Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या पिंपरी येथील महिलेला सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचून जेरबंद केले. तसेच एका तरुणीची सुटका करण्यात आली. मल्लिका महंमद शेख (२७, रा. आदर्शनगर, पिंपरी) हिच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात 'पिटा अॅक्ट'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिका शेख ही महिला तरुणींकडून पुण्यातील लष्कर परिसरात वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील गस्तीवर असलेले नितीन तेलंगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाइक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर सापळा रचून तिला जेरबंद केले. या कारवाईत एका तरुणीची सुटका करण्यात आली.

.............
बेकायदा पिस्तुलविक्री

बेकायदा पिस्तुलविक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी वाकडमध्ये गुरुवारी सापळा रचून अटक केली.

त्याच्याकडून मॅगझिनसह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई वाकड येथील भूमकर पुलाजवळ करण्यात आली. दिलसार नवाब शेख (१९, रा. सोमनाथ गुजर चाळ, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड येथील भूमकर चौकाजवळ एक जण गावठी पिस्तुलाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भूमकर चौकात गुरुवारी सापळा रचला. आरोपी शेख सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या ठिकाणी आला. पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्तुल, मॅगझीन, दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

या प्रकरणी हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.
...........................

विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : लग्नानंतर पती वेळोवेळी किरकोळ कारणावरून भांडणे करून माहेरी पाठवून देत असल्यामुळे नैराश्य आल्याने निगडी येथील २५ वर्षीय विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. वर्षा दत्ता गायकवाड (२५, रा. निगडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती दत्ता बबन गायकवाड (२९, रा. थोरले सनगर, लातूर) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा आणि दत्ता यांचा २०११मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. विवाहानंतर गेल्या एक वर्षापासून दत्ता वर्षाबरोबर किरकोळ कारणांवरून भांडणे करत होता. वर्षाला नांदवत नव्हता. वेळोवेळी माहेरी पाठवत होता. यातून आलेल्या नैराश्यातून वर्षाने निगडी येथील आपल्या माहेरच्या घरी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
...................

पादचारी तरुणाचा मोबाइल चोरला

पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना दुपारच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. हिमांशू बाहेती (२४, रा. हिंजवडी) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. कोल्हेंचा लांडगेंना टोला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'मतदारसंघात रस्ते, पाण्याच्या तक्रारी असताना कोणी खासदारकीची स्वप्ने पाहू नयेत,' असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता लगावला.

चिखली, जाधववाडी, तसेच मोरेवस्ती, साने चौक येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, रुपीनगर येथील गोरख कदम आणि सहकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश असे कार्यक्रम झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख राम गावडे, शहरप्रमुख राहुल कलाटे, महापालिकेतील शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर, सल्लागार मधुकर बाबर, भगवान वाल्हेकर, धनंजय आल्हाट, गजानन चिंचवडे, योगेश बाबर या वेळी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, 'काही जण खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र प्रत्येक मतदारसंघ किल्ला समजून सर करण्याचे आणि संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे काम शिवसेना करत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा बुलंद आवाज क्षीण

0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत शिवसेनेचा बुलंद आवाज येथे काहीसा क्षीण झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही स्थानिक प्रश्नांबाबत मात्र आंदोलन करण्याची नामुष्की या पक्षावर आली आहे. ठोस भूमिका नसल्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलिनीकरण करण्यास शहर शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्या संदर्भात २२ डिसेंबरला प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी शहरप्रमुख राहुल कलाटे, संघटिका सुलभा उबाळे, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, गजानन चिंचवडे, धनंजय आल्हाट, योगेश बाबर, नंदकुमार सातुर्डेकर, बब्रुवान गुळवे यांनी पुढाकार घेतला आहे. 'आमची बांधिलकी सत्तेशी नाही तर केवळ जनतेशी आहे,' या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचाराचे अनुकरण करून विलिनीकरणाच्या विरोधात जनमत चाचणी घेणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता गौतम चाबूकस्वार हे एक आमदार शिवसेनेचे आहेत. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. एका अर्थाने, स्थानिक प्रश्नांबाबत दोन्ही ठिकाणी ठोस भूमिका घेऊन ते मार्गी लावण्याची क्षमता या तिन्ही लोकप्रतिनिधींमध्ये नक्कीच आहे; मात्र तसे घडत नसावे किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळत नसावे, असे स्पष्ट होते. एके काळी शिवसेना म्हटले, की आंदोलनाला धार असायची. त्यामुळेच शिवसेनेची स्वतंत्र स्टाइल निर्माण झाली होती. किमान त्यांच्याकडूनच तसा प्रचार केला जात असे. कुठे गेली ती स्टाइल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

प्राधिकरणाचा मुद्दा लक्षात घेता विलिनीकरणाचा केवळ प्रस्ताव राज्य सरकारने प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मोर्चा प्राधिकरणाच्या कार्यालयावर काढून उपयोग काय? वास्तविक, याबाबत राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. तसे होत नाही. कारण दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. मग प्रश्न सोडवण्याचे अस्त्र राज्य सरकारच्या हाती असताना स्थानिक पातळीवर आंदोलन कशासाठी, याचे नेमके उत्तर मिळत नाही. आम्ही भविष्यात ठोस भूमिका घेऊ, असे मुळमुळीत आणि भलतेच उत्तर स्थानिक पदाधिकारी देत आहेत.

