Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खंडणीच्या उद्देशातूनजिममालकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूडमधील सिटीप्राइड सिनेमागृहाजवळील मॉलच्या पार्किंगमध्ये झालेली गोळीबाराची घटना एक कोटी रुपयांच्या खंडणीतून झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या गोळीबारामागे अन्य काही कारणे आहेत का याचा शोध सुरू आहे. अलंकार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अली शेख (रा. मंगळवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड येथे शकील शकुर विजापुरे यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला होता. हा जल्ला जाणीवपूर्वक कारवर केल्याचा उघडकीस आले आहे. पोलिसांनी गोळीबाराच्या कारणांचा शोध सुरू केला असून, येत्या दोन दिवसांत आरोपी गजाआड होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विजापुरे यांच्या मालकीची गोल्ड जिम सिटीप्राइडजवळ आहे. विजापुरे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिममध्ये आले होते. रात्री साडेआठच्या सुमारात ते आणि त्यांच्या मोटारीचा चालक जिममधून निघाले. त्यांची मोटार बिगबझारच्या पार्किंगमध्ये लावलेली होती. मोटारीमध्ये ते पाठीमागे बसले होते. त्यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या हल्लेखोराने त्यांच्या मोटारीच्या पुढील काचेवर गोळी झाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराचे तापमान साडेनऊ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील थंडीचा कडाका कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने शहरात थंडीचा कडाका वाढला असून, पुणेकरांना हुहहुडी भरू लागली आहे. मंगळवारी पुण्यात ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य व उत्तरेकडील राज्यातील तापमानात घट झाल्याने, तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडी जाणवत होती. उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी तर मध्य प्रदेशातील काही ठिकाणी कमाल तापमानात सहा ते आठ अंशांनी घट झाली होती. पंजाब, बिहार, झारखंड या भागात कमाल तापमानात दोन ते पाच अंशांनी घट झाली होती.

मंगळवारी पुण्यात नोंदले गेलेले २७.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी तर ९.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान एका अंशाने कमी होते. येत्या दोन दिवसात किमान तापमानाचा पारा नऊ अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. राज्यात अन्य ठिकाणी तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युद्धनीती करताना अखंड सावधानता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शत्रूराष्ट्रांना भेटी देणे, त्यांच्याशी चर्चा करणे हा युध्दनीतीचा भाग आहे. मात्र, ते करताना सावध राहिले पाहिजे. युध्द करायचे नसले, तरीही आपण कायमच युध्दसज्ज असले पाहिजे,' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

श्री ओंकारश्वर देवस्थानतर्फे दिला जाणारा 'श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार' शहीद कर्नल संतोष महडिक यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. या वेळी कर्नल महाडिक यांचा मुलगा स्वराज, त्यांचे सासरे बबनराव शेडगे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा आदी उपस्थित होते. 'धर्माचा वापर करून लोकांचे प्राण घेण्याची नवीन युध्दपध्दती तयार झाली आहे. शत्रूराष्ट्रांना प्रत्यक्ष युध्दात जिंकणार नसल्याची खात्री असल्याने आता कमजोरीवर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. आपण सक्षम नसल्यास आपल्यावर युध्द लादले जाते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यासाठी कायमच युद्धसज्ज राहणे आवश्यक आहे,' असेही डॉ. शेकटकर म्हणाले.

बदलते युध्द तंत्रज्ञान, नवनवीन शस्त्रे, बदलती युध्दनीती, याचा अभ्यास करता भारतीय लष्कर अद्ययावत आहे. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपण कमी नसल्याचे डॉ. शेकटकर म्हणाले. तसेच, सध्या चुकीचा इतिहास सांगून नगरिकांना भडकविण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे शाळेतील मुलांच्या मनावर भारताचा पराक्रमी इतिहास बिंबविणे आवश्यक आहे. एखाद्या राष्ट्राच्या नवीन पिढीला इतिहास माहित नसल्यास, त्या राष्ट्राचे भवितव्य धोक्यात असते, असा इशाराही त्यांनी दिला.

वीरपुत्राला अश्रू अनावर

कर्नल संतोष महाडिक यांचा पुरस्कार त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाने, स्वराज याने स्वीकारला. पुरस्कार स्वीकरताना या चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकलवर पुणेकरांच्या उड्या

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे-लोणावळा-पुणे या मार्गावर धावणाऱ्या लोकल प्रवाशांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ११ लाखांनी वाढली आहे. गेल्या चार वर्षांतील प्रवासी वाढीच्या तुलनेत यंदाची प्रवासी वाढ पाचपट आहे. रस्ते वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने, बीआरटी पाठोपाठ लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

लोकलच्या प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. प्रवाशांमध्ये पुणे ते देहूरोड या स्टेशनदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सकाळी आणि सायंकाळी ऑफिस, कॉलेजे सुटण्याच्या वेळेस लोकल गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात. पुणे-लोणावळा लोकलने २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात तीन कोटी ३६ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर २०१३-१४ मध्ये तीन कोटी ३६ लाख ९७ हजार आणि २०१४-१५ या वर्षात तीन कोटी ३८ लाख ६१ हजार प्रवाशांनी लोकल प्रवास केला. तर, २०१५-१६ या वर्षात एक एप्रिलपासून ३१ डिसेंबरपर्यंतची प्रवासी संख्या दोन कोटी ६३ लाख ८८ हजार इतकी आहे. या तुलनेत २०१४-१५ या वर्षात डिसेंबर अखेपर्यंतची प्रवासी संख्या दोन कोटी ५३ लाख होती. त्या आधीच्या वर्षात म्हणजे, २०१२-१३ पासून २०१४-१५ या तीन वर्षात केवळ सव्वादोन लाख प्रवासी वाढले होते.

