Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘अंजुमन ए इस्लामचे कार्य कौतुकास्पद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,येरवडा

'अंजुमन-ए-इस्लामने गेल्या नव्वद वर्षांत व्यक्तीला मोठे करण्यापेक्षा संस्थेला मोठे करण्याचे काम केले आहे. संस्थेने अनाथ मुलींना शिक्षणासोबतच जीवनातील हक्क, स्वातंत्र आणि स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मोलाची मदत केली आहे,' या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी संस्थेचे कौतुक केले.

शहरातील 'अंजुमन ए इस्लाम' संस्थेच्या 'पीर मोहम्मद अनाथालया'ने यंदा नव्वदीत पदार्पण केले. त्या निमित्त अनाथालयातील मुलींसाठीच्या नवीन कम्प्युटर विभागाचे आणि मीना बाजारचे उदघाटन श्रीमती सुळे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, पुणे कॅम्पसच्या अध्यक्षा नाझुरा सत्तार, व्यवस्थापकीय सदस्य हसीब फकीह, मुनीर चिनॉय, शाह सुलतान चिनॉय आदी उपस्थित होते. सुळे यांच्या हस्ते शाळा ,अनाथालयाच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. 'देशात मुलींची संख्या झपाट्याने घटू लागल्यानंतर सरकारला सक्तीने स्रीभ्रूण हत्या कायदा करावा लागला. त्याचप्रमाणे महिला सशक्तीकरणाच्या योजना राबविण्यात आल्या. मात्र, हाच विचार स्वातंत्र्यपूर्व कालखंडात करण्याचे धाडस अंजुमन ए इस्लामने दाखवले. संस्थेने अनाथ मुली आणि स्रियांचा विचार करून अनाथालयाची केलेली स्थापना उल्लेखनीय आहे,' असे सुळे यांनी स्पष्ट केले. वली मोहम्मद आणि दोस्त मोहम्मद या दोन भावांनी एकत्र येऊन अनाथाश्रमची उभारणी केली. अनाथालय उभारणीसाठी वली मोहम्मद यांनी रकमेची, तर दोस्त मोहम्मद यांनी जमिनीची मदत केली.

गरीब अनाथ मुलींना शिक्षण देण्यासोबतच त्यांचे राहणीमान, हक्क मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना पायावर उभे राहता यावे, या हेतूने त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांमुळे मराठी माध्यमातील शाळांतील मुलांची संख्या घटू लागली आहे. मात्र, या उलट ऊर्दू शिकणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

..

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेला पंचवीस लाखांचा निधी देणारे शरद पवार हे एकमेव राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पीर मोहम्मद अनाथाश्रमाची १९२५मध्ये स्थापना झाली. २३ मुलींवरून सुरुवात होऊन आज ही संख्या १७०वर गेली आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, कादर खान, तब्बसुम हे अंजुमनचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. भविष्यात मुलींना उच्च शिक्षण देण्याचा मानस आहे.

- डॉ. झहीर काझी, अध्यक्ष, अंजुमन-ए-इस्लाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेज प्रशासनाने हलगर्जीपणा केला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मुरुड दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव पुण्याला आणताना कॉलेज प्रशासनाकडून हालगर्जीपणा झाला. आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती कॉलेजने आम्हाला दिली नाही आणि आमच्या मुलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेला आम्हालाच बोलावले नाही,' असे आरोप करून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आझम कॅम्पसमध्ये बुधवारी संताप व्यक्त केला.

'दुर्घटनेची माहिती समजल्यावर आम्ही पुण्यातून मुरुडला गेलो. मुलांना एकदा शेवटचा स्पर्श करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाला हात लावल्यावर त्यांच्या नाका-तोंडातून रक्त, पाणी बाहेर येत होते. याचा अर्थ त्यांच्यावर प्रथमोपचार असे काहीच झाले नसावेत,' अशी शंका पालकांनी व्यक्त केली; तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था कॉलेज प्रशासनाने केल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यासाठी अगदी पेट्रोलपासून गाडी धुण्यापर्यंतचे पैसे आमच्याकडूनच वसूल केल्याचे पालकांनी सांगितले. 'आमच्या मुलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित केली होती, तर आम्हा पालकांना त्याची माहिती का दिली नाही,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी पालकांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, पालकांचे आक्रमक रूप पाहून त्यांना नंतर बाहेर काढण्यात आले.

कुटुंबातील इतर मुलांचे शिक्षण करू : इनामदार

'पोस्टमार्टेमसाठी विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठविले, त्या ठिकाणी कॉलेजची जबाबदार व्यक्ती उपस्थित होती; तसेच रुग्णवाहिकेचे पैसेही पालकांना दिले जातील,' असे पी. ए. इनामदार यांनी स्पष्ट केले. 'मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना संस्थेकडून शिक्षणासाठी मदत केली जाईल. नोकरीच्या पात्रतेत बसणाऱ्या तरुणांना वेळप्रसंगी नोकरीही दिली जाईल,' असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबीयांना मिळणार विम्याचे एक लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुरुड दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आबेदा इनामदार कॉलेजच्या चौदा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विम्यापोटी प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित विमा कंपनीला तसे निर्देशही देण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे अपघात विम्याची सुविधा पुरविली जाते. कॉलेजमधील प्रवेशप्रक्रियेमधूनच त्यासाठी नोंदणी केली जाते. कॉलेजमार्फत प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा रुपयांचा निधी विद्यापीठाकडे वर्ग केला जातो. त्यातून विद्यार्थ्यांना विम्याचे संरक्षण दिले जाते. याच योजनेच्या माध्यमातून आबेदा इनामदार कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही विम्यापोटी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

