Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पीएमआरडीए’मध्ये ई-चलन सुविधा

$
0
0

कामकाज होणार सुलभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम परवानगी मिळाल्यावर त्याचे शुल्क भरण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ई-चलन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नव्हे, तर बांधकाम नकाशे मंजूर झाल्यावर त्याचे चलन भरण्याची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे 'पीएमआरडीए'चे कामकाज अधिक सुलभ होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दस्त नोंदवण्यासाठी ई-चलन ही सुविधा आहे. त्याच धर्तीवर 'पीएमआरडीए'मध्ये आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने या कार्यालयात चलनासाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. तसेच चलनांसाठी होणारी अडवणूकही थांबणार आहे.

महापालिका हद्दीबाहेरील सुमारे सव्वासात हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र 'पीएमआरडीए'मध्ये आले आहे. या क्षेत्रात बांधकाम परवानगी 'पीएमआरडीए'कडून दिली जाते. महापालिकेबाहेरील क्षेत्रात जमीन विकसनाचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी 'पीएमआरडीए'कडे बांधकाम परवानगी घेण्यासाठी शेकडो अर्ज येत आहेत. या परवानगीमध्ये अधिक सुसूत्रता आणि सुलभता आणण्याचा 'पीएमआरडीए'चा प्रयत्न आहे.

बांधकाम परवानगीच्या अर्जासंबंधी 'पीएमआरडीए'ची नियमावली आहे. त्याची माहिती वास्तुविशारदांना देण्यात आली आहे. बांधकाम प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी होऊन विकसन शुल्क भरण्यासाठी चलन काढण्यात येते. ते चलन भरल्यानंतर बांधकाम परवानगी दिली जाते. सद्यस्थितीत नकाशे मंजूर झाल्यानंतर 'पीएमआरडीए'च्या कार्यालयात जाऊन चलन घेणे, ते बँकेत भरणे आणि पुन्हा त्याची प्रत 'पीएमआरडीए'ला देणे अशी कसरत करावी लागते. त्यामध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करून त्यात सुलभता आणण्यासाठी 'पीएमआरडीए'ने ई-चलन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

'पीएमआरडीए'ने बांधकाम नकाशे मंजूर केल्यावर त्याचे चलन भरण्यासाठी संबंधितांना ई-मेल तसेच एसएमएस पाठवला जाणार आहे. त्यामुळे नकाशे मंजूर झाल्याची माहिती संबंधितांना मिळतानाच चलन भरणेही सोपे जाणार आहे.

................

आगामी काळात सॉफ्टवेअर

'ईज ऑफ डुइंग बिझनेस'च्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात ई-चलन ही सुविधा 'पीएमआरडीए'ने उपलब्ध केली आहे. पुढील टप्प्यांत नवीन सॉफ्टवेअर केली जाणार आहेत. त्यामुळे वास्तुविशारदांना त्यांच्या कार्यालयातूनच बांधकाम नकाशे सादर करणे सहज शक्य होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये बांधकाम नकाशे सादर केल्यानंतर त्यांना तत्काळ त्यातील त्रुटी समजणार आहेत. या त्रुटी दुरुस्त करून बांधकाम परवानगी सुलभरीत्या मिळवणे शक्य होणार आहे, असे 'पीएमआरडीए'चे सीईओ महेश झगडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुरुड दुर्घटनेप्रकरणी पालक करणार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुरुड येथे सहलीसाठी गेलेल्या १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन, आबेदा इनामदार कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षक यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालक आणि शिक्षण हक्क मंच संस्थेने केली आहे. या मागणीसाठी ११ मार्च रोजी काळ्या फिती आणि झेंडे दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मनीन मुजावर आणि पालक शिवाजी सलगर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही दुर्घटना एक फेब्रुवारी रोजी घडली; मात्र अद्याप मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पालक २५ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांना कायद्यात तरतूद नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे सलगर यांनी स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही याबाबतचा अहवाल सादर केलेला नाही. उलट कॉलेजच्या प्रशासनाने अधिकार नसताना चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याद्वारे पालकांवर दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, कॉलेज प्रशासनाने स्थापन केलेली चौकशी समिती बरखास्त करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ मार्च रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय, नव्हे फिल्मसिटी

$
0
0

काही वर्षांत विकसित होणार चित्रनगरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच जागेत रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, बाग, इमारती असे सर्व काही उभारता येते का? पण हनुमान टेकडीवर ही किमया साधणार आहे 'फिल्मसिटी'च्या निमित्ताने. होय 'फिल्मसिटी'च. चित्रपट व्यवसायाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या पुण्यात 'एफटीआयआय'च्या जागेत आगामी काही वर्षांत चित्रनगरी उभी राहणार असून, एफटीआयआय नव्हे फिल्मसिटी अशी नवी ओळख 'एफटीआयआय'ला मिळणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) विविध प्रकल्पांना सुरुवात केली आहे. संस्थेच्या आवारातील दोन स्टुडिओ कमी पडत असल्याने हनुमान टेकडीजवळील ३६ एकर जागेत नवीन दोन स्टुडिओ उभारण्यात येणार आहेत, असे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. या दोन स्टुडिओंबरोबरच चित्रीकरणासाठी काही ठिकाणे विकसित करण्याचा निर्णय एफटीआयआय प्रशासनाने घेतला आहे. 'एफटीआयआय'च्या हनुमान टेकडीवरील जागेत हे प्रकल्प उभे राहणार आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. विद्यार्थ्यांच्या विरोधाची धग शांत झाल्यानंतर 'एफटीआयआय'ने विविध प्रकल्पांना हात घालायला सुरुवात केली आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील संस्थेच्या परिसरातील जागा अपुरी पडत असून, हनुमान टेकडीजवळील जागेत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पांना संस्थेच्या नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.

