Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रंगली तालवाद्यांची मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एखाद्या इलेक्ट्रिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मिलाफातून तब्बल चौदा तालवाद्ये वाजविण्याचा विक्रम पुण्यातील तबलावादक जयवंत उत्पात यांनी रविवारी केला. 'जयसॉनिक' या वाद्यावर चौदा तालवाद्यांची धून छेडत उत्पात यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हिंदी आणि मराठी गाण्यांसोबत त्यांनी सादर केलेला राग चारुकेशी उपस्थितांची दाद मिळवून गेला.

कोथरूड येथील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. सोनल उत्पात, अनंतराव भोकरे आणि वेल विशर्स ग्रुप यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'दिन सारा गुजरा', 'याद किया दिल ने', 'जाने क्यो लोग मोहब्बत', 'ए मालिक तेरे बंदे हम' या प्रसिद्ध गाण्यांना उत्पात यांनी तालवाद्यांची सांगत केली. त्यासह 'रूप पाहता लोचनी' ही रचना आणि भजनांनी पुणेकरांना तालवाद्यांची आगळीवेगळी अनुभूती दिली. उत्पात यांनी 'जयसॉनिक' आणि तालवाद्यांतले साम्य दाखवून देण्यासाठी त्यांची तबला, ढोलकी, पखवाज व ढोलक या वाद्या सोबतची जुगलबंदीही सादर केली.

अत्याधुनिक सॉफ्टवेअर व हार्डवेअरच्या मिलाफातून ढोल, ढोलक, तबला, ढोलकी, पखवाज अशी किमान चौदा तालवाद्ये वाजवू शकणाऱ्या 'जयसॉनिक' या इलेक्ट्रॉनिक तालवाद्याची निर्मिती संगणक अभियंते व तबलावादक जयवंत उत्पात यांनी केली आहे. उत्पात हे उस्ताद अल्लारखा खाँ यांचे शिष्य आहेत. सर्व वाद्यांना जोडणारे एकच वाद्य तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा विचार सुरू होता. त्यातूनच या उपकरणाची निर्मिती केल्याचे; तसेच हे करत असताना देशी तालवाद्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेतल्याचे उत्पात यांनी सांगितले. गोविंद भिलारे (पखवाज), चारुदत्त फडके (तबला), प्रशांत पांडव (ढोलक), निलेश पाठक (ढोलकी), सुनील जाधव (कीबोर्ड), प्रशांत पाठक (व्हायोलीन) यांनी वाद्यांची, तर पूर्णिमा दीक्षित व अरविंद देशपांडे यांनी गायनाची साथ केली. मंजिरी धामणकर यांनी निवेदन केले.

चौदा तालवाद्यांचा विक्रम

> तब्बल चौदा तालवाद्ये वाजविण्याचा विक्रम

> हिंदी, मराठी गाण्यांसोबत राग चारुकेशीलाही दाद

> 'दिन सारा गुजरा', 'याद किया दिल ने', 'जाने क्यो लोग मोहब्बत', 'ए मालिक तेरे बंदे हम' या प्रसिद्ध गाण्यांना तालवाद्यांची संगत

> तबला, ढोलकी, पखवाज व ढोलक या वाद्यांसोबतही जुगलबंदी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लायसन्ससाठी साडेतीन महिने का लागले?

$
0
0

'आरटीओं'ची लायसन्स विभागाला नोटीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे लायसन्ससाठी अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीला लायसन्स मिळण्यासाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला. या प्रकरणी लायसन्स विभागाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कोथरूड परिसरातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या योगेश चिथडे यांना नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर लायसन्स मिळाल्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणला. 'आरटीओ'च्या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीने लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर जास्तीतजास्त १५ दिवसांत त्या व्यक्तीच्या घरी लायसन्स पोहोचले पाहिजे. मात्र, चिथडे यांना लायसन्ससाठी साडेतीन महिने वाट का पहावी लागली, याची विचारणा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे केली आहे.

कायद्याप्रमाणे एका व्यक्तीला एका वेळेस एकच लायसन्स बाळगता येते. त्यामुळे चिथडे यांना त्यांच्याकडील एक लायसन्स आरटीओकडे जमा करावे लागेल. त्यासंबंधीची कायदेशीर नोटीस त्यांना पाठविण्यात येईल आणि सात दिवसांत लायसन्स जमा करण्यास सांगितले जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, लायसन्स विभागाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग?... ही तर ‘आडवाट’

$
0
0

Swpnil.Shinde@timesgroup.com

पुणे : पावसामुळे निसरडा रस्ता... दुभाजकामध्ये वाढलेली झाडे... नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक अन् अचानक समोर येणारी जनावरे...

एखाद्या गावातील रस्त्यावरचे वाटणारे हे चित्र आहे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि बेंगळुरू या चार महानगरांना जोडणाऱ्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे.

