Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वृक्षतोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
चासकमान धरणाच्या कडेकडेने जाणारा सर्व्हिस रस्ता आणि जलाशयाच्या दरम्यान उतारावर असलेली असंख्य मोठी झाडे काही जणांनी गेल्या आठवड्यात विनापरवाना तोडून टाकली. झाडे तोडल्यामुळे या रस्त्यावरील सलग नैसर्गिक आच्छादनच गायब झाले आहे.

धरणाच्या भिंतीलगतच राजरोसपणे झाडे तोडून टाकण्याचा गंभीर प्रकार सुरू असताना देखील चासकमान प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे पसंत केले. कुणाच्या सांगण्यावरून झाडे तोडण्यात आली, याबाबत प्रकल्प अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरित चास कमान धरणाची सुरक्षा व्यवस्थाच चव्हाट्यावर आली आहे. सुमारे एक किमी लांबीच्या अंतरातील धरणाच्या बाजूची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उतारावरील माती आणि दगडी पिचिंग कमकुवत होऊन रस्ता खचण्याची भीती व्यक्त होत आहे.

चासकमान धरणाअंतर्गत भागात असलेल्या कहू-कोयाळी, साकुर्डी, तांबेवाडीकडे जाण्यासाठी धरणाच्या डाव्या बाजूने जलाशयाला खेटून एक रस्ता आहे. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर असून दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाचा जलाशय आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षराजी आहे. या झाडांचे या रस्त्यावर नैसर्गिक आच्छादन तयार झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही या रस्त्याने प्रवास करणे आल्हाददायक असते. या वृक्षांचा वाहनचालकांना मोठा आधार होता. परंतु, गेल्या आठवड्यात काही स्थानिकांनी या रस्त्याकडेला असलेले डेरेदार वृक्ष तोडून टाकल्याने हा रस्ता भकास झाला आहे.

गस्त असूनही वृक्षतोड

धरणाच्या भिंतीवर चोवीस तास पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असतो. परंतु, या कर्मचाऱ्यांनी झाडे तोडणाऱ्यांना अटकाव केला नाही. ही झाडे कुणी तोडली हे माहिती असूनही संबधितांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, 'वरिष्ठांना या घटनेची कल्पना देण्यात आली होती. परंतु, वरिष्ठ अधिकारी दोन दिवसांनी घटनास्थळी आले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली होती,' असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

'फक्त फांद्या तोडल्या आहेत'

रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या झाडांच्या फांद्याचा त्रास होत होता. त्यामुळे कहू येथील ग्रामस्थांनी झाडांच्या केवळ फांद्या तोडल्या आहेत. सध्या झाडे तोडण्याचे काम बंद करण्यात आले आहे, असा दावा चासकमान धरण शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोलिंग तुटल्याने प्रवाशांना धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
विश्रांतवाडी बीआरटी मार्गावरील साठे बिस्कीट कंपनी बस थांब्यावरील रोलर तुटून लोखंडाच्या पट्ट्या बाहेर निघाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून बसमध्ये चढावे लागत आहे.

बीआरटी मार्गातील साठे बिस्कीट थांब्यावरून निघालेल्या बसमध्ये चढत असताना तोल जाऊन पडल्याने शुक्रवारी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे बीआरटी बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. साठे बिस्कीट थांब्यावर पुणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रवासी चढणाऱ्या ठिकाणी रोलर तुटल्याचे दिसून आले.

बीआरटीच्या प्रत्येक थांब्यावर स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. स्थानकात बस आल्यानंतर बसवर लावलेल्या सेन्सरच्या मदतीने स्वयंचलित दरवाजे उघडले जातात. बस स्थानकात येताना स्थानकाला घासू नये यासाठी स्वयंचलित दरवाजासमोर मोकळ्या भागाच्या पुढील बाजूस रोलर बसविलेले आहे. मात्र, अनेकदा थांब्यावर येणारी बस भरधाव वेगात असल्याने रोलिंग तुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

साठे बिस्कीट स्थानकातील रोलिंग तुटल्याने बस आणि थांबा यांच्यात अंतर पडले आहे. रोलिंग तुटल्याने थांब्याच्या धारधार लोखंडी पट्ट्या बाहेर निघाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून बस मध्ये चढावे लागत आहे. मागील आठवड्यात स्थानकातून निघालेली बस पकडत असताना पडलेल्या प्रवाशाला या लोखंडी पट्ट्या पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बीआरटी थांब्यावरील रोलिंगची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जांभूळकरनगरमधील पाच दुकाने ‘सील’

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
पुणे-सोलापूर रोड जांभूळकरनगर येथील भैरवनाथ मिनी मार्केटच्या दुकानांनी दहा वर्षांपासून एकूण आठ लाख रुपये भाडे थकवल्याने महापालिकेने पाच दुकाने सील केली आहेत. महापलिकेच्या भूमीजिंदगी विभागाच्या वसुली पथकाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली.

