Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नाशिक सुधारगृहातून पळालेले दोन जण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या १२ अल्पवयीन आरोपींपैकी नाशिकच्या सुधारगृहातून रविवारी (१० जानेवारी) पळाले होते. त्यापैकी दोघांना निगडी पोलिसांनी साने चौक, चिखली येथे ताब्यात घेतले. या दोघांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे. सुधारगृहातून पळाल्यावर नाशिक पंचवटी येथील एक दुचाकी चोरून १२ पैकी चौघे जण एकाच दुचाकीवरून निगडी येथे आले होते.

नाशिक सुधारगृहाच्या बराकीचा गज कापल्यानंतर भांडारात ठेवलेल्या किल्या घेऊन कुलूप उघडून १२ जणांनी पलायन केले होते. यातील चौघे जण एकाच दुचाकीवरून निगडीत आले. त्यापैकी दोन जणांना निगडीत सोडून उर्वरित दोन जण फरारी झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एक निगडीतील रहिवासी आहे, तर दुसरा सातारा येथील रहिवासी आहे. हे दोघे चिखली परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने निगडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी चेतन सावंत व सुनिल शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, श्रावण राठोड, स्वप्नील शिंदे यांनी परिसरात शोध मोहीम राबवून सोमवारी (११ जानेवारी) दोघाही जणांना ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता, गेल्या पंधरा दिवसांपासून पळून जाण्याचे प्लॅनिंग केल्याचे दोघांनी सांगितले. पळून गेलेल्या सर्व आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पलायनासाठी भांडारात काम करणाऱ्याने ब्लेड आणले होते. त्यानंतर गज कापून बराकीच्या बाहेर आल्याची माहिती त्यांनी दिली. सुधारगृहाच्या भिंतीवरून पळून जाण्यासाठी चादर आणि सतरंजीचा वापर केल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. गज कापण्यासाठी ब्लेड आणि भांडारातील किल्या मिळवेपर्यंत अंतर्गत सुरक्षारक्षक काय करत होते. याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या प्रकरणी प्रशासनाने दोन जणांना निलंबित केले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे इतरांबाबत चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे स्टेशन पुन्हा गजबजले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत बंद असलेली पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सोमवारी पूर्ववत झाली. त्यामुळे सोमवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन गजबजून गेले होते.

मुंबईतील भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान असलेला ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पाडण्यात आला. रविवारी सायंकाळपर्यंत ते काम सुखरूपपणे पूर्ण झाल्यानंतर तेथील लोकल सेवा सुरू झाली. तर, रात्री पुण्याहून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन व प्रगती सुपरफास्ट एक्स्प्रेस या चाकरमान्यांच्या समजल्या जाणाऱ्या नेहमीप्रमाणे गर्दीने फुलून गेल्या होत्या. एसटी महामंडळाच्या बस नेहमीप्रमाणे सोडण्यात येत होत्या. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक पूर्ववत व विनाअडथळा सुरू होती.

दरम्यान, पुणे विभागात लोणी आणि उरुळीकांचन स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीच्या कामासाठी १२, १४ व १७ जानेवारीला दुपारी साडेबारापासून तीन वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून सव्वातीन वाजता सुटणारी पुणे-निजामाबाद पॅसेंजर (५१४२१) ५० मिनिटे उशिराने सुटणार आहे.
..

जुन्या आठवणींना उजाळा

कामशेत येथे पावसात रेल्वेचा पूल व अनेक ठिकाणी ट्रॅक वाहून गेल्याची घटना पाच ते सात वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी पुणे ते मुंबई आणि पुणे ते लोणावळा लोकलही पूर्णपणे बंद होती. तर, डेक्कन क्वीन सात दिवस बंद होती. रविवारी पुणे-मुंबई दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने त्या घटनेच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार चेहऱ्यांवर ‘मुस्कान’

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com

पुणे : आपले मूल अचानक हरविल्यानंतर त्याचे पालक बैचेन होतात..त्याच्याबरोबर काही बरेवाईट झाले नसेल ना या काळजीने हैराणही होतात..पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले तर त्यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळतो..मूल सापडत नसल्यामुळे मानसिक धक्का बसलेले पालक वारंवार पोलिसांकडे चौकशी करतात..तर काहीजण भीतीपोटी तक्रार करतच नाहीत..हरविलेल्या मुलांची वाढती आकडेवारी लक्षात घेऊन जुलै २०१५मध्ये पोलिसांकडून राज्यात राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत ४,२९६ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे.

शोध घेण्यात आलेल्या मुलांपैकी ३,५११ मुले हरविल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यातच आली नसल्याचे उघड झाले आहे. 'ऑपरेशन मुस्कान'अंतर्गत रेकॉर्डवर असलेली ७७० मुले आणि रेकॉर्डव्यतिरिक्त ३,०९० मुले मिळून एकूण ३,८६० मुले त्यांच्या पालकांकडे, तर ४०३ अनाथ मुले चाइल्ड वेलफेअर केअरकडे सुपूर्द करण्यात आली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एक जुलै ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी 'ऑपेरशन मुस्कान' राबविण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात वेगवेगळ्या टीम करून ही मोहीम राबविण्यात आली. बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. त्यानुसार विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी आढळणाऱ्या मुलांची चौकशी करून त्यांची आणि पालकांची भेट घडवून आणण्यात आली.

