Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा ६५ वरून ६०

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयाची अट लवकरच ६५ वरून ६० करण्यात येणार आहे, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सवलतींचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू होईल.

'इतर काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयाची अट ६५ वरून ६० करण्यात यावी,' अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि कोथरूडच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी 'लक्ष्यवेधी'मार्फत केली होती. त्यावर उत्तर देताना बडोले यांनी आश्वासन दिले. यासाठी आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले.

'केंद्र सरकारचीही ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयाची अट ६० वर्ष आहे. त्याच धर्तीवर राज्यातही ही अट ६० वर्ष केल्यास त्याचा नागरिकांना फायदा होईल, यासाठी ही लक्ष्यवेधी मांडली होती. यावरील चर्चेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या अन्य प्रश्नांवरही चर्चा झाली', असे विखे पाटील यांनी सांगितले.

विविध सुविधांचा लाभ नाही

अनेक राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयाची अट ६० वर्ष इतकी आहे. तसेच केंद्र सरकारचीही ज्येष्ठ नागरिकांची अट ६० वर्ष इतकी आहे. परंतु, राज्यात मात्र, ही अट ६५ वर्ष असल्याने राज्यातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येत नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार यांच्या अमृतमहोत्सवाची जोरदार तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कृतज्ञता सोहळ्याची जय्यत तयारी शहर राष्ट्रवादीकडून सुरू आहे. येत्या रविवारी (२० डिसेंबरला) रेसकोर्स मैदानावर हा सोहळा होणार आहे.

पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीकडून हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख कार्यकर्ते येणार असल्याने या कार्यक्रमाची जोरदार तयारी शहरातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी कार्यक्रमाचा स्टेज उभारण्यात येणारी जागा, सुरक्षाव्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबतची सविस्तर माहिती घेऊन काही सूचना केल्या. १०० ते १२५ व्यक्त‌ी बसू शकतील, असा भव्य स्टेज या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक प्रशांत जगताप, फारुख इनामदार, सुनील बनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमिळनाडू पूरग्रस्तांना पालिका करणार मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तमिळनाडू येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगरसेवकाच्या वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये, पालिकेतील अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. पूरग्रस्तांसाठी ही मदत तातडीने दिली जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी जाहीर केले.

तमिळनाडू येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागाला मोठा फटका बसला असून अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. पुण्यात पानशेत धरण फुटल्याची दुर्घटना घडल्यानंतर तमिळनाडूने पुणे शहराला मोठी मदत केली होती. त्यामुळे पुण्यानेही त्यांना मदत करावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात मांडली. सभेचे अध्यक्ष महापौर धनकवडे यांनी तमिळनाडूला मदत करण्याचे जाहीर केले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत; तर पालिकेतील अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधनही पूरग्रस्तांना देण्यात येईल, असे सभागृह नेते शंकर केमसे यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी निवासस्थाने खाली न केल्यास गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवृत्त आणि बदली झाल्यानंतरही सरकारी निवासस्थाने न सोडणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही ५० जणांनी निवासस्थानांचा कब्जा सोडलेला नाही. त्यांनी १५ दिवसांत घर खाली न केल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी क्वीन्स गार्डन, येरवड्यातील भीमाशंकर, राणीचा बाग आणि शास्त्रीनगर या ठिकाणी वसाहती आहेत. त्या ठिकाणी क्लास वन अधिकाऱ्यांबरोबरच चतुर्थ श्रेणीपर्यंतचे कर्मचारी राहतात. त्यापैकी काही कर्मचारी निवृत्त झाले आहेत. काहींच्या बदल्या झाल्या आहेत. तरीदेखील त्यांनी सरकारी निवासस्थाने सोडलेली नाहीत. त्यांची यादी बनविण्यात आली असून, अशा प्रकराचे ६६ अधिकारी आणि कर्मचारी आढळून आले आहेत.

संबंधितांना निवासस्थाने सोडण्यासाठी एक ​महिन्याची नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी १६ जणांनी निवासस्थान सोडले आहे; तर उर्वरित ५० जण अद्यापही त्याच ठिकाणी रहात आहेत. त्यांनी १५ दिवसांत घरे खाली करण्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निवासस्थाने न सोडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

निवासस्थानांचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला देण्यात आले आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत निवासस्थानांची संख्या कमी आहे.

...

निवासस्थानांसाठी प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. मात्र, निवृत्त झालेले आणि बदली झालेले कर्मचारी बेकायदा वास्तव्य करून असल्याने प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना निवासस्थान मिळत नाही. संबंधितांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केली आहे.

- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्याचा आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेत न देणाऱ्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला ग्राहक न्याय मंचाने फटकारले आहे. या कायद्यानुसार बंधनकारक तरतुदींचे पालन कार्यालयाने केले नाही तसेच तक्रारदाराच्या निधीची रक्कम किती आहे हे ठरविण्यात कार्यालयाने वेळ घालविला असे निकालात नमूद करून कार्यालयाला मंचाने फटकारले आहे.

