Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बांधकाम कंपनीला आयोगाचा दणका

0
0

ग्राहकाला अकरा लाख रुपये देण्याचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फ्लॅटचा ताबा देताना ग्राहकाला मंजूर करण्यात आलेल्या जागेपेक्षा प्रत्यक्षात कमी जागा दिल्याप्रकरणी बांधकाम कंपनीला राज्य ग्राहक आयोगाच्या पुणे सर्किट बेंचने दणका दिला आहे. संबंधित बांधकाम कंपनीने अकरा लाख दोन हजार ७९४ रुपयांची नुकसानभरपाई ग्राहकाला द्यावी,' असा आदेश​ दिला आहे.

राज्य ग्राहक आयोगाकडून पुण्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंग उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत या दाव्याची प्रथम सुनावणी घेण्यात आली होती. राज्य ग्राहक आयोगाचे पीठासीन न्यायिक सदस्य पी. बी. जोशी, न्यायिक सदस्य धनराज खामतकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी दीपक सीताराम देसाई (रा. कोथरुड) यांनी ग्राहक आयोगाकडे 'धीरज असोसिएट्स'विरुद्ध दावा दाखल केला होता. अर्जदार देसाई यांच्यातर्फे अॅड. डी. जी. संत यांनी काम पाहिले.

अर्जदार यांनी २००९मध्ये 'क्रिश अपार्टमेंट' रास्ता पेठ येथे फ्लॅट क्रमांक १०१ हा फ्लॅट ५३ लाख रुपये देऊन विकत घेतला होता. त्याचा करार करण्यात आला होता. विरुद्ध पक्षाचा बिल्डिंगचा प्लॅन मंजूर करण्यात आला. त्यावेळी फ्लॅटच्या क्षेत्रफळात बदल करण्यात आले. फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर अर्जदार यांनी आर्किटेक्चरकडून फ्लॅटचे क्षेत्रफळ मोजून घेतले. अर्जदारांना ११८.९५ चौरस मीटरचा फ्लॅट देण्यात येणार होता. प्रत्यक्षात फ्लॅटचे क्षेत्रफळ त्यापेक्षा कमी होते.

या प्रकरणी अर्जदार यांनी संबंधितांना नोटीस पाठविली. त्यांच्या नोटीशीला उत्तर देऊन त्यांची तक्रार फेटाळण्यात आली. या प्रकरणी अर्जदार राज्य ग्राहक आयोगाकडे दावा दाखल केला. फ्लॅटसंदर्भात करण्यात आलेला करार, आर्किटेक्चरकडून मोजून घेतलेल्या जागेची कागदपत्रे आयोगापुढे सादर करण्यात आली. संबंधितांनी अर्जदाराला सेवा देताना त्रुटी ठेवल्याचे आयोगाने निकालात नमूद केले. अर्जदाराला ३७.५१ चौरस मीटर जागा कमी देण्यात आली. याप्रकरणी विरुद्ध पक्षाने ११ लाख दोन हजार ७९४ रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच, कमी जागा दिल्याचे नमूद करुन चूक दुरुस्ती करार करुन द्यावा, असा आदेश आयोगाने दिला.

'व्हीसी'द्वारे सुनावणी

राज्य ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच पुण्यात स्थापन करण्यात आले आहे. या सर्किट बेंचची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुंबईतून सुनावणी घेण्यात येते. पुण्यात हा उपक्रम सुरू करण्यात आल्यानंतर पहिली सुनावणी या दाव्याची झाली होती. व्हिडिओ कॉन्फ​रसिंगचा उपक्रम चांगला आहे. मात्र त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, चांगली सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. डी. जी. संत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुकीची माहिती देणाऱ्यांना नोटिसा

0
0

पासपोर्ट कार्यालयातर्फे क्लिअरन्स ड्राइव्ह उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन वर्षातील पासपोर्टची पेंडन्सी संपविण्यासाठी पासपोर्ट कार्यालतर्फे क्लिअरन्स ड्राइव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत २०१४पूर्वीचे प्रलंबित अर्ज, तसेच अपुऱ्या कागदपत्रांमुळे रखडलेले अर्ज आणि घरच्या पत्त्याची चुकीची माहिती दिलेल्या अर्जदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

पासपोर्टसाठी अर्ज भरला; पण कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेले अनेक अर्ज कार्यालयामध्ये पडून राहिले आहेत. वर्ष पूर्ण होऊनही या नागरिकांनी कार्यालयाकडे चौकशी केलेली नाही. अशा नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता करा, अन्यथा तुमची फाइल बंद करण्यात येईल, अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच, अनेकांनी पासपोर्टचे नूतीनकरण केले; पण पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्याबद्दल नकारात्मक अहवाल आला आहे. काहींनी नूतनीकरणादरम्यान पत्ते बदल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाला कळविली नसल्याचे उघडकीस आले आहे. या लोकांनाही नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

नागरिकांवर होणार कारवाई

चुकीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पासपोर्ट कार्यालयातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस आणि पासपोर्ट अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड, गरज पडल्यास पासपोर्ट रद्द करणे अथवा दोन वर्षे तुरुंगाची शिक्षा नमूद करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना पासपोर्टचे गांभीर्यच समजत नसल्याने ते कागदपत्रांची पूर्तता करताना अर्धवट माहिती देतात. या अर्जदारांमुळे पासपोर्ट आणि पोलिस या दोघांचाही वेळ वाया जातो. त्यामुळे आम्ही अशा अर्जदारांना नोटीस पाठविल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांना मूकसंमती देणारे गोत्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहने चालविणाऱ्या 'तळीरामां'बरोबरच त्यांच्याशेजारी गाडीत बसलेल्या सहप्रवाशांनाही आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मद्य पिऊन वाहन चालविण्यास मूक संमती दिल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत ४५ जणांवर कारवाई करण्यात आली असून, या सहप्रवाशांमध्ये तरुणींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे दंडाची पावती फाडून नव्या वर्षाची सुरुवात करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

'वाहनचालक दारू प्यायला असेल, आणि तो दारू प्यायला असल्याची माहिती असतानाही त्याच्यासोबत कोणी प्रवास करत असेल, तर त्यांच्यावर मोटार परिवहन कायद्यातील १८८नुसार कारवाई करण्यात येते. गेल्या दो​न दिवसांत अशा प्रकारे ४५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे,' अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी 'मटा'ला दिली.

