Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील कॉलेजला उपसंचालकांची नोटीस

$
0
0

बेकायदा शुल्कवसुली भोवली; १० डिसेंबरपर्यंत मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या प्रवेशांदरम्यान बेकायदा पद्धतीने शुल्क गोळा केल्याबद्दल पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजला नोटीस बजावली आहे. अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकडीमध्ये प्रवेश घ्यायला लावणे, पालकांच्या नावाने देणग्या वसूल करणे आदी गैरप्रकारांबद्दल कॉलेजच्या वेतनेतर अनुदानातून एक वर्षासाठी ५० टक्के कपात करण्याची कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सुशांत कुटे आणि स्वप्नील माळवे या कार्यकर्त्यांनी संबंधित कॉलेजविरोधात उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी हरून आतार आणि संबंधित गटशिक्षण अधिकारी अर्जुन मिसाळ यांना कॉलेजची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या दोघांनीही ही कारवाई न केल्याने कुटे आणि माळवे यांनी पुन्हा उपसंचालकांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्याची दखल घेतऊन उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या कॉलेजची चौकशी केली असता, कॉलेजविषयीच्या तक्रारींमध्ये तथ्थ आढळून आले. त्यानंतरच कॉलेजला नोटीस बजावण्यात आली.

या विषयी जाधव म्हणाले, 'कार्यालयाने केलेल्या तपासणीमध्ये कॉलेजने बेकायदा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याचे आढळून आले. अनुदानित आणि विनाअनुदानित वर्गांसाठीचे शुल्क निश्चित करताना पालक-शिक्षक संघाची स्थापना करून शुल्कनिश्चिती करणे गरजेचे असताना, तसे न करता वाढ केली. त्यामुळे ही फी वाढ बेकायदा ठरते. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रवेशापोटी त्यांच्या पालकांच्या नावाने देणग्या घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच कॉलेजला नोटीस पाठविण्यात आली.' या बाबत कॉलेजकडून खुलासा मागविण्यात आला असून, १० डिसेंबरपर्यंत खुलासा न मिळाल्यास, एक वर्षासाठी कॉलेजच्या वेतनेतर अनुदानात ५० टक्के कपात लावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कॉलेजने आरक्षणाच्या नियमांनुसार २१ विद्यार्थी विनाअनुदानित तुकडीमधून अनुदानित वर्गात वर्ग करून, संबंधित विद्यार्थ्यांकडून विनाअनुदानित वर्गाचे घेतलेले शुल्क परत करावे, पालकांकडून घेतलेली देणगीची रक्कम तातडीने परत करावी, कायदेशीर पद्धतीने कॉलेजचे शुल्क ठरवावे, विनाअनुदानित तुकडीमधील विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीमध्ये नियमानुसार आणि गुणवत्तेच्या निकषांचे पालन करून प्रवेश द्यावेत आणि त्यानंतर विनाअनुदानित तुकडीचे प्रवेश करावेत असे निर्देशही दिल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

पालथ्या घड्यावर पाणी

उपसंचालक जाधव यांच्या आदेशानंतरही आतार आणि मिसाळ यांनी संबंधित कॉलेजची चौकशी न करता, कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचेही या निमित्तानेच समोर आले आहे. पुण्यातील एका शाळेवरील कारवाईच्या संदर्भानेही आतार यांनी कामात टाळाटाळ केल्याचे यापूर्वीच दिसून आले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या पाठपुराव्यालाही हे अधिकारी जुमानत नसल्याची बाब त्यावेळी 'मटा' उघड केली होती. त्यानंतरही या अधिकाऱ्यांमध्ये सुधारणा झाली नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॅरेथॉनची तारीख बदलण्याची सूचना

$
0
0

शक्य नसल्याचा आयोजकांचा पवित्रा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या रविवारी (६ डिसेंबर) पुणे मॅरेथॉन होत असून, अवघे दोन दिवस आधीच पुणे पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. या दिवशी बंदोबस्त पुरवणे अडचणीचे ठरत असल्याने आयोज​कांनी तारीख बदलून पोलिसांची परवानगी घ्यावी, अशी सूचना पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी केली. तर, परदेशातून येणारे अनेक खेळाडू पुण्यात दाखल झाले असल्याने तारीख बदलणे शक्य नसल्याचा पवित्रा आयोजकांनी घेतला आहे. तसेच, त्यावर आज, शनिवारी दिवसभरात तोडगा निघेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

