Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्यावरणप्रेमी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हेमा साने

$
0
0

पुणे : किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी रोजी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन होणार आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. हेमा साने भूषवणार आहेत.

महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी ही माहिती दिली. मसापच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, एसपी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ या वेळी उपस्थित होते. यंदा या संमेलनाचे चौथे वर्ष आहे. डॉ. साने यांच्या मुलाखतीसह 'कार्बन फूट प्रिंट' याविषयी डॉ. सुनील कुलकर्णी यांचे व्याख्यान, 'शिवाजी महाराजांची पर्यावणनीती' या विषयार डॉ. अमर आडके यांचे व्याख्यान, 'पर्यावरण आणि कुशल नगरी' या विषयावर ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांचे व्याख्यान होणार आहे. 'विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. एसपी कॉलेज सध्या शताब्दी वर्ष साजरे करत असल्यानिमित्त या संमेलनाशी जोडले जात आहे. क्लीन कॅम्पस, ग्रीन कॅम्पस, डिजिटल कॅम्पस अशा अशा योजना कॉलेजमध्ये राबवल्या जात आहेत,' असे डॉ. शेठ यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मसाप’च्या मतदार यादीत दिवंगतही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक चर्चेत आली असतानाच मतदार यादीत दिवंगत झालेल्यांनाही स्थान देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निधन झालेल्या मोहन धारिया, बिंदूमाधव जोशी, हिमानी सावरकर अशांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. परिषदेच्याच सदस्याने या यादीबाबत आक्षेप घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपून मार्चमध्ये नवी कार्यकारिणी अस्तित्त्वात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठीची मतदार यादी जाहीर झाली. तेरा विभागातून ११ हजार २७७ आजीव सभासद मतदार असतील, अशी माहिती दिली होती.

मतदार यादीतील घोळ समोर आल्यावर परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी आक्षेप नोंदवला आहे. वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तरीही, या यादीत धारियांचा समावेश मतदार म्हणून करण्यात आला आहे. त्याशिवाय ज्येष्ठ क्रीडा समालोचक बाळ पंडित, ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी, हिंदू महासभेच्या

हिमानी सावरकर, पीडीएचे शशिकांत कुलकर्णी, इंद्रायणी प्रकाशनचे श्याम कोपर्डेकर, रंगकर्मी राजस साठे, लेखक जयंत बेंद्रे, ज्ञानेश्वर भणगे आदी निधन झालेल्या मान्यवरांचा या यादीत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन विज्ञानाचे होणार दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , पुणे
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे 'प्राचीन विज्ञान व तंत्रज्ञान : सिंहावलोकन आणि आकांक्षा' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नऊ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या परिषदेच्या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण विज्ञानप्रदर्शन आयोजन करण्यात आले. प्राचीन शास्त्रीय संकल्पनांवर आधारित व यशस्वी ठरलेले सुमारे शंभर प्रयोग या प्रदर्शनात मांडले जाणार आहेत.

पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर, डीआरडीओचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सतीशकुमार, इस्टाचे संचालक प्रा. डी. बालसुब्रह्मण्यम, 'डीआरडीओ'च्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मनीष भारद्वाज आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर आदी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

त्याबरोबर देश-विदेशातून एकूण ३०० संशोधक या परिषदेला उपस्थित राहणार असून शंभर रिसर्च पेपरचे सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. उपकुलगुरू डॉ. जयश्री साठे, प्रज्ञा विकास शिक्षण संस्थेचे सतिश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

प्राचीन भारतीय शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा उगम आणि विकास यासंबंधीच्या पुरातत्त्वीय व प्राचीन ग्रंथांमधील पुराव्यांचा उहापोह करणे, हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पर्यावरण, प्रदूषण, कृषिविज्ञान, आरोग्य, औषध निर्माण, जैविकशास्त्र, प्राचीन गणित, प्राचीन जलव्यवस्थापन या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. या आयोजनात सोळा संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच, प्राचीन विज्ञान पद्धतीचा अवलंब आताच्या काळात दक्षिण आशियात कशाप्रकारे करणे शक्य आहे, याबाबत विचारमंथन केले जाणार आहे. परिषदेचा समारोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहितीही डॉ. शिंदे यांनी या वेळी दिली.


प्राचीन प्रयोगांचे दर्शन

प्राचीन शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बॅटरीसेल, पायथागोरस सिद्धांताशी जुळणारी, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ‍ काढण्यासाठी शुल्बसूत्रांची प्राचीन पद्धती, प्राचीन संकल्पनांवर आधारित कमी खर्चात तयार केलेले पाणी शुद्धीकरण यंत्र, तसेच शेती विषयक उत्पादने या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्राचीन सौंदर्य प्रसाधने व उपचार याचे सादरीकरण येथे केले जाणार आहे. हे प्रदर्शन परिषद काळात सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलादाचे उत्पादन सर्वप्रथम विदर्भात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जगात स्टीलची (पोलाद) निर्मिती साडेतीन हजार वर्षांपूर्वी विदर्भात झाली असल्याचे संशोधन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने केले आहे. डेक्कन कॉलेजतर्फे विदर्भात सुरू असलेल्या उत्खननात साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या स्टीलच्या वस्तू आढळून आल्या आहेत.

कोरियामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी स्टीलची निर्मिती झाली असल्याचे यापूर्वी संशोधनातून समोर आले होते. स्टील बनविण्याचे तंत्रज्ञान तेथे विकसित होऊन, कालांतराने त्याचा प्रसार झाला, असा अंदाज त्यानुसार वर्तवला जात होता. मात्र, डेक्कन कॉलेजच्या संशोधकांना विदर्भात उत्खननादरम्यान सापडलेल्या वस्तुंमध्ये स्टीलच्या वस्तू सापडल्या आहेत. त्या इसवी सन पूर्व १५०० ते २००० या काळातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टीलची निर्मिची साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाली असल्याचे निदर्शनास येते, अशी माहिती कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.

माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पुन्हा जन्म मिळतो, अशी एक दंतकथा अस्तित्वात होती. त्यामुळे त्या माणसाचा पुर्नजन्म झाल्यानंतर त्याच्या गरजेसाठी विविध प्रकारचे साहित्य, लोखंडी हत्यारे दफनविधी करताना मयतासोबत पुरली जात होती. त्यामुळे उत्खनन करताना अनेक ठिकाणी, अशा विविध प्रकारच्या वस्तू आढळतात. त्यातूनच या स्टीलच्या वस्तू सापडल्या आहेत. प्राचीन शास्त्र व तंत्रज्ञानाचे जतन करून ते विकसित केल्यास, पुरातन काळातील अनेक गोष्टींचे संदर्भ मिळू शकतात. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी) मधील प्रा. प्रवीण देशपांडे हे या विषयी अधिक संशोधन करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’ चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या देशातील मातब्बर संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर सहा महिन्यांपासून असलेला राडारोडा हलवण्यात आला आहे. तसेच 'गजेंद्र चौहान गो बॅक', 'वी आर ऑन स्ट्राइक' अशा घोषणांनी रंगवलेल्या प्रवेशद्वाराची रंगरंगोटी करण्यात आली असून आवारातील भिंती स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 'एफटीआयआय काळवंडलेलीच' हे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत संस्थेत आता 'स्वच्छता अभियाना'ला सुरुवात झाली आहे.

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला होता. दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला आणि वर्ग सुरू झाले. दरम्यान, संप काळात कलात्मक अभिव्यक्तीतून विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकार अवलंबले. 'गजेंद्र चौहान गो बॅक' अशा स्वरूपाच्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या भिंती रंगवल्या. तर प्रवेशद्वाराच्या कमानीवरही विविध घोषणा लिहिण्यात आला होत्या. प्रवेशद्वारासमोरील राडारोडा अधिक लक्ष वेधून घेत होता व तीच एफटीआयआयची ओळख होऊ लागली होती. विद्यार्थ्यांच्या संपाचे चार महिने व नंतरचे दोन महिने असे सहा महिन्यापांसून एफटीआयआयचे चित्र हेच होते.

आंदोलन मागे घेतले की स्वच्छता करू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले होते, मात्र चार महिन्यांचा संप संपून दोन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांकडून याबाबतीत प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच या काळात संस्थेकडूनही कोणत्या हालचाली झाल्या नाहीत. 'मटा'तील वृत्ताने एफटीआयआयवर प्रकाश पडल्याने प्रशासन जोरात कामाला लागले. अखेर एफटीआयआयमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून ही मोहीम राबवली जात आहे. प्रवेशद्वारासमोर असलेला पुतळा, खुर्ची, फलक असा राडारोडा हलवून ही जागा स्वच्छ करण्यात आली आहे. विविध घोषणांनी रंगवलेल्या कमानीला रंगरंगोटी करून ती पूर्वीसारखी करण्यात आली आहे. आतील भिंतींवर तसेच रस्त्यावर काही प्रमाणात मजकूर असून ते स्वच्छ करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककला केंद्राला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लालफितीच्या कारभारातून लोककला प्रशिक्षण, संशोधन आणि कल्याण केंद्राची सुटका होण्याची चिन्हे आहेत. मॅनेजमेंट कौन्सिलने मान्यता दिल्यानंतरही दोन वर्षे रखडलेले हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाला मुहूर्त मिळाला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून लोककलाविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने २०१४मध्ये या केंद्राच्या स्थापनेस मान्यता दिली होती. २०१५च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठातील लालफितीच्या कारभारात केंद्राची अंमलबजावणी रखडली होती. आता विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षात हे केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. ललित कला केंद्रातील नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण भोळे यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात असलेल्या लोककला अकादमीच्या धर्तीवरच या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये लोककलांचे प्रशिक्षण देण्यात येते. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमासह संशोधन, लोककलावंतांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत. विद्यापीठ स्तरावर लोकलला विषयक अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसरेच विद्यापीठ आहे.

डॉ. भोळे यांनी या केंद्राविषयी 'मटा'ला माहिती दिली. 'मागील वर्षी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने हे केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली होती. मात्र, आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या लोककलाविषयक अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे,' असे त्यांनी सांगितले. केंद्राच्या माध्यमातून विविध लोककलांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे लोप पावणाऱ्या लोककला आणि कलावंतांना नवसंजीवनी मिळू शकणार आहे.

