Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयुक्त घडवणार नगरसेवकांना अद्दल?

$
0
0

बिल्डरांच्या दंडमाफीबद्दल प्रश्न उपस्थित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीसारख्या विषयात सर्वसाधारण सभेचा निर्णय बदलण्याची हिंमत दाखविणारे महापालिका आयुक्त बिल्डरांचा दंड माफ करण्याचा नगरसेवकांचा डाव हाणून पाडणार का, असा सवाल विचारला जात आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेने अमान्य केलेले अनेक प्रस्ताव मान्य करावेत, या साठी आयुक्त राज्य सरकारकडे धाव घेतात. शहरातील बांधकाम व्यावसायिकांचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा दंड रद्द करण्याचा प्रस्ताव काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी मान्य करून घेतला. मुख्य सभेने केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास पालिकेला कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. राज्य सरकारने महापालिकांचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्याने पालिकेचे उत्पन्न घटत आहे. त्यातच प्रशासनाचा कोणताही अभिप्राय न घेता लोकप्रतिनिधींनी बिल्डरांच्या कल्याणासाठी अशा पद्धतीने मुख्य सभेत ठराव मंजूर केल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट होणार आहे. मुख्य सभेने मंजूर केलेल्या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होत असेल तर, आपल्या अधिकाराचा वापर करून राज्य सरकारकडे धाव घेण्याचा आयुक्तांना अधिकार आहे. या पूर्वीही मुख्य सभेने मान्य केलेले काही प्रस्ताव रद्द करण्यासाठी आयुक्तांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभाग घेण्यासाठी मान्यता देणारा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आयुक्तांनी ४४८ कलमाचा वापर करून सरकारकडे धाव घेतली होती. सरकारने हस्तक्षेप करून मुख्य सभेला आदेश देण्याचीही विनंती केली होती. हा विषय नागरिकांच्या हिताचा असल्याने सरकारनेही मुख्य सभेला आदेश देऊन स्पष्ट निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

..

तीनशे कोटींवर पाणी?

चुकीच्या पद्धतीने आणि पालिकेची मान्यता न घेता केल्या जाणाऱ्या बांधकामांना आळा बसावा, या साठी तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या दंडात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आयुक्तांच्या या निर्णयाला २०११मध्ये पालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतरच अंमलबजावणी सुरू झाली होती. या निर्णयाचा आधार घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील १५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना दंडाच्या नोटिसा बजाविल्या आहेत. हा दंड ३०० कोटींच्या घरात आहे. मुख्य सभेने मान्य केलेल्या प्रस्तावामुळे पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोथरूडमध्ये उद्या ‘हॅपी स्ट्रीट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंध, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी अनुभवलेली 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल उद्या, रविवारी (२१ फेब्रुवारी) कोथरूडकरांना अनुभवायला मिळणार आहे. एरवी वाहतुकीने गजबजणाऱ्या आशिष गार्डन जवळील श्रीकांत ठाकरे रोडवर नागरिक सकाळीसकाळी योगासने, बॅडमिंटन, आवडत्या गीतावर नृत्य करण्याची तसेच, सायकलिंग, चॉकआर्ट यांसह विविध खेळांची मजा लुटताना दिसणार आहेत.

हॅपी स्ट्रीटमुळे रविवार कोथरूडकरांसाठी नक्कीच हटके ठरणार आहे. उपक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पुणे पोलिस, वाहतूक पोलिस, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स आणि व्ही. जे. डेव्हलपर्स यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून गेल्या वर्षभरापासून 'हॅपी स्ट्रीट'चा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत औंध, पिंपळे-सौदागर, कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच लोक रस्त्यावर हजेरी लावत होते. आता खास कोथरूडकरांच्या आग्रहास्तव येत्या रविवारी आशिष गार्डन समोरील श्रीकांत ठाकरे रोडची निवड करण्यात आली आहे.

या वेळी बॅडमिंटनसारखे विविध खेळ, एरोबिक्स आणि सायकलिंग यासह योगा-मेडिटेशन आणि लहान मुलांसाठी 'फन झोन', संगीतप्रेमींसाठी ड्रम सर्कल, कलाकारांसाठी चॉकआर्ट, टॉइज फ्रॉम ट्रॅश, फोटो बूथ आदी उपक्रमांची एकाच ठिकाणी चंगळ असल्याने कोथरूडकरांना 'अनलिमिटेड एंटरटेनमेंट' अनुभवायला मिळणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचे, चालण्याचे आणि सायकल वापरण्याचे महत्त्व सकारात्मक पद्धतीने पटवून देण्याच्या उद्देशाने 'हॅपी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात येते. नागरिकांना आपल्या कुटुंबीयांसोबत मित्र आणि मैत्रिणींसमवेत या उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी 'मटा'ने उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यशाळा नोंदणीला वाढता प्रतिसाद

$
0
0

कथा, पटकथा, अनुवादासाठी मिळणार मान्यवरांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा मैफल'बद्दल राज्यभरातील साहित्यरसिकांत उत्सुकता वाढत आहे. यंदाच्या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य असलेल्या कथा, पटकथा, अनुवाद कार्यशाळेच्या नोंदणीसाठी नवोदितांचा प्रतिसाद वाढतो आहे.