विलिनीकरणाबाबत जनमत चाचणी घेणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू, असे पक्षाने म्हटले आहे. वास्तविक, वर्षभरापूर्वीच मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून कौल दिला आहे. पसंतीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यात शिवसेनेचेही प्रतिनिधी आहेत. मग आता पुन्हा जनमत कशासाठी? यापूर्वीही एकदा अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या माध्यमातून जनमत चाचणी घेण्यात आली. विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. आता तसा मोर्चा काढता येणार नाही. कारण सत्तेत शिवसेना सहभागी आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर जनजागृतीसाठी मोर्चाचा इशारा दिला, असा दावा केला जात आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करणे, रेड झोन, पवना थेट जलवाहिनी, प्राधिकरणाच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा जमीन, २४ तास पाणीपुरवठा, नव्याने समाविष्ट गावांचा प्रस्ताव, पूररेषा, पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपो, एचए कंपनीचे पुनरुज्जीवन, पवना सुधार योजना असे शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे मुद्दे महापालिकेच्या २०१७मधील निवडणुकीत पुन्हा उपस्थित होणार आहेत. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला आव्हान निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न निश्चित करतील. परंतु, शिवसेनेने केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता स्थानिक प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. जनतेशी बांधिलकी जपायची असेल तर याच मुद्द्यांवर लोकांना न्याय मिळाला पाहिजे. प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत. अन्यथा, 'तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो' असे म्हणायची वेळ येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारकोड सांगणार घरपट्टी

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

तुमचे घर कोठेही असू द्या, त्याची नोंद ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या दप्तरी होते घरक्रमांकाने. हा घरक्रमांक असलेला अॅल्युमिनियमचा बिल्ला तुमच्या घराच्या दरवाज्यावर लावला जातो. त्यावर 'छोटे कुटुंब-सुखी कुटुंब' अशी बोधवाक्ये कोरलेली असतात. ही झाली पारंपरिक पद्धत. परंतु तंत्रज्ञानाच्या आजच्या बदलत्या जगात या बिल्ल्यांची जागा आता बारकोड प्लेटने घेतली आहे. जुन्नरमधील घरांना या बारकोड प्लेट बसवण्याचे काम सध्या सुरू आहे.

मिळकतधारकांना थेट मोबाइल अॅपद्वारे एसटी तिकिटासाठीच्या छोट्या प्रिंटरवर घरी येऊन बिल देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. प्लेटवरील बारकोडचे मोबाइलवरील स्कॅनरच्या साह्याने स्कॅनिंग केले जाईल आणि थेट तुमच्या मिळकतीची घरपट्टी, पाणीपट्टी आदींचे बिल तुम्हाला मिळेल, असे हे अॅप आहे. मिळकतकरधारकाला त्याच्या मालमत्तेचा तपशील, कराची आकारणी कशी केली, हेदेखील थेट पाहता येईल, अशी व्यवस्था या टेक्नोसॅव्ही यंत्रणेत समाविष्ट आहे. जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी 'मटा'ला ही माहिती दिली.

या प्रकारच्या बारकोड प्लेट जुन्नरमध्ये असलेल्या साडेसहा हजार मिळकतींना बसवण्यात येत आहे. या प्लेट बसवण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येणार आहे. घरोघरी जाऊन बारकोड स्कॅनिंग करून बिल देण्यासाठी एक मोबाइल आणि त्याचा प्रिंटर यांसाठी दोन लाखांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या नवीन वर्षापासून मिळकतधारकांना या नव्या पद्धतीने बिले दिली जातील, असे वारुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धानोरे गावात दोन लाख रुपयांची वीजचोरी उघड

0
0

पुणे : खेड तालुक्यातील धानोरे गावातील लक्ष्मी ब्राइट स्टील या कारखान्यात सुमारे दोन लाख सात हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे 'महावितरण'ने उघडकीस आणले आहे.