या महामार्गावरून पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करताच आपल्याला अशा साऱ्या अडचणींचा एकापाठोपाठ एक अनुभव येतो. महामार्गावरील पुलांची आणि रस्तारुंदीकरणाची अपूर्ण कामे, वाहनांचा अमर्याद वेग, खंबाटकी बोगद्यातील विद्युतदिव्याची दुरवस्था, तुटलेले दुभाजक, महामार्गावरील घुसखोरी व नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक यामुळे अशा अनुभवांची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे सर्व अनुभव टाळून, या रस्त्यावरील प्रवास सुकर व्हावा म्हणून, प्रशासनाकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच अनेकांना प्राणांस मुकावे लागले आहे.

एकीकडे अपघाताचे वाढते प्रमाण व टोलवसुली सुरूच आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दर्जात कोणतीही सुधारणा अनुभवायला मिळत नाही. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना प्रशासनाने अनेक बाबींची आवश्यक काळजी घेतलेली दिसत नाही. महामार्ग चौपदीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणांवरचे दिशादर्शक फलक काढण्यात आले असून, काही ठिकाणी या संदर्भात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावले गेले नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याबरोबरच वाहतुकीवर ताण येत असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र सगळीकडेच दिसून आले.

या महामार्गावर जागोजागी सुरू असलेली दुरुस्तीची कामे इतकी रेंगाळली आहेत, की 'दुरुस्ती नको, पण डायव्हर्जन आवर,' असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. जागोजागी रस्ते वळविल्यामुळे येथून वेगाने वाहने हाकताच येत नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्याबरोबरच अनेक ठिकाणी

गावांजवळ सर्व्हिस रोडची सुविधा अपुरी किंवा चुकीची बनल्यामुळे या गावांजवळ वाहनचालकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. एकीकडे टोलच्या रकमेत दरवर्षी भरमसाट वाढ होत असताना त्या तुलनेत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या नावाने ठणठणाटच असल्याचे या रस्त्यावरून जाताना दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी फोडणार स्वतंत्र बायपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस-वे) घाटात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यान स्वतंत्र 'बायपास' निर्माण करण्यास सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयासह इतर संबंधित खात्यांची परवानगी सहा महिन्यांत मिळविण्याचे निर्देश देऊन २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत, त्याची क्षमता विस्तारण्याचा प्रकल्प रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच मांडला होता. आघाडी सरकारच्या कालावधीतही या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न झाले; पण त्याला मान्यता मिळू शकली नाही. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या पहिल्याच बैठकीत सुमारे ३ हजार चारशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वेच्या प्री-फ्लेक्सिबिलिटी रिपोर्टलाही या वेळी मान्यता देण्यात आली.

'पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेची क्षमता वाढविली जाणार असून, दोन बोगदे, दोन व्हायडक्ट आणि एलिव्हेटेड रस्ते तयार केले जाणार आहेत. त्याशिवाय एक्स्प्रेस-वेची सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,' अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

एक्स्प्रेस-वेवर खालापूर ते लोणावळा दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होते. एखादा अपघात झाला, तर वाहनचालकांना तास न् तास अडकून राहावे लागते. त्यामुळे एक्स्प्रेस-वेची क्षमता विस्तारण्यासाठी स्वतंत्र बायपास निर्माण केला जाणार आहे. सुमारे १२ किमी लांबीच्या या मार्गावर आठ किमीचा बोगदा असेल, तर उर्वरित मार्ग एलिव्हेटेड असेल. घाटातील या नव्या रस्त्यामुळे हलक्या आणि जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार होऊ शकतील. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊ शकेल, असा दावा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला.

वाढीव टोल नाही

रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार एक्स्प्रेस-वेच्या क्षमता विस्तारीकरणासाठी पस्तीसशे कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. गेल्या चार वर्षांत तंत्रज्ञानात अनेक बदल झाले असून, सध्याच्या दर पत्रकांनुसार प्रकल्पाच्या सुधारित खर्चाचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतरच विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल. तरीही, यासाठी येणाऱ्या खर्चाचा कोणताही वाढीव बोजा एक्स्प्रेस-वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर लादला जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑडिट अहवालांना फुटले पाय

$
0
0

विविध विभागांचे ९६ ऑडिट अहवाल झाले गायब

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या पुणे महापालिकेच्या ऑडिट विभागाला आपण केलेल्या कामांचे अहवाल संभाळणे जमत नसल्याचे समोर आले आहे. विविध विभागांचे तब्बल ९६ ऑडिटच्या अहवालांना पाय फुटले असून हे अहवाल पालिकेतून गायब झाल्याची माहिती सर्वसाधारण सभेत सोमवारी उघडकीस आली.