'एफटीआयआय'च्या हनुमान टेकडीजवळील जागेत विश्रामगृह असून, दूरदर्शन केंद्र व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय लागूनच आहे. केंद्र सरकारच्या तीन महत्त्वाच्या संस्था या ठिकाणी असल्याने चित्रपट, माध्यम या क्षेत्रांच्या दृष्टीने परिसर विकसित करण्याचे धोरण आहे. त्यातूनच 'एफटीआयआय'च्या दोन स्टुडिओंना मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच आता चित्रीकरणासाठी काही ठिकाणे विकसित करण्याचा निर्णय एफटीआयआय प्रशासनाने घेतला आहे.


सेट व्यावसायिक चित्रीकरणासाठीही

रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, बाग, इमारती असे सेट उभे करण्यात येणार आहेत. हे सेट विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असले, तरी ते व्यावसायिक चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुणे हे चित्रपटांचे नवे केंद्र होत आहे. मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण पुण्यात होते; मात्र पुण्यात चित्रनगरी नाही. ही उणीव 'एफटीआयआय'च्या प्रकल्पाने भरून निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लासचालकावर गुन्हा दाखल करा

$
0
0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
खासगी क्लासचालकाच्या चुकीचे वेळापत्रक वाटल्याने येरवड्यातील बारावीच्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पेपरला मुकावे लागल्याची घटना बुधवारी घडली. क्लासचालकाने चुकीचे वेळापत्रक दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे क्लासचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
वेळापत्रकात चुकीची वेळ छापल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने क्लासचालकावर गुन्हा दाखल करावा, तसेच भूगोलाच्या पेपरला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने परीक्षा घेण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
येरवड्यातील भुजबळ कम्प्युटर सेंटरने परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि डॉ. आंबेडकर ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी परीक्षेचे छापील वेळापत्रक वाटले होते. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरेगांव पार्कमधील सेंट मीराज कॉलेजमध्ये बैठक व्यवस्था केली होती. मात्र बारावीची शेवटच्या भूगोलच्या पेपरची वेळ चुकीची छापण्यात आली होती. बोर्डाच्या नियोजनानुसार बुधवारी भूगोलच्या पेपरची वेळ ११ ते २ अशी असताना खासगी क्लासचालकाने छापलेल्या वेळापत्रकावर ३ ते ६ अशी चुकीची वेळ छापल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने रडू कोसळले. या घटनेला जबाबदार असणाऱ्या भुजबळ कम्प्युटर क्लासचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुणे विभागीय सचिवांकडे गुरुवारी केली. तसेच विद्यार्थ्यांकरिता तातडीने भूगोल विषयाची परीक्षा घेण्याची कार्याध्यक्ष मनोज पाचपुते यांनी मागणी केली.
याबाबत पाचपुते म्हणाले, 'विनापरवानगी शाळेमध्ये स्वतःची जाहिरात आणि बोर्डाच्या परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक वाटले. चुकीच्या वेळापत्रकामुळे तीसहून अधिक विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पेपरला मुकावे लागले. त्यामुळे भुजबळ क्लासवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घ्यावी.' या वेळी युवक अध्यक्ष अमोल पवार, निखिल बटवाल आणि पेपर हुकलेल्या विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारातील राजकीय हस्तक्षेप लवकरच संपेल

$
0
0

पुणे ः 'सहकारातील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात आणून सोसायट्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणणे, हा ९७ व्या घटनादुरुस्तीचा उद्देश आहे. लोकशाही नियंत्रण, स्वायत्तता आणि भ्रष्टाचार मुक्ती ही या विधेयकाची खास वैशिष्ट्ये आहेत,' असे ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले.
पुणे शहर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विभागीय संघाने (सिंहगड रोड हाउसिंग फेडरेशन) '९७ वी घटनादुरुस्ती व हाउसिंग सोसायट्यांची भूमिका' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. संघाचे कार्याध्यक्ष विकास वाळुंजकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
'धनंजयराव गाडगीळांनी अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेल्या सहकार चळवळीच्या विचारांशी मिळती जुळती अशी ही घटनादुरुस्ती आहे. हिंदू एकत्र कुटुंब कायद्यातील त्रुटी काढून या सुधारणा करण्यात आल्या आहेत. गेल्या साठ वर्षात लक्षावधी सोसायट्या स्थापन झाल्या. सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढत गेली. त्याला वळण लागले पाहिजे. त्याला अधिक अधिकार दिले पाहिजेत. आर्थिकदृष्ट्या ते बळकट झाले पाहिजे. समाजातील अपेक्षित बदल सहकारात आले पाहिजेत या हेतूने घटनादुरुस्तीचे हे विधेयक पुढे आले,'असे बेंद्रे यांनी सांगितले.
''ना नफा ना तोटा'या संकल्पनेपेक्षा व्यावसायिक व्यवस्थापनाला प्राधान्य दिले पाहिजे. वर्षातून एकदा सोसायटीचे निपक्षपातीपणे लेखापरीक्षण झाले पाहिजे. पंचकमिटीची संख्या २१ पेक्षा अधिक असू नये. अशी बंधने या विधेयकात घालण्यात आली आहेत. गटबाजीला आळा घालणे व व्यवहारात पारदर्शकता आणणे हा त्यामागचा हेतू आहे. सोसायटीची सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च आणि सार्वभौम असली पाहिजे. त्यावर लोकशाही पद्धतीचे नियंत्रण असले पाहिजे. बहुमताला किंमत असली तरी विरोधी गटाचे हितही जपले पाहिजे,'असेही ते म्हणाले. संघाचे उपाध्यक्ष सुरेश कट्टे यांनी प्रास्ताविक केले. सहकार्याध्यक्ष अॅड. सचिन हिंगणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेखाली उडी घेऊन प्राध्यापिकेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महिला दिनी मध्यरात्री घरातून निघून गेलेल्या प्राध्यापिकेने पिंपरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (९ मार्च) उघडकीस आली आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास प्राध्यापिका घरातून दुचाकीवरून निघून गेली होती.
रिचा विशाल चंद्रा (३५, रा. सोनिगिरा विहार, आदर्शनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिचा या मुंबई-बंगलोर हाय वेवर वाकड येथील एका महाविद्यालयात चंद्रा प्राध्यापिका होत्या. ८ मार्च रोजी त्या मध्यरात्री निघून गेल्या होत्या. घरच्यांनी चंद्र यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे त्या हरविल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. बुधवारी दुपारी पिंपरी रेल्वे स्थानक परिसरात चंद्रा यांची गाडी पोलिसांना आढळली. त्यानंतर शोधाशोध घेतल्यावर चंद्रा यांचा मृतदेह सायंकाळी उशिरा आढळून आला. त्यांचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते. मात्र, त्यांचे कपडे, सँडल व गाडी या गोष्टींची ओळख पटल्याने हा मृतदेह चंद्र यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. चंद्रा यांनी
आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिंपरी व वाकड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरंगता पूल ठेवण्याचे आदेश

