Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हवामान विभाग देणार ‘हेल्थ अलर्ट’

$
0
0

हवामान विभाग देणार 'हेल्थ अलर्ट'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हवामानातील तापमान, बाष्प आणि अन्य घटकांच्या प्रमाणानुसार हवामान विभागातर्फे लवकरच हेल्थ अलर्ट जारी केले जाणार आहेत. त्यामुळे हवामान बिघडल्यास त्याचे आरोग्यावर कसे परिणाम होतील, हेदेखील काही वेळ आधीच समजू शकणार आहे. त्याचबरोबर विशिष्ट हवामानात रोगजंतूंवर काय परिणाम होईल, याचाही अंदाज आल्यामुळे योग्य ती काळजी घेणेही शक्य होऊ शकेल.
हेल्थ अलर्टस जारी करण्याच्या दृष्टीने सध्या हवामान विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर पुणे आणि नवी दिल्ली येथील थंडीच्या नोंदी घेण्यात येत आहेत. लवकरच ही सेवा व्यापक प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल.
'आरोग्य आणि हवामान या एकमेकांशी अत्यंत निगडीत बाबी आहेत. नागरिकांच्या हितासाठी आपल्याकडील माहिती एकमेकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य आणि हवामान विभागाने घेतला आहे. त्या आधारे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या सेवेबाबतचे काम सुरू असून, लवकरच याचा विस्तार करण्यात येईल. येत्या उन्हाळ्यापासून ही सेवा उपलब्ध होईल,' असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक (संशोधन) बी. मुखोपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'हवामानातील तापमान आणि बाष्प या घटकांच्या विशिष्ट प्रमाणात काही विषाणू जीवंत राहतात किंवा मृत पावतात. त्याचबरोबर विशिष्ट प्रकारचे अनुकूल हवामान असल्यास काही विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर प्रसारही होऊ शकतो. त्यामुळे हवामानातील बदलांची योग्य ती पूर्वसूचना आरोग्य विभागाला देण्यात येईल,' असे मुखोपाध्याय यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकी भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे मिळकतकर थकबाकी भरण्यासाठी ७५ टक्के सवलत मिळविण्याची मुदत संपत आल्याने मंगळवारी एका दिवसात पाच हजार करदात्यांनी थकीत रकमेचा भरणा केला. त्यातून पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३ कोटी रुपयांची भर पडली असून, 'अभय योजने'त आजवर १५८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. थकबाकीवर ७५ टक्के सवलत मिळविण्याचा आज, बुधवारी अखेरचा दिवस आहे. मिळकतकराची मोठ्या प्रमाणावर असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने अभय योजना लागू केली. दंडावर ७५ टक्के सवलत मिळत असल्याने अनेक थकबाकीदारांनी या मुदतीत थकीत रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा केली. सुमारे ७८ हजारांहून अधिक नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेतला. या सवलतीचा बुधवारी अखेरचा दिवस असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मिळकतकर विभागातर्फे करण्यात आले आहे. अभय योजना पुढील महिनाभर सुरू राहणार असली, तरी गुरुवारपासून (११ फेब्रुवारी) दंडावर मिळणारी सवलत कमी होणार आहे. १० मार्चपर्यंत दंडाच्या एकूण रकमेवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिस्ती बांधवांच्या उपवासाला आज प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे ख्रिस्ती बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. उपवासानिमित्त बहुतांश चर्चमध्ये प्रार्थनांचे आयोजन केले जाते. उपवासाच्या पहिल्या दिवसाला 'राखेचा बुधवार' असे म्हणतात. देवाला प्रिय असलेला उपवास म्हणूनही या उपवासाची ओळख आहे, अशी माहिती चर्च ऑफ दी होली नेम कथेड्रलचे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी दिली. पापाच्या दलदलीमध्ये राहू नये. मानवाला सार्वकालीक जीवन मिळावे म्हणून देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राचे वधस्तंभावर बलिदान देऊन मानवजातीचे रक्षण केले, या सर्व गोष्टींचे आणि ईश्वराचे या चाळीस दिवसांत स्मरण केले जाते, असे बिशप रेव्हरंड अॅण्ड्र्यू राठोड यांनी सांगितले. 'प्रार्थनेसाठी येणारे भाविक चर्चमध्ये प्रार्थना करून उपवास सोडतात. या काळात अंध, अपंग, गरजवंत आणि गरिबांना दानधर्म केला जातो. त्यांची काळजी घेतली जाते,' असे रेव्हरंड अनिल इनामदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात बीएसएनएल ‘डिस्कनेक्ट’

$
0
0

Prasad.Panse
@timesgroup.com

पुणे : सिमकार्डांपासून ते मनुष्यबळापर्यंत आणि केबलपासून टॉवरपर्यंत अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा असल्यामुळे 'कनेक्टिंग इंडिया'चे ब्रीद मिरविणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी प्रत्यक्षात ग्राहकांपासून डिस्कनेक्ट होऊ लागली आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांची भरभराट होत असतानाच ही सरकारी कंपनी अडचणीत येण्यामागे काय डाव आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या काही काळात विविध प्रकारच्या कमतरतांमुळे बीएसएनएल अडचणीत आले आहे. सिम कार्डपासून मनुष्यबळापर्यंत आणि केबलपासून टॉवरपर्यंत सर्वच गोष्टींची कमतरता असल्याने बीएसएनएलच्या पुणे विभागाच्या सेवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सेवांचा विस्तार सोडा, पण सध्याच्या ग्राहकांनाही सेवा देणे कर्मचाऱ्यांसाठी आव्हान बनले असल्याचे कंपनीतील लोक सांगत आहेत.

