Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अॅपमुळे घेता येईल संगीतानुभूती

$
0
0

शिवराज सावंतकडून 'विश्वमोहिनी वेब अॅप'ची निर्मिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगीत शिकत आहात, पण तबल्यावर बोटांना अजून गती नाही की होर्मोनियमवर हात पळत नाही. नोटेशन्स तर वाजवून पहायचे आहे. तबल्यावरील बोल ऎकायचे आहेत, मग काय करता येईल... रियाजाशिवाय तर हे शक्यच नाही, पण एका अॅपमुळे संगीताची जादूमय अनुभूती घेता येणार आहे. संगीतवाद्यांचा रियाज करताना संगणकावरील सूर-ताल तुम्हाला नकळत संगीताचे ज्ञान देऊन जातील. रियाजच पण आधुनिक म्हणा हवं तर...

संगीतप्रेमी युवा सॉफ्टवेअर इंजिनीअर शिवराज सावंत या युवकाने 'विश्वमोहिनी वेब अॅप'ची निर्मिती केली आहे. पं. विजय दास्ताने, पं. मुकेश जाधव आणि पं. शशिकांत बेल्लारे यांच्याकडून शिवराज सावंत यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले आहे. संगीताच्या प्रेमापोटी त्यांनी विकसित केलेले अॅप संगीत शिकणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांसाठी उपयुक्त ठरत आहे.शहरात संगीताचे महोत्सव रंगू लागले आहेत. वातावरणात सूर-तालाचा निनाद घुमू लागला असतानाच नेमकी ही वेळ साधून हे अॅप संगीतप्रेमींसाठी विकसित करण्यात आले आहे, तेही मोफत. हे अॅप गेल्या तीन महिन्यांत सातशेहून अधिक जणांनी 'डाउनलोड' करून घेतले आहे. 'विश्वमोहिनी डॉट कॉम' या संकेतस्थळावरून मोफत डाऊनलोड करून घेतल्यानंतर लॅपटॉपवर इंटरनेटविनाही हे अॅप वापरता येऊ शकते.विश्वमोहिनी मेलडी प्लेअरमध्ये गुरुजींनी शिकविलेल्या बंदिशींचे नोटेशन्स करू शकतो. या नोटेशन्स वाजवू शकतो. सूर-तालाच्या नव्या स्वररचना करू शकतो. ज्या बोलांचा रियाज करायचा आहे, ते बोल, त्याचा ध्वनी या अॅपमधून ऎकता येईल, अशी माहिती देत इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा शास्त्रीय संगीतासाठी उपयोग झाला, याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्रियांनी विविध विषयांवर लिहावे

$
0
0

स्त्री साहित्य संमेलनातील मान्यवरांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'झपाटलेल्या लेखकांकडून कसदार साहित्य उतरते. वाचक अस्वस्थ होईल, असे साहित्य लिहिले जायला हवे,' असे मत ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले. निमित्त होते, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या स्त्री संमेलनाचे. रानडे या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथील सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षा रानडे, प्रमुख पाहुणे डॉ. विलास खोले आणि डॉ. विद्या देवधर या प्रसंगी उपस्थित होते. 'स्त्रियांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुरुष सुधारकांनीही समाजाचा विरोध सहन केला. त्यांनी स्त्रियांना शिकविले. त्यातल्या काही पुढे गेल्या. काही अनामिक राहिल्या, तर काही संसाराच्या ओझ्याखाली पुढेच आल्या नाहीत. मात्र, आता स्त्रियांनी विविध विषयांवर लिहिते व्हायला हवे,' असे सांगून रानडे यांनी स्त्रियांना लेखनासाठी प्रवृत्त केले.
डॉ. मंदा खांडगे, डॉ. निलीमा गुंडी आणि डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी संपादित केलेल्या २००१ ते २०१० या कालावधीतील 'स्त्री साहित्याचा मागोवा' या ग्रंथाचे प्रकाशन या वेळी धनागरे यांच्या हस्ते झाले. ग्रंथासाठी १६ अभ्यासकांनी सहा हजारांहून अधिक निबंध लिहून सहभाग नोंदवला. त्यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहा एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची चित्रकला

$
0
0

पुणे : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी साकारलेल्या चित्रकला, शिल्पकला आणि भरतकाम अशा विविध कला प्रकारांचा एकत्रित कलाविष्कार एकाच प्रदर्शनात रसिकांना अनुभवता येणार आहे. चित्रकार राजेंद्र ढवळे आणि कुटुंबीयांच्या विविध चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात मंगळवारपासून सुरू होत आहे. कलेला वाहून घेतलेल्या संपूर्ण कुटुंबातील आठ सदस्यांच्या कलांचा आविष्कार या प्रदर्शनात घडेल.

प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार सुनील देवरे या वेळी व्यक्तिशिल्प साकारणार आहेत. राजेंद्र ढवळे व कुटुंबीयांनी चितारलेली १५० चित्रे आणि शिल्पांचा समावेश प्रदर्शनात असेल. त्यांचे वडील चित्रकार पंढरीनाथ ढवळे, तर बालचित्रकार नरेंद्र ढवळे ,विरेंद्र ढवळे, मनस्वी ढवळे यांच्यासह दुर्वा ढवळे आणि तेजस्वी ढवळे या चार वर्षांच्या चिमुकलींनी काढलेली चित्रे पहायला मिळतील. रत्नमाला ढवळे यांचे भरतकाम प्रदर्शनात असेल. हे प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राइट टू पी’ चळवळ कलंक : अतुल पेठे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आपल्या देशात आरोग्यविषयक समस्यांबाबत अत्यंत अनास्था आहे. स्त्री वर्गाला मुलभूत हक्कांसाठी करावी लागणारी राइट टू पी ही चळवळ देशावरील कलंक आहे,' अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली.

पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात नुकत्याच झालेल्या आरोग्य चित्रपट महोत्सवात पेठे बोलत होते. फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, सतीश कोंढाळकर, शरद मुनोत, किरण कोठाडिया, विलास राठोड, डॉ. विक्रम काळूसकर आदी या वेळी उपस्थित होते.

'आरोग्याची संकल्पना केवळ शारीरिक आरोग्यापुरतीच मर्यादित नाही. व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आरोग्य चांगले असलेला समाज आरोग्यदायी असतो, असे म्हणता येते. चित्रपट या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. त्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते. या कलाकृतीकडे शहाणपण देण्याची आणि दृष्टिकोन विस्तारण्याची खरी ताकद आहे,' असेही पेठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोल करणाऱ्याविरोधात गुन्हा

$
0
0

पिंपरी : तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुनानगर येथील घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात गेलेल्या तरुण तरुणीचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती.

धवल शंकर लगाडिया (वय-२४, रा. यमुनानगर, निगडी) व मंदिरा रामलाल चौधरी (वय-२६, रा. सीआरपीएफ, तळेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी पेस्ट कंट्रोल करणाऱ्या लक्ष्मण जगन्नाथ वाळंज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर भागात राहणाऱ्या लगाडिया यांच्या फ्लॅटमध्ये ३१ ऑक्टोबरला पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी लगाडिया यांचा मुलगा धवल हा त्याची मैत्रीण मंदिराला घरी गेला होता. या वेळी ते दोघे घरात एकटेच होते.

काही वेळाने पेस्ट कंट्रोलचा त्रास होऊ लागला, त्या दोघांचाही श्वास गुदमरल्याने दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास धवलचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास मंदिराचा मृत्यू झाला.या प्रकरणाचा तपास करीत असता पेस्ट कंट्रोल करणाऱ्या लक्ष्मण वाळूंज याने पेस्ट कंट्रोल करताना प्राणघातक औषधी कीटकनाशकाचा वापर प्रमाणात न केल्यामुळे व ते औषध वापरण्यासाठी लागणारा कृषी विभागाचा परवाना नसतानाही

त्या औषधांचा वापर केल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाळूंजविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

आला आहे.

चौदा लाखांचे केमिकल जप्त

पिंपरी ः बेकायदा केमिकलची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून १४ लाख रुपये किंमतीचे ३१ केमिकलचे बॅरल जप्त केले. शुक्रवारी (११ डिसेंबर) मोहनगर, चिंचवड येथे केली.

रामकुमार निरहू यादव (वय ३३, रा. लालटोपीनगर झोपडपट्टी, मोरवाडी), रामलाल गंगाराम देवकर (वय ५३, रा. आण्णासाहेब मगर झोपडपट्टी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलिस नाईक अमित गायकवाड यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली, की चिंचवड परिसरातून दोन टेम्पोमधून बेकायदा केमिकलची वाहतूक होत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चिंचवड, मोहनगर येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केमिकलचे १४ लाख रुपये किंमतीचे ३१ बॅरलसह दोन टेम्पो जप्त केले. युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, फौजदार बाबा शेख, धनंजय चव्हाण, अमित गायकवाड, संतोष बर्गे, हेमंत खरात, अर्जुन भांबुरे, शशिकांत शिंदे, गणेश काळे, प्रमोद वेताळ, संजय गवारे, प्रमोद लांडे, विवेकानंद सपकाळे, राजे काकडे, अंकुश जोगदंडे, मोहनदास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसाला चावणाऱ्यास अटक

पिंपरी ः दारू पिताना हटकल्याबद्दल पोलिसाच्या हाताचा चावा घेणाऱ्यास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश तिमन्ना पवार (वय ४८, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी पोलिस नाईक गजानन जाधव यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव व कर्मचारी जगदाळे हे ताथवडे ते डांगे चौकात या दरम्यान रात्री गस्त घालत होते. या वेळी पवार हा डांगे चौकातील उड्डाणपुलाखाली दारू पित असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी पवार याला हटकले असता, त्याने रस्त्यावर पडलेल्या सिमेंटच्या वीटा पोलिसांच्या दिशेने फेकल्या. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी जाधव गेले. तेव्हा पवार याने जाधव यांच्या हाताचा चावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन नगरसेवकांसह अकरा जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खराळवाडी येथे क्षेत्रीय वॉर्ड सभेदरम्यान नगरसेविकेला झालेल्या मारहाण व परस्परविरोधी हाणामारी, लुटमारीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आलेल्या दोन नगरसवेकांसह अकरा जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पिंपरी कोर्टाने सोमवारी (१४ डिसेंबर) सर्वांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्वांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कैलास कदम, त्यांचे बंधू नगरसेवक सद्‌गुरु कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख यांच्यासह नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर, दत्ता इंगळे, सचिन जाधव, नितीन जाधव, सचिन कदम यांच्यासह तीन महिलांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडी येथील बालभवन सभागृहात गुरुवारी (१० डिसेंबर) क्षेत्रीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समस्या मांडण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीता मंचरकर आणि नगरसेवक सद्‌गुरू कदम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. या वादावादीचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले. कदम यांच्या सुमारे ४० महिला आणि २५-३० पुरुष अशा सुमारे ७० ते ८० कार्यकर्त्यांनी मंचरकर यांच्यासह त्यांच्या दोन महिला कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.

