Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शस्त्रास्त्र प्रदर्शनास प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
खडकीच्या दारूगोळा कारखान्याने आयुद्ध दिनानिमित शुक्रवारी आयोजित केलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास तरुण-तरुणींसोबतच महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक सी. एस. विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले. या वेळी कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक जे. पी. गुप्ता उपस्थित होते.

रेंजहिल्स इस्टेट ज्युनिअर स्टाफ क्लबमध्ये हे प्रदर्शन झाले. संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतीय आयुद्ध निर्मितीचा पहिला कारखाना गन अँड शेल फॅक्टरी कोलकाता येथील काशिपुरमध्ये १८ मार्च १८०२मध्ये सुरू करण्यात आला. हा दिवस आयुद्ध दिन म्हणून साजरा केला जातो. फॅक्टरीच्या कामगारांच्या परिवाराला आणि इतर जनतेला खडकी दारूगोळा कारखान्यात आणि इतर कारखान्यात तयार होणाऱ्या दारूगोळ्याची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन भरवले जाते, अशी माहिती कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक सी. एस. विश्वकर्मा यांनी दिली.

प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या पिस्तुल आणि रिव्हॉल्वरसाठीच्या बुलेट, रबर बुलेट, कार्टेज, एके ४७साठीच्या ५.५६ एमएस बुलेट आणि ९ एमएम बुलेटसह हँडग्रेनेड, ५१ एमएम मोटार बॉम्ब, नेव्हीसाठी वापरले जाणारे आरजीबी १२ आणि आरजीबी ६० वॉटरमाइन, तसेच रॉकेट लाँचर, अँटी मिसाइल बॉम्ब, ७.६२ एलएमजी, ५.५६ रायफल विथ ४० एमएम ग्रेनाइड लॉन्चर, कार्बाइन, एके ४७ गन, अँटी राइट रबर बुलेट मांडण्यात आले होते. फॅक्टरीतील फायर ब्रिगेड आणि त्यामध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणेही प्रदर्शनात ठेवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दाता दशसहस्त्रेषु’

$
0
0

राज्य सरकार सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या आणि सहकाराचे जाळे उभे राहण्याच्या काळात रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळेंनी स्वतःच्या हिंमतीवर खासगी दूध आणि मिठाई उद्योग उभा केला, तोही आदर्शवत असाच.. आर्थिक सुधारणांच्या कैक वर्ष आधी स्पर्धात्मकतेच्या कसोट्या आपल्या व्यवसायात अंगीकारण्याचे द्रष्टेपण भाऊसाहेबांच्या अंगी होते. मागणी तसा पुरवठा हे अर्थगणित सांभाळतानाच गुणवत्तेशी तडजोड न करताच बाकरवाडीसाठी मशिनचा पर्याय त्यांनी स्वीकारला. मोठ्या प्रमाणावरील मागणी पूर्ण करून चितळेंचा झेंडा सातासमुद्रापार नेणारे भाऊसाहेबच होते.
भाऊसाहेबांचा जन्म २२ ऑक्टोबर १९२० रोजी साताऱ्यातील लिंबगोवे या गावात झाला. भास्करराव चितळ्यांचे ते थोरले सुपुत्र. एकूण सात भाऊ आणि पाच बहि‍णींच्या मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांचे लहानपण गेले. भास्करराव यांचा सांगलीतील भिलवडीत मेसर्स बी. जी. चितळे नावाने दुधाचा व्यवसाय होता. वयाच्या १८ व्या वर्षी भाऊसाहेब या व्यवसायात सामील झाले. १९४० मध्ये ते पुण्यात सांगलीहून आणलेल्या दुधाची विक्री करत. १९४५ साली ते विजया गाडगीळ यांच्याशी विवाहबद्ध झाले. घरचा पारंपरिक दुग्धव्यवसाय चालवत असतानाच त्यांना संधींचे आकाश खुणावत होते. त्यातूनच १९५० मध्ये चितळे बंधू मिठाईवाले हा जगप्रसिद्ध ब्रँड उदयास आला. एका छोट्याशा दुकानापासून दोन प्रशस्त दालने, १६ फ्रँचायजी, पाच उत्पादन केंद्रापर्यंत हा पसारा भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणातून वाढत गेला. दरम्यानच्या काळात मोठ्या एकत्र कुटुंबाचे कर्तेपणही त्यांना आनंदाने, विनयाने सांभाळले.

आपल्या उद्योगात कालसुसंगत तंत्रज्ञानाची भर पडावी, यासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे केले. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून भिलवडीच्या डेअरीतील अत्याधुनिक यंत्रणेपासून पुण्यातील बाकरवडी आणि लाडूच्या यंत्रापर्यंत नव्या यंत्रणेची भर पडत गेली. त्यांचे आणि त्यांचे बंधू राजाभाऊ यांचे द्वैत विरळाच. या दोघांमुळेच चितळेंचा व्यवसाय बहरत गेला.

कालांतराने व्यवसाय पुढच्या पिढीकडे गेल्यानंतरही पदार्थांचा दर्जा आणि चवीकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. अखेरपर्यंत वेळेची शिस्तही कायम होती. आपली मुले, पुतणे किंवा नातवंडे व्यवसायानिमित्त बाहेरगावी, परदेशी गेली, की तिथे त्यांनी कोणते नवे तंत्रज्ञान पाहिले, शिकले आणि आपल्या व्यवसायासाठी आणले याचा हिशेब भाऊसाहेबांना द्यावाच लागे. नव्या पिढीशी ते सहज मिसळत. क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांमध्येही ते रमत. आपल्या कर्मचाऱ्यांनाही कुटुंबाचाच एक सदस्य मानण्याचा मोठेपणा त्यांच्या अंगी होता.

