Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नेत्यांच्या भरवशावर देश वाढत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नेते आणि सरकार यांच्या भरवशावर देश वाढत नाही, तर समाजाच्या जागृतीने देशाची उन्नती होते. त्यामुळे नेते आणि सरकार चांगले वागायचे असतील, तर समाजाने जागृत व्हायला पाहिजे,' असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी दिला. शिवशक्तीचा संगम करण्याचा नारा देऊन देशाच्या उत्थानासाठी 'आरएसएस' ही एकमेव शक्ती असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

'आरएसएस'च्या ​पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने मारुंजी येथे 'शिवशक्ती संगम' आयोजित करण्यात आला होता. सुमारे दीड लाखांहून अधिक स्वयंसेवकांनी हजेरी लावल्याने या परिसराला विराट सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

शक्तीच्या आधारे समाजाची उन्नती करणे हे संघाचे काम आहे. शिवशक्ती संगम हे त्याचेच दर्शन आहे. आपल्या देशाचा इतिहास पाहिला, तर कोणीतरी बाहेरून येतो आणि आपल्याला गुलाम बनवितो. कारण आपल्या समाजात काही अंगभूत त्रुटी आहेत. त्या काढून हा देश माझा आहे, या दृष्टीने देशाकडे पाहणारा संघटित समाज निर्माण करणे, हा त्यावरील उपाय आहे. डॉ. हेगडेवार यांनी हा विचार त्यावेळी केला होता.

- मोहन भागवत, सरसंघचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर ‘भाजप’मध्ये गटबाजीला उधाण

$
0
0

कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचे वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करून सर्व जागांवर विजय मिळविल्यानंतर वर्षभरातच शहर भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. विविध समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्तींवरून झालेले वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याचे समजते.

काही काळापूर्वी शहर भाजपला गटबाजीने ग्रासले होते. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासह विनोद तावडे यांना मानणाऱ्या गटांमध्ये चढाओढीचे राजकारण सुरू होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यासह पक्षातील वरिष्ठांनीही संघटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि गटबाजीचे उघड प्रदर्शन काही प्रमाणात कमी झाले. त्यानंतरही विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातील गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाले, तरी मोदीलाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उगारलेल्या छडीमुळे निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले नाहीत आणि शहरातील सर्व जागांवर भाजपला विजय मिळाला. त्यानंतरही पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्यासह सर्व नेत्यांनी एकत्रित काम करण्याची जाहीर हमी दिली. मात्र, सत्तेत आल्यानंतर काही काळातच त्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे.

सरकार आल्यानंतर विविध समित्यांवर पदाधिकारी म्हणून कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांत वादांच्या ठिणग्या झडत आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालय संचालन समितीच्या अध्यक्षपदी पूर्वी पालकमंत्र्यांची नियुक्ती होत असे. नव्या राज्य सरकारने त्या पदावर खासदारांची नियुक्ती करण्याचा आदेश काढला. त्यानुसार खासदार शिरोळे यांची त्या पदावर नियुक्ती झाली. परंतु, काही महिने लोटले, तरी अजूनही या समितीची एकही बैठक झालेली नाही. यापूर्वी दोन वेळा निमंत्रणे काढल्यानंतर ऐनवेळी बैठका रद्द झाल्या. त्या काळात समितीचे अध्यक्ष खासदार शिरोळे यांनी ससूनला भेट देऊन पाहणीही केली. या समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीवरून पक्षात राजकारण रंगल्यामुळे समितीची बैठक होऊ शकली नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. रुग्णालयातील विविध विकासकामे, पेशंटना देण्यात येणाऱ्या सुविधा, निधी मिळविणे आणि सरकारकडील कामांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी असलेल्या या समितीच्या बैठकाच होत नसल्याने ही कामे थंडावली आहेत.

ससूनच्या समितीचा नवा आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या खात्याने काढला होता. या समितीमधील त्यांच्या काही समर्थकांच्या नियुक्तीवरूनही वाद असल्याने संपूर्ण समितीची रचना न झाल्याचे सांगण्यात आले. आता नव्या वर्षात तरी ही समिती कार्यरत होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पुन्हा थंडी

$
0
0

आणखी काही दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कडाक्याच्या थंडीनंतर मधल्या काळात काहीसाच उकाडा अनुभवल्यानंतर शहरासह राज्यातही पुन्हा थंडी परतू लागली आहे. जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी झालेली बर्फवृष्टी व उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी परतली आहे. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. राज्यातील सर्वात नीचांकी तापमान अहमदनगर येथे (९.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. नाशिक व पुणे येथे ९.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. नांदेड येथे १०, नागपूर येथे ११.१, गोंदिया येथे १०.१, महाबळेश्वर येथे १४.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुण्यात पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी काहीशी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात पुण्यासह राज्यात तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला होता. उत्तरेकडील राज्यातील घसरलेले तापमान, काही ठिकाणी झालेली बर्फवृष्टी व तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घट झाली होती. काही वेळा सलग तीन चार दिवस तापमान सहा वे आठ अंशांदरम्यान राहून राज्यातील अनेक भागांना हुडहुडी भरली होती. कमाल व किमान दोन्ही तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका दिवसरात्र कायम होता.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र, उत्तरेकडील राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाला. त्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. परिणामी तेथून राज्याकडे उष्ण व कोरडे वारे वाहून राज्यातही तापमानात वाढ झाली. सलग आठवडाभराहून अधिक काळ असेच वातावरण कायम होते. मात्र, आता पुन्हा राज्यात थंडी परतू लागली आहे.

