच्या तक्रारी सातत्याने करीत आहेत.
- विमानगरमध्येही हीच परिस्थिती असून किमान १०० फूटांशिवाय पाणी लागत नाही.
- विश्रांतवाडीमध्ये काही वर्षांपूर्वी १५० ते २०० फुटांवर पाणी होते, आता ३०० फुटावर गेले आहे.
- लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड परिसात पूर्वी तक्रारी नव्हत्या, अलीकडे तेथील पाणी ५० ते ७५ फुटांवर पोहोचले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणात उतरण्यावर निर्बंध

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी खडकवासला धरणामध्ये उतरण्यास आणि जलक्रीडा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या २४ ते ३० मार्च दरम्यान हे निर्बंध लागू राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

हवेलीच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. होळीनंतर साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनानंतर अनेक हौशी नागरिक खडकवासला धरण परिसरात रंग खेळण्यास येतात. अपायकारक रंग खेळल्यानंतर धरणाच्या पाण्यात अंघोळ करतात. त्यामुळे धरणातील पिण्याचे पाणी प्रदूषित होते. त्यातच सलग चार सुट्ट्या आल्याने जलक्रीडेसाठी पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरतात. त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर २४ ते २७ मार्चपर्यंत खडकवासला धरणामध्ये उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रकिया संहिता १९७३च्या कलम १४४ अन्वये खडकवासला धरणाच्या भिंतीच्या आतील बाजूस, तसेच हवेली तालुक्याच्या हद्दीमध्ये समाविष्ट धरण क्षेत्रामध्ये रंग खेळणे, प्लास्टिक वा अन्य वस्तू पाण्यात टाकणे, पाण्यामध्ये उतरणे तसेच कोणत्याही प्रकारे धरणाचे पाणी प्रदूषित होईल, अशी कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही बर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

धरणांमध्ये सद्यस्थितीत अपुरा पाणीसाठा आहे. पुरेशा पाणीसाठ्याअभावी शहरात पाणीकपातही सुरू आहे. त्यामुळे या काळात धरणांतील पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. या निर्बंधांबाबतचे फलक धरण परिसरात लावण्यात येणार आहेत. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश खडकवासला पाटबंधारे विभाग, हवेली, वडगाव बुद्रुक आणि सिंहगड पोलिसांना यांना देण्यात आले आहेत. या काळात धरण परिसरात पोलिस, तसेच होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही खडकवासला धरणात परिसरात जनजागृती करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विमिंग पूल बंदचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील महापालिकेच्या मालकीचे, तसेच खासगी सर्व स्विम‌िंग पूल बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व स्विम‌िंग टँक चालकांना हे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. या स्विम‌िंग टँकमध्ये सोसायट्यांमध्ये असलेल्या टँकचाही समावेश असणार असून यामुळे शहरातील ३२५ टँक बंद राहणार आहेत.

शहरसह संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत भयानक आहे. पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा कमी होत चालला असून यावर उपाय म्हणून सप्टेंबर महिन्यापासूनच महापालिका प्रशासनाने स्विम‌िंग टँकसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करण्याचे आदेश दिले होते. विहिर, तसेच बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून शहरातील अनेक भागातील स्विम‌िंग टँक मात्र सुरू होते. राज्यातील पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने होळी, धुलीवंदन, रंगपंचमी या सणांच्या निमित्त साजरे केल्या जाणाऱ्या 'रेनडान्स'वर बंदी घातली आहे. तसेच जुलैपर्यंत राज्यातील सर्व स्विम‌िंग टँक बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या होत्या.

होळी, रंगपंचमी निमित्त पाण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करत दोन दिवसांपूर्वी महापौर प्रशांत जगताप यांनीही पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी काही सभासदांनी पिण्याच्या पाण्याचा होणारा गैरवापराकडे लक्ष वेधत पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सभासदांनी सभागृहात केली होती.