राज्यात या मोहिमेत पोलिसांकडे मुले हरवल्याची नोंद असलेल्या ७८५ मुलांची पालकांसोबत भेट घडवून आणण्यात आली. त्यामध्ये मुंबई पोलिसांनी सर्वाधिक कामगिरी करीत १५४ मुलांची पालकांसोबत भेट घडवून आणली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी १४३, नाशिक ६८, नवी मुंबई पोलिसांनी ४६, ठाणे पोलिसांनी ४५ मुलांचा शोध लावला.

मुंबई पोलिस अव्वल

राज्यात मुंबई रेल्वे पोलिसांनी रेकॉर्डवर नसलेल्या १,१५२ मुलांचा शोध लावला आहे. त्यानंतर अनुक्रमे नागपूर रेल्वे पोलिस (३८२), बुलडाणा (२३८), ठाणे ग्रामीण (२२८) आणि सोलापूर शहर (२२८) यांनी मुलांचा शोध लावण्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे.

..

पुणे जिल्हा आकडेवारी

जुलै २०१५ मध्ये सापडलेली मुले ३८

३१ जुलैनंतर न सापडलेली मुले २६८

पालकांकडे सुपूर्द केलेली मुले ३८

चाइल्ड केअरकडे दिलेली मुले १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक नगरीत रंगणार लष्करी सराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय लष्कराचा सर्वांत मोठा संयुक्त लष्करी सराव दोन ते आठ मार्च दरम्यान पुण्यात होणार आहे. आशियाई देशांबरोबरच जपान, अमेरिका, रशियाचा सहभाग असलेल्या या सरावाच्या पूर्वतयारीने आता वेग घेतला आहे. या संदर्भात सरावात सहभागी होणाऱ्या देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक आज, मंगळवारपासून पुण्यात सुरू होणार आहे.

भारतीय लष्कराच्या इतिहासातील पहिल्याच सर्वांत मोठ्या अशा या संयुक्त लष्करी सरावात आशियान समूहातील दहा देशांबरोबरच चीन, जपान, रशिया, अमेरिका आदी देशही सहभागी होणार आहेत. या सरावाची पूर्वतयारी आणि नियोजनाच्या दृष्टीने यात सहभागी होणाऱ्या देशांच्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक आजपासून (मंगळवार) आयोजिण्यात आली आहे. यामध्ये या सरावाची रूपरेषा अंतिम करण्यात येणार आहे. लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आर. जे. नरोन्हा यांच्या मार्गदर्शनाने या बैठकीला प्रारंभ होईल, असे लष्करातर्फे सांगण्यात आले. या संयुक्त सरावाला फिल्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (एफटीएक्स २०१६) असे नाव देण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या इतिहासातील हा पहिला सर्वांत मोठा संयुक्त लष्करी सराव असल्याने लष्करातर्फे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात असलेल्या अनेक लष्करी संस्था, सरावासाठी भरपूर व बंदिस्त मोकळी जागा, उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम हवामान आणि सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन सरावासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याचे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या सरावात भूसुरुंगांचा शोध घेऊन ते नष्ट करणे आणि शांतता मोहिमेदरम्यानच्या कसरतींचा सराव केला जाणार आहे. अनेक देशांच्या सहभागामुळे या सरावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्वदीच्या संमेलनाला तरुणाईची मदतीची जोड

$
0
0

sunil.landge@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथे येत्या शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरू होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ८९ वे असले तरी, त्यासाठी प्रत्यक्षात राबणारे हात तरुण आहेत. यंदाचे संमेलन तरुणाईला आकर्षित करणारे असेल, असा प्रयत्न संयोजकांकडून होत आहे.

संमेलनाच्या निमित्ताने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या मैदानावर प्रत्यक्षात जोरदार तयारी चालू आहे. संमेलनाच्या कालावधीत मिरवणारे, चर्चेत सहभागी होणारे असंख्य मान्यवर असतील. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून राबणारे हात मात्र तरुण असल्याचे दिसून येते. सुमारे सहाशेहून अधिक तरुण स्वयंसेवक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कार्यात सहभागी होत आहेत. यंदा या प्रकारचा जाणीवपूर्वक वेगळा प्रयत्न संयोजकांनी केला आहे.

मोबाइल अॅप, अद्ययावत वेबसाइट, व्हॉटस्अॅप, फेसबुक पेज, मोबाइल रिंगटोन, रेडिओ जिंगल आदी माध्यमातून मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि संमेलनानिमित्त होणारे कार्यक्रम याबाबतची विशेष खबरदारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने घेतली आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक निमंत्रण पत्रिकांचे वाटप, तितक्याच संख्येने ई-मेल पाठविण्यात आले आहेत. सुनील चव्हाण, किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा गट गेल्या पंधरा दिवसांपासून अक्षरशः राबत आहे. यामध्ये अंकिता वाठारे, अमृता जोशी, अभिषेक सिंग, अक्षय शिरसाट, प्रियांका पाटील, चिरंतन कुलकर्णी, महेश जोशी, तेजय रायभर यांच्यासह अन्य स्वयंसेवकांचा समावेश आहे. या कामासाठी विद्यापीठात स्वतंत्र कक्षच स्थापन करण्यात आला आहे.

संमेलनाच्या निमित्ताने येणारे मान्यवर पाहुणे, विशेष निमंत्रित, माजी संमेलनाध्यक्ष, मान्यवर लेखक यांच्या स्वागतासाठी तरुणांची पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये संयोजक विद्यापीठ आणि प्रतिष्ठानचे पाचशेहून अधिक युवक-युवती सहभागी असतील. या शिवाय पुणे विद्यापीठातून सुमारे शंभर स्वयंसेवकांची तुकडी मदतीला येणार आहे. याशिवाय निमंत्रण पत्रिकेतही मुले आणि तरुणांसाठीच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेखक चेतन भगत यांचा तरुणांशी संवाद, आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते, आजचे बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का, मुलांचा आनंदोत्सव आदी कार्यक्रमांचा उल्लेख करता येईल.

