Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रिक्षाचालकांचा चार मार्चला संप

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा परवाना नूतनीकरणाचे शुल्क १०० रुपयांहून १००० रुपये म्हणजेच दहा पट वाढविल्याच्या निषेधार्थ येत्या चार मार्चला रिक्षा चालकांचा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या बुधवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत संघटनेचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी ही माहिती दिली.रिक्षाचालकांचे विविध प्रश्न; तसेच परवाना नूतनीकरण शुल्क वाढीसंदर्भात कृती समितीची बुधवारी एस. एम. जोशी सभागृहात बैठक झाली.

या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या वेळी संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे, उपाध्यक्ष बाबा शिंदे, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे उपस्थित होते. राव म्हणाले, 'रिक्षाचालकांनी राज्यभर आपली ताकद उभी केली पाहिजे. दिल्लीत सरकार स्थापन केल्यावर केजरीवाल यांनी रिक्षाचालकांमुळे आपचे सरकार आल्याचे सांगितले होते. हा इतिहास आपण मुंबईतील महापालिका निवडणुकीत घडवणार आहोत. मुंबईमध्ये दोन लाख रिक्षाचालक आहेत. यामुळे जे सरकार रिक्षाचालकांचे पोट भरेल ते आमचे असेल. जे सरकार रिक्षा चालकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करेल, त्या सरकारला देखील आम्ही रस्त्यावर आणू.' बाबा कांबळे म्हणाले, 'खासगी कंपन्या शेअर टॅक्सीच्या माध्यमातून रिक्षा व्यवसायावर अतिक्रमण करीत आहेत. स्वस्तात सेवेच्या नावाखाली रिक्षाचालकाला संपवणे योग्य नाही.' शिंदे म्हणाले, 'वाहन चालक मालक प्रतिनिधी संघ रिक्षा चालकांच्या पाठीशी नवीन मोटार वाहन कायदा क्लिष्ट असून त्या विरोधात सर्व संघटनांनी एकत्र यावे. रिक्षा चालकांच्या पाठीशी इतर वाहतूक संघटना उभ्या राहतील. या माध्यमातून राज्य सरकाराला जागे केले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसपीव्हीची स्थापना अनिश्चित?

0
0

एसपीव्हीची स्थापना अनिश्चित?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतील कारभाऱ्यांची संदिग्ध भूमिका, केंद्र-राज्यात सत्तेत असूनही पालिकेत भारतीय जनता पक्षासमोरील संख्याबळाच्या मर्यादा, काँग्रेस-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संधीसाधू राजकारण आणि शिवसेनेने घेतलेले बघ्याचे सोंग... यामुळे स्मार्ट सिटीच्या 'स्पेशल पर्पज व्हेईकल'च्या (एसपीव्ही) स्थापनेची औपचारिकता आज, गुरुवारी तरी पूर्ण होणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. एसपीव्ही स्थापनेची प्रक्रिया आणखी पुढे गेल्यास, केंद्राचे अनुदान मिळविण्यासाठी पालिकेकडे अत्यल्प कालावधी उपलब्ध असेल.
महापालिकेतील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत गोंधळाची असून, एसपीव्ही स्थापनेच्या प्रक्रियेवर टांगती तलवार कायम आहे. काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचा ठाम विरोध मोडून काढत, राष्ट्रवादी-भाजपच्या 'पुणे पॅटर्न' पाणीपट्टीवाढ मंजूर केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा होणार, की वेगळाच चमत्कार होणार, याबद्दल पालिकेत दिवसभर चर्चा सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील मित्रपक्ष आणि विरोधक यांच्यात फाटाफूट झाली आहे. स्मार्ट सिटी असो, वा पाणीपट्टीतील वाढ, राष्ट्रवादी आणि भाजपच्या 'पुणे पॅटर्न'मुळे काँग्रेस-मनसे अशी विरोधकांची जोडगोळी निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी आणि पाणीपट्टी या दोन्ही विषयांना मंजुरी देताना, राष्ट्रवादीने ठोस भूमिकाच घेतलेली नाही. हीच परिस्थिती एसपीव्हीच्या स्थापनेला मंजुरी देतानाही कायम आहे. त्यामुळे, बुधवारी सभागृहात नेमकी एसपीव्हीच्या बाजूने कौल द्यायचा, की विरोधात हे ठरविण्यात वेळ घालविल्याने गणसंख्येवरून सभा तहकुबीची नामुष्की कारभाऱ्यांवर ओढवली.
भाजपसाठी स्मार्ट सिटीची सर्व प्रक्रिया सुलभ होणे अपेक्षित असले, तरी तुटपुंज्या संख्याबळामुळे सत्ताधाऱ्यांच्या मदतीशिवाय निर्णय घेणे त्यांना शक्य नाही. मात्र, स्मार्ट सिटी, पाणीपट्टी या योजनांचे महत्त्व स्थानिक नेतृत्वाला पटवून देण्यात कमतरता राहत असल्यानेच भाजपला वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवावी लागत आहेत.
राष्ट्रवादी-भाजपच्या 'पुणे पॅटर्न'मुळे बाजूला पडलेल्या काँग्रेस आणि मनसेकडे विरोधाशिवाय दुसरे हत्यारच नाही. काँग्रेसने सुरुवातीपासून विरोधाची भूमिका निभावली असली, तरी मनसेचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. स्मार्ट सिटीबाबत त्यांनी आयत्यावेळी बदललेल्या भूमिकेमुळे आता एसपीव्हीबाबत त्यांच्या ठाम विरोधाला फारशी किंमतच राहिलेली नाही.
महापालिकेत सुरुवातीची चार वर्षे शिवसेना सातत्याने भाजपसोबत राहिली आहे. परंतु, केंद्र आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर स्वतःची नेमकी जागा कुठे, हेच अद्याप शिवसेनेला उमगलेले नाही. त्यामुळे, स्मार्ट सिटीला पाठिंबा देतानाच, त्याला ढीगभर उपसूचनाही शिवसेनेकडून दिल्या जातात. पाणीपट्टीला ठाम विरोध करणाऱ्या सेनेसमोर एसपीव्हीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.......................
१५ मार्चपूर्वी कंपनी व्हावी
महापालिकेने एसपीव्ही स्थापनेचा प्रस्ताव आज, गुरुवारी मंजूर केल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे. एसपीव्हीमध्ये राज्य सरकारचा वाटा असल्याने त्यांच्यामार्फत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर कंपनीच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होऊ शकेल. या सर्व प्रक्रियेला किमान आठ ते १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे गुरुवारी एसपीव्हीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही, तर १५ मार्चपूर्वी कंपनी अस्तित्वात येणे धूसर आहे. परिणामी, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर पाणी पडण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ

0
0

येत्या दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सलग तीन-चार दिवस कडाक्याच्या उन्हाचा सामना केल्यानंतर बुधवारी तापमानात घट झाल्याने पुणेकरांना किंचित दिलासा मिळाला. शहरात बुधवारी ३४ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १४.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत मात्र, तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी राज्यात विदर्भ व मराठवाड्यात तापमानात वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी तापमानात काहीशी घट झाली. बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे (४० अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मालेगाव येथे ३७.४, चंद्रपूर येथे ३८.८, उस्मानाबाद येथे ३७.६, औरंगाबाद येथे ३५.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर राज्यातील सर्वात नीचांकी कमाल तापमान नाशिक येथे (१२.७ अंश सेल्सिअस ) इतके नोंदले गेले.
पुढील दोन दिवसांत पुण्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. गुरुवारी राज्यात हवामान कोरडे राहील. शुक्रवारी विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, शनिवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकोरियांसाठी संस्थांची माहिती आयुक्तांकडे दाद

0
0

बकोरियांसाठी संस्थांची माहिती आयुक्तांकडे दाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीमागील कारणे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट करणे आवश्यक असूनही, त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्वयंसेवी संस्थांनी थेट माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडेच दाद मागितली आहे.
राज्य सरकारने बकोरिया यांची दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या आयुक्तपदी बदली केली. पुण्यात दोन वर्षे पूर्ण होत असतानाच, बकोरिया यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याने राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीमुळे नागरिकांना फटका बसणार असल्याने माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ अंतर्गत त्यांच्या बदलीमागील कारणमीमांसा स्पष्ट करणे करणे आवश्यक आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अशी कोणतीही माहिती कलम ४ अंतर्गत जाहीर केली नसल्याने बकोरियांच्या बदलीचे कारण समजावे, यासाठी सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे.
अवघ्या दोन वर्षांमध्ये बकोरिया यांची बदली करताना, तीन वर्षे आणि आठ महिने झाल्यानंतरही दुसरे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची बदली का करण्यात येत नाही, अशी विचारणाही त्यांनी तक्रारीमध्ये केली आहे. तसेच, याबाबत सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपीव्हीची सभा तहकूब

0
0

एसपीव्हीची सभा तहकूब

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी स्पेशल पर्पज व्हेईकलला (एसपीव्ही) मान्यता देण्यासाठी बुधवारी झालेली पालिकेची खास सभा नाट्यमय घडामोडींनंतर तहकूब केली गेली. गणसंख्येचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची बुधवारी कोंडी केली. त्यामुळे आता नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली एसपीव्हीला मान्यता मिळणार की नाही, हे आज, गुरुवारी सायंकाळी स्पष्ट होईल.
एसपीव्हीला मान्यता देण्यासाठी पालिकेची खास सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. या सभेसाठी सुरुवातीला सभागृहात अत्यंत मोजके सदस्य उपस्थित होते. तसेच महापौर, उपमहापौरदेखील अनुपस्थित होते. हीच संधी साधून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी महापौर, उपमहापौरांच्या अनुपस्थितीमध्ये मनसेचे किशोर शिंदे यांना सभापती म्हणून सभेचे अध्यक्ष करावे, असा ठराव दिला. किशोर शिंदे यांनी महापौरांचे आसन ग्रहण करताच, अरविंद शिंदे यांनी कोरमची मागणी केली. या दरम्यान, भाजपचे गटनेते गणेश बिडकर सभागृहात दाखल झाले; तसेच, इतर पक्षांचे आणखी काही सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. खास सभेसाठी आवश्यक असणारा कोरम नसल्याचे नगरसचिवांनी सांगताच, ही सभा थेट १८ मार्चला घेण्यात यावी, अशी तहकुबी काँग्रेसने मांडली. त्याला बिडकर आणि भाजप-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केला. त्याच वेळी सभागृहनेते बंडू केमसे आणि सत्ताधारी पक्षाचे इतर सदस्य सभागृहात आले. त्यांनीही सभा तहकुबीला विरोध केला.
हा सर्व गोंधळ सुरू असतानाच, काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी आक्रमकपणे सभा मार्चपर्यंत तहकूब करावी, अशी आग्रही मागणी केली, तर कोरमअभावी सभा तहकूब होणार हे अटळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही सभा गुरुवारी घेण्याची मागणी राष्ट्रवादी-भाजपने केली. सभापती असलेल्या किशोर शिंदे यांनी तातडीने सभा तहकुबी वाचावी, अशी विनवणी वारंवार काँग्रेस, मनसेच्या सदस्यांकडून केली जात होती; परंतु त्यांच्याकडून विलंब होत असतानाच, महापौर दत्तात्रय धनकवडे सभागृहात दाखल झाले. सर्व परिस्थिती लक्षात घेत, त्यांनी मार्चऐवजी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी पाचपर्यंत सभा तहकूब केली. स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचा निर्णय आता आज, गुरुवारी नूतन महापौर प्रशांत जगताप यांची निवड झाल्यानंतर सायंकाळी होणाऱ्या सभेत घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.
..................
वेळेची महती
एसपीव्हीच्या स्थापनेवर सभा असल्याने त्यात बराचवेळ चर्चा होईल, अशी बहुतेक सदस्यांची अपेक्षा होती. तसेच, गेल्या काही महिन्यांत कोणतीच सभा निर्धारित वेळेत सुरू झाली नव्हती. किमान १०-१५ मिनिटे उशिरानेच सभेचे कामकाज सुरू होत असल्याचा आडाखा बांधून अनेक सदस्य सव्वाअकरा-साडेअकराच्या दरम्यान सभागृहात दाखल झाले. तोवर सभेमध्ये नाट्यमय घडामोडी घडून गेल्या होत्या. त्यामुळे, सभा तहकूब झाल्यानंतर बराच काळ नेमके काय झाले, याची माहिती संबंधित पक्षांचे गटनेते सदस्यांना देत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुपस्थित सदस्यांना भाजपची नोटीस