विशेष म्हणजे ऑडिट विभागाने केलेल्या या अहवालाची प्रत पा‌च कार्यालयांना पाठविली जात असताना या कार्यालयातही हे अहवाल मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांनी संगनमताने हा कारभार केला असून यामुळे पालिकेची शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. अहवाल गायब झाल्याची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

महापालिका प्रशासनाला ऑडिटबद्दल विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरामधून ही माहिती समोर आली आहे. पालिकेकडून २००८-०९ ते २०१४-१५ या कालावधीत विविध विभागांचे ९५७ ऑडिटचे अहवाल तयार करण्यात आले होते. त्यापैकी ३७६ अहवालामध्ये ऑडिट विभागाला आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या होत्या. या अहवालामधील ९६ अहवाल गायब झाल्याचा आरोप शिंदे यांनी सभागृहात करून पालिकेचे सह आयुक्त, तसेच मुख्य लेखापरीक्षक अमरिष गालिंदे यांना धारेवर धरले. गेले अनेक वर्षांपासून हे अहवाल गायब असतानाही याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने अभिलेख जतन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल का नाही केले, अशी विचारणा सभागृहात करण्यात आली. अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे अहवाल गायब केले असून यामुळे पालिकेचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. यातील बहुतांश अहवाल हे बांधकाम विभागाशी संबधित असताना याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा प्रश्नही सभागृहात उपस्थित करण्यात आला. पालिकेच्या लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केल्यानंतर त्याच‌ी एक प्रत माहितीसाठी नगरसचिव कार्यालय, मुख्य लेखापाल, आयुक्त कार्यालय अशा पाच विभागांकडे जाते. मात्र हे ९६ अहवाल या कोणत्याही कार्यालयाकडे सापडत नसल्याने संगनमताने हा कारभार झाला आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. बांधकाम विभागाच्या ऑडिट अहवालात काढलेल्या आक्षेपानुसार परस्पर दंड कमी करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का, असा सवाल उपमहापौर आबा बागुल यांनी केला. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर यासंदर्भात आयुक्तांनी चौकशी करून दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश महापौर धनकवडे यांनी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे अधिकारी पीएमआरडीएकडे नकोत

$
0
0

महापौरांचे सर्वसाधारण सभेत आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत अधिकाऱ्यांची कमतरता असताना पालिकेचे अधिकारी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) यापुढील काळात वर्ग करू नयेत, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिले. महापालिका आयुक्तांनी कोणतीही परवानगी न घेता परस्पर पीएमआरडीएकडे मुलाखती गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सभागृहात दिले.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पालिकेकडेच अपुरे अधिकारी असताना अनेक अधिकारी परस्पर पीएमआरडीएकडे जात असून, आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे का? असा प्रश्न काँग्रेसच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला. परस्पर पीएमआरडीएकडे गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. पालिकेतील सात ते आठ अभियंत्यांनी पीएमआरडीएच्या मुलाखती दिल्या असून, काही दिवसांपूर्वी पालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनीही आपली बदली पीएमआरडीएमध्ये करून घेतली आहे. हे मुलाखती देणारे अधिकारी खरवडकर यांच्या मर्जीतील असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

पालिकेकडेच अधिकारी कमी असताना काही अधिकाऱ्यांना पीएमआरडीएकडे बदली करणे शहराच्या दृष्टीने योग्य होणार नाही. पालिका आयुक्त म्हणून परस्पर अधिकाऱ्यांची बदली पालिकेतून पीएमआरडीएकडे केल्यास या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशाराही काँग्रेसने दिल्याचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पालिकेची परवानगी न घेता मुलाखतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. यापुढील काळात पालिकेने एकाही अधिकाऱ्याला पीएमआरडीकडे वर्ग करु नये, असे आदेश महापौर धनकवडे यांनी दिले. तर परवानगी न घेता मुलाखतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

खंडपीठासाठीही ठराव

शहरात हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे, याला पाठिंबा देणारा ठराव सोमवारी सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. पुणे महसुली खात्याचा विभाग असून त्याच्या अखत्यारित सहा जिल्हे येतात. या जिह्यांना पुणे हे जवळचे शहर आहे. शहरात हायकोर्टाचे खंडपीठ झाल्यास सर्वांची गैरसोय दूर होईल. अनेक दावे वेळेत निकाली निघतील. पुण्यात हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी मुख्यमंत्री, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे करण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

$
0
0

हिंगण्यातील प्रकार; पाच जणांच्या विरोधात गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुत्र्याला घेऊन मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंगणे खुर्द येथील कॅनॉल परिसरात सोमवारी सकाळी घडली. घटनेत संबंधित व्यावसायिक गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू नामदेव कापरे (वय ५३, रा. श्रीकृष्ण कुंज, आपटे कॉलनी, हिंगणे खुर्द) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापरे यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. कापरे आणि त्यांचा मुलगा व्यवसाय पाहतात. कापरे दररोज सकाळी कुत्र्याला घेऊन हिंगणे खुर्द येथील कॅनॉलच्या रस्त्याने फिरायला जातात. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कॅनॉल रस्त्याने जात असताना २५ ते ३५ वयोगटातील दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी कापरे यांना तुमचा कुत्रा छान आहे, चावतो का अशी विचारणा केली.

त्यावेळी त्यांनी कुत्रा चावत नसल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच एका व्यक्तीने कापरे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. दुसऱ्या व्यक्तीने त्यांना ढकलून दिले. त्यानंतर कापरे यांना दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. कापरे यांनी कॅनॉलच्या पाण्यात डोळे धुण्याचा प्रयत्न केला असता आणखी तीन जण तेथे आले. त्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार केले.