त्यावर खुलासा करताना महापालिका आयुक्त कुमार यांनी शहरातील सर्व स्विम‌िंग टँक बंद करण्याचे आदेश काढल्याचे स्पष्ट केले. शहरात असलेल्या ३२५ स्विमिंग टँकपैकी २१ टँक हे महापालिकेच्या मालकीचे असून उर्वरित सर्व खासगी मालकीचे आहेत. हे सर्व टँक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.

कारवाईसाठी पथके तयार

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा कोणताही वापर करू नये, अशा सूचना यापूर्वीच संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. स्विम‌िंग टँक देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून जे स्विमिंग टँक सुरू असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्त कुमार यांनी दिले. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरातील विविध भागांना भेट देऊन कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. धुलीवंदन, रंगपंचमीसाठी पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’ची ‘मागेल त्याला वीज’ कागदावरच

0
0

Jitendra.Ashtekar@timesgroup.com

पुणे : गेली काही वर्षे 'मागेल त्याला वीज' असा डंका पिटणाऱ्या 'महावितरण'कडे फेब्रुवारीअखेरपर्यंत तब्बल २ लाख ४२ हजार नवी वीज कनेक्शन प्रलंबित असल्याची धक्कादायक कबुली खुद्द 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिली आहे. शेती कनेक्शन्स वगळता इतक्या प्रचंड संख्येने राज्यातील ग्राहकांना गेले अनेक दिवस नव्या वीज कनेक्शनची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे गेल्या काही काळात कंपनीकरण झाल्यानंतर 'महावितरण'चा कारभार सुधारल्याचे आढळून येत आहे. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारची पेंडन्सी वाढल्याने यंत्रणेतील दिरंगाईवर खुद्द एमडींनीच बोट ठेवले आहे. ग्राहकाने तो राहत असलेल्या निवासाचा एक पुरावा दिला, तरी त्याला एका महिन्यात विजेचे कनेक्शन द्यावे, असे महावितरणच्या कृति मानकांमध्ये (एसओपी) नमूद करण्यात आले आहे. परंतु, ही कृती मानके लागू होऊन दहा वर्षे लोटल्यानंतरही सुमारे अडीच लाख ग्राहकांना महिनो न महिने वीज कनेक्शनसाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे. अनेकदा हेलपाटे घालूनही कनेक्शन मिळत नाही, त्यामुळे गैरप्रकार घडतात आणि ग्राहकांची अडवणूक होते, अशाही तक्रारी आहेत.

'महावितरण'तर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या 'महावितरण विद्युत वार्ता' च्या मार्च महिन्याच्या अंकातील 'हितगुज' या सदरात संजीवकुमार यांनी याबाबतची कबुली दिली आहे. नवी वीज कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी 'महावितरण'ने अनेक पावले उचलली आहेत. त्यामध्ये अनेक सेवा 'ऑनलाइन' उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच नवे कनेक्शन तातडीने मिळावे, यासाठी आवश्यक ए-१ फॉर्मही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरीही नवी कनेक्शन वेळेत मिळत नाहीत, त्यासाठी ग्राहकांना हेलपाटे घालावे लागतात, अशा अनेक तक्रारी आहेत. शेती कनेक्शन वगळता ही संख्या २ लाख ४२ हजारांवर पोहोचली आहे.


विलंबाची कारणे

- प्रशासकीय दिरंगाई

-७ दिवसांत साइट इन्स्पेक्शन अपेक्षित असताना ती होत नाही.

- देखरेख ठेवणारी केंद्रीय यंत्रणा नाही.

- काही प्रकरणांमध्ये वीजपुरवठा यंत्रणा (ट्रान्सफॉर्मर, वीजवाहिन्या) उपलब्ध नाही.

- लोड उपलब्ध नाही.

- ग्राहकांचे अज्ञान


'निकाली काढावीत'

वीज जोडणीत विलंब झाल्याने गैरप्रकारांना चालना मिळते. काही अधिकारी-कर्मचारी प्रलोभनांना बळी पडून गोवले जातात. हे प्रकार टाळण्यासाठी नव्या जोडण्यांची प्रकरणे १०-१५ दिवसांत निकाली काढावीत.

- संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

'कारवाई आवश्यक'

कृती मानकांमध्ये तरतूद असूनही इतक्या मोठ्या संख्येने प्रकरणे पेंडिंग का राहतात, याची महावितरणने चौकशी केली पाहिजे. तसेच मानकांचा भंग झाल्याबद्दल कारवाई करून संबंधितांना भरपाई दिली पाहिजे.

- विवेक वेलणकर, ग्राहक प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केल्याच्या खटल्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांनी दिले आहेत. या खटल्याची सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी दिली.

सुरेश जैन यांनी २००३ मध्ये पत्रकार परिषद घेऊन हजारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या विषयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे अण्णा हजारे यांनी बदनामी केल्याप्रकरणी अ‍ॅड. हर्षद निंबाळकर आणि अ‍ॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत कोर्टात २००३ मध्ये बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला. या खटल्यात हजारे यांची साक्ष नोंदविण्यात आली असून, एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. साक्षीपुरावा नोंदविल्यानंतर अण्णा हजारे आणि जैन यांच्यामार्फत कोर्टात युक्तिवाद करण्यात आला आहे. जैन यांच्याविरुद्ध दोषारोप ठेवण्यात यावेत, अशी मागणी हजारे यांचे वकील अॅड. निंबाळकर यांनी केली. कोर्टाने सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करावेत असे आदेश दिले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेएनयू’त देशाविरोधात ब्रेन वॉशिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (जेएनयू) डाव्या विचारसरणींच्या सुमारे शंभर प्राध्यापक आणि तीनशे विद्यार्थ्यांकडून विश्वविद्यालयात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे देशविरोधी कारवायांसाठी ब्रेन वॉश केले जात आहे. त्यासाठी तेथे अनेक वर्षापासून देशद्रोह्यांना हिरो बनवण्याचे काम सुरू आहे. देश तोडण्याची भाषा करणाऱ्या या डाव्या विचारसरणीच्या लोकांना आता नागरिकांनी प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे', असे जेएनयूच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेचे (अभाविप) अध्यक्ष आलोक सिंग यांनी सोमवारी सांगितले.

प्रबोधन मंचाच्यावतीने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जेएनयू' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिंग बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या डॉ. शांतीश्री पंडित, मंचाचे अध्यक्ष हरी मिराजदार, प्रा. अनंत लेले, निमंत्रक प्रा. गोविंद कुलकर्णी, किशोर शशितल उपस्थित होते.

सिंग म्हणाले, 'एक लाल किल्ला किंवा दुसरा जेएनयू म्हणजेच लाल किल्ला, असे दोन लाल किल्ले आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जेएनयूला लाल रंगाने रंगविलेच आहे. आता तिथल्या विद्यार्थ्यांना डाव्या विचारसरणीने रंगवण्याचे काम सुरू आहे. जेनयूच्या संकुलात होस्टेलमधील एका खोलीत आठ ते दहा विद्यार्थ्यांना राहावे लागत असल्याने तेथे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशाविरुद्ध करावाया करण्यासाठी भडकावण्यात येते. जेएनयूमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलामांसारख्या थोर व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल साधा आदर व्यक्त केला गेला नाही. मात्र, याकूब मेनन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन केले जाते. एकंदरीतच तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशाच्या विरोधात काम करण्यासाठी प्रेरित केले जात असून हे थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी अभाविप काम करीत असून लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे.'

डॉ. पंडित म्हणाल्या, 'मी १९८५ ते १९९० पर्यंत जेएनयूची विद्यार्थिनी होती. तेव्हा मात्र ही परिस्थिती नव्हती. साधारण २००२ सालापासून जेएनयूत देशविरोधी घटनांचे पेव फुटले आहे. जेएनयूमध्ये डाव्या विचारसरणीचे सुमारे २०० ते ३०० विद्यार्थ्यांचा गट सक्रीय आहे. त्यांच्यात एकसंधपणा असल्याने तो गट बहुमतात जाऊन तेथे संख्येने चांगल्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांवर प्रभावी पडतो. डावे असल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही, असे जेएनयूचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना सांगतात. त्यामुळे देशविरोधी कारवायांना रोखण्यासाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन देशाच्या एकसंधतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे.' साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

