Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संमेलनाचे बहुमाध्यमी प्रमोशन

$
0
0

संमेलनाचे बहुमाध्यमी प्रमोशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमी आकर्षित करण्यासाठी ८९व्या साहित्य संमेलनाचे हटके प्रमोशन करण्यात येत आहे. सोशल मीडिया, होर्डिंग, टीव्ही, रेडिओ अशा सर्व माध्यमांचा वापर करून संमेलनाची प्रथमच जाहिरात केली जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा १५ ते १९ जानेवारीदरम्यान पिंपरी-चिंचवड येथे होत आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड येथे प्रथमच साहित्य संमेलन होत असल्याने वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हे संमेलन व्यापक पद्धतीने व्हावे, त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी त्याच्या जाहिरातीवर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत साहित्य संमेलनाला वेबसाइट, फेसबुक पेजच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत होते. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे 'साहित्य मित्र' अँड्रॉइड अॅप, होर्डिंग या माध्यमांचाही वापर करण्यात येत आहे.
गुलजार, चेतन भगत, जावेद अख्तर, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर व्यक्ती संमेलनाला येत आहेत. त्यामुळे 'साहित्य संमेलनाला आम्ही येतोय... तुम्हीही चला' असा संदेश देणारी होर्डिंगही येत्या दोन दिवसांत लावली जाणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली.
'साहित्य संमेलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. तरुणवर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. त्यासाठीच सोशल मीडिया, वेबसाइट, अॅप्लिकेशन अशा माध्यमांची मदत घेतली जात आहे. साहित्य संमेलनाला कोण कोण साहित्यिक, मान्यवर व्यक्ती येणार, हे साहित्यप्रेमींना कळण्यासाठी होर्डिंग लावण्याचा निर्णय घेतला आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
..............
रेडिओ, टीव्हीवरही जाहिराती
खास या साहित्य संमेलनासाठी जिंगल, अॅनिमेटेड लोगोही तयार करण्यात आला. युट्यूबवर त्या ऐकण्या-पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आता 'माझी मराठी माय मराठी' ही जिंगल आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केली जाणार आहे. पुढील टप्प्यात एफएम वाहिन्यांवरूनही जाहिरात केली जाणार आहे. लोगोचा वापर करून टीव्हीवरील जाहिरातीही सुरू करण्यात येणार आहेत.
...............
अॅप्लिकेशनचे डाउनलोड - ५००हून अधिक
फेसबुक पेज सदस्य - सुमारे सात हजार
वेबसाइट हिट्स - दररोज सुमारे अडीच हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुलाबपुष्प प्रदर्शन भरणार उद्यापासून

$
0
0

गुलाबपुष्प प्रदर्शन भरणार उद्यापासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दि रोज सोसायटी ऑफ पुणे संस्थेतर्फे येत्या दोन आणि तीन जानेवारीला टिळक स्मारक मंदिर येथे गुलाब प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संस्थेने आयोजित केलेले हे ९७ वे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात देण्यात येणारे कै. लक्ष्मीबाई अनंत नाईक रौप्यपदक यंदा भाग्यश्री किवळकर यांना जाहीर झाले आहे; तसेच अरुण पाटील पुरस्कृत 'प्रगतीशील गुलाब शेतकरी' पारितोषिक वाशीम जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र वसंतराव राऊत यांना देण्यात येणार आहे.
प्रदर्शनाचे उद् घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थितीत आणि कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू डॉ. के. इ. लवांडे यांच्या हस्ते होणार आहे. एन. ए. जोशी पॉलीबॅग प्रमोशन सेंटरच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भिडे यांनी दिली.
प्रदर्शनात ७७ विभाग असून त्यामध्ये गुलाब पुष्पांसह उत्कृष्ट पुष्परचना, गुलाबाची छायाचित्रे मांडण्यात येणार आहेत. सुमारे १५० जातीचे दोन हजार गुलाब पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. याशिवाय गुलाबांची रोपे आणि बागकामाचे सर्व साहित्य, अवजारे येथे उपलब्ध असतील. शनिवारी दुपारी १ ते ८ आणि रविवारी सकाळी ९ ते ८ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे, असे भिडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुर्वेद संस्कृत’ची अॅलर्जी

$
0
0

परदेशी विद्यार्थ्यांच्या हट्टासाठी अभ्यासक्रमातून संस्कृत हद्दपार

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : प्राचीन काळापासून आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या संस्कृत विषयालाच आयुर्वेदाच्या साडेचार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातूनच हद्दपार करण्याचा घाट 'सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन'ने (सीसीआयएम) घातला आहे. त्यामुळे आयुर्वेदातील १५० गुणांचा असलेला स्वतंत्र संस्कृत विषय अवघ्या ५० गुणांवर आणून ठेवल्याने या भाषेची 'सीसीआयएम'ला 'अॅलर्जी' आहे का, असा सवाल आयुर्वेदतज्ज्ञांकडून केला जात आहे.

आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून संस्कृत विषयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागाकडे 'सीसीआयएम'ने मंजुरीसाठी पाठविला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला आयुर्वेद विश्वातून विरोध होऊ लागला आहे.

