Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगी कंपनीचा घाट महापौरांच्या अंगलट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांच्या हिताचे निर्णय नागरिकांर्यंत तातडीने पोहोचावे, यासाठी खासगी कंपनीमार्फत सोशल मीडियाचा सेतू वापरण्याचा निर्णय महापौरांच्या अंगलट आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपनीने ट्विटरवर कोणतीही माहिती न दिल्याची कबुली दिली असून, महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी मोजक्याच कार्यक्रमांची माहिती फेसबुकवर देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने संबंधित कंपनीचे बिल अद्याप अदा केले नसल्याने पूर्वीप्रमाणेच हे काम अंतर्गत विभागाकडूनच करून घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याने धोरणात्मक निर्णयांची माहिती तातडीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले होते. त्यानुसार, खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, मोजके अपवाद वगळता संबंधित कंपनीने महापौरांशी संबंधित 'अपडेट' देण्यात टाळाटाळ केल्याचे दिसून आले. महापौरांचे 'ट्विटर हँडल' जुलैपासून 'अपडेट' नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने त्याकडे लक्ष वेधल्यानंतर स्थायी समितीमध्ये महापौरांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या कंपनीच्या कामाचा सविस्तर अहवाल देण्याची मागणी केली होती. या अहवालातच, ट्विटरवर माहिती देण्यात आली नसल्याबद्दल संबंधित कंपनीने खंत व्यक्त केली आहे.

धनकवडे यांच्या नावाने सुरू असलेले 'फेसबुक पेज' कालांतराने 'महापौर, पुणे' अशा नावाने चालविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. १२ सप्टेंबर ते १९ डिसेंबरच्या सुमारे सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत संबंधित कंपनीने फेसबुक पेजवर ३३ 'अपडेट' टाकल्याची माहिती दिली आहे. परंतु, महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमांची आणि पालिकेतर्फे नागरी हितासाठी घेण्यात येत असलेल्या निर्णयांची-उपक्रमांची संख्या लक्षात घेता, हे अपडेट अत्यंत अपुरे असल्याची टीका केली जात आहे. या कंपनीने अद्यापपर्यंत करारनामाही केला नसल्याने पूर्वीप्रमाणेच पालिकेच्या खात्याकडूनच सोशल मीडियावर 'अपडेट' टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुळा-मुळेचे रूप पालटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, प‌ुणे

शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने जपानमधील जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (जायका) या कंपनीबरोबर बुधवारी सांमजस्य करार केला. गेल्या दोन वर्षापूर्वी जायकाच्या प्रतिनिधींनी शहरातील नदीची पाहणी करून या प्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी दाखविली होती. प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने पुढील काही वर्षां‌त शहरातील नदीचे रूप पालटल्याचे चित्र पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.

दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सू यांनी बुधवारी या करारावर सह्या केल्या. हा करार ऐतिहासिक असून यामुळे दोन्ही देशासांठी सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना जावडेकर यांनी व्यक्त केली. केंद्री‌य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या देशातील प्रदूषित ३०२ नद्यांमध्ये शहरातील मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश होता. शहरातून वाहणाऱ्या या नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आपला प्रस्ताव तयार करून राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेच्या (एनआरसीपी) माध्यमातून केंद्राकडे पाठविला होता.

नद्यांचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी जायका कंपनी केंद्र सरकारला एक हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ४० वर्षांची मुदत ठेवण्यात आली आहे. मलनिस्सारण यंत्राचे निर्माण या करारामध्ये करण्यात येणार असल्याने नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नदी शुद्धीकरणावर ९९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये ८४१.७२ कोटी रुपयांचा वाटा केंद्र सरकारचा असणार आहे. तर महापालिकेला १४८.५४ कोटी रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. २०२२ पर्यंत ही योजना पूर्ण केली जाणार असल्याने नदीचे रूप बदलण्यास मोठी मदत होणार आहे.

प्र‌‌ति‌क्र‌िया

नदी सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा निधी मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून पाठपुरावा केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा प्रकल्प मान्य झाला आहे. पुणेकरांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

या करारामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पुढील तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मे, जून महिन्यात याच्या कामाला सुरुवात होईल.

- कुणाल कुमार, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाचाच दर्जाच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) कॅडेटसच्या प्रशिक्षणासाठी शिवणे येथे उभारलेल्या विमानतळाला लोहगावप्रमाणे विमानतळाचा दर्जाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एनडीएने विमानतळालगतच्या गावांमधील इमारतींच्या उंचीवर प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, एनडीएच्या संरक्षक भिंतीपासून तीन किलोमीटरच्या हवाई अंतरामधील वारजे, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर व कोंढवे-धावडे या गावांतील इमारतींच्या उंचीवर बंधने आणताना पुनर्वसित अहिरे गावचा एनडीएला विसर पडला आहे. वास्तविक, पुनर्वसित अहिरे गाव हे एनडीएच्या हद्दीपासून फक्त पन्नास मीटर अंतरावर आहे. वारजे व शिवणे या दोन्ही गावांच्यामध्ये पुनर्वसित अहिरे गाव असताना या गावातील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आणण्याचा समावेश एनडीएने केलेला नाही.

