Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आयएस’च्या जाळ्यात पुण्याची मुलगी

$
0
0

सोळा वर्षांच्या मुलीची 'एटीएस'कडून सुटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीला 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेत जाण्यापासून रोखण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले. ही मुलगी गेल्या चार महिन्यांपासून सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सौदी अरेबिया, केनिया, दुबई, ब्रिटन या देशांतील 'आयएस'शी संबंधित सुमारे दोनशे संशयितांच्या संपर्कात होती. या मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून, तिच्यावर तपास यंत्रणांनी 'नजर' ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

'एटीएस'चे प्रमुख विवेक फणसळकर आणि विशेष पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना या मुलीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे युनिटचे प्रमुख भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने खबऱ्यांच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या साह्याने या मुलीची पूर्ण माहिती मिळवून तिची ओळख पटवली. गेल्या दहा दिवसांपासून हे 'ऑपरेशन' सुरू होते.

राजस्थान येथे दोन आठवड्यांपूर्वी 'इंडियन ऑइल' या कंपनीमधील मॅनेजर सिराजउद्दीन याला अटक झाली होती. सुसाइड बॉम्बर बनण्यापर्यंत या मुलीची मानसिक तयारी झाली होती. सिराजउद्दीनच्या अटकेनंतर त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटस् वरील एका ग्रूपमध्ये तिचे अकाऊंट आढळले होते.

''आयएस' शी संबंधित बातम्या पाहून या मुलीचे कुतहल जागे झाले होते. वारंवार बातम्या पाहणे, इंटरनेटवर सर्च करून 'आयएस'ची तिने माहिती मिळवली आणि प्रभावाखाली आली. फेसबुकच्या माध्यमातून तिने 'आयएस'शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ती पहिल्यांदा एका श्रीलंकन 'हँडलर'च्या संपर्कात आली. त्याला श्रीलंकेत अटक झाली आहे. त्याच्या माध्यमातून ती सिराजउद्दीनच्या संपर्कात आली होती,' असे सूत्रांनी नमूद केले.

'आयएस'शी संबंधित एका गटात समावेश झाल्यानंतर तिचा कट्टरतेकडील प्रवास सुरू झाला. तिला पुढील वर्षी सीरियात नेण्यात येणार होते. तेथे तिला वैद्यकीय शिक्षण देण्यात येईल आणि 'आयएस' त्याचा खर्च करेल, असे तिला भासवण्यात आले. या गटात ब्रिटन, सौदी अरेबिया, केनिया, दुबई या देशांपासून महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगण, त​मिळनाडू, जम्मू-काश्मीर, कर्नाटक या राज्यातील काही जणांचा समावेश होता. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अनेक मुलींनाही तिने 'आयएस'च्या जाळण्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

'मुलांना सांभाळा'

'आयएस'च्या प्रचाराच्या जाळ्यात आपली मुले अडकणार नाहीत, यासाठी तेरा ते तीस वयोगटातील मुला-मुलींच्या पालकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले आहे. मुलांच्या वागण्यात अचानक मोठा बदल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफएसआय’चा परिणाम तपासणार

$
0
0

नागपूर : पुण्यातील मेट्रो सक्षम करण्यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरापर्यंत चार चटई क्षेत्र (एफएसआय) मंजूर केल्याने कोणते सामाजिक परिणाम होतील याचा अभ्यास करण्यात येईल, असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले.

काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी पुण्यातील मेट्रो रेल्वेबाबत लक्षवेधी सूचना सादर केली. त्यात पुणे मेट्रोकरिता राज्य सरकार निधी कसा उभारणार, करापोटी पुणेकरांवर किती आर्थिक भार पडणार तसेच वाढीव एफएसआय दिल्यानंतर पायाभूत सुविधांवर किती ताण पडणार आदी प्रश्ने उपस्थित केले. विशेषत: कर्वे रोडवरील मेट्रोमुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तिथे चार एफएसआय दिल्यानंतर बहुमजली इमारती उभारल्या जातील. तेव्हा मेट्रोत गर्दी वाढावी म्हणून हा एफएसआय दिला काय, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांनीही रणपिसे यांनी उपस्थित केलेली शंका योग्य असल्याचे नमूद केले. एफएसआय वाढवून मेट्रो आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहात काय, तसे नसेल तर वाढीव एफएसआयमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक परिणामांना तपासून बघावे लागेल, असे निंबाळकर यांनी नमूद केले. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, की 'मेट्रो परिसरातील व्यावसायिक उपयोगिता वाढवून आर्थिक सक्षमता प्रदान करणे हा मूळ हेतू आहे. मुंबईत बीओटी तत्त्वावर सुरू केलेल्या मेट्रोचे तिकीट दर रिलायन्सच्या हातात आहेत. भविष्यात तसे होऊ नये म्हणून मेट्रोकरिता राज्य सरकारच निधी उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार प्रत्येकी २० टक्के अंशदान राज्य व केंद्र सरकार, ५० टक्के आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे कर्ज व गुंतवणूक आणि दहा टक्के स्थानिक महापालिकेकडून निधी उभारण्यात येत आहे.' सामाजिक परिणामांचा अभ्यास करू, असेही ते म्हणाले.

..