$
0
0

पिंपरी ः 'बोपखेल येथील मुळा नदीवर बांधण्यात आलेला तरंगता पूल काढू नये,' असे आदेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी (१० मार्च) दिले. आठ तासाच्या पूर्वसूचनेनंतर पूल तातडीने काढून टाकण्यात येईल, अशी नोटीस 'सीएमई'च्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यावर खासदार अमर साबळे पर्रीकर यांची दिल्लीत भेट घेऊन या ग्रामस्थांची अडचण लक्षात आणून दिली. त्यानंतर पर्रीकर यांनी 'सीएमई'च्या अधिकाऱ्यांना आदेश दिले.
बोपखेलवासियांसाठी 'सीएमई' जागेतून रस्ता देण्यास नकार दिल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी मुळा नदीवर तरंगता पूल बांधण्यात आला. हा पूल आठ तासांच्या पूर्वसूचनेनंतर काढण्यात येईल, अशी नोटीस देण्यात 'सीएमई'तर्फे देण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खासदार अमर साबळे यांच्याशी संपर्क साधला. साबळे यांनी पर्रीकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पुलाच्या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर पर्रीकर यांनी साबळे यांची भूमिका ऐकून घेतली आणि तरंगता पूल काढू नयेत असा आदेश 'सीएमई'च्या अधिकाऱ्यांना दिला. बोपखेल येथील नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी १४ मार्चला संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक आयोजित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूत्रविकारांबद्दल जागृती हवी

$
0
0

पेशंटची संख्या वाढल्याचे तज्ज्ञांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मधुमेह, रक्तदाबाचे वाढणारे पेशंट, मूत्रपिंड विकाराच्या निदानाच्या सुविधांची उपलब्धता यामुळे पुण्यातील डायलिसिसच्या पेशंटच्या संख्येत गेल्या पंधरा वर्षांत शंभर पटीने वाढ झाल्याचा निष्कर्ष मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी काढला आहे. जागतिक किडनी दिनाच्या पार्श्वभूमीवर मूत्रपिंड विकार तज्ज्ञांनी गेल्या पंधरा वर्षातील डायलिसिस पेशंट बदलाची माहिती 'मटा'ला दिली.
'पूर्वी एका आठवड्याला दोन ते तीन पेशंट डायलेसिस करण्यासाठी येत असत. आता दिवसाला दोन ते तीन पेशंट येतात. मधुमेह, रक्तदाबाच्या आजारामुळे मूत्रपिंडाचा (किडनी) विकार बळावतो आहे. मधुमेहाच्या पेशंटची संख्या वाढत असल्याने मूत्रपिंडाच्या पेशंटची संख्या वाढत आहे. मधुमेह झाल्यानंतर ८ ते १५ वर्षादरम्यान कोणत्याही मुधमेही पेशंटला किडनीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे डायलिसिस करण्याची गरज निर्माण होते. २००१ मध्ये पुणे शहरात पाच लाख लोकसंख्येमागे पाच व्यक्तींना डायलिसिसची गरज होती.
आता पंधरा वर्षांनंतर पाच लाख लोकसंख्येमागे ५०० पेशंटना डायलिसिस करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच पंधरा वर्षात शंभर पटीने डायलिसिस करून घेणाऱ्या पेशंटची संख्या वाढली आहे,' अशी माहिती रुबी हॉस्पिटलचे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अभय सदरे यांनी 'मटा'ला दिली.'भारतात सर्वाधिक मधुमेहाचे पेशंट आढळून येत आहेत. किडनीच्या आजाराचे लवकर निदान झाले तर डायलिसिस करणे टाळता येऊ शकते. त्यासाठी किडनीसह मधुमेहाच्या विविध चाचण्या करणे आवश्यक आहे. 'अॅडव्हान्स'या संशोधनात भारतीय नागरिकांचा समावेश आहे.'एबीए१सी' (रक्तातील साखर) याचे प्रमाण ६.५, रक्तदाब ८० ते १३० आणि कोलेस्टोरॉलचे प्रमाण १००पेक्षा खाली असणे आवश्यक आहे. त्यामुळे किडनीचे संरक्षण करणे शक्य आहे. मधुमेहामुळेच किडनीच्या पर्यायाने डायलिसिसच्या पेशंटच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे,'असे निरीक्षण मधुमेह तज्ज्ञ डॉ. शैलजा काळे यांनी नोंदविले.'किडनीविकारांचे निदान करणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध असल्याने डायलिसिसवर जाणाऱ्या पेशंटची संख्या निश्चित वाढली आहे,' असे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिके यांनी स्पष्ट केले. 'मूत्रपिंड अवयवाची हानी झाल्यास ते जीवघेणे ठरते. त्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यास पेशंटना डायलिसिस किंवा प्रत्यारोपण असे दोनच मार्ग आहेत. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तीन दिवसांनी डायलिसिस करावे लागते. प्रत्यारोपणासाठी दाता मिळणे फार कठीण आहे,'असे कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. गणेश म्हेत्राज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मेट्रो मार्ग जोडणार?

