Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महामंडळ छापणार भाषण

0
0

प्रत हाती न पडल्यास उपोषणाचा सबनीसांचा पवित्रा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संमेलनाध्यक्षांचे भाषण छापण्यास टाळाटाळ करणाऱ्या साहित्य महामंडळाने अचानक 'यू टर्न' घेऊन श्रीपाल सबनीस यांचे भाषण तत्परतेने छापण्यास दिले आहे. या भाषणाच्या छापील प्रति आज, प्रजासत्ताक दिनी हातात पडाव्यात या दृष्टीने महामंडळाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या हेतूवरच शंका उपस्थित करून छापील भाषण हातात पडले तर 'प्रकाशन' नाही तर 'उपोषण' असा पवित्रा घेतला आहे.

संमेलनाध्यक्षांचे भाषण छापण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ उत्सुक नव्हते. त्यामुळे संमेलनात स्वतः भाषण छापण्याची वेळ संमेलनाध्यक्षांवर ओढवली. २६ जानेवारीपर्यंत भाषण छापले नाही, तर साहित्य परिषदेसमोर उपोषण करू असा इशारा सबनीसांनी दिल्यानंतर 'मार्च महिन्यात होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत विचार करू, भाषण छापण्याची सक्ती महामंडळाला नाही,' अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, संमेलनाध्यक्षांच्या उपोषणाची वेळ जवळ येऊ लागताच महामंडळाने भूमिका बदलून भाषण छपाईसाठी दिले आहे.

संमेलनाध्यक्षांच्या उपोषणाचा इशारा गांभीर्याने घेऊन भाषण छापण्यास दिल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 'पदाधिकाऱ्यांवर आपला विश्वास नाही. भाषण आधी हातात पडू द्या, भाषणाची प्रत मिळाली तर प्रकाशन करू अथवा उपोषणाची सर्व तयारी झाली आहे,' असे डॉ. सबनीस यांनी सोमवारी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

'आपण खानदेशाच्या दौऱ्यावर असताना महामंडळाचे घरी पत्र आले. त्यामध्ये भाषण छापण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे, त्यावर महामंडळाच्या मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. आता अचानक भाषण छापण्याचा निर्णय घेऊन महामंडळाने कोलांटी उडी कशी मारली', असा प्रश्न सबनीस यांनी उपस्थित केला. भाषण छापले तर महामंडळाचे स्वागत करू. महामंडळाच्या भाषण प्रतींसह सह्याद्री फाउंडेशन आणि साहित्यवेध प्रतिष्ठानने छापलेल्या अकराशे प्रतींचे प्रकाशन करू अथवा बुधवारी 'उपोषण' करण्यात येईल, असे सबनीस यांनी सांगितले. हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहून उपोषणाला बसणार असल्याचे सबनीस यांनी स्पष्ट केले.


संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे भाषण छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषणाच्या एक हजार प्रती छापण्यात येतील. सबनीस यांनी संमेलनादरम्यान छापलेल्या भाषणाची रक्कम दिलीपराज प्रकाशन भरणार आहे.

- प्रकाश पायगुडे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांतील अवलिया ‘टेक्नोमॅन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिस्थितीमुळे 'एफवाय बीएस्सी'चे शिक्षण अर्धवट सोडून पोलिस खात्याची वाट धरलेले पोलिस हवालदार रवींद्र इंगवले, पुणे पोलिसांचे 'टेक्नो मॅन' म्हणून ओळखले जातात. या अवलियाने पोलिस खात्याच्या कार्यालयीन कामकाजासाठी तब्बल २४ सॉफ्टवेअर विकसित केली. इंगवले यांच्या कार्याची दखल 'नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरो'ने (एनसीआरबी) घेत त्यांचा नुकताच गौरवही केला आहे.

खडकवासल्याजवळील नांदेड गावचे इंगवले यांनी परिस्थितीचा विचार करून 'आयटीआय'चा कोर्स केला आणि ते वायरलेस विभागात १९९४ साली रुजू झाले होते. सुरुवातीची पाच वर्षे त्यांनी मुंबई पोलिस दलात नोकरी केली. पुण्यात आल्यानंतर त्यांना कॉम्प्युटरचे भावविश्व खुणवत होते. पहाटे लवकर उठून ते सी-डॅकचा कोर्स करू लागले. दिवसभर नोकरी आणि सकाळच्या सत्रात कोर्स, असा त्यांचा जवळपास पाच वर्षे शिरस्ता होता. कॉम्प्युटरच्या घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी पोलिस खात्यासाठी करायचा ठरवला. वायरलेस विभागात त्यावेळी भरती निघाली होती. त्यासाठी ८० हजार उमेदवारांनी अर्ज केले. या अर्जांचे डिजिटलायझेशन त्यांनी केले आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरली.

इंगवले यांच्या 'कम्प्लेंट अॅ​प्लिकेशन मॅनेजमेंट सिस्टीम' या सॉफ्टवेअरला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. दिल्ली येथील 'नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरो' (एनसीआरबी) येथे त्यांनी सॉफ्टवेअरचे सादरीकरण केले. १९ विभागांतून आलेल्या ४८ सॉफ्टवेअरमधून इंगवले यांच्या सॉफ्टवेअरची निवड झाली. इंगवले यांनी विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमुळे पोलिस दलातील शिपाई, लिपिक यांची कामे सुटसुटीत झाली आहेत. प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून इंगवले यांनी ही सॉफ्टवेअर विकसित केली आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेत त्यांचे परवाने मिळू लागले आहेत. इंगवलेंच्या या कार्यामुळे लाखो रुपयांची बचत तर झाली आहेच, मात्र वेळेत आणि पारदर्शकपणे कामे करण्यावर भर वाढला आहे.