वाहतूक पोलिसांनी या महिनाभरात साडेआठशे तळीरामांवर कारवाई केली आहे. तळीराम चालकासोबत दुचाकीवर पाठीमागे असलेली व्यक्ती, तसेच चारचाकी वाहनांमध्ये बसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.

वाहन नोंदणीही स्थगित

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांच्या ड्रायव्हिंग लायसेन्सबरोबरच ते चालवित असलेल्या वाहनाचे रजिस्ट्रेशनच स्थगित करण्याचे आदेश मोटार वाहन कोर्टाने दिले आहेत. वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत कोर्टात पाठवलेल्या खटल्यांपैकी २४२ वाहनांचे रजिस्ट्रेशन किमान दोन ​महिने, तर कमाल एक वर्षांपर्यंत स्थगित केले आहेत. यावर्षी सुमारे पाच हजार मद्यपींवर कारवाई केली आहे. तर, गेल्या दोन महिन्यांत ५२० मद्यपींविरुद्ध कोर्टात खटले पाठवण्यात आले होते. कोर्टाने त्यापैकी २६१ खटल्यांचा निकाल दिला.

२८ ठिकाणी नाकाबंदी

थर्टी फस्टच्या रात्री वाहतूक पोलिसांकडून तळीरामांवर कारवाई करण्यासाठी शहरात २८ ठिकाणी नाकांबदी करण्यात आली आहे. ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने वाहन चालकांची तपासणी करण्यात केल्यानंतर कारवाई करण्यात येते. कोर्टाने तळीराम वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले आहे. त्याशिवाय आता वाहनांचे रजिस्ट्रेशनच रद्द करण्यात येत असल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेलिबेशन@फार्म हाउस

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल, रेस्तराँमध्ये होणारी गर्दी, गजबज आणि वेटिंग टाळण्यासाठी अनेक उत्साही पुणेकरांनी 'आउटिंग' करण्याला प्राधान्य दिले. शहराबाहेर असलेल्या रिसॉर्ट आणि फार्म हाउसमध्ये त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले.
पार्ट्यांमधील गोंधळ, अनेक नियमांची पूर्तता करण्यापेक्षा या स्व‍च्छंदी मंडळींनी महाबळेश्वर, पाचगणी, खडकवासला, मुळशी, पौड, ताम्हिणी, लोणावळा परिसरातील फार्म हाउसचे बुकिंग केले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच सातारा रोड, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे, मुळशीच्या रस्त्यावर दिसून येत होत्या.
शहर आणि परिसरामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर गेल्या काही वर्षात अनेक बंधने आली असून, तळीरामांच्या गैरप्रकाराचे प्रमाणही वाढते आहे. याशिवाय परतीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी, पोलिसांचा बंदोबस्त टाळण्यासाठी मुख्यतः कौटुंबिक मंडळींनी शहराबाहेरी निवांत सेलिब्रेशनला प्राधान्य दिले. लहान मुलांची गैरसोय होणार नाही आणि नवीन वर्षाचे स्वागतही करता येईल, असा विचार करून या मंडळींनी मित्रमैत्रिणींच्या घरी अथवा वीकेंड होम असलेल्या फार्म हाउसवर गेट टुगेदर साजरे केले.
रस्त्यावरील गर्दी आणि हॉटेलमधील वेटिंग टाळण्यासाठी कौटुंबिक पुणेकरांनी घरच्या घरी गेट टुगेदर करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत केले. दरवर्षीच हिट ठरणारी पावभाजी, मटार उसळ आणि ब्रेड, बिर्याणी, छोले अशा पदार्थांबरोबरच पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, केक अशा चटपटीत पदार्थांचे बेत घरोघरी करण्यात आले होते. घरगुती पार्ट्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हॉटेल चालकांनीही खास नवीन वर्षानिमित्त होम डिलिव्हरीच्या विशेष ऑफर, सवलती जाहीर केल्या होत्या. मांसाहारी पदार्थांच्या डिशसाठी एक दिवस आधी बुकिंगही करण्यात आले होते. त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत अनेक सोसायट्यांच्या बाहेर ठिकठिकाणी होम डिलिव्हरी देणारे कार्यकर्ते दिसून येत होते. पहाटेपर्यंत सोसायट्यांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचे 'स्नेहसंमेलन'सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवताप कार्यालयातील ‘त्या’कर्मचांऱ्यांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोहगाव रस्त्यावरील जिल्हा हिवताप कार्यालयात भर दिवसा रंगणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पार्ट्यांची गंभीर दखल आरोग्य खात्याने घेतली आहे. संबंधित पार्ट्यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून, संबंधितांविरोधात लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
अशी माहिती आरोग्य विभागाच्या मलेरियाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी ही माहिती दिली. लोहगाव रस्त्यावरील जिल्हा हिवताप कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून काही कर्मचारी मलेरिया निदान चाचण्या करण्याऐवजी दारूच्या पार्ट्या करीत होते. त्याशिवाय कार्यालय संपल्यानंतरही त्यांच्या पार्ट्या रंगलेल्या असत. त्याशिवाय जुगारदेखील खेळला जात असे. या प्रकऱणांसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात होते. या संदर्भात 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून हे प्रकरण उघडकीस आणले होते.
या संदर्भात जिल्हा हिवताप कार्यालयातील रंगलेल्या पार्ट्यांसंदर्भात अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अशोक रासगे यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्याशिवाय अतिरिक्त जिल्हा आऱोग्य अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचे आदेशही डॉ. जगताप यांनी दिले होते.
या संदर्भात विचारता डॉ. जगताप म्हणाल्या,'संबंधित पार्ट्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल आपल्याकडे बुधवारी प्राप्त झाला आहे. त्या अहवालातील बाबींनुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांमध्ये पार्टीसाठी यंदा २०० परवाने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला आयोजित करण्यात येणाऱ्या विनापरवाना पाटर्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस आणि महसूल विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आल्यावर खबरदारी म्हणून पहिल्यांदाच काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी नागरिकांनी परवाने घेतले. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक दिवसासाठी पार्टी करण्यास २०० परवाने द्यावे लागले.यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस आणि करमणूक कर विभाग यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढली. विशेष म्हणजे त्यामध्ये काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी आतापर्यंत परवाना घेण्यात येत नव्हता. या वर्षी सात ते आठजणांनी परवाना घेतला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले.गेल्यावर्षी ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी १६५ जणांनी परवाने घेतले होते. या वर्षी २०० जणांनी परवाने घेतले. एक दिवसासाठी पार्टी करण्यास १३ हजार २५० रुपये शुल्क आकारण्यात येते, असे फुलपगार यांनी स्पष्ट केले.मद्य विक्रीसाठी उत्पादन शुल्क विभागाची, तिकीट विक्रीवर मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तर करमणूक कर शाखेची आणि डीजे संगीत वाजवयाचे असल्यास पोलिसांची परवानगी आवश्यक असते. या वर्षी या तिन्ही विभागांनी समन्वय साधत अवैध पार्ट्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने परवान्यांची संख्या वाढल्याचे फुलपगार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात भरती

