Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणाईला अभिव्यक्तीची ओढ

$
0
0

Shripad.Brahme@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी : काळ बदलला, माध्यमे बदलली तरी तरुणाईची व्यक्त होण्याची प्रेरणा कायम आहे आणि कायमच राहील; मोठ्यांनी तिच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही, असा सूर ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सोमवारी झालेल्या 'आजची तरुणाई : काय वाचते? काय लिहिते?' या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उपमंडपात रंगलेल्या या परिसंवादाचे अध्यक्षस्थान 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी भूषविले. प्रसिद्ध लेखक राजन खान, प्रा. राजेंद्र मुंडे, जुई कुलकर्णी आणि कैलास इंगळे या वक्त्यांनी परिसंवादात भाग घेतला.

प्रा. मुंडे म्हणाले, 'आजची तरुण पिढी टेक्नोसॅव्ही आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक संवाद साधने उपलब्ध आहेत. माध्यमे बदलली, तरी ही पिढी वाचत आहे. त्या त्या काळातील माध्यमावर तरुण स्वार होत असतात. आजच्या आयटीमधील तरुणांना फँटसीची ओढ आहे. अनुवादित साहित्याकडेही त्यांचा कल दिसून येतो. अनेक तरुण धाडसाने आपले म्हणणे मांडताना दिसतात. त्यांची भाषा हायब्रीड आहे. त्यांच्या पुस्तकांची नावेही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यावरून त्यांच्या लिखाणातील जोरकसपणा दिसून येतो. आजची पिढी सकस लिहिते आणि तेच तिचे सामर्थ्य आहे.'

जुई कुलकर्णी म्हणाल्या, 'तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा किंडलवर वाचते. त्यांच्या वाचनात क्वांटिटी असली, तरी क्वालिटी असतेच असे नाही. फक्त इथे लिहिणारे सर्व स्तरांतले असतात. ते पेशाने लिहिणारे असतीलच असे नाही. या माध्यमात दादही थेट व लगेच मिळते. अट्टल वाचणारे मात्र मुद्रित पुस्तके वाचणे सोडत नाहीत. आजच्या तरुणाईला अनुवाद वाचायला आवडतात. त्यातून मराठी माध्यमातून शिकलेल्या पिढीला इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी अनुवाद म्हणजे जगाची उघडलेली खिडकी वाटते. इंग्रजीतील तत्त्वज्ञान वाचायला आवडते. चेतन भगतसारखा लेखक चटपटीत लिहितो, सोपे इंग्रजी लिहितो, म्हणून तो तरुणाईला आवडतो. सोशल मीडियामुळे समाजातले बरेच भेद नष्ट झाले. हे सपाटीकरण लेखनाच्या बाबतीत स्वागतार्ह आहे.'

कैलास इंगळे यांनी आजच्या तरुणाईच्या माध्यमांची अनोखी ए टु झेड अशी 'एबीसीडी'च सादर केली. राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने नव्याने लिहिणाऱ्या तरुणाईचे पहिले पुस्तक काढावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

अध्यक्षीय समारोप करताना श्रीपाद अपराजित यांनी तरुणाईच्या अभिव्यक्तीविषयी सकारात्मक सूर व्यक्त केला. विदर्भातील अनेक लहान गावांतून आलेल्या मुलांच्या सकस लेखनाचे दाखले त्यांनी या वेळी दिले. आजच्या तरुणाईचे समाजभान हरपलेले नाही, असे निःसंदिग्ध प्रतिपादन करताना ते म्हणाले, 'मोबाइल हे आजच्या पिढीचे अस्त्र आहे. त्यांना त्यांचे आक्रंदन सोशल मीडियावर मांडता येते, ही चांगली गोष्ट आहे. गांधी-आंबेडकर यांचे आजच्या तरुण पिढीला आकर्षण आहे. बाजीराव मस्तानी सिनेमानंतर राऊ कादंबरीचा खप वाढला. तरुणाईचे मार्ग वेगळे आहेत; पण त्यांची जाणण्याची उत्सुकता कायमच आहे. आजची पिढी संभ्रमावस्थेत आहे, असे वाटत असले, तरी नव्या संकल्पना रुजवण्यातही हीच पिढी आघाडीवर आहे.'

तरुणांची अभिव्यक्ती खोटी : राजन खान

राजन खान यांनी मात्र अन्य वक्त्यांपेक्षा वेगळा सूर लावून, आजच्या तरुणाईला कानपिचक्या दिल्या. सोशल मीडियावरही कंपूशाही दिसते. तेथेही गट-तट दिसतात. जात तेथूनही गेलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. पूर्वी चांगले लिहिणारे शंभर-दीडशे जण असायचे. आज चाळिशीतला राज्यभर नाव असणारा एक तरी सकस लेखक दाखवा, असे आव्हान खान यांनी उपस्थितांना दिले. आजच्या तरुणाईची अभिव्यक्ती खोटी असून, त्यांचे लेखन आत्मकेंद्री आहे, असे बजावून काळावर मात करणारे लेखन करणारी तरुणाई कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. जो माणूस व्यवस्थेत कमकुवत असतो, तोच चांगला लेखक वा कवी होतो, असे स्पष्ट करून, समाजाला मार्गदर्शन करणारे लेखन आज कुठे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा

$
0
0

संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची सरकारकडे विनंती

Suneet.Bhave@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने वादात सापडलेले संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाच्या समारोप सोहळ्यातही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सीमाभागाच्या प्रश्नावरून कानपिचक्या दिल्या. 'केंद्रातील आणि राज्यातील सरकारने मनात आणले, तर सीमाभागाचा प्रलंबित प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या बाहेरही सुटू शकतो,' अशी विनवणी करत, 'वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केला जावा,' अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्षांच्या समारोपाच्या भाषणाने संमेलनाची सांगता होते. डॉ. सबनीस यांनी ही परंपरा खंडित करून प्रमुख पाहुणे जावेद अख्तर यांच्या भाषणापूर्वीच आपले विचार व्यक्त केले. संमेलनाच्या समारोप सत्रातील खुल्या अधिवेशनात नेहमीच सीमाप्रश्नाविषयी ठराव केला जातो; परंतु, तरीही या भागांत राहणाऱ्या नागरिकांना जिवंतपणी आणि मेल्यानंतरही नरकयातना भोगाव्या लागतात, याचे वास्तव सुरुवातीलाच व्यक्त करून, 'हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,' असा आग्रह डॉ. सबनीस यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला.