$
0
0

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 'पीएमआरडीए'चा प्रस्ताव म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोचा मार्ग पुणे महापालिकेच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाला जोडण्याचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्ताव आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग एकमेकांना जोडण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या अभियंत्यांमार्फत शक्याशक्यता तपासण्यात येत आहे. पुणे महापालिकेबरोबरच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात मेट्रो मार्ग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये शहराच्या विविध भागांतून हजारो नागरिक दररोज ये-जा करतात. त्यामुळे हिंजवडी येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर वेगवेगळ्या उपाययोजना करून मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे महापालिकेच्या प्रस्तावित मेट्रो मार्गाची पुणे-मुंबई रस्त्याने आखणी झाली आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प सुरू करता येईल, या दृष्टीने पीएमआरडीएने चाचपणी केली आहे. या मेट्रोसाठी टाटा रिअॅल्टीज अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने पीपीपी मॉडेलवर प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. तसेच पीएमआरडीएलाही प्रस्ताव देण्यात आला होता. या मेट्रोचे सादरीकरणही कंपनीने पीएमआरडीएला केले आहे. त्यासाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडाही दिला. दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमार्फत या मार्गाची शक्याशक्यता तपासण्यात येत आहे. महापालिकेने शहरात मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिला आहे. वनाज ते रामवाडी या दरम्यान पालिकेकडून मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा मेट्रो मार्ग शिवाजीनगर येथून जातो. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पास पीएमआरडीएने हिंजवडीकडून येणारा मेट्रो मार्ग जोडल्यास त्याचा वाहतूक कोंडी सोडविण्यास फायदा होऊ शकतो, अशी सूचना दिल्ली मेट्रोने केली होती. त्यावर प्राधिकरणानेही सकारात्मक भूमिका घेतली आणि हा मार्ग एकमेकांना कोठे जोडता येईल याची चाचपणी करण्यात येत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग सुमारे साडेसतरा किमी लांबीचा असणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावित मेट्रो मार्गाला तो जोडल्यास त्याची लांबी किमान दोन किमीने वाढणार आहे. पीएमआरडीने प्रस्तावित केलेला मार्ग हा इलेव्हेटेड असणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तोपर्यंत मेट्रोचे काम होऊ देणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी अर्थसंकल्पात संतसृष्टी, ग्रीन कॉरिडॉर, पेशवाईचा इतिहास सांगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र हे करत असताना कोथरुड येथील नियोजित शिवसृष्टीचा प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. कोथरुड येथील शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवसृष्टीबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी वारंवार तत्कालीन महापौरांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी याची बैठक घेतली नाही. शिवसृष्टीचा ‌निर्णय होणार नाही, तोपर्यंत मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी गुरुवारी दिला. स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवारी सर्वसाधारण सभेत चर्चेला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक करत मानकर यांनी नवीन योजनांचे कौतुक केले. अर्थसंकल्प तयार करताना अध्यक्षांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र कोथरुड येथील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. शिवसृष्टीबाबत या भागातील स्थानिक नगरसेवकांची भू‌मिका जाणून घेऊन पालिकेतील सभासदांच्या भावना महापौरांनी या भावना शासनाकडे पोहचवाव्यात, यासाठी बैठक घेण्याची विनंती यापूर्वी अनेकदा महापौरांकडे करण्यात आली होती. मात्र महापौरांनी यावर कोणतीही बैठक आजपर्यंत घेतली नाही. कोथरूड येथे मेट्रोचे मुख्य स्टेशन करण्यात येणार आहे. हे करत असताना शिवसृष्टीबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. पुणेकरांच्या दृष्टिने शिवसृष्टी प्रकल्प अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने याबाबत महापौर तसेच पालिकेतील प्रशासन आपली ठोस भूमिका घेणार नाही, तोपर्यंत मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असा इशारा मानकर यांनी दिला. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यास आमचा कोणताही विरोध नाही, परंतु हे करत असताना शिवसृष्टीबाबतही योग्य तो निर्णय झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. नवनियुक्त महापौर प्रशांत जगताप यांनी तातडीने या भागातील नगरसेवकांची बैठक बोलावून निर्णय घ्यावा, अशी मागणीही मानकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चा घोळ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठीची वेबसाइट सुरू होत नसल्याने या प्रक्रियेच्या सुरुवातीलाच खो बसला आहे. समाजातील गोरगरीब घरांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राबविली जाणारी ही प्रक्रिया गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अडचणीत आल्याने, पुणे आणि परिसरातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची नामुष्की शिक्षण खात्यावर ओढवली आहे. राज्यभरातील या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच सविस्तर वेळापत्रक जाहीर केले होते. विभाग आणि जिल्हा पातळीवरील या वेळापत्रकानुसार २७ फेब्रुवारीपासूनच प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार होती. त्यामध्ये पुणे शहर आणि विभागातील प्रक्रियेचाही समावेश होता. मात्र वेबसाइट सुरू होण्यास येत असलेल्या अडचणींमुळे पुणे आणि परिसरात ही प्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. गेल्या वर्षी दुसऱ्या सत्रापर्यंत लांबलेल्या या प्रक्रियेचा अनुभव विचारात घेता यंदा शिक्षण खात्याने काटेकोर नियोजन केल्याचे बोलले जात होते. मात्र, यंदा प्रक्रियेच्या प्रारंभीच या अडचणी समोर आल्याने अखेर गुरुवारी या प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्याचे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी जाहीर केले. याविषयी जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, यापूर्वी २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान शाळांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार होते. मात्र त्यासाठीची वेबसाइट सुरू न झाल्याने हे रजिस्ट्रेशन होऊ शकलेले नाही. त्यामुळे शाळांना या प्रक्रियेसाठीची माहिती सादर करण्यासाठी आणि नोंदणीसाठी ८ ते १३ मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून या प्रक्रियेसाठीचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतील. हे अर्ज भरण्यासाठी १४ मार्च ते ३१ मार्चदरम्यान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दरम्यानच्या काळात आलेल्या अर्जांचा विचार करून ४ एप्रिल रोजी प्रवेशांसाठीचा पहिला लकी ड्रॉ काढला जाणार आहे. पालकांना या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी उद्‍बोधन वर्गांचेही आयोजन केले जाणार असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षारक्षकांचे पगार असुरक्षित

