Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विकासाची गाडी बारामतीकडे कशाला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रिपदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पुण्यात राज्य सरकारच्या शरद पवारांविषयीच्या धोरणांबाबत टीका केली. भाजपच्या मंत्र्यांच्या बारामती भेटीच्या पार्श्वभूमीवर, 'विकासाची गाडी बारामतीकडे नाही, तर शेतकऱ्यांकडे घेऊन चला,' असा सल्ला राज्य सरकारला दिल्याचे खोत यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले.

स्वाभिमानी पक्षाच्या राज्य मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, मेळाव्याचे संयोजक जया शेट्टी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी जया शेट्टी यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. मेळाव्याच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पक्षाची भूमिका याविषयी भाष्य करून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खोत यांनी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.

खोत म्हणाले, 'आम्हाला बळीराजाचा नांगर घेऊन कारभार करायचा आहे. त्यासाठी विकासाची गाडी बारामतीकडे नाही, तर शेतकऱ्यांकडे घेऊन चला, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. बारामतीची वाट खूप वाईट असून, शरद पवार यांच्या बोलण्याला सगळे फसतात. मला मंत्रिपद मिळाले, तर त्याचे सर्वांत जास्त वाईट पवारांना वाटेल. मात्र, मला मंत्रिपद मिळाले, तर ते माझे नसून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे असेल.'

राजू शेट्टी यांनी या वेळी पक्षाच्या आगामी काळातील राजकीय वाटचालीविषयी उपस्थितांना माहिती दिली. तुपकर, जया शेट्टी यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले.

'तेव्हा यांची सहिष्णुता गेली कुठे?'

देशात सध्या असहिष्णूता पसरल्याची ओरड करून पुरस्कार परत करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखक, साहित्यिकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या नाहीत का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. चार लाखांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या सर्वांची सहिष्णू वृत्ती का जागी झाली नाही? त्या वेळी या लेखक-साहित्यिकांना पुरस्कार परत का करावेसे वाटले नाहीत? त्या वेळी यांच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत का, असा थेट सवाल त्यांनी विचारला. संवेदना संपल्या नसून, समाज कोमात गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणाला धंदा समजणाऱ्यांनी कष्ट करणाऱ्यांना गुलाम केल्याने पुरस्कार परत करण्यासारखी सहिष्णूता समोर येत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका उपायुक्त गद्रेंचा राजीनामा

0
0

पुणेः राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त किशोरी गद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे कारण गद्रे यांनी पुढे करून राज्य सरकारकडे राजीनामा धाडला आहे. सरकारकडून पाच महिन्यांपूर्वी गद्रे प्रतिनियुक्तीवर उपायुक्त म्हणून पालिकेत रुजू झाल्या होत्या.

त्यांच्याकडे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घनकचरा विभागाची जबाबदारी दिली होती. उरुळी देवाची तसेच फुरसुंगी येथील कचरा डेपोत महापालिकेचा कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे शहरातील कचरा शहरातच कशा पद्धतीने जिरविता येइल, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. गेल्या महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्याने काही दिवस त्या रजेवर होत्या. दरम्यान, त्यांनी राज्य सरकारकडे राजीनामा दिल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबत गद्रे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगठ्याचा ठसा देणार हृदयविकाराचा ‘संकेत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छातीत दुखतंय... अस्वस्थ वाटतंय...हार्टअॅटॅक येतोय अशी शंका येते आहे..घाबरू नका.. 'संकेत' या अभिनव उपकरणावर केवळ अंगठ्याचा ठसा द्या आणि क्षणार्धात तुमचा 'इलेक्ट्रो कार्डिओ ग्राम' अर्थात 'ईसीजी' तयार होईल. तो डॉक्टरांनाही पाठविला जाईल. त्यामुळे त्यावर त्वरित उपाययोजना करणेही शक्य होईल आणि प्राणही वाचू शकतील.

ही किमया आहे, अगस्था कंपनीच्या 'संकेत' या 'ईसीजी मॉनिटरिंग' उपकरणाची. दिल्लीतील राहुल आणि नेहा रस्तोगी यांनी हे उपकरण तयार केले आहे. याचे मोबाइल अॅप्लिकेशनही गुगल प्लेवर उपलब्ध आहे. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी रस्तोगी यांना 'पुणे इंटरनॅशनल सेंटर' आणि 'नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन'तर्फे अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्काराने गौरविण्यात आले.

राहुल यांच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. रात्री-अपरात्री त्रास झाल्यास त्यांना कधीही ईसीजी काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये न्यावे लागे. परंतु, गावी एकटे असताना त्यांना ईसीजी काढण्यासाठी कसे नेणार, असा प्रश्न राहुल यांच्या मनात आला. त्यासाठी आपल्या वडिलांना स्वतःच घरच्याघरी ईसीजी काढता यायला हवा, या विचाराने पछाडलेल्या राहुल यांनी संशोधन सुरू केले.