'विद्यापीठाने याविषयी कॉलेजकडे चौकशी केली असून, कॉलेजने या विद्यार्थ्यांसाठीचा निधी विद्यापीठाकडे वर्ग केला होता. कॉलेजने ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ देणे शक्य होणार आहे. मुरुड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ही मदत तातडीने मिळावी, यासाठी विद्यापीठाने संबंधित विमा कंपनीशीही संपर्क साधला असून, कंपनीला तशी विनंतीही करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना लवकरच ही मदत उपलब्ध होणार आहे,' असे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजयकुमार दळवी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... आणि आझम कॅम्पस गहिवरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तीन दिवसांनंतरही आझम कॅम्पसमध्ये कायम असलेली शांतता... विद्यार्थी, शिक्षकांसह सर्वांचे सुन्न चेहरे... आणि पालक, नातेवाइकांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुधारा... अशा भावुक वातावरणात मुरुड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुरुड येथे सोमवारी समुद्रात बुडून आबेदा इनामदार कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी या सर्वांवर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारपासून आझम कॅम्पसमधील सर्व विद्याशाखांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झाले. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता कॅम्पसमध्ये मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मधुकर निरफराके, डॉ. एन. वाय. काझी, डॉ. आबेदा इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, मुनव्वर पीरभॉय, नुरुद्दीन सोमजी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेसाठी बुधवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. मात्र, त्यानंतरही वातावरणात खिन्नता होती. काही मृत विद्यार्थ्यांचे पालक आणि या दुर्घटनेतून बचावलेले विद्यार्थी सभेला उपस्थित होते. सभेमध्ये या घटनेविषयी बोलण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वांना अश्रू अनावर झाले. काही पालक हंबरडा फोडून रडायला लागले.

'विद्यापीठातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कॉलेजस्तरावर उपाययोजना करण्यात येतील. विद्यापीठाने कॉलेजकडून या घटनेचाही अहवाल मागवला आहे,' असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

चौकट १

'घटनेची चौकशी होणार'

'या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन ते पाच जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीमध्ये आपल्यासह विधी, शिक्षण विभागाचे तज्ज्ञ आणि विद्यापीठातील एका सदस्याचा समावेश असेल. येत्या महिन्यात समितीकडून अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे पी. ए. इनामदार यांनी स्पष्ट केले. 'मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटनास्थळी कॉलेजतर्फे जनजागृतीपर फलक व विद्यार्थ्यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत,' असेही त्यांनी सांगितले.

चौकट २

'शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार'

या दुर्घटनेदरम्यान दोन मुलींचे प्राण वाचवणारा आणि तिसऱ्या मुलीला बाहेर काढण्यासाठी जाताना स्वतःचा जीव गमावणारा इफ्तेकार शेख या विद्यार्थ्याची मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे पी. ए. इनामदार यांनी सांगितले. या विद्यार्थ्याचा कॉलेजच्या आवारात उभारण्याची मागणी इफ्तिकारचे मामा इजहार शेख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसाला दारूड्याचा चावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दारूच्या नशेत वाहन चालविल्याबद्दल कारवाई केल्याने वाहतूक पोलिस आणि वॉर्डनला चावा घेतल्याची घटना बुधवारी (३ फेब्रुवारी) रात्री पिंपरी येथे घडली. या घटनेत वाहतूक कर्मचारी श्याम साळुंखे आणि वॉर्डन स्वप्नील ओव्हाळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी रश्मिन गणपत गोडबोले (रा. खराळवाडी) याच्यासह साथीदाराविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी वाहतूक विभागाच्यावतीने बुधवारी ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी रश्मिन आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबविले असता दोघांनीही भरपूर दारू पिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून गाडी पिंपरीच्या वाहतूक विभाग कार्यालय येथे जमा केली.

रात्री रश्मिन पुन्हा आपल्या साथीदारासह वाहतूक विभाग कार्यालयात आला. तेथे उपस्थित असलेले वाहतूक कर्मचारी साळुंखे आणि ओव्हाळ यांच्याशी त्याने हुज्जत घातली. त्यावेळी साळुंखे आणि ओव्हाळ यांनी पकडले असता त्याने साळुंखेंच्या दंडाला तर, ओव्हाळ यांच्या करंगळीचा चावा घेतला. यात ओव्हाळ यांच्या करंगळीचे हाड दुखापतग्रस्त झाले आहे. घटनेनंतर रश्मिन आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. त्या दोघांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक कार्यक्रमात गुन्हेगाराचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

धार्मिक कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने गोंधळ घातला. मात्र, पोलिस येत असल्याचे पाहून तो पसारही झाला. दुसऱ्या दिवशी कारवाई ठोस झाली नसल्याची तक्रार करीत नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर तणाव निवळला. मोरवाडी, लालटोपीनगर येथे ही घटना घडली.