राज्यात थंड आणि कोरडे वारे

सोमवारी जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस झाला. या भागात तापमानात ३ ते ४ अंशांची घट झाली आहे. या शिवाय काही राज्यातही तापमानातही घट झाली आहे. या राज्यांमधून महाराष्ट्राकडे थंड व कोरडे वारे वाहत आहेत. राज्यातही हवामान कोरडे असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनकारखान्यांना दहा टक्के मार्जिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साखर कारखान्यांना रास्त आणि किफायतशीर दर म्हणजे फेअर रेग्युनेटिव्ह प्राइजप्रमाणे (एफआरपी) शेतकऱ्यांसाठी उसाचे बिल देता यावे, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकन किमतीवर १५ टक्क्यांऐवजी दहा टक्के मार्जिन करण्याचा निर्णय घेऊन कारखान्यांसाठी एक हजार ६८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निर्णयाचा फायदा बँकेचे खातेदार असलेल्या १५ साखर कारखान्यांना होणार असून, त्या कारखान्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफआरपी'प्रमाणे उसाचे बील मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बँकेने मंजूर केलेल्या सुमारे एक हजार ६८० कोटी रुपयांपैकी सुमारे ४५३ कोटी रुपये कर्ज कारखान्यांनी उचलले असल्याचे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. साखर कारखान्यांना उत्पादित साखर साठ्याच्या मुल्यांकन किमतीवर १५ टक्के मार्जिक राखून मालतारण कर्जखाती उचल देण्यात येत होती. प्रचलित मुल्यांकनदरानुसार ऊस बिलासाठी जास्तीत जास्त प्रति मेट्रिक टनाला एक हजार २७५ रुपये उपलब्ध होतात. साखर कारखान्यांना 'एफआरपी'प्रमाणे उसाचे बिल शेतकऱ्यांना देता यावे, यासाठी साखरेच्या मूल्यांकन किमतीवर दहा टक्के मार्जिन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्यांना उसाच्या बिलासाठी प्रति मेट्रिक टनाला १२५ रुपये जास्त रक्कम उपलब्ध होणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
लाभ मिळणारे साखर कारखाने
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, ​भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, ​नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर लिमिटेड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, अनुराज साखर कारखाना, व्यंकटेशकृपा शुगर मिल्स, श्री अंबालिका शुगर, अॅस्टोरिया अॅग्रो इंडस्ट्रिज, इंद्रेश्वर साखर कारखाना यांचा समावेश आहे.
विक्रमी पीक कर्ज वितरण
बँकेने गेल्या वर्षभरात विक्रमी एक हजार ६५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण केले असल्याचे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. तसेच बँकेच्या कायम कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण मिळणार असल्याचे थोरात म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास अडीच हजारांची लाच घेताना सोमवारी रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ही कारवाई केली.

संजय शंकर चव्हाण असे अटक केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेने पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला होता. पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीचा अर्ज हडपसर पोलिस ठाण्यात आला. पासपोर्टसाठी सकारात्म अभिप्राय पाठविण्यासाठी पोलिस कर्मचारी चव्हाण याने तक्रारदार महिलेकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यांच्यामध्ये तडजोड होऊन अडीच हजार रुपये देण्याचे महिलेने मान्य केले. मात्र, लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून सोमवारी चव्हाण याला अडीच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेल लिपीतून बातम्यांचे वाचन