पुणे मॅरेथॉन आयोजित करताना पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ६ डिसेंबर ही तारीख निवडण्यात आली आहे. मात्र, या दिवशी पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असल्यामुळे तारीख बदलावी, असा सल्ला रामानंद यांनी मॅरेथॉन आयोजन समिताला दिला आहे. तसेच, मागील दोन वर्षाची बंदोबस्ताची ३८ लाख रुपयांची थकबाकी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पुण्यात सहा डिसेंबर रोजी पुणे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबत, पोलिसांकडे बंदोबस्त पुरविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत रामानंद म्हणाले, 'मॅरेथॉनचे आयोजन करताना पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. पत्र पाठवून परवानगीची मागणी करण्यात आली आहे. सहा डिसेंबर रोजी पोलिसांवर अगोदरच बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे, आयोजन समितीला तारीख बदलण्याची सूचना केली आहे.' मागील दोन वर्षांपासून बंदोबस्ताची थकबाकी असलेले ३८ लाख रुपये देण्याचे सांगण्यात आले आहे. ही थकबाकी देण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती.

मॅरेथॉन दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येते. सहा डिसेंबर रोजी पहिला रविवार येत असल्याने मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. सर्व खेळाडू पुण्यात आले असून, स्पर्धेचे नियोजन पूर्ण झाले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी शनिवारी चर्चा केली जाईल. २०१३ पासून मॅरेथॉनला दिलेल्या बंदोबस्ताचे पैसेच आकारू नयेत, अशी आमची मागणी आहे.' - अॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष, महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ प्रवेशांसाठीही सीईटी

$
0
0

राज्य सरकारतर्फे आदेश जारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विधी विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे अर्थात 'सीईटी'द्वारे होणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भात शुक्रवारी शासन आदेश जारी केला.

आतापर्यंत सर्वसाधारणपणे सर्व लॉ कॉलेजांमध्ये बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीच्या गुणांवर, तर पदवीनंतरच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश पदवीच्या गुणांवर होत होते. 'येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) मात्र राज्यातील शासकीय/ अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित विधी पदवी अभ्यासक्रमांना आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा यांच्यामार्फत केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे एक खिडकी पद्धतीने प्रवेश देण्यात येतील,' असे सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशानुसार, पदवीनंतरचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम; तसेच बारावीनंतरच्या पाच वर्षांचा अभ्यासक्रम अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आता विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. शासन आदेशात नमूद केल्यानुसार, 'राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या अनुक्रमानुसार केंद्रीय प्रवेशप्रक्रियेसाठीची गुणवत्ता यादी तायर करून त्यानुसार विधी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहेत.'

प्रवेश शुल्क व त्यांचे विनियमन अधिनियम, २०१५नुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विधी पदवी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या अधिनियमामध्ये खासगी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांच्या नियमनाची तरतूद करण्यात आली असल्याने खासगी विनाअनुदानित अभ्यासक्रमांबरोबरच शासकीय व अनुदानित कॉलेजांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी एक खिडकी पद्धतीने एकच प्रवेशप्रक्रिया राबवून विधी अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्याच्या 'सीईटी'द्वारे करण्याबाबत राज्याचा विचार सुरू होता. त्यावर या शासन निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यात सध्या प्रत्येक लॉ कॉलेजची प्रवेशप्रक्रिया वेगळी आहे. बहुतेक कॉलेजांत गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश दिले जातात.

आमच्याकडे सायन्स, कॉमर्स, आर्ट‍्स या तिन्ही शाखांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाखानिहाय गुणवत्ता यादी तयार होते. आता सीईटीनुसार प्रवेश दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण, त्यांनी दिलेले कॉलेजांचे प्राधान्यक्रम अशा सर्वच बाबींचा विचार होईल. त्याचे तपशील जाहीर झाल्यानंतरच प्रक्रियेबाबतचे चित्र स्पष्ट होईल. - डॉ. वैजयंती जोशी, प्राचार्या, आयएलएस लॉ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ व्यापाऱ्यांना दक्षतेच्या सूचना

$
0
0

पिंपरी-चिंचवड परिसरात दरोड्यांची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील सराफ पेढींवर सशस्त्र दरोडा पडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सराफ व्यापाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिस उपायुक्तांनी सर्व गुन्हे शोध पथकांना सराफ पेढींच्या बाहेर घुटमळणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश दिले आहेत. काही गुन्हेगारांच्या चौकशीतच संभाव्या दरोड्यांची माहिती उजेडात आली आहे.