पुणे- लोणावळा आणि लोणावळा-पुणे या दरम्यान लोकलच्या दररोज ४४ फेऱ्या होतात. एका दिवसात लोकलने सरासरी ८० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा एक चांगला, सोयीस्कर, सर्वसामान्यांना परवडणारा आणि खात्रीचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

पुणे-लोणावळा या मार्गावर पुणे, लोणावळ्यासहीत एकूण १७ स्टेशन आहेत. यामध्ये पुणे ते देहू रोड या दरम्यानच्या प्रवाशांची संख्या तुलनेने अधिक असते. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (क्रमशः)

-----------

वर्ष प्रवासी (कोटींत) उत्पन्न (कोटी रुपयांत)

२०१२-१३ ३, ३६, ४३, ००० १५, ७७, ००, ०००

२०१३-१४ ३, ३६, ९७, ००० १७, ०७, ००, ०००

२०१४-१५ ३, ३८, ६१, ००० १७, ९२, ००, ०००

२०१५-१६ २, ६३, ८८, ००० १४, ४७, ००, ०००

(डिसेंबर २०१५ पर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक, कवींनाच रक्षकांची अरेरावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झोकात पार पडले असले तरी या संमेलनात साहित्यिक कमी आणि मिरवणारे जास्त असे चित्र होते. आवर्जून आलेल्या काही लेखक व पत्रकारांना सुरक्षारक्षकांनी अरेरावी केल्याचे प्रकार संमेलनात घडले, यामुळे संमेलन नेमके कोणाचे, लेखक की राजकारणी, कार्यकर्ते वा सुरक्षारक्षकांचे होते, असा संतापजनक सवाल लेखकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मैदानावर साहित्य संमेलन रंगले, पण सर्वार्थाने वादाची किनार या संमेलनाला कायम होती. संमेलनाचा समारोप होतानाही काही अनुचित प्रकार घडले. साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे व्यासपीठ मानले जाते. पण संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेक साहित्यिकांनी गोंधळात जायला नको म्हणून संमेलनास येण्याचे टाळले. त्यामुळे माजी संमेलनाध्यक्ष वगळता इतर कोणतेही मातब्बर साहित्यिक संमेलनाकडे फिरकलेच नाहीत. माजी संमेलनाध्यक्ष आणि काही नेहमीचे चेहरेच संमेलनस्थळी उपस्थित होते. संमेलनस्थळाबाहेर बांगडी आणि पिनांचाही बाजार भल्याने संमेलनाला जत्रेचे स्वरूप आले होते.

त्यातच खासगी सुरक्षारक्षकांची अरेरावी आलेल्या लेखकांना सहन करावी लागली. असे प्रकार संमेलनात पदोपदी घडताना दिसत होते. या प्रकारांबद्दल तीव्र नाराजीची भावना लेखकांमध्ये असून, भव्य आयोजनातून संमेलनाचा इव्हेंट झाल्याची टीका खासगीत करण्यात येत होती. व्यासपींठावर जाण्यास लेखकांनाच आडकाठी करण्यात आल्याने संमेलन लेखकांचे न राहता ते हायजॅक झाल्याची टीकाही होऊ लागली आहे.

'नेते आले की तुताऱ्या वाजल्या'

ज्येष्ठ पत्रकार-लेखक महावीर जोंधळे सोमवारी सकाळी कविसंमेलनासाठी मुख्य मांडवात प्रवेश करत असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवून अरेरावीची भाषा केली. मी चाळीस वर्षे या क्षेत्रात आहे. लेखकांपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसून आली. संमेलन नेमके कोणाचे आहे, महामंडळाचे की डॉ. पी.डी. पाटील यांचे असा प्रश्न जोंधळे यांनी केला. साहित्याचा उत्सव केवळ राजकारण्यांसाठी असून, नेते आले की तुताऱ्या वाजतात. पण साहित्यिकांशी अरेरावी केली जाते, अशी टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष निवडणुकीवर महामंडळाची गुपचिळी

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या भावना आणि अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी वारंवार केलेल्या सूचनांच्या नंतरही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीची पद्धतीचा फेरविचार करण्यासही राजी नसल्याचे दिसून आले आहे. खुद्द संमेलनात या विषयाला तोंड फुटल्यानंतरही संमेलन समाप्त झाले, तरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे निवडणुकांचेच 'पहिले पाढे पंचावन्न' सुरू राहणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

संमेलनाध्यक्ष पदासाठी मते मागणे योग्य नाही. पाच लोकांची समिती नेमून त्यांनी संमेलनाध्यक्षाची निवड करावी. साहित्यिकांनी राजकारण्यांचा कित्ता गिरवू नये, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साहित्यिकांना संमेलनाच्या व्यासपीठावरून कानपिचक्या दिल्या. त्यानंतर साहित्य महामंडळाचा वार्षिक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असलेल्या संमेलनात या विषयावर चर्चा, विचारविनिमय होणे अपेक्षित होते. परंतु, या संमेलनात महामंडळाकडून अधिकृतपणे किंवा पदाधिकाऱ्यांनी खासगीतही याबाबत बोलणे टाळले आहे. त्यामुळे पवार यांच्या सूचनेकडे कानाडोळा करण्याचा बेत असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तीन वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आले. मार्च महिन्याच्या शेवटी महामंडळाची मुदत संपणार आहे. महामंडळाचे पदाधिकारीच बदलले जाणार असल्याने पवारांची सूचना अव्हेरण्याचे पाप आपल्या हातून घडणार नाही, या आत्मसुखात महामंडळाचे पदाधिकारी वावरत आहेत. महामंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षासाठी विदर्भ साहित्य संघाकडे जाणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी महामंडळावर निवडले जातील. विद्यमान पदाधिकारयांची मुदत फक्त दोन महिने राहिल्याने या काळात घटनेत बदल करणे शक्य नाही, त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांची त्यातून सुटका होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात महामंडळाच्या पदाधिकारयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. संमेलनाध्यक्षपद सन्मानाने दिले जावे, ही अनेक वर्षापासूनची मागणी असून त्यासाठी कराव्या लागणारया घटना बदलण्याच्या तांत्रिक प्रक्रियेला भिडण्याचे आव्हान विद्यमान पदाधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही.