कलावंतांसाठी ओपीडी

तमाशा कलाकार जत्रांसाठी विविध ठिकाणी आपले फड लावतात. त्यासाठी त्यांची फिरती सुरू असते. तमाशा कलावंतांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने त्यांच्यासाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. तसेच या कलाकारांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी डोअरस्टेप स्कूलही सुरू केले जाणार आहे. या शाळांच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एका केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. त्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी विभागच मागतात रेशनकार्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्डांचा वापर करू नये, असे खुद्द सरकारनेच वारंवार स्पष्ट केल्यानंतरही अनेक सरकारी आणि निमसरकारी विभागांमधूनच निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्डांची मागणी होत आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभाग हैराण झाला असून, रहिवासाचा निर्णायक पुरावा म्हणून रेशनकार्ड ग्राह्य धरू नये, असे विभागाने पुन्हा नव्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

रेशनकार्डांचा वापर शिधावस्तूंसाठी केला जातो. मात्र, विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांत निवासी पुरावा म्हणून रेशनकार्डांची मागणी केली जाते. दूरध्वनी जोडणी, घरगुती गॅस जोडणी, बँकेत खाते उघडणे, पॅनकार्ड काढणे, पासपोर्ट मिळविणे, वाहन चालविण्याचा परवाना, रुग्णालयात दाखल करणे, शाळा, महाविद्यालयांत प्रवेश अशा अनेक कारणांसाठी अर्जदारांकडून रेशनकार्डांची मागणी करण्यात येते. प्रत्यक्षात पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड देताना केवळ अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर राहतो की नाही, एवढीच जुजबी चौकशी केली जाते. रेशनकार्डांचा वापर हा निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, अशा सूचना सरकारने पाच जून २०१० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिल्या आहेत. तसा उल्लेख रेशनकार्डांवरही केलेला आहे. मात्र, अजूनही बऱ्याच कार्यालयांकडून निवासाच्या पुराव्यासाठी रेशनकार्डांचीच मागणी केली जात असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशहितासाठी प्रयत्न करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक पातळीवर यापूर्वी कधीही मिळत नव्हते, एवढे महत्त्वाचे स्थान सध्या भारताला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाची कामगिरी उंचावण्यासाठी युवा पिढीने स्वार्थी आणि अल्पसंतुष्ट होण्यापेक्षा देशहिताच्या दीर्घकालीन धोरणांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत 'इन्फोसिस'चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी मंगळवारी व्यक्त केले. देशाला असे स्थान पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याने, ही संधी दवडू नका असा सल्लाही त्यांनी दिला.

भारती विद्यापीठाच्या १७व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी विद्यापीठाच्या कात्रज परिसरातील कँपसमध्ये आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये मूर्ती यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विद्यापीठातर्फे मानद डी. एस्सी पदवीने गौरविण्यात आले. या वेळी विद्यापीठाने पाच हजार ९०५ विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित पदव्या बहाल केल्या. तसेच, मान्यवरांच्या हस्ते ७७ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने, तर ३० विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मूर्ती बोलत होते. डॉ. माशेलकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, डॉ. कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मूर्ती म्हणाले, 'देश एकीकडे प्रगतीपथावर असताना दुसरीकडे दारिद्र्य, निरक्षरता, कुपोषण अशा समस्यांनी घेरलेला भारतही आपण अनुभवत आहोत. सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते. मूलभूत आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत देशामध्ये दयनीय परिस्थिती आहे. वयाच्या विशीमध्ये अत्यंत हुशार, आदर्शवादी आणि आत्मविश्वासाने भारावलेल्या तरुणांना वयाच्या चाळीशीमध्ये खचलेले, दिशा हरवलेले, स्वतःपुरते मर्यादीत ठेवणारे आणि दुःखी बनवणारीरचना आपल्याकडे अस्तित्त्वात आहे, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदलण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे.' 'गांधीजींच्या स्वप्नामध्ये अपेक्षित असलेल्या प्रगतीशील देशाची उभारणी होण्यासाठी आदर्शवाद, आत्मविश्वास, आशा, ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले नागरिक महत्त्वाचे आहेत.

त्यासाठी युवा पिढीने मोठी मेहनत करण्याची गरज. आम्ही विद्यार्थी असताना तशी संधी आमच्यापुढे नव्हती, जी सध्याच्या पिढीसमोर आहे. त्यामुळेच आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही जाणीव आपल्यामध्ये जागृत व्हायला हवी. गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवे आणि त्या आधारे ज्या संधी आपल्यासमोर येतील, त्यात झोकून देऊन काम करायला हवे. यशस्वी होण्यासाठीची शिस्त अंगी बाणवायला हवी. वैयक्तिक स्वार्थांच्या पलिकडे जात देशहिताचा विचार करायला हवा,' असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले. डॉ. माशेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

'मोठ्ठे व्हा, नारायण मूर्ती व्हा'