दूरध्वनी जोडणी आणि यंत्रणा कार्यन्वित ठेवण्यासाठी आवश्यक अशा सर्वच यंत्रणांची सध्या बीएसएनएलच्या पुणे विभागाकडे मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. शहराच्या विविध भागात सध्या खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे सातत्याने टेलिफोनची केबल तुटत असल्याने हजारो लँडलाइनची सेवा ठप्प झाली आहे. मात्र, पुन्हा केबल पूर्ववत करून सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक साधनांची कमतरता असल्यामुळे या कामाला विलंब लागत आहे.

'बीएसएनएलच्या पुणे विभागाकडे यूआय कनेक्टर, मॉड्युलर स्ट्रीप, जॉइंटिंग कीटची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. त्याचबरोबर कोणत्या लाइनमध्ये व कुठे बिघाड आहे, हे शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉल्ट लोकेटरचीही कमतरता असल्याने नेमका कुठे बिघाड झाला आहे, हे शोधण्यासच विलंब होत आहे.बीएसएनएलला कामाचे आउटसोर्सिंग करण्याची परवानगी नसल्याने उपलब्ध असलेल्या मशिनवरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे,' अशी माहिती बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनचे सर्कल सचिव नागेश नलावडे, जिल्हा सचिव दिलीप जगदाळे आणि जिल्हा सचिव एम. आय. जकाती यांनी दिली.
(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला विस्मरण डी. लिटचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नव्वदच्या दशकापर्यंत दिला गेलेला डी. लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) हा सन्मान आता विस्मरणात गेला आहे. या सन्मानाच्या निवड प्रक्रियेमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी सुरू झालेला जीवनसाधना गौरव पुरस्कार हाच विद्यापीठाचा मुख्य सन्मान झाल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण झाले आहे.

केवळ शैक्षणिक उपक्रमांमधूनच नव्हे, तर विविध क्षेत्रांमधून समाजोपयोगी कार्याद्वारे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठातर्फे डी. लिट. या मानद पदवीने गौरविण्यात आले होते. त्यासाठी विद्यापीठाने गौरविलेल्या व्यक्तींमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यापासून ते ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांपर्यंतच्या दिग्गजांचा समावेश आहे. नव्वदच्या दशकात वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपांमुळे विद्यापीठाने हा बहुमान देणे बंद केले. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या सन्मानाच्या आवश्यकतेबाबत 'मटा'ने आढावा घेतला.

'समितीच्या माध्यमातून डी. लिटसाठीच्या मान्यवरांची निवड करणे शक्य आहे. त्यासाठी योग्य नियमावली तयार व्हायला हवी. समाजाला समृद्ध करणाऱ्या, निःस्वार्थ भावनेने आपले कार्य करणाऱ्या आणि पुरस्कारासाठी निवड झाल्यावर नावाविषयी कोणतेही दुमत नसणाऱ्या निर्विवाद व्यक्तिमत्वाला हा सन्मान देणे अधिक रास्त ठरेल,' असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी सांगितले.

डी. लिट. हा सन्मान विद्यापीठाने विचारपूर्वक बंद केल्याची माहिती विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी दिली. 'अत्युच्च वैचारिक उंचीच्या व्यक्तींना डी. लिटने गौरविणे रास्त ठरते. मात्र केवळ पदवी दिल्यामुळे कोणी त्यांच्या नावांविषयी उलट-सुलट चर्चा करत असेल, तर ते योग्य नाही. समाजमान्यता असणाऱ्या व्यक्तींना हा बहुमान निश्चितच द्यायला हवा,' असे त्यांनी सांगितले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, 'विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या सन्मानासाठीचा ठराव केल्यास, हा सन्मान पुन्हा देणे सहजशक्य आहे. सचिन तेंडुलकरला डी. लिट द्यावी अशी मागणीही केली होती. लता मंगेशकरांना डी. लिट. दिल्यानंतर हा सन्मान देणे बंद झाले. इतर सर्व पारंपरिक विद्यापीठांमध्ये ही पदवी दिली जाते. पुण्यातील इतर विद्यापीठांमधूनही त्याचा सोहळा होतो.'
...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेपत्ता’ नगरसेवकांसाठी नागरिकांची शोधमोहीम

$
0
0

वॉर्डात न फिरकलेल्या नगरसेवकांविरोधात बारामतीकरांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, बारामती

'प्रभागातील नगरसेवक निष्क्रीय असल्यामुळे आम्ही 'घड्याळा'ला मत दिल्याने मोठी चूक झाली. आता पश्चात्ताप होत आहे. निवडणुकांनंतर नगरसेवक आमच्याकडे फिरकत नसल्याने आम्ही त्यांना भेटण्यासाठी अनेक वेळा पालिकेत गेलो; मात्र तरीही ते भेटत नसल्याने याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला; मात्र लक्ष्मी-नारायणनगरातील समस्या आजही त्याच आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नसल्याने 'बेपत्ता' नगरसेवकासाठी आम्ही शोधमोहीम सुरू केली असून, आम्ही आपली वाट पाहत आहोत,' अशी विनवणी बोर्डाद्वारे करून बारामतीतील नागरिकांनी करत आंदोलन केले आहे.