मेट्रो डीपीआरमध्ये सुधारणा

पुणे मेट्रोबाबत उपस्थित होत असलेल्या विविध शंकांचे समाधान करण्याची सूचना सभपतींनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना केली. तेव्हा गिरीश बापट म्हणाले, की 'पुणे मेट्रोचा सुधारित आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मेट्रोचा एक मार्ग नदीकाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या कसबा पेठ, नारायणपेठ आणि दत्तवाडीसारखे परिसर मेट्रोशी जोडता येणार आहेत.' सुधारित आराखड्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहितीही बापट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसूचनांना वाटाण्याच्या अक्षता?

$
0
0

प्रस्तावात उपसूचनांच्या समावेशाबद्दल शंका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येऊ नये, यासाठी सर्वसाधारण सभेत सलग तेरा तास चर्चा करून नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनांना केंद्रात सादर केलेल्या प्रस्तावात वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. केंद्राला देण्यात आलेला प्रस्ताव पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर गुरुवारी ही बाब स्पष्ट झाली. स्मार्ट सिटीसाठी स्थापण्यात येणाऱ्या विशेष कंपनीचे (एसपीव्ही) अध्यक्ष महापौर असतील, ही उपसूचना अव्हेरून आयुक्तांकडेच हे पद असेल, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे नगरसेवकांनी सभागृहात केलेली चर्चा निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मंजूर झालेल्या उपसूचनांसह स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याचे ठरले असताना तसे का झाले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. पालिकेच्या वेबसाइटवरील प्रस्तावात उपसूचना नसल्या, तरी प्रत्यक्षात सादर केलेल्या प्रस्तावाला त्या जोडल्या असल्याचे स्मार्ट सिटी योजनेचे प्रमुख अनिल पवार यांनी 'मटा'ला सांगितले. या उपसूचना केंद्राला दिल्या असून, पालिकेच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध करणार असल्याचा खुलासा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुण्यातील आतापर्यंतची वाटचाल पाहता याबाबत साशंकता असल्याचे मत काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रकल्प अजूनही वादाच्या भोवऱ्यातच आहे. पालिका आयुक्तांनी केंद्राकडे नक्की कोणता प्रस्ताव सादर केला, असा प्रश्न ते विचारत आहेत.

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मान्य करताना भाजप वगळता सर्वच पक्षांच्या सभासदांनी स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या 'एसपीव्ही‌' कडाडून विरोध केला होता. स्मार्ट सिटीचे अध्यक्ष पालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी असतील, असे स्पष्ट केलेले असतानाही याचे अध्यक्ष पालिका आयुक्तच असतील, असा गैरसमज आयुक्त कुणाल कुमार करून दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. एसपीव्हीमध्ये केवळ सहा लोकप्रतिनिधींचा समावेश सदस्य म्हणून करण्यात आल्याने यावर आक्षेप घेऊन सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. याबाबत पाच उपसूचना देऊन नगरसेवकांनी अनेक बदल सुचविले होते. एसपीव्हीचे अध्यक्षपद महापौरांकडे असावे, असा ठराव पालिकेत मंजूर झाला होता. कंपनीमध्ये लोकप्रतिनिधींचे वर्चस्व रहावे, यासाठी त्यांची संख्या आठ करण्याचेही मान्य झाले होते.

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर होती. याचा सविस्तर अहवाल यापूर्वीच प्रशासनाने तयार करून ठेवला होता. १४ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. त्यामुळे त्यामध्ये झालेले ठराव या प्रस्तावाबरोबर केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहे. पालिकेच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेल्या प्रस्तावाबरोबर या उपसूचनाही प्रसिद्ध केल्या जातील.

- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याने घडवली ‘महाबँके’ला अद्दल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका विद्यार्थ्याने एटीएममधून ३०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला... पैसे आलेच नाहीत; परंतु खात्यातून कमी झाले... यावर बँकेने केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत टाळाटाळ केली... विद्यार्थ्याने मात्र हार मानली नाही. लेखी तक्रार व पाठपुरावा करून अखेर त्याने ३०० रुपये नुकसानीची तब्बल ९६०० रुपये भरपाई मिळवली.

श्रीकांत येरूळे या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने हा लढा देऊन बँक ऑफ महाराष्ट्रकडून ही नुकसानभरपाई मिळवली. श्रीकांतने २९ जुलै २०१५ रोजी एका अन्य बँकेच्या एटीएममधून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्डद्वारे ३०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पैसे मिळाले नाहीत, तरी खात्यातून मात्र ही रक्कम वजा झाली. त्यामुळे त्याने ३१ जुलै रोजी बँकेकडे लेखी तक्रार दिली.

श्रीकांत म्हणाला, 'वारंवार चौकशी केल्यानंतरही, 'चौकशी सुरू आहे,' या पलीकडे उत्तर दिले जात नव्हते. अशातच चार नोव्हेंबर रोजी बँकेने माझ्या खात्यामध्ये ३०० रुपये जमा केले. मी पाच नोव्हेंबर रोजी बँकेत जाऊन रिझर्व्ह बँकेचा एटीएम नुकसानभरपाईबाबतचा अध्यादेशही अधिकाऱ्यांना दाखवला. या नियमानुसार बँकेला हे पैसे सात दिवसांत जमा करणे कायद्याने बंधनकारक होते. नियम न पाळल्यास पुढे प्रतिदिन १०० रुपये दंड लावण्याची तरतूद आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र हा नियम बदलला आहे, असे सांगितले. मी 'आरबीआय'ची वेबसाइट पाहा, असा आग्रह धरल्यानंतर त्यांनी, 'आठ दिवसांत चौकशी करून सांगतो,' असे उत्तर दिले. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. 'आरबीआय'च्या नियमांनुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी लेखी तक्रारही दिली. त्यानंतर बँकेने ३ डिसेंबर रोजी ९६०० रुपयांची नुकसानभरपाई माझ्या खात्यावर जमा केली.'