धानोरे येथील या कारखान्याला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आलेली आहे. या कारखान्याची जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. कारखान्यातील वीजवापरातील अनियमिततेवरून संशय निर्माण झाल्याने 'महावितरण'च्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. त्यामध्ये कारखान्यातील सीटी ऑपरेटेड वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्याद्वारे दोन लाख सात हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कारखान्याच्या मालक अनुपमा संजय दरक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुनील पावडे, रमेश मलामे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, सुरेश वानखेडे, उपकार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण, सहायक अभियंता जया केवलिया, कनिष्ठ अभियंता श्रीकांत हुमनाबादकर, विशाल सावैतुल, अशोक तांदळे आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’ची १५ लाखांची वसुली

0
0

बारामती : विविध ठिकाणी नुकत्याच झालेल्या महालोकअदालतीमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या 'महावितरण'च्या ५३७ वीजग्राहकांनी थकित बिलापोटी १५ लाख २७ हजार रुपये भरले आहेत. बारामती परिमंडलातील विविध न्यायालयांमध्ये या महालोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना विभागीय कार्यालयांकडून पोस्टाने, तर शाखा कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष नोटीस देण्यात आली होती. त्याद्वारे थकबाकीची रक्कम भरण्याचे, तसेच लोकअदालतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. बारामती मंडलात ३९३ ग्राहकांनी १० लाख पाच हजार रुपयांचा भरणा केला. सोलापूर मंडलात ६१ ग्राहकांनी दोन लाख ४० हजार रुपयांचा, तर सातारा मंडलात ८३ ग्राहकांनी दोन लाख ८१ हजार रुपयांचा भरणा केला. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता केशव सदाकळे (बारामती), संजय साळे (सोलापूर), सुरेश गणेशकर (सातारा) यांच्या नेतृत्वाखाली, तसेच कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले यांच्या समन्वयांतर्गत बारामती परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांसाठी रुईचा लढा

0
0

नगरपालिकेत येऊनही वीस वर्षे मूलभूत बाबींचाच अभाव

म. टा. प्रतिनिधी, बारामती

गेल्या वीस वर्षांपासून स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, वीज या गोष्टींसाठी रुई गावाचा लढा पाचवीला पुजलेला आहे. आम्ही आपल्या वडिलोपार्जित जमिनी राष्ट्रवादी काँग्रेसला स्मरून विकासकामांकरिता कोणताही विरोध न करता कवडीमोल भावाने दिल्या; मात्र आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

बारामती शहराचा विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात सर्वत्र गुणगौरव केला जात आहे; मात्र शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रुई गावात सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी परिस्थिती असल्याचे जितेंद्र चौधर यांनी 'मटा'ला सांगितले.

वाढीव हद्दीसाठी निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक फिरकत नाहीत. वाढीव हद्दीतील नगरसेवकांनी नागरिकांना खोटे मोबाइल नंबर देऊन बोळवण केली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आपले पालिकेतील लोकप्रतिनिधी कोण आहेत, हेच माहीत नसल्यामुळे समस्या नेमक्या कोणाकडे मांडाव्यात, हाच गंभीर प्रश्न येथील नागरिकांना पडतो. रुई गावात दोन महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता यांचा अभाव, तसेच गावात एकही बाग नाही, अशी उदास अवस्था वीस वर्षांपासून आहे.

गाव पालिकेत समाविष्ट झाल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटे झाले आहे. आहेत त्या सुविधा बंद पडू लागल्या आहेत. गावाचा विकास फक्त कागदावरच दिसत आहे, प्रत्यक्षात काही नाही. वीस वर्षे आहे तीच परिस्थिती. नगरसेवक सर्व काही आलबेल असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रुई गावाची लोकसंख्या सात हजार असून २०१४-१५चा गावाचा महसूल अंदाजे २५ लाख रुपये जमा होऊनही बारामती नगर परिषद पिण्याच्या पाण्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेत नाही. रुई गावाने पिण्याच्या पाण्यासाठी जळोची गट नंबर ३७२मध्ये एक हेक्टर ९० आर क्षेत्र पिण्याच्या पाण्यासाठी घेण्यात आले होते. याच ठिकाणावरून नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे शक्य आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास गाव स्वागत करील, असे चौधर यांनी सांगितले. रुईच्या नागरिकांनी नगरसेविका सुनीता चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कधीच संपर्क होत नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले आहे. नागरिकांनी नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले आहे, याचा विसर पडला आहे.

रस्त्यांची कामे सुरू आहेत. पिण्यासाठी उजनीचे पाणी आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामे या गावात केली आहेत.

- अनिता बालगुडे, नगरसेविका, रुई, बारामती

रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. इतर कामे मंजुरीसाठी पाठवली आहेत.

- विक्रम तांबे, नगरसेवक, रुई, बारामती

नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यास पालिका सर्वतोपरी प्रयत्न करील.

- नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मानेसर येथील नॅशनस ​​सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) बॉम्बशोधक पथकाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान पुण्यातील एका जवानाचा ह्रदयविकाराने शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या जवानाचे पार्थिव शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यात आणण्यात येणार आहे.

आनंद भीमराव डोंगरे (३१, रा. गोखलेनगर पोलिस वसाहत, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे. डोंगरे हे पुणे पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक पथकात कार्यरत होते. डोंगरे पुणे पोलिस दलात २००६मध्ये भरती झाले होते. त्यानंतर ते बॉम्बशोधक पथकात रुजू झाले. डोंगरे यांच्या निधनाने पुणे बॉम्बशोधक पथकात शोककळा पसरली होती.

