Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खून प्रकरणातील आरोपींना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

खडकी औंध रोड येथील खुनातील आरोपींना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश खडकी कोर्टाने दिले आहेत. २००४ मध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी राजू बिडलान आणि आनंद बिडलान यांचा खून झाला होता. तर, रामू बिडलान हा गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यामध्ये त्यांच्या शेजारी राहात असलेले, त्यांचेच नातेवाईक सुरेश देदुंडा, सचिन देदुंडा, सोनू देदुंडा, संजय देदुंडा, भगतराम देदुंडा, काळुराम देदुंडा, गिरी देदुंडा, दीपक चव्हाण, फंटू तेजी, नीलेश लखन, संजय गोपाळ देदुंडा यांना अटक झाली होती. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अकरा वर्षानंतर मयताच्या मुलांनी खुनातील एक आरोपी संजय गिरी देदुंडा (वय ३२ रा. पिंपळे गुरव) याचा शनिवारी खून केला.

खडकी पोलिस निरीक्षक (क्राइम) राजेंद्र विभांडीक, उपनिरीक्षक जिवन मोहीते, श्रीनिवास कामोनी, हवालदार बाबा शिर्के, हवालदार दीपक माने, प्रमोद मगर, बापू धुमाळ यांनी एका अल्पवयीन मुलासह धीरज राजू बिडलान (वय २०), देवेंद्र रामलाल बिडलान (वय १९), संदीप राजू बिडलान (वय २२), सिद्धार्थ राजू लालबेगी (वय २० सर्व रा.औंधरोड), या आरोपींना अटक केली. अटक आरोपींना खडकी कोर्टात हजर केले असता त्यांना एक जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन कर्नलसह १४ जणांवर आरोप

0
0

पुणेः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) 'वर्ग क'च्या भरती घोटाळ्याप्रकरणी कर्नल कुलबीर सिंग, ए. के. सिंग यांच्यासह एंजट अशा चौदा जणांवर सोमवारी कोर्टात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने आरोपपत्र दाखल केले.

एनडीएतील आचारी, माळी, ग्रंथालय-प्रयोगशाळा सहायक आदी क वर्गाच्या ९७ जागा भरायच्या होत्या. त्यासाठी 'एनडीए'तील दोन कर्नल पदावरील व्यक्तींनी एजंटमार्फत पैसे भरती प्रक्रिया राबविली होती. प्रत्येक उमेदवाराकडून तीन ते चार लाख रुपये उकळले होते. कर्नल सिंग यांच्या व्यतिरिक्त 'एनडीए'तील लेफ्टनंट जनरलचा स्टाफ अधिकारी, कर्मचारी रमेश गायकवाड, पुण्यात खाद्यपदार्थांची गाडी चालवणारा बाल किशन कनोजिया व त्याचा नोकर विष्णू शर्मा तसेच मनोज शितळकर, दत्तात्रय शितळकर या सहा जणांना सीबीआयने अटक केली होती. त्यावेळचे एनडीए कमांडंट लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांची देखील सीबीआयने दोन दिवस कसून चौकशी केली होती. ज्यांची अवैधरित्या भरती आरेापींनी केली, त्यातील बहुतांश उमेदवार हे खडकवासला आणि जवळच्या परिसरातील असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात सरकारी वकील मनोज चलाडन काम पाहत आहे.

पिंपळे गुरवमध्ये चार लाखांची घरफोडी

पिंपळे-गुरवमध्ये बंद फ्लॅटमध्ये चार लाख ८० हजार रुपयांची घरफोडी करण्याची घटना २४ ते २७ डिसेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी प्रशांत धोंड (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. फिर्यादी यांच्या घरी कुलूप तोडून कपाटातील रोख दोन लाख पंधरा हजार रुपये, एलसीडी टीव्ही व सोन्याचे दागिने असे एकूण चार लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक रस्ता होणार सहा पदरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नाशिकफाटा ते खेड रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आता हा रस्ता सहा पदरी होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने रस्त्यांसाठी एक हजार ८६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सोमवारी (२८ सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याबरोबर खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सोमवारी कामाचा आढावा घेण्यासाठी व काही कामाच्या तक्रारी मांडण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे बैठक घेतली. या बैठकीसंदर्भात त्यांनी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय अल्हाट, नंदकुमार सातुर्डेकर आदी उपस्थित होते. अढळराव पाटील म्हणाले, 'अधिवेशन काळात आम्ही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक घेतली. यामध्ये नाशिक फाटा ते खेड या रस्त्याचा आराखडा मांडला. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्यामध्ये रस्त्यांसाठी ८६७ कोटी, तर भूसंपादनासाठी एक हजार कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे त्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून साधारण ३० किलोमीटरचा रस्ता असेल. त्यामध्ये मोशी येथे २४०० मीटर, चिंबळी येथे ६९० मीटर, तर चाकण येथील २२५० मीटर असे तीन उड्डाण पूल असणार आहेत. त्यामध्ये ग्रेड सेप्रेटरचा ही समावेश असणार आहे.

या सोबतच आंद्रा-भामा आसखेड या धरणासाठी २१६ कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. यामध्ये आंद्रा धरणासाठी ८६ कोटी रुपये देण्यात यावेत, धरणातून १०० एमएलडी पाणी शहरासाठी घ्यावे, तर भामा आस्केड धरणासाठी १३० कोटी रुपये देण्यात यावेत व १६७ एमएलडी पाणी शहरासाठी घ्यावे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खवय्यांची पावले वळली हुरडा पार्टीकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलाबी थंडीमध्ये शेकोटीशेजारी बसून चटपटीत हुरडा, जोडीला चमचमीत वांग्याची भाजी, मिरचीचा ठेचा अन् गरम भाकरीवर ताव मारण्यासाठी खवय्यांची पावले सध्या कृषी पर्यटन केंद्रांकडे वळाली आहेत. थंडीने जोर धरल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पुणे परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांमध्ये हुरडा पार्ट्या सुरू झाल्या आहेत. काही केंद्रांमध्ये २६ जानेवारीपर्यंतच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत.