विनय कुर्मी (३२, रा. मोरवाडी) असे प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्मी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर या पूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लाटोपीनगर येथे दोन दिवसापासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. बुधवारी (३ फेब्रुवारी) रात्री साडेबाराच्या सुमारास कुर्मी कार्यक्रमस्थळी आला. तुम्ही बाहेरच्यांचा सत्कार करता, स्थानिकांचा सत्कार करत नाहीत, असे म्हणत त्याने आयोजकांना दमदाटी आणि शिविगाळ केली. पोलिस येत असल्याचे समजून कुर्मी पसार झाला.

गुरुवारी सकाळी पुन्हा कुर्मी कार्यक्रमस्थळी आला आणि त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. नागरिकांनी कुर्मीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानतंर संतप्त नागरिक पोलिस चौकीत दाखल झाले. कुर्मी सराईत गुन्हेगार असल्याने पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप करून नागरिकांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गर्दी केली. सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते यांनी नागरिकांचे म्हणने ऐकून घेतले आणि सराईतावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तणाव निवळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन वेळेत पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दुर्धर आजारांवर प्रभावी उपचार पद्धती विकसित होत असली तरी, हे उपचार गरीब, सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात नाहीत. एखादा नवा शोध आपल्याला व्याधींमधून मुक्त करू शकेल अशा आशेवर जगणाऱ्या रुग्णांच्या वेदना शास्त्रज्ञांनी समजून घ्यायला हव्यात. देशासमोर असणाऱ्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी नियोजित वेळेत संशोधन पूर्ण करणे आवश्यक आहे,' अशा शब्दांत केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संशोधन संस्थांकडून सरकारच्या असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

पुणे दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डॉ. हर्ष वर्धन यांनी आघारकर संशोधन संस्था (एआरआय), मायक्रोबिअल कल्चर कलेक्शन (एमसीसी) आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसच्या (एनसीसीएस) प्रयोगशाळांना भेट दिली. यावेळी शास्त्रज्ञांशी संवाद साधताना समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखून कामाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, की 'विविध आजारांप्रमाणेच, कुपोषण, स्वच्छता, पिण्याचे पाणी आदी मूलभूत प्रश्न एकविसाव्या शतकातही आपल्याला भेडसावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारतीय शास्त्रज्ञांकडे या सर्वांवर उपाय शोधण्याची क्षमता आहे. मात्र, उद्दिष्टनिश्चिती आणि वेळेचे नियोजन न केल्यामुळे आपल्या गुणवत्तेचा हवा तसा फायदा झालेला नाही. संशोधनासाठी शास्त्रज्ञांना मुक्त वातावरण जसे आवश्यक आहे, तसेच शास्त्रज्ञांनी ठरावीक काळात आपले उद्दिष्ट्य गाठण्याची जबाबदारी ओळखणेही गरजेचे आहे.'

एनसीसीएसचे संचालक डॉ. शेखर मांडे, एआरआयचे प्रभारी संचालक डॉ. किशोर पाकणीकर आणि एमसीसीचे प्रमुख डॉ. योगेश शौचे यांनी डॉ. हर्ष वर्धन यांना आपल्या संस्थांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी तरुण संशोधकांशीही संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी पासष्ट हजार दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती करण्याच्या परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतर पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही वाहतूक पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. शहरातील विविध चौकांमध्ये गुरुवारी ( ४ जानेवारी) हेल्मेट नसलेल्यांवर पोलिस कारवाई करत असल्याचे चित्र दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये प्रामुख्याने सकाळी ९ ते १२ आणि ५ ते साडेआठ या वेळेत ६५० दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये यांप्रमाणे ६५ हजार रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. नागरिकांनी काही प्रमाणात या सक्तीला विरोध केला. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पोलिसांनाही कारवाईसाठी बळ मिळाले आहे.

.......

राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या सरकारनेही हा निर्णय घेतला होता. वाहनचालकांच्या जीविताचा विचार करूनच, त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, थेट अंमलबजावणी सुरू करण्यापेक्षा दुचाकी चालकांच्या समस्यासुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे.

श्रीरंग बारणे, खासदार

..

हेल्मेट मोटारसायकलस्वारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने हिताचे आहे. नागरिकांनीही त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी नियमांचे पालन करावे.

अमर साबळे, खासदार

..

हेल्मेट वापरणे चांगले आहे. मात्र, त्याचबरोबर प्रत्येक चौकातील सिग्नल व्यवस्था चांगली करणे गरजेचे आहे. हेल्मेटमुळे मागुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही, तसेच, हॉर्नचे आवाज ऐकू येत नाहीत.

महेश लांडगे, आमदार

..

शहरातील वाहतूक वाढली आहे. अपघातही वाढले आहेत. त्यामुळे सरकारने केलेली सक्ती योग्य आहे. नागरिक सुरवातीला थोडा विरोध करतील, मात्र, शहरातील रस्ते, त्यावरील खड्डे आणि जीवाचा विचार करता हा निर्णय योग्य आहे.

गौतम चाबुकस्वार,आमदार

..

सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, महसूल गोळा करणे हा आमचा उद्देश नाही.