रवींद्र इंगवले यांनी बनवलेले सॉफ्टवेअर

- पुणे पोलिसांच्या निवासस्थानाची इत्थंभूत माहिती

- २९ हजार शस्त्र परवान्यांचे डिजिटलायझेशन

- परकीय व्यक्तींच्या व्हिसा एंट्रीचे सॉफ्टवेअर

- पासपोर्टवर ऑनलाइन एंट्री

- पोलिस मित्रांचे डिजिटलायझेन

- 'एसआरपीएफ' गट क्रमांक ११ मधील कर्मचाऱ्यांची सर्व्हिस शीट डिजिटलायझेशन

- सायबर कॅफे परवाने मराठीत विकसित

- पे-स्लिप सॉफ्टवेअर

- पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती डिजिटाइज्ड

- पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सॉफ्टवेअर

- महाराष्ट्रातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांसाठी अंतिम परीक्षेचे डिजिटलायझेशन

- बिनतारी विभागात सात हजार उपकरणांची खरेदी, वितरण यासाठी सॉफ्टवेअर

- २००५साली बिनतारी संदेश विभागात भरतीसाठी आलेल्या ८० हजार अर्जांचे डिजिटलायझेशन

- हॉटेल परवाना डिजिटायझेशन

- शस्त्र, दारूगोळा वाहतूक परवाना. वॉटरमार्कसह परवाना देण्यात येतो

- लिपिकांसाठी कार्यविवरण सॉफ्टवेअर

- पोलिस पडताळणीसाठीचे सॉफ्टवेअर

- वर्ग चार कर्मचारी, जीपीएफ स्लिप मिळत नव्हती. ती ऑनलाइन करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी ठणठणीत; सदिच्छांबद्दल आभार!: शरद पवार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'माझी प्रकृती उत्तम असून मी ठणठणीत आहे. आपल्या सदिच्छांबद्दल आभारी आहे,' अशा शब्दांत ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: आपल्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे.

मूत्रपिंडाचा त्रास होत असल्यानं आणि त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं रविवारी संध्याकाळी शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांची तपासणी केली. त्यांचा रक्तदाब स्थिर असून पुढील दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही, असं रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं. असं असतानाही आज व्हॉट्सअॅपवरून पवारांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळे संदेश पसरवले जात होते. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला होता.

शरद पवार यांनी स्वत: ट्विट करून या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याशिवाय, पवार यांच्याबाबतचा रुग्णालयातील एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवार हे त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व इतर काही सहकाऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही पवार यांची प्रकृती चांगली असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांना डिस्चार्ज, विश्रांतीचा सल्ला

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुणे येथील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी पुढील काही दिवस पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी सायंकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच मंगळवारी त्यांच्या प्रकृतीबाबत अचानक वावड्या उठवण्यात आल्या असता खुद्द पवारांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगून लोकांच्या सदिच्छांबद्दल आभार व्यक्त केलं होतं. पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही पवारांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल असल्याचे स्पष्ट करून त्याला दुजोरा दिला होता.

दरम्यान, आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रुग्णालयाबाहेर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. 'डॉक्टरांनी मला ८ ते १० दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र, एकाच जागी एवढे दिवस बसणं मला जमेल असं वाटत नाही. पुढचे दोन महिने तरी आता सुट्टी घ्यायची नाही. विश्रांतीचं काय करायचं ते बघू', असं हसतच पवार म्हणाले.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवार मुंबईकडे रवाना झाले असून लवकरच ते मराठवाड्याचा दौरा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचं निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ज्येष्ठ समीक्षक आणि पुण्यात झालेल्या ८३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दत्तात्रेय भिकाजी अर्थात द. भि. कुलकर्णी यांचं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात हृदविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

द.भि. कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ रोजी नागपुरात झाला होता. नागपूर विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयात पी.एच.डी. मिळवली होती आणि रशियन भाषेतील अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती. शिक्षकाचा पिंड असलेल्या द. भि. सरांनी अध्यापन क्षेत्रात भरीव योगदान दिलं. नागपूरच्या विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य शिकवलं, अनेक विद्यार्थी घडवले. कारंजालाड येथे १९९०मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षस्थान सरांनी भूषवलं होतं. त्यांच्या या योगदानाबद्दलच राज्य सरकारने १९९१मध्ये त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानं गौरवलं होतं.

साहित्य शास्त्र हाही डॉ. कुलकर्णी यांचा विशेष आवडीचा-अभ्यासाचा विषय होता. त्यांचे अनेक संशोधनात्मक आणि समीक्षात्मक ग्रंथ गाजले. 'दुसरी परंपरा', 'जी.एं.ची महाकथा', 'हिमवंतांची सरोवरे', 'ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद', 'पार्थिवतेचे उदयास्त', 'महाकाव्य : स्वरूप व समीक्षा' (प्रबंध), 'पहिली परंपरा', 'पहिल्यांदा रणांगण', 'मेरसोलचा सूर्य' (कवितासंग्रह), 'समीक्षेची सरहद्द', 'समीक्षेची वल्कले', 'ज्ञानेश्वरांची प्रतीती विश्रांती' या समीक्षा ग्रंथांची बरीच प्रशंसा झाली होती. 'प्रतीती विश्रांती' या ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक या संस्थेचा पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार म्हणून त्यांच्या 'कादंबरी : स्वरूप व समीक्षा' या ग्रंथाची निवड करण्यात आली होती. 'अंतरिक्ष फिरलो पण' ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार देण्यात आला होता. न्यूयॉर्कच्या 'हेरल्ड ट्रिब्यून' या वृत्तपत्रातर्फे आयोजित प्रौढांच्या खुल्या कथा स्पर्धेत वयाच्या एकोणिसाव्या वर्षी डॉ. द. भि. यांना पुरस्कार मिळाला होता. त्यांना २००७मध्ये पु. भा. भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तसंच नागपूर विद्यापीठाच्या ना. के. बेहरे सुवर्णपदकावरही त्यांनी नाव कोरलं होतं.