0
0

दहा हजार कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात भरती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एकीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची वानवा असताना राज्याच्या आरोग्य विभागात दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
राज्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, तृतीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे यामुळे आरोग्य सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोग्य विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मलेरिया विभागाची आढावा बैठक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. त्या वेळी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. कांचन जगताप, साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते. डॉ. सावंत यांना रिक्त पदांसंदर्भात विचारता त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
'राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. त्या करिता गेल्या काही महिन्यात १८८० पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यापैकी १०३९ जागांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांवर भरती करण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय आरोग्य खात्यात तृतीय आणि चतुर्थश्रेणी विभागातील सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा खात्याने निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी येत्या चार जानेवारीला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे,' अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात बोलण्याचे मात्र त्यांनी या वेळी टाळले.
...............
पुण्यात डेंगी, मलेरियाचा प्रादूर्भाव नाही
गेल्या काही महिन्यांपासून डेंगीच्या डासाने पुण्यात थैमान घातले होते. त्यामुळे घरोघरी डेंगीचा ताप असलेल्या पेशंटची संख्या वाढत होती. त्या संदर्भात मलेरिया, डेंगीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यात मलेरियाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मलेरियाचे पेशंट आढळत आहेत. त्याशिवाय पुण्यात मलेरिया, डेगींचा प्रादूर्भाव कमी आहे, असा दावा डॉ. दीपक सावंत यांनी केला. पुण्याबरोबर मुंबईत मात्र डेंगीच्या तापाचे पेशंट आढळत असून तेथे उपाययोजना सुरू केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी अनुदान कपातीवरून पुणे पालिकेत गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थानिक संस्था करात (एलबीटी) केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपोटी पालिकेला मिळणाऱ्या अनुदानात सरकारने कपात केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. पुण्याचा निधी सरकारने पळविल्याची टीका करत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मनसेनेही राज्य सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.
राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटीच्या कररचनेत बदल केला. त्यामुळे, होणारे पालिकांचे आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारीही सरकारने घेतली. त्यानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत प्रत्येक पालिकेला ठरावीक रक्कम अनुदान स्वरूपात दिली जात होती. महापालिकेला दर महिन्याला ८१ कोटी रुपयांप्रमाणे पाच महिन्यांत चारशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली. मात्र, एलबीटीतील बदलांमुळे राज्यातील काही पालिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घडले आहे. त्यांना मदत करण्यासाठी जानेवारीच्या एलबीटी अनुदानात पुणे, पिंपरीसह नाशिक पालिकेच्या आर्थिक मदतीला कात्री लावण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी सर्वसाधारण सभेत उमटले. सभा सुरू होताच, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी आणि मनसेनेही सरकारच्या निर्णयाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. महापौरांसमोरील मोकळ्या जागेत एलबीटीचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, अशी एकमुखी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच, याबाबत खुलासा करण्याचा आग्रह धरण्यात आला.
'एलबीटीच्या अनुदानाचे सूत्र निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढ मिळणार आहे. त्यामुळे, पालिकेच्या हक्काचे सर्व अनुदान सरकारकडून निश्चित प्राप्त होईल', असा दावा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला.
आयुक्तांच्या खुलाशानंतरही सदस्यांचे समाधान झाले नाही. पालिकेला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात एक रुपयाचीही कपात होता कामा नये, असा आग्रह धरण्यात आला. अखेर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. पालिकेला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम पूर्ववत ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्‍यांकडे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने सर्वप्रथम स्थानिक संस्था कररचनेत बदल केले, त्यानंतर पेट्रोल-डिझेलरील एलबीटी रद्द केला, कर न भरणाऱ्यांसाठी अभय योजना लागू केली; तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या तपासणीची परवानगी नाकारत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न स्रोतांवर मर्यादा घालण्याचे काम केले. मुद्रांक शुल्कावरील अधिभारातून मिळणारे उत्पन्नही घटत चालले असल्याने पुण्यासारख्या शहराच्या विकासासाठी सरकारने पूर्वीप्रमाणेच एलबीटीचे संपूर्ण अनुदान द्यावे, असे पत्र महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजच्या सिनेसंगीतात ‘रस’ नाही