ग्रामीण भागापासून दुरावलेल्या नागरिकांना कृषी पर्यटन केंद्रांमुळे गावाकडे जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. धावपळीच्या जीवनशैलीतून बदल हवा म्हणून सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग, चित्रपट, बर्गर, पिझ्झा खाण्याऐवजी शहराबाहेर निवांतपणा अनुभवण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही मंडळी फार्म हाउसच्या बरोबरीने कृषी पर्यटन केंद्रांना प्राधान्य देत आहेत. खाण्यामध्ये दर वेळी नवीन पर्याय शोधणाऱ्या या मंडळींमध्ये सध्या गावरान जेवणाची क्रेझ आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी लोक या केंद्रांमध्ये जातात. थंडीने गेल्या काही दिवसात जोर धरल्याने या उत्साही पर्यटकांसाठी पुणे परिसरातील केंद्रांमध्ये हुरडा पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

साधारणतः नोव्हेंबरच्या अखेरीस शेतात कोवळी ज्वारी दिसायला लागते आणि हुरड्याची चाहूल लागते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपल्या नातेवाईकांच्या शेतामध्ये हुरडा खाण्यासाठी जात होते. पण, पिढ्यान् पिढ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना हा आनंद घेता येत नव्हता. याची दखल घेऊन कृषी पर्यटन केंद्रांनी हुरडा पार्टी असे गोंडस नाव देऊन पर्यटकांना हुरडा खाण्याची संधी उपलब्ध केली आहेत. पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा या उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिसरामध्ये सध्या चाळीसहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे असून बहुतांश केंद्रांमध्ये हुरडा पार्ट्या आयोजित केल्या जातात.

हुरड्याची मागणी दर वर्षी वाढत असल्याने ज्या भागात ज्वारी उपलब्ध नाही, तेथे देखील आता हुरडा पार्टी सुरू झाल्या आहेत. औरंगाबादसह काही भागातील शेतकरी त्यांच्याकडील हुरडा पुणे विभागातील केंद्रांना पुरवठा करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रोजगार मिळण्याबरोबरच केंद्र चालकांनाही फायदा झाला आहे. या वर्षीचा पार्ट्यांचा हंगाम गेल्या दहा दिवसापूर्वी सुरू झाला असून उत्तम प्रतिसाद आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत आहेत, अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहुण्या पक्ष्यांचे पुन्हा आगमन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थलांतरी पक्ष्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी पुण्यातील पक्षी अभ्यासकांनी केलेल्या टॅगिंग उपक्रमाला यश आले आहे. दोन वर्षांपूर्वी टॅग लावलेला काळ्या डोक्याचा शेराटी आणि चित्रबलाक हे दोन पक्षी पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील भादलवाडी या तलावाजवळ दाखल झाले आहेत. विणीसाठी हे पक्षी या परिसरामध्ये आले असून दोघेही सृदृढ असल्याचे त्यांच्या वैद्यकीय तपासाणीतून स्पष्ट झाले आहे.

थंडीची चाहूल लागली, की बर्फाच्छादित प्रदेशातील हजारो पक्षी स्थलांतर करून पुणे जिल्हा; तसेच पुणे विभागामध्ये मुक्कामासाठी येतात. लांब पल्ल्याचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांमुळे बर्ड फ्ल्यू अथवा इतर कोणतेही संसर्गजन्य रोगांचा धोका असतो का, हे जाणून घेण्यासाठी ईला फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) आणि वन विभागातर्फे दरवर्षी या स्थलांतरी पक्ष्यांचा वैद्यकीय अभ्यास केला जातो. तपासणी झालेल्या पक्ष्यांच्या पंखामध्ये अभ्यासक टॅग लावतात.

काही दिवसांपूर्वीच भादलावडी तलावाजवळ दाखल झालेल्या स्थलांतरी पक्ष्यांमध्ये दोन वर्षांपूर्वी टॅग केलेला चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), काळ्या डोक्याचा शेराटी (ब्लॅक हेडेड आयबीज) हे पक्षी आढळून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना टॅगिंग केले तेव्हा अवघे २८ दिवसांचे त्यांचे वय होते. या वेळी मूळ अधिवासापासून ४ किलोमीटर अंतरावर आढळून आले आहेत. हे पक्षी परत दिसणे ही आम्हा अभ्यासकांसाठी उल्लेखनीय बाब आहे, असे ईला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.

फाउंडेशन आणि एनआयव्हीतर्फे आत्तापर्यंत पेटेंड स्टॉर्क, नाइट हेरॉन, लिट्ल कॉर्मोनन्ट, ब्लॅक हेडेड आयबीज असा विविध प्रकारच्या ८० पक्ष्यांना टॅगिंग केले आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूंचा संशोधनाचा भाग म्हणून या पक्ष्यांच्या घशाची तपासणी, श्वासनलिकेचे स्त्राव आणि विष्ठा बाहेर पडते त्या जागेची वैद्यकीय तपासणी केली जाते. या प्रक्रियेनंतर आम्ही पक्ष्यांना टॅग लावतो. या वर संस्थेचे नाव, ठिकाण, पक्ष्यांचा अधिकृत नोंदणी क्रमांक आणि संपर्क लिहिलेला असतो. पक्षी पुढे ज्या ठिकाणी इतर अभ्यासकांना दिसतो, ते आमच्याशी संपर्क साधून माहिती कळवतात. ही प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पण, टॅग लावलेल्या ठिकाणीच पुन्हा पक्षी दिसणे, ही नक्कीच उल्लेखनीय घटना ठरते.