'जेएनयूचे नाव बदला'

धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व असदुद्दिन ओवैसी आणि त्याचे बंधू त्यांच्या भडकाऊ भाषणातून सांगत आहेत. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. या बंधूंच्या वक्तव्यांना समाजातील जागरूक नागरिकांनी विरोध करून देशाला एकसंध बांधणाऱ्या गोष्टीना पाठिंबा दिला पाहिजे. दरम्यान, जेएनयूचे नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस विश्वविद्यालय केल्यास बरे होईल, असे डॉ. पंडित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्ग्युसन कॉलेजमध्ये कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात आंबेडकरवादी चळवळीतील विद्यार्थ्यांनी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ आज घोषणाबाजी केली. कॉलेजचं वातावरण तणावपूर्ण बनल्यानं पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.

दिल्लीतील जेएनयूत घडलेल्या प्रकाराबाबत आपली बाजू मांडण्यासाठी अभाविपनं फर्ग्युसन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अभाविपचा अध्यक्ष अलोक सिंग संबोधित करणार होता. कार्यक्रमासाठी अलोक सिंगही फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाला होता. दरम्यान अभाविपचे १० ते १५ विद्यार्थी कार्यकर्ते फर्ग्युसन कॉलेजमधील किमया इथे चर्चा करत बसले होते. त्यावेळी 'भारत माता की जय', ' वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या. त्यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी अभाविप विरोधात घोषणा द्यायला सुरू केलं. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. घोषणाबाजीच्या प्रकारामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.

अभाविपनं आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे पॉलिटिकल इव्हेंट असल्याचं घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अभाविपनं देखील जेएनयूमध्ये आमच्या घोळक्यात थांबून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या अशा प्रतिक्रियाही या विद्यार्थ्यांनी नोंदवल्या.

दरम्यान, अभाविपनं कॉलेजकडे आज सकाळी 10 वाजता परवानगीसाठी पत्र पाठवले सादर केले होते, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाई वैद्य यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यभूषण फाउंडेशन व त्रिदल, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'पुण्यभूषण पुरस्कार' ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

'ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी वैद्य यांचे नाव निश्चित केले आहे. पुरस्काराचे यंदाचे २८ वे वर्ष असून लवकरच होणाऱ्या एका खास समारंभात वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार प्रदान सोहळ्यात शंकर बुरुंगले, बाबुराव पाटील, यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभुळकर, अरविंद मनोलकर व दत्ता गांधी या स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे,' अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

यापूर्वी हा पुरस्कार पं. भीमसेन जोशी, काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, पु.ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार, डॉ.मोहन धारिया, डॉ. रोहिणी भाटे, डॉ. जयंत नारळीकर अशा अनेक मातब्बर व्यक्तींना देण्यात आला आहे. 'सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशभर पोहचविण्याचे कार्य वैद्य यांनी केले असून १९४३ पासून ते राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. तेंव्हापासून 'लोकशाही समाजवाद' ही विचारधारा त्यांनी स्वीकारली असून त्याप्रति आजतागायत निष्ठा जपली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना 'पुण्यभूषण पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे,' असे डॉ. देसाई यांनी नमूद केले.

सोशलिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षासह भारत यात्रा ट्रस्ट दिल्ली, एस.एम. जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे म.न.पा. सेवा निवृत्त संघ अशा संस्थांचे वैद्य हे अध्यक्ष आहेत. पुण्याचे महापौर, माजी गृहराज्यमंत्री, जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषदेचे राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. वैद्य यांनी १९४२ मध्ये शालेय जीवनात असताना चलेजाव चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने तुरुंगासही भोगला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाई वैद्य ‘पुण्यभूषण’

0
0

यंदाच्या पुरस्कारासाठी निवड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यभूषण फाउंडेशन व त्रिदल संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'पुण्यभूषण पुरस्कार' यंदा ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

'ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी वैद्य यांचे नाव निश्चित केले आहे. पुरस्काराचे यंदाचे २८वे वर्ष असून, लवकरच होणाऱ्या एका खास समारंभात वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार प्रदान सोहळ्यात शंकर बुरुंगले, बाबूराव पाटील, यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर व दत्ता गांधी या स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरवण्यात येणार आहे,' अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

यापूर्वी हा पुरस्कार पं. भीमसेन जोशी, काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानूबाई कोयाजी, पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, डॉ. मोहन धारिया, डॉ. रोहिणी भाटे, डॉ. जयंत नारळीकर अशा अनेक मातब्बर व्यक्तींना देण्यात आला आहे.

'सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशभर पोहोचवण्याचे कार्य वैद्य यांनी केले असून, १९४३पासून ते राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. तेव्हापासून 'लोकशाही समाजवाद' ही विचारधारा त्यांनी स्वीकारली असून, त्याप्रति आजतागायत निष्ठा जपली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे,' असे डॉ. देसाई यांनी नमूद केले.

..............

डॉ. वैद्य यांचे कार्य

सोशलिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षासह भारत यात्रा ट्रस्ट-दिल्ली, एस. एम. जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे मनपा सेवानिवृत्त संघ अशा संस्थांचे वैद्य हे अध्यक्ष आहेत. पुण्याचे महापौर, माजी गृहराज्यमंत्री, जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषदेचे राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. वैद्य यांनी १९४२मध्ये शालेय जीवनात असताना 'चले जाव' चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. गोवा मुक्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला होता.

........................

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या नावाने सुरू झालेल्या त्रिदल संस्थेकडून हा पुरस्कार मिळत आहे, याचा खरा आनंद आहे. महनीय व्यक्तींच्या नावात मला स्थान मिळाल्याने मी समाधानी आहे.

- भाई वैद्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंपरा व नवनिर्माणाचा संगम शिक्षणात हवा

0
0

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्रातील जाणिवेच्या संस्कृतीतून सक्षम युवा पिढीची निर्मिती होत आहे. या पिढीसाठी भारतीय मूल्यात्मक शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. परंपरा आणि नवनिर्माण यांचा सुरेख संगम बदलत्या शिक्षण व्यवस्थेत व्हायला हवा,' असे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. प्राचार्य के. डी. जाधव, विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. म. शि. सगरे, उपप्राचार्य डॉ. मोरे, डॉ. पाटील, डॉ. बी. एन. पवार, प्रा. ई. डी. पाटील या वेळी उपस्थित होते. या वेळी योगिता शिंलवणकर (सायकलिंग), स्नेह शिंदे (कबड्डी), रणजित नलावडे (कुस्ती), दिनेश गुंड (कुस्ती) या 'शिवछत्रपती पुरस्कार'विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित प्रा. एस. डी. उगळे यांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. सबनीस म्हणाले, 'शिक्षणामुळे वंचित वर्गामध्ये आत्मसाक्षात्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींविरोधात विद्रोह निर्माण होत आहे. आपली समाजव्यवस्था मूलभूत मूल्यात्मक जाणिवा असलेली आहे. शिक्षण व्यवस्थेतून भारतीयत्व विकसित करणारा तरुण निर्माण व्हायला हवा. शिस्त, गुणवत्ता यांच्या आधाराने ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात डॉ. पतंगराव कदम यांच्या माध्यमातून भारती विद्यापीठाने नावलौकिक प्राप्त केला आहे.'

'महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वाटचाल केली आहे. विद्यार्थ्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत,' असे डॉ. सगरे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. के. डी. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनुराधा जपे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आताच्या कार्यकर्त्यांना पैसा, प्रसिद्धी महत्त्वाची

0
0

- तुमच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे सांगा...