'आयुर्वेदाच्या वैद्यकीय पदवीच्या अभ्यासक्रमातील संहिता (मूळ ग्रंथ) संस्कृत भाषेत आहेत. बीएएमएस पदवी अभ्यासक्रमात संस्कृत हा स्वतंत्र विषय शिकविला जातो. या विषयाची लेखी, तोंडी परीक्षा घेतली जाते. पूर्वी २५० गुणांचा असलेला विषय सध्या १५० गुणांचा केला आहे. आणखी कपात करून ५० गुणांसाठी आयुर्वेद अभ्यासक्रमात त्याचे महत्त्व ठेवले आहे. आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा येणे आवश्यक आहे. त्या करिता संस्कृतमधील व्याकरणांचे ज्ञान शिकविले जाते. परिणामी, संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथाचा अभ्यास करणे सोपे जावे हाच विषय शिकविण्याचा हेतू आहे. पदवी अभ्यासक्रमात ५० गुणांसाठी विषय ठेवल्याने भावी डॉक्टरांना आयुर्वेदाचे ज्ञान मिळण्यात मोठी अडचण ठरणार आहे,' अशी माहिती टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि काय चिकित्सा विभागप्रमुख डॉ. सदानंद देशपांडे यांनी 'मटा'ला दिली.

'आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षात आयुर्वेदाचा इतिहास हा विषय वगळण्यात आला असून पदार्थविज्ञान विषयालाही कात्री लावली आहे. चरक (मेडिसीन), सुश्रृत (सर्जरी), काश्यप (स्त्री रोग) हे आयुर्वेदातील मूळ ग्रंथ पाच हजार वर्षांपासून संस्कृत भाषेत आहेत. संस्कृतचे देशात महत्त्व वाढत असताना ते आणखी वाढविण्याऐवजी कमी करण्याचा 'सीसीआयएम'चा प्रयत्न आहे,' असा आरोप सीसीआयएमचे माजी सदस्य डॉ. सुहास परचुरे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेसबुक’वरून पत्नीची बदनामी

$
0
0

पुणे : पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्या मित्रांना मेसेज पाठवणाऱ्या व पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा खोटेपणा पत्नीने कोर्टात दाखल केलेल्या केसमध्ये उघडकीस आणला आहे. पतीचे दुसऱ्या मुलीबरोबर सूत जुळल्याची माहिती मिळाल्यामुळे कोर्टात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दाव्यात पत्नीविरोधात निकाल जावा म्हणून तिला बदनाम करणाऱ्याचा प्रताप तिच्या पतीने केला.

नाशिक येथील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये संबंधित महिलेचा पती प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तो प्रोफेशनल हॅकरही आहे. पत्नी बाळंतपणासाठी गेल्यानंतर त्याचे कॉलेजमध्ये असलेल्या एका मुलीबरोबर सूत जुळले. या प्रकाराची त्याच्या पत्नीला माहिती कळाली. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात पुणे कोर्टात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दावा दाखल केला आहे. कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत पत्नीविरोधात निकाल जावा, यासाठी तिच्या पतीने तिचे फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यावरून तिच्या मित्रांना मेसेज पाठविले. तिच्या मित्रांना पाठविण्यात आलेल्या मेसेजची कॉपी त्याने कोर्टात सादर केली. त्याची पत्नी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिने आपले अकाउंट हॅक झाल्याचे पुरावे गोळा केले. तिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट, तसेच अकाउंट हॅक झाल्यानंतर झालेल्या पोस्ट यांचे पुरावे कोर्टात दाखल केले.

कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कोर्टात दाखल करण्यात आलेल्या केसची सुनावणी सुरू असताना संबंधित महिलेच्या पतीने हा प्रकार केल्याचा प्रताप तिच्या पत्नीने उघडकीस आणला. या संदर्भात फरासखाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांच्या कार्यक्षेत्रात हा गुन्हा नसल्याचे सांगून तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती, अशी माहिती फिर्यादी महिलेच्या वकील अॅड. सुप्रिया कोठारी यांनी दिली. कोर्टात सध्या या केसची सुनावणी सुरू आहे. कोर्टाच्या केस सुरू असताना पतीकडून पत्नीच्या बदनामीचा प्रकार पत्नीच्या दक्षतेमुळे उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाच्या बजेटला पालिकेची मान्यता

$
0
0

विद्यार्थी घटले आणि बजेट फुगले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये २६ हजारांनी घटली असतानाही, याच दहा वर्षांच्या एकूण बजेटच्या तुलनेत १९२ कोटींनी वाढ असलेल्या पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बजेटला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने गुरुवारी मान्यता दिली. घटलेली विद्यार्थी संख्या, शिक्षकांच्या बदली घोटाळ्यात अडकलेले प्रशासन आणि ढासळणाऱ्या शैक्षणिक गुणवत्तेच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी शिक्षण मंडळाला धारेवर धरले असतानाही ३४१ कोटी रुपयांच्या या बजेटला मान्यता मिळाली.

गेल्या काही काळात पालिकेचे शिक्षण मंडळ विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत आले होते. या सर्व चर्चांचे प्रतिबिंब गुरुवारी या बजेटच्या चर्चेच्या निमित्ताने पालिकेच्या मुख्य सभेत उमटले. स्थायी समितीने ३४१ कोटी ३९ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करून ते मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी ठेवले होते. पालिकेच्या शाळांची गुणवत्ता ढासळत असताना एवढ्या मोठ्या रकमेच्या बजेटची गरजच काय, असे म्हणत पालिका सदस्यांनी या बजेटविषयी सुरुवातीला आक्षेप घेतले. बजेट सादर होत असताना शिक्षण मंडळ सदस्यांची अनुपस्थिती, मंडळाच्या अहवालातून गाळलेले विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे संदर्भ समोर ठेवत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खासगी शाळांच्या तुलनेत शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर अधिक खर्च होऊनही दर्जा सुधारत नसल्याची खंतही नगरसेवकांनी व्यक्त केली.