एनडीएने कॅडेटच्या प्रशिक्षणासाठी विमानतळ बांधले आहे. हा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणानंतर ही धावपट्टी पाच हजार चौरस फूट लांबीची होणार आहे. या विस्तारीकरणामुळे विमानांच्या टेकऑफ व लँडिंगला अडचणी येऊ नयेत यासाठी लगतच्या गावांमधील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आणण्याचे पत्र एनडीएने जिल्हाधिकारी सौरव राव यांना दिले आहे. या पत्रामध्ये एनडीएच्या विमानतळालगत व हद्दीला खेटून असलेल्या पुनर्वसित अहिरे गावाचा समावेश केलेला नाही.

अहिरे गाव पूर्वी एनडीएच्या आतमध्ये होते. या गावाचे पुनर्वसन वारजे व शिवणे गावाच्या हद्दीतील गणपतीमाथा येथे नुकतेच करण्यात आले. सुमारे शंभर वर्षांनी या संपूर्ण गावचे पुनर्वसन करण्यात यश आले आहे. या गावात अहिरेवासीयांनी इमारतीही बांधल्या आहेत. विमानतळापासून शंभर मीटरपर्यंत कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्यास मनाई झाल्यास या पुनर्वसनाच्या जागी एकही घर बांधता येणार नाही. ते मोठे अडचणीचे ठरणार असल्याने एनडीएने या गावाचा उल्लेख टाळला असल्याची शक्यता आहे.

गॅझेटमध्ये उल्लेख नाही

एनडीएने बांधलेल्या विमानतळावर गेली अनेक वर्षे कॅडेटला प्रशिक्षण देण्यात येत आहे. विमानतळ बांधल्यापासून गेल्या पन्नास वर्षांत तेथील बांधकामांवर कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे महापालिका व नगर विकास विभागाने तेथे बांधकाम परवानगी दिली आहे. बांधकाम परवानगी घेऊन अगदी एनडीएच्या संरक्षक भिंतीशी शेजारी इमारती उभ्या राहिल्या आहेत. हे विमानतळ केवळ प्रशिक्षणासाठी बांधल्याने त्याला लोहगावप्रमाणे विमानतळाचा दर्जा नाही. एनडीएच्या गॅझेटमध्येही त्याचा तसा उल्लेख नाही. त्यामुळे हे निर्बंध लावता येणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनो, दररोज पाच किलोमीटर चाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गोपनीय माहिती मिळवणे; तसेच पोलिसांचे अस्तित्व ठळकपणे दिसण्यासाठी पोलिसांनी दररोज कामात तीन ते पाच किलोमीटर आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालावे, असा आदेश पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यभरातील पोलिसांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गुजरातमधील भूज येथे राज्यांच्या पोलिस महासंचालकांची आणि निमलष्करी दलांच्या प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार पोलिसांना चालण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची अमंलबजावणीबाबत दीक्षित यांनी मुंबई येथे या आठवड्यात बैठक बोलावली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या पातळीवर गोपनीय माहिती मिळवण्यासाठी, तसेच गणवेशधारी पोलिसांचे रस्त्यांवरील अस्तित्व वाढले पाहिजे, यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी किमान तीन ते पाच किलोमीटर दररोज चालले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा सामाजिक कार्यामध्ये वावर वाढला पाहिजे. लहान मुलांची शाळेत भरती करणे, पोलिओ लसिकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदवण्यासारखे उपक्रम राबवले पाहिजेत, असेही सुचविण्यात आले आहे. 'पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या सरकारी नोकरांची माहिती ठेवली पाहिजे. या सर्व सरकारी नोकरांच्या बैठका बोलावून त्यांचा उपयोग करावा. त्यासाठी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी ठोस ​​यंत्रणा तयार केली पाहिजे,' असे सांगण्यात आले आहे. 'पोलिस अधिकाऱ्यांनी विविध पोलिस आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय ठेवला पाहिजे. सरकारी कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करण्यात आले तर त्याचा उपयोग नागरिकांची कामे झटपट होण्यामध्ये होईल आणि संबंधितांवर लक्षही ठेवणे सोपे जाईल. शेजारी-शेजारील जिल्ह्यांतील पोलिसांनी एकमेकांमध्ये वारंवार बैठका तसेच खेळाच्या स्पर्धा घेणे आवश्यक आहे,' असे सांगण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिणामांचा विचार करून बोला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत निर्माण झालेला वाद थांबतो न थांबतो तोच, 'साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणातून वाद होऊ नयेत. त्यामुळे परिणामांचा विचार करून बोला,'असा 'सल्ला' भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी दिला.

पिंपरी येथे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्या दिलगिरीनंतर भाजपने मवाळ भूमिका घेऊन आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच वेळी, 'अध्यक्षीय भाषणातून वाद होऊ नयेत. त्यामुळे परिणामांचा विचार करून बोला,' असा इशाराही भाजपने दिला आहे.

'संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेत आहोत', असे स्पष्टीकरण भंडारी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिले. याबाबत पत्रकारांनी अधिक विचारणा केली असता, 'कोणी काय बोलावे हे आम्ही ठरवत नाही,' अशी लगोलग सारवासारवही त्यांनी केली.