या प्रकरणी नगरसेवक सदगुरू कदम व भाजप स्थानिक कार्यकर्ता दत्ता इंगळे यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली होती. दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा प्रयत्न, पिस्तुल रोखणे, दंगल, लुटमार, विनयभंग आदी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी अकरा जणांना अटक केल्यानंतर पिंपरी कोर्टाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत सर्वांची रवानगी केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडणे सोडविली म्हणून मामाचा खून

$
0
0

पिंपरीः बहिणीचा पती आणि त्यांच्या सावत्र मुलामध्ये सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून बहिणीच्या सावत्र मुलाने त्यांच्या साथीदारांसह मामाचाच लाकडाने आणि दगडाने बेदम मारहाण करून खून केला.

ही घटना चिंचवड, लिंकरोड येथे नुकतीच घडली. विजय मोतिराम लांडगे (वय ३२, रा. नामू बारणे चाळ, थेरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. शिला लांडगे (वय ३०, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. विजय हे शुक्रवारी रात्री लिंकरोड येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्या बहिणीचा पती राजू वाघेला आणि त्याचा सावत्र मुलगा संजय वाघेला यांच्यात भांडणे सुरू होती. विजय यांनी त्यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने संजय याने त्याच्या साथीदारांसह विजय यांना लाकडाने व दगडाने बेदम मारहाण केली. यात विजय गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामे नियमित होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्वतःच्या मालकीच्या जागेवरील विनापरवाना बांधकाम नियमित करण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी (१४ डिसेंबर ) नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभेत केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागणार असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर निर्वासितांना दिलेली घरेदेखील नावावर करून देण्यात येणार असून, पिंपरी सिंधी कॅम्प परिसरातील नागरिकांची घरे आता स्वतःच्या मालकी हक्काची होणार आहेत.

विधिमंडळात पुरवणी मागणीवर चर्चा करताना खडसे यांनी एका उत्तरादाखल वरील घोषणा केली. पुणे जिल्ह्यात; तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशा विना परवाना व विना शेती (एनए) जागांवर परवनगी न घेता बांधलेल्या घरांच्या बांधकामांची संख्या सुमारे अडीच लाखांच्याही पुढे आहे. त्यामुळे या घोषणेमुळे राज्यातील अशा प्रकारची लाखो विनापरवाना घरे नियमित झाली आहेत.

दरम्यान, निर्वासितांना दिलेल्या सनदच्या जागा आता त्यांच्या मालकी हक्काच्या होणार आहेत. भारत व पाकिस्तानच्या फाळणीनंतर भारतात आलेल्या बहुतांश सिंधी बांधवांनी महाराष्ट्रातील पिंपरी कॅम्प, उल्हासनगर, कोल्हापूर-गांधीनगर, इचलकरंजी, अहमदनगर, जळगाव अशा अनेक शहरांमध्ये सरकारने राहण्यासाठी व व्यावसायासाठी जागा दिल्या होत्या. त्याला सनद असे संबोधले गेले. गेल्या ६९ वर्षांपासून सिंधी बांधव या जागांवर राहतात. तसेच, अनेकांनी या जागांवर आपले उपजिविकेचे साधन म्हणून व्यवसाय उभे केले. अनधिकृत बांधकामांबरोबरीनेच सनद म्हणून दिलेली घरे तेथे राहणाऱ्यांच्या नावाने मालकी हक्काची करण्याच्या निर्णयाची घोषणा देखील विधिमंडळात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कामगारांनी व गरिबांनी बांधलेली घरे नियमित करण्याची मागणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री खडसे यांच्याकडे केली होती. त्याबाबतचे निवेदन अॅड. चाबुकस्वार यांनी यापुर्वी दिले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत हायकोर्टात अवलोकनार्थ पाठविण्यात आला आहे. कोर्टाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला विधिमंडळात मंजुरी देण्यात येणार असून, कोर्टाच्या मंजुरीनंतर हा प्रस्तावही येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच दिली होती.

वादग्रस्त समस्या सुटण्याची शक्यता

गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचाराचा किंबहुना त्यापेक्षा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अनधिकृत बांधकामांवरून रान पेटले होते. ना-राजीनामा ते सरकारला कोंडीत घेरण्याचे प्रकार झाले होते. शहरातील अनेक घरे जमीन दोस्त करण्यावरून तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशींना धमकी देण्याचे प्रकार देखील झाले होते. या सर्व बाबींचा विचार करता महसूलमंत्री खडसे यांनी सोमवारी केलेल्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दप्तराचे ओझे कायमच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने शिक्षण विभागाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. शिक्षण विभागाने दोन्ही तालुक्यातील शाळांना दप्तरासंदर्भात सूचना दिल्या मात्र त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी अनेक शाळामधून झाली नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा भार अजूनही कायम असल्याचे 'मटा'च्या पाहणीतून हे वास्तव समोर आले आहे.

