Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गूढ आवाजाची भीती कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्फोटांच्या एकापाठोपाठ आलेल्या आवाजांनी चार दिवसांपूर्वी दुपारी रहाटणी, काळेवाडी, पिंपळेसौदागरसह पश्चिम पुणे चांगलेच हादरले होते. 'रेड झोन' पट्ट्यातील दिघी मॅगझिन आणि परिसरातील नागरिकांना अशा प्रकारांच्या आवाजाची आता सवय झाली आहे. परंतु, सलग चार-पाच स्फोटांच्या गूढ आवाजांनी मध्यवर्ती भागातील नागरिकांची धास्ती अजूनही कायम आहे. मध्यंतरी कोर्टाच्या निर्देषांचा विपर्यास करून बंद करण्यात आलेल्या कुंजीरवस्ती ते रक्षक चौकाच्या आसपास देखील हा गूढ आवाजाची दोरदार चर्चा होती.
अनेकजण गुरुवार असल्याने (२८ जानेवारी) घरी होते. दुपारी दीडच्या सुमारास एक जोरदार आवाज झाला. स्फोटासारखा आवाज असल्याने अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. आवाज कशाचा हे कळायच्या आता सलग चार-पाच वेळा स्फोटांसारखे आवाज झाले आणि रहाटणी, काळेवाडी मधील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. अनेकांच्या घरांच्या काचांना तडे गेले. तर इमारती आणि रस्ते हादरल्याचा अनुभव आल्याचे बरेच जण सांगत होते. औंधपासून रहाटणी, काळेवाडी हे अंतर जवळ आहे. मात्र, कोथरूड आणि वारजे येथे देखील काहींनी स्फोटाचे आवाज ऐकले. घरात बसलेल्यांना हा आवाज अधिक जाणवला होता. रक्षक चौकाजवळील औंध येथील लष्कराच्या जागेत १८ देशांचा संयुक्त युद्ध सराव नियोजित असून, त्याचा हा आवाज असावा असा तर्क काढण्यात आला. पण, त्यानंतर कोणताही युद्ध सराव सुरू नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या आवाजाचे गूढ अजूनच वाढले.
आळंदी रस्त्यावर 'दिघी मॅगझिन'मुळे दिवसातून किमान आठ-दहा वेळा तरी अशा प्रकारचे मोठे आवाज होता. घरे हादरतात. नव्याने राहण्यात आलेल्यांची या भागात पुरती भंबेरी उडते. येथील अनेकांच्या घरांना-इमारतींना भेगा पडल्या आहेत. परंतु, याची आता स्थानिकांना सवय झाली आहे. रेड झोन भागात बांधकाम होऊ नये हे सांगण्याचा हेतू देखील हाच असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मध्यंतरी बोपखेलकरांसाठी नदीपात्रातून झुलता पूल बांधण्यात आला. तो सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. 'नो-डेव्हल्पमेंट झोन' बदलून आता बोपखेलसाठी पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलाच्या आणि पर्यायी रस्त्यावर देखील हादरे जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सैन्याच्या व्यापलेला बराच परिसर पुणे, पिंपरीत आहे. प्रत्येक ठिकाणी सराव अथवा दारूगोळा आहेच असे नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आवाज फार तर खडकी, देहूरोड आणि दिघी मॅगझिन या पट्ट्यातच अनुभविल्याचे सांगितले जाते. परंतु, मध्यवस्तीत हादरे जाणवतात आणि या आवाजाशी काहीच संबंध नाही असे लष्कराकडून सांगण्यात येत असल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंदूंधर्मियांनीच पेरले वर्णव्यवस्थेचे बीज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिंदूधर्मियांनीच हिंदू संस्कृतीचे नुकसान केले. स्वत:च्या स्वार्थासाठी वर्णव्यवस्थेचे बीज समाजात पेरून मानवतेचा अपमान केला. सुसंस्कृत चेहऱ्यामागे असंस्कृतीचा बुरखा ओढला गेला आहे,' असे परखड वक्तव्य ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी शनिवारी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सतराव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उदघाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्षा मधुश्री ओव्हाळ, गुरूनानक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतसिंग मोखा, राष्ट्रीय बंधुता सहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विकास आबनावे, सरचिटणीस शंकर आथरे, संघटक महेंद्र भारती आणि हाजी अफझलभाई शेख या वेळी उपस्थित होते.

माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे; पण चारित्र्य नसेल तर ज्ञान हे विघातक ठरते. आज ज्ञानापेक्षा चारित्र्य आणि संस्काराची आवश्यकता आहे, असे सांगून आव्हाड म्हणाले, की ' सध्या धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न राजकारणी करीत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी वर्ण, जाती आणि धर्मव्यवस्था निर्माण करून मानवतेचा अपमान करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. आज सुसंस्कृत म्हणवणारेच असंस्कृत झाले आहेत, त्यांच्यामध्ये सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करणे हीच बंधुता आहे.'

अध्यक्षीय भाषणात डॉ. अश्विनी धोंगडे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की 'सध्याच्या अस्वस्थतेच्या काळात सन्मान मिरवणे ही गोष्ट साहित्यिकांना खटकली. जी मूल्ये आपण साहित्यामध्ये मांडली ती पायदळी तुडविली जात आहेत, या भावनेतून पुरस्कार परत करण्यात आले. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी सापडू न शकल्यामुळे सामान्य माणसांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. असहिष्णुता, जातीय हिंसाचार वाढत आहे, याला काळ हेच औषध आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूंना अनोखी श्रद्धांजली

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : ज्येष्ठ बालसाहित्यिक दत्ता टोळ यापुढे 'अमरेंद्र दत्त' या नावाने बालसाहित्यनिर्मिती करणार आहेत. अमरेंद्र गाडगीळ या आपल्या गुरूंच्या स्मृती जपल्या जाव्यात तसेच, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टोळ यांनी हा निर्णय घेतला आहे. गुरूचे आणि स्वत:चे पहिले नाव एकत्र करून 'अमरेंद्र दत्त' या नावाने यापुढे त्यांचे साहित्य प्रकाशित होईल.

