Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसवणूक प्रकरणी पत्नीची तक्रार

0
0

पिंपरी : लग्न झाल्याचे लपवून मॅट्रिमोनियल साइटवरून दुसरे लग्न केल्यावर पत्नीकडून तीन लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या पतीच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे-गुरव येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीणकुमार दशरथ खरात (३८, रा. सद्‌गुरुनगर, जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या दुसऱ्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
खरात याचे पहिले लग्न झाले होते. तरीही त्याने मॅट्रिमोनियल साइटवर नावनोंदणी केली होती. त्यातून त्याची तक्रारदार महिलेची ओळख झाली. त्यानंतर तीन महिन्यांनी दोघांनी लग्न केले. खरातने तक्रारदार दुसऱ्या पत्नीला अनेक कारणे सांगून व्यवसायाला कर्ज मिळत नसल्याचा बहाणा केला. काही दिवसांनी थेट 'तू पैसे दे नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईन,'अशी धमकी दिली. त्यामुळे खरात याच्या तक्रारदार पत्नीने वेळोवेळी पैसे दिले. पैसे घेतल्यानंतर खरात अचानक गायब झाला. त्यामुळे खरात याचा शोध घेत असताना त्याचे पहिले लग्न झाल्याचे आणि दोन मुले असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७५ टक्के सवलतीला महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे अवघ्या महिनाभरात महापालिकेच्या तिजोरीत १८५ कोटी रुपयांची भर घालणाऱ्या अभय योजनेला फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, एकरकमी कर भरणाऱ्या मिळकतकरदात्यांना दंडावर ७५ टक्के सवलत मिळविण्यासाठी आणखी १५ दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यानंतरही, दंडावर ५० टक्के सवलत ३१ मार्चपर्यंत मिळविता येणार आहे. महापालिकेने सुरुवातीला जाहीर केल्यानुसार दंडावर ७५ टक्के सवलत १० फेब्रुवारीपर्यंतच देण्यात येणार होती. परंतु, नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात योजनेला मुदतवाढ देण्याचा आग्रह धरला होता. तसेच, अनेक थकबाकीदारांना त्या संदर्भातील नोटीस मिळाल्या नव्हत्या, अशी तक्रार केली गेली. त्यामुळे, मिळकतकर विभागाने ७५ टक्के सवलतीला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, मार्चअखेरपर्यंत अभय योजना लागू राहणार असून, यादरम्यान दंडावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मिळकतकराच्या उत्पन्नाने एक हजार कोटी रुपयांचा टप्पा शुक्रवारी ओलांडला. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्नात तब्बल अडीचशे कोटी रुपयांनी वाढ झाली असून, मार्चअखेरपर्यंत मिळकतकरातून पालिकेच्या तिजोरीत आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने गेल्या महिन्याभरापासून लागू केलेल्या 'अभय योजने'तून पालिकेला मोठा फायदा झाला आहे. त्यातून, पालिकेला १८७ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ६ लाख ४० हजार मिळकतींच्या माध्यमातून पालिकेला ७५० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यंदा मिळकतींच्या संख्येत लाखभराने वाढ झाली असून, एक हजार कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यापूर्वी, गेल्या आर्थिक वर्षात (२०१४-१५) मध्ये पालिकेला सर्वाधिक ८४१ कोटी रुपये प्राप्त झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांची सर्व पक्षीय‘स्मार्ट’बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्याबाबत राजकीय मतैक्य घडविण्यासाठी येत्या रविवारी महापालिका आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या खासदार-आमदारांना या बैठकीसाठी बोलाविण्यात आले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. एसपीव्हीची स्थापना लवकर करण्यासाठी सर्वांची सहमती घेण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या २० शहरांमध्ये पुण्याची निवड झाली. त्यानंतर, केंद्र सरकारने तातडीने एसपीव्हीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. एसपीव्हीला प्रमुख राजकीय पक्षांचा विरोध असल्याने गेल्या १५ दिवसांत त्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. म्हणूनच, आता एसपीव्हीवर राजकीय सहमती घडवून आणण्यासाठी सर्वपक्षीय खासदार-आमदारांची बैठक येत्या रविवारी (१४ फेब्रुवारी) घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा अपवाद वगळता इतर सर्वच पक्षांचा एसपीव्हीतील तरतुदींना तीव्र विरोध आहे. त्यामुळे, हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी मांडण्यात आला, तरी त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वसाधारण सभेपूर्वीच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मोट बांधून एसपीव्हीबद्दल अनुकूलता निर्माण करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटीची अंमलबजावणी एसपीव्हीच्या माध्यमातूनच होईल, असे केंद्राने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, एसपीव्हीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचा दावा काँग्रेससह इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे, स्मार्ट सिटीअंतर्गत एसपीव्हीची गरज आणि त्याची रचना, याबाबत आयुक्तांकडून सविस्तर सादरीकरण केले जाण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाला भाजप वगळता इतर पक्षांनी नाईलाजाने पाठिंबा दिला आहे. मात्र, एसपीव्हीच्या स्थापनेबाबत आक्षेप कायम आहेत. या सर्व आक्षेपांचे निराकरण करून 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त सर्व पक्षांमध्ये मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांकडून केला जात आहे. एसपीव्हीवर राजकीय मतैक्य साधण्याचे व्हॅलेंटाइन गिफ्ट आयुक्तांकडून पुणेकरांना दिले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक परतफेडीवरून आयुक्तांना विचारणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत विविध खासगी कंपन्यांशी केलेल्या सहकार्यापोटी आर्थिक परतफेड करण्याचे 'स्मार्ट' आश्वासन आयुक्तांनीच दिल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेविना परस्पर आर्थिक बाबींची पूर्तता करण्याचे अधिकार आयुक्तांना कोणी दिले, अशी विचारणा केली जात आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश व्हावा, यासाठी अनेक खासगी कंपन्या महापालिकेला सहकार्य करण्यास पुढे आल्या होत्या. महापालिकेतर्फे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्व कंपन्यांनी सहकार्य करार केले. हे सहकार्य करार कोणत्याही आर्थिक बाबींशी निगडित नसतील आणि ते पालिकेसाठी बंधनकारक नसतील, असा दावाही त्यांनी वेळोवेळी केला आहे. परंतु, सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांना रिइम्बर्समेंट देण्यात येईल, असे पत्र आयुक्तांनी दिल्याचा आरोप सुराज्य संघर्ष समितीच्या विजय कुंभार यांनी केला आहे. दरम्यान, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या इंटर्नशिपचे विद्यावेतन (स्टायपेंड) त्यांना देण्यात येणार असल्याचा खुलासा केला आहे. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मॅकेन्झी कंपनीला सहकार्य केले. त्यामुळे, मॅकेन्झीला देण्यात येणाऱ्या शुल्कातूनच सर्व विद्यार्थ्यांचा स्टायपेंड दिला जाईल, असा दावा त्यांनी केला. ------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या विषयांसाठी कारभाऱ्यांकडे वेळ नाही?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लाखो पुणेकरांसमोर उभ्या ठाकलेल्या पाणीपट्टीवाढीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही आणि 'उल्टा पुल्टा' सभेतील टिंगलटवाळीसाठी मात्र उत्साहाने सहभाग, असे 'माननीयां'चे वागणे शुक्रवारी पहावयास मिळाले. पाणीपट्टी वाढीसारख्या विषयावरील सभा चर्चेविनाच गुंडाळून काही वेळातच ही दुसरी मनोरंजक सभा सुरू झाल्याने महापालिकेचा कारभार किती 'गांभीर्याने' सुरू आहे, याचाही अनुभव आला.
शहरात २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी येत्या काही वर्षांत चक्रवाढ पद्धतीने पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावावरून शहरात वादळ निर्माण झाले आहे. या विषयाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात युती झाली असून, काँग्रेस, शिवसेना व मनसेने त्याला विरोध केला. या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चेसाठी शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली. येत्या अनेक वर्षांत पुणेकरांच्या मानगुटीवर बसणाऱ्या पाणीपट्टी वाढीबाबत सांगोपांग चर्चा करून निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, सभा सुरू झाल्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने चर्चेची कोणतीही संधी न देता थेट तहकुबीचा ठराव मांडला. सभा तहकूब करण्यासाठी मुरूड येथे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीचे कारण देण्यात आले. प्रत्यक्षात यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाजच या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू करण्यात आल्याची नोंद महापालिकेत आहे. पाणीपट्टीसारख्या संवेदनशील विषयावर चर्चेचीही संधी न दिल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अखेर राष्ट्रवादी आणि भाजपच्या सदस्यांनी एकत्र येऊन मतदानाने कामकाज तहकूब केले. यामध्येही मतमोजणीत गडबडी करून कामकाज गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी महापौरांवर केला.
सकाळच्या सभेत हा प्रकार घडल्यानंतर काही वेळातच 'उल्टा पुल्टा' ही मनोरंजक सभा सुरू झाली. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ही गमतीदार सभा घेण्यात येते आणि त्यामध्ये नगरसेवक आणि अधिकारी परस्परांची यथेच्छ टिंगल करतात. आजही ही सभा रंगली खरी; पण काही वेळापूर्वीच पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील सभा गुंडाळणे आणि नंतर टिंगलटवाळीची सभा रंगविण्यावरून नागरिकांसह अनेक नगरसेवकांनीही 'हे वागणं बरं नव्हं,' अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. काँग्रेससह अन्य पक्षांतील नगरसेवकांची गैरहजेरी या 'उल्टा पुल्टा' सभेत जाणवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुत्वीय लहरींची राज्यात वेधशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमेरिकेतील ज्या वेधशाळांनी गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले तशाच प्रकारची वेधशाळा भारतातही उभारण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्रातील जागेला शास्त्रज्ञांची सर्वाधिक पसंती आहे, अशी माहिती इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्सचे (आयुका) संचालक प्रा. सोमक रायचौधरी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील जागा या केंद्रासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचा निष्कर्ष 'आयुका'च्या समितीने काढला असून, राज्य सरकारने त्याला संमती दिल्यास बारा ज्योतिर्लिंगांसाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनासाठीही ओळखले जाईल. गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी देशभरातील २२ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातून राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