सभागृहनेते बंडू केमसे यांनी वास्तव विचारात घेत स्थायी समितीने अंदाजपत्रकाला मान्यता दिल्याचे स्पष्ट केले. उपमहापौर आबा बागूल यांनी मंडळाचा प्रशासकीय खर्च कमी करण्याची मागणी केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मंडळाच्या खर्चात वाढ होत असतानाच, कारभार डबघाईला येत चालल्याची बाब सभेच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार नसल्याचे मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी सांगितले. सुनंदा गडाळे यांनी एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असतानाही मंडळाचे बजेट दरवर्षी वाढतेच कसे, असा रोखठोक सवाल उपस्थित केला.

बदल्यांमध्ये गैरव्यहार

'खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा मोठ्या आणि प्रशस्त आहेत. शाळांसाठी मैदाने असतानाही विद्यार्थी खासगी इंग्रजी शाळेकडे का गेले आहेत, याचा शोध घ्यावा. गरज नसलेल्या शाळांवर अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. शिक्षक बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे,' असा गंभीर आरोप नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केला. मुख्याध्यापक बदलीसाठी १० हजार, तर शिक्षक बदलीसाठी पाच हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप मनसेच्या किशोर शिंदे यांनी केला.

गेल्या दहा वर्षांत मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २६ हजारांनी घटली असतानाच मंडळांचे बजेट मात्र १९२ कोटींनी वाढले असल्याचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सभागृहात निदर्शनास आणले. एका विद्यार्थ्यावर महापालिकेकडून तब्बल ४६ हजारांचा खर्च केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मंडळ प्रशासनाने दाखविलेल्या उदासिनतेवरून त्यांनी मंडळाचे कान टोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभेच्छा, फटाक्यांची आतषबाजी अन् सेल्फी

$
0
0

पुणे ः झगमगती रोषणाई... आकाशातील सोडलेले दिवे आणि फुगे... हॉटेल व कॅफेबाहेर सेल्फी काढण्यात दंग असलेली तरुणाई... वाहतुकीची झालेली कोंडी... फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी... हॅपी न्यू इयर म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा...

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये असे चित्र पहायला मिळाले. उपनगरातील हॉटेल आणि क्लबमध्ये मोठी गर्दी झाली होती. पंचतारांकित हॉटेल आणि क्लबमध्ये डीजेच्या दणदणाटात न्यू इयर पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातल्या प्रमुख रस्त्यांसह सर्वच ठिकाणी गर्दीचे वातावरण होते. या भागातील हॉटेल्स आणि कॅफेही फुल्ल झाले होते. अनेक हॉटेलबाहेर वेटिंगसाठी रांग लागल्याचेही चित्र पहायला मिळाले. हॉटेलिंग करण्यासाठी अनेकांनी मॉलमध्ये भटकंती करण्याला पसंती दिली होती. त्यामुळे सेंट्रल मॉल, इनऑर्बिट मॉल, मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.

गोपाळकृष्ण गोखले रोड (एफसी रोड), जंगली महाराज रोज, कॅम्प, कोथरूड, चांदणी चौक, सिंहगड रोड या भागात रस्तावर गर्दी होती. तरुणाईचे ग्रुप रस्त्यांवर भटकत सेल्फी-ग्रुपी काढण्यात दंग झाले होते. एस. एम. जोशी पूल, काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज), विठ्ठल रामजी शिंदे पूल अशा ठिकाणी तरुणाईसह नोकरदार वर्गाच्या गप्पांचे फड रंगले होते. नॉर्थ मेन रोड, एम जी रोड आणि एफसी रोड या ठिकाणी रात्री अकरा नंतर नो व्हेइकल झोन करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते. महामार्गांवरून शहरात येणाऱ्या वाहनांवर आणि गाडी चालवणाऱ्या तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळावं वरीस ‘मोक्याचं’...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आज एकविसाव्या शतकातलं सोळावं वर्ष उजाडलंय. 'सोळावं वरीस धोक्याचं' असं एका लावणीत म्हटलंय; पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे वर्ष मोक्याचं ठरो, अशाच शुभेच्छांची देवाणघेवाण आज सगळीकडे होताना दिसतेय. सदैव भविष्यकाळाकडं पाहणारी नजर आणि भविष्यात नवं, चांगलं काही तरी घडण्याची आशा या बळावरच येणारं हे वर्ष सकारात्मक जगण्याची उमेद घेऊन आलं आहे.

'जग आशेवर चाललंय,' असं म्हणतात. नुसतं म्हणतात नाही, तर तेच खरं आहे. आशा-निराशेच्या याच खेळाचा नवा प्रयोग आजपासून सुरू झाला आहे. नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा नवं काही तरी होईल, या आशेवर प्रत्येकाच्या मनात नवी ऊर्मी आहे. निसर्गात वसंतामध्ये पालवी फुटते; पण माणसाच्या आशा-आकांक्षांना जानेवारीतच आशेची पालवी फुटते.

नव्या आर्थिक वर्षात होणाऱ्या 'अॅप्रायजल'मध्ये घसघशीत पगारवाढ मिळावी आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करता यावीत, ही आशा तमाम नोकरदारांची असते. बहुतेकांचे पुढचे तीन-चार महिने याच आशेवर निघून जातात. कुणाला प्रमोशनची आशा असेल, तर कुणाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा. कुणाला दोनाचे चार करायचे असतात, तर कुणाला 'गुड न्यूज' द्यायची असते. ऑक्टोबर राहिलेला पेपर किंवा राहिलेली 'एटीकेटी' यंदा तरी सुटू दे रे बाबा, या आशेवर कुणी नव्या वर्षाची सुरुवात करील, तर कुणी नव्या दमाने व्यायामाचा 'श्रीगणेशा' करून २०१६ला सलामी देईल. कुणाला चांगल्या नोकरीची आशा असेल, तर 'टर्नओव्हर' दुपटी तिपटीनं वाढावा, ही कुणाची प्रार्थना असेल. याच आशेचं प्रतिबिंब गुरुवारी रात्रभर रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये दिसत होतं.

