Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नगर रोडी बीआरटीसाठी अखेर एप्रिलचा मुहूर्त

0
0

वाघोलीतील जागेवर मुंबईत शिक्कामोर्तब

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नगर रोडवरील जलद बस वाहतूक प्रकल्प (बीआरटी) कार्यान्वित करण्यासाठी वाघोली येथील जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ही जागा ताब्यात मिळताच, त्यावर तातडीने टर्मिनलचे काम सुरू केले जाणार असून, पुढील महिन्यात नगर रोड बीआरटी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे संकेत महापौरांनी दिले.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत बीआरटी टर्मिनलच्या जागेवर अखेर तोडगा काढण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून वाघोलीची जागा ताब्यात येत नसल्याने पालिका आणि पीएमपीला बीआरटी सुरू करण्यात अडचणी येत होत्या. बापट यांनी घेतलेल्या बैठकीत वाघोलीतील केसनंद फाट्यालगतची जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेसाठी साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. ही जागा पालिकेच्या ताब्यात येताच, त्यावर तातडीने ट्रान्सफर टर्मिनल उभारण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. एका महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर नगर रोडवरील बीआरटी कार्यान्वित होऊ शकेल, असा विश्वास महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

वाघोलीतील जागा महापालिकेला टर्मिनलसाठी देण्याकरिता ग्रामपंचायतीने अनेक अटी घातल्या होत्या. पाण्याचे थकित बिल माफ करण्यापासूनच्या अटी महापालिकेने त्या धुडकावून लावल्या होत्या. दुसरीकडे, टर्मिनलशिवाय बीआरटी सुरू करता येणार नाही, अशी ठाम भूमिका पीएमपीने घेतली होती. हा तिढा सुटत नसल्याने अखेर पालकमंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. बैठकीला महापौर प्रशांत जगताप, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा उपस्थित होते.

..

सेवेबाबत स्पष्टता नाहीच

नगर रोड बीआरटी २६ जानेवारीपासून सुरू करण्याचे माजी महापौरांनी जाहीर केले होते. परंतु, काही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने ही तारीख केव्हाच उलटून गेली. त्यामुळे, नूतन महापौरांनी बीआरटी केव्हा सुरू होणार, याची नेमकी तारीख जाहीर न करता एप्रिलमध्ये सुरू होईल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजीनगर नागरी सुविधा केंद्र पूर्ववत

0
0

एजंटांवर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एजंटांकडून होणाऱ्या दमदाटीच्या प्रकारांमुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले शिवाजीनगर गोदामातील नागरी सुविधा केंद्र मंगळवारपासून पूर्ववत झाले. एजंटांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी नागरी सुविधा केंद्राचे काम बंद केल्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला होता.

नागरी सुविधा केंद्रात एजंटांना प्रवेश न देण्याबरोबरच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून केंद्राचे काम सुरू केले. या परिसरात एजंट आढळल्यास त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. नागरी सुविधा केंद्रात पोलिसगस्त ठेवण्यात येणार असल्याचे पुणे शहर प्रांत अधिकारी सोनप्पा यमगर यांनी सांगितले.

नागरिकांनी विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. गोदामात शहर पुरवठा विभागाची परिमंडल कार्यालयेही आहेत. या कार्यालयांत नवीन रेशनकार्ड वितरित केले जाते. रेशनकार्ड काढण्यासाठी गोदामात नागरिकांची गर्दी असते. नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यासाठी एजंटही येतात.

नागरी सुविधा केंद्रात मागील आठवड्यात आलेल्या काही एजंटांना सुरक्षा रक्षकाने हटकले. त्यावरून एजंट आणि सुरक्षारक्षकांत बाचाबाची झाली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही एजंटांनी दमदाटी केली. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांतून एजंट बाहेर गेल्याशिवाय कामकाज सुरू न करण्याचा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला. परिणामी गेल्या चार-पाच दिवसांपासून नागरिक सुविधा केंद्रातील कामकाज बंद होते. सुविधा केंद्र सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, त्यावर तोडगा न निघाल्याने काम बंदच राहिले. मंगळवारी सकाळी तोडगा निघाल्यामुळे नागरी सुविधा केंद्राचे कामकाज पूर्ववत झाले. सुविधा केंद्र सुरू झाल्याने नागरिकांना दाखल मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी होणार ‘आधार’ बंधनकारक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यात येणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मतदानासाठी 'आधार'ची सक्ती झाल्यास बोगस मतदानाला आळा बसू शकणार आहे.

केंद्र सरकारने आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या मतदानासाठी आधारकार्ड हा प्रमुख व महत्त्वाचा पुरावा मानला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच भविष्यात मतदानासाठी 'आधार' व मतदार ओळखपत्र हे दोनच पुरावे ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आगामी वर्षात होणार आहेत. या निवडणुकांची पूर्वतयारी सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयुक्तांनी मागील आठवड्यात बैठक घेऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शंभर टक्के आधार नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील टप्प्यात मतदार यादीलाही आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानासाठी 'आधार' सक्ती करण्याचे हे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे शहर व ग्रामीण भागाची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) ९४ लाख २६ हजार इतकी आहे. त्यातील ८१ लाख ८० हजार नागरिकांना आधारकार्ड देण्यात आले आहे. उर्वरित १२ लाख ४६ हजार नागरिकांची आधार नोंदणी झालेली नाही. या नागरिकांना तातडीने आधारकार्ड देण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आधार नोंदणीचे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांवर आहे. हे प्रमाण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न होत आहे. तसे झाल्यानंतर मतदानासह सर्वच योजनांना आधारची सक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, बँक खाते पासबुक, रोजगार हमी कार्ड, रेशनकार्ड, वाहन परवाना, राज्य व केंद्र सरकारच्या कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, पॅनकार्ड, पेन्शन ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेली मतदार स्लिप आदी पुरावे ग्राह्य धरले जातात. त्यात आधार कार्डचाही नुकताच समावेश करण्यात आला आहे. तथापि, भविष्यात अन्य पुराव्यांची संख्या कमी करून ती आधारकार्ड व मतदार ओळखपत्र व मतदार स्लिपपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपीवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वर्दळीच्या रस्त्यावर ब्रेक डाउन झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस तातडीने न हटविल्यास संबंधित बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिस विभागाने घेतला आहे.