'राज्यात भाजपचे सरकार आहे, केंद्रात भाजपचे सरकार आहे. मग संवाद का करत नाही,' अशी विचारणा करत, 'वादग्रस्त सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केला जावा,' असे त्यांनी सुचवले. 'राज्यातील सर्व खासदारांनी त्यासाठी पाठपुरावा करावा,' असे सांगत त्यांनी सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, केंद्र सरकारला हे कोडे घालावे, असे सूचित केले.

समारोप करताना, त्यांनी छापील भाषणात व्यक्त केलेल्या मुद्द्यांचा धावता परामर्श घेत, 'महापुरुषांच्या नावे केली जाणारी दुकानदारी थांबवा,' याचा पुनरुच्चार केला; तसेच महाराष्ट्राचा प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी जिल्हा स्तरावरील स्थानिक इतिहासकारांनी, तज्ज्ञांनी पुढे यावे,' असे आवाहन त्यांनी केले.

सबनीसांचा माध्यमांवर निशाणा

लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतरही एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात, 'अध्यक्षांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवर डॉ. सबनीस यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढविला. लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतरही अपशब्द वापरणाऱ्यांना खडे बोल सुनावत, हा राज्यघटनेचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्यविचाराने दिशा द्यावी’

$
0
0

sunil.landge@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) : 'देशात प्रत्येकाला लिहण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु त्याहीपुढे जाऊन साहित्य विचाराने देशाला दिशा देण्याचे कार्य करावे,' अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. लेखकांच्या सहिष्णू-असहिष्णुतेच्या मुद्द्यावर ते काय मते मांडतात, याबाबत उत्सुकता होती. त्याचा प्रत्यक्ष उल्लेख गडकरी यांनी टाळला, तरी या मुद्द्यांपेक्षा देशाचा विकास आणि दिशा यासाठी साहित्यिकांनी योगदान देण्याची गरज व्यक्त केली.

'साहित्याच्या माध्यमातून राष्ट्रीय जडणघडण महत्त्वाची आहे,' असे नमूद करून ते म्हणाले, 'भावी पिढीवर संस्कार करण्याचे महान कार्य साहित्य करीत असते. त्यातून संस्कार आणि वैयक्तिक जडणघडण होते. समाजात चांगले-वाईट, सुख-दुःख, अंधार-प्रकाश आहे. यापुढेही राहील. त्या अनुषंगाने प्रत्येकाला लिहण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु जात, पंथ, भाषा, धर्म, व्यक्ती यापेक्षा मोठा विचारच देशाला पुढे नेऊ शकतो. ते सामर्थ्य साहित्यिक, विचारवंत यांच्यामध्ये आहे.'

ते म्हणाले, 'साहित्यात त्या-त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीविषयी प्रतिबिंब उमटत असते. मधल्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या वेळी तेथील लेखकांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर परखडपणे लिहिले. नेमक्या शब्दांत लिहले. व्यथा मांडल्या. त्यावरून पुढे चित्रपट निघाला. जनजागृती झाली. अशा प्रकारचे वेदना देणारे साहित्य व्यक्तीच्या मनाला संवेदना देते. या शब्दांतून भविष्याचा इतिहास घडण्याची ताकद मिळते.'

एका लेखकाचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, 'डोळ्यामागे विचार दडलेले असतात. सत्ता शक्तीशाली असेल, तर ती डोळे नष्ट करू शकते; परंतु डोळ्यांमागे दडलेले मनामध्ये आणि डोक्यामध्ये असलेले विचार नष्ट करण्याची ताकद जगातील कोणत्याही सत्तेत नाही. म्हणूनच आपला जो इतिहास आहे, त्याहीबद्दल लिहून ठेवले गेले आहे, की इतिहास हा रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबाने लिहिला गेला; पण परिश्रमाचे आणि रक्ताच्या थेंबांचे रूपांतर जेव्हा शब्दांत झाले, तेव्हा तो जाज्ज्वल्य इतिहास भविष्यातील पिढीला प्रेरणा देत राहिला. त्यामुळे साहित्यिकांचे कार्य समाजनिर्मितीचे आहे. सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणारे आहे.'

'देशाला दिशा देण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. येथील साहित्यिकांच्या विचारधारांमध्ये आहे. संत आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा हा साहित्याच्या माध्यमातून संस्कारात रुपांतरित करून व्यक्तित्व निर्माण करण्याची प्रक्रिया निर्माण होईल, त्यातूनच आदर्श समाजाची निर्मिती होईल. साहित्याचे विचार मूल्यांशी जुळणारे आहेत. त्यातून प्रगल्भता आलेली आहे. समाजातील गुणात्मक परिवर्तनामध्ये शिक्षण आणि साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. या देशात विचारभिन्नतेचा प्रश्न नाही. विचारशून्यतेचा आहे. त्यामुळे प्रवाहाची चिंता न करता आपले प्रामाणिक विचार मांडावेत,' असे आवाहन गडकरी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असहिष्णुतेचे वातावरण सुन्न करणारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील वाढत्या असहिष्णुतेवर साहित्य संमेलन, या साहित्यिकांच्या व्यासपीठाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. 'देशातील वाढते हल्ले, असहिष्णुता, लेखक, कलावंत व कार्यकर्त्यांच्या हत्या; तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुन्यांचा शोध न लागणे, हे सारे भयावह व सुन्न करणारे आहे,' असा ठराव करून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या प्रकारांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना मिळालेल्या धमकीचा मात्र ठरावात उल्लेख नाही.

पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. समारोप सत्रात विविध ठराव करण्यात आले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले होते. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून देशात वातावरण तापले असताना साहित्याच्या व्यासपीठावरून या प्रकारांची दखल घेतली जाणार का, याबाबत उलट-सुलट चर्चा होती; पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने हल्ले, असहिष्णुता याबाबत ठराव करून सरकारकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.

'केंद्र आणि राज्य सरकारने विघातक शक्तींचा बिमोड करणारे आश्वासक व निर्भय वातावरण निर्माण करावे,' अशी मागणी संमेलनातून करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी ठराव मांडला असून, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी अनुमोदन दिले आहे.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढवून शाळांना नियमित अनुदान द्यावे, कवी नामदेव ढसाळ यांच्या पूर या गावी लोकोपयोगी वास्तू सरकारने उभी करावी; तसेच वर्षभरात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणारे व संमेलनाच्या आयोजनाबाबत स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचे अभिनंदन करणारा ठराव संमेलनात मांडण्यात आला.

'सीमावासीयांना न्याय द्या'

'सीमावासीय मराठी भाषिकांवर ५० वर्षे अत्याचार होत आहेत. न्यालायलात शासनाने बाजू मांडून सरकारने सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा आणि बेळगाव, निपाणी, भालकी, बिदर, संतपूर व औराद हा कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत,' असा ठराव मांडण्यात आला.