'अध्यक्षपदी सबनीस हे सदगृहस्थ निवडून आले. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ते वक्तव्य केले,' असा टोला भंडारी यांनी हाणला.

'पंतप्रधानांना पाच जानेवारी रोजी पत्र पाठवले, तर ते एवढ्या उशिरा उघड का केले,' असा सवालही त्यांनी केला. 'संमेलनाआधी अध्यक्षांना अप्रत्यक्षपणे दम देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या भाजपचा हा प्रयत्न तर नाही ना,' असा सवाल त्यामुळे आता असहिष्णुतेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर विचारला जाऊ लागला आहे.

सबनीस यांनी व्यक्त केलेली दिलगिरी संदिग्ध आहे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, असे दिसते. संमेलनासाठी आम्ही एक पाऊल मागे घेतले असले, तरी अध्यक्षीय भाषणातून वाद होऊ नयेत. त्यामुळे परिणामांचा विचार करून बोला. - माधव भंडारी प्रवक्ते, भाजप
दिलगिरीनंतर आठवलेंचे आंदोलन रद्द

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी उल्लेखाची विधाने करणारे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी विनाअट दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करतो. त्यामुळे आपल्या पक्षातर्फे यापूर्वी जाहीर केलेल मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचे आंदोलन आता रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते खा. रामदास आठवले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सातारा मार्गावर अपघातात मुंबईचे तिघे ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे - सातारा महामार्गावर खेड - शिवापूरजवळील वेळू येथे आज (गुरुवार) सकाळी पावणेसहा वाजता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथे ट्रेकिंगसाठी कारमधील सर्व जण जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. मृतांमध्ये चिनार राऊत, आयुष, अध्यांक काटोर यांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईचे रहिवासी आहेत.

या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात अल्पवयीन मुलाला जिवंत जाळलं!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील कसबा पेठ परिसरात काही लोकांनी एका अल्पवयीन मुलाला क्षुल्लक कारणावरून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पीडित मुलगा एका गाडीच्या कडेला लघवी करत होता. पण हा मुलगा गाडीच्या बॅटरी चोरणारा असल्याचा संशय स्थानिकांना आल्यामुळं काही लोकांनी त्याला हटकलं. त्यावरून वाद झाल्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं. यात हा मुलगा ६५ टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारणाचा मोठा फायदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

'पुरंदर हवेलीत जलसंधारणाची करोडो रुपयांची कामे सुरू आहेत. जलसंधारण कामांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रित पाणीसाठा तयार झाला असून त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाला आहे,' असे प्रतिपादन जलसंपदा-जलसंधारण व संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.
सासवड येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवतारे म्हणाले, 'जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक गावांत सिमेंट बंधारे, वळणबंधारे आणि खोलीकरण-रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. तालुक्यात गेल्या दोन वर्षांत सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्चून १०५ बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या वर्षी २८ बंधारे मंजूर झालेले असून त्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.'
परिंचे येथील मनसेचे उपतालुकाप्रमुख दिपक जाधव, भिवडी गावाचे माजी सरपंच केशवआप्पा दिघे, बंडूतात्या पवार, गोविंद भिंताडे, विजय क्षीरसागर, राजुरी गावचे माजी सरपंच कृष्णाजी भगत, गुलाब भगत, रामदास भगत, अशोक भगत, टेकवडी येथील ग्रा.पं सदस्य प्रल्हाद झिंजरके आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवतारे म्हणाले, 'तालुक्यातील अनेक कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. प्रशासकीय इमारतीचे काम निधीअभावी प्रलंबित होते. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून हे काम लवकरच पूर्णत्वाला जाईल. फुरसुंगी, सासवड, जेजुरी येथे राज्यमार्गाचे रुंदीकरण चालू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांत जी गावे बसतील त्यांची जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या आठवड्यात निवड करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात येतील. पांगारे येथील वडाची मळई बंधारा, दौंडज येथील जनाईदरा बंधारा आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शब्दांगण’ ठरणार वैशिष्ट्य

$
0
0

एकाच दालनात मिळणार माजी ८८ संमेलनाध्यक्षांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, छायाचित्रे आणि त्यांचे साहित्य एकाच ठिकाणी आज (शुक्रवार) पासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनात पाहता येणार आहे. तसेच ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती असणारे पुस्तकही या संमेलनात उपलब्ध होणार आहे. साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनामध्ये 'शब्दांगण'चे दालन यामुळे आकर्षण असेल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत कायमस्वरूपी पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या 'शब्दांगण' या संस्थेने साहित्य संमेलनामध्ये प्रथमच सहभाग घेत अनोखा उपक्रम राबवायचे ठरवले आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये असलेल्या शब्दांगणच्या दालनात साहित्याचे स्वतंत्र दालन मांडण्यात येणार आहे. या दालनामध्ये पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ते ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची उपलब्ध पुस्तके स्वतंत्ररीत्या मांडण्यात येणार आहेत, असे शब्दांगणचे संचालक लक्ष्मण राठिवडेकर यांनी सांगितले.तसेच शब्दांगणने 'आपले ८९ संमेलनाध्यक्ष : संमेलनाची स्मरणयात्रा'हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी यांनी संकलन केलेल्या या पुस्तकामध्ये आजवरच्या सर्व संमेलनाध्यक्षांची त्यांच्या छायाचित्रासह तसेच त्या संमेलनाबद्दल थोडक्यात माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या पुस्तकाचे संमेलनस्थळी प्रकाशन करण्यात येणार असून शब्दांगणच्या स्टॉलवर ते सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईची पसंती अनुवादित साहित्याला