मानेसर येथील 'एनएसजी'च्या बॉम्बशोधक पथकाने देशभरातील विविध बॉम्बशोधक पथकांना प्रशिक्षणासाठी बोलावले होते. यावेळी काही प्रात्याक्षिकांवर आधारित स्पर्धाही घेण्यात आल्या. महाराष्ट्रातून पुणे आणि ग​डचिरोली पोलिस दलाच्या दोन पथके तेथे गेली होती. त्यात डोंगरे यांचा समावेश होता.

'मानेसर येथील दहा दिवसांचे प्रशिक्षण गुरुवारी संपले होते. प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे पोलिसांना 'गोल्ड मेडल' मिळाले होते. हे पारितोषिक वितरण शुक्रवारी सकाळी होणार होते. त्यानंतर पुण्याचे पथक मायदेशी परतणार होते. डोंगरे यांना झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला असावा.

सोलापुरात अंत्यसंस्कार

डोंगरे यांचे पार्थिव विमानाने शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर ते पुण्यात आणण्यात येईल आणि येथून सोलापूरला नेण्यात येईल. डोंगरे यांच्यावर सरकारी इतमात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुक्याच्या पूर्वानुमानासाठी हवामान खात्याचे प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिवाळ्यामध्येच धुके कसे पडते, धुके दाट वा विरळ होण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत का, एकदा पडलेले धुके साधारण किती वेळ टिकू शकते, धुक्याच्या अशा वागण्याचे नेमके काय परिणाम होतात आणि त्या परिणामांची नेमकी कारणे काय आहेत, अशा सर्वच गोष्टींबद्दल जनसामान्यांसोबतच हवामानतज्ज्ञांमध्येही उत्सुकता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने आता धुक्याचा अंदाज वर्तविणारी प्रभावी यंत्रणा विकसित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नागरी वाहतूक, विमान वाहतूक, शेती अशा महत्त्वाच्या बाबींवर धुक्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळेच हवामान खात्याने धुक्याशी निगडित सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी हिवाळी धुक्याच्या निरीक्षणासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानातील निरीक्षणांच्या आधारे धुक्याचा अंदाज वर्तविणारी प्रभावी यंत्रणेची निर्मिती करण्यासाठी खात्यातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.

भारतात पहिल्यांदाच धुक्याच्या अभ्यासासाठी अशा प्रकारच्या अभियानाची सुरुवात झाली आहे. या पुढील तीन वर्षांमध्ये या अभियानासाठीची निरीक्षणे केली जाणार आहेत. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या मदतीने त्यासाठीची विशेष निरीक्षणे नोंदविण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात येत आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे सातत्यपूर्ण निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. त्या आधारे धुक्याच्या निर्मितीप्रक्रियेची पूर्वानुमान देऊ शकणारी अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले.

या बाबींचा होणार अभ्यास...

सध्या या अभियानाच्या माध्यमातून दिल्ली आणि परिसरातील धुक्याची वैशिष्ट्ये अभ्यासली जाणार आहेत. धुक्याचे गुणधर्म, त्याची वारंवारता, त्याच्याशी निगडीत थर्मोडायनॅमिक्स, क्लाउड मायक्रोफिजिक्स अभ्यासण्याचे प्रयत्न या अभियानातून केले जाणार आहेत. धुक्याची भौतिक वैशिष्ट्ये, धुक्याची निर्मिती प्रक्रिया, धुके दाट वा विरळ होण्यामागची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठीही हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. जमिनीवरील हवामानाची परिस्थिती, किरणोत्सारामधील समतोल, धुक्यामधील पाण्याचे रसायनशास्त्र, वाऱ्यांचा अभ्यास, तापमान, आर्द्रता आदी बाबींचाही या निमित्ताने सखोल अभ्यास होणार आहे. त्या आधारे धुके कधी पडणार, ते किती दाट असू शकेल, ते किती काळ टिकेल याचा अचूक अंदाज देऊ शकणारी यंत्रणा

सहभागी संस्था

धुक्याचा संपूर्ण अंदाज वर्तविणारी यंत्रणा विकसित करण्यासाठीच्या या अभियानामध्ये हवामान खात्यासोबतच एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतीय हवाईदल, आयसीएमआर, आयसर मोहाली, नॅशनल सेंटर फॉर मिडिअम रेंज फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), आयआयटी दिल्ली या संस्थाही सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊतने गुन्ह्यांची कबुली दिली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या तपासात योगेश राऊत याच्याकडे संशयाची सुई वळाली होती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली होती, अशी साक्ष तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शौकतअली साबीरअली सय्यद यांनी कोर्टात दिली.

नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्याची सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे. सरकार पक्षाकडून आतापर्यंत या केसमध्ये ३५ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी तपास अधिकारी सय्यद यांची साक्ष नोंदविली.