डॉ. रायचौधरी म्हणाले, 'गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणासाठी कमीत कमी भूगर्भीय हालचाली असणाऱ्या जागेच्या आम्ही शोधात होतो. या व्यतिरीक्त रेल्वे लाइन, मोठ्या शहराचा गजबजाट, औद्योगिक परिसर यांच्यापासून ती जागा दूर असणे आवश्यक असते. १५० मीटर रुंद आणि चार किलोमीटर लांब असे काटकोनातील दोन बोगदे या वेधशाळेसाठी बांधावे लागणार असल्यामुळे ३५० एकर जागेची आवश्यकता आहे.'

'राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक अशा अनुकूल जागा आम्ही अंतिम यादीत समाविष्ट केंल्या आहेत. भारतातील तिन्ही जागा भूशास्त्रीयदृष्ट्या अमेरिकेतील वेधशाळांपेक्षा दहा पटींनी स्थिर असल्यामुळे भारतातील वेधशाळेतून अधिक दर्जेदार नोंदी होऊ शकणार आहेत. महाराष्ट्रातील जागा नापीक जमिन आहे. लवकरच जागेविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल,' असेही रायचौधरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असहिष्णुता वगैरे काही नसते...

0
0

असहिष्णुता वगैरे काही नसते...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्राणार्पणाला २६ फेब्रुवारी रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पन्नासाव्या पुण्यस्मरणानिमित्त 'हिंदू हेल्पलाइन'तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यावर आधारीत 'सावरकर एक संन्यस्त खड्ग' या दृकश्राव्य कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी पंडित फार्म्समध्ये सायंकाळी सहा वाजता हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला हा संवाद.

'सावरकर एक संन्यस्त खड्ग' या कार्यक्रमामागची नेमकी कल्पना काय आहे?
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे आहे. ते त्यांचे विरोधकही मान्य करतात. सावरकरांच्या प्राणार्पणाला पन्नास वर्ष होत आहेत, पण त्यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारच्या पातळीवर एकही कार्यक्रम होत नाही. त्यांच्याकडून अपेक्षाही नाही. म्हणून सावरकरप्रेमींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. आज सर्वत्र राष्ट्रभक्तीचा अभाव जाणवतो. सावरकारांनी ५० वर्ष जन्मठेप भोगली. त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी आयुष्याचा होम केला म्हणून या पिढीला हे दिवस पाहता येत आहेत.

सरकार हिंदुत्ववादी विचाराचेच आहे, तरी कार्यक्रम का होत नाहीत?
- सरकार जरी हिंदुत्ववादी विचारसरणीचे असले, तरी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर निवडणूक असते. मत मिळणार नाही, म्हणून सावरकर स्वीकारले जात नाहीत. ही शोकांतिका आहे.

या कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे?
- स्वातंत्र्यवीरांचे गद्य आणि पद्य साहित्य नागरिकांसमोर मांडले जाणार आहे. त्यामध्ये सावरकरांच्या विविध लेखांचे, कवितांचे व नाट्य प्रवेशांचे अभिवाचन, त्यांनी लिहिलेली गाणी, पोवाडे व फटका यांचा समावेश आहे. सावरकरांचे काही लेख, कविता, नाटकातील काही पसंग, नृत्य हे अश्विनी एकबोटे, नितीन भारद्वाज व अन्य कलाकार सादर करतील. अनंत मी, जयोस्तुते, शिवाजी महाराजांची आरती यातून स्फुल्लिंग चेतवले जाईल. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पु. ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांनी सावरकरांविषयी काय म्हणून ठेवले आहे ते दाखवले जाईल. सुमारे ७० कलाकारांचा संच आहे. कोणावरही टीका करण्यात येणार नाही. सावरकरांचे मोठेपण सांगणे एवढाच यामागचा उद्देश आहे.

सावरकरांच्या प्राणार्पणाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, हेच निमित्त आहे की अशा कार्यक्रमाची गरज वाटली?
- सावरकर ८३ वर्षांचे आयुष्य जगले. २२ हजार पानांचे साहित्य सावरकरांनी लिहिले. सावरकरांचा राष्ट्रवाद, त्यांनी जातीयतेवर ओढलेले आसूड लोकांसमोर यायला हवेत. ते ब्राह्मण म्हणून जगले नाहीत. त्यांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. पण राजकारण्यांनी त्यांचे चुकीचे चित्र समाजासमोर ठेवले. १८५७ नंतर सावरकरांनी पहिल्यांदा स्वातंत्र्याचा जयघोष केला. त्यामागे त्यांचा राष्ट्रीय विचार होता. हिंदुराष्ट्र या संकल्पनेत धर्मांधतेचे अनुकरण अपेक्षित नाही. सर्व धर्म ग्रंथ पूजनीय आहेत, पण अनुकरणीय नाहीत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. वसुधैव कुटुंबकम हा राष्ट्रीयवाद त्यांनी मांडला. मुस्लिमांनी राहायचे की नाही, असा चुकीचा अर्थ काढला जातो. जातीभेद, देशाची सुरक्षा हे सावरकरांना अभिप्रेत होते. सावरकर २७ वर्ष समाजापासून लांब राहिले हे खूप मोठे नुकसान झाले.

कार्यक्रमाची निर्मिती प्रक्रिया कशी होती?
- मी सावरकरांची ५२ पुस्तके घेऊन बसायचो. सावरकरांवर अभ्यास होताच, त्यामुळे फारसे अवघड गेले नाही. दहा तासांचा कार्यक्रम करता येईल, इतके त्यांचे विपुल साहित्य आहे. तीन महिन्यांपासून यासाठी काम करत आहोत. मिळालेला पैसा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. पैशासाठी म्हणून कोणीही काम करत नाही.

या कार्यक्रमाचे राज्यभर प्रयोग होणार का?
- राज्यभर प्रयोग करायचे डोक्यात आहे, पण किमान सावरकरांचे ज्या ठिकाणी वास्तव्य होते, अशा गावांमध्ये तरी कार्यक्रम होतील. पुण्यातील कार्यक्रमापूर्वी शहरात विविध ठिकाणी या कार्यक्रमाविषयीची जनजागृती केली जाणार आहे. विविध चौकांत चित्रप्रदर्शन भरविण्यात येईल.

उत्तुंग व्यक्तिमत्वांना समाजाने बंदिस्त केल्याने ही सर्व मोठी माणसे सर्वांपर्यंत पोहोचली नाहीत, असे वाटत नाही का?
- प्रत्येक समाजाने आपला नेता वाटून घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, गांधी, आगरकर, सावरकर यांचे तत्त्वज्ञान व कार्य सर्वांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलेले नाही. त्यात पुन्हा टिळक, आगरकर व सावरकर जास्त उपेक्षित राहिले. ही सर्व महान व्यक्तिमत्वे एकाच वेळी सर्वांनी स्वीकारावी यासाठी काम केले पाहिजे.