'पवारांची भूमिका योग्यच'

पवारांनी साहित्यिकांच्या मनातील भूमिका मांडली. ही भूमिका अत्यंत योग्य असून, या सूचनेची कार्यवाही व्हावी, असा सूर संमेलनातील साहित्यिकांमध्ये आहे. पवारांची भूमिका योग्य आहे. महामंडळाचे कार्यालय कुठेही गेले, तरी निवडणुका बंद व्हायला हव्यात. रा.चिं. ढेरे, ना.धों. महानोर असे प्रज्ञावंत संमेलनाध्यक्ष कसे होणार,असा सवाल ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी याबाबतीत 'मटा'शी बोलताना केला. सर्व साहित्यिकांची हीच भावना आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकवर्गणीतून करा चित्रपटाची निर्मिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'क्राउड फंडिंग' ही समांतर अर्थव्यवस्था म्हणून विकसित होत आहे. सर्जनशील कलाकारांच्या कलाकृतींना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी सशक्त माध्यम ठरत आहे, असे मत क्राउड फंडिंग वेबसाइट 'विशबेरी'च्या संस्थापिका अंशुलिका दुबे यांनी मांडले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'पिफ बझार'अंतर्गत 'क्राउड फंडिंग' या विषयावर दुबे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत त्यांनी क्राउड फंडिंगची संकल्पना, त्याची कार्यपद्धती, त्याला मिळणारा प्रतिसाद याबाबतची सविस्तर माहिती दिली. चित्रपट निर्मितीसाठी क्राउड फंडिंग कशा पद्धतीने मदत करू शकेल, हेदेखील त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. श्याम बेनेगल यांनी 'मंथन' हा चित्रपट क्राउड फंडिंगच्या माध्यमातूनच केला होता. त्यावेळी पन्नास हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दोन रुपयांची मदत घेण्यात आली होती.

क्राउड फंडिंगसाठी वेगळी तयारी करावी लागते. त्यात सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरते. पैसे देणाऱ्या व्यक्तीला भेटीच्या स्वरुपात परतावा दिला जातो. अमेरिकेत क्राउड फंडिंग ही वेगळी इंडस्ट्रीच आहे. क्राउड फंडिंगमध्ये आर्थिक व्यवहार असल्याने सेबीने त्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, असेही दुबे म्हणाल्या. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून 'पुण्यकोटी' हा देशातील पहिला संस्कृत अॅनिमेशनपट तयार होत आहे. केवळ चित्रपटच नाही, तर शॉर्टफिल्म, माहितीपट, पुस्तके, म्युझिक व्हिडिओ, हार्डवेअर उत्पादन यांसाठीही क्राउड फंडिंगची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्राउड फंडिंग म्हणजे काय?

क्राउंड फंडिंग म्हणजे लोकवर्गणी जगभरात क्राउड फंडिंगच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार होत आहेत. भारतात २०१२पासून क्राउड फंडिंगचा वापर वाढला आहे. इंटरनेटचा वापर वाढण्यामुळे क्राउड फंडिंग ही संकल्पना व्यापक पद्धतीने पोहोचू लागली आहे. सामाजिक कार्यापासून चित्रपट निर्मितीपर्यंत अनेक कारणांसाठी क्राउड फंडिंगची मदत घेतली जाते.

उलाढाल १० कोटींवर

आपल्या देशात २०१२पासून क्राउड फंडिंगच्या मदतीने कलाकृती करण्याचे प्रमाण वाढू लागले. क्राउड फंडिंगसाठी मदत करणाऱ्या अनेक वेबसाइट कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षांत भारतात क्राउड फंडिंगची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणात्मक उपक्रम राबवा

$
0
0

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : वापराविना पडून असलेल्या जुन्या शाळांच्या इमारतींची डागडुजी करून या इमारती विद्यार्थ्यांसाठी वापरात आणाव्यात, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक व्यक्त करत आहेत. वर्गांची दुरुस्ती करून या इमारती वापरात आणल्या; तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाऊ शकतात. शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशीही शिक्षकांची मागणी आहे.

गावोगावी असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या जुन्या इमारतींचा गैरवापर सुरू झाल्याने, त्यांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या इमारतींमुळे अनेक ठिकाणच्या जुन्या इमारती वापराविना पडून आहेत. पत्ते कुटणारे आणि मद्यपींचे अड्डे होण्यापासून या शाळा वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करून त्यांच्या विळख्यातून या वास्तूंची सुटका करावी, अशी मागणी त्यामुळेच जोर धरू लागली आहे.

विद्यार्थ्यांसाठी नव्या शाळा बांधताना जुन्या इमारतींचे करायचे काय, याचे कोणतेही नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले नाही. जुन्या इमारतीही काही ठिकाणी मोडक्या अवस्थेत; तर काही ठिकाणी चांगल्या अवस्थेत आहेत. उपनगरीय भागात अशा पडीक इमारतींमध्ये कृषितज्ज्ञांकडून शेतीचे; तर तज्ज्ञांची मदत घेऊन व्यवसायाबाबतचे प्रशिक्षण केंद्र सुरू करता येऊ शकते. छंदवर्ग, करिअर मार्गदर्शन, विविध व्यावसायांचे प्रशिक्षण असे उपक्रमही या ठिकाणी राबविता येतील, असे पर्याय शिक्षकांकडून सुचविण्यात आले आहेत.

याबाबत बोलताना शिक्षक कुमार मुंगळे म्हणाले, 'पडीक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू करता येतील. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर करिअरसाठी होईल. पडीक शाळांमध्ये असे उपक्रम सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना क्लास व इतर गोष्टींसाठी बाहेर जावे लागणार नाही.'

