Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जुन्या दस्तनोंदी मार्चपासून ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ई सर्च'द्वारे २००२ पूर्वीच्या प्रॉपर्टीच्या दस्तनोंदी ऑनलाइन बघण्याची व्यवस्था नसल्याने येणारी अडचण आता दूर होणार आहे. कारण नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून १९८५ पासूनच्या प्रॉपर्टीच्या दस्त नोंदी पाहण्याची व्यवस्था केली जाणार असून, मार्च महिन्यापासून नागरिकांना याचा लाभ मिळू शकणार आहे.

नोंदणी आणि मुद्रांक विभागाने 'आय सरिता' या सॉफ्टवेअरद्वारे प्रॉपर्टीच्या दस्त नोंदी ऑनलाइन बघण्याची व्यवस्था २०११पासून सुरू केली आहे. याद्वारे २००२पासूनच्या नोंदी नागरिकांना ऑनलाइन पाहता येतात. मात्र, त्यापूर्वीच्या दस्त नोंदी पाहण्याची व्यवस्था नाही. त्यासाठी आता १९८५पासूनच्या दस्त नोंदी बघण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू झाले आहे. मार्च २०१६पासून ही सोय उपलब्ध होणार असल्याचे राज्याचे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी सांगितले.

प्रॉपर्टीचा व्यवहार करण्यापूर्वी प्रॉपर्टीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या दृष्टीने हिताचे असते. यापूर्वी मालकी हक्कात झालेले बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन नागरिकांना माहिती घ्यावी लागत होती. आता १९८५पासूनच्या दस्त नोंदी ई-सर्चद्वारे ऑनलाइन बघण्याची सुविधा होणार असल्याचे एन. रामास्वामी यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घ्यावा लागतो. त्यासाठी www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवरून ई-सर्चद्वारे ही सुविधा मिळते. प्रॉपर्टीचा क्रमांक किंवा दस्ताच्या क्रमांकावरून यापूर्वी झालेले व्यवहार शोधता येतात.

नागरिकांचे हेलपाटे वाचणार

आता १९८५ पूर्वीच्या दस्त नोंदी बघण्याची सोय होणार असल्याने नागरिकांचे हेलपाटे कमी होणार आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रॉपर्टीची दस्त नोंदणी ऑनलाइन बघता येते; तसेच ठराविक शुल्क भरून नोंदीची कागदपत्रे मिळू शकतात. आता ३० वर्षांपूर्वी झालेल्या दस्त नोंदी घरबसल्या नागरिकांना ई-सर्चद्वारे पाहता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफटीआयआय’ बैठक रद्द

$
0
0

मंत्रालयाचे सचिव हिवाळी अधिवेशनात व्यग्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) नवनियुक्त नियामक मंडळाची १८ डिसेंबर रोजीची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने जूनमध्ये एफटीआयआयच्या नियामक मंडळाची पुनर्रचना केली. त्यानंतर या मंडळातील पाच सदस्यांवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी १३९ दिवसांचा संप केला होता. दरम्यानच्या काळात या नियुक्त्या रद्द करण्याबाबत विद्यार्थी आणि सरकारमध्ये चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला. त्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एफटीआयआयला १८ डिसेंबर रोजी बैठक घेण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानुसार चौहान यांच्यासह इतर सदस्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले. चौहान यांनी या बैठकीला उपस्थित राहणार राहून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

'माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून बैठकीसाठी १८ डिसेंबर ही तारीख कळवण्यात आली होती. ती आम्ही ठरवलेली नव्हती. आता माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि इतर अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यग्र असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले,' असे संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी सांगितले. नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर बैठकीची नवी तारीख अद्याप कळवण्यात आलेली नाही. मात्र, जानेवारीमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. 'नियोजित बैठकीला उपस्थित रहाणे सर्व सदस्यांना शक्य होणार नव्हते. नवनियुक्त मंडळाची ही पहिलीच बैठक असल्याने सर्व सदस्यांनी त्याला उपस्थित राहणे अपेक्षित आहे,'' असे एका सदस्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळशीत आणखी एक गिरीशहर उभारणार

$
0
0

Dhananjay.Jadhav@timesgroup.com

पुणे : अॅम्बी व्हॅली आणि लवासापाठोपाठ मुळशी तालुक्यात आणखी तीन गिरीशहरे उभारणीच्या प्रतीक्षेत असून, तैलबैला गावात प्रस्तावित असलेल्या गिरीशहराचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. तैलबैला गावाला 'गिरीस्थान'चा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुळशी तालुक्यातील भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव, माजगाव आणि सालतर या गावांना गिरिस्थानचा दर्जा (हिल स्टेशन) यापूर्वीच देण्यात आला आहे. मात्र, तैलबैला या गावाला हा दर्जा दिलेला नव्हता. सालतर, माजगाव आणि तैलबैला या गावामध्ये गिरीशहर वसविण्याचा प्रस्ताव सॅन्टीड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राज्य सरकारला दिला होता. हा प्रस्ताव देताना त्यात तैलबैला गावाला गिरीस्थानचा दर्जा मंजूर झाला नव्हता. आता तो मंजूर झाला आहे.

गिरीशहर वसविण्यासाठी सलग चारशे हेक्टर जमिनीची (एक हजार एकर) मालकी असणे आवश्यक आहे. मुळशीतील भांबर्डे, एकोले, घुटके, बोर्पे या गावांमध्ये गिरीशहर उभारण्याचा एक प्रस्ताव अॅक्वालँड या कंपनीने दिलेले आहे. या गावात कंपनीची सुमारे सहा हजार एकर जमीन आहे. याशिवाय, महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू या कंपनीचाही मुळशीत गिरीशहर उभारण्याचा प्रस्ताव आहे. तकत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र व्हॅली व्ह्यूच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यांनीच या गिरीशहराला स्थगिती दिली आणि पुन्हा त्यांनीच स्थगिती उठविलीही. महाराष्ट्र व्हॅली व्ह्यूच्या गिरीशहराच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच मंजुरीही दिली आहे.