'एटीएममधून रक्कम न मिळाल्यास तक्रार दिल्यानंतर बँकेकडून सात दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास बँकांना दंडाची तरतूद आहे. हा अध्यादेश प्रत्येक एटीएममध्ये लावणे बंधनकारक असतानाही, अनेक बँकांनी ही कार्यवाही केलेली नाही. एटीएममध्ये असा अनुभव आल्यानंतरही अनेक खातेदार गप्प बसतात. या पार्श्वभूमीवर श्रीकांतने दिलेला लढा कौतुकास्पद आहे,' असे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी’च्या संपाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पगारवाढीबद्दल ठोस निर्णय न झाल्यामुळे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसने (इंटक) जाहीर केलेल्या संपाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील एसटीच्या सर्व स्थानकांवर दिवसभर वाहतूक व्यवस्था सुरळित सुरू होती. मात्र, दौंड, शिरूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी एसटीचे कर्मचारी दुपारपर्यंत संपामध्ये सहभागी झाले होते.

राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ हवी म्हणून इंटकतर्फे गेल्या आठवड्यात राज्य सरकारला संपाचा इशारा देण्यात आला होता. पण, सरकारने दखल न घेतल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून संघटनेने बेमुदत संपाला सुरुवात झाली. संपामुळे राज्यातील अनेक बस डेपोंमधून गाड्या बाहेरच पडलेल्या नाहीत. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, परभणी या ठिकाणी संपाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गाडीसाठी ते तासन् तास वाट बघत उभे होते. अनेकांनी खासगी वाहनांनी तसेच रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडला.

पुण्यातील एसटी कामगार संघटना संपात सहभागी झाली नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, इतर शहरातून येणाऱ्या गाड्यांना उशीर झाल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. स्वारगेट बसस्थानकावर दिवसभर गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत्या. बोरिवली, ठाणे, मुंबई सेंट्रल, दादर, सोलापूर, कोल्हापूर, गोंदवले, दिवेआगर, विनेरे या मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या, असे स्वारगेट स्थानकातील गाड्यांचे निजोयन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवाजीनगरवरून इतर शहरात गेलेल्या गाड्या मात्र परत आल्या नाहीत. मंगळूर, यवतमाळ, नंदूरबार, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेगाव, नांदेड, लातूर, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची वाट पाहावी लागली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानकांवरून वेळेत गाड्या सोडण्यात येत आहेत. रात्रीतून या गाड्या परत आल्यास प्रवाशांची हाल होणार नाहीत, असे विभागीय वाहतूक अधिकारी शिवाजी भोईर यांनी सांगितले.

...

कोट

राज्यात एसटी महामंडळाचे १ लाख १६ हजार कर्मचारी असून, त्यातील सुमारे ७० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. प्रशासानाने अद्याप वेतनवाढीबाबत आमच्याशी चर्चा केलेली नाही. आमच्या मागणीवर निर्णय होईपर्यंत संप सुरूच राहील.

- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदना शिवा यांचे उद्या व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कै. प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यानांतर्गत यंदा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा यांचे 'हवामान बदल - नागरिक व प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या काळे सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'युनेप'चे माजी संचालक आणि तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष राजेंद्र शेंडे असतील. व्याख्यानाचे यंदा आठवे वर्ष आहे. 'माहितीच्या अधिकाराचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा,' यासाठी कै. कर्दळे प्रयत्नशील होते. त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दर वर्षी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरमध्येच ऑक्टोबर हीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन डिसेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा अनुभव येऊ लागला आहे. पुण्यातील कमाल तापमान ३१.७ अंशांवर, तर किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये पुण्यासह राज्यात चांगली थंडी असते. उत्तरेकडील राज्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे राज्याकडे गार वारे वाहून तापमानातही घट होते. यंदा मात्र, थंडीचा कडाका खूपच कमी प्रमाणात जाणवत आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, तेलंगण या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन ते पाच अंशांनी अधिक आहे. उत्तरेकडील काही राज्यात कडाक्याची थंडी आहे. तुरळक ठिकाणी हिमवर्षावही होत आहे. परंतु, राज्यात अजूनही समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे सक्रिय आहेत. थंडीचा कडाका वाढण्यासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. सध्या राज्यात समुद्रावरील बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने थंडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. परिणामी, थंडीचा कडाका कमी जाणवत आहे, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

पुण्यात कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी नोंदले गेलेले कमाल तापमान (३१.७ अंश सेल्सिअस) सरासरीपेक्षा २.४ अंशांनी तर किमान तापमान (१७.८ अंश सेल्सिअस) सरासरीपेक्षा तब्बल ५.४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. लोहगाव येथे कमाल तापमान ३१.३ अंशांवर पोहोचले आहे. नाशिक, औरंगाबाद, नांदेड येथेही कमाल तापमान ३० अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गाच्या हाकेसाठी पुण्यात ‘सुविधा’

$
0
0

पुणे : दिवसागणिक तीव्र होत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या समस्येवर पुण्यातील सुरेश तळेकर आणि जितेंद्र ठाकूर यांनी उपाय शोधला आहे. या दोन इंजिनीअर्सनी 'सुविधा' या नावाचे एक अॅप तयार केले असून, त्याद्वारे आपण पुण्यात असलेल्या भागात उपलब्ध असलेली स्वच्छतागृहांची माहिती सहजगत्या मिळते.