दुर्गम भागातील शाळांकडे दुर्लक्ष

दुर्गम भागात जिथे शिक्षक मुक्कामी राहून विद्यार्थ्यांना शिकवतात, त्या शाळांकडे शिक्षणाधिकारी फिरकतही नाहीत. रायरेश्वर, सिंगापूर, मानगाव, दापसरे या गावातल्या शाळांमध्ये शिक्षकांसमोर असणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. काही ठिकाणी मर्यादित पटसंख्येमुळे पहिले ते पाचवी या इयत्तांचा वर्ग एकाच खोलीत भरतोय; तर घोलसारख्या गावातल्या शाळेला विद्यार्थीच नसल्याने वर्गात ग्रामपंचायतीचे ऑफिस थाटण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाची स्टेशनरी आढळली रस्त्यावर

$
0
0

विद्यापीठाची स्टेशनरी आढळली रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालांच्या छपाईसाठी वापरली जाणारी स्टेशनरी सोमवारी दुपारी लॉ कॉलेज रोडवर पडलेली आढळली. निकालांच्या छपाईसाठी व्हेंडरकडे दिलेल्या स्टेशनरीचा एक गठ्ठा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडल्याने हा प्रकार घडल्याचे विद्यापीठाने मंगळवारी केलेल्या तपासणीत आढळले.
या विषयी 'मटा'ला मिळालेल्या माहितीनुसार, लॉ कॉलेज रोडवर सोमवारी दुपारी काही लोक लांबलचक कागद गुंडाळताना दिसले. या कागदांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव आणि विद्यापीठाचे अधिकृत बोधचिन्ह छापलेले आढळले. त्यावर परीक्षा नियंत्रकांची सही असली, तरी कोणत्या परीक्षेचा उल्लेख वा गुण छापलेले दिसले नाहीत. त्या विषयी चौकशी केली असता, विद्यापीठाची स्टेशनरी असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या विषयीची छायाचित्रेही 'मटा'ला उपलब्ध करून देण्यात आली.
'मटा' प्रतिनिधीने या विषयी मंगळवारी सकाळी विद्यापीठाकडे संपर्क साधला असता, सुरुवातीला असा कोणताही प्रकार घडल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे नसल्याचे समोर आले. 'मटा'कडे उपलब्ध झालेल्या छायाचित्रांमधील स्टेशनरीवरील एका क्रमांकाच्या सहाय्याने परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी ही स्टेशनरी नेमकी कुठली, याचा शोध घेतला. विभागाने सोमवारी एका व्हेंडरला छपाईसाठी ही स्टेशनरी दिल्याची नोंद विभागामध्ये आढळून आली. विभागाने त्या विषयी संबंधित व्हेंडरकडे चौकशी केली असता, व्हेंडरनेही असा प्रकार घडल्याचे कबूल केले. विद्यापीठाने या विषयी संबंधित व्हेंडरकडून खुलासाही लिहून घेतल्याची माहिती परीक्षा विभागाने मंगळवारी सायंकाळी दिली.
'विद्यापीठाने काही परीक्षांच्या निकालांच्या छपाईसाठी मायक्रोडेटा या कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार या कंपनीचे लोक उत्तरपत्रिकांच्या स्टेशनरीचे १८ बॉक्स घेऊन निघाले होते. लॉ कॉलेज रोडवर स्पीड ब्रेकरवर झालेल्या एका छोट्या अपघातात त्यापैकी एक बॉक्स रस्त्यावर पडल्याने ही स्टेशनरी बाहेर आली. विद्यापीठाने केलेल्या चौकशीमध्ये या कंपनीने ही माहिती दिली. तसेच, या पुढील काळात असा प्रकार होणार नसल्याचेही लेखी खुलाशाद्वारे स्पष्ट केले. या पुढील काळात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी विद्यापीठही योग्य ती खबरदारी निश्चितच घेईल.'
डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथविक्री प्रदर्शनात ५ कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिशय भव्यतेने आयोजित केलेल्या ८९व्या साहित्य संमेलनातील पुस्तकविक्रीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडल्याची चर्चा आहे. ग्रंथविक्रीच्या दृष्टीने हे संमेलन ऎतिहासिक ठरले असून, चार दिवसांत प्रचंड ग्रंथविक्री झाली आहे. संमेलनात एकूण ५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती प्रकाशक परिषदेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी यांनी 'मटा'ला दिली.

'बाजीराव-मस्तानी चित्रपटामुळे राऊ, नटसम्राट चित्रपटामुळे नटसम्राट, कट्यार काळजात घुसली हे नाटक या बरोबरच तर शरद पवार यांच्या लोक माझ्या सांगाती या पुस्तकांची तडाखेबाज विक्री संमेलनात झाली. यंदाच्या संमेलनाने ग्रंथ विक्रीमध्ये विक्रम झाल्याने ग्रंथविक्रीच्या दृष्टीने संमेलन ऎतिहासिक होते,' असे 'अक्षरधारा'चे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शनात चारशे दालनांमध्ये सव्वा लाख मराठी पुस्तके उपलब्ध होती. मौज, पॉप्युलर, मॅजिस्टिक, पद्मगंधा, अमेय, रसिक, कॉन्टिनेंटल, मेहता, रोहन, साकेत, शुभम, डायमंड,राजहंस, गदिमा, ज्योत्स्ना, गमभन अशा प्रसिद्ध प्रकाशन संस्थांच्या दालनांमध्ये तसेच अक्षरधारा, ज्ञानगंगा यांसारख्या पुस्तक विक्री करणाऱ्या संस्थांच्या दालनांमध्ये वाचकांची गर्दी होती. संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाल्यानंतर ग्रंथविक्रीसाठी विशेष गर्दी नव्हती. शनिवार सुटीचा वार असूनही पुस्तकांची विक्री विशेष नोंदवली गेली नव्हती, पण रविवारने पहिल्या दोन दिवसांची कसर भरून काढली आणि ग्रंथविक्रीचा उच्चांक नोंदवला.