पीएमपीची बस आणि ब्रेकडाउन हे एक समीकरण बनले असून, अशा बंद पडलेल्या बसेस खूप वेळ त्याच जागी उभ्या राहिल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळते. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या बाबत वाहतूक विभागाने पीएमपीला वारंवार सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज, बुधावारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पीएमपीच्या दिवसभरात सुमारे ४० बस वर्दळीच्या रस्त्यावर ब्रेक डाउनमुळे बंद पडत असल्याचे वाहतूक पोलिसांचे निरीक्षण आहे. या बसमुळे वाहतूक कोंडी होते. तसेच, बस तातडीने न हटविल्यामुळे वाहतूक नियमन करणेही अवघड होते. त्यामुळे बस बंद पडल्यानंतर तातडीने बाजूला न केल्यास संबंधित ड्रायव्हर आणि कंडक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी केली आहे.

दरम्यान, ब्रेक डाउन होणाऱ्या बसमध्ये खासगी ठेकेदारांच्या बसचे प्रमाण अधिक आहे. पीएमपीच्या ब्रेक डाउन झालेल्या बससाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. तर ठेकेदारांकडून ब्रेक डाउनकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यांचावर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्यात आला असल्याचे, पीएमपी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी पुण्यात ‘सीयूआय’ची चाचपणी

0
0

राज्य सरकारतर्फे केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी, संशोधकांच्या नवनव्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुण्यात 'सेंटर फॉर अर्बन इनोव्हेशन' (सीयूआय) स्थापन करण्याची चाचपणी सुरू आहे. त्या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी दिली.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकताच लंडनचा दौरा केला. शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये लंडनचे तांत्रिक सहकार्य मिळणार असून, त्याअंतर्गत स्वतंत्र सेंटर निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी लंडनच्या 'फ्युचर सिटी कॅटापट'चे सहकार्य लाभणार आहे, असा दावा आयुक्तांनी केला. एक एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत त्याचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार असून, त्यानंतर तो केंद्र सरकारला सादर केला जाईल. शहरातील विद्यार्थी, नागरिक, संशोधक आणि तज्ज्ञांसह देशभरात नवनव्या कल्पनांची मांडणी करणाऱ्या सर्वांना अशा सेंटरचा उपयोग होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, अशा सेंटरद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

शहर वाहतूक आराखडा

शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) यापूर्वीच तयार करण्यात आला असला, तरी तो सात वर्षांपूर्वीचा आहे. नव्या रचनेत सायकल, बस वाहतूक, बीआरटी, मेट्रो अशा सर्व वाहतूक सेवांचा एकत्रित विचार करून वाहतुकीचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्याची गरज असून, पालिकेतर्फे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

................

लेखी नव्हे; तोंडी परवानगी

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य, केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेताच लंडनचा दौरा केल्याची टीका काँग्रेसतर्फे केली जात आहे. त्याबाबत खुलासा करताना कुमार म्हणाले, 'फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच मंजुरीसाठीची सर्व कागदपत्रे सरकारला पाठविण्यात आली होती. त्याला काहीसा विलंब झाला. ब्रिटन सरकारने हा दौरा निश्चित केला असल्याने आयत्यावेळी तो पुढे ढकलणे किंवा रद्द करणे शक्य नव्हते. त्यामुळे, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी परवानगी घेऊनच दौऱ्यावर गेलो होतो.' केंद्र-राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या लेखी स्वरूपात प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातानंतर शॉर्टसर्किट; पीएमपी जळून खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर कोर्टाजवळ दुचाकीची धडक बसल्यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे पीएमपीएलची बस जळून खाक झाली. बस चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी शिवाजीनगर गोदामासमोर ही घटना घडली. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले.

शरद भागवत आणि त्यांची मुलगी प्रजक्ता भागवत अशी जखमींची नावे आहेत. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगरवरून मुंढव्याकडे निघालेल्या बसला शासकीय गोदामासमोर दुचाकीची समोरून धडक बसली. त्यामध्ये दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी बसखाली अडकले. या अपघातामुळे सीएनजी बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात धूर निघाला. चालकाने सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरविले. बस मागे घेऊन बसखाली अडकलेल्या दाम्पत्याला त्वरित बाजूला काढले. त्यानंतर काही क्षणांतच बसच्या पुढील बाजूला आग लागली. बस फायबरची असल्याने आग वेगाने वाढली. त्यानंतर त्वरित अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाच मिनिटांतच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या कारवाईत तांडेल, यशवंत अभ्यंकर, संजय गायकवाड, अजय लोंढे, एकनाथ कुंभार, चालक समीर शेख यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणबद्ध गायकीसाठी धृपदसराव गरजेचा

0
0

पं. हळदणकरांनी टोचले शॉर्टकट मारणाऱ्यांचे कान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तंबोरा जुळवून आ करणे ही कृत्रिमता आहे. तंबोरा लावल्यानंतर ख्याल आळवायला सुरुवात केली जाते. त्यामध्ये सैरभैरता असते. कायदे सांभाळून प्रमाणबद्धतेने गायचे असेल तर, धृपद गायकीचा सराव करावा लागेल. धृपद गायकी मूळ आहे, हे कलावंतांनी विसरू नये,' अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि व गुरू पं. बबनराव हळदणकर यांनी शास्त्रीय संगीतातून सोपा मार्ग शोधणाऱ्यांचे मंगळवारी कान टोचले.

