Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आपल्या मराठीची रंगणार आजपासून ‘मैफल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अमृताते पैजा जिंकणाऱ्या आपल्या मराठी भाषेचा, त्यातील साहित्याचा, त्यातील कवितांचा, गाण्यांचा आगळा उत्सव आज, आजपासून सुरू होतो आहे. निमित्त आहे, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मैफल' या आगळ्या साहित्य सोहळ्याचे. डेक्कन जिमखान्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारात आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) सकाळी साडेदहा ते रात्री नऊपर्यंत या मैफलीत रंगणार आहे लेखन-वाचनावरील चर्चा, साहित्यिकांशी संवाद, कवितावाचन, गीत- काव्यांचा सुरेल कार्यक्रम आणि लेखन कार्यशाळा. हे कार्यक्रम सर्वांना खुले आहेत. आज सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या मैफलीचे उद्घाटन होणार आहे.

अभिजात मराठीपासून ग्लोबल मराठीपर्यंत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या, कवितेपासून गाण्यापर्यंत जाणाऱ्या, नव्या लेखणीला बळ देणाऱ्या या मैफलीचे हे दुसरे वर्ष आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची खास मुलाखत होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता तरुण लेखक काय वाचतात, ते काय लिहितात याचा परामर्श घेणारा परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये रवी कोरडे, विभावरी देशपांडे, जुई कुलकर्णी, उत्पल चंदावार हे सहभागी होतील. दुसरा परिसंवाद अभिजात मराठी ते जागतिक मराठी हा प्रवास उलगडणारा असून तो संध्याकाळी ४ वाजता होईल. या परिसंवादात हरी नरके, सुनीला गोंधळेकर, शंतनू खेर व मराठी भाषा शिकणारे परदेशी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी पटकथा आणि संवाद लेखन कार्यशाळाही होणार आहे. ही कार्यशाळा 'बालक पालक', 'यलो' या सिनेमांचे लेखक अंबर हडप घेतील.

नव्या कवींना खास मंच देणारा कवीकट्टा दुपारी २ वाजल्यापासून ज्ञानवृक्षाखाली रंगेल. साधारण ५० कवींना पहिल्या दिवशी सादरीकरणाची संधी मिळेल. या दिवसाची सुरेल सांगता लोकप्रिय संगीतकार-गायक सलील कुलकर्णी हे 'कवितेतून गीताकडे' या कार्यक्रमाने करतील. या कार्यक्रमांच्या बरोबरीने पुस्तके चाळण्याची, वाचण्याची आणि आपल्या आवडत्या लेखकाची पुस्तके विकत घेण्याची संधीही या मैफलीच्या निमित्ताने मिळणार आहे. प्रकाशक आणि विक्रेते पुस्तकांचा खजिनाच घेऊन वाचकांच्या भेटीला येथे येणार आहेत. एकूणच हा दोन दिवसांचा आपल्या मराठी भाषेचा साहित्योत्सव चुकवू नये असाच आहे. त्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

स्थळ : गोखले इन्स्टिट्यूट, डेक्कन जिमखाना
वेळ : सकाळी १०:३० ते रात्री ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉपीमुक्तीचे आशादायी चित्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गाडीच्या पुढे दोन कार्यकर्ते 'सेंटर' म्हणून गेट दाखवून तेवढ्यावर थांबले. पथकाला अनपेक्षितपणे गेटच्या आजूबाजूला सामसूम जाणवली. पोलिसांनी गेट उघडताच, समोरच्या मोकळ्या मैदानातली धूळ गाडीच्या वेगानेच उडाली. फक्त धूळच काय ती हलली, सेंटरवर बाकी सगळं शांत होतं. बिल्डिंगच्या व्हरांड्यांवर आणि बाहेरच्या सर्व कॅम्पसवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही चौकस होते. वर्गात विद्यार्थी पेपर लिहित होते. व्हरांड्यात होता तो सॅक, चप्पला नि बुटांचा सडा...

बारावीच्या परीक्षेदरम्यान बुधवारचा दिवस हा कॉपीचा दिवस ठरल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एका केंद्रावर शुक्रवारी अनुभवायला मिळालेले हे वातावरण परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे आशादायी चित्र समोर आणणारे ठरले. अर्थात त्यासाठी स्थानिक पातळीवर ज्युनिअर कॉलेजचे प्रशासन, ग्रामस्थ आणि पालकांकडून होणारी सकारात्मक मदतही तितकीच महत्त्वाची ठरल्याचे या सेंटरच्या तपासणीदरम्यान दिसून आले.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य बोर्ड) पुणे विभागीय मंडळाच्या माध्यमातून गैरमार्गाशी लढा अभियानाचा कृतीकार्यक्रम राबविला होता. त्यासाठी स्थानिक दक्षता समिती, केंद्र स्तरावरील सभा, पालकसभा, उद् बोधन वर्ग, प्रजासत्ताक दिनी प्रतिज्ञा आदी माध्यमांतून त्या विषयीची जनजागृती करण्यात आली होती. त्याआधारे परीक्षेतील गैरमार्गांचे प्रकार कमी होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात होती. काही मोजके अपवाद वगळता इतर केंद्रांमध्ये या उपक्रमांचा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया या केंद्रावर ऐकायला मिळाली.

पहिल्या मजल्यावरील वर्ग खोल्यांच्या तपासणीनंतर पथकाने आपला मोर्चा वरच्या वर्गांकडे वळविला. विद्यार्थ्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या एका लहान मुलाने तातडीने जिने चढून वर जाण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी काही म्हणण्यापूर्वीच केंद्रावरील शिक्षकांनी त्याला हटकले नि बाजूला केले. वरच्या मजल्यावरील वर्गांमध्ये शांतता होती. भरारी पथक आल्याचे लक्षात येताच थोडी कुजबूज होण्यापलीकडे काही दिसले नाही. पथकातील एका सदस्याने व्हरांड्याच्या कोपऱ्यावर उभे राहून केंद्राची पलिकडची बाजू, पाठीमागची बाजू तपासली. कोणीही दिसले नाही म्हटल्यावर हायसे वाटल्याने, इकडे सगळे आलबेल असल्याचा शेरा मारला. तोपर्यंत पथकातील दोघांनी दोन वर्गांचा ताबा घेतला. थोडे इकडे- तिकडे झालेल्या विद्यार्थ्यांना हटकून रांगेत बसवले. शिक्षकांशी बोलून काही गडबड नाही ना, याची खात्री करून घेतली.

खाली उतरल्यानंतर चहा-पाणी होईपर्यंत या सीसीटीव्ही फूटेज पाहून सगळं काही अलबेल असल्याची पथकाने खात्री करून घेतली. चहा झाला की पथक आले त्याच वेगाने गाडीकडे निघाले. गाडीही त्याच वेगाने सेंटरबाहेर निघाली. मैदानावरची धूळच काय ती उडाली. बस्स.

चपलांबाबतही विचारणा

पथक वर्गांबाहेर पडताच सॅक, चपला, बुटांविषयी विचारणा झाली. बुटांमध्ये, टोप्यांमध्ये लपवून मुले कॉप्या आणतात म्हणून ते सगळे वर्गाबाहेर काढण्याच्या सूचना केल्याचे केंद्र संचालकाने सांगितले. व्हरांड्यामध्ये बसविलेले सीसीटीव्ही दाखवत, याचा खूप उपयोग होतोयं, हेही सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेबही इंग्रजी माध्यमातून शिकले होते!: राज

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'बाळासाहेब आणि माझे वडीलही इंग्रजी माध्यमातून शिकले होते, ते ओरिएण्टल स्कूलचे विद्यार्थी होते, असं सांगतानाच, 'माझी मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकली असली तरी त्यांच्यावरचे संस्कार मराठी आहेत,' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुलांच्या इंग्रजी शिकण्याचे समर्थन केले.

मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'मटा मैफल'चे उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी राज यांची प्रकट मुलाखत घेतली. मराठी भाषा, राजकारण, समाजकारणासह वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक प्रश्नांना राज यांनी यावेळी दिलखुलास व मनमोकळी उत्तरं दिली. मराठी भाषेसाठी मनसेनं केलेल्या आंदोलनांचीही राज यांनी यावेळी माहिती दिली. अजेंडा घेऊन राजकारण करणाऱ्या राज यांना त्यांच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातून शिक्षणाबद्दल विचारले असता त्यांनी माझ्या मुलांवरचे संस्कार मराठी असल्याचं सांगितलं. मराठी भाषाही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी. नवनवे शब्द त्यात सामील करून घ्यायला हवेत,' असं मत राज यांनी मांडलं.

लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक

लता मंगेशकर यांच्यावरील एका पुस्तकाचं काम सध्या माझ्या हातात आहे, अशी माहिती राज यांनी यावेळी दिली. 'लतादिदी स्वतः गीते कागदावर लिहितात. तो खजिना त्यांनी माझ्याकडं दिला. स्वतःच्या साडीत गुंडाळून त्यांनी हा गीतसंग्रह मला दिला हे माझे भाग्य आहे,' असं राज म्हणाले.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे...

> मराठी भाषा दिन मनसेमुळेच लोकांना समजला. पण मराठी भाषा दिन एकच दिवस नको, वर्षाचे ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.

> मराठी चित्रपटांना मनसेच्या पुढाकारामुळंच स्क्रीन मिळाल्या. मराठी भाषा व मराठी माणसाविषयी आलेली सुस्ती मनसेनं घालवली. मराठीसाठी रोजच आंदोलन केलं पाहिजे असं नाही. पण आता पुन्हा एखादं आंदोलन करावं लागणार आहे.

> रेल्वे भरतीच्या जाहिरातीही मनसेमुळेच मराठी वृत्तपत्रात यायला लागल्या. रेल्वेची परीक्षा मातृभाषेत घ्यायला सुरुवात झाली. मनसेच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेमध्ये १४०० मुले नोकरीत कायम झाली.

> अमराठी आमदारांनीही मराठीतच शपथ घ्यायला हवी.

> साहित्य संमेलनातून निष्पन्न काय होते? तरुणांना काय मिळते?, याचा विचार व्हायला हवा.

> मराठीही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी. नवे शब्द स्वीकारायला हवेत.

> अत्रे, पुलं, तेंडुलकर, दळवी, कुरुंदकर हे माझे आवडते लेखक आहेत.

> 'पद्म' पुरस्कारासाठी वजन टाकताना आपण कमी पडतो. लेखकांनी पद्म व इतर पुरस्कारांच्या नादी लागू नये. वाचकांचे प्रेम हाच खरा पुरस्कार आहे.

> कलावंतांना माझा विरोध नाही, आपल्या कलावंतांना पाकिस्तानमध्ये मान दिला जात नाही हा माझा मुद्दा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखनच देते बळ

0
0

तरुण लेखकांची मनोभूमिका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लेखन हीच लिहिण्यामागची प्रेरणा असते. माध्यमांच्या कोलाहलात लेखनच बळ देते. आपल्या लेखनामुळे भवताली काही बदल झाला आहे का, या विचारापेक्षा स्वतःला आत्मविश्वास मिळ‍ण्यासाठी लिहिते राहणे महत्त्वाचे असते,'अशा शब्दांमध्ये तरुण लेखकांनी त्यांचा लेखनप्रवास उलगडला.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित 'मटा मैफली'च्या शानदार उद्घाटनानंतर 'आम्ही काय वाचतो, काय लिहितो?' या विषयावरील परिसंवाद रंगला. यामध्ये कवी रवी कोरडे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, जुई कुलकर्णी, उत्पल चंदावार यांनी सहभाग घेऊन आपले भावविश्व उलगडून सांगितले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे सह वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
'जगण्याचा अविभाज्य भाग म्हणजे वाचन. त्यातून जगण्यातला आनंद मिळतो,' असे सांगून तरुण साहित्यिकांनी आपण उत्तम वाचक असल्याचीच साक्ष दिली. 'आपल्या भोवती लहान मुले व पुस्तके असतील तर माणूस असण्याच्या शक्यतेजवळ आपण असतो,' असे सांगून कोरडे म्हणाले, 'पुस्तकातून आपण स्वत:ला शोधत असतो. माझ्या कवितेमुळे किती जणांचे भले झाले, हा प्रश्न असू शकतो. पण स्वत:ला उभे करण्यासाठी लिहिण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. समाजातील वेदनांमुळे लिहिण्याची ऊर्मी निर्माण होते.'
'वाचन हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. घरातील वातावरणामुळे रसिकता, संवेदनशीलता अंगी आली. वयाच्या १७ व्या वर्षी अपघाताने लिखाणाकडे वळले. लिहिण्याची प्रक्रिया आनंददायी असते तितकी ती त्रासदायक देखील असते. मात्र, लेखनामुळे स्वतःला शांतता आणि बळ मिळते,' याकडे विभावरी देशपांडे यांनी लक्ष वेधले. 'लहान वयात भालचंद्र नेमाडेंची पुस्तके वाचल्याने समज वाढली,' असे विभावरी यांनी स्पष्ट केले.
चंदावार म्हणाले, 'दोन पिढ्यांमधील आमची पिढी असल्याने संमिश्र कोलाहलात लिखाण सुरू आहे. घरातील वातावरण मध्यमवर्गीय असल्याने लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार झाले. पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, श्री. ना. पेंडसे यांचा प्रभाव माझ्यावर आहे. ज्ञानार्जनासाठी आज खूप माध्यमे आहेत, पण विचार करण्यासाठी, संवेदनशीलता जागवण्यासाठी वैचारिक साहित्याशिवाय पर्याय नाही.'
'फेसबुकमुळे मी लिहू लागले. आभासी साहित्य भावते आणि त्यात रमायला आवडते. त्याच प्रकारचे साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते. लहान वयात गौरी देशपांडे, सानिया, ग्रेस व जी.ए. कुलकर्णी यांचे लेखन वाचल्याने वाचनसंस्कार उत्तम झाले,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.
...
स्वत:ला उभे करण्यासाठी लिहिण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. समाजातील वेदनांमुळे लिहिण्याची ऊर्मी निर्माण होते.
- रवी कोरडे
...
माझ्यावर उत्तम वाचनसंस्कार झाले. मात्र, दोन पिढ्यांमधील आमची पिढी असल्याने संमिश्र कोलाहलात लिखाण सुरू आहे.
- उत्पल चंदावार
..
लेखनाची प्रक्रिया जितकी आनंददायी तितकी त्रासदायकही असते. लेखनकला जगण्याचे बळ देते.
विभावरी देशपांडे
..
आभासी साहित्य भावते आणि त्यात रमायला आवडते. त्याच प्रकारचे साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
- जुई कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात दर्जा दिल्यास मराठी जागतिक भाषा