टोळ यांचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा नुकताच झाला. हा योग साधून टोळ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यापुढे अमरेंद्र दत्त या नावाने मी बालसाहित्याचे लेखन करणार आहे, तसेच याच नावाने पुरस्कार देणार आहे,' असे टोळ यांनी 'मटा'ला सांगितले.

'गाडगीळ यांनी भारतीय बालकुमार साहित्य संस्था स्थापन केली. बालसाहित्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आतापर्यंत लेखन करत आलो आणि यापुढे नव्या नावाने लेखन करणार आहे,' असे टोळ यांनी सांगितले.

टोळ यांची बालसाहित्यावरील १०८ पुस्तके प्रसिद्ध असून, बालसाहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारने तीन, राज्य सरकारने चार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. माणसांना पशु-पक्षांची भाषा समजू लागली तर काय होईल, या विचारांतून शोध घेणाऱ्या 'एक शोध हरवला' या कादंबरीचे लेखन सध्या ते करीत आहेत. 'अमरेंद्र दत्त' या नावाने ही कादंबरी लवकरच प्रसिद्ध होईल.

राजदत्त यांच्याकडून प्रेरणा

या बाबतीत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे. राजदत्त यांचे मूळ नाव दत्ता मायाळू असे आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे त्यांचे गुरू होते. गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजदत्त यांनी गुरूंच्या नावातील राज आणि स्वत:च्या नावातील दत्त हे नाव घेऊन 'राजदत्त' या नावाने आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी 'अमरेंद्र दत्त' या नावाने साहित्य लेखन करणार आहे, असे दत्ता टोळ यांनी सांगितले.

-----------------------

तीन लाख व्यक्तींना बुकमार्क

पुस्तके वाचा, पण पानाचा कान पिरगाळू नका, असा संदेश देऊन दत्ता टोळ भेटेल त्याला 'बुकमार्क' भेट देतात. त्यावर संदेश तर असतोच; पण वाचून झालेल्या पानाजवळ खूण म्हणून या बुकमार्कचा उपयोग करता येईल, असे ते आवर्जून सांगतात. रस्त्यावरून कोणी लिफ्ट दिली तर त्यास ते आवर्जून ही भेट देतात. रोज तीन या नियमाने गेल्या दहा वर्षांत