'पं. त्र्यंबकराव जानोरीकर संगीत-भूषण पुरस्कार' ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना पं. हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायिका आणि पं. जानोरीकर यांच्या शिष्या पंडिता डॉ. सुहासिनी कोरटकर पुरस्कृत हा पुरस्कार गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी देण्यात येतो. डॉ. कोरटकर, संस्थेचे अध्यक्ष कृ.गो.धर्माधिकारी, वासंती ब्रह्मे याप्रसंगी उपस्थित होते.

धृपद गायकी पूर्वीसारखी जोमात नाही, हे खरे असले तरी तेच मूळ आहे. गायन शिकताना आधी धृपदच शिकवले जाते, याकडे लक्ष वेधून पं. हळदणकर म्हणाले, 'धृपद गायकी सर्वांत मार्गदर्शक आहे. गायनात जी प्रमाणबद्धता लागते, ती धृपदमधून येते. गुणगुणण्यातून गाण्याची उत्क्रांती होत असते.' 'मी संगीताचा लहान सेवक आणि साधक आहे. कोणीतरी माझी आठवण काढेल, या विचारात होतो. पुण्यातील लोक डागर यांना विसरले आहेत. या सन्मानाची मी वाट पाहत होतो. हा पुरस्कार माझ्यासाठी रिवॉर्ड आहे,' अशी भावना उस्ताद डागर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उस्ताद डागर यांनी 'गायकी डागर घराण्याची' या मैफलीतून घराण्याची गायकी उलगडली. गायन साथ उस्ताद नफीसुद्दीन आणि अनिसुद्दीन डागर यांनी केली. तानपुऱ्यावर प्रतिमा कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी व प्रीमित यांनी तसेच पखवाजवर उद्धव आपेगावकर यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन सविता हर्षे यांनी केले.

..

'दोनशे वर्षांनी घराणी एकत्र'

'आग्रा आणि डागर घराणे दोनशे वर्षांपूर्वी एकत्र होते. आग्रा घराण्याचे उस्ताद घग्गु खाँ आणि डागर घराण्याचे बाबा बेहुराम खाँ हे दिग्गज जयपूर येथील रामसिंग यांच्या दरबारात एकत्र होते. आज मी आणि सईदुद्दीन डागर एकत्र आलो आहोत. दोनशे वर्षांनंतर ही घराणी एकत्र आल्यासारखे वाटत आहे,' अशी भावना व्यक्त करत पं. बबनराव हळदणकर यांनी आठवणींना उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली असून, शहरात मंगळवारी कडक उन्हामुळे चांगलाच उकाडा जाणवला. वाढत्या तापमानाबरोबरच हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढत असल्याने शुक्रवारपासून दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शहरात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तर, १६.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. लोहगाव येथे कमाल ३६.२ आणि किमान १८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान परभणी येथे (३८.५ अंश सेल्सिअस) तर सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे (१५.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मध्य प्रदेशाच्या काही भागात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्याचबरोबर राज्यात पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शुक्रवारापासून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.


प्रमुख शहरांचे कमाल तापमान


शहर अंश सेल्सिअस


परभणी ३८.५

सोलापूर ३८.२

सांगली ३७.६

नागपूर ३६.६

जळगाव ३६.२

उस्मानाबाद ३५.७

नाशिक ३४.४

सांताक्रूझ ३४.४


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या खिशाला चाट

0
0

भामा-आसखेडसाठी धरणग्रस्तांच्या मोबदल्याचा भार पडणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागांतील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड योजनेला गती देण्यासाठी आळंदी नगरपरिषदेसह धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा भार महापालिकेवर पडणार आहे. आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी रुपये देण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती भुर्दंड बसणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

विमान नगर, धानोरी, कळस अशा पूर्व भागांतील नागरिकांसाठी भामा-आसखेड धरणातून राज्य सरकारने सुमारे अडीच टीएमसी पाणी मंजूर केले आहे. या योजनेचे ३० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी प्रकल्पाचे काम थांबविले होते. महापालिकेच्या योजनेतूनच आळंदी नगरपरिषदेलाही पाणी देण्यात येण्याची मागणी होत होती. चार महिन्यांपासून प्रकल्प रखडल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, जिल्हाधिकारी सौरव राव, पालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थानिक आमदार सुरेश गोरे, बाळा भेगडे उपस्थित होते.

आळंदी नगर परिषदेलाही भामा-आसखेड योजनेतून पाण्याचा स्वतंत्र कोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, पुण्याच्या योजनेवरूनच पाणी घेण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र, महापौर आणि महापालिका आयुक्तांनी त्याला तीव्र विरोध केला. आळंदी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या योजनेसाठी ९० टक्के आर्थिक मदत करण्याचे सरकारने कबूल केले, तर उर्वरित १० टक्के म्हणजेच चार कोटी रुपये पुणे महापालिकेने द्यावेत, यावर सहमती झाली.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीही येत्या आठ दिवसांत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश बापट यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांना दिले. शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मोबदला द्यावा लागणार असून, ही रक्कम पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य सरकार यांच्या सहभागातून उभी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतरच पालिकेच्या तिजोरीवर आणखी किती बोजा पडणार हे देखील स्पष्ट होईलच. मात्र, योजनेच्या खर्चाशिवायचा हा अतिरिक्त खर्च पालिकेला भागवावा लागणार असल्याने त्यावरून टीका होत आहे.