महापालिकेने भाडे तत्त्वावर छोटी दुकाने व्यवसाय करण्यासाठी दिली आहेत. पुणे-सोलापूर रोड जांभूळकरनगर येथे भैरवनाथ मिनी मार्केट आहे. यामध्ये एकून ३७ छोटी दुकाने आहेत. त्यांची एकून आठ लाख रुपये थकबाकी आहे. प्रत्येक दुकानांना महिना ५०० रुपये भाडे आहे. मात्र, दुकानदारांनी मागील दहा वर्षांपासून भाडेच भरलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाचे भाडे तीस हजार रुपयांच्या घरात पोहचले आहे. महापालिकेच्या पथकाने बुधवारी दुपारी १८ थकबाकीदारांवर कारवाई केली. यामध्ये पाच दुकाने सील करण्यात आली. पाच दुकानदारांनी काही रकमेचा धनादेश महापालिका आयुक्तांच्या नावे जागेवर दिला. थकबाकीदारांना पैसे भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत, असे भूमीजिंदगी विभागाचे उपअभियंता नलावडे यांनी सांगितले. हडपसर गाव येथील राजलक्ष्मी भोसले मिनी मार्केट, तसेच गाडीतळ बंटर शाळेच्या बाजूच्या दुकानदारांवर कारवाई केली जाईल. संपूर्ण शहरात अशी कारवाई सुरू आहे, असे नलावडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
गाडीतळ चौकातील हडपसर पोलिस ठाण्यासमोर पोलिस ठाण्यात आलेली वाहने आणि पोलिसांनी ओढून आणलेली वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी हा हडपसरचा गंभीर प्रश्न आहे. मात्र, पोलिसांच्या वाहनामुळेच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हडपसर पोलिस ठाणे हे उपनगरातील सर्वांत मोठे पोलिस ठाणे आहे. गाडीतळ चौकात कमी जागेत पोलिस ठाणे असल्याने ठाण्यात तक्रार देणाऱ्यांची, तसेच पोलिसांनी कारवाई करून आणलेली वाहने रस्त्यावरच पार्क केली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या भागात दोन्ही बाजूला दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क केली जातात. सोलापूर रोड उड्डाणपूलाच्या बाजूने ओढून आणलेली शेकडो दुचाकी, चारचाकी जड वाहने पार्क केली आहेत. मात्र, वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. हडपसर पोलिस ठाण्याला सरकारने माळवाडी येथे मोठी जागा दिली आहे. येथील जागा रिकामी आहे. ओढून आणलेली वाहने पोलिस ठाण्याच्या जागेत हलवली, तर मुख्य चौकातील जागा रिकामी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, त्या दृष्टीने पोलिस विचार करत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात हडपसर वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. एन. थोरात म्हणाले, 'पोलिस ठाण्यासमोर अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने, तसेच रस्त्यावर पार्क केलेली वाहने काढून घेण्यास सांगणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागितली शिष्यवृत्ती, मिळाली लाथ

0
0

मागितली शिष्यवृत्ती, मिळाली लाथ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्या हक्काच्या स्कॉलरशिपविषयी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात विचारणा करण्यास गेलेल्या एका विद्यार्थ्याला कार्यालयातील अधिकाऱ्याने थेट लाथ घालून हाकलून दिल्याचा प्रकार मंगळवारी पुण्यात घडला. समाजातील गोरगरीब घरांमधील विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या समाजकल्याण खात्यातील अधिकारीच असे वागत असल्याने, गरजू विद्यार्थ्यांनी आता दाद मागाचयी तरी कुणाकडे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी सध्या पुण्यातील एका कॉलेजमध्ये पदव्युत्तर वर्गाच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. पुण्यात प्रवेश घेण्यापूर्वी या विद्यार्थ्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने समाजकल्याण खात्याच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून या शिक्षणासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याला ही स्कॉलरशिप मिळत नाही. स्कॉलरशिपसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही स्कॉलरशिपची रक्कम आपल्या खात्यामध्ये का जमा होत नाही, या विषयीची माहिती घेण्यासाठी हा विद्यार्थी स्वारगेट परिसरातील समाजकल्याण खात्याच्या कार्यालयामध्ये गेला असता हा प्रकार घडला. या विद्यार्थ्याने 'मटा' प्रतिनिधीला ही 'आपबिती' सांगितल्यानंतर खात्याचा हा कारभार उघड झाला.
'कार्यालयात गेल्यानंतर मी तेथील कर्मचाऱ्यांना माझी अडचण सांगितली. सुरुवातीला तेथील एका कर्मचाऱ्याने माझी सगळी माहिती घेऊन तपासणी केली. त्यात माझ्या खात्यावर फक्त २०११ सालच्या स्कॉलरशिपसाठीचे नऊशे रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यानंतरची स्कॉलरशिप जमा न झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. २०१२ आणि २०१३ सालची स्कॉलरशिप जमा न झाल्याविषयी मी विचारले असता त्यांनी तेथील एका अधिकाऱ्याला भेटायला सांगितले. मेश्राम आडनावाच्या या अधिकाऱ्याकडे माहिती विचारली असता, त्यांनी सुरुवातीपासूनच अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. तसे बोलणे योग्य नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी मला लाथ मारली,' अशी माहिती या विद्यार्थ्याने दिली. या प्रकाराविषयी समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार दिल्याचेही त्याने बुधवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककलांचाही ‘विकिपी‌डिया’

0
0

लोककलांचाही 'विकिपी‌डिया'