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. माशेलकर यांनी आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. डॉ. माशेलकर परदेशातून भारतात परतल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने आशीर्वाद देताना 'मोठ्ठा हो, जयंत नारळीकर हो,' असे सांगितले होते. हा संदर्भ घेत त्यांनी उपस्थितांना नारायण मूर्ती यांचे कार्य विचारात घेता, 'तुम्ही सर्वांनी असेच मोठ्ठे व्हा, नारायण मूर्ती व्हा,' असा आशीर्वाद आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात २८ हजार शौचालये उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरामध्ये अजूनही शौचालयांची संख्या अपुरी असल्यामुळे अनेक नागरिकांना उघड्यावरच शौचास जावे लागते. केवळ पुणेच नाही, तर देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हीच परिस्थिती असल्याने हे चित्र बदलण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला असून, वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून पुणे शहरात तब्बल २८ हजार शौचालये उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय, काही सार्वजनिक आणि कम्युनिटी शौचालयांची डागडुजी केली जाणार आहे.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातूनच ही माहिती समोर आली असून, मार्चअखेरपर्यंत सहा हजार शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत हे काम केले जाणार असून, शहराच्या काही भागांत हे काम सुरू झाले असून, काही भागांमध्ये अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. २८ हजार शौचालये उभारण्यासाठीच्या संपूर्ण प्रकल्पासाठी ६२ कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये, सर्वाधिक ३५ टक्के वाटा (२२ कोटी रुपये) राज्य सरकार उचलणार असून, केंद्र सरकार आणि वैयक्तिक लाभार्थ्यांचा हिस्सा अनुक्रमे २० टक्के (प्रत्येकी १२ आणि १३ कोटी रुपये) असेल. उर्वरित २५ टक्के निधी (१७ कोटी रुपये) महापालिकेला उभारावे लागणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यासाठीचा निधी पालिकेने उपलब्ध करून दिला असून, प्राधान्याने कोणत्या भागांमध्ये आधी शौचालये उभारणे गरजेचे आहे, यानुसार नियोजन केले जात आहे. मार्च अखेरपर्यंत ६ हजार शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असून, त्यातील काही शौचालयांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती घनकचरा विभागातर्फे देण्यात आली. यंदा शौचालयांसाठी पालिकेला सुमारे पाच कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षांपासून प्रयत्न केले जात असून, आतापर्यंत सुमारे पंधराशे शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारताना संबंधित भागांतील ड्रेनेजलाइनवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अशा भागांतील ड्रेनेज यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून, कम्युनिटी शौचालयांची देखभाल आणि निगा राखण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. वैयक्तिक शौचालये उभारल्या जाणाऱ्या भागांमध्ये आधीच ड्रेनेजलाइन मोठे करण्याचे काम केले जाणार आहे. तसेच, केवळ शौचालय उभारण्यासाठीच नाही, तर ते संबंधित परिसरातील ड्रेनेजलाइनला जोडण्यासाठीचा खर्च 'सीएसआर'मधून करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. त्याशिवाय, सर्व शौचालयांचे जीपीएस मॅपिंगही करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. नागरिकांच्या सहकार्यातून पालिकेने शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले, तर 'सुंदर पुणे, स्वच्छ पुणे' याला अर्थ प्राप्त होईल.

पुढील महिनाअखेरीस कामास सुरुवात

शौचालय उभारणीचे निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, पुढील महिनाअखेरीस प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. येरवडा भागात किमान अडीचशे वैयक्तिक शौचालय उभारणी केले जातील अशी माहिती गागरे यांनी दिली. तसेच, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने अद्याप शौचालाय उभारणीच्या निविदा प्रसिद्ध केली नसल्याचे सहायक आयुक्त वसंत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-बुक’ व्यवहार मर्यादित

$
0
0

Chinmay.Patankar@timesgroup.com

पुणे : जागतिक स्तरावर साहित्याच्या प्रमोशनसाठी विविध प्रयोग केले जात असताना मराठी साहित्य व्यवहारात तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर होत नसल्याचे चित्र आहे. ई बुकला मिळणारा प्रतिसाद अद्यापही कमी असून, एखादा अपवाद वगळता मराठी प्रकाशक-पुस्तकांची स्मार्टफोनवर अॅप्लिकेशनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावण्यात मर्यादा येत आहेत.

गेल्या काही वर्षांत साहित्य क्षेत्रात डिजिटल माध्यमांचाही शिरकाव झाला आहे. ब्लॉगलेखनासह ई बुक निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. मात्र, मराठी साहित्य व्यवहारात ई बुकचा व्यवहार अद्यापही मर्यादित स्वरूपातच आहे. काही मोजकेच प्रकाशक मुद्रित पुस्तकांसह ई बुकचीही निर्मिती करतात. तसेच ई बुक उपलब्ध असलेल्या वेबसाइटची संख्याही मर्यादित आहे. मेहता पब्लिशिंग हाउस, डेलीहंट, बुक हंगामा डॉट कॉम, बुकगंगा डॉट कॉम अशा मोजक्याच ठिकाणी मराठी ई बुक उपलब्ध आहेत. ई बुक म्हणजे पीडीएफ हाच अनेकांचा समज आहे. मात्र, ई बुक ही पूर्णतः वेगळी संकल्पना आहे.

'ई बुकच्या प्रमोशनसाठी प्रकाशकांनी एकत्र येऊन काहीतरी प्रयत्न करायला हवेत. वाचकांना ई बुकची सवय लावावी लागेल. त्यामुळे मुद्रित पुस्तक करताना ई बुकचाही प्राधान्याने विचार करायला हवा. मुद्रित पुस्तकापेक्षा ई बुक करणे अधिक किफायतशीर आहे. कॉपीराइटमुक्त झालेल्या इंग्रजी लेखकांची असंख्य पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. मात्र, उत्तम आशयविषय असूनही मराठी लेखकांच्या बाबतीत हे होत नाही. मराठी प्रकाशकांची स्मार्टफोन अॅप्लिकेशन येण्यासाठी अजून वर्षभर तरी जाईल,' असे सुनील मेहता त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्य व्यवहारात मुद्रित पुस्तकाबाबतचा रोमँटिसिझम अजूनही कायम असल्याने ई बुक पूर्णपणे रुजण्यासाठी अजून किमान पाच वर्षे जावी लागतील, असे मत बुकहंगामा डॉट कॉमचे विक्रम भागवत यांनी व्यक्त केले. 'बुकहंगामाला अल्पावधीत उत्तम प्रतिसाद लाभला आहे. गेल्या वर्षभरात वेबसाइटचे तीन हजाराहून अधिक सदस्य झाले आहेत.

