Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संजय दत्त आज सुटणार!

$
0
0

पत्नी, वकिलाच्या सोबतीने गाठणार मुंबई

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याची शिक्षा गुरुवारी संपणार आहे. सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान तो तुरुंगातून बाहेर पडणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्याची पत्नी मान्यता आणि वकील त्याला घेण्यासाठी येरवडा तुरुंग परिसरात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संजत दत्त हा सुटणार असल्याने पोलिसांकडून तुरुंगाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. विश्रांतवाडीकडून तुरुंगाच्या दिशेने येणारा रस्ता गर्दीची स्थिती पाहून बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांसह येरवडा पोलिसांतील अधिकारी-कर्मचारी गुरुवारी सकाळी सहापासून बंदोबस्तासाठी तैनात असतील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

तुरुंगातील त्याच्या सामानाची बांधाबांधही झाली असून, लोहगाव विमानतळावरून खासगी विमानाने तो मुंबईतील सहारा विमानतळावर पोहोचेल. विमानतळावरील गेट नंबर आठने तो थेट सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहे. दर्शन झाल्यानंतर आई नर्गिस दत्त यांच्या मरीन लाइन येथील दफनभूमीतील कबरीचे दर्शन घेईल. दोन्ही ठिकाणचे दर्शन घेतल्यानंतर संजय बांद्रा येथील इम्पिरिअल हाइटस् या आपल्या घरी परतेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संजय दत्तच्या सुटक्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांकडून तुरुंगाच्या चोहोबाजूंनी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तो बाहेर पडेपर्यंत तुरुंगाकडे जाणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुरुंग परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून येरवडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, खडकी विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, विलास सोंडे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा अधिकारी आणि शंभर हून अधिक कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून बंदोबस्तासाठी असणार आहेत. तुरुंग परिसरातील १५ रस्त्यांवर पोलिसांची विविध तुकड्या लक्ष ठेवणार आहे. विश्रांतवाडी, प्रतीक नगरकडून जेलच्या समोरून जाणार रस्ता बंद केला जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संजय दत्तच्या सुटकेविरोधात याचिका

अभिनेता संजय दत्त आज, गुरुवारी शिक्षासवलतीमुळे तुरुंगातून सुटणार असतानाच प्रदीप भालेकर यांनी पुन्हा एकदा त्याच्या शिक्षेला आव्हान देणारी जनहित याचिका केली आहे. त्यावर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संजयला पाच वर्षांची शिक्षा झालेली असताना राज्य सरकारकडून त्याच्यावर मेहेरनजर दाखवली जात आहे. चांगल्या वर्तणुकीच्या नावाखाली त्याला शिक्षेत सवलत दिली जात आहे. परंतु, त्याच्याप्रमाणे कित्येक कैदी चांगल्या वर्तणुकीबद्दल अशा शिक्षासवलतीसाठी पात्र असताना त्यांना हा लाभ दिला जात नाही. मग संजयलाच का, असा सवाल भालेकर यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संजय दत्त जेलमधून सुटला!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त आज अखेर सुटला. एकूण ४२ महिन्यांची (आधीचे १८ महिने) शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्तची सुटका करण्यात आली. सकाळी साडेआठच्या सुमारास तो तुरुंगातून बाहेर आला. बाहेर येताच जमिनीला स्पर्श करून आणि तुरुंगाच्या दारावर फडकणाऱ्या तिरंग्याला सॅल्युट ठोकून कोणाशी काहीही न बोलता त्यानं घराची वाट धरली.

संजय दत्तच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाच्या परिसरातात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी व स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संजय दत्तला घेण्यासाठी त्याची पत्नी मान्यता दत्त व बॉलिवूडमधील त्याची काही जवळची मित्रमंडळी कारागृहाबाहेर उपस्थित होती. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी संजय दत्तला गाठून त्याची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं काहीही बोलण्यास नकार दिला. तो तडक गाडीत बसून पुणे विमानतळाकडं रवाना झाला.

सुटकेचा मार्ग सोपा नव्हता!

संजय दत्त विमानानं जाणार असल्याची माहिती असल्यानं पत्रकारांनी विमानतळावरही ठाण मांडले होते. तो विमानतळावर पोहोचताच त्याला वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला. तेव्हा 'सुटकेचा मार्ग सोपा नाही, मित्रांनो', एवढीच प्रतिक्रिया त्यानं दिली. दरम्यान, आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन संजय दत्त आपल्या भावना व्यक्त करणार असल्याचं समजतं.