पुण्यातील गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या आवारात २७ आणि २८ फेब्रुवारी या दोन दिवशी होणाऱ्या या साहित्य सोहळ्यात अन्य भरगच्च कार्यक्रमांबरोबरच लेखनविषयक कार्यशाळाही होणार आहेत. कथालेखन, विविध माध्यमांसाठीचे लेखन, अनुवादलेखन आणि ऑनलाइन लेखन यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आहेत. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान कथालेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. अनुवादक विदुला टोकेकर अनुवाद कार्यशाळा घेणार आहेत. लेखक अंबर हडप पटकथा आणि संवाद लेखनाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. विक्रम भागवत आणि त्यांचे सहकारी ऑनलाइन लेखन कार्यशाळा घेणार आहेत.

इच्छुकांना एका किंवा त्याहून अधिक कार्यशाळांत भाग घेता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. इच्छुकांनी matamaifalpune@gmail.com या ई-मेलवरून कार्यशाळेसाठी नोंदणी करावी. नावनोंदणी करताना पूर्ण नाव, पत्ता आणि फोन क्रमांक देणे आवश्यक आहे. कोणकोणत्या कार्यशाळेत भाग घ्यावयाचा आहे, याचा उल्लेख जरूर करावा.

..

कथा स्पर्धा आणि कविता

'मटा मैफल'च्या निमित्ताने लघुत्तम कथा (कमाल शंभर शब्द) आणि लघुकथा (कमाल एक हजार शब्द) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तुम्ही आपल्या कथा आपले नाव, पत्ता आणि छायाचित्रासह २४ फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेसाठी पाठवू शकता. त्याचबरोबर कविकट्ट्यावर कविता वाचण्यासाठीही आपल्या दोन वा तीन कविता पाठवाव्यात. साहित्य पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे. ई-मेल : matamaifalpune@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे पडसाद पुण्यातही शुक्रवारी उमटले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी डेक्कन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या असताना, आंबेडकरवादी संघटनांनी निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इराणी आपल्या दोन दिवसांच्या पुणे भेटीदरम्यान डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप समारंभासाठी उपस्थित राहणार होत्या. राज्याच्या उच्चशिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्यासह इतर मान्यवरही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमापूर्वीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित आदिवासी अधिकार आंदोलन, भीमछावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. इराणी यांची गाडी कार्यक्रमस्थळी जात असतानाच, त्यांना निळे झेंडे दाखवत 'स्मृती इराणी वापस जावो', 'रोहित वेमुला अमर रहे', अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, डेक्कन कॉलेजच्या या कार्यक्रमात इराणी यांनी कॉलेजचा वार्षिक अहवाल आणि कॉलेजतर्फे तयार करण्यात आलेल्या संस्कृत डिक्शनरीच्या ३१ व्या खंडाचे प्रकाशन केले. खासदार अनिल शिरोळे, डॉ. चहांदे, संस्थेचे कुलपती डॉ. गो. बं. देगलुरकर, कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. जे. डी. साठे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आदी या वेळी उपस्थित होते. इराणी म्हणाल्या, 'पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक युगात वापर करून घेण्यासाठी कॉलेजने पुढाकार घ्यावा. गणित आणि विज्ञानाच्या विकासासाठी संस्कृतचा अधिक प्रभावीपणे वापर करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याद्वारे पारंपरिक भारतीय गणित आणि विज्ञानविषयक ज्ञान समाजासमोर अधिक प्रभावीपणे मांडणे शक्य होईल.' डॉ. देगलुरकर यांनी स्वागत केले. डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साठे यांनी आभार मानले. 'भारतीय भाषांमधून उच्चशिक्षणाच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी सरकार लवकरच 'भारतवाणी' हे ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अॅप जनतेसमोर आणणार असल्याचे इराणी यांनी सांगितले. या पोर्टलवर पहिल्या टप्प्यात २२ भारतीय भाषांमधून उच्चशैक्षणिक माहिती दिली जाईल. येत्या तीन वर्षांमध्ये भाषांची ही संख्या शंभरपर्यंत नेण्यात येईल,' असे त्या म्हणाल्या. डेक्कन कॉलेजच्या संशोधन प्रकल्पांना युनेस्कोच्या मदतीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन इराणी यांनी या वेळी दिले. युनेस्कोच्या माध्यमातून येत्या ५ एप्रिलला पॅरिसमध्ये आर्यभट्टाची प्रतिमा उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे भारतीय संशोधकांचे कार्य जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार घडवेल सामाजिक बदल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात पिपललेस, पेपरलेस आणि कॅशलेस सुविधा मिळण्यासाठी आधार हा पाया असून, त्याद्वारे सामाजिक बदल होऊ शकतील,' असे मत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीए) माजी अध्यक्ष आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक डॉ. नंदन निलेकणी यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्यावतीने डॉ. निलेकणी लिखित 'रिबुटिंग इंडिया' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते शुक्रवारी सेनापती बापट रस्त्यावरील बजाज आर्ट गॅलरीत करण्यात आले. त्यावेळी निलेकणी बोलत होते. कार्यक्रमाला रवी पंडित उपस्थित होते.

'नागरिकांना प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता भासू नये. त्यासाठी पिपललेस सेवा मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या छायांकित प्रती सादर कराव्या लागतात. त्या देण्याची गरज निर्माण होऊ नये, यासाठी पेपरलेस सुविधा मिळणे आवश्यक आहे; तसेच कॅशलेस व्यवहार होण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीची सुविधा असायला हवी. त्यासाठी ऑनलाइन युनिक बायोमेट्रिक आयडेंटिटी हा पाया आहे. देशात सगळ्यांना आधार कार्ड मिळाल्यानंतर सामाजिक बदल होऊ शकतील,' असे डॉ. निलेकणी यांनी स्पष्ट केले.