राज्य सरकारने प्राथमिक विद्यार्थ्यांना वयोगटानुसार दप्तराच्या ओझ्यासंदर्भात निकष लावले आहेत. निकषांपेक्षा अधिक प्रमाणात वजन असू नये, याची खबरदारी प्रत्येक शालेय प्रशासनाने घ्यावी असे कळविण्यात आलेले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे शाळांमध्ये दप्तरांची अंमलबजावणी होते की नाही, याची स्थानिक स्तरावरून अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करावी असे निर्देश सरकारने दिले होते. मात्र, शिक्षण विभागातील अधिकारी पाहणी करण्याची टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायम आहे.

बारामती तालुक्यात २५ शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून आदेश दिल्याचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांनी सांगितले. बारामतीमध्ये ५८ हजार ६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी फक्त २५ ते ३० टक्केच मुलांचा पाठीवरचा बोजा कमी झाला आहे. इंदापूर तालुक्यातील शिक्षण विभाग याबाबत गाफील असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. शाळांची पाहणी, मुलांची संख्या याबाबत कोणतीही आकडेवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी टाळाटाळ करत आहेत.

शाळा तपासणीचा कार्यक्रम दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागांत झाला आहे. संबंधित शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्याची तयारी सुरू केली असली तरी शिक्षण विभागाने याकडे डोळेझाक का करावी, असा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा व नगरपालिकेच्या शाळा मुलांच्या पाठीवरचे दप्तर कमी करण्यात यशस्वी होत आहे , मात्र खासगी संस्थाना या निर्णयाचे कोणतेही गांभीर्य नाही. अशा संस्थावर शिक्षण विभाग कारवाई करणार का? असा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीसा पाठविल्या आहे , मात्र ज्या संस्था आदेशाचे पालन करीत नाही त्या संस्थांचे अहवाल कारवाई साठी धर्मादाय आयुक्तांच्याकडे पाठवण्यात येतील.

- रामचंद्र जाधव शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनीबसच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पीएमपी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव मिनी बसने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. येरवडा परिसरातील आंबेडकर सोसायटी रोडवर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी बस चालकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन लक्ष्मण सूर्यवंशी (५५, रा. सुरक्षानगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मिनी बसचा चालक रवींद्र बालाजी टिपराळे (२७, रा. शिवाजी चौक, कासारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आंबेडकर सोसायटी रोडवरील पीएमपी बस स्टॉपवर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी सुरक्षानगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मिनी बसने सूर्यवंशी यांना जोरात धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येरवडा पोलिस ठाण्याचे फौजदार एम. एम. साळुंखे करत आहेत.

एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न

हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथे कॅनरा बँकेचे एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रमोद आढाव (४०, रा. सुभाषनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. आढाव हे बँकेचे फिल्ड ऑफिसर म्हणून काम पाहतात. हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथे गोयल निवासमध्ये कॅनरा बँकेचे एटीएम मशिन आहे. शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्याने एटीएम मशिन बाहेर काढून ते चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा मशिन तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान, आढाव हे पहाटे साडेचारच्या सुमारास त्या ठिकाणी आले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. गोरे हे अधिक तपास करत आहेत.

लॉजच्या मॅनेजरला मारहाण

सिगारेट ओढू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून चौघांनी शुक्रवारी मध्यरात्री विल्सन गार्डन येथील अगरवाल लॉजमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत मॅनेजरला बेदम मारहाण केली. या टोळक्याने मॅनेजरच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाइल असा एकूण ३२ हजाराचा माल चोरुन नेला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लॉजचे मॅनेजर गोपाल शिवाजी बोरोकार (२४, रा. बिल्सन गार्डन, अगरवाल लॉज) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन परिसरातील विल्सन गार्डन येथे अगरवाल लॉज येथे बोरोकार हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. शुक्रवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती लॉजमध्ये सिगारेट ओढत असल्याने बोरोकार यांनी त्याला येथे सिगारेट ओढण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीला त्याचा राग आल्याने त्याने बोरोकार यांना शिवीगाळ करीत निघून गेला. तो आणि त्याचे इतर मित्र हे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लॉजमध्ये आले. त्यांनी बोरोकार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली आणि हॉटेलमधील खुर्ची, टेबल व इतर साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी फौजदार एस. शिंदे अधिक तपास करत आहेत.

पोलिस कर्मचाऱ्याला पकडले

फसवणुकीची तक्रार घेण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रात्री पुण्यातील ब्ल्यू नाइल हॉटेल समोर ही कारवाई केली. सचिन शंकर जगदाळे असे अटक केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहेत. मावळ तालुक्यातील मौजे पवना सिंदगांव येथे साडेचार एकर जमीन खेरेदीच्या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी ते लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले होते. त्या वेळी फसवणुकीची तक्रार घेण्यासाठी जगदाळे याने त्यांच्याकडे तीस लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता फसवणुकीची फिर्याद घेण्यासाठी जगदाळे याने तीस लाख रुपये मागितल्याचे आढळून आले.

या तीस लाखांपैकी टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्याचे शुक्रवारी ठरले होते. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कॅम्प परिसरातील ब्ल्यू नाइल हॉटेल समोर सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना जगदाळे याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांच्या विरोधात १०६४ या हेल्पलाइनवर किंवा (०२०) २६१२२१३४, २६१३२८०२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींविरुद्धचे गुन्हे कायम

$
0
0

sujit.tambde@timesgroup.com

पुणे : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ला अद्याप मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळाली नसताना, या पक्षाचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या सहा खटल्यांपैकी तीन राजकीय खटले मागे घेण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यापासून 'अच्छे दिन' दूरच राहणार आहेत.

खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २०१२ मध्ये झालेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनातील हे गुन्हे आहेत. राजकीय खटले मागे घेण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात १९ जणांविरुद्ध राजकीय खटले प्रलंबित आहेत. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. खासदार शेट्टी यांच्याविरूद्ध इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा खटले दाखल असून, त्यापैकी तीन खटले मागे घेण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. अन्य तीन खटले मागे घेण्यास राज्य सरकारकडे नकारात्मक शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खासदार शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १२ नोव्हेंबर २०१२ रोजी पुणे-सोलापूर रस्त्यावरील हिंगणगावातील बाबूळगाव पाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी एसटी बसवर दगडफेक आणि बंदोबस्तासाठी पोलिस चालले असताना जमावाने सरकारी वाहन अडवून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, निलेश देवकर, सतीश काकडे यांच्याविरूद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा खटला मागे घेण्यासाठी खासदार शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी अर्ज केला होता. त्यावर बैठकीत चर्चा करून खटला मागे न घेण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे-सोलापूर रस्त्यावर आंदोलन करताना कुंडलिक कोकाटे या आंदोलनकर्त्याचे निधन झाले. ही घटना १२ नोव्हेंबर २०१२ रोजी घडली. याप्रकरणीही खासदार शेट्टी यांच्याविरूद्ध गुन्हा आहे. या गुन्ह्यात जीवितहानी झाली असल्याने गुन्हा मागे घेण्याची शिफारस न करण्याचे ठरविण्यात आले. आंदोलनाच्या काळात एसटी बस जाळल्यामुळे सुमारे १२ लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम जास्त असल्याने हा खटला मागे घेतला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय अन्य तीन खटले मागे घेतले जाणार आहेत. ऊसदरवाढीसाठी कर्मयोगी साखर कारखान्याच्या जागेवर मंडप बांधून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सात सप्टेंबर २०१२ रोजी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा आहे. हा खटला मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.

१२ सप्टेंबर २०१२ रोजी पुणे सोलापूर रोडवर पळसदेव गावाजवळ रस्ता रोको करण्यात आला. त्यामध्ये बसचे सुमारे ३० हजार रुपये ​नुकसान केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मुख्य आरोपी म्हणून जयवंत काळे यांचे नाव आहे. या गुन्ह्यातही खासदार शेट्टी यांचे नाव आहे. नुकसानीची ही रक्कम भरण्याच्या अटीवर खटला मागे घेण्याची शिफारस करण्यात आली. बावडा ते अकूलज रोडवर आंदोलनात एसटीचे ६० हजार रुपये नुकसान करण्यात आले आहे. ही रक्कम भरण्याच्या अटीवर हा खटला मागे घेतला जाणार आहे.

काही खटल्यांतून दिलासा

राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना यांच्याकडून नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येते. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात. हे खटले अनेक वर्षे प्रलंबित असतात. त्यामुळे राज्य सरकारने एक नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे राजकीय खटले मागे घेण्याचा निर्णय १३ जानेवारी २०१५ रोजी घेतला आहे. मात्र, त्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. जीवितहानी न झालेले, खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले नसलेले खटले मागे घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांचे ‘चलो दिल्ली’

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : विमान प्रवासासाठी पुणेकरांकडून दिल्लीला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विमानतळावरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ३० टक्के प्रवासी दिल्लीला जातात. तसेच, देशभरातील बहुतांश शहरातून दिल्लीचा प्रवास विमानाने करणाऱ्यांची संख्या जास्त असून, प्रवाशांच्या संख्येचा विचार करता, त्यामध्ये पुण्याचा सातवा क्रमांक आहे.

'डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'तर्फे देशभरातील विमानतळावरून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचा मासिक अहवाल सादर केला जातो. त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्याद्वारे ही माहिती पुढे आली आहे. ऑक्टोबर महिन्यात पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या २, २१, ०४६ होती. पुणे विमानतळावरून १४ शहरांमध्ये विमानसेवा उपलब्ध आहे. यामध्ये दिल्लीला प्रवास करणाऱ्यांची संख्या ३० टक्के, तर बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २३ टक्के होती. उर्वरित ४७ टक्के प्रवासी अन्य १२ मार्गांवरील आहेत.

या अहवालानुसार आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पुण्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सव्वादोन लाखाच्या जवळपास आहे. मात्र, विमानाने पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. ऑक्टोबर महिन्यात पुण्याला आलेल्या प्रवाशांची संख्या १,५२, ७९४ होती. पुण्यातून बहुतांश शहरात जाण्यासाठी विमानाचा वापर केला जातो. मात्र, तेथून येण्यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब केला जात असण्याची शक्यता आहे. एकूण मार्गांपैकी केवळ बेंगळुरू, अहमदाबाद व हैदराबाद या शहरातून पुण्याला येणाऱ्यांची संख्या जाणाऱ्या प्रवाशांपेक्षा अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेम चुकल्याने पत्नी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

कर्जबाजारी झाल्याने दडपणाखाली आलेल्या एका व्यक्तीने आत्महत्येच्या विचाराने रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी चालवून घेतली. मात्र, त्याचा नेम चुकल्याने गोळी झोपेत असलेल्या त्याच्या पत्नीला लागल्याची घटना कोंढवा-कात्रज रोडवरील गोकुळनगर येथे सोमवारी सकाळी घडली.