ऐतिहासिक पुस्तकांना अधिक मागणी

राऊ, द. गो. गोडसे लिखित मस्तानी, नटसम्राट, लोक माझे सांगाती या पुस्तकांबरोबरच मृत्युजंय, छावा, श्रीमानयोगी, पानिपत, स्वामी, ययाती, हिंदू, एकटा जीव या पुस्तकांना प्रचंड मागणी होती. पुस्तके हातोहात खपत असल्याने प्रकाशक व विक्रेत्यांची धावपळ उडाली. गुलजार, अच्युत गोडबोले, गुलजार यांच्या पुस्तकांनाही वाचकांची पसंती होती. ई-बुकच्या दालनांमध्येही वाचकांची गर्दी होती. श्री ठाणेदार, अच्युत गोडबोले यांनी पुस्तकांच्या दालनांमध्ये उपस्थितीही लावली. त्यांनी लिहिलेली पुस्तके विकत घेऊन त्यावर लेखकाची स्वाक्षरी असा दुहेरी आनंद वाचकांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय विद्यार्थ्यांचे पुन्हा उपोषणास्त्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ १३९ दिवसांचा संप करणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारले.

हैदराबाद येथे पाच दलित विद्यार्थ्यांना वाळीत टाकल्याच्या आणि त्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ हे प्रतिकात्मक उपोषण करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा प्रशासन विभाग आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेकडून अयोग्य वागणूक देऊन त्यांना वाळीत टाकल्याचा आरोप 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या पाच विद्यार्थ्यांतील रोहित वेमुला या विद्यार्थ्याने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, अभाविपचे विद्यापीठ प्रमुख सुशील कुमार, कुलगुरू अप्पाराव पोडिले, विद्यापीठाचे शिस्तपालन अधिकारी प्रा. अलोक पांडे हे रोहित वेमुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोपही 'एफटीआयआय'च्या स्टुडंट कौन्सिलने केला.

गेल्या काही काळात देशात अल्पसंख्याकांवर हल्ला करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, मतभेदाच्या स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, ब्राह्मणी विचार लादले जात असल्याचा आरोप करून तीव्र निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर टोलझोल

$
0
0

वाहनांची संख्या निम्म्याने कमी दाखवली; चित्रीकरणातून झाले स्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील विविध टोलनाक्यांवरून होणारी प्रत्यक्ष वाहनांची आणि कंत्राटदाराकडून दाखविण्यात आलेल्या वाहनांच्या संख्येत प्रचंड तफावत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दर वर्षी दीडशे कोटी रुपयांची आणि गेल्या दहा वर्षांत सुमारे दीड हजार कोटी रुपयांची राज्य सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रस्ते विकास महामंडळाने कंत्राट देऊन जुलै २०१५ मध्ये पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील खालापूर, तळेगाव, कुसगाव, शेडुंग या टोलनाक्यांवर येणाऱ्या वाहनांची व्हिडिओग्राफीद्वारे माहिती घेतली. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकार कायद्याद्वारे याबाबतचा तपशील मिळविला असून, त्यातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. टोलवसुली ठेकेदाराने दिलेल्या वाहनसंख्येच्या आकड्यापेक्षा एक्स्प्रेस वेवरून प्रत्यक्षात पन्नास टक्के वाहने अधिक धावतात, असे आढळून आले आहे.

'एक्स्प्रेस वेवरील टोलनाक्यांवर येणाऱ्या वाहनांची कंत्राटदाराकडून दाखविल्या जाणाऱ्या आकडेवारीबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने स्वतःहून खासगी कंत्राटाद्वारे टोलनाक्यांवर येणाऱ्या वाहनांची व्हिडीओग्राफी केली. त्याद्वारे वाहनांची संख्या मोजण्यात आली. खालापूर, तळेगाव, कुसगाव आणि शेडुंग या चार टोलनाक्यावर तीन दिवसांमध्ये सरासरी येणाऱ्या वाहनांची संख्या आणि कंत्राटदाराने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत ५० टक्के फरक तफावत असल्याचे आढळले. त्यामुळे राज्य सरकारला दाखविलेली रक्कमही कमीच आहे. त्यातून नागरिकांची लूट होत आहे. एका वर्षात टोलनाक्यातून सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांची रक्कम वसूल केल्याचे दाखविले जाते. तफावतीनुसार सुमारे ४५० कोटी रुपयांची रक्कम नागरिकांच्या खिशातून वसूल केली जात आहे,' अशी माहिती शिरोडकर आणि वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'पुणे एक्सप्रेस वेवरून व्हीआयपी, पोलिस वाहने आणि पासधारक वाहने जात असतात. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक दिसत आहे. त्या तुलनेत कंत्राटदार कंपनीकडे कमी संख्या दिसून येत आहे,' असे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता डी. ए. साळुंखे यांनी सांगितले.

या रस्त्यावरील टोलनाक्यावरून मंत्री, खासदारांची वाहने वगळली तरी आकडेवारीत एवढी तफावत येण्याची शक्यता नाही. जर सूट देण्यात येणारी वाहनांची संख्या ५० टक्के गृहित धरण्यात आल्यास सूट देण्यात येणारी वाहने ५० टक्के असू शकतात का, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला. सरकारला टोलमाफी करायची असेल, तर राज्य सरकारने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील होणाऱ्या टोलनाक्यावर झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दहावीत एकही विद्यार्थी नापास होणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

'यंदाच्या वर्षांपासून दहावीमध्ये एकही मुलगा नापास होणार नाही,' अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. 'दहावीच्या परीक्षेमध्ये साधारणतः ९० टक्के विद्यार्थी पास होतात. लगेच पुन्हा घेतलेल्या परीक्षेमध्ये सहा टक्के मुले पास होतात. मग, राहिलेल्या चार टक्के मुलांचे (सुमारे साठ हजार) राज्य सरकार वन-टू-वन करिअर कौन्सेलिंग करण्यात येणार आहे,' असेही तावडे म्हणाले

मुलांमधील गुणांची माहिती घेऊन त्यांना त्याप्रमाणे एक वर्षांचे प्रशिक्षण देणार. ते पूर्ण केल्यावर ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण अकरावीसाठी आणि चार टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कौशल्य विकासासाठी, असे मानले जाणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

खडकी शिक्षण संस्थेच्या जीएमआय कन्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस चंद्रकांत छाजेड, खडकी कॅँटोन्मेंटचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, आमदार शरद रणपिसे, मुख्याध्यापिका सुरेखा अळगुंडगी उपस्थित होते.