दिवाळीसाठी पैसे नसल्याने मध्यंतरी थेरगाव येथे चार जणांनी सराफ पेढीवर सशस्त्र दरोडा टाकला होता. या वेळी सिगारेट लायटरच्या धाकाने आणि हत्याराने मारहाण करीत दागिन्यांची लूट केली होती. या आरोपींना पोलिसांनी अटक केली. तेव्हा ते रिक्षा चालक असल्याचे तसेच दिवाळीसाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, या घटनेच्या तपासादरम्यान काही सराईत गुन्हेगारांच्या मागावर देखील पोलिस होते; पण त्यापूर्वी तपास लागल्याने या आरोपींकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, नुकतेच यातील काही गुन्हेगारांना पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडून शहरातील सराफ पेढींवर काही गुन्हेगार सशस्त्र दरोडा टाकला जाणार असल्याची माहिती उजेडात आली.

खबऱ्यांनी देखील याबाबत पोलिसांना सुचित केले असून, त्यामुळे सर्वांना सतर्क करण्यात येत आहे. सध्या सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी विशेष मोहिम पोलिसांनी राबविली. त्यामुळे या घटनातुलनेने कमी झाल्या आहेत. मात्र, वरील माहिती मिळाल्याने सराईतांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. उच्चपदस्य अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह उपायुक्त-सहाय्यक आयुक्तांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांना (डीबी) सराफ पेढींबाहेर घुटमळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच हद्दीतील सराईतांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी फौजदारांना अधिकाऱ्यांनी कामाला लावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी हताशपणा सोडावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'प्रतिकूल परिस्थितीत उभे राहून पुन्हा विजयश्री खेचून आणण्याची ऊर्जा ही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांनी हताश झाल्याची भावना सोडली पाहिजे. काँग्रेसची भूमिका, मूल्ये समाजामध्ये समर्थपणे मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची फ‍ळी निर्माण करण्यास सज्ज व्हा,' असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी यांच्यातर्फे सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद् घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार उल्हास पवार, चंद्रकांत छाजेड, आबा बागूल, चंद्रशेखर कपोते आणि मोहन जोशी उपस्थित होते. 'आ​णीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी वादळ उभे केले. त्यानंतर देशात काँग्रेसची पिछेहाट झाली होती. त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे २२ खासदार निवडून आले होते. सध्या लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नांसाठी उभे राहतात, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची तयारी ठेवली पाहिजे,' असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.

'कार्यकर्ता लोकप्रिय झाला पाहिजे'

काँग्रेसची भूमिका कोण समर्थपणे समाजात मांडू शकतो, असा कार्यकर्त्यांची गरज आहे. कोणाकडे किती कार्यकर्ते आहे, याचे महत्त्व आता कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये ३२ सभा घेतल्या. लाखोंच्या संख्येने नागरिकांनी सभेला गर्दी केली. मात्र, आमदार निवडून आले नाहीत. वास्तवाशी जुळवून घेऊन काम केले पाहिजे. शहरात दररोज विविध घटना घडतात, या घटनांना आपण कसा प्रतिसाद देतो, यावर आपली प्रतिमा निर्माण होणार आहे. या काळात नेता नव्हे तर कार्यकर्ता लोकप्रिय झाला पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.

'तूरडाळीत महाघोटाळा'

तूरडाळ घोटाळा हा दोन नाही, तर चार हजार कोटींचा आहे. या संदर्भातील कागदपत्रे मिळाली असून येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार आहे. या घोटाळ्यात मंत्र्यांचे हात अडकले आहेत. नियंत्रित साठ्यावरील निर्बंध उठवून साठेबाजीला परवानगी देण्यात आल्याचीही टीका विखे पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांवरील खटले घेणार मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांविरूद्ध प्रलंबित असलेले राजकीय खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील १४ जणांविरूद्धचे खटले मागे घेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. मात्र, चार जणांविरूद्धचे खटले मागे घेण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राजकीय खटले मागे घेण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात १८ जणांविरूद्ध राजकीय खटले प्रलंबित आहेत. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यापैकी १४ जणांचे खटले मागे घेण्याची शिफारस करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, चार खटले गंभीर स्वरुपाचे असल्याने ते मागे घेण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याकडून नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात. हे खटले अनेक वर्षे प्रलंबित राहतात. राज्य सरकारने एक नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे प्रलंबित राजकीय खटले मागे घेण्याचा निर्णय १३ जानेवारी २०१५ रोजी घेतला आहे. मात्र, जीवितहानी न झालेले; तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले नसलेलेच खटले मागे घेतले जाणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
राज्य सरकारकडे खटले मागे घेण्याची शिफारस करण्यापूर्वी किती रुपयांची आर्थिक हानी झाली आहे, याची माहिती संबंधितांना कळविली जाणार आहे. त्या रकमेचा भरणा करण्याबाबत त्यांच्याकडून लेखी हमी घेतली जाणार आहे. रक्कम भरल्यानंतर खटला मागे घेण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या खुनाचा कट