सुमारे २०० हृदयविकारतज्ज्ञ आणि ४०० हृदयविकाराच्या रूग्णांशी केलेल्या सविस्तर चर्चेनंतर काही महिन्यांनंतर क्रेडिट कार्डाच्या आकाराचे 'पोर्टेबल ईसीजी डिव्हाइस' तयार करण्यात त्यांना यश आले. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी हृदयविकारतज्ज्ञांना दाखविले. हे उपकरण पाहून खूष झालेल्या डॉक्टरांनी त्यांना पसंतीची पावती देऊन काही सुधारणा सुचवल्या आणि त्यातून हे उत्पादन तयार झाले. अलिकडच्या काळात भारतात सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने होत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध झाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. छातीचे दुखणे गॅसेसमुळे आहे की हृदयविकारामुळे हे समजण्यासाठी ईसीजी महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

असा मिळणार रिपोर्ट

या उपकरणावर अंगठा ठेवल्यानंतर अवघ्या काही सेकंदात नेहमीच्या ईसीजी सारखा 'थ्री लीड' ईसीजी तयार होतो. त्याचक्षणी ईसीजी पीडीएफ स्वरूपात मोबाइलवर तसेच क्लाउडवर सेव्ह होतो. इतकेच नव्हे तर हा रिपोर्ट ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंतही पोहोचविण्यात येतो. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत डॉक्टरांकडून अहवाल मिळविण्याचीही सोय उपलब्ध आहे. सध्या १५ हजार रुपये किंमत असलेल्या या उपकरणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास किंमत दहा हजारांपर्यंत कमी होऊ शकते. ईसीजी काढल्यानंतर त्याचा रिपोर्ट सेव्ह होऊन डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी साधारणतः ५० पैसे खर्च येतो.

सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि प्रत्येक गावातील किमान एका प्राथमिक आरोग्य सेवकाकडे हे यंत्र असावे, अशी माझी इच्छा आहे. त्याद्वारे संपूर्ण गावाचा ईसीजी एका दिवसात कमीत कमी खर्चात काढणे शक्य होईल. त्याचबरोबर ही यंत्रणा अधिक स्वस्तात किंवा पूर्णतः मोफत उपलब्ध व्हावी,यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

- राहुल रस्तोगी, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोचा खर्च १२,५०० कोटींवर?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चर्चा आणि विलंबामुळे रखडलेल्या पुणे मेट्रोच्या खर्चात 'वाढता वाढता वाढे' मोठी वाढ अपेक्षित धरली जात आहे. या संदर्भातील दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा (डीएमआरसी) सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होणार असला, तरी मेट्रो प्रकल्पाचा संपूर्ण खर्च साडेबारा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे मेट्रो केवळ चर्चेच्या ट्रॅकवरच अडकून पडली होती. त्यामुळे, आठ हजार कोटी रुपयांवरून मेट्रो प्रकल्पाचा खर्च अकरा हजार कोटींच्या घरात यापूर्वीच पोहोचला होता. गेल्या वर्षभरातही मेट्रो भुयारी हवी की एलिव्हेटेड यावरून चर्चा सुरू असल्याने प्रकल्प खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या मार्गात बदल झाला असल्याने त्याच्या खर्चाचे गणितही नव्याने मांडावे लागणार आहे. सध्या 'डीएमआरसी'कडून खर्चाची पुनर्मांडणी करण्याचे काम सुरूच असून, दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊन त्या कार्यान्वित होईपर्यंतच्या खर्चाचा आढावा घेण्यात येत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या १० हजार आठशे कोटी रुपयांच्या खर्चातील वाढ मर्यादित राहिली, तरी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत विविध स्वरूपाचे व्याज यांची सांगड घातल्यास, संपूर्ण प्रकल्पाचा एकत्रित खर्च साडेबारा हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे संकेत मिळत आहेत. खर्चाचा वाढता भार पाहता, दीर्घकालीन टप्प्यावर ती फायदेशीर ठरू शकेल का, याचेही मूल्यांकन केले जात असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॉटेल कोहिनूर’मधून ३७ लाखांची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपटे रोडवरील हॉटेल कोहिनूर एक्झीक्युटीव्हमधील तिजोरीत ठेवलेले ३७ लाख रुपये तिजोरीसह चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे तिजोरी तळमजल्यावर असून तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी तीन दरवाजांची कुलपे तोडण्यात आली आहेत.

हॉटेलचे अकाउटंट राजेश सतीश तिखे (वय ४६, रा. नंददीप अपार्टमेंन्ट, पाषाण सुस रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २३ वर्षांपासून तिखे हे हॉटेलमध्ये अकाउटंट म्हणून काम करतात. हॉटेलचे मालक माधव कोकणे (रा. दादर, मुंबई) हे हॉटेलमध्ये अधून-मधून येत असतात. हॉटेलच्या नुतनीकरणासाठी काम सुरू असून हॉटेलमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत न भरता तळमजल्यावरील तिजोरीत ठेवली जाते. तिजोरीपर्यंत जाण्यासाठी तीन दरवाजे लागतात. पहाटे तीनच्या सुमारास चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र, काउंटरवरील व्यक्तीने सकाळी तिखे व पोलिसांना कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एपिलेप्सी’ जोडपी विवाहाच्या बंधनात

0
0

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : फिट्स येणे अथवा अपस्मारासारख्या (एपिलेप्सी) आजाराच्या तरुण तरुणींच्या रेशीमगाठी जुळल्या असून पाच वर्षांत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी १९ जोडप्यांचा संसार सुखाने सुरू आहे. 'संवेदना एपिलिप्सी सपोर्ट ग्रुप'ने याकामी पुढाकार घेतला आहे.