तक्रारदाराला भविष्य निर्वाह निधीचे ७२ हजार ९५२ रुपये नऊ टक्के व्याजदराने देण्यात यावेत. तसेच, नुकसानभरपाई म्हणून वीस हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. अतिरिक्त पुणे जिल्हा तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख, सदस्य एस. के. पाचरणे, शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी अशितकुमार घोष (रा. विद्यानगर) यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाविरुद्ध दावा दाखल केला होता. घोष यांना या प्रकरणात भारतीय मजदूर संघाने मदत केली. घोष यांच्यातर्फे संघाचे उमेश विश्‍वाद यांनी कामकाज पाहिले.

भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेले घोष हे दौंड तालुक्‍यातील बॅब ऍग्रो लि. या कंपनीत नोकरी करत होते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. २००३ पासून त्यांनी कार्यालयाकडे रक्कम मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. संबंधित कंपनीने १९९९ पासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अंशदान रक्कम जमा केली नसल्याची माहिती त्यांना समजली.

कंपनीने जेवढी रक्कम जमा केली होती, त्यापैकी काही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घोष यांना दिली. उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी घोष यांनी २०१० मध्ये पुन्हा संबंधित कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. तेव्हा त्यांना तेथे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच, कागदपत्रे हरवली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ डिसेंबरला पार्ट्यांसाठी १६५ ठिकाणांना परवाने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववर्षाच्या स्वागतासाठी शहर आणि परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबर या दिवशी १६५ ठिकाणी पार्ट्यांसाठी परवाने दिले आहेत. विनापरवाना पार्ट्या आणि बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी १२ विशेष पथके बनविण्यात आली असून, त्याद्वारे कारवाई होणार आहे.

नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला शहरात विविध ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्यात येतात. त्यांच्यासाठी खात्याकडून परवाने देण्यात येतात. आतापर्यंत १६५ ठिकाणी पार्ट्यांसाठी परवाने देण्यात आले आहेत. परवाना न दिलेल्या पार्ट्यांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.

नववर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी १२ पथके बनविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून बेकायदा मद्यविक्री आणि पार्ट्यांवर कारवाई होणार असल्याचे वर्दे यांनी स्पष्ट केले.

बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि करमणूक कर विभाग यांचीही मदत घेण्यात येत आहे. २० नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १९५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे वर्दे यांनी नमूद केले. खात्यासाठी एक हजार ७३५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मद्यविक्रीमध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअीक्षक सुनील फुलफगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांची ‘स्मार्ट’ लपवाछपवी ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कंपन्या आणि संस्थांबरोबर स्मार्ट सिटीचा करार करताना त्यामध्ये पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केलेली लपवाछपवी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. करार करतानाच या कंपन्यांना भविष्यकाळात आर्थिक लाभ मिळावा, अशा आशयाच्या अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे या कंपन्या स्मार्ट सिटी योजनेसाठी दिवसरात्र का झटत होत्या, याचे कोडे आता उलगडू लागले आहे. विशेष म्हणजे हे करार करताना आयुक्तांनी स्थायी समितीसह कोणत्याही पदाधिकाऱ्याला याची माहिती यापूर्वी दिलेली नव्हती.

स्मार्ट सिटी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील २० संस्था तसेच कंपन्यांनी महापालिकेला मदतीचा हात पुढे केला होता. या कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात पालिका यशस्वी झाल्याचा दावा आयुक्तांनी‌ केला होता. या नामांकित कंपन्यांनी पालिकेकडून फायदा मिळावा, असा कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. या कंपन्याबाबत पालिकेच्या मुख्य सभेत अनेक सभासदांनी शंका उपस्थित केल्या आणि त्यातील गोंधळाचे पुरावेही सादर केले. परंतु, तेव्हाही आयुक्तांनी त्यांची पाठराखण केली होती. या कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठीच पालिकेला मदत केली असल्याने त्यांना यापुढील काळात स्मार्ट सिट‌ीच्या कामांमध्ये सहभागी करून घेऊ नये, अशी उपसूचनाही सभागृहात मांडण्यात आली होती. मात्र, ही उपसूचना अयोग्य असल्याचे सांगत सभागृह नेत्यांनी अमान्य केली.