$
0
0

वाल्हेकरवाडी दरोडा प्रकरणाला वेगळे वळण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथे दोन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पतीच्या असह्य छळाला कंटाळून पत्नीने मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी प्रियकराने वाहनचालकाला एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. हा दरोड्याचा बनाव उघडकीस आणून हल्ला करणारे दोघे व मुलीची आई यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा प्रियकर अद्याप फरारी असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनीषा मधुकर पाटील (वय ३८, रा. रजनीगंधा हौ. सोसा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), कुशल दीपक घस्ते (वय २७, रा. सर्वोदय रेसिडेन्सी, जगताप डेअरीजवळ, वाकड) आणि तेजस जगन्नाथ घाडगे (वय २८, रा. सौंदर्या कॉलनी, काळेवाड फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत मधुकर दाजी पाटील (४६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निलेश भराडिया अद्याप फरारी आहे.

निलेश हा पाटील यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहण्यास होता. त्याचे आणि पाटील यांच्या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू झाले. त्याची माहिती पाटील यांना झाल्यामुळे त्यांनी १ एप्रिल २०१५ पासून निलेशला भाड्याने दिलेली खोली रिकामी करण्यास सांगितले; तसेच वाल्हेकरवाडी परिसरात पुन्हा दिसल्यास आणि मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू ठेवल्यास पाहून घेईल, अशी धमकी दिली होती. मुलीच्या प्रेमप्रकरणावरून पाटील सर्व कुटुंबावर संशय घेऊन त्यांना मानसिक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला मनीषा कंटाळली होती. तिने निलेशशी संगनमत करून पतीचा काटा काढण्याचा कट रचला. निलेश याने पाटील यांचा काटा काढण्यासाठी त्याच्या ओळखीच्या कुशल आणि तेजस यांना एक लाख रुपयाची सुपारी दिली. त्यानंतर दरोड्याचा बनाव रचण्यात आला. पाटील यांना कामावरून घरी येण्यास रात्रीचे बारा वाजत होते. ३० नोव्हेंबरला रात्री पाटील घरी येण्यापूर्वीच मनीषा ही तिच्या मुलीला आणि मुलांना घेऊन घराला कडी लावून बाहेर पडली. कुशल आणि तेजस घराजवळ दबा धरून बसले. पाटील रात्री पावणे बाराला घरी आले असता तेजस त्यांच्या घरात गेला. त्याने पाटील यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर कुशलनेदेखील त्यांच्यावर वार केले. घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच झोन तीनचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली व गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, मोहन विधाते यांनी गुन्ह्याचा शोध सुरू केला. दरोडा प्रतिबंधक विभाग व युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या पथकाने परिसरातून माहिती काढण्याचे काम सुरू केले. पोलिस कर्मचारी किरण लांडगे यांना हल्लेखोर कुशल आणि तेजस यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला. या घटनेत मुख्य आरोपी निलेश याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना कोर्टाने ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कपड्याच्या घड्यांवरून आला संशय

एखाद्या ठिकाणी दरोडा पडल्यानंतर आरोपी कपडे कशा पद्धतीने विस्कटतात याची माहिती पोलिसांना होती. मधुकर पाटील यांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या; पण घरात कपड्यांच्या घड्या विस्कटलेल्या नव्हत्या. त्यावरून काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तपास केल्यानंतर दरोड्याचा बनाव रचल्याचे समोर आले, अशी माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

डान्स बारमध्ये पैशाची उधळण

हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निलेश याने मधुकर पाटील यांचा काटा काढण्यासाठी कुशल आणि तेजस यांना एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. पाटील यांच्यावर खुनी हल्ला केल्यानंतर निलेशने त्यांना पैसे दिले. मिळालेल्या पैशापैकी काही रक्कम आरोपींनी मुंबई येथील मीरा रोडवरील एका डान्सबारमध्ये उघडविल्याचे समोर आले आहे. या रकमेपैकी ३५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी कुशल घस्ते हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरात अडकलेल्यांना परत आणणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चेन्नईमधील आयआयटीत अडकून पडलेल्या, राज्यातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी सकाळी हे विद्यार्थी बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत.