0
0

अनुपस्थित सदस्यांना भाजपची नोटीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) स्थापनेची खास सभा गणसंख्येअभावी तहकूब झाल्याने अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाने अनुपस्थित राहिलेल्या सर्व नगरसेवकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. एसपीव्हीच्या खास सभेसाठी 'व्हिप' बजावूनही पक्षाचे २६ पैकी केवळ नऊच सदस्य उपस्थित होते.
एसपीव्हीच्या स्थापनेला मंजुरी देण्यासाठी बुधवारी होणाऱ्या खास सभेकरिता पक्षातर्फे सर्व नगरसेवकांना 'व्हिप' बजावण्यात आला होता. ही खास सभा सकाळी ११ वाजता असूनही, पक्षाचे काही मोजकेच सदस्य सभेला उपस्थित होते. महापालिकेत सध्या भाजपचे २६ सदस्य आहेत; पण सभा सुरू झाली त्यावेळी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच सदस्य सभागृहात होते. भाजपसह इतर पक्षांचेही तुरळक सदस्य असल्याने त्याचा फायदा उठवित, काँग्रेसने गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली.
पक्षाचा 'व्हिप' असूनही सदस्य वेळेवर उपस्थित नसल्याने गटनेते गणेश बिडकर यांनी सर्व अनुपस्थित सदस्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. 'उशिरा येण्याबाबत लेखी खुलासा करण्याचे पत्र सर्वांना देण्यात आले असून, सर्वांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल', असे भाजपचे गटनेते बिडकर यांनी सांगितले.
..............
मनसेनेही मागविला खुलासा
भाजपप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सदस्य किशोर शिंदे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. गणसंख्येअभावी सभा तहकूब करण्याची मागणी काँग्रेस, मनसेने केली. त्यावेळी सभापती म्हणून मनसेचे किशोर शिंदे महापौरांच्या आसनावर होते. मात्र, त्यांनी सभा तहकुबीची सूचना वेळेत वाचली नाही. परिणामी, महापौर दत्तात्रय धनकवडे सभेत दाखल झाल्यानंतर त्यांनी केवळ एक दिवसच सभा तहकूब केली. स्मार्ट सिटीला विरोध असल्याने ही सभा थेट १८ मार्चपर्यंत तहकूब करण्याची संधी असूनही त्याबाबत वेळकाढूपणा करण्याचे कारण काय, अशी विचारणा शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेंढपाळ आणि मी’ला छायाचित्रणाचा पुरस्कार

0
0

'मेंढपाळ आणि मी'ला छायाचित्रणाचा पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मेंढपाळ आणि मी' या माहितीपटाला पाचव्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवात उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन विभागातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा विभागातील नॉन फिक्शन गटात या माहितीपटाला नामांकन मिळाले होते. महोत्सवातील चारही गटांमधील नामांकन मिळालेल्या ३१ लघुपट, माहितीपट यामधून हरीश कुलकर्णी यांना 'मेंढपाळ आणि मी' या माहितीपटासाठी उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला.
धनगर समाजात काळानुरूप होणाऱ्या बदलांचा आढावा 'मेंढपाळ आणि मी' माहितीपटामधून घेण्यात आला आहे. मेंढपाळ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दैनंदिन राहणीमानाबद्दल या माहितीपटातून माहिती देण्यात आली आहे. माहितीपटाची निर्मिती संतोष कचरे, ज्ञानेश्वर कचरे व यशोदा कचरे यांच्या धुळेश्वर प्रॉडक्शनची असून, संकल्पना अमोल कचरे यांची आहे. माहितीपटाचे दिग्दर्शन अमोल कचरे, हरीश कुलकर्णी व संतोष शिरगावकर या तीन मित्रांनी मिळून केले आहे. संतोष शिरगावकर व अमित सोनावणे यांनी संकलन केले आहे.
विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव पार पडला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, निर्माता सुहृद गोडबोले आणि अॅनिमेशन फिल्मनिर्मात्या ध्वनी देसाई परीक्षक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबशेती वाढली पाहिजे

0
0

गुलाबशेती वाढली पाहिजे

इंडियन रोज फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुरेश पिंगळे यांची नुकतीच निवड झाली. फेडरेशनचे शंभर शहरांमध्ये जाळे पसरले असून, दीड हजारांहून अधिक सदस्य आहेत. पुढील तीन वर्षांत भारतातील गुलाब शेतीस प्रोत्साहन देऊन त्याचा विकास करण्याचे ध्येय पिंगळे यांनी निश्चित केले आहे. यानिमित्ताने पिंगळे यांच्याशी चैत्राली चांदोरकर यांनी संवाद साधला.
..................

तुम्ही सुरुवातीपासून सोसायटीचे सक्रिय सभासद आहात. गुलाबाच्या शेतीला चालना देण्यामध्ये सोसायटीचा सहभाग आहे का?
इंडियन रोज फेडरेशनची स्थापना १९८७ मध्ये मुंबईत झाली. तेव्हापासून सोसायटीतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये या गुलाबप्रेमींचे संमेलन भरते. यंदा ३४ वे वार्षिक संमेलन पुण्यात घेण्यात आले. आम्ही हॉलंड, रशिया, जर्मनी अशा विविध देशांमध्ये जाऊन गुलाब शेती, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठ याबद्दल सविस्तर अभ्यास केला आहे. गुलाबशेती कशी करावी, यासाठी आम्ही निबंध स्पर्धाही घेतल्या आहेत. सोसायटीने केलेल्या जनजागृतीमुळे अनेक शेतकरी तयार झाले. सध्या पुण्यासह नाशिक, सांगलीमध्ये या शेतीचे प्रमाण उल्लेखनीय आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकरी उघड्या शेतात गुलाब लावत असल्याने त्यांचे गुलाब देशांतर्गत बाजारपेठेतच खपत होते. साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी पॉलिहाऊस दाखल झाली. सोसायटीने पॉलिहाऊसविषयी जागृती केली. सरकारकडे पाठपुरावा करून सबसिडी उपलब्ध करून दिली. आता या व्यवसायाने चांगला जम बसवला आहे.