या करारांची माहिती द्यावी, अशी मागणी पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अनेकदा करूनही प्रशासनाने दाद दिली नाही. मात्र, वारंवार विचारणा केल्यानंतर उपलब्ध झालेल्या प्रतींमधून धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. केपीआयटी टेक्नॉलॉजीज फॉर इलेक्ट्रिक बस टेक्नॉलॉजी या कंपनीबरोबर करण्यात आलेल्या करारात केपीआयटी कंपनी पालिकेला १०० इलेक्ट्रीक बस देणार आहे. त्याच्याबदल्यात पालिका त्यांना प्रती किलोमीटरसाठी रक्कम मोजणार असून बसला आवश्यक असलेले चार्जिंगसाठी स्टेशन, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. याच कंपनीबरोबरच इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम्स बाबतच्या करारनाम्यात कंपनी करत असलेल्या कामाच्या बदल्यात पालिका त्यांना जाहिरातीचे अधिकार देण्याचे नमूद केले आहे. अशा पद्धतीने खासगी कंपनीला परस्पर जाहिरातीचे अधिकार देण्याचे अधिकार आयुक्तांना दिले कुणी, असा प्रश्न विचारला जात आहे.

स्मार्ट सिटीच्या मदतीसाठी शहरातील ज्या कंपन्या पालिकेच्या मदतीला धावल्या, त्यांच्याशी आयुक्तांनी परस्पर करार केले आहेत. यासाठी पालिकेतील एकाही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला. या कंपन्यांना भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळावा, अशा पद्धतीने आयुक्तांनी हे करार केले आहेत. यामुळे पुणेकरांचे मोठे नुकसान होणार आहे.

एसप‌ीव्ही स्थापन होण्यापूर्वीच आयुक्तांनी आत्ताच नसलेले अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. हे करार रद्द करावेत, आणि या कंपन्यांना स्मार्ट‍ सिटी प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

..

या कंपन्यांकडून आपण केवळ सेवा घेतली आहे, त्यांना कोणताही आर्थिक लाभ होणार नाही, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिल्याने त्याविरोधातील सूचना आम्ही स्वीकारली नाही. मात्र, या नव्याच बाबी समोर आल्यानंतर त्यातील तथ्य तपासून फेरविचार करून सर्वसाधारण सभेत योग्य निर्णय घ्यावा लागेल.

दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटमाथ्यात आठपदरीकरण

0
0

कोंडी सोडविण्याचे प्रयत्न; मं​त्रिमंडळाची मान्यता

बंडू येवले, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नित्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटमाथा परिसरात नवीन साडेनऊ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधून हा मार्ग आठ पदरी करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या पुनर्रचित पायाभूत सुविधा समितीने एक डिसेंबरला तत्त्वतः मंजुरी दिली. मात्र, या मार्गासाठी खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज पर्यंतच्या स्वतंत्र १२ किमी. बायपाससाठी आवश्यक असणाऱ्या ४५ हेक्टर जमिनीच्या संपादनाव्यतिरिक्त या मार्गासाठी पुन्हा नव्याने जमीन संपादन करण्यात येणार नाही, असे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील महिला पोलिस केंद्रामागील कुणे पूल, खंडाळा एक्झिट, खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस स्टेशन, आडोशी गावची हद्द, अंडापॉइंट, आडोशी बोगदा, खोपोली एक्झिट आणि खोपोलीच्या हद्दीतील फूडमॉलपर्यंतचा सुमारे १२ ते १३ किलोमीटरचा मार्ग घाटमाथा आणि डोंगरातून गेला आहे. या परिसरात अनेक नागमोडी वळणे तीव्र चढ उताराची आहेत. या घाटमाथा क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या परिसरात झालेल्या हजारो जीवघेण्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा असे संबोधले जाते. घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय बनला आहे.

नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासासाठी जलद संबोधला जाणाऱ्या द्रुतगती मार्गाला प्रवासी कूर्मगतीचा मार्ग अशी दूषणे देऊ लागली आहेत. अनेकवेळा हा मार्ग १० ते १५ तास ठप्प झालेला आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

वरील सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने या समस्या सोडविण्यासाठी या मार्गावर खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजपर्यंत स्वतंत्र बायपासच्या निर्मितीबरोबर या मार्गाची क्षमता विस्तारण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने काही दिवसांपूर्वी मांडला होता. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या पुनर्रचित पायाभूत समितीच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तत्वतः मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

फक्त बायपास आठपदरी : संजय गांगुर्डे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा आठ पदरी होणार असल्याचे वृत्त सर्व वृत्तपत्रांसह टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध झाल्याने एक्स्प्रेस-वे लगतच्या गावातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा आपल्या जमिनींचे संपादन होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या संदर्भात 'मटा'ने रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला. गांगुर्डे म्हणाले, की 'संपूर्ण एक्स्प्रेस वे आठ पदरी नसून, घाटमाथा परिसरात नेहमी होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि कोसळणाऱ्या दरडीमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजपर्यंत सुमारे १२ किमीचा आठ पदरी बायपास निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी घाटमाथा आणि डोंगर वगळता सुमारे ४५ हेक्टर जमीन नव्याने संपादन करण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषध विक्रेत्यांचा २६ जानेवारीपासून पुन्हा बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गर्भपात, लैंगिक, नशेची तसेच स्टिरॉइड या सारख्या शेड्यूल प्रकारातील औषधे ऑनलाइनद्वारे उपलब्ध होत असल्याने केमिस्टांच्या व्यवसायावर संकट आले आहे. ऑनलाइन औषधविक्रीमुळे औषधांचा दुरुपयोग होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. येत्या २६ ते २८ जानेवारी दरम्यान पुणे शहर जिल्ह्यात केमिस्टांचा बंद पुकारण्यात आला आहे.

