Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘दोन पदवी कोर्स एकाच वेळी नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची मुभा देण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांबाबत सध्या असलेल्या नियमांचेच पालन करावे, असे स्पष्टीकरण 'यूजीसी'ने केले आहे.

विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्याची मुभा देण्याच्या कल्पनेबाबत 'यूजीसी'ने वैधानिक मंडळांकडून सूचना मागवल्या होत्या. 'याबाबत आतापर्यंत आलेल्या सूचना या एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याच्या कल्पनेला पाठिंबा देणाऱ्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठांनी त्यांचे अभ्यासक्रम 'फर्स्ट डिग्री अँड मास्टर डिग्री रेग्युलेशन्स, २००३'नुसार राबवावेत आणि वैधानिक मंडळांनी तयार केलेल्या नियम आणि निकषांचे पालन करावे,' अशी सूचना 'यूजीसी'चे सचिव जसपाल एस. संधू यांनी जारी केली आहे.

नियमित पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याला त्या जोडीने मुक्त विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम करण्याची मुभा द्यावी, अशी शिफारस 'यूजीसी'ने प्रा. फुरकान कमर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एका तज्ज्ञ समितीने तीन वर्षांपूर्वी केली होती. मात्र, प्रशासकीय आणि शैक्षणिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने दोन नियमित पदवी अभ्यासक्रम एकत्र करण्याची मुभा नसावी, असेही समितीने स्पष्ट केले होते. समितीने केलेल्या या शिफारशींवर देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून मते मागविण्यात आली होती.

------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रंथ प्रदर्शनातून पुस्तकांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात कोट्यावधींची उलाढाल झाली. एकीकडे ग्रंथ प्रदर्शनाची भव्यता, मिळालेल्या प्रतिसादाची चर्चा सुरू असतानाच दरम्यान पुस्तकांची चोरी झाल्याचाही प्रकार समोर आला आहे.

साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी ग्रंथदालनांची आवराआवर करण्यात येत होती. संमेलनाचे पहिले तीन दिवस ग्रंथ दालनाच्या परिसरात सुरक्षाव्यवस्था चोख होती. मात्र, अखेरच्या दिवशी सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली होती. या दरम्यान चोरट्यांनी साहित्य अकादमीच्या पुस्तकांवर डल्ला मारला. साहित्य अकादमीच्या पुस्तकांची नऊ पार्सल ग्रंथ दालनातून चोरीला गेली असल्याची माहिती सूत्रांनी 'मटा'ला दिली.

साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात सुमारे चारशे ग्रंथ दालने होती. मराठीतील प्रकाशकांसह साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्टसारख्या मान्यवर संस्थांच्या ग्रंथ दालनांचाही त्यात समावेश होता. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी जवळपास रात्रभर ग्रंथदालनांची आवराआवर करण्यात येत होती. साहित्य अकादमीच्या दालनातील कर्मचाऱ्यांनी पुस्तके एकत्र करून पार्सल बांधून ठेवली होती. मात्र, सुरक्षाव्यवस्था नसल्याने चोरट्यांनी अकादमीच्या दालनातून ही पार्सल हातोहात लांबवल्याचे सूत्रांनी सांगितले. पुस्तकांच्या चोरीबाबतचा अधिक तपशील मिळवण्यासाठी साहित्य अकादमीशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

चोरीच्या बऱ्याच घटना

संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांची पन्नास हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्सही चोरीला गेली. त्याबाबतची तक्रार संत तुकारामनगरच्या पोलिस चौकीत केली. पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 'ग्रंथप्रदर्शनात चोरीच्या घटना घडल्या. आमच्या दालनातील पुस्तके पहायला आलेल्या एका तरुणाचा पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाइलही चोरीला गेला. त्याच्यात महत्त्वाचा डेटा असल्याने तो तरुण रडकुंडीला आला होता. अशा प्रकारे चोरी करणारी एखादी टोळी असावी. पुस्तके पहाण्याच्या बहाण्याने वस्तू लांबवण्याच्या घटना घडल्या,' असे पवार यांनी सांगितले.
...

संमेलनाप्रमाणेच ग्रंथप्रदर्शनही उत्तमरित्या पार पडले. चोरी किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही.

सचिन इटकर,

समन्वयक, साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासीसंख्येत उरुळीकांचनची झेप

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे-दौंड आणि पुणे-बारामती पॅसेंजर या एका दिवसात सहा फेऱ्या मारणाऱ्या गाड्यांच्या प्रवाशांची वार्षिक संख्या आता सात लाखांवर पोहोचली आहे. दौंडवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच जास्त होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसरात वाढलेल्या नागरीकरणामुळे उरुळीकांचन आणि केडगाव ही वाढत्या प्रवासी संख्येची स्टेशन म्हणून उदयाला आली आहेत.