भारतीय बाजारपेठेचा विचार केल्यास पुण्याची गुलाबशेती कुठे आहे, असे तुम्हाला वाटते?
भारतातून निर्यात होणाऱ्या गुलाबांमध्ये पुणे आणि बेंगळुरू अग्रेसर आहेत. या दोन्ही ठिकाणी वर्षभर गुलाबाला पोषक वातावरण असते. इतर जिल्ह्यांमध्ये हवामानातील गुलाबांची गुणवत्ता ढासळते. पुण्यातील गुलाबांना युरोपीय देशांमधून अधिक मागणी आहे. आपल्याकडील बहुतांश गुलाब निर्यात करण्यासाठीच केला जातो. साधारणतः नोव्हेंबरमध्ये युरोप आणि अमेरिकेत थंडी पडायला सुरुवात झाली की तेथील शेतकऱ्यांचा गुलाब उत्पादनाचा खर्च आणि बाजारपेठेतील दर वाढतात. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात आपल्याला फायदा होतो. आपले शेतकरीदेखील याच काळात ६५ टक्के गुलाबांचे उत्पादन निघेल असे नियोजन करतात. उरलेल्या काळात येणारे गुलाब देशांतर्गत बाजारपेठेत जातात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गुलाबांची मागणी वाढते आहे का, यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा आहे का?
जगाला गुलाब पुरविणाऱ्या युरोपमध्ये सध्या आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रचंड सवलती दिल्या जात होत्या. वीज मोफत, पॉलीहाऊस, कम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी सबसिडी दिली जाते. मात्र, यापुढे हे वाटप युरोपला परवडणार नसल्याने त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. सध्या गुलाबांची जागतिक बाजारपेठेत ६ लाख ८० हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. आपला यात वाटा अर्धा टक्कादेखील नाही. यात हॉलंडचा हिस्सा ६५ टक्के आहे. प्रत्यक्षात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुलाब शेती करणारा हा देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. त्यांच्याकडील मंदीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे.

हवामान बदलाचे पडसाद उमटत असताना, गुलाबशेती योग्य आहे का, रोझ सोसायटीच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात?
इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे हवामान आजही चांगले आहे. आपल्या जमिनीची गुणवत्ता उत्तम असून या शेतीसाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. कामगारदेखील स्वस्त आहे. त्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे. मुख्यतः ग्रामीण भागात ही शेती विस्तारण्यास संधी आहे. एक एकर ऊसाला जेवढे पाणी लागते, तेवढ्यात सात ते आठ एकर गुलाब होऊ शकते. विशेष म्हणजे हॉलंडमधील बडे शेतकरी आपल्याबरोबर काम करण्यास इच्छूक आहेत. या संधीचा लाभ घेतला पाहिजे. सोसायटीच्या माध्यमातून मी पुढील तीन वर्षे तरुण शेतकर्‍यांना गुलाबशेतीकडे वळविण्यासाठी सातत्याने जागृतीपर उपक्रम राबविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीआयडीचे वरिष्ठ पोलिसअधिकारी आगीमधून बचावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे मुकुंदनगर येथील गल्ली नंबर पंधरामध्ये सीआयडीतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या फ्लॅटला बुधवारी पहाटे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पोलिस अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबांची सुखरूप सुटका केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सुरेश शहा (वय ४९) हे कुटुंबीयांसोबत मुकुंदनगर येथील गल्ली नंबर पंधराच्या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये पहाटेच्या सुमारास आचानक आग लागली. अग्निशमन दलास कळविल्यानंतर दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम शहा यांच्या पत्नी व मुलांना मागील दरवाजाने सुखरूप बाहेर काढले. नंतर बेडरूममध्ये अडकलेल्या शहा यांना खिडकीचे गज कापून बाहेर काढले. बेडरूम व हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर आग होती. शहा यांनी सुखरूप झालेल्या सुटकेनंतर जवानांचे आभार मानले. शहा हे सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. विलास दुगाणे, ड्रायव्हर आकाश मोहिते, चंद्रकांत गावडे, संजय जाधव, मनीष बोंबले, सोपान कांबळे, संदीप खरिवले, दशरथ थळकर यांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षगणनेसाठी पालिकाकरणार नऊ कोटी खर्च