0
0

केंद्राने अहवालाला द्यावी मंजुरी; भाषा अभ्यासकांची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यास मराठी ही जागतिक भाषा होईल. त्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सादर केलेला मराठी ही अभिजात भाषा असल्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर करावा, अशी सूचना भाषा अभ्यासकांकडून करण्यात आली.
'मटा मैफल'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'अभिजात मराठी​, जागतिक मराठी' या परिसंवादामध्ये प्रा. रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक आणि ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, सुनीला गोंधळेकर, 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज' या संस्थेतील प्रा. सुजाता महाजन, प्रा. शंतनू खेर आणि परदेशी विद्यार्थी डॉमनिक हे सहभागी झाले होते. श्रीपाद बह्मे यांनी संवाद साधला.
मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने केंद्र सरकारला पुराव्यासहित सुमारे ५०० पानी अहवाल सादर केला आहे. याबाबत हरी नरके म्हणाले, 'सध्या मराठी भाषेसाठी राज्य सरकारकडून सुमारे २५ कोटी रुपये मिळतात. प्रा. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर केल्यास केंद्र सरकारकडून सुमारे ५०० कोटी रुपये मिळतील. त्यानंतर मराठी ही जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी मदत होईल. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.'
मराठीला अभिजात दर्जा मिळण्याची संकल्पना आणि त्याबाबतचे निकष याचा आढावा घेताना नरके म्हणाले, 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही कल्पना सर्वप्रथम मराठी माणसांच्या मनात १२ वर्षांपूर्वी आली. त्यामागचे कारण म्हणजे केंद्र सरकारने तेलगू भाषेला हा दर्जा दिला. तेलगू भाषिक हे भाषेच्या बाबतीत खूप आग्रही असतात. त्यांनी विधानसभेत केंद्र सरकारला पाठिंबा देताना एक अट घातली होती की, आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असाल, तर आम्ही पाठिंबा देऊ. या भाषेला सहज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कारण तोपर्यंत निकष तयार झाले नव्हते. आता निकष तयार करण्यात आले आहेत.'
'अभिजात म्हणजे उच्चवर्णियांची भाषा, हा समज शेकडो वर्षे चालत आला आहे; पण हा अभिजात दर्जा देणाऱ्या समितीने तो मोडून काढला आहे. त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असणारी भाषा ही अभिजात असते, अशी मांडणी केली आहे, ही गोष्ट महत्त्वाची वाटते. भाषेचे बळ दाखविणारे अभिलेख, दस्तऐवज हे किती वर्षे जुने आहेत. त्यावर अभिजात भाषेचा दर्जा ठरविला जातो. दुसऱ्या भाषेची नक्कल असता कामा नये, हा आणखी एक निकष आहे. भाषा ही प्रवाही असते, त्यामध्ये खंड पडतो. त्यामुळे मूळचे रुप आणि सध्याचे रूप यामध्ये नाते असले पाहिजे, हा एक निकष आहे,' असे नरके यांनी सांगितले.
'काही भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला. तोपर्यंत वयाची मर्यादा ही सुमारे ५०० वर्षांपर्यंत होती. मात्र, अन्य भाषांना हा दर्जा मिळू नये म्हणून दीड हजार वर्षांचा निकष करण्यात आला.' असेही ते म्हणाले.
मराठी ही संस्कृतपेक्षा जुनी असल्याबाबतचे दाखले नरके यांनी दिले. ते म्हणाले, 'मराठीचे वय ८०० ते ९०० वर्षे असल्याचा गैरसमज करून घेण्यात आला आहे. दुर्गाबाई भागवत यांचे आजोबा संस्कृततज्ज्ञ राजारामशास्त्री भागवत यांनी दोन ग्रंथ लिहिले. त्यामध्ये त्यांनी मराठी ही संस्कृतपेक्षा जुनी असल्याचे म्हटले होते. दुर्गाबाई भागवत यांच्या भाषेत सांगायचे, तर 'संस्कृत ही भाची आणि मराठी ही मावशी आहे.' डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल. रा. पांगारकर यांनीही याबाबतची मांडणी केली आहे. संत एकनाथांनी 'संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली?' असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी 'अमृताहुनी पैजा ​​जिंके', असे वर्णन केले. नाणेघाटात २२२० वर्षांचा शीलालेख सापडला आहे. तेलगू भाषेत कावेरी नदीवर धरण बांधण्याच्या कामाचे वर्णन येते. त्या वेळी गवंडी हे मराठीत बोलत असल्याची नोंद आहे.'
आपली संस्कृती समृद्ध आहे. 'गाथा सप्तपदी' हा पहिला ग्रंथ दहा रुपयांत मिळाला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. त्या भाषेच्या अभ्यासकांना शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत. रोजगार देणारी भाषा टिकत असते. मराठी भाषेतून शिकूनही यशस्वी होता येते, हे अनेकांनी दाखवून दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'अनेक परदेशी विद्यार्थी हे मराठी भाषा शिकण्यासाठी देशात येतात. अमेरिकेत दुसरी भाषा शिकल्यास सरकारी नोकरी लगेच मिळते. त्यासाठीही ही भाषा शिकली जाते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे,' असे गोंधळेकर म्हणाल्या.
महाजन म्हणाल्या, 'आपल्याकडे शाळांमध्ये भाषा शिकविताना भाषा शिकवायचे म्हणजे काय हे सांगितले जात नाही. शाळांमध्ये दृश्यात्मकतेला महत्त्व दिले पाहिजे.'
व्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढला पाहिजे. याबाबत खेर म्हणाले, 'एसएमएस पाठविताना मराठीचा वापर झाला पाहिजे. एटीएममध्ये मराठी पर्याय दिलेला असतो; पण कितीजण त्याचा वापर करतात?'
मराठी शिकण्यासाठी आलेल्या डॉमनिक या विद्यार्थ्याने अस्खलित मराठीतून अनुभवकथन केले. 'मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. पुण्यात मराठी भाषा शिकण्यासाठी आलो, तेव्हा मराठी माणसांना भाषेबाबत अभिमान असल्याचे दिसले. दोन वर्षांपूर्वी मोडी लिपीचाही अभ्यास केला आहे.'
.................
मराठी कोश वाङ्मयाचे काम उत्तम
बालभारतीकडून दर वर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तके छापून विकली जातात. ही जगातली एक क्रमांकाची संस्था आहे. मराठी कोशवाङ्मयात जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे काम झाले आहे. मराठीत वैचारिक, विनोदी साहित्य लेखन झाले आहे. दर वर्षी सुमारे अडीच हजार पुस्तके प्रकाशित होऊन सुमारे २५० कोटी रुपयांची विक्री होते, ५०० दिवाळी अंक, २५० साहित्य संमेलने होतात. भारतातील एकूण ग्रंथांपैकी २५ टक्के ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत.' असे प्रा. नरके यांनी नमूद केले.
..
रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर केल्यास सरकारकडून सुमारे ५०० कोटी रुपये मिळतील. त्यामुळे मराठी ही जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी मदत होईल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

- प्रा. हरी नरके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढा

0
0

अच्छे दिन जवळपासही नाहीत; राज ठाकरेंची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नरेंद्र मोदी झटकन आवडले खरे पण तितक्याच झटकन त्यांच्याकडून भ्रमनिरासही झाला. अच्छे दिन म्हणणाऱ्या मोदींचे अच्छे दिन अजून जवळपासही दिसत नाहीत', अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. 'देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढा, त्याच्यावर राजकारण करू नका, असे सांगतानाच सरकारने कोणाला देशभक्ती किंवा देशद्रोहाचे सर्टिफिकेट देऊ नये', असा सल्ला देत त्यांनी केंद्र सरकारचे कान टोचले.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'मटा मैफल' च्या उद्घाटन सत्रात प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान, त्यांनी मोदी, केंद्र सरकार, जेएनयूचे आंदोलन, टोल व मराठीचे आंदोलन आदी मुद्द्यांवर भाष्य केले.