पुणे
राज्यातील लोककलांविषयी आस्था असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. लावणी असूद्यात की भारूड, गण-गवळण असूद्यात, पिंगळा असूद्यात किंवा वासुदेवाची गाणी... अशा सर्वच लोककलांची माहिती लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय त्यासाठी विकीपी‌डियाच्या धर्तीवर एक ऑनलाइन पोर्टलच विकसित करत आहे. त्यामुळे लोककलांची माहिती अभ्यासण्यासोबतच, त्यामध्ये भर घालण्याची सुविधाही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून गेल्या काही काळामध्ये लोककलांचा अभ्यास करण्यासाठी काही महत्त्वाचे संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लोककलाकारांचे सर्वेक्षणामध्येही केंद्राने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या सर्वेक्षणाचे भवितव्य आणि लोककलांच्या संवर्धनासाठी संचालनालयामार्फत सुरू असणारे उपक्रम या विषयी 'मटा'ने बुधवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर आणि ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्याशी संवाद साधला. त्यातून लोककलांच्या विकीपिडियाच्या निर्मितीबाबतची माहिती मिळाली.
आंबेकर म्हणाले, 'लोककलाकारांच्या सर्वेक्षणाचे दोन टप्पे नुकतेच पूर्ण झाले आहेत. उर्वरीत दोन टप्प्यांमधील सर्वेक्षण या पुढील काळात होणार आहे. या सर्वेक्षणासाठी राज्यातील दहा विद्यापीठांची मदत घेण्यात येत आहे. या पुढील टप्प्यात विद्यापीठांसोबतच राष्ट्रीय नाट्य विद्यालयासारख्या (एनएसडी) संस्थांकडे लोककलांविषयी असणारी दृकश्राव्य माहिती संकलित केली जाणार आहे. त्या आधारे संचालनालय विकिपीडियासारखे एक ऑनलाइन पोर्टल विकसित करत आहे.' येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पामधील ललित कला केंद्राच्या सहभागाविषयी डॉ. बहुलीकर यांनी माहिती दिली. डॉ. बहुलीकर म्हणाल्या, 'राज्यात दहा विद्यापीठांच्या माध्यमातून लोककलाकारांचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. या सर्वेक्षणाद्वारे आम्ही जवळपास चार हजारांवर लोककलाकारांची माहिती एकत्रित केली आहे. ललित कला केंद्रातील दहा विद्यार्थीही या संशोधन प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पातून समोर आलेली माहिती विचारात घेत, संचालनालयाने लोककलांचा विश्वकोष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची मुख्य जबाबदारीही केंद्राकडे सोपविण्यात आली आहे.'
विश्वकोष निर्मितीसाठी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, दादा पासलकर आणि डॉ. यशवंत पाठक यांची सल्लागार समितीही नेमण्यात आल्याचे डॉ. बहुलीकर यांनी सांगितले.

................
बदल असले तरी लोक टिकून...
लोककलाकारांच्या सर्वेक्षणातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असल्याचे डॉ. बहुलीकर यांनी या निमित्ताने सांगितले. डॉ. बहुलीकर म्हणाल्या, 'ऑगस्ट २०१५ पासून या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांनी लोककलाकारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेत माहिती गोळा केली आहे. ही माहिती घेण्यासोबत कलाकारांच्या अडचणीही आम्ही जाणून घेत आहोत. या कलाकारांच्या वेशभूषा, सादरीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य, वाद्ये आदी बाबींमध्ये कालानुरूप बदल होत आहेत. असे असले तरी कलाकार आणि त्यांचा आस्वाद घेणारे चाहते मात्र कायम असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर येत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचारग्रस्त मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

अत्याचारग्रस्त मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिरुरच्या माजी आमदाराचा नातू अजित सोनाभाऊ गावडे (वय २३, रा. टाकळी हाजी, शिरुर) याने बलात्कार केल्याची तक्रार दिलेल्या तरुणीने मंगळवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या तरुणीने लिहून ठेवलेली चार पानी 'सुसाइड नोट' पोलिासंना मिळाली आहे. त्यामध्ये तिने आरोपींकडून तिच्या नातेवाइकांना त्रास होत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गावडेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. ही तरुणी नर्सचे काम करते. त्या ठिकाणी अजित व तरुणीची ओळख झाली. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिचे व्हिडीओ तयार करून 'व्हॉट्सअॅप'वर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. शिवाजीनगर येथील येथे १० मार्च रोजी दोघे भेटले. अजितने त्याचे लग्न ठरल्याचे तरुणीस सांगितले. त्यावरून दोघांचे हॉटेलमध्ये जोरदार भांडण झाले. त्यामध्ये अजित त्याने तिला मारहाण केली. यानंतर या तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ११ मार्च रोजी बलत्काराची तक्रार दिली होती. त्यावरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गावडेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडीत तरुणीने विश्रांतवाडी येथे काकाच्या घरी जाऊन मंगळवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घरात अस्वस्थ अवस्थेत लोळत असताना तिच्या काकाने पाहिले. तिला कोरेगाव पार्क येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तरुणीने लिहून ठेवलेली चिठ्ठी विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये तिने तक्रार दिल्यानंतर तिला व तिच्या नातेवाईकांना आरोपींकडून खूप त्रास दिला जात आहे. त्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले आहे; तसेच तिच्या मृत्यूस अजित गावडे, पोपटराव गावडे, सुनीता गावडे, राजू गावडे यांना जबाबदार धरले असून, त्यांना शिक्षा मिळावी, असे म्हटले आहे.
दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. याबाबत परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी सांगितले की, 'तरुणीने तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, आरोपी पळून गेला आहे. दोन्ही टीम आरोपीच्या मागावर आहेत. कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नाही.'
..................
राजकीय दबावापोटी कारवाई नाही
आई व आजोबा मोठ्या राजकीय पदावर आहे. तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तक्रार मागे घ्यावी म्हणून कुटुंबियांना धमकी दिली. कुटुंबियांना होत असलेला त्रास पाहून निराश होऊन तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. राजकीय दबाब असल्यामुळे पोलिस या प्रकरणात कारवाई करत नाहीत, असा आरोप तरुणीच्या काकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायाभूत सुविधांची पाच वर्षांत पूर्तता