बारामतीमधील वाढीव हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमधील विक्रांत तांबे, जय पाटील, सुनीता चव्हाण, अनिता बालगुडे, शैलेश बगाडे या पाच नगरसेवकांना 'बेपत्ता नगरसेवक' असे संबोधण्यात आले आहे. कसबा माळेगाव रोडलगत असणाऱ्या लक्ष्मी-नारायणनगरमध्ये स्थानिक नागरिक सुजय रणदिवे व या प्रभागातील महिलांनी आगळेवेगळे आंदोलन केले. या वेळी वॉर्डातील नगरसेवक बेपत्ता असल्याचे रहिवाशांनी संतप्त भावनेतून सांगितले. चौकात 'बेपत्ता नगरसेवक' असा बोर्ड लावला आहे. त्यावर 'जिथे अजून घरे झाली नाही तिथे रस्ते, ड्रेनेज केले. जिथे लोकवस्ती आहे तिथे रस्ते, पाणी, ड्रेनेजची सुविधा नाही. अशा प्रकारचा असमतोल विकास केल्याबद्दल आभारी आहोत. आम्ही आपली वाट पाहत आहोत,' असे लिहिण्यात आले आहे.

...............

ड्रेनेज लाइनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल; मात्र नागरिकांनी सहकार्य करावे.

- विक्रांत तांबे, नगरसेवक, प्रभाग सात

...............

आंदोलन कशाबद्दल केले आहे, ते माहीत नाही. कोणीही आंदोलने करील अशी कोणतीही समस्या नाही.

- सुनीता चव्हाण, नगरसेवक, प्रभाग सात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाव पडल्याने शेतकऱ्याने केळीबागेत फिरवला रोटर

$
0
0

पुरुषोत्तम मुसळे, भोर

शेती गहाण ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. शिक्षणामध्ये मुलाला प्रवेश मिळाला नाही म्हणून ते पैसे शेतीत गुंतवून कर्जाची फेड करू, पारंपरिक शेतीला फाटा देऊन चार पैसे अधिक मिळतील, या भाबड्या आशेवर अहोरात्र काबाडकष्ट करून त्यांनी केळीची शेती केली. निसर्गानेही साथ दिली. परंतु नशिबाने फसवले. केळीचे भाव गडगडले. गुंतवलेल्या रुपयांपैकी फक्त चार आणेच पदरात पडले. निराश होऊन कर्जाच्या काळजीने बिचाऱ्या शेतकऱ्याने केळीच्या बागेत रोटर फिरवून उभे पीक शेतात गाडून टाकले, कदाचित पुढच्या पिकासाठी त्याचा खत म्हणून तरी उपयोग होईल या आशेने.

ही दुर्दैवी कर्मकहाणी आहे वेल्हे तालुक्यातील पाल बुद्रुक येथील यशवंत पोळेकर या शेतकऱ्याची. पोळेकर हे मुंबईत कुर्ल्यात ३५ वर्षे कुल्फीचा व्यवसाय करत होते. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक गाडा बऱ्यापैकी सुरळीत चालू होता. परंतु डोक्यावरच्या कुल्फीच्या ओझ्याने मणक्याचा त्रास सुरू झाला.आता गावाकडे जाऊन शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे ते गावी परतले. त्याच वेळी त्यांच्या मुलाला कृषी पदवीला प्रवेश घेण्याकरिता डोनेशनसाठी पैशांची अडचण आली. शेतीला आई समजणाऱ्या पोळेकरांचे मन शेती विकायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी शेतजमीन जिल्हा बँकेकडे तारण ठेवून साडेचार लाख रुपयांचे कर्ज काढले. दोन टक्के गुण कमी पडल्यामुळे आणि कर्जाचे पैसे पुरेसे नसल्यामुळे मुलाला कृषी शाखेत प्रवेश मिळाला नाही.

त्यांच्या शेतात भाताचे पारंपरिक पीक घेतले जायचे. कर्जाचे पैसे हातात होते. भाताऐवजी चार पैसे जास्त मिळतील, या हेतूने त्यांनी केळीची शेती करण्याचा विचार केला. घरातील सर्व कुटुंबीय अहोरात्र त्याकरिता शेतात राबू लागले. पाण्याची बचत होण्यासाठी दोन लाख रुपये खर्चून ठिबक सिंचनाची सोय केली. पाण्याचे नियोजन, वेळेवर खते व औषधांची मात्रा यामुळे केळीचा पहिला हंगाम खूप चांगला बहरला. ४० ते ५० किलो वजनाचे केळ्यांचे घड दिसू लागले. आता चांगले पैसै मिळतील आणि हळूहळू कर्ज फिटेल याकडे नजर लावून सर्व जण होते. परंतु बाजारात केळीचे भाव पडल्याची त्यांना खबरच नव्हती. त्यामुळे पहिल्या हंगामात केळी विकून जेमतेम ५० हजार रुपये हातात आले. दुसऱ्या वेळेस ३० हजार आले. चालू हंगामात मात्र फारच वाईट अनुभव आला. केळी भरून टेम्पो