....

आयटी दिंडी अन् पारंपरिक पोशाख

संमेलनात ग्रंथदिंडी हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. यामध्ये वारकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांची आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांची दिंडी सहभागी होणार आहे. हे सर्वजण पारंपरिक पांढरा झब्बा, पायजमा आणि मुली किंवा महिला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करणार आहेत. सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, युवकांचा दिंडीत सहभाग असेल, असे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार कोणतेही असो; शेतकऱ्यांनो काळजी सोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'सर्वच शेतीमालाच्या भावात घसरण झाली असून, सध्या अडचणीचा काळ आहे. अशी संकटे येतच असतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी धीराची गरज आहे. शेतीमालाच्या भावाबाबत देशात अथवा राज्यात कोणतेही सरकार येवू दे; तुम्ही काळजी करू नका. आगामी दोन ते तीन वर्षांत चांगली परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास वाटतो,' अशी भावना शिवनगर विद्या प्रसारक मंडळातर्फे आयोजित अमृतमहोत्सवी अभिष्ट चिंतनसोहळ्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

या वेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे, विजय कोलते आणि शिवाजीराव भोसले उपस्थित होते . 'मध्यंतरीचे काही दिवस थोडे धाकधुकीचे होते. देशातील साखर उद्योगाबाबत लोक माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. कारखाने खासगी असो की सहकारी त्यांच्याशी माझा सुसंवाद होतोच. ऊसाचे उत्पादन वाढल्यामुळे साखरही वाढली. त्यामुळे थोडी अडचण झाली खरी; पण आता हे चित्र पुन्हा बदलायला सुरुवात झाली आहे. साखरेच्या भावाची घसरण थांबण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षी ऊसाचे उत्पादन जवळपास २० ते २५ टक्क्यांनी घटेल,' असे संकेतही पवारांनी दिले.

माळेगावच्या शैक्षणिक संकुलात पाऊल ठेवल्यावर जुन्या माळेगावची आठवण झाल्याशिवाय राहात नाही, असेही पवार म्हणाले. जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींनाही पवारांनी उजाळा दिला. आपल्याला लाभलेले ​जिवाभावाचे सहकारी हीच आपली कमाई आहे. पहिली निवडणूक संघर्षाची झाली, मात्र पुन्हा कधीच मतांचा जोगवा मागण्याची वेळ मतदारांनी माझ्यावर येऊ दिली नाही. असे मतदार संपूर्ण देशात कुठेही नाहीत, या शब्दांत पवारांनी मतदारांचे आभार मानले.

यंदा पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुलनात्मकदृष्ट्या परिस्थिती बरी राहील. मात्र, आपल्या तरुणाईने शेती किंवा नोकरी व्यतिरिक्त उद्योगांकडे पहिले पाहिजे. भविष्यात नोकरी मागण्यासाठी माझ्यासाठी येऊ नका.मात्र, मात्र उद्योगासाठी सहकार्य हवे असल्यास अवश्य माझ्याकडे या.

शरद पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. शिवकुमार शर्मांना ओ. पी. नय्यर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ओ. पी. नय्यर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'ओ. पी. नय्यर पुरस्कार' प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून यंदा पुरस्काराचे सहावे वर्ष आहे.

या पूर्वी हा पुरस्कार शमशाद बेगम, इनॉक डॅनियल, मनोहरी सिंग, पं. राम नारायण, केर्सी लॉर्ड आणि बर्जोर लॉर्ड या गायक-वादकांना प्रदान करण्यात आला आहे. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जयंतीदिनी १६ जानेवारी रोजी गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सारंगी वादक पं. राम नारायण यांच्या हस्ते पं. शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमात 'श्रुती' ही संस्था नय्यर साहेबांच्या गाण्यांचा नजराणा पेश करणार आहे.

पं. नारायण व पं. शर्मा हे दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र येणार असून, या कार्यक्रमातील बहुसंख्य गाणी शिवजींनी निवडलेली आहेत. या गाण्यांवर ते भाष्य करणार असून, नय्यर साहेबांच्या आठवणीही उलगडणार आहेत. सुलतान खाँ यांचे शागीर्द दिलशान खाँ (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सुनील अवचट (बासरी), शिवजींचे शिष्य दिलीप काळे (संतूर) संगीतकार आणि सतारवादक भास्कर चंदावरकर यांच्या शिष्या गायत्री गोरे (सतार) या कलावंतांची अनोखी जुगलबंदी या कार्यक्रमात अनुभवता येईल. सुहास काटदरे यांची व्हायोलिनवर साथसंगत असेल. तसेच सॅक्सोफोन, अॅकॉर्डियन, माउथ ऑर्गन, ग्रँड पियानो या वाद्यांची सूरमयी अनुभूती कार्यक्रमातून मिळणार आहे. संगीत संयोजन अमृता ठाकूरदेसाई यांचे असून, शैलजा सुब्रह्मण्यम, प्रियांका बर्वे, अली हुसेन व धवल चांदवडकर गाणी सादर करणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.