सुटकेचा निषेध

संजय दत्तच्या सुटकेचा निषेध करण्यासाठी काही लोक येरवडा तुरुंगाच्या बाहेर जमले होते. मात्र, निदर्शनं आणि घोषणाबाजी सुरू करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएनयूतील विद्यार्थी देशद्रोहीच!: वीरपत्नी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशाच्या विरोधात घोषणा देणारे विद्यार्थी देशद्रोहीच आहेत,' असे उद्गार सियाचीनमध्ये शहीद झालेले लान्सनायक हणुमंत्तपा यांच्या पत्नी महादेवी यांनी काढले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या वतीनं आज शहीद हणमंत्तपा यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते हणमंत्तपा यांच्या मातोश्री व पत्नी महादेवी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी बोलताना महादेवी यांनी जेएनयूमधील घोषणाबाजीवर संतप्त प्रतिक्रिया दिली. 'जेएनयूमध्ये झालेल्या घोषणा देशद्रोहीच आहेत. देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकांचा सन्मान राखला जायला हवा. त्यांना देशानं विसरू नये,' असं महादेवी म्हणाल्या.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही दिवसांपूर्वी डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी संसद हल्ल्याचा गुन्हेगार अफझल गुरूची पुण्यतिथी साजरी करत 'भारत तोडो'च्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी केंद्र सरकारनं संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळं राजकीय वादाचा धुरळा उडाला. काँग्रेस, आम आदमी पक्षासह सर्व डावे पक्ष विद्यार्थ्यांचं समर्थन करत सरकारवर तुटून पडले. हा गदारोळ सुरू असतानाच दहा हणमंत्तपांसह दहा जवान देशाचे रक्षण करताना सियाचीनमधील हिमस्खलनात गाडले गेले होते. त्या अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेल्या हणमंत्तपा यांचा नंतर दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. पतीच्या निधनामुळं दु:खाचा डोंगर कोसळलेल्या वीरपत्नी महादेवी आज सत्काराच्या निमित्तानं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड झाली आहे. प्रशांत जगताप यांनी भाजपच्या अशोक येनपुरे आणि शिवसेनेच्या सचिन भगत यांचा दारूण पराभव केला. प्रशांत जगताप यांना सर्वाधिक ८४ मते मिळाली असून भाजपचे अशोक येनपुरे यांना २५ मते तर शिवसेनेच्या सचिन भगत यांना अवघ्या १२ मतांवर समाधान मानावे लागले.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने उमेदवार उभे केले असले तरी मनसे मात्र तटस्थ होती. मनसे तटस्थ राहिल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड झाली असली तरी महापौरपदासाठी पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका उषा कळमकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पक्षाचे चांगेल काम करुन सुद्धा मला संधी देण्यात आली नाही असे उषा कळमकर म्हणाल्या. उषा कळमकर यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक पार पडली. दरम्यान, महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासोबतच बाळासाहेब बोडके, दीपक मानकर, विकास दांगट, बाबूराव चांदेरे आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक मुकारी आलगुडे, सुधीर जानजोत, दत्तात्रय बहिरट आणि नगरसेविका सुनंदा गडाळे यांची नावे चर्चेत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षाला बाराशे जण बेपत्ता

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातील निम्म्याहून अधिक लोक पुन्हा घरी परतत असले तरी, उर्वरित लोक जातात कुठे, हा मोठा प्रश्न आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वर्षाकाठी १२०० जण बेपत्ता होत आहेत.

अपयशाने खचून गेलेले अथवा एखाद्या गोष्टीला कुटुंबाकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत अनेकांची 'मिसिंग' नोंद पोलिस ठाण्यात होत असते. महिन्याकाठी हे प्रमाण सरासरी ९० ते १२५ एवढे आहे. बऱ्याचदा बेपत्ता झालेले काही दिवसांनी पुन्हा घरी परततात. घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असले, तरी उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे, हा मोठा प्रश्न आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागापासून राज्य स्तरावर चालणारे 'मुस्कान'सारखे प्रकल्प बेपत्तांना घरी पोहोचविण्यासाठीच सुरू करण्यात आले आहेत.

मध्यंतरी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अन्य राज्यांच्या पोलिसांशी संपर्क करून मोठ्या प्रमाणात 'मुस्कान' प्रकल्प राबविला. यात रेल्वे पोलिसांनीदेखील हिरीरीने सहभाग नोंदवून अनेकांना आपल्या कुटुंबांशी भेट घडवून आणली. परंतु, तरीही घरातून निघून जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे कुटुंबातील संवाद कसा वाढेल, यावर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकारी नोंदवितात.

अनेकदा घरातून निघून गेलेली व्यक्ती कोणत्या तणावात होती हे कुटुंबातील सगळ्यांना माहीत असते, असे नाही. बऱ्याचदा माहिती असूनदेखील पोलिसांना त्याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे पोलिसांना अशा बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणेही कठीण होऊन जाते. संवाद हेच कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता होणे रोखण्याचे एक साधन आहे. तसेच, बऱ्याचदा आर्थिक संकटात सापडलेले घरातून निघून जातात. तेव्हा त्याचा त्रास कुटुंबातील अन्य सदस्यांना भोगावा लागतो. यातून अन्य गंभीर समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते.

दररोज बेपत्ता झालेल्यांची नोंद काही तासांत सर्व जिल्हा मुख्यालयांत पाठविण्यात येते. त्यानंतर त्याचा स्वतंत्र तपास होतो. परंतु हा मुद्दा सरकारी दफ्तरी नोंदीपुरता मर्यादीत राहतो, वास्तविक ज्यांच्या घरातून एक सदस्य बेपत्ता झाला त्यांना सावरणे कठीण होत असते.

तर अपहरणाचा गुन्हा

बेपत्ता होणाऱ्यांमध्ये ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे, अशांबाबत पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे १२ ते १७ वयोगटातील बेपत्ता होणाऱ्यांची आणि गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातून बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण हे महिन्याकाठी सरासरी १२ एवढे आहे.

'आजही डोळे लावून आहोत'

काही वर्षांपूर्वी दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी एक मुलगा पुण्यातून आकुर्डी येथील कॉलेजमध्ये आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. मुलगा संपर्कात रहावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला स्वतःचा मोबाइल दिला होता; पण तो मुलगा ना घरी परतला ना त्याचा मोबाइल सुरू राहिला. आजही आपला मुलगा घरी परतेल, तो कधीतरी फोन करेल, या आशेवर त्याचे वडील गेल्या ८ वर्षांपासून त्या मोबाइलचे बिल भरून तो नंबर कायमस्वरूपी बंद होणार नाही, याची काळजी घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा अनोखा ‘स्टेशनरी संच’