मार्केट यार्डमध्ये पाठवला. तेथील व्यापाऱ्याने केळी नाकारली. ती केळी तशीच आळंदीला पाठवली. दोन दिवस टेम्पो तेथे उभा करून 'फक्त टेम्पोचे भाडे द्या केळी फुकट घ्या' अशी विनवणी करूनही केळी कोणी घेतलीच नाहीत. टेम्पोचे दहा हजार रुपये भाडे मात्र भरावे लागले. दोन वर्षांत साडेतीन ते चार लाख रुपये गुंतवून कसेबसे ८० हजार रुपये पदरात पडले. कुटुंबातील चार माणसे अहोरात्र कष्ट करून शेतीत राबली ते वेगळेच. पाच लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर झाले आहे. ते कसे फेडायचे या विवंचनेने पोळेकर आता खचून गेले आहेत. नको त्या विचारांनी त्यांना ग्रासले आहे. ग्रामीण भागात भांडवलाअभावी बागायत शेती करता येत नाही. भांडवल उभे करून धाडस केले तर बाजारभावाची हमी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे काय होते, ते पोळेकरांच्या प्रयोगातून पाहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

'आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करून, सर्वांना सोबत घेऊन त्यांच्यामधील सुप्त गुण जाणून घेऊन, स्किल डेव्हलपमेंटसह इतर सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्राने आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे आदिवासी युवक मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल,' असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आठव्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात व्यक्त केले.

केंद्र सरकारचा युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र संघटन, पुणे जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यातर्फे तळेगाव सीआरपीएफ कॅम्पसमध्ये आठवा राष्ट्रीय आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे सचिव राजीव गुप्ता होते. या वेळी 'सीआरपीएफ'चे डीआयजी आर. टी. परमहंस, नेहरू युवा केंद्राचे विभागीय संचालक उपेंद्र ठाकूर, उपसंचालक ए. आर. पांडे, जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, 'एनएसएस'चे शिंदे, डॉ. मिलिंद भोई,

डॉ. शंतनू जगदाळे, प्रवीण निकम, दिगंबर माने उपस्थित होते. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात झारखंड व ओडिशा राज्यातील २५० युवकांनी सहभाग घेतला आहे.

राजीव गुप्ता म्हणाले, 'आदिवासी युवकांना शहराची माहिती व्हावी. तसेच सरकारने सुरू केलेल्या 'स्किल डेव्हलपमेंट'सह विकासाच्या विविध योजना व संस्कृतीचा आनंद लुटता यावा, यासाठी या सात दिवसांच्या राष्ट्रीय आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आदिवासी युवकांनी स्वतःचा विकास करून विकसित राष्ट्र निर्माण करण्यात योगदान द्यावे.'

'या सात दिवसांच्या कार्यक्रमात आदिवासी युवकांना जीवन कौशल्य, संस्कृतीचे आदान-प्रदान, योग, ध्यानधारणा, औद्योगिक क्षेत्र, तसेच हिंजवडी आयटी सेक्टरला भेट, स्वच्छ भारत व प्लास्टिकमुक्त अभियान रॅली, तसेच पर्यटनस्थळी भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे,' असे विभागीय संचालक उपेंद्र ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक पुणे व मुंबई जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी केले. आभारप्रदर्शन पांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...नाही तर बेमुदत लेखणी बंद

$
0
0

कृषी सहायकांचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, बारामती

राज्यातील कृषी सहायकांच्या प्रलंबित मागण्या गेल्या नऊ वर्षांपासून पूर्ण होत नसल्याने कृषी सहायकांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदवत कामकाज सुरू ठेवले आहे; मात्र राज्य सरकारने या संदर्भात लवकर दखल न घेतल्यास जलयुक्त शिवार योजनेवरही बहिष्कार घालून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे यांनी दिला आहे.

कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करून कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षकपदी सेवाज्येष्ठतेने १०० टक्के पदोन्नती व कृषी सहायक पदोन्नती मिळण्यासाठी गेली नऊ वर्षे संघटनेच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. महसूल विभागात ज्याप्रमाणे पदोन्नती मिळते त्याप्रमाणे येथे मिळत नाही. कृषी विभागात ७५ टक्के जण कृषी सहायक म्हणून सेवेत येतात व कृषी सहायक म्हणूनच सेवानिवृत्त होत आहेत.

कृषी सहायकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर पहिली व २४ वर्षांनंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करण्याचे आदेश 'मॅट'ने दिल्याने त्याचा लाभ सर्वच कृषी सहायकांना देण्यात यावा; १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती ग्राह्य धरावी; कृषी सहायक संवर्गाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करावेत; राज्यात सर्वंकष धोरण व कालमर्यादा निश्चित करून रिक्त कृषी पर्यवेक्षकांची पदे भरण्यात यावी; कृषी विभागाचे ई-टेंडर रद्द करावे; कृषी सहायक संवर्गास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी नऊ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे; मात्र १५ फेब्रुवारीपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला याचा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यामध्ये अडचण येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात टंचाई निवारणाची कामे ठप्प होणार असल्याने राज्य सरकार या बाबतीत कोणती भूमिका घेत आहे, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

...................


राज्य सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही जलयुक्त शिवार योजनेवरही बहिष्कार घालून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू करणार आहोत.

- संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्या सुरू न केल्यास जनावरांसह मोर्चा

$
0
0

खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, दौंड

'सरकारने चारा छावण्या तातडीने सुरू न केल्यास पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर जनावरांसह मोर्चा काढण्यात येईल,' असा इशारा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच दौंड तालुक्यातील रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा या दुष्काळी गावांचा दौरा केला. या वेळी सर्वच गावांत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'पुणे जिल्हा पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरा जात असून, शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये दुष्काळी परिस्थितीत तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न सोडवला होता. सध्याचे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चारा छावण्या सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात असून, याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर जनावरांचा मोर्चा काढला जाणार आहे.'

सुप्रिया सुळे यांनी या दौऱ्यात रावणगाव येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण कामांचा शुभारंभदेखील केला. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, शोभा आटोळे, आशाताई डेंबळकर, नितीन दोरगे, राणी शेळके, गटविकास अधिकारी संतोष हराळे, नायब तहसीलदार एस. चौगुले, तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड आदींसह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठांना साद

$
0
0

पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन साजरा


म. टा. प्रतिनिधी, पुणे

'चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्यासाठी देशभरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमांसोबत मानवी मूल्ये आणि नीतिमत्तेचे शिक्षण देण्याची जबाबदारीही पेलायला हवी,' अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बुधवारी पुण्यात व्यक्त केली. तसेच लोकशाही जीवनमूल्यांचे संवर्धन करणाऱ्या शिक्षणाचे राजकारण होऊ नये, यासाठीही विद्यापीठांनी आपली ध्येयधोरणे निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६७वा वर्धापनदिन समारंभ बुधवारी विद्यापीठाच्या आवारात पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पाटील बोलत होत्या. याच समारंभामध्ये विद्यापीठातर्फे सिनेदिग्दर्शक अमोल पालेकर, 'बेटी बचाव अभियाना'च्या संस्थापिका डॉ. सुधा कांकरिया, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे, नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या नीलिमा पवार आणि भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथ्था यांना जीवनसाधना गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक डॉ. मीरा बोरवणकर यांनाही जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मानपत्राचेही या वेळी वाचन करण्यात आले. डॉ. बोरवणकर यांना हा पुरस्कार नंतर दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

पाटील म्हणाल्या, 'विद्यापीठांनी मनुष्यबळाची निर्मिती करताना कुशल आणि सक्षम पिढी घडवणे गरजेचे आहे. त्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून काम व्हायला हवे. शिक्षणामधून सुशिक्षण व्हायला हवे, त्यातून चारित्र्य संवर्धन होणे गरजेचे आहे. सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांची वजाबाकी करणारे शिक्षण विद्यापीठांमधून दिले जायला हवे.' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करतानाच, नामविस्तारानंतरच्या टप्प्यात विद्यापीठामध्ये गुणात्मक बदल दिसायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिलांना समाजामध्ये योग्य सन्मान मिळण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून अगदी प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यापासूनच प्रयत्न करत समाजाची मानसिकता बदलणे शक्य असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पालेकर, डॉ. कांकरिया, पानतावणे, डॉ. काळे, पवार आणि मुथ्था यांनी या वेळी पुरस्काराविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे पाटील आणि डॉ. गाडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी आभार मानले.

..........

...म्हणून पुरस्काराविषयी कृतज्ञता!

पुरस्काराला उत्तर देताना दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पालेकर म्हणाले, 'आजकाल पुरस्कार, जीवनगौरव वगैरे खूप उदंड झाले आहेत. आजच्या काळात त्याचे साजेसे इव्हेंट्स होतात. या कार्यक्रमात विद्यापीठाने स्वतःची प्रतिष्ठा कायम राखल्याच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराचे महत्त्व खूप मोठे आहे. आज कोणी महाराज-बाबा इथे अंगठी काढताना दिसत नाही. हे लक्षात घेऊन विद्यापीठाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो.' पालेकरांच्या या वक्तव्याने पुण्यात सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात एका बाबाने दाखवलेल्या चमत्काराविषयीच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटले.

...............

सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीला पुरस्कार

नीलिमा पवार यांनी या वेळी विद्यापीठाच्या 'कमवा-शिका' योजनेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीला 'नीलवसंत फाउंडेशन'च्या माध्यमातून सुवर्णपदकाचा विशेष पुरस्कार जाहीर केला. त्यासाठीचा धनादेशही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याच कार्यक्रमात विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळीच सुधारा, नाही तर कारवाई करावी लागेल

$
0
0

गिरीश बापट यांचा आपल्याच खात्याच्या अधिकाऱ्यांना दम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरवठा खात्यामध्ये अनेक डॉन आणि समाजकंटकांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या मंडळींचे अनेक अधिकाऱ्यांशी हितसंबंध असून, अशी दहा प्रकरणे पुराव्यासह आपल्याकडे आहेत. धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना कडक शासन करण्यासाठी सरकारने 'महाराष्ट्र समाजविघातक कारवाया प्रतिबंधक कायदा' (एमपीडीए) आणला आहे. त्यामुळे वेळीच सुधारा, अन्यथा आपल्या खात्यावरच या कायद्यान्वये कारवाई करावी लागेल,' असा सज्जड दम राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिला.