सशुल्क प्रवेशिकांसाठी संपर्क

शुल्क प्रवेशिकांसाठी ९८२२४५६३००, ९८२२०१५६९६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेतल्या भांडणातून मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शाळेत झालेल्या वाद मिटविण्यासाठी एकत्र आलेल्यांमध्ये भडका उडून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सांगवी येथील नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर रविवारी (१० जानेवारी) रात्री दहाच्या सुमारास घडली. दोन्ही गटातील लोकांवर परस्पर विरोधी खुनी हल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

पप्पू वानवडे, सुरकला खेराले, नीलेश खेराले (रा. जिल्हा रुग्णालय वसाहत, औंध, पुणे) यांच्या विरोधात गजानन गाजरे (२५, रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे; तर अभिजीत ढमाले, गजानन गाजरे व इतर आठ ते दहा जणांच्या विरोधात नीलेश खेराले (३७) यांनी फिर्याद दिली.

नीलेश खेराले यांचे मामेभाऊ अक्षय नाईक व अभिजीत ढमाले यांच्यात शुक्रवारी (८ जानेवारी) भांडणे झाली. खेराले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाद मिटविण्यासाठी खेराले गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या जुनी सांगवी येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ रविवारी जमले होते. त्या वेळी नगरसेवक शितोळे तेथे उपस्थित नव्हते. खेराले यांनी नगरसेवक शितोळे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस अभिजीत ढमाले, गजानन गाजरे व इतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नीलेश खेराले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिजीत ढमाले व गजानन गाजरे यांनी नीलेशच्या डोक्यावर, दोन्ही हातावर, बोटावर व उजव्या पायाच्या मांडीवर कोयता व सत्तूरने वार केले. लाकडी दांडके व दगडाने मारहाण करून खेराले याला मारण्याचा प्रयत्न केला.

गजानन गाजरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या कार्यालयासमोर थांबलेल्या गर्दीतील लोकांना येथे का थांबले, असे विचारल्याच्या कारणावरून पप्पू वानवडे, सुरकला खेराले, नीलेश खेराले यांनी गजाननला शिवीगाळ व हाताने मारहाण केली. पप्पू वानवडे याने मानेवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळभोरनगरमध्ये सुजाता टेकवडे विजयी

$
0
0

पिंपरी ः पिंपरी-चिंवड महापालिकेच्या काळभोरनगर (प्रभाग क्रमांक २६ अ) पोटनिवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता टेकवडे यांनी ६३१ मतांनी विजय मिळविला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या लिटमस स्टेटमध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष पराभूत झाले आहेत.

नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खुनानंतर काळभोरनगर प्रभागात रविवारी (दहा जानेवारी) झालेल्या मतदानात आठ हजार ४४६ नागरिकांनी हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसने टेकवडे यांच्या पत्नी सुजाता यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेने विजयकुमार गुप्ता आणि भारतीय जनता पक्षाने गणेश लंगोटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर होती, तर शिवसेनेचे गुप्ता सुमारे आठशेहून अधिक मतांनी आघाडीवर होती. परंतु, नंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये टेकवडे यांनी पिछाडी भरून काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम निकाल पुढीलप्रमाणे - एकूण मते (८,४४६); सुजाता टेकवडे यांना ३,४८४ मते मिळाली. विजयकुमार गुप्ता यांना २,८५५ मते, तर गणेश लंगोटे यांना २,००२ मते मिळाली. 'नोटा'साठी १०३ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशवंत माने यांनी काम पाहिले. निकालानंतर महापौर शकुंतला धराडे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, आझमभाई पानसरे यांनी टेकवडे यांचे अभिनंदन केले.

काळभोरनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहिली आहे. अविनाश टेकवडे यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुजाता कटिबद्ध राहतील, अशी पावती मतदारांनी दिली आहे. हा धडा विरोधकांनी घ्यावा.

- मंगला कदम, पक्षनेत्या, पिंपरी-चिंचवड महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा पदाची, भाषा आव्हानाची

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला वर्षाचा कालावधी शिल्लक असताना इच्छुकांचा उतावीळपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या इच्छुकांना पदाची आशा असली तरी त्यांची फ्लेक्सवरील भाषा, मात्र आव्हानांचीच असल्याचे दिसून येते.

महापालिकेची २०१७ मधील निवडणूक एक किंवा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची होणार, याबाबत उत्सुकता कायम असताना इच्छुकांनी मात्र आत्तापासूनच विद्यमानांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी फ्लेक्स, फेसबुक आणि व्हॉट्सअपचे माध्यम खुबीने वापरण्यात येत आहे. या माध्यमांमधून आजपर्यंतचा छुपा विरोध थेट जाहीर होऊ लागला आहे. विशेषतः भोसरी, मोशी परिसरात चौकांचौकांमध्ये, महामार्गांवर हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

'गुलाल तर उधळणारच, नगरसेवक होणारच,' 'डर मत बंदे ये ....का आखाडा है,' '....ने एक झटके से सबको उखाडा है,' '२०१७ ला नगरसेवकाची पाटी आम्हीच लावणार,' 'जंगल यही रहेगा, लेकिन शेर बदल जाएगा,' 'आए कितने गए कितने, लेकिन शेर तो शेरही रहेगा' अशा प्रकारच्या फलकांनी सध्या अक्षरशः धुमाकूळ घातल्यासारखे वाटते. त्यामुळे या तुलनेच 'लक्ष्य २०१७' आशयाचे फलकही फिके वाटू लागत असल्याचे जाणवते.