0
0

आजच्या सिनेसंगीतात 'रस' नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'हल्लीच्या हिंदी सिनेसंगीतात माधूर्य (मेलडी) जराही नाही आणि चांगले शब्दही कुठेच दिसत नाहीत. सध्या पर्कशन्स, ताल आणि ऑर्केस्ट्रेशनवरच सर्वाधिक भर दिलेला दिसतो. म्हणूनच मी सिनेमात फारशी गात नाही,' अशी भावना पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी व्यक्त केली. निमित्त होते आजपासून (दि. एक जानेवारी) सुरू होणाऱ्या 'स्वरझंकार' महोत्सवाचे.
व्हायोलिन अॅकॅडमीच्या वतीने आजपासून रौप्यमहोत्सवी स्वरझंकार महोत्सव आयोजिण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेच्या मैदानावर रोज संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या महोत्सवाची सुरुवात आज बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त व्हायोलिन वादक अतुलकुमार उपाध्ये यांना शुभेच्छा देतानाच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना पाठिंबा देणारे प्रायोजक फारच कमी असल्याची खंतही व्यक्त केली.
एके काळी मदन मोहन, उषा खन्ना, जयदेव, नौशाद यांसारख्या 'लिजंडरी' संगीतकारांकडे गायल्यानंतर परवीन यांना आज सिनेसंगीताकडे वळावेसे वाटत नाही. अनेक ऑफर्स आजही येतात आणि संगीतकार पायावर अक्षरशः लोटांगण घालतात; पण मनाला भावत नाही, तोपर्यंत मी गाणे गायची तयारी दाखवत नसल्याचे सुलताना यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतात इतकी वर्षे घालवल्यावर चुकूनसुद्धा एखादे वाईट गाणे मी गायले, तरी रसिकच मला वाईट ठरवायला पुढे- मागे पाहाणार नाहीत, अशी खात्री त्यांना वाटते. लोकांचा आदर आणि प्रेम मिळवण्यासाठीच काही बंधने स्वतःवर घालून घेतल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
'हल्ली कुणीही उठून एकमेकांसह जुगलबंदी करतात. मात्र, गुरू-शिष्य किंवा एकाच गुरूचे दोन शिष्य यांच्यातच खऱ्या अर्थाने जुगलबंदी होऊ शकते; कारण त्यासाठी कलाकार एकाच घराण्याचे असावे लागतात किंवा किमान त्या दोघांत अत्यंत सौहार्दपूर्ण नाते असावे लागते. जुगलबंदी ही स्पर्धेतून नाही, तर प्रेमातून होते,' असेही सुलताना यांनी आवर्जून सांगितले. गायकाच्या आवाजाचा दर्जा नेहमीच उच्च असतो. त्याला कुणीच कलाकार जुगलबंदीतून 'मॅच' करू शकत नाही. त्यातल्या त्यात सारंगी हे वाद्य गायकी अंगाने सादर होऊ शकते; पण स्त्री गायकाच्या आवाजाला तोड नाही. म्हणूनच मी जुगलबंदी करत नसल्याचे सुलताना यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवविविधतेतून साधणार ग्रामविकास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खेड्यांच्या आजूबाजूला आढळणारी जैवविविधताही या पुढील काळात संबंधित खेड्यांसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत ठरू शकते. औद्योगिक क्षेत्रामध्ये या जैवविविधतेमधील विविध घटकांच्या होणाऱ्या वापराच्या बदल्यात संबंधित खेड्यांना वा गावांना मोबदला देण्यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने सुरू केले आहेत. या माध्यमातून जैवविविधतेची ओळख होण्यासोबतच ग्रामविकास साधण्यासाठीही व्यापक प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण विभागाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी मावळ आणि मुळशी तालुक्यांमधील काही खेड्यांमध्ये काम सुरू झाले आहे. विभागाचे संचालक डॉ. एरिक भरुचा यांनी या उपक्रमाविषयी गुरुवारी 'मटा'ला माहिती दिली. त्यावेळी मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाच्या बारकाव्यांवरही डॉ. भरुचा यांनी प्रकाश टाकला.
डॉ. भरुचा म्हणाले, 'जैवविविधतेची नेमकी ओळख व्हावी, त्याचे संवर्धन व्हावे, स्थानिक पातळीवर त्या विषयी जनजागृती व्हावी, यासाठी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आखले जात आहेत. हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. त्यासाठी विद्यापीठाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबतच मावळ आणि मुळशी तालुक्यातील स्थानिक शालेय विद्यार्थ्यांमध्येही जैवविविधतेविषयी जागरुकता निर्माण केली आहे. त्या आधारे हे विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आपापल्या भागात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी, त्यांच्या वेगवेगळ्या जाती आणि प्रकारांची बारकाईने माहिती गोळा करत आहेत. ही माहिती त्या गावाची संपत्ती म्हणूनच ओळखली जाणार आहे.'
त्यासाठीच्या तांत्रिक बाबींवरही डॉ. भरुचा यांनी प्रकाश टाकला. जैवविविधतेच्या माध्यमातून संबंधित गावांपर्यंत थेट निधी उपलब्ध होण्यासाठीची यंत्रणा जैवविविधता मंडळाने विकसित केली आहे. त्यासाठी गावांच्या पातळीवर स्थानिक जैवविविधता समिती गठित केली जाणार आहे. या समित्यांना राज्य मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील जैवविविधतेची नेमकी नोंद केली जाणार आहे. मंडळाकडून या नोंदींची पडताळणी करून, संबंधित गावामध्ये आढळणारी जैवविविधता ही त्या गावाशी जोडली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात या जैवविविधतेमधून वापरल्या जाणाऱ्या घटकांसाठी संबंधित औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून त्या गावाला विशिष्ट निधी उपलब्ध करून दिला जाईल. या निधीमधून पुढील टप्प्यात जैवविविधतेच्या विकासासाठीचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही डॉ. भरुचा यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदना शिवा यांना यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान

0
0

वंदना शिवा यांना यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातव्या किर्लोस्कर वसुंधरा सन्मानांची घोषणा करण्यात आली असून, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या सात किर्लोस्कर वसुंधरा सन्मानांची घोषणाही आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