राजश्री अजित बेडगे (वय २५, रा. फ्लॅट नंबर ५०१, गणेश विश्व सोसायटी, गोकुळ नगर, कोंढवा) असे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे पती अजित यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अजित यांनी आत्महत्येचा प्रयत्न करताना राजश्री यांच्या खांद्याला गोळी लागल्याचे सायंकाळी पोलिस तपासात निष्पन्न झाले.

बेडगे कुटुंबीय गणेश विश्व सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहते. अजित बेडगे यांना सोमवारी मुंबईला जायचे असल्याने ते सकाळीच उठले होते. रिक्षा आणण्यासाठी ते गोकुळनगरमधील स्टॉपवर गेले होते. रिक्षा त्यांच्या सोसायटीखाली आल्यानंतर लघुशंकेसाठी ते पुन्हा आपल्या फ्लॅटमध्ये आले होते. या दरम्यान त्यांच्या पत्नीवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे चित्र रंगविण्यात आले होते. अजित यांनी राजश्री यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी गोळीची पुंगळी मिळाली आहे. दरम्यान, बेडगे कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता, अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

विविध संस्थांत नोकरी लावण्यासाठी अजितने अनेकांकडून पैसे घेतले होते. तसेच, त्याने ते पैसे पुढे संबंधितांनाही दिले होते. मात्र, त्यानंतरही तरुणांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे अजितकडे पैसे मागणाऱ्यांची संख्या वाढत होती. त्याचा अजितला मनस्ताप होऊ लागला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रिवॉल्व्हरमधून सुटलेली गोळी चुकून पत्नीला लागल्यानंतर, त्याने वरील बनाव रचला, अशी कबुली अजितने पोलिसांकडे दिल्याचे मोकाशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातही होणार ‘आझाद मैदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि परिसरात विविध मागण्यांसाठी संस्था, संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या सेंट हेलेनाज शाळेजवळील मोकळी जागा आंदोलनासाठी सूचविली असून, या एकाच जागेवर आंदोलनकर्त्यांना आंदोलन करावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेंट्रल बिल्डिंग या दोन ठिकाणी अनेक सरकारी कार्यालये आहेत. मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागरिक, संस्था आणि संघटना या ठिकाणी नेहमी आंदोलन करतात; तसेच फुटपाथवर उपोषणालाही बसतात. काही वेळा नागरिकांकडून तात्पुरता मंडप उभारून आंदोलन केले जाते. त्यामुळे या परिसरात कायम वाहतुकीची कोंडी झालेली असते. यावर उपाय म्हणून आंदोलनासाठी स्वतंत्र जागेचा प्रस्ताव पोलिसांकडे देण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या इमारतीचे बांधकाम सुरू असलेले जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेंट हेलेनाज शाळेच्या मध्यभागी एक जागा आहे. त्या ठिकाणी हातगाड्या आणि स्टॉल आहेत. ती जागा मोकळी करून त्याच ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी​ देण्याचा प्रस्ताव पोलिसांकडे पाठविण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

कोंडीतून होणार सुटका

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेंट्रल बिल्डिंग परिसरात शाळा, सरकारी कार्यालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वसतिगृह, बसस्थानक आणि हॉटेल आहेत. त्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. याशिवाय हातगाडीचालकही असतात. अशा परिस्थितीत आंदोलन करण्यात आल्यानंतर या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. ससून रुग्णालय, पुणे रेल्वे स्टेशन, काउन्सिल हॉल याकडे जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप होतो. हे टाळण्यासाठी आंदोलनासाठी स्वतंत्र जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अकरावी’च्या आरक्षणात गोंधळ

$
0
0

प्रवेश नियमांना हरताळ फासल्याचा 'सिस्कॉम'चा आरोप

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश समितीच गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणाचे निकष डावलून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करत आहे. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना हक्काच्या प्रवेशांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप 'सिस्टिम करेक्टिंग मूव्हमेंट'ने (सिस्कॉम) केला आहे. 'सिस्कॉम'ने या आरोपांबाबतचा एक सविस्तर अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर केला असून, प्रक्रियेसाठीच्या शासकीय निर्णयांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याने हे प्रकार समोर येत असल्याची बाबही त्यात नमूद केली आहे.

शहरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधील वादग्रस्त मुद्द्यांवर आक्षेप घेत सिस्कॉमने ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकणारा एक अहवाल यापूर्वीच संघटनेने राज्य सरकारला पाठविला आहे. या विषयी कोर्टात जनहित याचिकेच्या माध्यमातून लढा देत संघटनेने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वैशाली बाफना यांनी सोमवारी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेत, त्यांना आरक्षणाशी संबंधित या मुद्द्यांची माहिती दिली. तसेच, हे प्रकार थांबविण्यासाठी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या सर्व सरकारी आदेशांची परिपूर्ण अंमलबजावणी करण्याची गरजही स्पष्ट केली.

या विषयी बाफना म्हणाल्या, 'अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासूनच आरक्षणाचे नियम डावलले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैधानिक आरक्षणाच्या आधारे प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते. त्याचवेळी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे निकष दाखवून प्रक्रियेतून प्रवेश दिला जात नसल्याने ते आपोआपच प्रक्रियेच्या बाहेर फेकले जातात. हेच विद्यार्थी मग हवे ते कॉलेज मिळविण्यासाठी कॉलेज पातळीवरील प्रवेशांच्या माध्यमातून पुन्हा कॉलेजांकडे वळतात. या प्रकारांमुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या मूळ हेतुलाच हरताळ फासले जात आहे.'