अन्न व नागरी पुरवठा खात्याची दुसरी राज्यस्तरीय आढावा बैठक पुण्यात झाली. त्या वेळी बापट यांनी पुरवठा खात्यातील अधिकारी व धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे लागेबांधे चव्हाट्यावर आणताना त्यांच्यातील संबंधांचे व्हिडिओ चित्रणही आपल्याकडे असल्याचे सांगून, खळबळ उडवून दिली. या बैठकीला नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रधान सचिव दीपक कपूर यांच्यासह राज्यातील पुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

'पुरवठा खात्याबद्दल बोलण्यासारखी फारशी चांगली स्थिती नाही. खात्यात अनेक गैरप्रकार सुरू आहेत. हे प्रकार मला कळत नाहीत, असे कोणीही समजू नये. अधिकाऱ्यांच्या नावासह व्हिडिओ चित्रणदेखील माझ्याकडे आहे. या बैठकीत बोलण्याची ही वेळ नाही. परंतु वेळ आल्यावर मी बोलणार आहोत. आपण पगार घेतो, कायद्याने आपल्यावर जबाबदारी आहे, तेवढे तरी काम करा. किमान काही चांगले काम करता येत नाही, तर वाईट काम तरी करू नका,' असे बापट यांनी यावेळी खडसावले.

'पोलिस आणि वाहतूकदारांसह समाजकंटकांच्या टोळ्या आणि डॉन लोकांशी अधिकाऱ्यांचे कसे संबंध आहेत, हे मला माहिती आहे. काही लोक मला भेटून लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी विचारणा करतात. त्यांना नाही म्हटले, तर माझेच काही लागेबांधे आहेत का, असा संशय निर्माण होतो आणि परवानगी द्यावी तर खात्याची बदनामी होते. हे कुठे तरी थांबले पाहिजे,' असेही पुरवठामंत्र्यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर पुर‍वठा खातेच बंद करावे लागेल

$
0
0

बैठकीत सचिवांचा संताप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील गोदामांत ठेवण्यात येणाऱ्या धान्याची तपासणी वर्षातून दोनदासुद्धा होत नसल्याची धक्कादायक माहिती पुरवठा खात्याच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत समोर आली आहे. अतिरिक्त पदभार असल्याने ही तपासणी होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे संतापलेले प्रधान सचिव दीपक कपूर यांनी 'अशा कारभारामुळे हे खातेच बंद करावे लागेल,' असा उद्वेग व्यक्त केला.

धान्याची साठवणूक करण्यात येणाऱ्या गोदामांची वर्षभरात किमान दोनदा तपासणी झाली पाहिजे, असा नियम आहे. या आढावा बैठकीमध्ये धान्य गोदामांच्या तपासणीचा मुद्दा चर्चेला आला. तेव्हा राज्यातील फक्त सहा जिल्ह्यांमध्येच गोदामांची शंभर टक्के तपासणी झाल्याची माहिती देण्यात आली. ही तपासणी न होण्यामागची कारणे प्रधान सचिव कपूर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना विचारली. त्या वेळी अतिरिक्त पदभार असल्यामुळे हे काम करणे शक्य झाले नाही, असे स्पष्टीकरण काही अधिकाऱ्यांनी दिले. या उत्तराने प्रधान सचिव प्रचंड संतापले.

'अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली असे होत असेल, तर खात्याचे कामच होणार नाही. हे बेजबाबदार उत्तर आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनीच गोदामांची तपासणी करायची असते असे नाही. ही तपासणी तहसीलदारांकडूनही करून घेता येते. गोदाम तपासणीसाठी वर्षातून दोन दिवससुद्धा देता येत नसतील, तर हे योग्य नाही,' असे कपूर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

'आपल्या खात्याच्या मंत्रिमहोदयांकडे तीन ते चार खाती आहेत. आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे असे कारण सांगून कसे चालेल? खात्यामध्ये चाळीस टक्के कर्मचारी कमी आहेत, हे मान्य आहे. आदर्श परिस्थितीतच काम होऊ शकते. तसे नसेल तर खाते बंद करावे लागेल,' असेही ते उद्वेगाने म्हणाले. दरम्यान, 'धान्य गोदामांची तपासणी वेळेत झाली पाहिजे. त्याशिवाय धान्य गळतीवर नियंत्रण ठेवता येणार नाही,' पुरवठामंत्री बापट यांनी या वेळी सांगितले.

..

'अडचणी मला सांगा'

धान्य गोदामांची तपासणी, अन्नपूर्णा योजना, रॉकेल वितरण, तसेच साखर वाटपाची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याचेही या आढावा बैठकीत निदर्शनास आले. तेव्हा, पुरवठामंत्री बापट यांनी, 'तुमच्या काही अडचणी असतील, तर त्या मला सांगा. त्यासाठी पत्र पाठवा, एसएमएस पाठवा. त्यांची दाखल घेण्यात येईल. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांचा कामकाजाचा अहवाल तयार करून तो सादर करावा,' असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुत्वीय लहरींबाबत उत्सुकता