'देशात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी सरकारने अर्थसाह्य करणे गरजेचे आहे. सरकारने व्यासपीठ निर्माण केल्यावर खासगी संस्थांनीही सहभाग घेतला पाहिजे.' असे डॉ. निलेकणी म्हणाले. 'देशाच्या प्रगतीसाठी नावीन्यपूर्णतेला महत्त्व आहे.' असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी अनुभवींचे पारडे जड

$
0
0

उपमहापौरपदासाठी काँग्रेसजनांनी लावली फिल्डिंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्षातील अनुभवी नेत्यांना नेतृत्वाची संधी देणार की, नव्या चेहऱ्याला संधी देऊन आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणार, यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे महापौर-उपमहापौरपदासाठीचे उमेदवार निश्चित होणार आहेत. महापालिका निवडणुकीला जेमतेम वर्षभराचा कालावधी राहिला असल्याने अनुभवी नगरसेवकांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या गुरुवारी (२५ फेब्रुवारी) निवडणूक होणार आहे. त्यासाठी, आज (शनिवारी) दुपारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून, तेव्हाच महापौर-उपमहापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल. या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. नव्या महापौरांना वर्षभराचाच कालावधी मिळणार असला, तरी त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सत्ताधारी पक्षांना पालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे, महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबद्दल विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाला अनुक्रमे दोनदा आणि एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे आता शहराच्या इतर भागांतील चेहऱ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाबूराव चांदेरे, दीपक मानकर, विकास दांगट, प्रशांत जगताप या चार प्रमुख इच्छुकांसह चेतन तुपे आणि दिलीप बराटे यांच्या नावांची महापौरपदासाठी चर्चा आहे.

पमहापौरांची निवडही गुरुवारी केली जाणार आहे. त्यासाठी, काँग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार 'फिल्डिंग' लावली असून, गुरुवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेतल्याचे समजते. काँग्रेसकडून मुकारी अलगुडे, सुधीर जानजोत यांच्यासह दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, मिलिंद काची, सुनंदा गडाळे इच्छुक आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडूनही अनुभवी उमेदवारालाच पसंती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण’

$
0
0

जुन्नर : 'मराठा समाजासाठी ठेवलेल्या १६ टक्के आरक्षणास कोर्टाने स्थगिती दिली असली, तरी मराठा आरक्षण ही सरकारची बांधिलकी असून त्याहीपुढे जाऊन १६ ऐवजी २५ टक्के आरक्षण अन्य मार्गांनी उपलब्ध करून देण्यात येईल,' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला होता. या कायद्याला कोर्टाने स्थगिती दिली असली, तरी मराठा आरक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे १६ टक्क्यांच्याही पुढे जाऊन २५ टक्के जागा दुसऱ्या मार्गाने मराठा समाजासाठी राखीव केल्या जातील. त्या इतरांसाठी भरल्या जाणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी पर्यटक गेट वे ऑफ इंडियाच्या प्रेमात

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणेः महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांविषयी प्रेम असले, तरी परेदशातील पर्यटक सागरी पर्यटनासाठी गोव्यालाच प्राधान्य देतात. इनक्रेडिबल महाराष्ट्र बघताना त्यांची गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरिन ड्राइव्हला पसंती मिळते आहे. पुण्यामध्ये मात्र ते आवर्जून आगाखान पॅलेस बघायला जातात, असा निष्कर्ष महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अहवालातून पुढे आला आहे.

राज्यातील आगामी पर्यटन योजनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पर्यटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गेल्या वर्षभरात पर्यटकांच्या तपशीलावर आधारित अहवाल तयार केला आहे. यासाठी नमुना सर्वेक्षणाच्या आधारे पर्यटकांकडून त्यांच्या अपेक्षा मांडणारे अर्जही भरून घेण्यात आले होते. अहवालानुसार गेल्या वर्षभरात १६ कोटी ७६ लाख १२ हजार ०६६ भारतीय पर्यटकांनी महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली. याशिवाय २९ लाख ९१ हजार ६२० परदेशी पर्यटकांनी महाराष्ट्राचे आदरातिथ्य अनुभवले. अहवालातील माहितीनुसार, देशांतर्गत पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांचे अधिक महत्त्व वाटते. त्यामुळे शिर्डी, महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, शनिशिंगणापूर येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. तर गेट वे ऑफ इंडिया, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, लोणावळा, खंडाळा या ठिकाणांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. चोखंदळ परदेशी पर्यटकांना मात्र मुंबईचे सर्वाधिक आकर्षण असून गेट ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरिन ड्राइव्ह, हाजी अली या ठिकाणांचे आकर्षण आहे. पुण्यातील आगा खान पॅलेस बघायचा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प, लोणावळा, खंडाळ्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. कोकण किनाऱ्याविषयी महाराष्ट्रातील लोकांना आकर्षण असले, तरी एकूण पर्यटकांच्या नोंदीमध्ये कोकणातील पर्यटनाला पुढचे स्थान मिळालेले नाही.