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील वृक्षांची गणना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी एका खासगी कंपनीला नऊ कोटी आठ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, एका वृक्षाची गणना करण्यासाठी सर्वसाधारण २२ रुपये ७० पैसे दिले जाणार आहे. महापालिकेच्या वत‌ीने शहरातील वृक्षांची गणना करण्याची मोहीम २०१३ मध्ये हाती घेण्यात आली होती. या वृक्षगणनेमध्ये शहरात जवळपास ३२ लाख वृक्ष असल्याची माहिती समोर आली होती. ही गणना करताना केवळ किती वृक्ष आहेत, याची संख्या मोजण्यात आली होती. वृक्षांचे प्रकार, वय, पत्ता याची कोणतीही माहिती घेण्यात आली नाही. परिणामी, शहरात नक्की किती प्रकारचे वृक्ष आहेत, ते कोठे आहेत, त्यांचे वय किती आहे, ही माहिती मिळण्यास अडचण येते. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांची गणना जीपीएसच्या माध्यमातून करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या कामासाठी ९ कोटी आठ लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. वृक्षांची गणना करण्यासाठी जीपीएस यंत्रणा वापरली जाणार असल्याने वेबसाइट तसेच मोबाइल अॅपद्वारे कळणार आहे. तीन मीटर उंच आणि दहा सेंटीमीटरपेक्षा अधिक घेर असलेल्या वृक्षांचे सर्व्हेक्षण यामध्ये केले जाणार आहे. यामुळे संबंधित वृक्षाची सद्यस्थिती, त्याचे अक्षांश व रेखांश याची माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे वृक्षांच्या अस्तित्वाची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे वृक्षसंवर्धन करण्यासाठी मदत होणार आहे. वृक्षगणना करताना क्षेत्रिय कार्यालय, प्रभाग निहाय अशीही माहिती गोळा केली जाणार आहे. वृक्षांच्या जातीनुसार स्वतंत्र माहिती घेतली जाणार आहे. कार्बन उत्सर्जन दरांबाबतची माहिती मिळणार आहे. या माहितीच्या आधारे भविष्यात कोणत्या भागांत किती वृक्षलागवड करायची आहे, याचे नियोजन करता येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वात कमी दराचे टेंडर सार आयटी रिसोसॅस प्रा. लि यांनी भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे वृक्षजनगणना केली जाणार असल्याने प्रत्येक वृक्षाचा संपूर्ण इतिहासाच उपलब्ध होणार आहे. यामुळे बेकायदा वृक्षतोडीला आळा बसणार आहे. वृक्षसंवर्धन कायद्यानुसार एका वृक्षाची तोड केल्यानंतर, तीन वृक्षांची लागवड केली जाते का, याची माहिती संकलित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य करण्यात आला, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉफी टेबल बुक’मधून कळणार शहराची माहिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, रुढी, परंपरा, पर्यटनस्थळे याची संपूर्ण अद्यावत माहिती देणाऱ्या 'कॉफी टेबल बुक' तसेच महापालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा यांची माहिती एका क्लिकवर पुणेकरांना उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने तयार केलेल्या 'मोबाइल अॅप' चे उद्घाटन बुधवारी झाले. महापालिकेच्या श्री छत्रपती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. 'टाइम्स ऑफ इंडिया' यांच्या पुढाकारातून महापालिकेचे 'कॉफी टेबल बुक' हे पुस्तक तयार करण्यात आले असून, शहराचा इतिहास, संस्कृती जतन करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. पालिकेच्या १४ विभागांचे कामकाज, प्रकल्पांची माहिती या पुस्तकात देण्यात आली असून, १५० पानांची ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व विभागांबरोबर समन्वय साधून, माहिती गोळा करून, फोटोची जुळवाजुळव करण्यासाठी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने केलेल्या सहकार्याचे महापौर धनकवडे, उपमहापौर बागूल यांनी आपल्या मनोगतामध्ये विशेष आभार मानले. या वेळी सभागृह नेते शंकर केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, चेतन तुपे, बाळासाहेब बोडके, गेरा डेव्हलपर्सचे रोहित गेरा, टाइम्स ऑफ इंडियाचे पुणे विभागाचे ब्रॅँच हेड रणजित जगदाळे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहराच्या मुख्य गोष्टींची माहिती असलेला दस्तऐवज असणे ही गरज होती. कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून ही गरज पूर्ण झाल्याचे महापौर धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले. 'बदलत्या काळानुसार महापालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सुविधा मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे होते,' असे उपमहापौर बागूल यांनी सांगितले. शहराच्या विविध कामांचा लेखाजोखा यामुळे नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर पित्ती यांनी केले. आभार संजय मोरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंग परिसरात कडक बंदोबस्त

0
0


पत्नी, वकिलाच्या सोबतीने गाठणार मुंबई

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याची शिक्षा गुरुवारी संपणार आहे. सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान तो तुरुंगातून बाहेर पडणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्याची पत्नी मान्यता आणि वकील त्याला घेण्यासाठी येरवडा तुरुंग परिसरात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संजत दत्त हा सुटणार असल्याने पोलिसांकडून तुरुंगाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. विश्रांतवाडीकडून तुरुंगाच्या दिशेने येणारा रस्ता गर्दीची स्थिती पाहून बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांसह येरवडा पोलिसांतील अधिकारी-कर्मचारी गुरुवारी सकाळी सहापासून बंदोबस्तासाठी तैनात असतील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

तुरुंगातील त्याच्या सामानाची बांधाबांधही झाली असून, लोहगाव विमानतळावरून खासगी विमानाने तो मुंबईतील सहारा विमानतळावर पोहोचेल. विमानतळावरील गेट नंबर आठने तो थेट सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहे. दर्शन झाल्यानंतर आई नर्गिस दत्त यांच्या मरीन लाइन येथील दफनभूमीतील कबरीचे दर्शन घेईल. दोन्ही ठिकाणचे दर्शन घेतल्यानंतर संजय बांद्रा येथील इम्पिरिअल हाइटस् या आपल्या घरी परतेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संजय दत्तच्या सुटक्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांकडून तुरुंगाच्या चोहोबाजूंनी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तो बाहेर पडेपर्यंत तुरुंगाकडे जाणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुरुंग परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून येरवडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, खडकी विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, विलास सोंडे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा अधिकारी आणि शंभर हून अधिक कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून बंदोबस्तासाठी असणार आहेत. तुरुंग परिसरातील १५ रस्त्यांवर पोलिसांची विविध तुकड्या लक्ष ठेवणार आहे. विश्रांतवाडी, प्रतीक नगरकडून जेलच्या समोरून जाणार रस्ता बंद केला जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नथुराम हा पहिला दहशतवादी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी सहिष्णुता होती, असे म्हणता येणार नाही; पण गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे स्वातंत्र्यानंतरचा देशातील पहिला दहशतवादी आहे, हेही नाकारता येत नाही. आज त्याच नथुरामचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरू असून, हे दुदैवी आहे,' अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी केली. 'असहिष्णुता कोणा एका राजकीय पक्षाच्या माथी मारता येणार नाही. असहिष्णुता एका धर्मापुरती किंवा भाजपपुरती मर्यादित नाही. ती सर्व धर्मात व राजकीय पक्षात आहे,' असे त्यांनी ठणकावून सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती स्वतंत्र्य आणि सद्यस्थिती' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी, प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, ललिता सबनीस उपस्थित होते. 'डाव्या विचारसरणींच्या महापुरुषांची उजव्या विचारणीवाल्यांनी पळवापळवी केली,' अशी टीका करून डॉ. सबनीस म्हणाले,' महापुरुषांच्या अनुयायांनी देशात गोंधळ घालण्याचे काम केले. महापुरुषांचे विचार घेण्यापेक्षा त्यांचे अनुयायीच भांडण लावत आहेत. खऱ्या हिंदू व इस्लाम धर्माला असहिष्णुता अभिप्रेत नाही. कोणत्याही धर्मातील व्यक्तीची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानव जातीची हत्या करण्यासारखे आहे. मार्क्सवादी विचारांच्या बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या काळात नंदीग्राममध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा जो प्रकार घडला, तोही देशातील असहिष्णुतेचेच उदाहरण मानायला हवा. '