'काही कंपन्यांद्वारे 'ऑनलाइन' औषध विक्री सुरू आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी दोन १४ ऑक्टोबरला देशव्यापी संप पुकारला होता. परंतु, अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वारंवार विनंती करूनही बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई केली जात नाही. ऑनलाइनद्वारे पुन्हा औषधविक्री सुरूच आहे. त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने येत्या २६ ते २८ जानेवारी दरम्यान पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. संपात जिल्ह्यातील सात हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत,' अशी माहिती असोसिएशनचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली.

'ऑनलाइन औषध विक्रीबरोबरच डॉक्टर डिन्स्पेन्सिंगला देखील आमचा विरोध कायम आहे. सध्या डॉक्टरांकडे औषधांचा साठा उपलब्ध असतो. आवश्यक आणि गरजेपुरती औषधे जवळ ठेवणे योग्य आहे. परंतु, गरजेपेक्षा औषधांचा साठा ठेऊन त्याची विक्री करणे हे चुकीचे आहे. यामुळे देखील केमिस्ट व्यवसाय धोक्यात येऊ लागला आहे,' अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपाद डॉक्टर डिन्स्पेन्सिंगच्या मुद्यावरही भर देणार आहोत, असेही सांगण्यात आले.

पुणे विभागाच्या एफडीएचे सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर तसेच जिल्हाधिकारी सौरव राव यांना केमिस्ट संघटनेच्या शिष्टमंडळाने संप पुकारत असल्याचे निवेदन दिले. शहर संघटनचे अध्यक्ष सुरेश बाफना, चंगेडिया, पश्चिम महाराष्ट्र औषध विक्रेता संघटनेचे सचिव अनिल बेलकर, खजिनदार संजय शहा उपस्थित होते.

ऑनलाइन फार्मसी, डॉक्टर डिन्स्पेन्सिंगला आमचा विरोध कायम आहे. ऑनलाइन औषध विक्री चुकीची आहे. एफडीएने ऑनलाइन कंपन्यांविरोधात कारवाई केली नाही; तर पश्चिम महाराष्ट्रातील औषध विक्रेते देखील संपात सहभागी होतील.- रोहित करपे, खजिनदार, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळसे पाटील यांची प्रकृती स्थिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना एका कार्यक्रमात भोवळ आल्याने उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांच्यावरील उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना येत्या शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येईल, असे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले.

'मी आता पूर्णपणे बरा आहे. आता मी विश्रांती करतोय. सध्या डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या रविवारी कार्यक्रमात भाषण करताना भोवळ आली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. योग्य उपचारांमुळे मी आता बरा झालो आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही,' अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या हितचिंतकांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

दिलीप वळसे पाटील यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांच्यात हृदयात रोपण केलेल्या पेसमेकरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्यांच्या हृदयाचे कार्य अनियमितपणे सुरू होते. अतिदक्षता विभागातून (आयसीयू) स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा झाली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काळजी करण्यासारखे काही नाही, अशी माहिती रुबी हॉस्पिटलचे कार्यकारी विश्वस्त आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट यांनी पत्रकारांना दिली.

हृदयाचे ठोके अनियमितपणे सुरू असल्याने त्यांना भोवळ आली होती. आता त्यांना कोणताही धोका नाही. तीन महिन्यांपूर्वीच कार्डिअॅक सीटी काढण्यात आला होता. पाच वर्षांपूर्वी वळसे पाटील यांच्या हृदयात पेसमेकरचे अमेरिकेत रोपण करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पेसमेकरमुळे त्यांच्या हृदयाचे अनियमित कार्य सुरळीतपणे सुरू ठेवणे शक्य होते. हृदयाचे कार्य पूर्वीप्रमाणे सुरुळीत सुरू झाल्यास पेसमेकरचे कार्य थंडावते. पेसमेकर बसविल्यानंतर हृदयाचे कार्य पूर्वीसारखे सुरुळीत सुरू झाले, अशीही माहिती डॉ. ग्रँट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाच्या बहाण्याने फसवणूक