$
0
0

पुणे आकाशवाणीच्या इतिहासातील पहिलीच घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आकाशवाणीचे पुणे केंद्र...सकाळी सात दहाच्या बातम्यांच्या उत्तरार्ध... आणि अचानक सादरकर्ता बदलून 'श्रोतेहो नमस्कार, मी धनराज पाटील आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे,' अशी घोषणा झाली...आणि आकाशवाणीच्या मराठी बातम्यांमध्ये इतिहास घडला...कारण हे बातमीपत्र एका दृष्टिहीन मित्राने सादर केले होते.
निमित्त होते, ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे. ब्रेल जयंतीनिमित्त दृष्टिहीन व्यक्तींचे श्राव्य माध्यमांशी असलेले नाते लक्षात घेत आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणीवरील मराठी बातम्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ब्रेल लिपीच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तीने बातम्या सादर केल्या. पुणे केंद्राचे वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर यांनी बातमीपत्राच्या पूर्वार्धाचे वाचन केले. त्यानंतर पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे धनराज पाटील यांनी बातमीपत्राचा उत्तरार्ध सादर केला. यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. उत्तरार्धात सादर होणाऱ्या बातम्या ब्रेल लिपीत लिहिण्यात आल्या होत्या.
'हा माझ्यासाठी तसेच सर्व दृष्टिहीन बांधवांसाठी अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव होता. थोड्या सरावाने मला हे जमू शकले, याचा खूप आनंद आणि समाधान आहे. संधी मिळाल्यास अनेक दृष्टिहीन व्यक्ती बातमीपत्राचे वाचन करू शकतील,' असे पाटील यांनी सांगितले.
'दृष्टिहीन व्यक्तींसाठी ध्वनी हे माध्यम अत्यंत जवळचे व मोलाचे असते. त्याचबरोबर ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही हे सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला. हे बातमीपत्र आमच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे. अवघ्या चार पाच दिवसातील सरावात पाटील यांनी आकाशवाणीवरील बातमीपत्राचे तंत्र व कौशल्य आत्मसात केले. त्यांचे सादरीकरणही उत्तम झाले,' असे वृत्त विभागाचे प्रमुख नितीन केळकर यांनी सांगितले.
'हे बातमीपत्र अद्वितीय, ऐतिहासिक व अभूतपूर्व होते. अत्यंत कमी वेळात पाटील यांनी हे कौशल्य आत्मसात केले. आकाशवाणीसाठी बातम्यांची वेळ पाळणे महत्त्वाचे ठरते. ब्रेल लिपीतील शब्द वाचण्यासाठी काही वेळ जावा लागतो, परंतु, पाटील यांनी वाचन व वेळ ही दोन्ही गणिते उत्तमरित्या सांभाळली,'असे क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवाब मलिकांनाजामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कोर्टात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना कोर्टाने सोमवारी दहा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. मलिक हे त्यांच्या वकिलांमार्फत सोमवारी कोर्टात हजर झाले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शितल बांगड यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
मलिक यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात हे प्रकरण हस्तांतरित करण्यात यावे, असा अर्ज कोर्टात केला आहे. या अर्जावर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. गिरीश बापट यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन, अॅड. सुनीता किंकर, अॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात अब्रुनकसानीचा दावा दाखल केला आहे.
मलिक यांनी १९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी, 'बापट यांनी तूर डाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी दिली आणि दोन हजार कोटींचा घोटाळा केला आहे. बापट भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून काढून टाकावे,' असे आरोप केले होते. ही बातमी विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाली. त्यामुळे बापट यांची लोकांमध्ये बदनामी होऊन प्रतिमा मलीन झाली, असे बापट यांच्यामार्फत कोर्टात सांगण्यात आले होते.
'जो माल जप्त केला त्याची किंमत ५४० कोटी रुपये होती. त्यामध्ये तूर डाळ ही १४० कोटींची होती. बाँडवर जी डाळ रीलीज केली, ती ४३ कोटींची होती. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता येत नाही. ते स्वत: मंत्री आणि आमदार असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. म्हणून त्यांनी द्वेषाने आणि प्रसिद्धीसाठी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी दोन दिवसांनीही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले,' असे बापट यांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे. या प्रकरणी नवाब मलिक सोमवारी त्यांचे वकील अॅड. उमेश मोहिते यांच्यामार्फत कोर्टात हजर झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोठूनही बजावा ग्राहकहक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कमाल २१ दिवसांत ग्राहक मंचात खटला दाखल करून घेणे, केस चालवण्यासाठी वकिलांची आवश्यकता नाही, एका ठिकाणी खरेदी केलेल्या वस्तूबाबत दुसरीकडे खटला दाखल करता येऊ शकणे, असे ग्राहकहिताचे संरक्षण करणारा 'कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट' लोकसभेत मंजूर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी दिली.

पासवान हे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान, फूड कॉर्पोरेशन इंडियाचे अतिरिक्त संचालक सुरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत नवीन कायद्याची माहिती दिली. ग्राहक कोर्टांमध्ये खटला दाखल करण्यासाठी सध्या वेळ जात आहे. तसेच, तो दाखल करताना अनेक अडचणी येत आहेत. या कायद्यानुसार २१ दिवसांत केस दाखल करणे बंधनकारक झाले आहे, अन्यथा ही केस दाखल झाली असल्याचे समजले जाणार आहे, असे पासवान यांनी सांगितले.

सध्या वस्तू खरेदी केलेल्या भागातच केस दाखल करणे बंधनकारक आहे. नवीन कायद्यानुसार देशात कुठेही खरेदी केलेल्या वस्तुबाबत दुसरीकडे कुठेही केस दाखल करता येणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही दिल्लीत काही खरेदी केली आहे, तुम्ही पुण्यातले असून तुम्हाला पुण्यात केस दाखल करता येईल, असे पासवान म्हणाले.