दरम्यान, कापरे यांनी हातावर वार घेतल्यामुळे त्यांचे एक बोट तुटले. तसेच, हाताला गंभीर जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केल्यामुळे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. पिंगळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत एसटीची ‘दिवाळी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांत सातत्याने तोट्यात चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) यंदाच्या दिवाळीत खरोखरीच दिवाळी झाली आहे. एसटीने या दिवाळी हंगामात ३२ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात ३६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) सभागृहामध्ये एसटीची आढावा बैठक झाली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासह राज्यातील सर्व विभाग नियंत्रक या बैठकीला उपस्थित होते. उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिल्यामुळे आणि गणपती व दिवाळीत सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने रावते यांनी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

खासगी क्षेत्राशी स्पर्धा करीत एसटी आता आधुनिकतेकडे झेप घेत आहे. प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित सेवा देण्यासाठी पावले उचलली जात आहोत, असे रावते यांनी सांगितले. तसेच, एसटीचे अधिकारी हे एसटीचे विश्वस्त आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे. त्यांच्या जीवावरच एसटीचा कारभार सुरू असल्याचे रावते म्हणाले.

रावतेंनी खडसावले

एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाबरोबरच रावते यांनी त्यांना खडतर शब्दात काही सूचनाही केल्या. एसटी पाससाठी पैसे नसल्याने लातूर येथे एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. त्यानंतर एसटीने मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी 'स्वाती अभय पास' योजना जाहीर केली. त्यासाठी नऊ कोटी रुपये निधी सरकारने उपलब्ध केला आहे. मात्र, त्यानंतरही लातूरमध्ये विद्यार्थ्यांकडून पाससाठी पैसे मागितले गेल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. एसटीच्या नियंत्रकांना या योजनेची माहिती नसेल, तर विभागीय नियंत्रकांनी ही माहिती त्यांना दिली पाहिजे. आणि त्यांनाही योजनांची माहिती नसेल, तर ते दुर्दैव आहे, असे रावते यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राज्यातील कायदा समावेशक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला जादूटोणा विरोधी कायदा मानवी जीवनातील सर्व अंगांना व्यापणारा आहे. तसेच, तो जगातील पहिला अंधश्रध्दाविरोधी कायदा आहे. आपल्या राज्याला वारकरी संप्रदाय आणि समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभल्यानेच हा कायदा संमत झाला,' असे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी व्यक्त केले.

शहर पोलिसांच्यावतीने जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसाराबाबत पोलिस आयुक्तालयात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. मानव बोलत होते. या प्रसंगी पोलिस उपायुक्त दीपक साकोरे आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या वेळी गुन्हे शाखेच्या व इतर पोलिस अधिकाऱ्यांना मानव यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. मानव म्हणाले, 'देशात छत्तीसगड, बिहार आणि ओडिशा या तीन राज्यात अंधश्रध्दा विरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. मात्र, ते तकलादू आहेत. त्यामध्ये बिहारमधील कायद्यामध्ये फक्त जादूटोण्याच्या संशयाने मारहाण केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येते. त्याउलट राज्यातील कायदा हा मानवी जीवनातील सर्व अंधश्रध्देच्या विषयांना सामावून घेणारा आहे. राज्यात कायदा लागू केल्यापासून दोनशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले करण्यात आले आहेत. समाजकल्याण आयुक्तालयाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात या कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पोलिसांना या कायद्याचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशकरासाठी खडकीत फेरनिविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खडकी कॅटोन्मेंट बोर्डाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाहन प्रवेशकरासाठी फेरनिविदा काढण्यात यावी असा निर्णय बोर्डाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. कॅटोन्मेंट बोर्डाच्या उत्पन्नवाढीसाठी बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर वाहन प्रवेशकर लावण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. २०१४-१५ मध्ये आलेल्या निविदेद्वारे बोर्डाला १६ कोटी रुयांचे उत्पन्न मिळाले होते.

यंदा, मात्र याच कामासाठी सोलापूर कन्स्ट्रक्शन अँड फायब्रिकेशन प्रायव्हेट कंपनीने १०.७ कोटी रुपयांची सर्वाधिक रकमेची निविदा भरली आहे. यामुळे बोर्डाला गेल्या वर्षाच्या मानाने सहा कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. या बाबत काय निर्णय घ्यावा यासाठी बोर्डाने कायदेसल्लागाराकडे मत मागवले होते. कायदेसल्लागारांनी बोर्ड सर्व निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी बोर्डावर आली. फेरनिविदा काढल्यामुळे जास्त रक्कम मिळू शकेल अशी बोर्डाला अपेक्षा असल्याने त्यांनी हानिर्णय घेतला. येत्या पंधरा दिवसांत फेरनिविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तातडीने महामार्ग दुरुस्तीचे आदेश

$
0
0

पुणे : महामार्गांचे रुंदीकरण, टोलनाके आणि अन्य कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देऊन राज्याच्या मुख्य सचिवांनी सोमवारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अर्धवट असलेली मागे लवकर पूर्ण करण्याचे आदेशही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतली. बैठकीला राज्यातील जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे (एनएचए) अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महामार्गांवरील कामे, रस्ते रुंदीकरण, टोलनाक्यांवर होणारा विलंब या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान क्षत्रिय यांनी नॅशनल हायवे अथरिटीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून त्यांना कामे लवकर करण्याचे आदेश दिले.