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव ट्रकने ठोकरल्याने तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पिरंगुट परिसरातील लवळे फाट्याजवळील उतारावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यातील चार वाहनांना ठोकल्यामुळे एका सात वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर इतर तीन जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. सिमेंटच्या विटा घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रक धडकून थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अभिषेक सुरेश दगडे (वय १८, रा. पिरंगुट), समीर संजय उभे (वय १८, रा. वरपेवाडी, भुकूम) व ओंकार संतोष जाधव (वय ७, रा. पिरंगुट घाट) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, गणेश दत्तात्रय दुधाने (वय ३२, रा. बावधन), संतोष बबन जाधव (वय ३७, रा. पिरंगुट), ट्रकचालक तानाजी पांडुरंग जाधव (रा. लोणीकाळभोर) हे जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून पिरंगुटकडे लोखंडी गज घेऊन रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा ट्रक निघाला होता. घाट संपताना उतारावर ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने पहिल्यांदा बुनिंदा ढाब्यासमोरील मोटारीला धडक दिली. त्यानंतर या ट्रकने त्याच्याच पुढे असलेल्या एका स्विफ्ट कारला मागून धडक दिली. त्यामुळे कारच्या मागील भागाचा चुराडा झाला. कारमधील दुधाने हे यामध्ये जखमी झाले. त्यानंतर या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये ओंकार याचा मृत्यू झाला. तर, त्याचे वडील संतोष यामध्ये जखमी झाले. त्याच दरम्यान समोरून पुण्याकडे सिमेंटच्या विटांनी भरलेला ट्रॅक्टर व त्याच्या पुढे दुचाकीवर दोन तरुण येत होते. या ट्रकने प्रथम दुचाकीस्वार दगडे व उभे यांना समोरून धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हा ट्रक ट्रॅक्टरला जाऊन धडकला. ट्रॅक्टरमधील सिमेंट विटांच्या वजनामुळे ट्रकला अडथळा निर्माण झाला व तो पुलावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पंधरा फूट खोल जाऊन उलटला. यात ट्रॅक्टरचाही चुराडा झाला. अपघातानंतर पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रकच्या खाली चालक अडकला होता. ट्रक क्रेनच्या सहाय्याने उचलून त्याला बाहेर काढले. तसेच, जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये पाठविले. या प्रकरणी ट्रक चालकावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर आडवा आला नसता तर... उतारावर ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने तीन वाहनांना धडक देत पुढे तो सिमेंटच्या विटांनी भरलेला ट्रॅक्टरवर समोरून आदळला. त्यामुळे ट्रकला पुढे जाण्यास अडथळा होऊन तो रस्त्याच्या बाजूच्या खड्यात खोल जाऊन उलटला. पौडच्या बाजूने पुण्याला जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती. ट्रक थांबला नसता तर त्याने अनेक वाहनांना धडक दिली असती. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती. गतिरोधक बसवण्याकडे दुर्लक्ष एक महिन्यांपूर्वी पिरंगुट येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. अनेक दिवसांपासून या उतारावर गतीरोधक बसविण्याची विनंती केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगलबंदीला पदन्यासाचा ठेका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे तबला, पखावज, घट्टम, ड्रमकिट, हार्मोनियम अशा वाद्यांची विख्यात कलाकारांनी रंगवलेली दमदार जुगलबंदी आणि सोबतीला कथकचा बेफाम पदन्यास असा सांगीतिक योग जुळून आला, तर ती संध्या रसिकांसाठी यादगार ठरणार हे नक्की. या सादरीकरणाची मोहिनी मनातून उतरत नाही तोच पुन्हा सतार आणि तबल्याच्या जुगलबंदीने मैफलीच्या आठवणींचा पट आणखी गडद होणार हे निश्चितच. असेच वातावरण 'तालचक्र' या तीन दिवसीय महोत्सवाच्या समारोपाला रसिकांनी अनुभवले. 'तालचक्र २०१६' पॉवर्ड बाय महाराष्ट्र टाइम्स' महोत्सवाचा शेवटचा दिवस गाजला, तो योगेश समसी (तबला), गिरीधर उडुपा (घट्टम), बी. एस. अरुणकुमार (ड्रम किट), सुखद मुंडे (पखावज) तन्मय देवचके (हार्मोनियम), शीतल कोलवलकर-मानसी देशपांडे (कथक) आणि नीलाद्री कुमार (सतार), पं. कुमार बोस (तबला) या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने. 'पु. ना. गाडगीळ अँड सन्स'च्या दीपा गाडगीळ आणि एनडीचे सौरभ तिवारी यांच्या हस्ते या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मैफलीची सुरुवात समसी यांनी एकल तबला वादनाने केली. पंजाब घराण्याच्या काही बंदिशी, तुकडे, तिहाई सादर केल्यानंतर त्यांना उडुपा यांनी घट्टमवर साथ देत मैफल रंगवायला सुरुवात केली. त्यांच्या काही बंदिशींची जुगलबंदी झाल्यानंतर अरुणकुमारने ड्रम किटवर सादरीकरणाला फ्युजनचा बाज आणला. या सादरीकरणाला मुंडे यांनी पखावजवर साथ देत सौंदर्याचा साज दिला. सोबतीला कथक नृत्यामध्ये शीतल कोलवलकर आणि मानसी देशपांडे यांनी उत्तम टायमिंग साधत आपली कला दाखवली. या संचाचा शेवट अल्लाखाँच्या काही बंदिशींच्या एकत्रित जुगलबंदीने झाला. याला कळस ठरवला, तो वर्षा ऋतूचे वर्णन करणाऱ्या रचनेने. ढगांचे गडगडणे, वीजा चमकणे आणि कोसळत्या सरी यांचा अनुभव या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांना बसल्या जागी दिला! दुसरे सत्र रंगवायला सुरुवात केली, ती नीलाद्री कुमार आणि पं. कुमार बोस यांच्या सतार-तबला जुगलबंदीने. सुरुवातीला काही वेळ एकल वादन करून त्यांनी वातावरण सुरेल करण्यास सुरुवात केली आणि उत्तरोत्तर मैफलीची शोभा वाढवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या तापमानात वाढ; थंडी गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ३० अंशांवर पोहोचले आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने थंडी जणू गायब झाल्याचेच चित्र आहे. पुण्यात कमाल तापमान ३४.४, तर किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तरेकडील राज्यातील तापमानात सध्या वाढ झाली आहे. तेथून तसेच समुद्राकडूनही राज्यात उष्ण व कोरडे वारे वाहत आहेत. राज्यातील हवामानही कोरडे असल्याने राज्यात तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात लोहगाव येथे ३५.१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. रविवारी राज्यातील सर्वात उच्चांकी कमाल तापमान परभणी येथे (३७.४ अंश सेल्सिअस) तर नीचांकी किमान तापमान जळगाव येथे (११.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. जळगाव येथे ३४.६, सोलापूर येथे ३६.१, नाशिक येथे ३४.६, उस्मानाबाद येथे ३४.८, औरंगाबाद येथे ३४.४ , अकोला येथे ३३.५ तर नागपूर येथे ३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशगंगेची ‘थ्री-डी’ अनुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तारांगणाची अनुभूती देणारा एक प्रकल्प जालना जिल्ह्यातील निमखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील शिक्षक अनिल सोनुने यांनी विकसित केला आहे. त्यासाठी एरवी लागणारा दोन लाख रुपयांचा खर्च स्वतः विकसित केलेल्या तंत्राच्या आधारे पंधरा हजारांवर आणला आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानाच्या आधारे लॅपटॉपवर पाहता येणाऱ्या आकाशगंगेची 'थ्री-डी' अनुभूती दर्शक म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्या घेत आहेत, हेही विशेष!
राज्याच्या शिक्षण खात्याने पुण्यात आयोजित केलेल्या 'शिक्षणाची वारी' या उपक्रमाच्या माध्यमातून सोनुने यांनी राज्यभरातील निवडक शिक्षक आणि खात्यातील अधिकाऱ्यांसमोर हा प्रकल्प मांडला होता. या निमित्ताने सोनुने यांनी 'मटा'ला आपल्या या प्रकल्पाची माहिती दिली. हा 'थ्री-डी' व्ह्युअर डोळ्यावर गॉगलसारखा बसविता येतो. त्यानंतर तारांगणासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर लॅपटॉपवरून सुरू केले, की माउसचा मोजका वापर करून आपण बसल्या जागी तारांगणाची भटकंती करू शकतो. 'शिक्षणाच्या वारी'दरम्यान सात हजारांवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शाळांना तारांगण उभारणे ही न परवडणारी बाब आहे. शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये तारांगण दाखविण्यासाठी आणणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही खर्चिक बाब ठरते. या दोन्हीवर तंत्रज्ञानाधारित पर्याय शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे सोनुने यांनी सांगितले. सोनुने म्हणाले, 'तारांगणाच्या अभ्यासासाठी वापरले जाणारे 'वर्ल्ड वाइड टेलेस्कोप' हे सॉफ्टवेअर आणि 'स्टेरिओ व्ह्युअर' हा द्विमितीय चित्राचे त्रिमितीय चित्रामध्ये रुपांतर करू शकणारा 'थ्री-डी व्ह्युअर' एकत्रित वापरून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एरवी या दोन्ही बाबींचा एकत्र वापर करण्यासाठी साधारण दोन-अडीच लाख रुपयांचा खर्च येतो. तो टाळण्यासाठी साइड बाय साइड थ्री-डी हे तंत्रज्ञान वापरून स्वतःचा 'थ्री-डी' व्ह्युअर विकसित केला.'
या पुढील टप्प्यामध्ये हे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित करून, मान आणि डोक्याच्या हालचालींवर नियंत्रित होऊ शकेल, असा थ्री-डी व्ह्युअर तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठीचे काम यापूर्वीच सुरू केले असून, या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे माउसच्या वापराविना आकाशगंगेची भ्रमंती करविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिले थकल्याने विद्यार्थी वेठीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यार्थी वाहतूक सेवेची बिले थकल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. ही बिले पालिकेने तातडीने न दिल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. महपालिका शाळेतील विद्यार्थी संख्या वाढून साक्षरतेचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून पीएमपीएमएल; तसेच रिक्षा यांच्याबरोबर करार करण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३०० रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. पालिकेच्या शहरातील २२ विद्यानिकेतन शाळांसाठी पीएमपीएमएलच्या २८ बसमधून २२०० तर ४६ शाळांसाठी रिक्षाच्या माध्यमातून सहा हजार विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. यासाठी महापालिका एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करते. यासाठी शाळांना दिला जाणारा निधी महापालिका प्रशासनाकडे थकित असून हा आकडा एक कोटी ८० लाख रुपयांच्या घरात गेला आहे. विद्यार्थी वाहतूक सेवेची बिले मिळावीत, यासाठी वर्गीकरणाद्वारे ही रक्कम उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी केला. ते म्हणाले, 'फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यावर निर्णय न झाल्यास ९ फेब्रुवारीला आंदोलन केले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व भाषांत आता ‘ग्रीन ऑलिम्पियाड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्राच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून देशपातळीवर सर्व भाषांमध्ये 'ग्रीन ऑल्म्पियाड' स्पर्धा आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च पर्यावरण शिक्षणाच्या अर्थसंकल्पातून केला जाईल. तसेच, या स्पर्धेचे पुणे हे प्रमुख केंद्र असेल केंद्र पुणे असेल,' असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी जाहीर केले.