एपिलेप्सी आजाराच्या तरुण तरुणींच्या विवाहाची समस्या मोठी आहे. जोडीदारास अथवा सासरच्या मंडळींपासून आजाराची माहिती लपविल्याने अनेकांचे घटस्फोट झाले आहेत. परंतु, याच आजाराच्या तरुण-तरुणींच्या राज्यामध्ये रेशीमगाठी जुळल्या आहेत. १९ जोडप्यांचा संसार सुखाने सुरू आहे. शालेय शिक्षक, विद्यार्थी; तसेच पालकांमध्ये या आजाराबाबत अज्ञान आहे. 'संवेदना एपिलिप्सी सपोर्ट ग्रुप'च्या संस्थापक संचालक यशोदा वाकणकर यांनी जागतिक एपिलिप्सी दिनानिमित्ताने 'मटा'ला माहिती दिली.

वाकणकर म्हणाल्या, 'हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराची चर्चा होते. मात्र, फिट्स येण्याचा आजार लपविला जातो. पुण्यासह महाराष्ट्रात आजाराचे एक टक्के पेशंट आढळतात. तरुण तरुणी नोकरीसाठी मुलाखत देताना अथवा लग्न ठरविताना फिट्स येण्याचा आजार आहे, हे लपवायचे का, असा सवाल करतात. नोकरी मिळविणे अथवा लग्न जुळविण्यामध्ये हा आजारच मोठी समस्या बनला आहे.'

'शाळेत मुलाला पाठविताना आजार असल्याचे पालक लपवितात. अनेक शाळांतून काही तरी कारण सांगून मुलांना काढून टाकले जाते. परंतु, पुण्यातील शाळांमधून असे प्रकार घडले नाहीत. अनेकदा मुलाखतीत आजाराची माहिती दिल्याने हातची नोकरी सोडावी लागली, तर फिट्स येण्याच्या आजाराची माहिती नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींकडून फारसे गांभीर्य घेतले जात नाही. फिट्स आल्याचे पाहून सासरच्या मंडळींनी मुलीला माहेरी पाठवून घटस्फोट दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे 'सपोर्ट ग्रुप'च्यावतीने राज्यातील १९ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. आजाराबाबत एकमेकांशी प्रामाणिक राहणे आणि आजारादरम्यान एकमेकांची काळजी घेत असल्याने जोडप्यांचा संसार सुखाने सुरू आहे.'

फिट्स येणे म्हणजे काय ?

मेंदूत विद्युत प्रवाह सुरू असतो. त्याच्या इशाऱ्यानुसार शरीराच्या हालचाली होतात. त्या प्रवाहात अडथळा आल्याने व्यक्तीचा एका क्षणासाठी तोल जाऊन फिट्स येण्याचे प्रकार घडतात. कधी उजवा हात हलतो, कधी तोंडातून फेस येतो. काही जण खाली पडतात, तर उभ्या उभ्या देखील फिट्स येते. कधी झोपेत, तर कधी सकाळी फिट्स येण्याचे प्रकार घडतात. या आजारामुळे तरुणांच्या विवाहामध्ये समस्या निर्माण होत आहेत.

जन्माला येताना बाळाच्या मेंदू अथवा कवटीला इजा झाल्याने डोके चेपले जाते. त्यामुळे मूलाचे वय वाढते तसे त्याला फिट्स येण्याचे प्रमाण वाढते. अशा पेशंटचा आजार औषधोपचाराने बरा होतो. काही पेशंटचा आजार ऑपरेशन केल्याने बरा होतो. औषधे चुकल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. औषधांचे काही विपरित परिणाम पेशंटला दिसून येतात.

- डॉ. सुशील पाटकर, मेंदूविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिम्बायोसिसमध्ये सुसज्ज ग्रंथालय

0
0

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त सिम्बायोसिस संस्थेने सुसज्ज असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारले आहे. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह न राहता बाबासाहेबांच्या विचारांचे दर्शन यातून व्हावे तसेच त्यांच्या जीवनावर व कार्यावर संशोधन व्हावे, या हेतूने ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. आंबेडकर गार्डन लायब्ररी आता अद्ययावत ग्रंथालय झाले आहे.

या ग्रंथालयाचे उद‍्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ग्रंथालयाच्या संचालिका संजिवनी मुजुमदार व संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