..................

शिवसेनेची आडमुठी भूमिका

महापालिकेच्या भामा-आसखेड योजनेचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. पालकमंत्र्यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतले असले, तरी काम सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांबाबत पुढील आठ दिवसांत प्रगती झाल्याचे दिसून आल्यास, काम सुरू होईल अशी आडमुठी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे, या योजनेचे काम नक्की कधी सुरू होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायमच आहे.

......................

भामा-आसखेड योजनेचे काम बंद असल्याने खर्चांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे, सामंजस्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न बैठकीत झाला.

प्रशांत जगताप,

महापौर, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार

0
0

महापौरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत मेट्रोच्या मान्यतेसह १० कोटी रुपयांच्या तरतुदीत वाढ न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रोला सहाशे कोटी रुपये, तर पुणे मेट्रोसाठी अवघी १० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यावरून, काँग्रेसने गेल्या आठवड्यातच शहराच्या खासदार-आमदारांवर टीका केली. आज त्यात सत्ताधारी राष्ट्रवादीनेही त्यात उडी घेतली. 'पुण्यात मेट्रोचा प्रकल्प प्रलंबित असला, तरी मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यात असल्याने त्यासाठी किमान दोनशे कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. नागपूरबरोबरच मुख्यमंत्र्‍यांनी पुण्यासाठीही शब्द टाकला असता, तर १० कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले नसते. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्रीही पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत असून, त्यांना मेट्रो प्रकल्प गुंडाळायचा आहे, असे दिसते', या शब्दांत महापौरांनी केंद्र-राज्यातील सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढले.

केंद्रीय अर्थसंकल्प अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे, पुण्याच्या मेट्रोसाठी वाढीव तरतूद करता येऊ शकते. त्यासाठीच, आपण मुख्यमंत्र्यांना नुकतेच पत्र पाठविले आहे. मेट्रो प्रकल्पासाठी वाढीव तरतूद झाली नाही, तर पुणेकरांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा जगताप यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांची वीज महागणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महावितरण'ने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेला सहा ते आठ टक्के दरवाढीचा प्रस्ताव आणि इंधन समायोजन आकार यांचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील उद्योगांना सुमारे वीस टक्के वीज दरवाढीला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील वीजदर शेजारी राज्यांतील दराच्या दीडपट होणार असून, 'मेक इन महाराष्ट्र' या महत्त्वाकांक्षी मोहिमेलाही यामुळे दणका बसण्याची शक्यता आहे. वीज नियामक आयोगाकडे महावितरणने सहा ते आठ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच दिली आहे. त्याबरोबरच सध्याच्या वीज दरांमध्ये १२ ते १३ टक्के इंधन समायोजन आकार (एफएसी) समाविष्ट करण्यात आला आहे. 'यामुळे उद्योगांचा वीज दरवाढीचा शॉक वीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे,' असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

एकीकडे 'मेक इन महाराष्ट्र'ची मोहीम घेऊन उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या वीज दरवाढीने विकासाची स्वप्ने कागदावर राहतील, अशी टीकाही त्यांनी केली. सत्तेवर येताच सहा महिन्यांत वीजदर कमी करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. मात्र, अजूनही ते प्रत्यक्षात आलेले नाही. अशीच स्थिती २०१३ मध्ये निर्माण झाली होती. त्या वेळी उद्योगांनी राज्याबाहेर जाण्याचा इशारा दिला. तेव्हा सरकारने तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती नियुक्त केली आणि सातशे कोटी रुपयांचे अनुदान देऊन वीजदर नियंत्रणात ठेवले होते. आताही सरकारने असा धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणी होगाडे यांनी केली आहे. राज्यभरात साडेतीन रुपये प्रतियुनिट या दराने हवी तेवढी वीज उपलब्ध होऊ शकते; परंतु सरकारी महानिर्मिती कंपनीच्या प्रकल्पांमधून साडेचार ते सहा रुपये प्रतियुनिट अशा महाग दराने वीजखरेदी सुरू आहे. त्यामुळे उद्योगांसह सर्वच वीज ग्राहकांना दरवाढीचा बोजा सोसावा लागत आहे.

औद्योगिक वीजदरांची तुलना (जाने. १६)

(रुपये प्रतियुनिट)

महाराष्ट्र - ८.३९

कर्नाटक (शहरी) - ६.४५

गुजरात - ५.८०

आंध्र प्रदेश - ६.८०

मध्य प्रदेश - ६.६०

छत्तीसगड - ५.५०

गोवा - ३.८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको सेन्सिटिव्ह झोनद्वारे लोणारचा बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगप्रसिद्ध लोणार विवर आणि सरोवराला जगभरातील शास्त्रज्ञ नैसर्गिक प्रयोगशाळा मानत असले, तरी राज्य आणि केंद्र सरकारच्यामते ते स्थानिकांच्या विकासातील अडथळा ठरले आहे. लोणारचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये (ईएसझेड) करण्याच्या अधिसूचनेचा मसुदा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केला आहे. मात्र, हा इको सेन्सिटिव्ह झोन लोणार विवराच्या व्याप्तीपेक्षाही कमी असून, स्थानिक राजकारणाच्या दबावामध्ये लोणार विवराचा बळी देण्याचे काम सरकारतर्फे होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) आणि लोणारच्या संवर्धनासाठी काम करणारे प्रा. सुधाकर बुगदाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केंद्राच्या अधिसूचनेच्या मसुद्याविषयीचे आक्षेप मांडले. 'हीच अधिसूचना कायम राहिल्यास लोणारचे संवर्धन होण्याऐवजी लोणारचा ऱ्हास होईल,' असे मत प्रा. बुगदाणे यांनी या वेळी व्यक्त केले. देशभरातील पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांना इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्याचे आणि त्यांच्या संवर्धनाचा आराखडा करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारतर्फे लोणारची इको सेन्सिटिव्ह झोनसाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली. केंद्राने २० नोव्हेंबर २०१५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यानुसार लोणार अभयारण्यापासून फक्त शंभर मीटरचा परिसर ईएसझेड म्हणून घोषित करण्यात आला.