नुसता व्यवसाय न सांभाळता भाऊसाहेबांनी विविध सामाजिक संस्थांवर काम करून त्यांनाही मोठे केले. शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे जोशी हॉस्पिटल, महाराष्ट्र चित्पावन संघ, मिठाई-फरसाण-दुग्धपदार्थ-विक्रेता संघ, कर्वे स्त्री शिक्षण संस्था, जनता सहकारी बँक, ग्राहक पंचायत आदी संस्थांवर त्यांनी आपल्या शिस्तीची, योगदानाची मोहोर उमटवली. भाऊसाहेबांना वेगळेपण देणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांचे दातृत्त्व.. कर्णाची परंपरा सांगणाऱ्या आपल्या मातीत भाऊसाहेबांसारखा निरलस निरपेक्ष दाता होता, हे सांगूनही खरे वाटणार नाही. आपल्या व्यवसायाप्रमाणे शिक्षण संस्था, रुग्णालयेही आधुनिक कालसुसंगत व्हावीत, यासाठी त्यांनी कोट्यवधींचे दान निरपेक्ष भावनेने केले.

'मी चितळे बंधू मिठाईवाले हा उद्योग चालवतो आणि होणाऱ्या नफ्यातून कोणताही कर न चुकवता समाजातील चांगल्या संस्थांना देणगी देतो ते समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच,' अशी भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. आपली कर्तव्ये बजावून अतिशय शांतपणे कुठलाही भपकेबाजपणा न करता येणारा आणि जाणारा असा दाता पुढच्या पिढीला कदाचित पुस्तकातच वाचावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणांनी बदलली नागरिकत्त्वाची व्याख्या

$
0
0

'भारत माता की जय'वर वैद्य यांचा हल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सत्ता हातात आल्यावर संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भारत माता की जय म्हटल्यानंतरच, तुम्ही देशाचे नागरिक अशी व्याख्या बदलली गेली तर आपण कधीच भारत माता की जय म्हणणार नाही,' अशा शब्दांत सद्य परिस्थितीवर ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी बोट ठेवले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्ताने समाज प्रबोधन पुरस्कार देऊन सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी वैद्य अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, डॉ. विश्वंभर चौधरी, तमन्ना शेख, रुबिना पटेल, सायरा मुलाणी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.
'सध्या नागरिकत्वाची व्याख्या बदलणारा अजेंडा पुढे येतो आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कधी भारत माता की जय म्हणताना आढळले नाहीत. त्या काळात संघवाल्यांनी गांधी टोपी घातली नाही की कधी महात्मा गांधी की जय म्हटल्याचे आठवत नाही. त्यामुळे आता भारत माता की जय म्हणण्याचा त्यांना पुळका का आला, भारत मातेची आठवण का आली असा रोखठोक सवाल करून सर्वसामान्यांनी याचा विचार केला पाहिजे. या घटनांमुळे संविधानातील संकल्पना बदलण्याचा त्यांचा विचार आहे का अशी शंका येते,' असेही भाई वैद्य म्हणाले. 'आपल्यापुढील आव्हाने कोणती हे ओळखण्याऐवजी काही मुस्लिम नेतेच समाजाला भडकविण्याचे काम करीत आहेत,' अशी तोफही वैद्य यांनी 'एमआयएम' पक्षाचे खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्यावर डागली. 'घटनात्मक राष्ट्रवाद हा समाजात रुजविला पाहिजे. घटनेला आव्हान देण्याची आतापर्यंत हिंमत झाली नाही. म्हणून सांस्कृतिक राष्ट्रवाद हा प्रश्न कायम पुढे आला आहे. आम्ही सांगाल ती संस्कृती असे सांगत सांस्कृतिक राष्ट्रवाद सांगितला जातो. मात्र तिरंगा तुमचा झेंडा कधी होता, तुमचा भगवा झेंडा होता. तुम्ही कधी जन गण मन म्हटले सत्ता मिळाली म्हणून तुम्ही राष्ट्रगीत म्हणता,' अशा शब्दांत डॉ. चौधरी यांनीही भाजपवर टीका केली.
पुरस्काराला उत्तर देताना मुमताज शेख म्हणाल्या, 'महिलांना अडकून ठेवणाऱ्या परंपरा नको. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक वादात महिलांची पिळवणूक होते. स्त्री म्हणून जेथे नाकारले जाईल तेथे आम्ही जाणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाधुंद गोळीबारात महिलेसह तिघे जमखी

$
0
0

पुणेः नऱ्हे येथील भैरवनाथ मंदिरापाठीमागील चौकात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका महिलेसह तिघे जखमी झाले. किरकोळ भांडणादरम्यान हा गोळीबार करण्यात आला. या वेळी रस्त्याने पायी चालेल्या एका महिलेच्या डाव्या दंडात गोळी घुसली, तर दुसऱ्या व्यक्तीच्या जबड्यातून गोळी आरपार गेली.

दीपक अशोक वाल्हेकर (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, नऱ्हेगाव) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विनायक शिवाजी रानवडे (वय २८, रा. नऱ्हेगाव), हृषीकेश श्रीरंग रानवडे (वय १९) आणि सूरज दिलीप रानवडे (वय २२) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी; तसेच गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नऱ्हे येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

दीपक यांना त्यांचा चुलत भाऊ हृषीकेश राजेंद्र वाल्हेकर यांचा शनिवारी रात्री फोन आला होता. रानवडे बधूंनी अनिकेत वाल्हेकर यास नऱ्हेगाव तालमीसमोर मारहाण केल्याचे सांगितले. दीपक यांनी लगेचच त्यांच्या भावंडांना एकत्र केले आणि ते घटनास्थळी पोहोचले. दीपक यांनी अनिकेतला मारहाण केल्याचा जाब आरोपींना विचारला. बाचाबाचीदरम्यान आरोपी विनायक हा घरात पळत गेला आणि त्याने गावठी पिस्तूल आणले. विनायकने रागाच्या भरात दीपक यांच्या दिशेने एक गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला लागली.

