Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दप्तराचे ओझे अजूनही जडच

$
0
0

७४ टक्के शाळांकडून नियमावलीकडे दुर्लक्षच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत हाय कोर्टाने आणि राज्य सरकारने वारंवार इशारे दिल्यानंतरही, शहरातील जवळपास ७४ टक्के शाळांमधून त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे गुरुवारी उघड झाले. केवळ २६ टक्के शाळांमधूनच त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत आहे. त्यामुळेच हायकोर्टाच्या सूचनांचा आणि राज्य सरकारच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा बजावण्याचा निर्णय पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी गुरुवारी घेतला.

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र शासन निर्णय काढत, दप्तराच्या वजनावर मर्यादा आणल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक वजनाच्या दहा टक्के वजनापर्यंतचे दप्तर शाळेमध्ये नेणे अपेक्षित आहे. हे ओझे कमी करण्यासाठी पालकांनी काळजी घेण्यासोबतच, शाळांमधून मुख्याध्यापकांनीही त्या विषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पूर्वी सरकारी पातळीवरून झालेल्या तपासणी मोहिमांमधून हे ओझे जास्तच असल्याचे आढळून आल्याने, ते कमी करण्यासाठी शाळांना सक्त सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही शहरातील अनेक शाळांमधून ही दप्तराच्या ओझे मुलांच्या मानेवर कायमच असल्याचे गुरुवारी दिसून आले.

या विषयी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले, 'आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविली. दप्तराचे ओझे तपासण्यासाठी गुरुवारी अचानक ३८ शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविली. त्यापैकी २६ टक्के शाळांमध्येच सरकारी निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी आढळून आली. इतर सर्व शाळांमध्ये मुलांच्या दप्तराचे ओझे नियमापेक्षा जास्त दिसून आले. एकूण ३७८ विद्यार्थ्यांच्या दप्तरांपैकी २२२ विद्यार्थ्यांचे दप्तर निकषांप्रमाणेच आढळले. हे प्रमाण ५९ टक्के इतके आहे. दप्तराचे ओझे बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५६ असून, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ४१ टक्के इतके आहे.'

'मुख्याध्यापकांना नोटिसा बजावणार'

दप्तराचे ओझे कायम असल्याचे आढळून आलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनाही या विषयीची कल्पना दिली जाणार आहे. अशा शाळांकडून या पुढील काळात दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, या विषयीचे स्पष्टीकरणही मागविण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नैराश्यातून इंजिनीअरची आत्महत्या

$
0
0

नोकरीत डावलले गेल्याची भावना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रीय खेळाडू असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पिंपळेगुरव येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 'महानिर्मिती'ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील नोकरीत डावलले गेल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, याप्रकरणी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

संकेत विश्वास गेंजगे (वय २८, रा. लेकसाइट, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई प्रियदर्शनी विश्वास गेंगजे (वय ५८) यांनी फिर्याद दिली असून, महानिर्मितीच्या वांद्रे, मुंबई येथील कार्यालयातील अधिकारी रानडे, आनंद भिंताडे, समीर थेऊलकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि राष्ट्रीय खेळाडू होता. त्याने गुरुवारी सकाळी बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे उघड झाले. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. मात्र, आदल्या रात्री तो कुटुंबीयांशी नोकरीबद्दल बोलला होता.

संकेत याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वदेखील केले होते. अनेक पदके मिळविल्यानंतर त्याने 'महानिर्मिती'मध्ये विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्याचा सातवा क्रमांक आला होता. मात्र, जातीचे आरक्षण आणि खेळाडू आरक्षण अशा दोन्ही पर्यायांचा उल्लेख त्याने फॉर्म भरताना केला होता. त्यामुळे तो महानिर्मितीच्या नोकरीत डावलला गेल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परीक्षा पास झाल्यानंतरदेखील मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला नोकरीसाठी ताटकळत ठेवण्यात आले. या कालावधीत त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले होते. मात्र, संकेतला वारंवार डावलण्यात येत असल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

संकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाला होता. त्याची फौजदारपदासाठी निवड झाली होती. मात्र, त्याला त्यात फारसा रस नव्हता. 'वेगळे काहीतरी करण्याची जिद्द असलेला संकेत आत्महत्या करेल, असे कधीही वाटले नाही,' अशी भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.

एकंदरीत परिस्थितीने संकेतला नैराश्य आले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली, असे त्यांचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले विद्यापीठ १२७व्या स्थानी

$
0
0

'टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग' जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग'ने जगभरातील विकसनशील देशांमधील शैक्षणिक संस्थांच्या केलेल्या पाहणीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १२७वे स्थान पटकावले आहे. या रँकिंगमध्ये देशभरातील आठ आयआयटी आणि इतर सात विद्यापीठांचाही समावेश असल्याचे रँकिंगमधून जाहीर केले आहे.

'टाइम्स'तर्फे 'ब्रिक्स अँड इमर्जिंग इकोनॉमिक्स कन्ट्रीज' गटातील देशांमधील शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर केले. त्यात जाधवपूर युनिव्हर्सिटी ८० व्या, तर पंजाब युनिव्हर्सिटी १२१व्या क्रमांकावर असल्याचेही नुकतेच स्पष्ट झाले. 'टाइम्स'ने यापूर्वी जाहीर केलेल्या सर्वेक्षणामध्येही अध्यापनाच्या बाबतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगभरातील पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये स्थान देण्यात आले होते.