भादलवाडी परिसरातल येकले गुरुजी, स्पंदन संस्थेचे महेश कान्हेकर यांचे आम्हाला विशेष सहकार्य आहे. दत्ता नागरे, नितीन डोळे आणि राहुल डोळे यांना हे पक्षी दिसले. या पक्ष्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली असून दोघेही निरोगी आणि सुदृढ आहेत. काही वर्षांपूर्वी आम्ही पक्ष्यांच्या पायात नाजूक रिंग घालत होतो. पण, लांबून निरीक्षकांना ही रिंग दिसत नाही. या पेक्षा टॅग दुरूनही पटकन लक्षात येतो. परदेशात या प्रकारे स्थलांतरी पक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. टॅगिंगबरोबरच पक्ष्यांचा मार्ग शोधण्यासाठी आता टेलिमेट्री पद्धतीने संशोधन होणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच या उपक्रमालाही आम्हाला मान्यता मिळाली आहे, असे पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची चोरी

0
0

पुणेः वीज मीटरमध्ये फेरफार करून खडकी येथील नवा बझारमधील तीन दुकानांतील सुमारे अडीच लाख रुपयांची वीज चोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणने केलेल्या वीजमीटर तपासणी मोहिमेत ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी रमेश देवराज पारेख, प्रवीण विजय गर्ग आणि निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांच्याविरुद्ध महावितरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवा बझारमध्ये पारेख यांचे 'प्रकाश ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. या दुकानासाठी असलेल्या वीज जोडणीच्या मीटरचे सील तोडण्यात आलेले आढळले. वीज मीटरमध्ये फेरफार करून सुमारे ८३ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनात आले. निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांचे 'संस्कार' नावाचे कपड्याचे दुकान आहे. त्यामध्ये सुमारे ७९ हजार रुपयांची वीजचोरी करण्यात आली. प्रवीण विजय गर्ग यांचे मिठाईचे दुकान असून, त्यांनी ८७ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता आनंद रायदुर्ग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी, गणेश शामसे आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिस पाटील’ भरती लवकरच

0
0

पुणे जिल्ह्यात १७५२ पैकी ९९२ पदे रिक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गावकीच्या राजकारणामध्ये 'पोलिस पाटला'चा मान 'गावच्या पाटला'च्या दर्जाचा असल्याने त्यासाठी मोठी रस्सीखेच होते. या चढाओढीत गेल्या काही वर्षांपासून पोलिस पाटील पदांच्या भरतीवर असलेली स्थगिती नुकतीच उठली असून पुणे जिल्ह्यात ९९२ रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.

पुणे शहर, हवेली, भोर, पुरंदर, बारामती, मावळ, खेड व जुन्नर तालुक्यात पोलिस पाटलांची १,७५२ पदे मंजूर आहेत. त्यातील ७६० पदे कार्यरत आहेत. ही पदे ऑगस्ट २०१४ पर्यंत भरली गेली आहे. पोलिस पाटील पदांच्या भरतीला स्थगिती असल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी कोणतेही पद नव्याने भरले गेले नाही. त्यातच ही पदे आता आरक्षणनिहाय भरायची असल्याने त्याचे रोस्टर करण्याचेम काम सुरू आहे.

पोलिस पाटील पदाच्या भरतीसाठी २५ ते ४५ अशी वयोमर्यादेची अट आहे. त्यासाठी शिक्षणिक पात्रता किमान सहावी उत्तीर्ण अशी आहे. अपवादात्मक परिस्थितीत शैक्षणिक अट शिथिलही करता येते. या पदासाठी दरमहा आठशे रुपये मानधन देण्यात येते. गावातील कायदा-सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे आणि कोतवालांवर नियंत्रण ठेवणे अशी काम पोलिस पाटलांवर सोपविण्यात आली आहेत.

दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त

जिल्ह्यातील पोलिस पाटलांची तब्बल ९९२ पदे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त आहेत. त्यात पुणे शहर ४०, हवेली ४८, भोर १५०, पुरंदर ८९, बारामती १४८, मावळ २१७, खेड १३३ व जुन्नरमधील १६७ पदांचा समावेश आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागून बालिकेचा मृत्यू

0
0

हडपसर : वीटभट्टीमधील उघड्यावर ठेवलेल्या स्वीच बोर्डचा शॉक लागून अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना हांडेवाडी रोडवरील आनंदनगर येथे असणाऱ्या वीटभट्टीत सोमवारी सकाळी आठच्या सुमारास झाली. याबाबत वीटभट्टीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. संजना ताराचंद बोंदाडे (वय अडीच वर्षे, रा. आनंदनगर, हांडेवाडी रोड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार प्रताप पांडुरंग डोईफोडे यांनी फिर्याद दिली आहे.