गर्दी पाहून घाबरलेल्या विनायकने दहशत माजवण्यासाठी आणखी दोन गोळ्या हवेत झाडल्या. या गोळ्या रस्त्याने पायी चाललेल्या दोघांना लागल्या. दत्तात्रय गंगाराम कांबळे (वय ३३, रा. नऱ्हेगाव) यांच्या जबड्यात घुसलेली गोळी हनुवटीतून बाहेर पडली. दुसरी गोळी ही संगीता उत्तम वाघ (वय ३०) यांच्या डाव्या हाताच्या दंडात घुसली. दीपक यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर, कांबळे आणि वाघ यांच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

किरकोळ कारणावरून वाद शिगेला

रानवडे आणि वाल्हेकर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. शिवजयंतीमध्ये लहान मुलांमध्ये झेंडा लावण्यावरून किरकोळ वाद झाले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी दीपक हे गेले असता गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखळीचोरांचा पुन्हा उच्छाद

$
0
0

पुणेः शहरात सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून गेल्या दोन दिवसांत शहरात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामधील चार घटना रविवारी दिवसभरात घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. या घटना घडल्यानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी वाढविली होती.

गेल्या दोन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात काही प्रमाणात पुणे पोलिसांना यश आले होते. साखळीचोरीच्या घटना कमी झाल्याचा पोलिसांकडून दावा सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. शनिवारी दिवसभरात सिंहगड रोड व विमानतळ परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. तर, रविवारी दिवसभरात चार घटना घडल्या. बिबवेवाडी परिसरात रविवारी दुपारी सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणी ५७ वर्षांच्या महिलेने (रा. अप्पर इंदिरानगर ) तक्रार दिली आहे. बिबवेवाडी परिसरातील सोसायट्यांध्ये ही महिला धुणी-भांडी धुण्याचे काम करते. रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास काम संपवून त्या घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी ३५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरून नेले.

सायंकाळनंतर वाकड, भोसरी, खडकी या ठिकाणी सोनसाखळीचोरांनी महिलांना लक्ष्य केले आहे. या घटनांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने चोरीला गेले आहे. या घटनानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते.

सोनसाखळी चोरीची आणखी एक घटना शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. तक्रारदार महिला आनंदनगर येथील महालक्ष्मी सोसायटीच्या समोरून भाजी आणण्यासाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप हे अधिक तपास करीत आहेत. विमाननगर येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सागर औहे (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. औहे हे सहारा इन्क्यू सोसायटी येथे रहातात.

मोटरसायकलवर बाहेर जाऊन आल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ते सोसाटीच्या पार्किंगमध्ये मोटरसायकल लावत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पवार हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात २८ जणांची फसवणूक

$
0
0

दिल्लीतील कारवाईनंतर गुन्हे उघडकीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे सायबर सेलने दिल्ली येथील दोन कॉल सेंटरवर कारवाई केल्यानंतर पुण्यातील २८ जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील अनेकांची यापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून न घेता बोळवण केल्याचे समोर येत आहे.

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याच्या दोन, तर इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने फसवण्यात आल्याची एक, अशा तीन घटनांमध्ये बिबवेवाडी, निगडी आणि लष्कर पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने दिल्लीतील ठकांना गजाआड करत त्यांच्याकडून चालवण्यात येत असलेले दोन कॉल सेंटरवर नुकतीच कारवाई केली. नोकरीच्या बहाण्याने देशभरातील ६५०, तर महाराष्ट्रातील ६३ जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. त्यात पुण्यातील आठ जणांचा समावेश आहे.

'बजाज अलाएन्झ' व 'बजाज फायनान्स'मधून बोलत असल्याचे भासवून नागरिकांना पर्सनल लोन देण्याच्या बहाण्याने या टोळीने अनेकांना फसवले आहे. या टोळीने पुण्यातील वीस जणांना फसवल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले होते. यातील बहुतेक जणांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले नव्हते. यातील काही जण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाआठी गेले होते. पण, त्यांची त्या वेळी बोळवण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कर्जाच्या बहाण्याने फसवणूक

बिबवेवाडी येथील सागर बनसोडे यांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ६९ हजार ४०० रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनसोडे यांना ९ डिसेंबरपासून खासगी फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

सहा लाखांना फसवले

निगडी येतील चंद्रकांत पाटील (वय ३२) यांनाही कर्ज मिळवण्याच्या बहाण्याने सहा लाख १४ हजार रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक तीन डिसेंबर ते २ मार्च दरम्यान घडली आहे.

पॉलिसीच्या बहाण्याने फसवणूक

कॅम्प परिसरातील संजय सोनवणे (वय ५४) यांना दीड लाख रुपयांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. सोनवणे यांना इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने फोन करण्यात आला होता. पॉलिसी कोडसाठी त्यांच्याकडून २४ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर सोनवणे यांना नोएडा येथे घराच्या स्किममध्ये नंबर लागला असल्याचे भासवण्यात आले. घर किंवा ४० लाख रुपये हवे असतील तर एक लाख ४९ हजार सांगण्यास बँक अकाउंटवर भरण्यास सांगून फसवणूक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मार्गांवर ‘‌पीएमपी एक्स्प्रेस’

$
0
0

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन; ताफ्यात ३६५ बस समाविष्ट करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आमदार व नगरसेवकांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्रत्येक एक बस घेऊन द्यावी,' असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केले. तसेच, पीएमपीच्या ताफ्यात ३६५ नवीन बस समाविष्ट करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शिवाजीनगर ते कात्रज आणि मनपा ते निगडी या मार्गावर एक्स्प्रेस मर्यादित थांबा (एक्सप्रेस) सेवेला बापट यांच्या हस्ते रविवारी स्वारगेट बसस्थानक येथे सुरुवात झाली. त्यावेळी बापट बोलत होते. कार्यक्रमास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, नगरसेवक अशोक येनपुरे, पीएमपीचे अधिकारी, कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बस बापट यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी पीएमपी सक्षम करणार आहोत. मात्र, पीएमपीने उत्पन्न वाढीसाठी विविध पर्यायांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन बापट यांनी केले.