व्यावसायिक काम आणि पुन्हा हे सर्व व्याप कसे जुळवून आणता?
- सावरकर यांच्या जीवनाचे व इतिहासाचे मला व्यसन आहे. शुटिंगदरम्यान लोकांची लफडी चघळण्यापेक्षा मी वाचन करतो. रोज दहा पाने वाचली तरी खूप वाचन होते. मी अनेकांना ही सवय लावली आहे. सेटवर मला अनेकजण सावरकर म्हणून हाक मारतात.

सध्या तुम्ही अनेक ठिकाणी व्याख्याने देत आहात, त्याविषयी?
- या देशात ८० टक्के हिंदू आहेत, तरी हे हिंदू राष्ट्र नाही. जगात सर्व धर्मांनी आपापल्या नावाचे राष्ट्र वाटून घेतले आहे. हे मी जाहीरपणे बोलत राहीन, त्यामुळे माझे नुकसान झाले तरी चालेल.

सध्या असहिष्णुतेविषयी खूप बोलले जाते. मी नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकावेळी तुम्हाला असहिष्णुतेचा सामना करावा लागला का?
- असहिष्णुता वगैरे काही नसते. स्वागत आणि विरोध या दोन्ही प्रक्रिया घडतच असतात. मुंबई येथील हुतात्मा स्मारक फोडले, तेव्हा का नाही पुरस्कार परत केले? मुळात पुरस्कार परत करून काही होत नसते. समाजात जे चुकीचे आहे, त्याविरूद्ध लेखणी चालवून निषेध करायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा हात

0
0

प्लास्टिकमुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा हात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पुण्याला प्लास्टिक कचरामुक्त करण्यासाठी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीनशेहून अधिक शाळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पुण्यात ३१ टन, तर पिंपरी चिंचवडमध्ये २२.४० टन कचरा गोळा केला.
केंद्रीय वने आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या प्लास्टिकमुक्त पुणे अभियानामध्ये वन विभागाबरोबरच, जिल्हा, प्रशासन, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि विविध सरकारी कार्यालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रमणबाग शाळेच्या मैदानावर या उपक्रमाचे उद् घाटन झाले. या वेळी जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक धनराज माने, नगरसेविका मुक्ता टिळक, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानास आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. स्वच्छतेचे हे संस्कार शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांपर्यंत होण्याची आवश्यकता आहे,' असे मत बापट यांनी व्यक्त केले.
'स्वच्छ भारत हा महात्मा गांधीजींचा संदेश होता. तो संदेश आपण कृतीतून पुढे नेत आहोत. विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम पुणेकरांनी पुढे नेल्यास शहर प्लास्टिक कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही,' असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले. बापट आणि जावडेकर यांनीही रणबागेतील विद्यार्थ्यांसोबत नदीपात्रातील प्लास्टिक कचरागोळा केला.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्ती अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, नगरसेवक कैलाश गायकवाड उपस्थित होते. या वेळी विद्यापीठाच्या औषधी वनस्पती उद्यानामध्ये मान्यवरांनी औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर पाचशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून घनकचरा गोळा केला. महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाने कचरा ताब्यात घेतला. घनकचरा विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश पाटील, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, बीसीयूडीचे संचालक डॉ. विश्वास गायकवाड, डॉ. विद्या गारगोटे आदी उपस्थित होते.
...............
वीरकर हायस्कूलचे योगदान
सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील शिंदे आळी, आकाश मारुती कोपरा, बाफना पेट्रोल पंप, काळा हौद चौक, बदामी चौक, चिंचेची तालीम, सेवा मित्र मंडळ परिसरातील प्लास्टिक गोळा केले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनोखे छाऊ नृत्य शिकण्याची संधी