0
0

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते राम माधव यांचा विश्वास
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांतील प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. शेतीसाठी पाणी, वीज, गावोगावचे रस्ते, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता या गोष्टींबाबत पुरेसा विचार झालेला नाही. मात्र, येत्या पाच वर्षांत या गोष्टींची पूर्तता झालेली असेल,' असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम माधव यांनी बुधवारी दिले.
पुणे मराठी ग्रंथालायातर्फे खासदार रामभाऊ म्हाळगी स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'वैश्विक गुरूच्या मार्गावर भारत' या विषयावर राम माधव यांनी विचार मांडले. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे (बीएमसीसी) माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, पुणे मराठी ग्रंथालयाच्या सहकार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी, शरद घाणेकर, प्रा. चारुदत्त निमकर आदी या वेळी उपस्थित होते. शिक्षण, कृषी, रस्ते आणि स्वच्थता या क्षेत्रात मोठे बदल करायचे आहेत. येत्या पाच वर्षात ते बदल केले जातील, असे राम माधव यांनी स्पष्ट केले.
'सध्याची जागतिक परिस्थिती, भारताची वैचारिक संपन्नता, देशातील राष्ट्रीय समाज आणि योग्य नेतृत्वाच्या आधारे भारत लवकरच वैश्विक गुरू बनणार आहे. जगातील प्रत्येक देश वैश्विक गुरू होण्याचे स्वप्न पाहू शकतो. मात्र, त्यासाठी त्या देशाकडे अनुकूल परिस्थिती असायला हवी. भारतात त्यासाठीची अनुकूल परिस्थिती आहे. जगात स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही या गोष्टींमध्ये वाद सुरू आहे. संपूर्ण जग स्वातंत्र आणि लोकशाहीमध्ये विभागत आहे. याबाबत भारत जगाला मार्ग दाखवू शकतो,' असे राम माधव यांनी सांगितले.
'भारताकडे योग्य विचार आहे. स्वतंत्र संस्कृती आहे. हे विचार जगण्यासाठी आणि जगाला देण्यासाठी राष्ट्रीय समाज भारतात आहे. भारतातील तरुणांची बौद्धिकता जगातील इतर देशातील तरुणांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारताचा सन्मान होत असून, हे तरुण जगाला विचार देऊ शकतात,' असेही माधव म्हणाले.
................
'भारत विश्वगुरू बनेल'
'देश संपन्न करणे, देशाचे विचार जगाला देण्यासाठी एक कुशल नेतृत्त्व पंतप्रधानांच्या रुपाने आपल्याला लाभले आहे. त्यामुळे येत्या काळात भारत विश्वगुरू बनणार हे निश्चित आहे,' असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच नाटकाच्या नावे अनेक निविदा

0
0

शिवमहोत्सवासाठी महापालिकेचा पराक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणारा 'शिवमहोत्सव' चुकीच्या टेंडर पद्धतीमुळे वादात सापडला आहे. यामध्ये तीन दिवस महानाट्याचे आयोजन करण्यासाठी थेट एकाच नाटकाच्या नावाने निविदा काढण्याचा पराक्रम पालिकेने केला आहे. हितसंबंधातून असे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एसएसपीएमएसच्या मैदानावर १८ मार्चपासून 'शिवमहोत्सव' भरविण्यात येणार आहे. यामध्ये सलग तीन दिवस महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवल्याचा आरोप नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी केला आहे. २५ लाख रुपयांच्या या टेंडरमध्ये थेट 'शिवगर्जना' या महानाट्याचे नाव आहे. पालिकेने महोत्सवासाठी महानाट्य हवे, असे टेंडर काढणे अपेक्षित असताना कोल्हापूरमधील 'शिवगर्जना' या नाटकाच्या नावे टेंडर काढण्यात आल्याकडे भोसले यांनी लक्ष वेधले. या महोत्सवासाठी भोसले यांच्यासह सचिन सस्ते यांच्या दिशा इव्हेंट या संस्थेने टेंडर भरले होते.
'पहिला क्रमांक दिशा इव्हेंटचा असताना परस्पर 'शिवगर्जना' या नावे टेंडर काढण्यात आले असून हितसंबंधातून असे प्रकार होत असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. ' सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुण्यातील नाट्यसंस्थांना स्थान देण्यात येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली.
............
एकूण पाच टेंडर आली होती. त्यातील पुण्यातील दोन संस्थांनी कमी रक्कम भरली. महानाट्याचा प्रयोग असल्याने शिवगर्जना हे नाटक केले आहे का, असे आम्ही विचारले होते. हे नाटक भव्यदिव्य होणे अपेक्षित असल्याने शिवगर्जनाच्या संघाला संधी देण्यात आली आहे. नियमाने दिशा इव्हेंटकडे नाटकाची जबाबदारी द्यायला हवी होती.