'बाजू मांडताना विवेक हवा'

'जेएनयूमधील घटना सहजासहजी घडलेली नाही. देशद्रोह आणि देशभक्ती यांची व्याख्या करणाऱ्यांनी आपली बुध्दी कोणत्याही विचारसरणीच्या दावणीला न बांधता व्याख्या करावी. राष्ट्रविरोधात घोषणा देणे, शत्रु राष्ट्राचा जयजयकार करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसते का,' असा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी विचारला. 'कोणतीही बाजू मांडताना विवेक जागृत ठेवायला हवा. इतिहास विवेकाने वाचावा आणि विवेकाने लिहावा,' असा सल्ला त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाच हजार संस्थांवर कारवाई

0
0

जिल्ह्यातील ११८ कागदोपत्री सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकार खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या ४९ हजार सहकारी संस्थांपैकी सुमारे साडेपाच हजार संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असून, पुणे जिल्ह्यातील ११८ संस्था असल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.

राज्यात सुमारे दोन लाख २८ हजार सहकारी संस्था आहेत. या संस्थांची सद्यस्थिती पाहण्यासाठी सहकार खात्याकडून जुलै ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात सुमारे ४९ हजार ३०४ या संस्था कागदावरच असल्याचे आढळून आले होते. या संस्थांची सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केल्यावर सुमारे साडेपाच हजार संस्था कागदोपत्रीच नोंदविल्याचे दिसून आले. या संस्था नोंदविण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचे कामकाज स्थगित आहे; तसेच काही संस्था दिलेल्या पत्त्यांवर अस्तित्त्वातच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रद्द झालेल्या संस्थांमध्ये सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ११८ संस्था असून, ग्रामीण भागातील ११५ तर, शहरातील तीन संस्थांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील २८ संस्था असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी झालेल्या सर्वेक्षणात कागदावर आढळून आलेल्या संस्थांची अधिक तपासणी केल्यानंतर त्यापैकी सुमारे ५१ हजार ७४ सहकारी संस्थांचे कामकाज स्थगित असल्याचे आढळले. संबंधित संस्थांना सहकार खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी बंद, दिलेल्या पत्त्यांवर नसलेल्या आणि केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या सुमारे साडेपाच हजार संस्थांची नोंदणी रद्द झाली असल्याचे अधिकऱ्यांकडून नमूद करण्यात आले.

नोंदणी रद्द झालेल्या सहकारी संस्थांमध्ये गृहनिर्माण संस्थांबरोबरच नागरी ग्रामीण पतपुरवठा संस्था, नागरी बँका, नोकरदार पतपुरवठादार संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी पतसंस्था आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या उद्देशानेच प्रौढाचा खून

0
0

शिवाजीनगर येथील गुन्ह्याप्रकरणी एकाला अटक; दिली कबुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मंगला थिएटरच्यापाठीमागील बाजूस असलेल्या इमारतीमध्ये झालेल्या प्रौढाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत चोरट्यांनी चोरीच्या उद्देशानेच हा खून केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

सागर उर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे (वय २३, रा. पीएमसी कॉलनी, शंकरशेट रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. साथीदार मयूर राजेंद्र शिंदे (रा. पुणे) याचा शोध सुरू आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरी चोरी आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत. भांडे याने शनिवारवाड्यातील सुरक्षारक्षाकाचा खून केला होता. तर, शिंदे याने त्याच्या मित्राचा खून केला होता. दोघेही व्यसनासाठी गुन्हे करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

या घटनेत नारायण हसानंद नागदेव (वय ५०, रा. शिवाजीनगर) यांचा खून झाला होता. नागदेव तेल घाण्यामागील घरात नागदेव रविवारी रात्री झोपले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचा खून करून घरातील तीन लाखांची रोकड चोरून नेली. वर्दळीच्या शिवाजीनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस कर्मचारी शिवानंद स्वामी, जावेद पठाण यांना सूत्रांकडून आरोपींविषयी माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक सीताराम मोरे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बाबर, कर्मचारी अशोक भोसले, संदीप तळेकर, दिनेश शिंदे, रोहिदास लवांडे, महेश पवार, संदीप राठोड यांच्या पथकाने राहुल थिएटरजवळील पुलाखालून भांडेला अटक केली. त्याच्याकडे नागदेव यांच्या घरातून चोरलेले अडीच हजार रुपयांचे चिल्लर नाणी, चांदीचे दागिने आदी पाच हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

त्याच्याकडे तपास केल्यानंतर आरोपी शिंदेच्या सोबत खून केल्याची कबुली दिली. शनिवारी रात्री दोघेजण चोरीच्या उद्देशाने नागदेव यांच्या घरामध्ये घुसले. त्यांनी बॅगांमध्ये दगड घालून नागदेव यांचा खून केला. चोरट्यांनी नागदेव यांच्या घरात खिडकीतून प्रवेश केला होता. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खिडक्यांना जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

..