'रतन टाटांनी केलेल्या गुजरातच्या स्तुतीनंतर मी गुजरातला जाऊन आलो. तिथल्या सुविधा पाहून भारावलो. मात्र, ते अर्धसत्य होते, हे वास्तव नंतर लक्षात आले. मोदींनी गुजरातचे उभे केलेले चित्र आणि वास्तव वेगळे होते. त्यामुळे अनेक कंपन्या आता गुजरातमधून बाहेर पडत आहेत. रतन टाटांनीही आता सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर असल्याचे म्हटले आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. केंद्रात सत्तेवर आल्यावर शंभर दिवसात अच्छे दिन येतील, असे म्हणणाऱ्या मोदींचे अच्छे दिन अजूनही दृष्टिपथात आलेले नाहीत,' असे ठाकरे यांनी सांगितले.

'देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे,' असे सांगून राज ठाकरे म्हणाले, 'आपली विद्यार्थी संघटना या विद्यापीठात घुसविण्यासाठी भाजप याचे राजकारण करत आहे. भारतविरोधी घोषणांचा भाजपला एवढाच तिटकारा होता, तर अफजल गुरूचे समर्थन करणाऱ्या 'पीडीपी'सोबत भाजप जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी कशी होते,' असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर 'एखाद्याला देशभक्त आणि देशद्रोही सर्टिफिकेट भाजपने द्यावे, सरकारने नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला.'अमराठी व्यक्ती येथे येऊन स्थायिक होतात, इथल्या सुविधांचा लाभ घेतात. आमदारही होतात. मग त्यांनी मराठीत शपथ का घ्यायला नको. अमराठी व्यक्तींनी आमच्याशी एकरूप व्हावे, त्यासाठी आंदोलनाची वेळ आणू नये', असेही ठाकरे या वेळी म्हणाले.'मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या योजना चांगल्या आहेत. परंतु, परकीय कंपन्यांना भारतात बोलविण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. लघुउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,' असे ठाकरे म्हणाले.

टोलमुक्तीचे श्रेय मनसेचेच

'टोलवसुली करणे हे सरकारचे काम आहे. खासगी कंपन्यांना हे काम देऊन त्यांचा फायदा करून देण्याचे कारणच काय? नाक्यानाक्यावर टोलनाके उभारून जनतेची लूट सुरू होती. पण कोणताही राजकीय पक्ष त्यावर बोलत नव्हता. मनसेनेच यावर आंदोलन केले. त्यामुळेच बहुतांश टोल नाके बंद झाले. त्याचे श्रेय मनसेलाच द्यावे लागेल,' असे राज ठाकरे यांनी सांगितले. 'मी जगभर फिरलो आहे, जगात कोठेही टोलनाक्यावर रोख रक्कम घेतली जात नाही. आपल्याकडे मात्र, रोख रक्कमच घेतली जाते. आता सर्व अधिकृत टोल नाक्यांवर कॅश स्वीकारली जाणार नाही, यासाठी आंदोलन करावे लागेल,'असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेचे गाणे झाले अन् घडली संगीत साक्षरता

0
0

डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिली कलासक्त प्रवासाची रसिकांना अनुभूती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कविता...त्यातील शब्दांचा अर्थ...शब्दांना दिलेली चाल...त्यातून झालेला गाण्याचा जन्म...गाणे कसे गावे...विशिष्ट कवितांचे गाणे झाले तर काय होईल...अशा प्रक्रियेचीच जणू कविता झाली आणि त्यातून काव्यमय संगीत साक्षरता घडली. कविता निर्माण होणे, ती भेटणे, तीचे गाणे होणे, अशा 'कवितेचे गाणे होताना'च्या कलासक्त प्रवासाची रसिकांना अनुभूती मिळाली.
महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित 'मटा मैफली'मध्ये प्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची 'कवितेचे गाणे होताना' ही मैफल शनिवारी रंगली. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रम्य सायंकाळी रंगलेल्या या मैफलीने मटा मैफलीच्या पहिल्या दिवसाची सुरेल सांगता झाली. महाराष्ट्र टाइम्सचे सिद्धार्थ केळकर यांनी त्यांच्याशी सुरेल संवाद साधला. आदित्य आठल्ये यांनी तबल्यावर साथसंगत केली.
विविध कविता, गाणी यांच्या माध्यमातून हा सुरेल प्रवास रंगला. 'गायक संगीतकारांनी रसिक म्हणून कविता वाचावी. कवितेमधील शब्दांच्या पलीकडचे काही दिसत असेल तरच शब्दांना चाल लावावी,' असा सल्ला देऊन 'संगीतकार कवितेच्या प्रेमात पडतच असतो, पण त्याचे वाचन असावे. कविता आपल्याला चोहो बाजूंनी भेटत असते, तो क्षण अवर्णनीय असतो,' अशा शब्दांची गुंफण डॉ. कुलकर्णी यांनी केली.
आयुष्यात पहिल्यांदा कविता कधी भेटली, असे विचारल्यानंतर 'आरत्यांमधून कविता भेटते,' असे त्यांनी सांगितले. 'आरत्या म्हणताना आपण 'सुखकर्ता दुःखहर्ता' या तीन मात्रेच्या दादऱ्यातील आरतीकडून थेट 'घालीन लोटांगण, वंदिन चरण,' या चार मात्रेतील प्रार्थनेकडे जातो, असे त्यांनी उदाहरणासह दाखवून दिले आणि प्रत्येकाकडे लय असते हे सिद्ध केले.
..
चाल देताना संगीतकाराला भान असले पाहिजे. कोणत्या कवितेच्या भानगडीत पडायला हवे, हे संगीतकाराला कळायला हवे. सगळी गाणी नाचण्यासाठी नसतात आणि प्रत्येक कवितेचा स्वभाव असतो.
- डॉ. सलील कुलकर्णी
..............
तेव्हा खऱ्या शांताबाई होत्या...
पूर्वी चांगल्या गाण्यांचा पर्याय होता. तेव्हा खऱ्या शांताबाई होत्या. सध्या 'कल्लूळाचं पाणी,''शांताबाई,''आवाज वाढव डीजे' या गाण्यांचा बोलबाला आहे. या गाण्यांमधून कोणताच अर्थ निघत नाही, असे मार्मिक विधान डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले. माझ्या लहानपणी काहींकडे मर्सिडीझ तर काहींकडे शेती होती. माझ्या घरी कुसुमाग्रज, शांता शेळके यांची पुस्तके होती. त्यामुळेच कवितेचा संस्कार झाला. शब्दांचा अर्थ समजण्यासाठी आणि कवितांची गाणी योग्य चालीत तयार करायला मदत झाली, असे सांगून 'दूर कुठे तरी पाहाटतो सूर्य,''काळोखाचे मन,''उदासीस या कोणता रंग आहे, तुला ठाव नाही, मला ठाव नाही,' 'रात्र रात्र जागते, मी स्वत:स जाळते,''मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसते,'अशा कविता आणि गाण्यांतून त्यांनी मैफलीत रंग भरले. कुसुमाग्रजांच्या 'जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी,'या कवितेने मैफलीची सुरेल सांगता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघाताने राजकारणात

0
0

राज ठाकरे यांची मटा मैफलीत कबुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जय-पराजयाच्या भीतीपासून सुटका हवी असेल, तर छंद जोपासा, तोच तुम्हाला वाचविण्याचे काम करेल' असा संदेश देऊन अपघातानेच राजकारणात आल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. चित्रपट हीच माझी पहिली आवड होती अन् राजकारणात येण्यापूर्वी 'वॉल्ट डिस्ने'त जाऊन 'अॅनिमेटर' होण्याची तीव्र इच्छा होती, अशा अनेक स्मृतींचा खजिना ठाकरे यांनी उलगडला.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा मैफल' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे यांनी व्यंगचित्राची सुरुवात, बाळासाहेबांचे मार्गदर्शन, चित्रपट-लघुपटावरील प्रेम, भविष्यातील योजना यासारख्या अनेक गोष्टींवर ओघवत्या शैलीत संवाद साधला.