महाराष्ट्रामध्ये नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या आतापर्यंत उल्लेखनीय होती. याच्या जोडीला आता राज्यात खास पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील आता वाढली असल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोखले इन्स्टिट्यूटच्या वादापासून इराणी दूर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' या संस्थेच्या आजच्या २२ व्या पदवी प्रदान कार्यक्रमाला मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी अनुपस्थित राहिल्या. गोखले इन्स्टिट्यूट तर्फे दिल्या जाणाऱ्या पदव्यांबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. नियमबाह्य पद्धतीने या पदव्या देण्यात येत असल्याचे आरोप झाले. त्यामुळेच या कार्यक्रमाला इराणी अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती.

स्मृती इराणींच्या हस्ते नियमबाह्य पदव्या प्रदान करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला दलित संघटनांनी विरोध केला होता. तसंच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी इराणींनी या पदवी प्रदान कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा आहे. इराणींसोबतच शिक्षण मंत्री विनोद तावडेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.


संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र

८५ वर्षांपासून उत्तमरित्या कार्यरत असलेल्या संस्थेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप संस्थेने केला आहे. 'स्वतःला गोपाळकृष्ण गोखल्यांचे वारस म्हणवणाऱ्यांनी त्यांच्याच संस्थेला बदनाम करावे ही दुर्देवी बाब आहे', असं गोखले इन्स्टिट्यूटचे कुलपती राजन कुमार म्हणाले. गोखले इन्स्टिट्यूटच्या पदवी प्रदान कार्यक्रमावर गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतू सुनील गोखले यांनी आक्षेप घेत काही पदव्या नियमबाह्य असल्याचा आरोप केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कातिलच्या खुनाच्या बदल्यासाठी स्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येरवडा जेलमध्ये खून झालेला 'इंडियन मुजाहिदीन'चा दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे समोर आले आहे. तेलंगणा व ओडिशा पोलिसांनी रुरकेला येथे 'सिमी'च्या चार दहशतवाद्यांना पकल्यानंतर पुणे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्यासमोर १० जुलै २०१४ रोजी दुपारी बॉम्बस्फोट झाला होता. पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात उपलब्ध सीटीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सातारा येथील सेशन कोर्टासमोरून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या चोरलेल्या दुचाकीचा स्फोटासाठी वापर करण्यात आला होता.

तेलंगणा व ओडिशा पोलिसांनी रुरकेला येथून शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू ऊर्फ समीर ऊर्फ रमेश शेख इस्माईल (वय २७, रा. गणेश तलाई, खांडवा, मध्य प्रदेश), अमजद ऊर्फ दाऊद ऊर्फ पपू ऊर्फ उमर रमजान खान (वय २७, रा. चिराखादान, खांडवा, मध्य प्रदेश), मोहम्मद अस्लम ऊर्फ बिलाल, जाकीर ऊर्फ सादिक ऊर्फ विक्की डॉन ऊर्फ विनयकुमार बदरूल हुसेन (वय ३२, रा. सेल्स टॅक्स कार्यालयामागे, खांडवा, मध्य प्रदेश) यांना नुकतीच अटक केली. त्यातील दोघांनी फरासखाना बॉम्बस्फोटाची कबुली दिली. याप्रकरणी चौकशीसाठी पुणे एटीएसचे पथक रुरकेला येथे गेले होते. यामध्ये सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्फोट केल्याची कबुली गुड्डू शेख, झाकीर हुसेनने दिली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून पुणे 'टार्गेट' असल्याचे समोर आले आहे.

दगडूशेठ गणपती मंदिरात बॉम्ब ठेवण्याचा कतिलचा प्रयत्न एका फुलविक्रेत्यामुळे फसला. त्याला अटक करून येरवडा जेलच्या 'अंडासेल'मध्ये ठेवण्यात आले होते. कुख्यात गुंड शरद मोहोळ व अलोक भालेराव यांची कातिलची वादावादी झाली. त्यामुळे ८ जून २०१२ रोजी पायजम्याच्या नाडीने कातीलचा दोघांनी गळा आवळून खून केला होता. या खुनाचा बदला म्हणून एक ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट केले होते. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी पुन्हा फरासखान्याच्या आवारात बॉम्बस्फोट केल्याचे समोर आले आहे.


एटीएसचा कोर्टात अर्ज

एटीएसच्या पथकाने रुरकेला येथे जाऊन संशयित दहशतवाद्यांकडे चौकशी केली. गुड्डू शेख व झाकीर हुसेन या दोघांनी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट केला होता. त्यांचा साथीदार महंमद एजाजोद्दीन पोलिस चकमकीत ठार झाला. या दोघांना चौकशीसाठी महाराष्ट्र 'एटीएस'च्या ताब्यात देण्यासाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती पुणे एटीएसचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर, उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या रिक्त झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीसह पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या भाजप, मनसे आणि शिवसेनेने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पदांसाठी चौरंगी लढत होणार आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून तरुण चेहरा असलेल्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपच्या अशोक येनपुरे, मनसेचे वसंत मोरे, तर सेनेकडून सचिन भगत यांनी अर्ज भरले.

उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून मुकारी अलगुडे, भाजपकडून वर्षा तापकीर, मनसेच्या अस्मिता शिंदे आणि सेनेच्या योगेश मोकाटे यांनी अर्ज भरले. चारही पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली असली तरी आघाडीच्या सभासदांची संख्या लक्षात घेता या दोन्ही पक्षांच्या उमेदवारच महापौर, उपमहापौर होण्याची शक्यता आहे.