देणी चुकविण्यासाठी चोरीचा डाव

भांडे याला फरार आरोपी शिंदेकडून काही रक्कम येणे होती. ती रक्कम देण्यासाठी दोघांनी मिळून चोरी करण्याचे ठरविले. त्यानुसार शिंदेने घराची पाहणी केली. रविवारी रात्री दोघांनी मिळून नागदेव यांचा खून करून चोरी केली. भांडेचे वडील पीएमसीमध्ये नोकरीला आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पस्तीस टक्के पुणेकर ‘बसून’

0
0

'मॅक्स बुपा वॉक फॉर हेल्थ' सर्वेक्षणातील चालण्यासंदर्भातील निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उत्तम आरोग्यासाठी दररोज काही वेळ तरी चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, उत्तम आरोग्याच्या या सल्ल्याला ३५ टक्के पुणेकर केराची टोपली दाखवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणासारखे आजार वाढत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

'मॅक्स बुपा वॉक फॉर हेल्थ'ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. पुण्यासह मुंबई, दिल्ली जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या शहरांतील चालण्याची सवय असलेल्या १३०० नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. वाढते शहर, धकाधकीचे जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे पुणेकरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडून नियमित व्यायाम करण्याचा आणि चालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, अनेक पुणेकरांनी त्याला हरताळ फासला आहे.

नोकरी अथवा कामानिमित्त २३ टक्के पुणेकर रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. त्यामुळे चालण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. शिवाय कार्यालयातील कामामुळे २४ टक्के व्यक्तींना दररोज चालणे शक्य होत नाही. प्रदूषणामुळे १९ टक्के पुणेकर चालण्याऐवजी घरी बसणेच पसंत करतात. तर, सोबत नाही या सबबीपायी १६ टक्के जण चालत नाहीत. चालण्यासारख्या सोप्या व्यायामाच्या ऐवजी डायटिंगवर १३ टक्के पुणेकरांचा भर आहे. २४ टक्के पुणेकर महिलांनी वाढत्या प्रदूषणामुळे चालत नसल्याचे सांगितले.

चालण्याच्या नियमित सवयीअभावी १५ टक्के पुणेकरांमध्ये रक्तदाब, प्रत्येकी १० टक्क्यांमध्ये मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि स्थूलता आढळते. ११ टक्के जणांना पाठीची समस्या आणि १६ टक्के जणांना दुर्बल नजर आदी व्याधींनी ग्रासल्याचे समोर आले आहे.

..

पुणेकरांच्या चालण्याची कारणे

- ६५ टक्के पुणेकर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालतात.

- ३८ टक्के जणांना हृदयरोग टाळण्यासाठी चालणे महत्त्वाचे वाटते.

- ३६ टक्के जण वजन नियंत्रणासाठी चालतात.

२८ टक्के जणांचा फुफ्फुसासाठी चालण्यावर भर.

- २० टक्के नागरिक आरामासाठी चालतात.

- ३० टक्के महिला तरुण दिसण्यासाठी चालतात.

-३० टक्के पुरुष उत्साह टिकविण्यासाठी चालतात.

- ३९ टक्के महिलांना चालण्याने वजन कमी होते असे वाटते.

- २९ टक्के पुरुषांना चालण्यामुळे वजन कमी होते असे वाटते.

..

पुण्यात जीवनशैलीविषयक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर चालणे हा उत्तम उपाय आहे. परंतु, शहरातील ३५ टक्के नागरिक चालण्याऐवजी एकाच ठिकाणी बसून राहतात. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, कॅन्सरसारखे आजार बळावत आहेत.

- आशिष मेहरोत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅक्स बुपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी

0
0

मोबाइलप्रमाणे रिचार्जची सुविधा; कँटोन्मेंटमध्ये प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे: पाण्यापासून होणाऱ्या विविध आजारापासून संरक्षण करण्यासाठी आता कँन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना एटीएमद्वारे ३० ते ४० पैसे लिटर दराने शुद्ध पाणी उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेमुळे कँन्टोन्मेंटमधील रहिवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. ही सेवा निरंतर चालू राहावी यासाठी मोबाइलप्रमाणे एटीएम कार्ड रिचार्ज करावे लागणार आहे.

सर्वजल संस्था आणि पिरामल हेल्थकेअर ग्रुपच्या वतीने ही योजना महाराष्ट्रासह सात राज्यांत राबविण्यात येणार आहे. राज्यात नांदेड, विदर्भातील काही भागांत शुद्ध पाणी स्वस्तात पाणी देण्याचा प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार पुणे, खडकी, देहूरोड, नगर, देवळाली कँन्टोन्मेंट भागात हा प्रयोग राबविता येऊ शकतो का, या साठी सादरीकरण करण्यात आले. लष्कराच्या केंद्रीय मुख्यालयाचे संचालक ए. व्ही. सिंग, दक्षिण मुख्यालयाचे संचालक ए. भास्कर रेड्डी, गीता परेटी, पुणे कँन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार, खडकीचे अमोल जगताप, तसेच अन्य कँन्टोन्मेंटचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

'पावसाळ्यात नळ अथवा बोअरवेलद्वारे येणारे पाणी दूषित असते. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. देशात दरवर्षी दूषित पाणी प्यायल्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या १७ लाख आहे. घरोघरी स्वच्छ पाण्यासाठी प्युरिफायर वापरले जाते. त्यासाठी सुमारे १२ ते १५ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च प्रत्येकाला करणे शक्य नसते. सर्वजल आणि पिरामल संस्थेचे मशिन बोअरला लावल्यास त्याद्वारे कँन्टोन्मेंटमधील रहिवाशांना शुद्ध पाणी मिळू शकते. 'रिचार्ज' केलेले एटीएम' कार्ड मशिनमध्ये स्वाइप' केल्यास हवे तेवढे पाणी मिळेल. त्यासाठी लिटरमागे नागरिकांना ३० ते ४० पैसे शुल्क द्यावे लागणार आहे. पाच व्यक्तींच्या कुटुंबाला दिवसाकाठी लागणाऱ्या शुद्ध पाण्यासाठी साडेतीन रुपये शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कँन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे', अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'मटा'ला दिली. वर्षाकाठी शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना १५६० रुपये द्यावे लागणार आहेत. कँन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा होऊन योजना राबवायची की नाही याविषयी लवकरच ​निर्णय होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

वीस लाखांचा खर्च अपेक्षित

कँन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना आठ ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करता येऊ शकेल. त्यासाठी मशिन बसविण्यात येतील. त्यासाठी वीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च बोर्डाने करावा की आणखी कोणी या विषयी बोर्डाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. योजना राबविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीसाठी यंदा दोन ‘दिन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'युनेस्को'तर्फे २१ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन यंदा तीन मार्चला साजरा केला जावा, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे विद्यापीठांना केलेली असताना २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांना २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन व तीन मार्च रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, असे दोन दिन साजरे करावे लागणार आहेत.