-भरत कुमावत, नाट्यगृह व्यवस्थापक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरारी पथकांकडून तलावांची तपासणी नाही

0
0

स्वयंसेवी संस्थांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात ३२५ पेक्षा अधिक स्वीमिंग टँक आहेत. त्यापैकी महापालिकेचे २१ टँक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या टँकमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्यात आला असला तरी, विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्याचा वापर करून ते सुरू ठेवण्यात आले आहेत. या टँकमध्ये वापरले जाणारे पाणी नक्की कोणते आहे, याची शहानिशा करण्यासाठी पालिकेने भरारी पथके नेमली आहेत; मात्र या भरारी पथकाच्या माध्यमातून स्वीमिंग टँकची तपासणी केली जात नसल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.
धरणातील पाणीसाठा कमी होत असताना शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी बोअरवेल्स तसेच विहिरींचे पाणी वापरासाठी आणता येईल का, याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. स्वीमिंग टँकसाठी पिण्याचे पाणी वापरत नसल्याने कारण पुढे करून अनेक टँकचालकांनी बोअरवेल्सचे पाणी घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शासनाने सर्व टँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत की नाही, याची माहिती आदेश मिळाल्यानंतरच स्पष्ट होइल. त्यानंतर टँकबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
..
'रेनडान्सवर बंदी घालावी'

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर होळी, धुलवड, रंगपंचमीच्या दिवशी वॉटर पार्क‍ येथे होणाऱ्या रेनडान्सवर बंदी घालावी, अशी मागणी नगरसेवक सनी निम्हण यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे केली आहे. या मागणीचा राव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निम्हण यांनी सांगितले. तसेच या सणांच्या काळात पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही निम्हण यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यासाठी पाणी वापरल्यास कारवाई

0
0

सिमेंट रस्त्यांबाबत पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामासाठी पिण्याचे पाणी वापरले जात नाही. या कामासाठी पिण्याचे पाणी वापरत असल्याच्या काही तक्रारी आल्याने याची तपासणी तटस्थ संस्थेमार्फत केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित ठेकेदाराबरोबरच पालिकेतील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असून, गल्लीबोळातील रस्तेही सिमेंट काँक्रिटचे करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे धरणांत पाण्याची टंचाई असतानाही काँ‌क्रिटच्या रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. धरणांतील पाणीसाठा घटल्याने पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना रस्त्यांसाठी पाण्याच्या वापरावर कोणतेही निर्बंध नसल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बांधकामे, उद्याने, वॉशिंग सेंटर यांच्यावर पिण्याचे पाणी वापरण्यासाठी महापालिकेने बंधने घातली आहेत. मात्र, रस्त्यांसाठी पालिकेच्या पाइपलाइनला टॅप मारून ठेकेदार पाणी वापरत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
शहरात सध्या विविध विकास कामांसाठी जवळपास ३२५ किलोमीटरच्या रस्त्यांची खोदाई करण्यात येळघ्घ्ऱ्त आहे. त्यापैकी शंभर किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर केला जात आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात आहे. रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त कुमार यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले रस्ता तयार करताना पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तटस्थ संस्थेकडून तपासणी केली जाईल. रस्ता तयार करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
..
'सिमेंट रस्त्यांना परवानगी नाही'
शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवट ठेवता येणे अशक्य असल्याने प्राधान्यक्रमाने ही कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर मात्र नव्याने सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिमेंटचे रस्ते करणे हा प्राधान्यक्रम नसल्याचेही आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या योजना कँन्टोन्मेंटना लागू

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधिमंडळात स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या हिताच्या विविध योजनांप्रमाणे राज्यातील पुणे, ख़डकी, देहूरोडसह नऊ कँन्टोन्मेंट बोर्डांतील नागरिकांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांचा फायदा होईल. पर्यायाने बोर्ड प्रशासनाला निधीचा बूस्टर देखील मिळण्यास मदत होणार आहे.
महापालिकाप्रमाणे कँन्टोन्मेंटमध्ये जकात अथवा एलबीटीद्वारे कर वसूल केला जात नाही. त्यामुळे कँन्टोन्मेंटमध्ये विकास कामांना लागणारा आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. परिणामी निधीअभावी विकासकामांना खीळ बसते. त्याशिवाय कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी भाजपचे आमदार विजय काळे यांनी पालिकेप्रमाणे खडकी कँन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य उपस्थित होते.
'महापालिकेच्या हद्दीत संजय गांधी निराधार योजना, महिला व बाल कल्याण, झोपडपट्टी विकास योजना, रेशनिंग, महिला बचत गट अनुदान यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होतो. तसेच, कँन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे मिनी महापालिका आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक निधी मिळणे आवश्यक आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध योजना लागू असणे अपेक्षित आहे, असे केंद्र सरकारने नुकतेच जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. त्या पत्रानुसार राज्यातील सर्व कँन्टोन्मेंटबाबत कार्यवाही करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ', अशी माहिती आमदार विजय काळे यांनी दिली.
या संदर्भात कार्यवाही लवकरच सुरू होऊन अध्यादेश जारी होईल. त्यामुळे कँन्टोन्मेंट भागातील रहिवाशांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
..
खडकी कँन्टोन्मेंटसह राज्यातील पुणे, देहूरोड, देवळाली तसेच अन्य अशा नऊ कँन्टोन्मेंटना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. परिणामी नागरिकांना विविध योजनांचा लाभ तसेच निधी उपलब्ध होणार आहे.
विजय काळे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीओईपी’च्या यंत्र विभागाचे नूतनीकरण