सिम्बायोसिस संस्थेने १९९० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालयाची स्थापना केली. या स्मारकाच्या आवारातच अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात आले असून केंद्र सरकारचे यासाठी अनुदान मिळाले आहे. या ग्रंथालयात ४ हजार पुस्तके उपलब्ध असून ग्रामीण भागातून आलेल्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ८०० विद्यार्थ्यांना या ग्रंथालयाचा उपयोग होत आहे. याशिवाय ग्रंथालयात विविध दालने असून ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्यात येत आहे. तसेच, परदेशात स्थायिक असणाऱ्या मुलांशी ज्येष्ठांना संवाद साधता येत आहे. लहान मुलांनाही खेळण्यासाठी येथे सोय असून या सर्व सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेब आंबेडकरांची ५० छायाचित्रे लंडनला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेत असताना वास्तव्यास असलेल्या लंडन येथील घराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाल्याने हा सुखद क्षण असताना पुण्याचे या घराशी एक आगळे नाते जोडले गेले आहे. या घरासाठी बाबासाहेबांची ५० दुर्मिळ छायाचित्रे पाठविली आहेत. सिम्बायोसिस संस्थेला मान मिळाला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त बाबासाहेबांच्या लंडन येथील घराचे लोकार्पण करण्यात आले. वायव्य लंडनमधील १० किंग हेन्री रोडवरील या घरात डॉ. आंबेडकरांनी १९२१-२२ या कालावधीत वास्तव्य केले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारताने २,०५० चौ.फुटाचे हे तीन मजली घर ऑगस्टमध्ये विकत घेतले. यासाठी सुमारे चार दशलक्ष पौंड एवढी किंमत मोजावी लागली. सध्या या घराची दुरुस्ती सुरू आहे. परंतु, मोदींनी उद्‍घाटन केलेला एक मजला २० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा काम सुरू करून पुढील वर्षी हे घर नव्याने खुले करण्यात येईल. या घरात बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत दुर्मिळ कागदपत्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यातच या घराची शोभा वाढवित आहेत ती बाबासाहेबांची दुर्मिळ ५० छायाचित्रे !

मोदींनाही या छायाचित्रांसमवेत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सिम्बायोसिस संस्थेने १९९० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालयाची स्थापना केली. लंडन येथील घरात लावण्यात आलेली छायाचित्रे याच संग्रहालयातील आहेत.

संग्रहालयाच्या संचालिका संजिवनी मुजुमदार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला ही माहिती दिली. मुजुमदार यांनी सांगितले की, बाबासाहेबांच्या पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या सर्व वस्तू संस्थेला दिल्या. त्यातूनच संग्रहालय उभे राहिले. यामध्ये १९० दुर्मिळ छायाचित्रांचाही समावेश आहे. लंडन येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी यातील निवडक छायाचित्रे लावण्यासाठी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. त्यानुसार निवडक ५० छायाचित्रांच्या प्रती राज्य सरकारकडे १ नोव्हेंबर रोजी सुपूर्द करण्यात आल्या.

विविध छायाचित्रे

बाबासाहेबांचे जीवनदर्शन उलगडणाऱ्या या छायाचित्रांमध्ये कोलंबिया व लंडन येथे शिक्षण घेत असतानाची छायाचित्रे तसेच गोलमेज परिषद, ग्रंथालयाची पावती, डी. लिट, भारतरत्न, विद्यार्थीदशेतील छायाचित्रे, लंडन येथील सहकाऱ्यांसमवेतील छायाचित्रे व मृत्यूदाखला यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राचा तोतया अधिकारी गजाआड

0
0

केंद्र सरकारच्या नावाने दुकानदाराची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारचा अधिकारी असल्याचा बनाव करून लाल दिव्याच्या मोटारीतून येऊन व्यावसायिकांना लुटणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तोतयाने मंगळवारी लष्कर भागातील मोबाइल विक्री करणाऱ्या दुकानदाराला नियमांचे पालन करत नसल्याचे सांगून पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याचे समोर आले आहे. त्याने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विशाल पांडुरंग ओंबाळे (वय ३८, रा. स्पार्टन एनक्लेव्ह सोसायटी, येरवडा) असे या तोतयाचे नाव आहे. एमजी रोडवरील अजित युनूस खान यांच्या मोबाइलच्या दुकानात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ओंबाळे लाल दिव्याच्या मोटारीतून आला. आपण केंद्र सरकारी कर्मचारी असल्याचे त्याने खान यांना सांगितले. पुराव्यादाखल ओळखपत्रही दाखवले. मोबाइलविक्री करताना केंद्राच्या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे तुझ्यावर कारवाई करावी लागेल. कारवाई केल्यास बाजारपेठेत अपप्रतिष्ठा होईल. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी तीस हजार रुपये देण्याची मागणीही त्याने केली. दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ३० हजार रुपये घेतले. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा पोलिस करत होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस कर्मचारी शैलेश जगताप यांना बातमीदारामार्फत ओंबाळे लाल दिवा लावलेल्या मोटारीतून कोरेगाव पार्क परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने तोतयाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाल दिवा लावलेली स्विफ्ट मोटार, तीन पिस्तुल, ५० खोटी काडतुसे, केंद्र सरकारचे बनावट ओळखपत्र आणि व्हिजिटिंग कार्ड असा एकूण ७ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांने साथीदाराबरोबर लाल दिव्याच्या मोटारीतून अनेकांना लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, अधिक तपास सुरू आहे. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी पाहुण्यांची ‘बडदास्त’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विदेशी नागरिक राहात असलेले हॉटेल्स तसेच परिसरात जलद प्रतिसाद दलाकडून (क्युआरटी) गस्त घालण्यात येत आहे. पॅरिस येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर विदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. कोरेगाव पार्क परिसरात कायमस्वरूपी सशस्त्र जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

शहरातील विदेशी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना राज्याचे पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी दिल्या आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी विदेशी नागरिकांचा वावर असलेल्या ठिकाणी गस्त वाढवली आहे. पुणे शहरात दहा हजारांच्या आसपास परदेशी नागरिकांची संख्या आहे. त्यात सर्वाधिक विद्यार्थी आहेत. आखाती देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परदेशी नागरिक वास्तव्यास असणाऱ्या भागात तसेच त्यांचा दैंनिदिन वावर असलेल्या परिसरात सशस्त्र पोलिसांनी गस्त घालावी. परदेशी पाहुणे कार्यालयातून, घरातून बाहेर पडताना किंवा घरी येण्याच्या काळातही गस्त घालण्यात यावी, आदी सूचना दीक्षित यांनी केल्या आहेत.

परदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून 'फिडबॅक' घेण्यात यावा. तसेच हॉटेल चालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये परदेशी नागरिक उतरले असतील त्याची माहिती तत्काळ 'सी' फॉर्मद्वारे पोलिस ठाण्यांना कळवणे बंधनकारक आहे. हे फॉर्म भरून घेताना परदेशी नागरिक कोणत्या व्हिसावर शहरात आले आहेत, याचीही खातरजमा करण्याचे आदेशात नमूद आहे. पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०७ पुणेकरांनाच डेंगी?

0
0

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अजब 'निदान'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही महिन्यांत घरोघरी डेंगीचे पेशंट आढळून येत असतानाच महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र, संपूर्ण शहरात केवळ ३०७ जणांनाच डेंगीची लागण झाल्याचे 'निदान' केले आहे. शहरात एक हजार २८ जणांना डेंगीचा ताप असल्याची नोंदणी विभागाकडे झाली आहे.

यंदा पावसाळ्यात डेंगीने चांगलेच डोके वर काढले होते. शहराच्या विविध भागात प्रामुख्याने सहकारनगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, हडपसर, पाषाण, औंध, शिवाजीनगर, कोथरूड, घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, येरवडा येथील सोसायट्यांमध्ये डेंगीच्या ''एडिस इजिप्ती' डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाईही केली होती. ' शहरात जानेवारीपासून आतापर्यंत १०२८ डेंगीचे पेशंट आढळले. त्यापैकी ३०७ जणांचीच डेंगीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे,' अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली. नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे. पाणी साठवून ठेवू नये, तसेच डासांची उत्पत्ती झाल्यास पालिकेला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले

दरम्यान, थंडीत डेंगीचे पेशंट आढळत असल्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडे विचारणा केली असता, डेंगीच्या विषाणूत बदल झाल्याचे दिसून येत नसल्याचे ते म्हणाले. डेंगीचे 'डेन १', 'डेन २', 'डेन ३' आणि 'डेन ४' हे चार प्रकारचे विषाणू आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी शहरात 'डेन २' हा विषाणू कार्यरत होता. यंदाच्या वर्षी'डेन ३' हा विषाणू कार्यरत असावा. त्यामुळे विषाणूचे स्वरुप बदलले असे मात्र, वाटत नाही. डेंगीची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी पेशंटच्या शरिरातून प्लेटलेट कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीत डेंगीचे थैमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा संपून थंडीची चाहूल लागली तरीही डेंगीच्या पेशंटची संख्या मात्र काही कमी होण्याचे नाव नाही. ऐन थंडीत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये डेंगीचे पेशंट आढळून येतच आहेत. डेंगीची चाचणी निगेटिव्ह येत असली, तरीही पेशंटमधील प्लेटलेट कमी होत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

थंडी सुरू झाल्यानंतर शहरातील छोट्या-मोठ्या दवाखान्यांमध्ये तापाच्या कारणास्तव पेशंट उपचार घेत आहेत. त्यातील अनेकांना डेंगीची लागण झाल्याने त्यांच्या शरिरातील प्लेटलेटचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

'डेंगीचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह येत आहे. पहिल्याच दिवशी 'एनएस१' ही चाचणी केल्यास ती निगेटिव्ह येते. त्यामुळे ती चाचणी दुसऱ्या दिवशीही करावी लागत आहे. पहिल्या दिवशी डेंगी असल्याचे निदान झाले, तर 'आयजी', 'आयजीएम' ही चाचणी 'निगेटिव्ह' येते. त्यामुळे ही चाचणी पुन्हा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी करावी लागते. पेशंटच्या शरिरात दीड लाख ते साडेचार लाख प्लेटलेटची संख्या असणे अपेक्षित आहे. मात्र, तीस हजारापर्यंत प्लेटलेट खाली आल्यास पेशंटला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल होण्याची गरज असते,', असे फिजिशियन डॉ. सुहास नेने यांनी सांगितले.

नोबेल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, की 'हॉस्पिटलमध्ये विविध विषाणूच्या संसर्गाने पेशंट बाधित असून, सोबत डेगींचे देखील पेशंट आहेत. मात्र, डेंगीची साथ आहे, असे म्हणता येणार नाही. डेंगीचे पेशंट अधिक असले तरी ते फारसे गंभीर नाहीत.' यंदा डेंगीच्या पेशंटचे प्रमाण अधिक असले तरी, मृत्यूचे प्रमाण चिंताजनक नाही. अद्याप डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही,' असे निरीक्षण फिजिशियन डॉ. अच्युत जोशी यांनी नोंदविले.