कामानिमित्त घर किंवा कार्यालयाबाहेर बराच काळ वावरणाऱ्यांची संख्या बरीच असते. अशा परिस्थितीत आत्यंतिक गरज असलेली स्वच्छतागृहे हव्या त्या संख्येने उपलब्ध नाहीत आणि असली तरी त्यांविषयी फारशी माहिती नसते. महिलांची तर अशावेळी फारच कुचंबणा होते. यावर उपाय म्हणून पाणी किंवा द्रव पदार्थांचे कमीच सेवन करणे किंवा मूत्रविसर्जनाची भावना रोखून धरणे, असे उपाय योजले जातात. या दोन्ही गोष्टींचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. या साऱ्यामुळेच आज 'राइट टू पी' ही चळवळ जोर धरते आहे.

सुरेश आणि जितेंद्र यांनी नेमकी हीच गोष्ट ओळखून हे अॅप तयार केले आहे. त्याच्या माध्यमातून आपण असलेल्या ठिकाणापासून जवळ स्वच्छतागृह आहे का, हे समजते. तेथे पोहोचण्याच्या मार्गही समजतो. या स्वच्छतागृहाचा वापर महिला, पुरुष आणि अपंग यांपैकी कोण करू शकते, हेही अॅपवरून समजेल. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर त्याला रेटिंग देण्याची सोयही करण्यात आली आहे. नंतरच्या वापरकर्त्यांना उपयोग व्हावा, यासाठी रेटिंग उपयुक्त ठरेल.

या अभियंता द्वयीने सध्या शहरातील खासगी आस्थापनांशी संपर्क साधून आणि त्यांची परवानगी घेऊन या अॅपमध्ये त्यांचे मॅपिंग केले आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ७५०पेक्षा जास्त स्वच्छतागृहांची नोंदणी अॅपवर केलेली आहे. या संदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावर त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले. लवकरच त्या दृष्टीने कार्यवाही होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबर सध्या नागपूरमध्येही हे अॅप कार्यान्वित आहे.

..

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असणे, ही अगदी प्राथमिक गरज आहे. शहराचा विकास होताना या शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गरजेचा विचार व्हायला हवा. शहराचे नागरिक म्हणून आम्ही आमच्या परीने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

सुरेश तळेकर

..

सुविधा ही योजना चांगली आहे. त्याविषयीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर महानगरपालिका त्यामध्ये सहभागी होऊ शकेल.

ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, पुणे महापालिका

..

सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध

हे अॅप सध्या अँड्रॉइड मोबाइलसाठी उपलब्ध आहे. आयओएस व्हर्जन लवकरच कार्यान्वित होणार आहे. प्ले स्टोअरवरून हे मोफत डाउनलोड करता येईल.

..

अॅपची वैशिष्ट्ये

0. जवळची स्वच्छतागृहे समजणार.

0. स्वच्छतागृहे नेमकी कोणासाठी हे कळणार.

0. वापरल्यानंतर रेटिंग देता येणार.

0. पुण्यातील ७५० पेक्षा अधिक स्वच्छतागृहांची नोंदणी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गँगस्टर नायरविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दक्षिण पुण्यातील गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी गँगस्टर बापू नायरविरुद्ध फास आवळण्यास सुरुवात केली आहे. कोंढवा तसेच बिबवेवाडी परिसरातील जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कोंढवा आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

​मार्केट यार्ड येथील प्रमोद बाफना (वय ५८) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सचिन बाळू जागडे (वय ३२, रा. अप्पर बिबवेवाडी) याला अटक केली, तर गँगस्टर बापू नायरसह पाच ते सहा संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाफना यांची बिबवेवाडी परिसरात जागा आहे. या जागेवर ते कुंपण घालत असताना नायरच्या टोळीतील सदस्यांनी तेथे धाव घेतली आणि बाफना यांना कुंपण घालण्यापासून रोखले.

'आम्ही बापू नायरची माणसे आहोत, जागा खाली करा. तुम्ही कोणाला विचारून येथे काम सुरू केले आहे', असा दमही त्यांना बाफना यांना भरला. बाफना यांचे कामगार विश्वनाथ चव्हाण यांना दमदाटी तसेच शिवीगाळ करण्यात आली. या प्लॉटवर पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दगडाचे कुंपण घालण्यासाठी त्या ठिकाणी ३० ब्रास डबर टाकण्यात आले होते. आरोपींनी ४० हजार रुपये किमतीची डबर डंपरमधून घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत, नीलेश कुंतिलाल बोत्रा (वय ३९, रा. पाटील प्लाझा, पर्वती) यांनी तक्रार दिली आहे. मार्केट यार्ड परिसरात बोत्रा यांच्या जागेवर आरोपींनी पत्र्याचे शेड टाकल्याचे आढळून आले. बोत्रा खात्री करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून जागेची कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर बोत्रा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बाजीराव-मस्तानी'ला भाजपचा विरोध

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

एकेकाळी पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाला विरोधाला सामोरे जावे लागत आहे. पुणे भाजपने बाजीराव-मस्तानी चित्रपटाला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिल्याने पुण्यातील अनेक थिएटरमधील या चित्रपटाचे सकाळचे शो रद्द करण्यात आले आहेत.

