Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नाट्यपदांना ५० वर्षांनी पुन्हा साथ

0
0

येत्या रविवारी (दि. ६) गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या विशेष मैफलीत उस्ताद झाकीर हुसेन जवळपास ५० वर्षांनी नाट्यपदांना तबल्याची साथ करणार आहेत. एकल वादनाव्यतिरिक्त साथीदार म्हणून भूमिका बजावतानाची आव्हाने आणि जुन्या संगीत नाटकांना केलेल्या तबला साथीविषयी त्यांच्याशी आसावरी चिपळूणकर यांनी साधलेला संवाद.

पुण्यात या वेळी तुम्ही एकल वादन कमी आणि साथीदार म्हणून जास्त दिसताय. नाट्यगीतांसह तबला वादन करण्याचे काही विशेष कारण?

उस्ताद : नुकताच मी आणि माझ्या कथक नृत्य कलाकार असलेल्या बायकोने पुण्यात सह सादरीकरणाचा कार्यक्रम केला. कथकनंतर पुन्हा एकदा नाट्यपदांना मी तबला साथ करणार आहे. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमामुळे पुन्हा एकदा नाट्यसंगीताकडे प्रेक्षक वळू लागले आहेत. मात्र, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा 'कट्यार'चा प्रयोग मी मुंबईत पाहिल्यानंतर या कार्यक्रमाविषयी त्यांच्याशी बोललो होतो; शिवाय माझे आणि संगीत नाटकांचे ऋणानुबंध तसे जुने आहेत. 'एकच प्याला' आणि वसंतराव देशपांडे असताना 'कट्यार'ला मी साथ केली आहे. त्यामुळे ५० वर्षांनी पुन्हा एकदा नाट्यपदांना साथ करताना मजा येईल.

एकल वादन आणि साथीचे वादन करताना तबला वादकाला कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात?

उस्ताद : मुळात तबला हे साथीचेच वाद्य आहे. त्यामुळे तबला वादकाची तालीम ही साथ देण्याच्या दृष्टीनेच करून घेतली जाते. अहमदजान थिरकवां, माझे वडील अल्लारखां खान, समता प्रसाद यांसारख्या मोठ्या कलाकारांनी एकल तबला वादनाने रसिकांची दाद मिळवली. तिथून एकल तबला वादनाची परंपरा सुरू झाली. प्रमुख वाद्याचा पूर्ण अभ्यास आणि वादकाशी उत्तम परिचय असेल, तर तबला साथ करताना अधिक रंगत येते. काही गायक किंवा वादक अनपेक्षित सादरीकरण करतात, तेव्हा साथीदार म्हणून तुम्हाला सजग असावे लागते. संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाला तबला साथ करताना मीही बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. हळूहळू एकल तबला वादक म्हणूनच माझी प्रतिमा तयार होत गेली. त्यामुळे साथीदार म्हणून अलीकडे मला विचारणाच फार कमी होते.

राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांची ही कितवी पिढी असेल, ज्यांना तुम्ही तबला साथ करत आहात?

उस्ताद : माझे वडील (अल्लारखा), पं. भीमसेन जोशी, पं. अजय चक्रवर्ती आणि आता राहुल- शौनक. ही चौथी पिढी आहे, ज्यांना मी साथ करतोय.

काय फरक वाटतो या पिढ्यांतील कलाकारांत?

उस्ताद : गुरूने सांगितलेल्या गोष्टींचेच पालन करणारी एक पिढी होती, तर त्या पलीकडचा विचार करणारी पुढची पिढी होती. मात्र, तिसऱ्या पिढीने विचारापुढे कृती केली आणि आता चौथ्या पिढीला इंटरनेटमुळे अधिक माहिती थेट हाती मिळते. त्यामुळे आत्ताची पिढी अत्यंत सुदैवी आहे. फक्त मेहनत आणि विकास त्यांच्याच हातात आहे.

सा व नी सूरसंगीत या बॅनरशी तुमचा संबंध कधीपासून आला?

उस्ताद : सा व नी सूरसंगीत या बॅनरअंतर्गत मैफल करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयोजक सुरेंद्र मोहिते स्वतः तबला वादक आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने कलाकारांशी वागायचे, त्यांना सांभाळायचे, याची त्यांना पूर्ण जाण आहे. दरवर्षीप्रमाणेच याहीवेळी ते डॉ. अपर्णा देशमुख यांच्या आभाळमाया वृद्धाश्रमाला कार्यक्रमातून जमा होणाऱ्या निधीतील काही वाटा देणार आहेत. तबला वादनाच्या माध्यमातून एखाद्या गरजू संस्थेला मदत करता येते, हेही मोहितेंच्या संस्थेबरोबर काम करण्याचे आणखी एक कारण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संगीत स्वयंवर’ नाटक शताब्दीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नरवर कृष्णासमान... नाथ हा माझा... मम आत्मा गमला... मम मनीं कृष्ण सखा...' ही नाट्यपदे आजही काळजाचा 'ठोका' चुकवतात. संगीत नाटकांच्या समृद्ध परंपरेत लोकप्रियतेचा इतिहास निर्माण करणारे व ज्यातील ही नाट्यपदे आहेत असे अभिजात नाटक म्हणजे संगीत स्वयंवर. शताब्दी गाठतानाही ही नाट्यपदे आजही तितकीच टवटवीट वाटतात. काकासाहेब खाडिलकरांची कलाकृती असलेले 'संगीत स्वयंवर' हे नाटक आता शताब्दीत पदार्पण करत आहे. समृद्ध नाटकांच्या यादीत या नाटकाचाही समावेश होणार असून, यातील नाट्यपदे रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत.