पुणे वन विभाग, तेर पॉलिसी सेंटर आणि अबेदा इनामदार कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'ग्रीन ऑल्म्पियाड' स्पर्धेचे पारितोषिक वितरण जावडेकर यांच्या हस्ते झाले. आझम कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, कॉलेजच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, तेर पॉलिसी सेंटरच्या डॉ. विनिता आपटे, मुख्य वनसंरक्षक जीत सिंह उपस्थित होते.

ऑलम्पिक स्पर्धेसाठी आपला देश कसून तयारी करत आहे. अधिकाधिक पदके देशाकडे खेचून आणण्याचा प्रयत्न खेळाडू करत आहेत. त्यातून 'ग्रीन ऑल्म्पियाड' स्पर्धेची कल्पना पुढे आली, असे जावडेकर यांनी सांगितले. पुण्याला स्मार्ट करण्यासाठी शहरातील प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्पन करावा, असे आवाहन जावडेकर यांनी केले. स्पर्धेमध्ये राज्यातील पाच हजार शाळांमधील सुमारे वीस हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. तीन गटात विजेत्या ठरलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्ले स्टेशन, स्मार्ट फोन आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत घराघरात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करणे, हा स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू होता.

स्पर्धेत साप्लिंग गटात नेविश पाठे, अनिमेश सिंग, देवस्मित मंडल, प्लान्ट गटात प्रगती जाजू, ऋषिकेश जाधव, अंजली मधुमित्र, ट्री गटात रितेश पटेल, योगेश भामे, राहुल तिवारी यांनी प्रत्येक गटात अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. याशिवाय आयसीएम कम्पुटर एज्युकेशन, पार्थ पब्लिक स्कूल, स्कूल ऑफ आर्ट कॉलेज या संस्थांना फिरते करंडक पारितोषिक म्हणून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रश्न सुटण्याचा मार्ग सुकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड
सासवडच्या कचराप्रश्नी एकत्र येऊन मार्ग काढण्यासाठी प्रथमच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्यात शालेय स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावर जाहीर चर्चा झाली. मुख्याधिकारी, प्रांत व जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावण्यात येणार असून अनेक वर्षांपासूनची कचरा कोंडी सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

स्वामी विवेकानंद संस्थेच्या पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने राज्यमंत्री विजय शिवतारे, भोर उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक भरते, संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, प्राचार्य, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप उपस्थित होते. शिवतारे यांनी भाषण सुरू करताच समोरील कचरा डेपोला रविवार असल्याने आग लावण्यात आली होती. त्याचा धूर आणि दुर्गंधी सभास्थानी पोहोचल्याने उपस्थितांना त्याचा त्रास होत होता. त्यावेळी शिवतारे यांनी आपले भाषण थेट कचरा प्रश्नाकडे वळविले. तेवढ्यात नगराध्यक्षा जगताप यांचे थोड्या उशिराने व्यासपीठावर आगमन झाले. या वेळी शिवतारे यांनी, 'कचराप्रश्नी योग्य निर्णय घेऊन वाघ डोंगर परिसरात १० गुंठे जागा उपलब्ध करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घेऊन उच्चस्तरीय बैठक बोलावतो. आपण सहकार्य करावे,' अशी अपेक्षा जगताप यांच्याकडे व्यक्त केली. सासवडच्या कचराप्रश्नी आपण अनेक वेळा पालिकेकडे लेखी पत्रव्यवहार केला. परंतु, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, असे शिवतारे म्हणाले.

सासवडचा कचरा डेपो-प्रक्रिया उद्योग कुंभारवळण येथे हलवण्यास स्थानिक नागरिक आणि जिल्हा परिषदेचा विरोध आहे. आपणही या विरोधात आहोत, असे शिवतारे यांनी सांगितले. आपण १० गुंठे अथवा अर्धा एकर जागा सुचवावी ती मिळवून देण्याच्या मी शासन पातळीवर प्रयत्न करीन. पण यात राजकारण आणू नका, असेही शिवतारे म्हणाले.

'राजकारण नाही...'