दौंडहून पुण्याला येण्यासाठी आणि पुण्याहून दौंडला जाण्यासाठी खूप गाड्या आहेत. मात्र, त्या दरम्यानच्या यवत, पाटस, केडगाव, उरुळीकांचन, फुरसंगी, लोणी काळभोर आदी स्टेशनांवर पुणे-दौंड-पुणे पॅसेंजर आणि पुणे-बारामती-पुणे पॅसेंजर या दोन गाड्या थांबतात. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड एक्स्प्रेसने २०१४-१५ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ४,४३,९५९ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे रेल्वेला एक कोटी २६ लाख ७१ हजार ६४० रुपये उत्पन्न मिळाले या वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत चार लाख ५१ हजार २६६ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्याद्वारे एक कोटी ३१ लाख एक हजार ७४५ रुपये उत्पन्न मिळाले.

पुणे-बारामती पॅसेंजरद्वारे २०१४-१५ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ७८ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केला. २०१५-१६ मध्ये त्याच कालावधीत ८७ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला आहे, अश माहिती रेल्वेच्या वाणिज्य विभागातील सूत्रांनी दिली.

पुण्यावरून थेट दौंडला जाण्यासाठी प्रवाशांकडून एक्स्प्रेस गाड्यांचा वापर केला जातो. मात्र, दरम्यानच्या स्टेशनांवर उतरण्यासाठी केवळ पॅसेंजरचाच पर्याय उपलब्ध आहे. पुणे-दौंड पॅसेंजरमधील ४० टक्के प्रवासी उरुळीकांचनला उतरतात. केडगावच्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सोलापूर-पुणे पॅसेंजर, मनमाड-पुणे पॅसेंजर, बारामती-पुणे पॅसेंजर, हैदराबाद एक्स्प्रेस आदी गाड्याही पुणे- दौंड-पुणे या मार्गावर धावतात. मात्र, या गाड्या पुणे-दौंड दरम्यानच्या सर्व स्टेशनवर थांबत नाहीत. या गाड्यांना प्रवाशांची गर्दी असते. त्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या पुणे ते दौंड दरम्यानच्या प्रवाशांची संख्या रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झाली नाही.

--------

पुणे-दौंड पॅसेंजर

वर्ष प्रवासीसंख्या

२०१५-१६ ४, ५१, २६६

२०१४-१५ ४, ४३, ९५९

पुणे-बारामती पॅसेंजर

वर्ष प्रवासीसंख्या

२०१५-१६ ८७, २२७

२०१४-१५ ७८,०५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपलं बजेट’ला भरघोस प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या परिसरातील विकासकामांचा समावेश व्हावा; तसेच शहरासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांबाबतही नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याच्या दृष्टीने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'आपलं बजेट, आपलं पुणे' उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक यांनीही अर्थसंकल्पाविषयी सूचना करण्यास पुढाकार घेतला आहे.

पुढील आठवड्यात महापालिका आयुक्त अर्थसंकल्पाचा आराखडा स्थायी समितीला सादर करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीतर्फे पालिकेचे अंतिम अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्वरूपात तरतूद केली जाते. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांसह शहरासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये, त्या-त्या प्रभागातील कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जावे; तसेच शहर पातळीवर कोणत्या प्रकल्पांसाठी निधी दिला जावा, अशा सूचना नागरिकांना करता येणार आहेत.

यापूर्वी, वारंवार मागणी करूनही आपल्या परिसरातील एखाद्या पदपथाचे अथवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसेल तर, 'मटा'च्या 'आपलं बजेट, आपलं पुणे'च्या माध्यमातून अर्ज भरून आपण, प्रभागात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे, याबाबत सूचना करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, पीएमपीची बससेवा वेळेवर उपलब्ध होण्यापासून ते एखाद्या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची गरज असल्यास, त्याबाबतच्या थेट अपेक्षाही तुम्हाला 'मटा'ने उपलब्ध करून दिलेल्या अर्जाद्वारे मांडता येणे शक्य आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नागरिकांच्या सहभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. म्हणूनच, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्येही नागरी सहभाग वाढविण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी केलेल्या सूचना आणि अपेक्षा पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम 'मटा'तर्फे केले जाणार आहे.

अर्ज येथे पाठवा..

नागरिकांनी त्यांच्या सूचना, अपेक्षा महाराष्ट्र टाइम्सच्या गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील (एफ. सी. रोड) कार्यालयात पाठवाव्या. तसेच, punemata1@gmail.com या ई-मेलवरही अर्ज भरून पाठवता येतील. शिवाय, टिळक रोडवर ग्राहक पेठ येथेही 'मटा'तर्फे हे अर्ज स्वीकारण्यासाठी 'ड्रॉप बॉक्स' ठेवण्यात आला असून, त्याचाही लाभ नागरिकांना घेता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णरावांच्या नावाचा पुरस्कार ही शाबासकी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मास्टर कृष्णराव यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी शाबासकी आहे,' अशी भावना सरदार मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते मुजुमदार यांच्या 'स्वरसंगत सरदार' या ग्रंथासाठी फुलंब्रीकर यांच्या घरी छोटेखानी घरगुती कार्यक्रमात बुधवारी देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, अॅड. प्रमोद आडकर, योगेश सोमण, सुनीताराजे पवार, रवींद्र जोशी, संजय देशपांडे, मास्टर फुलंब्रीकर यांच्या स्नुषा कुंदा फुलंब्रीकर, डॉ. वसुंधरा फुलंब्रीकर, प्रिया फुलंब्रीकर व फुलंब्रीकर कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