पुण्यातील डॉ. राजेश देशपांडे यांचा मुलगा पार्थ हा आयआयटी चेन्नईमध्ये शिकत आहे. त्याच्यासोबत पुण्यातील त्याचे इतर सात-आठ मित्रही सध्या चेन्नईच्या पुरामुळे आयआयटी कॅम्पसवरच अडकून पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने, मोबाइल फोन डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा संपर्कही तुटला आहे. पार्थने मोठ्या कष्टाने आपली ही परिस्थिती वडिलांपर्यंत पोहोचविली. डॉ. देशपांडे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना विद्यार्थ्यांची ही परिस्थिती सांगून, या विद्यार्थ्यांसाठी तातडीने मदत पाठविण्याबाबत विनंती केली. पाटील यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्याच पातळीवरून प्रयत्न सुरू झाले. हर्षवर्धन पाटील यांनी या मदतकार्याची 'मटा'ला माहिती दिली.

'मराठी विद्यार्थ्यांना तेथील कँटीनमध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली,' असे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून चर्चा केली आहे. त्यानुसार चेन्नई आयआयटीमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरूहून तीन लक्झरी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच ते राज्यातील सुखरूप परततील. या बसमधूनच आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी अन्नाची पाकिटेही पोहोचविण्याची सोय करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोड्या करणारा पोलिसांकडून अटकेत

$
0
0

पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शहरात दिवसा व रात्री घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दिगंबर गजेंद्र मांदळे (वय २२, रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सिंहगड रोडवरील सरिता नागरी परिसरात पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वायनरी’चा शेतकऱ्यांना कोटींचा गंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील वाईन उद्योजकाने बारामती तालुक्यातील २६ शेतकऱ्यांना, तर बंगलोर येथील कंपनीने बारामती- इंदापूर तालुक्यातील ९ शेतकऱ्यांना त्यांची द्राक्षे खरेदी करून तब्बल २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे . पीडित शेतकऱ्यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचे ठरविले आहे.

शेतकरी वसंतराव घनवट, रामचंद्र नाळे, सुधाकर झगडे, महादेव ठोंबरे, सतीश कोकरे, बाळासाहेब गायकवाड आदींनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन वेगवेगळ्या प्रकरणातील ही फसवणूक वायनरी द्राक्षांच्या खरेदीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील रामचंद्र नाळे यांच्यासह २६ शेतकऱ्यांनी जानेवारीत संभाजी पांडुरंग पवार यांच्या वायनरीसाठी करार करून ४७ रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षे दिली. त्यापोटी पवार यांनी निम्म्या रकमेचे धनादेश शेतकऱ्यांना दिले, मात्र ते न वटता परत आले. त्यानंतर शेतकरयांनी पवार यांची भेट घेतली. तेव्हा पूर्ण रकमेचे एकूण २६ शेतकऱ्यांना एक कोटी ६२ लाख १७ हजार १२१ रुपयांचे धनादेश दिले. मात्र तेही वटले नाहीत. आता ते टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे शेतकरयांच्या लक्षात आले. नाळे यांनी २६ द्राक्ष उत्पादकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार पलूस येथील पोलिस ठाण्यात पलूस एमआयडीसीतील कृष्णा वाईन पार्कचे संभाजी पांडूरंग पवार, श्रध्दा संभाजी पवार व मुलगा डॉ. अमेय संभाजी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या घटनेत बारामतीतील वसंतराव घनवट व इतर ९ जणांनी बंगलोर येथील वायनरीस १२९ टन द्राक्षे पुरवली. त्यापोटी कंपनीकडून ४२ लाख रुपये येणे होते. या कंपनीने त्यापूर्वी घेतलेल्या द्राक्षांचे पैसे दिले होते. मात्र, त्यानंतर कंपनीचे धनादेश परत आले. गेल्या काही दिवसांपर्यंत कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी बारामती कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. संबंधित दोन्ही कंपन्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्याची प्रेरणा टाटा समूहाकडून

$
0
0

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'सामाजिक कार्य आणि ग्रामविकासासाठी काम करण्याची प्रेरणा मला टाटा उद्योगसमूहाकडून मिळाली,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त केले.