आम्ही यात राजकारण करणार नाही. कुंभारवळण येथील नियोजित प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे सासवड परिसरात गायरान जागा सरकारकडून मिळवून द्यावी. त्यावर कंपोस्ट खत प्रकल्प करण्यास आम्ही तयार आहोत, असे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरुनगर परिषदेत संगणकीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
'ई गव्हर्नन्स'अंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासाठी नवनिर्मित राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये संगणकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या २३ मार्चला हुतात्मा शिवराम राजगुरू यांच्या जयंतीच्या दिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे व मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन सहस्त्रबुद्धे यांनी दिली.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने या प्रकल्पासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. संगणकीकरणामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, गतीमानता व अचूकता येईल, असे थिगळे यांनी सांगितले. पुणे येथील डीएसएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राजगुरुनगर नगरपरिषदेला उपयुक्त अशी सर्व विभागासाठीची मोड्युल उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर प्रणाली दिली आहे. यामध्ये जन्म आणि मृत्यू विभाग, मूल्यांकन विभाग, पाणीपट्टी विभाग, अन्न परवाना विभाग, व्यवसाय परवाना विभाग, लेखा विभाग, तक्रार निवारण सेवा, युजर ऑथेंटिकेशन मोड्यूल, वेब पोर्टल, सीएफसी विभाग, शहर नियोजन विभाग, विवाह नोंदणी विभाग, कर विभाग, भांडार विभाग आणि आस्थापना अशा १५ मोड्यूल्सचा समावेश आहे. या प्रणालीसोबत ऑनलाइन वेब अॅप्लिकेशन (५४ सेवा), मोबाइल अॅप्लिकेशन आणि डायनामिक वेब पोर्टल सेवा कंपनीकडून नगरपरिषदेला पुरविली जाणार आहे. या सॉफ्टवेअरसाठी संबंधित कंपनी मोफत सेवा पुरविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या रिक्षा परमिटसाठी व्हेरिफिकेशन आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी रिक्षांसाठी नव्याने परवाने (परमिट) देताना संबंधिताची चारित्र्य पडताळणी आवश्यक असते. आतापर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल आहे किंवा नाही याचे प्रमाणपत्र संबंधितांना पोलिसांकडून घेऊन परिवहन विभागाला द्यावे लागत होते. मात्र, यापुढील काळात संबंधितांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल पोलिसांकडून थेट परिवहन विभागाला पाठविण्यात येणार आहे. रिक्षाचालकांना होणारा त्रास वाचावा यासाठी संबंधितांची चारित्र्य पडताळणीचा अहवाल परिवहन विभागाने पोलिसांकडून परस्पर घ्यावा, अशी मागणी रिक्षा पंचायतीकडून केली जात होती. पुणे पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. यापुढे केवळ कागदपत्र एकदा सादर केल्यानंतर चारित्र्य पडताळणीचा अहवाल पोलिस परिवहन विभागाला पाठवणार आहे. रिक्षा पंचायतीने जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व परिवहन विभागाकडे केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. आता परवाना मिळणाऱ्यांच्या यादीतील रिक्षाचालक उमेदवारांवर दखलपात्र गुन्हे दाखल आहे का या विषयी पुणे पोलिसांच्या वतीने थेट परिवहन विभागालाच माहिती दिली जाणार आहे. आतापर्यंत १,२०० जणांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल परिवहन विभागाला (आरटीओ) पाठविण्यात आला आहे. तर अजून सुमारे १२०० जणांची चारित्र्य पडताळणी बाकी आहे. रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी याबाबत मागणी केली होती. पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त पिटर लोबो यांची भेट घेतली. त्यानंतर लोबो यांनी संबंधितांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल थेट आरटीओला पाठविण्यास संमती दर्शविली. त्यामुळे यापुढील काळात रिक्षाचालकांची ससेहोलपट थांबणार असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. चारित्र्य पडताळणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, अनेक वर्षे रिक्षाचालक म्हणून प्रवासी सेवा देणाऱ्या ज्येष्ठ रिक्षाचालकांना प्राधान्याने परवाने द्यावे. त्यासाठी लॉटरी पद्धतीने रिक्षा परवाना वाटपाचा गांभिर्याने फेरविचार करावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना रिक्षा परवाने देण्याच्या जोडीला आपल्या हयातीत रिक्षाची प्रवासी सेवा देणाऱ्या आणि अकाली मरण पावलेल्या रिक्षाचालकांच्या विधवा पत्नींनाही परवान्यात प्राधान्य मिळावे, यासाठी रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाचा विषयही मार्गी लावावा आदी प्रश्न प्रलंबित असल्याचे पवार यांनी सांगितले. चारित्र्य पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि फी भरण्यासाठी पोलिसांना आयुक्तालयात एकदाच यावे लागेल. त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल आरटीओला थेट पाठविला जाणार आहे, असे सहायक पोलिस आयुक्त पीटर लोबो यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११८ वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे चोरीच्या ११२ गुन्ह्यांमध्ये त्याला विविध कोर्टाकडून तब्बल ११८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली...या सर्व शिक्षा एकत्र करून त्याविरुद्ध अपील करण्यात आले...कोर्टाने त्याला साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली...जेलमध्ये तो साडेसात वर्षांहून अधिक काळ राहत असल्यामुळे त्याची कोर्टाकडून सुटका करण्यात आली...पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जेलमध्ये कायदेविषयक मदत देण्यासाठी नेमण्यात आलेल्या वकिलामुळे त्या ६६ वर्षीय अपंग आरोपीची सुटका झाली. रवी गोपाळ शेट्टी (रा. विश्रांतवाडी, मूळ रा. मेंगळुरू) असे सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे. शेट्टीविरुद्ध पुण्यातील जवळपास सर्व पोलिस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला २००७ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध विविध कोर्टात चोरीच्या गुन्ह्यांची सुनावणी झाली. या विविध कोर्टाकडून त्याला तब्बल ११८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शेट्टी चोरीच्या गुन्ह्यात एकदा पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना त्याच्या कंबरेला मार लागला होता. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. विविध कोर्टाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षा एकत्र करून आपल्याला कमी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शेट्टीने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली. जेलमधील कैद्यांना कायदेविषयक मदत मिळावी म्हणून प्राधिकरणातर्फे जेलमध्ये जेल ड्युटी कौन्सिल नियुक्त करण्यात आले आहेत. शेट्टीतर्फे जेल ड्युटी कौन्सिल अॅड. अतिश लांडगे यांनी काम पाहिले. शेट्टीला विविध गुन्ह्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षा ११८ वर्षांहून अधिक होत्या. त्याच्या सर्व शिक्षा एकत्र करून त्याच्याविरुद्ध कोर्टात अपील दाखल करण्यात आले. कोर्टाने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षा कमी करून त्याला साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली. शेट्टी जेलमध्ये साडेसात वर्षांहून अधिक काळ असल्याचे अॅड. लांडगे यांनी कोर्टाला सांगितले. कोर्टाने शेट्टीची जेलमधून सुटका करण्याचा आदेश दिला. जेलमधून सुटका झाल्यानंतर तो आपल्या मूळ गावी परत गेला, अशी माहिती अॅड. लांडगे यांनी दिली. जेलमध्ये असलेल्या कैद्यांना अनेकदा वकील नेमणे शक्य होत नाही. तसेच, त्यांना कायदेविषयक माहिती नसते. त्यामुळे त्यांना अधिक काळ जेलमध्ये राहावे लागते. जेल ड्युटी कौन्सिलकडून कैद्यांना कायदेविषयक मदत केली जाते. त्याचे समुपदेशनही करण्यात येते. जेलमध्ये दिवसाला ३०-४० कैद्यांकडून कायदेविषयक मदतीसाठी जेल ड्युटी कौन्सिलकडे चौकशी करण्यात येते, असे अॅड. लांडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेत निकृष्ट आहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
जनावरे देखील तोंड लावणार नाहीत असे निकृष्ट दर्जाचे जेवण चिखलगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुला-मुलींना दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खेड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या या आश्रमशाळेच्या वसतिगृहात एकूण १३० विद्यार्थी राहत असून यामध्ये ९० मुली आणि ४० मुलांचा समावेश आहे. रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी हरभरा, वाटाणा व चवळी ही कडधान्ये किडलेली, बुरशीयुक्त असल्याचे समोर आले आहे. या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. किड्यांनी पोखरलेली ही कडधान्ये विद्यार्थ्यांना खायला दिली जात आहेत. तांदळाचा दर्जा देखील चांगला नाही. वसतिगृहात वरण बनवण्यासाठी वापरली जाणारी मूग डाळही भेसळयुक्त आहे. चपात्यांसाठी वापरले जाणारे पीठ निकृष्ट गव्हाचे आहे. मात्र, उपाशी राहण्यापेक्षा नाईलाजाने हे अन्न खाण्यावाचून येथील विद्यार्थ्यांसमोर पर्याय नाही. आदिवासी विकास महामंडळ, जुन्नर आणि घोडेगाव येथून या मालाचा पुरवठा केला जातो. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या या आदिवासी मुलांना खराब अन्न देऊन त्यांची कुचेष्टा करण्याचाच हा प्रकार आहे.