महंमद रफी यांच्यासारख्या महान गीतकारावर मराठीचे उच्चार, बोली शिकविण्याचे संस्कार वडिलांनी केले, असे सांगत त्यातून नकळत भाषेचे संस्कार आमच्यावरही झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. 'वडील संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडून तबला, व्हायोलिनचे धडे सुरुवातीला गिरवले खरे; पण माझा ओढा व्यंगचित्रांकडे होता,' असे राज यांनी सांगितले. ते म्हणाले, 'चित्र सर्वार्थाने उत्तम कसे असेल, याची शिकवण बाळासाहेबांकडून मिळाली. व्यंगचित्राची कल्पना, त्याची रचना, त्यातील मार्मिक टिपण्णी आणि अक्षर अशा सर्व गोष्टींचा उत्तम परिणाम साधला गेला, तरच व्यंगचित्र उठावदार होते, याचे धडे बाळासाहेबांनी दिले.'

'चित्रपटाबद्दल मला लहानपणापासून आकर्षण होते. लघुपटांचा मोठा संग्रहच माझ्याकडे आहे. त्यातून विविध विषयांची माहिती होते. आजकालच्या तरुणांनी आवर्जून लघुपट पाहायला हवेत, त्यातून जगाचे भान समजते,' अशा शब्दांत त्यांनी विविध आवडीनिवडी आवर्जून जोपासण्याचा सल्ला दिला.

लतादिदींच्या गीतांचा संग्रह

पूर्वीच्या काळी अनेक गीतकार उर्दूतून गीते लिहून देत असत. त्यामुळे, या गीतांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी लतादिदी संबंधित गीत स्वहस्ताक्षरात लिहून घेत. रेकॉर्डिंगच्या वेळी गीत लिहिलेला कागद नेहमी त्यांच्यासोबत असे. हा सर्व खजिना त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केला असून, लवकरच त्यावर पुस्तक काढण्याचा विचार असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

'पुरस्कारापेक्षा पुस्तकांना, कलाकृतींना आणि लेखक-कलावंतांना मिळणारे वाचकांचे, प्रेक्षकांचे प्रेम अधिक मोलाचे आहे. त्यामुळे, मराठी लेखक, कलावंतानी पद्मश्रीसारख्या पुरस्कारांच्या भानगडीत पडूच नये.' - राज ठाकरे

आम्ही मराठीचे पुरस्कर्ते

'मराठी भाषेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासून घेतलेल्या भूमिकेची फळे आत्ता कुठे दिसू लागली आहेत,' असा दावा राज ठाकरे यांनी केला. मराठीचे आंदोलन सुरू केले, तेव्हा मराठी मुलांना रेल्वे भरतीमध्ये संधीच दिली जात नव्हती. रेल्वे भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रांमध्ये येत नव्हती, की मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. मनसेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे टप्प्याटप्प्याने या गोष्टी घडून आल्या आणि नुकतीच चौदाशे मराठी मुलांची रेल्वेमध्ये भरती झाली असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी मराठीसाठी केलेल्या आंदोलनाचे समर्थन केले. मराठी माणसांमध्ये आलेली सुस्ती आंदोलने, जागृती यामुळे दूर झाली असल्याचा दावा त्यांनी केला. त्याशिवाय, मराठी पाट्या असो वा राजभाषा दिन, प्रत्येक वेळी मनसेवर आंदोलनाची वेळ का येते, याचा विचार कोणी करणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही काय फक्त माझी एकट्याची जबाबदारी आहे का, असा रोखठोक सवाल विचारून, 'बरेच दिवस शांत बसलोय, आता पाट्यांवरून पुन्हा आंदोलन करावेच लागेल,' असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगला कथा, पटकथेचा वर्ग

0
0

अंबर हडप यांच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ससा कासवाच्या शर्यतीची कथा सगळ्यांनीच लहानपणी ऐकलेली; पण याच कथेवर मालिका किंवा नाट्याच्या अंगाने दृश्य आणि संवाद कसे लिहायचे इथपासून उत्तम कथा, मालिका, एकांकिका आणि सिनेमा लेखक होण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा संवादात्मक वर्ग शनिवारी मटा मैफलीत रंगला. प्रसिद्ध लेखक अंबर हडप यांच्या मैत्रीपूर्ण संवादातून रंगलेल्या या वर्गाला लेखक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डेक्कन येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या वर्गातच ही कार्यशाळा झाली. एरव्ही कार्यशाळा म्हटले की एकतर्फी संवाद असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, हडप यांनी प्रथमपासूनच सहभागी झालेल्यांना या संवादात सामावून घेतले आणि कार्यशाळेची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
माणसांना ऐकतानाच कथेसाठीच्या पात्रांची निवड कशी करायची याबाबत माहिती देऊन हडप यांनी कार्यशाळेचा श्रीगणेशा केला. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि राज ठाकरे यांच्या बोलण्यातून मला कशी पात्रे मिळाली, हेही त्यांनी सांगितले. कथासूत्र हे माध्यमानुसार बदलत असते हे सांगतानाच त्यांनी लेखकाची शैली वेगळी का असावी, याचे महत्त्व अधोरेखित केले.
'कथेचा पटकथेत विस्तार कसा करायचा, पात्रे ठरवून कथेला आकार कसा द्यायचा, त्यात उपकथनाकांचा विचार कसा करायचा, मुख्य पात्रांसाठीचे संवाद कसे असावेत याची माहिती देताना सुरुवात ही कथालेखन मग त्याचा विस्तार आणि छोटी नाट्ये आणि एकांकिकांपासून करा,' असे सूत्र हडप यांनी सांगितले. छोट्या-छोट्या विषयांवर लघुपट करण्याचा सल्लाही दिला. 'सिनेमा हे फक्त संवादांचे नाही तर दृश्य माध्यमही आहे. त्यामुळे सिनेमासाठी लेखन करताना संवाद ताणू नयेत. मालिकांचे कथानक अनेक दिवस चालवायचे असल्याने त्यात इतर पात्रे आणि त्यांच्या स्वतंत्र कथांना वाव मिळतो,' असेही त्यांनी सांगितले. हडप यांनी त्यांचे गाजलेले'बालक-पालक', 'यलो' असे सिनेमे तसेच 'अग्निहोत्र' या मालिकेसह 'शोले', 'हम आपके है कौन', 'अमर अकबर अँथनी' आणि त्याच कथेत बदल करून तयार झालेला 'यादों की बारात' या सिनेमांचे दाखले त्यांनी कार्यशाळेत दिले. याद्वारे त्यांनी सिनेमा आणि मालिकेच्या कथालेखनातील फरक सांगितला. प्रसिद्ध लेखक प्रकाश कापाडिया, राजेश जोशी तसेच दिग्दर्शक राजू हिरानी यांच्या कामाचे दाखलेही त्यांनी दिले.
...
उलगडली लेखनाची शैली
प्रश्नोत्तरांच्या सत्रात सीनफ्लो, स्क्रीनप्ले, फ्लॅशबॅकचे तंत्र आणि त्याचे महत्त्व, मसाला पट, लघुपट, सिनेमा आणि सीन नॅरेशन, सेटवर लेखकाला असणारे महत्त्व आदी विविध बाबींविषयी संवाद साधत ही कार्यशाळा एका वेगळ्या उंचीवर नेली. लेखक होण्यासाठी सतत पाहणे, वाचणे, अनुभव या गोष्टींचे महत्त्व सांगून; तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती देत कार्यशाळेचा समारोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील अडीचशे झाडेतोडण्याचा प्रस्ताव फेटाळला