विकसनशील देशांमधील पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील १६ संस्थांचा समावेश आहे. विद्यापीठांमधील शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विचार करत 'टाइम्स'ने हे रँकिंग जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या मानांकनाच्या प्रक्रियेत यापूर्वी विद्यापीठाला ११०० ते १३०० च्या दरम्यान स्थान देण्यात आले होते. यंदा विद्यापीठाने ६०१ स्थान मिळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नपत्रिका पारंपरिक पद्धतीने

$
0
0

'एमपीएससी'च्या उमेदवारांचा गोंधळ वाढला; अंतिम निर्णय बाकी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपाने सध्या सतावले आहे. येत्या परीक्षेत या दोन्ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ प्रश्नांवर अपेक्षित असतानाच, त्या पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने, उमेदवार गोंधळून गेले आहेत. तर, परीक्षेची जाहिरात अजून येणे बाकी असून, स्वरूपाविषयीचा अंतिम निर्णयही होणे बाकी असल्याने उमेदवारांनी गोंधळून जाण्याचे कारणच नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

आयोगातर्फे गट अ आणि गट ब मधील राजपत्रित पदांवरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी राज्य सेवा परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची निवड केली जाते. यातील मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन १ ते ४ अशा एकूण सहा विषयांची परीक्षा घेतली जाते. त्यातील मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप पारंपरिक पद्धतीवरून वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित पद्धतीकडे बदलण्याचा निर्णय आयोगाकडे विचाराधीन होता.

त्यानुसार आयोगाने २० जून २०१५ ला एक घोषणा करत, या दोन्ही परीक्षांचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी केल्याचे प्रस्तावित केले होते. २०१६ च्या परीक्षेपासून हे बदल प्रस्तावित करण्यात आले होते. याच घोषणेचा विचार करत राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी गेल्या काही काळापासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवर भर देत अभ्यासाला सुरुवातही केली होती. २०१५ च्या परीक्षेच्या स्वरुपाविषयी अनभिज्ञता असल्याच्या काळामध्ये ही तयारी सुरू असतानाच, आयोगाने ३० नोव्हेंबरला २०१५ च्या परीक्षेविषयी प्रसिद्ध केलेल्या घोषणेमुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घोषणेनुसार, २०१५ च्या परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजीचे पेपर पारंपरिक पद्धतीनेच होणार आहेत.

ही घोषणा प्रसिद्ध झाल्यापासूनच्या काळात नव्या वस्तुनिष्ठ स्वरुपाचा विचार करून, परीक्षेची तयारी सुरू केलेले उमेदवार गोंधळून गेले आहेत. एकीकडे २०१५ च्या परीक्षेचा तपास नसल्याने २०१६ च्या परीक्षेच्या नियोजनाने उमेदवारांनी अभ्यास सुरू केला होता. आता आयोगाने २०१५ च्या परीक्षेची घोषणा केली. त्यात मराठी आणि इंग्रजीचा पेपर पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले आहे. वेळापत्रकानुसार परीक्षा न होणे आणि नव्या धोरणांच्या अंमलबजावणीविषयी ठोस निर्णय न घेण्याने उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी या निमित्ताने नोंदविली.

मुळात यापूर्वीच्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास अद्याप अवकाश आहे. तसेच, वस्तुनिष्ठ स्वरूपाविषयीही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी गोंधळून जाण्याची वा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. वस्तुनिष्ठ स्वरूपाविषयी आयोगाने विविध घटकांकडून मते मागविली होती. त्यांचा विचार करून आयोगाच्या बैठकीमध्ये त्याविषयीचा अंतिम निर्णय होईल. २०१६ च्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये त्या विषयीची स्पष्टता निश्चितच केली जाईल. - डॉ. व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाका पाहणीसाठी पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाक्यावरून तीन मिनिटांच्या आत वाहनचालकांना सोडण्यात येते का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पथकाकडून पाच आणि सहा डिसेंबर रोजी टोलनाक्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे दिला जाणार आहे.

या विशेष पथकामध्ये हवेली आणि भोरचे प्रांत, तहसीलदार आणि रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी आदींचा समावेश असणार आहे. या पथकाकडून सकाळी आणि सायंकाळी टोलनाक्यावर थांबून व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक वाहन टोलनाक्यावरून जाण्यासाठी किती वेळ लागतो, हे समजू शकणार आहे. या पथकाचा अहवाल प्रशासनाकडे आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

​खेडशिवापूर येथील टोलनाक्याबाबत तक्रारी वाढल्याने येथे तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहने थांबवू नयेत, या साठी व्यवस्था करण्याचे आदेश टोलनाका चालविणाऱ्या रिलायन्स कंपनीला जिल्हा​धिकारी सौरव राव यांनी दिले होते. त्यासाठी दोन डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, 'रिलायन्स'ने या आदेशाची अंमलबजावणी न करता तीन मिनिटांची अट करारात नसल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता टोलनाक्याची पाहणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना नूतनीकरणाची नियमबाह्य अंमलबजावणी

$
0
0

पुणे : रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील कलम ७६(६) प्रमाणे स्पष्ट नियम असताना, राज्य परिवहन प्राधिकरणाकडून (एसटीए) नियमबाह्य अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. रिक्षा वगळता राज्यातील अन्य परवानाधारक वाहनांचे परवाना नूतनीकरण मुदत संपल्यानंतर कधीही केले जाते. मग, रिक्षा परवाना नूतनीकरणाला वेगळा नियम का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

रिक्षा परवान्याची वैधता संपल्यानंतर पुढील सहा महिन्यात नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय 'एसटीए'ने गेल्या वर्षी घेतला. त्यावेळी राज्यभरात लाखाहून अधिक रिक्षांच्या परवाना न

नूतनीकरणावर टांगती तलवार होती. यंदा राज्य सरकारने या रिक्षांसाठी अभय योजना सुरू करून त्यांचे परवाना नूतनीकरण केले. मात्र, महाराष्ट्र मोटार वाहन कायदा २०१०, कलम ७६ (६) नुसार कोणत्याही परवानाधारक वाहनाची परवाना नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतर त्या पुढील प्रत्येक महिन्यासाठी १०० रुपये दंड आकारून नूतनीकरण करण्याचा नियम आहे. असे असताना रिक्षांचे सहा महिन्यांच्या मुदतीनंतर परवाना नूतनीकरण का केले जात नाही, असा सवाल रिक्षा फेडरेशनचे बापू भावे यांनी उपस्थित केला.