शेतकरी आत्महत्यांबाबत उपाययोजनेची मागणी

'शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही देशातील व राज्यापुढील मोठी समस्या आहे. पुढील काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित करावी,' अशी कळकळीची विनंती संमेलनातून ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी ‘बोअर’ही झाले पाहिजे

$
0
0

लेखक चेतन भगत यांची 'सर्जनशील' चेतना

Sujit.Tambade@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी : 'तरुणांनी सतत अभ्यास करावा किंवा मौजमजा करावी, असले कोणतेही सल्ले न देता तरुणांनी थोडे 'बोअर' झाले पाहिजे,' असा अकल्पित सल्ला 'यूथ आयकॉन' लेखक चेतन भगत यांनी दिला. बोअर झालात, तरच नवनिर्मिती होऊ शकते, याचे भान आणून चेतन यांनी तरुणांमध्ये चेतना जागविली! 'महाराष्ट्रात वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते. माझ्या पुस्तकांना सर्वाधिक वाचक हे मराठीच आहेत. आता तर मी महाराष्ट्राचा रहिवासी झालो आहे,' असे सांगत चेतन यांनी मराठीचे गोडवेही गायले.

आघाडीचे लेखक म्हणून नावलौकिक मिळविलेले चेतन भगत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात युवकांशी संवाद साधला. संमेलनाचे मुख्य सभामंडप तरुणांनी खचाखच भरले होते. आपण कोणी तरी श्रेष्ठ आहोत, याचा वागण्यात-बोलण्यात जराही अभिमान न बाळगता चेतन यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. तरुणांची एवढी प्रचंड गर्दी पाहून भारावलेले भगत यांना 'सेल्फी' घ्यायचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट व्यासपीठावरूनच सेल्फी घेत उपस्थितांची मने जिंकली.

सुरुवातीला त्यांनी मराठीतून प्रेक्षकांशी संवाद साधला. 'प्रेमाला नसते भाषेचे कुंपण, तेथे केवळ मनाचे गुंफण' असे सांगत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तरुणांच्या मनातील प्रश्न चेतन जोशी आणि सोमनाथ पाटील यांनी त्यांना विचारले.

'काही तरी नवीन करायचे असले, तर पहिल्यांदा आयुष्यात कधीतरी 'बोअर' झाले पाहिजे. बोअर झालात, की आपोआप काही तरी नवीन केले जाते; पण सध्याचे तरुण बोअर झाले, की फेसबुक, ट्विटर किंवा व्हिडिओ गेम खेळतात. तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. आमच्या वेळी करमणुकीची साधने नसायची. त्यामुळे 'बोअर' झालो, की पुस्तके वाचायचो. बागेत फिरायला जायचो. आता तसे घडत नाही,' अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

'मनात काही तरी कल्पना निर्माण होण्यासाठी पुस्तके वाचली​ पाहिजेत. पुस्तक वाचताना मनात त्याबाबतची कल्पना निर्माण होते; पण फेसबुक, टीव्ही पाहताना तुमच्या मनात कल्पना निर्माण होत नाही, मग नवनिर्मिती होणार कशी,' असा सवाल त्यांनी केला.

तुम्ही लेखनाकडे कसे वळलात, हा प्रश्न ओघाने आलाच. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भूतकाळातील आठवणी जागवल्या. ते म्हणाले, 'मला लेखक वगैरे व्हायचे नव्हते. मी पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. दहावीत जेमतेम ७६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेलो. त्यामुळे प्रत्येकजण माझी 'औकात' काय, हे दाखवून द्यायचे. मी तर एसटीडी बूथ चालविण्याचे स्वप्न बाळगले होते. तीन ते चार एसटीडी बूथ झाले, की सर्वकाही मिळाले, हे होते माझे स्वप्न!'

... मग लेखक कसे झालात, असा प्रश्न येताच, त्यांनी आयुष्यातील पुढील वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, 'मी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला आणि इंजिनीअर झालो. एका बँकेत नोकरीला लागलो. बँकेतील बॉस फार कडक होते. त्यांना मी कामात गुंतलो आहे, असे भासविण्यासाठी काही तरी काम करत राहायचो; पण प्रत्यक्षात मी काम करत नसायचो, तर काही तरी लिहित असायचो. तोपर्यंत मी लेखक होईल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यातूनच माझे पहिले पुस्तक तयार झाले. ते छापण्यासाठी पहिल्यांदा प्रकाशक भेटत नव्हते. एक प्रकाशक भेटले आणि पहिले पुस्तक हातोहात खपले. तेव्हा प्रथम जाणीव झाली, की आपल्याला लिहिता येते आणि मग नोकरी सोडून लेखन करायचेच ठरवले.'

लेखनावरच जगायचे, हा निर्णय झाल्यावर कुटुंबातून कशी प्रतिक्रिया उमटली, या प्रश्नाला भगत यांनी खुसखुशीत शैलीत उत्तर दिले. 'मी नोकरी सोडली आणि सासूकडून वेगळाच सूर आला. माझी पत्नी ही तमिळनाडूतील आहे. ती नोकरी करणार आणि मी फक्त लेखनावर जगणार म्हटल्यावर हा काही तरी 'स्कॅम' आहे, असेच सासूला वाटले; पण आपला ​निर्णय चुकला नाही. प्रत्येकाने आपल्या मनाला काय वाटते, त्याप्रमाणे काम केले पाहिजे,' असे त्यांनी सांगितले.

सध्या नवीन काय लिहित आहात, हा सवाल आल्यावर भगत यांनी लेखनात कोणकोणती पथ्ये पाळतो, हे आवर्जून निदर्शनास आणून दिले. 'माझ्या कथेतील नावे ही श्रीकृष्णाची असतात. मी कधीही कथेत ड्रग्ज वगैरे बाबी लिहित नाही. माझ्या लेखनातील अर्धे वास्तव आणि अर्धे काल्पनिक असते. ​'थ्री इडियड्स'मधील रांचो, चतुर आणि राजू ही पात्रे वास्तवातील आहेत. आता मी एक मुलगी कसा विचार करते, यावर आधारित कथानक लिहित आहे. क्राइम विषयावर लिहावेसे वाटते; पण अद्याप लिहिलेले नाही. लहान मुलांसाठी काहीतरी लिहिणार आहे,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा हीच ‘दीवार’ बनली आहे : अख्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

'समाजाची आकांक्षा समजण्याचे भाषा हे माध्यम असताना तीच 'दीवार' झाली आहे,' अशा शब्दांत ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी दाहक वास्तवावर बोट ठेवले. 'भाषा हीच दुसऱ्या भाषेची अडसर ठरत असून, मराठी साहित्य दुसऱ्या भाषेत अनुवादित झालेले नाही. त्यामुळे मराठीची मोठी साहित्य परंपरा देशापर्यंत पोहोचली नाही. मी लेखक, कवी अशी घमेंड साहित्यिकांमध्ये निर्माण झाली,' अशा शब्दांत त्यांनी साहित्यिकांचे कान टोचले. 'साहित्य, कला, संस्कार, परंपरा हे आपण विसरलो आहोत,' अशी टीकाही त्यांनी केली.