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाला आमचा विरोध आहे, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येईल त्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाजपच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुण्यातील अनेक थिएटरमधील सकाळचे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. तसचे कोथरूड येथील सिटी प्राइड या थिएटर बाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. मात्र तरीही या चित्रपटाचे आजचे सगळे शो रद्द करण्याचा निर्णय सिटी प्राइड थिएटरकडून घेण्यात आल्याचे कळते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्य थिएटर बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा आपण फक्त ऐकतो : नाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जन गण मन' हे आपले राष्ट्रगीत खूप सुंदर आहे. राष्ट्रगीत म्हणावे की म्हणू नये, यावर चर्चा होते आणि अशा चर्चा आपण निर्लज्जपणे ऐकतो. आम्ही किती कोडगे होत चाललो आहोत ना,' अशी बोचरी टीका प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी केली.

नाम फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या सेनानींच्या 'शौर्या तुला वंदितो' या कृतज्ञता सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, प्रमोद मांडे, कर्नल सुरेश पाटील, डॉ. अविनाश पोळ आणि विजय तनपुरे उपस्थित होते. काशीराम उत्तेकर, कृष्णा शिर्के, पांडुरंग चव्हाण, वामन पलांडे, सदाशिव मोरे, सुरेश कुऱ्हाडे, शंकर साळुंके, धोंडिबा मोरे, रामचंद्र साळवी, श्यामराव पाटील, गोविंद शिर्के, एस. एस. पाठक, किशन वरगुले आणि शंकर शिंदे या सेनानींचा सत्कार करण्यात आला.'सीमेवरचे जवान सुरक्षित असतात, ते मिष्टान्न खातात, आणि आम्ही असुरक्षित असतो... अशी वल्गना आपण करतो. यावरून आपण किती असंवेदनशील झालो आहोत,' याची कल्पना येते, असे सांगून नाना म्हणाले,

नाना ब्लॉग लिहित नाहीव्हॉट्सअॅपसह समाजमाध्यमांमध्ये बाजीराव-मस्तानी चित्रपटासंदर्भात नाना पाटेकर यांच्या नावे फिरणाऱ्या ब्लॉगच्या संदर्भात मकरंद अनासपुरे यांनी खुलासा केला. 'नाना कधीही ब्लॉग लिहित नाहीत. कुणीतरी हा प्रताप केला आहे. नाना जाहीरपणे बोलतात. ते या भानगडीत पडणार नाहीत,' असा खुलासा मकरंद यांनी केला.

नाना कारगिल युद्धात

नाना पाटेकर स्वत: कारगिल युद्धात लढला आहे, असा गौप्यस्फोट मकरंद अनासपुरे यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मी तुमचा 'सहकारी' आहे, अशी भावना नाना यांनी त्यावर व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटाला विरोध ही सभ्यता नाही

$
0
0

निर्माता- दिग्दर्शक महेश भट यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हाती शस्त्र घेऊन चित्रपट प्रदर्शित होण्याला विरोध करणे ही सभ्यता नाही. कोणत्याही विषयावर चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो,' अशी भूमिका निर्माता -दिग्दर्शक महेश भट यांनी शुक्रवारी मांडली.
सम्यक साहित्य संमेलनाच्या उद‍्घाटनासाठी भट पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात अयोग्य पद्धतीने इतिहास मांडल्याचा आरोप करत हा चित्रपट प्रदर्शित होण्यावरून पुण्यात विरोध करण्यात आला. या चित्रपटाचे खेळ रद्द झाले. या पार्श्वभूमीवर, भट यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

'मुक्त विचारांना देशात कायमच पाठिंबा देण्यात आला आहे. निर्माते, दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातून काही मांडू पाहात असतील, तर त्यांचा हाती शस्त्र घेऊन विचार केला जातो, हे योग्य नाही. दिग्दर्शकाचे आयुष्य पणाला लागलेले असते. चित्रपटाला विरोध करून कमी खर्चात सर्वाधिक परिणाम साधता येतो. समोरचा माणूस चुकीचे बोलत असला, तरी त्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे, हे सभ्यतेचे आणि सहिष्णुतेचे लक्षण आपण विसरत चाललो आहोत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर कोणाचे आक्षेप असतील, तर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावावा. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे,' याकडेही भट यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतांचे ब्राह्मणीकरण केले

$
0
0

सम्यक साहित्य संमेलनात डॉ. रावसाहेब कसबे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तुकाराम, कबीर, मीरा अशा संतांच्या मनातील विद्रोह नीट समजून घेतला पाहिजे. मात्र, संतांना समजून न घेता संतांचे ब्राह्मणीकरण करण्यात आले,' अशी परखड टीका पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र आणि बार्टीतर्फे आयोजित पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे उद‍्घाटन हिंदी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. संयोजक परशुराम वाडेकर, माजी अध्यक्षा नीरजा, डॉ. विजय खरे, ज्येष्ठ उर्दू समीक्षक प्रा. जहीर अली, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, व्ही. जी. रामटेके आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. कसबे यांनी अध्यक्षीय भाषणात पाश्चिमात्य प्रबोधन आणि भारत, धर्मनिरपेक्षता, बदललेले जागतिक वास्तव, साहित्याचे प्रयोजन, साहित्याची निर्मिती, बदलते वास्तव यांचा वेध घेतला.