मुजुमदार वाड्यात मास्टर कृष्णराव गणेशोत्सवात संगीत सेवेसाठी येत असे सांगून मुजुमदार यांनी सरदार मुजुमदार व मास्टर कृष्णराव यांच्या आठवणी जागवल्या. सरदार किबेंच्या ३६ हजार चिजा संकलित केल्या असून, संशोधनात्मक लेख या पुस्तकात आहेत. 'परिस्थिती खालावली होती, तेंव्हा विलायत खाँ साहेबांचे गायन वाड्यात रंगले होते. त्यांनी काही बिदागी स्वीकारली नाही. बांधून ठेवणारी माणसे त्याकाळी होती. मास्टर कृष्णराव त्यापैकीच एक होते. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी शाबासकी आहे,' अशी भावना मुजुमदार यांनी व्यक्त केली.

डॉ. वैद्य म्हणाल्या, 'आयुष्यात अनेक ठिकाणी मास्टर भेटत राहिले. कलावंत कधी जात नाही. तो स्वरांतून आठवणीतून कायम भेटत राहतो.' उत्तरार्धात संजय देशपांडे यांचे हार्मोनियम वादन रंगले. मास्टर कृष्णराव यांनी बांधलेल्या बंदिशी, भजने त्यांनी सादर केली.

शेजवलकरांचा मार्मिक टोला

हा घरगुती सोहळा विलक्षण आहे. परिषदेने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला, याचा मनापासून आनंद आहे. यानिमित्ताने साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले, असा मार्मिक टोला डॉ. प्र.चिं. शेजवलकर यांनी पदाधिकाऱ्यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रजासत्ताक दिनी मंडईत अनुभवा ‘आर्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चित्रप्रदर्शन पाहायचे असेल तर, कलादालनात जावे लागते. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी खास कलादालनात जाणारे तसे कमीच. यामुळे चांगली कला उपेक्षित राहते. मात्र, आता ही कला तुम्हाला भाजी मंडईतही खुणावू शकते. या प्रजासत्ताक दिनी तुम्ही सकाळी भाजी घेण्यासाठी महात्मा फुले भाजी मंडईमध्ये गेलात तर एक हजार चित्रे तुमचे मनमोहक रंगसंगतीने स्वागत करतील. 'आर्ट मंडई' या अनोख्या संकल्पनेतून चित्रकलेचा अविष्कार येत्या मंगळवारी (२६ जानेवारी) प्रजाकसत्ताक दिनी मंडईत घडणार आहे.

चित्रकला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यातून सामाजिक कार्यासाठी निधी संकलित व्हावा या उद्देशाने काही कलाकारांनी पुढाकार घेऊन 'आर्ट मंडई' हा उपक्रम आखला आहे. वैशाली ओक, राजू सुतार, गौरी गांधी, सुजाता धारप, इंद्रनील गराई, संदीप सोनावणे आणि रुबी झुनझुनवाला या कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे.

संगीताशी प्रत्येकजण जोडला जातो, पण चित्र अथवा शिल्पकलेच्या वाट्याला हे सुख येत नाही. चित्रप्रदर्शन ही वेगळ्या वर्गासाठी असतात, या गैरसमजातून प्रदर्शनाकडे येणाऱ्यांकडे प्रमाण कमी होते. हे चित्र बदलण्यासाठी या कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. फक्त चित्रप्रदर्शन आयोजित न करता, चित्रांची विक्री करून त्यातून संकलित होणाऱ्या निधीपैकी निम्मा निधी 'नाम फाउंडेशन'ला देण्यात येणार आहे. कला पोहोचवण्याबरोबरच सामाजिक ऋण जपण्याचा प्रयत्न ही कलाकार मंडळी करणार आहेत.

वैशाली ओक म्हणाल्या की, 'मंडई हे ठिकाण सर्वांचे आहे. सर्वस्तरातील लोक तिथे भेटतात. त्यांच्यापर्यंत कला जावी यासाठी हा प्रयत्न आहे. ३५ कलाकारांचे एकूण एक हजार चित्रे या प्रदर्शनात असतील. या चित्रांची किंमत एक हजारच्या पुढे नसेल. यातून संकलित होणारा निधी नाम फाउंडेशनला देणार आहोत. प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत प्रदर्शन भरणार असून, आर्ट मंडई पाहायला नक्की या,' असे आग्रहाचे आमंत्रणही त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य परिषदेमध्ये निवडणुकीची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगतेनंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. आजी-माजी पदाधिकारी, लेखक, माजी संमेलनांचे स्वागताध्यक्ष अशा मंडळींनी निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. परिषदेच्या ३३ जागांसाठी तब्बल ११७ अर्जांची विक्री झाली.

परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३० मार्च रोजी संपणार आहे. १५ मार्च रोजी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे संमेलनाच्या गडबडीनंतर आता मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. विविध कारणांनी गाजणाऱ्या परिषदेच्या पदांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहे. परिषदेच्या ३३ जागांसाठी ११७ अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे किमान तीन पॅनेल निवडणुकीत उतरणार, असे बोलले जात आहे. लेखक प्रा. मिलिंद जोशी, विद्यमान पदाधिकारी सुनील महाजन यांच्यासह परिषदेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या एका पॅनेलचा समावेश आहे.

या पॅनेलमध्ये संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई (पुणे), विजय कोलते (सासवड), भारत देसडला (घुमान) यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नुकत्याच झालेल्या संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचाही एका पॅनेलमध्ये समावेश आहे. मात्र, ते कोणत्या पॅनेलमध्ये असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मान्यवर लेखक, प्रकाशक, कार्यकर्ते यांच्याबरोबरच स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची जबाबदारी पेलणारे पुणे परिसरातील राजकीय कार्यकर्तेही या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज ११ ते १६ जानेवारीपर्यंत घेण्याची मुदत ठेवण्यात आली होती. या मुदतीत ११७ अर्जांची विक्री झाली आहे. हे अर्ज २२ जानेवारीपर्यंत परिषदेत स्वीकारले जाणार आहेत. संबंधित उमेदवारांना ते २५ जानेवारीपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्यानंतर २७ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

माधवी वैद्य यांची माघार

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी निवडणुकीचा अर्ज घेतलेला नाही. त्यामुळे ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीत साहित्य परिषद चर्चेत राहिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघ, युवा आघाडी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर या संघटनांनी बुधवारी निदर्शने केली. रोहितला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी करून डॉ. हमीद दाभोलकर, भारिपच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे, उमेश चव्हाण, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवानी यांनी मनोगत व्यक्त केले. 'मुंबई हायकोर्टाने नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या शोधाबद्दल सीबीआय या सर्वोच्च तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत. असे असतनाही हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे धाडस राज्यकर्त्यांनी केले. त्यांच्या उदासीनतेमुळे समाजात नकारात्मक वातावरण पसरले आहे. रोहितने देखील याच भावनेतून आत्महत्या केली,' असे दाभोळकर म्हणाले. चांदणे आणि चव्हाण यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दरम्यान, हैदराबाद विद्यापीठातील घटनेच्या निषेधार्थ सोशालिस्ट पार्टी आणि अन्य पुरोगामी संस्था-संघटनांकडून निषेध करण्यात आला. संघटनेच्या वतीने महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यासमोर निषेध सभा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिलायन्स जिओ’विरुद्ध पोलिसांकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्याप्रकरणी रिलायन्स जिओ या कंपनीविरुद्ध थेट पोलिसांकडेच तक्रार दाखल करण्यात आली आहे. विविध खासगी केबल कंपन्यांकडून परवानगीपेक्षा अधिकची खोदाई करण्याचे प्रकार वारंवार घडत असूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित कंपन्यांविरुद्ध वेळेवर कारवाई होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

रिलायन्स जिओ कंपनीतर्फे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत शंभर किलोमीटरपेक्षा अधिक ठिकाणी कंपनीला खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात, कंपनीतर्फे पालिकेच्या परवानगीशिवाय जादा खोदाई केली जात असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी, एकदा पालिकेने कंपनीला दंडही ठोठावला होता. तरीही, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रिलायन्सने पुन्हा दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकची खोदाई केल्याची माहिती समोर आली आहे. हाजी रसूलभाई पानसेर बाल उद्यान ते मार्केटयार्ड बाफना एक्सपोर्ट या दरम्यान कंपनीला खोदाईची परवानगी देण्यात आली होती. या दरम्यानच्या रस्त्यासह कंपनीने गिरीधरभवन चौक ते मार्केटयार्ड पोस्ट ऑफिसदरम्यानच्या तीनशे मीटरचा रस्ता विनापरवाना खोदला. त्याची तक्रार अतिरिक्त पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे करण्यात आली. त्याची दखल घेत बकोरिया यांनी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पथ विभागाने केलेल्या चौकशीत रिलायन्सने परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, २४ तासांत खुलासा करण्याची नोटीस कंपनीला बजाविण्यात आली होती. त्याबाबत, कंपनीने समाधानकारक खुलासा केला नसल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे पत्र पालिकेतर्फे स्वारगेट पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली नसती, तर रिलायन्सवर कोणतीच कारवाई शक्य झाली नसती, असे दिसून येत आहे. त्यामुळे, खासगी कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन कंपनीने किती खोदाई केली आहे, याचा आढावा घेतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागवत संकुल दारूड्यांचा अड्डा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने शहराच्या विविध भागांत बांधलेल्या अनेक इमारतींचा ताबा पालिकेकडे असला, तरी अशा अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. सदाशिव पेठेतील वसंतराव भागवत क्रीडा संकुलाचा ताबा कागदोपत्री पालिकेकडे असला, तरी संकुलामध्ये जेवणाच्या डिश, दारूच्या बाटल्या, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. या क्रीडा संकुलाचा ताबा पालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडे असताना, येथे सुरू असणाऱ्या गैरप्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी होत आहे.