'मराठी साहित्य संमेलनासारखे महासंमेलन पाहिले नाही,' असे सांगून अख्तर म्हणाले, 'गेल्या साठ वर्षांत काही केले नाही, असे आपण म्हणतो. आपल्याला विरोध करायची जास्त सवय आहे; पण देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे सूत निर्माण होत नव्हते. आता देश कुठल्या कुठे पोहोचला आहे. मात्र, या स्पर्धेत आपण साहित्य, कला, संस्कार, परंपरा हे सामान विसरलो आहोत. हा दोष आमच्या पिढीचा आहे. आमच्या पूर्वीच्या पिढीने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. आम्हीच साहित्याची परंपरा विसरलो, पुढच्या पिढीकडे आम्ही ते दिले नाही; पण आताची पिढी साहित्य, कलेकडे वळत आहे.'

भाषेच्या संदर्भात ते म्हणाले, 'भाषा हीच भाषेची अडसर ठरत आहे. मला ऊर्दू, हिंदी या पलीकडचे विश्व माहीत नव्हते. मुंबईत आल्यामुळे मला विजय तेंडुलकर आणि पु. ल. देशपांडे यांचे साहित्य समजले. मराठी साहित्याबाबत मी अनभिज्ञ होतो, याची मला लाज वाटते. देशात असंख्य लोकांना हे साहित्य माहीत नाही. मराठी साहित्य भाषांतरित न झाल्याने ते पोहोचू शकलेले नाही. मराठीतील साहित्य दुसऱ्या भाषेत जावे व दुसऱ्या भाषेतील साहित्य मराठीत यावे, यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करावेत,' असे अख्तर यांनी नमूद केले. 'भाषा ही भिंत झालेली असताना अनुवाद ही खिडकी आहे,' असे त्यांनी सुचवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात असहिष्णुताच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

संमेलनाध्यक्षांच्या निवडीपासून ते उद्-घाटन सत्रापर्यंत कायम राहिलेला सहिष्णुतेचा विचार संमेलनाच्या समारोप सत्रातही केंद्रस्थानीच राहिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले आणि देशातील वाढत्या असहिष्णुतेला जबाबदार असणाऱ्यांना निषेध करणारा ठराव खुल्या अधिवेशनात मांडण्यात आला. तरीही असहिष्णुतेच्या मुद्द्यावर थेट भाष्य करण्याचे टाळून, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशात प्रत्येक व्यक्तीला लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याचा पुनरुच्चार केला.

पिंपरी-चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचू सूप सोमवारी वाजले. संमेलनाच्या उद्-घाटनापूर्वीच सहिष्णुता आणि पुरस्कारवापसीचा मुद्दा गाजत होता. संमेलनाच्या उद्-घाटन समारंभास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही या मुद्द्याला वाचा फोडली होती. संमेलनाच्या समारोप कार्यक्रमातही देशात असहिष्णू वातावरण वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या शक्तींचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. तसेच, भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत, असेही केंद्र आणि राज्य सरकारला सुचविण्यात आले.

समारोप समारंभाच्या अखेरच्या टप्प्यात हजर झालेल्या नितीन गडकरी यांनी सहिष्णू-असहिष्णू यावरून सुरू असलेल्या वादाबाबत कोणतीही थेट टिप्पणी केली नाही. परंतु, देशातील प्रत्येक व्यक्तीला लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याचा उल्लेख करून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या लेखकांवर अथवा इतर कोणावरही बंधने नसल्याचे स्पष्ट केले.

गडकरी यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रसिद्ध कवी, गीतकार जावेद अख्तर, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

संमेलनाध्यक्षांनी उचलली सीमाभागाची तळी

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या समारोप भाषणात सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केला जावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्य सरकारने करावी, अशी मागणी केली. तसेच, या प्रश्नी राज्यातील सर्व खासदारांनीही केंद्राला साकडे घालावे, असा आग्रह त्यांनी धरला. त्याशिवाय, गोव्यामध्येही कोकणीप्रमाणेच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे गोवा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्टधारक महिलांचा टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे विभागातून पासपोर्ट काढून घेणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या खालोखाल व्यावसायिकांनी पासपोर्ट काढून घेतले आहे. दोन तृतीयपंथी व्यक्तींनीही पासपोर्ट काढले असून, बदलत्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे पासपोर्टसाठी मागणी वाढली आहे.

पुणे विभागीय कार्यालयाने २०१५ या कॅलेंडर वर्षात वितरित केलेल्या पासपोर्टची संख्या २०१४ या वर्षाच्या तुलनेत ३३.६९ टक्क्यांनी अधिक आहे. पुणे विभागीय कार्यालयाने २०१५ या कॅलेंडर वर्षात दोन लाख ८० हजार ७९५ पासपोर्टचे वितरण केले असून, पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे विशेष सन्मानही पटकावला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.

सन २०१५ मध्ये देण्यात आलेल्या पासपोर्टपैकी ४० टक्के म्हणजेच एक लाख १२ हजार २८१ पासपोर्ट महिलांनी काढले आहेत. व्यवसायानुसार केलेल्या विभागणीनुसार सन २०१५ मध्ये सर्वाधिक ७४ हजार २४० पासपोर्ट हे खासगी क्षेत्रातील नोकरदारांना देण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल ४२ हजार २८८ म्हणजेच १५.०६ टक्के पासपोर्ट हे गृहिणींना देण्यात आले आहेत. उद्योजक किंवा व्यावसायिक गटासाठी ४० हजार ५२२ म्हणजेच १४.४३ टक्के पासपोर्ट देण्यात आले आहेत.

पासपोर्टच्या पुणे विभागातर्फे पुणेकरांसाठी एक मे ते ३० सप्टेंबर दरम्यान औंध येथे खास महा पासपोर्ट सेवा मेळाव्यात ३२ हजारहून अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढून घेतले. त्यामुळे तसेच अन्य मेळावे व विशेष प्रयत्नांमुळे सर्वसाधारण पासपोर्टसाठीच्या अपॉइंटमेंट मिळण्याचा कालावधी ५५ दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी झाला.