आतापर्यंत दोनशे ई बुक केली असून, अजून एक हजार पुस्तके करण्याचे काम सुरू आहे. ई बुकच्या प्रक्रियेत वाचकांना सामावून घेतले पाहिजे. ई बुक आणि पुस्तक यांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, प्रकाशक आणि वाचक दोघांच्याही दृष्टीने ई बुक अधिक सोयीचे आहे. मात्र, स्मार्टफोन अॅप्लिकेशन, ई बुक ही बदलत्या काळाची गरज आहे. प्रकाशकांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम झालेच पाहिजे,' असेही त्यांनी सांगितले.

मराठीत ई बुकचे प्रमाण अजूनही कमीच आहे. प्रत्येक पुस्तकाचे ई बुक केले जात नाही, अनेक प्रकाशकांच्या वेबसाइटही नाहीत. ई बुक पुरवणाऱ्या संस्थाही कमी आहेत. मराठी ई बुकची उलाढाल दोन कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. मराठी पुस्तकांची क्षमता या पेक्षा जास्त व्यवसाय करण्याची आहे. मात्र, ई बुक करण्यासाठी प्रकाशकच पुरेसे प्रयत्नशील नाहीत.

- सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग हाउस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीकडून दुरुस्तीचा ‘इतिहास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभ्यासक्रमातील धड्याचा अभ्यास परीक्षेपुरता न करता, त्या अनुषंगाने विषयाची सखोल माहिती मिळवल्याने पंढरपूर तालुक्यातील खर्डी या खेड्यातील प्रियांका चंदनशिवे या विद्यार्थिनीने जपानमधील एका वेबसाइटला आपली चूक दुरुस्त करण्यास भाग पाडले.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) पंढरपूर तालुक्यातील पाच गावांत गेल्या अडीच वर्षांपासून 'शिक्षणपंढरी' हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या जोडीने इंटरनेटद्वारे मुक्त शिक्षण स्रोत उपलब्ध करून दिले जातात.

श्री सीताराम महाराज विद्यालयातील प्रियांकाने नववीत असताना, दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याबाबतचा उल्लेख 'जपान न्यूज' नावाच्या वेबसाइटवर वाचला होता. त्यातून प्रेरित होऊन तिने दुसऱ्या महायुद्धाबाबत दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील दोन प्रकरणे वाचून काढली; मात्र त्यातील माहिती आणि 'जपान न्यूज'च्या वेबसाइटवरील उल्लेखात तिला तफावत आढळल्याने तिने इंटरनेटवरून आणखी माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्या काळातील वृत्तपत्रांची कात्रणेही तिने इंटरनेटवरून शोधून काढली. त्यांचा अभ्यास केल्यावर तिला 'जपान न्यूज'च्या माहितीत त्रुटी असल्याचे आढळले.

प्रियांकाने 'जपान न्यूज'ला ई-मेल पाठवून याबाबत कळवले. त्यांनी प्रियांकाला ई-मेल पाठवून त्याचा आधार काय, असे विचारले. त्यावर प्रियांकाने शोधलेली कात्रणे 'जपान न्यूज'ला पाठवली. 'जपान न्यूज'ने त्यावर उत्तर देऊन प्रियांकाची माहिती जवळपास ९५ टक्के अचूक असल्याने आपण लेखात सुधारणा करत असल्याचे कळवले. प्रियांकाच्या कामगिरीची माहिती तिचे शिक्षक प्रसाद संत यांनी 'एमकेसीएल'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांना पत्र लिहून कळवली.

पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन विद्यार्थ्याने ज्ञानग्रहण करावे आणि त्याचा व्यवहारात उपयोग करावा, असे आपल्याला रचनावादी शिक्षणाकडून अपेक्षित आहे. 'शिक्षणपंढरी' उपक्रमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न आहे. प्रियांकाच्या उदाहरणाने त्याला बळ मिळाले आहे.

- डॉ. विवेक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, एमकेसीएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात गंभीर गुन्हे घटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी, सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे, घरफोड्यांच्या गुन्ह्यांत आदल्या वर्षीच्या तुलनेत २०१५मध्ये घट झाली. गंभीर गुन्हे घटले असले, तरी फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. सायबर सेलच्या दुरवस्थेमुळे तक्रार अर्जांचा निपटारा वेळेत होत नाही. शहराच्या आजूबाजूच्या महामार्गांवर बळींची संख्या वाढत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

'गेल्या वर्षी गंभीर गुन्हे घटले असून, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊन ते तीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे घटले आहेत,' अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. गेल्या वर्षी २०१४च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात चोरी, फसवणूक, विश्वासघात आणि महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारने विनयभंगाच्या गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद वाढली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. पोलिस ठाण्यांमध्ये सहा हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंद झाली आहे. या ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात येत असून, अडीच हजार ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. कात्रज-देहूरोड बायपासवर तब्बल ८९ बळी गेले आहेत. गेल्या वर्षी शहराला जोडणारे इतर महामार्ग मिळून दीडशे जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत बळींचा आकडा ३५ने वाढला आहे. गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी इतिहास रचून साडेएकोणीस लाख वाहनचालकांवर कारवाई करून वीस कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्केट यार्ड’चा होणार कायापालट