समाजकार्याची चढाओढ

आगामी निवडणुका लक्षात घेता सामाजिक उपक्रमांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही बाब सामान्य नागरिकांच्या दृष्टीने समाधानाची असली, तरी कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, याबाबतचे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात कायम आहे. इच्छुकांकडून सध्या अनेक सहलींचे आयोजन करण्यात येत असून, काहींनी निवडक कार्यकर्त्यांना थेट परदेशवारीचे आमिष दाखविले आहे. काही इच्छुक मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाऊन मतदारांना निवडक 'शो' दाखवित आहेत. त्यामुळे आमची डोकेदुखी मात्र वाढली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान नगरसेवक व्यक्त करीत आहेत.

नागरिकही संभ्रमात

महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक, नामनिर्देशित सदस्य, वृक्ष प्राधिकरण सदस्य, माजी महापौर यांच्या नावांचे फलक त्यांच्या निवासस्थानालगतच्या परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामध्ये भर म्हणून की काय महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या स्वीकृत सदस्यांनीही नगरसेवक असाच थेट उल्लेख केला आहे. त्यांच्या या मोहामुळे नागरिक मात्र संभ्रमात आहेत. समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेकांचे हात पुढे असले तरी कोणाकडे जायचे? अशा द्विधा मनःस्थितीत नागरिक आहेत.

नगरसेवकपद नको

बहुतांशी इच्छुकांनी विद्यमान नगरसेवकांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे असताना आत्तापासूनच कोणाची दखल घ्यायची? अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका सदस्याने व्यक्त केली आहे. तर, आव्हानाची भाषा आणि इच्छुकांची संख्या लक्षात घेता नगरसेवकपदही आता नको वाटू लागलयं, (अर्थात, खुर्चीचा मोह कोणाला नको असतो? हा भाग वेगळा) अशी प्रतिक्रियाही एका नगरसेवकाने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या पावसाने राज्यातील पाणीसंकट गहिरे

$
0
0

१०१७ टँकर सुरू; पुण्यात २१ टँकरने पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात झालेल्या अपुऱ्या पावसाचे परिणाम जाणवू लागले असून, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई भासू लागली आहे. या दोन विभागांसह राज्यातील ७५९ गावे व १,१३१ वाड्या-वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. या गावांना तब्बल १,०१७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेली सलग काही वर्षे मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघत आहे. यंदा या दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांमध्ये पाण्याचे संकट गहिरे झाले आहे. या जिल्ह्यांतील ५८७ गावे व २४९ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाने घेरले आहे. या गावांची पाण्याची तहान भागविण्यासाठी ८१० टँकर सुरू करावे लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात टँकरची ही संख्या कित्येक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९२ गावांना १२९ टँकरने पाणी दिले जात आहे. बीडमधील १५३ गावे व १२९ वाड्या टंचाईच्या गर्तेत सापडल्या आहेत. बीडमध्ये तूर्त २०४ टँकर सुरू करण्यात आले आहेत. परभणीत ४४ गावांना ५४ टँकरने, तर लातूरमधील ७० गावे व २३ वाड्यांना ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नांदेडमधील १०० गावे व ७८ वाड्यांना १६१ टँकरने पाणी दिले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ११६ गावांना टंचाईचा फटका बसला आहे. या गावांची तहान १६० टँकरने भागविण्यात येत आहे. मराठवाड्यातील जालना व हिंगोलीत तुलनेने कमी टँकर सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात १५ गावे व ९८ वाड्यांना २१ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे, तर सातारा जिल्ह्यातील ११ गावे व ८१ वाड्या टँकरवर अवलंबून आहेत. सांगलीत टंचाईची तीव्रता जाणवत आहे. सांगलीतील २६ गावे व २१३ वाड्यांना ३४ टँकरने पाणी देण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तूर्त सहा टँकर सुरू आहेत. याशिवाय नाशिक, धुळे व जळगावमध्येही यंदा जानेवारीतच पाणीटंचाई भासू लागली आहे. गतवर्षी याच काळात फक्त २३३ टँकर सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजच्या जाळीत अडकले ट्रकचे चाक

$
0
0

पुणेः शगुन चौकाकडून कुमठेकर रस्त्याकडे जाणाऱ्या वाळूच्या ट्रकचे चाक रस्त्यावरील ड्रेनेजच्या लोखंडी चेंबरच्या जाळीत अडकण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.

रात्री उशिरापर्यंत ट्रक त्याच जागी उभा होता. लक्ष्मी रोडवरून कुमठेकर रस्त्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबविली होती. रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. 'कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण पोलिसांना कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले. हा प्रकार रात्री घडला असल्याने फारशी वर्दळ नसल्याने वाहतूक कोंडी झाली नाही,' असे प्रत्यक्षदर्शी अनुप जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पेठा झाल्या हवालदिल

$
0
0

पाणी पुरेशा दाबाने देण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये पाण्याची समस्या जाणवू लागली असून, दिवसाआड दिले जाणारे पाणी पुरेशा दाबाने येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. जानेवारी महिन्यातच अशी स्थिती असेल, तर एप्रिल, मे महिन्यात पालिका प्रशासन मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा कसा करणार असा प्रश्न विचारला जात आहे. दिवसाआड पाणी देण्यास हरकत नाही, मात्र जे पाणी दिले जाते ते पुरेशा दाबाने देण्यात यावे, अशी मागणी मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा शहराला वर्षभर पुरावा, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून याची अंमलबजावणी सुरू आहे. दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा हा सर्व भागांना समान पद्धतीने केला जात असून, याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत, असा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत‌ आहे. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नसल्याचे प्रशासन म्हणत असले, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठेत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