विद्यमान महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी शनिवारी इच्छुकांनी उमेदावरी अर्ज भरले. काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन्ही पदांसाठी एकत्रित अर्ज भरले. तर शिवसेना-भाजपा युतीमध्ये फुट पडल्याचे उमेदवारी अर्ज भरताना समोर आले. या दोन्ही पक्षांनी या पदांसाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले आहेत. यापूर्वी अनेकदा तटस्थ भूमिका घेणाऱ्या मनसेनेही महापौर आणि उपमहापौरपदांसाठी अर्ज दाखल करीत या निवडणुकीत उडी घेतली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू होण्याच्या अखेरच्या क्षणी वानवडीचे जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी जेष्ठ नगरसेवक अलगुडे यांना संधी देण्यात आली. या दोन्ही पक्षांनी एकत्रित उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे दाखल केले. आघाडी एकत्र राहिल्यास जगताप आणि अलगुडे यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.

'जगताप यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे, त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली,' असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत मोठ्या पदापासून वंचित राहिलेल्या मुकारी अलगुडे यांना उपमहापौरपदासाठी संधी दिल्याचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या निवडीवरून काँग्रेसमधील दोन गटांच्या नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद झडल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौटंकीत अडकलेला युवक जागा : वाजपेयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'नरेंद्र मोदी यांच्या नौटंकीत अडकलेला युवक वर्ग आता जागा झाला आहे. धार्मिक द्वेष, दलितांचा द्वेष, कट्टरता या विरोधात देशात सुरू झालेल्या व्यापक जनआंदोलनात या युवक वर्गाची महत्त्वाची भूमिका, हा देशासाठी आशेचा किरण आहे,' असे मत प्रसिद्ध साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी शनिवारी व्यक्त केले. 'नरेंद्र मोदी हे दांभिक असून राहुल गांधी अपरिपक्व आहेत, त्यामुळे अपेक्षा ठेवायच्या तरी कोणाकडून,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत संस्थेतर्फे 'उम्मीद बनाम उम्मीद' या विषयावर वाजपेयी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य, कॉम्रेड भालचंद्र केरकर, लोकायतच्या अलका जोशी, नीरज जैन या वेळी उपस्थित होते.

'देशातील युवाशक्तीला परिस्थितीची जाणीव झाली आहे. ही युवाशक्ती मोदींच्या नौटंकीतून बाहेर पडत जनआंदोलनात सक्रिय होत आहे. देशातील उद्योग-व्यापार-बाजार व्यवस्थेनेचे मोदींना सत्तेवर आणले. आणि आता हीच व्यवस्था त्याची पूर्ण वसुली करत आहे. मूल्यांसाठी नागरी अभियान उभे करण्याची गरज आता निर्माण झाली आहे,' असे वाजपेयी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे पुलावर अंनिसचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कर्नाटक येथील विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना सरकार पाठिशी घातल आहे. या मारेकऱ्यांना काही राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी केला केला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावताने विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे 'खुनी पकडा' म्हणून सलग तिसाव्या महिन्यात निदर्शने करण्यात आली. या वेळी डॉ. हमीद दाभोलकर, अॅड. वैशाली चांदणे, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, उमेश चव्हाण, अंनिसचे शहराध्यक्ष श्रीपाल ललवानी, शमशुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.

'गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या, तसेच रोहित वेमुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असणारे व दिल्लीच्या नेहरू विद्यापीठातील कन्हैय्याला देशद्रोहाच्या खटल्यात अटक करणारे एकच आहेत. देशात अराजकतेचे वातावरण आहे. यामध्ये सहिष्णुता कुठेच नाही,' असे आढाव म्हणाले. तसेच, नथुरामाच्या विचारांचे सरकार दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचा तपास कसा करेल, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने केली असल्याचा अहवाल आहे. या प्रकरणी सनातनच्या एका साधकावर आरोपपत्र दाखल आहे. त्यानंतरही तपास यंत्रणा त्याची पॉलिग्राफिक टेस्ट करण्याची मागणी करीत असल्याची खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडला स्वातंत्र्यवीरांचा जीवनपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शृंखलांचे शस्त्र बनवू आसवांनो मागे फिरा' असे म्हणणारे, 'ने मजसी ने परत मातृभूमीला', 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' अशा अजरामर रचना रचणारे महाकवी, साहित्यिक, हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहतानाच 'वसुधैव कुटुंबकम्' अशी भावना ठेवणारे, जातीव्यवस्थेविरोधात खंबीरपणे उभे राहणारे... स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अशा अज्ञात पैलूंसह त्यांचा जीवनपट शनिवारी उलगडला.