0
0

येत्या सोमवारी होणार इमारतीचे उद् घाटन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) यंत्र विभागाच्या १०० वर्षे जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्वरूपातील प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून प्रशस्त तीन मजली इमारतीची निर्मिती केली आहे. येत्या सोमवारी (२१मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, असे विभागप्रमुख डॉ. दिलीप मालखेडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
'सीओईपी'मध्ये यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला १०३ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. यंत्र अभियांत्रिकी इमारतीची उभारणी करून १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. उद्योजक राहुल बजाज यांनी सीएसआरमधून साडेचार कोटी रुपये इमारतीच्या कामासाठी दिले. तसेच महाविद्यालयाने तेवढीच रक्कम प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी खर्च केली आहे. नूतनीकरणाचे काम इमारतीचा जुना ढाचा तसाच ठेवून करण्यात आले आहे. उद्घाटनाला बजाज, प्रतापराव पवार, शास्त्रज्ञ एफ. सी. कोहली, संचालक डॉ. बी. बी. आहुजा उपस्थित राहतील, असे डॉ. मालखेडे यांनी सांगितले. प्रा. प्रीतम सेलमोकर, प्रा. मोहन खोंड उपस्थित होते.
.......................
प्रवेशक्षमतेत वाढ
सीओईपीच्या यंत्र अभियांत्रिकीच्या शाखेच्या डिझाइन आणि थर्मल पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढविण्यात आली आहे. सध्या या दोन्ही अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता १८ असून, ती वाढवून २५ करण्यात येणार आहे. मात्र, या प्रवेशक्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश २०१७पासून मिळेल. यापूर्वी ऑटोमोबाईल अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता १८हून वाढवून ३५ करण्यात आली आहे. दरम्यान, नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे नामकरण बजाज ऑटो स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनीअरिंग' करण्यात येणार असल्याचे, डॉ. मालखेडे यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिर्यारोहक हर्षदला खुणावतेय ‘एव्हरेस्ट’

0
0

स्वप्न साकारण्यासाठी पुणेकरांच्या दातृत्त्वाला साद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील गिर्यारोहक हर्षद राव जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या एव्हरेस्टवर गिर्यारोहण करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, मोहिमेचा खर्च भागविण्यासाठी त्याला ३०.८० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. आतापर्यंत त्याच्या कुटुंबाने निम्म्याहून अधिक मदत गोळा केली असून, अद्याप दहा लाख रुपये कमी पडत आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम गोळा करण्यासाठी आणि हर्षदचे स्वप्न साकारण्यासाठी पुणेकरांच्या मदतीची गरज भासणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीसीएस ही पदवी प्राप्त केलेला २७ वर्षीय हर्षद एव्हरेस्ट मोहिमेला येत्या २८ मार्चपासून सुरुवात करणार आहे. या पूर्वी त्याने उत्तराखंड येथील जानली (उंची २१ हजार ८०० फूट) आणि गंगोत्रीजवळील जोगीन (उंची २१००० फूट) ही शिखरे सर केली आहेत. मात्र, त्याला आता एव्हरेस्ट खुणावत आहे. त्यासाठी त्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील शिखर सर करण्याचा कसून सराव केला आहे. हर्षदकडे एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द आणि धाडस या दोन्ही गोष्टी आहेत. मात्र, आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्याला आणखी दहा लाख रुपये आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हर्षदचे वडील ए. एम. राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या मोहिमेविषयी माहिती दिली.
कुटुंबातील सदस्य, समाजातील दानशूर व्यक्ती आणि गिरीप्रेमी सारख्या संस्था विविध मार्गाने मदत करीत आहेत. मात्र, मोहीम सुरू होण्यासाठी कमी कालावधी राहिल्याने उर्वरित रक्कम जमवण्यासाठी आम्ही पुणेकरांकडून मदत घेण्याचे ठरविले असल्याचे राव म्हणाले. हर्षदला मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९०११०७८४१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या आई हेमलता राव यांनी केले.
...............
लहानपणापासूनच पर्वतांवर जाण्याची आवड होती. या आवडीमुळे मी गिर्यारोहक झालो. आता एव्हरेस्ट शिखर सर करून देशाचा तिरंगा तेथे फडकवण्याची इच्छा आहे. त्यासाठी नागरिकांच्या पाठबळाची आवश्यकता आहे .
- हर्षद राव, गिर्यारोहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या नोटिशीवर २१ला सुनावणी