$
0
0

गुरुत्वीय लहरींबाबत उत्सुकता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्वाच्या रहस्यामधील अनेक गुपिते उलगडू शकणाऱ्या गुरुत्वीय लहरींबाबत खगोलशास्त्रज्ञ उद्या, गुरुवारी मोठे स्पष्टीकरण करणार आहेत. अमेरिकेतील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरीच्या (लिगो) अंतर्गत संशोधन करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली असून, गुरुवारी वॉशिंग्टन डीसी, लंडन, पॅरिस आणि पुणे येथून एकाच वेळी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी घोषणा करण्यात येणार आहे.
लिगोच्या वतीने पत्रकारांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रणांमधून नव्या शोधाविषयीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आल्यामुळे खगोलप्रेमींकडून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिग्ज बोसॉनच्या शोधापेक्षाही मोठा शोध उद्या जाहीर होण्याची शक्यता असून, गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतासाठीही ही घटना महत्त्वाची असून, गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गटामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच भारतीय शास्त्रज्ञांच्या वतीने पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅंड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथून या शोधाबाबत माहिती दिली जाणार आहे. देशभरातील खगोलशास्त्रज्ञांसोबत विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे पदाधिकारीही त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आइनस्टाइनने गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाबाबत वर्तवलेल्या भाकीताला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असून, गेल्या शतकात गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागलेला नाही. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाल्यास थेट विश्वनिर्मितीच्या क्षणाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे. विद्युत- चुंबकीय लहरींद्वारे विश्वाच्या अभ्यासापेक्षा गुरुत्वीय लहरींचा अभ्यास पूर्णपणे वेगळा असून, गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाल्यास खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला सुरुवात होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.....................
गुरुत्वीय लहरी म्हणजे काय?
अवकाशातील मोठ्या वस्तुमानाच्या घटकांमध्ये वेगाने होणाऱ्या प्रक्रियेतून अवकाश आणि काळाच्या पटलावर तरंग उमटतात. (पाण्यात दगड टाकल्यावर निर्माण होणाऱ्या तरंगांप्रमाणे) या तरंगांना गुरुत्वीय लहरी म्हणतात. दोन न्यूट्रॉन तारे किंवा कृष्णविवरांच्या एकमेकांभोवती फिरण्यातून, ताऱ्याच्या स्फोटातून, दोन आकाशगंगांच्या मिलनातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व वेधशाळेत मोजता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. गुरुत्वीय लहरींमुळे अवकाश आणि काळामध्ये होणारा अतिशय सूक्ष्म म्हणजे एका प्रोटॉनच्या हजाराव्या भागाएवढा बदलही लिगोमध्ये नोंदला जाऊ शकतो.
.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील गटनेत्यांचा राजीनामा घेतल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील, असे टीकास्त्र मावळते उपमहापौर आबा बागूल सोडले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केलेल्या या मागणीमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

राष्ट्रवादीने महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा राजीनामा घेतल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनीही उपमहापौर बागूल राजीनामा देतील असे जाहीर केले होते. मात्र बागूल यांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतरच राजीनामा देणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यानुसार बागूल यांनी मुंबईत चव्हाण यांची भेट घेऊन शहराध्यक्ष, पालिकेतील गटनेत्यांच्याही राजीनाम्यांची मागणी केली. यंदा स्थायी समितीचे अध्यक्षपद, प्रभाग अध्यक्षांपैकी किमान १० अध्यक्षपदे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष अशी महत्वाची पदे काँग्रेसकडे घेण्याची हमी राष्ट्रवादीकडून घ्यावी. तसेच निवडणुकीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी.

विशेष म्हणजे बैठकीत केलेल्या या मागणीची माहिती बागूल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केवळ तुमच्या राजीनाम्या विषयीच चर्चा करा, एवढेच बागूल यांना सांगितले असल्याचे शहराध्यक्ष छाजेड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनाच हवी हेल्मेटमुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील हेल्मेटसक्तीच्या वातावरणात पोलिसांवरही जोरदार कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्तालयाच्या आवारात पोलिसांवरील कारवाईचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना पोलिस अधिकारी असलेल्या दाम्पत्याने थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात येत असतानाच दाम्पत्याने तेथून धूम ठोकली.

शहरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच, पोलिसांनाही हेल्मेटसक्तीतून सवलत का असा सवाल करण्यात येत आहे. हेल्मेटसक्तीविरोधात पुण्यात आंदोलने, बैठका आणि चर्चा झडल्यानंतर कारवाई जराशी थंडावली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मात्र पोलिसांवरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे. त्याचेच पडसाद बुधवारी पोलिस आयुक्तालयाच्या आवारात उमटले.

पोलिस अधिकारी असलेले दाम्पत्य बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयातून हेल्मेट न घालता बाहेर पडले. या वेळी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई सुरू होती. साहजकिच त्यांनाही पकडण्यात आले. तसेच, इतर पोलिसांवरही कारवाई सुरू होती. या घटनेचे फोटो काढण्यासाठी तेथे उपस्थित असलेले वृत्तपत्रांचे प्रतिनिधी सरसावले. आपले फोटो काढले जात आहेत, या भावनेने ते दाम्पत्य आ​णि आणखी एक महाशय भडकले. हेल्मेटच्या कारवाईचा राग पत्रकारांवर काढत महिला अधिकाऱ्याने थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. परकीय नोंदणी विभागातील एका व्यक्तीने त्याची 'री' ओढली. पत्रकार या घटनेची माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांना देण्यासाठी निघाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला.