जमशेदजी टाटा यांच्या १७६व्या जन्मदिनानिमित्त पिंपरीत 'टाटा वॉलेंटियरिंग मंथन' कार्यक्रम घेण्यात आला. त्याअंतर्गत उल्लेखनीय काम केलेल्या स्वयंसेवकांचा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कंपनीच्या पुणे प्रकल्पाचे (सीव्हीबीयू) प्रमुख संगमनाथ दिग्गे, कार प्रकल्पाचे (पीसीबीयु) प्रमुख अनुपकुमार जैन, कॉर्पोरेट सीएसआर प्रमुख व्ही. सुरेश, एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष सतीश ढमाले, सुरेश जमाले, सुरेश जासूद उपस्थित होते.

हजारे म्हणाले, 'जेव्हा १९७२ मधील दुष्काळाची झळ राळेगणसिद्धीलाही बसली होती. त्या वेळी टेल्कोचे सुमंत आणि लिलाताई मूळगांवकर दाम्पत्य गावात स्वयंसेवकांबरोबर आले. त्यांनी विहिरीची सोय करून दिली. परिसरात छोटे बंधारे बांधले. त्या माध्यमातून गावात विकासाचा पाया घातला. तेच काम आम्ही आजपर्यंत चालू ठेवले आहे. कंपनीच्या स्वयंसेवकांच्या कार्यातून मीदेखील समाजसेवेची प्रेरणा घेतली आणि काम करू लागलो. माझा गाव, समाज आणि देश हाच माझा मोठा परिवार आहे.'

उपक्रमांतर्गत कंपनीतील सुमारे साडेचार हजार पेक्षा अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चार हजार वृक्षांचे रोपण केले. याशिवाय श्रीगणेश मूर्ती दान, वृद्धाश्रमांमध्ये श्रमदान, अंध मुलींच्या शाळेत खाऊवाटप, रक्तदान शिबिर असे कार्यक्रम राबविण्यात आले. त्यातील स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. एलसीवी (एच ब्लॉक), सीएमएस, प्रोजेक्ट संकल्प, प्रेस शॉप, आरएम एण्ड कास्टिंग, वेल्ड शॉप आणि कलासागर या संघांना विशेष पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक संजय वर्मा यांनी केले. अनुराधा दास यांनी आभार मानले. योगिता आपटे आणि रोहित सरोज यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारी बँकांमधील ठेवींवरील दहा हजार रुपयांपेक्षा अधिक व्याजावर उद्गमकराची (टीडीएस) कपात करण्याचा निर्णय जून २०१५ पूर्वीच्या व्याजावर लागू होणार नाही, असे प्राप्तिकर खात्याने अखेर स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस टीडीएस कपातीबाबत हजारो ठेवीदारांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार दूर झाली आहे.

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली आहे. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार सहकारी बँकांच्या सभासदांच्या ठेवींवरील व्याजावर टीडीएस कपातीची सवलत पूर्वी मिळत होती. मात्र, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार हे बंधनकारक झाले. त्यामुळे देशातील सर्व सहकारी बँकांना मागील तीन वर्षांत त्यांच्या सभासदांना दिलेल्या दहा हजार रुपयांवरील व्याजावर टीडीएसची कपात न केल्याने प्राप्तिकर खात्याने कोट्यवधी रुपयांच्या मागणीच्या नोटिसा पाठविल्या. त्यापूर्वी बँकांनी टीडीएस व्याजातून न कापल्याने हा बोजा बँकांवरच आला होता. दरम्यान, २०१५-१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर कपातीवरील सवलत एक जून २०१५ पासून बंद झाली. मात्र, त्यापूर्वीच्या तीन वर्षांसाठी प्राप्तिकर खात्याने सुमारे एक हजार ६०० कोटी रुपयांच्या मागणी नोटिसा पाठविल्या होत्या. त्याबाबत प्राप्तिकर खात्याने स्पष्ट भूमिका न घेतल्याने त्या केसेस प्रलंबित होत्या.