खेडशिवापूर, शिवरे आणि पुनावळे या टोलनाक्यांजवळील कामे प्रलंबित आहेत. रुंदीकरणाचीही​ कामे अपूर्ण आहेत. भूसंपादन झाले नसल्याने ही कामे रखडली असल्याचा दावा नॅशनल हायवे अथरिटीच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असल्याचे म्हणणे महसूल खात्याकडून मांडण्यात आले. त्यानंतर क्षत्रिय यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाने ओलांडली ‘डेडलाइन’

$
0
0

वारजे पुलाचे काम सुरूच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बायपासवर वारजे येथे सुरू असलेल्या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची 'डेडलाइन' राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्राला दिली होती. मात्र, ही 'डेडलाइन' संपल्यानंतरही पुलाचे काम सुरूच असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.

डुक्कर खिंडीजवळ १५ नोव्हेंबरला मिनीबस आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी (एनएचएआय), रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी आणि आमदार विजय काळे यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर कात्रज बोगदा ते किवळे फाट्यापर्यंत पाहणी केली. या वेळी या मार्गावरील पुलांचे काम किती दिवसांत पूर्ण होऊ शकेल, अशी विचारणा 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी त्यांनी वारजे पुलाचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत आणि बावधन येथील दोन्ही पुलांचे काम पाच डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे शक्य असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत.सोमवारी सकाळी महामार्गावर चांदणी चौकापासून काही अंतरावर दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. रस्त्याच्या कडेला असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात, दुचाकी खड्ड्यात आदळल्याने हा अपघात झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुर्दशेमुळे आणखी एक बळी गेला आहे. वारजे येथे पुलाचे काम सुरू असल्याने चांदणी चौकाकडून कात्रजकडे जाताना सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळविण्यात आली आहे.

बावधन येथेही दोन पुलांचे काम सुरू असून पाच डिसेंबरपर्यंत या पुलांचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, रिलायन्स इन्फ्राच्या कामाची गती पाहता त्या पुलांचे कामही दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल का, प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

$
0
0

पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावर गेल्या काही वर्षांत चांदणी चौक ते डुक्कर खिंड या दरम्यानचा रस्ता 'मृत्यूचा मार्ग' बनला आहे. दोन आठवड्यांपूर्वी याच परिसरात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा त्याच भागात एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

महामार्गावर वेदभवन ते डुक्कर खिंडीदरम्यान सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कांचन प्रदीप व्हनमाने (३३, रा. रायकर मळा, धायरी) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रदीप व्हनमाने (४४) किरकोळ जखमी आहेत. व्हनमाने दाम्पत्य दुचाकीवरून चांदणी चौकाकडे जात होते. त्या वेळी वेदभवन सोसायटी येथे पीएमपीची एक बस उभी होती. त्यामुळे प्रदीप यांनी दुचाकी बसच्या उजवीकडून वळवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मागून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे ते दोघेही रस्त्यावर पडले आणि गाडीचे चाक कांचन यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. प्रदीप यांच्या हाताला, पायाला, पोटाला मार लागला. त्यांना धडक दिलेला ट्रक अपघातानंतर तेथे न थांबता मुंबईच्या दिशेला निघून गेला. दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी त्या दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कांचन यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

एकत्र प्रवास

प्रदीप व्हनमाने बावधन येथील डीएसके मोटर्स येथे नोकरीला आहेत. कांचन सूस रोड परिसरात ब्युटी पार्लर चालवित होत्या. ते दोघे रोज बावधनपर्यंत दुचाकीवर सोबत जात असत आणि तेथून पुढे रिक्षाने सूस रोडपर्यंतचा प्रवास करीत. आजही ते नेहमीप्रमाणे घरातून निघाले; पण त्यांचा हा प्रवास अखेरचा प्रवास ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यव्यापी ‘शाळाबंद’चा इशारा

$
0
0

राज्य शिक्षणबचाव कृती समितीतर्फे मोर्चाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणसंस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांवर काही दिवसात तोडगा न काढल्यास, येत्या ९ आणि १० डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने सोमवारी पुण्यात दिला. त्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याची तयारीही संघटनेने सुरू केली आहे.

शैक्षणिक प्रक्रियेतील सर्व सहभागी घटकांच्या विविध मागण्यांसाठी सर्व घटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन नुकतीच कृती समितीची स्थापन केली होती. सर्व घटकांच्या विविध मागण्यांसाठी एकत्रित लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीने गेल्या महिनाभरापासून सक्रिय कार्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून समितीने आमदार विक्रम काळे आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात शिक्षक भवन ते शिक्षण आयुक्त कार्यालय या मार्गावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी या मोर्चामध्ये भाग घेतला होता. समितीचे संपर्क प्रमुख शिवाजी खांडेकर, निमंत्रक विजय बहाळकर आदींनी या मोर्चाचे संयोजन केले.