$
0
0

पिंपरी : परीक्षा किंवा प्रोजेक्ट सबमिशन अशा ऐन वेळी लागणाऱ्या वस्तू वेळेवर न सापडल्यास परीक्षार्थ्यांचे मन विचलित होते. स्टेप्लर, पंचिंग मशिन, स्टॅम्प आणि शार्पनर अशा छोट्या; पण किरकोळ वस्तू अनेकदा सापडत नाहीत. या वस्तू एकत्रित अथवा त्यावर उपाय म्हणून चिंचवड येथील आदित्य जगताप या विद्यार्थ्याने एक 'स्टेशनरी संच' तयार केला आहे. या संचाचा वापर एका वेळी चार प्रकारे होऊ शकतो. असा संच ताथवडे येथील राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकलच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आदित्य जगताप या विद्यार्थ्याने तयार केला आहे. विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स प्रोजेक्ट, सबमिशन करताना स्टेप्लर, पंचिंग मशिन, स्टॅम्प आणि शार्पनर लागत असते; परंतु वेळेवर या वस्तू सापडत नाही. या कल्पनेतून आदित्यने स्टेशनरी संचाची निर्मिती केली. त्याचे पेटंटदेखील त्याच्या नावाने नोंदविले आहे. चार कामांसाठी उपयोगात आणता येणाऱ्या एका संचाला तयार करताना आदित्यला शंभर रुपये खर्च लागला आहे. स्टेशनरी संचात लाकडाच्या आयताकृती फळीवर स्टेप्लर चिकटविण्यात आले आहे. तसेच, स्टेपलरवर पंचिंग मशिनचा वरचा भाग बसविला आहे. पंचिंग करणाऱ्या खिळ्यांना समांतर ठेवून लाकडी फळीला दोन छिद्रे पाडून पंचिंग मशिन तयार केले आहे. पंचिंग मशिनच्या वरचा आणि खालच्या भागात स्टेप्लर बसविण्यात आले आहे. त्यालाच जोडून शार्पनर चिकटविले आहे. संचाचे वैशिष्ट म्हणजे पंचिंग करताना बटण दाबल्याशिवाय स्टेप्लर सुरू करता येत नाही. संचाचा वापर करताना खटका खाली ओढावा लागतो. सहज आपण कुठेही या मशिनला नेऊ शकतो. यासाठी आदित्यला वडील आनंदराव जगताप, अंजली जगताप, प्राध्यापक चोपडे, हर्षद मगर, गणेश दुधे, सागर सरवदे, सागर लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघू उद्योजकांसाठी ‘व्हायब्रंट एसएमई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'मेक इन इंडिया' व 'मेक इन महाराष्ट्र'अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मध्यम व लघू उद्योजकांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये 'व्हायब्रंट एसएमई २०१६'चे आयोजन करण्यात आले आहे. सीएमएसचे (कलेक्टिव्ह मार्केटिंग सर्व्हिसेस) संचालक अनिल मित्तल आणि पिंपरी-चिंचवड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत नुकतीच माहिती दिली. या वेळी सीएमएसचे संचालक अभय खिंवसरा, नीतेश मकवाना, दिलीप मॅथ्यू आदी उपस्थित होते. 'व्हायब्रंट एसएमई २०१६'अंतर्गत ३ ते ५ मार्च २०१६ या कालावधीत होणाऱ्या उपक्रमात २३ प्रकारच्या उद्योगांमधील १५० प्रदर्शक आपली उत्पादने सादर करणार आहेत. यामध्ये इंजिनीअरिंग गुड्‌स, मॅन्युफॅक्चरिंग व त्यांच्याशी संबंधित सेवा क्षेत्रातील उद्योजकांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. या अंतर्गत कंपन्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यात येतील. तसेच, नवीन मशिनरीचे उत्पादक, त्यासंबंधी विक्रीपश्चात सेवा देणाऱ्या सेवा, उद्योजक आणि ग्राहक यांच्याशी समन्वय साधून अनेक औद्योगिक करार होणार आहेत. यातून औद्योगिक विकासाला, रोजगार आणि व्यवसायाला अनेक संधी उपलब्ध होणार आहे. 'व्हायब्रंट एसएमई २०१६'चे वैशिष्ट्य म्हणजे नवतंत्रज्ञान व उत्पादन उपक्रमात 'टेकी शो' आणि 'प्रॉडक्ट रॅम्प वॉक' हे दोन अभिनव विकास मंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये या क्षेत्रात दीर्घ काळ असणाऱ्या कंपनी व्यवस्थापनातील उच्च अधिकाऱ्यांबरोबर नवउद्योजकांना स्टार्टअपसाठी आपली नवीन उत्पादने, संशोधन, प्रकल्प, गुंतवणूक, बँक संपर्क व सहयोगी संस्थांशी समन्वयासाठी संपर्क प्रस्थापित करता येतील. 'सीएमएस' ही संस्था 'मेक इन इंडिया'ला व 'मेक इन महाराष्ट्रा'च्या पूर्ततेसाठी शहरात पहिलाच उपक्रम राबवित आहे. ही संस्था लघू व मध्यम उद्योजकांच्या प्रगतीसाठी मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड घाटातही जाळ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सिंहगड घाट रस्त्यावरील दरडप्रवण भागातील धोकादायक दरडी हटवण्यास; तसेच संरक्षण जाळ्या बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यादरम्यान गेल्या दोन वर्षांत सिंहगड घाट रस्त्यावर लहान मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात दुचाकी स्वाराच्या डोक्यात दगड पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तसेच, दर काही दिवसांनी डोंगरावरून खडी आणि लहान मोठे दगड घसरून खाली येते होते. येत्या पावसाळ्यापूर्वी अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरडप्रवण डोंगरांवर जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पर्यटकांनी वारंवार केली होती. पण, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून हे काम रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सिंहगडाच्या घाट रस्त्यावर सहा ठिकाणी एकूण शंभर मीटर अंतर धोकादायक असून त्या भागात पोलादी जाळ्या बसविण्यात येणार आहे. हे काम संपविण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. पण, धोकादायक भाग पावसाळ्यापूर्वी संपविण्यात येणार आहे. यासाठी लागणारे पैसे वन विभागाने यापूर्वीच खात्याकडे जमा केले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सिंहगडाचा घाट रस्ता सात किलोमीटर आहे. यातील काही ठिकाणी दरडी केवळ साफ कराव्या लागणार आहे, तर काही ठिकाणी स्टील रोल केबलच्या जाळ्या लावाव्या लागतील. यासाठी वळणांवर दरडीचे धोके अधिक असल्याने तेथे पोलादी जाळीचे दोन थर लावण्यात येतील. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महादुर्बिणीच्या परिघात विज्ञानमेळा