या खटल्यांमध्ये वकिलांची आवश्यकता नाही. ग्राहक स्वतः केस लढू शकतात. जून्या कायद्यात वकील अनिवार्य होते. जिल्हा ग्राहक मंचामध्ये पूर्वी २० लाख रुपयांपर्यंतचा खटला दाखल होऊ शकत होता. आता ही मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य ग्राहक मंचाची मर्यादा १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर त्यापुढील खटले हे राष्ट्रीय ग्राहक मंचात चालतील. एखादा ग्राहक जिल्हा आणि राज्य ग्राहक मंचात केस जिंकला तर अशा वेळी राष्ट्रीय ग्राहक मंचात अपील करता येणार नाही. जिल्हा आणि राज्य ग्राहक मंचातील निकाल वेगवेगळे असतील तरच राष्ट्रीय ग्राहक मंचात अपील करता येईल. ग्राहक मंचात खटला सुरू असला तरी ग्राहक आणि संबंधित कंपन्या, व्यापारी यांना कोर्टाबाहेर समेट करता येईल, असे पासवान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयुर्वेदा’च्या प्रसारासाठी आठ देशांशी करार

$
0
0

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्राचीन काळापासून औषधोपचारपद्धतीत आपले महत्त्व अबाधित ठेवलल्या आयुर्वेद औषधप्रणाली जगभर पोहोचविण्यासाठी, त्याच्या प्रसारासाठी नेपाळ, हंगेरी, मॉरिशस, बांगलादेश, चीनसारख्या आठ देशांशी करार करण्यात आला आहे. त्याबरोबरच चीनमध्ये विद्यापीठात योगासाठी स्वतंत्र अध्यासन निर्मिती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारमधील आयुष विभागाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि इंडियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ ट्रॅडिशनल एशियन मेडिसीन (आयस्तम) यांच्या संयुक्तपणे पहिल्या आंतरराष्ट्रीय एशियन मेडिसीन विषयाच्या जागतिक आरोग्य परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम होते. इस्टामचे प्रमुख डॉ. नरेंद्र भट, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील, डॉ. अश्विनीकुमार राऊत, प्रा. मानसी देशपांडे आदी उपस्थित होते. आयुर्वेदातील संशोधन, शिक्षणातील कामगिरीबाबत विविध तज्ज्ञांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाईक यांनी माहिती दिली.
'परदेशातील विद्यार्थी आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भारतात येत आहेत. त्यामुळे नेपाळ, मॉरीशस, बांगलादेश, हंगेरी, चीन यासारख्या आठ देशांशी आयुर्वेद जगभर पोहोचविण्यासाठी करार करण्यात आले आहे. तेथील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याशिवाय चीनच्या विद्यापीठात योगासाठी स्वतंत्र अध्यासन निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय उपचार पद्धती असलेल्या 'आयुष'ला प्रोत्साहन देण्यासाठी आयुषची निर्मिती करण्यात आली आहे. आयुर्वेद उपचारपद्धती जगात सर्वोत्तम असल्याचे प्रस्थापि करण्यासाठीच आयुष प्राधान्य देत आहे,' अशी माहिती नाईक यांनी दिली.
..
परदेशातील विद्यार्थी आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भारतात येतात. त्यामुळे नेपाळ, मॉरीशस, बांगलादेश, हंगेरी, चीन यासारख्या आठ देशांशी आयुर्वेद जगभर पोहोचविण्यासाठी करार करण्यात आले आहे. तेथील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय उपचार पद्धती असलेल्या 'आयुष'ला प्रोत्साहन देण्यासाठी आयुषची निर्मिती करण्यात आली आहे.

- श्रीपाद नाईक, राज्यमंत्री, आयुष विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्याधारित शिक्षण बारगळले

$
0
0

दहावी फेरपरीक्षेतील नापासांना मूळ प्रवाहात आणणे अवघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहावीच्या फेरपरीक्षेमध्येही नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या आधारे पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याची सरकारची योजना प्रत्यक्षात येण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. त्यासाठीच्या प्रस्तावांवर ठोस धोरण राबविणारी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाल्याने, राज्यभरातील पन्नास हजारांवर विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्ष वायाच जाणार असल्याचे समोर येत आहे.
राज्यात दहावीच्या मार्चच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच जुलै- ऑगस्टमध्ये नापासांची फेरपरीक्षा घेण्यात आली. त्या आधारे दहावीच्या मार्चच्या परीक्षेत नापास झालेल्यांपैकी ५७ हजारांवर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होत अकरावीला प्रवेश घेता आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थी बसले होते. फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले, तसेच एटीकेटीच्या आधारे अकरावीला पात्र ठरणारे विद्यार्थी वगळता उर्वरीत सर्व नापास विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन, त्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार या प्रशिक्षणाचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी मटा प्रतिनिधीने शिक्षण खात्यातील संबंधित घटकांशी संपर्क साधला. मात्र, अद्याप त्या विषयी सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना मिळाल्या नसल्याचे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोमवारी सांगण्यात आले.
कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण खात्यांतर्गत असणारा व्यवसाय शिक्षण विभागाचा कारभारही सध्या बदल अनुभवत आहे. त्यामुळे सध्या दहावीच्या फेरपरीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमांबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अधिकारी अनभिज्ञ
कौशल्याधारित शिक्षण योजनेबाबत व्यवसाय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून ही प्रशिक्षणे सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र त्या विषयी व्यवसाय शिक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रस्ते अपघातात महाराष्ट्र अव्वल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात रस्ते अपघातांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र, येथील रुग्णवाहिका सेवा सक्षम असल्याने अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे, असे मत लंडन विद्यापीठाचे माजी प्रमुख विजय गौतम यांनी सोमवारी व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अँड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे ड्रायव्हिंग स्कूलच्या शिक्षकांसाठी 'रोड सेफ्टी इमर्जन्सी ट्रॉमा ट्रेनिंग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 'आयडीटीआर'चे प्रमुख के. माधवराज, महाराष्ट्र स्टेट मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे, सचिव यशवंत कुंभार, पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष मामा देशमुख आणि कृष्णा देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