0
0

खडकी : विवाह जुळवण्यासाठीच्या वेबसाइटवर नोंदणी केलेल्या तरुणाने साखरपुडा करून मुलीने दिलेली दहा ग्रॅमची अंगठी आणि रेल्वेचे तिकीट घेऊन पोबारा केल्याची तक्रार मुलीच्या मावशीने खडकी पोलिसांमध्ये केली आहे. सूर्या जी. असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथे राहणाऱ्या मुलीने विवाहासाठी असलेल्या वेबसाइटवर नोंदणी केली होती. त्याच साइटवर सूर्या जी. यानेही नाव नोंदविले होते. त्याने प्रोफाइलमध्ये आपण सीआरपीएफमध्ये पोलिस असल्याचे सांगितले होते. त्या माहितीच्या आधारावर मुलीच्या नातेवाइकांनी ऑगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत त्याच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर त्यांचा विवाह ठरला आणि साखरपुडाही झाला. या कार्यक्रमात मुलीच्या नातेवाइकांनी सूर्याला दहा ग्रॅमची आंगठी आणि हैद्राबाद येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढून दिले. आरोपीने आपण हैद्राबाद येथे प्रशिक्षणास असल्याचे सांगून रेल्वे तिकीट घेतले. मात्र, त्यानंतर, आरोपीचा फोन लागत नसल्याने संशय निर्माण झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचे बजेट १३३.९८ कोटींचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी सुचविलेल्या कपातीकडे दुर्लक्ष करून शिक्षण मंडळाने सादर केलेले २०१६-१७चे १३३.९८ कोटी रुपये खर्चाचे बजेट स्थायी समितीने मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे (जीबी) पाठविले आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आयुक्त जाधव यांनी सुचविलेली कपात स्थायी समिती विचारात घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु, ती फोल ठरल्यामुळे सर्वसाधारण सभेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. बैठकीत शिक्षण मंडळाचे २०१५-१६ चे ११४.२६ कोटी रुपये खर्चाचे सुधारित बजेट आणि आगामी २०१६ -१७ चे ११५.२७ कोटी रुपये खर्चाचे मूळ बजेट स्थायी समितीपुढे सादर केले होते. त्यावर चर्चा न होता मंडळाने सुचविलेले बजेट समितीने मंजूर केले. वास्तविक, शिक्षण मंडळ प्रशासनाने बजेटमध्ये ११८.४५ कोटींची तरतूद सुचविली होती. त्यामध्ये १५ कोटी ५३ लाखांची वाढ करीत शिक्षण मंडळ सदस्यांनी १३३ कोटी ९८ लाख २४ हजार रुपयांचे बजेट आयुक्तांना सादर केले. त्यात फेरबदल करीत आयुक्तांनी सुमारे १८ कोटी ७१ लाखांची कपात सुचविली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत मंडळाने सादर केलेले बजेट सर्वसाधारण सभेने मंजूर करावे, अशी शिफारस स्थायी समितीने केली आहे.

शासन अनुदानाव्यतिरिक्त महापालिकेच्या हिश्श्यापोटी जमा बाजूस ७४ कोटी ८० लाख रुपये गृहित धरले असताना त्यात ९० कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचा फेरबदल करण्याची उपसूचना स्थायी समितीने मांडली आहे. मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९ आणि अधिनियम १९४७ मधील कलम १५४ (२) नुसार बजेट येत्या एक जानेवारीपूर्वी मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाचे बजेट मंजूर करण्याची शिफारस स्थायीने केली आहे.

आयुक्तांनी सकस आहार योजनेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद सुचविली होती. मंडळाने तीन कोटी रुपये तरतूद आवश्यक असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थी आरोग्यासाठी आयुक्तांनी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची सूचना केली होती. परंतु, मंडळाने अडीच कोटी रुपये आवश्यक असल्याचे स्थायीला सांगितले. याशिवाय बालवाडी विद्यार्थी सकस आहारासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर, आयुक्तांनी तरतूद आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शिवाय बालवाडी विद्यार्थी गणवेश आणि स्वेटर्स, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता आणि विकास, आगरोधक यंत्रणा, बालवाडीताई प्रशिक्षण, बालवाडी विद्यार्थी वॉटर बॉटल यासंदर्भातील आयुक्तांच्या कपातीकडेही स्थायी समितीने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकर्मा पतसंस्थेत ३२ लाखांचा घोटाळा

0
0

पिंपरी : काळेवाडी येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक मंडळानेच लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात संचालक दिलीपकुमार दीनानाथ वेदपाठक यांच्यासह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोत्रे राज्य सरकारच्या सहकार विभागात विशेष लेखापरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी काळेवाडीतील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये पतसंस्थेचे संचालक वेदपाठक आणि इतर चौघांनी पतसंस्थेमधील जमा-ठेवीचे व्यवहारांची नोंद केलेली नाही, परस्पर ठेव पावत्या देणे तसेच खोटे व बोगस खर्च व्यवहारांची नोंद केल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर विनातारण कर्ज व्यवहार करणे, रोख, तसेच शिल्लक रकमेचा अपहार करून शिल्लक रकमेपेक्षा जास्त उचल रक्कम देणे आदी प्रकार करून सुमारे ३२ लाख ११ हजार ५२४ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भापकरच्या घरी पोलिसांचा छापा

0
0

कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि साईप्रसाद चिटफंड कंपनीचा सर्वेसर्वा बाळासाहेब भापकर याच्या चिंचवड येथील लिंक रोडवरील बंगल्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने मंगळवारी छापा मारला. या छाप्यात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळून आली. पोलिसांनी साईप्रसाद समूहाच्या दोन कार्यालयांपाठोपाठ भापकरचा बंगला सील केला आहे.कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बाळासाहेब भापकर याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्याच आठवड्यात अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली.