गेल्या काही काळामध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून या घटक प्रतिनिधींनी विविध मागण्या नोंदविल्या होत्या. मात्र, या मागण्यांना सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याबाबत या मोर्चामध्ये सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. टिळक चौक, डेक्कन परिसरातून निघालेल्या या मोर्चामध्ये राज्यस्तरीय मोर्चानंतर संघटनेने राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन त्यांना संघटनेच्या मागण्यांची माहिती दिली. डॉ. भापकर यांनी संघटनेची भूमिका जाणून घेऊन, या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास संघटना राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा या वेळी समितीचे उपाध्यक्ष आमदार काळे यांनी दिला. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीचा फी परतावा तातडीने मिळावा, अशी मागणी करण्यात आली

समितीच्या काही प्रमुख मागण्या...

- २८ ऑगस्ट २०१५ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द व्हावा.

- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच्या सुधारीत आकृतीबंधाविषयीच्या अहवालावर तातडीने कार्यवाही करावी.

- कला-क्रीडा शिक्षकांसाठी अन्यायकारक मानला जाणारा ७ ऑक्टोबरचा शासननिर्णय तातडीने रद्द करावा.

- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालाबाह्य कामांमधून मुक्तता मिळावी.

- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीचा फी परतावा तातडीने मिळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांचा कुटुंबावर सशस्त्र हल्ला;एक गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी



चिंचवड - वाल्हेकरवाडीजवळील एका घरात सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोर घुसले. त्यांनी घरातील महिला आणि दोन मुलींना शस्त्राचा धाक दाखवला आणि दागिने लुटले. त्याचवेळी प्रसंगावधान राखून त्या मायलेकींनी तेथून पळ काढला. त्यानंतर घरी परतलेल्या महिलेच्या पतीवर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात ते जखमी झाले आहेत.

चिंचवडजवळ सोमवारी मध्यरात्री मधुकर पाटील यांच्या घरात पाच सशस्त्र दरोडेखोर घुसले. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. मात्र, त्या तिघींनीही तेथून पळ काढला. दोन दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. तर अन्य तिघे घरात दागिने शोधत होते. त्याचवेळी मधुकर पाटील कामावरून घरी परतले. ते घरात जात असताना दरोडेखोरांनी त्यांच्यावर शस्त्राने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. पाटील यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर शेजारी धावले. त्यांनी पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांची घराची पाहणी केली. पाटील यांची पत्नी आणि मुली बेपत्ता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यांचे मोबाइल फोनही बंद असल्याने त्यांचे काय झाले, याबाबत समजले नव्हते. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, त्या तिघीही नातेवाइकाच्या घरी गेल्याचे समजले.

दरम्यान, पाटील यांची प्रकृती सुधारत असून, या प्रकरणी चिंचवड पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जोडप्याच्या तालात रंगली मैफल

$
0
0

पुणे टाइम्स टीम

जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांची पत्नी प्रसिद्ध कथक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला यांचा एकत्रित कलाविष्कार पाहण्याचं भाग्य पुणेकर रसिकांना लाभलं. हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, प्रसिद्ध कथक गुरू प्रभा मराठे यांच्या 'कलाछाया' संस्थेतर्फे.

विख्यात कथक गुरू सितारा देवी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अँटोनिया या सितारा देवींच्या शिष्या आहेत. त्यांनी आपल्या कथक सादरीकरणातून सितारा देवींना कलांजली वाहिली. अँटोनिया यांचा पुण्यातील हा पहिलाच कथक नृत्याचा कार्यक्रम होता. त्यांनी प्रारंभी तीन तालात काही तुकडे आणि तिहाई सादर केली. या रचना सितारादेवींच्या होत्या. तसंच एकतालातील तराणा पेश करून मीरा भजनानं सांगता केली.

त्यांनी सितारादेवी आणि प्रभाजींकडून शिक्षण घेतानाच्या काही निवडक आठवणी अधूनमधून सांगून आपलं सादरीकरण आणखी संवादी केलं. त्यांना नृत्यासाठी मिळालेली पती झाकीर हुसेन यांची तबलासाथ हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यांना सोमनाथ मिश्रा यांनी गायनसाथ केली, तर साबीर खान यांनी सारंगी वादन केलं. उ. अल्लारखाँ खाँसाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण उ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर 'कलाछाया'तर्फे कथक नृत्याविष्कार पेश करण्यात आला. या नृत्यात जयश्री जंगम, रश्मी जंगम आणि शिष्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना भरत जंगम (तबला), सोमनाथ मिश्रा (गायन, संवादिनी), सायली पानसे-शेल्लीकेरी (गायन), सुखद मुंडे (पखवाज), सुनील अवचट (बासरी) यांनी सुरेख साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायन-वादन-नृत्यात गाजला महोत्सव

$
0
0

पुणे टाइम्स टीम

सनई वादनानं भारलेलं वातावरण, वडील आणि मुलीच्या वादनाची कधी जुगलबंदी, तर कधी सहसादरीकरण असा अनोखा मिलाफ रसिकांनी नुकताच अनुभवला.

गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित १७ व्या विविद स्मृती संगीत महोत्सवाची सुरुवात डॉ. प्रमोद आणि नम्रता गायकवाड या वडील- मुलीच्या सनई वादनानं झाली. गुरू-शिष्य असलेले पालक आणि पाल्य अशी 'वारसा' ही संकल्पना घेऊन चार दिवसीय विविद स्मृती संगीत महोत्सव शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात नुकताच पार पडला.

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हा महोत्सव आयोजिण्यात येतो. पहिल्या दिवशी सनई वादनानंतर तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि त्यांची मुलगी सावनी यांचं तबला वादन झालं. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ह. भ. प. मिलिंदबुवा बडवे आणि श्रेयस बडवे यांच्या कीर्तनानं झाली. त्यांनी 'पं. विष्णू दिगंबर व विनायकराव यांचे संगीतकार्य' हा विषय मांडला.

त्यानंतर शिव आणि विष्णू (हरिहर) यांच्यातील साम्य आणि भेद दाखवणारा नृत्याविष्कार सादर झाला. शिव- शक्ती, रुक्मिणीदेवी अरुंडेल यांची स्वरजती रचना आणि अष्टरस यांसारख्या सादरीकरणाने भरतनाट्यम् गुरू स्वाती दैठणकर आणि त्यांची मुलगी व शिष्या नुपूर दैठणकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. आदितालातील 'नृत्यबिंब' ही संकल्पना घेऊन तिल्लाना या प्रस्तुतीनं त्यांनी सांगता केली.

या समारोहाचं तिसरं पुष्प हार्मोनियम वादक सुभाष दसक्कर आणि सरोद वादक पं.राजन कुलकर्णी यांनी गुंफलं. या पुष्पाची सुरुवात हार्मोनियम वादक सुभाष दसक्कर यांनी केली. संध्यासमयीच्या मधुवंती रागातील एक बड़ा ख्याल घेऊन त्याच्या आलाप ताना आणि बोलताना घेत रागविस्तार केला. त्यांना विलंबित त्रितालामध्ये तेवढीच समर्थ साथ सुजित काळेनं केली. त्यानंतर द्रुत तीनतालातील छोटा ख्याल सादर झाला. हार्मोनियमवर तिन्ही सप्तकात लीलयापणे फिरणाऱ्या बोटांची नजाकत रसिकांना अनुभवता आली. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी ईश्वरी दसक्कर आणि सुरश्री दसक्कर यांनीही हार्मोनियमवर साथ करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. मिश्र पिलु रागातील उपशास्त्रीय वादनानं त्यांनी वादनाची सांगता केली.

त्यानंतर स्वरमंचावर पं.राजन कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी या पितापुत्रांनी सरोदवादनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. राग हेमंतमधील पारंपरिक 'झाला' सादर करून त्यांनी वादनाची सुरुवात केली. त्यानंतर राग बागेश्रीमधील तीन रचना सादर करत ग्वाल्हेर घराण्याच्या वादनाचे पैलू रसिकांसमोर मांडले. विलंबित आणि नंतर मध्यलयीत पं. रामदास पळसुले यांनी तालसंगत केली. मैफलीची सांगता विष्णु दिगंबर पलुस्कर रचित एका भजनाच्या वादनाने झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशखिंड रस्ता रुंदीकरण लांबले

$
0
0

प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंधकडून पुणे विद्यापीठाकडे येणाऱ्या गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोजकी झाडे काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असला, तरी अद्याप त्याबाबतची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे, या रस्त्यावर आणखी किमान एक लेन उपलब्ध होण्याची शक्यता असताना, नागरिकांना अद्याप वाहतूक कोंडीशी झगडावे लागत आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतची सुमारे शंभरहून अधिक झाडे तोडण्याची नोटीस पालिकेने काही महिन्यांपूर्वी लावली होती. विद्यापीठ रस्त्यावरील मोठमोठी झाडे तोडण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. पर्यावरणप्रेमींकडून झाडे तोडण्यास आक्षेप घेतले जात असतानाच, शहराच्या खासदारांनी झाडे वाचलीच पाहिजेत, अशी भूमिका घेतली. भाजपच्या स्थानिक आमदारांनी रस्ता रुंदीसाठी प्रयत्न सुरू केले असताना, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यात 'खो' घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनीही त्यांची री ओढत झाडे वाचलीच पाहिजेत,

असा पवित्रा घेतला.