समस्यांचा डोंगर
- स्वयंपाकासाठी कर्मचारी असूनही वसतिगृहातील मुलींकडून कामे करून घेतली जातात.
- स्वयंपाकाच्या खोलीत अस्वच्छता. धान्य व स्वयंपाकाचे साहित्य ठेवलेल्या जागी उंदीर, घुशींचा सुळसुळाट झाला आहे.
- वसतिगृहात अंघोळीची सोय नाही. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना आरला नदीवर आंघोळीसाठी जावे लागते.
- शाळेच्या कार्यालयात चार सौर कंदील धूळ खात पडलेले आहेत.
- आश्रमशाळेला स्वमालकीची इमारत नाही. भाडेतत्वावर घेतलेल्या खोल्या आणि शेजारच्या एका मंदिरात शाळा भरते. याच जागेत आणि मंदिरात मुला-मुलींना झोपावे लागते.
- मुलांना शाळेचे गणवेश मिळालेले नाहीत.

शौचालय नाही

वसतिगृहात शौचालय नाही. त्यामुळे प्रातःविधीठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बाहेर जावे लागते. हा भाग दुर्गम असल्याने परिसरात जंगली श्वापदे, साप यांचा वावर असतो. गेल्या वर्षी याच वसतिगृहातील एका मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही शाळा व्यवस्थापन समिती, आदिवासी विकास महामंडळाला जाग आलेली नाही.

पोषण आहार कागदावरच

वसतिगृहातील मुलांना रोज सकाळी न्याहरीसाठी सफरचंद, केळी, अंडी दिली जातात, असा दावा शाळा व्यवस्थापनाने केला आहे. मात्र, हा आहार रोज दिला जात नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मटणही खायला मिळालेले नाही, असे मुलांनी सांगितले. महिन्यातून एकदा मुलांना खाण्यासाठी मटण देणे बंधनकारक आहे. मात्र, आश्रमशाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगले जेवण दिले जाते. जेवणाबाबत कुणाचीही तक्रार नाही. आश्रमशाळेला स्वतःची इमारत नाही, हीच आमची प्रमुख समस्या आहे, असे या शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. नागरगोजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवेत त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीला फटकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका हॉलिडेज कंपनीकडून सभासदत्व घेतल्यानंतरही करारात नमूद करण्यात आलेल्या सेवा न दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने कंपनीला फटकारले आहे. संबंधित कंपनीने रक्कम वसूल केली; मात्र तक्रारदाराला कोणतीही सेवा दिली नाही ही त्रुटी असल्याचे स्पष्ट करून एक लाख ६१ हजार रुपये परत करण्याचा आदेश दिला आहे. पुणे​ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी निखील मर्चंट, अमोल मर्चंट (दोघे रा. क्लोव्हर वॉटरगार्डन, कल्याणीनगर) यांनी दावा दाखल केला होता. त्यांनी गोलेश्युअर इंटरनॅशनल हॉलिडेज प्रा. लि​. सेनापती बापट रोड, डायरेक्टर आशिष जगताप, दत्तप्रसाद मोरे, विशाल भोर, जनमाहिती अधिकारी विरेन्द्र सिंग, टेक ओव्हर मॅनेजर स्नेहा तांबके, सेल्स एक्झिक्युटिव्ह रोहित यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.