तैलबैला, माजगाव व सालतर गावामध्ये वनीकरण, तसेच शेती व ना-विकास क्षेत्रामधील जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. या जमिनी गिरीशहर वसविण्यास योग्य असल्याचे राज्य सरकारचे मत आहे. या गिरीशहरातून गावठाण भाग वगळण्यात आला आहे; तसेच गावठाणापासूनचे दोनशे मीटरपर्यंतचे क्षेत्र यातून वगळण्यात आले आहे. या गिरीशहर प्रकल्पातील वहिवाटीच्या रस्त्यांचे गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत. या तीन गावांमध्ये होणाऱ्या गिरीशहरासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पाटबंधारे व वन विभागाची ना-हरकत बंधनकारक करण्यात आली आहे. हा प्रकल्प मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असल्याने टाटा कंपनीचीही ना हरकत घ्यावी लागणार आहे.

नकाशे कोण मंजूर करणार ?

मुळशीत पर्यटनदृष्ट्या व एकसंघ विकासासाठी गिरीशहरे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी लवासासारख्या गिरीशहरांना विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार देण्यात आले. मात्र, ग्रामीण भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्य सरकारने नुकतीच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली. या स्थापनेनंतर पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील अन्य सर्व विशेष नियोजन प्राधिकरणांचे अधिकार संपुष्टात येतात. पीएमआरडीएच्या नव्या हद्दीत तैलबैला, सालतर, माजगाव, घुटके, एकोले ही गावे येत आहेत. या गावांतील बांधकाम नकाशे मंजूर करण्याचे अधिकार आता पीएमआरडीएकडे आले आहेत. तथापि, गिरीशहर विकसित करणाऱ्या कंपनीने प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे या गिरीशहरांचे आराखडे नेमके कोण मंजूर करणार हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ उपसूचनांची खेळी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश होण्याबाबतचे अडथळे संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबतचा प्रस्ताव मंजूर करताना त्याच्यासोबत अनेक उपसूचना मंजूर करण्याची तयारी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेससह, कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांनी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या कंपनीच्या (एसपीव्ही) अधिकारांमध्ये कपात करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या बाबतचे अहवाल अजूनही जाहीरपणे लोकांसमोर मांडत नसल्याने स्वयंसेवी संस्थांनीही त्यांच्याविरूद्ध आघाडी उघडली आहे.

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर निर्णय न घेता महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन राज्य सरकारकडे दाद मागितली होती. आयुक्तांच्या विनंतीवरून १४ डिसेंबरपूर्वी या बाबत निर्णय घेण्याचा आदेश सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे आता सोमवारी ही सभा होणार आहे. पालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे नगरसेवक दुखावले असून, आता या प्रस्तावाला विविध उपसूचना देणार असल्याचे ते सांगत आहेत. या उपसूचनांद्वारे योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कंपनीच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचा; तसेच त्यावरील लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सभागृह नेते शंकर केमसे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ; तसेच कॉँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपसूचना मांडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या उपसूचनांचे स्वरूप काय असणार याविषयी कोणीही जाहीरपणे बोलण्यास तयार नाही. मात्र, प्रस्तावावर निर्णय तर घ्यायचा; पण अंमलबजावणी मनासारखी करायची असे धोरण या उपसूचनांद्वारे राजकीय पक्ष स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुक्तांच्या विरोधात आघाडी

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील अनेक बाबी गुप्ततेच्या नावाखाली पालिका आयुक्त कुणाल कुमार दडवत असल्याचा आरोप आज विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. कुमार यांनी कंपनीच्या रचना आणि तत्त्वांची माहिती असलेले कागद सर्वसाधारण सभा सुरू असताना दिले, त्यामुळे त्याच्यावर अभ्यासच करता आला नाही असा आरोप सगळ्याच राजकीय पक्षांनी केला आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी मॅकेन्झी आणि कंपनीला पालिकेने अडीच कोटी रुपये देऊन विशेष सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. या कंपनीचा अहवाल अजून एकाही नगरसेवकाला बघायला मिळालेला नाही. हे सर्व कागदपत्र पालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यामध्ये आयुक्तांना कोणती अडचण आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पालिका आयुक्तांना विचारा प्रश्न

स्मार्ट सिटी प्रस्तावावर सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार असून, या प्रस्तावावर विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून अनेक आक्षेप घेतले जात आहे. याविषयीच्या महत्त्वाच्या प्रश्नांची यादी 'महाराष्ट्र टाइम्स'ने तयार केली आहे. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रश्नांना उत्तरे देण्याचेही मान्य केले आहे. नागरिकांना याबाबत काही आक्षेप असतील, तर त्यांनी punemata1@gmail.com या ई-मेलवर दुपारी बारा वाजेपर्यंत ते पाठविल्यास तेही आयुक्तांकडे पाठवून त्याच्यावर खुलासा घेण्याचा प्रयत्न 'मटा' करणार आहे.

आज पालिकेत

मनसेचा या प्रस्तावाला विरोध करण्याचा पुन्हा निर्धार. पालिकेच्या आस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रस्ताव असल्याची टीका

कंपनीमुळे करवाढ झाल्यास त्याला विरोध करण्याची भाजपकडून घोषणा

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उपसूचना तयार करण्याचा प्रयत्न

पुणेकरांशी बांधिलकी असल्याने त्यांच्यावर करवाढ होऊ न देण्याचा शिवसेनेचा निर्धार

सेव्ह स्मार्ट सिटी अभियानाच्या वतीने रविवारी सायंकाळी शनिवारवाड्यावर मेळावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद जोशी यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासप्रक्रियेत परिघावर फेकल्या गेलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कांसाठी दिल्लीचं तख्तही हादरवून सोडणारे, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते व संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी आज सकाळी ९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद जोशी यांच्या निधनामुळं शेतकरी चळवळीचा 'पंचप्राण' गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून त्या सोमवारी परतणार आहेत. त्यानंतरच जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी पुण्याकडे येण्याची घाई करू नये. शरद जोशींवर अंत्यसंस्कार कधी व कुठे होणार हे उद्या संध्याकाळी जाहीर केले जाईल, असं आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील-हंगरगेकर यांनी केलं आहे.