मसुद्यात जाहीर करण्यात आलेले 'ईएसईझेड'चे सर्व क्षेत्र लोणार विवराच्या एकूण व्याप्तीपेक्षाही कमी असल्याचे सीसीएसने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. याबाबत प्रा. बुगदाणे म्हणाले, 'लोणारला ईएसझेड म्हणून घोषित करताना लोणार ज्यासाठी ओळखले जाते त्या विवराचा, खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा आणि प्राचीन मंदिरांचा विचार करण्यात आलेला नाही. लोणारच्या विवराची व्याप्ती विवराच्या कडेपासून सुमारे पाचशे ते हजार मीटरपर्यंत पसरलेली आहे. इएसझेड या व्याप्तीपेक्षा कमी असून, तो कायम राहिल्यास विवराचा भाग असणाऱ्या 'इजेक्टा'वर (अशनीच्या आघातातून विवराच्या चोहोबाजूंना पसरलेला ढीग) तत्काळ अतिक्रमण होण्याचा धोका आहे. लोणारची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये माहित असतानाही स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्या निकषावर शंभर मीटर इतके कमी अंतर सुरक्षित म्हणून घोषित केले हे समजायला हवे.'

लोणारच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. 'इको सेन्सिटिव्ह झोन'च्या अधिसूचनेनुसार या पाचशे मीटरच्या आतील बराचसा भाग प्रतिबंधित राहत नाही. 'इको सेन्सिटिव्ह झोन' लोणारच्या रक्षणासाठी आहे किंवा विवरावरील अतिक्रमणे अधिकृत करण्यासाठी असा सवाल 'सीसीएस'ने उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली सहाव्या शतकातील गोष्ट

0
0

अप्रकाशित ताम्रपटात तेलगी गावाच्या दानाचा उल्लेख

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातल्या तेलगी (ता. बसवन बागेवाडी) या गावाचे सहाव्या शतकात चंद्रग्रहणाच्या प्रसंगी दान करण्यात आले होते. बदामीच्या चालुक्य घराण्याचा राजा विनयादित्य हा अरद्रू येथे छावणीत असताना त्याने दिलेल्या दानपत्रात हा उल्लेख आलेला आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे आयोजित परशुराम कृष्ण गोडे स्मृती व्याख्यानमालेत मंगळवारी हा इतिहास उलगडला. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट आणि 'इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्स'चे अध्यक्ष प्रदीप सोहोनी यांनी या व्याख्यानात दोन अप्रकाशित ताम्रपटांचे वाचन केले. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

बदामीचा चालुक्य नृपती विनयादित्य याचा ताम्रपट (१७ एप्रिल, इसवी सन ६८३) आणि यादव नृपती कृष्ण (कन्हरदेव) याचा संशयित ताम्रपट (२९-३० एप्रिल, इसवी सन १२५४) अशा दोन ताम्रपटांची माहिती या वेळी देण्यात आली. तेलगी गावाबाबतच्या ताम्रपटात हे गाव गौतम गोत्रातील एका विद्वानाला देण्यात आले होते. हे गाव कृष्णा नदीच्या उत्तर तीरावर आहे. तेलगी गावासोबतच धन्नगुल म्हणजेच कृष्णा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले धन्नूर हे गावही या दानपत्राद्वारे देण्यात आले होते. तेलगी जवळच्याच मसूती या गावाचा उल्लेखही यात आला आहे.

या दानपत्राची तीन पत्रे असून, त्यावर एकूण ३३ ओळींचा मजकूर आहे. पत्रे तांब्याच्याच कडीत ओवलेले आहेत. त्यावर राजाची वराहमुद्राही अंकित करण्यात आलेली आहे. या संचाचे वजन १८१५ ग्रॅम आहे. या ताम्रपटावर मोठ्या प्रमाणात किटण चढलेले होते. रासायनिक प्रक्रियेद्वारे ते स्वच्छ करून त्याचे वाचन करण्यात आल्याचे बापट आणि सोहोनी यांनी सांगितले.

सहाव्या-सातव्या शतकांतील ताम्रपटातून महत्त्वाचे दुवे उलगडले. तेव्हापासून प्रादेशिक भाषा आणि लिपीचा वापर सुरू झाल्याचे यातून दिसते, असे ढवळीकर म्हणाले. संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागची भूमिका सांगितली. डॉ. अमृता नातू यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरांच्या मैफलीत रंगला महोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पं. अजय पोहनकरांचे मंत्रमुग्ध करणारे गायन...लोकप्रिय गीतांना मिळालेली उत्स्फूर्त दाद...अभिनेता सुबोध भावे यांचे निवेदन आणि नृत्य-वाद्यांचा अविष्कार यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या स्वरसागर महोत्सवातील मैफल रंगतदार झाली.