तक्रारदारांनी गोलेश्युअर इंटरनॅशनल हॉलिडेजचे २१ डिसेंबर २०१४ रोजी सभासदत्व घेतले होते. या योजनेमध्ये सभासदाला दहा वर्षापर्यंत सहलीचा कार्यक्रम, विमानतळ ते रिसॉर्ट मोफत, समारंभ साजरा करण्यासाठी सभागृहाची सोय आणि दोन प्रौढांसाठी व्यायामशाळा सुविधा देण्याचे करारात नमूद करण्यात आले होते. तक्रारदारांनी विरुद्ध पक्षाला एक लाख ५५ हजार रुपये दिले. तसेच वार्षिक देखभाल खर्चापोटी सहा हजार रुपये दिले होते. तक्रारदारांना सभासदत्व कार्ड देण्यात आले. मात्र, करारानाम्यात नमूद केलेल्या कोणत्याही सोयीसुविधा तक्रारदारांना मागणी करूनही देण्यात आल्या नाहीत. एका तक्रारदार सदस्याला जीमचा लाभ मिळू शकला नाही. तक्रारदारांनी ई-मेल पाठवूनही कोणत्याही हॉटेलचे बुकिंग त्यांना देण्यात आले नाही. तक्रारदारांनी लग्नानंतर हनिमूनसाठी हॉटेल बुकिंगची मागणी करूनही त्यांना हॉटेल उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यांना सात दिवसांच्या सुटीसाठी ४० हजार रुपये गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आले होते. महाबळेश्वर येथे अतिशय निकृष्ठ दर्जाचे हॉटेल त्यांना देण्यात आले होते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यांना सेवा देण्यात आली नाही. याप्रकरणी तक्रारदारांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. तक्रारदारांनी मंचापुढे करारनामा आणि ई-मेल व्यवहाराचा प्रती सादर केल्या. या प्रकरणी पक्षाने विविध सोयीसुविधांचे प्रलोभन दाखवून तक्रारदारांकडून एक लाख ६१ हजार रुपयांची वसूल केली. मात्र, त्यांना सेवा देताना त्रुटी ठेवली. तक्रारदारांना कोणतीही सेवा मिळाली नसल्यामुळे त्यांनी भरलेले शुल्क आणि देखभाल खर्च त्यांना परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच, तक्रारदारांना एक लाख ६१ हजार रुपये परत देण्याचा ग्राहक मंचाने आदेश दिला. नुकसानभरपाई आणि तक्रारीच्या खर्चापोटी १५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आकारपड’जमीन शेतकऱ्यांना परत देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शेतसारा भरण्याइतकीही आर्थिक ऐपत नसलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या सरकारजमा करण्यात आलेल्या 'आकारपड' जमिनी त्यांना परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील अशी ६० ते ७० एकर जमीन या शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मि‍‍ळणार आहे. यशदा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यातल्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेनिमित्त महसूल मंत्री एकनाथ खडसे पुण्यात आले आहेत. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आकारपड जमिनीबरोबरच कोकणातील बेदखल कुळांच्यादेखील नावावर जमीन केली जाणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या अनेक शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची रक्कमही भरता आलेली नाही. अशा शेतकऱ्यांच्या जमिनींवर 'आकारपड' अशी नोंद घालून त्या सरकारजमा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सुमारे साठ ते सत्तर हजार एकर जमीन अशा पद्धतीने सरकारजमा झाली आहे. शेतसाऱ्याची क्षुल्लक रक्कम भरण्याइतकीही आर्थिक ताकद नसलेल्या शेतकऱ्यांना या जमिनीवर पाणी सोडावे लागले आहे. ही सर्व आकारपड जमीन आता पुन्हा मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे खडसे यांनी सांगितले. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी पंचवीस ते तीस हजार एकर जमीन आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागात आकारपड जमिनींचे प्रमाण अधिक आहे. या जमिनी आता संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर केल्या जाणार आहेत. कोकणामध्ये बेदखल कुळांची संख्या अधिक आहे. या जमिनींवर कुळ लागले आहे. परंतु त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर लागलेले नाही. कोकणातील अशी सुमारे एक लाख एकर जमीन बेदखल कुळांच्या नावावर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शैक्षणिक तसेच अन्य कारणांसाठी वाटप झालेल्या सरकारी जमिनींचा वापर व्यापारी व तत्सम कामांसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शर्तभंग झालेल्या जमिनींवर पुन्हा सरकारचे नाव लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकारचे नाव लावल्यानंतर जमीन वाटप झालेल्या संबंधित संस्थांच्या अपिलांवर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, आरक्षित जमिनींचा वापर वेळेत न झाल्यास त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचेही महसूल मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी महाविद्यालयांची तपासणी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील खासगी कृषी महाविद्यालये, कृषी शाळा आणि कृषी तंत्रनिकेतने यांच्या कारभाराची आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फतही तपासणी केली जाणार आहे. कृषी महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी परिषदेने हा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने आता निकृष्ट दर्जाच्या महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सरकारी कृषी महाविद्यालयांची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत दर पाच वर्षांतून एकदा तपासणी करण्यात येते. खासगी कृषी महाविद्यालयांची तपासणी संबंधित विद्यापीठांकडून केली जाते. त्या तपासणीमध्ये 'क' आणि 'ड' दर्जा मिळालेल्या खासगी कृषी महाविद्यालये, कृषी शाळा आणि कृषी तंत्रनिकेतने यांची तपासणी आता परिषदेमार्फत केली जाणार आहे.

'राज्यात खासगी कृषी महाविद्यालये, कृषी शाळा आणि कृषी निकेतन यांना परवानगी ​देण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी परिषदेमार्फतही तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात येणार आहेत. त्या पथकांमध्ये एक सदस्य हे अन्य विद्यापीठांतील संचालक असणार आहेत.' असे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी सांगितले.