$
0
0

जुन्नर : विज्ञान दिनानिमित्त गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेला विज्ञानमेळा २८ आणि २९ फेब्रुवारीला खोडदच्या महादुर्बिण प्रकल्पात भरणार आहे. राज्यातील विविध शाळा; तसेच कॉलेजांतील दोनशे वैज्ञानिक प्रकल्प या वेळी पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
'जीएमआरटी'चे प्रशासकीय अधिकारी आणि विज्ञानदिन समितीचे अध्यक्ष डॉ. जे. के. सोळंकी, डीन यशवंत गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा 'इस्रो', टीआयएफआर मुंबईची घर प्रयोगशाळा, हवामानशास्त्र विभागाची हवामानशास्त्र प्रयोगशाळा आकर्षण असणार आहेत. राज्यातील विविध भागांतून वीस हजारांपर्यंत विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येतील, असे त्यांनी सांगितले. 'जीएमआरटी इंजिनीअरिंग सिस्टीम'ची कार्यप्रणाली; तसेच रेडिओ दुर्बिणीचा अँटेना वापरून पल्सार, सूर्य यांचे थेट प्रक्षेपणदेखील पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहीती येथील वैज्ञानिक नरेंद्र पात्रा यांनी दिली. गुरुत्वीय लहरींचा शोध लागल्याच्या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर जीएमआरटीमधील पल्सार टायमिंग प्रणालीद्वारेदेखील गुरुत्वीय लहरींचा शोध घेणे हे शक्य होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. विज्ञानमेळ्याचे उद‍्घाटन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते २८ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे, तर समारोप २९ फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता ए.आर.आयचे संचालक डॉ. किशोर पाकणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनआरएचएम’ला ‘पीएफ’साठी पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) म्हणून ठरावीक रक्कम कपात करणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाला (एनआरएचएम) अखेर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचा 'पीएफ' भरण्यासंदर्भात 'इपीएफ' कार्यालयाने स्मरणपत्र पाठविले आहे. त्यामुळे आता या पत्रानंतर आरोग्य खाते नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील वीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा पीएफ केंद्र-राज्य आणि 'इपीएफ' यांच्या वादात अडकला आहे. या पत्रामुळे 'एनआरएचएम' विभागाला जाग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 'एनआरएचएम' विभागाला पीएफ न भरण्यासंदर्भात 'इपीएफ' विभागाने यापूर्वी २०१५ पर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपून काही महिने उलटले, तरी 'एनआरएचएम' विभागाकडून 'इपीएफ' विभागाला दाद दिली जात नव्हती. या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने आवाज उठविला. अखेर 'इपीएफ' विभागाने यापूर्वी पत्र पाठविले. त्या पत्राला उत्तर न मिळाल्याने पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. 'एनआरएचएम' विभागातील कर्मचाऱ्यांनी 'इपीएफ' कायद्या लागू असून त्याची अंमलबजावणी होण्याबाबत 'इपीएफ' विभागाने पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने कोणत्याही विभागाला 'पीएफ' भरण्यापासून वगळण्यात येणार नाही असे ७ सप्टेंबर २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार 'एनआरएचएम'मधील सर्व कर्मचारी, डॉक्टरांना हा कायदा लागू असून त्यानुसार त्यांच्या 'पीएफ'ची रक्कम भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची 'पीएफ' भरले की नाही याची माहिती 'इपीएफ' विभागाला देण्यासंदर्भात माहिती तत्काळ पाठवावी तसेच 'इपीएफ'च्या नियमाची अंमलबजावणी करावी असे स्मरणपत्र 'इपीएफ'च्या पुणे विभागाचे सहायक पीएफ आयुक्त व्ही. व्ही. गोटखिंडीकर यांनी पाठविले आहे. या संदर्भात गोटखिंडीकर यांच्याशी संपर्क साधला असता मात्र तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाधी परिसराची सफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे शहर वसविण्यात महत्त्वाचा वाटा असलेले नानासाहेब पेशवे यांच्या समाधीच्या परिसराची निरंजन सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सफाई केली. या संदर्भातील चित्रवृत्त 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. मुठा नदीकाठी यशवंतराव चव्हाण दुचाकी पुलाजवळ नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे. शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना उभी करणारे आणि शहर वसविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पेशवे यांची समाधी हा शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, गेल्या काही दिवासंत या परिसराची दुरवस्था झाली होती. या परिसरात घाणीचे साम्राज्य उभे राहिले होते. तसेच, सिगारेटची थोटके, गुटख्याची पाकिटे आणि दारूच्या बाटल्या येथे पडल्या होत्या. या संदर्भातील चित्रवृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर निरंजन सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि ३० ते ४० जणांनी या संपूर्ण परिसराची सफाई केली. यामध्ये तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. ऐतिहासिक वारशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होणे, ही दुःखाची बाब आहे. परंतु, केवळ हळहळ व्यक्त न करता स्वतः काही वाटा उचलावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी सांगितले. या वेळी कर्नल सदानंद साळुंखे, विठ्ठल काटे, पोपटलाल शिंगवी उपस्थित होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी ही सफाई केली असली, तरी त्याची नियमित देखभाल करणे, हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे येथे संरक्षक कुंपण बसविणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे अशा उपाययोजनांची गरज आहे, असे संस्थेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘​टेक मंथनमुळे संशोधनाची गोडी’