डॉ. वंदना शिवा यांना वसुंधरा सन्मान, बिट्टू सहगल यांना जीवन गौरव, नोरफेल चेवांग यांना वसुंधरा मित्र (कार्यकर्ता), सुरेश एल्मॉन यांना वसुंधरा मित्र (फिल्म मेकर), डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया, दिल्ली यांना वसुंधरा मित्र (संस्था), आयझॅक किहीमकर यांना ग्रीन टीचर पुरस्कार, तर महाराष्ट्र टाइम्सच्या वरिष्ठ बातमीदार चैत्राली चांदोरकर यांना ‌इको जर्नालिस्ट सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दहाव्या वर्षात पर्दापण करत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १३ जानेवारीदरम्यान हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात १७५ चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीशी निगडीत विविध कार्यक्रम होणार आहेत. स्मार्ट वॉक, चर्चासत्र, मानवी साखळी, स्मार्ट सिटी कार्निव्हल, स्मार्ट सिटी या विषयावर तयार करण्यात आलेले नाटक या वेळी सादर करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी अनिरुद्ध चाओजी, रुषल चकोर, सुप्रिया चित्राव, संदीप देसाई, मयूर वैद्य, सुप्रिया गोटूरकर, जुई तावडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पोलिसांचे नवी वेबपोर्टल सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या www.punepolice.co.in या नवीन वेबपोर्टलचे उद्घाटन पोलिस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यात पुढील आठवड्यात पोलिस दलाच्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची वेबसाइट नवीन रूपात तयार करण्यात आली आहे.
आयुक्तालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या साइटचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद, अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, प्रदीप रासकर, पोलिस उपायुक्त मकरंद रानडे, दीपक साकोरे, पी. आर. पाटील आणि राज्य राखीव दलाच्या ग्रुप दोनचे कमाडंट मनोज पाटील या वेळी उपस्थित होते.
नव्याने तयार करण्यात आलेली ही वेबसाइट नागरिकांना हाताळण्यास सोपी आहे. कम्प्युटर, टॅब आणि मोबाइलवरही सहजतेने हाताळता येणार आहे. पोलिस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्याच्या दृष्टीने ही वेबसाइट अतिशय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास पोलिस आयुक्त पाठक यांनी व्यक्त केला.
चारित्र्य पडताळणी, विविध परवानगी याशि‍वाय वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिकांना आवश्यक सर्व प्रकारचे फॉर्म वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत. पुणे पोलिस दलाची माहिती, अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे कार्यक्षेत्र याचीही माहिती देण्यात आली आहे, असे साकोरे यांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांच्या संकल्पनेतून या वेब पोर्टलची डिझाइन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सहायक आयुक्त किशोर नाईक, पोलिस निरीक्षक अरुण वायकर, सहायक निरीक्षक गिरीशा लिंबाळकर, संजय ठेंगे, पोलिस शिपाई उमेश चिकणे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. इन्फोसिस्टीमचे सर्वेश सोनवणे यांनी ही साइट डेव्हलप केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वरझंकार’ महोत्सवास आजपासून दिमाखात प्रारंभ

0
0

'स्वरझंकार' महोत्सवास आजपासून दिमाखात प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्हायोलिन अॅकॅडमीच्या वतीने आजपासून (दि. एक जानेवारी) स्वरझंकार महोत्सवास सुरुवात होत आहे. महोत्सवाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर दररोज संध्याकाळी सहा वाजता महोत्सवातील मैफली होतील.
महोत्सवाची सुरुवात आज पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर विख्यात मोहनवीणावादक पं. विश्वमोहन भट यांच्या सादरीकरणाने पहिल्या दिवशीच्या सत्राची सांगता होईल. संस्थेतर्फे या वेळी 'रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार' ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग यांना, युवावादक आणि गायकांना दिला जाणारा 'गुरुवर्य बा. शं. उपाध्ये स्मृती पुरस्कार' औरंगाबाद येथील युवा व्हायोलिनवादक नीलेश विश्वनाथन आणि युवा गायक अमोल निसळ यांना प्रदान केला जाणार आहे. 'डॉ. विनोद देऊळकर स्मृती पुरस्कार' तरुण आश्वासक तबलावादक नीलेश रणदिवे यांना देण्यात येईल.
..................
'स्वरझंकार' महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका नावडीकर म्युझिकल्स (कोथरूड), दिनशा अँड कंपनी (लक्ष्मी रोड), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्क), मराठे ज्वेलर्स (पौड रोड), पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स (लक्ष्मी रोड व कॅम्प), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, अण्णा भाऊ साठे सभागृह (सातारा रोड) मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क ः ८९७५००३२१३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावीस वरिष्ठ पोलिसअधिकाऱ्यांच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील २२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात पुण्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तिनही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यात अप्पर आयुक्त प्रदीप रासकर, प्रकाश मुत्याल, शहाजी सोळुंके; तर पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांचा समावेश आहे.
रासकर, मुत्याल आणि सोळुंके यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. रासकर यांची नियुक्ती महाराष्ट्र गुप्तचर प्रबोधिनीच्या प्रमुखपदी, मुत्याल यांची नियुक्ती नागपूर येथे राज्य राखीव दलात; तर सोळुंके यांना जेल विभागातच पदोन्नती देण्यात आली आहे. रानडे यांना ठाणे पोलिस दलात अप्पर पोलिस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. रासकर आणि मुत्याल यांना पदोन्नती देण्यात आल्याने आता पुण्यात केवळ एकच अप्पर पोलिस आयुक्त नियुक्तीस राहिले आहेत. इतर तीन जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी चांगलीच रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
पदोन्नतीवर बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
( कंसात कोठून कोठे बदली झाली याची माहिती )
अतुलचंद्र कुलकर्णी (सह आयुक्त, क्राइम, बृहन्मुंबई ते (सह आयुक्त, क्राइम, बृहन्मुंबई) अप्पर महासंचालक) , व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण ( सह आयुक्त, ठाणे शहर ते (सह आयुक्त, ठाणे शहर) अप्पर महासंचालक), जयजित सिंघ (पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र ते अप्पर महासंचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), व्ही.के. चौबे (केंद्रीय प्रतिनियुक्ती येथून ते पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र), चिरंजीव प्रसाद (केंद्रीय प्रतिनियुक्ती येथून ते पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र), अमिताभ गुप्ता (पोलिस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा ते नियंत्रक, वैद्यमापक शास्त्र, महाराष्ट्र राज्य),
राजकुमार व्हटकर (पोलिस आयुक्त, अमरावती), कृष्ण प्रकाश (पोलिस उपमहानिरीक्षक, सीआयडी, पुणे ते पोलिस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई), एफ. के. पाटील (अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई ते पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन, पुणे), शिवाजी टी. बोडखे (अप्पर पोलिस आयुक्त, ठाणे ते पोलिस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर), विठ्ठल जाधव (अप्पर आयुक्त, वाहतुक, मुंबई ते पोलिस महानिरीक्षक, सीआयडी), किशोर जाधव (अप्पर आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते पोलिस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई), व्ही.आर. चव्हाण (अप्पर आयुक्त, नवी मुंबई ते पोलिस महानिरीक्षक, बिनतारी संदेश, पुणे), रवींद्र शिसवे (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, नागपूर शहर), दत्तात्रय मंडलिक (पोलिस अधिक्षक, सीआयडी, पुणे ते पोलिस उपमहानिरीक्षक, सीआयडी), केशव जी. पाटील (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर ते अप्पर आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), श्रीकांत तरवडे (अप्पर आयुक्त, नागपूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, सीआयडी, पुणे) आणि नितीन पवार (पोलिस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद ते पोलिस उपायुक्त, अमरावती शहर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाच्या बजेटला मान्यता