निमित्त होते हिंदू हेल्पलाइन आणि सेतू प्रकल्प यांच्यातर्फे आयोजित 'सावरकर ः एक सन्यस्त खड्ग' या कार्यक्रमाचे. एरंडवण्यातील वसुंधरा पंडीत फार्म्स इथे झालेल्या या कार्यक्रमाला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभिनेते शरद पोंक्षे, नितीश भारद्वाज, अविनाश नारकर, योगेश सोमण, राजेश दामले, पूर्वी भावे यांच्या अभिवाचनातून सावरकरांच्या साहित्यातले अपरिचित पैलू रसिकांसमोर आले. अश्विनी एकबोटे आणि सहकाऱ्यांनी सावकरांच्या रचनांवर नृत्य सादर केली. प्रसिद्ध गायक रवींद्र साठे आणि रेवा नातू यांच्या भावपूर्ण गायकीतून सावरकरांच्या रचना सादर झाल्या. राजू परांजपे (ऑर्गन), केदार परांजपे (की बोर्ड), विक्रम भट (तबला, पखवाज) आणि अभिजित भदे यांनी समर्पक साथसंगत केली.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, हिंदू हेल्पलाइनचे अध्यक्ष रणजित नातू, प्रसन्न गोखले, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, खासदार अरविंद सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, भाजपचे शहर उपाध्यक्ष दीपक नागपुरे, नगरसेविका मंजुषा नागपुरे, प्रशांत बधे, शाम देशपांडे, पृथ्वीराज सुतार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश कर्पे आदी या वेळी उपस्थित होते.


हिंदूराष्ट्राचे स्मरण ठेवा

अतिक्रमणांनी जखडलेली मातृभूमी मुक्त करण्याचा आणि त्यासाठी अखंड हिंदूराष्ट्राचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी या वेळी केले. मातृभूमीची भक्ती प्रत्येकाच्या मनात हवी. हिंदूकुश पर्वतावर भगवा ध्वज फडकेल हीच खऱ्या अर्थाने सावरकरांना आदरांजली असेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिल्डरांचा दंड माफ, ही लोकांची फसवणूक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करायची आणि दुसऱ्या बाजुला बांधकाम व्यावसायिकांचा कोट्यवधी रुपयांचा दंड माफ करायचा, ही पुणेकरांनी फसवणूक आहे, अशा कडक शब्दात काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे, मनसेचे नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांनी टीका केली आहे. बिल्डरांचा दंड माफ करण्याचा सभासदांनी दिलेला प्रस्ताव मान्य केल्यास पालिकेच्या कारभारात चुकीचा पायंडा पडणार असल्याने याला मान्यता देऊ नये, अशी मागणी या सभासदांनी केली.

महापालिकेची परवानगी न घेता करण्यात आलेल्या बांधकामाला महापालिकेच्या वतीने दंड आकारण्यात येत होता. शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होणाऱ्या बांधकामांना चाप बसावा यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी २०११मध्ये या दंडात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या मुख्य सभेनेही त्याला मंजुरी दिली होती. या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने शहरातील १५०हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचा दंड केला आहे. पालिकेने लादलेल्या या दंडाविरोधात बिल्डर असोसिएशन कोर्टात गेले आहे. मात्र त्यावर कोर्टाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. असे असतानीही याकडे दुर्लक्ष करत बिल्डरांच्या हितासाठी पालिकेतील काही लोकप्रतिनिधींनी मुख्य सभेत बिल्डरांचा हा दंड माफ करण्याचा प्रस्ताव मांडून मतदानाच्या जोरावर हा मान्य करून घेतला.

या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू करू नये, अशी मागणी केली जात आहे. दोन आठवड्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे २४ कोटी रुपयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने पुणेकरांच्या पाणीपट्टीत वाढ केली. तर दुसरीकडे ३०० कोटी रुपये बांधकाम व्यावसायिकांना माफ करायचे, ही पुणेकरांची फसवणूक असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मृती इराणी यांची कार्यक्रमाकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सच्या २२व्या पदवीप्रदान सोहळ्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी अखेर पाठ फिरवली. संस्थेतर्फे नियमबाह्य पद्धतीने पदव्या दिल्या जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इराणी यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र, 'काही व्यक्तींनी मंत्र्यांचे कान भरल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. हे संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे,' असे स्पष्टीकरण संस्थेचे कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी दिले.

'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' या अभिमत विद्यापीठाचा २२वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी इराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. मात्र, अशा वादग्रस्त कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे पणतू अॅड. सुनील गोखले यांनी इराणी यांची भेट घेऊन केले होते. त्यानंतरच त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांच्या अनुपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडला. अखेर संस्थेचे कुलपती डॉ. राजीव कुमार आणि कुलगुरू डॉ. राजस परचुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 'स्वतःला गोखले यांचे वारस म्हणविणाऱ्या व्यक्तींनीच त्यांच्या नावाच्या संस्थेची नाहक बदनामी करणे योग्य नव्हे,' असे डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत करवाढ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतकरामध्ये वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळत २०१५-१६चेच दर २०१६-१७ आर्थिक वर्षासाठी कायम ठेवण्याचा निर्णय शनिवारी (२० फेब्रुवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. समान दरनिश्चिती आणि कराची पुनर्रचना करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी २०१६-१७ करिता करांचे दर आणि करेत्तर बाबींच्या शुल्क निश्चित करताना करयोग्य मूल्यावर सामान्य करामध्ये दोन टक्के, निवासी आणि बिगरनिवासी करामध्ये चार टक्के, मलप्रवाह सुविधा, पाणीपुरवठा लाभ आणि रस्ता कर यामध्ये एक टक्का दरवाढ सुचविली होती. ती अमान्य करीत चालू आर्थिक वर्षाचेच दर कायम ठेवावेत, अशी शिफारस स्थायी समितीने केली होती. त्यावर चर्चा करताना कर वसुलीबाबत प्रशासनाचे धोरण कुचकामी असल्याची टीका सदस्यांनी केली.