0
0

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या विविध भागात तोडण्यात येणाऱ्या अडीचशे झाडांचा प्रस्ताव राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फेटाळला आहे. या वृक्षतोडीस परवानगी देण्यापूर्वी वृक्ष अधिकाऱ्यांनी स्वतः अडीचशे झाडांची पाहाणी करावी, एवढेच नव्हे तर अर्जदाराने गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि वृक्ष अधिकारी वृक्ष संवर्धन अधिनियमांचे पालन करीत नाहीत; वृक्षतोडीस सर्रास परवानगी दिली जात आहे, अशी तक्रार पर्यावरणवादी कार्यकर्ते विनोद जैन यांनी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाकडे केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश यू. डी. साळवी आणि अजय देशपांडे यांनी हा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयानेही याच प्रकारचे आदेश या पूर्वी दिले होते.
वृक्षतोडीस परवानगी देण्यापूर्वी वृक्ष अधिकारी घटनास्थळाची पाहाणी करीत नाहीत. वृक्षतोडीबद्दल त्यांना गांभीर्य नाही. समितीने दिलेल्या शहराच्या विविध भागातील प्रस्तावांना कोणतेही आक्षेप न घेता परवानगी दिल्यामुळे अडीचशे वृक्ष तोडले जाणार आहेत, अशी बाजू याचिकाकर्त्यांचे वकील हर्षद मांडके यांनी मांडली होती. त्याची दखल घेत न्यायाधिकरणाने वृक्ष प्राधिकरण समितीची कानउघाडणी केली आहे. वृक्ष संवर्धन कायद्याच्या निमयांनुसार सर्व पद्धतीचा अवलंब करूनच वृक्षतोडीस परवानगी दिली पाहिजे. सध्या मंजूर केलेल्या अडीचशे वृक्षांच्या तोडीच्या प्रस्तावांची घटनास्थळी जाऊन पाहाणी करावी; तसेच अर्जदाराने गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वज मराठीचा उंच धरा रे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी भाषेच्या राजकारणापासून तिच्या भवितव्यापर्यंत, मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याच्या वास्तवापासून मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मराठी भाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे आवाहन तरुण पिढीला केले. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांचा उत्सव साजरा करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजिलेल्या 'मटा मैफल'च्या उद‍्घाटन ठाकरे यांनी केले. उद‍्घाटनानंतरच्या विविध परिसंवादात, तसेच कविता वाचनात, लेखन कार्यशाळेत आणि सायंकाळी सलील कुलकर्णी यांनी अतिशय उत्कटतेने सादर केलेल्या कविता आणि गीतांच्या कार्यक्रमात मराठीच्या अभिजाततेबाबत, सर्जनशील साहित्याबाबत मौलिक चर्चा होत गेली, मराठीचा ध्वज उंच धरण्याचा आशय त्यातून प्रतीत होत गेला आणि रसिक प्रेक्षांच्या उदंड प्रतिसादाने 'मैफल' रंगत गेली. आज, रविवारी (२८ फेब्रुवारी) या मैफलीचा उत्सवाचा दुसरा दिवस असून, त्यातील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. मराठी भाषा आणि संस्कृतीबरोबरच राजकारणाबाबतच्या विविध प्रश्नांना ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. मराठी साहित्य आणि संस्कृती समृद्ध असून, हे साहित्य जगभर पोहचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 'कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन एक दिवस साजरा होत असला, तरी वर्षाचे ३६५ दिवस मराठी दिन साजरा व्हायला हवा. काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी दिनाची कोणाला ओळखही नव्हती. हा दिवस साजरा करण्यास मनसेने सर्वप्रथम सुरुवात केली,' असे ते म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रल्हाद केशव अत्रे यांच्या प्रेरणादायी आत्मचरित्रांचा त्यांनी या वेळी आवर्जून उल्लेख केला; तसेच अत्रे, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर हे आवडते लेखक असल्याचे त्यांनी सांगितले.

ए. व्ही. भट आणि कंपनीच्या संचालक अरुणा भट यांच्या हस्ते ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. 'महाराष्ट्र टाइम्स'चे मुख्य संपादक अशोक पानवलकर यांनी प्रास्ताविकात 'मटा मैफल' आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर या वेळी उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी अभिजित थिटे यांनी सूत्रसंचालन केले.

माध्यमापेक्षा संस्कार महत्त्वाचे

मराठीसाठी आंदोलने करणाऱ्या राज ठाकरे यांची मुले इंग्रजी माध्यमातून का शिकतात, असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडीलही इंग्रजी माध्यमातूनच शिकले होते, असे ठाकरे यांनी त्यावर स्पष्ट केले. 'माध्यम महत्त्वाचे नाही, तर आपण संस्कार कसे करतो, याला अधिक महत्त्व आहे. माझी मुले इंग्रजी माध्यमातून शिकली असली, तरी संस्कार मराठीच आहेत,' असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा मैफली’ची आज सांगता

0
0

पुणे : मराठी साहित्य, संस्कृती यांवरील संवादाच्या या आगळ्या उपक्रमाचा आज, रविवारी दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता त्याचा समारोप होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजिलेल्या लघुत्तम कथा आणि लघुकथा स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी पठारे यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. त्याच्या आधी सकाळी ११ वाजता डॉ. आशुतोष जावडेकर यांचा 'लयपश्चिमा' हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, योगेश नांदूरकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक लेखनावर परिसंवाद रंगणार आहे. दुपारी कवीकट्टा असून, निवडक कवींबरोबरच रामदास फुटाणे राजकीय भाष्य कविता सादर करणार आहेत. याशिवाय अनुवाद, कथालेखन आणि ऑनलाइन लेखन यांबाबत कार्यशाळा होणार आहेत. समारोपाच्या सत्रानंतर कवी चंद्रशेखर गोखले यांचा 'मी माझा' हा कार्यक्रम होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'चे विशेष आभार

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या 'मटा मैफल' उपक्रमाचे राज ठाकरे यांनी आवर्जून कौतुक केले. हा उपक्रम असाच सुरू राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; तसेच महाराष्ट्र टाइम्सशी विशेष जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगताना, 'मटा'चे पहिले आणि अखेरचे व्यंगचित्रकार म्हणून वडील श्रीकांत ठाकरे यांची ओळख असल्याचा उल्लेख त्यांनी केला. 'मटा' सुरू झाला, तेव्हा सुरुवातीला वडील 'पॉकेट कार्टून्स' स्वरूपात व्यंगचित्रे काढत. मार्मिकचे काम वाढल्याने नंतर त्यांना वेळ देता आला नाही. तरीही त्यांनी तुमच्याशिवाय दुसरा कोणताही व्यंगचित्रकार घेणार नाही, अशा शब्दांत वडिलांच्या कामाचे कौतुक केले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वे वर दहा तासांचा खोळंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवर शनिवारी दिवसभर वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळ‌ित झाली होती. वाहतूक कोंडीमुळे सुट्टीचे औचित्य साधून पुणे व लोणावळा-खंडाळ्याला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाहनांच्या सहा ते सात किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी उश‌िरापर्यंत कूर्मगतीने सुरू होती.

एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीसाठी आणि अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या अमृतांजन पुलाजवळील अमृतांजन टेकडीच्या सैल दरडी हटविण्यासाठी व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला २२ फेब्रुवारीला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम ११ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. कामादरम्यान वाहतूक आणि प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये तसेच वाहतूक सुरू राहावी यासाठी रस्ते विकास महामंडळाने पुण्याकडे जाणारी एक लेन बंद केली आहे. या लेनवर संरक्षणासाठी लोखंडी पत्रे व लोखंडी पिंप बसविल्याने उर्वरित दोन लेनवर वाहतुकीचा भार पडला असून, या ठिकाणी चढ, उतार आणि नागमोडी वळणे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. पुणे व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे सकाळपासूनच कोंडीमुळे प्रचंड हाल झाले.

वाहतूक कोंडीचे गांभीर्य पाहून बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई -पुणे मार्गावर वळविली; तसेच एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक्स्प्रेस वेवरील काही वाहने पर्यायी मार्गाने बाहेर काढून पुणे-मुंबई लेनवरून विरुद्ध दिशेने अंडाकृती पुलावरून जुन्या मार्गाने रवाना केली. सायंकाळी साडेचार वाजता वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलिसांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक बलात्काराच्या घटनांनी पुणे, नागपूर हादरले

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे/नागपूर

सामूहिक बलात्काराच्या घटनांनी उपराजधानी नागपूर आणि पुणे शहर हादरले. नागपुरात १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर पुण्यात हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीला बेशुद्ध करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारी २४ वर्षांची तरुणी काल, शनिवारी तिच्या मित्रासोबत बाहेर फिरण्यासाठी गेली होती. दोघांनी एका हॉटेलात जाऊन मद्यपान केले. मित्राने तिच्या मद्याच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध टाकले. थोड्या वेळाने तिला खोलीवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याचे सहकारीही होते. मद्यात गुंगीचे औषध टाकल्याने बेशुद्ध झालेल्या तरुणीवर प्रथम मित्राने आणि त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी बलात्कार केला. पीडित तरुणी ही मुंढवा येथील आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या मित्रांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काल दिवसभरात पुण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अत्याचाराच्या घटनांप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, नागपुरातील नंदनवन परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी उच्चशिक्षित विवाहितेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२७ फेब्रुवारी) रात्री चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. काही महिने लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी मृत तरुणीने लग्न केले होते. सुप्रिया गंगाधर कांबळे (२७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक दिलीप साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील सुप्रिया ही मूळचा केरळचा असलेल्या अभिष हरिकुरूप याच्याबरोबर काही महिने लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहत होती. त्यानंतर १४ सप्टेंबर २०१४ ला दोघांनी आळंदी येथे मंदिरात लग्न केले होते. एचआरमध्ये सुप्रिया हिने एमबीए केले होते; तर अभिषने इलेक्ट्रॉनिकमध्ये इंजिनीअरिंग केले आहे. तो सध्या हिंजवडीत नोकरी करतो. दोघे सध्या वाल्हेकरवाडीत राहतात. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री अभिष चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता. दहा मिनिटाने घरी आला असता दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने अभिषने दरवाजा तोडला. तेव्हा सुप्रिया घरात साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. नेहमीच्या डायरीत मला माफ करा एवढेच लिहून सुप्रियाने जीवन संपविले. पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंतवणुकीवर जास्त परतावा मोठी जोखीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून शहरातील विविध भागांत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळणार असेल तर त्या ठिकाणी अधिक धोका असतो, असे मार्गदर्शनही आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना केले. पोलिस महासंचालकांच्या आदेशाप्रमाणे पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने शहरात खडकी, वानवडी, लष्कर, स्वारगेट, पिंपरी, चतुःश्रुंगी, डेक्कन, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमात सीए विनीत देव, कोटक म्युच्यल फंड विभागाचे सुधीर भगत, गुंतवणूक तज्ज्ञ हेमंत काळे, विशेष सरकारी वकील आयुब पठाण, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी उपस्थितांना गुंतवणूक जनजागृती अभियानात मार्गदर्शन केले. गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा असेल तर त्या ठिकाणी जास्त जोखीम असते. आपला पैसा वाढावा ही गोष्ट चुकीची नाही. पण, जास्त परतावा का देणार आहेत हे समजून घेऊन गुंतवणूक करावी. तसेच, गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. सजगपणे केलेली गुंतवणूक हीच चांगला परतावा देऊ शकते. अलीकडे चिटफंडाद्वारे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. हाव आणि कमीतकमी वेळेत जास्त पैसा मिळावा, यातून नागरिकांची फसवणूक होत आहे, असे विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच, गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेण्याबरोबरत फसवणूक झाली तर पोलिसांकडे कसा संपर्क कसा साधावा. या गोष्टींबाबत साकोरे यांनी मार्गदर्शन केले. येत्या २९ फेब्रुवारी रोजी सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत ठाकूर, अन्सार शेख यांनी नारायण पेठेतील केसरीवाडा येथे आर्थिक गुन्ह्यांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला आहे. तर, २ मार्च रोजी पोलिस निरीक्षक निलम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलिस ठाणे येथे होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोबोकॉन स्पर्धा तीन मार्चपासून सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे दूरदर्शन व आळंदी येथील एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग यांच्यातर्फे आयोजिण्यात येणारी 'रोबोकॉन' स्पर्धा तीन ते पाच मार्चदरम्यान बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा स्टेडिअम येथे होणार आहे. 'क्लिन एनर्जी रिचार्जिंग द वर्ल्ड' ही यंदाची थीम आहे. विजेत्या संघाला २१ ऑगस्ट २०१६ रोजी बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यंदा देशभरातील १०५हून अधिक इंजिनीअरिंग कॉलेजांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये चार आयआयटी व पाच एनआयटींचा देखील समावेश आहे, अशी माहिती दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव व दूरदर्शनच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम अधिकारी संदीप सूद व प्रमोद चोपडे या वेळी उपस्थित होते. प्रत्येक संघाला 'इको रोबो' आणि 'हायब्रिड रोबो' असे दोन रोबो तयार करायचे आहेत. 'इको रोबो'ला चालण्यासाठी 'हायब्रिड रोबो'कडून ऊर्जा घ्यावी लागेल. त्याला उतार, चढ, नदी या मार्गांवरून जाताना दिशा नियंत्रणासाठी एका स्टिअरिंगचा वापर करता येईल. 'हायब्रिड रोबो'ला 'इको रोबो'कडून पवनचक्कीचे पाते घेऊन पवनचक्कीच्या खांबावर चढावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातच पोलिसांना अधिक रस