श्री रुक्मिणी स्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्त्वे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अर्थात काकासाहेब खाडिलकर यांनी नाटकाद्वारे रसिकांपुढे मांडली. यातील नाट्यपदांची मोहिनी आजही नाट्यवेड्या रसिकांच्या मनात घर करून आहे. त्याच वेळी तरुण पिढीमध्येही ही नाट्यपदे विशेष लोकप्रिय आहेत.

संगीत स्वयंवरच्या शताब्दीतील पदार्पणानिमित्त कलाद्वयी संस्थेचे विश्वस्त विद्यानंद देशपांडे यांनी संगीत नाटकांसाठी होणाऱ्या 'प्रयोगां'विषयी 'मटा'ला माहिती दिली. संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी, तसेच नाट्यसंगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कलाद्वयीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'नवीन संचात आम्ही संगीत स्वयंवर हे नाटक सादर करतो. यामध्ये बुजूर्ग आणि तरुण मंडळी काम करतात. संस्थेतील अस्मिता चिंचाळकर, संजय गोगटे, संजय गोसावी, वर्षा जोगळेकर व मी असा आमचा पाचही जणांचा त्यात सहभाग असतो. नाटकाचा आवाका खूप मोठा आहे. काकासाहेबांची भाषा आणि त्यांचे हे नाटक करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. संगीत नाटकाच्या प्रेमाखातर आम्ही हे करू शकतो. सर्वजण आपला व्याप सांभाळत ही परंपरा पुढे नेत आहेत. नाटकासाठी कीर्ती शिलेदार व मधुवंती दांडेकर यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मूळ नाटक पाच अंकी आहे, त्यात थोडे बदल करून पण संहितेला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत ते दोन अंकी केले आहे. नाटकात ५० पेक्षा अधिक पदे आहेत. ही सर्व घेणे शक्य नाही. आम्ही २० नाट्यपदे घेतो. त्यामध्ये यातील गाजलेल्या सर्व पदांचा समावेश आहे. नाटकाच्या शताब्दीच्या निमित्ताने पुणे व मुंबई येथे प्रयोग होणार आहेत.'

कलाद्वयी करणार सादरीकरण

१० डिसेंबर १९१६ रोजी संगीत स्वयंवर काकासाहेब खाडिलकरांनी संगीत रंगभूमीवर आणले. येत्या १० डिसेंबरला या नाटकाला ९९ वर्ष पूर्ण होत असून हे नाटक शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. संगीत नाटकांना उतरती कळा लागली असली, तरी या नाटकाचे आजही प्रयोग होत आहेत. राजाश्रय नसताही संगीतनाट्यवेडी मंडळी हे वैभव टिकवण्याता आटोकाट प्रयत्न करत आहेत, त्यापैकीच एक संस्था म्हणजे कलाद्वयी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या रविवारी ‘स्वरझंकार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुण्यातील व्हायोलिन अकादमी आणि पिंपरी-चिंचवडमधील अनिंदो चटर्जी म्युझिक फाउंडेशन च्यावतीने सहा आणि सात डिसेंबरला चिंचवड येथे स्वरझंकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्याच्या उपनगरांमध्ये संगीत प्रसार आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे, अशी माहिती संयोजक समीर सूर्यवंशी यांनी दिली. ते म्हणाले, की 'प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवस महोत्सव होणार आहे. सहा डिसेंबरला रात्री नऊ वाजता महोत्सवाला प्रारंभ होईल. या वेळी कट्यार काळजात घुसली चित्रपटाच्या माध्यमातून गायनाचा ठसा उमटविणारे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य महेश काळे यांचे गायन होणार आहे. उत्तरार्धात पं. रोणु मुजुमदार (बासरी) आणि पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) यांची जुगलबंदी होणार आहे.'

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. त्यानंतर दिलशाद खान यांचे सारंगीवादन होईल. जयपूर घराण्याच्या लोकप्रिय गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. तसेच भरत कामत, रामदास पळसुले, समीर सूर्यवंशी, नीलेश रणदिवे या कलाकारांच्या वादनाचा आस्वादही रसिकांना मिळणार आहे. महोत्सव सशुल्क असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाच्या जीभेवर ऑपरेशन यशस्वी

0
0

ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे यश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आठ वर्षांचा सूरज एरंडे या मुलाच्या जीभेच्या मागील भागात आलेल्या मोठ्या गाठीमुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत होता. गुंतागुंतीच्या ऑपरेशनपूर्वी 'रेलरोडिंग' या भूल देण्याच्या पद्धतीमुळे ससून हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा तज्ज्ञांनी हे ऑपरेशन यशस्वी करून दाखविले.

डॉ. संजय सोनावले, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. सुश्रृत देशमुख यांच्या पथकाने हे ऑपरेशन यशस्वी केले. डॉ. विनया कुलकर्णी, डॉ. किर्ती कुंडलवाल, डॉ. चेतन पाटील, डॉ. सुशांत चंदावार यांनी तज्ज्ञांना साह्य केले; तसेच बधिरीकरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना केळकर यांनी भूल देण्याचे काम केले. जीभेवर गाठ आल्याने श्वास घेण्याबरोबर अन्न गिळण्यासही आठ वर्षांच्या मुलाला त्रास होत होता. त्यामुळे तो ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. अशा प्रकारच्या गाठींचा प्रादुर्भाव एक लाखांपैकी एखाद्या पेशंटना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या गाठींचे प्रमाण अगदी नगण्य असते.