यापूर्वी पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट मिळत नाही, एजंटांचा जाच सहन करावा लागतो, अशी तक्रार वारंवार केली जात होती. मात्र, गेल्या वर्षभरात पासपोर्टसाठीच्या अपॉइंटमेंटची संख्या वाढविली. परिणामी अपॉइंटमेंटचा कालावधी कमी होण्यासोबतच एजंटांचा सुळसुळाटही नियंत्रणात आला आहे.

'तत्काळ'ची संख्या घटली

सर्वसाधारण (नॉर्मल) पासपोर्टसाठी अर्ज केल्यापासून पासपोर्ट मिळण्याच्या कालावधीत घट झाल्याने नागरिक तत्काळऐवजी सर्वसाधारण पासपोर्ट काढण्यालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तत्काळ पासपोर्टच्या संख्येत २०१४ च्या तुलनेत अडीच टक्क्यांची घट झाली आहे. सन २०१४ मध्ये २० हजार ९३६ तत्काळ पासपोर्ट वितरित करण्यात आले होते; तर २०१५ मध्ये त्यात अडीच टक्क्यांनी घट होऊन २० हजार ४०३ तत्काळ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या संख्येतही २०१४ च्या तुलनेत २५.७७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये महिलांची, गृहिणींची संख्या वाढते आहे. हे बदलत्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे लक्षण आहे. स्वस्त झालेला विमानप्रवास, वाढलेले पगार, बदलती जीवनशैली यामुळे सर्वसामान्य नागरिकही पासपोर्ट काढून घेत आहेत. परीक्षांसाठी पासपोर्ट बंधनकारक असणे, पुण्याची आयटी हब अशी असलेली ओळख यामुळेही पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

- अतुल गोतसुर्वे, पासपोर्ट अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिंचवडला वैज्ञानिक प्रदर्शन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इस्रोच्या अंतरीक्ष प्रदर्शनाचे मंगळवारी इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रमोद काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे मंगलयानासाठी वापरण्यात आलेल्या उपकरणांच्या प्रतिकृती प्रथमच पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या वेळी प्रमोद काळे यांच्यासह इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक जे. पी. जोशी आणि दीपक पंड्या तसेच पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आणि दिलीप गावडे, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टच्या संध्या मोहोळ आदी उपस्थित होते. १९ ते २१ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच, या प्रदर्शन काळात संपूर्ण सायन्स पार्क बघण्यासाठी केवळ २० रुपये शुल्क राहील. प्रदर्शनाचे तीनही दिवस इस्रोचे वैज्ञानिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधणार आहेत. या प्रदर्शनात इस्रोचा इतिहास, माहिती फलक, उपग्रह प्रक्षेपक यानांच्या प्रतिकृती यांच्यासह मुख्यत्वे करून मंगलयानासाठी वापरण्यात आलेले मेथाने सेंसर मार्स कलर कॅमेरा, थर्मल इमॅजिंग स्पेक्ट्रोमीटर आणि विविध मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स हे प्रमुख आकर्षण आहेत. याशिवाय प्रदर्शनात इस्रोवर आधारित माहितीपट तसेच अंतरिक्ष वैज्ञानिक होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इस्रोमधील नोकरीविषयक उपलब्ध संधीवरील व्हिडिओ क्लिप देखील पहावयास मिळणार आहे. प्रदर्शनात जिल्हापरिषदेच्या जवळपास २० शाळा भेट देणार असून, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४ शाळांच्या २०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच, पुण्यातील ज्ञानप्रबोधिनींसोबत आसाममधील माजूली येथील विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रदर्शनास भेट दिली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालंय...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी झटणे हे मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालंय,' असे भावोउद्गार काढत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी समाजातील दुःख आपण वाटून घेऊया, असे आवाहन मंगळवारी (१९ जानेवारी) केले. चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चिंचवड येथे आयोजित विस्तारीत उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, खासदार श्रीरंग बारणे व्यासपीठावर होते.

नाना पाटेकर यांना ऐकण्यासाठी संपूर्ण सभागृह शांत आणि धीरगंभीर होते. त्यामुळे भाषण करताना नाना काहीसे भावूकही झाले. ते म्हणाले, 'मौन जास्त बोलकं असतं. लेखकाच्या दोन शब्दांमधील रिकामी जागा भरून काढण्याचे काम अभिनेता करीत असतो. परंतु, अभिनेता म्हणून आत्ता काहीतरी गवसतयं, असं वाटू लागले आहे. दुःख पराकोटीला जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु, येथेच दुःख सुरू होत असल्याचे जाणवले. त्यामुळे कोणी हात पसरायच्या आधीच आपण त्यांना दिले पाहिजे, या भावनेतून काम करीत आहे.'

'शेतकऱ्यांच्या आजच्या दयनीय अवस्थेबद्दल मी कोणत्या सरकारला दोष देणार नाही. टिपण्णी करणार नाही,' असे नमूद करून ते म्हणाले, 'भाव वाढले. पगार वाढले. शेतीमालाला भावही मिळाला. परंतु, त्याचा उत्पादन खर्च हा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे काय करायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आर्त भाव मनाला स्पर्श करतात. वेदना देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे कारण मला मिळाले आहे. ते मी मरेपर्यंत करणार आहे.' 'अभिनयाबद्दल मिळणाऱ्या पारितोषिकापेक्षा जास्त समाधान आत्ता वाटत आहे. यातून मिळणारा आनंद हीच खरी पावती आहे,' असे पाटेकर यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १९६८ मध्ये मी मुकादमाचे काम करीत होत असल्याची आठवणही सांगितली.

चित्रपट महोत्सव आणि साहित्य संमेलन एकाच वेळी साजरे होत असल्यामुळे काहीशी गैरसोय झाल्याचे नमूद करून डॉ. पटेल म्हणाले, 'वास्तविक, गेल्यावर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी १४ जानेवारी २०१६ तारीख निश्चित झाली होती. त्याची नोंद आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये झाली. त्यामुळे बदल शक्य नव्हता. पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्यावर्षी जाहीर केलेली दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाची रक्कम या वेळी तांत्रिक कारणास्तव मिळालेली नाही. ती पुढील वर्षी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.' प्रास्ताविक आयुक्त राजीव जाधव यांनी केले. बारणे, मंगला कदम यांनी मनोगत व्यक्त केले. वैशाली दातार यांनी सूत्रसंचालन केले. त्याबाबत त्यांचे पाटेकर यांनी विशेष कौतुक केले. नाम फाउंडेशनसाठी आजपर्यंत सुमारे वीस कोटी रुपयांची मदत मिळाली आहे, याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून नाना पाटेकर म्हणाले, 'सर्वांनीच भरभरून मदत दिली. एका भिकाऱ्यानेही तीनशे रुपये दिले. त्याने केलेली ही मदत मला एखाद्या श्रीमंताने दिलेल्या शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण, ही चळवळ सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहचत असल्याचे दिसून येते.' 'अभिनय गोष्ट नाही, ती अनुभूती असते,' असे नमूद करून नाना पाटेकर म्हणाले, 'नटसम्राट करताना मी पूर्ण रिकामा झालो आहे. या चित्रपटातून अभिनयाचे सगळे संचित दिले आहे. त्यामुळे आता निदान या क्षणी तरी काही करावेसे वाटत नाही. पुन्हा संचित करायचे आहे. या काळात ऐश्वर्य उघड्यावर टाकून जगत असलेल्या शेतकऱ्यांचे दुःख वाटून घ्यायचे आहे. थोडे तुम्हीही घ्या.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंढव्यातील कत्तलखान्याचा प्रस्ताव मंजूर