$
0
0

निधीसाठी स्वतंत्र तरतूद केली नसल्याने पगार रखडले म. टा. प्रतिनिधी, येरवडा पुणे महानगरपालिकेच्या विविध विभाग आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या पंधराशेहून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांचे पगार मागील तीन महिन्यांपासून रखडल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे. सुरक्षारक्षकांच्या पगारासाठी निधीची स्वतंत्र तरतूद केली नसल्याने ठेकेदारांची बिले मंजूर झाली नसल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. आज (शुक्रवारी) सुरक्षारक्षकांचे पगार तातडीने मंजूर होण्यासाठी पाणीपुरवठा भवन आणि उद्यान विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा होणार असल्याने पुढील आठवड्यात सर्व सुरक्षारक्षकांचे पगार होण्याची आशा आहे. पालिकेच्या विविध इमारती, उद्याने, हॉस्पिटलमध्ये खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे शहरात विविध ठिकाणी सुमारे पंधराशेहून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षक काम करतात. पालिकेने मागील तीन महिन्यांपासून ठेकेदारांची बिले मंजूर न केल्याने सुरक्षारक्षकांना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. वेळेवर पगार होत नसल्याने सुरक्षारक्षक हवालदिल झाले असून अनेक जण खासगी सावकाराकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन संसाराचा गाडा हाकू लागलेत. कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या पगारासाठी पालिकेकडून स्वतंत्र निधीची तरतूद केली नसल्याने ठेकेदाराची बिले मंजूर झालेली नाहीत. मागील वर्षी सुरुवातीचे दोन महिने वेळेवर पगार झाल्यानंतर जूनपासून पालिकेकडून बिले मंजूर झालेली नाहीत. सुरक्षारक्षक पगारापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठेकेदारांनी जुलै ते नोव्हेंबर या सहा महिन्यांची पगाराची बिले स्वतःच्या खिशातून दिल्याचे समजते; पण पुढे परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सुरक्षारक्षकांचे पगार वेळेवर होऊ शकलेले नाहीत. ठेकेदाराची लाखोंची बिले मंजूर करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून लवकरच निधीसाठी स्वतंत्र बजेट हेड करण्याचे काम चालू आहे. कंत्राटी सुरक्षारक्षकांचे पगार करण्यासाठी अठरा कोटींची तरतूद करणार असल्याची माहिती पालिकेतील अधिकृत सूत्रांनी दिली. याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, 'कंत्राटी सुरक्षारक्षकांचे पगार होण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र निधी तरतूद केली गेली नसल्याने ठेकेदारांची बिले मंजूर होण्यास उशीर होत आहे. पंधराशेहून अधिक सुरक्षारक्षकांचे पगार होण्यासाठी १४ ते १५ कोटींची आवश्यकता आहे; पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध नसल्याने उद्या (शुक्रवारी) पाणीपुरवठा, भवन आणि उद्यान विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या तीनही विभागांकडून मंजूर निधीतून खर्च न झालेल्या रकमेचे वर्गीकरण करून पगारासाठी निधी उभारला जाईल. पुढील वर्षी सुरक्षारक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी स्वतंत्रपणे वीस कोटींची तरतूद केली जाणार आहे.' -- ठेकेदाराच्या कंत्राटी सुरक्षारक्षकांचे बिले मंजूर करण्यासाठी पालिकेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आवश्यक निधी उपलब्ध होताच दोन दिवसांत ठेकेदाराची बिले मंजूर केली जातील. पुढील आठवड्यात सर्व सुरक्षारक्षकांचे रखडलेले पगार होतील. - राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट औषधाचा साठा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती '३० कॅप वाटा' या औषधांच्या उत्पादन आणि विक्रीप्रकरणी बारामतीतील मनोज गुप्ते आणि अविनाश कदम या दोन जणांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकून कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६६६५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या बनावट औषधाची पाटस (दौंड) येथे विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार औषध निरीक्षक संदीप नरवणे आणि वि. पा. खेडकर यांनी ४ मार्चला पाटस येथील तौफिक किराणा स्टोअर्स या दुकानावर छापा टाकला. दुकानातील सर्व औषधांचा साठा जप्त करण्यात आला. हे औषध आष्टा फार्मस, धनश्री अपार्टमेंट, काशिगाव, ठाणे येथून उत्पादित केले असल्याचा उल्लेख त्यावर होता. औषधावर १५५ रुपये किंमत नमूद करण्यात आली होती. सर्व औषधे चाचणीसाठी घेतली असता नमूद असलेला परवाना व उत्पादित होत असल्याचा पत्ता अस्तित्वात नसल्याचे आढळून आले, असे नरवणे यांनी सांगितले. तौफिक किरणा दुकानाच्या मालकाकडे चौकशी केली असता, त्यांनी ही औषधे बारामतीतून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार सापळा रचून शहरातील दाते पेट्रोल पंप येथून गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६६६५ रुपयांचा '३० कॅप वाटा' या बनावट औषधाचा साठा जप्त करण्यात आला. बनावट औषधांची उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी कदम व गुप्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त न. पु. सुपे व सहाय्यक आयुक्त स. ता. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आल्याचे नरवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नजर चुकवून चोरलीसहा लाखांची बॅग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर जमीन खरेदीची नोंदणी करण्यासाठी आणलेली सहा लाख रुपयाची बॅग अज्ञात चोरट्याने पार्क केलेल्या कारमधून लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी गाडीतळ पुणे-सोलापूर रोड वरील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. ६ च्या शेजारी असलेल्या साधना हॉस्पिटलसमोर घडली. हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल बाळासाहेब जवळकर (वय ३०, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता अमोल जवळकर हे आपला चुलत भाऊ राहुल शिवाजी जवळकर (वय ३४) याच्यासोबत, गाडीतळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. ६ येथे जमिनीची नोंदणी करण्यासाठी स्कॉर्पिओ कारमधून आले होते. कार पुणे-सोलापूर रोडवरील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या साधना हॉस्पिटलच्या समोर पार्क केली होती. कार मध्ये रोख सहा लाख रुपये व बँकेचे चेक बुक एका बॅगमध्ये ठेवलेले होते. अमोल जवळकर हे खरेदीखत कार्यालयात नोंदणीचा नंबर आला आहे की नाही, हे पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी गाडीत रोख रक्कम असल्याने चुलत भाऊ राहुल याला गाडीत बसवले होते. मात्र राहुलला फोन आल्याने तो गाडीच्या बाहेर उभा राहून फोनवर बोलत होता. राहुलने बाहेर पडताना कार लॉक केली नव्हती. कारचा दरवाजा उघडा असल्याने संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. अमोल बॅग घेण्यासाठी कारजवळ आला तेव्हा राहुल फोनवर बोलत होता. कारचा दरवाजा उघडून पहिले असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्याने नजर चुकवून सहा लाख रुपयाची बॅग चोरून नेल्याची तक्रार अमोल यांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर चुकल्याप्रकरणी दाद मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी क्लासचालकाच्या चुकीमुळे बारावीचा भूगोलाचा पेपर देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली असताना, पोलिसांनी मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (बोर्ड) अंगुलिनिर्देश केला आहे. त्यामुळे या प्रकरणी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक उपस्थित करीत आहेत.