याबाबत महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन आणि नॅशनल फेडरेशन यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) अध्यक्षांची भेट घेतली आणि सरकारने ही सवलत १ जून पासून रद्द केल्याने त्यापूर्वीच्या मागणी नोटिसा रद्द करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीबीडीटीने कायद्यातील सुधारणांबाबत प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरण अहवालात नागरी बँकांचे म्हणणे मान्या करत, कायद्यातील बदल एक जूनपासूनच लागू होत असल्याचे स्पष्ट केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळस, धानोरीत गुरुवारी पाणी नाही

$
0
0

पुणेः पुणे महापालिकेच्या रावेत जलउपसा केंद्र ते भक्ती चौक येथील जलवाहिनीचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे येत्या १० डिसेंबर व १७ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याने कळस, धानोरी, लोहगाव परिसराचा पाणीपुरवठा दोन्ही दिवस बंद राहणार आहे. ११ आणि १८ डिसेंबर रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : कळस (गणेशनगर), कळस (काही भाग), धानोरी (भैरवनगर परिसर), लोहगाव ग्रामपंचायत, विमानतळ आणि विमानतळ परिसराचा भाग, विमाननगरचा काही परिसर, खराडी (समर्थनगर, आपले घर), विद्यानगर (काही भाग), सर्व्हे क्र. ११२, विश्रांतवाडी, वडगावशेरी, गणेशनगर, पुण्यनगरी, सुनितानगर, मुन्नुरवार सोसायटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पुन्हा थंडीचा कडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे काही काळ पडलेल्या खंडानंतर शहरात आता पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात घट होऊ लागली आहे. पुण्यात पारा १४.८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला असून, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दहा तारखेच्या आसपास राज्याच्या काही भागात पावसाचीही शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात शहरात चांगलीच थंडी होती. राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचा अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही हवामान ढगाळ राहिल्याने तापमानात वाढ झाली होती. हळूहळू आकाश निरभ्र होऊन थंडीचा कडाकाही वाढू लागला आहे. शनिवारी पुण्यात १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमान नाशिक येथे १२.५ अंश सेल्सियस नोंदले गेले. नागपूर व गोंदिया येथे १३.१ अंश सेल्सिअस तर अहमदनगर व जळगाव येथे १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तर दहा तारखेच्या आसपास राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना पुणेकरांचा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'निसर्गाच्या कोपामुळे घरदार उद् ध्वस्त झालेल्या चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी पुणेकरांनी मदतीचा हात पुढे करावा,' असे आवाहन राष्ट्रीय एकात्मता समितीने केले आहे. समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मदत करून या उपक्रमास सुरुवात केली आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईसह तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने थैमान घातल्याने तेथे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा वेळी मदत करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, अशी भूमिका घेऊन आढाव यांनी महापौर धनकवडे यांच्याकडे समितीच्या वतीने पन्नास हजार रुपयांचा धनादेश देऊ केला. पुण्यात १९६१ मध्ये पानशेतचा महाप्रलय झाला, त्या वेळी साऱ्या देशातून मदतीचे हात पुणेकरांसाठी पुढे आले. आता तमिळनाडूतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणेकरांनी पुढे आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी अश्विनी कदम, नवनाथ बिनवडे, संतोष नांगरे, संपत सुकाळे आदी उपस्थित होते.

'मदत पाठवा'

'गेल्या काही काळापासून महापौर निधीचे खाते कोर्टबाजीत गोठविण्यात आले आहे. अशा काळात पुणेकरांनी आपली मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवावी,' असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हडपसरला आई-मुलाची आत्महत्या

$
0
0

हडपसरः हडपसर गाडीतळ येथील सुमंगल पार्क सोसायटीमधील राहत्या घरात माय-लेकाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी मिळाला असून ही अात्महत्या असावी, असा संशय हडपसर पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विक्रम बबन निकम (वय ३२) व आई पुष्पा बबन निकम (५०, सुमंगलपार्क, डी बिल्डिंग, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकांची नावे आहेत.

विक्रमचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते; परंतु सहा महिन्यांतच त्याचा घटस्फोट झाला होता. विक्रमचे वडील नेव्हीत होते; त्यांच्या निधनानंतर विक्रम जहाज सर्व्हिसिंगची कामे करीत होता.दोन दिवसांपासून दोघेही सोसायटीतील नागरिकांना दिसून न आल्याने शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडून घरात प्रवेश केला असता पुष्पा या हॅालमध्ये; तर विक्रम बाथरूमच्या पॅसेजमध्ये फरशीवर पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले असता डॅाक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दहावी-बारावी’साठी १४ पर्यंतची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी बसणाऱ्या पुनर्परीक्षार्थी व खासगी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील सोमवारपर्यंत म्हणजेच १४ डिसेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी ही माहिती देण्यात आली. फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी पुर्नपरीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे व तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही प्रक्रिया राबविण्यात येईल. यानुसार संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सात ते १४ डिसेंबरपर्यंत www.mahasscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान पैसै जमा करायचे आहेत. विलंब शुल्कासह १५ ते २१ डिसेंबर दरम्यानही अर्ज करता येणार आहे. त्यानंतर संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या २८ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज

माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सात ते १४ डिसेंबरपर्यंत www.mahasscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरी एमआयडीसीमध्ये १० लाखांची वीजचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भोसरी एमआयडीसीमधील शिरभाते इंडस्ट्रीजमध्ये सुमारे ८० हजार युनिट्स, म्हणजे साडेदहा लाख रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भोसरी एमआयडीसीमध्ये सेक्टर क्र. ७ मधील प्लॉट क्र. २३२ येथील मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीज वापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटर यंत्रणेची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत फेरफार केल्याचे दिसून आल्यानंतर वीजमीटर व सीटी यंत्रणा (करंट ट्रान्सफॉर्मर) पंचनामा करून जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीत वीजमीटर व सीटी यंत्रणेत वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर तांत्रिक फेरफार केल्याचे आढळून आले. यात ७९ हजार ३९६ युनिट्स, म्हणजे दहा लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले.

मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजचोरी उघडकीस आणण्यात मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, रमेश मलामे, कार्यकारी अभियंता धर्मराज पेठकर, प्रवीण नाईक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप गिरी, उपकार्यकारी अभियंता एस. एस. हातोळकर, सहायक अभियंता रमेश सुळ, शीतल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भुजबळ यांचा सहभाग होता.

या वीजचोरीप्रकरणी मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजच्या जागेचे मालक सुनील येडे, वीज वापरकर्ते जाकीर शेख, शशिकांत प्रकाश निकम, इरफान शेख, फुलचंद रामदुलार विश्वकर्मा आदी सहा जणांविरुद्ध बुधवारी रास्ता पेठेतील महावितरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुरसुंगी पुलावर अपघातात एक ठार

$
0
0

हडपसरः ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या कारला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण दूर फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी झाला. फुरसुंगी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पृथ्वीराज गोवार्ध शेखलिया (वय २१, रा. धूळवडी रोड, बारामती) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तसेच, संदीप विजय भोसले (२३, रा. मळद, फलटण रोड, बारामती) हा किरकोळ जखमी आहे. या प्रकरणी कारचालक किसनकुमार बाबगौन्डा पाटील (रा. आकृती सिटी, कोंढवा बुद्रुक) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पृथ्वीराज हा बारामती येथील पी. सी. कॉलेजमध्ये नोकरीला होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास तो मित्रासोबत पुण्यावरून बारामतीकडे दुचाकीवरून जात होता. फुरसुंगी उड्डाणपुलावर आले असता, ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक बसली. दुचाकी चालवत असलेला पृथ्वीराज ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

$
0
0

करोडपती असल्याचे सांगून घेतले कोरे चेक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोडपती व्यक्ती व्याज न घेता पाच व दहा लाख रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून नागरिकांना कर्जमंजूर करून देण्याच्या बहाण्याने दहा ते बारा नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा खुर्द परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेत आरोपींनी तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सकिना ताहेर पुनावाला (वय ३५, रा. सोमाजी चौक, कोंढवा) अटक करण्यात आली आहे. मुश्ताक अहमद पटेल, अन्वरी बेगम निजामउद्दिन (दोघेही रा. सुनिटी पार्कसमोर, कोंढवा) हे फरार झाले आहेत. याबाबत जोहरा शेख (५१, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना हिने नागरिकांना आरोपी मुश्ताक पटेल हा करोडपती असून तो लोकांना बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला एक कोरा चेक द्यावा लागेल असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून कोरे चेक घेतले. बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी पाच लाखांसाठी दोन हजार आणि पैसे मिळाल्यानंतर १० हजार असे द्यावे लागतील, असे सांगितले. तसेच, दहा लाखांसाठी चार हजार आणि चेक मिळाल्यानंतर १५ हजार लागतील, असे सांगितले. नागरिकांनी बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने कोरा चेक आणि पैसे आरोपींना दिले. आरोपींनी एका नागरिकाकडून घेतलेल्या कोऱ्या चेकवर मुश्ताक पटेल यांचे नाव टाकून बनावट सही करायचे आणि ते दुसऱ्या नागरिकाला द्यायचे. अशा प्रकार दहा ते बारा नागरिकांची एकूण दोन लाख ८९ हजार रुपांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. आरोपींनी आणखी नागरिकांची फसवणूक केल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक टी. टी. शेटे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images