0
0

हायकोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाहीची दिशा ठरणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकारी बँकांवरील संचालकपद अपात्र ठरविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर सहकार खात्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दिलीप सोपल आणि दिलीप माने यांना बजावलेल्या नोटिशींवर २१ मार्च रोजी हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्च रोजी होणारी सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.
सहकार खात्याकडून पवार वगळता अन्य तिघांच्या नोटिशींवर १८ मार्चला सुनावणी घेण्यात येणार होती. पवार यांनी सुनावणीसाठी दीर्घ मुदतवाढ मागितल्याने त्यांच्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित ठेवण्यात आली. मात्र, या बाबत हायकोर्टात याचिका दाखल असल्याने २१ मार्च रोजी सुनावणी झाल्यानंतर निर्णय घेण्याचे सहकार खात्याने ठरविले आहे. विभागीय उपनिबंधक संतोष पाटील यांच्याकडे सुनावणी होणार आहे.
बरखास्त झालेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना पुन्हा कोणत्याही सहकारी बँकेचे संचालकपद किमान दहा वर्षे उपभोगता येणार नसल्याचे निर्देश ​​रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिले आहेत. राज्याच्या सहकार विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार चौघांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पवार, मोहिते-पाटील आणि सोपल राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना ही बँक बरखास्त झाली. पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवर, मोहिते-पाटील आणि सोपल सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. सोलापूर येथील ब्रह्मदेवदादा माने नागरी सहकारी बँकेचे संचालक माने असताना ही बँक बरखास्त करण्यात आली. ते सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचेही संचालक आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांची पदे धोक्यात आली आहेत.
..
मुश्रीफ सुप्रीम कोर्टात
दरम्यान, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रश्नी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयानंतर दाद मागण्याचे निर्देश दिल्याने हायकोर्टातील याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एनआयव्ही’ला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

0
0

मुदत संपल्यानंतरही 'ससून'च्या जागेवर ठिय्या; उत्तरासाठी १५ दिवस
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भाडेतत्त्वावर देण्यात आलेली ८,३११.२७ चौरस मीटरची जागा बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलला परत देण्याचे नाव न घेणाऱ्या राष्ट्रीय विषाणू संस्थेस (एनआयव्ही) जिल्हाधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलच्या मालकीची ८,३११.२७ चौरस मीटर अर्थात सुमारे सव्वादोन एकर जागा २३ सप्टेंबर १९६४मध्ये 'एनआयव्ही'ला ३० वर्षांच्या नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. ही मुदत २२ सप्टेंबर १९९४ रोजी संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आणखी पुनश्च २२ सप्टेंबर २००१ला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ससून हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी वापरता असलेली जागा ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र,'एनआयव्ही'ने जागेवरून हटण्यास असमर्थता दर्शवली. या विषयी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम वृत्त देऊन पाठपुरावा केला. मुख्यमंत्री कार्यालयाबरोबरच महसूल विभागाकडे धाव घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने गाऱ्हाणे मांडले होते.
या संदर्भात ससून हॉस्पिटलने 'एनआयव्ही'च्या ताब्यातून जागा घेण्यासंदर्भात मुंबई सरकारी जागा अधिनियम १९५५ तसेच सुधारित अधिनियम २००७ अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला. या बाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी ससून हॉस्पिटलचे अधिकारी आणि 'एनआयव्ही'च्या अधिकाऱ्यांची दोन आठवड्यापूर्वी सुनावणी घेतली. त्या सुनावणीनंतर मुठे यांनी 'एनआय़व्ही'ला नोटीस जारी केली. मुदत संपल्यानंतरही २२ सप्टेंबर २००१पासून एनआयव्हीने बेकायदा ससूनची जागा बळकावली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुनावणीदरम्यान ससूनच्या अधिकाऱ्यांनी या जागेची विस्तारीकरणासाठी मागणी केली आहे. त्या जागेवर एनआयव्ही' अनधिकृत भोगवटा करीत असल्याने त्यांना महिनाभराच्या आत जाण्यासाठी आदेश का देण्यात येऊ नयेत या संदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. 'एनआय़व्ही'ला म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत म्हणणे प्राप्त न झाल्यास जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात येतील, असेही नोटिशीत म्हटले आहे.
..
एनआयव्ही'च्या ताब्यातील ससून हॉस्पिटलची सव्वादोन एकर जागा मिळाली तर, तेथे विस्तारीकरण करणे शक्य होणार आहे. त्या ठिकाणी शासकीय दंत महाविद्यालय, फिजिओथेरपी कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव आहे.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. मेडिकल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीआय कार्यकर्त्याची आत्महत्या

0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील आरटीआय कार्यकर्ते तुकाराम चव्हाण (३७ रा. अजंठानगर, चिखली) यांनी लोणीकंद येथील एका लॉजमध्ये बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद येथील राजवर्धन लॉजमध्ये त्यांचा गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. लोणीकंद पोलिस तपास करत आहेत.