महेंद्र रोकडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभद्र युतीमुळे पुणेकरांना भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या अभद्र युतीने पुणेकरांवर पाणीपट्टीचा बोजा वाढविल्याचा आरोप काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने केला. 'एक दिवसाआड पाणी मिळत असतानाही, नागरिकांवर वाढीव कर लादणाऱ्या पक्षांना महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत पुणेकर जागा दाखवून देतील,' असा इशारा काँग्रेसने दिला आहे, तर पाणीपट्टीत केलेल्या वाढीवर जनमत जाणून घेण्याचे काम मनसे करणार आहे.

आगामी वर्षात पाणीपट्टीत ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केला होता. काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेने विरोध करूनही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सोबत घेऊन हा प्रस्ताव मंजूर केला. शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याकरता करवाढ आवश्यक असल्याचा दावा केला जात असला, तरी राष्ट्रवादी-भाजपच्या छुप्या युतीवर इतर पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

'कोणताही विचार न करता, पुणेकरांवर पुढील ३० वर्षे करवाढीचा बोजा लादणाऱ्या या पक्षांना पुणेकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत,' असे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले. 'मनसेतर्फे 'अन्यायकारक करवाढ मान्य आहे का?' अशी मोहीमच राबविण्यात येणार आहे,' असे गटनेते बाबू वागसकर यांनी सांगितले. 'पाणीपट्टीत वाढ करण्याच्या निर्णयाचा विरोध केला जाईल,' अशी भूमिका शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांच्या खिशाला बसेल मोठा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीसाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचा केंद्राचे धोरण पुणे महापालिकेने गुरुवारी चुटकीसरशी अंमलात आणले. केवळ एक वर्षासाठीच नव्हे, तर येत्या पाच वर्षांसाठी 'चक्रवाढ' पद्धतीने पाणीपट्टीवाढीचा बोजा गुरुवारी पुणेकरांच्या माथी मारला. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीयांची पुणेकरांना फटका देण्यासाठी युती झाली. इतकेच नव्हे, तर येत्या २०४७ पर्यंत पाणीपट्टीतील सातत्यपूर्ण वाढीचे 'स्मार्ट' नियोजनही या माननीयांनी तत्परतेने करून टाकले.

शहरातील समान पाणीपुरवठ्यासाठी पाणीपट्टीत ५० टक्के वाढीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. भाजप वगळता इतर पक्षांचा विरोध त्याला होता. स्थायी समितीच्या खास बैठकीत पाणीपट्टीत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याच्या भाजपच्या उपसूचनेला पाठिंबा देऊन, राष्ट्रवादीने 'यू टर्न' घेतला. महापालिकेत राष्ट्रवादीसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने आणि राज्यात भाजपसह सत्तेत असलेल्या शिवसेनेसह मनसेनेही करवाढीला तीव्र विरोध केला. मात्र, ९ विरुद्ध ५ अशा बहुमताने करवाढीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

अशी वाढणार पाणीपट्टी

स्थायी समितीने गुरुवारी घेतलेल्या निर्णयामुळे पुणेकरांना पुढील पाच वर्षांत पाणीपट्टीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या, वार्षिक ९०० रुपये पाणीपट्टी देणाऱ्या नागरिकांना २०२१-२२ पर्यंत १८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

असमतोल दूर करून सर्वांना २४ तास पाणी देण्यासाठी पुढील पाच वर्षांत योजना राबविण्यात येणार आहे. पाणीपट्टीतील वाढ या दृष्टीने त्याकडे पाहण्यापेक्षा पुढील ३० वर्षांचे दूरदृष्टीने केलेले नियोजन पुणेकरांनाच हितावह ठरेल. करवाढीतील उत्पन्न केवळ २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठीच वापरण्यात येईल. - कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगनगरी ‘सीएसआर’च्या प्रतीक्षेत

$
0
0

sunil.landge@timesgroup.com

पिंपरी : महापा​लिकेचे घटते उत्पन्न आणि वाढत्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीच्या (सीएसआर) माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. त्यासाठी येत्या आर्थिक वर्षात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नव्या कंपनी कायद्यामुळे 'सीएसआर'वर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्यातून काही हिस्सा सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी खर्च करायला हवा, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमांसाठी नफ्यातील किती हिस्सा खर्च करावा, कोणत्या उपक्रमांवर खर्च करावा आणि कोणत्या कंपन्यांना असा खर्च करणे बंधनकारक आहे, या बाबतची माहिती कायद्यात नमूद करण्यात आली आहे. वार्षिक निव्वळ नफा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या कंपन्यांना देखील सीएसआर बंधनकारक आहे. पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातून या कामासाठी भरीव निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा महापालिकेला होती. ही बाब बजेटमध्येही उल्लेखनीय मानली जात होती. परंतु, गेल्या दोन वर्षांत मर्यादित प्रमाणात अपेक्षापूर्ती झाली आहे. .