शेतकरी योद्ध्याचा प्रवास

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात १९३५ साली शरद जोशी यांचा जन्म झाला. उच्चशिक्षित आणि बुद्धिमान असलेल्या शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिकारपदांवर काम करत संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघात काम करत असताना जगातील आणि भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला. भारत सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणं व त्यामुळं भारतीय शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतूनच जोशी यांनी तडकाफडकी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले.

भारतात परततानाच शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. १९७९ साली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारी 'शेतकरी संघटना' स्थापन करून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. 'शेतमालास रास्त भाव' हा एककलमी कार्यक्रम घेऊन कांदा, उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांसाठी त्यांनी महाराष्ट्रात असंख्य आंदोलनं केली. 'शेतकरी तितका एक एक' हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं, हे त्यांचं सर्वात मोठं यश होतं. या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करवून घेतल्या. सरकारला आपली धोरणे बदलावी लागली. शेतीच्या प्रगतीसाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अभिनव समीकरणांचा देशात प्रचंड बोलबाला झाला. शेतकऱ्यांच्या दु:स्थितीचे वर्णन करण्यासाठी जोशी यांनी मांडलेली 'इंडिया विरुद्ध भारत' ही संकल्पना क्रांतिकारी ठरली. शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक 'वारकरी'चे ते संपादक व प्रमुख लेखक होते. जोशी यांनी शेतीच्या प्रश्नावर केवळ आंदोलनेच केली नाहीत, तर शेतीच्या प्रश्नांचा अभ्यास असलेली कार्यकर्त्यांची पिढी घडवली. त्यांच्या शब्दाखातर प्राण द्यायला लोक तयार होते, इतका जोशी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव होता. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक शेतकरी नेते घडले. त्यांच्या या कार्यामुळंच शेतकरी चळवळीत ते शेतकऱ्यांचे 'पंचप्राण' म्हणून ओळखले जायचे. हा 'पंचप्राण' अखेर आज निघून गेला आहे.

संघटना ते राजकारण

स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी जोशी यांनी 'स्वतंत्र भारत पक्षा'ची स्थापना (१९९४) केली. देशाची राजकीय, आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची उपाययोजना सुचविणारा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा व त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा जोशी यांनी मांडला. जुलै २००४ ते जुलै २०१० या काळात ते राज्यसभेवर खासदार होते. खासदार म्हणून त्यांनी देशभरच्या शेतकऱ्यांचा आवाज सरकारदरबारी पोहोचवला. शरद जोशी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर शेतकरी संघटनेत मतभेद झाले. जोशी यांच्या तालमीत तयार झालेल्या, पण त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळं नाराज झालेल्या अनेकांनी त्यांची साध सोडली. राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांसारख्या शेतकरी नेत्यांनी स्वत:च्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. मात्र, शरद जोशी खचले नाहीत. इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते अखेरपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत होते. राजकारणाच्या मुद्द्यावर जोशी यांना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांनी नंतर स्वत:च राजकारणाचा मार्ग धरला. आज विधिमंडळाच्या व संसदेच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हिरीरीनं भूमिका मांडणारे अनेक नेते शेतकरी संघटनेची पार्श्वभूमी असलेले आहेत, हे शरद जोशी यांचेच यश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'देशातील शेतकरी चळवळीचं नुकसान'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनामुळं महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शेतकरी चळवळीचं अपरिमित नुकसान झालं आहे,' अशा प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारी व्यवस्थेला चौकटीबाहेरचा विचार करायला लावणाऱ्या जोशी यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. शेतकरी संघटनांच्या विविध नेत्यांपासून ते राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

> शरद जोशी यांच्यासोबत आम्ही अनेक वर्ष काम केलं. नंतरच्या काळात काही कारणांमुळं आम्ही संघटनेपासून दूर गेलो असलो तरी ते आम्हाला गुरूस्थानीच होते. शेतीचं अर्थशास्त्र सोप्या भाषेत सांगून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम जोशी यांनी केलं. शेतकऱ्यांच्या जीवनात शरद जोशी यांचा प्रवेश होण्याआधी मरण आणि धोरण हे आपल्या हातात नाही अशीच शेतकऱ्यांची भावना होती. मात्र, मरण आपल्या हातात नसलं तरी सरकारची धोरण काय असतील हे आपण ठरवू शकतो, याचा विश्वास जोशींनी शेतकऱ्यांना दिला. त्यांनी घडवलेले अनेक शेतकरी अर्थतज्ज्ञाला लाजवतील अशा पद्धतीनं शेतीवर बोलू शकतात हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. त्यांच्या जाण्यामुळं चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. - राजू शेट्टी, शेतकरी संघटना

> जगातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडसारख्या देशातील प्रतिष्ठेची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढणारा आणि त्यांच्यासाठी रस्त्यावर झोपणारा हा लोकविलक्षण नेता होता. - वामनराव चटप, नेते, शेतकरी संघटना

> शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाची सद्यस्थितीत नितांत आवश्यकता होती. त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेतून केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळाला असे नव्हे; तर याच चळवळीतून गावा-खेड्यात नव्या नेतृत्वाची निर्मिती झाली. शेतकरी संघटनेतून मोठे झालेले अनेक नेते आज सर्वच राजकीय पक्षात दिसतात, ही शरद जोशींच्या चळवळीची देण आहे. - राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते. विधानसभा

> शरद जोशी यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे. शेती, शेतकरी व महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष कधीही न विसरता येण्यासारखा आहे. - एकनाथ खडसे, कृषिमंत्री

> शरद जोशी यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भाष्य करणारा कणखर आवाज हरपला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीतील अडचणी आणि शेती विकास यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या नेत्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य माणसासाठी लढा दिला. कृषी बाजारपेठांचा विकास आणि शेतीतील तंत्रज्ञान यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचे आणि कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