महापालिकेने शनिपार मंदिराजवळील कवठेअड्डा मैदानातील काही भागावर क्रीडा संकुल उभारले आहे. या ठिकाणी बॅडमिंटनचा प्रशस्त हॉल असून, जिमची सुविधाही उपलब्ध आहे. परंतु, अनेक वर्षांपासून हे क्रीडासंकुल वापरात नाही. काही वर्षांपूर्वी ते चालविण्यास देण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया राबवली होती; पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, संकुलाचा ताबा पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे असून, त्यांनी कुलूपबंद केले आहे. तरीही, पालिकेच्या विभागाला न जुमानता या ठिकाणी संकुलाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नगरसेवक दिलीप काळोखे यांनी बुधवारी हा प्रकार उघडकीस आणला असून, जेवणावळी आणि पार्ट्यांसाठी या हॉलचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

बॅडमिंटन हॉलमध्येच दारूच्या बाटल्या, थर्मोकोलच्या डिश यांचा खच पडला असून, सजावटीच्या साहित्याच्या राडारोड्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. संकुलाचा ताबा पालिकेकडे असून आणि त्याला कुलूप लावण्यात आले असतानाही, येथे जेवणावळी कशा झडतात, असा प्रश्न काळोखे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुडगूस घालणाऱ्या टोळक्यांवर गुन्हा

$
0
0

पुणे : बिबवेवाडी भागातील अंबिकानगर येथे हातामध्ये तलवारी, काठ्या घेऊन धुडगूस घालून दहशत पसरविणाऱ्या वीस जणांच्या टोळक्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळक्याने परिसरातील बारा वाहनांची तोडफोड करून नागरिकांना मारहाण केली होती.

मोन्या विकारे, अक्षय लोखंडे, ओंकार घाटे, पंकज शिंदे, अजू पठाण, पक्या पारट, रोशन्या, संदेश पटेल, रवी साळवे, सोन्या अवचर, सतिश ओझा, आकाश गरुड यासह ८ जणांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास जठार (वय २०, रा. अपर इंदिरानगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे अप्पर कोंढवा रोडजवळ आंबिकानगर आहे. दोन दिवसापूर्वी याठिकाणी दोन गटात वादावादी झाली होती. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास या ठिकाणी दहशत पसरविण्यासाठी २० जणांच्या टोळक्याने हातामध्ये काठ्या, तलवारी घेऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेले अॅटो, कार, जीप अशा बारा वाहनांची तोडफोड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीत १५० कोटींची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराद्वारे (एलबीटी) एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत पालिकेचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा तब्बल दीडशे कोटी रुपयांनी वाढले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत एलबीटीतून पालिकेच्या तिजोरीत अकराशे कोटी रुपये जमा झाले असून, २०१५-१६ चे एलबीटीचे उत्पन्न गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक ठरेल, अशी शक्यता आहे.

स्थानिक संस्था करातून (एलबीटी) पालिकेला डिसेंबरमध्ये १४० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहेत. आर्थिक वर्षाचे आणखी तीन महिने बाकी असल्याने पालिकेला गेल्यावर्षीपेक्षा निश्चित अधिक उत्पन्न मिळू शकणार आहे. डिसेंबरचा कर पालिकेत जमा करण्याची मुदत बुधवारी संपली. या दरम्यान निव्वळ एलबीटीपोटी पालिकेला ३२ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान (८१ कोटी) आणि मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभार (२६ कोटी) यामुळे डिसेंबरचे एलबीटीचे उत्पन्न १४० कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत पालिकेला १५५ कोटी रुपये अधिक प्राप्त झाले आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत केवळ ९४५ कोटी रुपये जमा झाले होते.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी पालिकेला मिळणाऱ्या अनुदानात सरकारने कपात करून ते दरमहा ५० कोटी रुपये केले आहे. तरीही, पुढील तीन महिन्यांचे दीडशे कोटी रुपये निश्चित पालिकेला प्राप्त होणार आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षात एलबीटीतून पालिकेला सुमारे तेराशे कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. चालू आर्थिक वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंतचे उत्पन्न लक्षात घेता, यंदा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसे झाल्यास, एलबीटी उत्पन्नाचे उच्चांक यंदा नोंदविला जाईल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुरसुंगीला अडीच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

महापालिकेचा कचरा डेपो असलेल्या फुरसुंगी, उरळी देवाची या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यासाठी २ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने गेले अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागला आहे.

उरुळी देवाची, फुरसुंगी या भागात पालिकेचा कचराडेपो असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच तेथील विकास कामांसाठी निधी देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने स्विकारली आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून या गावांना आणि आजुबाजुच्या भागांना पालिकेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जा‌त आहे. या भागामध्ये पालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत ४८ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत‌.

या गावांना आवश्यक तो पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ १६ च्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत ही तरतूद करण्यात आली होती. पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदारामार्फत २ कोटी ४८ लाख ४० हजार रुपयांची पूर्वगणन पत्रके पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आली होती.

बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी असल्याने टेंडर प्रक्रिया करून ठेकेदारामार्फत हे काम करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे घनकचरा विभागामार्फत ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी मध्ये काही दिवस हा विषय प्रलंबित होता. त्यावर चर्चा झाल्यानंतर स्थायीने हा विषय मान्य करून सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी पाठविला होता.

सर्वसाधारण सभेत यावर सभासदांनी चर्चा करून हा विषय महत्वाचा असल्याचे त्याला एकमताने मान्यता दिली. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टँकरला जीपीएस यंत्रणा लावा

फुरसुंगी, उरुळी देवाची येथील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर वेगळ्या कारणासाठी होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी सभासदांनी केली. शहरात एक दिवसाआड पाणी दिले जात असल्याने या भागातही पालिकेने हाच न्याय लावून एक दिवसाआड पाणी द्यावे, या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होवू नये, यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पात्रतेचा पेपर पुन्हा होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टीईटी) शनिवारी फुटलेला पहिला पेपर पुन्हा होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल राज्य सरकारकडे विचाराधीन असून, हा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. राज्यभरातील दीड लाखांहून अधिक उमेदवारांना पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यभरात शनिवारी झालेल्या 'टीईटी'चा पहिला पेपर बीडमध्ये फुटल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्यभरात झालेली परीक्षा वादात सापडली होती. पुण्यासह बीड, धुळे शहरांमध्ये या परीक्षेतील भाग १ ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः नागपूरमध्ये या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार यांना आदेश दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी ४८ तासांची मुदतही देण्यात आली होती. त्यानुसार डॉ. नंदकुमार यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये या शिफारशीचा समावेश असल्याची माहिती खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

या शिफारशीसोबतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यभाराबाबतही या अहवालात निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे सोपविण्यात आलेला परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याच्या सूचनांचाही या अहवालात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’वर मुख्यमंत्री नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेमुळे पुण्याचा नियोजनबद्ध विकास होईल आणि राज्य शासनाला महसूल मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेथे काहीच काम होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 'पीएमआरडीए'च्या कामकाजाची झाडाझडती घेतली. 'पीएमआरडीए'च्या कामकाज आणि महसुलाची माहिती या महिनाअखेर होणाऱ्या जिल्हाधिकारी परिषदेत देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजना, दुष्काळीस्थिती, टँकर तसेच महसूल विभागाशी संबंधित विषयांचा समावेश होता. 'पीएमआरडीए'च्या कामकाजाचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला.

'पीएमआरडीए'ची स्थापना झाल्यापासून बांधकाम आराखडे मंजुरीचे तीन हजारांहून अधिक प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी १,६५० प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. शासनाला किमान एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे वाटले होते. परंतु दोनशे कोटी रुपयांचे सुद्धा उत्पन्न मिळू शकलेले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी 'पीएमआरडीए'च्या कामावर बोट ठेवले.

'पीएमआरडीए'च्या कामकाजाबाबत नागरिक व बांधकाम व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या फाइल्सवर कित्येक महिने निर्णय घेतले गेले नाहीत. यापूर्वी शहरविकास विभागाने मंजूर केलेले आराखडे पुन्हा नव्याने करण्यास भाग पाडले जाते. तसेच जोते तपासणीसाठी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यातून विलंब असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे गेल्या होत्या.

'जलयुक्त'बद्दलही नाराजी

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातील या कामांबद्दल समाधान व्यक्त करताना मराठवाडा आमि विदर्भात जलयुक्त शिवारची काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीडीआरला हवी ९ मीटर रुंदी

$
0
0

वापराच्या पद्धतीमध्ये होणार बदल; 'नगरविकास'ची शिफारस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्तारूंदीच्या प्रमाणामध्ये हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरण्याच्या पद्धतीमध्ये लवकरच बदल करण्यात येणार असून, सहा मीटर रूंदीच्या रस्त्यावर 'टीडीआर' वापरास परवानगी न देण्याची शिफारस नगर विकास विभागाने केली आहे. 'टीडीआर'च्या वापरासाठी किमान नऊ मीटर रूंदीचा रस्ता असण्याचे बंधन कायम राहणार आहे.

'टीडीआर'च्या धोरणामध्ये फेरबदल करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आरक्षित जमीन ताब्यात घेताना संबंधित जमीनमालकास त्याच्या मोबदल्यात 'टीडीआर' द्यावा आणि तो मान्य चटईक्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) अडीच पट द्यावा, अशी शिफारस केली होती. ही शिफारस मंजूर करताना राज्य सरकारने त्यामध्ये काही बदल केले. त्यात दाटवस्तीच्या परिसरात अडीच पट, तर विरळ वस्तीच्या विभागात दुप्पट 'टीडीआर' देण्याचा निर्णय घेतला. तसेच, तो देताना जमिनीच्या बाजारभावाशी जोडून आणि रस्त्याच्या रुंदीप्रमाणे वापरण्याची तरतूद केली.