$
0
0

१८ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये वाचनाचे प्रमाण मोठे
पुणे : वाचनसंस्कृतीपासून तरुणाई दुरावत असल्याची चर्चा फोल ठरते आहे. १८ ते ३० या वयोगटातील तरुणामध्ये वाचनाचे प्रमाण मोठे असून, त्यांच्याकडून अनुवादित साहित्याला मोठी मागणी आहे. टीव्ही, मोबाइल आणि फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल मीडियामुळे तरुणाई वाचत नसल्याची सातत्याने चर्चा केली जाते. साहित्य संमेलनांमध्ये वाचन आणि तरुणाई या विषयावर नेहमीच चर्चा होते. तरुणाईला वाचनसंस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, सरकारी पातळीवरूनही पुढाकार घेतला पाहिजे असेही बोलले जाते. मात्र, १८ ते ३० या वयोगटात वाचनाचे प्रमाण मोठे असल्याचे निरीक्षण पुस्तक विक्रेत्यांनी नोंदवले आहे. तरुणांकडून प्रेरणादायी पुस्तके, कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकाराची पुस्तके वाचली जातात.
'वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांना या वयोगटातील वाचकांकडून मागणी आहे. त्यातही अनुवादित साहित्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बदलत्या काळात तरुणाईच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. पुस्तकांच्या विषयासह वाचनाची पद्धतही बदलली आहे. ई-बुक वाचनाचे प्रमाण मोठे नसले, तरी ते वाचणारेही तरुण बरेच आहेत. असे असले तरी पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी झाले असे म्हणता येणार नाही,' असे अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवरेकर यांनी सांगितले.
'तरुण वाचत नाही या चर्चेला काही अर्थ नाही. ऐतिहासिक पुस्तकांपासून अनुवादित पुस्तकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके तरुणाईला हवी असतात. तरुणांमध्ये पुस्तकांविषयी उत्सुकता असते. पुस्तकांविषयी सातत्याने चौकशी सुरू असते. मात्र, मराठी पुस्तकांचे अधिक चांगल्या पद्धतीने मार्केटिंग झाले पाहिजे,' असे साहित्य दरबारचे संचालक विनायक धारणे यांनी स्पष्ट केले.
..
लोकप्रिय इंग्रजी लेखक
चेतन भगत, जे. के. रोलिंग, रॉबिन शर्मा, आमिश त्रिपाठी, बेट्टी मेहमुदी, डॅन ब्राउन, जेफ्री आर्चर, सिडने शेल्टन, पाउलो कोएलो, शिव खेरा
..
मराठी लेखक
पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, रत्नाकर मतकरी, सुधा मूर्ती, द. मा. मिरासदार, नारायण धारप, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, चिं. वि. जोशी, अच्युत गोडबोले, गिरीश कुबेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यनगरी लखलखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भव्य आणि सुबक सजावटीने सजलेला मुख्य मंडप..., तब्बल दीड हजार एलईडी दिव्यांचा झगमगाट..., मुख्य मंडपाशेजारीच अडीच हजार आसन क्षमतेचे दोन उपमंडप..., चारशे दालनांचे भव्य ग्रंथप्रदर्शन..., संमेलन स्थळालगत शंभर एकर मैदानावर पार्किंगची सोय... अशा भव्यतेमध्ये ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज, शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. संमेलनाचे औपचारिक उद्घाटन उद्या, शनिवारी होणार असले, तरी ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनामुळे उद्योगनगरीत शुक्रवारपासूनच साहित्यनगरीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

संमेलनासाठी आलेल्या निमंत्रितांसह साहित्य रसिकांची संमेलनस्थळी शुक्रवारपासून होणारी गर्दी लक्षात घेता, संयोजकांतर्फे गुरुवारीच संमेलनाच्या तयारीवर अंतिम हात फिरविला जात होता. संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच ८० फूट लांबीच्या आणि पाच फूट जाडीच्या निळ्या रंगाच्या फाउंटन पेनाच्या प्रतिकृतीने सर्वांचे स्वागत केले जाणार आहे. तेच संमेलनाचे बोधचिन्हही आहे. हे भव्य पेन हाती पेलणाऱ्या समाजातील शेतकरी, पुरोहित, पत्रकार, औद्योगिक कामगार, देशाचे रक्षण करणारा शीख सरदार आणि महिला अशा घटकांचा यात समावेश आहे. अमन मोहन विधाते या कलावंताने याची निर्मिती केली असून, थर्मोकोल आणि आतून लोखंडाचा समावेश असणाऱ्या या बोधचिन्हाच्या प्रतिकृतीचे वजन एक टन आहे.