माहिती अधिकाराच्या माध्यमातून शहरातील नऊ प्रमुख कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर बाफना यांनी समोर आलेल्या गैरप्रकारांचीही माहिती दिली. त्यानुसार, या कॉलेजांमध्ये वैधानिक आरक्षणांच्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनेने जास्त दिसून आली. त्याचा आढावा घेतला असता, वैधानिक आरक्षणांच्या आधारे प्रवेशित होऊ शकणाऱ्या ४०७ विद्यार्थ्यांना समितीने खुल्या गटातून प्रवेश दिले. त्यामुळे एकीकडे या कॉलेजमधून आरक्षित गटातील विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असतानाच, दुसरीकडे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना मात्र गुणवत्ता असूनही या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. तसेच, या कॉलेजांमध्ये ५०८ विद्यार्थ्यांना त्यांनी कोणतेही अर्ज केले नसताना, 'ओपन स्पेशल' या गटातून प्रवेश देण्यात आले. या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे वैधानिक आरक्षणांमधून प्रवेशित होऊ शकले असते.

प्रत्यक्षात त्यांना ओपन स्पेशल गटातून प्रवेश देण्यात आल्याची माहितीही बाफना यांनी दिली. हे सर्व प्रकार दरवर्षी होत असल्याने ते तसेच सुरू राहिले आहेत. त्यामुळेच १९९७ पासून राबवविलेली अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप बाफना यांनी या निमित्ताने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपनीच्या अधिकारांना कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खास कंपनीला (एसपीव्ही) देण्यात आलेल्या अधिकारांना कात्री लावून आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवून स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला सोमवारी सर्व पक्षांनी अखेर एकमताने मान्यता दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक बदललेली भूमिका आणि राजकीय शह-काटशहाचे राजकारण अशा तब्बल तेरा तासांच्या चर्चेनंतर हा प्रस्ताव मान्य झाला असला, तरी त्याला दिलेल्या उपसूचनांमुळे योजनेची अंमलबजावणी कशी होणार, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटीची मान्यता पुढे ढकलल्यानंतर शहरात वादळ निर्माण झाले होते. राज्य सरकारनेही हा विषय प्रतिष्ठेचा केला आणि तहकूब केलेली सभा पुन्हा सोमवारी घेण्याचे आदेश दिल्याने या सभेत काय होणार, याची साऱ्या शहरात उत्सुकता होती. मात्र, प्रारंभीच मनसेने आपली बदललेली भूमिका जाहीर केल्याने प्रस्ताव मान्य होणार, हे स्पष्ट झाले होते. अखेर मूळ प्रस्तावास पाच उपसूचना देऊन एकमताने ठराव मान्य करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नियोजित 'एसपीव्ही' आणि त्याच्या सीईओंच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांऐवजी महापौरांना एसपीव्हीचे सीईओ करा, अशी उपसूचना मान्य करण्यात आली आहे.

तसेच येत्या दोन वर्षांत नियोजित एसपीव्हीने समाधानकारक काम केले नाही, तर ती बरखास्त करण्याची तरतूद करावी; त्याबरोबरच सीईओंना महापालिकेची मालमत्ता गहाण ठेवण्याचे अधिकार देण्यात येऊ नयेत, असाही प्रस्ताव मान्य झाला. दरम्यान, या एसपीव्हीने महापालिकेला त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक करणारी उपसूचनाही सभेने केली आहे. त्याबरोबरच एसपीव्हीच्या रचनेत बदल सुचविण्यात आले असून, कंपनीत महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना संचालक करावे आणि पक्षांच्या संख्याबळानुसार अन्य तीन संचालकांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या लोगोमध्ये पुणे पालिकेच्या नावाचा उल्लेख असावा, यालाही सर्व पक्षांनी मान्यता दिली.

स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरात राबविण्यात येणाऱ्या वाहतूक आणि ड्रेनेजसह घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांचाही समावेश करावा, अशा आशयाची उपसूचना सभागृहाने मान्य केली. त्याबरोबरच स्मार्ट सिटीतील योजना राबविण्यासाठी अधिक खर्च झाल्यास पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकू नये आणि औंध-बाणेर भागात क्षेत्रविकास योजना राबविण्यासाठी करवाढीची वेळ आली, तर सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याची शिफारस करण्यात आली. तसेच भविष्यात कंपनी स्थापन झाली नाही, तरीही स्मार्ट सिटी सुरूच रहावी, असेही उपसूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले.

मोक्याचा विषय अनिर्णित

स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावास एकूण आठ उपसूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी पाच स्वीकारण्यात आल्या आणि दोन फेटाळण्यात आल्या. मात्र, आतापर्यंत या प्रक्रियेत महापालिकेस मदत करणाऱ्या २० कंपन्या व अन्य संस्थांना पुढील टेंडरप्रक्रियेत भाग घेण्यास मनाई करावी, अशी उपसूचना काँग्रेसकडून मांडण्यात आल्यावर सभेत वाद झाले. मात्र, सभा संपली, तरी या उपसूचनेवर निर्णय झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अवजारांसाठी पावणेदोन कोटी