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार आणि दुचाकी ओळख परेडसाठी कोर्टात आणली होती. नयनाच्या पतीने ती हरविल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. जरेवाडी येथे पोलिसांना मिळालेला मृतदेह नयना पुजारी यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेचे (युनिट चार) पोलिस निरीक्षक सय्यद यांनीही तपास केला होता.

पुजारीच्या एटीएम कार्डचा वापर करून ६१ हजार रुपये काढण्यात आले होते. पुजारी काम करीत असलेली सिनेक्रॉन ही कंपनी आणि झेन्सॉर या कंपनीचे कार्यालय एकाच इमारतीत आहे.

तेथील सुरक्षारक्षक, कॅबचालकांकडे चौकशी करण्यात आली, एटीएम केंद्राच्या ठिकाणी असलेल्या रखवालदारांचीही चौकशी केली गेली. त्यानुसार आरोपीचे रेखाचित्र तयार केल्याची माहिती सय्यद यांनी कोर्टात दिली. या गुन्ह्याशी संबंधित ठिकाणांच्या या भागातील मोबाइलचा डाटा तपासण्यात आला होता.

राऊतची मोटार झेन्सॉर या कंपनीत वाहतुकीसाठी होती. गुन्हा केल्यानंतर त्याने गाडी भावाला चालविण्यास दिली होती. त्याच्यावर संशय असल्याने त्याला येरवडा येथे ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने नयना पुजारी यांच्यावर बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिल्याचे सय्यद यांनी साक्षीत नमूद केले.

युवकाला अटक

पुणेः अल्पवयीन मुलीला फळांच्या रसातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

श्रेयस अजित भट (१९, रा. न्यू हिल टॉप सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपीने सात डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. तिला कोथरूड येथील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये ठेवले. या मुलीला आरोपीने फळांच्या रसातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. तसेच घरातून सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार मुलीने तीन अंगठ्या नेल्या होत्या. हा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाटा मोटर्सला कोर्टाचा फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रदूषण रोखण्यासाठी दोन हजार सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांची नोंदणी थांबवा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिल्यामुळे टाटा मोटर्सला फटका बसणार आहे. टाटाच्या एरिया, स्टॉर्म व सुमो या गाड्यांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या वाहन निर्मितीवरही काहीसा परिणाम होईल, असे बोलले जात आहे.

टाटा मोटर्सचे पुण्यात पिंपरी व रांजणगाव येथे तसेच गुजरातमध्ये काम चालते. याठिकाणांहून चारचाकी वाहनांची निर्मिती करण्यात येते. चारचाकी वाहनांच्या दृष्टीने दिल्ली ही मोठी बाजारपेठ असल्याने दिल्लीला मोठ्या प्रमाणात वाहने पाठविण्यात येतात, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे या प्रक्रियेलाच 'ब्रेक' लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदूषणाचा प्रश्न दिल्लीमध्ये सध्या जटील बनला आहे. सम-विषम क्रमांकाची वाहने एकदिवसाआड रस्त्यावर आणण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्यानंतर दोन हजार सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांची नोंदणी थांबवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये वाहन खरेदीला 'ब्रेक' लागेल , असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉवर धोकादायक नाहीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड उत्सर्जनातून आरोग्याला कोणताही धोका नाही. हे उत्सर्जन म्हणजे रेडिओ लहर असून मानवी आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होत नाही,' असे स्पष्टीकरण टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चे प्रधान सल्लागार सुरेश कुमार गुप्ता यांनी शुक्रवारी दिले.

मोबाइल टॉवरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड (ईएफएम) उत्सर्जानबद्दल पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी 'ट्राय'तर्फे पुण्यामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. ट्रायचे प्रधान सल्लागार सुरेश कुमार गुप्ता, बी अँड सीएस विभागाचे सल्लागार अग्नेश्वर सेन, सेबिचेन मॅथ्यूज यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या ईएमएफ उत्सर्जनातून आरोग्याला अपाय होतो, असा समज नागरिकांमध्ये आहेत. मात्र, सरकार यासंदर्भात अतिशय कठोर दिशानिर्देश लागू केले आहेत. त्यामुळे या लहरींच्या उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. विविध देशांमध्ये यावर विस्तृत अभ्यास झाला असून २५ हजारांहून अधिक संशोधनांमध्ये ईएमएफ उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत, असे गुप्ता यांनी सांगितले.

सेन यांनी मोबाइल टॉवरमधून होणारे उत्सर्जन आणि मानवी आरोग्य या विषयावर सादरीकरण केले. पुरेशा प्रमाणात नसलेल्या मोबाइल टॉवरमुळेच मोबाइल सेवेचा दर्जा घसरत चालला आहे. मोबाइल टॉवर आणि मोबाइलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जनामध्ये इतकी ऊर्जा नसते, त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोतच नाही. विकसित देशांसह जगभरातील इतर देशांचा विचार करता बीटीएस आणि मोबाइलमधून उत्सर्जित होणाऱ्या ईएमएफ उत्सर्जनासंदर्भात भारतातील दिशानिर्देश अतिशय कठोर आहेत, असे सेन यांनी सांगितले.