२०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी भूषवलं होतं. यंदा पिंपरीतील साहित्य संमेलनासाठी आले असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीस जिंकले, साहित्य महामंडळ नमले!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण छापण्यावरून साहित्य महामंडळ व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यात सुरू झालेला वाद अखेर शमला आहे. सबनीस यांच्या लिखित भाषणाच्या एक हजार प्रती महामंडळानं छापल्यानं सबनीस यांनी महामंडळाविरोधात उपसलेली उपोषणाची तलवार अखेर म्यान केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळं संमेलनाआधीच सबनीस वादात सापडले होते. त्यामुळं त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचं टेन्शन संमेलनाच्या आयोजकांना होतं. संमेलनातील त्यांचं भाषण सुरळीत पार पडलं. मात्र, लिखित भाषणामुळं वाद होऊ नयेत म्हणून अनेक वर्षांची परंपरा मोडत महामंडळानं अखेरपर्यंत सबनीस यांचं ते भाषण छापलंच नाही. महामंडळाच्या या सेन्सॉरशिपविरोधात सबनीस यांनी जोरदार आघाडी उघडली होती. सुरुवातीला सबनीस यांनी शाब्दिक हल्ले चढवले. मात्र, त्यांना महामंडळाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर सबनीस यांनी महामंडळाला भाषण छापण्यासाठी २६ जानेवारीची मुदत देत २७ जानेवारीपासून सपत्नीक उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.

सबनीस यांच्या या उपोषणास्त्राचा योग्य तो परिणाम होऊन महामंडळानं त्यांच्या भाषणाच्या एक हजार प्रती छापल्या. त्यातील २५ प्रती त्यांनी सबनीस यांच्या घरी पाठवल्या आणि त्यांच्या मुलाकडून पोचपावतीही घेतली. महामंडळाच्या या निर्णयानंतर सबनीस यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसंच, भाषण छापल्याबद्दल महामंडळाचे आभारही मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ अभिनेत्री अरूणा भट यांचे निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

'डार्लिंग डार्लिंग', 'घरोघरी बोंब', 'नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल' अशा धमाल नाटकातून आपल्या अभिनयाने धमाल उडवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अरूणा भट यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.

अरूणा भट यांच्या मेंदूत गाठ असल्याचे आढळल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर आठ दिवसांपू्र्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही आणि यातच त्यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांच्या ह्रदयावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

संध्याकाळी उशीरा त्यांचे पार्थिव प्रभात रस्ता इथे असलेल्या त्यांच्या रहात्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर नवी पेठ इथे असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल या नाचकांव्यतिरिक्त अरूणा भट यांचे बायको नसावी शहाणी हे नाटकही विशेष गाजले. अशा अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांत देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या नाट् परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम पाहत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी महापालिकेची आर्थिक कसरत

0
0

भांडवली खर्च निम्म्यापेक्षा कमी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ च्या बजेटचे काम अंतिम टप्प्यात असताना चालू वर्षी अपेक्षित भांडवली कामांसाठीच्या तरतुदीपैकी केवळ ३५ टक्केच रक्कम खर्च झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला आर्थिक कसरत करावी लागत असून, लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जकात, एलबीटीपाठोपाठ राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतही कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश नाही. त्यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २०१५-१६ चे बजेट आणि आजअखेर प्रत्यक्षातील जमा याबाबतचा आढावा घेतला असता काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या खर्चाला कात्री लावण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. पुढील वर्षी निवडणुका होणार असल्यामुळे प्रलंबित कामांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्याचा तगादा नगरसेवकांनी लावला आहे. त्यानुसार कोणत्या कामांचा समावेश करावयाचा, याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यांना लोकप्रतिनिधींच्या रोषालाही सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
चालू बजेटनुसार एलबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नांची आकडेवारी कशीबशी गाठण्यात यश आले आहे. बांधकाम परवानगी विभागाकडून वर्षभरात ३५५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यापैकी गेल्या दहा महिन्यांत केवळ २१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आकडेवारीवरून हे उद्दिष्ट गाठणे मुश्कील ठरण्याची चिन्हे आहेत. करसंकलन विभागाकडून ४२५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना दहा महिन्यांत २४० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. पाणीपट्टी विभागाकडून ६५ कोटी रुपये वसुली अपेक्षित असताना दहा महिन्यांत केवळ २१ कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विभागांकडून प्रशासनाचा आजअखेर तरी अपेक्षाभंग झाला, असे स्पष्ट होते.
चालू बजेटनुसार भांडवली खर्चासाठी ९७० कोटी रुपयांची तरतूद होती. त्यापैकी केवळ ३०८ कोटी रुपये १५ जानेवारी २०१६ अखेर खर्च झाले आहेत. भांडवली कामांमध्ये हॅरीस ब्रिज दोन लेनचा करून रस्ता मोठा करणे, नाशिकफाटा ते मोशी इंद्रायणी पुलापर्यंतचा रस्ता विकसित करणे, डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधणे, पांजरपोळ चौकापासून चऱ्होली ते लोहगाव हद्दीपर्यंतचा रस्ता विकसित करणे, निगडी जकात नाक्याशेजारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणे, वायसीएम हॉस्पिटल परिसरात नाइट शेल्टर विकसित करणे, आळंदी फाटा येथे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज भेटीवर आधारित शिल्पसमूह उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी तयार करणे, आकुर्डीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित भिंतीवरील शिल्प उभारणे, भोसरीत जुन्या भाजीमंडईच्या जागेवर नवीन दुमजली भाजीमंडई इमारत उभारणे, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेणे, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण करणे आदी प्रमुख कामांचा समावेश होता. यापैकी अगदी मोजकीच कामे मार्गी लागण्याची चिन्हे असून, उर्वरित कामांच्या बाबतीत पुढील वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद करावी लागण्याची शक्यता आहे.
.....
जमेचा अंदाज आणि प्रत्यक्षात जमा (१५ जानेवारी २०१६ अखेर)