ताराचंद बोंदाडे आणि त्यांची पत्नी दोघेही वीटभट्टीवर विटा बनविण्याच्या कामावर आहेत. या ठिकाणी तांत्रिक पद्धतीने विटा बनविल्या जातात. सोमवारी बोंदाडे दाम्पत्याने वीट बनविण्याच्या मशिनवर काम सुरू केले, तेव्हा त्यांची मुलगी शेजारीच खेळत होती. या मशिनचा स्विच बोर्ड जमिनीवर उघड्यावरच ठेवण्यात आला आहे. त्या स्विचला संजनाचा हात लागला आणि तिला शॉक लागला. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनात देशीवादाचा सामना

0
0

डॉ. कसबे यांचा 'देशीवाद : समाज आणि साहित्य' ग्रंथ पूर्ण

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे ः 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे प्रत्यक्ष संमेलनात सहभागी होणार का, असे कवित्व सुरू असताना ते सातत्याने मांडत असलेल्या देशीवादाची चिकित्सा करणारा व त्यांचे विचार खोडून काढणारा एक ग्रंथ संमेलनातून साहित्यविश्वात दाखल होणार आहे. त्यामुळे एकीकडे नेमाडेंची देशीवादी मुलाखत, तर दुसरीकडे देशीवादावरचा ग्रंथ असा वैचारिक सामना संमेलनात रंगेल.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी 'देशीवाद : समाज आणि साहित्य' या ग्रंथाची निर्मिती केली आहे. भारतीय इतिहास, प्राचीन ते आधुनिक साहित्य व देशीवाद अशी चिकित्सा करणारा हा ग्रंथ असेल. ४५० पृष्ठांचा हा ग्रंथ लोकवाडमय गृहातर्फे प्रकाशित करण्यात येईल, पण तत्पूर्वी तो पिंपरीमध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपलब्ध करून दिला जाईल, असे खुद्द डॉ. रावसाहेब कसबे यांनी सोमवारी 'मटा'शी बोलताना सांगितले. नेमाडेंना सिंधू संस्कृती माहीत नाही, ती काय आहे; तसेच मातृसत्ताक पद्धत आणा असे नेमाडे म्हणतात, पण ती नष्ट का झाली हे या ग्रंथातून सांगितले आहे, अशी माहिती डॉ. कसबे यांनी दिली.

'जाती मोडल्या तर देश मोडेल, जातीव्यवस्थेचे पुनुरुज्जीवन करा,' अशी भूमिका नेमाडे मांडतात, पण ज्ञानपीठ विजेत्या लेखकाने राज्यघटनेच्या विरोधात अशी भूमिका जाहीरपणे मांडणे किती योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जाती व्यवस्थेची मांडणी ग्रंथातून केली आहे. प्राचीन वाडमय सर्वश्रेष्ठ असे नेमाडे म्हणतात, त्यामुळे या साहित्याची जागतिक साहित्याशी तुलना केली आहे, असे सांगून देशीवादाचा विचार समाजाला मागे नेणारा आहे, याकडे डॉ. कसबे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावरही आर्ट गॅलरी

0
0

एका वेळी कलादालनात मांडणार एकाच कलाकाराची कलाकृती

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुण्यातील हौशी व व्यावसायिक कलावंतांना त्यांच्या कलाकृतींसाठी पुणे विमानतळावर एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे (एएआय) विमानतळावर कलादालन सुरू करण्यात येणार असून, या कलादालनात कलाकृती ठेवू इच्छिणाऱ्या कलावंतांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एका वेळेस एका कलाकाराच्याच कलाकृती या कलादालनात मांडल्या जाणार आहेत.

कलेच्या क्षेत्रासाठी पुण्यातील वातावरण नेहमीच अनुकूल राहिले आहे. येथे कलाकारांची व कलादालनांची संख्याही खूप असून, त्यांना रसिक श्रोत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. त्यामुळे राज्यभरातील कलावंत पुण्यात येऊन त्यांच्या कलेचे सादरीकरण करतात. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर देखील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. कलादालनात शिल्प, चित्र, म्युरल, हस्तकला आदी प्रकारातील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कलावंतांना संधी दिली जाणार आहे. एक कलावंत कमाल १५ दिवस कलाकृती ठेवू शकतो; तसेच एका कलावंताला किमान पाच कलाकृती ठेवण्याचे बंधन राहणार आहे. या कलाकृतींच्या किमतीच्या १० टक्के रक्कम जागेचे भाडे म्हणून 'एएआय'ला द्यावी लागणार आहे.

एखादा प्रवासी कलाकृती घेण्यास इच्छुक असल्यास, त्यास सुरुवातीला २० टक्के अनामत रक्कम विमानतळ व्यवस्थापकाकडे जमा करावी लागणार आहे. त्यानंतर पाच ते १० कार्यालयीन दिवसांत, ती कलाकृती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कलावंताची असेल. कलावंत व प्रवासी यांच्यातील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर 'एएआय'कडून अनामत रकमेतील १० टक्के रक्कम कलावंताला दिली जाईल.

एखादी कलाकृती ही संबंधित कलावंताचीच आहे, याबाबत त्यांना 'एएआय'कडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे; तसेच, सेवा कर, व्हॅट किंवा अन्य प्रकारच्या करासहीत कलावंत कलाकृतीची किंमत ठरवू शकतात. हे कलादालन विमानतळावरील सुरक्षित क्षेत्रात असेल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने येथे काटेकोर नियम असतील; परंतु कलादालनासाठी सर्व खबरदारी घेऊन काही नियम शिथिल केले जातील, असे 'एएआय'ने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाने बनवली १६ अॅप्स

0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्यांसाठी मोबाइल वा टॅबवर वापरता येणारी अॅप्लिकेशन्स बनविणे ही तुलनेने सोप्पी गोष्ट. मात्र, तशी कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या बालाजी जाधव या शिक्षकाने हिच बाब सहजशक्य करून दाखविली आहे. त्यातूनच स्वतः विकसित केलेली एकूण १६ अॅप्लिकेशन्स ते २०१६ च्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील विद्यार्थी- शिक्षकांना मोफत उपलब्ध करून देणार आहेत.

राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या (टेक्नोटिचर्स) गटातील सदस्य असलेल्या जाधव यांनी 'मटा'ला या सर्व अॅप्लिकेशन्सची माहिती दिली. इंटरनेट नसतानाही कोणत्याही मोबाइल वा टॅबवरून ऑफलाइन स्वरुपात आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेमध्ये वापरता येणाऱ्या या सर्व अॅप्सच्या आधारे इयत्ता पहिली ते पाचवीसाठीच्या अभ्यासक्रमाला पूरक असणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यास करता येणे शक्य आहे. राज्यातील ग्रामीण भागात, इंटरनेटच्या सुविधा नसतानाही आणि इंग्रजीची अडचण दूर सारत विद्यार्थ्यांपर्यंत इंटरॅक्टिव्ह पद्धतीने अभ्यासक्रम पोहोचविण्यासाठी ही अॅप्लिकेशन्स महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास जाधव यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

या अॅप्लिकेशन्सची माहिती देताना जाधव म्हणाले, 'अॅप्लिकेशन वापरताना विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांची ओळख करून दिली जाते. प्रत्येक वेळी अॅप सुरू केल्यानंतर प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचाही क्रम आपोआप बदलला जातो, हे या सर्व अॅप्लिकेशन्सचे वैशिष्ट्य आहे. विशिष्ट प्रश्नांची विशिष्ट उत्तरे लक्षात ठेवण्यापेक्षा,पाठांतरावर भर देण्यापेक्षा कृतीआधारित शिक्षण आणि रचनावाद प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी हे वैशिष्ट्य महत्त्वाचे ठरणार आहे.'

गावाकडे मोबाइल हातात आला की मुले सारखी गेम खेळतात अशी तक्रार पालक करतात. ही तक्रार दूर करण्यासाठी या सर्व अॅप्लिकेशन्सचे स्वरूप एखाद्या गेमसारखेच ठेवले आहे. उत्तर चूक की बरोबर हे सांगणारे, सर्व प्रश्न संपले की तुमचा एकूण निकाल सांगणारे संदेश ही अॅप्लिकेशन्स देतात. प्रायोगिक टप्प्यावर या सर्व अॅपना खूपच उत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय नागरिकांचे मरणही वेदनादायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मरणाच्या दारात उभ्या असलेल्या पेशंटचा मृत्यू सुखकारक व्हावा, त्याला आजारपणाच्या वेदना कमी व्हाव्यात, यासाठी देण्यात येणाऱ्या परिहार सेवेत (पॅलेएटिव्ह केअर) भारत मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. द इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने तयार केलेल्या या वर्षीच्या 'क्वालिटी ऑफ डेथ इंडेक्स' या अहवालात भारताला नीचांकी स्थान मिळाल्याचे स्पष्ट केले.

अहवालानुसार, जगातील ८० देशांच्या यादीत भारताचे स्थान हे ६७ व्या क्रमांकावर आहे; तर इंग्लंडसारख्या देशाचा पहिला क्रमांक लागतो. प्रगत राष्ट्रांमध्ये परिहार सेवेचे राष्ट्रीय धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या धोरणाचा समावेश केला आहे. द इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने हा दुसरा अहवाल तयार केला आहे. यापूर्वी २०१० मध्ये अहवाल प्रसिद्ध झाला होता. नवीन अहवालात आरोग्यसेवेशी निगडीत पाच पैलूंमध्ये पॅलिएटिव्ह व एकंदर आरोग्य सुरक्षा, वातावरण, मानवी साधने, परवडणारी आरोग्य सेवा, सेवेची गुणवत्ता व समाजाचा सहभाग यांचा समावेश आहे.

'कॅन्सर, एचआयव्ही, किडनी, पॅरालेसिस, अल्झायमर, पार्किसन्ससारख्या गंभीर आजाराच्या पेशंटना वर्षानुवर्षे हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. पूर्वी अशा पेशंटच्या आयुष्याचा शेवट त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांच्या सहवासात व्हायचा. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान उंचावण्याच्या प्रयत्नात पेशंटवर हॉस्पिटमध्ये उपचार केले जातात. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करतात. परंतु, त्यावेळी पेशंटच्या सोबतीला नातेवाईक, आवडत्या व्यक्तींऐवजी विविध प्रकारच्या मशीन्स असतात. आजाराच्या शारिरीक तसेच मानसिक वेदनांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आवश्यक 'परिहार सेवा' देण्यात भारत अन्य देशांच्या तुलनेत मागे आहे, अशी माहिती इंडियन असोसिएशन ऑफ पॅलेटिव्ह केअरच्या मानद सचिव प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी दिली.

पेशंटचे शेवटचे दिवस आनंदात जावे, त्याला कोणत्याही शारीरिक हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी परिहार सेवा दिली जाते. ही सेवा देशात प्राथमिक टप्प्यात आहे. त्या करिता वर्षी इंडियन असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर आणि इंडियन सो​सा​यटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन संस्थेने मार्गदर्शक तत्त्वे मांडली. परंतु, तत्वांच्या अमंलबजावणीसाठी परिहार सेवेच्या राष्ट्रीय धोरणाची गरज आहेे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंजवडी इन्फोसिस कंपनीत बलात्कार

0
0

तक्रार केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंजवडी आयटी पार्क मधील इन्फोसिस कंपनीच्या वॉशरूम मध्ये कॅन्टिनच्या कॅशिअर विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रार केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

परितोष बाग व प्रकाश महाडिक हे दोघे कंपनीमध्ये हाऊसकिपिंगचे काम करतात. त्यांच्यापैकी एकाने आपल्यावर बलात्कार केला आणि दुसऱ्यानं फोटो काढल्याची तक्रार एका २५ वर्षीय विवाहितेने केली आहे. ही महिला कंपनीच्या आवारातील कॅन्टिनमध्ये कॅशिअरचं काम करते.