दूरसंचार विभागातील टर्म सेलच्या प्रतिनिधींनी सरकारने जाहीर केलेले दिशानिर्देश पालन करण्यासाठी घेण्यात येणारी खबरदारी तसेच मोबाइल टॉवरमधील उत्सर्जनाची पातळी तपासण्याची पद्धत याबद्दल माहिती दिली. ज्या मोबाइल कंपन्यांचे टॉवर दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करत नाही त्यांना दंड ठोठावल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ट्रायचे वरिष्ठ अधिकारी, टर्म सेल अधिकारी, राज्य सरकारी अधिकारी, नागरिक कल्याण संस्था, स्वयंसेवी संघटना, ग्राहक मंच, बांधकाम व्यावसायिक, शिक्षण तज्ञ आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल टॉवर आणि मोबाइलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जनामध्ये जी ऊर्जा असते, त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचत नाही. विकसित देशांसह जगभरातील इतर देशांचा विचार करता बीटीएस आणि मोबाइलमधून उत्सर्जित होणाऱ्या ईएमएफ उत्सर्जनासंदर्भात भारतातील दिशानिर्देश अत्यंत कठोर आहेत.

- अग्नेश्वर सेन, सल्लागार, बी अँड सीएस विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा संप अखेर मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ देण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसने (इंटक) सुरू केलेला संप शुक्रवारी दुपारी मागे घेण्यात आला. पुण्यात संपाला समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, अन्य शहरात बहुसंख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे संप मागे घेतल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

'राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ मिळावी,' म्हणून इंटकतर्फे गेल्या आठवड्यात राज्य सरकारला संपाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सरकारने दखल न घेतल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून संघटनेने बेमुदत संपाला सुरुवात केली होती. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, परभणी या ठिकाणी संपाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम, बाहेरगावहून पुण्यात दाखल होणाऱ्या गाड्यांवर झाला होता.

'परिणाम दुसऱ्या दिवशीही'

संपाचा परिमाण दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचा दावा संघटनेने केला आहे. 'स्वागरेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन आगारातून सोडण्यात आलेल्या अनेक गाड्या परतल्याच नाहीत. त्यामुळे तीनही स्थानकात गाड्यांची संख्या कमी होती,' असे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व तपशीलासह प्रस्ताव वेबसाइटवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करताना केलेल्या लपवाछपवीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने प्रस्तावाची सविस्तर माहिती वेबसाइटवर शुक्रवारी टाकली. केंद्राकडे दिलेला प्रस्ताव, या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या शहरातील कंपन्या, स्वयंसेवी संस्था आदींची नावे, त्यांच्याबरोबर करण्यात आलेले करार, विशेष कंपनीबद्दल (एसपीव्ही) सर्वसाधारण सभेने केलेल्या उपसूचना, या योजनेसाठी येणारा खर्च आदी सारी माहिती आता वेबसाइटवर उपलब्ध झाली आहे.

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करण्यापासून तो केंद्राकडे पाठविताना पालिका प्रशासनाने याबाबतची कोणतीही माहिती देण्याचे सतत टाळले होते. प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण पुढे करत प्रशासनाने नगरसेवकांसह सर्वसामान्य नागरिकांपासून सतत ही माहिती लपविली होती. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शहरातील अनेक संस्था, खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेताना त्यांच्याबरोबर करार पालिका आयुक्त कुमार यांनी केले होते. स्थायी समितीसह पालिकेतील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता प्रशासनाने परस्पर हे करार केले आहेत.

पालिका प्रशासनाने केलेल्या या लपवाछपवी बाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने अनेक प्रश्न उपस्थित करत याची उत्तरे पालिका प्रशासनाने द्यावी, यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

स्मार्ट सिटी योजनेसाठी शहरातील ज्या संस्था, कंपन्यांबरोबर पालिकेने करार केले आहेत, त्यांची नावे, त्यांच्यात झालेले करार, या संस्थांनी पालिकेला दिलेल्या पाठिंब्याची पत्रे पालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहेत. प्रस्ताव, नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचना अशा गोष्टींची सविस्तर माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनात सहभाग नाही

0
0

पुणेः 'बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शित होण्याविरोधात झालेल्या आंदोलनात आमचा कोणताही सहभाग नाही,' असे स्पष्टीकरण पेशवे आणि सरदार दाभाडे यांच्या वंशजांनी शुक्रवारी दिले.