- स्वातंत्र्योत्तर काळात लक्ष्मी रोडवर आमचे वास्तव्य होते आणि मी रविवार व बुधवार पेठ भागात सामाजिक काम करायचे. माझे काम पाहून, मी राजकारणात यावे, असे या परिसरातील अनेकांना वाटत होते; पण आमच्या डॉक्टरांनी (म्हणजे, पती डॉ. रतिलाल मर्चंट) राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी सामाजिक कार्यवरच भर दिला. त्यानंतर माझे काम आणि त्यास नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आमच्या डॉक्टरांनीही मला राजकारणात जाण्याची परवानगी दिली. मी १९६२ व १९६८ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून व १९७२ साली विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. ससून मित्र मंडळ (आताची श्रीवत्स संस्था), जिजामाता बँक या संस्थांच्या स्थापनेत माझा सहभाग होता. तसेच, पुणे महिला मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, पूना विमेन्स कौन्सिल, गुजराथी महिला मंडळ, वीर वनिता मंडळ, औद्योगिक सहकारी संस्था, संयुक्त स्त्री संस्था, स्टेट होम नशाबंदी मंडळ आदी संस्थांच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यापूर्वी १९४२चा स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेल्या लढ्यातही मी सहभागी झाले होते. या सर्व गोष्टी आठवताना मनात एक समाधानाची भावना निर्माण होते.

- आताची सामाजिक व राजकीय परिस्थिती आणि स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थिती यात काय बदल जाणवतो?

- आताचे राजकारण वेगळे आहे. आमच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. सामाजिक कार्य करायचे एवढेच आम्हाला माहिती होते. तेव्हाच्या कार्यकर्त्यांना कामातून समाधान मिळत होते; मात्र आताच्या कार्यकर्त्यांना पैसा आणि प्रसिद्धी महत्त्वाची वाटते. १९६२ सालच्या चीनविरुद्धच्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्रिपदी होते. त्या वेळी त्यांची शनिवारवाड्यावर सभा झाली होती. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी निधी दिला. त्या वेळी आमच्यासारख्या काही महिला कार्यकर्त्यांनी अंगावरील दागिनेदेखील दिले होते; मात्र आता तसे कार्यकर्ते आढ‍ळून येत नाहीत. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत; मात्र एका व्यक्तीवरही बंधने येतात. त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत, ते कार्यक्षम वाटत नाहीत. देशातील महागाई, सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.


- तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल ?

- तरुणांनी देशाकरिता कामे करावीत आणि मुलींनी सामाजिक कार्यात यावे, असा सल्ला मला आताच्या तरुणाईला द्यावासा वाटतो. सामाजिक कार्यातील महिलांचे प्रमाण तुलनेने कमी झाले असून, तरुणींची संख्या तर खूप कमी आहे. त्यामुळे किटी पार्टी व भिशीतून थोडा वेळ काढून त्यांनी सामाजासाठी दिला पाहिजे. आताची तरुणाई मोबाइल आणि टीव्हीमध्ये गुंतली आहे. आपापसांतील संवाद कमी झाला आहे. यातून त्यांनी बाहेर आले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबातील तिघांची सहा पुस्तके प्रकाशित

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी होण्याचा एक वेगळा सोहळा नुकताच पार पडला. 'स्नेहल प्रकाशन'च्या वतीने डॉ. अशोकराव कुकडे यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (नवी मुंबई) कुलगुरू डॉ. संजीव ओक आणि लेखक डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते झाले.

या वेळी संचेती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. के. एच. संचेती, 'ज्ञानप्रबोधिनी'चे प्रा. यशवंत लेले, लेखिका मीना प्रभू, किरण ठाकूर, शामली नरप्पनवार व 'स्नेहल प्रकाशन'चे संचालक रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. 'कथा एका ध्येय साधनेची' (डॉ. अशोकराव कुकडे), 'पॅशन टू मिशन' (डॉ. अशोकराव कुकडे), 'बोल अंतरीचे' (डॉ. ज्योत्स्ना कुकडे), 'आजचे पसायदान' (डॉ. अनघा लवळेकर), 'स्त्री मनाचा कानोसा' (डॅा. अनघा लवळेकर), रंग नात्यांचे (डॉ. अनघा लवळेकर) या सहा पुस्तकांचे प्रकाशन झाले.