येरवड्यातील भुजबळ क्लासने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचा आधार घेतल्याने बुधवारी ३६ विद्यार्थी भूगोलाचा पेपर देऊ शकले नाहीत. त्यानंतर या क्लासचालकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'खासगी क्लासचालकांनी विद्यार्थी वा पालकांची दिशाभूल करणे चुकीचे आहे. शॉपअॅक्ट लायसन्सच्या आधारे ते क्लास चालवत असल्याने त्या कायद्याच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करता येईल. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल करायला हवी.' यंदा जुलै महिन्यात बारावीची फेरपरीक्षा होणार असल्याने या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा पर्याय खुला आहे आणि त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

तावडे यांनी पोलिसात जाण्याची सूचना केली असली, तरी तक्रारीसाठी आलेल्या पालकांना पोलिसांनी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, क्लासचालकांविरोधात कारवाई करण्याबाबत कोणतीही थेट तरतूद नसल्याचे सांगून मंडळाने कारवाई करण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आता कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस आयुक्तांनाही मोर्चाचा बसला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सराफ व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी दुपारी शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. 'एसएसपीएमएस' मैदानावरील सभेदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केल्याचा फटका खुद्द पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनाही बसला. अखेर आयुक्तांच्या आदेशानेच कारवाईचा बडगा उगारल्यामुळे अनेकांची पळापळ झाली.

सोन्यावर उत्पादन शुल्क लादण्याच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी काढलेल्या मोठ्या मोर्चामुळे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे हाल झाले. लक्ष्मी रोडवरील विजय टॉकीज चौकात पुणे सराफ असोसिएशनचे कार्यालय आहे. या ठिकाणाहून मोर्चा सुरू झाला होता. हा मोर्चा वाहतुकीच्या प्रवाहाविरोधात लक्ष्मी रोडने कॅम्पच्या दिशेने गेला. मोर्चाला गर्दी असल्याने लक्ष्मी रस्ता कोंडीत अडकला. पर्यायाने लक्ष्मी रोडच्या दोन्ही बाजुचे रस्ते, गल्ली वाहनांच्या कोंडीत सापडल्या.

हा मोर्चा लक्ष्मी रोडने कॅम्पमध्ये पोहोचला. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मोर्चातील गर्दीमुळे मालधक्का चौक, शाहीर अमर चौक, जहाँगीर चौक, 'आरटीओ' चौक, अलंकार चौक, पुणे स्टेशन परिसर, कौन्सिल हॉल, ब्लू नाइल चौक आणि किराड चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती.

मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती. एका चौकात मीही अडकलो होतो. आंदोलकांनी आपली वाहने रस्त्यावर इतरत्र लावल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अखेर, वाहतूक पोलिसांना रस्त्यावर, फुटपाथवर पार्क केलेल्या वाहनांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी जॅमरची कारवाई केली, असे पाठक यांनी सांगितले.

'सीसीटीव्ही'द्वारे होणार कारवाई

'सीसीटीव्ही'द्वारे मोर्चाचे संपर्ण रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी 'सीसीटीव्ही' फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सराफ असोसिएशन विरुद्ध खटला दाखल

सराफ असोसिएशनला मोर्चाला परवानगी देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. निर्धारित वेळेत मोर्चा संपवणे, वाहतुकीला अडथळा न आणणे आदी अटींचे पालन न केल्याप्रकरणी सराफ असोसिएशनविरुद्ध विश्रामबाग आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे.

एअरपोर्ट रोडचा फुटपाथ उखडला

नवीन एअरपोर्ट रोड ते रामवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरील फुटपाथचे काम करण्यासाठी खोदण्यात आला होता. खोदकाम केल्यानंतर तो राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला. त्यामुळे एअरपोर्ट रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. या रोडवर वारंवार व्हीआयपी मुव्हमेंट होत असल्याने पोलिसांनी रस्त्याचे काम थांबवून संबंधित ठेकेदाराविरुद्ध विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या सराफांना संपवण्याचे षडयंत्र

$
0
0

उत्पादनशुल्कवाढीविरोधात सराफ संघटनेचा पुण्यात एल्गार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध राज्यांमध्ये पसरलेल्या साखळी सराफ कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव आहे. त्यामुळेच छोटे सराफ व्यावसायिक आणि कारागिरांना संपविण्यासाठी सोन्यावर उत्पादन शुल्क लादण्यात आले आहे. शुल्क मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तसेच, दिल्लीतही धडक देण्याचा आणि प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला.