'जागतिक पातळीवर जाण्याची क्षमता असलेले अनेक लेखक मराठीत आहेत. नव्या पिढीला खूप काही दिसते. वय वाढल्याने माणूस भारी होत नाही. मराठी साहित्यात वैचारिक लेखनाचा ठणठणाट आहे. समीक्षकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. समीक्षा सर्जनशील साहित्याला समृद्ध करते. लाखभर रुपये पगार घेणारे प्राध्यापक काय करतात? त्यांचे त्यांच्या विषयातील योगदान काय? पाच पुस्तके तरी वर्षाला वाचतात का? उद्याची पिढी यांना प्रश्न विचारणार आहे,' असे डॉ. कसबे म्हणाले.

'सनातनी वृत्ती केवळ हिंदूंमध्येच नाही, तर मुस्लिम समाजातही वाढते आहे. आज गालिब असता, तर त्याचे डोके फोडले गेले असते. 'दिवाण-ए-गालिब' फाडला असता. ब्रिटिश काळातही लेखकांना थोडे स्वातंत्र्य होते. ते आज राहिलेले नाही. ऊर्दू साहित्याशिवाय भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्याने व्यवस्थेविरोधात, धर्माविरोधात भूमिका घेतलेली नाही. ऊर्दूबाबत समाजात गैरसमज आहेत,' असे मत ज्येष्ठ उर्दू समीक्षक प्रा. जहीर अली यांनी मांडले.

आवाज बुलंद करावा

'सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी एके काळी आमचे सहकारी होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात त्यांनीही आमच्यासह आवाज उठवला होता आणि आज तेच संस्कृती जपण्याच्या गप्पा मारत आहेत. समाजात असहिष्णुता पूर्वीपासूनच होती. मात्र, असहिष्णुतेविरोधात समाजाने आवाज बुलंद करायला हवा. आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे,' असे महेश भट यांनी सांगितले.

नेमाडेंना टोला

'देशीवादाची चळवळ देशीयतेचा पुरस्कार न करता पुनरुज्जीवनवादी बनली आणि आधुनिकतेच्या विरोधात उभी ठाकली. ही चळवळ म्हणजे एकखांबी तंबू आहे. आडव्या जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या या उभ्या खांबाला त्याच्या मिशांसकट लवकरच आडवे केले जाईल. चिंध्या भरलेल्या या भोत, बुजगावण्याला ज्यांना घाबरायचे, त्यांनी पारितोषिकांच्या आशेने घाबरावे,' अशा शब्दांत डॉ. कसबे यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना टोला हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याचिकेवर दोन दिवसांत निर्णय

$
0
0

पुणे : पुण्यातील धरणांमधून उजनी धरणात दहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकेवर येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यासंबंधी दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर ही याचिका शुक्रवारी निकालासाठी बंद करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी पुण्यातील भामा-आसखेड धरणातून चार टीएमसी, चासकमान धरणातून तीन टीएमसी, आंद्रे धरणातून दोन व मुळशी धरणातून एक टीएमसी असे दहा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले होते. या निर्णयाविरोधात शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे व अॅड. सुरेश पलांडे यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि सोलापूरमध्ये शेती असलेले जलसंपत्ती प्राधिकरणाचे सदस्य सु. वि. सोडल यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला; तसेच पाणी सोडण्याच्या निर्णयावर फेरसुनावणी घेण्याचे आदेश दिले.

प्राधिकरणाकडे झालेल्या मागील सुनावणीत उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी किती शेतकऱ्यांनी मागणी अर्ज केले, उजनीतील किती पाण्याचा वापर झाला, नदीत किती पाणी सोडण्यात आले, धरणसाठ्याची ऑक्टोबरमधील स्थिती काय होती, याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जलसंपत्ती प्राधिकरणासमोर म्हणणे मांडण्यात आले. पुणे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती, धरणांतील कमी झालेला पाणीसाठा, पिण्यासाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठी लागणाऱ्ऱ्या पाण्यावर अवलंबून असलेले लाखो शेतकरी याची माहिती प्राधिकरणाला देण्यात आली.

पुण्यातून उजनीत पाणी सोडल्यास मोठ्या जटील प्रश्नाला सामोरे जावे लागणार असल्याचे वास्तव अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील व उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी प्राधिकरणासमोर मांडले. या याचिकेवर याचिकाकर्ते भारत भालके यांच्या वतीनेही जलसंपत्ती प्राधिकरणाकडे बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर ही याचिका निकालासाठी बंद (क्लोज फॉर ऑर्डर) करण्यात आली. या याचिकेवर येत्या सोमवारी वा मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

उजनी धरणात सद्यस्थितीत जवळपास ६७ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातील ५३ टीएमसी मृत पाणीसाठा आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी वर्षाला फक्त दोन टीएमसी पाणी लागते. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज लागल्यास उजनीच्या मृतसाठ्यामधून ते उचलण्यात यावे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपत्ती प्राधिकरणाला सुचविले आहे. उजनी धरणातील मृत पाणीसाठ्याचा यापूर्वीही वापर करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

आता पाणी सोडून उपयोग होणार का?

सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांसह शेतीसाठी पुण्यातून पाणी सोडण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकेवर ऑक्टोबर महिन्यात निकाल झाला होता. या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. त्यानंतर ही याचिका पुन्हा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी आली आहे. यामध्ये दीड महिन्यांचा कालावधी गेला आहे. त्यामुळे आता पुण्यातील धरणातून पाणी सोडल्यावर त्याचा पिकांना उपयोग होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीतून पाण्याचा बेसुमार वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उजनी धरणातून सोलापूर आणि परिसरात बेसुमार पाण्याचा वापर झाल्याची वस्तुस्थिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे दिलेल्या माहितीवरून उघड झाली आहे. या धरणातून मार्च महिन्यापासून आतापर्यंत सुमारे ५२.९१ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. पुण्यातील चार धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता फक्त २.९१ टीएमसी पाणी सोडता येऊ शकते. त्यामुळे उजनीला दहा टीएमसी पाणी देणे शक्य नसल्याचेही महामंडळाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील चार धरणांमधील दहा टीएमसी पाणी सोलापूर येथील उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने तीन डिसेंबर रोजी स्थगिती दिली; तसेच प्राधिकरणासमोर नव्याने ​​सुनावणी घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार १४ डिसेंबरला सुनावणी झाली होती. उजनीतील पाणीवापराबाबत माहिती देण्याची मागणी याचिकाकर्ते शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून प्राधिकरणासमोर माहिती सादर करण्यात आली. त्यावरून उजनी धरणातून बेसुमार पाणीवापर होत असल्याचे उघड झाले आहे.

उजनी धरणातून आतापर्यंत ५२.९१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामध्ये एक मार्च ते ३० जून या उन्हाळी हंगामात ३३.२० टीएमसी, एक जुलै ते १४ ऑक्टोबर २०१५ या खरिपाच्या हंगामात ९.३० टीएमसी, १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर रब्बी हंगामात १०.४१ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाने सादर केली असल्याचे अॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.

पुण्यातील चासकमान, भामा आसखेड, आंद्रा आणि मुळशी या चार धरणांतून उजनीत दहा टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश प्राधिकरणाने २६ ऑक्टोबर रोजी दिला होता. मात्र, सध्या या धरणांमध्ये सोडण्यायोग्य अवघे २.९१ टीएमसी पाणी आहे. ते पाणी उजनीत सोडल्यास सुमारे दीड टीएमसी पाणी धरणापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे या धरणांतून पाणी सोडणे न्यायिक होणार नाही, हे प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे अॅड. पलांडे म्हणाले.

सध्या उजनी धरणात सुमारे ६३ टीएमसी अचल पाणीसाठा आहे. आतापर्यंत १३.२० टीएमसी अचल पाणीसाठ्याचा वापर झालेला आहे. सोलापूर परिसरात असलेले शेतीचे क्षेत्र पाहता तीन टीएमसी पाणी पुरेसे आहे. त्यामुळे पुण्यातील धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. महामंडळाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे चित्र स्पष्ट झाले असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बैलगाडा शर्यतबंदी उठवणार

$
0
0

प्रकाश जावडेकर यांची सकारात्मक भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीचा तिढा सुटण्याची चिन्हे अखेर निर्माण झाली आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, 'केंद्र सरकार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अनुकूल आहे,' अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत खासदार अमर साबळे व आमदार महेश लांडगे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. 'पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यत हा संस्कृती आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. शर्यतीसाठी सांभाळले जाणारे बैल शेतीच्या कामासाठी वापरले जात नाहीत. शर्यतीचे बैल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे आहे. शर्यत बंद ठेवली, तर बैल सांभाळायचे कसे, असा प्रश्न गाडामालकांना पडला आहे. बैलगाडा शर्यत हे गाडामालकांच्या उत्पन्नाचे साधन आहे. शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकारण न करता महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी,' अशी भूमिका या वेळी आमदार लांडगे यांनी मांडली.

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, 'बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येर्इल. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्रालय संसद अधिवेशनात विधेयक ठेवणार आहे. विधेयक तयार करण्यासाठी कॅबिनेटला नोट पाठवली आहे.'

'हिवाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या विधेयकावर केवळ चर्चा होऊ शकते. लोकसभेत विधेयक मंजूर होऊन, त्यानंतर राज्यसभेत विधेयक मंजूर होण्याइतका वेळ आता अधिवेशनात उरलेला नाही. त्यामुळे लोकसभेत विधेयक सादर न करता काही विशेष कायद्याची तरतूद करता येईल का, याबाबतही तपासणी करू,' असे आश्वासन जावडेकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांसाठी ‘धन्वंतरी’ योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू करण्याची शिफारस शिक्षण मंडळाने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे शुक्रवारी केली.

शिक्षण मंडळ आणि शिक्षक संघटनांची पालिकेत बैठक झाली. या वेळी सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले यांच्यासह सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी आशा उबाळे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय कुंजीर, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक आणि केंद्र प्रमुख सभेचे अध्यक्ष मनोज मराठे, अनुसूचित जमाती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नाना तिटकारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शरद लावंड उपस्थित होते. शिक्षकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धन्वंतरी योजना फायदेशीर असल्यामुळे ती लागू करण्याबाबत बैठकीत एकमत झाले. त्या अनुषंगाने आयुक्त जाधव यांच्याकडे प्रस्ताव देऊन शिफारस करण्यात आली.