> शेतकऱ्यांच्या समस्यांचं अचूक निदान करून त्या सोडवण्यासाठी वास्तववादी उपाय शोधणारे नेते म्हणून शरद जोशी नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. शरद जोशींनी केलेली कोणतीही आंदोलनं तत्कालीक नव्हती. त्यामागं सखोल विचार होता. त्यामुळंच शेतकरी हक्काची चळवळ राज्याबाहेर गेली. राज्याबाहेर देशातही मान्यता लाभलेलं त्यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी विदेशातील विद्यापीठांचे विद्यार्थी महाराष्ट्रात येत इतकं त्यांचं काम सर्वदूर पोहचलं होतं. शासनानं लागू केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा सर्वार्थानं 'गो'पाळ हत्या कायदा आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

> जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेचे खासदार म्हणून काम करताना त्यांनी संसदेत शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे लावून धरली. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. त्यांचा संघर्ष आणि त्यांची जिद्द खरोखरच अजोड आहे. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या अतुलनीय नेतृत्वास विनम्र श्रद्धांजली. - अशोक चव्हाण, खासदार. प्रदेशाध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र.

> शरद जोशी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळं शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. - राधामोहन सिंह, केंद्रीय कृषिमंत्री

> शरद जोशी हे अष्टपैलू आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व होतं. शेतीच्या प्रगतीचा निश्चित असा विचार त्यांच्याकडं होता. ते द्रष्टे नेते होते - सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाड्यात भन्साळींचा पुतळा जाळला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहासाची मोडतोड करून 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची विटंबना केली आहे. 'पिंगा' व 'मल्हारी'या गाण्यांद्वारे चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी पेशव्यांचे वंशज आणि इतिहास संशोधकांना दाखवावा, अन्यथा चित्रपटगृहातील खेळ बंद पाडण्यात येतील, असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारी देण्यात आला.

प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाडा येथे चित्रपटाची निषेध सभा आयोजिण्यात आली होती. या वेळी या चित्रपटाचे दिर्ग्दशक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तो जाळण्यात आला. पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे, महेंद्रसिंह पेशवे, सत्यशील दाभाडे, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संदीप पोतनीस, आमदार मेधा कुलकर्णी, अनुराधा सहस्रबुद्धे, देवव्रत बापट, अंकित काणे, विलास तुपे, नगरसेवक मिलिंद काची, मंदार लवाटे, पराग गोखले, सुनील चौधरी, सुनील माने या वेळी उपस्थित होते.

चित्रपटात मस्तानी आणि काशीबाई एका गाण्यावर थिरकत असल्याचे दाखवले आहे. त्याकाळातील राज घराण्यातील स्त्रिया अशा प्रकारे नाचणे शक्य नाही. याबरोबरच संपूर्ण चित्रपटात मोठ्या प्रमाणात इतिहासाची आणि संस्कृतीची मोडतोड झालेली असू शकते. त्यामुळे हा चित्रपट इतिहासतज्ज्ञांना दाखवावा आणि त्यांनी सांगितलेल्या सुधारणा कराव्यात, अशी सूचना उदयसिंह पेशवे यांनी केली.




'काशीबाई आणि मस्तानी यांचे एकत्रित नाचणे मराठी जनता सहन करेल, अशा भ्रमात भन्साळींनी राहू नये. बाजीरावांच्या पराक्रमाचा इतिहास बाजूला ठेवून भलताच इतिहास लोकांच्या गळी उतरविण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी टीका मोघेंनी केली. 'ही इतिहासाच्या अस्मितेची लढाई आहे. श्रद्धास्थानांची विटंबना करण्याच्या प्रथांना वेळीच आळा घातला नाही, तर असे प्रकार अन्य महापुरुषांच्या संदर्भातही होऊ शकतील,' असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 'चित्रपटाची कथा लिहिण्यापूर्वी भन्साळींनी पेशव्यांच्या वंशजांशी संपर्क साधणे गरजेचे होते. काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या चित्रपटाला आमचा विरोध राहणार आहे,' असे महेंद्रसिंह पेशवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी विभाजनावर अद्याप अभिप्राय नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील विविध संघटनांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विभाजनाची मागणी केल्यानंतर राज्याच्या नगर विकास विभागाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीच्या अध्यक्षांकडून विभाजनाबाबत अभिप्राय मागविला आहे. त्याबाबतचे पत्र नुकतेच संबंधित यंत्रणांना प्राप्त झाले असून अद्याप त्यावर कोणीच अभिप्राय दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला चांगल्या दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण करून १९ ऑक्टोबर २००७ ला पीएमपीची स्थापन करण्यात आली. त्या वेळी या दोन्ही संस्था तोट्यात होत्या आणि त्यांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी महापालिकेकडे होती. पीएमपीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ही कंपनी सातत्याने तोटाच सहन करीत आहे. पहिल्या वर्षी असलेली २७ कोटींची वित्तीय तूट २०१४-१५ मध्ये १६७ कोटी झाली आहे.

कंपनीच्या वाढत्या तोट्यामुळे पीएमपी व्यवस्थापनासमोर अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्याचा सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकातील काही लोकप्रतिनिधींसह, पीएमटी कामगार संघाकडून पीएमपीच्या विभाजन करण्याची मागणी करण्यात येत होती. खासदार श्रीरंग बारणे, तत्कालीन आमदार विलास लांडे, आमदार भीमराव तापकीर, पीएमटी कामगार संघाचे महासचिव नरूद्दीन इनामदार यांनी पत्राद्वारे विलिनीकरण रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीच्या अध्यक्षांकडून विभाजनाबाबत तातडीने अभिप्राय मागविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगीत व्याख्येचीच प्रचिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सहेला रे,' ची गुंज... बासरीतून प्रकटलेले अद्‍भूत स्वर... बासरीच्या स्वरांवर रंगलेले तबला वादन... अभिजात गायकी आणि जोडीला कथकमधून भावभावनांचा कोलाहल. सवाईमधील हा मिलाफ 'गायन, वादन आणि नृत्य यांचा एकत्रित अविष्कार म्हणजे संगीत' या व्याख्येचाच प्रत्यय रसिकांना शनिवारी देत होता. बासरीवादनाने व नृत्याने साऱ्या आसमंतावर तृप्तीची झालर पसरली.