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात इतिहासाचे विद्रुपीकरण होत असल्याचा आक्षेप घेत भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे खेळ रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यापूर्वी शनिवारवाडा येथे 'जोडे मारा' आंदोलनही करण्यात आले होते. पेशवे आणि सरदार दाभाडे यांच्या वंशजांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, पेशवे आणि सरदार दाभाडे यांच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरदार सत्यशिलराजे दाभाडे, महेंद्र पेशवा, पुष्करसिंह पेशवा, डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे आदी या वेळी उपस्थित होते.

'बाजीराव मस्तानी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नाही. चित्रपटातील इतिहासाचे विद्रुपीकरण वगळण्यात यावे, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. सनदशीर मार्गाने आम्ही विरोध केला. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला आमचे समर्थन नाही. आता चित्रपट प्रदर्शित झाल्याने आमच्यासाठी हा विषय संपला आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीव्र निदर्शने आणि शो रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुचर्चित व वादग्रस्त बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला. कोथरूड येथील सिटी प्राईड आणि मंगला टॉकीज या दोन्ही थिएटरसमोर आंदोलने करण्यात आली. 'मंगला टॉकीज' येथे लावण्यात आलेली सिनेमाची पोस्टर्स फाडण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

कोथरूड येथील सिटीप्राइड थिटएरसमोर 'भाजयुमो'च्या कार्यकर्त्यांनी सकाळीच गर्दी केली होती. 'बाजीराव मस्तानी'चा शो दाखवण्यास विरोध करून आंदोलन सुरू करण्यात आले होते. अलंकार पोलिस ठाण्यातील अधिकारी-पोलिस कर्मचारी या ठिकाणी होते. पोलिसांच्या बंदोबस्तात पहिला शो पार पाडला. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पुढील शो रद्द करण्यात आले होते. पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी मंगला टॉकीज परिसरात धाव घेतली. तेथील शो बंद करण्याची भूमिका घेऊन त्यांनी तेथील पोस्टर्सवर अंडी फेकली, तसेच पोस्टर्स फाडली. थिएटर व्यवस्थापनाने पुढील शो-बंद करणार असल्याचे जाहीर केल्यावर आंदोलन थांबले होते. शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. बाजीराव मस्तानी, दिलवाले या सिनेमांना होत असलेला विरोध पाहता पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी शहरात बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले होते.

आजही थिएटर परिसरात बंदोबस्त

थिटएरच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंदोबस्त शनिवारीही कायम ठेवण्यात येणार आहे. भाजप तसेच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन झाल्यामुळे पोलिसांनाही टोकाची भूमिका घेतली नाही. आंदोलनकर्त्यांना काही काळासाठी ताब्यात घेतल्यानंतर सोडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गरिबांना मोफत उपचार द्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कागदपत्रांसह कोणत्याही आजाराचे कारण न सांगता पेशंटना तत्काळ मोफत उपचार द्या, माणुसकीच्या भावनेतून त्यांच्यावर उपचार करा. कोणताही पेशंट उपचाराविना घरी जाता कामा नये,' अशा कडक शब्दांत धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी शहरातील बड्या हॉस्पिटलच्या विश्वस्तांना तंबी दिली.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब पेशंटांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारींवर चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मादाय हॉस्पिटलने सेवा देण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील धर्मादाय हॉस्पिटलच्या विश्वस्तांची धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत विश्वस्तांना समज देण्यात आली. शहरातील अनेक बड्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठीच्या दोन टक्के निधीची रक्कम अद्याप खर्चण्यात आलेली नाही. साठ हॉस्पिटलकडे सुमारे तीस कोटींची रक्कम शिल्लक असून, सर्वाधिक निधी शिलकीत बिर्ला हॉस्पिटल (१२ कोटी) आीण रुबी हॉस्पिटल (सात कोटी) यांचा समावेश आहे. मोफत उपचार देण्याची योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, तसेच तक्रारी देखील या वेळी हॉस्पिटलकडून मांडण्यात आल्या.

'शहरातील सर्व धर्मादाय हॉस्पिटलनी त्यांच्याकडील गरिबांसाठीचा शिल्लक निधी लवकरात लवकर खर्च करावा. गोरगरिबांना उपचारासाठी नाकारू नका. पेशंट कोणत्या कारणास्तव आला आहे, कोठून आला आहे याचा विचार न करता त्यांच्यावर तातडीने उपचार करा. माणुसकीच्या आणि सामाजिक बांधिलकी समोर ठेऊन उपचार द्या. उपचाराविना कोणताही पेशंट घरी जाता कामा नये', अशी तंबी डिगे यांनी दिली.

हॉस्पिटलच्या विश्वस्तांच्या बैठकीला सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, धर्मादाय सहआयुक्तालयातील रुग्णालय अधीक्षक अभिजित अनाप, रुबी हॉस्पिटलचे डॉ. परवेज ग्रँट, 'जहांगीर'चे एच. सी. जहांगीर, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. एस. एस. इनामदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांसाठीचा निधी अपुरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपंगांसाठी जिल्हास्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयाकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सातत्याने अपुरा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे अपंगांसाठीच्या योजना राबविताना अनेक मर्यादा येत असून हजारो अपंगांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अंपगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयाकडून लाभार्थ्यांच्या तुलनेत अपुरा निधी मिळत आहे. याबाबत परिषदेने अपंग कल्याण आयुक्तांना पत्र पाठवून पुरेसा निधी देण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही.

परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अपंग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व व शालंत परीक्षेत्तर स्कॉलरशिप दिली जाते. या दोन्ही योजनांसाठी गेल्या तीन वर्षांत चार हजार ३८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या स्कॉलरशिपसाठी परिषदेने पाच कोटी २६ लाख ५४ हजार निधीची मागणी केली होती. त्यापैकी ४४ लाख ४८ हजार रुपये निधीच परिषदेला प्राप्त झाला. त्या निधीतून केवळ १०३१ अर्ज धारकांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. अपंगांना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणाऱ्या बीजभांडवल योजनेसाठी १२ लाख ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ पाच लाख ५८ हजार रुपये निधी मिळाला. एकूण ३९ लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील १९ जणांना या योजनेचा लाभ मिळाला.

अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी १७ जून २०१४ पासून राबविण्यात येत असलेल्या योजनेकरीता अद्याप निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिषदेकडे ३७ दाम्पत्यांनी अर्ज केले असून अद्याप एकालाही त्याचा लाभ मिळालेला नाही. या योजनेचा निधी देण्यासाठी लेखाशीर्षच अस्तित्त्वात नसल्याने सरकारकडून निधी मिळत नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलंमुळे विनोद कळू लागला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'हसायला कधी लागलो माहीत नाही पण, पुलंच्या पुस्तकांमुळे विनोद कळू लागला. त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. पुल माझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहिले आहेत,' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन इव्हेंट्स मीडियातर्फे आयोजित पुलोत्सव तपपूर्ती सोहळ्यात शनिवारी प्रभावळकर यांना ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते 'पु.ल. स्मृती सन्मान' प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक राजेश गोयल, 'आशय'चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, मयूर वैद्य आदी या वेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रभावळकरांचा प्रवास सर्वांसमोर जिवंत झाला. 'चिमणराव या व्यक्तिरेखेने चेहरा, ओळख दिली. प्रायोगिक रंगभूमी ते बालनाट्य असा प्रवास केला. माझ्यावर माझ्यापेक्षा दिग्दर्शकांचा जास्त विश्वास आहे. एका भूमिकेत अडकून पडलो नाही. ठरावीक ओळख पुसण्यासाठी विविध भूमिका केल्या. मुन्नाभाईमधील गांधीजी म्हणून मला प्रेक्षक स्वीकारतील का, अशी शंका होती. पण, लोकांनी ही भूमिका उचलून धरली,' अशी भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केली.

पु.ल. देशपांडे, मल्लिकार्जून मन्सूर, कुमार गंधर्व, ना.सी. बेंद्रे यांसारख्या मातब्बरांनी समाजाला देण दिली आहे. कलांचा हा माहोल चिरंतन टिकला पाहिजे. समाज सर्व कलांमध्ये समरस होतोय, असे वातावरण निर्माण व्हायला हवे, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत काळे, अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा 'करुणोपनिषदे' हा कार्यक्रम रंगला. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

डोक्याचे 'माप' कळाले

चिमणरावमुळे पुणेरी पगडीची सवय झाली. त्यामुळे डोक्याचे 'माप' कळाले, असे दिलीप प्रभावळकर यांनी उच्चारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पगडी डोक्यावर बसेल की नाही, याची चिंता असायची. पुढे चिमणराव व्यक्तिरेखेचा प्रभाव पुसला; पण पगडीचे महत्व आजही कायम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त करताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगंधर्व मंडळातर्फे नाट्यसंगीत महोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालगंधर्वांनी रंगभूमीवर आणलेल्या 'संगीत स्वयंवर' या संगीत नाटकासह 'संशय कल्लोळ' आणि 'पुण्यप्रभाव' या नाटकांचेही यंदा शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे नाटककार गो. ब. देवल यांचेही स्मृतिशताब्दी वर्ष आहे. या चतुर्गंध शताब्दी महोत्सवानिमित्त बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दोन दिवसीय नाट्यसंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, सोमवारी (२१ डिसेंबर) आणि मंगळवारी (२२ डिसेंबर) दुपारी ४.३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. सोमवारी 'रंगसुगंध' ही नाट्यसंगीताची मैफल होणार असून रामदास कामत, बकुल पंडित, अरविंद पिळगावकर, रवींद्र कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना संजय गोगटे (ऑर्गन) आणि नितीन दिवाकर (तबला) हे वादक साथसंगत करणार आहेत. मंगळवारी कलाद्वयी प्रस्तुत 'संगीत स्वयंवर' या संगीत नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्यामध्ये अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी दिली. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images