'परवानगी देण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय, वसतिगृह आणि अन्य अत्यावश्यक सुविधा आहेत का, हे तपासले जाणार आहे. विद्यापीठांनी 'क' आणि 'ड' दर्जा दिलेल्या महाविद्यालयांची सुरुवातीला तपासणी होणार आहे,' असेही डॉ. खर्चे म्हणाले. राज्यातील चार कृषी विद्यापाठांतर्गत मराठी माध्यमाची ७७ कृषी पदविका विद्यालये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना वजनकाटा; ना माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'एलपीजी'सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या गॅस एजन्सीच्या बहुतांश कर्मचाऱ्यांकडे सिलिंडरचे वजन मोजून दाखविण्यासाठी वजनकाटा उपलब्ध नाही, तसेच, रिकाम्या सिलिंडरचे वजन किती व एलपीजी भरलेल्या सिलिंडरचे वजन किती याची माहिती देखील काही कर्मचाऱ्यांना नसल्याचे सोमवारी निदर्शनास आले. तर, अपवादात्मक स्थितीतच ग्राहकांसमोर सिलिंडरचे वजन करून दाखविले जात असल्याचे ग्राहकांनी दिलेल्या माहितीद्वारे स्पष्ट झाले. एलपीजी सिलिंडरचे वजन प्रमाणित वजनापेक्षा कमी असल्याच्या तक्रारी राज्यभरातून वैधमापन विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर राबविलेल्या कारवाई मोहिमेत कमी वजनाचे सिलिंडर आढळून आले. तसेच, अनेक ठिकाणी सिलिंडरचे वजन करण्यासाठी वजनकाटाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर 'मटा'ने सोमवारी शहरात काही ठिकाणी गॅस वितरणाच्या कामाकाजाची पाहणी केली, तसेच गॅस वितरकांच्या सर्व्हिसविषयी ग्राहकांशी संवाद साधला. कोंढवा येथे राहणाऱ्या राणी जाधव यांनी सांगितले की,'गॅस डिलिव्हरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे यापूर्वी कधीही वजनकाटा असल्याचे निदर्शनास आले नाही. मागच्या महिन्यात सिलिंडर नेहमीपेक्षा लवकर संपला होता. सिलिंडरचे वजन करून द्या, अशी मागणी केली. तर, काय मॅडम, आमच्यावर विश्वास नाही का,'असा प्रतिप्रश्न करून, 'थंडीमुळे सिलिंडर लवकर संपला असेल,'असेही त्यांनी सांगितले. 'आम्ही मागणी करतो म्हणून केवळ आमचा सिलिंडर वजन करून दिला जातो. मात्र, आमच्या सोसायटीतीतील इतर रहिवासी देखील मागणी करीत नाहीत. आणि गॅस वितरक कर्मचारीही स्वतःहून सिलिंडरचे वजन करून देत नाहीत,'अशी माहिती अनंत ढगे यांनी दिली. शनिवारवाड्याच्यासमोरील बाजूस असलेल्या राजहिरा रेसिडेन्सीच्या येथे गॅस डिलिव्हरीसाठी एका कंपनीचे कर्मचारी छोटा टेम्पो घेऊन आले होते. कर्मचारी सिलिंडर घेऊन गेला व दुसरा कर्मचारी गाडीजवळ उभा होता. त्या कर्मचाऱ्याकडे 'मटा' प्रतिनिधीने सिलिंडरचे वजन, वजनकाटा या विषयी चौकशी केली असता, तो दुसरा कर्मचारी वजनकाटा घेऊन गेला आहे, असे त्याने सांगितले. वास्तविक, सिलिंडर घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्याकडे वजनकाटा नसल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, त्या कर्मचाऱ्याला भरलेल्या व रिकाम्या सिलिंडरचे वजन किती असते, हे देखील सांगता नाही आले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए’च्या परीक्षेचा निकाल चार टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए अभ्यासक्रमातील इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल अवघा चार टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४.१४ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

नोव्हेंबर २०१५मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी दोन्ही ग्रुपची परीक्षा ५० हजार ८९२ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २१०८ म्हणजेच केवळ ४.१४ टक्के विद्यार्थीच यशस्वी झाले.

पहिल्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १२.७२ टक्के, तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्यांपैकी १०.६९ टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरले. या परीक्षेत काठमांडूच्या प्रणव प्रतीक तुलसीयान या विद्यार्थ्याने ७७.७१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नवी दिल्ली येथील अभिषेक अगरवाल याने ७७ टक्के मिळवत द्वितीय, तर दिल्लीच्याच आयुषी गोयल हिने ७६.४३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला, अशी माहिती आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष यशवंत कासार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी पार्श्वभूमीवर ‘संवाद यात्रा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळ आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे 'शेती पाणी रोजगार संवाद' यात्रा आयोजित करण्यात आली आहे. येत्या ४ फेब्रुवारीला नांदेड येथून ही यात्रा सुरू होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर मार्चमध्ये ही यात्रा सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जाणार आहे.

शोषित, उपेक्षित आणि दुष्काळपिडीत शेतकऱ्यांच्या समुहाशी संवाद साधून दुष्काळ निर्मूलनासाठी मार्गदर्शन करणे आणि पाणलोट क्षेत्र विकास आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने कृती कार्यक्रम आखणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पाणी आणि शेती विषयाशी निगडीत संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक यामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेती, पाणी रोजगार संवाद यात्रेची सुरुवात नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये होणार असून प्रा. देसरडा यांचे बीजभाषण होणार आहे. पुढे महिनाभर परभणी येथील कृषी विद्यापीठांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर मधील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. देसरडा यांच्याबरोबरच कृष्णा हरिदास आणि महादेव भूईभार यांनी यात्रेचे नियोजन केले आहे.

गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. धनंजय गाडगीळ यांनी १९५२मध्ये महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळ स्थापन केले. पुढे १९७२च्या दुष्काळात या मंडळाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. सध्या एन. डी. पाटील हे या मंडळाचे अध्यक्ष असून डॉ. सुलभा ब्रह्मे या कार्यवाह आणि एच. एम. देसरडा हे उपाध्यक्ष आहेत.

पाणलोटक्षेत्र विकासाचा संदेश

दुष्काळाशी सामना करण्यासाठी सध्या वाहून जाणाऱ्या मातीला अडविणे, शेतीतील जैवविविधता टिकवणे, वृक्षाच्छादनाचे संरक्षण आणि पावसाचे पाणी मुरवणे ही आव्हाने आहे. जमिनीवर मातीचा एक इंच थर निर्माण होण्यास पाचशे वर्षे लागतात आणि धक्कादायक बाब म्हणजे आपल्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी ६० कोटी टन माती वाहून जाते आहे. मोनोकल्चर शेतीपद्धतीने पारंपरिक पिकांचे प्रमाण खूप कमी झाले असून जमिनीची गुणपत्ताही ढासळते आहे. जलसंवर्धनासाठी माथा ते पायथा या संकल्पनेनुसार काम केले, तरच पाणलोटक्षेत्र विकास यशस्वी होणार आहे, यांसह विविध मुद्द्यांवर यात्रेदरम्यान मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे देसरडा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images