भीमपलासच्या जादुई स्वरांनी भारती प्रताप यांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या मैफलीला प्रारंभ केला. एकतालात 'नाद समुद्र को' या बंदिशीतून त्यांनी ख्याल विस्तार केला. झपताल, तराणा, दादरा अशा अंगाने मैफल बहरत गेली. या वेळी हार्मोनियमवर सीमा शिरोडकर, तबल्यावर डॉ. पं. विश्वनाथ शिरोडकर, तानपुऱ्यावर वैष्णवी अवधानी व कांचन लवाटे यांनी साथसंगत केली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य ही ओळखच पुरेशी असलेल्या पं. रघुनंदन पणशीकर यांनी गुरूला वंदन करत सादर केलेल्या किशोरीताईंच्याच 'सहेला रे' ने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. भाव रागाने त्यांनी गायनाला सुरुवात केली. 'पद्मनाभ नारायणा' या भजनाने भक्तिरस निर्माण केला. या वेळी हार्मोनियमवर तन्मय देवचाके, तबल्यावर प्रशांत पांडव; तर तानपुऱ्यावर रूपक उभयकर, देविका पणशीकर व सौरभ काडगावकर यांनी सुरेल साथसंगत केली.

प्रवीण घोडखिंडी यांचे बासरीवादन विशेष रंगले. मारू बिहाग रागात त्यांनी गायकी शैलीत प्रथम विलंबित एकतालात व नंतर द्रूत तीनतालात बासरीतून स्वरांची बरसात केली. प्रथम कोमल वाटणाऱ्या व नंतर एकदम काळजाला येऊन भिडणाऱ्या बासरीच्या स्वरांनी रसिक घायाळ झाले. राग बागेश्री विशेष रंगला. केवळ साथसंगत न करता ओजस अडिया यांनी तबल्यावर बासरीच्या स्वरात स्वतंत्र वादन रंगवले. तानपुऱ्यावर मोहसिन मिरजकर यांनी साथसंगत केली.

उठाण, टप्पा, तिहाई यातून व्याकुळता, विरह, आस, मिलनाचा आनंद असे विविध रस नृत्यगुरू पं. राजेंद्र गंगाणी यांच्या नृत्यातून प्रकटले. गणेशवंदना, बंदिश, गुरुवंदना यातून नृत्य रंगले. घुंगरांच्या निनादातून मेघमल्हार अवतरला. नृत्याच्या साथीला गायन विजय परिहार, सारंगी संदीप मिश्रा, बासरी सुनील अवचट, तबल्यावर अरविंद कुमार आझाद यांनी सुरेल साथसंगत केली.

वस्तूंचे भान विसरले

सवाईच्या जादुई स्वरयात्रेत रसिक इतके हरखून जात आहेत, की त्यांना आपल्या वस्तूंचेही भान राहिनासे झाले आहे. घराच्या किल्ल्या वगैरे किरकोळ वस्तू हरवणे नेहमीचे असले तरी यंदाच्या मैफलीत रसिक आपल्या गाडीच्या किल्ल्यांपासून, गॉगल, कार्ड पाऊच ते आयफोन व लॅपटॉप अशा मौल्यवान वस्तूही विसरत आहेत. या वस्तू आयोजकांना मिळाल्या आणि तशी घोषणा करण्यात आली म्हणून ठीक नाही तर सवाईची मैफल काही अती तल्लीन रसिकांना हजारो रुपयांमध्येच पडली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुर्वेदाचा प्रसार हिंदी, इंग्रजीत हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आयुर्वेदाचे मूळ भारतात आणि भारतातही ते महाराष्ट्रात असल्याचे जगभरात बोलले जाते. त्यामुळे आपल्याकडील आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये झाला पाहिजे,' असे मत धूतपापेश्वर या आयुर्वेदीय वस्तू उत्पादक कंपनीचे संचालक रणजित पुराणिक यांनी शनिवारी व्यक्त केले. ज्येष्ठ वैद्य य. गो. जोशी यांच्या व्याख्यानमालेच्या डीव्हीडीचे शनिवारी प्रकाशन पुराणिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. वि. वि. डोईफोडे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.

'य. गो. जोशी यांनी निस्वार्थी भावनेने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांच्या शिष्यांनाही त्यांनी हीच शिकवण दिली आहे. त्यांच्या या डीव्हीडीच्या निर्मितीसाठी रेकॉर्डिंगला ५२ तास आणि १०० तास व्हिडिओ एडिटिंगसाठी लागले. या वयातही त्यांनी चांगल्या प्रकारे हे सर्व निभावले. त्यांच्या संपूर्ण टीमने यामध्ये चांगले काम केले. मात्र, त्यांची ही डीव्हीडी मराठी भाषेतच आहे. त्यामुळे येत्या काळात हिंदी व इंग्रजी भाषेतही निर्माण केली पाहिजे, म्हणजे अधिक लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचेल,' असे पुराणिक म्हणाले. 'कालसुसंग आधुनिक माध्यमाद्वारे जोशींच्या आयुर्वेदीय ज्ञानाचा सागर अभ्यासकांना उपलब्ध झाला आहे. याचप्रकारे आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अन्य दिग्गजांच्या ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे,' असे मत डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केले.