'टीडीआर'चा वापर सहा मीटर रूंदीच्या रस्त्यावरही करण्याचा प्रस्ताव सुरुवातीला होता. मात्र, या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विरोध केला. मुंबईतील 'कोहिनूर' इमारतीध्ये 'टीडीआर' वापरण्यावरून हायकोर्टात केस दाखल झाली होती. त्यात हायकोर्टाने 'टीडीआर'साठी किमान बारा मीटर रस्ता रूंद असण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. मात्र, हे शक्य नसल्याने किमान नऊ मीटर रूंदीच्या रस्त्यावर 'टीडीआर' वापरास मुभा देण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

'टीडीआर' वापरासंबंधीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामध्ये सहा मीटर रूंद रस्त्यावर टीडीआर वापराला परवानगी न देण्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ९ ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर ५० टक्के टीडीआर वापराचा प्रस्ताव आहे. १२ ते १८ मीटर रूंदीच्या रस्त्यावर ७५ टक्के टीडीआर, १८ ते २४ मीटर रूंद रस्त्यावर दुप्पट टीडीआर वापराची शिफारस आहे. २४ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर सव्वादोन पट आणि ३० मीटर रूंद रस्त्यावर टीडीआरसह अडीचपट बांधकामाची परवानगी मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीतील मुलीने रोखला स्वतःचा बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीत शिकणाऱ्या धाडसी मुलीने आई-वडिलांना विरोध करत स्वतःचा बालविवाह रोखला. या मुलीच्या आई-वडिलांनी, नात्यातील मुलाशी तिचे लग्न ठरवून तारीखही निश्चित केली होती. मात्र, पुढे शिकण्याची इच्छा असल्यामुळे मुलीने पालकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनीही पालकांना बोलवून घेऊन हा बालविवाह रोखला आणि मुलीला त्रास न देण्याची त्यांना तंबी दिली.

मंगळवार पेठेत राहणारी सुचित्रा (नाव बदलेले आहे) १५ वर्षाची असून, तिने पोलिस आयुक्तालयातील महिला सहायता कक्षाकडे आई-वडिलांविरोधात तक्रार दिली आहे. सुचित्राचे वडील रिक्षाचालक असून, आई गृहिणी आहे. तिच्या आईचे लग्न कमी वयातच झाले होते. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तिच्या आईने लग्नाचा आग्रह धरून नात्यातीलच एका २५ वर्षाच्या तरुणाशी तिचे लग्न ठरवले. तिचा या लग्नाला विरोध होता. हा विरोध न जुमानता कुटुंबीयांनी जबरदस्तीने साखरपुडा केला आणि लग्नासाठी २६ एप्रिलचा मुहूर्तही नक्की केला. त्यासाठी वाघोली येथील कार्यालयात एक लाख रुपयांचा आगाऊ भरणाही केला. आईने तिला या मुलाशी फोनवर बोलण्यास भाग पाडून त्यांच्यात जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घराची परिस्थिती हलाखीची असताना, तिला १६ हजार रुपयांचा शालू घेतला. सुचित्राने लग्नाला नकार दिल्यानंतर आई-वडिलांनी तिला मारहाण केली. शेवटी तिने या त्रासाला कंटाळून आजोबा व एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसात धाव घेतली.

'या मुलीच्या आई-वडिलांना बोलवून समज देण्यात आली आहे. तसेच, नियोजित वर मुलालाही याबाबत समजवण्यात आले आहे. जबरदस्तीने बालविवाह केल्यास गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात येईल. मुलीस कुटुंबीयांनी त्रास दिल्यास तिला संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे,' अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.

मुलीने ठरलेल्या मुलाशी लग्न करावे, म्हणून तिला देवऋषीकडे नेण्यात आले. तिचे मन बदलण्याचा प्रयत्न आई-वडिलांनी केला असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले आहे. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला मारहाणही करण्यात आली आहे. तसेच, लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. दीड महिन्याची असल्यापासून ती आजी-आजोबांकडे असून तिचे पालन-पोषण तेच करत आहेत. आई-वडिलांनी जन्म देण्यापलीकडे आपल्याला काही दिले नसल्याचे तिने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीही करा महापालिकेचे बजेट...