मुख्य मंडपातील व्यासपीठावर दोन्ही बाजूंना पुस्तकांचे रॅक्स आणि त्यातून हाती पुस्तक घेऊन वाचणारे आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. मंचाच्या पाठीमागे भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आला आहे. त्याशिवाय, संपूर्ण मंडपात १३ स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.



दुपारी दोन वाजता ग्रंथदिंडी

पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शुक्रवारी दुपारी दोन वाजता ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. यामध्ये, दोन हजार महिला पारंपरिक पोषाखात सहभागी होणार असून, १६ प्रकारचे विविध खेळ सादर करतील. या ग्रंथदिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होईल. या दिंडीत शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रंथदिंडीच्या समन्वयक मृदुल महाजन यांनी सांगितले.



'ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी'

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या मैदानावर होत असलेल्या संमेलनस्थळाला 'ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी' असे नाव दिले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली. मुख्य मंडपाला कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात आले असून, उपमंडपाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठ असे नाव दिले आहे. तसेच, संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.



मोफत बससेवेची व्यवस्था

संमेलनाच्या निमंत्रितांना संमेलनस्थळापर्यंत आणण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. १६ ते १८ जानेवारीच्या कालावधीत सकाळी आठ वाजता बससेवा उपलब्ध असेल. याशिवाय तळेगाव दाभाडे (देहूरोड, निगडीमार्गे), देहूगाव (तळवडे, निगडी मार्गे), आळंदी (भोसरीमार्गे), मोशी (इंद्रायणीनगरमार्गे), रावेत (डांगेचौक, काळेवाडी, औंध, सांगवी, नाशिकफाटा मार्गे) आणि येरवडा (विश्रांतवाडी, दिघी, भोसरीमार्गे) या भागातून बससेवा असेल. या बसमध्ये स्वयंसेवक असेल. शिवाय बसवर संमेलनाचा फलक लावण्यात येणार आहे.



भव्य-दिव्य संमेलन

मुख्य मंडप क्षमता - १२ ते १५ हजार

मुख्य व्यासपीठ - १२० फूट लांब (एलईडी स्क्रीनसहित)

एलईडी दिवे - सुमारे १,५००

स्वयंसेवक - ६००

पोलिस बंदोबस्त - ३५०हून अधिक

खासगी बाउन्सर्स - २००

ग्रंथविक्रीचे स्टॉल्स - सुमारे ४००





मायमराठी आणि मराठी साहित्याची सेवा करण्याची सुसंधी मला मिळाली असल्याने संमेलनात येणाऱ्या प्रत्येकाची कोणतीही गैरसोय होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. मराठी मायबोलीत सर्वजण एक आहेत, ही समानता आम्ही या संमेलनातून दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

डॉ. पी. डी. पाटील,

स्वागताध्यक्ष, ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनात रंगणार ‘बालआनंद मेळावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कविवर्य विंदा करंदीकर यांच्यापासून ते संदीप खरे यांच्यापर्यंत विविध पिढीतील कवींच्या गाजलेल्या गीतांची धमाल बालकुमारांना साहित्य संमेलनात अनुभवता येणार आहे. खास बालकुमारांसाठी 'बालआनंद मेळावा' संमेलनात रंगणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बालआनंद मेळाव्याची कल्पना स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी मांडली होती. कार्यक्रमाचे संयोजन सचिन इटकर यांनी केले आहे. साहित्य संमेलनात बालसाहित्यावर चर्चा, परिसंवाद होतात. मात्र, मुलांसाठी खास कार्यक्रम होत नाही. ही उणीव या संमेलनात भरून काढली जाणार आहे. कार्यक्रमाची संहिता व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांची आहे. त्यात शुभंकर कुलकर्णी, चैतन्य देवढे, निधी घारे, प्रांजली बर्वे, कवी संदीप खरे सहभागी होणार आहेत. शुभंकर अत्रे, सुहानी धडफळे आणि अनेक कार्टूनचा आवाज असलेल्या मेघना एरंडे 'बालआनंद मेळाव्या'चे सूत्रसंचालन करणार आहे.
विविध पिढ्यांतील कवींच्या रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. बालकुमारांच्या भावविश्वाशी जोडली गेलेली बालगीत आणि त्यावर आधारित नृत्यांतून धमाल सफर घडणार आहे. अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या नृत्य सादर करणार आहेत. बालआनंद मेळाव्याला महाराष्ट्र राज्य सहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड, पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के आणि बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षीय भाषणात ‘संचितां’चे प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोलताना सतत संघर्ष, संवाद आणि संचित या शब्दांचा प्रयोग करणाऱ्या नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील वक्तव्याने संघर्ष आणि त्यानंतर संवाद अनुभवल्यानंतर आता त्यांचे भाषण 'संचितां'चे प्रयोग ठरणार आहे. लिखित भाषणात प्रथमच महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्राच्या साहित्य प्रवाहाचा; तसेच समाजातील विविध घटकांतील प्रवाहांचा आढावा घेताना नियोजित संमेलनाध्यक्ष विविध संचितांचे दर्शन घडविणार आहेत.