महापालिकेकडून 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' वर्गीकरणानुसार करवसुली होते. त्याचे दर रेडिरेकनरच्या दरानुसार निश्चित होतात. त्यामुळे रेडिरेकनरचे दर वाढले की आपोआप करवाढही होते. ही छुपी करवाढ नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यांची दिशाभूल होते, असा मुद्दा सुलभा उबाळे यांनी उपस्थित केला. त्यावर २००६मध्येच करवसुलीचे धोरण निश्चित झाल्याचा खुलासा सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी केला. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. शहरात असमान पद्धतीने करवसुली होत असल्यास नवीन धोरण तयार करावे. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. रिक्त जागा, टेरेस, पार्किंग यासंदर्भातील करवसुलीबाबत फेरविचार व्हावा, अशा सूचना उबाळे यांच्यासह मंगला कदम, अजित गव्हाणे, बाबा धुमाळ, धनंजय आल्हाट यांनी केल्या. त्यानंतर समान दरनिश्चिती आणि कर पुनर्रचना होईपर्यंत नव्याने करवाढ न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

तत्पूर्वी, प्रश्नोत्तराच्या तासात भाऊसाहेब भोईर यांनी विचारलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. मिळकतकर आणि पाणीपट्टी वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती भोईर यांनी व्यक्त केली. कर भरताना प्रामाणिक नागरिकांवर अन्याय होऊ नये. करचोरी करणाऱ्या किंवा थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची सूचना कदम यांनी या वेळी केली.

'स्थायी' सदस्य निवड

महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये नारायण बहिरवाडे, अमिना पानसरे, रोहित काटे, संदीप चिंचवडे, सुमन नेटके, शुभांगी लोंढे, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली जवळकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

आंदोलनाचा इशारा

पुणे शहरातील कचरा मोशीतील कचरा डेपोत टाकण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे, असा दावा करीत त्याच्या निषेधार्थ रविवारी (२१ फेब्रुवारी) पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सकाळी साडेनऊ वाजता सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक धनंजय आल्हाट आणि अरुण बोऱ्हाडे यांनी सर्वसाधारण सभेत दिला. यावर पिंपरी-चिंचवडमधील कचरा टाकण्यासाठी पुणे महापालिकेनेच आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी उपसूचना पक्षनेत्या मंगला कदम यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’त पुन्हा ‘पुणे पॅटर्न’ची चर्चा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर-उपमहापौरदासाठी अनेक इच्छुकांमधून करण्यात आलेल्या निवडींनंतर सर्वच पक्ष-आघाड्यांमध्ये राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादीत ज्येष्ठ नगरसेवकांना डावलल्याने कारभारात त्यांच्या नाराजीचा सामना करण्याची वेळ येणार आहे, तर काँग्रेसमध्येही यावरून वादंग झाल्याचे समजते. त्याबरोबरच भाजप आणि शिवसेनेतही सवतासुभा होऊन वेगवेगळे अर्ज भरण्यात आल्याने युतीतील धुसफूस समोर आली असून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पुन्हा 'पुणे पॅटर्न'ची चर्चा सुरू झाली आहे.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून वानवडी भागातील नगरसेवक प्रशांत जगताप यांचा महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज शनिवारी नगरसचिव कार्यालयाकडे दाखल करण्यात आला. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी जोरदार शिफारस केल्याने त्यांना उमेदवारी मिळाल्याचे समजते. गेल्या पंधरा दिवसापासून पक्षातील अनेक इच्छुकांनी महापौरपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये विकास दांगट, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप यांच्यासह जगताप यांचेही नाव चर्चेत होते. अखेरच्या क्षणी शहराध्यक्षांनी जगताप यांचे नाव लावून धरल्याने त्यांना संधी दिल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात कारभार चालविताना महापालिकेतील नेत्यांना वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपने दोन्ही पदांसाठी आपल्या सभासदांचे स्वतंत्र अर्ज नगरसचिव कार्यालयाकडे दाखल केले. सकाळपासून सेनेच्या नेत्यांशी संपर्क साधत असून ते 'नॉट रिचेबल' असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी दिले. मात्र, तासाभरातच सेना नेते रिचेबल झाले आणि सचिन भगत, योगेश मोकाटे यांनी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज भरले. पूर्वीपासून सर्व निवडणुका एकत्र लढविणाऱ्या युतीतील फाटाफूट यानिमित्ताने समोर आली असून आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटणार का, अशी चर्चा आहे. तसेस पूर्वी जाहीर केलेली तटस्थ भूमिका अचानकपणे बदलत मनसेच्या सभासदांनीही दोन्ही पदांसाठी अर्ज भरले.

आश्वासन पाळणार का?

महापौर-उपमहापौर पदांसाठी दोन्ही काँग्रेस परस्परांच्या उमेदवारांना सूचक-अनुमोदर राहिल्या आहेत. परंतु, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांचा पुणे पॅटर्न पुन्हा अस्तित्वात येणार का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसला स्थायीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पाळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या प्रवेशद्वारी एन्ट्री वॉलने स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यात प्रमुख महामार्गांद्वारे येणाऱ्या नागरिकांचे आणि पर्यटकांचे शहराच्या हद्दीत प्रवेश करताना स्वागत करण्यासाठी 'एन्ट्री वॉल' उभारण्यात येणार असून, सुरुवातीच्या टप्प्यात बोपोडी आणि बाणेरमध्ये ही संकल्पना साकारली जाणार आहे. या प्रवेशद्वारांवर शहराचे महत्त्व अधोरेखित करणारी भव्य चित्रे उभारण्यात येणार असून, शहराच्या संबंधित भागांतील वैशिष्ट्ये चितारली जाणार आहेत.