'महाराष्ट्रात रुग्णवाहिका सेवा सक्षम असल्याने अपघातातील मृतांची संख्या कमी आहे. देशात उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावरील अपघातांमध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अपघातातील जखमींना प्राथमिक उपचार, तत्काळ मदतीची गरज असते. त्यासाठी ट्रॉमा प्रशिक्षण देण्याची गरज आहे,' असे गौतम यांनी सांगितले. तसेच, कार्यक्रमानंतर त्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार कसे करावे, या विषयी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा नाही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संकष्टीच्या दिवशी मंगळवारी चंद्रोदयाला चतुर्थी असेल तर, अंगारकी योग येतो. पण २०१६ मध्ये असा योग घडणार नसल्याने वर्षभऱात कॅलेंडरमध्ये अंगारकी चतुर्थी दिसणार नाही.

चालू वर्ष हे लिप वर्ष असल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यात २७ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे हे वर्ष ३६६ दिवसांचे असल्यामुळे नोकरदारांना एक दिवस जास्त काम करावे लागणार आहे. या वर्षातील अजून दोन वेगळे बदल म्हणजे मकर संक्रांत यंदा १५ जानेवारीला येणार आहे. दुसरा बदल म्हणजे या वर्षभरात एकाही महिन्यात अंगारकी चतुर्थी येणार नाही.

इंग्रजी कॅलेंडरमध्ये अंगारकी चतुर्थी न येण्याचा गणितीय कोणताही संबंध नाही, संकष्टीच्या दिवशी मंगळवारी चंद्रोदयाला चतुर्थी तिथी असेल तर अंगारकी चतुर्थी चा योग घडतो. असा योग २०१६मध्ये आलेला नाही. मात्र, चैत्र ते फाल्गुन या दरम्यान पुढील वर्षी माघ महिन्यात १४ फेब्रुवारीला २०१७ अंगारकी चतुर्थीचा योग आहे. ही घटना तिथीशी संबंधीत असल्याने इंग्रजी कॅलेंडरमध्ये असे घडू शकते, तसेच एका इंग्रजी महिन्यात २ वेळा संकष्टी सुद्धा येते, असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

या वर्षी गणरायाचे आगमनही दहा दिवस आधी म्हणजेच पाच सप्टेंबरला होणार आहे. गौरींबरोबर विसर्जन होणाऱ्या गणपतीचा मुक्काम सहा दिवस असेल. याशिवाय वर्षभरात १४ एप्रिल, १२ मे, ९ जून असे तीन गुरुपुष्यामृत योग असतील. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहविक्रय करणाऱ्या महिलांची आज कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देहविक्री करणाऱ्या महिलांना 'पिटा'अंतर्गत कारवाई करून कोर्टात हजर केले जाते. कोर्टात पैसे भरून त्यांची जामिनावर सुटका होते, तर काहींची रवानगी सुधारगृहात होते. कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकदा पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराला आणि मनमानीला त्यांना सामोरे जावे लागते. अशा महिलांना कायदेविषयक माहिती मिळावी या साठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कम्युनिटी लीगल सेंटर यांच्यातर्फे आज, मंगळवारी (५ जानेवारी) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉटेल रिट्झ येथे सकाळी अकरा ते चार यावेळेत ही कार्यशाळा होणार आहे. पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आणि पुणे​ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुमंत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वेश्यावस्तीतील २५ महिला सहभाग घेणार आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयावर अॅड. शुभांगी देशमुख, पिटा अॅक्टवर सहायक सरकारी वकील गौरी लकडे, फौजदारी कायद्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, आणि विधी सेवा या विषयावर प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

'पिटा'अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या महिलांना त्यांच्यासाठी काय कायदे आहेत याविषयी माहिती नाही. त्यांना कायदेविषयक माहिती मिळावी. त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, मुख्य म्हणजे त्यांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महेश जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन औषधविक्री रोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध कंपन्यांकडून 'ऑनलाइन' औषध विक्री सर्रास मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आता दस्तुरखुद्द केंद्र सरकारच्या औषध महानियंत्रकांनीच थेट राज्यातील अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औषध विक्रेत्यांच्या या मागणीला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, ऑनलाइन औषध विक्री घातक असल्याचे महानियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.