खासगी वित्तीय संस्थांकडून दीर्घ मुदतीचे कर्ज घेऊन पीएमपीसाठी बस खरेदी करणे, डेपो बांधणे आदी उपाययोजना करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. मात्र, वित्तीय कर्ज उभारणी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जास हमी द्यावी, अशी मागणी अभिषेक कृष्णा यांनी केली.

या दोन्ही मार्गांवर गर्दीच्या वेळेला एकूण बसस्टॉपपैकी केवळ अतिमहत्त्वाच्या स्टॉपवर या बस उभ्या केल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठी कोणताही अन्य जादा दर घेतला जाणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे स्टेशन-सिंहगड पायथा बस

पर्यटकांच्या सोयीसाठी पुणे स्टेशन ते सिंहगड पायथा या मार्गावर नवीन बस सुरू करण्यात आली आहे. पुणे स्टेशन येथून पहाटे पाच व सकाळी नऊ वाजता सिंहगडसाठी बस सुटेल. तर, सिंहगड येथून सकाळी पावणेसात व १०.५० वाजता पुण्याला येण्यासाठी बस आहे. स्टेशनवरून सुटणारी बस आरटीओ, मनपा, डेक्कन, टिळक रोड, स्वारगेट व पुढे सिंहगड रोड मार्गे जाणार आहे. तसेच, यापूर्वीपासून सिंहगड पायथ्यासाठी शनिवारवाडा येथून बस सेवा दिली जात आहे.

पंधरा मिनिटे वाचणार

कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर १४ बसस्टॉप आहेत. नवीन योजनेनुसार संचलनाची वेळ १५ मिनिटांनी कमी होईल, अशी शक्यता पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याबरोबरच मनपा-निगडी हा मार्ग सुमारे २० किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावर सहा ते सात बसस्टॉप ठेवण्यात येणार आहेत.

या ठिकाणी बसचा थांबाः

कात्रज-शिवाजीनगर : कात्रज ते स्वारगेट दरम्यान सर्व बीआरटी स्टॉप, शनिपार (येताना महात्मा फुले मंडई), आप्पा बळवंत चौक (येताना वसंत टॉकीज) मनपा (मंगला टॉकिज), शिवाजीनगर.

मनपा-निगडी : मनपा, वाकडेवाडी, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी रोड, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी.

प्रायोगिक तत्त्वावर या दोन मार्गांवर ही जलद सेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात १० मार्गांवर ही सेवा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रयत्नशील आहे.

- अभिषेक कृष्णा (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’मुळे काँग्रेसचे भले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा, महिला आणि बालकल्याण, विधी; तसेच क्रीडा समितीच्या सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदांची निवड पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता असून, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने त्याची परतफेड म्हणून चारपैकी तीन समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.

प्रत्येक समितीमध्ये तेरा सदस्य असून, राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे तीन, भाजप, मनसेचे प्रत्येकी दोन, तर शिवसेनेचा एक सभासद आहे. महापालिकेत राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस मित्रपक्ष आहे. पालिकेत सत्ता स्थापन करताना स्थायी समितीचे अध्यक्षपद एक वर्ष काँग्रेसकडे देण्याची चर्चा करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या वर्षीही राष्ट्रवादीने उमेदवार उभा केल्याने काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत मित्रधर्म पाळला. स्थायी समितीच्या मोबदल्यात चारपैकी तीन समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेसला देण्याची दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या विविध विषय समित्या आणि त्यांच्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे : शहर सुधारणा समिती : चंचला कोद्रे, रेश्मा भोसले, शिवलाल भोसले, रोहिणी चिमटे, सुधीर जानज्योत, जीलेहुमा खान, सुनंदा गडाळे, मनीषा घाटे, नीलिमा खाडे, पुष्पा कनोजिया, रवींद्र धंगेकर, सचिन भगत. क्रीडा समिती : अविनाश बागवे, किशोर वीटकर, सुषमा निम्हण, विनायक हनमघर, दिनेश धाडवे, सुवर्णा पायगुडे, शीतल सावंत, संजय बालगुडे, विष्णू हरिहर, स्मिता वस्ते आणि अनिता डाखवे. विधी समिती : अनिल टिंगरे, हिना मोमीन, प्रदीप गायकवाड, विजया कापरे, मोहिनी देवकर, कैलास गायकवाड, दत्तात्रय बहिरट, कमल व्यवहारे, वनिता वागसकर, किशोर शिंदे, योगेश मोकाटे, मनीषा चोरबेले, मानसी देशपांडे. महिला व बालकल्याण समिती : उषा कळमकर, सुरेखा कवडे, संगीता कुदळे, रंजना मुरकुटे, लक्ष्मी दुधाणे, शशिकला गायकवाड, विजया वाडकर, लक्ष्मी घोडके, आशा साने, भाग्यश्री दांगट, माधुरी सहस्रबुध्दे, मंजुषा नागपुरे, कल्पना थोरवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवसांच्या बॅनरवर पालिका कारवाई करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार शहरात वाढदिवस, अभिनंदन आणि इतर प्रकारचे फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर लावण्यास पूर्णतः बंदी असून, राजकीय कार्यकर्ते/पदाधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना द्याव्या, असे पत्रच महापालिकेने राजकीय पक्षांना पाठविले आहे. पोस्टर, बॅनरवर पालिकेतर्फे तातडीने कारवाई केली जाणार असून, त्याचा तपशील हायकोर्टाला सादर केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या पोस्टर-बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, त्याला आळा घालण्याची जबाबदारी हायकोर्टाने संबंधित पालिकांवर निश्चित केली आहे. कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून फ्लेक्स-बॅनर लावल्याप्रकरणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रमुख पक्षांच्या नेत्यांना दंड ठोठावण्यात आला होता. वारंवार आदेश देऊनही फ्लेक्स, बॅनरवर कारवाई केली जात नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिकेने शहरातील सर्वच राजकीय पक्षांना 'फलक'बाजी पासून सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीच सर्व राजकीय पक्षांना फ्लेक्स-बॅनर न लावण्याबाबत स्पष्ट इशारा दिला असून, सविस्तर पत्रच पाठवून हायकोर्टाचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या परिणामांना जबाबदार राहण्याचे सूचित केले गेले आहे.