थोडक्यात काय, तर नव्याने काहीतरी मिळेल, या आशेवर आणि नव्यानं काहीतरी सुरू करुयात, या संकल्पावर प्रत्येकाने नव्या वर्षात पदार्पण केले आहे. जुन्या वर्षांतील कटू आठवणी आणि कटू प्रसंगांना विसरून, 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' असे म्हणून प्रत्येक जण नव्या वर्षात प्रवेश करतोय. तर काही जण अजूनही मावळत्या वर्षांच्या आठवणीतच अजूनही रेंगाळताहेत. 'नवे वर्ष, नवा हर्ष' अशीच प्रत्येकाची परिस्थिती आहे. प्रत्येकाला काही तरी सकारात्मक घडण्याची आशा आहे. कारण 'आशा अमर आहे' आणि त्याच आशेवर रोजचा खेळ सुरू आहे. आज त्या खेळाचा नवा अंक. पहिला प्रयोग. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा... 'हॅपी न्यू इयर...'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'...तर मोदी एका दिवसात संपला असता!'- सबनीस

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

'दहशतवाद नष्ट करण्यासाठी गांधी-बुद्धाचं नाव घेत मोदी सगळीकडे बोंबलत फिरतोय... पाकिस्तानात नवाझ शरीफांना भेटायला जाणं हे तर मरायचंच लक्षण होतं... तिकडे हाफिज सईद आहे, दाऊद आहे, दहशतवाद्यांचे अड्डे आहेत... कुणाची गोळी लागली असती, बॉम्बगोळा पडला असता, तर नरेंद्र मोदी एका दिवसात संपला असता आणि मंगेश पाडगावकरांच्या आधी मोदींचीच शोकसभा घ्यायला लागली असती...'

ही मुक्ताफळं आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसाची स्तुती करत असताना, सबनीसांना किती बोलू - काय बोलू असं होऊन गेलं आणि त्यांचा तोल सुटून सगळाच घोटाळा झाला. मोदींचे विरोधक किंवा शत्रूही जे बोलत नाहीत, ते संमेलनाध्यक्ष चुकून बोलून गेले, तेव्हा सगळ्यांनीच कपाळावर हात मारला. 'हा मोदी', 'तो मोदी' असा एकेरी उल्लेख करत सबनीसांनी मोदींबद्दलची जवळीक दाखवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोही सगळ्यांना खटकला. त्यामुळे अध्यक्षीय भाषणाआधी त्यांचं हे भाषण चर्चेचा विषय ठरलंय. सबनीस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डीतील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात विद्यार्थी साहित्य संमेलनाचं उद्घाटन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी बोलता-बोलता, ते विद्यार्थ्यांना संवादाचं महत्त्व पटवून द्यायला गेले आणि वेगळ्याच वादाला तोंड फुटले.

संघर्षाच्या जागा आहेत, पण आपण संवादाकडे वळलं पाहिजे. गुलाम अलींचं गाणं पाकिस्तानच्या नकाशात बंद करणार आहात का? येऊ दे त्यांना भारताच्या नकाशात, असं स्पष्ट मत व्यक्त करत, भारत-पाक मैत्रीसाठी आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान मोदी करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करायला त्यांनी सुरुवात केली. गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. पण उत्तरार्धात बदललेला आजचा मोदी गांधींचं नाव घेतो. बुद्धाचं नाव घेतो. या दोघांची बेरीज करून इसिसचा दहशतवाद नष्ट करण्यासाठी ३४ राष्ट्रांची आघाडी करण्यास मोदी भाग पाडतो. अमेरिकेशी, चीनशी मैत्री करतो. सगळीकडे बोंबलत फिरतोय. असा पंतप्रधान राष्ट्रवादी नाही का?, असा सवाल सबनीस यांनी केला. ते इतके 'सुटले' होते, की आपण देशाच्या पंतप्रधानाचा एकेरी उल्लेख करतोय याचं भानही त्यांना नव्हतं. त्यानंतर ते क्षणभर थांबले, तेव्हा त्यांची गाडी रुळावर येईल असं वाटलं. पण पुढे तर त्यांनी कहरच केला. आरएसएसचा पंतप्रधान अचानक पाकिस्तानात जातो. नवाझ शरीफांना वाढदिवशी भेटतो. पण त्यांना शरीफांचा पुळका नव्हता, तर देशाचा पुळका होता. अक्षरशः शीर हातावर घेऊन मोदी तिथे गेला होता. मरायचीच लक्षणं होती ती. कोणाचीही गोळी लागू शकत होती, बॉम्बगोळा येऊन पडला असता तर मोदी एका दिवसात संपला असता आणि आपल्याला पाडगावकरांच्या आधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती, असा त्यांचा 'कल्पनाविलास' ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मोदींच्या समर्पण वृत्तीचा गौरव करताना ते त्यांना श्रद्धांजली वाहूनच मोकळे झाले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या नियुक्तीपासून वादात अडकलेले श्रीपाल सबनीस पुन्हा टीकेचं लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे.