भाषेच्या सद्यस्थितीचा यथासांग उहापोह करताना भाषेला दिशा देण्याच्या दृष्टीने संमेलनाध्यक्षांचे भाषण महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच्या अनुद्गारामुळेच चर्चेचा विषय ठरले. आता ते संमेलनात लिखित भाषण वाचण्यास पुरेसा अवधी मिळणार नसल्याने उस्फूर्त भाषण करणार असले, तरी त्यांच्या लिखित भाषणाकडे एक प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.

लिखित भाषण रसिकांसाठी वाङ्मयीन संचित ठरावे यासाठी त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विविध साहित्य प्रवाहांना परिस्पर्श केला आहे. त्यामागची पार्श्वभूमी उलगडताना त्यांनी अत्यंत खुबीने नकाशांचाही वापर केला आहे. गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील साहित्याबरोबरच उपेक्षितांच्या साहित्य प्रवाहाचा आढावादेखील त्यांनी भाषणात घेतला आहे.

भाषणामध्ये नकाशांचा वापर मी केला आहे. यापूर्वी लिखित भाषणांमध्ये कवी आणि साहित्यिकांची सूची दिली जात असे. मात्र, मी आदिवासी, दलित, स्त्री, मुस्लिम, ख्रिश्चन या साहित्य प्रवाहांचे संचित मांडण्याचा प्रयोग केला आहे. या साहित्याबरोबरच गुजरात, गोवा आदी भागातील साहित्यसंकृतीचे मराठी संचित उलगडून दाखवताना विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहाचे स्थूलमानाने नकाशे देण्यावर भर दिला आहे. त्यात गावांबरोबरच मान्यवर लेखकांच्या नावांचा समावेश आहे. हे भाषण १३५ पानांचे झाले आहे, असे डॉ. सबनीस यांनी सांगितले.

या पुस्तिकेला सामर्थ्य आणि मर्यादा या सूत्रावर आधारित 'संवाद आणि संघर्षवादी, इहवादी ( सेक्युलर) भूमिका' असे समर्पक नाव दिले आहे. अध्यक्षीय भाषणाला शीर्षक असण्याची कदाचित ही पहिली वेळ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीमावादाबाबत संमेलनात ठराव करा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सीमावासीय मराठी भाषिकांवर अत्याचार झाले आहेत. हा लढा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या प्रश्नात लक्ष घालून सुप्रीम कोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडावी आणि बेळगाव, निपाणी, भालकी व बिदर हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी निर्णायक पावले उचलावीत. असा ठराव पिंपरी येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात यावा,' अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य महामंडळाकडे पत्राद्वारे केली आहे.

सीमावासियांचा लढा सुरू असूनही साहित्य संमेलनात गेल्या दोन वर्षांपासून बेळगाव सीमाप्रश्नाच्या ठरावाला बगल देण्यात आली. यंदा संमेलनाच्या कालावधीतच म्हणजे १७ जानेवारीला 'हुतात्मा दिन' बेळगावसह महाराष्ट्रात पाळला जाणार असताना सीमा प्रश्नाचा ठराव मांडला जाणार का? याबाबतीत प्रश्न निर्माण झाला असतानाच डॉ. गोऱ्हे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. संमेलनात अनेकदा संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ व त्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ठराव करण्यात आले आहेत. मात्र, घुमान येथे झालेल्या ८८व्या साहित्य संमेलनात सीमावासीयांबाबतचा ठराव करण्यात आला नव्हता.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावनांची दखल घेतली जावी. महामंडळ हा ठराव स्वीकारेल अशी आशा आहे. ठरावाच्या माध्यमातून साहित्य संमेलनातील वक्ते, साहित्यिक रसिकांसमोर याबाबत बोलतील. त्यातून महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी बांधवांचा धागा दृढ होईल. तसेच या माध्यमातून राज्यकर्त्यांना या प्रश्नाची तीव्रता कळेल आणि सर्वोच्च न्यायालयात ते अधिक ठामपणे बाजू मांडतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.



आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सीमाप्रश्नावर ठराव करण्यासंदर्भातचे पत्र मिळाले आहे. या ठरावाची नक्कीच दखल घेतली जाईल. संमेलनामध्ये दि. १७ जानेवारी रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मांडला जाईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तो खुल्या अधिवेशनात मांडू

- डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्माकोल वापराचा निषेध

$
0
0

पर्यावरणप्रेमींचे संमेलनाध्यक्षांना पत्र
म. टा. प्रतिनिधी, पुणे
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्याबाबतचा वाद शमला असताना आता पर्यावरणप्रेमींनी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत निषेधाचे अस्त्र उगारले आहे. संमेलनाच्या सजावटीमध्ये थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याने पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला हरताळ फासण्यात आल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे १५ ते १८ जानेवारीदरम्यान पिंपरी चिंचवड येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी संमेलननगरीत उत्साहाचे वातावरण आहे. संमेलनाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मोरया गोसावी यांच्यासह आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या साहित्यिकांचे पुतळे ठेवण्यात येणार आहेत. मुंबईचे शिल्पकार अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सजावटीचे काम करण्यात आले आहे. पुतळे तयार करण्यासाठी थर्माकोल वापरण्यात आले आहे. थर्माकोलमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन अॅड. असीम सरोदे यांनी डॉ. सबनीस यांना त्याबाबतचे पत्र दिले आहे. अॅड. रमा सरोदे, अॅड.रुचा पांडे, अॅड. शिवानी कुलकर्णी, अॅड. ओमकार वांगीकर, अॅड. गौरी कवडे आदी या वेळी उपस्थित होते.
'निसर्गावर लिहायचे, कविता करायच्या आणि इतर वेळी साहित्याचा पर्यावरणाशी संबंधच नाही असे वागायचे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. प्राणवायू प्रदूषित करणाऱ्या थर्माकोलचा वापर निषिद्ध मानला पाहिजे. मात्र, संमेलनाच्या सजावटीतील प्रतिकात्मक पुतळे पर्यावरणाची हानी करणारे आहेत. थर्माकोलबाबत कोणताही प्रकारचा आदर राखला जाऊ शकत नाही. त्यामुळे आपणही या थर्माकोलच्या वापराचा निषेध करावा,' असे आवाहन सबनीस यांना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचशेहून अधिक कवींचा काव्ययज्ञ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरीत शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरू होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवींच्या व्यतिरिक्त राज्यभरातून सुमारे पाचशेहून अधिक कवी काव्यकट्टा उपक्रमाच्या माध्यमातून काव्ययज्ञ करणार आहेत.

ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरीत मुख्य मंडपाव्यतिरिक्त अन्य एका मंडपात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून कवी सहभागी होणार आहेत. निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभागी होऊ न शकणारे अनेक कवी काव्ययज्ञात सहभागी होतील. त्यासाठी राजन लाखे, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस आणि अन्य सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. सहभागी कवींची ऑनलाइन पत्राने निवड करण्यात आली असून, त्यांना काव्य सादरीकरणाची वेळ आणि तपशील कळविण्यात आला आहे. सादर झालेल्या कवितांमधून ८९ कविता निवड्यात येणार असून, संमेलनानंतर त्याचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा एकप्रकारे काव्यज्ञच असेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले. मुख्य मंडपात सोमवारी (१८ जानेवारी) निमंत्रितांचे कविसंमेलन भ. मा. परसवाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यात प्रवीण दवणे, दासू वैद्य, संघमित्रा खंडारे, डॉ. सत्यपाल राजपूर, डॉ. विष्णू सोळंखे, प्रशांत असनारे, हेमलता पाटील, योगिराज माने, सय्यद अल्लाउद्दीन, सुहास जेवळीकर, कविता मोरवणकर, संगीता अरबुने आदींचा सहभाग राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याजवळ अपघातातमुंबईच्या तिघांचा मृत्यू

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, भोर पुणे-सातारा हायवेवर खेड-शिवापूरजवळील वेळू येथे गुरुवारी रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टँकरला एका कारने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हरीश आशुतोष कनगो (वय २३), अशोक किसन काहोर (२४) आणि चिनार उमेश राऊत (२२) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत नामदेव पवार आणि अभिषेक पुरुषोत्तम चौधरी ही अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई येथील अंधेरी, चर्चगेट परिसरातील राहणारे असून, हे सर्वजण मुंबईहून ट्रेकिंगसाठी महाबळेश्वरकडे निघाले होते. त्यादरम्यान पहाटे सहाच्या सुमाराला हा अपघात झाला. वेळू गावाच्या हद्दीतील हॉटेल आमंत्रणसमोर उभ्या असलेल्या टँकरवर त्यांची कार धडकली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेत आणि अभिषेकला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅटरी चोरीच्या संशयावरून पेटवले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे दुचाकींच्या बॅटरी चोरत असल्याच्या संशयावरून १७ वर्षांच्या भंगार गोळा करणाऱ्या युवकावर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना पवळे चौकाजवळ बुधवारी दुपारी घडली. हा युवक ८५ टक्के भाजला असून, त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेकार्डवरील गुन्हेगारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सावन धर्मा राठोड (वय १७, रा. अलका टॉकीज (टिळक) चौक फुटपाथ) असे जाळण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी इम्रान इक्बाल तांबोळी (वय ३०, रा. केंट सोसायटी, शिवरकर रोड, वानवडी), इब्राहीम मेहमूद शेख (वय ३५, रा. कसबा पेठ) आणि जुबेर इक्बाल तांबोळी (वय २९, रा. शिवरकर रोड, वानवडी) यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे फौजदार गिरीश सोनावणे यांनी दिली. राठोड हा आपल्या मित्रांसह भंगार गोळा करण्याचे काम करतो आणि डेंगळे पुलाखालील मुन्ना भंगारवाला याच्याकडे जाऊन विक्री करत. नेहमीप्रमाणे राठोड आणि त्याचा मित्र बुधवारी दुपारी भंगार विक्रीसाठी गेले होते. भंगार विक्री केल्यानंतर राठोड आणि त्याचा मित्र खन्न्या हे पवळे चौकात दारू प्यायले. तेथून ते फडके हौदाकडे जात होते. खन्न्या पुढे चालला होता; तर राठोड पाठीमागून जात असताना त्याला एकजण गचांडी धरून बोळात घेऊन गेला. दुचाकीतील बाटलीत काढलेले पेट्रोल ओतून राठोडला पेटवून दिले. अखेर त्याने पेटलेले अंगावरील कपडे काढून फेकले. यादरम्यान तो चांगलाच भाजला. त्यानंतर आरोपींनी एका टेम्पोत बसवून त्याला नदीपात्रात नेऊन सोडले आणि पळ काढला. ------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यनगरी गजबजली