रिक्षा वगळता सध्या टॅक्सी, ट्रॅव्हल्स, राष्ट्रीय परवानाधारक वाहने अशा सर्व वाहनांच्या परवान्याच्या नुतनीकरणाची मुदत संपल्यानंतरही दंड आकारून नूतनीकरण केले जाते. 'एसटीए'ने रिक्षांसाठी वेगळा कायदा केला असून, स्वतःच्या पातळीवर परवाना नूतनीकरणाचे नियम बदलले आहेत. त्याचा

फटका रिक्षाचालकांना बसत आहे. त्यामुळे रिक्षा परवाना नूतनीकरण मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे करावे आणि तसेच, हिवाळी अधिवेशनात सरकारने याबाबत स्पष्टोक्ती द्यावी, अशी मागणी भावे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार ठाम राहणार?

$
0
0

परवान्यासाठी तीनदा मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा मुदतवाढ दिली. त्या दरम्यान, राज्यातील १.४० लाख रिक्षाचालकांपैकी केवळ १८ हजार रिक्षाचालकांनी परवान्यांचे नूतनीकरण केले. तीन वेळा मुदतवाढ देऊनही नूतनीकरण होत नसल्याविषयी विविध शंका उपस्थित होत आहेत. आरटीओची यंत्रणा सक्षम आहे की नाही, नूतनीकरण न होणाऱ्या रिक्षा सेवेतूनच बाद झाल्या आहेत, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. सरकार ठाम भूमिका घेणार की अजून मुदतवाढ देणार अशीही विचारणा होत आहे.

राज्यातील रिक्षाचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राज्य सरकारने नुतनीकरणाची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. सरकारतर्फे एक ऑक्टोबरपासून रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. मात्र, योजनेला रिक्षा चालकांकडून थंडा प्रतिसाद आहे. त्यामुळे सरकारने ३१ ऑक्टोबरची मुदत संपल्यानंतर प्रथमतः १६ नोव्हेंबर आणि नंतर ३० नोव्हेंबरपर्यंत योजनेला मुदतवाढ दिली. त्यामुळे सरकारी पातळीवर सुरू असलेला मुदतवाढीचा खेळ कधी थांबणार, अशी चर्चा आरटीओत सुरू आहे. रिक्षाचालकांच्या मागणीनुसार नूतनीकरणासाठी मुदतीची अट लादू नका किंवा आता दिलेल्या मुदतीवर ठाम राहून यापुढे मुदतवाढ देऊ नका, अशी भूमिका सरकारने घेण्याची आवश्यकता आहे.

दोनदा मुदतवाढ देऊनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १,८३७ रिक्षांचे नूतनीकरण बाकी आहे. उर्वरित राज्यातील परिस्थिती यापेक्षाही भीषण आहे. पुण्यात परवाना नूतनीकरण करताना दंडाची रक्कम प्रतिमहिना शंभर रुपये आणि पासिंगचे २०० रुपये आकारले जातात. तर, मुंबई महानगर क्षेत्रात अनुक्रमे २० हजार आणि १५ हजार रुपये आकारले जातात. असे असतानाही पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे रिक्षाचालक परवाना नूतनीकरणाला प्रतिसाद का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातील परवाना नूतनीकरणाची टक्केवारी चांगली आहे. परवानाधारकांना नूतनीकरणाची आवश्यकता वाटत नसेल किंवा परवानाधारक हयात नसेल, ही दोन कारणे नूतनीकरणाला प्रतिसाद न मिळण्यामागे असू शकतात. - जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. विजय कोपरकर यांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकाराला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दिला जाणारा 'वत्सलाबाई जोशी स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या महोत्सवात संगीतमार्तंड पं. जसराज व प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांची विशेष मुलाखतही रंगणार आहे. आर्यसंगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

युवा आणि बुजुर्ग कलाकारांच्या सादरीकरणाने १० ते १३ डिसेंबरदरम्यान ६३वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात पं. कोपरकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्काराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.

'षड्ज'मधून प्रेक्षकांना लघुपटाचा आनंद मिळणार असून, १० ते १२ डिसेंबरदरम्यान सवाई गंधर्व स्मारक येथे सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत लघुपट पाहता येतील. पहिल्या दिवशी मधुरा जसराज दिग्दर्शित 'संगीतमार्तंड जसराज', दुसऱ्या दिवशी राजीव चौरासिया दिग्दर्शित 'बासुरी गुरू-पं. हरिप्रसाद चौरासिया', तर शेवटच्या दिवशी 'जमुना के तीर-अब्दुल करीम खाँ' हे लघुपट व त्यानंतर वामनराव देशपांडे यांनी हिराबाई बडोदेकरांची घेतलेली मुलाखत पाहता येईल. 'अंतरंग' या संवादात्मक कार्यक्रमात संगीतमार्तंड पं. जसराज व प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांची विशेष मुलाखत रंगणार आहे.

प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी टिपलेल्या कलाकारांच्या पूर्वीच्या व आताच्या छायाचित्रांचे 'तेव्हा आणि आता' हे प्रदर्शन भरणार असून, ६८ कलाकारांच्या १३६ भावमुद्रा त्यात पाहता येतील. शिल्पकार चारुचंद्र भिडे यांच्या 'पत्थर की लकेर' या पाषाणचित्रांचे प्रदर्शनही 'सवाई'च्या मुख्य महोत्सवादरम्यान अनुभवता येईल. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, मुख्य महोत्सवासाठी पीएमपीएमएलच्या बसची खास सोय करण्यात आली आहे.