तपशील / बजेटनुसार जमा अंदाज / प्रत्यक्षात जमा (रुपये)

एलबीटी / १, १०३ कोटी / १,०४० कोटी

बांधकाम परवानगी / ३५५ कोटी / २१६ कोटी

करसंकलन / ४२५ कोटी / २४० कोटी

भांडवली जमा / ४० कोटी / ४० कोटी

पाणीपट्टी / ६५ कोटी / २१ कोटी

एकूण जमा / २,३१५ कोटी / १,६२९ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ रंगकर्मी अरुणा भट यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ रंगकर्मी अरुणा भट यांचे अल्पशा आजाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भट यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने काही दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभात रस्ता येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. या वेळी ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, लीला गांधी, मोहन जोशी आदी नाट्यकलावंतासह आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अरुणा भट यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम केले होते. डार्लिंग डार्लिंग, लग्नाची बेडी, तुझ आहे तुझपाशी, सूनबाई घर तुझ आहे, राजकारण गेल चुलीत, नाथ हा माझा, घरोघरी हीच बोंब, नवऱ्याची धमाल, बायकोची कमाल, बायको नसावी शहाणी या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'अवंतिका' या मालिकेत त्यांनी आपली वेगळी मोहर उमटविली होती. दादा कोंडके यांच्या चित्रपटांसह 'आता कशाला उद्याची बात', 'वन रूम किचन' या चित्रपटात देखील त्यांनी काम केले. कै. निळू फुले, कै. सुधीर जोशी, अशोक सराफ, रिमा लागू आदी कलावंतांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

रंगभूमीच्या सेवेबददल त्यांना 'बालगंधर्व पुरस्कारासह' मुंबई नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. कलाकारांच्या पेन्शन योजनेसाठी त्या आग्रही होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला चटके देणाऱ्या आईविरुद्ध गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या आठ वर्षांच्या मुलाला हातापायांनी, पट्टीने मारहाण करून अगरबत्तीने चटका देणाऱ्या आई आणि मावशीविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे मुलाचे आजोबा राजेंद्र गडकरी (वय ६५, रा. महंमदवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ऋतुजा रोहित गडकरी (वय ३३, रा. सूस पाषाण रोड) आणि श्रध्दा विलास देशपांडे या अनुक्रमे मुलाची आई आणि मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या कस्टडीवरून रोहित आणि ऋतुजा गडकरी यांच्यात कोर्टात वाद सुरू आहेत. या वादातून मुलाला मारहाण झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. राजेंद्र गडकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषण प्रकाशनावर बहिष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने छापले तरी, छापील भाषणाच्या प्रकाशनाकडे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. महामंडळाचा एकही पदाधिकारी न फिरकल्याने डॉ. सबनीस यांनी स्वत:च आपल्या भाषणाचे प्रकाशन बुधवारी केले. आधी भाषण छापणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या महामंडळाने भाषण मुदतीत छापून एक पाऊल मागे घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

साहित्य महामंडळ, सह्याद्री फाऊंडेशन, साहित्यवेध प्रतिष्ठान आणि डी. वाय. बिल्डर यांनी छापलेल्या डॉ. सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या तीन हजार प्रतींचे एकत्रित प्रकाशन बुधवारी करण्यात आले. महामंडळाने सुरुवातीस भाषण छापायला टाळाटाळ केली होती. प्रजासत्ताक दिनाआधी भाषण छापून न दिल्यास आंदोलनाचा इशारा सबनीस यांनी दिला होता. त्यानंतर महामंडळाने अचानक भाषण छापायला दिले. महामंडळाने भाषण छापल्याने उपोषण नाही तर, प्रकाशन अशी भूमिका घेऊन सबनीस यांनी बुधवारी आपल्या भाषणाच्या प्रतींचे प्रकाशन केले.

'माझे भाषण छापायला महामंडळाच्या दोन-तीन पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. अध्यक्षांचे भाषण छापण्याची सक्ती नसेल तर ८८व्या संमेलनाध्यक्षांचे भाषण महामंडळाने कसे छापले, असा प्रश्न उपस्थित करून भाषण छापल्याने माझ्या दृष्टीने हा वाद संपला आहे,' असे सबनीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अध्यक्षीय भाषण हे साहित्य परंपरेचे संचित आहे. महामंडळाच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असून, त्यांच्याभोवती संशय वाढला आहे,' अशीही टीकाही त्यांनी केली.

..तर पाठीराखे आंदोलन करणार

अध्यक्षीय भाषणाच्या प्रती लेखक, कवींना महामंडळाने आठ दिवसांत वितरीत न केल्यास डॉ. श्रीपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी साहसाने विद्यार्थीही हरखले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निमशहरी भागातील घरात लपलेले सशस्त्र दहशतवादी...त्यांच्या हालचाली टिपून जमिनीवरून सरपटत तसेच हेलिकॉप्टरमधून येणारे जवान...काही क्षणातच केला जाणारा हल्लाबोल...गोळीबार आणि ग्रेनेडचा वापर...आणि अवघ्या काही मिनिटांत दहशतवाद्याचा खात्मा करून एकाला जिवंत पकडण्यात मिळालेले यश....