चिंचवड संभाजीनगर येथे स्वरसागर महोत्सवाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाले. स्थानिक कलाकार सागर उपासनी, पूनम आसवले, विधी शर्मा, अभिलाषा गजभिये यांनी भाग घेतला. पायल नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी शिववंदना, तराणा आणि फ्युजन नृत्य सादर केले. पायल गोखले दिग्दर्शित या कार्यक्रमात संगीता शाळिग्राम, अक्षता टिळक, तृप्ती आळतेकर, गायत्री वळवईकर, मानसी भागवत, वैभवी पंडित, स्वप्नाली डुबे यांनी भाग घेतला. नंतरच्या सत्रात सौरभ साळुंके यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग 'मधुवंती'मधील बंदिश सादर केली. 'सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी' या अभंगाने वातावरणात भक्तिभाव निर्माण झाला. त्यांना अभिजित पाटसकर (संवादिनी), केदार तळणीकर (तबला) यांनी साथ केली. अभिनेते सुबोध भावे आणि गायक महेश काळे यांनी 'सूर निरागस हो' संगीतमय कार्यक्रम सादर केला. 'संगीत स्वयंवर'मधील 'नाथ हा माझा, मोही खला' नाट्यपदाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातील 'मनमंदिरा तेजाने' गीत सादर केले. 'दिलकी तपीश आज है आफताब' गीताने महोत्सवाची रंगत वाढवली. 'शिव भोला भंडारी' गीताने सांगता झाली. राजीव तांबे (संवादिनी), विभव खांडोळकर (तबला), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), प्रसाद जोशी (पखवाज), मंदार ढुमणे (गिटार), वैभव केसकर (ढोलक), शिरीष जोशी (तालवाद्य) यांनी साथ केली.

शेवटच्या सत्रात, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांचे गायन झाले. त्यानंतर अनेकविध रचना सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. भैरवीतील ठुमरीने सांगता झाली. त्यांना सुरंजन खंडाळकर (गायन), संतोष घंटे (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), शरद सिधये (तानपुरा) यांनी साथ केली. पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका वनिता थोरात या वेळी उपस्थित होत्या. प्रवीण तुपे, संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी, डॉ. नंदकिशोर कपोते यांनी संयोजन केले. सरोज राव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बप्पीदांच्या स्वरांवर तरुणाईचा ठेका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

याद आ रहा है तेरा प्यार...तुने मारी एंट्री और दिल में बजी घंटी... इन्तहां हो नयी इंतजारकी... अशा बहारदार गाण्यांतून कलंदर बप्पीदा रसिकांनी अनुभवले. बप्पीदांच्या साथीने अवघी तरुणाई 'आय एम ए डिस्को डान्सर,' असे म्हणण्यात बेधुंद झाली होती.

भारत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महाशिवरात्र महोत्सवाची सांगता प्रख्यात संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांच्या मैफलीने झाली. बप्पीदांसह सौरभ गाडगीळ आणि डॉ. रणजित जगताप यांना 'शिवशक्ती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, अभिनेते रणजित, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, नगरसेवक उमाकांत आंदेकर, महोत्सवाचे संयोजक बाळासाहेब दाभेकर उपस्थित होते.

आय एम ए डिस्को डान्सर...के पग घुंगरू बांध...दे दे प्यार दे प्यार दे...या गाण्यांच्या फ्युजनने तरुणाईला भारावून टाकले. बप्पी लाहिरी यांच्या गायनाला त्यांचे पुत्र बाप्पा लाहिरी यांनी साथ केली. गायिका सोनाली, राजेश्वरी, मकरंद पाटणकर, कल्याणी शेळके, शेखर गरुड या गायकांनी रसिकांना खिळवून ठेवले. निवेदन संदीप पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगार कमी दिल्यानेमागितली खंडणी

0
0

पुणे : नोकरी करत असताना पगार कमी देत असल्याच्या कारणावरून एका तरुणाने पिंपरीतील उद्योजकाकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. अमेल उर्फ सोन्या राजू भालेराव (वय १९, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील एका उद्योजकाला ४ मार्च रोजी पाच लाख रुपयांची खंडणी मागणी करणारा फोन आला होता. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. उद्योजकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असता खंडणीसाठी फोन करणारी व्यक्ती भालेराव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार व त्यांच्या पथकाने इंदिरानगर झोपडपट्टी भागात माहिती काढून आरोपीला अटक केली. त्याने वापरलेला फोन पोलिसांनी जप्त केला आहे. भालेराव याच्याकडे तपास केला असता त्याने उद्योजकाला घाबरविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले. भालेराव हा या उद्योजकाकडे एक वर्षापूर्वी नोकरीला होता. त्यावेळी उद्योजक त्याला खूपच कमी पगार देत होता. त्यामुळे त्याने नोकरी सोडून दिली. पगार कमी देत असल्याचा रागातून उद्योजकाला हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीकर ठक गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बजाज अलाएन्झ' व 'बजाज फायनान्स'मधून बोलत असल्याच्या बहाण्याने ७५० नागरिकांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करणारी दिल्लीतील ठकांची टोळी गजाआड झाली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तिघा उच्चशिक्षित आरोपींना अटक करून त्यांचे विविध बँकांचे नऊ अकाउंट गोठवले आहेत.

मनीष गोपाल गुप्ता (वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली), तरुण शंकर गुप्ता (वय २३, रा. उत्तमनगर, दिल्ली) आणि अवनीशकुमार श्रीसुरेश ​​सिंग (वय ३६, रा. नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अवनिश हा 'येस' बँकेचा कर्मचारी असल्याची माहिती सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे आणि सहायक आयुक्त किशोर नाईक यांनी दिली.