पत्रकारांकडेच हेल्मेटची मागणी

पोलिस आयुक्त कार्यालयातून बाहेर पडताना महिला अधिकाऱ्याच्या पतीने पत्रकारांकडेच तात्पुरते हेल्मेट द्या, अशी मागणी केली होती. परंतु, पत्रकारही बाहेर पडत असल्याने त्यांनी हेल्मेट दिले नाही. त्याच वेळी कारवाईचा फोटो काढल्याने पत्रकारांशी या दाम्पत्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेट’ची पुनर्परीक्षा एप्रिलमध्ये घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) फुटलेला पेपर क्रमांक १ ची परीक्षा येत्या एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीच्या पेपर क्रमांक २ ची तात्पुरती उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली असून, त्या विषयी आक्षेप असल्यास १७ फेब्रुवारीपर्यंत परिषदेकडे पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्यभरातील शिक्षक होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी परिषदेने १६ जानेवारीला राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा घेतली होती. या परीक्षेतील पहिला पेपर फुटल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार यांच्या समितीमार्फत या प्रकाराची चौकशी करण्यात आली होती. तक्रारीत तथ्थ्य आढळून आल्याने, परीक्षेचा पहिला पेपर रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार रद्द झालेला हा पेपर एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असल्याचे परिषदेतर्फे बुधवारी सांगण्यात आले. एप्रिलमध्ये होणाऱ्या या पेपरसाठीची तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

तसेच, परिषदेने याच परीक्षेतील दुसऱ्या पेपरसाठीची तात्पुरती उत्तरसूची या http://mahatet.in/Advertisement/PaperII_Uttarsuchi.pdf लिंकवर जाहीर केली आहे. पेपर २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाविषयी किंवा पर्यायी उत्तराबाबत काही आक्षेप वा त्रुटी असल्यास, त्या परिषदेकडे येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन परिषदेने केले आहे. या मुदतीत मिळालेल्या लेखी निवेदनांचा विचार करून परिषद या पेपरची अंतिम उत्तरसूची जाहीर करणार असल्याचेही बुधवारी परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षिका आत्महत्या; गूढ अद्याप कायमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

काळेवाडीत शिक्षिकेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, दुसऱ्या दिवशी देखील शिक्षिकेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. भारती मुकेश घोलप (वय ३७, रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर) असे आत्महत्याग्रस्त शिक्षिकेचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक एन. जे. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलप यांनी मंगळवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहत्या घरात गळफास घेऊन श्रीमती घोलप यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. घोलप पुण्यातील हुजुरपागा शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गावर विज्ञान आणि गणित हे विषय शिकवित होत्या. शाळेमध्ये त्या उत्तम शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. गेले दोन महिने त्या रजेवर होत्या. त्यानंतर नुकत्याच शाळेमध्ये पुन्हा रुजू झाल्या होत्या. मंगळवारी त्या गैरहजर होत्या. बुधवारी त्यांच्याविषयी चौकशी केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे समोर आल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात सोनेचांदी खरेदी सुरळीतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनेखरेदी करताना दोन लाख रुपयांच्या आणि त्यापुढील खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक केल्याच्या निषेधार्थ देशातील सराफ व्यावसायिकांनी बुधवारी संप पाळला. मात्र, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा या संपात सहभाग नसल्याने पुण्यातील बहुतांश सराफी पेढ्या सुरू होत्या.

'ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन'ने या बंदचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून राज्य सराफ सुवर्णकार महामंडळानेही बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने मात्र, यात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे या संघटनेशी संल्गन असलेल्या पुण्यातील बहुतांश सराफ व्यावसायिकांनी आपली दालने सुरू ठेवली होती. 'पॅनकार्डच्या सक्तीबाबत आम्ही आमची भूमिका इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनमार्फत सरकारपर्यंत पोहोचवली आहे. सरकारनेही त्यावर पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार याबाबत निर्णय घेईपर्यंत आम्ही संपात सहभागी व्हायचे नाही', असा निर्णय घेतला होता, असे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षनेत्यांचे अधिकार ४ वर्षांनी आठवले का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या पक्षनेत्यांचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना चार वर्षानंतर आठवली का, असा सवाल करून राष्ट्रवादीचा अजेंडा राबविण्यासाठी पुणेकरांच्या निधीची उधळपट्टी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेससह भाजप, शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांनी बुधवारी घेतली.

महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यूथ फेस्टिव्हलसाठी १ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट सत्ताधारी राष्ट्रवादीने घातला होता. काँग्रेससह इतर सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी या खर्चाला कडाडून विरोध केला. १ कोटींऐवजी १५ लाखांमध्ये फेस्टिव्हलचे आयोजन करावे, असा प्रस्ताव मान्य करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून हा फेस्टिव्हल होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. आम्ही पालिकेत सत्ताधारी असताना असा निर्णय घेणारे गटनेते कोण, असा प्रश्न उपस्थित करून काकडे यांनी पक्षनेत्यांच्या समितीला काहीही अधिकार नसल्याची टीका केली होती. या वक्तव्याचा सर्वच गटनेत्यांनी समाचार घेतला.

काकडे यांना चार वर्षांनंतर गटनेत्यांचे अधिकार आठवले का, या पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत अनेक निर्णय झाले, त्यावेळी काकडे यांनी आक्षेप का नाही घेतला असा प्रश्न विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या उधळपट्टीवर बोट ठेवले म्हणून काकडे यांना वाईट वाटले का, अशी विचारणा त्यांनी केली. राष्ट्रवादीने त्यांचा अजेंडा स्वत:च्या पैशातून राबवावा, पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी लगावला. पालिकेच्या पैशांच्या उधळपट्टीला मनसेही विरोध करेल, अशी भूमिका गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images