$
0
0

पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारे महापालिकेचे बजेट तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये पुणेकरांचा थेट सहभाग असावा यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेतला असून, पुणेकरांच्या बजेटविषयीच्या अपेक्षा व सूचना जाणून घेऊन त्या थेट महापालिकेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जगामध्ये अनेक शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे बजेट तयार करण्यामध्ये नागरिकांचा थेट सहभाग घेतला जातो. भारतामध्येही बंगळूरमध्ये अशा प्रकारे नागरिकांना सहभागी करून घेऊन बजेट तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे महापालिकेने २००६मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष रशीद शेख यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहभागाने बजेट तयार करण्यास प्रारंभ केला आहे. पण प्रारंभी नागरिकांच्या थेट सहभागाने तयार होणारा अर्थसंकल्प हा नंतर नगरसेवकांना त्रासदायक ठरू लागला. त्यानंतर, सर्वसाधारण सभेने ठराव करून नागरिकांनी केलेल्या सूचना या परस्पर अर्थसंकल्पात दाखल करण्याऐवजी त्या नगरसेवकांना विचारूनच दाखल करण्यात याव्यात, असे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसली होती. त्यामुळे, आता 'मटा'ने यामध्ये पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये नागरिकांकडून दोन प्रकारच्या सूचना मागविण्यात येणार आहेत. नागरिक शहर पातळीवर कोणते प्रकल्प असावेत, याची सूचना करू शकतात; तसेच स्थानिक पातळीवर त्यांना कोणते काम होणे आवश्यक वाटते याबाबतही सूचना करू शकतात. त्याचा अधिक तपशील मंगळवारच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आठवडाभरामध्ये आलेल्या सूचनांचे संकलन करून, तसेच त्यांची व्यवहार्यता तपासून त्या सूचना महापालिका आयुक्त कुणालकुमार आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांच्याकडे सूपूर्त करण्यात येणार आहेत. त्याची दखल त्यांनी घेऊन येत्या वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद करणे अपेक्षित आहे

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीस यांचा साहित्य महामंडळावर हल्लाबोल

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण न छापल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लोकनियुक्त अध्यक्षांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू न देणे, ते सेन्सॉर करणे हा केवळ मराठीजनांचा विश्वासघात नसून एक प्रकारची असहिष्णुता आहे,' असा संताप सबनीस यांनी व्यक्त केला आहे.

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सबनीस यांनी केलेल्या मोदीविरोधी वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मोदीसमर्थक आक्रमक झाल्यानं अखेर सबनीस यांना माफी मागावी लागली. मात्र, सबनीस यांच्या संमेलनातील भाषणाबद्दल आयोजकांना धाकधूक होती. संमेलनातील त्यांचे भाषण सुरळीत पार पडले खरे; पण त्यांचे लिखित भाषण महामंडळाने छापलेच नाही. महामंडळाच्या या निर्णयावर सबनीस प्रचंड संतापले आहेत. साहित्य महामंडळानं मराठीजनांचा विश्वासघात केल्याचा आरोप सबनीस यांनी केला आहे.

'महामंडळानं माझं अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या आदल्या दिवशीपर्यंत छापायलाच दिलं नव्हतं. हे कळल्यावर मी स्वत:च ते छापून उद्घाटनाच्या दिवशी संमेलनात वाटण्याची व्यवस्था केली,' असा गौप्यस्फोट सबनीस यांनी केला. 'साहित्य महामंडळाने लोकनियुक्त अध्यक्षाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले. माझ्या भाषणात त्यांना काही आक्षेपार्ह वाटत होते तर त्यांनी संवाद साधणे आवश्यक होते. त्याऐवजी परस्पर भाषण न छापण्याचा निर्णय घेणं ही असहिष्णुताच आहे,' अशी टीका सबनीस यांनी केली. 'साहित्य महामंडळाला सेन्सॉर बोर्डाचे अधिकार दिले गेले आहेत का, हे राज्य सरकारला पत्र पाठवून विचारणार आहे,' असंही सबनीस यांनी सांगितलं.

आत्मकथन लिहिणार!

'साहित्य महामंडळानं संमेलनाच्या आधीपासूनच माझ्याशी संपर्क ठेवलेला नाही. पण मी कोणाच्या मेहरबानीवर जगत नाही,' असं सांगून, 'येत्या वर्षभरात सर्वप्रकारच्या दहशतवादाचा विरोध, धर्मनिरपेक्षतेची पेरणी, सर्व साहित्य प्रवाहांची एकात्म मांडणी याविषयी प्रबोधन करण्याचे प्रयत्न करीन,' असं त्यांनी सांगितलं. पुतळे जाळण्याच्या आणि गाढवावर धिंड काढण्याच्या धमक्या भविष्यात कुठल्याही संमेलनाध्यक्षाच्या वाट्याला येऊ नयेत. तसंच, महामंडळाची असहिष्णुता, सेन्सॉरशिप सर्वांपर्यंत जावी म्हणून लवकरच संमेलनातील बऱ्यावाईट अनुभवांवर आत्मकथन लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गालिब म्हणजे गतिशीलतेचा कवी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. लौकिक जीवनाच्या तराजुतून गालिबच्या काव्याकडे पाहता येत नाही. गालिब हा गतिशीलतेचा कवी आहे,' असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मांडले. बज्मे खिदमते उर्दू आणि पद्मगंधा प्रकाशन यांच्यातर्फे मिर्झा गालिब : जीवन, चरित्र व काव्यसाधना या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. त्या वेळी डॉ. काळे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार काकिर्डे आदी या वेळी उपस्थित होते. गालिबच्या हजारो ख्वाईशे ऐसी, काबां किस नूर से जाओगे गालिब अशा एकाहून एक सरस रचना काळे यांनी सादर केल्या. 'गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. तारुण्यात तो विलासी आणि रंगेल वृत्तीचा होता. कर्मकांडापासून मुक्त होता. त्याने कधी नमाज अदा केला नाही, कधी रोजा ठेवला नाही. मद्य ही गालिबच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू आहे,' असे त्यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images