साईप्रसाद समूहाच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयासह दोन कार्यालये या पूर्वीच सील करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी चिंचवड लिंक रोड येथील भापकरच्या बंगल्यावर छापा मारला. पोलिस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.भापकरच्या घरात दहा किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे १०२ दागिने, तसेच हिऱ्याचे दागिने व काही कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यास पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून भापकरच्या कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार 'सेबी'च्या वतीने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविली आहे. या प्रकरणी भापकरची पत्नी आणि कंपनीची संचालक वंदना भापकर हिला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’ची रणधुमाळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संस्थेच्या मतदारांची अंतिम यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याची मुदत चुकल्याचा आरोप केला जात असून, निवडणुकीची मतदारयादी मंजूर करण्यासाठी कार्यकारी मंडळाची तातडीची सभा सोमवारी (२१ डिसेंबर) बोलावण्यात आली आहे.

मराठी सारस्वतांची मातृसंस्था असल्याने 'मसाप'च्या निवडणुकीकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष असते. विद्यमान कार्यकारिणीची मुदत १५ मार्च २०१६ रोजी संपुष्टात येत आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या ३० सप्टेंबर रोजी झाली होती. या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यानुसार, निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पात्र मतदारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी १५ डिसेंबर मुदत होती. मात्र, पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही यादी वेळेत मंजूर होऊ शकलेली नाही. निवडणुकीसाठी मतदारांची यादी मंजूर करण्याबाबत पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यात यादी परस्पर मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही सदस्यांनी त्याला तीव्र विरोध करून कार्यकारी मंडळातच ही यादी मंजूर करण्याची मागणी केली. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी कार्यकारी मंडळाची तातडीची सभा बोलवल्याचा 'एसएमएस' सदस्यांना पाठवण्यात आला आहे.

विद्यमान कार्यकारिणीच्या काळात झालेल्या विविध घडामोडींनी संस्था चर्चेत आली होती. या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणूक साहित्य विश्वात विशेष महत्त्वाची मानली जात आहे. 'मसाप'च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्येच पॅनेल करण्यावरून चुरस सुरू आहे. त्यात प्रकाशक आणि लेखकांचे स्वतंत्र पॅनल उभे राहणार असल्याचे चित्र आहे. पॅनेल तयार करण्यासाठीच्या बैठकाही सातत्याने सुरू आहेत. या बैठकांतून प्रत्यक्ष किती पॅनेल उभी राहतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

माहिती अधिकार कक्षेबाबत अनभिज्ञता

'मसाप'ला राज्य सरकारकडून अनुदान मिळते. मात्र, त्यामुळे संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येते की नाही, या विषयी संस्थेतच अनभिज्ञता आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर संस्थेच्या राज्यभरातील सदस्यांनी पत्र पाठवून माहिती मागवली आहे. मात्र, माहिती अधिकाराच्या कक्षेत संस्था येते, की नाही हेच माहीत नसल्याने पत्रांना उत्तर देण्यात आलेले नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत काय झाले, याची माहिती; तसेच साहित्य संमेलनाच्या निवडणुकीची तपशीलवार माहिती देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्युझियम सांगतेय शौर्यगाथा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्याची शपथ... त्यांनी लढलेल्या लढाया... पेशव्यांनी लढलेल्या लढाया... राजस्थानमधील विविध राजांची; तसेच तेथील ऐतिहासिक लढायांची पेंटिंग्ज व म्यूरल्स... लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयासह विविध संस्थांच्या स्थापनेसह विविध लढायांचे फोटो, माहिती... पुरातन शस्त्रास्त्रांपासून अत्याधुनिक मशिनगन्स व लाँचर्सपर्यंतची शस्त्रास्त्रे, विविध रणगाड्यांच्या माध्यमातून इतिहासाची सैर...

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने घोरपडी येथील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे उभारलेल्या सदर्न कमांड म्युझियमच्या माध्यमातून पुणेकरांना हे सर्व अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 'विजय दिना'चे औचित्य साधून लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांच्या हस्ते या म्युझियमचे लोकार्पण करण्यात आले. दक्षिण मुख्यालयांतर्गत दक्षिण महाराष्ट्र सब एरियातर्फे हे म्युझियम उभारण्यात आले आहे. सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल नीरज बाली यांनी म्युझियमबाबत माहिती दिली.