$
0
0

कोंढव्यातील कत्तलखान्याचा प्रस्ताव मंजूर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोंढव्यातील पुणे महापालिकेचा कत्तलखाना सुरू करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीने मंजूर केला. यांत्रिक स्वरूपातील या कत्तलखान्यासाठी पालिकेने मोठा कर्मचारी वर्ग तैनात केला असल्याने भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला; पण सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य केला.
मुंबई हायकोर्टाने कत्तलखाना सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याने त्यानुसार हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी केला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत हा कत्तलखाना चालविण्यात येणार असून, त्यांना प्रशिक्षण देण्यासह आवश्यक सर्व परवानग्या आणि वार्षिक देखभालीसाठी डॉ. फ्रोएब इंडिया कंपनीला तीन कोटी ३६ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या निधीतून पालिकेने कोंढव्यातील कत्तलखान्याचे आधुनिकीकरण केले होते. कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे खासगीकरणातून हा प्रकल्प चालविण्यात येणार होता. नवी दिल्लीतील एका संस्थेला त्याचे काम देण्यात आले होते. परंतु, जैन आणि वारकरी संघटनांनी खासगीकरणातून हा कत्तलखाना सुरू करण्यास विरोध केल्याने स्थायी समितीने हा विषयच दफ्तरी दाखल केला होता.
पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावरील, सुनावणीदरम्यान पालिकेनेच कत्तलखाना चालवावा, असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले होते. त्यासाठी, अतिरिक्त पदभरती करण्यासाठी पालिकेने वेळ मागून घेतली होती. राज्य सरकारने अतिरिक्त पदांना नुकतीच मान्यता दिली असून, कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठीच हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
दरम्यान, सद्यस्थितीत दीडशे मोठी जनावरे आणि दोनशे लहान जनावरांची कत्तल केली जात असून, यांत्रिक पद्धतीने सर्व काम सुरू असताना एवढा मोठा कर्मचारी वर्ग तैनात करण्याची गरज काय, अशी विचारणा भाजपच्या मुक्ता टिळक आणि राजेंद्र शिळीमकर यांनी केली. तसेच, भविष्यात येथे कत्तल होणाऱ्या प्राण्याची संख्या वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजपने विरोध केला, तरीही सत्ताधारी राष्ट्रवादीने काँग्रेस आणि मनसेच्या साथीत हा प्रस्ताव मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वी शस्रक्रिया

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी दुर्मिळ व्याधीने ग्रस्त असलेल्या १५ वर्षांच्या मुलावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. चेतातंतू आणि स्‍नायूंचा रोग असलेल्‍या मायॅस्‍थेनिया ग्रेव्हज्‌ या आजारामुळे स्‍नायू दुर्बल होऊन थकवा येणाऱ्या 'कर्न्स सायर सिंड्रोम' या व्याधीने सोलापूर येथील ज्ञानेश्वर जगताप हा ग्रस्त होता. पुण्यामध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मंगळवारी (१९ जानेवारी) बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी दिली. या वेळी डॉ. राजेश बदानी, ज्ञानेश्वर व त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. हा आजार हा आजार लाखांमध्ये एकाला आणि साधारणतः वीस वय ओलांडल्यानंतर होतो. पण, ज्ञानेश्वरला १५ व्या वर्षीच या व्याधीने ग्रासले होते. या दुर्मिळ आजारामुळे हृदयाच्या क्रियेत अडथळा निर्माण होऊन हृदयरोग, डोळ्याचे स्‍नायूंचा वाढत जाणारा अर्धांगवायू आणि डोळ्याच्या शीरेवर अतिप्रमाणात साठत जाणारा रंगीत पदार्थामुळे तीव्र सूज येणे, डोळ्याच्या अस्‍तराची होत जाणारी झीज आदी धोके उद्‌भवतात. या रोगाचा मेंदूच्या भागावर प्रभाव पडत असल्‍याने स्नायू कमकुवत होणे, शरीराची चण कमी होणे, श्रवणशक्‍ती क्षीण होणे आणि हालचाली करण्यामध्ये समस्‍या होण्याची देखील शक्यता अधिक असते, असे हृदयरोग आणि इलेक्‍ट्रोफिजीऑलॉजीचे तज्‍ज्ञ डॉ. राजेश बदानी यांनी या वेळी सांगितले. ज्ञानेश्वरला मायॅस्‍थेनिया ग्रेव्हज्‌ झाल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी आणि चक्‍कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तो आदित्‍य बिर्ला स्‍मृती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आला. त्याला पेसमेकर बसविण्यासाठी दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर विविध तपासण्या झाल्यावर त्याच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, जगताप यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अन्य हॉस्पिटलच्या तुलनेत बिर्ला हॉस्पिटलमध्ये अत्यंत नाममात्र दरात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र नोंदणी क्रमांक