कुठे काय बोलावं, यापेक्षा काय बोलू नये, हे कळणं जास्त महत्त्वाचं असतं असं म्हणतात. पण, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या व्यक्तीला याचं भान राहू नये, हे दुर्दैवीच म्हणावं लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कॉलरशिपची मुदत वाढवली

$
0
0

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे आणि कॉलेजांनी विद्यार्थ्यांचे अर्ज न सादर केल्याने निम्मे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते. त्यानंतर अर्जाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्या मुदतीतदेखील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज सादर न झाल्याने १५ जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्कॉलरशिप व फ्री-शिपकरिता ३१ डिसेंबरअखेर राज्यात १२ लाख २८ हजार २७१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत; मात्र गेल्या वर्षातील विद्यार्थी व यंदा झालेले नवीन प्रवेश यांची संख्या पाहता १६ ते १७ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे अद्याप सुमारे चार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

मुदतवाढीबरोबरच ऑनलाइन अर्ज भरताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवरही मात केली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या तांत्रिक अडचणींमुळेही काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुदतवाढीच्या १५ दिवसांत या तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याची संबंधित कंपनीने खात्री करावी, असे विद्यार्थ्यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिघी व मंगळवार पेठेतील वेश्याव्यवसायावर छापा

$
0
0

तीन मुलींची सुटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सामाजिक सुरक्षा विभागाने दिघी व मंगळवार पेठेत चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून मुली पुरवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन सज्ञान तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

तपन लंबोदर घोष (२४, रा. भोसरी गावठाण, मूळ रा. ओडिशा) आणि शमीम सिद्दीक शेख (४२, रा. मंगळवार पेठ, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी घोष मुलींना बोलावून घेऊन त्यांच्याकडून दिघी परिसरात, तर आरोपी शेख हा मंगळवार पेठ येथील एका फ्लॅटवर मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक निरीक्षक नीता मिसाळ, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, राजेश उंबरे, नितीन तेलंगे यांच्या पथकाने दिघी आणि मंगळवार पेठ परिसरात छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी घोष याच्या ताब्यातील एका, तर आरोपी शेख याच्या ताब्यातील दोन अशा एकूण तीन सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली. आरोपी घोष विरुद्ध दिघी आणि आरोपी शेख विरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात 'पिटा' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एका सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर महादेव येलजाळे (२८, सध्या रा. भोंडवेवस्ती, वाल्हेकरवाडी, रावेत रोड, मूळ रा. रोहितळ, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
येलजाळे निगडी आणि परिसरात तरुणींना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी गणेश जगताप यांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा करण्यात आली. येलजाळे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक निरीक्षक नीता मिसाळ, गणेश जगताप, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अप्पू घरकडून भक्तीशक्ती चौकात येणाऱ्या सार्वजनिक रोडवर छापा टाकून दलाल येलजाळे याला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातील एका सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली आहे. तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले असून, येलजाळे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, तो तरुणींना कोठून बोलावून घेत होता याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील माळवाडी भागात घडली. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दत्तात्रय शंकर वेताळ (वय ४२, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा सागर (वय २४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नवनाथ शंकर वेताळ (वय ३९ , रा. काळेपडळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ यांचा हडपसर भाजी मंडईमध्ये गाळा आहे. त्यांचा मोठा भाऊ दत्तात्रय व विठ्ठल माळवाडी भागात शेजारी राहण्यास आहेत. हडपसर जकातनाका येथे मिळेल ते काम करीत असताना दत्तात्रय खूप दारू पित होते. अलिकडे दारू पिण्याचे प्रमाणात वाढले होते. त्यामुळे ते कोणताही उद्योगधंदा करीत नव्हते. त्यांचा मुलगा सागर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तर पत्नी साफसफाईची कामे करतात. दत्तात्रय हे दारू पिऊन पत्नी व मुलाला त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वादवादी होत होती. गुरुवारी रात्री दत्तात्रय यांनी दारू पिऊन पत्नीस शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्यामुळे सागर आणि त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. चिडलेल्या सागरने त्यांचा गळा दाबून खून केला. हडपसर पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे येथील जिजाई गार्डन परिसरामध्ये नदीपात्रातील भराव काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. महापालिकेने आणलेल्या जेसीबी आणि गाड्यांच्या काचा फोडल्या. काम थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावले.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे मुठा नदीपात्रातील भराव काढण्याचे काम सध्या सुरू आहे. वारजे-माळवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दुपारी जिजाई गार्डन परिसरामध्ये भराव काढण्यासाठी गेले होते. त्यांचे काम सुरू असतानाच काही नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. या नागरिकांनी महापालिकेच्या जेसीबी आणि इतर गाड्या फोडल्या. कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मारहाण करून पाठलाग केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम सोडून थेट वारजे क्षेत्रीय कार्यालय गाठले.

कर्मचाऱ्यांनी भराव काढण्यासाठी चर खणत असतानाच हा प्रकार घडला. स्थानिक पोलिसांनीही घटनेची माहिती घेतली असून रात्री उशीरापर्यंत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उमेश माळी यांनी दिली.

दरम्यान, कर्मचाऱ्यांवर झालेली दगडफेकीची माहिती मिळाल्यावर संध्याकाळी उमेश माळी यांसह बांधकाम विभागाचे किरण देसले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संध्याकाळनंतर भराव काढण्याचे थांबविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायन वादनाने स्वर झंकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छेडल्या जाणाऱ्या तारांतून झंकारणारा स्वर... अभ्यासपूर्ण आणि अनुभवी गायनाची रंगलेली मैफल... वैविध्यपूर्ण रचनांचे सादरीकरण अन् त्याला रसिक पुणेकरांनी दिलेले स्टँडिंग ओवेशन...