लष्कराचे दक्षिण क्षेत्र हे भारतातील सर्वांत मोठे क्षेत्र असून, यामध्ये महाराष्ट्र, राजस्थानसह भारताचा ४० टक्के भूभाग या क्षेत्रात येतो. दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय सुरुवातीपासूनच पुण्यात आहे. लष्कराच्या विविध मोहिमा, लढायांमध्ये दक्षिण क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच लष्करात दक्षिण मुख्यालयाला मानाचे स्थान आहे. या दक्षिण मुख्यालयाचा इतिहास मांडणारे म्युझियम पुण्यात उभारावे, अशी कल्पना लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांनी मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही महिन्यांत हे म्युझियम साकारण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, कान्होजी आंग्रे आदींची पेंटिंग्ज व म्यूरल्स, विविध किल्ल्यांचे म्युरल्स आणि पानिपतपर्यंतच्या लढायांच्या पेंटिंग्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास उलगडण्यात आला आहे. अशाच पद्धतीने महाराणा प्रताप, कृष्ण देवराय, हैदर अली यांचे पेंटिंग्ज, म्यूरल्सच्या माध्यमातून राजस्थानच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

रणगाड्यांच्या विभागात भारतीय लष्कराने वापरलेले विविध रणगाडे तसेच पाकिस्तानचे जप्त केलेले रणगाडे पाहता येतात. सदर्न कमांड विभागात सदर्न कमांडची स्थापना, इतिहास, मुख्यालयाचे फोटो, सन १८१७ पासूनच्या विविध लढाया, मोहिमांचे फोटो, जवानांचा संपूर्ण पोशाख व किट, पुरातन बंदुका, रायफल्स, शस्त्रांस्त्रांपासून अत्याधुनिक गनलॉँचर्स, मशिनगन्स, विमानभेदी तोफांचा समावेश आहे. याशिवाय सदर्न कमांड अंतर्गत येणाऱ्या विविध ४० प्रशिक्षण संस्थांची माहिती व फोटो या शिवाय विविध नैसर्गिक आपत्तींदरम्यान सदर्न कमांडच्या जवानांनी केलेल्या मदतकार्याचे फोटो व माहिती येथे पाहता येते. हे म्युझियम दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले असेल.

शत्रूवर गोळ्या चालविण्याची संधी

लष्करी मोहिमा कशा चालतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या म्युझियममधील पिनपॉइंट शूटिंग रेंजच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या म्युझियममध्येच जंगलाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जवानांचा पोशाख घालून या जंगलात फिरत शत्रूला गोळ्या घालण्याचे लक्ष्य नागरिकांना देण्यात येते. ही संपूर्ण कामगिरी दोन मिनिटांत पार पाडण्याचे आव्हान असते; तसेच या कामगिरीचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेकॉर्डिंग केले जाते. कामगिरी संपल्यानंतर नागरिकांना हे शूटिंग पाहता येते. त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही केले जाते. यासाठी ३० रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. वानवडी येथील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे उभारलेल्या सदर्न कमांड म्युझियमच्या माध्यमातून पुणेकरांना पुरातन शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

जागवल्या युद्धाच्या स्मृती

पाच पिढ्यांचा सैनिकी वारसा असलेले मेजर उदय साठे (निवृत्त) यांनी पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धाच्या स्मृती जागवल्या. भारतीय सैन्य लढाईसाठी सज्ज होते. भारतीय सैन्याचे मनोबलही उंचावले होते. भारताच्या धडक कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याला धडकी भरली. भारताची मुसंडी आणि समोर दिसत असलेला पराभव यामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करली. तोपर्यंत भारताने ढाक्यापर्यंत मजल मारली होती, असे साठे यांनी सांगितले. या युद्धातील पराक्रमाबद्दल साठे यांना वीर चक्राने गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विखे पाटील फाउंडेशनवर फसवणुकीचा आरोप

0
0

पावणेदोन कोटींना गंडवले; 'सनातन'ची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. विखे पाटील फाउंडेशनने पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारची एक कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सनातन संस्थेने बुधवारी पुण्यात केला. फाउंडेशनने हे आरोप नाकारले असून, कायदेशीर पद्धतीनेच हा व्यवहार केल्याचे स्पष्ट केले.