0
0

अनोखे छाऊ नृत्य शिकण्याची संधी

पुणे : 'मयूरभंज छाऊ' हा आगळा वेगळा, दुर्मिळ आणि पारंपरिक नृत्यप्रकार शिकण्याची संधी पुण्यातील नृत्यप्रेमींना मिळाली आहे. देशातील प्रसिद्ध छाऊ नर्तक राकेश साई बाबू हे यात मार्गदर्शन करणार असून 'नृत्ययात्री'तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालय येथे १८ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.
'छाऊ' हा मूळचा आदिवासी नृत्यप्रकार असून, तो उडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लोकप्रिय आहे. या नृत्यामध्ये नर्तकाच्या एका हातात तलवार असते; तर दुसऱ्या हातात ढाल असते. या नृत्यप्रकाराला युनेस्कोची मान्यता मिळाली असून, मुख्यत्वे प्रादेशिक उत्सवादरम्यान तो पाहायला मिळतो. दिल्लीस्थित राकेश साई बाबू हे छाऊ नृत्यप्रकारातील मयूरभंज या शाखेचे सुपरिचित नर्तक आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते अनंतचरण साई बाबू यांचे नातू व मयूरभंज छाऊ गुरू जन्मेजय साई बाबू यांचे सुपूत्र आहेत. भारतासह जगभरात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले असून, त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या कार्यशाळेत बॉडी बॅलन्सिंग, हालचाली, नृत्य तंत्र याबरोबरच या नृत्य प्रकारातील लहानसहान प्रकारांबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८८११ ४८८५० या क्रमांकावर संपर्क साधावा.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई यांना धमकीचे पत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शुक्रवारी धमकीचे पत्र आले आहे. यामध्ये 'तुमचाही दाभोलकर होईल,' असे म्हटले आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देसाई यांना धमकीचे पत्र आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. त्यामध्ये तुम्ही सुरू केलेल्या आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होत आहे. तुम्ही जर सरकारविरुद्ध लढत असाल तर खुशाल लढा. स्त्री समानतेसाठी तुम्ही शिंगणापूरचे आंदोलन का सुरू केले. तुम्हा शेतकरी दिसत नाही का, बसच्या पाससाठी आत्महत्या करणारी विद्यार्थिनी दिसत नाही का? तुम्ही जर रणरागिणी समजत असाल, तर स्त्री शिक्षण आणि स्त्रीभ्रूण हत्या या प्रश्नी लढा का उभारत नाहीत. स्त्री जास्तीत जास्त सुरक्षित कशा होतील, याचा विचार करावा. नाहीतर तुमचा ही दाभोलकर होईल, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या प्रकरणी देसाई यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर सहकारनगर पोलिसानी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्म-मृत्यू नोंदीसाठीएकच कम्प्युटर प्रणाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जन्म-मृत्यूच्या नोंदी आणि दाखले देण्यासाठी देशपातळीवर सुसूत्रतता आणण्यात आली असून त्यासाठी केंद्र सरकारने देशभरासाठी एकच कम्प्युटर प्रणाली विकसित केली आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या प्रणालीद्वारेच संबंधित दाखले देण्याची सूचना करण्यात आली आहे.
जन्म व मृत्यूच्या घटनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नोंदणी केली जाते. यामध्ये सुसूत्रतता आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यस्तरीय आंतरविभागीय समन्वय समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने त्यासाठी विकसित केलेल्या कम्प्युटर प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रणालीद्वारेच जन्म व मृत्यूचे दाखले देण्यात यावेत, अशी सूचना नगर विकास विभागाने केली आहे.
जन्म व मृत्यूचे दाखले देण्यासाठी crsorgi.gov.in ही संगणक प्रणाली १ जानेवारीपासून कार्यानिव्त करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे जन्म व मृत्यूची नोंद घेऊन तत्काळ दाखले वितरित करणेही शक्य आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका व नगरपालिकांनी जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची सध्याची पद्धत बंद करावी आणि या केंद्र सरकारच्या नव्या प्रणालीनुसार दाखले द्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानाशुल्काच्या वाढीविरोधातसोमवारी आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला वाहतूक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात येत्या सोमवारी (ता.१५) जिल्हाधिकरी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय पुणे जिल्हा माल व प्रवासी वाहतुकदार कृती समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
विविध प्रकराच्या परवान्यांच्या नूतनीकरणाचे शुल्क व परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रक्कम, याची नवीन निर्णयाप्रमाणे आकारणी करण्यास प्रादेशिक परिवहन विभागाने सुरुवात केली आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक वाहतूक संघटना एकत्र आल्या आहेत. माल व प्रवासी वाहतूक कृती समितीचे बाबा शिंदे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे शहराध्यक्ष राजू घाटोळे, रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, बाबा कांबळे, संजय कवडे, सुरेश जगताप, चंद्रकांत गोडबोले, प्रदीप भालेराव आदींची शनिवारी बैठक झाली. शुल्क वाढीच्या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे आठ लाख ट्रक चालक, दीड लाख खासगी प्रवासी वाहतूक करणारे बसचालक, आठ लाख रिक्षाचालक आणि सहा लाख टॅक्सीचालकांना बसणार आहे.
मंगळवारीही मोर्चा
बसच्या तात्पुरत्या परवान्याचे शुल्कही वाढविण्यात आल्याने, एक दिवसासाठी परवाना काढणे अवघड होणार आहे. शहरातील सर्व आमदरांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रविवारी निवेदन देण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारपर्यंत परवाना शुल्क वाढीचा निर्णय मागे न घेतल्यास मंगळवारी वाहनांसह मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक बांधिलकीचीजाणीव महत्त्वाची

0
0

कुलगुरू डॉ. गाडे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळविण्यासाठी समाजाच्या गरजा, अपेक्षा व समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढला आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक तरुणाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे,' असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.
सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू पं. विद्यासागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्यामसुंदर पाटील, रंगनाथ नाईकडे, स्पर्धा परीक्षा संमेलानाध्यक्ष सुधीर ठाकरे, निमंत्रक डॉ. आनंद पाटील, समन्वयक संचालक वैशाली पाटील तसेच स्वागताध्यक्ष विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते.
साहित्य संमेलानाच्या निमित्ताने आयोजित भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीचे उद्घाटन साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. वारकरी संप्रदाय तसेच सोबत सहभागी झालेले कॉलेजमधील व स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिंडी उत्साहात निघाली. या दिंडीत पारंपरिक वेशातील विद्यार्थी, युवक आणि फुगड्या घालणारे वारकरी व विद्यार्थिनी हे लक्षवेधी ठरले. प्रा. हांडगे, सुनील कुदळे यांना पुरस्कार देण्यात आला.
'राज्य लोकसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जागा मर्यादित आणि त्या मानाने विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. अपयश जरी पदरी पडले, तरी खचून न जाता इतर क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी आयुष्याचे प्राधान्यक्रम ठरविता येणे आवश्यक आहे,' असे मत डॉ. गाडे यांनी व्यक्त केले.
'परीक्षा देताना वेळेचे गणित जुळले पाहिजे. प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन ते सोडविता आले पाहिजे. आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा कसे वेगळे आहे, हे या स्पर्धा परीक्षांमधून समजून येते. त्यासाठी निश्चित तयारी करावी लागते. स्पर्धामधून व्यक्तिमत्त्वाची जडण घडण होते,' असे पंडित विद्यासागर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीसाठी व्हीप