फेडरेशनतर्फे उत्पादनशुल्काविरोधात गुरुवारी पुण्यात लक्ष्मी रोडवरील पुणे सराफ असोसिएशनच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो सराफ व्यावसायिक आणि कारागीर सहभागी झाले. शहरातील विविध व्यापाऱ्यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला. लक्ष्मी रस्ता, कॅम्पमार्गे मोर्चा एसएसपीएमएस येथे आल्यानंतर त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या बाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर झालेल्या सभेला आमदार महादेव जानकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कुंभोज, पुणे सराफ असोसिएशनचे सचिव अभय गाडगीळ, सौरभ गाडगीळ, जितेंद्र घोडके, नितीन अष्टेकर, व्यापारी महासंघाचे महेंद्र पितळिया आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.

'राज्यात ७० हजार सराफ व्यावसायिक तर, अडीच लाख कारागीर आहेत. त्यांचा व्यवसाय संपविण्यासाठीच बड्या आणि साखळी दुकाने असलेल्या कंपन्यांनी सरकारवर दबाव आणून कर लादला आहे. या कंपन्या बेमुदत संपात सहभागी झालेल्या नाहीत. प्रसंगी या दुकानांबाहेर निदर्शने करण्यात येतील. सतरा मार्चला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन केले जाईल,' असेही रांका म्हणाले. मुख्यमंत्र्‍यांशी या बाबत बोलणे झाले असून, त्यांनी आमची भूमिका पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले. 'सरकार दावा करत असले, तरी उत्पादन शुल्कातून छोट्या व्यावसायिकांना वगळण्यात आलेले नाही. या पूर्वी सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे आम्ही खूप जाच सहन केला आहे. पूर्वी कॉँग्रेसने सोन्यावर उत्पादन शुल्क लादले होते, तेव्हा भाजपने संसदेत आमची बाजू घेतली होती. परंतु, आज ते सत्तेत असताना त्यांनीच शुल्क लादले आहे. उत्पादनशुल्कामुळे पुन्हा लायसन्स, परमिट राज सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना विविध रजिस्टर सांभाळावी लागणार आहेत,' असे रांका यांनी स्पष्ट केले.

'मी भाजपचा कार्यकर्ता असलो, तरी सोन्यावर उत्पादन शुल्क लादणे ही आमची चूकच आहे. या साठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सोन्यावर उत्पादन शुल्क लादणे हे व्यापाऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही आंदोलनाची धार आणखी तीव्र करू,' असे कुंभोज यांनी सांगितले. 'कॉँग्रेसनेही पूर्वी सोन्यावर उत्पादन शुल्क लादले होते. परंतु, आम्ही त्यावरून धडा घेऊन हा निर्णय मागे घेतला. हा निर्णय व्यापाऱ्यांना उद्धवस्त करणारा आहे,' असे शिंदे म्हणाले.

...............

सोन्यावर उत्पादन शुल्क लादणे ही सरकारची चूक असून, हा निर्णय मागे घेण्यासाठीच्या आंदोलनाला आमचा आणि मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे. सराफ फेडरेशनची भूमिका आम्ही अर्थमंत्री, पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू. त्याबाबतीत मुख्यमंत्र्‍यांशी बोलणे झाले आहे.

महादेव जानकर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस मतदानाचा ‘कळस’

$
0
0

ज्येष्ठ साहि​त्यिक डॉ. जोशींनाही बसला फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मतदारांच्या परस्पर त्यांच्या नावे मतदान होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांना या प्रकाराचा फटका बसला असून, त्यांच्यासह त्यांच्या मुलाच्या नावे मतदान झाले असल्याचे उघड झाले.

साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून, १५ मार्च रोजी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. मतपत्रिका न मिळालेल्या आजीव सभासदांनी दुबार मतपत्रिका मिळावी या साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. डॉ. जोशी यांनी दुबार मतपत्रिकेसाठी अर्ज केला होता. १० मार्च रोजी दुबार मतपत्रिका देण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार प्रसाद जोशी स्वत:ची तसेच डॉ. जोशी यांची मतपत्रिका घेण्यासाठी गुरुवारी परिषदेत गेले असता, तुमच्या दोघांचेही मतदान यापूर्वीच झाल्याची नोंद असल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या बाबत डॉ. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला. 'मतपत्रिका मिळाली नाही, म्हणून दुबारसाठी अर्ज केला. दुबार मतपत्रिका गुरुवारी मिळणार होती, पण मतदान झाले आहे, असे सांगण्यात आले. ही आश्चर्यकारक बाब आहे,' अशी प्रतिक्रिया डॉ. जोशी यांनी नोंदवली. 'मी १९६० पासून परिषदेचा सदस्य आहे. परिषद तसेच अखिल भारतीय साहित्य महामंडळावर पदाधिकारी म्हणून काम केले आहे. यापूर्वी माझ्या बाबतीत असा प्रकार घडला नव्हता,' असे सांगून डॉ. जोशी यांनी या प्रकारांबाबत आश्चर्य व्यक्त केले.

------------------------

नियम कडक करण्यात आल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. त्यातूनच असे प्रकार होत आहेत. मात्र अशा प्रकारांचा फटका मतदारांना बसणार नाही. डॉ. न. म. जोशी यांना दुबार मतपत्रिका देण्यात येईल. जुन्या मतदानाच्या नोंदीनुसार जुनी मतपत्रिका बाद करण्यात येईल.

- अॅड. प्रताप परदेशी, मुख्य निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाअखेरीस ‘ट्रायल रन’?

$
0
0

नगर रोड बीआरटी मार्गाची महापौर, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रोडवरील जलद बस वाहतूक सेवेसाठी (बीआरटी) आवश्यक कामांची पूर्तता पुढील १५ दिवसांत झाल्यास, महिनाअखेरीस 'ट्रायल रन' घेणे शक्य होणार आहे. त्यानंतर, नगर रोड बीआरटी प्रवाशांसाठी एप्रिलपासून कार्यान्वित होऊ शकेल.