0
0

शिक्षण मंडळाच्या बजेटला मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये २६ हजारांनी घटली असतानाही, याच दहा वर्षांच्या एकूण बजेटच्या तुलनेत १९२ कोटींनी वाढ असलेल्या पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बजेटला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने गुरुवारी मान्यता दिली. घटलेली विद्यार्थी संख्या, शिक्षकांच्या बदली घोटाळ्यात अडकलेले प्रशासन आणि ढासळणाऱ्या शैक्षणिक गुणवत्तेच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी शिक्षण मंडळाला धारेवर धरले असतानाही ३४१ कोटी रुपयांच्या या बजेटला मान्यता मिळाली.
गेल्या काही काळात पालिकेचे शिक्षण मंडळ विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत आले होते. या सर्व चर्चांचे प्रतिबिंब गुरुवारी या बजेटच्या चर्चेच्या निमित्ताने पालिकेच्या मुख्य सभेत उमटले. स्थायी समितीने ३४१ कोटी ३९ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करून ते मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी ठेवले होते. पालिकेच्या शाळांची गुणवत्ता ढासळत असताना एवढ्या मोठ्या रकमेच्या बजेटची गरजच काय, असे म्हणत पालिका सदस्यांनी या बजेटविषयी सुरुवातीला आक्षेप घेतले. बजेट सादर होत असताना शिक्षण मंडळ सदस्यांची अनुपस्थिती, मंडळाच्या अहवालातून गाळलेले विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे संदर्भ समोर ठेवत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खासगी शाळांच्या तुलनेत शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर अधिक खर्च होऊनही दर्जा सुधारत नसल्याची खंतही नगरसेवकांनी व्यक्त केली.
सभागृहनेते बंडू केमसे यांनी वास्तव विचारात घेत स्थायी समितीने अंदाजपत्रकाला मान्यता दिल्याचे स्पष्ट केले. उपमहापौर आबा बागूल यांनी मंडळाचा प्रशासकीय खर्च कमी करण्याची मागणी केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मंडळाच्या खर्चात वाढ होत असतानाच, कारभार डबघाईला येत चालल्याची बाब सभेच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार नसल्याचे मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी सांगितले. सुनंदा गडाळे यांनी एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असतानाही मंडळाचे बजेट दरवर्षी वाढतेच कसे, असा रोखठोक सवाल उपस्थित केला.
.................
बदल्यांमध्ये गैरव्यहार
'खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा मोठ्या आणि प्रशस्त आहेत. शाळांसाठी मैदाने असतानाही विद्यार्थी खासगी इंग्रजी शाळेकडे का गेले आहेत, याचा शोध घ्यावा. गरज नसलेल्या शाळांवर अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. शिक्षक बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे,' असा गंभीर आरोप नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केला. मुख्याध्यापक बदलीसाठी १० हजार, तर शिक्षक बदलीसाठी पाच हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप मनसेच्या किशोर शिंदे यांनी केला.
..................
विद्यार्थी घटले आणि बजेट फुगले
गेल्या दहा वर्षांत मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २६ हजारांनी घटली असतानाच मंडळांचे बजेट मात्र १९२ कोटींनी वाढले असल्याचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सभागृहात निदर्शनास आणले. एका विद्यार्थ्यावर महापालिकेकडून तब्बल ४६ हजारांचा खर्च केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मंडळ प्रशासनाने दाखविलेल्या उदासिनतेवरून त्यांनी मंडळाचे कान टोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरभर तरुणाईचा जल्लोष

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
झगमगती रोषणाई... आकाशातील सोडलेले दिवे आणि फुगे... हॉटेल व कॅफेबाहेर सेल्फी काढण्यात दंग असलेली तरुणाई... वाहतुकीची झालेली कोंडी... फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी... हॅपी न्यू इयर म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा...
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये असे चित्र पहायला मिळाले. उपनगरातील हॉटेल आणि क्लबमध्ये मोठी गर्दी झाली होती. पंचतारांकित हॉटेल आणि क्लबमध्ये डीजेच्या दणदणाटात न्यू इयर पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातल्या प्रमुख रस्त्यांसह सर्वच ठिकाणी गर्दीचे वातावरण होते. या भागातील हॉटेल्स आणि कॅफेही फुल्ल झाले होते. अनेक हॉटेलबाहेर वेटिंगसाठी रांग लागल्याचेही चित्र पहायला मिळाले. हॉटेलिंग करण्यासाठी अनेकांनी मॉलमध्ये भटकंती करण्याला पसंती दिली होती. त्यामुळे सेंट्रल मॉल, इनऑर्बिट मॉल, मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.
फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोज, कॅम्प, कोथरूड, चांदणी चौक, सिंहगड रोड या भागात रस्तावर गर्दी होती. तरुणाईचे ग्रुप रस्त्यांवर भटकत सेल्फी-ग्रुपी काढण्यात दंग झाले होते. एस. एम. जोशी पूल, काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज), विठ्ठल रामजी शिंदे पूल अशा ठिकाणी तरुणाईसह नोकरदार वर्गाच्या गप्पांचे फड रंगले होते. पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवागनगी असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच, पेट्रोलिंगही करण्यात येत होते. महामार्गांवरून शहरात येणाऱ्या वाहनांवर आणि गाडी चालवणाऱ्या तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.
नव्या वर्षाचे स्वागत करण्यात तरुणाईचा अतिउत्साहही होता. सुसाट वेगाने कार-बाइक चालवत, जोरजोराने हॉर्न वाजवत, आरडाओरड करत तरुणांचे ग्रुप फिरत होते. एकाच बाइकवर तिघा-चौघांनी बसण्याचा केलेला 'पराक्रम'ही दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदातील ‘संस्कृत’ची ‘सीसीआयएम’ला अॅलर्जी