'जीभेवर गाठ असलेल्या पेशंटसाठी भूल देण्याची नेहमीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबावी लागते; परंतु पेशंट वयाने लहान असल्याने त्यासाठी भूल देण्यासाठी रेलरोडिंग ही पद्धत वापरण्यात आली. भूल देण्याची ही पद्धत लहान मुलांमध्ये वापरता येत नाही. मोठ्या वयातील पेशंटमध्येच ही पद्धत वापरली जाते; परंतु ससून हॉस्पिटलमध्ये प्रथमच लहान वयाच्या पेशंटला भूल देण्यासाठी रेलरोडिंग ही पद्धत वापरण्यात आली,' अशी माहिती डॉ. समीर जोशी यांनी दिली.

भूल देण्यासाठी नाकातून नळी

लहान मुलांच्या अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी भुलेसाठीची नळी तोंडातून घालता येत नाही. त्यामुळे भूल देण्यासाठी नाकातून नळी घालावी लागते. लहान मुलांमध्ये भुलेचे कोणतेही औषध शिरेतून दिल्यास गाठ मागे जीभेवरून स्वर यंत्रणेवर पडण्याची भीती असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांकडून कायद्याचा गैरवापर

0
0

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'महिला अत्याचारविरोधी कायद्याचा २० टक्के महिलांकडून गैरवापर करण्यात येतो. ही बाब धक्कादायक असून, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठीच या कायद्याचा वापर व्हायला हवा,' असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांनी गुरुवारी (३ डिसेंबर) व्यक्त केले.

'एकविसाव्या शतकातील महिलांचे हक्क, कर्तव्ये आणि आव्हाने' या विषयावर आकुर्डीत कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी श्रीमती साहू बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, उमा खापरे, माउली थोरात आणि अपर्णा मणेरीकर या वेळी उपस्थित होत्या.

महिलांवरील अत्याचारविषयीच्या प्रश्नांना साहू यांनी उत्तरे दिली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, 'महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब चिंताजनक आहे. परंतु, अन्याय सहन न करता महिलांनी ई-मेल, लेखी तक्रार किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून आयोगाकडे तक्रार करावी. त्याची छाननी करून आयोग संबंधित पोलिसांना कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश देईल. बलात्कार, अपहरण आणि सासरच्यांकडून जाळण्याचा प्रयत्न या प्रकरणांबाबत पोलिसांकडून तातडीने कारवाई होत नाही, असे दिसून आले आहे. अशावेळी महिलांनी जागृत राहून पाठपुरावा करायला हवा. तक्रार नोंदवून घेणे पोलिसांवर बंधनकारक आहे. परंतु, समाजातील २० टक्के महिला मिळालेल्या अधिकारांचा स्वार्थासाठी गैरवापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उर्वरित ८० टक्के प्रामाणिक महिला बदनाम होतात. हे टाळण्यासाठी महिलांनी आत्मपरिक्षण करून योग्य मार्गाचा अवलंब करावा. महिला ज्यावेळी स्वतः बदलतील, तेव्हाच समाज बदलेल,'.

एका महिलेने शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीला दुग्धाभिषेक करणे हे ढोंगीपणाचे लक्षण आहे. मूर्तीला महिलेने स्पर्श न करणे हे बुद्धीला पटत नाही. परंतु, देशातील मंदिरांमध्ये काही नियम असतात. ते एखाद्या महिलेने तोडू नयेत. बंडच करायचे असल्यास संघटनेचा आधार घ्यावा. तेव्हाच क्रांती घडते.

- सुषमा साहू, सदस्या, राष्ट्रीय महिला आयोग

कुठे आहे जनजागृती?

महाराष्ट्रातून अनेक तक्रारी आयोगाकडे प्राप्त होतात. त्यापैकी मुंबईतील ११५ प्रकरणे राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आली आहेत. महिलांवर अन्याय होऊ नये, या साठी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. या विषयी शाळा आणि कॉलेजांमध्ये जनजागृती मोहीम चालू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अशा मोहिमा बंदच आहेत. अशा मोहिमांना आवश्यक निधी महिला आयोगाकडून दिला जाईल, असेही साहू यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकतेसाठी व्यासपीठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे एक समान व्यासपीठ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संस्था आणि इच्छुक विद्यार्थ्यांना या व्यासपीठावर एकत्र आणण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे यांनी गुरुवारी 'मटा'ला ही माहिती दिली. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि देआसरा फाउंडेशनतर्फे गरवारे कॉलेजमध्ये उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला त्यांच्यासह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, देआसरा फाउंडेशनच्या प्रज्ञा गोडबोले आदी उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, 'उद्योजक बनायचे आहे; पण तशी आपली क्षमता आहे का, ती निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल आदी बाबींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. 'आयटीआय'चे विद्यार्थी कुशल असल्याने त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार उद्योग सुरू करणे कठीण जात नाही; पण त्याच जोडीने कला, वाणिज्य यासारख्या पारंपरिक शाखांतील विद्यार्थ्यांनाही उद्योजकतेचे धडे मिळण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरेल.'

'उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण आम्ही देतो. त्याचप्रमाणे उद्योग सुरू करताना लागणाऱ्या परवानग्या, नोंदण्या, निधी, मार्केटिंग, कर्ज ते प्रत्यक्ष उद्योग उभा राहीपर्यंतही मदत करतो. सध्या असे २० उद्योग उभारण्यासाठी आम्ही मदत केली आहे. त्यामध्ये मसाले बनवण्यापासून फोटोग्राफी स्टुडिओ उभारण्यापर्यंतच्या उद्योगांचा समावेश आहे,' अशी माहिती देआसरा फाउंडेशनच्या प्रज्ञा गोडबोले यांनी दिली.