बॅनर-फ्लेक्स काढताना, संबंधितांना कोणतीही नोटीस दिली जाणार नसून, त्याचा सविस्तर अहवाल हायकोर्टाला सादर केला जाणार आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी होणाऱ्या कारवाईची सर्वस्वी जबाबदारी संबंधित फ्लेक्स-बॅनर लावणाऱ्यांवर राहील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टरबाबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना थेट तक्रारी करता याव्या, यासाठी महापालिकेने स्वतंत्र वेबसाइट कार्यान्वित केली आहे. कोर्टाने वेबसाइटवरील तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे, नागरिकांकडून फोटोसह दाखल होणाऱ्या सर्व तक्रारी कोर्टात सादर केल्या जाणार असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन’बाबत साशंकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतात सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट-अप इंडिया'सारख्या उपक्रमांना गती मिळेल की नाही, याविषयी दिल्लीतील उच्चपदस्थ साशंक असल्याचा अनुभव विविध बैठकांमधून घेतल्याची माहिती अमेरिकेतील 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी'च्या (एमआयटी) 'सेंटर फॉर बिट्स अँड अॅटम'चे संचालक आणि 'फॅब-लॅब' चळवळीचे प्रमुख प्रचारक डॉ. नील ग्रेशनफेल्ड यांनी रविवारी पाबळ येथे दिली. भारतातील या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणाऱ्या 'यू कॅन मेक इन इंडिया'सारख्या उपक्रमांचा विचार होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाबळमधील विज्ञानाश्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या डिझाइन इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन डॉ. ग्रेशनफेल्ड यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने डॉ. ग्रेशनफेल्ड यांनी विज्ञानाश्रमामधील 'फॅब-लॅब'सह इतर उपक्रमांचीही पाहणी केली. त्यानंतर आयोजित औपचारिक उद्घाटनपर कार्यक्रमात त्यांनी भारतातील फॅब-लॅबसमोरील भविष्यातील आव्हाने विषद केली. फॅब-लॅबसारख्या संस्थांना अशा मोहिमांमध्ये मोठे काम करण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. डी. डी. ढवळे, विज्ञानाश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.

डॉ. ग्रेशनफेल्ड म्हणाले, 'भारतात सुरू असलेली मेक इन इंडिया मोहीम केवळ कंपन्यांचा विचार करूनच सुरू असल्याचे अनुभवायला मिळत आहे. त्यातून फक्त नोकऱ्यांचाच विचार होताना दिसतो. त्याऐवजी आपणही भारतामध्ये काही तरी तयार करू शकतो, उत्पादित करू शकतो, असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण व्हायला हवा. त्यासाठी विज्ञानाश्रमासारख्या संस्थांमध्ये सुरू झालेले फॅब-लॅबसारखे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत.' विज्ञानाश्रमात सुरू असलेल्या उपक्रमांचा विचार करता, आम्ही येथे सुरू असलेल्या 'फॅब-लॅब'ला 'फॅब-लॅब-झिरो' म्हणूनच मान दिला आहे. जगभरात फॅब-लॅबची उभारणी करणे हेच फॅब-लॅब चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.

विज्ञानाश्रमामध्ये उभारण्यात आलेल्या डिझाइन इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी या वेळी सांगितले. या केंद्राद्वारे विविध सामाजिक प्रश्न आणि समस्यांवर प्रकल्पाधारित थेट उत्तरे शोधण्यासाठीची संधी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

'शिक्षणव्यवस्था आताही ब्रिटिश अमलाखालीच'

भारतीय शिक्षणव्यवस्था अद्यापही ब्रिटिशांच्या अंमलाबाहेर आली नसल्याचे मत अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआयटी) सेंटर फॉर बिट्स अँड अॅटमचे संचालक आणि फॅब-लॅब चळवळीचे प्रमुख प्रचारक डॉ. नील ग्रेशनफेल्ड यांनी रविवारी पाबळ येथे व्यक्त केले. अनौपचारिक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात उदासीन असणाऱ्या शिक्षकांमुळे भारतीय विद्यार्थी मागे पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पाबळ येथे आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. ग्रेशनफेल्ड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी 'मटा' प्रतिनिधीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. ग्रेशनफेल्ड यांनी भारतीय आणि अमेरिकन नागरिकांची मानसिकता, फॅब-लॅबची चळवळ आणि त्याचा जगभरात होत असलेला प्रसार आदी बाबींविषयी आपली मते मांडली. डॉ. ग्रेशनफेल्ड म्हणाले, 'भारतीय शैक्षणिक संस्थांवर अद्यापही ब्रिटिश अंमल कायम आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांमधील तितकासा मोकळेपणाने संवाद होत नाही. भारतीय विद्यापीठांमध्ये अजूनही पदतालिकेला (हायरार्की) महत्त्व दिले जाते. अमेरिकन विद्यापीठे तुलनेने खूप लवकर त्या अंमलामधून बाहेर पडल्याने, तेथे विद्यार्थ्यांना प्रश्न उपस्थित करण्याचे स्वातंत्र्य खूपच लवकर मिळाले. त्यातून अनौपचारिक वातावरणातील शिक्षण आणि संशोधन तेथे रुजले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आयोगाची सुनावणी विभागीय