सकाळी किंवा संध्याकाळी डासांकडून चावा घेण्याचे प्रमाण अधिक आहे. नेमके याच दरम्यान तरुण वर्ग फिरण्याच्या निमिताने घराबाहेर पडतो. पालकांनी देखील मुलांना बाहेर खेळायला पाठविताना काळजी घेतली पाहिजे.

थंडीत डेंगीचे पेशंट कमी होतील असा अंदाज होता. मात्र पेशंटची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. दररोज डेंगीचा ताप असलेले पेशंट उपचारासाठी येत आहेत. डेंगीचा विषाणू बदलला की काय अशी शंका येत आहे. डेंगीसोबत शहरात अन्य संसर्गजन्य विषाणूंचा मोठा प्रादुर्भाव आहे.

- डॉ. सुहास नेने, फिजिशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड गाव, कोल्हेवाडीत पाच लाखांची घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नांदेड गावात बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून पाच लाखांचा ऐवज घरफोडी करून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली; तसेच शेजारील कोल्हेवाडी येथील आणखी एक घर फोडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष रघुनाथ पडवळ (वय ४१, रा. लगडमळा, नांदेड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी सकाळी कामाच्या निमित्ताने घर बंद करून गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील ९० हजार रुपयांचे गंठण, चाळीस हजार रुपयांची मोहनमाळ, तीस हजार रुपयांचा नेकलेस, दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, तीस हजार रुपयांची सोन्याची साखळी, पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, पन्नास हजार रुपयांची सोन्याची नथ आणि रोख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. पडवळ सोमवारी सायंकाळी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसले. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिली आहे; तसेच कोल्हेवाडी येथे राहणारे धनंजय विश्वंभर दिवाणजी (वय ४३, रा. कोल्हे प्राइड) यांच्या घरातही घरफोडी झाल्याचे आढळले आहे. या प्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांद्रयान २, आदित्य मोहिमा प्रगतिपथावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'चंद्रावर उतरवण्यात येणारे 'चांद्रयान २' आणि सूर्याच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या 'आदित्य १' या मोहिमांना केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला असून, या दोन्ही मोहिमांची तयारी सध्या प्रगतिपथावर आहे.

'चांद्रयान २' हे यान २०१७ मध्ये, तर आदित्य २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात येईल,' अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंगलयान आणि अॅस्ट्रोसॅट यांच्या यशानंतर इस्रोने पुढील अवकाश मोहिमांची तयारी सुरू केली असल्याचे डॉ. किरण कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'चांद्रयान २' मध्ये लँडर प्रत्यक्ष चंद्रावर उतरवण्यात येणार असून, ते अलगद उतरवता यावे यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सध्या विकसित होत आहे. चंद्रावर फिरू शकणाऱ्या रोव्हरचा आराखडा तयार असून, मोहिमेच्या रंगीत तालमीसाठी बेंगळूरूमध्ये चंद्रावरील स्थितीशी साधर्म्य असणारी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. पूर्णपणे भारतीय असणारी ही मोहीम २०१७ मध्ये प्रक्षेपित करण्यात येईल.'

आदित्य मोहिमेबाबत ते म्हणाले, 'सूर्याच्या अभ्यासासाठी २०१९ मध्ये पाठवण्यात येणाऱ्या 'आदित्य १' या मोहिमेला केंद्राची मंजूरी मिळाली असून, मोहिमेच्या विविध गटांनी आपले काम सुरू केले आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा समान प्रभाव असणाऱ्या ठिकाणी (लॅग्रांज), पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवर हे यान पाठवण्यात येणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे वर्षभर, चोवीस तास निरीक्षण करण्याची संधी आदित्यमुळे संशोधकांना मिळणार आहे.'

जीएसएलव्ही मार्क-३ डिसेंबरमध्ये

'जीएसएलव्ही मार्क-३ या इस्रोच्या सर्वात मोठ्या रॉकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनाची जमिनीवरील चाचणी यशस्वी झाली असून, डिसेंबर २०१६ मध्ये पूर्णपणे सुसज्ज प्रक्षेपकाचे प्रक्षेपण करण्यात येईल,' असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हव्यास वेतनवाढीच्या मुळावर

0
0

पोलिस सहआयुक्तांची अधिकाऱ्यावर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मटका अड्ड्यावर छापा घालून जप्त केलेले २७५ रुपये आणि पाच रुपयांचा बॉलपेन पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात जमा न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निष्काळजीपणाचा चांगलाच धडा मिळाला. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी संबंधित अधिकाऱ्याची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्याचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने मटका अड्ड्यावर छापा मारला होता. त्यावेळी त्याने मटका अड्ड्यावरून रोख २७५ रुपये, पाच रुपयांचा बॉलपेन तसेच मटक्याचा चार्ट असा २८० रुपयांचा ऐवज जप्त केला होता. हा मुद्देमाल त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तो स्वतःजवळच बाळगला.

दरम्यान, स्वारगेट येथील मुद्देमाल कक्षातून हजारो किमतीचा ऐवज गायब झाल्याप्रकरणी चौकशी सुरू होती. या चौकशीत मटक्याच्या अड्ड्यावरून जप्त केलेला मुद्देमाल जमा करण्यात आला नसल्याची बाब उघडकीस आली. स्वारगेट मुद्देमाल कक्षाची चौकशी सहआयुक्त रामानंद यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येत होती. त्यामुळे या प्रकाराची माहिती त्यांना समजली. मुद्देमाल जमा करण्यात न आल्याप्रकरणी संबंधित पोलिस ​अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली. ही चौकशी पोलिस मुख्यालयाच्या उपायुक्तांकडून करण्यात आली. संबंधित पो​लिस अधिकाऱ्याने सादर केलेला खुलासा असमाधानकारक होता. त्यामुळे त्यांचे एक वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले.