लष्कराच्या महार रेजिमेंटच्या तुकडीने औंध येथील लष्करी तळावर ही कामगिरी पार पाडली आणि या चित्तथरारक अनुभवाने जमलेले शेकडो शालेय विद्यार्थी हरखून गेले. शालेय विद्यार्थ्यांना लष्कराची कार्यपद्धती आणि जवानांचे चलनवलन जवळून अनुभवता यावे, या साठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांचे सुमारे ४५० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

सुरुवातीलाच या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दोघा-दोघांच्या गटात जमिनीवरून सरपटत येणारे किंवा खाली वाकून घरापर्यंत पोहोचणारे जवान, गोळीबार करत ग्रेनेड फोडून घरात केलेला प्रवेश आणि त्यानंतर समोरासमोरच्या लढाईत केलेला दहशतवाद्यांचा खात्मा, अशा थराराने विद्यार्थी हरखून गेले होते. त्यानंतर आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शनालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. विविध प्रकारच्या मशिनगन, मिसाइल लॉँचर, भुसुरुंग, रेडिओ सेट्स, विविध प्रकारच्या बंदुका, जवानांचा पोशाख जवळून पाहाताना विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. त्यानंतर जवानांसाठीची मेस आणि राहण्याच्या ठिकाणालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारण उत्पन्नाचे नव्हे परिवर्तनाचे साधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एकमेकांना विरोध करत बसलो तर, हाती काहीच लागणार नाही. देशाच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी सकारात्मक विचार करायला हवा. राजकारण हे उत्पन्नाचे नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे साधन आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या. देशात सर्व विचारधारांना जागा असायला हवी, असेही ते म्हणाले.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेचे उद घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना 'जीवनगौरव', दिल्ली येथील भाजपच्या खासदार अॅड. मीनाक्षी लेखी यांना 'गार्गी पुरस्कार' आणि खासदार कुमारी शैलजा यांना 'मैत्रेयी पुरस्कार' या प्रसंगी प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ जाहिरात गुरू अॅलेक पद्मसी, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शहा (निवृत्त), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उद्योजक गणेश नटराजन, एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.

'राजकारण आपल्या उत्पन्नाचे साधन नाही, तर ते समाजपरिवर्तनाचे साधन आहे. राजकारणाच्या मदतीने आर्थिक, पर्यावरणीय क्षेत्रातून देशाचा विकास साधायला हवा. राजकारणातून चांगले काम केले तर ते लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते,' असे फडणवीस म्हणाले. 'देशात सर्व विचारांना जागा हवी. पण आपला विचार हेच ध्येय कोणी मानू नये. विचारधारा हा विकासाकडे जाण्याचा मार्ग असून देश आणि मानवतेचा विकास हेच अंतिम ध्येय हवे,' असेही मुख्यमंत्री म्हणाले. सूत्रसंचालन नीलम शर्मा यांनी केले. डॉ. सायली गणकर यांनी आभार मानले.

'संसदेतील ठराव अंमलात आणू'

भारतीय छात्र संसद देशातील तरुणांचे प्रतिनिधित्व करते. या तरुणांना जनतेचे खरे प्रश्न माहिती असतात, त्यामुळे या संसदेत जे जे ठराव केले जातील त्यांना राज्य सरकार महत्त्व देईल. या ठरावांवर कारवाईही सरकार करेल, असे आश्वासन देऊन महाविद्यालयीन निवडणूक लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडर्न’च्या प्राध्यापिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. पुणे- सोलापूर रोडवरील किर्लोस्कर पुलावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिती प्रसाद कुलकर्णी (वय ४०, रा. कॉसमॉस सोसायटी, मगरपट्टा सिटी, हडपसर) असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे पती प्रसाद कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर मॉडर्न कॉलेजमध्ये आदिती या प्राध्यापक होत्या. सोमवारी सायंकाळी कॉलेजचे काम संपवून त्या मगरपट्टा येथे दुचाकीवरून घरी जात असताना पुणे-सोलापूर रोडवरील किर्लोस्कर पुलावर त्या दोन वाहनांच्या मध्ये सापडल्या. त्यावेळी एका वाहनाचा त्यांना धक्का लागला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना तत्काळ हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी आर. जे. काळे घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौंदर्यासक्त माणूस हरपला

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. द. भि. कुलकर्णी कलात्मक आणि कलावादी समीक्षा लिहिणारे विद्वान समीक्षक होते. दभिंच्या समीक्षणामुळे अनेक लेखक खऱ्या अर्थाने समाजासमोर आले. त्यांचा निधनाने जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहणारा समीक्षक महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
..
द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. एक अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर साहित्याचा एक चांगला आस्वादक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपण गमावला आहे. ज्ञानेश्वरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अध्यापनाचा विषय होता.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दभिंच्या समीक्षणामुळे अनेक लेखक खऱ्या अर्थाने समाजासमोर आले. शिक्षण मातृभाषेतूनच व्हावेयासाठी ते आग्रही होते. त्यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्राने एक थोर समीक्षक गमावला आहे.

-विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील फार मोठा समीक्षक हरपला आहे. साहित्यिकांना लेखनाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम त्यांनी केले.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

डॉ. द.भि. कुलकर्णी सूक्ष्म कलात्मक आणि कलावादी समीक्षा लिहिणारे विद्वान समीक्षक होते. त्यांच्या समीक्षेने मानदंड प्रस्थापित केले. कलावादी समीक्षा पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी पुढच्या पिढीमध्ये दिसत नाही.

- डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य संमेलनाध्यक्ष

द. भि. यांची समीक्षा सैद्धांतिक होती. कविता,कथा, महाकाव्य आदी कलाप्रकारांच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या अनुषंगाने लेखन करीत त्यांनी सैद्धांतिक समीक्षेत मोलाची भर घातली.

- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,

माजी संमेलनाध्यक्ष

मराठी समीक्षेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्ञानेश्वर पूर्व काळातील संस्कृत साहित्य, ज्ञानेश्वर काळातील साहित्य आणि आधुनिक साहित्य या समीक्षेच्या तीन टप्प्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.

- डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष

साहित्यविश्वात सौंदर्यवादी समीक्षा करणारा असा हा समीक्षक होता. इतर संमेलनाध्यक्ष आणि समीक्षकांपेक्षा साहित्यात द.भि. यांचे स्थान नक्कीच वेगळे होते. ज्योतिषाची त्यांना उत्तम जाण होती.

-डॉ. न. म. जोशी,

ज्येष्ठ बालसाहत्यिक

निरनिराळे साहित्यप्रकार आपल्या समीक्षात्मक लेखणीतून त्यांनी पुढे आणले. त्यांचे वाचन, लेखन आणि विचार अनेकांना मार्गदर्शन करणारे ठरले.

- डॉ. वि.भा देशपांडे,

ज्येष्ठ नाट्य समीक्षक

मराठी साहित्य विश्वातील एक वटवृक्ष आज कोसळला आहे. द. भि. समी़क्षेचा ज्ञानकोश होते. महाकाव्यापासून ते युवापिढीपर्यंत त्यांच्या समीक्षेचा परीघ व्यापलेला होता.

- प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध लेखक

द. भि. यांच्याशी माझे नाते हे गुरू-शिष्याचे होते. अध्यापनात ते निष्णात होते. विद्यार्थ्यांच्या पातळीवर उतरून ते शिकवित असतं. साहित्याविषयी त्यांना अतोनात प्रेम आणि जिव्हाळा होता.

- ह. मो. मराठे, ज्येष्ठ साहित्यिक

दभि यांची समीक्षा सर्जनशील आणि आस्वादकतेचे नवीन मानदंड प्रस्थापित करणारी होती. मर्ढेकर, आरती प्रभू आणि कवी ग्रेस या कवींना दभिंच्या समीक्षेमुळे नाव मिळाले.

- डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

दभि कुलकर्णी यांचे निधन धक्का देणारे आहे. पिंपरी येथे झालेले साहित्य संमेलन त्यांचे अखेरचे संमेलन ठरेल असे वाटले नाही. साहित्य क्षेत्रातील मोठी व्यक्ती हरपली आहे.

- डॉ. पी. डी. पाटील, स्वागताध्यक्ष, पिंपरी साहित्य संमेलन

डॉ. द. भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक आणि संतसाहित्य व संस्कृत महाकाव्य परंपरेचे व्यासंगी अभ्यासक होते. साहित्य समीक्षेलाही त्यांनी एका चिंतनाच्या पातळीवर नेले.

- डॉ. रामचंद्र देखणे,

संत साहित्याचे अभ्यासक

....
सोमवारी श्रद्धांजली सभा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर आणि ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
...

समीक्षेशी प्रामाणिक राहणारा साहित्यिक

ज्ये ष्ठ समीक्षक, साहित्यिक, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष 'दभि' अर्थात डॉ. दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी. संपूर्ण साहित्य विश्वातच नाही, तर समाजातही त्यांची ओळख 'दभि' याच नावाने होती. नागपूरमध्ये २५ जुलै १९३४ रोजी दभिंचा जन्म झाला. 'कला निष्णात' (एमए, मराठी) ही पदव्युत्तर पदवी संपादित करताना त्यांनी नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकाविले.

सुरुवातीपासूनच त्यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम होते. नागपूर येथील विकास विद्यालय आणि विकास दिनान्त महाविद्यालय येथे त्यांनी सुरुवातीची काही वर्षे अध्यापक म्हणून काम केले. बनारस हिंदू विश्वविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून वर्षभर काम करण्याची संधी त्यांना लाभली. कोल्हापूर येथील गो. कृ. गोखले महाविद्यालयात प्रोफेसर आणि विभागप्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर सलग २० वर्षे ते नागपूर विद्यापीठात कार्यरत होते. नागपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून सुरुवात केलेल्या दभिंनी विभागप्रमुखापर्यंत अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या. याच दरम्यान त्यांनी नागपूर विद्यापीठातून 'महाकाव्य' या विषयावरील पीएचडी पूर्ण केली.

शिक्षण क्षेत्रात रमणाऱ्या दभिंनी कालांतराने लेखनाकडेही मोर्चा वळविला. दुसरी परंपरा हे त्यांचे पहिले पुस्तक १९७४ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यापाठोपाठ, 'महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा' या पुस्तकामुळे मराठी साहित्याला नव्या समीक्षकाची ओळख झाली. ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली परंपरा, चार शोधनिबंध, नाट्यवेध,, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनःस्थापना, कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा, समीक्षेची सरहद्द, जीएंची महाकथा, समीक्षेची वल्कले, अनन्यता मर्ढेकरांची यासारखी ३६ पुस्तके त्यांनी लिहिली. बा. सी. मर्ढेकरांची कविता हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. मर्ढेकरांच्या कवितेचा प्रभाव त्यांच्यावर होता. विविध समीक्षात्मक ग्रंथांसह दभिंनी सहलेखक म्हणूनही काही पुस्तकांसाठी काम केले. तर, मेरसोलचा सूर्य हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.