जुन्या पाइपलाइनमुळे समस्या

मध्यवर्ती भागात पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे नारायण पेठेतील नगरसेविका मुक्ता टिळक यांनी सांगितले. कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येतात. पाणीपुरवठा विभागाकडेही यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने कोणताही उपयोग होत नाही. मध्यवर्ती पेठांमधील जुन्या पाइपलाइन अत्यंत जीर्ण झाल्याने त्यामध्ये दोष निर्माण होतो. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची लाइन तुंबण्याचे प्रकारही घडतात. मध्यवर्ती भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने बोअरवेलची दुरूस्ती तातडीने करण्याची गरज आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीए विमानतळामुळे बांधकामांवर येणार निर्बंध

$
0
0

Dhananjay.jadhav@timesgroup.com

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) हद्दीपासून वीस किलोमीटर हवाई अंतराच्या त्रिज्येतील बांधकामांच्या उंचीवर निर्बंध घालण्यासंदर्भातील नोटिफिकेशन संरक्षण खात्याकडून जारी करण्यात आले आहे. या नोटिफिकेशनमुळे केवळ एनडीएलगतची गावेच नव्हे तर संपूर्ण पुणे शहर, पिंपरी-चिंचवडचा काही भाग, ग्रामीण भागांतील काही गावांवरील बांधकामांवर निर्बंध येणार आहे.

त्याचबरोबर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत या नोटिफिकेशनमधील अंतरामध्ये कोणतेही नवे बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी एनडीएची 'ना हरकत' घेण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. या नोटिफिकेशनमुळे लोहगाव विमानतळ, तसेच देहू दारूगोळा फॅक्टरीलगतच्या रोडझोनप्रमाणेच बांधकामांना अडचणी येणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण खात्याने घातलेल्या या निर्बंधांना जिल्हाधिकारी सौरव राव यांना दुजोरा दिला आहे. तसेच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे 'मटा'शी बोलताना सांगितले. या संदर्भात एनडीएचे अधिकारी तसेच महसूल, पालिका, नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. एनडीएपासून वीस किलोमीटरच्या हवाई अंतराच्या त्रिज्येत बांधकामांच्या उंचीवर निर्बंध आल्यास त्याचा परिणाम पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागात होणार आहे. त्यावर सर्वंकष चर्चा करण्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

कॅडेटच्या प्रशिक्षणासाठी शिवणे गावाजवळ छोट्या आकाराचे विमानतळ उभारण्याचे काम एनडीएमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी यापूर्वीची धावपट्टी १५०० मीटर लांब व ३० मीटर रुंद विस्तारण्यात येत आहे.

या विमातळावरील विमानांच्या टेकऑफ व लँडींगसाठी लगतच्या वारजे, शिवणे, अहिरे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, यासह आठ ते दहा गावांच्या परिसरातील बांधकामांच्या उंचीवर निर्बंध व संरक्षण खात्याची ना हरकत घेण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना मागील आठवड्यात देण्यात आले. त्यासंबंधी चर्चा सुरू असताना एनडीएच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण खात्याने जारी केलेले नोटिफिकेशन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. या नोटिफिकेशनमध्ये एनडीएपासून २० किलोमीटर हवाई अंतराच्या त्रिज्येत बांधकामांच्या उंचीवर मर्यादा व ना हरकत घेण्याची अट घालण्यात आली आहे. या नोटिफिकेशनमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह पालिका, पिंपरी-चिंचवड, नगर विकास विभाग, पीएमआरडीएमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय दत्त येणार २५ फेब्रुवारीला बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगून २५ फेब्रुवारीला बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, तुरुंग प्रशानाकडून तारीख निश्चीत केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संजय दत्तच्या शिक्षेतील सुटीच्या दिवसांचा हिशोब लावून जेल प्रशासनाने ही तारीख निश्चित केल्याचे संजयचे वकील अ‍ॅड. हितेश जैन यांनी सांगितले. मात्र, तुरुंग प्रशासनाकडून अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण, संजय दत्त हा फेब्रुवारी अखेरपर्यंत जेलच्या बाहेर पडणार असल्याचे येरवडा जेलचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष सोडून जाऊ नका हो....!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'प्रत्येक राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात सारखेच असून, कधी कोण जात्यात, तर कोण सुपात असते, असा सूचक संदेश देऊन थोडा संयम ठेवलात, तर आगामी काळात आपल्या पक्षाचे भविष्य बदलेल,' अशी आर्जवी साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांना घातली. निवडणुका येतील आणि जातील; पण नागरिकांसाठी केलेले कामच तुमची प्रगती घडवेल, असे सांगून पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करणाऱ्यांनाही त्यांनी चुचकारले.

शहरातील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांची एकत्रित बैठक ठाकरे यांनी सोमवारी घेतली. नेहमी आक्रमक शैलीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणाऱ्या ठाकरे यांनी या वेळी समुपदेशनाच्या स्वरूपात सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या शहरातील सद्यस्थितीबद्दल कोणालाही जबाबदार न धरता, यापुढे अधिक नेटाने काम करीत राहण्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. जाहीर भाषण, सभा-समारंभातून विरोधी पक्षांवर घणाघाती टीका करणाऱ्या ठाकरे यांनी सोमवारी चक्क त्याच पक्षांची उदाहरणे देत, संयम ठेवण्याचे फायदे कार्यकर्त्यांपुढे मांडले. एका-एका वॉर्डातून, प्रभागातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित जणांनाच स्थान देता येणार आहे; पण पदाधिकारी म्हणजे सर्वस्व नाही. तर, कार्यकर्त्यांच्या संघटनावरच पक्ष मोठा होतो, असे पटवून देताना, नाराजीतून कोणीही पक्ष सोडू नका, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. बैठकीला दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, रीटा गुप्ता, आदित्य शिरोडकर, बाबाराजे जाधवराव उपस्थित होते.