$
0
0

प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र नोंदणी क्रमांक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशांसाठी यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशप्रक्रिया या नोंदणी क्रमांकाच्याच आधारे करण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर घालण्यात येणार असून, त्या आधारे मागच्या दाराने होणारे प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
केवळ शहरातच नव्हे, तर राज्यभरात दरवर्षी चर्चेचा विषय ठरणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी आता सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेतून कमीत कमी वेळेत आणि अधिकाधिक पारदर्शी पद्धतीने अकरावीचे प्रवेश होण्याची अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरच्या टप्प्यावरही त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. सिस्टिम करेक्टिंग मूव्हमेंटच्या वैशाली बाफना यांनी या त्रुटींविरोधात हायकोर्टात जनहित याचिकेच्या माध्यमातून लढाही पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी करण्यासाठी शिक्षण खात्यानेही प्रयत्न सुरू केल्याचे समोर येत आहे.
या विषयी सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, 'अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अधिकाधिक बिनचूक आणि पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी यंदाच्या प्रक्रियेमध्ये काही बदलही करण्यात येत आहेत. त्यातूनच प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही स्वतंत्र नोंदणी क्रमांक देणार आहोत. विद्यार्थ्याने या क्रमांकाच्याच आधारे आपला प्रवेश निश्चित करणे गरजेचे असेल. गेल्या काही वर्षांमध्ये अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाही प्रक्रियेमध्ये समाविष्ट न होता, बाहेरून कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे आरोप केले जात होते. स्वतंत्र नोंदणी क्रमांकामुळे विद्यार्थ्यांना नॉट रिपोर्टेड राहणे शक्य होणार नाही. प्रवेशित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हा नोंदणी क्रमांक केंद्रीय प्रवेश समितीकडे सादर करणे कॉलेजांना बंधनकारक केले जाईल.' या यंत्रणेच्या आधारे कॉलेज पातळीवर दिले जाणारे प्रवेश नियमित प्रक्रियेमधूनच करण्यासाठी समिती आग्रही धोरण राबविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी ई-टेंडरिंगच्या माध्यमातून त्रयस्थ यंत्रणेची निवड केली जाणार आहे. त्यासाठीचे नियम आणि अटीही निश्चित करण्यात येत आहेत. त्या आधारे या प्रक्रियेसाठीचा सुधारित सरकारी निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनविरोधी औषध विक्रेत्यांचा संप स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेड्यूल प्रकारातील औषधे ऑनलाइनद्वारे सर्रास विकण्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई करण्यात येत नाही. या विरोधात येत्या २६ जानेवारीपासून तीन दिवसांचा पुकारण्यात आलेला औषध विक्रेत्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भात केमिस्टांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

ऑनलाइन औषध विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला. त्यानंतरही पुण्यासह मुंबईत विविध कंपन्या नाव बदलून ऑनलाइन औषध विक्री करीत आहेत. त्यासंदर्भात 'एफडीए'कडे तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नाही. या बाबात कारवाईची मागणी करूनही टाळाटाळ होत आहे. म्हणून ऑनलाइऩ औषध विक्रीविरोधात कारवाई कऱण्यात यावी या मागणीसाठी पुणे जिल्हा औषध विक्रेत्यांनी २६ ते २८ जानेवारी दरम्यान संप पुकारला होता. या संदर्भात बापट यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तात्पुरता हा संप स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिला.

सध्या बापट जपान दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरून ते परत आल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच केमिस्टांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे चंगेडिया यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तालयाच्या गच्चीतून उडी मारणाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस आयुक्तालयाच्या गच्चीवरून उडी मारणाऱ्या तरुणाचा मंगळवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजित अजित प्रधान (वय १९, रा. मोरवाडी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी तयार केल्याची तक्रार एका तरुणीने सायबर सेलकडे केली आहे. या अकाउंटवरून तिच्या मैत्रिणींना मेसेज पाठविले जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी सायबर सेलने सुजितच्या भावाला अगोदर बोलविले होते. पण, त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या भावाने हे अकाउंट काढल्याचे समोर आले. त्यामुळे दोघांनाही १२ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले होते. दोघा भावांमध्ये बोलणे झाल्यांतर काही वेळाने अचानक सुजितने पोलिस आयुक्तालयाच्या गच्चीवरून खाली उडी मारली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी आत्महत्येचे पुण्यातही पडसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकाराचे पडसाद मंगळवारी पुण्यातही उमटले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या प्रकाराविरोधात कँडल मार्च काढून निषेध केला. तर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राजकारणाचा निषेध करून विद्यार्थ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्नातक रोहित वेमुला (वय २८) याने रविवारी सायंकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दोन नेत्यांचाही समावेश असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या प्रकाराचा निषेध करून डेक्कन परिसरातील गोपाळकृष्ण गोखले चौकामध्ये निदर्शने केली. कँडल मार्च काढून या वेळी रोहितला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघटनेतर्फे या पुढील काळात कॉलेज आणि विद्यापीठ पातळीवरही जातीयवादी कारवायांविरोधात तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

वेमुला परिवाराच्या दुःखात 'अभाविप'ही सहभागी असून, या प्रकारामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी 'अभाविप'ने मंगळवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. या घटनेनंतर काही राजकीय संघटना 'अभाविप'ला जाणीवपूर्वक बदनाम करत असल्याचा आरोप संघटनेने केला. अशा सर्व संघटना आणि पक्षांचा 'अभाविप' निषेध करत असल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेईई-मेन’ अर्जात दुरुस्तीसाठी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जेईई-मेन' या प्रवेश परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील तपशिलामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दुरुस्ती करायची आहे, त्यांना ती २१ ते ३१ जानेवारीदरम्यान 'जेईई-मेन'च्या वेबसाइटवर (jeemain.nic.in) करता येईल,' असे 'जेईई-मेन'च्या परीक्षा संचालकांनी स्पष्ट केले आहे.

'ज्या विद्यार्थ्यांनी 'जेईई-मेन'साठी अर्ज केले आहेत, त्यांनी आपण भरलेल्या अर्जातील तपशील तपासून पाहावेत. त्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्या त्यांना २१ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान करता येतील,' असे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 'तपशिलात दुरुस्ती करताना परीक्षा केंद्र म्हणून नमूद करण्यात आलेल्या शहराचा पर्याय; तसेच परीक्षा कम्प्युटर-बेस्ड पद्धतीने देणार, की पेन-पेपर पद्धतीने देणार, याबाबत नमूद केलेला पर्याय मात्र बदलता येणार नाही,' असेही म्हटले आहे.

तपशिलातील दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक असून, ते क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे भरावे अथवा ते ई-चलनाद्वारे कॅनरा/ आयआयसीआयसीआय/ सिंडिकेट बँकेत भरता येईल. 'तपशिलातील दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत दुरुस्ती करावी,' असे आवाहन करण्यात आले आहे. आयआयटीतील प्रवेशाकरता; तसेच राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांतील अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना 'जेईई-मेन' देणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’ मान्यतेला सत्ताधाऱ्यांचा ‘खो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असताना, पालिकेतील कारभाऱ्यांनी त्याविरोधात उपसलेल्या विरोधाच्या हत्यारामुळे सर्व प्रक्रियेलाच खीळ बसण्याची भीती आहे. २००७-२७ या २० वर्षांसाठीचा हा आराखडा मंजूर होण्यास यापूर्वीच आठ वर्षे विलंब झाला असताना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे त्यात पुन्हा 'खो' घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजप-सेनेच्या युती सरकारने शहराच्या डीपीवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीस समिती नेमली होती. या समितीने गेल्या वर्षी डीपीचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे. समितीच्या अहवालाची छाननी करून नगररचना संचालकांच्या शिफारसींसह अंतिम अहवाल सरकारला येत्या काही दिवसांत सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यावर, पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला डीपी वेळेत मंजूर होऊन त्यानुसार अंमलबजावणी अपेक्षित असताना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात वगळण्यात आलेल्या आरक्षणांपासून ते विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) सुचविण्यात आलेल्या शिफारसींमुळे शहराचे नुकसान होणार असल्याची टीका केली जात आहे. तसेच, बिल्डरांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच, डीपीचा अहवाल करण्यात आल्याची भूमिका पालिकेचे कारभारी मांडत आहेत.