$
0
0

'मार्केट यार्ड'चा होणार कायापालट

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : फळभाज्यांचे स्वतंत्र मार्केट असावे, यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले गुलटकेडीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गाळे आता धोकादायक ठरत आहेत. पुढील ५० वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेवत मार्केट यार्डातील भुसार वगळता विविध विभागातील गाळे जमीनदोस्त करून मार्केट यार्डाला नवा चेहरा देण्यासाठी आराखडा तयार कऱण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याच्या क्षमतेत आणखी २०० गाळ्यांची क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांचे गुलटेकडी येथे १९७८ पासून टप्प्याटप्प्याने स्थलांतर झाले. १९८० पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाजार सुरू झाला. मार्केट यार्डातील सुमारे २८ एकर जागेतील ११०० पेक्षा अधिक व्यापारी गाळे बांधून सुमारे ४० वर्ष झाली आहेत. मार्केटमधील गाळ्यांचे बांधकामांचे 'स्ट्रक्चरल ऑडीट' केले असता इमारतींचे बांधकाम जुने व धोकादायक झाल्याचे सांगत नव्याने बांधकाम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
मार्केट यार्डातील कांदा बटाटा विभाग, फळभाज्या, फळे, केळी बाजार, पान विभागातील ११०० पेक्षा अधिक गाळ्यांच्या बांधकामांचा पुनर्विकास करण्याचे काम पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने हाती घेतले आहे. मार्केट यार्डातील विविध विभागांतील गाळे टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त करून नव्याने बांधकाम करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. पुढील ५० वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेऊन त्याचे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, पायाभूत सुविधा यावर नेहमीच येणारा ताण दूर करण्यासाठी आराखड्यामध्ये तोडगा सुचविण्यात येत आहे.
शेतीमालाचे तत्काळ वजन करून त्याचा शेतकऱ्याला योग्य मोबादला मिळवून देणारे सॉफ्टवेअर नव्या बाजारात बसविण्याची योजना आहे. शेतमालाच्या विक्रीनंतर तयार करण्यात येणाऱ्या 'पट्टया' ऑनलाइन करण्यात येतील. गाळे जमीनदोस्त केल्यानंतर व्यापारासाठी जनावरांच्या बाजारातील दहा ते बारा एकर जागेत पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. व्यापारासाठी शेड बांधण्याचे नियोजन आहे.
मार्केट यार्डाला आधुनिक चेहरा देण्याचे काम हाती घेताना बाजार आवारातील विविध घटकांच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. पालकमंत्री, पणनमंत्र्यांकडे याबाबत सादरीकरण केले जाईल. यासाठी काही प्रमाणात व्यापारी, शासन आणि बाजार समिती यांच्यामार्फत बांधकामासाठी निधी उपलब्ध केला जाईल. मार्केट यार्डातील फळभाज्यांसह फळांच्या सर्व गाळ्यांचे बांधकाम झाल्यानंतर भुसार विभागातील पुनर्विकासाला हात घालण्यात येईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला सांगितले.
.................
नव्या आराखड्यात आहे काय?
मार्केट यार्डातील गाळ्यांचा पुनर्विकास करताना वाहतुकीचे नियोजन, आधुनिक तंत्रप्रणाली, पार्किंग सुविधा, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत पाइपलाइन, शेतीमालाच्या योग्य वजनासह योग्य मोबादला मिळवून देणारे सॉफ्टवेअर अशा यंत्रणांचा आराखड्यात समावेश केला जात आहे. सोलर इलेक्ट्रिस्टी जनरेशन सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास, बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी व्यापारी निवास यांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी प्रशासकीय मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटला रेकॉर्ड देणे बंधनकारक