तावडेंचा माफीनामा

शाळेचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार होता; मात्र साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास पूर्णवेळ थांबावे लागल्याने नियोजित कार्यक्रमास येण्यास चार तास उशीर झाला. तावडे रात्री साडेनऊ वाजता पोचले. कार्यक्रात पोहचताच त्यांनी माईक हातात घेतला आणि उपस्थितांची माफी मागितली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री निघून गेल्यामुळे जे काही घडले ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे मला तेथे थांबावे लागले; नाही तर पुन्हा असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित झाला असता,' असेही विनोद तावडे या वेळी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडीक शाळांची आकडेवारी नाही

$
0
0

Prasad.Pawar
@timesgroup.com

पुणे : जिल्हा परिषदेच्या पडीक शाळांची आकडेवारी प्रशासनाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाला पडीक शाळांची मोजणी करण्यापासून पावले उचलावी लागणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या गावोगावी असणाऱ्या पडीक शाळांचा ताबा अड्डेबाजांनी घेतल्याचा तसेच इथे चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत 'मटा'ने 'अनास्थेची शाळा' या मालिकेतून हा प्रकार समोर आणला. जिल्हा परिषदेच्या पडीक इमारतींमध्ये पत्ते खेळणारे आणि मद्यपींनी अड्डे जमविले आहेत. पडीक शाळांच्या वर्गांमध्ये चालणारे हे प्रकार त्वरित थांबवावेत, अशी मागणी शिक्षकांकडून केली जाते आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे ही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, 'जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या किती खोल्या वापरात आहेत, याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकेल मात्र किती शाळा पडीक आहेत आणि वापरात नाहीत त्यांची आकडेवारी गोळा करण्यासाठी काही दिवस द्यावे लागतील.'

पडीक शाळांमध्ये गैरप्रकार वाढत आहेत. असे प्रकार विद्यार्थ्यांसमोर चालत असल्याने त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक बाहेरगावचे असल्याने स्थानिकांशी याबाबत चर्चा करणेही त्यांच्यासाठी धोकादायक आहे. उपनगरीय भागात हे प्रकार जास्त घडताना दिसतात. अशा पडीक शाळांबाबत प्रशासनाकडेच माहिती नसल्याने त्याबाबत असणारी अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

नियोजन नाही

गावोगावी शाळांसाठी नव्या सुसज्ज इमारती बांधताना जुन्या इमारतींचे करायचे काय, याचा विचारच जिल्हा परिषद प्रशासनाकडून न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. सध्या पडीक शाळांमध्ये चालणाऱ्या प्रकारांबाबतची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे की नाही, याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली.
(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोराची चिंचोली येथे राज्य सिंचन परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सिंचन सहयोग'च्या वतीने आयोजित करण्यात येणारी १७वी महाराष्ट्र राज्य सिंचन परिषद येत्या २० व २१ फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जयमल्हार कृषि पर्यटन केंद्रामध्ये होणार आहे. शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय म्हणून कृषि पर्यटन हा पर्याय अजमावणे हा परिषदेतील चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे.

महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न, नवीन तंत्रज्ञान, लागवडीचे नवे प्रयोग, शेती उत्पन्नवाढ, ग्रीन हाउस, पाण्याचे समन्यायी वाटप अशा विविध विषयांवर सिंचन परिषदेमध्ये उहापोह केला जातो. यंदाच्या सिंचन परिषदेमध्ये अवर्ण-प्रवण क्षेत्राचा विकास हा मुख्य विषय राहणार आहे. या अनुषंगाने पशुपालन, चारानिर्मिती, गट व समुह शेती, शेडनेट व कृषि पर्यटन या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या विषयांमधील अनुभव व जाणीवांवर आधारित लेख लिहून परिषदेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या परिषदेत सिंचन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था, शेतकरी तसेच शेतकरी बांधवांना मार्गदर्शक काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. राज्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. अलिकडच्या काळात शेतकऱ्याला पुरक उत्पन्न मिळवून व्यवसाय म्हणून कृषि पर्यटनाला महत्त्व येत आहे. कृषि पर्यटनाचा पर्याय शेतकऱ्यांना अवलंबवा यासाठी परिषदेमध्ये केंद्रबिंदू म्हणून यावर चर्चा केली जाणार असल्याचेही डॉ. मोरे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औंधचा पिनकोड आता ६७

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नव्याने विस्तारलेल्या औंध परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या परिसरात नवे पोस्ट ऑफिस लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे औंध परिसराचा पिनकोड आता बदलणार असून या परिसराला पुणे ०७ ऐवजी पुणे ६७ अशी नवी ओळख मिळणार आहे. यासाठी सर्व आवश्यक पूर्तता करण्यात आली असून लवकरच हे पोस्ट ऑफिस कार्यरत होणार आहे.

पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी ही माहिती दिली. पूर्वीच्या काळी औंध परिसरात फारशी वस्ती नव्हती. परंतु, अलिकडच्या काळात औंध परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहिल्या असून वस्तीही वाढली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पोस्टल सुविधा पुरविण्यासाठी औंधमध्ये हे नवे सब डिलिव्हरी पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येत आहे. नव्या पोस्ट ऑफिसमुळे औंध परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. त्याचबरोबर गणेशखिंड पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होणार आहे.

'औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवनामध्ये हे पोस्ट ऑफिस सुरू होईल. पोस्ट विभागाच्या सर्व सुविधा येथे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. पूर्वी औंध भागातील सर्व पत्रांचा बटवडा गणेशखिंड पोस्ट ऑफिसमधून केला जात होता. आता या पोस्ट ऑफिसमधील आठ ते दहा पोस्टमनच्या बिट्स औंध येथील नव्या पोस्ट ऑफिसमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षात कापडगंज व एएफएमसी ही दोन पोस्ट ऑफिस बंद करण्यात आली आहेत. तेथील कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना औंध येथील पोस्ट ऑफिसमध्ये नेमणूक देण्यात आली आहे,' असे सावळेश्वरकर यांनी सांगितले.

'नव्या पोस्ट ऑफिसमुळे नागरिकांची सोय होणार असली, तरी त्यामुळे पिनकोडमध्ये बदल होणार आहे. नागरिकांना बदललेल्या पिनकोडची माहिती करून देणेही आवश्यक आहे. त्यासाठी पोस्ट विभागातर्फे नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. बदललेल्या पिनकोडमुळे नागरिकांचा संभ्रम होऊ नये, यासाठी त्यांना पुरेशी माहिती देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे,' असेही सावळेश्वरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डमी’ आडत्यांवर बाजार समितीची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळ्याच्या पंधरा फुटाच्या बाहेर व्यापार करणाऱ्या 'डमी' आडत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे ६० 'डमी' आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बाजार समितीच्या मार्केट यार्डातील बाजार आवारात 'डमी' आडत्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नव्या प्रशासकीय मंडळाने 'डमी' आडत्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उपसले आहे. या संदर्भात बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासकीय मंडळासह आडत्यांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक झाली. मात्र, त्यात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

'मार्केट यार्डातील बाजार आवारात सातशे ते एक हजार 'डमी' आडते व्यापार करीत आहेत. गाळ्याच्या १५ फुटाबाहेर व्यवसाय करणे चुकीचे आहे; तसेच गाळेधारकांकडे मदतनीस म्हणून 'डमी' आडते व्यवसाय करतात. अतिरिक्त मदतनीसांना गाळे बंद ठेऊन गाळेधारक गाळे भाड्याने देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बाजार समितीचे सेस बुडविण्याचे प्रकार सुरू आहेत. म्हणूनच चार दिवसांत ६० व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरुच राहेणार आहे. व्यापाऱ्यांसह झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. कारवाईसंदर्भात व्यापाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार आहोत,' असे बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी सांगितले. बाजार आवारात ज्या बेकायदा गोष्टी सुरू आहेत, त्या होऊ नयेत. ते बंद करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, 'पूर्वी गाळ्यापासून १५ फुटाच्या बाहेर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आमचा विरोध आहे. त्याच्यावर दंडात्मक अथवा माल जप्तीची कारवाई केल्यास त्याला विरोध राहणार नाही; परंतु दोन मदतनीस ठेवण्यास विरोध होत असेल; तसेच सरसकट व्यापाऱ्यांवर कारवाईचे धोरण राबविले गेले, तर बाजार समितीच्या या भूमिकेला आमचा विरोध राहील.'

ग्राहकांची फसवणूक

मार्केट यार्डात सध्या सुमारे ९०० गाळेधारक आहेत. घाऊक विक्रेत्यांकडे फळे, भाज्या घेऊन त्यांच्या गाळ्यापुढेच त्याची जादा दराने विक्री करीत असल्याने त्यात गाळेधारकाचा देखील फायदा होत असल्याचे दिसून आले. मात्र त्यामध्ये ग्राहकाची फसवणूक होत असली तरी त्याबाबत बाजार समिती प्रशासन काहीच बोलत नसल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पात्रतेचा पेपर पुन्हा होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टीईटी) शनिवारी फुटलेला पहिला पेपर पुन्हा होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल राज्य सरकारकडे विचाराधीन असून, हा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. राज्यभरातील दीड लाखांहून अधिक उमेदवारांना पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यभरात शनिवारी झालेल्या 'टीईटी'चा पहिला पेपर बीडमध्ये फुटल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्यभरात झालेली परीक्षा वादात सापडली होती. पुण्यासह बीड, धुळे शहरांमध्ये या परीक्षेतील भाग १ ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः नागपूरमध्ये या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार यांना आदेश दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी ४८ तासांची मुदतही देण्यात आली होती. त्यानुसार डॉ. नंदकुमार यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये या शिफारशीचा समावेश असल्याची माहिती खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली. या शिफारशीसोबतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यभाराबाबतही या अहवालात निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे सोपविण्यात आलेला परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याच्या सूचनांचाही या अहवालात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यभरात झालेल्या या परीक्षेत राज्यभरातून एकूण ३ लाख २५ हजार ९४४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी या परीक्षेतील पहिला पेपर घेण्यात आला. या पेपरसाठी एक लाख ९१ हजार ३७० उमेदवारांनी नोंदणी केली होती. या सर्व उमेदवारांना आता पुन्हा नव्याने होणाऱ्या पहिल्या पेपरच्या स्वतंत्र परीक्षेसाठी बसावे लागणार की नाही, याचा निर्णय लवकरच अधिकृतपणे जाहीर केला जाणार असल्याचेही मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

खेळ परीक्षा परिषदेचा...

टीईटी, स्कॉलरशिप अशा महत्त्वाच्या परीक्षा घेण्यात प्रमुख भूमिका बजावणारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शिक्षण खात्यातील एक महत्त्वाची संस्था आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही संस्था पूर्णवेळ अध्यक्ष आणि पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत आहे. या संस्थेमधील अनेक पदे गेली काही वर्षे भरलीच नसल्याने, सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. त्यातच टीईटी आणि स्कॉलरशिपसारख्या परीक्षांदरम्यान काही आक्षेपार्ह प्रकार घडल्यास त्याचे खापर संस्थेच्या माथी फोडले जात आहे. संस्थांतर्गत पातळीवर कार्यरत संघटनांमधील अंतर्गत वादाचा फटकाही गेल्या काही काळात संस्थेत कार्यरत उच्चपदस्थांना बसल्याचे गेल्या काही काळात अनुभवायला मिळत आहे. अशा परिस्थितीत टीईटीच्या निमित्तानेच राज्य सरकारला या संस्थेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरसाठी हवा नऊ मीटर रूंद रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्तारूंदीच्या प्रमाणामध्ये हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरण्याच्या पद्धतीमध्ये लवकरच बदल करण्यात येणार असून, सहा मीटर रूंदीच्या रस्त्यावर 'टीडीआर' वापरास परवानगी न देण्याची शिफारस नगर विकास विभागाने केली आहे. 'टीडीआर'च्या वापरासाठी किमान नऊ मीटर रूंदीचा रस्ता असण्याचे बंधन कायम राहणार आहे.