रविवारी २७ डिसेंबरला पीडित विवाहिता वॉश रूममध्ये गेली होती. त्यावेळेस परितोष बाग हा तेथे गेला व त्याने पीडितेवर अत्याचार केला. यावेळी प्रकाश महाडिक हा देखील वॉश रुममध्ये आला. परितोष पीडितेवर अत्याचार करत असताना महाडिक याने मोबाईल वर फोटो काढले. आपल्याविरोधात तक्रार केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकीही या दोघांनी पीडितेला दिली होती. या नंतर पीडितेने हा प्रकार महिला सुरक्षा रक्षकाला सांगितला. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर तिनं न घाबरता पोलिसांकडे तक्रार दिली. त्याची गंभीर दखल घेऊन हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळात एलसीडी घोटाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या शिक्षण मंडळात वह्या, पुस्तके, कम्प्युटर, स्वेटर यात गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे घडली असतानाच, आता ई-लर्निंगच्या जमान्यात चक्क शाळांसाठीचे 'एलसीडी टीव्ही'ही परस्पर लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कागदोपत्री शाळांना एलसीडी टीव्हींचे संच पुरविण्यात आल्याचे दाखविण्यात आले असले, तरी चार शाळांच्या तपासणीत १४ टीव्ही गायब असल्याची माहिती पुढे आली आहे.

शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण देण्यासाठी २०१२ आणि २०१४ अशा दोन वर्षांत तब्बल ८५० संच खरेदी करण्यात आले होते. मंडळाकडून शाळेच्या आवश्यकतेनुसार त्यांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, मंडळाच्या कागदपत्रांमध्ये शाळेला संच दिल्याची नोंद करून प्रत्यक्षात हे संच गायब करण्याचे प्रकार घडले आहेत. मंडळात शाळांना दिलेले संच आणि प्रत्यक्ष शाळांना मिळालेले संच यामध्ये तफावत आढळून येत असून, संभाजी महाराज संघर्ष समितीने ही बाब उजेडात आणली आहे.

विश्रांतवाडीच्या विठ्ठलराव गाडगीळ शाळेमध्ये १३ संच दिल्याची नोंद आहे. परंतु, शाळेला केवळ आठच संच मिळाले आहेत. गाडगीळ शाळेत १३ संचाची नोंद करतानाही खाडाखोड करण्यात आली आहे. येरवड्यातील जाधव विद्यालयामध्येही १३ ऐवजी केवळ सातच एलसीडी टीव्ही मिळाले आहेत. सोमवार पेठेतील के. सी. ठाकरे विद्यामंदिर; तसेच शिवाजीनगर गावठाणातील लालबहाद्दूर शास्त्री शाळेमध्येही कमी संच पोहोचले आहेत. संघर्ष समितीचे सुभाष जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन केलेल्या पाहणीत ही लपवा-छपवी समोर आली आहे.

..................

चौकशीची मागणी

शिक्षण मंडळातर्फे केली जाणारी खरेदी आत्तापर्यंत नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. वह्या-पुस्तकांपासून ते बेंचपर्यंत प्रत्येक बाबतीत मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी तर कुंडी खरेदीवरून मंडळाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. असे असताना, ई-लर्निंगच्या माध्यमातून मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे भविष्य घडविण्याऐवजी एलसीडीचे संच परस्पर गायब करून स्वतःच्या घराची शोभा कोणी वाढविली, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारने तोंडाला पाने पुसली’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने सुमारे तीन हजार कोटी रुपयांची मदत देऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केला. केंद्र सरकारने तत्काळ तिकिटाच्या दरात आणि राज्य सरकारने आरोग्य सेवांमध्ये वाढ केली असताना, आता राज्य सरकारने आगामी वर्षासाठी रेडी रेकनरचे दर वाढवू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांवर कडाडून टीका केली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेविका नीता रजपूत, संगीता देवकर आदी उपस्थित होते. 'राज्यात सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सुमारे तीन हजार कोटी रुपयांऐवजी किमान दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देणे अत्यावश्यक होते. राज्यात दुष्काळाची स्थिती असताना ही मदत अपुरी आहे,' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने तत्काळ तिकिटांच्या दरात वाढ करून सामान्य नागरिकांवर बोजा टाकला आहे. अर्थसंकल्पापूर्वी अशी वाढ करणे योग्य नाही. राज्य सरकारनेही आरोग्य सेवेत वाढ केली आहे. ही बाब नागरिकांच्यादृष्टीने हिताची नसल्याचे चव्हाण म्हणाले. घरांच्या किमती जास्त असल्याने सामान्य नागरिकांना घरे विकत घेता येत नाहीत. त्यामुळे आगामी वर्षासाठी राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये. सध्या घरांना मागणीही नाही. अशा परिस्थितीत रेडी रेकनरचे दर न वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

मुंबई काँग्रेसचे मुखपत्र 'काँग्रेस दर्शन'मधील वादग्रस्त लिखाणाबाबत विचारणा करण्यात आली असता, याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे पुढील कारवाई करतील, असे चव्हाण यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण आयुक्तांना हवे संरक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या कार्यालयात केलेल्या झाडाझडतीनंतर शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या झाडाझडतीनंतर डॉ. भापकर यांच्या कार्यालयात काही संघटनांनी आंदोलने केल्याने त्यांनी शिक्षण आयुक्तालयाला पोलिस संरक्षण मागितले आहे. मात्र, पूर्ण वेळ संरक्षण देणे शक्य नसून, गरज पडेल तेव्हा संरक्षण पुरविण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