राज्य सरकारवर टीकास्त्र सोडताना, पालिकेमध्ये डीपी मंजूर करण्यासाठीच्या सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणावर उपसूचना देण्याचा विक्रम सत्ताधाऱ्यांनीच केला होता. पहाटे दोनपर्यंत चाललेल्या या सभेमध्ये एकमेकाशी विसंगत असलेल्या अनेक उपसूचना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मांडल्या. त्यामुळेच, पुणेकरांनी तब्बल ८७ हजार हरकती नोंदवित त्याचा निषेध केला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाही, डीपीवरील हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठीची तज्ज्ञांची समिती नेमण्यासही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलंब लावला होता. पुणे महापालिकेमध्ये २००७ पासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. सुरुवातीची अडीच वर्षे वगळता उर्वरित सर्व काळ काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे. महापालिकेत बहुमत असूनही डीपीची सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात सत्ताधाऱ्यांना पूर्ण अपयश आले. त्यामुळेच, युती सरकारने डीपी पालिकेकडून काढून घेत, तो पूर्ण करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली.

डीपी विरोधाला थंडा प्रतिसाद

राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे डीपीविरोधात जनजागृती करण्यासाठी एकत्र येऊन विधानसभा मतदारसंघनिहाय आंदोलने केली जात आहेत. गेल्या रविवारपासून ही आंदोलने सुरू झाली असली, तरी त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्या पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता, अनेक नेते, आजी-माजी नगरसेवक या आंदोलनापासून दूरच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटीपी’ची उभारणी चुकीच्या पद्धतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी (एसटीपी) कोट्यवधी रुपये खर्च करुन नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) राजाराम पुलाजवळ बांधलेले केंद्र चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचा 'साक्षात्कार'महापालिकेला झाला आहे. हे केंद्र सुरू करताना ज्या सल्लागाराकडे काम देण्यात आले होते. त्यांनी चुकीचा अहवाल दिल्यानेच सध्या या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. ज्या ठेकेदाराकडे हे केंद्र चालविण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांच्याकडून केंद्राची संपूर्ण दुरुस्ती करुन घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सुमारे १२ कोटी रुपये खर्च करुन पालिकेने हे केंद्र उभारले असून, प्रतिदिन ३२ एमएलडी एवढी प्रकल्पाची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र, येथे १६ ते १७ एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर हे काम रामके प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. पाच वर्षे या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने जर्मनीतील एमडब्ल्यूएच यांना सल्लागार म्हणून नेमले होते. या सल्लागारांनी दिलेल्या अभिप्रायानंतर पालिकेने प्रकल्प उभारला. त्यासाठी सल्लागाराला १८ लाख रुपये शुल्क प्रशासनातर्फे देण्यात आले.

प्रकल्पातून दुर्गंधी ये‌त असल्याची तक्रार या पूर्वी अनेकदा स्थानिकांनी केली होती. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत असल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करून प्रकाराला वाचा फोडली होती. या विषयी प्रशासनाकडून माहिती घेतली असता, प्रकल्प उभारताना सल्लागाराने चुकीचा अहवाल दिल्याचे विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचे पुढे आल्याचे कंदूल यांनी सांगितले. मैलापाण्यावर प्रक्रिया करून जो मैला तयार होतो, त्यावर प्रक्रिया करण्याचे युनिट रस्त्याच्या बाजूलाच उभारण्यात आले आहे. मोकळ्या जागेत हा मैला साठवून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत असल्याचे कंदुल यांनी स्पष्ट केले.

चुकीला माफी नाही : कंदुल

पूर्वीच्या ठेकेदाराने यामध्ये आवश्यक ती काळजी न घेतल्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतरच पूर्वीच्या ठेकेदाराला पालिका उर्वरित पैसे देणार असल्याचे कंदुल यांनी सांगितले. शहराच्या दृष्टिने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असल्याने आवश्यक ती दुरुस्ती करुन दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागारावर कारवाई करावी, अशी शिफारस करणार असल्याचे कंदुल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा समस्येसाठी घेणार जपानची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जपानची मित्सुबिशी कंपनी सहकार्य करणार असून, त्यांचे अधिकारी जानेवारीअखेरीस पुण्याला भेट देऊन सविस्तर अहवाल महापालिकेला सादर करणार आहेत. मित्सुई कंपनीतर्फेही सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पामध्ये पुणे महापालिकेला मदत केली जाणार आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश झगडे यांनी मंगळवारी दोन्ही कंपन्यांच्या जपानमधील प्रकल्पाला भेट दिली. 'पुण्यात गुंतवणूक करण्यास दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली असून, शहरातील प्रकल्पांची व्यवहार्यता तपासण्यासाठी संबंधित कंपन्यांचे भारतातील प्रतिनिधी लवकरच शहराला भेट देणार आहेत', अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली. मित्सुबिशी कंपनीच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी पालिकेला भेट दिली होती. त्यावेळीच, त्यांनी जपानमधील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला आवर्जून भेट देण्याचा आग्रह धरला होता.

योकोहामा येथे कंपनीचे प्रत्येकी चारशे टनांचे तीन प्रकल्प असून, त्याद्वारे प्रतिदिन तब्बल बाराशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात असा प्रकल्प उभारता येणे शक्य आहे का, याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यादृष्टीने प्रत्यक्षातील स्थिती आणि आर्थिक प्रा-रूप याचा सविस्तर अहवाल कंपनीतर्फे पालिकेला सादर केला जाणार आहे. त्यासाठी कंपनीचे दिल्लीतील प्रतिनिधी १५ दिवस पुण्यात येणार असून, १० फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करतील, असे आयुक्तांनी सांगितले.

वीजनिर्मितीसाठीही मदत

मित्सुबिशीसह मिस्तुई कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेतही सविस्तर चर्चा झाली. वाहतूक, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास कंपनीचे प्राधान्य असून, सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीमध्ये पालिकेला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे, असे कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images