$
0
0

हडपसर : 'विद्यार्थ्यांनी चौकस वृत्तीचा अंगिकार करून संशोधन करण्यावर भर द्यावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचा चिकीत्सक वृत्तीने अभ्यास करून त्यामागील वैज्ञानिक संकल्पनाचा शोध घ्यावा. 'टेक मंथन'सारख्या उपक्रमामुळे आजच्या युवा पिढीला संशोधनाची गोडी लावण्यासाठी नक्कीच मदत होईल,' असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी 'टेक मंथन'च्या उद‍्घाटनप्रसंगी केले. हडपसर जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर शैक्षणिक संकुलात 'टेक मंथन टेक्निकल फेस्टिवल'चे उद‍्घाटन डॉ. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जेएसपीएमचे संस्थापक सचिव प्रा. टी. जे सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे धर्मदाय सहआयुक्त शिवकुमार डिगे, नवनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सावंत आदी उपस्थित होते. अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने 'टेक मंथन'चे आयोजन केले होते. यामध्ये दिनेश शिरसाट या विद्यार्थ्याने बनवलेला गाडीच्या शॉकॉब्जरद्वारे विद्युतनिर्मिती करण्याचा प्रकल्प लक्षवेधी ठरला. ज्या वेळी गाडीचे शॉक ओब्सारवर आणि स्पस्पेशन त्यावेळी एक खास बनवलेल्या लिंकेजद्वारे गिअर सिस्टीमला ऊर्जा दिली जाते. गिअर सिस्टीम वीडीसी डायनोमोला गती देते. डायनोमो फिरल्यामुळे विद्युत निर्मिती होते. अध्यक्षीय भाषणात सावंत म्हणाले, 'समाजाला उपयोगी पडणाऱ्या नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांद्वारे 'टेक मंथन'मध्ये मांडण्याचा आमचा मानस आहे. भविष्यात आमचा विद्यार्थी उपग्रहांबाबत संशोधन करण्याकरिता शिक्षक व विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. सूत्रसंचालन प्रा. उल्हास माळवदे, गणेश गानबोटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-सेना आमने-सामने

$
0
0

भाजप-सेना आमने-सामने

पुणे : महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीऐवजी प्रथमच एकमेकांविरोधात उभे ठाकले. आगामी महापालिकेची चुणूकच त्यातून स्पष्ट झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले हे पक्ष आता महापालिका निवडणुकांमध्येही स्वतंत्र वाटेने जाण्याची ही कदाचित रंगीत तालीमच ठरेल, असे दिसते.
दत्तात्रय धनकवडे यांची महापौर निवडणूक भाजप-सेना युतीने एकत्र लढवली होती. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांची २५ वर्षांची युती संपुष्टात आली होती. विधानसभेच्या निकालानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले असले, तरी एकमेकांवर टीका करण्याची संधी एकही पक्ष सोडताना दिसत नाही. पुणे महापालिकेत भाजप-सेना युती अनेक वर्षांपासून एकत्र आहे. अलीकडच्या काळात राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवरून युतीतील विसंवाद वाढीस लागला होता. हेल्मेटसक्ती आणि टीडीआर धोरण यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जाहीर भूमिका घेतली होती; तसेच २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास भाजपचा पाठिंबा होता; पण शिवसेनेने विरोध केला होता. स्मार्ट सिटी आणि एसपीव्ही कंपनीच्या स्थापनेतील जाचक अटींनाही शिवसेनेचा विरोध आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना भाजपने विश्वासात न घेतल्याची टीका करून शिवसेनेने दोन्ही पदांसाठी अर्ज भरले होते. दोन्ही पक्षांमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी समेट होईल, अशी आशा होती; परंतु एकाही पक्षाने उमेदवारी मागे घेतली नाही. परिणामी दोन्ही निवडणुकांसाठी आपापसातले वैर विसरून सत्ताधारी एकत्र आले असताना, विरोधक मात्र विखुरलेले होते.
..................
कोंडीत पकडण्याची रणनीती
आगामी महापालिका निवडणुकीत विधानसभेप्रमाणे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचे संकेत गुरुवारच्या घटनेतून मिळाले आहेत. सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधणाऱ्या 'पुणे पॅटर्न'ला भाजपकडून पुन्हा उजाळा मिळत असताना, काही वर्षांपूर्वी याच 'पुणे पॅटर्न'चा लाभार्थी ठरलेल्या शिवसेनेला मात्र आता त्यामध्ये स्थान राहिलेले नाही. परिणामी पुणेकरांच्या हिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत, सत्ताधाऱ्यांसह भाजपलाही कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी असले, तरी राजकीय रंग स्पष्ट होऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांच्या कोर्ससाठी सहा वर्ष कशी लागतात?