समाजोपयोगी कामासाठी निधी देणाऱ्या अनेक चांगल्या कंपन्या शहर आणि परिसरात आहेत. त्या वर्षानुवर्षे समाजासाठी कामही करत आल्या आहेत. परंतु, ही संख्या अल्प असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत या शहरात ई-लर्निंग (रोटरी क्लब), महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत वायफाय सुविधा (फोर्ड फाउंडेशन), पिंपळे गुरवमध्ये शौचालय उभारणी (शेल्टर असोसिएट्स), इंग्रजी माध्यमांच्या शाळा (थरमॅक्स), एड्स नियंत्रण कक्ष (बजाज) असे मोजकेच प्रकल्प राबविण्यात आले. परंतु, शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कॉर्पोरेट जगताने अधिक योगदान देण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांशी पालिका प्रशासनाने पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

विशेषतः दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य सुविधा, पेयजल पुरवठा या क्षेत्रात सुधारणेला खूप वाव आहे. ही सरकारची जबाबदारी असली, तरी त्यामध्ये उद्योग जगताने आर्थिक वाटा उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या माध्यमातून विकासाची फळे वंचितांपर्यंत नेणे सुलभ होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्ये, स्त्रिया, वृद्ध आणि सामाजिक तसेच आर्थिक दृष्टया मागासलेल्यांना सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणारे पर्यावरणीय प्रकल्प आणि राष्ट्रीय तसेच ऐतिहासिक वारशाची जपणूक, निवृत्त सैनिक आणि सैनिकांच्या विधवा यांच्या साठीचे उपक्रम देखील सीएसआर अंतर्गत खर्चासाठी पात्र ठरवण्यात आले असल्यामुळे या बाबतीतही प्रशासन मदतीची अपेक्षा करीत आहे.

..

शिक्षण मंडळही मदतीच्या प्रतीक्षेत

महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत आहे. त्या तुलनेत विकासकामांच्या अपेक्षा वाढत आहेत. महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील लोकप्रतिनिधींनी तर समतोल विकासाच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या परिस्थितीत सीएसआरच्या माध्यमातून शहरातील काही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कंपन्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी भरीव उपक्रम राबविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

.....

या कामांसाठी मदतीची गरज

- झोपडपट्टी परिसरात शौचालये

- मुख्य चौकांचे सुशोभिकरण

- शिक्षणासाठी शाळा दत्तक

- शहरात ई-लर्निंग सुविधा

- व्यक्तिमत्त्व कौशल्य विकास

- कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेच्या गोंधळातून अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परस्परांची भाषा न उमगल्याने अर्थाचे अनर्थ कसे होतात, याचा प्रत्यय कोलकात्यातील एकाला आला आहे. बॉम्बची अफवा पसरविल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी थेट कोलकाता गाठले आणि त्याला अटक करून पुण्यात कसून चौकशी केली. चौकशीअंती त्याने केलेली चूक हा केवळ भाषेचा गोंधळ असल्याचे समोर आले.

मुंबईत बॉम्ब ठेवला असल्याचा एक फोन राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाच्या मोबाइलवर खणखणला होता. त्याने ही माहिती पुणे पोलिसांना दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. तो फोन कोलकात्यातून करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. संबंधित फोन करणाऱ्याला कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले. वानवडी पोलिसांच्या पथकाने कोलकात्यातून त्याला ताब्यात घेतले आणि पुण्यात आणले. त्याला अटक करून एक दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली. तपासाअंती केवळ भाषेमुळे अर्थाचा अनर्थ झाल्याचे उघडकीस आले. महंमद झाकीर (वय ३६, रा. मोंगामियान, डमडम, कोलकाता) असे या व्यक्तीचे नाव आहे. झाकीर हा कामगार कंत्राटदार आहे. आठवड्याभरापूर्वी त्याच्या कामानिमित्त केलेला फोन 'एसआरपीएफ'च्या जवानाच्या मोबाइल फोनवर आला होता. त्याने त्या जवानाला 'खलाती किधर है', असा प्रश्न विचारला होता. या वेळी जवानाने राँग नंबर म्हणून फोन डिस्कनेट केला. मात्र, पुन्हा त्याच्या मोबाइलवर फोन आला. या वेळी त्याने 'बंबई में बॉम्ब रखा है,' असे ऐकले. त्याने लगेच ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली आणि धावपळ सुरू झाली.

झाकीरकडे विचारणा झाली असता त्याने सांगितले, की त्याने 'खलाती' हा उच्चार न करता तो 'खलासी' असा केला होता. त्यांच्या भाषेत 'खलासी' म्हणजे कामगार. त्याचे दुसरे वाक्य हे 'खलासी है क्या', 'बंम्बई मे खलासी है क्या', असे म्हटले होते. बंम्बईचा उल्लेख त्याच्याकडून 'बंब' असा झाला. झाकीरने उच्चारलेली वाक्ये तपासादरम्यान त्या जवानाला पुन्हा ऐकवली आणि तपासाअंती 'खलासी'मुळे हे नाट्य घडल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गच्चीत ‘बायोगॅस’ची शेती

$
0
0

अमृता ओंबाळे, पिंपरी

महानगरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. अशाप्रकारे वाया गेलेले अन्न अखेर कचऱ्यात टाकले जाते. वाया जाणारे अन्न कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्यातून बायोगॅसची निर्मिती केली, तर पर्यावरणाचेही रक्षण होईल आणि खर्चातही घट होईल या उद्देशाने निगडीतील चौऱ्याऐंशी वर्षांच्या गोपाळ लेले या तरुणाने पुढाकार घेतला आहे.