'आयुर्वेदाची मला असलेली माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली, तर अनेकांना फायदा होईल या भावनेतून हा प्रकल्प करण्यात आला. या वयात हे शक्य होईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे शक्य झाले,' असे जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूठभर नागरिकांच्या हितासाठीच ‘स्मार्ट सिटी’चा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका कायद्यातील ४४८ कलमाचा चुकीचा वापर करून लोकप्रतिनिधींना बदनाम आणि ब्लॅकमेल करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मान्य करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शहरातील विविध संस्था, संघटनांनी केला आहे. या प्रस्तावाला कोणत्याही परिस्थितीत पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता देऊ नये, यासाठी स्मार्ट सिटीला विरोध करण्याचा निर्णय या संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'पुणे शहर बचाव समिती'च्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संस्था, संघटना, पक्ष तसेच शहर नियोजनातील तज्ज्ञ, पर्यावरणवादी, यांनी स्मार्ट सिटीला विरोध करण्यासाठी एकत्र येत 'पुणे शहर बचाव समिती'ची स्थापना केली आहे. या समितीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत शहरावर स्मार्ट सिटी योजना लादणाऱ्यांना विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, महाराष्ट्र कामगार मंचाचे दिलीप मोहीते, परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन, शहर नियोजन तज्ज्ञ अनिता गोखले बेनिंजर, कागद, काच पत्रा पंचायतीचे विष्णू श्रीमंगले, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे उपाध्यक्ष अॅड. म. वि. अकोलकर, पालिकेतील आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारीप बहुजन महासंघाच्या अॅड. वैशाली चांदणे, सीटूचे वसंत पवार, युवा भारतीचे भूषण पवार, आरपीआय विद्यार्थी परिषदेचे सतीश गायकवाड, एसएफआयचे विलास साबळे यांच्यासह अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औंध, बाणेर भागातील फक्त ४० हजार लोकसंख्येसाठी २,८०० कोटी; तर उर्वरित ३४ लाख नागरिकांसाठी केवळ ७८० कोटी रुपये खर्च करण्याची स्मार्ट सिटी ही भयानक योजना आहे. अभ्यास करण्यासाठी कोणताही पुरेसा वेळ न देता शहरात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्याचे सर्व कायदेशीर अधिकार एका कंपनीला देण्यात येत आहेत. लोकशाही अधिकाराचा वापर करून नगरसेवकांनी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला असता महापालिका कायद्यातील ४४८ कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून राज्य सरकार प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना बदनाम आणि ब्लॅकमेल करत आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली. शहराला आवश्यक पायाभूत गरजांकडे कानाडोळा करीत परदेशी खासगी विकसक, बिल्डर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या यांच्या हितसंबंधासाठी घटनेमधील ७४ व्या घटनादुरुस्तीने पालिकेला दिलेले अधिकार जबाबदाऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक कायदा, शहर नियोजन कायदा यातील तरतुदींना पायदळी तुडविण्यात येत असल्याची टीका या वेळी करण्यात आली.

'प्रस्ताव मान्य करू नये'

पालिकेच्या मुख्य सभेने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मान्य करू नये, यासाठी सोमवारी (१४ डिसेंबरला) महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केले जाणार आहे. पुणे बचाव समितीत सहभागी झालेल्या संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. पालिकेतील सभासदांनी हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत मान्य करू नये, असे आवाहन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापू नायर टोळीकडून जागा बळकाविण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात बापू नायर टोळीकडून एका व्यावसायिकावर हल्ला करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संघटित गुन्हेगारी पथकाने नायर टोळीच्या एकाला अटक केली असून नायर व त्याचे साथीदार फरार झाले आहेत.

याबाबत नीलेश कुंतिलाल बोत्रा (वय ३९, रा. पाटील प्लाझा, पर्वती) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नायर टोळीतील दीपक कृष्णा कदम (रा. अप्पर इंदिरानगर) याला अटक केली आहे. तसेच, बापू नायर, अमोल बसवंत, नीलेश बसवंत या आरोपींचा शोध सुरू आहे. मार्केट यार्ड परिसरात बोत्रा यांच्या जागेवर आरोपींनी पत्र्याचे शेड टाकल्याचे आढळून आले. त्यांनी खात्री करण्यासाठी गेले असता त्यांना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून जागेची कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पोलिसाकडे तक्रार केली. संघटित गुन्हेगारी पथकाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या पथकाने बोत्रा यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या कदम याला अटक केली. तर, त्याचे इतर साथीदार पळून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकवडे यांच्या खुनानंतर १० जानेवारीला पोटनिवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खुनानंतर रिक्त झालेल्या काळभोर नगर (२६ अ) प्रभागासाठी येत्या १० जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, ११ जानेवारीला मतमोजणी होणार असून, या प्रभागात बुधवारी (९ डिसेंबर) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होत आहे.

नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोहन नगर येथील राहत्या घराच्या इमारतीत डोळ्यात मिरचीपूड टाकून खून करण्यात आला होता. या रिक्त जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पिंपरी-चिंचवडसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नगर या महापालिकांमध्येही रिक्त जागांसाठी एकाच दिवशी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव ध. मा. कानडे यांनी बुधवारी जाहीर केला.

या पोटनिवडणुकासाठी १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज दिले जातील. अर्ज स्वीकृतीसाठी २२ डिसेंबरपर्यंत असून, अखेरची मुदत सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज छाननी करण्यात येणार असून, छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

२८ डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंतची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे; तर ३० डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येतील. याच दिवशी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

निवडणुकीसाठी १० जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी ११ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे. १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध केला जाईल. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांचा वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे. मोहन नगर प्रभागापुरतीच ही आचारसंहिता मर्यादीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग पर्यटन’ वाढवणार पर्यटन विकासासह रोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटन क्षेत्रातील आर्थिक संधी, रोजगार निर्मितीची क्षमता, वनांमध्ये वस्ती असलेल्या आदिवासींचा उदरनिर्वाह आणि निसर्ग शिक्षणाच्या संतुलित अंमलबजावणीसाठी 'महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ' स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या मुख्यालय नागपूर येथे राहणार आहे. राज्यातील वन, वन्यजीव व वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन व नियोजन करण्याचे काम कार्यकारी समिती करणार आहे. याशिवाय, निसर्ग पर्यटन स्थळांची प्रसिद्धी आणि प्रचार करण्याच्या दृष्टी कार्यक्रम आखण्याची जबाबदारी या मंडळावर असणार आहे. निसर्ग पर्यटन विषयासंबंधी शासकीय धोरणे, कायदा न कार्यपद्धती सुसंगत करण्यास ही कार्यकारी समिती शासनाला प्रस्ताव सादर करू शकणार आहे.