$
0
0

महिला आयोगाची सुनावणी विभागीय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महिला आयोगाकडे येण्यात महिलांना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासाठी आता महिला आयोगच राज्यात विभागीय स्तरावर येत्या जूनपासून सुनावणी घेणार आहे. गरज पडल्यास जिल्हा पातळीवरदेखील सुनावण्या घेण्यात येतील,' अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकारांना माहिती दिली.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित महिलांविषयक राष्ट्रीय परिषदेचे उद् घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, प्रथम संस्थेच्या सहसंस्थापक फरिदा लांबे, विद्यापीठाचे प्रा. प्रकाश यादव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, 'राज्यात सहा वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे पाच हजार प्रकरणे प्रलंबित होती,' असा संदर्भ दिला गेला. त्या संदर्भात विचारले असता, '१९९३ पासून महिला आयोगाकडे प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याची छाननी केली असता त्यामध्ये केवळ दीड हजार प्रकरणांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यापैकी १०० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तर उर्वरीत साडेतीन हजार प्रकरणे मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारींची आहेत. त्याची प्रत आमच्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दीड हजार प्रकरणांचाच निपटारा करण्याची गरज आहे. यासाठी महिलांनी आयोगाकडे आले पाहिजे; परंतु राज्यात जूनपासून विभागीय पातळीवर महिला आयोगाच्या सुनावण्या घेण्यात येतील. गरज पडल्यास जिल्हा स्तरावरही सुनावण्या घेण्यात येतील,' अशी माहितीही रहाटकर यांनी दिली.
'सध्या प्रलंबित प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणे 'लिव्ह इन रिलेशनशिप'ची आहेत. त्या पाठोपाठ कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार यासारख्या तक्रारी आहेत. 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या तक्रारी अधिक असल्याने त्या कशा सोडवायच्या, महिला, तरुणींना कसे सांभाळायचे, त्यांना मानसिक आधार देण्याचे मोठे आव्हान आयोगापुढे आहे. त्यासाठी आम्ही येत्या जूनपासून २४ तासांसाठी एक हेल्पलाइन सुरू करणार आहोत. त्याद्वारे महिलांसह तरुणींचे समुपदेशन केले जाणार आहे,' असेही रहाटकर यांनी स्पष्ट केले.
..............
महिला आयोग आता परिवार आयोग
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कुटुंबसंस्था चांगली आहे. स्त्री पुरुष बरोबरीने काम करीत असले, तरी त्यांना समानता मिळाली नाही. महिलांच्या तक्रारी सोडविताना मानसिक आधार देण्यासाठी महिला आयोग आता परिवार आयोग म्हणून काम करेल. न्यायालयीन अधिकार असले, तर आम्ही महाराष्ट्रातील अनेक तुटलेली कुटुंब जोडण्याचे काम करणार आहोत. आयोगाकडे महिला येण्यास घाबरतात. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी महिलांचे मेळावे आयोजित करून त्यात त्यांच्या तक्रारी ऐकण्यात येतील, अशीही माहिती विजया रहाटकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणला १०१९ कोटींचे अनुदान

$
0
0

महावितरणला १०१९ कोटींचे अनुदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने या भागात कृषीपंप वीज जोडणीला पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून महावितरण कंपनीस १०१९ कोटी १८ लाख रुपयांचा निधी अनुदान स्वरुपात दिला जाणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कृषीपंपांच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेवर अतिभार आल्याने योग्य दाबाने पुरवठा होत नाही; तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. अतिभारामुळे अस्तित्वात असलेले रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. कृषीपंपांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. त्यामुळे कृषीपंपांना लागणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आणि अस्तित्वात असणाऱ्या विद्युत प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारने खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील २१ जिल्ह्यांतील १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. दोन टप्प्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीपैकी सर्वाधिक ५५१ कोटी रुपयांचा निधी मराठवाडा विभागाला मिळणार आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने कृषी पंप वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची कामे केल्यास शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात होऊ शकणार आहे. ही बाब विचारात घेऊन २१ जिल्ह्यांमध्ये कृषी विषयक विजेच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे काढण्यासाठी रेल्वेचे आता विशेष पथक

$
0
0

अतिक्रमणे काढण्यासाठी रेल्वेचे आता विशेष पथक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या हद्दीतील म्हणजेच मोकळ्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी, तसेच ते पुन्हा होऊ न देण्यासाठी आता रेल्वे विभागाने एक विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पथकातील कर्मचाऱ्यांवर रेल्वे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची, तसेच जागेवर अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी असेल. या पथकात रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वेच्या अभियांत्रिकी शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती विभागाचे सुरक्षा आयुक्त डी. विकास यांनी गुरुवारी 'मटा'ला दिली.
पुणे विभागात रेल्वेची मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. मात्र, या जागेची देखभाल करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांद्वारे अतिक्रमण केले जाते. कालांतराने हे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे विभागाला मोठी कसरत करावी लागते. काही वेळा अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचा विरोध असतो. त्यामुळेच प्रामुख्याने मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊ न देण्यासाठी हे पथक काम करणार असल्याचे डी. विकास यांनी सांगितले.
रेल्वे विभागाच्या ताडीवाला रोड, शिवाजीनगर रेल्वेस्थानक, खडकी, दापोडी, घोरपडी आणि इतर ठिकाणच्या मोकळ्या जागेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या पथकाचा उपयोग होईल. या पथकाकडून पुण्याव्यतिरीक्त सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर आदी ठिकाणी अतिक्रमण झाल्यास ते काढण्याची किंवा अतिक्रमण न होऊ देण्याची जबाबदारी असेल. रेल्वेने नुकतीच ताडीवाला रस्त्यावर रेल्वे कॉलनीत अनधिकृतपणे रेल्वेच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या ७७ जणांवर कारवाई केली आहे.
................
प्रसंगी महापालिकेची मदत
रेल्वे विभागाच्या या विशेष पथकात आरपीएफचे एक निरीक्षक आणि सहा कर्मचारी असतील; तसेच अभियांत्रिकी विभागातील काही कर्मचारी असतील. नागरिकांनी पुणे महापालिकेच्या आणि रेल्वेच्या अशा दोन्ही जागेवर एकत्रितपणे अतिक्रमण केले असल्यास ते काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मदत घेण्यात येईल. त्याबाबत विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे डी. विकास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायरॉइड विकाराबाबत प्रमाणपत्र अभ्यासक्रम