'टीडीआर'च्या धोरणामध्ये फेरबदल करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आरक्षित जमीन ताब्यात घेताना संबंधित जमीनमालकास त्याच्या मोबदल्यात 'टीडीआर' द्यावा आणि तो मान्य चटईक्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) अडीच पट द्यावा, अशी शिफारस केली होती. ही शिफारस मंजूर करताना राज्य सरकारने त्यामध्ये काही बदल केले. त्यात दाटवस्तीच्या परिसरात अडीच पट, तर विरळ वस्तीच्या विभागात दुप्पट 'टीडीआर' देण्याचा निर्णय घेतला. तसेच, तो देताना जमिनीच्या बाजारभावाशी जोडून आणि रस्त्याच्या रुंदीप्रमाणे वापरण्याची तरतूद केली.

'टीडीआर'चा वापर सहा मीटर रूंदीच्या रस्त्यावरही करण्याचा प्रस्ताव सुरुवातीला होता. मात्र, या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विरोध केला. मुंबईतील 'कोहिनूर' इमारतीध्ये 'टीडीआर' वापरण्यावरून हायकोर्टात केस दाखल झाली होती. त्यात हायकोर्टाने 'टीडीआर'साठी किमान बारा मीटर रस्ता रूंद असण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. मात्र, हे शक्य नसल्याने किमान नऊ मीटर रूंदीच्या रस्त्यावर 'टीडीआर' वापरास मुभा देण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

'टीडीआर' वापरासंबंधीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामध्ये सहा मीटर रूंद रस्त्यावर टीडीआर वापराला परवानगी न देण्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ९ ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर ५० टक्के टीडीआर वापराचा प्रस्ताव आहे. १२ ते १८ मीटर रूंदीच्या रस्त्यावर ७५ टक्के टीडीआर, १८ ते २४ मीटर रूंद रस्त्यावर दुप्पट टीडीआर वापराची शिफारस आहे. २४ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर सव्वादोन पट आणि ३० मीटर रूंद रस्त्यावर टीडीआरसह अडीचपट बांधकामाची परवानगी मिळू शकणार आहे.

पंधरवड्यात निर्णय होणार

रस्ता रूंदीच्या प्रमाणात डीटीआर वापरासंबंधीचा प्रस्ताव नगर विकास विभागाने तयार केला असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यावर येत्या पंधरा ते वीस दिवसांत निर्णय अपेक्षित असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिफारशी याप्रमाणे..

रस्त्याची रूंदी टीडीआर प्रस्ताव

९ ते १२ मीटर ५० टक्के

१२ ते १८ मीटर ७५ टक्के

१८ ते २४ मीटर दुप्पट

२४ ते ३० मीटर सव्वादोन पट

३० मीटर अडीचपट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’वर मुख्यमंत्री नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) स्थापनेमुळे पुण्याचा नियोजनबद्ध विकास होईल आणि राज्य शासनाला महसूल मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेथे काहीच काम होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 'पीएमआरडीए'च्या कामकाजाची झाडाझडती घेतली. 'पीएमआरडीए'च्या कामकाज आणि महसुलाची माहिती या महिनाअखेर होणाऱ्या जिल्हाधिकारी परिषदेत देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजना, दुष्काळीस्थिती, टँकर तसेच महसूल विभागाशी संबंधित विषयांचा समावेश होता. 'पीएमआरडीए'च्या कामकाजाचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला. या आढाव्यात मुख्यमंत्र्यांनी 'पीएमआरडीए'च्या कामाविषयी नाराजी प्रकट केली.

'पीएमआरडीए'ची स्थापना झाल्यापासून बांधकाम आराखडे मंजुरीचे तीन हजारांहून अधिक प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी १,६५० प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तेव्हा, 'पीएमआरडीए'च्या स्थापनेमुळे पुणे महानगर क्षेत्राचा विकास होईल आणि मोठा महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. शासनाला किमान एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे वाटले होते. परंतु दोनशे कोटी रुपयांचे सुद्धा उत्पन्न मिळू शकलेले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी 'पीएमआरडीए'च्या कामावर बोट ठेवले. 'पीएमआरडीए'कडील प्रकरणे व महसुली उत्पन्न याची तपशीलवार माहिती २८ जानेवारी रोजी होणाऱ्या परिषदेत देण्याची सूचनाही त्यांनी केली.

'पीएमआरडीए'च्या कामकाजाबाबत नागरिक व बांधकाम व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या फाइल्सवर कित्येक महिने निर्णय घेतले गेले नाहीत. यापूर्वी शहरविकास विभागाने मंजूर केलेले आराखडे पुन्हा नव्याने करण्यास भाग पाडले जाते. तसेच जोते तपासणीसाठी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यातून विलंब असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे गेल्या होत्या. बांधकाम परवानगी देण्यापलीकडे 'पीएमआरडीए'कडून विकासाचे कोणतेही मोठे प्रकल्प हाती घेण्याच्या दृष्टीने हालचाल झाल्याचेही दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.

'जलयुक्त'बद्दलही नाराजी

दरम्यान, या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातील या कामांबद्दल समाधान व्यक्त करताना मराठवाडा आमि विदर्भात जलयुक्त शिवारची काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images