0
0

आयुर्वेदातील 'संस्कृत'ची 'सीसीआयएम'ला अॅलर्जी

Mustafa.Attar@timesgroup.com
पुणे : प्राचीन काळापासून आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या संस्कृत विषयालाच आयुर्वेदाच्या साडेचार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातूनच हद्दपार करण्याचा घाट 'सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन'ने (सीसीआयएम) घातला आहे. त्यामुळे आयुर्वेदातील १५० गुणांचा असलेला स्वतंत्र संस्कृत विषय अवघ्या ५० गुणांवर आणून ठेवल्याने या भाषेची 'सीसीआयएम'ला 'अॅलर्जी' आहे का, असा सवाल आयुर्वेदतज्ज्ञांकडून केला जात आहे.
आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून संस्कृत विषयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागाकडे 'सीसीआयएम'ने मंजुरीसाठी पाठविला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला आयुर्वेद विश्वातून विरोध होऊ लागला आहे.
'आयुर्वेदाच्या वैद्यकीय पदवीच्या अभ्यासक्रमातील संहिता (मूळ ग्रंथ) संस्कृत भाषेत आहेत. बीएएमएस पदवी अभ्यासक्रमात संस्कृत हा स्वतंत्र विषय शिकविला जातो. या विषयाची लेखी, तोंडी परीक्षा घेतली जाते. पूर्वी २५० गुणांचा असलेला विषय सध्या १५० गुणांचा केला आहे. आणखी कपात करून ५० गुणांसाठी आयुर्वेद अभ्यासक्रमात त्याचे महत्त्व ठेवले आहे. आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा येणे आवश्यक आहे. त्या करिता संस्कृतमधील व्याकरणांचे ज्ञान शिकविले जाते. परिणामी, संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथाचा अभ्यास करणे सोपे जावे हाच विषय शिकविण्याचा हेतू आहे. पदवी अभ्यासक्रमात ५० गुणांसाठी विषय ठेवल्याने भावी डॉक्टरांना आयुर्वेदाचे ज्ञान मिळण्यात मोठी अडचण ठरणार आहे,' अशी माहिती टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि काय चिकित्सा विभागप्रमुख डॉ. सदानंद देशपांडे यांनी 'मटा'ला दिली.
'आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षात आयुर्वेदाचा इतिहास हा विषय वगळण्यात आला असून पदार्थविज्ञान विषयालाही कात्री लावली आहे. चरक (मेडिसीन), सुश्रृत (सर्जरी), काश्यप (स्त्री रोग) हे आयुर्वेदातील मूळ ग्रंथ पाच हजार वर्षांपासून संस्कृत भाषेत आहेत. संस्कृतचे देशात महत्त्व वाढत असताना ते आणखी वाढविण्याऐवजी कमी करण्याचा 'सीसीआयएम'चा प्रयत्न आहे,' असा आरोप सीसीआयएमचे माजी सदस्य डॉ. सुहास परचुरे यांनी केला.
...............
विषयांची संस्कृत नावे झाली मॉडर्न
परदेशी विद्यार्थ्यांना आयुर्वेद अभ्यासक्रमातील संस्कृत भाषेतील असलेली विविध विषयांची नावे समजण्यास अवघड जातात. त्या करिता विषयांची बदललेल्या नावांना आयुर्वेद तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. आयुर्वेदाचा पाया असलेल्या 'द्रव्यगुण विज्ञान' (हर्बल मेडिसीन) याचे नाव बदलून 'आयुर्वेदीय मटेरिया मेडिका' असे ठेवले. 'कौमारभृत्य'ऐवजी 'बालरोग', 'स्त्री रोग'चे 'आयुर्वेद गायनॉकॉलॉजी', 'शल्यतंत्र'चे 'सर्जरी' आणि 'शालक्यतंत्रा'चे 'कान - नाक- घसा', 'नेत्ररोग'ला 'ऑप्थॉलमॉलॉजी' अशी नावे ठेवण्यात आली आहेत.
................
संस्कृत भाषेतील आयुर्वेद विषयांचे पूर्वी विविध भाषांत भाषांतर झाले नव्हते. त्यामुळे हे विषय शिकणे अवघड जात होते. कालांतराने त्या विषयांचे विविध भाषांत भाषांतर झाले. त्यामुळे संस्कृत विषयाला कात्री लावण्याची गरज नव्हती. आयुर्वेदातून संस्कृत भाषेला हद्दपार केले तर आयुर्वेदाच्या मूळ ज्ञानापासून विद्यार्थी वंचित राहतील.
डॉ. सुहास परचुरे, माजी सदस्य, सीसीआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा बिरजू महाराजांचा कलाविष्कार

0
0

अनुभवा बिरजू महाराजांचा कलाविष्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कथक गुरू पं. बिरजू महाराज यांचा कलाविष्कार पाहण्याचे भाग्य पुणेकर रसिकांना लाभले आहे. 'कलाछाया' संस्थेतर्फे येत्या शनिवार-रविवारी (दि. २, ३) आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमात पं. बिरजू महाराज यांचा 'स्वरभावरंग' हा कलाविष्कार आणि 'कथ कीर्तनक' हा अनोखा कार्यक्रम पाहता येणार आहे. महान कथक गुरू अच्छन महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.
कलाछाया संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेले वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता या दोन दिवसीय कार्यक्रमातून होणार आहे. कथक गुरू अच्छन महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते शनिवारी (दि. २) संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर रामायणाची कथा कथक आणि कीर्तनाच्या मिलाफातून ऐकण्याची संधी 'कथ कीर्तनक' या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे. यामध्ये कीर्तनकार श्रेयस बडवे, गायक समीर दुबळे, सोमनाथ मिश्रा, नम्रता महाबळ आणि बासरीवादक सुनील अवचट यांचा सहभाग असेल. कलाछायाच्या विद्यार्थिनी कथक नृत्याचे सादरीकरण करतील.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सचिव तसेच महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक वाजपेयी यांचे चर्चासत्र रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजता आयोजिण्यात आले आहे. कलाकारांची कला सामान्य माणसांपर्यंत पोहोचते का, ती विशिष्ट वर्गापुरती मर्यादीत न राहता बहुसंख्यांपर्यंत कशी पोहोचेल, कलेतून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं जातंय का, राजकारण आणि कला यांच्या परस्परसंबंधांकडे नागरिक कसे पाहतात, यासारख्या अनेक गंभीर विषयांवर ते संवाद साधणार आहेत.
याच दिवशी संध्याकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध कथक नृत्यांगना शाश्वती सेन यांचे नृत्य होणार आहे. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद (तबला) आणि सोमनाथ मिश्रा (गायन) हे साथ करणार आहेत. त्यानंतर पं. बिरजू महाराज यांचा 'स्वरभावरंग' हा कार्यक्रम होणार आहे.
हे सर्व कार्यक्रम कलाछाया कॅम्पस, विखे पाटील शाळेसमोर, पत्रकार नगर रस्ता, सेनापती बापट मार्ग इथे होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘डरांव डरांव’

0
0

राज्य बालनाट्य स्पर्धेत 'डरांव डरांव'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाणे येथील ज्ञानदीप कलामंच या संस्थेच्या 'डरांव... डरांव' या नाटकाने विविध वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र सेवा संघ, मुंबई या संस्थेच्या 'तुफानातील मोती' या नाटकास द्वितीय पारितोषिक, सस्नेह कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, सांगली या संस्थेच्या 'एका झाडाची गोष्ट' या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हा निकाल जाहीर करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान स्पर्धेची अंतिम फेरी झाली. स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले. गोविंद गोडबोले, संजय पेंडसे, सुहास भोळे, नंलिनी देशपांडे व जुई बर्वे यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. प्रबोधिनी विद्यामंदिर, नाशिक या संस्थेच्या शहाणपण देगा देवा या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

सविस्तर निकाल
दिग्दर्शन : प्रथम - राजेश राणे (नाटक-डरांव डरांव), द्वितीय - वीणा नाटेकर (नाटक-तुफानातील मोती), तृतीय - उदय गोडबोले (नाटक-एका झाडाची गोष्ट), अपंग उत्तेजनार्थ - रमेश वनीस (नाटक-शहाणपण देगा देवा)
प्रकाशयोजना - प्रथम - दीपक नांदगांवकर (नाटक-शेवटचे स्पंदन), द्वितीय - सतीश साळुंखे (नाटक-राखेतून उडाला मोर),
नेपथ्य : प्रथम - विजय फडके (नाटक-एका झाडाची गोष्ट), द्वितीय - अर्चना पवार (नाटक-डरांव डरांव),
रंगभूषा : प्रथम - प्रमिला पालव (नाटक-शहाणपण देगा देवा), द्वितीय - अवधुत गोळे (नाटक-तुफानातील मोती),
नाट्यलेखन - प्रथम पारितोषिक - उदय गोडबोले (नाटक-एका झाडाची गोष्ट), द्वितीय - विजय सुलताने (नाटक-डरांव डरांव),
संगीत दिग्दर्शन - प्रथम संजय जोशी (नाटक-तुफानातील मोती), द्वितीय - अशोक घोलप (नाटक-राखेतून उडाला मोर),
वेशभूषा - प्रथम पारितोषिक - कश्मिरा गुजर (नाटक-डरांव डरांव) द्वितीय - प्रीती कांबळे (नाटक-एका झाडाची गोष्ट)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक - दर्शन आंबोने (नाटक-बंद गली), राहुल जोशी (नाटक-तुफानातील मोती), जय कंकाळे (नाटक-शेवटचे स्पंदन), राघव राऊत (नाटक-राखेतून उडाला मोर), संस्कार गुंदेचा (नाटक- सर, तुम्ही गुरुजी व्हा), मन्विता जोशी (नाटक-तुफानातील मोती), वेदश्री तांबोळी (नाटक-डरांव डरांव), ऐश्वर्या गलगले (नाटक-बंद गली), अनुष्का गोखले (नाटक-गोष्ट पृथ्वी मोलाची), सृष्टी शिंदे (नाटक-कस्तुरी),
अभिनय उत्तेजनार्थ - आकांक्षा शिंदे (नाटक- सर, तुम्ही गुरुजी व्हा), सानिका कुलकर्णी (नाटक-राखेतून उडाला मोर), वेदांगी आठवले (नाटक-डरांव डरांव), श्रावणी पांचाळ (नाटक-कथा एका जिद्दिची), नवनीत वाघ (नाटक-शहाणपण देगा देवा), संस्कार डोंबरे (नाटक-एका झाडाची गोष्ट), ऋतुराज कुलकर्णी (नाटक-एका झाडाची गोष्ट), अंकुश भूडळकर (नाटक-तमसो मा ज्योतिर्गमय).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी जीवनाला साहित्यातून आकार

0
0

मानवी जीवनाला साहित्यातून आकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मानवी जीवनाला आकार देण्यात साहित्याचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे साहित्याची सर्वांनीच कास धरायला हवी,' अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य संमेलनाध्यक्षा फैय्याज शेख यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखा, नाट्य परिषदेची शाखा व कलापिनी यांच्यातर्फे हे संमेलनपूर्व संमेलन झाले. त्या वेळी फैय्याज बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आदी या वेळी उपस्थित होते. तळेगाव दाभाडे येथील संमेलन हे दुसरे असून, तिसरे संमेलन आळंदी येथे होणार आहे.
तीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्‍वरी व गाथा साहित्य या विषयावर प्रबोधनात्मक विचार मांडण्यात आले. डॉ. सबनीस यांनी साहित्य व संगीताचा असणारा अन्योन्य संबंध व जवळीक यासंबंधी विवेचन केले. डॉ. देखणे यांनी शब्द व सुरांच्या नात्याच्या एकत्रीकरणासंबंधीचे विचार मांडले.
फैयाज यांची प्रकट मुलाखत सुरेश साखवळकर आणि डॉ. अनंत परांजपे यांनी घेतली. 'साहित्य संमेलन हे मराठी परंपरेचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यातून आपोआपच साहित्य व कलेचा प्रचार होतो. अशा संमेलनातूनच साहित्यिक व नवोदितांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध होते,' असे त्यांनी सांगितले. मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वयंवर नाटकाती 'मम आत्मा गमला,' कट्यार काळजात घुसली या नाटकातील 'लागी कलेजवा कट्यार..' आणि गोरा कुंभार या नाटकातील 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी..' ही पदे गायली. दादा कोंडके यांच्यासमवेत केलेल्या 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकादरम्यानचे काही किस्सेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images