सेवाकराच्या सवलतीसाठी प्रयत्न

५०० रुपयांवरील तिकिटांसाठी द्याव्या लागणाऱ्या सेवाकराबाबत खासदार अनिल शिरोळे यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देण्यात आले आहे. अभिजात संगीताच्या कार्यक्रमाला यातून सवलत मिळावी, यासाठी ही मागणी केल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडले अलौकिक प्रतिभेचे पर्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तत्त्वज्ञ, चित्रकार, कथा-कादंबरी, तसेच नाट्यलेखक, कवी, गीतकार आणि संगीतकार, अभिनय अशा विविध पैलूंतून जगविख्यात साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या अलौकिक प्रतिभेचे पैलू उलगडले आहेत. रवींद्र संगीत ही त्यांचीच अलौकिक निर्मिती. त्या संगीताच्या आस्वादासाठी आयोजित केलेल्या 'रवींद्र संगीत' या मैफलीत प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या भावपूर्ण स्वरांमध्ये रंगत आणली. राधा यांच्या स्वरातला बंगाली भाषेचा गोडवा रसिकांची दाद मिळवून गेला.

'स्वरभारती'ने प्रस्तुत केलेली ही मैफल कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली होती. टागोरांचे संगीत लाभलेली बंगाली गाणी रसिकांपर्यंत पोहोचावीत, टागोरांची प्रतिभा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या हेतूने मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र संगीत गाण्यासाठी नियम आणि अटींचे पालन करावे लागते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टागोरांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांची चाल बदलता येत नाही, याची माहिती देऊन राधा यांनी मैफलीचा श्रीगणेशा केला.

'मोन रोबे की न रोबे', 'मधुगोंधेभरा मृदूस्निग्धोछाया', 'शइभालो शइभालो', 'तोमार होलो', 'खोनीकेर अतिथी', 'शुखे आमाय राखवे केनू' अशी टागोरांची वेगवेगळी गाणी सादर करून राधा यांनी ही मैफल वेगळ्या उंचीवर नेली. फोक स्वरूपातील 'आये तो बे शोहेचरी' या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांची साथ देऊन वन्स मोअर दिला. राधा यांना विवेक परांजपे (संगीत संयोजन), विशाल गंड्रतवार (तबला) यांनी तितकीच समर्पक साथसंगत केली.

गाण्यांसोबत टागोर यांचे कुटुंब, त्यांनी काढलेली चित्रे, त्यांचे घर, हस्ताक्षर, खाडाखोड करतानाही त्यातून स्केचेससारखी चित्रे रेखाटण्याची सवय, गीतांजली या काव्यसंग्रहाचा अध्याय, 'वाल्मिकी प्रतिभा' हे पहिले नाटक आणि त्यात केलेली भूमिका या गोष्टींची माहितीही राधा यांनी अभ्यासपूर्ण शैलीतून मांडली.

पंडितजींची दाद...

'रवींद्र संगीत' या मैफलीला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी उपस्थिती लावून कलावंतांना दाद दिली. पंडितजींच्या आवडीचे 'तोमार होलो' हे गाणेही राधा यांनी सादर केले. 'तोमार' या शब्दाचा उच्चार पंडितजींकडून शिकल्याचेही राधा यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रसिकांनी पंडितजींशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदीतूनही उलगडले ‘बहुरंगी बोरकर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अपनी तार सितार बजा के, दिल चाहे जो गाओ'

स्वतःच्या धुंदीत राहूनही एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर पोहोचवणारे हे हिंदी गीत लिहिले आहे चक्क कविवर्य बा. भ. बोरकर यांनी. बोरकर म्हटले, की अप्रतिम मराठी कविता आठवतात; मात्र नुकत्याच झालेल्या 'बहुरंगी बोरकर' या कार्यक्रमात बोरकरांची हिंदी आणि कोकणी भाषेतील गीतेही सादर झाली.

कवी बोरकर स्मृती समिती आणि ऐक्यभारती यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. भेंडीबझार घराण्याच्या गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी या गीतांना संगीतबद्ध केले होते. कोरटकर यांनी 'मैं तो फकीर कलंदर' ही रचना पंजाबी टप्पा शैलीत सादर केली, तर 'बचपन से जी सुनता आया' ही पंढरीच्या पांडुरंगाविषयीची हिंदी रचना वेगळ्याच लगावाने सादर केली. 'अवधू साधो सहज समाध', 'अपनी प्रीत पुरानी', 'जो कोई चित सुध' या हिंदी, 'नाही पुण्याची मोजणी', 'गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले', 'मी रंगवतीचा फुलवा', 'यापुढे हे गीत माझे' या मराठी आणि 'निळें निळें सवणे' आणि 'त्या दिसान्' यांसारख्या कोकणी रचनाही कोरटकरांनी सादर केल्या.

या कार्यक्रमात बोरकर यांच्या कन्या पद्मा वज्रम आणि 'ऐक्य भारती'च्या संचालिका डॉ. दुर्गा दीक्षित यांनी डॉ. कोरटकर आणि साथीदारांचा सत्कार केला. कोरटकर यांना रोहित मराठे (संवादिनी), सुनील देशपांडे (तबला) आणि श्याम पोरे (तालवाद्य) यांनी साथ केली. विनया देसाई यांनी बोरकरांविषयीच्या आठवणी सांगून आपल्या निवेदनातून कार्यक्रम खुलवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’ १४ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चौदावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) येत्या १४ ते २१ जानेवारीदरम्यान होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन व राज्य सरकारतर्फे 'पिफ'चे आयोजन केले जाते. जगाला दहशतवादाची झळ सोसावी लागत असताना खेळ आणि चित्रपट या दोन माध्यमांतून सलोखा निर्माण होऊ शकतो, असा विचार मांडणारा 'स्पोर्ट् स अँड सिनेमा ब्रिंग दी वर्ल्ड टुगेदर' हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे.

फाउंडेशनचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे क्रिएटिव्ह संचालक प्रा. समर नखाते, सचिव रवी गुप्ता, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, डीएसके सुपीन्फोकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित कुमार आदी या वेळी उपस्थित होते. महोत्सवासाठी १०४हून अधिक देशांतून ९८५ चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धात्मक विभाग, मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ शॉर्टफिल्म स्पर्धात्मक विभाग, जागतिक चित्रपट, कॅलिडोस्कोप, रेट्रोस्पेक्टिव्ह, अॅनिमेशन, ह्युमन माइंड्स, भारतीय चित्रपट, आशियाई चित्रपट, आजचा मराठी चित्रपट, जेम्स फ्रॉम एनएफएआय, फिल्म्स डिव्हिजनचे माहितीपट, ट्रिब्युट आदी विभागांतील वैविध्यपूर्ण चित्रपटांचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवले जाणार आहेत.

'यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एमआयटी, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस आणि डीएसके सुपीन्फोकॉम या संस्थांनी महोत्सवाला सहकार्य दिले आहे. त्यामुळे महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असेल,' असे पटेल म्हणाले. 'जगभरात दशतवादाच्या घटना घडत आहेत; मात्र, खेळ आणि चित्रपट ही दोन माध्यमे सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे यंदा हाच विषय महोत्सवासाठी घेण्यात आला आहे,' असे गुप्ता यांनी सांगितले.

सोलापूरमध्येही महोत्सव

'पिफ'मधील काही चित्रपट यशवंत चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईत आणि औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून औरंगाबाद येथे दाखवले जातात. यंदापासून सोलापूरमध्येही महोत्सवातील काही चित्रपट दाखवले जाणार असून, यंदा 'पिफ'मधील तीस चित्रपट तेथे दाखवले जातील. यशवंत चित्रपट महोत्सवात यंदापासून स्मिता पाटील स्मृती व्याख्यान आणि 'बदलता महाराष्ट्र' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी शॉर्टफिल्मची स्पर्धा घेतली जाणार आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या काळातच...

८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरीत होणार आहे. 'पिफ' आणि साहित्य संमेलनाच्या रूपाने सांस्कृतिक कार्यक्रमांची जंत्रीच त्या काळात पुणे आणि परिसरात असेल. त्यामुळे चित्रपट आणि साहित्य अशा दोन्ही विषयांतील उत्सुकता आणि आवड असलेल्यांची तारांबळ उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कलामांच्या नावाने बुक बँक

$
0
0

वंचित विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिस्थितीअभावी अथवा अन्य कारणांमुळे पुस्तकांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत, यासाठी डॉ. अब्दुल कलाम बुक बँक हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरातील अल्प उत्पन्न गटातील तसेच जिल्हा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तक पेटी देण्यात येणार आहे.

पं. दीनदयाळ सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्चतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी राष्ट्रपती व जगप्रसिद्ध मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्याआधारावरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, कर्नल अनंत गोखले, कार्याध्यक्ष डॉ. दीपक वेडे-पाटील, मार्गदर्शक डॉ. हेमा लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सेंटरतर्फे शालेय अभ्यासक्रम, शास्त्रीय अभ्यासक्रम, प्रेरणादायी चरित्रे,साहित्य, पर्यावरण, आरोग्य आदी क्षेत्रातील ८० ते १०० पुस्तकांच्या १५ पेट्यांचा एक संच तयार करण्यात आला आहे. प्रत्येक शाळेत एक पेटी तीन महिने देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ही पुस्तके वाचल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात येतील. व या प्रतिक्रिया मुख्यालयात जमा केल्या जातील, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी पुस्तक स्वरूपात किंवा पेटीचे प्रायोजकत्वाच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शंभर रुपयांपासून पुढे मदत करता येईल, असेही त्यांनी सांगितले. संपर्क ०२०-२४४९७३९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीप्रकरणी दिराला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भावजयीचे अश्लील फोटो काढून वेबसाईटवर त्याचे प्रोफाइल तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दिराला अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एन. जाधव यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

या प्रकरणी संबंधित ४० वर्षीय महिलेने तिच्या दिराविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तिच्या दीराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीने त्याच्या भावजयीचे फोटो, पत्ता, मोबाइल नंबर, वैयक्तिक माहिती, तिचे अश्लील फोटो एका वेबसाइटवर टाकून प्रोफाइल तयार केले. ते प्रोफाइल तयार करून तिची बदनामी केली होती. आरोपीने यापूर्वी दोन वेळा असे कृत्य केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दीर असल्यामुळे फिर्यादी महिलेने गुन्हा नोंदविला नव्हता. आरोपीकडे अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक सरकारी वकील एस. सी. शिंदे यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटातील महिलेकडून चाळीस लाखांची फसवणूक

$
0
0

वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेतले

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

मुलाच्या हृदयाला छिद्र असून ऑपरेशनकरिता लाखो रुपयांची गरज असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करून बचत गटातील एका महिलेने सभासदांची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार धानोरीत घडला. केवळ आठ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद असले, तरी संबंधित महिलेने चाळीस लाखांहून अधिक फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

रंजना मुरलीधर गायकवाड (५३, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मनीषा प्रकाश केंगळे (रा. रोड नं. १३, भैरवनगर, धानोरी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा यांनी बचत गटाव्यतिरिक्त इतर वीसहून अधिक महिलांकडून लाखो रुपये उसने घेतल्याचे समोर आले असून, त्यामुळे फसवणुकीचा आकडा चाळीस लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील भैरवनगर भागात उत्कर्ष बचत गट आहे. मागील अनेक वर्षांपासून रंजना गायकवाड बचत गट चालवत असून, आरोपी मनीषादेखील या गटाच्या सभासद आहेत. 'मुलाच्या हृदयाला छिद्र असून, डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. त्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे. अंबरनाथला मालकीच्या दुकानगाळ्यांचे बांधकाम करण्यासाठी, तसेच गावाकडील शेती विकत घ्यायची आहे,' अशी वेगवेगळी कारणे सांगून मनीषा यांनी गटातील महिलांकडून आठ लाख रुपये घेतले आहेत. याशिवाय इतरही काही महिलांचा विश्वास संपादन करून त्यांनी तीस लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