'विविध उद्योगांसाठी काय काय बाबी आवश्यक असतात, याची उद्योगनिहाय 'टेम्प्लेट'च आम्ही तयार केली आहेत. सध्या ६० उद्योगांसाठी असे ६० स्वतंत्र नियोजनाचे आराखडे आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असून, त्याचा आधार घेऊन उद्योग उभारणी करणे शक्य आहे. येत्या काही वर्षांत २५ हजार उद्योजक निर्माण करण्याचे आमचे ध्येय असून, त्याद्वारे एक लाख रोजगार निर्माण होतील, अशी आमची अपेक्षा आहे,' असेही त्यांनी नमूद केले.

'कौशल्य शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवणे हा नियमित मार्ग आहे. मात्र, उद्योजकतेसाठी आवडीबरोबरच मार्गदर्शनही आवश्यक असते. अनेक विद्यार्थ्यांना आवड तर असते; पण मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी व्यासपीठ तयार करण्याचा आमचा मानस आहे. देआसरा फाउंडेशनसारख्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या इतरही संस्थांना यामध्ये सामावून घेण्याचा विचार आहे.' - विजय वाघमारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात येत्या बुधवारी गॅस इंडिया परिषद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गॅसचा सुरक्षित वापर, गॅसची निर्मिती व पुरवठ्यातील नवे तंत्रज्ञान या विषयी चर्चा करण्यासाठी येत्या नऊ व १० डिसेंबर रोजी पुण्यात गॅस इंडिया परिषद होणार आहे. या निमित्ताने खास प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅसचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जयसिंह संपथ, आर. टी. कुलकर्णी उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी इंद्रप्रस्थ गॅसचे संचालक नरेंद्र कुमार उपस्थित राहणार आहेत. वर्ल्ड एलपीजी फोरमच्या माध्यमातून पुण्यात एलपीजी ट्रेनिंग अॅकॅडमी सुरू करण्याबाबतची अधिकृत घोषणाही या वेळी करण्यात येणार आहे. या माध्यमातून गॅसविषयक तंत्रज्ञ तयार करण्यात येणार आहेत.

या परिषदेत गॅस व इंधन क्षेत्रातील विविध सरकारी आणि खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील. परिषदेत गॅस व इंधन विषयाशी संबंधित काही तांत्रिक शोधप्रबंधांचे सादरीकरण होईल. विविध प्रकारच्या गॅसचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी खास प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गॅस नियंत्रित करणारी उपकरणे, गॅसचा सुरक्षित वापर करण्यासाठीची उपकरणे आणि गॅसशी निगडीत विविध वस्तूंचा समावेश असेल. हे प्रदर्शन येत्या बुधवारी व गुरुवारी (ता. ९ व १०) नगर रस्त्यावरील हॉटेल हयात रिजेन्सी येथे सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, वळसेंनी गावच निवडले नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने जाहीर केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्ह्यातील आमदारांनी गावे निवडली असताना, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अद्याप गावांची निवड केलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्मरणपत्रे पाठवूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघातील एक गाव निवडायचे आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली होती. पवार आणि वळसे-पाटील वगळता अन्य आमदारांनी गावांची निवड करून त्याबाबतची पत्रे जिल्हा नियोजन विभागाकडे दिली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात विधानसभेतील २१ आणि विधान परिषदेतील सहा आमदार आहेत. गावे निवडताना सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये आमदारांना स्वत:चे किंवा पत्नीचे गाव निवडता येणार नाही. संबंधित गावाची लोकसंख्या सुमारे एक हजारापेक्षा जास्त असणे अत्यावश्यक आहे. गावांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०१९ पर्यंत ही गावे आदर्श करण्याचे नियोजन असणार आहे.

आमदार आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांत विविध विकास योजना राबविल्या जाणार आहेत. गावांतील रहिवाशांसाठी आरोग्याच्या सुविधा, विद्यार्थ्यांसाठी किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे, पशुसंवर्धन, पाणलोट विकास, ग्रामपंचायत भवन, रस्ते, भारनियमनमुक्त वीज पुरवठा, इंटरनेटची सुविधा, बँक क्षेत्रातील सेवा पुरविणे, कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प आदी विकासकामे होऊ शकणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.

इतर सर्वांची पत्रे मिळाली

आमदार आदर्श ग्राम योजनेत प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघातील एक गाव निवडायचे आहे. पवार आणि वळसे-पाटील वगळता अन्य आमदारांनी गावांची निवड करून त्याबाबतची पत्रे जिल्हा नियोजन विभागाकडे दिली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरस्काराने मी धन्य झालो

0
0

प्रभाकर जोग यांची भावना; मंगेशकर पुरस्कार प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीत साधनेला सुरुवात झाली. ज्या लतादिदींनी माझ्या अनेक रचना अजरामर केल्या, त्या स्वरसम्राज्ञीच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराने मी धन्य झालो. संगीत सेवेचे हे फळ मिळाले,' अशी भावना ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांनी पुरस्कार वापसीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जोग यांना ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार योगेश टिळेकर, सांस्कृतिक संचालक अजय अंबेकर व संजय भोकरे याप्रसंगी उपस्थित होते. बाबूजी, गदिमा यांचा आवर्जून उल्लेख करून जोग यांनी संगीत सेवेतील साथीदारांविषयी कृतज्ञता प्रकट केली. बाबूजींना गीतरामायणाच्या ५०० कार्यक्रमांना साथ देण्याचे भाग्य मला मिळाले. सर्वांनी साथ दिल्याने संगीत सेवा घडवू शकलो. या पुरस्काराने मी कृतार्थ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चव्हाण म्हणाल्या, 'कलाकाराला पुण्यात लौकिक मिळाल्याशिवाय कलेची पावती मिळत नाही. पुणे हे माझे माहेर आहे. जन्माला यावे आणि कलाकार व्हावे. मी १५ वर्षांची असताना जोग साहेबांकडे गायले होते. इतक्या वर्षांनंतर त्यांना पाहतीय. माझ्या हस्ते त्यांचा सन्मान ही माझ्यासाठीच खूप मोठी संधी आहे.'