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) मराठी भाषेतील सर्वांत मोठ्या साहित्य उत्सवाला, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला सर्व वाद मिटले असल्याने पुढील चार दिवस, पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्यिक आणि रसिकांचा आनंदमेळा रंगणार आहे. उद्योगनगरी आणि राजकीय वातावरणाचे रंग अनुभवणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना प्रथमच चार दिवस साहित्याची मेजवानी उपलब्ध असेल. साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनातील भरगच्च कार्यक्रमांना शुक्रवारी दुपारी दोनपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारपासून संमेलन आयोजकांची लगबग सुरू असून, राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर साहित्यिक आणि निमंत्रित पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या (एचए) तब्बल ४० एकर मैदानावर संमेलनातील सर्व कार्यक्रम होणार असून, येथील सर्व तयारीवर अंतिम हात फिरविण्याचे काम गुरुवारी दिवसभर सुरू होते. संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांनी उत्सुकतेने एचएच्या मैदानावर हजेरी लावली होती. संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लोगोसदृश कमानीसमोर उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. संमेलनाच्या निमित्ताने मराठीतील नामवंत लेखक, कवी यांना प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. त्याशिवाय, भारतीय भाषांमधील ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आणि गुलजार, जावेद अख्तर, चेतन भगत यांच्यासारख्या मान्यवरांना ऐकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. संमेलनाचे औपचारिक उद्घाटन उद्या, शनिवारी होणार असले, तरी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन आणि माजी संमेलनाध्यक्षांच्या सत्कारामुळे शुक्रवारीही साहित्यरसिकांची पावले ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनागरीच्या दिशेने वळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसनाचा श्रीगणेशा स्वारगेटपासून करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील चौक आणि फूटपाथवर अतिक्रमण करणारे फेरीवाले, पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला स्वारगेटपासून सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे शंभरहून अधिक व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पुणे महापालिकेचे तीन विभाग त्यासाठी एकत्र काम करणार असून, पथदर्शी स्वरूपातील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहराच्या इतर भागांमध्येही त्याच धर्तीवर पुनर्वसन करण्याचा पालिकेचा मनोदय आहे.

शहरातील अतिक्रमणाची समस्या ठरावीक दिवसांनंतर सातत्याने निर्माण होते. तात्पुरत्या स्वरूपात त्यावर कारवाई केली जात असली, तरी फेरीवाले, पथारी व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. आता, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करण्याचे संकेत दिले असून, त्यासंबंधीचे सविस्तर धोरण लवकरच पक्षनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्वारगेट येथील शंभरहून अधिक गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील कॅनॉललगत असलेल्या पालिकेच्या सीमाभिंतीलगत कायमस्वरूपी बांधकाम केले जाणार असून, संबंधित व्यावसायिकांना तेथे जागा दिली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली.

पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अतिक्रमण विभाग, भवन रचना आणि मालमत्ता व व्यवस्थापन अशा तिन्ही विभागांतर्फे संयुक्त कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण विभागातर्फे संबंधित भागांतील व्यावसायिकांची प्राधान्य यादी तयार केली जाणार आहे. तसेच, त्यांना नव्याने जागा मिळणार असल्याने 'अतिक्रमण' म्हणून त्यांची नोंद वगळण्यात येणार आहे. मालमत्ता व व्यवस्थापन विभागातर्फे संबंधित व्यावसायिकांशी करारनामा केला जाणार असून, पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार त्याची मुदत निश्चित केली जाईल. तर, भवन रचना विभागातर्फे पुनर्वसनाचे सर्व गाळे बांधून दिले जाणार आहेत, अशी माहिती जगताप यांनी दिली.

पथदर्शी स्वरूपातील या प्रकल्पाची अंमलबजावणी यशस्वी ठरली, तर शहराच्या इतर भागांमध्येही याचप्रकारे तिन्ही विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचे सविस्तर धोरण येणाऱ्या पक्षनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

अद्याप एकाचेही पुनर्वसन नाही

राष्ट्रीय फेरीवाला कायदा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेकडे आहे. १ एप्रिल २०१४ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी अद्याप एकाही पथारी व्यावसायिक, फेरीवाल्याचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे, पुनर्वसन करण्याआधीच त्यांच्यावर केली जाणारी कारवाई चुकीची असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांनी वारंवार केला आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने ठरविले आहे. म्हणूनच, स्वारगेट येथील पुनर्वसन प्रक्रियेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images