मटका अड्ड्यावरील छापा हा गांभीर्याने घेण्यात येत नाही. कारवाई केल्यानंतर लगेचच कोर्टात खटला पाठवला जातो. कोर्टाकडून संबंधितांना दंडाची शिक्षा होते आणि आरोपी तेथून सुटतात. त्यामुळे जर जप्त केलेली रक्कम ही किरकोळ असेल, तर अनेकदा ती जमा करण्यात येत नाही. अनेकदा पोलिसांकडून घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेली ही रक्कम अगदीच नगण्य असते. त्यामुळे मुद्देमाल जमा करताना हलगर्जीपणा दाखवण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सच्चा देशभक्त, शूर, अष्टपैलू आणि जिंदादिल

0
0

पुणे : मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे असलेले कर्नल महाडिक ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगडच्या जंगलात दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. कर्नल महाडिक मूळ स्पेशल फोर्सेसच्या इलिट २१ पॅरा युनिटचे अधिकारी होते. सन २०१३ मध्ये तरुण अधिकारी म्हणून कुपवाडा जिल्ह्यातल्याच लोलाब खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी महाडिक यांना प्रतिष्ठेच्या सेना मेडलने सन्मानित करण्यात आले होते.

शांत, सुस्वभावी आणि सज्जन अशा स्वभावाच्या महाडिक यांचे मन देशभक्तीने भारलेले होते. क्रीडा प्रकारांची आवड असलेल्या महाडिक यांना बॉक्सिंगचा विशेष जिव्हाळा होता. त्यांनी शालेय वयातच बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना खरी लढाई ही सीमेवर देशाचे रक्षण करण्यातच आहे, असे सांगितल्याची आठवण महाडिक यांच्या मित्रांनी जागवली.

आपल्या गावाविषयी त्यांना विशेष आस्था होती. गावातील तरुणांना ते नेहमीच स्पर्धा परीक्षा, लष्करभरती याबाबत मार्गदर्शन करत. त्याचबरोबर त्यांची नेमणूक असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील दुर्गम भागातील युवकांशीही ते सातत्याने संपर्कात असत. त्यांना विविध करिअर संधींबद्दल ते मार्गदर्शन करत, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

महाडिक नेहमीच वीरमरणाबद्दल बोलत असत. शांत सुस्वभावी आणि उमद्या स्वभावाच्या महाडिक यांच्या हृदयात मात्र, नेहमी देशभक्तीचे वादळ असे. महाडिक उत्तम क्रीडापटू होते. असे महाडिक यांच्यासोबत प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

...अन् डोळे पाणावले

काही महिन्यांपूर्वीच महाडिक यांच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले होते. त्याच वेळी महाडिक यांनी पुढील वर्षी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यालाही हजर राहण्याचे वचन दिले होते, असे सांगताना महाडिक यांचे मित्र अमोल यांचा स्वर कातर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक कुटुंबाची जबाबदारी सरकारची

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी कडवी झुंज देताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी राज्य सरकार घेईल. राज्याबरोबरच संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे,' या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नल महाडिक यांना आदरांजली वाहिली.

कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हवाई दलाच्या खास विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास लष्करी इतमामात त्यांचे पार्थिव कॅम्पमधील नॅशनल वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. तेथे त्यांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, लष्कराचे अधिकारी, महाडिक यांचे कुटुंबीय आणि नागरिक या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री, शिवतारे यांच्यासह लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी महाडिक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

देशाच्या शत्रूशी लढताना महाडिक यांना हौतात्म्य आले. त्याचे दुःख असले, तरी त्यांच्या बलिदानाचा अभिमानही वाटतो. राज्य सरकार देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या महाडिक यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

कर्नल महाडिक यांचे पार्थिव वॉर मेमोरिअल येथे आणण्यात आल्यानंतर वीरमाता कालिंदी, वीरपत्नी स्वाती, मुलगा स्वराज आणि मुलगी कार्तिकी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. तशाही अवस्थेत त्यांनी हौतात्म्याचे भान ठेवून महाडिक यांच्या पार्थिवाला सॅल्यूट करताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