दरम्यान, वयाच्या ८३ व्या वर्षांत चव्हाण यांनी ठसकेबाज आवाजात 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', ही लावणी सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा ठेक्यात रसिकतेची बरसात केली. जोग यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची मैफल रंगली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्कार परत करून काही होणार नाही

'पुरस्कारवापसीचे सत्र सुरू आहे, त्यामुळे पुरस्कार देताना भीती वाटते. मात्र, प्रभाकर जोग यांना दिलेल्या पुरस्काराने उद्देशाची प्रतिपूर्ती झाली आहे, असे सांगून जी मंडळी पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्या लिखाणात समाजाला बदलण्याची ताकद आहे. पुरस्कार परत करून काही होणार नाही. त्या उलट त्यांनी आपल्या लेखणीतून आपले म्हणणे मांडले पाहिजे,' असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांचा बाजार

0
0

आरटीओ एजंटला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट असो किंवा विमा पॉलिसी, लाइट बिल असो की निवडणूक ओळखपत्र... अशी हवी ती कागदपत्रे बनावट तयार करून 'प्रती परिवहन कार्यालय' (आरटीओ) थाटणाऱ्या गंज पेठेतील तमसीन हैदर सय्यद या 'आरटीओ' एजंटला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून तब्बल शेकडो बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

तमसीन गेली सात वर्षे 'आरटीओ' एजंट म्हणून काम करतो. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून त्याने बनावट कागदपत्रे तयार करण्याचा 'उद्योग' सुरू केला. 'आरटीओ'मध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांना विमा पॉलिसी, लाइट बिल, मतदान ओळखपत्र यासारखी कागदपत्रे अपुरी पडतात. त्यामुळे त्यांना कागदपत्रे मिळवून देता-देता त्याने ती बनावटच तयार करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय त्याने 'आरटीओ'ची 'फिटनेस सर्टिफिकेट' तयार केल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली. 'आरटीओ'ची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरीखुरी असल्याचा बनाव रचून त्याने अनेक वाहनचालक; तसेच परिवहन विभागाला फसवल्याचे पाटील म्हणाले.

अशी झाली कारवाई

गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाला तमसीनबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर अनेक दिवस पाळत ठेवण्यात आली. त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले असता त्याच्या ताब्यात एक पेन-ड्राइव्ह मिळाला होता. या पेन ड्राइव्हमध्ये ९६ वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट सेव्ह करण्यात आल्याचे सापडले. बड्या आठ विमा कंपन्यांच्या १९८ पॉलिसी, २११ लाइट बिले, २८ निवडणूक ओळखपत्रे सेव्ह करण्यात आल्याचे लक्षात आले.

बनावट कागदपत्रांचा कारखाना

तमसीन हा कम्प्युटरच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करत असे. स्कॅन तसेच 'पीडीएफ' फॉरमेटमध्ये असलेल्या मूळ कागदपत्रांमध्ये जुजबी बदल करत तो बनावट कागदपत्रे तयार करत असे. बनावट कागदपत्रांच्या कलर प्रिंट काढून त्यांची विक्री करत असे. अशा प्रकारे त्याने शेकडो बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघडकीस आले आहे. या कागदपत्रांचा उपयोग 'आरटीओ'मध्ये इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करण्यासाठी केला गेला आहे की काय, याचा तपास करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

'आरटीओ'- वाहनचालक-मालकांवरही संशय

तमसीनचा हा उद्योग 'आरटीओ' कार्यालयाच्या लक्षात कसा आला नाही, यामध्ये कोणी सामिल होते का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे. त्याशिवाय वाहनचालक-मालकांना तमसीनने फसवले आहे की कोणी त्याच्याकडून जाणीवपूर्वक बनावट कागदपत्रे खरेदी केली आहेत, याबाबतही तपास करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

या कंपन्यांची बनावट कागदपत्रे

श्रीराम जनरल इन्शुरन्स, बजाज अलायन्स, चोला एसएम, दी न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, फ्युचर जनरल इन्शुरन्स, रॉयल सुंदरम, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, महावितरणची इलेक्ट्रिक बिले, निवडणूक ओळखपत्रे

इन्शुरन्स काढताना काळजी घ्या

इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडूनच इन्शुरन्स काढावा. तमसीनसारख्या एजंटने फसवणूक केल्यास अपघातानंतर विमा मिळणार नाही. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पाटील यांनी केले. सहायक निरीक्षक संपत पवार, कर्मचारी फिरोज बागवान, अतुल गायकवाड, प्रसाद जंगलीवाड आणि अजिनाथ काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी नेत्यांची राष्ट्रीय परिषद उद्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वनराई संस्थेतर्फे येत्या शनिवारी (पाच डिसेंबर) शेतकरी नेत्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'संगम २०१५' या नावाच्या या परिषदेचे उद् घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांच्या हस्ते होणार आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, अमित वाडेकर आणि प्रकाश जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टिळक रोडवरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात होणाऱ्या या परिषदेला खासदार अनिल शिरोळे, खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, पाशा पटेल, सदाभाऊ खोत, कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर ऑफ असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एच. पी. सिंग, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत. कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप होईल.

या परिषदेत कृषी सचिव दिनेश जैन, कृषी आयुक्त विकास देशमुख, विजय कोलते, हरियाणाचे शेतकरी नेते रामपाल जाट, कृषी आयुक्त विकास देशमुख, गुणवंत पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. राम खर्चे, पाशा पटेल आदी मार्गदर्शन करतील. याचबरोबर बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यावरही यात चर्चा होणार आहे. त्यातून तयार होणारा मसुदा केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे धारिया यांनी स्पष्ट केले.