कचराकुंडीत कचऱ्याचे ढिग लावण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचा उपाय योजण्यातच शहाणपण असल्याचा विचार लेले यांनी केला. त्यातूनच त्यांनी निगडीतील आपल्या राहत्या घराच्या गच्चीत बायोगॅसचा प्रकल्प बसवला. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर ते स्वयंपाकासाठी करीत असून, वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग त्यांनी बाग फुलविण्यासाठी केला आहे. एका मित्राकडून बायोगॅस प्रकल्पाची माहिती लेले यांना मिळाली. हजार लिटर आणि ७५० लिटरच्या क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या वरून अर्ध्या कापून त्या एकमेकांवर बसवल्या. बाहेरील टाकीच्या तळाशी सहा विटा ठेवल्या. १०० किलो शेण आणि पाणी आतील टाकीमध्ये टाकून त्यात ७५० लिटरची टाकी उपडी केली. वरच्या लहान टाकीला गॅस आउटलेट देऊन तो पाइप शेगडीला जोडला. यातील मोठ्या टाकीला मोठा पाइप जोडला. या मोठ्या पाइपमधून येणारे खरकटे अन्न मोठ्या टाकीत जाईल अशी सोय केलेली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी त्यांना दहा ते अकरा हजार खर्च आला आहे. २००१ मध्ये उभारलेला हा प्रकल्प अजूनही सुस्थितीत आहे.

गच्चीवरील सहा बाय सहा जागेत प्रकल्प आहे. घरात उरलेले अन्न, भाज्यांचे देठ मोठ्या पाइपमधून आत टाकीत टाकले जातात. त्यानंतर बादलीभर पाणी ओतून हा कचरा मोठ्या टाकीत टाकला जातो. त्यानंतर हे मिश्रण तसेच आठ तास ठेवले जाते. त्यानंतर मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात वापरासाठी मिथेन गॅस तयार होतो. तयार झालेला गॅस नळीद्वारे स्वयंपाकघरातील शेगडीला जोडला आहे. प्रकल्पातील गॅसचा वापर करून लेले यांच्या घरातील सकाळचा स्वयंपाक मार्गी लावला जातो. प्रकल्पामुळे एक ते दीड तास गॅसची बचत होते, असा लेले यांचा दावा आहे. लेलेंना या कामी पत्नी नलिनी (वय ७७) यांचीही मदत मिळत आहे. बायोगॅसचा प्रसार व्हावा म्हणून लेले दाम्पत्याने 'घरगुती बायोगॅस प्लान्ट' ही छोटी पुस्तिका देखील प्रकाशित केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : गोपाळ लेले (९८२२०५५५२५)

..

सध्याच्या काळात पर्यावरणाचा विचार करणारे खूपच कमी आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी सर्वांनी बायोगॅस तंत्राचा अवलंब करावा. हॉटेल मालकांनी आणि मोठी जागा असलेल्यांनी हा प्रकल्प अवश्य उभारावा. - गोपाळ लेले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह शनीचे दर्शन घ्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत केवळ घोषणाबाजी न करता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक शनीचे दर्शन घ्यावे,' असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केले. याबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेनेही भूमिका जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.

'प्रत्येक वेळी अत्यंत किरकोळ प्रश्नांवर आपली भूमिका जाहीर करणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद या संघटना शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा, की नाही याबाबत अद्यापही गप्प का बसल्या आहेत? त्यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी,' अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

'अंगणवाड्यांमध्ये रामायण, महाभारताचे धडे देणे म्हणजे अराजकाला आमंत्रण देण्याचा प्रकार असून, राज्य सरकारच्या वतीने अशा पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्यात येईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून पंकजा मुंडे यांनी अंगणवाड्यांमध्ये रामायण, महाभारताचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत असताना कोणत्याही एका धर्माची बाजू घेऊन शिक्षण देणे अमान्य आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपी: ४० जणांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुपी को. ऑप. बँकेने १९९७ ते २०१३ या कालावधीत केलेल्या कर्जपुरवठ्यामध्ये अनियमितता असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहकार आयुक्तांनी संचालक आणि अधिकाऱ्यांसह ४० जणांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. १५ दिवसांत संबंधितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्या अहवालात संचालक आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले असतानाच, लेखापरीक्षण अहवालातही संचालक आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सहकार खात्याकडून या बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. १९९७ ते २०१३ या कालावधीत करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यामध्ये अनियमितता आढळली आहे. त्यास संचालक आणि अधिकारी जबाबदार असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकार कायद्याच्या कलम ८१ (३) ब नुसार ४० जणांना नोटिसा बजावल्या असल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.

नोटिसा बजावण्यात आलेल्या संचालक आणि अधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

डॉ. तोष्णीवाल यांच्या अहवालामुळे या बँकेचे संचालक आणि अधिकारी हे अडचणीत आले असताना, लेखापरीक्षण अहवालातूनही अनेक बाबी उघड झाल्या आहे. डॉ. तोष्णीवाल यांच्या अहवालात ६९ जणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामध्ये १५ तत्कालीन संचालक आणि ५४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १,४९० कोटी ४४ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निधन झालेल्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या वारसांकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे. या अहवालानुसार सहकार आयुक्तांनी वसुलीचे आदेश देण्यापूर्वी कोर्टाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे सहकार आयुक्तांनी संचालक आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यासाठी नोटिसा काढल्या आहेत.