'युनेस्को'तर्फे साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन यंदा २१ फेब्रुवारीऐवजी तीन मार्चला साजरा केला जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने नियोजनात बदल झाला आहे. तसे पत्र विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे विद्यापीठांना पाठवले आहे. हा दिन साजरा करण्याचे आदेश महाविद्यालय आणि शाळांना देण्यात आले असून, या निमित्ताने भाषिक आदानप्रदान होणार आहे.

'कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून महाविद्यालयांना व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जळगाव, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणच्या सुमारे २५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे,' अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.

'शिक्षणामध्ये मराठी भाषेचे योगदान व त्याची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. चर्चासत्रे, व्याख्यान, कविसंमेलन असे उपक्रम राबवावेत, असे सरकारने म्हटले आहे,' अशी माहिती देत विद्यापीठ स्तरावर गेल्या २०-२५ वर्षापासून विविध उपक्रम राबवले जातात,' याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी लक्ष वेधले.

'मी पाहिलेले कुसुमाग्रज'

मराठी भाषा दिनानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे यंदा व्याख्यान व कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी संत नामदेव सभागृहात दुपारी एक वाजता ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचे 'मी पाहिलेले कुसुमाग्रज' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत सुखदेव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कविसंमेलन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेटल डिटेक्टरमध्ये न सापडणारा ‘क्रूड बॉम्ब’

0
0

Pashant.Aher@timesgroup.com

पुणे : मेटल डिटेक्टर असो की हॅण्ड डिटेक्टर... एक्स-रे मशिनच्या वापरानंतरही शोधण्यास अडचणीचा ठरणारा हा 'क्रूड बॉम्ब', दहशतवाद्यांकडून विमानात पाठवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून याबाबत विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना धोक्याची कल्पना दिली आहे. सगळीकडे सहजपणे मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून हा क्रूड बॉम्ब तयार करण्यात येतो. इतर बॉम्बमध्ये स्फोटाची तीव्रता वाढवण्यासाठी बॉल-बेअरिंगचा 'स्पिल्टंर' म्हणून वापर करण्यात येतो. हे 'स्पिल्टंर' या क्रूड बॉम्बमध्ये वापरण्यात येत नाही. हा बॉम्ब हवाबंद करण्यासाठी 'सिलिकॉन'चा वापर करण्यात येत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. हा बॉम्ब तयार करण्यात आल्यानंतर तो ऑरगॅनिक द्रव्य तसेच पाण्याने धुण्यात येतो. त्यामुळे तो मेटल डिटेक्टर तसेच हॅण्ड डिटेक्टरमध्ये सापडण्यात अडचणी येतात. अनेकदा या प्रकारची स्फोटके शरीराच्या 'प्रायव्हेट पार्ट'जवळ बांधून ती विमानात अथवा संवेदन​शील ठिकाणी नेण्याचा धोका अधिक आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यातील सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने या क्रूड बॉम्बच्या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळाची पाहणी केली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या 'सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स'च्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. पुणे विमानतळावर अद्यावत एक्स-रे मशिन घेण्यात आले आहेत. हे मशिन इस्राइलच्या धर्तीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. पठाणकोट येथील लष्करी हवाई विमानतळावर हल्ला झाल्यानंतर देशभरातील विमानतळांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. पुण्यातील लोहगाव विमानतळ हा मुळचा हवाई दलाचा विमानतळ असल्याने येथील घडामोडींवर बारकाईने लक्ष्य ठेवण्यात येत आहे. याबाबत बर्गे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. क्रूड बॉम्ब तयार करण्यात आल्यानंतर तो ऑरगॅनिक द्रव्य तसेच पाण्याने धुण्यात येतो. त्यामुळे तो मेटल डिटेक्टर तसेच हॅण्ड डिटेक्टरमध्ये सापडण्यात अडचणी येतात. अनेकदा या प्रकारची स्फोटके शरीराच्या 'प्रायव्हेट पार्ट'जवळ बांधून ती विमानात अथवा संवेदन​शील ठिकाणी नेण्यात येतात. त्यामुळे त्याचा धोका अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदी क्रमांक सी १६६५६.... हाजीर हो !

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कैदी नंबर सी १६६५६ असलेला संजय दत्त आज, गुरुवारी सकाळी येरवडा तुरुंगातून सुटणार आहे. त्याचा सुटण्यापूर्वीचा दिनक्रम वरीलप्रमाणे असणार आहे. येरवडा जेलमधील प्रत्येक कैद्याचा डिजिटल डाटा तयार करण्यात आला आहे. तुरुंगाच्या प्रवेशद्वारावरील कम्प्युटरवर थंब इम्प्रेशन घेण्यात येते. त्यानंतर कैद्याचा संपूर्ण 'बायोडेटा' स्क्रीनवर येतो. स्क्रीनवरील माहितीची खातरजमा करण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरू होते.

कैद्याचा स्क्रीनवर आलेला फोटो आणि प्रत्यक्षात समोर असलेला कैदी यांची पडताळणी होते. कैद्याची कागदपत्रे तपासण्यात येतात. त्यानंतर रेकार्डवर असलेल्या जन्मखुणांची पडताळणी करण्यात येते. ही सर्व प्रक्रिया जेल प्रशासनाला पार पाडावीच लागते. यातून संजय दत्तचीही सुटका होणार नाही.

संजयने 'रेडिओ शो' करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्याचा मेहनताना त्याला देण्यात येणार आहे. त्याशिवाय संजय दत्तला जेलमध्ये खर्च करण्यासाठी ठरावीक रक्कम पोस्टाने मिळत होती. त्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेचा हिशोब करण्यात येणार आहे. या दोन्ही रकमांची गोळाबेरीज करून त्याला पैसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याची हिशेबावर सहीही घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. संजय दत्तने सुटकेची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडल्यानंतर त्याला तुरुंगातून बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images