$
0
0

तीन वर्षांच्या कोर्ससाठी सहा वर्ष कशी लागतात?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'एफटीआयआय'मधील वाद मिटला हे बरे झाले. विद्यार्थ्यांनी आता इतर गोष्टींपेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देत तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी सहा वर्ष कशी लागतात,' असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. 'जेएनयू'मधील वादाबाबत विचारले असता, त्यांनी कानावर हात ठेवले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) चित्रपट जतनाविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा, फिल्म हेरिटेज फाउंडेशनचे संचालक शिवेंद्र डुंगरपूर, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम व संतोष अजमेरा यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवर या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनीता आपटे यांनी केले.
'एफटीआयआय'मधील आठवणींना उजाळा देताना शाह यांनी सांगितले की, 'खिशात दहा रुपये असताना १९७३ मध्ये मी या संस्थेत आलो. या संस्थेत शिक्षण झाल्याने स्वप्न पूर्ण झाले. मी चित्रपट क्षेत्रात उशीरा पदार्पण केल्याने माझ्या अनेक संधी हुकल्या. वाईट चित्रपट तयार करणे अवघड असते.'
दरम्यान शाह यांना पत्रकारांनी एफटीआयआयबाबत विचारले असता, 'वाद मिटला हे बरे झाले. विद्यार्थ्यांनी आता इतर गोष्टींपेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देत तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी सहा वर्ष कशी लागतात,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या मी कोणताही चित्रपट करत नसून, गेल्या दोन वर्षांतील माझ्या चित्रपटांविषयी बोलण्यासारखे काही नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जेएनयूमधील वादाविषयी त्यांना हटकले असता, राजकारणाविषयी विचारू नका, असे उत्तर देत त्यांनी कानावर हात ठेवले.
..................
विसंगतीवर बोट
'सेन्सॉर बोर्ड चित्रपट कापून जतन करते, तर एनएफएआयमध्ये संपूर्ण चित्रपट जतन केला जातो,' अशा मिश्किल विधानातून नसिरूद्दीन शाह यांनी सरकारी पातळीवरील विसंगतीवर बोट ठेवले. निसर्गाचे जतन व संवर्धन जसे आवश्यक असते, तसेच चित्रपट जतन करणे आवश्यक आहे. हा ठेवा पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी चित्रपट संवर्धन चळवळ व्हायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’ प्रकल्पांना पालिका कारभाराचा फटका

$
0
0

'एफटीआयआय' प्रकल्पांना पालिका कारभाराचा फटका

पुणे : विद्यार्थ्यांच्या विरोधाची धग शांत झाल्यानंतर राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) विविध प्रकल्पांना सुरुवात केली असली, तरी महापालिकेच्या संथ कारभाराचा फटका पूर्वीच्या प्रकल्पांना बसला आहे.
संस्थेच्या आवारात उभी करण्यात येणारी दोन थिएटर आणि एक अॅक्टिंग स्टुडिओ यांना वर्ष उलटून गेले तरी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता मिळालेली नाही. एफटीआयआयच्या या महत्त्वाच्या प्रकल्पांची फाइल पालिकेत धूळ खात पडली असून त्यावर निर्णय घेण्यास सरकारी बाबूंना वेळ मिळालेला नाही.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. विद्यार्थ्यांचा विरोध झुगारत अभिनेते गजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सात जानेवारी रोजी स्वीकारला. संस्थेचा सुमारे सहा महिन्यांचा कार्यकाळ आंदोलनाच्या गोंधळात गेल्याने पालिकेच्या प्रशासनाने संस्थेच्या प्रकल्पांना मंजुरीच दिली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. एफटीआयआय हनुमान टेकडीजवळ दोन स्टुडिओ उभारणार असताना पूर्वीच्या प्रकल्पांना पालिकेकडून मान्यता मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लॉ कॉलेज रस्त्यावरील संस्थेच्या परिसरात सीआरटी म्हणजे क्लासरूम थिएटर; तसेच सहाशे आसनी सुसज्ज असे थिएटर व अॅक्टिंग स्टुडिओ उभारण्याचा संस्थेचा प्रकल्प आहे. मात्र, यास एका वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मान्यता मिळालेली नाही, अशी माहिती एफटीआयआयचे कुलसचिव उत्तमराव बोडके यांनी 'मटा'ला दिली.
क्लासरूम थिएटर, सहाशे आसनी सुसज्ज असे थिएटर व अॅक्टिंग स्टुडिओ यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंदाजपत्रकही मंजूर करण्यात आले आहे. मात्र, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता मिळालेली नसल्याने प्रकल्पांना सुरुवात होऊ शकलेली नाही. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे, त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करता येईल. परवानगी न मिळाल्याने एक वर्ष वाया गेले. या कालावधीत प्रकल्प पूर्णत्वास गेले असते, याकडे डॉ. बोडके यांनी लक्ष वेधले. याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीशी संपर्क होऊ शकला नाही.
...............
महत्त्वाचे प्रकल्प रखडले
एफटीआयआय ही चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील मातब्बर संस्था असून या माध्यमांचे शिक्षण देणारी ही संस्था पुण्याचे वैभव म्हणून ओळखली जाते. या संस्थेने अनेक दिग्गज कलाकार चित्रपट क्षेत्राला दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संस्थेच्या कारभाराचा गाडा पुढे सरकू शकला नाही. मात्र, आता केंद्र सरकारच्या या संस्थेला पालिकेच्या कारभाराचा फटका बसू लागला असून, त्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प रखडले गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संजय अखेर जेलबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ येरवडा