या प्रकरणी कोंढवा येथील सलीम अमीर शेख (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्या पत्नीला किडनीचा त्रास आहे. तिच्या उपचारांसाठी त्यांना दहा लाख रुपयांची आवश्यकता होती. या दरम्यान त्यांना मोबाइलवर आलेल्या फोनवर पर्सनल लोनबाबत विचारणा झाली होती. आरोपींनी ते बजाज अलाएन्झ सोल्युशनमधून बोलत असल्याचे सांगितले होते. शेख यांना पर्सनल लोन देण्याच्या बहाण्याने आरोपींना त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून एक लाख १७ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला असता, आरोपींचा वावर हा दिल्लीत असल्याचे आढळले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक संजय ठेंगे, फौजदार प्रवीण स्वामी, राजू भिसे, अस्लम अत्तार, सरिता वेताळ, व्ही. एस. पाटील यांनी दिल्लीतून तिघा आरोपींना अटक केली. या आरोपींनी वापरलेली नऊ अकाऊंट गोठावण्यात आली असून त्याद्वारे चार लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

फसवणुकीचे कॉल सेंटर

आरोपींनी दिल्लीत छोटे कॉल सेंटर उभारले होते. या कॉल सेंटरद्वारे देशभरातील विविध नागरिकांना फोन करून फसवण्यात येत होते. आरोपींनी वापरलेल्या बँक अकाउंटच्या प्राथमिक तपासात त्यांनी तब्बल ७५० नागरिकांना फसवल्याचे संशय आहे. या आरोपींनी गेल्या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांना अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. सर्वसामान्य नागरिकांनी या आरोपींच्या अकाउंटवर पैसे भरल्यानंतर अवघ्या काही तासांत त्या अकाउंटवरील पैसे काढण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुरिअर कंपनीशीही संपर्क

सायबर सेलने पकडलेले तिन्ही आरोपी हे पदवीधर आहे. त्यातील एक जण बँकेत नोकरी करीत असल्याने त्याला बँकेच्या व्यवहारांची पूर्ण माहिती होती. आरोपींच्या जाळ्यात एखादी व्यक्ती अडकली, तर ती कुठल्या भागात राहणारी आहे, याचा माहिती घेण्यात येत असे. 'जस्ट डायल'शी संपर्क साधून त्या भागातील कुरिअर कंपनीशी संपर्क साधण्यात येई. कुरिअर कंपनीला आपण दिल्लीस्थित कंपनीतून बोलत असून पुण्यात ऑफिस टाकण्यास परवडत नसल्याचे सांगण्यात येत असे. तुमच्या भागातील काही कुरिअर पोहोच करायचे आहेत, असे सांगून त्यांना पैसे देण्यात येत असत. दरम्यान, जाळ्यात अडकलेल्या ग्राहकाला आपण कंपनीचा कर्मचारी पाठवत असून त्याच्याकडे चेक; तसेच कागदपत्रे पाठवून द्यावी, असे सांगण्यात येत असे. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने गोळा केलेले चेक त्याच्याकडून बडोदा येथे पाठवण्यात येत असे. बडोद्यातही अशाच प्रकारे एखाद्या कुरिअर कंपनीशी संधान साधून त्यांच्याकडे आलेले चेक बँकेत भरण्यास सांगत. त्यानंतर बँकेत रोकड जमा झाली की, ती लगेचच काढण्यात येत असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेगाड्यांच्या मार्गात उद्या बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात येणाऱ्या पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर मळवली ते कामशेत दरम्यान पुलाचे काम येत्या शुक्रवारी (ता. ११ ) दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत ये-जा करणाऱ्या काही लोकलच्या फेऱ्या आणि प्रवासी रेल्वेगाड्यांची सेवा बदललेली असेल, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी बुधवारी दिली.
शुक्रवारी पुणे-लोणावळा लोकलच्या दुपारी १, ३ आणि ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणाऱ्या फेऱ्या रद्द असतील. लोणावळा-पुणे लोकलच्या दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी, संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी आणि ६ वाजून २० मिनिटांनी सुटणाऱ्या फेऱ्या रद्द असतील. तसेच पुणे - तळेगाव लोकलची ३ वाजून ४० मिनिटांनी आणि तळेगाव - पुणे लोकलची ४ वाजून ४० मिनिटांची फेरी रद्द असेल.
दरम्यान, या कालावधीत पुणे-कर्जत आणि कर्जत-पुणे सवारी रेल्वेगाडी रद्द असेल. संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी पुणे-बारामती सवारी रेल्वेगाडी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस निर्धारित मार्गाऐवजी दौंड, मनमाड मार्गाहून जाईल. पुणे-छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई (सीएसटीएम) डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-इंदौर एस्क्प्रेस या रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा एक ते दोन तास उशीराने धावतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पावर पालिकेत चर्चाच नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पुरेशा गणसंख्येअभावी तहकूब करावी लागल्याने स्थायी समितीने मांडलेल्या २०१६-१७ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पावर चर्चाच होऊ शकली नाही. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पालिकेतील कारभाऱ्यांमध्येच नागरी हितावरून 'तू-तू-मैं-मैं' झाली.

स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेचे कामकाज सुरू झाले, त्यावेळी सभागृहात केवळ दोन सदस्य उपस्थित होते. महापालिकेचे बहुसंख्य अधिकारीही अनुपस्थित होते. पुढील १०-१५ मिनिटांत प्रमुख पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक सभागृहात दाखल झाले, तरी सभागृहातील सदस्यांची संख्या मोजकीच होती. परिणामी, महापौर प्रशांत जगताप यांनी अर्ध्या तासासाठी सभा स्थगित केली.