दभिंच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे 'समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती आणि प्रवाह' हा विशेष ग्रंथ संपादित करण्यात आला होता. राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कारापासून ते उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारापर्यंतचे अनेक मान-सन्मान त्यांना प्राप्त झाले. न्यूयॉर्कच्या 'हेरल्ड ट्रिब्यून' या नियतकालिकातर्फे आयोजित स्पर्धेतही त्यांना पुरस्कार पटकाविला होता. डॉ. यशवंत मनोहर, डॉ. प्रभा गणोरकर यांच्यासारख्या पंचवीसहून अधिक संशोधकांना पीएचडीसाठी, तर पन्नासहून अधिक संशोधकांना एमफिलसाठी दभिंनी मार्गदर्शन केले. नागपूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळापासून ते राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था यासारख्या विविध संस्थांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. त्यावेळी, प्रथमच संमेलनाध्यक्ष म्हणून संयोजकांकडून मिळालेल्या एक लाख रुपयांतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठीच्या प्रसार-प्रचारासाठी भ्रमंती केली. एवढेच नाही, तर त्याचा संपूर्ण हिशेबही त्यांनी सादर केला होता.

मराठी समीक्षेला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि आयुष्यभर समीक्षेशी प्रामाणिक राहून साहित्याची निरलस सेवा करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये दभिंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देशाला सध्या गरज नव्या कर्मवीरांची’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात तीन तर राज्यात केवळ दोन टक्के खर्च शिक्षणावर खर्च केला जातो. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असताना बहुजन समाजातील मुलांना ते कसे मिळणार हा मोठा प्रश्न आहे, अशा काळात नव्या कर्मवीरांची गरज आहे,' असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी नुकतेच व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत आणि अंतर्नादचे संपादक भानू काळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पिंपरी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संचालक अनिल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, रामशेठ ठाकूर, अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या पत्नी शशिकला शिंदे, राजीव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.

'देशात उच्च शिक्षणाचा लाभ केवळ बारा टक्के लोकच घेतात. त्यामध्ये बहुजन समाजाचे प्रमाण कमी आहे, असे सांगून वैद्य यांनी शासन शिक्षणाकडे लक्ष देत नाही. देशात तीन तर राज्यात केवळ दोन टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासीठी नव्या कर्मवीराची गरज आहे,'असे मत व्यक्त केले. रावसाहेबांचे आयुष्य ध्यासपर्व होते. त्यांनी मार्क्सवाद स्वीकारला आणि नंतर सेवादलातही काम केले, अशी आठवण त्यांनी जागवली.

रावसाहेबांचा अखेरपर्यंत जिव्हाळा होता. त्यांनी आयुष्यभर प्रेम दिले, अशी भावना कदम यांनी व्यक्त केली. थोरात म्हणाले, रावसाहेब कसे घडले हे समाजासमोर यायला हवे. ते सिद्ध झालेले सोने होते.

..

पतंगरावांचे चिमटे

पी.डी. पाटील विराट पुरुष आहेत, असे विधान विवेक सावंत यांनी केले. 'साहित्य संमेलनाआधी वाद निर्माण झाल्याने मीच विचारात पडलो होतो; पण पी.डी. पाटील हे बेस्ट रिंगमास्टर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संमेलनाआधी निर्माण झालेले वादाचे धुके त्यांनी दूर केले. मोकळी बोंबाबोंब करायला काही लागत नाही,' अशा शब्दांत डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या खास शैलीत चिमटे काढले. पुणेकरांनी मला स्वीकारले असून ब्रह्मवृंद्दांनी माझा सत्कार केला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कशाला?’

0
0

गारगोटी (कोल्हापूर) : 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला सीमा नव्हत्या. छत्रपतींनी राज्यातील अनेक गड कोटांवर पराक्रम गाजविला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात त्यांचा पुतळा न उभारता गड-किल्ल्यांवर स्मारक उभे केले पाहिजे. शिवजयंतीच्या तारखेचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंतीची एकच तारीख निश्चित झाली पाहिजे,' अशी रोखठोक मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी बुधवारी केली.

शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या श्रीरांगणागड ते भुदरगड धारातीर्थ यात्रा मोहिमेचा सांगता समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे झाला. या वेळी भिडे गुरुजी बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. दारूबंदीसाठी गावागावात मतदान घेण्यापेक्षा राज्यात एकावेळी मतदान घ्यावे. बलात्काऱ्यांना, गोहत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी भिडे यांनी केली.

'छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेला मार्ग आणि प्रशासकीय नीतीचा अवलंब करुन राज्य

सरकारची वाटचाल सुरू आहे.' असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राष्ट्रासमोर ज्यावेळी आव्हाने उभे राहतात त्यावेळी छत्रपतींचे कार्य, विचार आणि नीती आदर्श मानून त्या आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग मिळतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसपोर्ट १३ ठिकाणी उभारणार