गेल्या तीस महिन्यांपासून मनीषा यांनी अनेकांकडून रोखीने लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याची कुणकुण मागील महिन्यात महिलांना लागली. त्यानंतर काही महिलांनी तिच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी अनेकांना स्वतःचे नाव छापलेले कॅनरा आणि टीजेएसबी बँकेचे सही केलेले कोरे चेक दिले; पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपले चेकबुक गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत आणि बँकेत दिल्याने चेक बाउन्स झाले. त्यामुळे कोणालाही पैसे मिळाले नाहीत. याबाबत आणखी कुणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्यामुळे फसवणूक झालेल्या अनेक महिलांनी एकत्र येऊन एक महिन्यापूर्वी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली; पण अनेक दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने स्थानिक नगरसेविका रेखा टिंगरे यांनी त्या संदर्भात पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुरस आफ्रिकन धावपटूंमध्येच

$
0
0

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उद्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय मॅरेथॉनच्या जन्मभुमीत रविवारी होत असलेल्या ३०व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये शंभरहून अधिक परदेशी धावपटूंसह २०हजारहून अधिक जण सहभागी होत आहेत. अर्थात, सर्वांच्या नजरा असतील त्या पूर्ण मॅरेथॉनकडे. आतापर्यंत पुणे मॅरथॉनवर आफ्रिकन धावपटूंचाच दबदबा राहिलेला आहे. त्यातही केनियन आणि इथियोपियन धावपटूंत चुरस पाहायला मिळाली आहे. यंदा भल्या पहाटे पूर्ण मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. अर्थात, अनुकूल हवामानामुळे या वेळी विक्रमी वेळ नोंदली जाणार का, याबाबत उत्सुकता आहे.

खंडुजीबाबा चौकातून पूर्ण मॅरेथॉनला (४२.१९५ कि.मी.) पहाटे साडेपाच वाजता प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सारस बागेजवळ या शर्यतीचा समारोप होणार आहे. १९८३पासून पुणे मॅरेथॉनला प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत एकाही धावपटूला २ तास १२ मिनिटांत ही शर्यत पूर्ण करता आलेली नाही. अर्थात, २०१२मध्ये केनियाच्या ल्यूका किप्केम्बोइ चेलिमोने २ तास १३ मिनिटे आणि ०३ सेकंद वेळ नोंदविली होती. या वेळी पहाटे साडेपाचला मॅरेथॉन सुरू होत आहे. हवामानही अनुकूल आहे. त्यामुळे या वेळी विक्रमी वेळ नोंदली जाणार का, याबाबत औत्सुक्य आहे. २०१०पासून तीन वेळा इथोयोपियन धावपटूंनी, तर दोन वेळा केनियन धावपटूंनी ही शर्यत जिंकली आहे. अर्थात, या वेळी या आफ्रिकन धावपटूंतच विजेतेपदासाठी चुरस असणार आहे. पूर्ण मॅरेथॉनसाठी अग्रमानांकन देण्यात आलेल्या सिल्व्हेस्टर टिमेटची २ तास ६ मिनिटे व ०५ सेकंद ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यापाठोपाठ अॅम्स्टरडॅम मॅरेथॉन विजेता निकोलस काकयाला (२ तास ६ मि. व २४ से.) दुसरे मानांकन, तर इथियोपियाच्या लेता किबेलाला (२ तास १० मि. व ५२ से.) तिसरे मानांकन देण्यात आले आहे. अर्थात, हे धावपटू बाजी मारणार की, अन्य कोणी विजेतेपद मिळविणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पुरुषांत भारताची भिस्त बिनींग लायंगखोइ, अंगद कुमार, भरम प्रकाश, नवीन हूडा, किशोर गुऱ्हाणे, सूर्यकांत फेरे यांच्या असणार आहे. बिनींगने २०१२ आशियाई मॅरेथॉनमध्ये २ तास १८ मिनिटे वेळ नोंदविली होती.

महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अग्रमानांकन देण्यात आलेल्या केनियाच्या हेलन किमूताईची १ तास ०९ मिनिटे २७ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. द्वितीय मानांकन केनियाच्या रुथ वनजिरूला मिळाले असून, तिची सर्वोत्तम कामगिरी १ तास १० मिनिटे आणि ०४ सेकंद आहे, तर तिसरे मानांकन मिळालेल्या केनियाच्या फ्लोरेन्स चेप्सोईची सर्वोत्तम कामगिरी १ तास १० मिनिटे २८ सेकंद आहे. यापैकी कोणती धावपटू बाजी मारणार की, अन्य कोणी जेतेपद पटकाविणार, याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, यंदाच्या मॅरेथॉनसाठी डॉ. पराग संचेती यांच्या नेतृत्वाखाली पाचशे जणांचे वैद्यकीय पथक सज्ज होणार आहे.

पूरग्रस्तांना मदत...

पुणेकर धावपटू आणि विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांनी संयोजन समितीने दिलेले सुहाना कंपनीच रेडी टू इट पोहे आणि उपमा कप; तसेच बिस्किटे हे खाद्यपदार्थ चेन्नईतील पुरग्रस्तांना देण्यासाठी संयोजन समितीचे उपाध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांच्याकडे सुपूर्त केले. त्यात कटारिया हायस्कूल, महाराष्ट्रीय मंडळ, दामले प्रशाला, जयहिंद स्कूल, दस्तूर स्कूल, कीर्ती विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांसह बीईजी, एएसआय, पिंपरी-चिंचवड स्पोर्ट क्लब, डेक्कन जिमखाना क्लब आदींच्या धावपटूंचा समावेश आहे. सोमवारी पाच हजार पॅकेट्स चेन्नईला तमिळनाडू अॅथलेटिक्स असोसिएशनकडे पाठविली जाणार असल्याचे संयोजन सचिव प्रल्हाद सावंत यांनी सांगितले.