जाधव यांच्या कार्यालयात डॉ. भापकर यांनी १५ डिसेंबर रोजी अचानक भेट देऊन सुमारे दोन तास झाडाझडती घेतली होती. मागितलेली माहिती वेळेवर न मिळाल्याने त्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची जबाबदारी समजावून दिली; तसेच काम सुधारण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. काम न सुधारल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर काही संघटनांनी आंदोलने केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भापकर यांनी पोलिस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

'शिक्षण आयुक्तालय 'बालभारती'च्या परिसरात आहे. या ठिकाणी होणारे आंदोलने ही अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असून, 'बालभारती'च्या मालमत्तेसाठी धोकादायक आहे,' असे डॉ. भापकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, पूर्णवेळ संरक्षण पुरवणे शक्य नसल्याचे उत्तर विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी मंगळवारी भापकर यांना दिले. 'शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाला स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी वारंवार भेट देतील. पोलिस संरक्षणांची गरज असेल, त्यावेळी ते पुरवण्यात येईल,' असे पाठक यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

'बोगस संघटनांवर आक्षेप'

'मला कोणत्याही संघटनेची वा खात्यातील अधिकाऱ्यांची भीती नाही. शिक्षण खात्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये निष्कारण ढवळाढवळ करणाऱ्या बोगस संघटनांवर आक्षेप आहे. आयुक्त कार्यालयामध्ये सध्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांसाठीची कागदपत्रे आहेत. 'बालभारती'च्या आवारात हे कार्यालय असल्याने तिच्या मालमत्तेच्या संरक्षणाचाही विचार करावा लागतो,' असे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरेलू कामगारांचा आंदोलनाचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना बंद केल्या आहेत. त्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी दहा जानेवारीपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्धार घरेलू महिला कामगारांच्या मेळाव्यात मंगळवारी करण्यात आला.

राष्ट्रीय मजदूर संघातर्फे काँग्रेस भवन येथे घरेलू महिला कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला आमदार अनंत गाडगीळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेविका कमल व्यवहारे आदी उपस्थित होते. यावेळी जनश्री विमा योजनेअंतर्गत घरेलू महिला कामगारांना मदतीच्या चेकचे वाटप करण्यात आले.

घरेलू कामगार महिलांसाठी आमदार निधी आणि रुग्णवाहिका देण्यासाठी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे गाडगीळ म्हणाले. स्मार्ट सिटी योजनेवर गाडगीळ यांनी टीका केली. हा करवाढीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे विविध योजना सुरू केल्या होत्या. या सरकारने योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे घरेलू महिला कामगारांना मदत मिळत नाही. या योजना पुन्हा सुरू होण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगार नेते सुनील शिंदे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबसिडी बंदमुळे आयटीयन्स गॅसवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने वार्षिक दहा लाख रुपये उत्पन्न असलेल्या ग्राहकांची गॅस सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका पुण्यातील काही लाख करदात्यांना बसण्याची शक्यता आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांचा विस्तार लक्षात घेता या निर्णयाचा सर्वाधिक फटका आयटीतील नोकरदारांना बसण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने आपल्या गॅसवरील सबसिडी रद्द करण्याच्या मोहिमेची सुरुवात उच्च उत्पन्न गटापासून केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार वार्षिक दहा लाख रुपये (साधारणत: दरमहा ८३ हजार रुपये उत्पन्न) करप्राप्त उत्पन्न असलेल्या ग्राहकाला अनुदानित सिलिंडरचा लाभ मिळणार नाही. संबंधित ग्राहकाची पत्नी किंवा पतीचे उत्पन्न या मर्यादेहून अधिक असेल, तरीही त्या कुटुंबाला सबसिडी मिळणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे. देशभरात दहा लाखाहून अधिक उत्पन्न असलेले व त्यावर कर भरणा करणारे सुमारे ४० लाख करदाते आहेत. यात प्रामुख्याने चार महानगरांमधील करदात्यांनंतर पुणे, अहमदाबादसारख्या शहरांमधील करदात्यांचा समावेश होतो. पुण्यामध्ये दहा लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या काही लाखात असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहनोद्योग, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती यासारखे मोठे उद्योग आहेत. त्याचबरोबर पुण्यात सेवाक्षेत्राचाही मोठा विस्तार आहे. याचबरोबर विविध व्यावसायिक तसेच सेवा पुरवठादारांची संख्याही मोठी आहे. या विविध उद्योगांमध्ये वरिष्ठ आणि मध्यम स्तरावर काम करणाऱ्या नोकरदारांचे वार्षिक वेतन दहा लाखाहून अधिक आहेत. अशा कंपन्यांची संख्या व तेथील कर्मचारी संख्या विचारात घेतल्यास अशा करदात्यांची संख्या काही लाखांत जाते. विविध क्षेत्रातील व्यावसायिक, सल्लागार यांचीही संख्या मोठी असून, त्यापैकी अनेकजण या नव्या निर्णयामुळे गॅसवरील सबसिडीला मुकण्याची शक्यता आहे.

या बाबत सीए विजयकांत कुलकर्णी म्हणाले, की, 'पुण्यात माहिती तंत्रज्ञान, वाहनोद्योग क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपन्या आहेत. सेवाक्षेत्राचाही विस्तार मोठा आहे. या क्षेत्रात काही लाख नोकरदार काम करतात. त्यांपैकी अनेकांना दहा लाखांहून अधिक वार्षिक वेतन मिळते. त्यांना नव्या निर्णयानुसार गॅसवर सबसिडी मिळू शकत नाही. परंतु, हे सर्व उच्च उत्पन्न गटातील असल्याने त्यांच्यावर या निर्णयाचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही.'