फाउंडेशनच्या पत्रकारनगर परिसरातील भूखंडासंदर्भात 'सनातन'ने हे आरोप केले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे प्रवक्ते अभय वर्तक, हेमंत शिंदे आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या आरोपांविषयीची माहिती दिली. 'फाउंडेशनने सुरुवातीच्या टप्प्यात या भूखंडावर शाळा सुरू करण्यासाठीची परवानगी घेतली होती. नंतरच्या काळात त्या जागेवर तांत्रिक आणि उच्च शिक्षणासाठी कॉलेज सुरू करण्यात आले. शाळेसाठी म्हणून घेतलेल्या या भूखंडावर कॉलेज सुरू करताना फाउंडेशनने त्यासाठीच्या जागेच्या दरातील फरक सरकारकडे भरणे कायदेशीररीत्या गरजेचे होते. फाउंडेशनने ते अद्याप केले नसल्याने या प्रकरणात राज्य सरकारची जवळपास एक कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे,' असा आरोप शिंदे यांनी या वेळी केला. २००२ पासून सुरू असलेल्या या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही हे प्रकरण दडपून ठेवण्यासाठी फाउंडेशनला मदत केल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील यांनी या आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, 'याविषयी इतरांनीही कोर्टात खटले दाखल केले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी आम्ही भाष्य करणे योग्य नाही. या खटल्यांमध्ये आम्ही आमची बाजू कोर्टापुढे मांडलेलीच आहे. संस्थेने सर्व कायदे पाळून आणि नियमानुसारच व्यवहार केले आहेत. न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याने लोक असे करत असतील, तर हे देशाचे दुर्दैव आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगाखान पॅलेसमधील चंदनाची झाडे चोरीला

0
0

पुणे : आगाखान पॅलेसच्या बागेमधून चंदनाची पाच झाडे चोरीस गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते अडीचच्या दरम्यान घडली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदनचोरांचा शहरात सुळसुळाट झाला असून, पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांच्या आवारातूनही चंदनचोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता आगाखान पॅलेसच्या बागेमधूनच पाच झाडे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बजरंग येकीकर (वय ४१, रा. येरवडा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येकीकर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात संवर्धक सहायक आहेत. आगाखान पॅलेसची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दीड ते अडीचच्या सुमारास या ठिकाणची पाच चंदनाची झाडे कापली. त्यातील चंदनाचे बुंधे चोरून १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार डी. आर. हेमाडे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॅक्टिकल परीक्षेसाठीही आता एक्स्टर्नल परीक्षक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावी-बारावीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षांसाठीही बहिःस्थ पर्यवेक्षक (एक्स्टर्नल सुपरवायझर) नेमण्याचे आदेश राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य बोर्ड) राज्यातील सर्व शाळा-कॉलेजांना दिले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या विक्रमी निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्य बोर्डाचा हा आदेश निकालावर नियंत्रण मिळविण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात वर्ष २०१३-१४ पासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८०-२० पॅटर्ननुसार नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतरच्या टप्प्यावर गेल्या दोन वर्षांमध्ये दहावी-बारावीच्या निकालांच्या टक्केवारीने नव्वदीपार झेप घेतली होती. शाळा-कॉलेज पातळीवर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचे गुण देताना कोणत्याही मर्यादा पाळल्या जात नसल्यानेच निकालाची टक्केवारी वाढल्याची टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर, बोर्डाचे सचिव के. बी. पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय बोर्डांच्या सचिवांना प्रॅक्टिकलच्या परीक्षांसाठी बहिःस्थ पर्यवेक्षक नेमण्याचे आदेश दिल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

पाटील यांनी सर्व विभागीय मंडळांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार, 'फेब्रुवारी- मार्च २०१६ च्या परीक्षेपासून दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची प्रॅक्टिकलची परीक्षा ही अंतर्गत आणि बहिःस्थ परीक्षकांच्या उपस्थितीत होणे बोर्डाला अपेक्षित आहे.'

'मूल्यांकन पारदर्शक होईल'

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सचिव अनिल देशमुख यांनी महासंघाच्या वतीने राज्य बोर्डाच्या या निर्णयाचे बुधवारी स्वागत केले. देशमुख म्हणाले, 'बहिःस्थ परीक्षकांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या प्रॅक्टिकलच्या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार समोर येत होते. खासगी क्लाससोबतच्या टाय-अप्समुळे अनेक कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स न करताही पैकीच्या पैकी मार्क्स दिल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. अशा सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बहिःस्थ परीक्षकांच्या नेमणुकीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि निकालाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या बहाण्याने बेडगेकडून अनेकांची फसवणूक

0
0

पुणेः स्वतःच्या कानशिलावर पिस्तुल ठेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गोळी सुटल्याने महिला जखमी झाल्याची घटना गोकुळनगर येथे घडली होती. या घटनेतील आरोपी अजित बेडगे याने नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सूरज मोरे (वय ३७, रा. तुळजापूर,जि.उस्मानाबाद) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अजित विठ्ठल बेडगे (वय २८, रा. प्रथमेश बिल्डिंग गोकुळनगर, कोंढवा), देविदास पवार आणि लोणारे यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेडगे याने 'एमकेसीएल'मध्ये भरती व्यवस्थापक असल्याचा बनाव केला होता.

आरोपी पवन आणि लोणारे यांच्या साथीने तक्रारदार मोरे यांना समाज कल्याण विभागात निरीक्षक पदावर नोकरी मिळवून देण्याचा बहाणा केला होता. त्यासाठी मोरे यांच्याकडून त्याने दहा लाख रुपये घेतले आणि त्यांना नियुक्तीचे बनावट पत्र दिले होते. बेडगे याने अशा प्रकारे अनेकांना फसवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images