पदाधिकारी येणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या अनेक बैठकीत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली आहे. सोमवारच्या बैठकीत त्यांनी या गोष्टींचे ओझरते उल्लेख केले; तसेच आजही पक्षात, पालिकेत काय सुरू आहे, याची कल्पना असल्याचे स्पष्ट केले. सोमवारच्या बैठकीत घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे अनेक पदाधिकारीही विस्मयचकित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉर्निंग वॉक’नंतर बिघडली प्रकृती

$
0
0

पुणे : प्रकृती सुधारण्यासाठी 'मॉर्निंग वॉक'ला जाण्याचा 'सल्ला' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना मानवलेला दिसत नाही. या धमकीवजा सल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यासमवेत प्रतिकात्मक 'मॉर्निंग वॉक' केल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सबनीस यांची प्रकृती सोमवारी सुधारण्याऐवजी बिघडली. सायंकाळच्या नियोजित कार्यक्रमासही ते उपस्थित राहू शकले नाहीत.

सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात वादंग झाले होते. त्यावरून राज्यात डावे आणि उजव्यांची पुन्हा विभागणी होऊन या वादांना खतपाणी मिळाले. त्यातच सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एका कार्यक्रमात सबनीस यांना 'मॉर्निंग वॉक' ला जाण्याचा सल्ला दिला होता. यापूर्वी राज्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे या विचारवंत-कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुनाळेकर यांनी दिलेला सल्ला ही प्रत्यक्षात धमकी असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सबनीस यांना पाठिंबा म्हणून सोमवारी पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत प्रतिकात्मक 'मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. स्वतः सबनीसही त्यामध्ये सहभागी झाले होते. 'हा एक अज्ञात लोकांचा कट असून दाभोलकर-पानसरे यांच्या वाटेनेच मला नेण्याच्या या कटाची चौकशी व्हावी,' अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

मात्र, सबनीस यांना दिलेला मॉर्निंग वॉकचा सल्ला हा तब्येत चांगली राहवी, यासाठी दिल्याचे स्पष्टीकरण पुनाळेकर यांनी दिले होते; पण प्रत्यक्षात मॉर्निंग वॉक केल्यानंतर सबनीस यांची तब्यात सुधारण्याऐवजी बिघडली. सायंकाळी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांच्या सत्काराच्या नियोजित कार्यक्रमासही ते हजर राहू शकले नाहीत. 'प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत,' असे संयोजकांनीच जाहीर केले. राज्यात उभ्या राहिलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकाराची साहित्य वर्तुळात चर्चा सुरू होती.

संमेलन रद्द करा : वाघ

संमेलनाच्या वादात ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी उडी घेतली आहे. संमेलन विनाअध्यक्ष घेण्यात यावे किंवा संमेलन रद्द करण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सातत्याने सारखे बोलत राहिल्यामुळे थोडाफार त्रास होत आहे. पण ते फारसे गंभीर नाही. मला मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे, पण संमेलन जवळ येत असल्याने आता मी त्यासाठी सज्ज होत आहे'

- डॉ. श्रीपाल सबनीस, नियोजित संमेलनाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात दरीपुलाखाली आढळला मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जांभुळवाडी येथील दरीपुलाखाली झाडांमध्ये एका महिलेचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आला. या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी टाकून दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहयक पोलिस निरीक्षक विष्णू सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी येथील दरीपुलाखाली कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत तीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने वार करून या महिलेचा खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी झाडांमध्ये टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाच्या डोक्‍यावर गंभीर जखम आहे. सुमारे दहा-पंधरा दिवसापूर्वी खून करून हा मृतदेह येथे आणून ठेवला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खुनाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. शिंदे यांनी सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथकाच्या मारहाणीनंतर सात जण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

येरवडा परिसरात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत सात जणांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल माजविणे, अशा कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच परिसरातील बेकायदा होर्डिंगवरही कारवाई करण्यात आली आहे.

लालू हसन शेख (वय ५५), मौला हसन शेख (वय ५०), इरफान लालू शेख (वय २८), फिरोझ लालू शेख (वय २५), रियाझ लालू शेख (वय २३), इम्रान मौला शेख (वय २९) आणि वसीम मौला शेख (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण येरवड्यातील मदर तेरेसा नगर येथे राहतात. यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

लालू शेख हा सिद्रा हॉटेलचा मालक असून, मौला हा भाऊ तर इम्रान हा पुतण्या आहे. येरवड्यातील गुंजन चौकात विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लालू शेख याने 'सिद्रा चायनीज व फास्टफूड' अनधिकृत हॉटेल उभारले होते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी पर्णकुटी चौकापासूनच रस्त्यावरील पथारीवाले, टपऱ्यांवर कारवाईस सुरुवात झाली. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. शेख यांच्या हॉटेलसमोरील पान टपरीवर कारवाई सुरू होताच हॉटेल मालक लालू शेख, भाऊ मौला, पुतण्या इम्रान आणि दहा ते बारा तरुणांनी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

या तरुणांना दरडावून हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी करताच, हॉटेलच्या आवारात पडलेल्या सिमेंटच्या विटा, बियरच्या बाटल्यांचा वापर करून दगडफेक आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. लालू शेख याने माधव जगताप यांच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने रक्त वाहू लागले. त्यानंतरही, माधव जगताप यांचा पाठलाग करून त्यांना विटा आणि बाटल्या फेकून मारण्यात आल्या. या दरम्यान काहींनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अतिक्रमण पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे करून संरक्षण दिल्याने अनर्थ टळला. या मारहाणीत अतिक्रमणचे पोलिस उपनिरीक्षक आजिनाथ सल्गर यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे समजताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस उपयुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले. तसेच, हॉटेलच्या आवारात बेकायदेशीरपणे उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात आली.