सकाळी आठ वाजून ३७ मिनिटांची वेळ... येरवडा जेलसमोरील रस्ता बंद तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा... या वातावरणात येरवडा जेलचा तो छोटाशा दरवाजा उघडला जातो... ब्लू जीन्स आणि निळा शर्ट तसेच दाढी वाढलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्त 'मुन्नाभाई'च्या थाटात बाहेर पडतो...जेलसमोरील पटांगणात काही पावले चालत आलेला संजय दत्त अचानक थांबतो आणि पाठीमागे वळून जेलकडे पाहतो. जेलचे प्रवेशद्वार आणि त्यासमोर फडकणाऱ्या ​तिरग्यांला 'सॅल्यूट' ठोकतो. संजय दत्तच्या येरवड्यातील 'जेल एंट्री'चा गुरुवारी सकाळी अशा प्रकारे शेवट झाला.
मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या संजय दत्तला एके-४७ बाळगल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. तब्बल पाच वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या संजय दत्तने गुरुवारी सकाळी जेलच्या पटांगणात मोकळा श्वास घेतला. यावेळी त्याला आपल्या भावनांनाही आवार घालता आला नसल्याचे चित्र होते.
संजय दत्तच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. त्याला नेण्यासाठी त्याची पत्नी मान्यता गेटवर उभी होती. एका हातात बॅग तर दुसऱ्या हातात कागदपत्रे घेऊन आलेल्या संजय दत्तला लगेचच कारमध्ये बसवून त्याला विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले. त्यानंतर साडेदहाच्या ​सुमारास खासगी विमानाने तो, त्याची पत्नी मान्यता, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, त्याचे वकील तसेच काही मित्र हे मुंबईकडे रवाना झाले.
संजय दत्त जेलच्या बाहेर पडताच माध्यमांनी त्यांची छबी टिपण्यासाठी धांदल उडाली होती. अखेर पोलिसांनी सुरक्षेचे कडे करून त्याला खाजगी गाडीत बसवले. माध्यम प्रतिनिधींची गर्दी पाहून बोलण्यासाठी तो गाडीतून खाली उतरला. त्याचवेळी सर्व प्रतिनिधी त्याच्या दिशेने धावले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला लगेचच पुन्हा कारमध्ये बसवले आणि निघून गेले.
'अनेकांच्या आशीर्वादामुळे या सर्वातून बाहेर पडलो आहे. शिक्षा भोगून बाहेर पडणे कठीण होते,' अशी प्रतिक्रिया त्याने लोहगाव विमानतळावर माध्यमांसमोर व्यक्त केली आणि त्यानंतर तो विमानतळावरील खासगी विमानात बसण्यासाठी गेला.
..................
जेलसमोर निदर्शने
संजय दत्तच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर कर्जदार, जमीनदार हक्क बचाव समितीकडून जेल समोर निदर्शने करण्यात आली. बाळासाहेब रावसाहेब हंगारागे (वय ३७),अजय किशोर वाल्हेकर (वय ३०) ,सुरेश रावसाहेब हंगारागे(वय २७),अविनाश नानासाहेब पवार (वय ३५ सर्व रा. लोहगांव) आणि सुनील गंगाराम खंदारे (वय १८ रा. येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुश्श...सुटलो एकदाचे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलेला अभिनेता संजय दत्तच्या सजेचा कार्यकाल हा जेलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारे 'शिक्षा' ठरली होती. गेल्या २९ महिन्यांत तो जेलमध्ये असताना कुठलीही अनुचित घटना असो की त्याच्यावरून होणारे आरोप-प्रत्यारोप असो, या दबावाखाली कायमच जेलमधील अधिकारी-कर्मचारी वावरत होते.

संजय दत्तला जेलमध्ये आणण्यात आल्यानंतर येरवडा जेल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले होते. संजयची पॅरोल, फर्लोवर सुटका झाली तर इतरांची का नाही सुटका होत, म्हणून प्रश्न उपस्थित केला जायचा. संजय 'व्हीआयपी' असल्याने त्याला जेलमध्ये 'रॉयल ट्रीटमेंट' मिळत असेल, अशाही वावड्या उठत होत्या. या सगळ्यामुळे जेलमधील अधिकारी-कर्मचारी दबावाखाली वावरत होते.

संजय दत्त आणि बॉम्बस्फोटातील दुसरा आरोपी युसूफ नळवाला यांना एकाच बराकीत ठेवण्यात आले होते. दोघांच्याही खोल्या मात्र स्वतंत्र होत्या. या बराकीवर बंदोबस्तासाठी प्रामाणिक, विश्वासू असे पाच जेल रक्षक नेमण्यात आले होते. हे रक्षक संजय जेलमध्ये आल्यापासून तो जाईपर्यंत तेथेच बंदोबस्तासाठी होते.

संजय जेलच्या नियमानुसार पहाटेच उठत असे. तो नित्यनियमाने व्यायाम करे. व्यायामासाठी जेलमध्ये असलेल्या जुजबी उपकरणांचा त्याने वापर केला. करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आणि लाखो फॅन्स असलेला संजय मात्र जेलमध्ये आपले कपडे आपणच धुवायचा, रोजच्या अंथरूण-पांघरुणाच्या घड्या घालत असे. जेलमधली जेवणच त्याला देण्यात आले. या प्रकारचा शिक्षेचा कार्यकाल संपवल्यानंतर २३ वर्षांच्या दबाबातून आपण मुक्त झाल्याची भावना संजय दत्तने व्यक्त केली.

युसूफ जेलमध्येच

संजय दत्तचा जवळचा मित्र असलेला युसूफ नळवाला हा येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे. संजय दत्तच्या शिक्षेचा कार्यकाळ संपल्याने तो गुरुवारी जेलमधून बाहेर पडला. मात्र, युसूफची शिक्षा अद्याप काही महिने बाकी आहे. युसूफने शिक्षाधीन कैदी असताना संजय दत्तपेक्षा कमी काळ ​जेलमध्ये वास्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षेचा काळ संजय दत्तपेक्षा काही महिने अधिक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

................

दबाब कमी झाला

संजय दत्त हा 'व्हीआयपी' असल्याने आमच्यावर नैतिकदृष्ट्या अधिक दबाब राहत असे. त्याला कुठलाही 'फेवर' मिळणार नाही, यासाठी अधिक काळजी घ्यावी लागत असे. माध्यमे, जागरूक नागरिक तसेच इतर कैदीही त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत अधिक जागरूक असत. पर्यायाने आम्हाला अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन करावे लागे. संजय दत्तची शिक्षा संपणे ही आमच्यावरील दबाब कमी करणारी घटना आहे.