या परिषदेदरम्यान नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वनराईतर्फे मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार शरद सोनावणे उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकी यात्रेला आळंदीत प्रारंभ

0
0

हैबतराव सेवा पुरस्काराचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घंटानाद, गुरू हैबतबाबा पायरी पूजन आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी अभिषेक या कार्यक्रमांनी श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिकी यात्रेला गुरुवारपासून (तीन डिसेंबर) प्रारंभ झाला. या प्रसंगी हैबतरावबाबा सेवा पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.

कार्तिकी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत आणि टाळमृदंगाच्या गजरात यात्रेला प्रारंभ झाला. पहाटे मुख्य मंदिरात घंटानाद करण्यात आला. त्यानंतर माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला. पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर आणि बाळासाहेब आरफळकर यांनी सपत्निक हैबतबाबांच्या पायरीचे पूजन केले. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, अभय टिळक, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर या वेळी उपस्थित होते.

वीणा मंडपात योगीराज ठाकूर आणि बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन झाले. रात्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे आगमन आळंदीत झाले. या सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चोपदार फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा श्री हैबतरावबाबा सेवा पुरस्कार पालखी सोहळ्यातील रथामागील अकरा क्रमांकाच्या गोऱ्होकार दिंडीला देण्यात आला. मानपत्र, शाल आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त ज्ञानेश आश्रम आणि अंध शिक्षण संस्था यांच्या वतीने देहू फाटा येथे अंधांसाठी ब्रेल लिपीतील ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. व्यासपीठाचे नेतृत्त्व गणपत महाराज जगताप करीत आहेत. या सोहळ्यात काकड आरती, पारायण, गाथा भजन, प्रसाद कार्यक्रम, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार उलगडणार राजकीय जीवनपट

0
0

'लोक माझे सांगाती' आत्मकथेचे दिल्लीत प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविणारे...भूखंड घोटाळ्यांपासून दाऊदशी संबंधांपर्यंत अनेक आरोपांना तोंड देणारे... गेल्या कित्येक दशकांमध्ये राज्य व देशातील राजकीय इतिहासाचे जवळचे साक्षीदार असणारे मुरब्बी राजकारणी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपल्या राजकीय- सामाजिक जीवनाचा इतिहास आत्मकथनाच्या माध्यमातून उलगडणार आहेत.

या निमित्ताने गेल्या काही दशकांमधील महत्त्वाच्या घडामोडींचा पटही उलगडला जाणार आहे. राजहंस प्रकाशनातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती...' या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन दहा डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. हे पुस्तक त्याच दिवशी राज्यात उपलब्ध होईल, अशी माहिती 'राजहंस'चे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार असलेल्या पवारांनी राष्ट्रीय राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हे आत्मकथन प्रकाशित करण्यात येणार आहे. हे आत्मकथन चार विभागांत असून, स्वतः शरद पवार यांनी आपल्या राजकीय वाटचालीत महत्त्वाचे टप्पे यात सविस्तरपणे उलगडले आहेत. पवार यांनी सांगितलेल्या गोष्टींवर अभय कुलकर्णी, सुजाता देशमुख आणि 'राजहंस'च्या संपादकीय मंडळाने संपादकीय संस्करण केले आहेत, असे डॉ. बोरसे यांनी स्पष्ट केले. सुमारे चारशे पानांच्या या पुस्तकात ३० पाने छायाचित्रांसाठी देण्यात आली आहेत.

अनेक घटनांवर पडणार प्रकाश

पुलोदची स्थापना, मुख्यमंत्रिपद, केंद्रीय मंत्रिपद, राष्ट्रवादीची स्थापना, कृषी क्षेत्रासह देशातील विविध समस्या, महाराष्ट्राची परिस्थिती, पवार यांनी केलेले पक्षबदल त्यामागची भूमिका, भूखंड घोटाळे, दाऊदशी असलेले कथित संबंध आदी विषयांवर पवार यांनी आत्मकथनाच्या माध्यमातून थेट भाष्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

0
0

तांबेंच्या राजीनाम्याने उडाली खळबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर, सभागृह नेते यांच्यावर आरोप करून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

महापौरबदलाच्या हालचाली सुरू असतानाच घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या हितासाठी नागरिकांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक पुढे ढकलले जात असल्याचा आरोप करून तांबे यांनी या प्रकरणाला महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते शंकर केमसे जबाबदार असल्याचा उल्लेख राजीनाम्यात केला आहे. तांबे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर धनकवडी भागाला आता कोणतेही मोठे पद दिले जाणार नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. स्थायीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या पदापासून वंचित राहिलेल्या धनकवडे यांना पक्षाने चांगले पद द्यावे, अशी मागणी करून तांबे, अप्पा रेणुसे, सुवर्णा पायगुडे, मोहिनी देवकर यांनी पक्षाध्यक्षांची भेट घेतली होती. धनकवडे यांच्याकडे महापौरपद आल्यानंतर मात्र तांबे, धनकवडे यांच्यात अंतर पडल्याचे दिसून आले. कोर्टाने आदेश दिल्याने धनकवडी भागातील नागरिकांच्या हितासाठी येथील मोकळ्या जागेवर उद्यानाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव तांबे यांनी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी महापौरांची मदत न झाल्याने शेजारी प्रभाग असलेल्या या दोघांमधील संबध अधिकच ताणले गेले. धनकवडे यांचा महापौरपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपत आहे. त्याला मुदतवाढ मिळावी, या साठी धनकवडे प्रयत्नशील असतानाच पक्षातील जवळच्या नगरसेवकाकडूनच अशा पद्धतीने आरोप झाल्याने धनकवडे अडचणीत आले आहेत.