सध्या औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चा कायद्यात दैनंदिन औषध विक्री आणि ऑनलाइन औषध विक्री संदर्भात कोणताही वेगळा फरक असल्याचे दाखविण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून विविध कंपन्यांमार्फत ऑनलाइन औषध विक्री सर्रास सुरू आहे. लैंगिक समस्या, गर्भपात नशेची औषधे, स्टेरॉइड्ससारखी औषध देखील विना प्रीस्क्रिप्शन उपलब्ध केली जात आहेत. या औषधांचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहर जिल्हा औषध विक्रेत्यांसह देशातील औषध विक्रेत्यांनी ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संप पुकारला होता.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कायद्यात विविध नियमांवर बोट ठेवण्यात आले. औषध विक्री कोणत्याही प्रकारे असली तरी त्याला कायदा सारखाच लागू आहे. त्यामुळे मानवी आरोग्यास घातक असेलली औषधे एकदा ऑनलाइन विकली तर ती परत मागविणे अशक्य,तसेच औषधांच्या साठवणुकीसंदर्भात तडजोड, चुकीची औषधे घेण्याचे युवकांमध्ये वाढणारे धाडस आणि नियंत्रित ठेवणे शक्य असलेल्या औषधांची सर्रास ऑनलाइन विक्री यामुळे मानवी आरोग्य धोका पोहोचू शकतो, याकडे औषध महानियंत्रकांनी राज्याच्या एफडीएच्या आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

..

अंतिम अहवालाची अद्याप प्रतीक्षाच

या संदर्भात ऑनलाइनद्वारे औषध विक्री करणे योग्य की अयोग्य आहे यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने अद्याप आपला अंतिम अहवाल दिला नाही. तरीही देखील या प्रकाराची केंद्रीय औषध महानियंत्रकांनी दखल घेऊन सर्व राज्यांच्या एफडीए आयुक्तांना पत्र पाठवून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ऑनलाइन औषध विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्वाज कुणाचा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अरे आव्वाज कुणाचा, करंडक कुणाचा अशा आरोळ्यांना दणाणून गेलेला परिसर... युवा रंगकर्मींची सुरू असलेली धावपळ... सादरीकरणाला मिळालेली दाद...निमित्त होते 'महाराष्ट्रीय कलोपासक'तर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे. लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या हस्ते भरत नाट्य मंदिर येथे सोमवारी स्पर्धेचे उद्घाटन झाले. संस्थेचे अनंत निघोजकर, अंतिम फेरीचे परीक्षक ज्योती सुभाष डॉ. प्रवीण भोळे, प्रदीप वैद्य या वेळी उपस्थित होते. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

पुरुषोत्तम करंडक ही अप्रतिम स्पर्धा असल्याचे सांगून मोकाशी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'भक्षक' ही एकांकिका सादर केली. मानवी अतिक्रमणामुळे होणारी जंगलतोड आणि प्राणीमात्रांचा वस्तीमध्ये होणारा प्रवेश या विषयावर ही एकांकिका बेतली होती. महाअंतिम फेरी ७ जानेवारीपर्यंत होणार असून, वीस नहाविद्यालयांच्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सबनीसांना दिलेली धमकी ही असहिष्णूता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना आलेली धमकी आणि संमेलन उधळून लावण्याची भाषा असहिष्णुतेचे प्रतीक आहे. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपला उत्तेजन देऊ नये, असा सूर विविध संघटनांमधून उमटू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एकेरी टीका योग्य नाही, असे स्पष्ट करून संघटना डॉ. सबनीस यांच्या पाठिशी उभ्या राहू लागल्या आहेत.

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांवर केलेली टीका अयोग्य आहे. पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख व श्रद्धांजलीची भाषा संमेलनाध्यक्षाला शोभत नाही, अशी भूमिका मांडून आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी डॉ. सबनीस यांचे पुतळे जाळणे व संमेलनात त्यांना येऊ देणार नाही, ही खासदार अमर साबळे यांची भाषा असहिष्णू आहे. तर संमेलन उधळून लावू ही रामदास आठवले यांची भाषा आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांना शोभणारी नाही, असे म्हटले आहे. रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फेही डॉ. सबनीस यांना पाठिंबा देण्यात आला आहे. डॉ. सबनीस यांच्यावरील झुंडशाही ही राज्यातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक आहे,असे राहुल डंबाळे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. बिरजू महारांनी गायले मराठी गाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखीन एक पैलू रसिकांसमोर उलगडला. 'कलाछाया'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बिंदादीन महाराज यांच्या ठुमरींसह मराठी गाणेही गाऊन त्यांनी रसिकांना जिंकून घेतलं.