दरम्यान, सहकारी बँकांमधील वाहनकर्ज घोटाळा प्रकरणात या बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यापूर्वी मुंबई हायकोर्टाने सहकार आयुक्तांना दिले आहेत. त्यामध्ये तत्कालीन महाव्यवस्थापक महेंद्र दोशी, उपमहाव्यवस्थापक प्रशांत गोरे आणि बुधवार पेठ शाखेचे शाखाधिकारी पुंजाजी पगारे यांचा समावेश आहे. त्यापैकी दोशी आणि गोरे यांना डॉ. तोष्णीवाल यांच्या अहवालातही दोषी धरण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समुद्र, टेकड्या, पर्वत, तलावांवर सहलबंदी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी एक परिपत्रक जारी केलं असून, त्यानुसार शाळा आणि महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थ्यांना यापुढे समुद्र, टेकड्या, पर्वत आणि तलावांवर सहलीला घेऊन जाता येणार नाही. मुरूडच्या समुद्रकिनारी १४ विद्यार्थ्यानी आपले प्राण गमावल्यानंतर राज्य शासनानं सहलबंदीचं हे पाऊल उचललं आहे.

शिक्षण उपसंचालकांनी जारी केलेल्या या परिपत्रकात महाविद्यालयं आणि शिक्षकांसाठी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार समुद्र किनारे, उंच पर्वतावरील ठिकाणं, उंच टेकड्या, नद्या, तलाव,विहीर अशा ठिकाणी सहल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या सहलीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना २ प्रशिक्षित शिक्षकांकडून आपत्कालीन परिस्थितीत आपला बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शिवाय प्रथमोपचार पेटी, शासकीय हॉस्पिटलचे आणि स्थानिक डॉक्टरांचे फोन नंबर सोबत ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. आवश्यकता वाटल्यास पालकांचा प्रतिनिधी सोबत ठेवावा अशीही सूचना करण्यात आली आहे.
सहलीला जायचे असल्यास विद्यार्थ्यानं आपल्या पालकांकडून संमतीपत्र घेणंही या नव्या नियमावलीनुसार बंधनकारक करण्यात आलं आहे. दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असं प्रमाणही निश्चित करण्यात आलं आहे. शिवाय आरटीओ मान्यताप्राप्त वाहनातूनच सहल नेण्यात यावी असाही नियम घालून देण्यात आला आहे.