इतकेच नव्हे तर निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व भागिदारांच्या संबंधांचे बळकटीकरण तसेच नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर व शाश्वत व्यवस्थापन होण्यासाठी नियमन करण्याचे काम कार्यकारी समिती करणार आहे. निसर्ग पर्यटनस्थळांची निवड व तेथे सर्वप्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही या समितीवर सोपविण्यात आले आहे.

राज्यात सद्यस्थितीत ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने, चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशी ५८ नव्यजीव संरक्षण क्षेत्रे आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, बोर ‍‍व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड, कर्नाळा अभयारण्य, फणसाड, राधानगरी टिपेश्वर यासारखी अभयारण्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तर दर वर्षी आठ ते दहा लाख पर्यटक येतात. या वनक्षेत्रांमध्ये वनांना धक्का न लावता रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या क्षेत्रातील आर्थिक संधी, रोजगार निर्मितीची क्षमता, स्थानिकांच्या उपजिविकेच्या संधी वाढविण्याची क्षमता यामुळे हे पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअरसाठी लष्कर सेवेला प्राधान्य हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लष्करातही चांगले करिअर होऊ शकते. त्यामुळे हुशार आणि बुद्धिमान युवक-युवतींनी करिअर म्हणून लष्करातील सेवेच्या करिअरचा प्राधान्याने विचार करावा', असे आवाहन एअर मार्शल ए. एस. कर्णिक (निवृत्त) यांनी नुकतेच केले.

जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन संकलनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सैनिक कल्याण विभागाच्या महासैनिक लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमाला सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर (निवृत्त), लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त), कमोडोर हरिश बात्रा, मेजर जनरल शिशिर महाजन (नि), ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि), ब्रिगेडियर अनुराग भसीन, उपविभागीय अधिकारी सोनाप्पा यमगर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल बिपीन शिंदे (नि) आदी उपस्थित होते.

'लष्करातील करिअरच्या माध्यमातून देश सेवा करण्याची प्रचंड मोठी संधी आहे. लष्कराच्या तीनही दलात अधिकारीपदाबरोबरच इतरही अनेक संधी आहेत. आपल्या राज्यातून लष्करात भरती होण्याची परंपरा आहे. पण, अलीकडे थोडा बदल झाल्याचे जाणवते. आपली लष्करी सेवेची परंपरा कायम राखण्यासाठी लष्करातील सेवेला प्रथम प्राधान्याचा विचार करायला हवा', असे आवाहन कर्णिक यांनी केले.

जतकर यांनी निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी सैनिक कल्याण विभाग करत असलेल्या कार्याची माहिती दिली. विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ध्वज दिन संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध शासकीय कार्यालयांच्या प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सतार, सरोद, सारंगीवादनाची आज अनुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
६३ व्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'चा आज, रविवारी (दि. १३) सांगतेचा दिवस. मालिनी राजूरकर, शुभा मुद्गल आणि डॉ. प्रभा अत्रे या तीन गायिकांसह ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या सादरीकरणाविषयीही रसिकांच्या मनात कमालीचे कुतूहल आहे. विविध घराण्यांतील गायकांच्या एकल सादरीकरणासह सतार- सरोदचे सहसादरीकरण आणि सारंगी वादन आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरेल.
..
शौनक अभिषेकी (गायन)
संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करणारे गायक- संगीतकार अशी ज्यांची ओळख आहे, त्या पं. जितेंद्र अभिषेकी यांचा मुलगा म्हणजे शौनक अभिषेकी. खरेतर इतक्या मोठ्या कलावंताच्या कलेचे आणि सांगीतिक कारकिर्दीचे ओझे खांद्यावर घेऊन जगताना स्वतंत्र ओळख मिळवणे ही अतिशय हिमतीची आणि धैर्याची गोष्ट आहे. नेमकी तीच शौनक यांनी केली आहे आणि आजच्या घडीला आग्रा आणि जयपूर घराण्यातील गायन शिक्षणातून स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणारे मखमली आवाजाचे गायक म्हणून ते ओळखले जातात. जयपूर घराण्याच्या गायिका कमला टेंबे आणि वडील अभिषेकीबुवा यांच्याकडे शिकताना शौनक यांनी तंत्र आणि भावपूर्ण गायकीचा नेमका मिलाफ साधला आहे. बालगंधर्व पुरस्कार, सरस्वतीबाई राणे पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांचे मानकरी असलेल्या शौनक यांनी देशविदेशात सादरीकरण केले आहे. दाणेदार ताना, नेमक्या ठिकाणी कठोर आणि तितक्याच लवचिकतेने मृदू होणारी शौनक यांची गायकी महोत्सवाच्या चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात ऐकायला मिळणार आहे.
..
धृव घोष (सारंगी)
सारंगी या वाद्याला रसिकांच्या हृदयात नव्याने मानाचे स्थान मिळवून देणारे वादक म्हणून पं. धृव घोष यांच्याकडे पाहिले जाते. प्रख्यात तबलावादक असलेले वडील पंडित निखिल घोष यांच्यामुळे घोष यांना घरातच सांगीतिक वातावरण लाभले. सरोद आणि गायन शिक्षणाकडे सुरुवातीला वळलेल्या घोष यांनी नंतर सारंगी वादनात नैपुण्य मिळवले. त्यांचे सारंगी वादन अतिशय मोहक ठरते, ते गायकी आणि तत्कारी अंगांच्या मिलाफामुळे...सारंगी शिकणारे अधिकाधिक तरुण कलाकार तयार व्हावेत, या साठी ग्रॅमी अॅवॉर्ड आणि संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड विजेत्या या कलाकाराचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळच्या सत्रातील या एकमेव वादनाविष्काराविषयी रसिकांना विशेष उत्सुकता आहे.
..
मालिनी राजूरकर (गायन)
गोविंदराव राजूरकर आणि वसंतराव राजूरकर यांच्याकडून गायनाचे धडे गिरवलेल्या मालिनी राजूरकर या त्यांच्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहेत. गायक कृष्ण गुंडोपंत गिंडे, पं. जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांच्या गायकीचा जबरदस्त प्रभाव मालिनीताईंच्या गायनावर दिसतो; तरीही त्या पूर्णपणे ग्वाल्हेर घराण्याची गायकी सादर करत नाहीत. १९६४ सालापासून सुरू झालेल्या मैफलीतील गायनानंतर आजही, वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील त्यांचे देशविदेश दौरे सुरूच आहेत. हैदराबादमध्ये स्थायिक झालेल्या मालिनीताई किराणा घराण्याच्या ठायीतील सादरीकरणाप्रमाणे ख्याल पेश करतात. टप्पा ऐकावा, तर त्यांच्याचकडून.. वेगवान स्वरसमूहांचा आविष्कार अतिशय लीलया करण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. मालिनीताईंच्याच गायनाने 'सवाई'च्या सकाळच्या सत्राची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना मिळणार साने गुरुजी पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवी स्थापना वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाला शिक्षणाशी जोडणाऱ्या शिक्षकांना या वर्षापासून 'साने गुरुजी समाजशिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार' दिला जाणार आहे. राज्याच्या ३६ जिल्ह्यातील ५२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष राजा अवसक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, मुंबई येथील दत्ता आणि आशा गांधी या सेवानिवृत्त शिक्षण दाम्पत्याचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