..

साडेआठ लाखांनी केली सबसिडी परत

दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच गॅसवरील सबसिडी स्वतःहून परत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला प्रतिसाद देऊन राज्यातील साडेआठ लाखाहून अधिक तर, देशातील सुमारे ५३ लाख नागरिकांनी गॅसवरील सबसिडी परत केली. यापैकी बहुसंख्य नागरिक हे उच्च उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे सक्तीने सबसिडी रद्द करावी लागणाऱ्या करदात्यांची संख्या कमी असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. हे सर्व उच्च उत्पन्न गटातील असल्याने त्यांच्या दृष्टीने सबसिडीला फारसे महत्त्व नसते. त्यापैकी अनेकांना सबसिडी रद्द करण्याच्या प्रकियेची माहिती किंवा वेळ नसल्यानेही त्यांनी सबसिडी परत केली नसावी, अशीही शक्यता आहे. आता मात्र, त्यांची सबसिडी सक्तीने रद्द होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीजभाषण अन् मुलाखतही

0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : साहित्य संमेलनातील अध्यक्षांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत या साठी अध्यक्षांच्या भाषणाबरोबरच त्यांची मुलाखत घेण्यात यावी, या नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सूचनेचा गांभिर्याने विचार करून यंदाच्या संमेलनात अध्यक्षांच्या मुलाखतीचा बेत आखण्यात आला आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षांची मुलाखत असणारे हे पहिलेच संमेलन ठरण्याची शक्यता आहे.

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १६ तारखेला होणार असून, त्याचदिवशी सायंकाळी डॉ. सबनीस यांची मुलाखत रंगणार आहे. 'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व संयोजक यांना मी पत्र पाठवून संमेलनाध्यक्षांची मुलाखत घेण्यात यावी, अशी सूचना केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे. त्याप्रमाणे उद्घाटनादिवशी सायंकाळी माझी मुलाखत होईल,' अशी माहिती डॉ. सबनीस यांनी मंगळवारी 'मटा'शी बोलताना दिली.

साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचे भाषण सुरू झाले की लोक उठून जातात, हा दरवेळी येणारा कटू अनुभव असतो. संमेलनाचा प्रमुख असलेल्या संमेलनाध्यक्षाला त्यामुळे रसिकांच्या 'असहिष्णुतेचा' सामना करावा लागतो. मोजक्या साहित्यप्रेमींसमोर भूमिका मांडण्याशिवाय अध्यक्षांकडे पर्याय उरत नाही. त्यामुळे अध्यक्षाची भूमिका सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी नियोजित अध्यक्ष डॉ. सबनीस यांनी अध्यक्षांच्या भाषणा बरोबर मुलाखत घेण्यात यावी, मुलाखत जास्त रंगते, त्यातून भूमिका उलगडता येऊ शकते, अशी सूचना साहित्य महामंडळाला केली होती. ८८ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनीही या सूचनेला पाठिंबा दर्शविला होता.

..

संमेलनात माझी मुलाखत होणार असली तरी संमेलनाच्या उद्घाटनानंतर मी पूर्णवेळ भाषण करणार आहे. भाषणामधून मी सविस्तर भूमिका मांडणार असून, सायंकाळी एक तास रंगणाऱ्या मुलाखतीतून विविध पैलू समोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल.

डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष

..

आज होणार शिक्कामोर्तब

साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर होणार असून, त्यामध्ये अध्यक्षांच्या मुलाखतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय संमेलनातील भरगच्च कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्ध जीवन’वर पुण्यात ४० छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ओडिशात चिटफंडासंबंधी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकांनी समृद्ध जीवन समूहाच्या कार्यालयांवर मंगळवारी दिवसभर छापे घातले. 'सीबीआय'च्या पंचेचाळीस पथकांमध्ये सुमारे तीनशे अधिकाऱ्यांच्या समावेश होता. पुण्यात ४० ठिकाणी तर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर येथे मिळून ५८ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

'सीबीआय'चे भुवनेश्‍वर येथील पथक मंगळवारी पुण्यात दाखल झाले. स्थानिक 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे छापासत्र सकाळीच सुरू झाले. ओडिशा येथे चिटफंडासंबंधी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा समृद्ध जीवनविरोधात आहे. या कंपनीने सर्वसामान्यांकडून चिटफंडासाठी पैसे गोळा केले आहेत. या कंपनीला कुठलाही कायदेशीर अधिकार नसतानाही पैसे जमा केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती 'सीबीआय' कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, मोतेवार यांना सोमवारी उस्मानाबाद पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भुवनेश्‍वर येथील पोलिस अधीक्षक राजीव रंजन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी समृध्द जीवनच्या कार्यालयावर तसेच संबंधित अन्य कंपन्यांच्या ५८ कार्यालयांत छापे घातले. मोतेवार अटकेत असताना त्यांच्या कंपन्यांवर छापे घालण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

समृध्द जीवन आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील ४० ठिकाणी छापे घालण्यात आले. तर, समृध्द जीवनच्या फर्ग्युसन रस्त्यावरील लॅन्डमार्क कंपनीच्या कार्यालयात काही तास 'सीबीआय'च्या पथकाने तळ ठोकला होता. मोतेवार यांची म​ल्टि स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. या सोसायटीच्या कार्यालयांवर छापे घालण्यात आले. स्वारगेट, सेव्हन लव्हज् चौक, कोथरूड, धनकवडी त्याशिवाय शिरूर या ठिकाणे छापे घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 'सीबीआय'ने राज्यात ४५ ठिकाणी छापे घालण्यासाठी वॉरंट आणले होते. त्यातील ४० छापे एकट्या पुण्यात घालण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images