'कलाछाया'च्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता या दोन दिवसीय सुरेख कार्यक्रमातून झाली. पूर्वार्धात प्रसिद्ध नृत्यांगना शाश्वती सेन यांचे नृत्य झाले. नृत्यकलेवरील त्यांचे प्रभुत्व अचंबित करणारे होते. त्यांनी थाट, आमद, तीन तालातील परण सादर केले. त्यानंतर ताल धमार पेश केला. त्यातील मुक्तछंद, अवघड परण आणि काही तुकडे त्यांनी सादर केले. निःशब्द बोलांना मूर्त स्वरूप देऊन विद्यार्थ्यांसाठी ते सोपे करण्याची बिरजू महाराजांची हातोटी आहे. त्याचा प्रत्यय या वेळी आला. हॉकी, बॉल खेळताना शाश्वती यांचा समेवर होणारा 'गोल' म्हणजे रसिकांना मिळणारी दृश्यात्मक मेजवानीच होती. शाश्वती यांना पं. अरविंदकुमार आझाद (तबला), सोमनाथ मिश्रा (गायन), संदीप मिश्रा (सारंगी) यांनी साथ केली. पं. बिरजू महाराज यांनी त्यांना तबलासाथ करून कार्यक्रम अधिक उंचीवर नेला.

उत्तरार्धात पं. बिरजू महाराज यांचा 'स्वरभावरंग' हा कार्यक्रम झाला. त्यांनी गुरु बिंदादीन महाराज यांची 'जागे हो कई रैन' आणि 'मोहे छेडो ना नंद के सुन हूं छैल' ही ठुमरी गायली. 'तेरी महफिल में किस अंदाज से बैठा है दिवाना', 'मेरे हमनवाज मेरे हमनशी' या गझला पेश करून महाराजांनी कार्यक्रम रंगवला. 'जायचे असेल जरी नकळत निघून जा' हे मराठी गाणेही सादर करून उपस्थितांना मेजवानी दिली. बनारसची कजरी गाऊन त्यांनी समारोप केला.

पहिल्या दिवशी कथक गुरू अच्छन महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते झालं. त्यानंतर 'कथ कीर्तनक' या कार्यक्रमामधून रामायणाची कथा कथक आणि कीर्तनाच्या मिलाफातून मांडण्यात आली. यामध्ये कीर्तनकार श्रेयस बडवे, गायक समीर दुबळे, सोमनाथ मिश्रा, नम्रता महाबळ आणि बासरीवादक सुनील अवचट यांचा सहभाग होता. 'कलाछाया'च्या विद्यार्थिनी कथक नृत्याचे सादरीकरण केलं.
..

भारतरत्न देण्याची मागणी

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सचिव तसेच महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक वाजपेयी या कार्यक्रमास उपस्थित होते. 'कला क्षेत्रात पं. बिरजू महाराज यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे. तशा उंचीची व्यक्ती सापडणे तसे दुर्मिळच आहे, त्यामुळे त्यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावा,' असा प्रस्ताव प्रसिद्ध नृत्यांगना शाश्वती सेन यांनी वाजपेयी यांच्यापुढे मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायगावमधील ग्रंथालयाचे लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे औपचारिक उद् घाटन रविवारी झाले. सावित्रीबाई फुले यांच्या १८५ व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठाने या ग्रंथालयाचे लोकार्पण केले.

विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर पार्श्वभूमीवर फुले यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा संकल्प विद्यापीठाने सोडला होता. या ग्रंथालयाच्या माध्यमातून या शैक्षणिक उपक्रमांनाही आता सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, डॉ. संजीव सोनवणे, ग्रंथपाल डॉ. बी. एम. पानगे यांच्याह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नायगाव ग्रामस्थांतर्फे सरपंच मनोज नेवसे यांनी कुलगुरू गाडे यांचा विशेष सन्मान केला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या मुलींच्या होस्टेलमध्येही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे चीफ रेक्टर डॉ. टी. डी. निकम, वनिता कांबळे, विद्यापीठातील पाळणा घराच्या संचालिका डॉ. अनघा तांबे उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या धावपळीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. साहित्य संमेलन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आयते निमित्त मिळाल्याने संभाव्य उमेदवार कमालीचे उत्साहात आहेत. 'मी कार्याध्यक्ष होणार, मी प्रमुख कार्यवाह होणार', अशा भीमगर्जना सुरू झाल्या आहेत. बारा सदस्यांचे पॅनेल उभे करणे अवघड आहे, तसेच निवडणूक बिनविरोधही शक्य नाही, अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, १५ मार्च २०१६ रोजी नवीन अधिकार मंडळ अस्तित्वात येणार आहे. निवडणुकीत ११ हजार २७७ मतदार सहभागी होणार आहेत. एकूण १३ विभागांतून ११ हजार २७७ मंतदार सभासद असून, कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांसह ३३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह व कोषाध्यक्ष; तसेच पुण्यासासाठी सहा कार्यवाह व तीन सदस्य अशा बारा सदस्यांचे मंडळ निवडून द्यावे लागणार आहेत. प्रमुख तीन पदांसाठी १३ विभागांमधून मतदान होणार आहे. प्रमुख तीन आणि उर्वरित नऊ जागांसाठी पॅनेल करायचे तर इच्छुक उमेदवार आवश्यक आहेत. तर, त्याच वेळी प्रत्येक जणच मी विशिष्ट पदासाठी निवडणूक लढवणार आहे, अशा कल्पना करू लागल्याने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