सभेचे कामकाज अर्ध्या तासाने पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी पालिका आयुक्त का उपस्थित नाहीत, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे आणि मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी केली. काँग्रेसच्या संजय बालगुडे यांनी सभेसाठी आवश्यक गणसंख्या आहे का, असा सवाल उपस्थित केला. सभागृहनेते बंडू केमसे यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून पुण्याच्या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस आणि मनसेवर केला. तर, आयुक्त नसल्याने अर्थसंकल्पावरील स्तुती आणि त्यातील त्रुटी कोणासमोर मांडायच्या, असा प्रतिप्रश्न शिंदे यांनी केला. विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने काँग्रेसतर्फे रडीचा डाव खेळला जात असल्याचे प्रत्युत्तर केमसे यांनी दिले.

महापौर आणि नगरसचिवांनी नियमबाह्य काम करू नये, गणसंख्या विचारली असताना इतर कामकाज थांबवावेच लागते, असा धोशा काँग्रेस आणि मनसेने लावून धरला. अखेर, या सर्व गदारोळात महापौरांनी गणसंख्या मोजण्याचे आदेश नगरसचिवांना दिले. पुरेशी गणसंख्या नसल्याचे स्पष्ट होताच, अर्थसंकल्पावरील चर्चा एक दिवस पुढे ढकलण्यात आली.



काँग्रेस, मनसेचे राजकारण

सभागृहामध्ये पुरेशी गणसंख्या नसल्याने सभा चालविता येणार नाही, हे सुरुवातीच्या १०-१५ मिनिटांमध्येच स्पष्ट झाले होते. सभागृहात उशिराने दाखल होणाऱ्या सभासदांना त्याची कल्पना नव्हती. काँग्रेस किंवा मनसेचे सदस्य सभागृहात येताच, दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना बाहेर जाण्यासाठी खुणावले जात होते. या सभासदांची गणती झाली असती, तर कदाचित आवश्यक गणसंख्या भरली असती. आणि सभेचे कामकाज पुढे नेता आले असते. काँग्रेस आणि मनसेला सभाच होऊ द्यायची नसल्याने त्यांनी सभागृहात येणाऱ्या सदस्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविला.



सह्या करणारे सदस्य गैरहजर

सभागृहात पुरेशी गणसंख्या आहे का, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले. काँग्रेसकडून गणसंख्या मोजण्याचा आग्रह धरला जात असताना, राष्ट्रवादीने सर्वसाधारण सभेच्या हजेरी नोंदवहीत सह्या केलेल्या सदस्यांची आकडेवारी जाहीर केली. या नोंदवहीत सह्या केलेल्या सदस्यांची संख्या अधिक असली, तरी प्रत्यक्ष सभागृहात सदस्य उपस्थित नव्हते. सभागृहनेते बंडू केमसे यांनी त्याला आक्षेप घेत, सह्या करून अनुपस्थित असणारे सदस्य गेले कुठे, अशी विचारणा केली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातावरणातील बदलांमुळे ग्लायडर कोसळले

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

ग्लायडर सुरक्षित ठिकाणी उतरविताना हवेच्या अचानक बदलेल्या प्रवाहामुळे ते कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलट किरकोळ जखमी झाला. पायलटच्या प्रसंगाधानामुळे मोठी जीवितहानी टळली. ही घटना गोंधळेनगर येथील भाजी मंडईसमोर दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेत लक्ष्मण दत्तात्रय कोकाटे (वय ६५ रा. विमाननगर, पुणे ) हे जेष्ठ पायलट किरकोळ जखमी झाले आहेत. कोसळलेले ग्लायडर विमान व्हीटीजीएलके एल-२३ या क्रमांकाचे असून पायलटसह एक प्रवासी बसेल एवढी त्यामध्ये व्यवस्था होती. हे ग्लायडर लक्ष्मण कोकाटे नेहमीप्रमाणे चालवत होते. हवेच्या दाबावर या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक त्याचे लँडिंग करावे लागणार होते. नागरी वस्तीवर घिरट्या घालणाऱ्या वैमानिकाने प्रसांगावधान राखून नागरी वस्तीच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात हे विमान उतरण्याचा प्रयत्न केला. ग्लायडर कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. नागरी वस्तीमध्ये आलेल्या विमानाला पाहण्यसाठी एकच गर्दी झाली होती. ग्लायडर कोसळल्याचे समजताच प्रशिक्षण केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमी कोकाटे यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठविले. त्यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. लक्ष्मण कोकाटे म्हणाले, मी अकाशात दीड हजार फूट उंचावर होतो. लोणी काळभोर या गावापर्यंत मी गेलो होते. परत येत असताना अचानक हवामानात बदल झाला. त्यामुळे ग्लायडर खाली खेचले गेले. ग्लायडिंग सेंटरवरील रन-वेवर लँडिंग करणे शक्य नव्हते. त्यामुळे मोकळ्या मैदानावर लँडिंग केलेहे. संकटकालीन स्थितीत लोकवस्तीपासून दूर ग्लायडर लँडिंग कसे करायचे याचे आम्हाला प्रशिक्षण दिले जाते. या घटनेत विमानाचे किरकोळ नुकसान झाले.' ग्लायडिंग सेंटरचे प्रमुख कॅप्टन शैलेश चारभे म्हणाले, 'कोकाटे हे पूर्ण प्रशिक्षित आहेत. ग्लायडर हे केवळ हवेवर चालते. हवेत अचानक बदल झाल्यास हवा ग्लायडरला उंच अथवा खाली खेचते. हे प्रसंग नित्याचेच असतात. बऱ्याचदा मोकळ्या जागेत अथवा शेतात लँडिंग केले जाते. मात्र, कोकाटे यांनी कौशल्य पणाला लावून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकवस्तीत अरुंद मोकळी जागा शोधून लँडिंग केले आणि नागरिकांना सुखरूप ठेवले.'



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images