शहराच्या विकास आराखड्यानुसार (डीपी) रस्ता रुंदी केली जात असल्याचा दावा पथ विभागाने केला. परंतु, झाडे तोडण्यास तीव्र विरोध केला जात असल्याने सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले होते. महापौरांच्या आदेशानुसार वृक्ष तोडण्याबाबत असलेल्या सर्व आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर, महापौरांसह खासदार अनिल शिरोळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, पथ विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह प्रत्यक्ष जागा पाहणी करण्यात आली. त्यानंतर, पालिकेने शंभरऐवजी केवळ १७ झाडे काढली, तरीही रस्ता पुरेसा रुंद होऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, ही संख्या कमी करून आठ झाडांपुरती मर्यादित ठेवण्यात आली. त्यानुसार, पालिकेच्या पथ आणि उद्यान विभागाने पुढील कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, केवळ कागदी प्रक्रिया आणि परवानगी-मंजुरी यातच हे दोन्ही विभाग अडकल्याचे दिसून येत असून, सहा महिन्यांहून अधिक काळ रस्तारंदीचा निर्णय प्रलंबित राहिला आहे.

अखेर, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीच पुन्हा त्यात हस्तक्षेप केला असून, उद्यान आणि पथ विभागाने परस्पर समन्वयातून तातडीने रस्त्याचे रुंदीकरण हाती घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. येत्या आठवड्याभरात या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास वेग प्राप्त होईल, असा दावा

त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक, कलावंतच परिवर्तन घडवू शकतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील नागरिकांचे जीवन सध्या संकटमय परिस्थितीत आहे. या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता राजकारण्यांमध्ये नाही, तर ती साहित्यिक, कलावंत आणि शिक्षकांमध्येच असल्याचे परखड मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी सोमवारी केली. राजकारण धंदा बनला असताना स्वार्थाचा लवलेश नसलेले कलाकार आणि साहित्यिकच नवनिर्मितीच्या आधारे हे परिवर्तन घडवून आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे अत्रे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशालेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात डॉ. जोशी यांना यंदाच्या गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय सौर कॅलेंडरचे प्रचारक आणि ज्येष्ठ शिक्षक हेमंत मोने यांनाही या वेळी इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी सध्याची परिस्थिती आणि बदलांवर भाष्य करताना डॉ. जोशी यांनी आपली भूमिका मांडली. सोसायटीच्या कार्याध्यक्षा डॉ. प्रभा अत्रे, अध्यक्ष डॉ. मदन फडणीस, कार्यवाह सुधन्वा बोडस आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले, 'माणसाच्या अंगी नम्रता यावी आणि अहंकार गळून पडावा हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. सध्याच्या बाजारू शिक्षणपद्धतीमुळे हे उद्दिष्ट दूर गेले आहे. समाजाच्या उभारणीचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्यासाठी देशातील साहित्यिक, कलावंत आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यांच्या खांद्यावरून देशाच्या परिवर्तनाची पालखी जाणार आहे.' वेगवेगळ्या किश्श्यांमधून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. डॉ. अत्रे यांनी प्रास्ताविक करत पुरस्कारांपाठीमागची भूमिका स्पष्ट करून सांगितली. डॉ. फडणीस यांनी स्वागत केले.

'शिक्षकांना प्रोत्साहन द्या'

शालेय उपक्रमांना समाजकार्याची जोड देत विद्यार्थ्यांना खऱ्या शिक्षणाची ओळख पटवून देणे शक्य असल्याचे मत मोने यांनी या वेळी मांडले. त्यासाठी ध्येयवादाने प्रेरित होऊन काम करणारी मोजकी शिक्षक मंडळी आपल्याकडे आहेत. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटीने प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. न. म. जोशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना धक्के देणारा साखळीचोर एकच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध भागांत गेल्या दोन महिन्यांत एका दुचाकीस्वाराने सोनसाखळी हिसकावण्याचे तब्बल १५ हून ​अधिक गुन्हे केले आहेत. ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांना धक्का मारून तो त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावतो. शिवाजीनगर परिसरात मंगळवारी सकाळी अशाच प्रकारे सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली असून, पोलिसांना संशयिताचे 'सीसीटीव्ही फुटेज' मिळाले आहे.

सोनसाखळी चोराकडून वयस्कर महिलांना लक्ष्य करण्याच्या घटना गेल्या दोन महिन्यांत वाढल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार या घटनांमध्ये एकच सोनसाखळी चोरटा असून, तो स्थानिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपलब्ध 'सीसीटीव्ही' फुटेजनुसार सोनसाखळी चोराची ओळख पटवण्यात येत आहे.

वयस्कर महिलांना लक्ष्य करणाऱ्या सोनसाखळी चोरट्याला पकडण्यासाठी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी मंगळवारी पोलिस आयुक्तालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित संशयिताची माहिती सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

गुन्हे उघडकीस आणा ः रामानंद

शहरात साखळीचोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वाढत्या साखळीचोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी शहरातील सर्व 'बीट मार्शल'ची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवा, अशा स्पष्ट सूचना दिल्या. सोनसाखळीचोरी करणाऱ्या एका संशयित स्थानिक असल्याच्या शक्यतेने तपास करण्यात येत आहे, असेही रामानंद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images