नगर रोड बीआरटीच्या टर्मिनलसाठी आवश्यक असलेली वाघोलीची जागा पालिकेला हस्तांतर करण्यास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर महापौर प्रशांत जगताप यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुरुवारी नगर रोड बीआरटी मार्गाची पाहणी केली.

बीआरटी मार्गावरील पर्णकुटी चौक ते खराडीपर्यंतच्या १३ बसथांब्यांची उभारणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी बसथांब्यांचे स्वयंचलित दरवाजांचे काम अद्याप सुरू आहे. या मार्गावर मोठ्या वाहनांच्या रहदारीचे प्रमाण अधिक असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही ठिकाणी गतिरोधक बसविण्याची सूचना महापौरांनी केली. तसेच, सिग्नल यंत्रणा आणि इतर अनुशंगिक कामेही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

पीएमपीतर्फे चालकांचे प्रशिक्षण, आयटीएमएस यंत्रणा, वॉर्डन आणि सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जात असल्याने त्याबाबतची कार्यवाही पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी केल्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यावर बीआरटी सेवा कार्यान्वित झाल्यानंतर नगर रोडवरील बीआरटीही तातडीने सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, वाघोली येथे बस टर्मिनलसाठीची जागा पालिकेच्या ताब्यात येत नसल्याने बीआरटीला विलंब झाला. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत वाघोलीतील जागा पालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, एप्रिलपासून बीआरटी सेवा सुरू करण्याचे संकेत महापौरांनी दिले असल्याने गुरुवारी बीआरटी मार्गाची पाहणी करण्यात आली.

...............

टर्मिनलसाठी मिळालेल्या अडीच एकर जागेपैकी सव्वा एकर जागेवर तातडीने बांधकाम सुरू केले जाणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत बीआरटी संचलनात अडथळे येऊ नयेत, यासाठी उर्वरित जागेवर तात्पुरत्या स्वरूपात बसथांबे उभारण्यात येतील.

प्रशांत जगताप,

महापौर, पुणे महापालिका

...................

बीआरटी मार्गावरील सर्व अपूर्ण कामे पालिकेने नियोजित वेळेत पूर्ण केल्यास, चालकांना अंदाज यावा, यासाठी ट्रायल रन घेता येऊ शकेल. टर्मिनलचे काम सुरू असले तरी, ट्रायल रन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

मयुरा शिंदेकर

सीईओ, पीएमपीएमएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खुन्या मुरलीधर’चा उलगडणार इतिहास

$
0
0

येत्या रविवारी सकाळी हेरिटेज वॉक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेखीव चिरेबंदी दिंडी, काळ्या पाषाणातून साकारलेला गाभारा, श्रीकृष्णा आणि राधा यांची संगमरवरी मूर्ती, प्रशस्त लाकडी सभामंडप आणि दुर्मिळ चित्रे आदी वैशिष्ट्ये असणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध पेशवेकालीन खुन्या मुरलीधर मंदिराचा रंजक इतिहास जाणून घेण्याची संधी वारसाप्रेमींना मिळणार आहे. येत्या रविवारी (१३ मार्च) सकाळी साडेदहा वाजता मंदिरात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आनंद कानिटकर या मंदिराचा इतिहास तसेच वास्तुवैशिष्ट्य आदी गोष्टींची माहिती देणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'टिमविचा संस्कृत आणि इंडॉलॉजी विभाग' तसेच 'हेरिटेज इंडिया' यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खुन्या मुरलीधर मंदिरात तत्कालीन वास्तुकलेची वैशिष्ट्ये दिसून येतात. मंदिराचा मुख्य गाभारा काळ्या पाषाणातून साकारलेला आहे. सभामंडपाचे कोरीव कामही पाहण्यासारखे आहे. मुरलीधराच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती फक्त एक पाय आणि दुसऱ्या पायाचा अंगठा यावर उभी आहे. आधारासाठी मूर्तीला प्रभावळ नाही. सभामंडपात मुरलीधरासमोर हात जोडून उभा असलेला गरूडही पाहण्यासारखा आहे.

सदाशिव रघुनाथ ऊर्फ दादा गद्रे यांनी मंदिराची उभारणी केलेली आहे. ते पेशव्यांचे सावकार होते. एके दिवशी दादा गद्रे यांना श्री मुरलीधराने स्वप्नात दर्शन देऊन हा मूर्ती घडविण्याचा आदेश दिला. मूर्ती बनविण्याचे काम जयपूरचा शिल्पकार बखतराम याच्याकडे सोपविले गेले. या मूर्ती दुसऱ्या बाजीरावास आवडल्याने त्याने त्यांची मागणी गद्रे यांच्याकडे केली. वेदमूर्ती नारायणभट्टांनी म्हणजेच ६ मे १७९७ रोजी मुहूर्तावर गद्रे वाड्यातून मूर्ती हलविल्या आणि सकाळी धार्मिक विधी सुरू केले. या कारणावरून गद्रेंचे अरब सैनिक आणि पुण्यात इंग्रजांची नुकतीच आलेल्या तैनाती फौजेशी पेशव्यांची चकमक झाली. त्यात काही माणसे मरण पावली. आत अभिषेक सुरू असताना हे खून पडले. त्यामुळे 'खुन्या मुरलीधर' असे नाव मंदिराशी जोडले गेले. गद्रेंनी नंतर मंदिराची व्यवस्था खरे घराण्याकडे सोपवली ती आजपर्यंत सुरू आहे. या इतिहासाला हेरिटेज वॉकमध्ये उजाळा मिळणार आहे.

..

काय ः हेरिटेज वॉक

कुठे ः खुन्या मुरलीधर मंदिर, सदाशिव पेठ

केव्हा ः रविवार, १३ मार्च

वेळ ः सकाळी १०.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images