कारवाईसाठी पालिकेची टाळाटाळ

गुंजन चौकाच्या रस्त्याच्या कडेला उभारलेल्या चायनीज हॉटेलची जागा अतिक्रमण मुक्त करावी ,बेकायदेशीर होर्डिंग काढून टाकावे, याबाबत लालू शेख याला पालिकेने वारंवार नोटीस बजाविली होती. परंतु, नोटीस बजावण्यापलीकडे कारवाई करण्यास पालिकेनेच टाळाटाळ केली. परिणामी, हॉटेलच्या अनधिकृत शेड वाढतच गेल्या. येरवडा परिसरात अजूनही अनेक ठिकाणी अतिक्रमणे असून, त्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू राहणार

येरवडा येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी गेलेल्या उपायुक्तांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुढील दहा दिवस पोलिस बंदोबस्त घेऊन शहरातील विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निश्चय पालिका प्रशासनाने केला आहे. स्थानिक पोलिस स्टेशनची मदत घेऊन अतिक्रमणविरोधी कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे, अनधिकृत हॉटेल, फूटपाथवरील स्टॉल यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत बांधकामे, स्टॉलवर कारवाई करण्यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. येरवडा भागातील पर्णकुटी चौकात अतिक्रमण कारवाई सुरू असताना काही नागरिकांना या पथकावर दगडफेक करून अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनाल मारहाण केली. यामध्ये जगताप यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली‌ आहे.

अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. या घटनेमुळे पुढील काही दिवस पुरेसा पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई अधिक कठोरपणे करण्याचा निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण कारवाई करण्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पालिकेने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे केली आहे. पोलिस आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत बंदोबस्त देण्याची तयारी दाखविल्याने ही अतिक्रमण कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या बजेटला चर्चेसाठी चारच दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या परदेश दौऱ्यामुळे आयुक्तांचे बजेट स्थायी समितीसमोर सादर करण्यासाठी दहा दिवस उशीर होणार आहे. ३१ जानेवारीपूर्वी आयुक्तांच्या बजेटला मान्यता देण्याचे बंधन स्थायी समितीवर असल्याने आयुक्तांच्या बजेटवर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीला अवघे चार दिवस मिळणार आहे. आयुक्तांच्या बजेटला स्थायीने ३१ जानेवारीपूर्वी मान्यता द्यावी, असा ठराव मुख्य सभेनेच मान्य केल्याने स्थायीला चार दिवसामध्ये तारेवरच‌ी कसरत करून बजेटला मान्यता द्यावी लागणार आहे.

महापालिका आयुक्तांनी चालू वर्षाचे बजेट तयार करताना त्याची माहिती १५ जानेवारीपूर्वी स्थायी समितीसमोर ठेवावी. आयुक्तांनी ठेवलेल्या बजेटवर १५ दिवस चर्चा करून स्थायी समितीने १ फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय घेणे बंधनकारक आहे. स्थायी समितीने अभ्यास करुन तयार केलेल्या बजेटच्या प्रती आयुक्तांनी ११ फेब्रुवारीपूर्वी सभासदांना देणे बंधनकारक आहे. पालिकेच्या मुख्य सभेने चार ऑक्टोबर १९८३ मध्ये याबाबतचा ठराव करून या सर्व कालावधीला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेने केलेल्या ठरावानुसार गेले अनेक वर्षापासून या कालावधीत बजेट तयार करून त्याला मंजुरी घेतली जाते.

जपान सरकारने पालिका आयुक्तांना जपानच्या भेटीसाठी निमंत्रण दिले आहे. १६ ते २४ जानेवारी या काळात पालिका आयुक्त जपान दौऱ्यावर जाणार असल्याने पालिकेचे बजेट १५ जानेवारीपर्यंत सादर करता येणार नसल्याचे पालिका आयुक्त कुमार यांनी नगरसचिव कार्यालयाला कळविले आहे. या दौऱ्यावरून आल्यानंतर २४ जानेवारीनंतर स्थायी समितीला बजेट सादर केले जाइल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २४ तारखेनंतर कुमार यांनी स्थायी समितीसमोर बजेट सादर केल्यास ते समजावून घेऊन त्याचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यासाठी समितीला केवळ चार दिवस उपलब्ध होणार आहे. तारेवरची कसरत करून समितीला हे काम करावे लागणार आहे.

मुदतवाढीसाठी मुख्य सभेकडे?

पालिका आयुक्तांनी दहा दिवस उशीरा स्थायी समितीसमोर बजेट सादर करण्याचा निर्णय घेतल्याने समितीला त्यावर निर्णय घेण्यासाठी चार दिवस मिळणार आहे. समितीला प्रशासनाने तयार केलेल्या बजेटचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी अधिक मुदत घ्यायची असल्यास मुख्य सभेमध्ये हा प्रस्ताव मांडून त्याला मंजुरी घ्यावी लागेल. बजेट कधी सादर करावे, याचा ठराव पालिकेच्या मुख्य सभेतच झाल्याने मुदतवाढीसाठी मुख्य सभेकडेच जावे लागणार असल्याचे नगरसचिव विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images