हे वातावरण होते महाराष्ट्र टाइम्स, व्हायोलिन अकादमी आणि रोटरी क्लब पुणे कात्रज यांच्यातर्फे आयोजित स्वरझंकार संगीत महोत्सवाचे. या महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी रमणबाग प्रशालेच्या मैदानावर झाला. महोत्सवाचे आयोजक अतुलकुमार उपाध्ये, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ, हेमंत वाटवे, व्हायोलिन अकादमीचे शिरीष उपाध्ये या वेळी उपस्थित होते. यंदा या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

मोहनवीणा वादक पं. विश्वमोहन भट यांनी 'विश्वरंजनी' या स्वरचित रागापासून आपल्या मैफलीची सुरुवात केली. रागविस्तार करून त्यांनी निर्भया घटनेच्या पार्श्वभूमीवर महिषासूरमर्दिनी ही रचना, कोकिळेच्या आवाजावर आधारित रचना अत्यंत सुंदररित्या सादर केल्या. त्यानंतर 'केसरिया बालम' ही पारंपरिक राजस्थानी रचना गाऊन मोहनवीणेवरही नजाकतीने वाजवली. अत्यंत स्वच्छ आणि सफाईदार वादन हे भट यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते; तसेच ग्रॅमी पुरस्कार विजेती रचना आणि 'वंदे मातरम्' वाजवून त्यांनी शेवट केला. त्यांच्या या रचनांनी रसिकांना अक्षरशः भारावून टाकले. पं. मुकेश जाधव यांनी त्यांना उत्तम तबलासाथ केली. एकमेकांच्या वादनाला दाद देत त्यांनी घडवलेला आविष्कार आनंदानुभूती देणाराच होता. त्यांच्या वादनाला रसिक पुणेकरांनी 'स्टँडिंग ओवेशन' दिले.

स्वरसम्राज्ञी बेगम परवीन सुलताना यांचे टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत झाले. 'सेंटर फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक' या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन आणि फाउंडेशन ऑफ म्युझिक या पुस्तकाचे प्रकाशन सुलताना यांच्या हस्ते झाले. सुलताना यांनी मैफलीची सुरुवात राग जोगमधील 'प्रेम सुख पायो' या विलंबित बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत बंदिशही सादर केली. सुलताना यांच्या अभ्यासू आणि अनुभवी स्वरलगावाने विलक्षण परिणाम साधत होता. तिन्ही सप्तकांतून सहजतेने संचार करत त्यांनी मैफलीत रंग भरले. त्यांना पं. मुकुंदराज देव यांनी तबलासाथ केली, हार्मोनियमसाथ श्रीनिवास आचार्य यांनी, तर शादाब एस. खान, विनय चित्राव यांनी तानपुऱ्याची साथ केली.

नववर्षाची सुरुवातच पं. भट व बेगम परवीन सुलताना यांच्यासारख्या मान्यवर गायकांच्या गाण्याने झाल्याचा आनंद रसिकांच्या चेहऱ्यावरही झळकत होता.


आजचे कार्यक्रम

पं. संजीव अभ्यंकर (गायन)

व्हायब्रेशन्स - पं. रोणू मुझुमदार (बासरी), उस्ताद तौफिक कुरेशी (तालवाद्य), पं. रामदास पळसुले (तबला)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी बसचे मोबाइलवर ट्रॅ‌किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे ट्रॅकिंग मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे करता येणार आहे. त्यामुळे एखाद्या मार्गावरील बस कोठे आहे, ती बस विशिष्ट स्टॉपवर किती वेळात पोहचू शकते याची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे. परिणामी, प्रवाशांनाही प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.

पीमपीच्या ताफ्यातील बीआरटीच्या ८०० बस असून, २५० बसमध्ये 'आयटीएमएस' प्रणाली बसविण्यात आली आहे. तर, उर्वरित बसमध्येही ते बसविले जाणार आहे. त्याबरोबरच ताफ्यातील उर्वरित १२०० बसमध्ये 'जीपीएस' प्रणाली बसविण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधिचा प्रस्ताव पाठवून एक कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पीएमपीने नुकतेच त्याचे टेंडरही काढले आहे. येत्या काळात लवकरच बसमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'पीएमपी'चे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यांनी दिली.

पीएमपीकरीता एक मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. या सर्व बसमध्ये जीपीएस बसविल्यानंतर ते अॅप्लिकेशनही प्रवाशांच्या सेवेत दाखल केले जाईल. ते अॅप्लिकेशन व बसमधील जीपीएस प्रणाली एकमेकांशी लिंक करण्यात आले आहे. त्यानुसार अॅप्लिकेशनमध्ये बसचे संपूर्ण ट्रॅकिंग होणार आहे. जीपीएस प्रणालीद्वारे बसचे ठिकाण, बस कोठे थांबते, बसचा वेग, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल, बस बंद पडली, अपघात झाला, या सर्व गोष्टी पीएमपीच्या कंट्रोल रूममध्ये कळणार आहेत, असे मोरे यांनी सांगितले.

१६ कंपन्यांची टेंडर

जीपीएस बसविण्याच्या कामासाठी टेंडर भरण्याची अंतिम मुदत १४ जानेवारी आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, दिल्ली बेंगळुरू आदी शहरांतील १६ कंपन्यांनी टेंडर सादर केले आहे. एकूण टेंडर प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर काम लवकरच सुरू केले होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएमपीच्या जागांवर मोबाइल टॉवर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) उत्पन्न वाढविण्यासाठी, पीएमपीच्या ताब्यातील नऊ मोकळया जागा आणि १० इमारतींचे टेरेस मोबाइल टॉवर उभारण्यासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने संचालक मंडळापुढे ठेवला आहे. या माध्यमातून पीएमपीला दरमहा साडेतीन लाख रुपये भाडे मिळण्याची शक्यता आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाची येत्या सहा जानेवारीला बैठक होणार असून त्या वेळी प्रस्तावावर निर्णय होणार आहे.