$
0
0

पेशंटला रेकॉर्ड देणे बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या काही भागांसह ग्रामीण भागात औषधोपचार करणाऱ्या आयुर्वेद, होमिओपॅथ डॉक्टरांकडून पेशंटना प्रिस्क्रिप्शन, तसेच केस पेपर (रेकॉर्ड) दिले जात नाही. त्यामुळे नेमके कोणते उपचार सुरू आहेत, हे समजत नसल्याने आता केंद्रीय आयुष विभागाने या दोन्ही पॅथीच्या कौन्सिलला पत्राद्वारे आदेश दे‍ऊन पेशंटला 'प्रिस्क्रिप्शन'सह रेकॉर्ड दाखविणे बंधनकारक केले आहे.
श्रेयांश बागडे या तरुणाने माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती उघडकीस आली. ग्रामीण भागात अॅलोपॅथीच्या डॉक्टरांची वानवा असल्याचे दिसते. त्यामुळे औषधोपचारासाठी पेशंट आयुर्वेद, तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे जातात. ग्रामीण भागात आयुर्वेदासह होमिओपॅथचे डॉक्टर औषधांमध्ये स्टिरॉईड्स मिश्रित करून औषधे देतात. त्यामुळे सुरुवातीला पेशंटला बरे वाटू लागते. मात्र, काही दिवसांनी त्याचे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसते. त्या अनुषंगाने माहिती अधिकाराच्या माध्यमातून बागडे यांनी आयुर्वेद, होमिओपॅथीची डॉक्टरांच्या प्रॅक्टिसची पद्धत चव्हाट्यावर आणली. परिणामी पेशंटना डॉक्टर नेमके कोणते उपचार करतात, कोणती औषधे देतात, याविषयी फारसे ज्ञान नसल्याने गोंधळ उडतो, याकडे केंद्रीय आयुष विभागाचे लक्ष वेधले.
आयुष विभागाने माहिती अधिकारातील या पत्राची गंभीर दखल घेतली आहे. पेशंटना त्यांच्या तपासणीचे रेकॉर्ड दाखविणे अथवा देणे हा पेशंटचा हक्क आहे, याकडे आयुर्वेदच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या परिषदेचे केंद्रीय आयुष विभागाने पत्र पाठवून लक्ष वेधले. 'आजारी असल्याने मीसुद्धा आयुर्वेद डॉक्टरांकडून औषधे घेतली होती. त्यात मला फरक पडला नाही. माझ्यावर झालेल्या उपचाराच्या रेकॉर्डची मागणी केली. त्या वेळी रेकॉर्ड देणे बंधनकारक नाही, असे सांगण्यात आले. पुढे उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथे औषधांमध्ये स्टिरॉइड्स वापरल्याचे निदान झाले. त्यामुळे माझी हाडे ठिसूळ झाली. त्यामुळे पुढे हा पत्रव्यवहार केला,' अशी माहिती बागडे यांनी दिली.
'पेशंटला आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर औषधोपचार करताना प्रिस्क्रिप्शन देतात; परंतु पेशंटना रेकॉर्ड अथवा केस पेपर देता येत नाही. पण पेशंटने केस पेपरची मागणी केली, तरी ती त्याला आम्ही देऊ शकतो. हा त्याचा हक्क आहे; परंतु बाह्यरुग्ण विभागातील पेशंटचे रेकॉर्ड एक वर्ष, आंतररुग्ण विभागातील पेशंटचे रेकॉर्ड तीन वर्ष आणि मेडिको लीगल प्रकरणातील रेकॉर्ड दहा वर्षांपर्यंत जपून ठेवण्यात येते. पेशंट उपचारासाठी वारंवार येतो, त्यामुळे त्याची मागील उपचाराची माहिती असावी, यासाठी डॉक्टर केस पेपर स्वतःकडे ठेवतात,' असे 'निमा'चे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. मंदार रानडे यांनी सांगितले.
.................
पेशंटने मागणी केली तर त्याच्या उपचाराचे रेकॉर्ड, तसेच प्रिस्क्रिप्शनही देणे बंधनकारक आहे. या संदर्भात केंद्रीय आयुर्वेद आणि होमिओपॅथ परिषदेने कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
जस्मीन जेम्स, अवर सचिव, केंद्र सरकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टी-स्कूल’ प्रवेशासाठी येत्या रविवारी चाचणी

$
0
0

'टी-स्कूल' प्रवेशासाठी येत्या रविवारी चाचणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अभिनयात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी सुरू केलेल्या टी-स्कूलच्या नव्या तुकडीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीची निवड चाचणी येत्या रविवारी (१० जानेवारी) होत आहे.
रंगमंचावर काम करण्याची इच्छा असलेले १५ वर्षे किंवा त्यावरील उमेदवार टी-स्कूलच्या प्रवेशासाठी नोंदणी करू शकतील. एका तुकडीत केवळ २५ जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. टी-स्कूलचा अभ्यासक्रम तीन महिने कालावधीचा असून, तो सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळात राबवला जातो. येत्या रविवारी होणारी निवड चाचणी स्वतः प्रशांत दामले घेणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी ९८८१७२४३७२ या मोबाइल फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सतरा जानेवारीला पोलिओ मोहीम

$
0
0

सतरा जानेवारीला पोलिओ मोहीम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'दो बूँद जिंदगी के' म्हणत पाच वर्षांच्या बालकांना पोलिओ होऊ नये, यासाठी येत्या १७ जानेवारी आणि २१ फेब्रुवारीला जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे पाच लाख बालकांना 'पोलिओ'चे डोस दिले जाणार आहेत.
या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येते. १९९९ पासून एकही पोलिओचा पेशंट आढळला नाही. त्यामुळेच येत्या १७ जानेवारी आणि २१ फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. पाच वर्षांच्या आतील चार लाख ९६ हजार २३२ बालकांना जिल्ह्यात पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. त्या करिता ग्रामीण शहरी भागात चार हजार ९५ बूथ केंद्रे स्थापन केली आहेत; तसेच मोबाइल बूथ, ट्रान्झिट बूथची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी दिली.
दोन्ही दिवशी पोलिओचे डोस देण्यासाठी आरोग्य खात्याचे सुमारे दहा हजार २१३ कर्मचारी परिश्रम घेणार आहेत; तसेच पोलिओ बूथ केंद्रावर न येणाऱ्या बालकांना थेट घरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. त्या करिता स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकांची जबाबदारी अाता पालकमंत्र्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका हद्दीत स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारने पालकमंत्र्यांवर टाकली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश सरकारने पालिकांना दिले आहे. पालिका आयुक्त या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. महापालिका हद्दीत थोर व्यक्ती, राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, संत, प्रसिद्ध राजकीय व्यक्ती, परमवीर चक्र मिळालेल्या व्यक्तींची स्मारके उभारायची असतील, तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवायचा आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्ह्याचे नगररचनाकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांचा समावेश असणार आहे. समितीने स्मारकाचा प्रस्ताव सादर करून त्याला राज्य सरकाने मंजुरी दिल्यास स्मारकाचे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. स्मारक बांधण्यासाठी सरकार कोणताही निधी देणार नाही. उलट याची देखभाल करण्याची जबाबदारी ही पालिकेवर असेल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. सर्व महापालिकांना हे आदेश पाठविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे घटली मद्य​विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे मद्य पिण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत असतानाच पुण्यात डिसेंबरमधील मद्यविक्री निम्म्याने घटल्याचे आढळून आले आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचा परिणाम मद्यविक्रीवरही झाला असून, दर वर्षी डिसेंबर महिन्यात वाढणारी मद्यविक्री यंदा मात्र घटली आहे. मात्र, कोल्हापूर विभागात मद्यशौकिनांनी डिसेंबर महिन्यात थर्टी फर्स्टसह सुमारे ९२ कोटी ४३ लाख रुपयांची दारू फस्त करून मद्यविक्रीचा उच्चांक केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या मद्यविक्रीचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये सुमारे ७०४ कोटी ७२ लाख रुपयांचे मद्य रिचविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे; पण २०१४ मधील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात सुमारे ३१३ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर असे सहा विभाग आहेत. अन्य पाच विभागांच्या तुलनेत कोल्हापूर विभाग हा मद्यविक्रीत दर वर्षी सर्वांत तळाच्या क्रमांकावर असायचा; पण वाढलेल्या तळीरामांमुळे या विभागाने यंदा तिसऱ्या स्थानावर उचल खाल्ली आहे.