- जेलमधील उच्चपदस्थ अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशविघातक कृत्यांचेसमर्थन करू नका’

$
0
0

हनुमंतप्पा कोप्पद यांच्या पत्नीचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हनुमंतप्पा कोप्पद यांनी देशासाठी बलिदान केले. याचा आम्हाला अभिमान आहे. सैनिकांचे स्मरण ठेवा, त्यांना विसरू नका. जेएनयूमधील देश विघातक कृत्याचे समर्थन करू नका', असे वक्तव्य वीर पत्नी महादेवी हनुमंतप्पा कोप्पद यांनी गुरुवारी पुण्यात केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगरातर्फे सियाचिन येथे वीरमरण आलेल्या लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या परिवाराचे स्वागत करण्यात आले. नागपूर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी ते पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन वीर माता, वीर पत्नी व दीड वर्षाची चिमुकली नेत्रा यांचा गौरव करण्यात आला. महादेवी म्हणाल्या, 'माझी मुलगीदेखील सैन्यात जाऊन देशाची सेवा करेल. हनुमंतप्पा यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सियाचिन येथे देशाचे रक्षण केले; पण त्यांनी कधीही याविषयी तक्रार केली नाही.' वीरमाता म्हणाल्या, 'हनुमंतप्पाने माझ्या पोटी जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे.' या वेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत साठे व प्रदेश मंत्री राम सातपुते, पुणे महानगर अध्यक्ष प्रा. प्रसाद कोरडे उपस्थित होते. 'व्यर्थ न हो बलिदान' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मला दहशतवादी म्हणू नका’

$
0
0

संजय दत्तची पत्रकार परिषदेत विनंती

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

'मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात मी दोषी ठरलेलो नाही. टाडा न्यायालयाने मला दहशतवादाच्या आरोपातून मुक्त केले असून, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत होतो. कृपया दहशतवादी म्हणून माझा उल्लेख करू नये,' अशी विनंती संजय दत्तने गुरुवारी पत्रकरांना केली. येरवडा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर दुपारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

'मी तुरुंगातून सुटलो आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. काही दिवसांच्या पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आलो आहे, असेच मला वाटते आहे', अशी भावना संजय दत्तने व्यक्त केली. येरवडामधून बाहेर पडल्यावर त्याने जमिनीला नमस्कार करत राष्ट्रध्वजाला सलाम केला. यामागचे कारण विचारल्यावर संजय म्हणाला, 'मी देशभक्त आहे. भारतावर माझे नितांत प्रेम आहे. याच कारणास्तव मी हे केले.' तर येत्या काळात आता आपल्याला केवळ कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे आणि कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

तुरुंगातील दिवसांचे वर्णन करताना संजय भावूक होतो. जेलमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे काम केले. अगदी काही दिवस जेल प्रशासन चालवत असलेल्या रेडिओ स्टेशनवर जॉकी म्हणूनही होतो. यादरम्यान अनेकांशी मैत्री झाल्याचे त्याने सांगितले.

मुंबईतील दिनक्रम

तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त सकाळी ११ वाजता त्याच्या मित्रपरिवारासह मुंबईत दाखल झाला. सर्वप्रथम त्याने सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. मग आई नर्गिस यांच्या कबरीपाशीही एकांतात काही वेळ घालवला. तिथून वांद्रे येथील घरी जाऊन वडील सुनील यांच्या फोटोसमोर पूजा केली. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. सश्रम कारावास भोगल्याने त्यातून कमावले पैसे संजयने पत्नी मान्यताकडे दिले. यानिमित्त तिचेही अश्रू अनावर होत होते.

रणबीरचे काम उत्तम

संजय दत्तच्या आयुष्यावर बनत असलेल्या चरित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असेल. याबद्दल खुद्द संजयला विचारल्यावर तो सांगतो, 'मला तो आवडतो. त्याचे काम उत्तम आहे.'

सलमान मार्ग काढेल

सलमान खानविषयी विचारल्यावर, 'तो मला धाकट्या भावासारखा आहे. सर्व अडचणींमधून तो मार्ग काढेल, माझा यावर विश्वास आहे,' या शब्दांत त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजयने राखला ‘प्रकाशझोत’

$
0
0

कॅमेऱ्यात येण्याची घेतली 'दक्षता'

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

संजय दत्त गुरूवारी सकाळी येरवडा जेलमधून सुटणार असल्याचे निश्चित झाल्यावर तो प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात कसा राहिल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. पुण्यातून सकाळी सात वाजता जेलमधून सुटल्यानंतर मुंबईला घरी पोहोचेपर्यंतचे संजयचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. संजयचे प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या कंपनीकडून यासाठी खास खबरदारी घेतल्याचे दिसत होते.

संजय किती वाजता कोणत्या ठिकाणी असेल, तेव्हा कोणता कॅमेरामन उपलब्ध असेल, तसेच तो कोणत्या ठिकाणी केवळ कॅमेऱ्यांना आपली छबी देईल, तर कधी तो माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधेल याची एक लिस्टच तयार करण्यात आली होती. त्याच्या 'पीआर'ने त्याचे वेळापत्रक पद्धतशीरपणे माध्यमांना पुरवले होते. प्रत्येक ठिकाणी पुरेपूर 'फूटेज' मिळेल, याची काळजी त्यांनी घेतली होती.

सकाळी सात वाजता येरवडा जेल, अकरा वाजता चार्टर प्लेन, त्यानंतर मुंबईत सिद्धीविनायक मंदिर व त्यानंतर इम्पेरिअल हाइट्समधील घरी पोहोचेपर्यंतचे वेळापत्रक ठरवण्यात आले होते. पाच वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेऱ्यांमध्ये संजयला टिपण्यासाठी एकाच माध्यमाच्या पाच वेगवेगळ्या व्यक्ती हजर होत्या.

'जेल ते घर' हा प्रवास लवकर व्हावा आणि माध्यमांना टाळता यावे, म्हणून त्याला चार्टर प्लेनने नेण्यात येणार आहे, असे सांगितले जात होते. मात्र, चार्टर प्लेनचा वापर केवळ लवकर घरी पोहोचण्यासाठी होता, माध्यमांना टाळण्यासाठी नव्हे, असेच दिसत होते. कारण प्रसिद्धी माध्यमांना टाळणे तर दूरच; उलट कॅमेऱ्यांची नजर जास्तीत जास्त वेळ संजयवर कशी राहिल, याची पुरेपूर खबरदारी घेतली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images