पीएमपीच्या जागा मोबाइल टॉवर उभारण्यासाठी १२ वर्षाच्या मुदतीसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. पीएमपीने याबाबत टेंडर प्रक्रियाही राबविली. त्यामध्ये इंडस टॉवर्स लिमिटेडने १९ जागासाठी सर्वात जास्त भाडेदराचे टेंडर सादर केले. ग्राउंड बेस टेलिकॉमसाठी १०० चौरस फूट जागा, टेरेसवरील टॉवरसाठी ६०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे. याद्वारे पीएमपीला दर महिन्याला साडेतीन लाख रुपये भाडे निश्चित केले आहे. तर, दर तीन वर्षांनी १२ टक्के भाडेवाढ होणार आहे, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

या प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यास, त्या कंपनीने मोबाइल टॉवर उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक आहे. पुणे महापालिकेकडून भेकराईनगर, शेवाळवाडी, बालेवाडी, बावधन खुर्द, शिंदेवाडी आणि पिंपरी-चिंचवड पालिकेकडून वल्लभनगर जकात नाक्याची जागा पीएमपीला मिळाली आहे. या जागांवर बस डेपो, बस स्टँडचे काम सुरू करण्यासाठी सीमाभिंत आणि वर्कशॉपसाठी स्ट्रक्चरल शेडची उभारणी करावी लागणार आहे. पालिकेच्या टेंडर विभागाने त्यासंबंधी टेंडर मागविले होते. त्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात मद्याच्या बाटल्यांसह तीन जणांना अटक

$
0
0

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'थर्टी फस्ट'ला लोणावळ्यातील एक बंगला, मॉलमधील परमीट रूम आणि ढाब्यांसह चार ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दमण येथून आणलेल्या मद्याच्या बाटल्यांसह सुमारे ५२ हजार रुपयांचा माल जप्त झाला आहे.
'थर्टी फस्ट'ला कारवाई करण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकांद्वारे रात्रभर विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. लोणावळा येथील एका बंगल्यामध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी बेकायदा दमण येथील मद्य आणण्यात आले होते. ही पार्टी आयोजित करणाऱ्याला अटक करण्यात आली. या बंगल्यातून सुमारे ४२ हजार ८०० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.
नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या परमीट रूमचालकाकडून मॉलमधील गार्डनवर नागरिकांना मद्य पुरविण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या परमीट रुमचालकाविरूद्ध कारवाई करण्यात आल्याचे वर्दे यांनी स्पष्ट केले. कासारवाडी आणि काळेवाडी येथील दोन ढाब्यांकडे मद्य विक्रीचा परवाना नसतानाही मद्यविक्री करण्यात येत होती. त्यावर छापे टाकून सुमारे दहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरात दोघांना अटक करण्यात आली असल्याचे उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले. निरीक्षक दीपक परब, ऋषिकेश फुलझळके, आर. एन. भिसे, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत रासकर, तानाजी शिंदे, विजय रोकडे आदींनी कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पुरस्कारांची व्यवस्था संथ

$
0
0

'महाराष्ट्र टाइम्स', व्हायोलिन अकादमी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे, कात्रजतर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी 'स्वरझंकार संगीत महोत्सव' न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेच्या मैदानावर दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. रविवारी (दि. ३ जानेवारी) उस्ताद शाहीद परवेझ (सतार) आणि पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) यांच्या जुगलबंदीने महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यानिमित्त आसावरी चिपळूणकर यांनी उ. शाहीद परवेझ यांच्याशी साधलेला संवाद.

............

'स्वरझंकार'च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या सतार आणि व्हायोलिन (अतुलकुमार उपाध्ये) जुगलबंदीची खासियत काय असेल?

- जुगलबंदी ही नेहमी दोन कलाकारांच्या समजूतदारपणावर रंगते. एकमेकांच्या सादरीकरणाविषयी आदर असलेल्या दोन कलाकारांचीच अप्रतिम जुगलबंदी होऊ शकते. उपाध्ये यांच्याशी माझी ओळखही संगीताच्या समान आवडीमुळेच झाली. त्यांचे व्हायोलिन ऐकल्यावर फक्त वाद्यांच्याच नाही, तर मनाच्याही तारा जुळल्या.

कुठल्या वाद्यासह सतारची जुगलबंदी सर्वांत सुंदर होऊ शकते?

- मी पं. राजन-साजन मिश्रा आणि राशीद खान यांसारख्या गायकांसह जुगलबंदी केली आहे. सतारसह तारवाद्यांची जुगलबंदी चांगली होतेच; पण गायकासह अधिक चांगली होईल, असे वाटते.

एखाद्या कलाकाराला पुरस्कार मिळणे ही किती महत्त्वाची गोष्ट असते?

- पुरस्कार म्हणजे कलाकाराचे कौतुक असते. 'पद्म'सारखे राजकीय आणि 'कुमार गंधर्व सन्मान'सारखे सांगीतिक असे दोन प्रकारचे पुरस्कार कलाकाराला मिळतात. मात्र, आपली राजकीय पुरस्कारांची व्यवस्था फार मंदावली आहे. कलाकाराचा सांगीतिक अनुभव, वय आणि कुवतीनुसार योग्य वेळी त्यांना पुरस्कार द्यायला हवा. सांगीतिक क्षेत्रात विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर, बऱ्यापैकी मोठा अनुभव गाठीशी जमा झाल्यावर कलाकारांना पुरस्कारापलीकडचे एक सांगीतिक समाधान लाभलेले असते. मात्र, नेमक्या त्याच वेळी कलाकारांना आपल्याकडे राजकीय पुरस्कार दिले जातात. त्या वेळी कलाकारांना पुरस्कार मिळाला काय, किंवा नाही मिळाला काय, काहीच फरक पडत नाही.