0
0

Rohit.Athavale@timesgroup.com पिंपरी : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या वादात पोलिसांचा नको तेवढा हस्तक्षेप पाहता काही दिवसांपूर्वी सहपोलिस आयुक्तांनी पोलिस ठाणे स्तरावरील अधिकाऱ्यांना उपायुक्तांना कल्पना देऊनच गुन्हे दाखल करा, असे लेखी आदेश दिले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड व लोणावळा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित पोलिस ठाण्यात सर्रास जमिनीशी संबंधित वादाचे परस्पर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. दैनंदिन गुन्हे आणि तपासाकडे दुर्लक्ष करीत पोलिस अधिकाऱ्यांना जमिनीच्या वादात भलताच रस वाटू लागला असून, 'लिटीगेशन' वाल्यांची गर्दी पोलिस ठाण्यात होऊ लागली आहे. फ्रॉडचा गुन्हा दाखल होताना फ्रॉड केला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. फसवणूक करणाऱ्यांची एक टोळीच शहरात कार्यरत झाली असून, या टोळीतीलच काही जण प्रथम फसवणूक करतात आणि नंतर फसवणूक झाल्याचे सांगणारा टोळीतलाच दुसरा एकजण पुढे येतो. तो तुम्हांला जमिनीची लिटीगेशन मिटवून देतो, गुन्हा दाखल करून देतो, पैसे वसूल करून देतो असे सांगत सर्रास दुकान थाटत आहेत. पोलिस ठाण्यांमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्रासपणे जमिनीची वाद मिटवून दिले जात आहेत. बनावट कागदपत्रे अथवा मृतव्यक्तींच्या नावे जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. याबाबत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, ज्यांची खरंच फसवणूक झाली आहे ते पोलिस ठाण्यांपासून लांबच राहत असून, अन्यच लोक स्वतःचा हेतू साध्य करीत आहेत. महसूल वाढविण्याच्या हेतूने जमिनीचा कोणताही व्यवहार कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात 'रजिस्टर' करण्यास सरकारने मुभा दिली आहे. वास्तविक फसवणूक होण्याचे प्रमाण देखील त्यातून वाढू लागले आहे. कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घ्यायचा आणि हवा तसा तपास करून घ्यायचा यासाठी सुरुवातीलाच हव्या त्या दुय्यम निबंधक कार्यालयात डॉक्युमेंट रजिस्टर केले जाते. शहरातील शक्यतो प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अखत्यारित परिसरात एकतरी दुय्यम निबंधकाचे कार्यालय आहे. या सगळ्याबाबींचा विचार करता पोलिस आयुक्त के. के. पाठक व सहआयुक्त सुनील रामानंद यांनी जमिनीच्या व्यवहाराबाबत काही महिन्यांपूर्वी लेखी आदेश जारी केले होते. परंतु, त्याला पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांचे 'काम पाहणाऱ्या' कर्मचाऱ्यांकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. शहर पोलिसांप्रमाणेच जिल्हा पोलिसांकडून देखील जमिनीच्या व्यवहारांबाबत दाखल गुन्ह्यांसाठी अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी लेखी आदेश दिले होते. अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडूनच प्रथम कागदपत्रांची खात्री करून मगच गुन्हे दाखल करावेत असे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. परंतु, तसे होत नाही. आर्थिक गुन्हे शाखा सोडून अन्यच शाखा आणि पोलिस ठाणे स्तरावर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे शहर-जिल्ह्यात जमिनींच्या व्यवहारात अफरातफर करणाऱ्या कुख्यात बापू नायरवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक बापू नायर उदयास आले आहेत. जमिनींवर ताबा मारणे, क्लिअर टायटल जमिनींमध्ये लिटिगेशन करून लुबाडणूक करणाऱ्या व्हाइट कॉलर गुन्हेगारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. जमिनीच्या वादासंदर्भात गुन्हे दाखल करताना पोलिस उपायुक्तांना याबाबत कल्पना द्या, कागदपत्रांची पाहणी उपायुक्तांनी करावी असे आदेश सहआयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यांवर बारकाईने लक्ष आहे. मध्यंतरी काही पोलिस ठाण्यांमध्ये न कळविता जमिनीशी संबंधित गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे तेव्हाच संबंधितांवर कारवाई केली होती. पुन्हा असे प्रकार घडत असतील, तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी निधी साहित्यासाठीच वापरा

0
0

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सल्ला; प्रा. जाधव यांना जीवनगौरव प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सरकारने दिलेले पंचवीस लाख रुपये संमेलनासाठीच आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाने या निधीचा उपयोग साहित्यविषयक उपक्रमांसाठी करावा,' असा सल्ला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी दिला. या बाबत महामंडळानेच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव यांना मराठी भाषा दिनानिमित्त विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमानंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका मुक्ता टिळक, गणेश बीडकर, सुनील महाजन आदी यावेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे दर वर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. यंदा पिंपरीतील संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी हा निधी परत केला. सध्या हा निधी महामंडळाकडे असल्याने त्यांनी त्याचा उपयोग साहित्याच्या विविध कामांसाठी किंवा बालकुमार साहित्य संमेलनासाठी वापरावा. साहित्य हा सांस्कृतिकच अविभाज्य भाग आहे. त्यासाठी देण्यात आलेले अनुदान हे साहित्यासाठीच वापरणे आवश्यक आहे, असे तावडे यांनी नमूद केले.

'सध्या राज्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यामुळे २५ लाख रुपयेही पुरणार नाहीत. परिस्थिती लक्षात घेऊन महामंडळाने या निधीतून दुष्काळी भागात वाचनालय सुरू करावे. बिकट परिस्थितीत संघर्ष कसा करावा, झुंज कशी द्यावी, अशी पुस्तके तेथे उपलब्ध व्हावीत, जेणेकरून दुष्काळ भागातील प्रत्येकाला जगण्याची हिंमत मिळेल,' असेही तावडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही काँग्रेसचे सख्य ‘स्थायी’ राहणार का?

0
0

'राष्ट्रवादी'च्या वचनपूर्तीकडे सर्वांचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली युती पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीत कायम राहणार का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. या अध्यक्षपदाच्या निर्णयावर आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. पालिकेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला दिलेला शब्द राष्ट्रवादीचे नेते पाळणार की पुन्हा मोडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात येत असल्याने नवीन अध्यक्षपदासाठी येत्या ५ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने अध्यक्षपद नक्की कोणाकडे ठेवायचे याचा निर्णय त्यापूर्वी दोन्ही काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. पालिकेत सत्ता स्थापन करताना पाच वर्षांसाठी महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, स्थायी समितीचे अध्यक्षपद चार वर्षे राष्ट्रवादीकडे तर एक वर्ष काँग्रेसकडे ठेवण्याची चर्चा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली होती. काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. यंदाचे वर्ष हे पाच वर्षांतील अखेरचे वर्ष असल्याने काँग्रेसला स्थायी समितीबाबत दिलेला शब्द राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पाळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

पुणेकरांवर वाढीव पाणीपट्टी, स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मान्यता, एसपीव्हीची स्थापना यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. हे प्रस्ताव मान्य करण्यासाठी राष्ट्रवादीने सभागृहात भारतीय जनता पक्षाची मदत घेतली होती. या प्रकारामुळे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवता दोन्ही काँग्रेसने एकत्र येणे गरजेचे आहे. निवडणुकीला अवघे एक वर्ष उरलेले असताना या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फटका निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा बसू शकतो. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चांगले संबंध असणे गरजेचे आहे.

विधानपरिषदेला लागणार मदत

आगामी दोन महिन्यांत विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये पुण्यातील एका जागेचा समावेश असल्याने राष्ट्रवादीला काँग्रेसची मदत लागणार आहे. या सर्वांचा विचार करून राष्ट्रवादीला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेताना करावा लागणार आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद देणार की निवडणुकीत आपला उमेदवार उतरून काँग्रेस विरोधात दंड थोपटणार यावर शिक्कामोर्तब अर्ज दाखल करण्याच्या दिवशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images