महापौरांच्या कृतीचे आश्चर्य

ज्या भूखंडावर बागेचे आरक्षण टाकायचे आहे. तेथे इमारत बांधण्यास एक बांधकाम व्यावसायिक इच्छूक आहे. हा व्यावसायिक महापौर यांच्या विशेष मर्जीतील असल्याने तेथे आरक्षण पडू नये, यासाठी महापौर विशेष प्रयत्नशील असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. या प्रभागात उद्यान व्हावे, यासाठी येथील मतदार एकत्र येऊन कोर्टाकडून आदेश आणतात. परंतु याच प्रभागात वास्तव्यास असणारे महापौर मात्र आरक्षणाचा प्रस्ताव पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पवारांकडून कानउघाडणी ?

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी काही जणांशी संपर्क साधून कानउघाडणी केल्याची चर्चा महापालिकेत आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी असे प्रकार चव्हाट्यावर येणे योग्य ठरणार नाही, अशी सूचना त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणसंस्थांचा विस्तार ग्रामीण भागात आवश्यक

0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द असली, तरी परिस्थितीमुळे त्यांच्यासमोर खूप मोठ्या अडचणी उभ्या राहत आहेत. या परिस्थितीमध्येही होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न कॉलेजसारख्या संस्थांनी ग्रामीण भागामध्ये विस्तार करणे गरजेचे आहे,' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी व्यक्त केले.

गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या सौर-पवन मिश्र ऊर्जा प्रकल्पाचे उद् घाटन बापट यांच्या हस्ते झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मेधा कुलकर्णी, उच्चशिक्षण विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कॉलेजमध्ये व्होकेशनल एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेचेही बापट यांच्या हस्ते उद् घाटन झाले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात कॉलेजला आपल्या विस्तारासाठी जागा मिळण्याबाबत डॉ. एकबोटे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना आवाहन केले. या आवाहनासंदर्भाने बापट यांनी ही भूमिका मांडली.

बापट म्हणाले, 'शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातून शहरात येऊन शिकणाऱ्या, तसेच ग्रामीण भागातच राहून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या खूपच गंभीर आहेत. सध्या शहरांमध्ये जागांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत मॉडर्न कॉलेजने ग्रामीण भागात आपल्या शाखा सुरू करण्यावर भर द्यायला हवा.' देशाच्या विकासासाठी पाणी, रस्ते आणि वीज या तीन मूलभूत नागरी गरजांवर व्यापक संशोधन होण्याची गरज आहे. मॉडर्न कॉलेजचा मिश्र ऊर्जा प्रकल्प हा अशाच संशोधनांना चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. गाडे यांनीही समाजोपयोगी संशोधनांवर भर देण्याबाबत उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. खरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एकबोटे यांनीही आपले मनोगत मांडले.

देशाकडे अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्रभावीपणे वापर होत नसल्याने ऊर्जासंकट कायम राहात आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्रभावी वापर होण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि तुलनेने स्वस्त तंत्रज्ञान शोधण्यासाठीची संशोधने देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. संशोधकांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. - डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मान’ गेला अन् ‘धन’ही

0
0

अपात्र नगरसेवकांकडून मानधनाची वसुली

Chaitanya.Machale@timesgroup.com

खोटी कागदपत्रे दिल्याने नगरसेवकपद रद्द झालेल्या दोन नगरसेवकांकडून महापालिकेने त्यांना दिलेल्या मानधनाची रक्कम वसूल केली आहे. नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर पूर्वलक्ष्यी प्रभावाने पालिका प्रशासनाने दोघांकडून चार लाख रुपयांची रक्कम वसूल करून ती पालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे. नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर संबधितांवर कारवाईचा बडगा उगारून प्रशासनाने प्रथमच मानधन आणि सभा बैठकीच्या भत्त्यांसाठी दिलेली रक्कम परत घेतली आहे. कल्पना बहिरट आणि भरत चौधरी अशी या माजी सदस्यांची नावे आहेत.

पालिकेच्या साडेतीन वर्षांपूर्वी (२०१२) झालेल्या निवडणुकीत मंगळवार पेठेतील प्रभाग क्रमांक ४० अ मधून कल्पना बहिरट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिनिटावर विजयी झाल्या होत्या. निवडणूक लढविताना त्यांनी दिलेला जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर त्यांनी बनावट जातीचा दाखला दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे अवघ्या एका वर्षातच हायकोर्टाने बहिरट यांचे सभासदत्व रद्द करण्याचा निकाल दिला होता. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक ६३ अ मधून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या भरत चौधरी यांनीही निवडणूक लढविताना दिलेला कुणबी जातीचा दाखला खोटा असल्याची तक्रार करण्यात आली होती. या बाबत हायकोर्टात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर थेट कोर्टाने जातपडताळणी प्रमाणपत्र समितीला याबाबत विचारणा करत माहिती मागविली होती. समितीने केलेल्या चौकशीमध्ये चौधरी यांनी सादर केलेला जातीचा दाखलाही बनावट असल्याचे लक्षात आल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे सभासदत्व रद्द केले.