बैठकीत संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा झाली. यामध्ये शिक्षकांची निवड श्रेणी, मुख्याध्यापक पदोन्नती, समायोजन, आयकर विवरण पत्राचे धोरण, सेवा पुस्तकातील नोंदींचे अद्ययावतीकरण यांचा समावेश होता. शिक्षकांची कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, अशा सूचना सभापती घुले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शिक्षण मंडळाने शिक्षकांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू केल्यास त्याचा लाभ महापालिका शाळांतील एक हजार दोनशे शिक्षक आणि आठशे सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. ही योजना महापालिका प्रशासनाने तातडीने राबवावी, अशी विनंती मंडळाने आयुक्तांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचए’ कंपनीबाबत सकारात्मक तोडगा

$
0
0

अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीबाबतचा रासायनिक खत मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. त्यावर विचार करून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल,' असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी दिली.

एच. ए. कंपनीला केंद्र सरकारकडून 'रिव्हायव्हल पॅकेज' मिळवण्यासाठी खासदार बारणे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळासमवेत जेटली यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे गटनेते अनंतराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.

बारणे म्हणाले, 'एच. ए. कंपनीला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्याच आठवड्यात रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार यांची भेट घेतली होती. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे पाठवल्याचे सांगितले. त्यावर लोकसभेत १५ डिसेंबरला शून्य प्रहरात तारांकित प्रश्नातून या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्यावर राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एच. ए. कंपनीला मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे आश्वासन दिले होते.'

त्यानंतर बारणे यांनी पाठपुराव्यासाठी जेटली यांची भेट घेतली. त्यात त्यांनी एच. ए. कंपनीचा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. परंतु या प्रस्तावात कंपनीच्या जागेच्या विक्रीचाही प्रस्ताव असल्याचे नमूद केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे जेटली यांनी म्हटल्याचे बारणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी मुंबईऐवजी व्हावा पिंपरी-चिंचवडचा विचार

$
0
0


अजित पवार यांची 'स्मार्ट सिटी'बद्दल अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्यास नवी मुंबई इच्छुक असेल, तर त्या जागी पिंपरी-चिंचवडचा प्राधान्याने विचार व्हावा,' अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यातील रेसकोर्स मैदानावर कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनासाठी पक्षाच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे काळभोरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, 'पिंपरी-चिंचवडच्या विकासात साहेबांचे बहुमोल कार्य आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्या अनुषंगाने सत्काराचा कार्यक्रम बिगरराजकीय व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व स्तरातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे.'

ते म्हणाले, 'केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले. त्या संदर्भात विधानसभेत लक्ष वेधले असता या शहरातील आमदारांनीही आवाज उठवणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही, याची खंत वाटते. शहर विकासाच्या बाबतीत तिन्ही आमदारांसहित सर्वांनीच एकत्रित भूमिका घेणे आवश्यक आहे.'

पक्षाचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मोहननगर जागेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. बाजीराव-मस्तानी चित्रपट आंदोलनाचा धागा पकडून पवार यांनी 'चित्रपट मनोरंजनाच्या भूमिकेतूनच पाहायला हवा,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरया गोसावी महोत्सव २१पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव २१ ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

समाधी सोहळ्याचे यंदाचे ४५४वे वर्ष असून, त्या निमित्ताने आयोजित उपक्रमांची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, सतीश गडाळे, विनोद पवार उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‍‍घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि वा. ना. उत्पात यांच्या हस्ते २१ डिसेंबरला दुपारी चार वाजता होणार आहे. देव महाराज म्हणाले, 'महोत्सवानिमित्त २१ ते २७ डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी नऊ ते बारा या वेळेत गाथा पारायण होईल. दुपारी १२ ते तीन या वेळेत विविध मंडळांची भजने होतील. सायंकाळी पाच ते आठ वेळेत तुकाराम गाथेवर प्रमोद महाराज जगताप यांची प्रवचने होतील. २८ ते ३० डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी साडेआठ वाजता श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सायंकाळी पाच ते सहा या वेळेत 'तू फक्त राम म्हण' विषयावर प्रा. शानू पंडित यांची प्रवचने, सायंकाळी सहा ते आठ वेळेत प्रकाशबुवा मुळ्ये यांची नारदीय कीर्तने होणार आहेत.'

ते म्हणाले, 'श्री मोरया गोसावी समाधीची महापूजा २८ डिसेंबरला सकाळी सहा वाजता होईल. त्यानंतर सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, रक्तदान शिबिर, सामुदायिक महाअभिषेक, गणेशयाग, हरिपाठ होईल. रात्री साडेआठ वाजता पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय आणि अभंग गायन होईल. २९ डिसेंबरला रुद्र स्वाहाकार, रक्तदान शिबिर, सकाळी साडेनऊ वाजता महिलांचे श्रीसूक्त पठण होईल. रात्री साडेआठ वाजता गायिका मंजूषा पाटील यांचे शास्त्रीय गायन होईल.'

ते म्हणाले, 'काकड आरती, पवमान स्वाहाकार, भजन कार्यक्रम ३० डिसेंबरला सकाळी सहा वाजता होईल. दुपारी एक ते पाच या वेळेत नेत्रचिकित्सा शिबिर होईल. सायंकाळी सात वाजता मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होईल. त्यानंतर सरोदवादक पं. अभिषेक बोरकर, सतारवादक साकीर खान यांची जुगलबंदी रंगणार आहे. ३१ डिसेंबरला पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी समाधी महापूजा आणि अभिषेक होईल. सकाळी सात वाजता दिंडी सोहळा आणि समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल. सकाळी साडेआठ वाजता प्रमोदमहाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी अकरापासून महाप्रसाद होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images