परिषदेच्या सर्व साधारण सभेमध्ये अध्यक्ष प्र. चिं.शेजवलकर यांनी प्रा. मिलिंद जोशी यांना पुन्हा परिषदेत घ्या, असे आवाहन केले होते. त्यानंतर जोशी यांचा गट सक्रीय झाला असून, त्यांच्यासह विद्यमान प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांचा या दोघांना पाठिंबा मिळाला आहे. विद्यमान कोषाध्यक्ष सुनील महाजन प्रमुख कार्यवाह या पदासाठी इच्छुक आहेत. तर, साहित्य संमेलनाचे निवडणूक अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

..

चाचपणी सुरू

सर्व इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली असून, पॅनेल केले तर कोणाकोणाला बरोबर घेता येईल व विरोधात कोण असेल, याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. निवडणूक बिनविरोध केली तर कोणाकोणाची समजूत काढावी लागेल, कोणत्या पदांसाठी कोण तयार होईल, कोण समाधान मानेल, याचा आढावा घेतला जाऊ लागला आहे.
..

यांच्या नावांची चर्चा

प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, अॅड. प्रमोद आडकर यांच्यासह काहींची नावे निवडणुकीसाठी चर्चेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य संमेलनाबाबत दुजाभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा निधी अद्यापही सरकारच्या तिजोरीतच अडकून पडला आहे. संमेलनाला अवघा एक महिना उरला असताना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आयोजनाकडे लक्ष देण्याऐवजी निधीसाठी शासनाच्या कार्यलयाचे खेटे घालावे लागत आहेत. साहित्य संमेलनाचा निधी वेळेवर देणाऱ्या शासनाचा नाट्यसंमेलनाच्या बाबतीत दुजाभाव का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

पिंपरी येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून २५ लाख रुपये साहित्य महामंडळाला मिळाल्यानंतर नाट्य संमेलनासाठी मिळणाऱ्या निधीची नाट्य परिषदेला प्रतीक्षा आहे. नाट्य संमेनलाचे स्थळ निश्चित झाल्यानंतरच हा निधी मिळणार होता. नाट्य संमेलनाचे ठिकाण म्हणून ठाण्यावर शिक्कामोर्तब होऊन दोन महिने होत आले तरी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी निधीच्याच प्रतीक्षेत आहेत.

घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पुढच्या संमेलनाचा निधी दसऱ्यापूर्वी महामंडळाच्या खात्यात जमा होईल, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे दसऱ्याला अवघे तीन दिवस शिल्लक असताना निधी महामंडळाच्या खात्यात जमा झाला. नाट्य संमेलनाची मात्र शासनाकडून उपेक्षाच होत आहे.

राज्य शासनातर्फे साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनासाठी दर वर्षी २५ लाख रुपये दिले जातात. पूर्वी हा निधी केव्हा मिळेल याची खात्री नव्हती. निधीसाठी पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात वारंवार खेटे घालावे लागत. साहित्य महामंडळ व नाट्य परिषदेकडून लेखी स्वरूपात प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबतीत निर्णय होत. यामध्ये संमेलनाच्या तारखा जवळ आल्या तरी प्रत्यक्ष निधी मिळत नसे. मात्र, सरकार बदलल्यानंतर घुमान येथे झालेल्या संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी निधी दसऱ्याच्या आधी मिळेल, अशी घोषणा करून बदलाचे संकेत दिले होते. त्यानुसार विनोद तावडे यांनी आपली घोषणा खरी करून दाखवली; पण त्यांना नाट्य संमेलनाचा मात्र विसर पडला.

साहित्य संमेलनासाठी निधी मिळाला असला तरी नाट्य संमेलनासाठी निधी मिळालेला नाही. ९६ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची एकमताने निवड झाली आहे. पुढील महिन्यात ठाण्यामध्ये हे संमेलन होणार असून तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.

पाठपुराव्यात कमी

साहित्य संमेलनाच्या निधीसाठी महामंडळाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. तसा पाठपुरावा करण्यात नाट्य परिषद कमी पडते, असे काही जाणकारांचे मत आहे. दोन्ही संमेलनांसाठी निधीची तरतूद असते. त्यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा केला तर संमेलन जवळ आले की धावपळ उडणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.
..

संमेलनाचे ठिकाण निश्चित झाले तरी निधी मिळालेला नाही. ठिकाण निश्चित झाल्यानंतर बँक खात्यामध्ये निधी जमा होईल, असे आश्वासन शासनाकडून मिळाले होते. पूर्वी धनादेश मिळत असे. संमेलन जवळ आले तरी खात्यावर निधी जमा झालेला नाही. निधीसाठी मंगळवारी कार्यालयात जावे लागणार आहे.

- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images