दरम्यान, समुद्र, टेकड्या, पर्वत आणि तलावांवर जर सहली न्यायच्या नाहीत, तर मग न्यायच्या कुठे? असे प्रश्न विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र, सहलींबाबत जे काही नियम आहेत, त्या नियमांचा विचार करूनच नवी नियमावली तयार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिलं आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांशी चर्चा करून नव्या नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येतील अशी भूमिकाही जाधव यांनी मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा होतोय ‘मोबीट्रॅश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध 'स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक आला म्हणजे लगेच सर्व प्रश्न सुटतील असे नाही तर स्वच्छतेसारख्या शहराच्या प्रश्नावर सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्याला चांगल्या सुविधांसाठी पैसे खर्च करावे लागतील. मोबीट्रॅशसारखी कचरा समस्येवरील सुविधा शहराला परिणामकारक उपाय देणारी आहे,' असे पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. एक्सेल इंडस्ट्रीजच्या वतीने पुणे शहरात खासगी तत्वावर सुरू करण्यात आलेल्या मोबीट्रॅश या फिरत्या कचरा प्रक्रिया करणाऱ्या गाड्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेवक कैलास गायकवाड, मोबीट्रॅशचे रवी श्रॉफ, वैशाली पाटकर आदी उपस्थित होते. सोसाट्यांमध्ये जाऊन सोसायटीतील ओल्या कचरा व बागेतील कचराऱ्यावर ही व्हॅन प्रक्रिया करणार आहे. या वाहनातच कच्चे खत तयार करण्याची आधुनिक सुविधा व संकलनाची व्यवस्था असणार आहे. सोसायटीमधून कचरा बाहेर पडण्याऐवजी आता या गाडीच्या माध्यमातून कच्चे खत बाहेर जाणार असल्याने वाहतुकी दरम्यान रस्त्यावरील दुर्गंधीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कंपनीशी संलग्न झालेल्या सोसायट्यांना घरटी १९९ रुपये प्रति महिना घेतले जाणार आहेत. यात गाडी आपल्या सोसायटीमध्ये येऊन कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. यामुळे सोसायटीमधील ओला कचरा नियमित शास्त्रोक्त पद्धतीने जिरवण्यास मदत होणार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड म्हणाले, 'शहरामध्ये समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या खासगी यंत्रणांचे स्वागत होणे आवश्यक आहे.' परंतु, त्याचबरोबर सध्या काम करणारे कामगार बेरोजगार होणार नाहीत तसेच ही सुविधा नागरिकांना परवडणारी असली पाहिजे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या कचरा रॅम्पच्या आवारात हे उद्घाटन घेण्यात आले. परंतु, औंध क्षेत्रीय कार्यालयातील माननीय व अधिकारी यांना कार्यक्रमाची कल्पना नव्हती. यामुळे माननीयांसह अनेक नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. कंपनीशी संलग्न झालेल्या सोसायट्यांना घरटी १९९ रुपये प्रति महिना घेतले जाणार आहेत. यात गाडी आपल्या सोसायटीमध्ये येऊन कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. यामुळे सोसायटीमधील ओला कचरा नियमित शास्त्रोक्त पद्धतीने जिरवण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगदास स्वामी मंदिरातीलदानपेटी फोडून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुन्नर आमटी-भाकरीच्या महाउत्सवाच्या दृष्टीने राज्यात प्रसिद्ध असलेल्या अणे येथील रंगदास स्वामी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. यातून किती रक्कम चोरीला गेली याचा तपशील समजू शकला नाही. याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, सुधीर आंबेकर हे पूजा करण्यासाठी मंदिरात आले तेव्हा मंदिराचे कूलूप तोडून दानपेटीतील चोरी झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले. मंदिराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत चोरट्यांचे फूटेज चित्रीत झाले आहे. मात्र, तोंडे झाकलेली असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्टच्या वतीने याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरील दरोडेखोरांकडूनव्यापाऱ्यांची अणे घाटात लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर नगर-कल्याण महामार्गावरील गुळूंचवाडी (अणे) घाटात ट्रकला दुचाकी आडवी घालून दरोडेखोरांनी ट्रकमधील व्यापाऱ्यांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार घडला. व्यापाऱ्यांकडील एक लाख २० हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लांबवली. दरम्यान, दरोडेखोरांपैकी एकाला पकडण्यात व्यापाऱ्यांना यश आले. पकडलेल्या दरोडेखोराला गाडीत बांधून ठेवत व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशीचा व्यापार करणारे व्यापारी अनुक्रमे ज्ञानदेव ससे, शंकर ससे, राजू खाडे, सदाशिव जाधव, अश्पाक शेख, निसार सय्यद, दत्तात्रय खाडे हे (रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. नगर) कल्याणकडे ट्रकमधून जात होते. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास, गुळूंचवाडी घाटात मागून आलेल्या तीन दुचाकीवरील दरोडेखोरांनी ट्रकला गाड्या आडव्या लावल्या. एकाने ट्रकमध्ये चढून ट्रकचालकाला मारहाण सुरू केली. मात्र, चालकाने मोबाइल लावण्याचा प्रयत्न करताच त्याने सत्तुरसारखे हत्यार त्याच्या मानेवर लावत ट्रकची चावी काढून घेतली. त्याचवेळी चालकाविरुद्ध बाजूने काहीजण आत चढले. त्यांनी केबीनमधील तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील एक लाख २० हजार रक्कम काढून घेतली आणि ते पळू लागले. त्याचवेळी अष्पाक शेख आणि शंकर ससे या दोन व्यापाऱ्यांनी एका दरोडेखोराला पकडून ठेवले. इतर दरोडेखोरांनी दगडांचा मारा करत ज्ञानदेव ससे, शंकर ससे, अष्पाक शेख या तिघा व्यापाऱ्यांना जखमी केले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी पकडून ठेवलेल्या ओंकार सुरेश शेजवळ (रा. भोसरी) याला ट्रकमध्ये दोरीने बांधून दुचाकीसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी शेजवळसह अन्य सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर दरोडेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगारासाठी शिरूरला तरुण रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर रांजणगाव कारेगाव औद्योगिक वसाहतीतील व तालुक्यातील कंपन्यात स्थानिकांना रोजगार व्यवसाय मिळावा या मागणीसाठी व सरकारचे या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शिरूर तहसील कार्यालयावर क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने इशारा मोर्चा काढण्यात आला. शहरातील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. मोर्चा पुणे- नगर रोडने तहसील कार्यालयावर गेला. या वेळी उपस्थित युवकांसमोर बोलताना क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे म्हणाले, की स्थानिक मुले रोजगार मिळविण्यासाठी कंपनीत गेले तर त्यांना रोजगार मिळत नाही. स्थानिकांना रोजगार द्यावा असे सरकारचे धोरण असतानाही रोजगार का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व मांडण्यासाठी युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले. एक महिन्यात प्रशासनाने रोजगार व व्यवसायासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा पाचंगे यांनी दिला. या वेळी जनता दल युवाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे म्हणाले, की एमआयडीसीसाठी स्थानिक जनतेने जमिनी दिल्या मात्र त्यांना रोजगार नाही. एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या किती जणांना रोजगार मिळाला आहे, असा प्रश्न उपस्थित करून तरुणांना व्यवसाय व रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे शेवाळे म्हणाले. शिरूर मुद्रण संघटनेचे बाबुराव पाचंगे, ग्राहक पंचायतीचे रमेश टाकळकर, धनंजय गायकवाड, शिवसेनेचे गणेश जामदार, निमोणेचे माजी सरपंच विजय भोस, अहमदाबादचे माजी सरपंच प्रकाश थोरात, यशस्विनी अभियानाच्या नम्रता गवारी, टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी चौरे यांची ही भाषणे झाली. सूत्रसंचालन जनता दलाचे संजय बारवकर यांनी केले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार राजेंद्र पोळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images