0
0

पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काँग्रेस, मनसे, शिवसेनेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे वाढीव पाणीपट्टीच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूट जाण्याची शक्यता असली तरी आयत्या वेळेस सभागृहात मतदान घेण्याची वेळ आल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेतील काँग्रेस, शिवसेना, मनसे या तीनही पक्षनेत्यांनी 'व्हीप' काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१६ फेब्रुवारीला) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी सभागृहात हजर राहावे, यासाठी या तीनही पक्षाच्या गटनेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणेकरांच्या पाणीपट्टीत चक्रवाढ पद्धतीने वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने एकत्र येऊन घेतला आहे. काँग्रेस, शिवसेना, मनसेने या प्रस्तावाला कडाडून विरोध करून आंदोलने देखील सुरू केली आहेत. पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रवादी, भाजप मतदानाच्या जोरावर मान्य करण्याची शक्यता असल्याने मतदान घेण्याची वेळ आल्यास त्याला विरोध करण्यासाठी सर्व सभासद हजर असावेत, यासाठी व्हीप काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टीत अशा पद्धतीने वाढ करण्यास राष्ट्रवादी, भाजपमधील काही नगरसेवकांचा विरोध आहे. पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेताना या दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी पक्षाच्या सभासदांनाच विश्वासात न घेतल्याने काही सभासदांचा विरोध आहे.
'राष्ट्रवादी'मधील काही सभासदांचा या वाढीला विरोध असल्याने पुणेकरांचा रोष ओढवून घेण्याऐवजी एक पाऊल मागे येत पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेण्याची शक्यता आहे. पालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या 'राष्ट्रवादी'चे संख्याबळ ५६ इतके आहे. तर काँग्रेसचे ३०, मनसेचे २८, भाजपचे २६ आणि शिवसेनेचे संख्याबळ १२ आहे. राष्ट्रवादी, भाजप एकत्र आल्यास या दोन्ही पक्षांचे संख्याबळ ८२ इतके होते. तर काँग्रेस, सेना, मनसेचे संख्याबळ ७० होते. पाणीपट्टी वाढीबाबत राष्ट्रवादी बॅकफूटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात सभागृहात हा विषय मान्य करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी आयत्या वेळेस घेऊ शकते. त्यामुळे आयत्या वेळेस मतदान घेण्याची वेळ आल्यास अडचण नको, यासाठी तीनही पक्षांच्या गटनेत्यांनी विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांचा विरोध डावलून राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांनी वाढ करण्याचे आदेश दिल्यास या विरोधात बंड करून या दोन्ही पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास मतदानाच्या जोरावर काँग्रेस, सेना, मनसे हा विषय फेटाळू शकते.
...
पाणीपट्टीत वाढ पुणेकरांसाठी अन्यायकारक असल्याने याला विरोध करण्यासाठी सर्व सभासदांनी हजर रहावे, असा व्हीप यापूर्वीच काढला होता. मंगळवारी होणाऱ्या सभेसाठीही व्हीप काढला जाणार आहे.
- अरविंद शिंदे (काँग्रेस)
..
पाणीपट्टीत वाढ करण्याच्या सभेसाठी पक्षाच्या सर्व सभासदांनी हजर रहावे, यासाठी सर्वांना फोन करण्यात येणार आहेत.
- बाबू वागस्कर (मनसे)
..
पक्षाने या विरोधात वारंवार आंदोलने केली आहेत‌. सभागृहात या प्रस्तावाला विरोध करून नागरिकांच्या हिताचा निर्णय व्हावा, यासाठी पक्षाच्या सभासदांनी हजर रहावे, अशा सूचना सर्वांना देण्यात येतील.
- अशोक हरणावळ (शिवसेना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरांना लागणार लगाम

0
0

वीजचोरांना लागणार लगाम

पुणे : वीजचोरांनो सावधान! 'महावितरण'कडून वीजचोरांचा माग काढण्यासाठी आणि त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी पुण्यात खास कक्ष सुरू होत आहे. पुण्यातील या कक्षात बसून 'महावितरण'चे अधिकारी राज्यातील १३ जिल्ह्यांमधील वीजचोरांचा शोध लावणार आहेत. ग्राहकाकडून वीजवापर बंद झाल्यास किंवा कमालीचा कमी झाल्यास तेथे वीजचोरी सुरू झाल्याचे या कक्षामुळे अधिकाऱ्यांना लगेच कळणार असल्याने वीजचोर अलगदपणे जाळ्यात सापडणार आहेत.
पुण्यात रास्ता पेठ येथील 'महावितरण'च्या मुख्यालयात हा विशेष कक्ष असणार आहे. त्या ठिकाणी पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हिंगोली या १३ ​जिल्ह्यांतील वीजचोरांचा शोध लागणार आहे. 'महावितरण'च्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या साह्याने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाचे कामकाज येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहे. त्यानंतर या कक्षाद्वारे वीजचोर सापडणार असल्याचे 'महावितरण'च्या दक्षता विभागाचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.
'महावितरण'च्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे सर्व वीजग्राहकांच्या वीजवापराबाबतची माहिती आहे. ती माहिती या कक्षात संकलित केली जाणार आहे. त्याद्वारे वीजग्राहकांकडून होणाऱ्या वीजवापराचे विश्लेषण करण्यात येणार आहे. प्रत्येक वीजग्राहकाकडून दरमहा होणाऱ्या विजेच्या वापराचा आलेख कक्षाकडे असेल. त्यानुसार ग्राहकांकडून कोणत्या वेळी किती विजेचा वापर केला जातो, याची माहिती उपलब्ध असणार आहे. काही ग्राहकांचा वीजवापर अचानकपणे बंद किंवा कमालीचा कमी झाल्यास त्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचा संशय निर्माण होतो. त्या ग्राहकांबाबतची माहिती संबंधित​ जिल्ह्याच्या दक्षता विभागाला दिली जाणार आहे. त्यानंतर त्या ग्राहकाच्या मीटरची तपासणी होणार आहे. त्यामुळे वीजचोरी उघडकीस येऊ शकेल, असे इंदलकर यांनी स्पष्ट केले.
या कामासाठी दक्षता विभागांकडे १६ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पुण्यातील विशेष कक्षात चार कम्प्युटरमध्ये माहिती संकलित होणार आहे. त्या माहितीद्वारे अधिकाऱ्यांकडून वीजवापराचे विश्लेषण होणार आहे. या कक्षातून १३​ जिल्ह्यांमधील वीजचोरांचा माग काढला जाणार आहे. साधारणतः वीजपुरवठा खंडित झाल्यास वीजवापर बंद होतो. मात्र, अनेक ठिकाणी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी प्रमाणापेक्षा कमी वीजवापर होत असल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचा संभव असतो. अशा ग्राहकांना जाळ्यात पडकले जाणार असल्याचे इंदलकर यांनी नमूद केले.
.....................
मॉल, कंपन्यांवर 'वॉच'
विजेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी काही प्रमुख ठिकाणे असतात. त्यामध्ये औद्योगिक कंपन्या, मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्स आदी आहेत. या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या प्रत्येक ठिकाणी दरमहा सरासरी किती वीजवापर होतो, याची माहिती 'महावितरण'कडे आहे. अचानकपणे वीजवापर बंद किंवा कमी झाल्यास त्यांची लगेच तपासणी होणार असल्याने हे मोठे मासे जाळ्यात पकडले जाणार आहेत. छोटे वीजचोर पकडण्यासाठी प्रत्येक विभागात 'महावितरण'चे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून वीजचोरी पकडली जाणार आहेच; पण या कक्षात मोठे वीजचोर पकडण्यावर भर असणार असल्याचे दक्षता विभागाचे उपसंचालक इंदलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेच्या आमदाराने तलाठ्याला चोपले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पुणे

मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुन्नरचे राज्यातील एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी अणे गावचे तलाठी दीपक हरण यांना त्यांच्या रायगड या संपर्क कार्यालयात बोलावून मारहाण केल्याचा आरोप तलाठी संघटनेने केला आहे.

या प्रकरणी जोपर्यंत सोनवणे यांच्या गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व संघटना सोमवारपासून बेमुदतपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा पवित्रा तलाठी संघटनेने घेतला आहे. तर जनतेच्या कामांसाठी कामावर हजर न राहता लोकांची गैरसोय करणाऱ्या तलाठ्याला ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. ४७ लोकांची संघटना चार लाख जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, असेही सोनवणे यांनी सांगितले. याबाबत जुन्नर तालुका तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार सोनवणे यांनी तलाठी हरण यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडतोस, तलाठी कार्यालयात येत नाहीस, असे सुनावले आणि त्यांना बेदम मारहाण केली. ही माहिती समजताच हरण यांना प्रथम ग्रामीण हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

तलाठी हरण सहा महिन्यांपासून नागरिकांची कामे करत नव्हते. त्यामुळे सरपंच आणि ग्रामस्थ माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते. याबाबत मी तहसीलदार आणि प्रांत यांना कळविले होते. मी त्यांना फक्त विचारणा केली. त्या वेळी इतर व्यक्तीही उपस्थित होत्या. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. - शरद सोनवणे, आमदार, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मन बेकरी स्फोटाच्या आठवणी ताज्या

0
0

पुणे हिटलिस्टवर; हेडलीच्या साक्षीतून झाले स्पष्ट, चार आरोपी अद्याप फरारी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबईवरील २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी डेव्हिड कोलमन हेडलीने दिलेल्या साक्षीमध्ये पुण्यातील छबाड हाउस, सदर्न कमांड यांची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या रडारवर आजही पुणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेडलीच्या साक्षीमुळे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. स्फोटाला सहा वर्ष झाल्यानंतरही स्फोटातील चार आरोपी अद्यापही फरारी आहेत. हे फरारी आरोपी परदेशात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात येत आहे. २००९मध्ये हेडली पुण्यात आला होता. त्या वेळी तो कोरेगाव पार्क भागातील सूर्या व्हिला हॉटेलमध्ये उतरला होता. त्या वेळी जर्मन बेकरी, छबाड हाउस, दक्षिण लष्काराचे मुख्यालय असलेले सदर्न कमांड, परदेशी नागारिकांचे वास्तव्य असलेली ठिकाणे यांची रेकी केल्याचे हेडलीने कोर्टासमोर सांगितले. यानंतर मुंबईत गेल्यानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात आला होता. २६/११ च्या हल्ल्यानंतर वर्षामध्येच जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे पुणे हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे समोर आले. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी 'लष्करे तोयबा' आणि 'इंडियन मुजाहिदिन' संघटनेने एकत्रित येऊन काम केल्याचे तपास यंत्रणाच्या लक्षात आले होते.
पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू तर ५७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश होता. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने मिर्झा हिमायत बेग याला अटक केली. कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार यासीन भटकळ यालाही अटक झाली असून त्याच्यावर अद्याप खटला सुरू झालेला नाही. जबिउद्दीन अन्सारी याला तपास यंत्रणांनी अटक केली असली तरी या गुन्ह्यात त्याला अद्यापपर्यंत ताब्यात घेतलेले नाही. मोहसीन चौधरी, रियाज भटकळ, इक्बाल भटकल, फैय्याज कागझी हे अद्याप फरार आहेत. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाला, त्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरात ही बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अटक केलेला दहशतवादी कतिल सिद्दीकी याचा येरवडा जेलमध्ये खून झाला होता.
..
भटकळवर खटला केव्हा?
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकलाला तपास यंत्रणांनी अटक केली आहे. देशातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणी भटकळ हा पोलिसांना हवा होता. अटक केल्यानंतर त्याला विविध कोर्टात हजर करण्यात आले. त्यानुसार जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करून पोलिस कोठडीत तपास करण्यात आला. त्याच्यावर अद्याप जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी खटला सुरू झालेला नाही. दुसरा आरोपी जबुउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुदांल याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केलेली नाही. या प्रकरणी अटक केलेल्या मिर्झा हिमायत बेग याला फाशीची शिक्षा सुनावली असून, त्याने हायकोर्टात अपील केले आहे.
--
श्रद्धांजली
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांना नागरिकांना नेपाळी सोशल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंग विश्वकर्मा, रोहन जैसी, केवलसिंग, रमेश विश्वकर्मा, भोलानाथ डहल, दिवानसिंग आदी उपस्थित होते. या वेळी नेपाळमधील अनेक समस्यांवर तसेच, भारत-नेपाळ मैत्री संबंध अधिकाधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या मिल्ट्री फार्ममधील दोन कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी तीन अधिकाऱ्यांच्या घरावर पुण्यासह इतर चार शहरात छापे टाकले.