मद्याची विक्री कमालीची घसरली असतानाच कोल्हापूरमध्ये मात्र उलटे चित्र आढळले. या विभागात कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात मद्यावर सुमारे ९२ कोटी ४३ लाख रुपये उधळले गेले. २०१४ मध्ये सुमारे ८१ कोटी ७२ लाख रुपये विक्री झाली होती. हे प्रमाण अन्य पाच विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी होते, असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात १४ कोटी ६९ लाख रुपये आणि साताऱ्यात ४८ कोटी १७ लाख रुपयांच्या मद्याची विक्री झाली. सांगलीत २९ कोटी ५६ लाख रुपये, रत्नागिरीत २१ लाख आणि सिं​धुदूर्गमध्ये १७ लाख रुपयांची विक्री झाली. सरासरी मद्यविक्रीत दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबाद अग्रेसर राहिले असून, पुण्याने दुसरे स्थान कायम राखले आहे. चौथ्या क्रमांकावर नाशिक आणि त्यानंतर अनुक्रमे नागपूर आणि ठाणे विभाग आहे.

पुण्यातील ​मद्यविक्री निम्म्यावर

औरंगाबाद विभाग हा कायम मद्यविक्रीत प्रथम क्रमांकावर असतो. २०१४ च्या डिसेंबर महिन्यातच ३२७ कोटी १२ लाख रुपयांची मद्यविक्री झाली होती. मात्र, यावेळी हे प्रमाण २९१ कोटी ६४ लाख रुपयांवर आले आहे. पुण्यामध्येही हीच स्थिती आहे. २०१४ मध्ये २५२ कोटी ७५ लाख रुपयांची विक्री झाली असताना, यावेळी मात्र हे प्रमाण १२६ कोटी २० लाख रुपयांवर आले आहे. त्यामुळे निम्म्याने मद्यविक्री कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिल्ली पॅटर्न पुण्यातही राबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी दिल्ली प्रमाणेच सम-विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणण्याची योजना राबवावी, अशी मागणी माजी महापौर अंकुश काकडे यांनी केली आहे. दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे वाहतूक सुरळित झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने पुण्यातही प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करावा, अशी मागणी केली जात आहे.

शहरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेनदिवस अत्यंत गंभीर होत चालला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत वाहतुकीसाठी कमी पडत असलेले रस्ते यामुळे वाहनचालकांना सतत वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दिल्लीतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सम-विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणण्याचा प्रयोग एक जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे वाहतूक सुरळित झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या योजनेत काही त्रुटी असल्यास त्रुटी दूर करून प्रायोगिक तत्त्वावर अशा पद्धतीची योजना सुरू करावी, अशी मागणी काकडे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल चोराकडून लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्वी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अद्याप चोरांच्या दृष्टीने सायकलीचे महत्त्व तसेच आहे. सायकलचोरीची तक्रार नागरिक देत नाहीत आणि पोलिसांकडून या गुन्ह्यांना फारसे महत्त्व देण्यात येत नसल्यामुळे लोहियानगर येथील चोरट्याने २६ सायकलींची चोरी केल्याचे समोर आले आहे. या सायकल चोरणाऱ्या व्यक्तीला खडक पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून लाख रुपये किमतीच्या २६ सायकली जप्त केल्या आहेत.

राजू उर्फ पावडर मलय्या कोटा (रा. लोहियानगर) असे या चोरट्याचे नाव आहे. अनिता संतोष गुजराथी (रा. गंज पेठ) यांची सायकल चोरीला गेल्यानंतर त्यांनी राजू याच्यावर संशय व्यक्त केला होता. खडक पोलिस ठाण्याचे हवालदार विजय कांबळे रात्री गस्तीवर असताना राजूने चोरलेल्या सायकली लुल्लानगर मधील ट्रान्झिट कॅम्पमधील खोलीत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून घरावर छापा टाकला.

त्यावेळी पोलिसांना घरात लपवून ठेवलेल्या विविध ब्रँडच्या २६ सायकली सापडल्या. त्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये आहे. ज्या नागरिकांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत, त्यांनी ०२० २४४५२०९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राजूला दारूचे व्यसन आहे. सायकलची चोरी करून झोपडपट्टीत तो पाचशे ते सहाशे रुपयांना विकायचा. त्यातून तो व्यसन भागवत होता. त्याचा एक साथीदार फरारी असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images