दांडेकर पूल येथील साने गुरुजी स्मारक येथे २४ डिसेंबरला पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, अभिनेते संदीप कुलकर्णी, शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अनिल सदगोपाल यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या वेळी 'समतेसाठी शिक्षण' या विषयावर डॉ. विवेक सावंत, प्रा. शरद जावडेकर, जे. यु. नाना ठाकरे आदी विचार मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा योद्धा हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, 'शेतकरी तितुका एक एक' असे म्हणून असंघटित शेतकऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडणारे, शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार शरद जोशी (वय ८१) या योद्धा शेतकऱ्याची शनिवारी सकाळी पुण्यात प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जोशी यांचे पार्थिव पूना हॉस्पिटलमधील शवागरात ठेवण्यात आले आहे. जोशी यांना दोन मुली असून त्यातील श्रेया शहाणे या कॅनडात तर डॉ गौरी जोशी या अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहतात. या दोन्ही मुली सोमवारी पुण्यात दाखल होतील. परदेशातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतलेले जोशी शेतकऱ्यांसाठी 'सूर्य' ठरले होते. शेतकऱ्यांसाठी 'कर्जमुक्ती'चा आवाज देणाऱ्या जोशी यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात विविध आंदोलने उभी करून सरकारला खडबडून जागे केले होते. जोशींवर गेली महिनाभर खासगी रुग्णालायात उपचार सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञानभारतीची गिनीज बुकात नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच वेळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगासाठी विज्ञानभारतीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल झाले आहे. यापूर्वी झालेल्या अशा प्रयोगात १,३३९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. हा विक्रम मोडून काढत विज्ञानभारतीने गिनीज बुकात स्थान पटकावले आहे.

विज्ञानभारती, आयआयटी दिल्ली आणि केंद्र सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल आणि यंग इंडिया इंटरनॅशनल सायन्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. चार ते आठ डिसेंबर दरम्यान आयोजित या कार्यक्रमात ४० शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी एकाचवेळी केमिस्ट्रीमधील दोन प्रयोग केले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. या प्रयोगामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या उपक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी निवड झाल्याची अधिकृत घोषणा शनिवारी, १२ डिसेंबर रोजी करण्यात आली, अशी माहिती विज्ञानभारतीचे डॉ. के. के. क्षीरसागर यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थर्टी फर्स्ट पार्टी’वर करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर करमणूक कर विभागाची करडी नजर राहणार आहे. प्रवेश कर लावून मनोरंजनात्मक कार्यक्रम करणाऱ्या हॉटेलचालकांनी कर न भरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 'थर्टी फर्स्ट'ला महसूल खात्याची भरारी पथके अचनाक परवाने तपासणी करणार आहेत.
नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेल्ससह मोटेल्स, पब्जमध्ये पार्ट्यांची तयारी सुरू झाली. थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी हॉटेल, मोटेल, पब्जकडून प्रवेश कर घेण्यात येतो. अशा प्रवेश कर आकारणाऱ्या आयोजकांनी त्याची परवानगी घेऊन करमणूक कर भरणे आवश्यक आहे.
नववर्ष स्वागत पार्ट्यांसाठी प्रवेश कराच्या वीस टक्के रक्कम ही करमणूक कर म्हणून आकारली जाते. हा कर भरल्यानंतर संबंधित हॉटेल्सला कार्यक्रमांना परवानगी देण्यात येते. मात्र, करमणूक कर न भरता पार्टी आयोजित केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले. या करमणूक कराविषयी माहिती देण्यासाठी शहरातील सर्व हॉटेलचालकांची बैठक पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलिवण्यात येणार आहे. या बैठकीत नववर्ष स्वागत पार्ट्यांसाठी परवानगी तसेच कर भरण्याविषयी हॉटेलचालकांना माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
थर्टी फर्स्टला रात्री बारावाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते. तसेच, इनहाउस मद्य पार्ट्यांना गृह खात्यामार्फत पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात येते. यंदाच्या परवानगीबाबत कोणतीही सूचना अद्याप गृह खात्याने काढलेली नाही. यासंदर्भातील आदेश पुढील आठवड्यात काढले जाण्याची शक्यता आहे.
...

करमणूक कर न भरता आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करण्यासाठी यंदाही भरारी पथके स्थापन केली जाणार आहेत. प्रांत अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारांचा समावेश असलेली ही पथके रात्रभर हॉटेलची तपासणी करणार आहेत. त्यात कर न भरलेल्या पार्टीचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

- मोहिनी चव्हाण, करमणूक कर अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images