'एकाच कुटुंबातील व्यक्तींनी लिहिलेली सहा पुस्तके ही अनन्यसाधारण घटना आहे. या पुस्तकांतून ध्येयसाधनेच्या कथा समाजासमोर येतात. या सकारात्मक पुस्तकांमधून माणुसकीचा खळाळणारा झरा आपल्याला पाहायला मिळतो. ही पुस्तके आश्वासक आणि प्रेरणादायी आहेत,' असे उद्गार डॉ. ओक यांनी काढले.

डॉ. उपाध्ये म्हणाले, 'एकाच कुटुंबातील हे तीन कल्पतरू आहेत. ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन अशा तिन्ही गोष्टी या पुस्तकांद्वारे पाहायला मिळतात. प्रास्ताविक रवींद्र घाटपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सुषमा निसळ यांनी केले. लक्ष्मीप्रसाद लवळेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान विभागाचेही ‘मेक इन इंडिया’

0
0

पुणे : विमानतळाच्या धावपट्टीवरील दृष्यमानतेची (व्हिजिबिलिटी) अचूक माहिती वैमानिकाला देणारी 'दृष्टी' ही यंत्रणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने विकसित केली आहे. आतापर्यंत ही यंत्रणा आयात करावी लागत होती. आयात केलेल्या यंत्रणेच्या किमतीपेक्षा अवघ्या एक तृतीयांश खर्चात ही यंत्रणा विकसित करण्यात यश आल्याने भारताची परकीय चलनाचीही मोठी बचत होत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) उपकरण विभागाने नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीच्या (एनएएल) सहकार्याने 'दृष्टी' ही यंत्रणा विकसित केली आहे. त्याविषयी 'आयएमडी'च्या उपकरण विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर. आर. माळी यांनी 'मटा' ला अधिक माहिती दिली. ही यंत्रणा विकसित करण्यासाठी आयएमडी आणि एनएएलमध्ये मे २०१४ मध्ये सामंजस्य करार झाला. त्यानुसार ही यंत्रणा विकसित करण्यात आली.
'या पूर्वी ही यंत्रणा जर्मनी व ऑस्ट्रेलियाकडून आयात केली जात होती. त्याची किंमत साधारण साठ लाख रुपयांच्या आसपास होती. आता मात्र, आयएमडी आणि एनएएलला ही यंत्रणा वीस लाख रुपयांमध्ये विकसित करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर या यंत्रणेचा वापर, दुरुस्ती व देखभाल 'आयएमडी'तर्फे केली जाते. सुट्या भागांसाठीही कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. यातले कुठलेही काम बाहेरील यंत्रणेला दिले जात नाही. त्यामुळे परकीय चलनात मोठी बचत होत आहे,' असे डॉ. माळी यांनी सांगितले.
सध्या नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३ ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. जयपूर विमानतळावर तीन, लखनौ विमानतळावर तीन, अमृतसर आणि वाराणशी विमानतळावर प्रत्येकी एक यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर लवकरच पाटणा, गुहावटी, डेहराडून आणि अहमदाबाद या विमानतळावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
'वैमानिकासाठी उड्डाण करताना किंवा विमान उतरवताना धावपट्टीवरील दृष्यमानता अत्यंत महत्त्वाची असते. त्यावरच विमान उतरवायचे की नाही, याचा निर्णय वैमानिक घेतो. त्यासाठी वैमानिकाला धावपट्टीवरील परिस्थितीचा अचूक अंदाज मिळणे आवश्यक ठरते. दृष्यमानता अगदी कमी असेल तर वैमानिक विमान दुसरीकडे उतरवतो. तेच काम ही यंत्रणा करते. या यंत्रणेची अचूकता ही अन्य आयात केलेल्या उपकरणांपेक्षा अधिक चांगली असल्याचेही निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे,' असे डॉ. माळी यांनी सांगितले.
...
दृष्टी यंत्रणेची अचूकता अन्य आयात केलेल्या उपकरणांपेक्षा अधिक चांगली आहे. सध्या तेरा ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा विकसित केल्याने परकीय चलनांमध्येही बचत होणार आहे.
- डॉ. आर. आर. माळी, उपमहासंचालक, 'आयएमडी'चा उपकरण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images