मुंबई, नगर, सातारा, सोलापूर अशा प्रमुख शहरांशी जोडल्या गेलेल्या महामार्गांसह पुण्यात प्रवेश करण्यासाठी इतरही काही महत्त्वाचे रस्ते आहेत. सध्या या सर्वच रस्त्यांवर शहराच्या हद्दीत प्रवेश करताना, केवळ 'पुण्यनगरीत सर्वांचे स्वागत' अशा आशयाचे फलक आहेत. शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता पुण्याच्या प्रवेशद्वारांवर भव्य स्वरूपातील कमान किंवा तत्सम रचना साकारली जावी, असा आग्रह धरला जात होता. अखेर, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार असून, सुरुवातीच्या टप्प्यात बोपोडी आणि बाणेरमध्ये 'एन्ट्री वॉल' साकारल्या जाणार आहेत. बोपोडीमध्ये या एन्ट्री वॉलचे कामही प्रगतीपथावर असून, त्यावरील डिझाइनही अंतिम टप्प्यात आहे.

शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर तीन मोठमोठ्या वॉल उभ्या केल्या जाणार असून, त्यावर शहराची संस्कृती-परंपरा दर्शविणारे संकल्पचित्र असेल. बोपोडीच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या वॉलवर पंढरपूरला जाणाऱ्या वारीचे रेखाटन असेल. देहूहून निघणारी तुकाराम महाराजांची पालखी बोपोडीमध्ये पुण्याच्या हद्दीत प्रवेश करते. त्यामुळे, या ठिकाणी तीन मीटर बाय चार मीटर अशा तीन भव्य भिंतींवर पालखीचे सचित्र रूप साकारले जाणार आहे. या भिंती उभारण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत पाया उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आता त्यावरील फ्रेमचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विद्येचे माहेरघर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे महत्त्व लक्षात घेऊन बाणेर येथील प्रवेशद्वारावर उभारल्या जाणाऱ्या वॉलवर शैक्षणिक संस्थांची महती चित्रबद्ध केली जाईल. येत्या चार ते सहा महिन्यांत दोन्ही प्रवेशद्वारांवरील 'एन्ट्री वॉल' प्रत्यक्षात साकारली जाईल, असा विश्वास आर्किटेक्ट निखिल मिजर यांनी व्यक्त केला.

नऊ ठिकाणी उपक्रम

शहरात प्रवेश करणाऱ्या एकूण नऊ ठिकाणी या स्वरूपाच्या 'एन्ट्री वॉल' उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सर्व ठिकाणी एकाचवेळी काम पूर्ण होणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने ते करण्यात येणार आहे. बोपोडीचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, बाणेर येथील काम केले जाईल. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यावर सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथील वॉलचे काम हाती घेण्यात येईल. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील प्रसंग साकारण्याचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य-संस्कृतीशी जुळणार तरुणाईचे नाते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतला ठळक साहित्योत्सव अशी ओळख होत असलेल्या 'मटा मैफली'त सहभागी होण्यासाठीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. कला-साहित्य-संस्कृतीशी दृढ नाते सांगणाऱ्या या उपक्रमाचे पुण्यातील यंदाचे दुसरे वर्ष आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या उपक्रमांत अन्य विविध कार्यक्रमांबरोबरच कथा, पटकथा, अनुवाद कार्यशाळेचे आयोजन आवर्जून करण्यात आले आहे. त्यात अभिव्यक्त होण्यासाठी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या आवारात २७ फेब्रुवारीपासून हा भव्य साहित्य सोहळा रंगणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कथालेखन, विविध माध्यमांसाठीचे लेखन, अनुवादलेखन आणि ऑनलाइन लेखन यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आहेत. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान कथालेखन, विदुला टोकेकर अनुवाद, लेखक अंबर हडप पटकथा आणि संवाद लेखनाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. विक्रम भागवत आणि त्यांचे सहकारी ऑनलाइन लेखन कार्यशाळा घेणार आहेत.

इच्छुकांनी matamaifalpune@gmail.com या ई-मेलवरून कार्यशाळेसाठी नोंदणी करावी. नावनोंदणी करताना पूर्ण नाव, पत्ता आणि फोन क्रमांक देणे आवश्यक आहे. कोणकोणत्या कार्यशाळेत भाग घ्यावयाचा आहे, याचा उल्लेख जरूर करावा.

..

कथा स्पर्धा आणि कविता

'मटा मैफल'च्या निमित्ताने लघुत्तम कथा (कमाल शंभर शब्द) आणि लघुकथा (कमाल एक हजार शब्द) स्पर्धा होणार आहे. आपल्या कथा, आपले नाव, पत्ता आणि छायाचित्रासह २४ फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेसाठी पाठवू शकता. त्याचबरोबर कविकट्ट्यावर कविता वाचण्यासाठीही आपल्या दोन वा तीन कविता पाठवाव्यात.साहित्य पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे. ई-मेल : ई-मेल : matamaifalpune@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images