पुण्यात खडकी परिसरात मिल्ट्री फार्म आहे. या ठिकाणी दुधाचे उत्पादन घेऊन ते लष्करी जवानांना पुरविले जाते. २००९ ते २०१३ या काळात कर्नल पी. के बहुगुणा, लेफ्टनंट कर्नल जे. के. जोसेफ आणि अजितसिंह बहादोरिया हे या ठिकाणी कार्यरत होते. यांच्या काळात काही कंपन्यांनी त्यांच्याकडून खरेदी केलेल्या दुधामध्ये गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. त्यानुसार तपास केल्यानंतर दोन कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर तीन अधिकारी व कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने शनिवारी या तीन अधिकाऱ्यांच्या पुणे, जम्मू काश्मीर, कोलकता, नवी दिल्ली, कोटा येथील घरांवर छापे टाकले. या ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीवाढ एक वर्षापुरतीच?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांवर सलग ३० वर्षे पाणीपट्टीवाढीचा बोजा टाकल्याने चहूबाजूंनी होणारी टीका लक्षात घेत, दोन पावले मागे जाण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत. त्यामुळे, पुढील आर्थिक वर्षासाठीची प्रस्तावित १२ टक्के दरवाढ वगळता पुढील ३० वर्षांची दरवाढ तूर्तास रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.

शहरात सर्वत्र समान पाणीपुरवठा (२४*७) करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या साथीने ही वाढ मान्य केली. पुणेकरांवर थेट ३० वर्षांसाठी करवाढ लादल्याने त्याला तीव्र विरोध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाला २४ तास पाणीपुरवठा हवा असला, तरी दरवाढीला विरोध आहे. त्यामुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी पालिकेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. तसेच, पुणेकरांच्या भावनांचा विचार करून निर्णय घ्या, असेही बजावले.

सर्वच प्रमुख पक्ष विरोधात असल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला करवाढीचा मोठा फटका सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे, समान पाणीपुरवठ्यासाठी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता गृहित धरून आता राष्ट्रवादीनेही 'यू टर्न' घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. संपूर्ण ३० वर्षांसाठीच्या करवाढीला मान्यता देण्याऐवजी सध्या प्रायोगिक स्वरूपात केवळ एका वर्षासाठी करवाढीला मान्यता देण्याबाबत पक्षात विचार-विनिमय सुरू आहे. १२ टक्क्यांच्या प्रस्तावित वाढीला मान्यता दिल्यास, पुणेकरांना वर्षाकाठी जेमतेम शंभर रुपये जादा द्यावे लागणार आहेत. त्यामुळे, केवळ पुढील वर्षासाठी (२०१६-१७) पाणीपट्टीत वाढ करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा, निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पा लोंढे खूनप्रकरणीदोघांना पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याचा खून केल्यानंतर फरार झालेल्या गोरख कानकाटेसह त्याच्या साथीदाराला अटक करून शुक्रवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले. त्या दोघांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. गोरख उर्फ गोरक्ष बबन कानकाटे (४३, रा. कोरेगाव मूळ रा. इनामदारवस्ती, हवेली) आणि रवींद्र शंकर गायकवाड (३६, रा. उरुळी कांचन) या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष शिंदे (३४), नीलेश सोलनकर (३०), राजेंद्र गायकवाड (२४), आकाश महाडिक (२०), नितीन मोगल (२७), विष्णू जाधव (३७), नागेश झाडकर (२७) आणि मनीकुमार ऊर्फ चंद्रा ऊर्फ अण्णा (४५), विकास यादव (३१) यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच, अण्णा उर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन, सोमनाथ कांचन, प्रवीण कुंजीर यांचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव प्रकाश ऊर्फ आप्पा लोंढे (२२) याने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अप्पा लोंढे याच्या भावाचा २००२ मध्ये खून झाला होता. या खटल्यात आप्पा लोंढेने साक्ष दिली होती. या गुन्ह्यात गोरख कानकाटे व त्याचे साथीदार यांना शिक्षा झाली होती. हायकोर्टातून आरोपी जामिनावर बाहेर होते. आप्पा लोंढे २८ मे रोजी पहाटे व्यायामासाठी बाहेर पडला, तेव्हा उरुळी कांचन येथे त्याच्यावर आरोपींनी गोळीबार व धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. याप्रकरणी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपी कानकाटे आणि गायकवाड गुन्हा केल्यापासून फरार होते. या काळात त्यांना कोणी आश्रय दिला याचा तपास करायचा आहे. इतर फरार आरोपींचाही शोध घ्यायचा असल्याने बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांच्या पथकाने दोघांना अटक करून कोर्टात हजर केले. अतिरिक्त सरकारी वकील एस. एम. जगताप यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील अॅड. सुचित मुंदडा, अ‍ॅड. दादासाहेब लोंढे, अ‍ॅड. दीपाली गायकवाड आणि अ‍ॅड. केतन जाधव यांनी विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images