0
0

पुणे ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवाजीनगर आगाराबरोबरच १३ आगारांच्या ठिकाणी बसपोर्ट उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या बसपोर्टमध्ये सुसज्ज बस टर्मिनलपासून शॉपिंग कॉम्प्लेक्सपर्यंतच्या विविध सुविधा उपलब्ध होणार आहे.
पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून बे बसपोर्ट उभारले जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी एसटीची मोठी आगारे आहेत. आगारांच्या जागा मोठ्या असूनही अनेक ठिकाणी योग्य रचना करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर पनवेल, बोरिवली नँन्सी कॉलनी, पुण्यातील शिवाजीनगर, सांगली मधील माधवनगर, सोलापूर मधील पुणे नाका, कोल्हापूर मधील संभाजी नाका, नाशिक महामार्ग, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अकोला तसेच नागपूर मधील मोरभवन या आगारांच्या इमारती पाडून तेथे जागांचा योग्य वापर करून बसपोर्ट उभारले जाणार आहे.
शिवाजीनगर आगारात बसडेपो आणि बस स्टँड आहे. येथून एका दिवसाला दोन ते अडीच हजार बसेस विविध मार्गांवर सोडल्या जातात. स्टँडचे काम अनेक वर्षांपूर्वीचे आहे. प्रवाशांना तेथे मर्यादित सुविधा देता येतात. या ठिकाणी आता तळ मजल्यावर बस स्टँड व प्रवासी विश्रामकक्ष, दुसऱ्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर व्यावसायिकांसाठी गाळे, असे नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांच्या संख्येत दोन लाखांची घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळल्यामुळे पुणे शहर व ग्रामीण भागातील मतदार संख्या १ लाख ९७ हजारांनी घटली आहे. ही नावे वगळल्यामुळे पुण्यातील २१ विधानसभा मतदार संघांमधील मतदार संख्या ६७, २३, ९९८ वर आली आहे.

बोगस मतदारांमुळे पुण्याची मतदार यादी फुगल्याचे 'मटा'ने सर्वप्रथम उघडकीस आणले होते. याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने बोगस मतदारांची नावे वगळण्याची सूचना केली होती. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदारांना यादीतून वगळण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास साडेचार लाख बोगस मतदारांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने नुकतीच पुण्याची मतदारयादी प्रसिद्ध केली. त्यात वगळलेले मतदार आणि नव्या मतदारांची नोंद घेतल्यानंतर १ लाख ९७ हजार ७९५ मतदारांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले. गत वर्षी मतदारांची संख्या ६९, २१, ७९३ होती. नव्या यादीनुसार ही मतदार संख्या आता ६७,२३,९९८ झाली आहे. ही प्रसिद्ध झालेली मतदार यादी महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

नव्या मतदार यादीमध्ये पुरुष मतदारांची संख्या ३५, २९, १९६ तर, स्त्री मतदारांची संख्या ३१, ९४, ७२६ आहे. याशिवाय ७६ इतर (तृतीयपंथीय) मतदारांची नोंद यामध्ये झाली आहे. या इतर मतदारांना मतदार ओळखपत्रही देण्यात आले आहे. नव्या मतदार यादीतील ६३, १२, ७२२ मतदारांना निवडणूक ओळखपत्रे देण्यात आली आहेत. अद्याप साडेचार लाख मतदारांना निवडणूक ओळखपत्र मिळालेले नाही.

..

बोगस नावे वगळण्यात जिल्हा अव्वल

दुबार, स्थलांतरीत व मृत मतदारांची नावे गेली कित्येक वर्षे यादीत तशीच राहिल्याने मतदार यादी फुगली होती. यापूर्वी राबविलेल्या विशेष मोहिमेत अशी ३ लाख ६३ हजार नावे वगळण्याची कारवाई करण्यात आली. नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी ८३ हजार नावे कमी करण्यात आली. बोगस नावे वगळण्याची मोठी कारवाई करणारा पुणे हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे सेवा ऑनलाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी आता सरकारी कार्यालयात सामान्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. येत्या महात्मा गांधी जयंतीपासून राज्यात २५० सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार असून, त्यासाठीचे मोबाइल अॅप विकसित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जर्मनीच्या एसक्यूएस इन्फो सिस्टीम प्रालि. कंपनीच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमात बुधवारी मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, कंपनीचे सीईओ राल्फ गिलेसन, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी या वेळी उपस्थित होते. 'राज्य सरकारने आपले सरकार' या वेबपोर्टलवर दीडशे सेवा ऑनलाइन केल्या आहेत. गांधी जयंतीपासून ४० हजार सेतू केंद्रांवर या सुविधा उपलब्ध होतील. अशा सेवा देण्यासंदर्भातील उपक्रमांसाठी आयटी उद्योगाने पुढाकार घ्यावा,' असे आवाहनही फडणवीस यांनी केले. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया धोरणामुळे रोजगार उपलब्ध होणार असून, त्यास राज्य सरकार निश्चित पाठबळ देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

'राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांना नव्या सवलती देण्यात येणार असून, त्यातून हा उद्योग वाढविण्याचा प्रयत्न आहे. तसेच जर्मनीशी सहकार्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,' असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जिरेंद्र कसमळकर यांनी विस्तारीकरणासंदर्भात माहिती दिली.

१७०० भूखंड ताब्यात

राज्यांतील एमआयडीसीमधील उद्योग न उभारलेले १७०० भूखंड सरकारने ताब्यात घेतले आहेत. केंद्राच्या स्टार्ट अप इंडिया योजनेद्वारे दोनशे कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यंदा देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३५ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली.

'बाळासाहेबांनी रिमोट दिल्याचे पाहिले नाही'

मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज्याचा रिमोट आमच्या हातात आहे असे भाष्य केले होते. त्यावर बाळासाहेबांनी जरी तुमच्या हातात रिमोट दिला असला तरी, आता रिमोट माझ्या हातात दिला आहे सेनेच्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावे, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याबाबत उद्योगमंत्र्यांना विचारले असता, 'बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात रिमोट दिल्याचे आम्ही तरी कधी पाहिले नाही,' अशा मार्मिक टोला त्यांनी हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images