चव्हाण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून अनेक प्रकरणांचा पाठपुरावा करत होते. चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलच्या जागेचा, तसेच कार्ला येथील एसईझेड जमीन परतावा, मिठाईवर बेकायदेशीररीत्या वापरला जाणारा वर्ख यांसह विविध प्रश्नांचा ते पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देहूरोड येथील आरटीआय कार्यकर्ते पोपट करणे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या वादातून तरुणाला पेटवले

0
0

म. टा. प्रतिनिधी,येरवडा


लोहगाव येथे जागेचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये बुधवारी सायंकाळी जोरदार वाद झाले. या वादाची परिणती एकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्यात झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पेटलेल्या व्यक्तीने आपल्याला पेटवल्याचा आरोप केला आहे. विमाननगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

श्रीराम तानाजी माने (वय ३० रा. लोहगांव) असे भाजलेल्या तरुणाचे आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अशोक प्रेमराज उपाध्ये (वय ५८), सुरेखा अशोक उपाध्ये (वय ३२), योगेश अशोक उपाध्ये (वय २८ सर्व रा. लोहगांव) यांना ताब्यात घेतले आहे. उपाध्ये कुटुंबाने आपल्याला काठीने मारहाण करून रॉकेल अंगावर ओतून पेटवून दिल्याची तक्रार केली आहे. विमाननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माने याने उपाध्ये यांच्याकडून २०१३मध्ये अर्धा गुंठा जमीन खरेदी केली होती. या जागेवरून त्यांच्यात वाद होता. माने हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास उपाध्येच्या घरी गेला होता. यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून पेटवण्यात आले. माने याने आपल्याला मारहाण करून पेटवल्याचा आरोप केला आहे. तर, उपाध्ये याने मानेने स्वतःच पेटवून घेतल्याचे सांगितले आहे. माने हा घरी येताना रॉकेलचा कॅन घेऊन आला होता, असे उपाध्ये याने पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट कँन्टोन्मेंट’साठी २१२ कोटी

0
0

'स्मार्ट सिटी'च्या धर्तीवर पुणे बोर्डाची झाली निवड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आता संरक्षण मंत्रालयाने 'स्मार्ट कँन्टोन्मेंट' योजना राबविण्या निर्णय घेतला असून, त्यासाठी पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची निवड करण्यात आली आहे. स्मार्ट कँन्टोन्मेंटसाठी बोर्डाच्या प्रशासनाने २१२ कोटी रुपयांचा आराखडा संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला आहे.
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट कँन्टोन्मेंट राबविण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना आहे. या योजनेंतर्गत सिकंदराबाद, देवळाली आणि पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची निवड करण्यात आली आहे. पुणे कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने स्मार्ट कँन्टोन्मेंट योजनेसाठी २१२ कोटी रुपयांचा आराखड्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वाधिक ६८.२५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. त्यापाठोपाठ भूमिगत सांडपाण्याच्या पाइपलाइनसाठी ५९.७१ कोटी रुपये, पादचारी मार्गांची दुरुस्ती, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी २५.२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांनी दिली.
स्मार्ट कँन्टोन्मेंटसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात बोर्डाच्या मुख्य इमारतीतील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. त्याशिवाय पाणीपुरवठा यंत्रणा, कँन्टोन्मेंट भागातील चौकांचे सुशोभिकरण यासारख्या गोष्टींवरदेखील भर देण्यात आला आहे. सौर उर्जेसाठी एक कोटी ४२ लाख ३८ हजार, पाणी पुरवठा यंत्रणेसाठी १५ कोटी ९७ लाख ४७ हजार ८०० रुपये, सुशोभिकरणासाठी १० कोटी ८१ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनुष्यबळासाठी नऊ कोटी ७४ लाख १६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
..
योजनेचा तपशील तरतूद (कोटी रुपयांत)
कचरा व्यवस्थापन ६८.२५
भूमिगत सांडपाणी ५९.७१
रस्तारुंदीकरण २५.२५
सौर ऊर्जा प्रकल्प १.४२
पाणीपुरवठा १५.९७
सुशोभिकरण १०.८१
मनुष्यबळ ९.७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या आदेशानंतर स्विमिंग टँक बंद करू

0
0

आयुक्त कुणाल कुमार यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरातील स्विमिंग टँक बंद करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिल्यास सर्व टँक पूर्णपणे बंद करण्यात येतील,' असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. 'स्विमिंग टँकसाठी पिण्याचे पाणी वापरू नये,' असे आदेश प्रशासनाने यापूर्वीच दिले असल्याचे कुमार म्हणाले.

राज्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर होळीमध्ये 'रेन-डान्स'साठी पाणी देऊ नये, 'स्विमिंग पूल'चा पाणीपुरवठा बंद करावा, असे आदेश राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत. जुलैपर्यंत स्विमिंग टँकचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात यावा, असे राज्य सरकारने म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त कुमार यांचा विचारले असता, अद्याप राज्य सरकारचे आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. 'या आदेशात नक्की काय म्हटले आहे, याची खात्री करून त्यानंतर शहरातील सर्व स्विमिंग टँक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल,' असे त्यांनी स्पष्ट केले. स्विमिंग टँकसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे आदेश यापूर्वीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नळदुरुस्ती मोहीम

पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत नळदुरुस्ती मोहीम राबवली जाणार असून, सकाळी ११ ते ५ या वेळेत (०२०) २५५३३६७६ या क्रमांकावर नागरिकांना तक्रार नोंदवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images