दुसरे कुठले वाद्य शिकण्याचा कधी प्रयत्न केला नाही का?

- माझी आता सातवी पिढी सतारवादन करते आहे. घराण्याच्या परंपरेनुसार सतार वादनच करायला हवे, असा काही कुणाचा घरातून आग्रह नसतो. अर्थात, मी कधी दुसरे कुठले वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला नाही; पण माझे पुतणे तबला आणि सरोद वादन करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजपने आत्मपरीक्षण करावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधायक राष्ट्रवादाचा मी केलेला गौरव भाजपला समजत नसेल, तर त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो. भाजपने माझा पुतळा जाळून असहिष्णुतेवरच शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा सांस्कृतिक दहशतवाद व मुस्कटदाबी मी सहन करणार नाही. त्यांच्या या राजकारणामुळे त्यांनाच फटका बसेल,' अशा शब्दांत टीकास्त्र सोडत भाजपने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी 'मटा'शी बोलताना दिला.

मोदींच्या पाकिस्तान भेटीसंदर्भात केलेल्या विधानामुळे डॉ. सबनीस अडचणीत आले आहेत. डॉ. सबनीस यांना विरोध होऊ लागला असून, अध्यक्षांना संमेलनस्थळी प्रवेश करू देणार नाही, अशी भाषा भाजपच्या गोटातून बोलली जाऊ लागली आहे, या संदर्भात 'मटा'शी बोलताना डॉ. सबनीस यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. 'पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेची पेरणी करत आहेत. मोदींची विधायक राष्ट्रवादी भूमिका गौरवास्पद आहे. एक नागरिक म्हणून मला त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते, पण भाजपला हे कौतुक कळत नसेल तर त्यांनी माझ्या भाषणाचा अभ्यास करावा,' असा सल्ला डॉ. सबनीस यांनी देत विरोधकांवर हल्ला चढवला.

'मी लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलो आहे. माझा पुतळा जाळणे राज्यघटनेला धरून नाही. विचार स्वातंत्र्य हे घटनेने दिले आहे. पुतळा जाळणे हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपला सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासायचा असेल, तर माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग नाही. मी माझी भूमिका मांडत राहणार. मोदींचा गौरव हा गुन्हा नाही. गौरव करणाऱ्याचा पुतळा जाळल्याने मोदींच्या विरोधात कोण आहे, ते स्पष्ट होते,' अशी टीका करत आगामी संमेलनावर काही परिणाम होणार नसून भाजपच्या राजकारणावरच या प्रकारांचा परिणाम होईल, असेही डॉ. सबनीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षरदानातून शाळांसाठी ग्रंथालये

$
0
0

Abhijit.Thite@timesgroup.com

पुणे : एक पुस्तक एखाद्या माणसाचे आयुष्य बदलू शकते, या वाक्यावर विश्वास असलेल्या कौस्तुभ बंकापुरे या कोल्हापुरमधील तरुणाने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा ध्यास घेतला आहे. मुलांच्या विकासासाठी झटणाऱ्या कोल्हापुरातील समर्थ विद्यामंदिर आणि नागपुरातील ग्लोबल व्हिलेज स्कूल या दोन शाळांना त्याने उत्तमोत्तम पुस्तके मिळवून देण्याचे ठरविले आहे. याला सर्वांचाच हातभार लागावा यासाठी त्याने पुस्तकदान ही योजना आखली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. थिएटर रिसोर्स या स्वतःच्या संस्थेमार्फत कौस्तुभ हे काम करतो आहे.

'समर्थ विद्यामंदिर ही सर्वसमावेशक शाळा आहे. येथे नियमित विद्यार्थांबरोबर अपंग आणि पारधी समाजातील विद्यार्थीही शिक्षण घेतात. नागपूरमधील ग्लोबल व्हिलेज स्कूल ही शेतीप्रधान शाळा आहे. या शाळेत पहिलीपासून नियमित विषयांबरोबर शेतीचेही शिक्षण दिले जाते. या दोन वेगळ्या प्रकारे काम करणाऱ्या शाळा असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना प्राधान्य दिले,'असे कौस्तुभ सांगतो. त्याच्या या उपक्रमाला विविध शहरांतील संस्था आणि व्यक्तींचे सहकार्यही लाभले आहे.

या योजनेमध्ये सर्वसामान्यांना किमान एक पुस्तक दान करून सहभागी होता येईल. पुस्तक नवीनच घ्यावे असेही नाही. घरातील वाचून झालेले पुस्तक असले तरी चालेल. फक्त त्याची पाने फाटलेली नकोत आणि ते चांगल्या परिस्थिती असावे, हीच अट आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना वाचण्यायोग्य कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ऐतिहासिक, भौगोलिक, कला अशा कोणत्याही विषयांवरील गुणात्मक पुस्तके चालतील. ३१ डिसेंबर रोजी गोळा झालेली सर्व पुस्तके या दोन शाळांना देण्यात येणार आहेत. अधिक माहिती आणि आपल्या शहरातील पुस्तक स्वीकारणाऱ्या केद्रांसाठी ९४२३९८१३११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images