वर्चस्व केनियन धावपटूंचे ...

पुणे मॅरेथॉनमधील पूर्ण मॅरेथॉनमध्ये केनियन धावपटूंचेच वर्चस्व राहिले आहे. केनियन धावपटूंनी आतापर्यंत बारा वेळा ही ४२.१९५ कि.मी. अंतराची शर्यत जिंकली आहे. त्यापाठोपाठ सहा वेळा भारतीय धावपटूंनी या शर्यतीत बाजी मारली आहे. अर्थात, १९९७मध्ये भारताच्या अभय सिंगने ही मॅरेथॉन जिंकली होती. त्यानंतर मात्र एकदाही भारतीय धावपटूला ही ४२.१९५ कि.मी. अंतराची शर्यत जिंकता आलेली नाही. इथियोपियन धावपटूंनी तीनदा, तर स्वीडनच्या धावपटूंनी दोनदा ही मॅरेथॉन जिंकली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया, टांझानिया, रशिया, बेल्जियम मोरोक्को आणि श्रीलंकेच्या धावपटूंनी प्रत्येकी एकदा ही शर्यत जिंकली आहे.

शर्यतींच्या वेळा

पू्र्ण मॅरेथॉन - पहाटे ५.३० पासून अर्ध मॅरेथॉन (महिला) - पहाटे ५.३० पासून अर्ध मॅरेथॉन (पुरुष) - सकाळी ५.४५ पासून १० कि.मी. (महिला) - सकाळी ६ पासून १० कि.मी. (पुरुष) - सकाळी ६.१५ पासून ५ कि.मी. (पुरुष) - सकाळी ७.१०पासून ५ कि.मी. (महिला) - सकाळी ७पासून व्हिलचेअर - सकाळी ८.०५पासून १४ वर्षांखालील मुले - सकाळी ८.०५पासून १४ वर्षांखालील मुली - सकाळी ८पासून चॅरिटी रन - सकाळी ८.१०पासून खंडुजीबाबा चौकातून प्रारंभ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापरिनिर्वाण दिनी रेल्वेच्या जादा गाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी (६ डिसेंबर) विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही नियमित गाड्यांना अतिरिक्त द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.

सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (सीएसटीएम) ही रेल्वे आज, शनिवारी रात्री सव्वादहा वाजता सोलापूरहून सुटेल, ती रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता सीएसटीएमला पोहोचेल. 'सीएसटीएम' ते सोलापूर ही गाडी 'सीएसटीएम'हून सोमवारी (७ डिसेंबर) मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटून मंगळवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल. या गाड्या कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि दादर येथे थांबतील. त्याचबरोबर कोल्हापूर- 'सीएसटीएम' महालक्ष्मी एक्सप्रेस, कोल्हापूर-'सीएसटीएम' सह्याद्री एक्सप्रेसला आज, शनिवारी आणि रविवारी अतिरिक्त डबा जोडण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी शुक्रवारी दिली. चेन्नईला झालेल्या मुसळधार पावसामुळे आज, शनिवारी (५ डिसेंबर) अहमदाबाद-चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस आणि अहमदाबाद-चेन्नई सेंट्रल नवजीवन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी वापराला प्राधान्य द्या

$
0
0

राज्यातील महापालिका, नगरपालिकांना नगरविकास आणि ऊर्जा विभागाचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एलईडी वापराला प्राधान्य देण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास आणि ऊर्जा विभागाने शुक्रवारी (चार डिसेंबर) दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही एलईडी वापराबाबत प्राधान्यक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.

राज्याच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमित साटम आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना केली होती. त्यानुसार शहरातील पथदिव्यांच्या कमी प्रकाशामुळे मुलींची छेडछाड, विनयभंग तसेच खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यावरील चर्चेत एलईडीचा वापर केल्याने विजेची आणि पर्यायाने पैशाची बचत होते. शिवाय त्याच्या वापरामुळे इतर साधनांपेक्षा जास्त प्रकाश मिळतो, असे मत व्यक्त करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन राज्याच्या नगरविकास आणि ऊर्जा विभागाने केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील सर्व महापालिकांना आदेश दिले की, या महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य द्यावे आणि त्यातून वीज बचत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

त्यानुसार या विभागाने शुक्रवारी परिपत्रक जारी केली आहे. त्यात म्हटले आहे, राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी त्यांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य द्यावे आणि त्यामधून वीजबचत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राबाबत माहिती घेतली असता, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीजपुरवठा होतो. शिवाय वीजवापरात दर वर्षी वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय वीजगळतीचे प्रमाणही सात ते आठ टक्के आहे.

लवकरच कार्यवाही: आयुक्त

राज्य सरकारचा आदेश प्राप्त होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये एलईडी वापराबाबत कार्यवाही चालू आहे. त्यानुसार शहरातील २० टक्के भागात वापर चालू केला आहे, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. ते म्हणाले, 'केंद्र सरकारची ईईसीएल कंपनी किंवा जयपूर पॅटर्न याबाबत अभ्यास चालू आहे. त्यानंतर योग्य प्रस्तावाची निवड करून कार्यवाही केली जाईल. त्यासाठी महापालिकेच्या पुढील बजेटमध्ये तरतूद केली जाईल. शहरात ७५ ते ८० टक्के एलईडी वापराचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात वीज बचत होण्यास मदत होणार आहे.'