$
0
0

थायरॉइड विकाराबाबत प्रमाणपत्र अभ्यासक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशात थायरॉइडच्या विकाराच्या पेशंटची संख्या वाढत असल्याने चेलाराम डायबिटिस इन्स्टिट्यूटतर्फे थायरॉइड आजार व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे.
पुण्यातील शाखेत ४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, हा अभ्यासक्रम पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) यांच्याशी संलग्न आहे. तो चार महिन्यांचा असेल. प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये थायरॉइड आजाराबाबत सल्ला व व्यवस्थापन क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात चेलाराम डायबिटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन, एम्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंडोक्रोनोलॉजिस्ट डॉ.आर. के. मारवाह, इंडोक्रोनोलॉजिस्ट डॉ. अंजली भट, पीएचएफआयचे डॉ. तनू सोनी आदी उपस्थित होते. याप्रसंगी एका अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
'थायरॉइड आजाराच्या व्यवस्थापनेत डॉक्टर आणि प्राथमिक सेवा देणाऱ्याचे सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमामुळे आजाराचे योग्य निदान होणे, तसेच सामन्यतः आढळून येणाऱ्या थायरॉइडचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. या सर्वांमुळे थायरॉइड आजाराने ग्रस्त पेशंटना अधिक चांगले आरोग्य मिळण्यास मदत होईल,' असा विश्वास इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन यांनी सांगितले.
'भारतात थायरॉइड आजारामुळे चार कोटी २० लाख नागरिक त्रस्त आहेत. हायपोथायरॉडिझम हा थायरॉइडमध्ये सर्वांत जास्त आढळणारा विकार असून, याचे निदान योग्य वेळी झाले नाही, तर विशेषत: मुलांमध्ये आरोग्याविषयी इतर समस्या उद्भवू शकतात,' असे पीएचएफआयचे उपाध्यक्ष प्रा. डी. प्रभाकरन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरवर फ्लेक्सबाबत गुन्हा

$
0
0

येरवडा पोलिसांची कारवाई; पालिका अधिकारी सुस्तच
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरवर महापालिकेकडून कारवाई होणे अपेक्षित असताना, महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. मात्र, आता पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी येरवडा परिसरातील पथ दिव्यांवर अनधिकृत फ्लेक्स उभारणाऱ्या बिल्डरवर येरवडा पोलिसांनी विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
शिरीष निहाल चंद लोढा (३८, रा. अरिहंत सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार दत्तात्रय भूकन यांनी फिर्याद दिली आहे. धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये '२९ गोल्ड कोस्ट' नावाने नवीन बांधकाम प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी बिल्डरने येरवडा भागातील अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले आहे. यासाठी बिल्डरने महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे पालिकेची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शहराचे विद्रुपीकरण केल्याने पोलिसांनी बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे.
'२९ गोल्ड कोस्ट' बांधकाम प्रकल्पाच्या जाहिराती विनापरवाना पथ दिव्यांच्या खांबांवर लावण्यात आल्या आहेत. याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून डोळेझाक होत असल्याचा आरोपी स्थानिक नागरिकांनी केला होता. याबाबत १४ मार्चच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतरही पालिकेने कारवाई न केल्याने पोलिसांनी आपणहून कारवाई करण्यास पुढाकार घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा परवान्याचा निर्णय सरकारकडे

$
0
0

रिक्षा परवान्याचा निर्णय सरकारकडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिका क्षेत्राच्या हद्दीबाहेर वास्तव्य असल्याने रिक्षा परवाने नाकारलेल्या १८४ रिक्षाचालकांच्या परवान्याचा निर्णय आता राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) लॉटरी पद्धतीने परवान्यांचे वाटप करताना नियमानुसार महापालिका हद्दीबाहेर वास्तव्य असलेल्या रिक्षाचालकांना परवाने देण्याचे नाकारले आहे. या निर्णयाविरोधात शिवेनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने अशोक साळेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या परिवहन विभागाने पुणे-पिंपरी महापालिका क्षेत्रासाठी एकूण तीन हजार २०८ रिक्षा परवाने जाहीर केले. या परवान्यांची सोडत लॉटरी पद्धतीने झाल्याने सोडतीत महापालिका क्षेत्राबाहेरील म्हणजेच भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील रिक्षाचालकांनी अर्ज करून परवान्यासाठी क्रमांक मिळवला. संबंधित चालकांनी परवान्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून ११ हजार रुपयांचा धनादेश आरटीओमध्ये जमा करून मराठीची चाचणीदेखील दिली. मात्र, कागदपत्रांच्या तपासणीमध्ये आतापर्यंत सुमारे १८४ रिक्षाचालकांचे वास्तव्य महापालिका हद्दीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीओने या रिक्षाचालकांना परवाना नाकारला आहे.
लॉटरीत जे उमेदवार पात्र ठरले आहेत. त्या सर्वांच्या मुलाखती, परीक्षा आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, कागदपत्र तपासणीत महापालिका हद्दीबाहेरच्या उमेदवाराला परवाना नकारण्यात आला आहे. रिक्षाचालकांनी केलेली मागणी सरकारला कळवली असून राज्य सरकारचा परिवहन विभाग अंतिम निर्णय घेईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
.................
गाळणीचा विकल्प हवा होता
रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्या वेळी प्रशासनाने हद्दीबाहेरील उमेदवारांचे अर्ज बाद करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने तसे न करता शेवटच्या टप्यात परवाने नाकारले. प्रशासनाच्या चुकीच्या परवाना वाटपाच्या पद्धतीमुळे रिक्षाचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ऑनलाइन अर्ज भरताना प्रणालीमध्ये गाळणीचा विकल्प दिला असता, तर चुकीच्या पद्धतीने भरलेले अर्ज बाद होऊन त्या जागी गरजू उमेदवार लॉटरीमध्ये पात्र ठरले असते, असा आरोप विविध वाहतूक संघटनांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, शिरूर
राज्याचा २०१५-१६च्या अर्थसंकल्पात शिरूर हवेली मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली आहे.
तालुक्यातील भीमानदीवर मांडवगण फराटा ते कानगाव येथील पुलासाठी १८ कोटी एक लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भीमाशंकर-पाबळ-शिरूर रस्ता सुधारण्यासाठी ६० लाख, वेल्हा ते पाबळ, उरूळीकांचन रस्त्यासाठी ५० लाख, न्हावरे इनामगाव रस्त्यासाठी ५० लाख, लोहगाव ते वाघोली ते राहू रस्त्यासाठी एक कोटी, रांजणगाव ते करडे, चव्हाणवाडी रस्त्यासाठी ५० लाख, मांडवगण, फराटा ते गणेगाव रस्त्यासाठी ४० लाख, उरळगाव, अरणगाव, होलगुंडे वस्ती रस्त्यासाठी ३० लाख, न्हावरा ते चिंचणी रस्त्यासाठी ३० लाख, कुंजीरवाडी ते आळंदी म्हातोबा रस्त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी विशेष मदत केल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम महाराष्ट्र प्रांतात संघशाखांची दुपटीने वाढ