निवडणूक लढविताना या सभासदांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून पालिकेची फसवणूक केली आहे. त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याने यापूर्वी पालिकेने या सभासदांना दिलेले मानधन तसेच सभाभत्ता याची वसुली तातडीने करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना दिले होते. या सभासदांना यापूर्वी विविध सभांसाठी पालिकेच्या नियमाप्रमाणे दिलेला भत्ता आणि मानधन याची वसुली करुन त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशानुसार पालिकेने या दोन्ही सभासदांकडून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ४ लाख रुपये वसूल करून पालिकेच्या तिजोरीत भरले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार बहिरट यांच्याकडून ८२ हजार ३८८ रुपये, तर चौधरी यांच्याकडून ३ लाख १८ हजार ९१३ रुपये वसूल करण्यात आल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. नगरसेवकांकडून अशा प्रकारे पालिकेने पहिल्यांदाच मानधन वसूल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

गेल्या साडेतीन वर्षात पालिकेतील पाच नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. यामध्ये प्रिया गदादे, कल्पना बहिरट, बापू कांबळे, भरत चौधरी, विजय देशमुख यांचा समावेश आहे. त्यापैकी गदादे या पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाल्या, तर कांबळे यांनी कोर्टात केस दाखल केल्याने पदमुक्तीला स्थगिती मिळाली आहे. देशमुख यांच्याबाबत अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग तीन दिवसांत तिसरा रेल्वेबळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी ते देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान सलग तीन दिवसांत तीन जणांचा बळी गेला आहे. गुरुवारी (३ डिसेंबर) खांबाला धडकून ३० वर्षीय युवक रेल्वेतून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी निकिता अगरवाल या विद्यार्थिनीचा पडून मृत्यू झाला होता, तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन जण जखमी झाले होते. बुधवारी याच ठिकाणी एका महिलेचा मृतदेह रूळावर आढळून आला होता.

आकुर्डी रेल्वे स्टेशनच्यापुढील १६ नंबर खांबाला धडकून त्याच रेल्वेखाली आल्याने गुरुवारी (३ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसातही देहूरोड व पिंपरी या दोन ठिकाणी रेल्वे अपघातात दोन जणांचा बळी गेला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. या सलग अपघात सत्रांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन नगरसेवकांचे आळंदीत पद रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर चाकुने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ही कारवाई केली.

औंधकर यांच्यावर चाकूने वार केल्याप्रकरणी पोलिसांनी चितळकर, कुऱ्हाडे यांच्यासह चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. जिल्हाधिकारी राव यांनी दोघांचेही नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकूळ’ कंपनीच्या दूध विक्रीवर बहिष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दूध विक्रीच्या कमिशनमध्ये वाढ देण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या गोकूळ दूध कंपनीचे दूध न विकण्याचा निर्णय शहरातील दूध विक्रेत्यांनी घेतला. आजपासून शहरातील गोकूळच्या दूध विक्रीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. त्यामुळे या कंपनीचे दूध उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले.

पुणे जिल्हा दूध वितरक संघाची याबाबत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. कमिशन वाढीसाठी आंदोलन झाले. त्यानंतर चितळे आणि गोकूळ दूध कंपनीच्या प्रतिनिधींनी कमिशन वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. चितळे दूध कंपनीने नुकतेच कमिशन वाढवून दिले. मात्र, गोकूळ दूधने कमिशन वाढवून दिले नाही. त्यामुळे किरकोळ दूध विक्रेते, उपवितरक व मुख्य वितरकांच्या बैठकीत गोकूळ दूध न विकण्याचा निर्णय घेण्यात आला; तसेच गायीच्या दुधामध्ये २० टक्के तर, म्हशीच्या दुधामध्ये १० टक्के कमिशन वाढ देण्याची मागणीही करण्यात आली, अशी माहिती सचिन निवंगुणे यांनी दिली. राजू पासलकर, सचिन लोहकरे, संजय चव्हाण, विलास सोमा, चंद्रकांत कोरडे, संतोष चांदोरे आदी बैठकीत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उजनी धरणात पाणी सोडू नये’

0
0

प्राधिकरणाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील चार धरणांमधील दहा टीएमसी पाणी सोलापूर येथील उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. १४ डिसेंबरला प्राधिकरणासमोर नव्याने ​​सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

प्राधिकरणाच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या एस. व्ही. सोडल यांच्या जागेवर नवीन सदस्य नेमण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. पुण्यातील चासकमान, भामा आसखेड, आंद्रा आणि मुळशी या चार धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचा आदेश प्राधिकरणाने २६ ऑक्टोबर रोजी दिला होता. त्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका आमदार बाबूराव पाचर्णे आणि आमदार सुरेश गोरे यांनी हायकोर्टात दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि गौतम पटेल यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. कोर्टाने पाचर्णे आणि गोरे यांचे म्हणणे मान्य करून प्राधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली, तर नव्याने १४ डिसेंबर रोजी प्राधिकरणासमोर सुनावणी घेण्याचा आदेश दिला. पुण्याचे पाणी सोलापूरला देण्यास पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी नकार दर्शविला होता. पुण्यातील धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी असताना उजनी धरणात पाणी सोडणे योग्य नसल्याचा अहवाल राव यांनी सादर केला होता.

उजनीमध्ये सुमारे ५४ टक्के अचल पाण्याच्या साठा आहे. यापूर्वी दहा वर्षांपैकी आठ वर्षे अचल पाणी वापरण्यात आले आहे. त्याप्रमाणे यावर्षीही अचल पाण्याचा साठा वापरावा, असे आमदार पाचर्णे आणि गोरे यांचे म्हणणे होते. प्राधिकरणाचे सदस्य सोडल हे उजनीचे लाभार्थी असल्याने वैयक्तिक लाभातून हा निर्णय घेतल्याचे आमदार पाचर्णे आणि गोरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर कोर्टाने सोडल यांना पदाचा राजीनामा देण्याचा आदेश बुधवारी दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. सोडल यांच्या जागी नवीन सदस्याची नियुक्ती करून सुनावणी घेण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images