शहरातील वीज वापर (दशलक्ष किलो वॅट)

क्षेत्र / २०१२-१३ / २०१३-१४ / २०१४-१५ रहिवासी / ३४६.३५ / २५५.५४८ / ३०६.०५ व्यावसायिक / ८२.४१९ / ५८.६०५ / ६६.९५ औद्योगिक / ३९.५४३ / ३०.०२२ / ३१.९५ पथदिवे / १४.८५६ / ९.१२७ / ११.७५ पाणीपुरवठा / १.०९८ / ०.९१९ / ०.५२६ इतर / १.२३६ / ०.३११ / ३.३७४

(स्त्रोत - पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर हल्ला; आरोपींना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राजगड पोलिसांवर दगडाने आणि लोखंडी रॉडने हल्ला करून कॉन्स्टेबलला जखमी केल्याप्रकरणी कोर्टाने तिघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी पांडू हिरालाल रजपूत, सुनिता रजपूत आणि शंकर रजपूत ( तिघे रा. राजगड) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सुरेश दत्तात्रय साळुंखे (वय ४६) या पोलिस कॉन्स्टेबलने फिर्याद दाखल केली होती. या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय बाबूलाल सेगर (वय २६) जखमी झाले होते. १३ ऑगस्ट २००९ रोजी सायंकाळी ही घटना घडली. या केसचे कामकाज जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार आणि अतिरिक्त सरकारी वकील जावेद यांनी पाहिले.

पोलिस कॉन्स्टेबल साळुंखे यांना सरोबाची वाडी येथे रजपूत हा हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस खासगी वाहनाने घटनास्थळी कारवाईसाठी गेले. कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच, सेगर यांना रॉडने मारहाणही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडून मृत्यूप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पानशेत धरणात स्पीडबोट उलटून झालेल्या अपघातात सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोर्टाने बोटमालक आणि चालकाला दोषी धरले आणि शिक्षा सुनावली. बोटमालकाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड, तर बोटचालकाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. जुलै २०१०मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी बोटमालक अंकुश भाऊ पासलकर (वय ५१, रा. पानशेत, ता. वेल्हा) आणि बोटचालक संजय आनंदा कांबळे (२१, रा. पुरवटे, ता. वेल्हा) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी फिर्याद दाखल केली होती. विनिता अशोक जैन (वय २१), तिचा भाऊ विनीत (वय १९ रा. एकबोटे कॉलनी, शंकरशेट रस्ता) या दोघांचा घटनेत मृत्यू झाला. त्याच बोटीत असलेल्या विनिताच्या मैत्रिणी स्नेहा रमेश कुमावत (वय १९), ऋचिका जैन (वय २१, दोघीही रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) या दोघी पोहता येत असल्याने वाचल्या. कांबळे याने विनिताला पाण्याबाहेर आणले होते.

बोटमालक अंकुश पासलकर यांना धरणात बोट चालविण्याचा परवाना देण्यात आला होता. परवाना देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात बोटीतून प्रवास करणाऱ्यांना लाइफजॅकेट देण्यात येण्याच्या अटीचा समावेश होता. केसच्या कामकाजात सरकारी वकील साळवी यांनी चार साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचा टीडीआर बगीच्यासाठी देणे गैर

$
0
0

तांबेंच्या आरोपांना महापौरांचे उत्तर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धनकवडी भागातील मोकळ्या भूखंडावर बगीचा उभारण्याला आपला विरोध नाही. या भागात बगीचा व्हावा, या साठी २००७मध्ये पालिकेत ठराव दिला होता. बगिच्याची आरक्षित जागा नाममात्र दराने ताब्यात येणे शक्य असतानाही त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा टीडीआर देणे योग्य नाही. बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी नेमके कोण काम करते, हे यातून दिसून येते. असे स्पष्टीकरण देऊन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी नगरसेवक विशाल तांबे यांनी केलेले आरोप शुक्रवारी फेटाळले. गणसंख्येअभावीच पालिके‌ची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती, असे सांगून संबंधित जागेवरच बगीचा उभारणार असल्याचेही महापौरांनी नमूद केले.

धनकवडी येथील मोकळ्या भूखंडावर बगिचाचे आरक्षण टाकण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश कोर्टाने देऊनही धनकवडे आणि सभागृह नेते शंकर केमसे जाणीवपूर्वक हा प्रस्ताव पुढे ढकलत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे नगरसेवक तांबे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनाम्याचे पत्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पाठविल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन महापौरांनी तांबे यांचे आरोप फेटाळून लावले.

सभागृहात उपमहापौर आबा बागूल यांनी गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केल्याने नियमाप्रमाणे सदस्यांची संख्या मोजण्याचा आदेश नगरसचिवांना देण्यात आला. सभागृहात संख्या कमी भरल्याने सभा तहकूब करण्यात आली. बगिच्याला विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक हा विषय पुढे ढकलण्यात आले नसल्याचे धनकवडे यांनी सांगितले. ही सोसायटीची मोकळी जागा आहे. तिचा गैरवापर होऊ नये, या साठी ताबा प्रशासनाला घेता येतो. त्यामुळे नाममात्र दरातही ही जागा उपलब्ध होऊ शकते. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविल्यास पालिकेला अडीच पट टीडीआर द्यावा लागणार आहे. कोर्टाने दिलेला निर्णय रद्द होणार नाही. डिसेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर हा विषय मान्य केला जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

साहेबांपाठोपाठ दादांनीही टोचले कान

बगिच्याच्या प्रस्तावावरून राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौर, सभागृह नेते यांच्यासह नगरसेवक विशाल तांबे यांची शुक्रवारी कडक शब्दात कानउघाडणी केली. महापौर तुमच्या बद्दल तक्रारी का येतात, अशी विचारणा धनकवडे यांना करून पुढील सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे, अशा शब्दात सुनावले. एवढ्यातेवढ्या कारणावरून राजीनामा देण्याची गरज काय होती, माझ्याकडे का आला नाही? अशी विचारणाही तांबे यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images