$
0
0

पश्चिम महाराष्ट्र प्रांतात संघशाखांची दुपटीने वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील शाखांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षात शाखा, साप्ताहिक शाखा व संघ मंडळी शाखांची एकूण संख्या ७०५ होती. या वर्षात ती १२६४ वर पोहोचली आहे. शाखांची संख्या वाढण्याबरोबरच स्वयंसेवकांमध्ये तरुणांची संख्याही वाढत असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नाना जाधव यांनी सोमवारी दिली.
राजस्थानातील नागौर येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रांत कार्यवाह विनायक थोरात, मनोहर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रांतात गेल्या वर्षी ५२५ शाखा कार्यान्वित होत्या, तर १५० साप्ताहिक मिलन व ३० संघ मंडळी कार्यरत होते. या वर्षी आतापर्यंत ६३८ शाखा अस्तित्वात असून, ५४४ साप्ताहिक मिलन शाखा आणि ८२ संघ मंडळी शाखा आहेत. त्यामध्ये पुणे महानगरातील २३० शाखा व १३३ साप्ताहिक मिलन शाखांचा समावेश आहे. संघ विचारांच्या प्रसारासाठी गेल्या तीन वर्षांपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत संघाच्या शाखा व स्वयंसेवक वाढविण्यावर भर दिला जात होता. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार झाल्याचे पाहायला मिळते, असे जाधव यांनी सांगितले.
प्रभावी वैद्यकीय संरक्षण आणि स्वस्त व सुलभ वैद्यकीय सेवा मिळावी, सर्वांना दर्जेदार आणि स्वस्त शिक्षण मिळावे, दैनंदिन जीवनात समरसतेचे आचरण करावे, असे ठराव संघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्र्यांकडून अधिकाराचा गैरवापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, भोर
'पाणीवाटपाबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाला फाटा देऊन नीरा देवघर आणि भाटघर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश देऊन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत,' असा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे.
पूर्व भागासाठी नीरा देवघरमधून ७५० क्युसेक तर भाटघरमधून ७०० क्युसेक वेगाने रविवारी पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे. धरण भागातील शेतकऱ्यांनी पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. सध्या नीरा देवघरमध्ये ३७ टक्के तर भाटघरमध्ये १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आमदार थोपटे म्हणाले,' पुरंदर तालुक्याला पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही. येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुरंदरमधील जमीन देण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी पुनर्वसन प्रश्नावर चर्चाही केली नाही. प्रकल्पग्रस्तांना पुरंदर मधील एक गुंठाही जमीन दिली नाही. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, इतकीच अपेक्षा आहे.'
'कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मी प्रत्येक वेळेस धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याखेरीज पाणी सोडणार नाही, असे सांगतो आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून बैठकीतल्या निर्णयाला बगल देण्यात आली आहे. अधिकाराचा गैरवापर करून पाणी सोडण्यात आले. वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल,' असा इशाराही थोपटे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-दौंड लोकल लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुणे-दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, पुणे-दौंड लोकल सुरू होण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी 'महापारेषण'कडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे-दौंड लोकलचे काम वेगाने पूर्ण होऊन, ती लवकर सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे,' अशी माहिती महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी 'महापारेषण'च्या अधिकाऱ्यांकडून पुणे-दौंड लोकलच्या विद्युतीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांना वरील माहिती देण्यात आली. विद्युतीकरणाची सर्व कामे प्रगतीपथावर असून महापारेषणने त्यांच्या अखत्यारीतील सर्व तांत्रिक कामे पूर्ण केली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
'दौंड उपकेंद्रातील सहा टॉवर असलेल्या उच्च दाब वाहिनीचे काम ३१ डिसेंबर २०१५ रोजी पूर्ण झाले आहे. तसेच, १३२ केव्ही अतिउच्चदाब वाहिनी आणि यवत व दौंड येथील उपकेंद्राचे काम आता पूर्ण झाले आहे. यवतमधील अतिउच्चदाब वाहिनी व यवत उपकेंद्राचे काम येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. तसेच, पुणे-दौंड लोकल सुरू होण्यासाठी वीज पुरवठ्याबाबतच्या तांत्रिक कामांची पूर्तता केली आहे,' असे 'महापारेषण'चे अधीक्षक अभियंता अनिल कोलप यांनी बैठकीत सांगितले.
पुढील महिन्यात रेल्वे विभागामार्फत पुणे ते दौंड रेल्वे मार्गाची तपासणी, रेल्वेमार्गाचे अंतर्गत परीक्षण, लोकलच्या ट्रायल्स इत्यादी कामे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहेत. संरक्षण खात्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सुळे रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांची येत्या २८ मार्चला बैठक घेणार आहेत. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभॉय हे देखील या वेळी उपस्थित राहणार असल्याचे सुळे यांनी कळविले आहे. 'महावितरण'चे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, कार्यकारी अभियंता चारुलता बेंद्रे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता केदार रेळेकर, प्रवीण शिंदे, अप्पासाहेब पवार आदी बैठकीस उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images