$
0
0

भोर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान मोहिमेंर्तगत कृषी यांत्रिकीकरण उपमोहीम योजनेसाठी पुणे जिल्ह्याकरीता एक कोटी ७१ लाख ५१ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलित अवजारे, रोटव्हेटर, पेरणी यंत्र, कापणी यंत्र, मळणी यंत्र, फवारणी यंत्र आदी शेती अवजारे घेता येणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती, अल्पभूधारक, महिला लाभार्थींना ट्रॅक्टरच्या किमतीत ३५ टक्के, तर पॉवर टिलर व इतर स्वयंचलित ट्रॅक्टरचलित अवजारे, पिकसंरक्षणाची उपकरणे यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या शिवाय इतर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किमतीत ३५ टक्के, तर पॉवर टिलर व इतर स्वयंचलित ट्रॅक्टरचलित अवजारे, पीकसंरक्षणाची उपकरणे यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

सदरच्या योजनेतील अवजारे व उपकरणे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, पुणे यांच्याकडून खरेदी करणे बंधनकारक आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज व इतर कागदपत्रांची पूर्तता करून मागणी नोंदवावयाची आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१५ आहे.

पाणलोटासाठी ८० लाख

पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत अपूर्ण पाणलोट पूर्ण करण्यासाठी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेनुसार सन २००७-०८ या वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यातून गतिमान पद्धतीने एका पाणलोटातील कामे पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीला फसवून दुसऱ्या मुलीशी विवाहाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

गेल्या चार वर्षांपासून मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून दुसऱ्याच मुलीशी विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला लग्नाच्या दोन दिवस आधी चंदननगर पोलिसांनी अटक केली.

अभिजित दत्त्तात्रय नऱ्हे (रा. सरगडे चाळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी अभिजितचा मंगळवारी (दि. १५) विवाह होणार होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित आणि पीडित मुलीची ओळख काही वर्षांपूर्वी पुणे स्टेशन येथे झाली. कालांतराने दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या चार वर्षांपासून अभिजितने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील विविध लॉजवर नेऊन शारीरिक संबध ठेवले होते. लग्नासाठी मैत्रिणीने अनेकदा विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करीत होता. काही वेळा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे चालू होते. काही दिवसांपूर्वीच अभिजितचा विवाह दुसरीकडे होणार असल्याची माहिती मुलीला समजल्यानंतर तिने विचारणा केली असता, तुमची जात कनिष्ठ असल्यामुळे तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे त्याने सांगितले. लग्नामध्ये अडथळा आणण्याच्या प्रयत्न केल्यास आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलीने पोलिस दलात असणाऱ्या मामाच्या मदतीने सोलापूर शहरात बलात्काराची तक्रार नोंदविली. हा गुन्हा चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफियांकडून ३० लाखांचा दंड वसूल

$
0
0

बारामती : बारामती तालुक्यातील विना परवाना वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १२७ वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई करून ३० लाख ३४ हजार रुपयांचा दंड सहा महिन्यांत वसूल केला आहे, तर १७ फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे. बारामती तालुक्यात व इतर तालुक्यातून बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कारवाई धाडी टाकल्या. चालू आर्थिक वर्षात सहा महिन्यांतील कारवाईतून सुमारे ३० लाख ३४ हजार रुपयांची वसुली केल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

सरकारच्या महसूल वाढीकरिता शक्य ते प्रयत्न केले जातील. गौण खनिज महसुलावर लक्ष केंद्रित करून याही वर्षी जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- नीलप्रसाद चव्हाण,तहसीलदार, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षतेने टळला सिलिंडर स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

गोळेगाव ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सिलिंडरच्या रेग्युलेटरचा नॉब अचानक पेटला. मात्र, जितेंद्र भालेराव या युवकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. जितेंद्रने अग्निशामक यंत्राचा वापर करून तत्परतेने सिलिंडरवर फवारा मारल्याने आग विझली.

गोळेगाव ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सिलिंडरच्या रेग्युलेटरचा नॉब अचानक पेटल्याने शाळेच्या स्वयंपाकगृहात धावपळ झाली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तातडीने वर्गाबाहेर काढून पुरेशी खबरदारी घेतली. या घटनेने शाळेत ओरड होताच परिसरात राहणाऱ्या जितेंद्र भालेराव या युवकाने शाळेतील अग्निशामक यंत्र काढून आग विझविण्याची तत्परता दाखवली. अग्निशामक यंत्र सिलिंडरच्या पलीकडे असल्याने तो काढणे धोक्याचे होते. असे असूनही त्याने जवळच असलेल्या बालवाडीत पळत जाऊन तेथील अग्निशामक यंत्राचे नळकांडे आणून त्याचा फवारा सिलिंडरवर मारला. त्यामुळे आग लगेच विझली. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट टळला.

दरम्यान, या घटनेची माहिती एचपी गॅस डिलर शहा यांना कळविण्यात आली. त्यामुळे तेथूनही मेकॅनिक अग्निशामक यंत्र घेऊन आले. परंतु ते पोहोचेपर्यंत जितेंद्रने दाखविलेल्या खबरदारीने अनर्थ टळला, अशी माहिती घटनेचे प्रत्यक्षदर्शी संजय माळी यांनी दिली. दरम्यान, शाळेत पहिली ते चौथीची ७८ मुले शिकत आहेत.

एक मोठी संभाव्य दुर्घटना टळल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला, असे येथील शिक्षक गणेश बिडवई म्हणाले. ही घटना नळीची गळती व रेग्युलेटरमध्ये दोष असल्याने झाल्याचे गॅस डिलर शहा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images