पर्रीकर यांच्या अनुपस्थितीने नाराजी

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरही बुधवारी पुण्यात दाखल झाले. नॅशनल वॉर मेमोरिअल जवळच असलेल्या सर्किट हाऊसमध्ये पर्रीकर उतरले आहेत. परंतु, तेथून अवघ्या काही मिनिटांवर असलेल्या वॉर मेमोरिअल येथे येऊन त्यांनी कर्नल महाडिक यांना आदरांजली वाहिली नाही. त्यामुळे काही अधिकाऱ्यांसह जवानांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पर्रीकर हे गुरुवारी सातारा येथे महाडिक यांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरे यांच्या सत्काराचा फेरविचार करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा महापालिकेच्या वतीने जाहीर सत्कार करण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी केलेला निर्णय हा जातीयवादी राजकारणाचा प्रकार आहे. महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीतला हजर राहता येणार नाही, असे शिवसेना, भाजप आणि मनसेच्या गटनेत्यांनी महापौरांना कळवून ही बैठक पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करत तीन पक्षांचे गटनेते उपस्थित नसल्याने पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने खालच्या पातळीवरील राजकारण केले असल्याचा आरोप भाजप, सेनेसह मनसेच्या गटने‌त्यांनी केला. पुरंदरे यांच्या सत्काराचा फेरविचार करावा, असा प्रस्तावही या तीनही पक्षांच्या नगरसेवकांनी नगरसचिव कार्यालयाकडे दिला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने नुकतेच गौरविले आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदरे यांचा जाहीर सत्कार महापालिकेच्या वतीने करावा, असे पत्र भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. पक्षनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येक पक्षनेत्यांच्या बैठकीत हा विषय पुढे ढकलण्यात येत होता. प‌ालिकेतील तीन पक्षांचे पक्षनेते अनुपस्थित असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव थेट दफ्तरी दाखल करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे पळकुटेपणाचा प्रकार आहे. राजकारण करून सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार केला असल्याची टीका भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी केली. गेले चार ते पाच महिने हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर निर्णयच घ्यायचा होता तर सर्व पक्षनेते उपस्थित असताना का नाही घेतला, असा प्रश्न बीडकर यांनी उपस्थित केला. पुरंदरे यांच्या सत्काराचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करून जातीय राजकारण केले असल्याची टीका मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी केली.

'हा पुणेकरांचा अपमान'

हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करणे हा बाबासाहेबांचा नव्हे; तर पुणेकरांचा अपमान आहे, हे कदापी सहन केले जाणार नाही. त्यामुळे याचा फेरविचार करावा, असा प्रस्ताव नगरसचिवांकडे दिला असल्याचे या तीनही पक्षनेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ की तस्करीचा अड्डा?

0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : देशात सोन्याची तस्करी वाढत असून, तस्करांसाठी पुण्यातील लोहगाव विमानतळ 'मोक्याचे ठिकाण' ठरला आहे. गेल्या दोन वर्षांत या विमानतळावरून सहा कोटींपेक्षा अधिक ​किमतीचे सोने पकडले आहे. सोने आणण्यासाठी तस्करांकडून वेगवेगळ्या 'आयडिया' वापरल्या जात असून, पकडलेले सर्वजण किरकोळ मोबदल्यात सोन्याची वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या सर्वच व्यक्ती पुण्याबाहेरील असूनही लोहगाव विमानतळावर सोने घेऊन येण्याची आगळिक त्यांनी केली हे विशेष!

गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात दोनदा सोने घेऊन येणाऱ्या तस्करांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. ही गेल्या वर्षभरातील सहावी कारवाई होती. आखाती देशांतून तस्करीचे सोने भारतात आणण्यासाठी पूर्वी मुंबई विमानतळाचा वापर केला जात होता. मात्र, अलिकडे मुंबई आणि अन्य आंतरराष्ट्रीय विमातळावरील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाशुल्क चुकवून सोन्याची तस्करी करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून सोने तस्करांकडून पुण्यातील लोहगाव विमानतळाला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. मुंबई आणि दक्षिण भारतातील तस्करांकडून मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून सोने तस्करीसाठी लोहगाव विमानतळाला अधिक पसंती देण्यात येत आहे.

तस्करीसाठी विविध मार्गांचा वापर

तस्करीचे सोने भारतात आणण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविण्यात येतात. दुबईहून सोने घेऊन येणाऱ्या हसन खान आणि राजा मेहंदी यांना अटक केली असता, त्यांनी अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॉटप्लेटचा वापर केला होता. एका तस्कराने खजुरामध्ये सोन्याच्या लगडी लपवून आणल्या होत्या. एका व्यक्तींने २१ लाख रुपयांचे सोने निरोधमध्ये लपवून आणले होते. तर अन्य एकाने बुटाच्या सोलमध्ये अर्धा किलोची सोन्याची बिस्किटे आणण्याचे धाडस केले होते. डिसेंबर २०१४मध्ये आगवान आस्माँ या महिलेकडून एक कोटी सहा लाख रुपयांच्या सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या होत्या. तस्करीसाठी तिने अंतर्वस्त्रांचा वापर केला.

पाच हजारांसाठी तस्करीचा मार्ग

सोन्याची तस्करी करून घेऊन येताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आलेले तस्कर प्रामुख्याने पुण्याबाहेरचे रहिवासी आहेत. या व्यक्तींचा वापर केवळ सोने विमानतळाबाहेर आणण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचेही निरीक्षण आहे. त्यांना एकवेळ सोने घेऊन येण्यासाठी विमानाचे तिकीट आणि साधारणतः पाच ते दहा हजार रुपये दिले जातात. हे तस्कर मुंबई, कर्नाटक आणि केरळमधील असतात. दुबईमार्गे पुणे विमानतळावर सोने आणून त्यानंतर मुंबई आणि इतरत्र पाठविण्यात येते, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पत मानांकना’त सुधारणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराची वाढ, आर्थिक विकास, उत्पन्न स्रोत आणि नागरी सुविधा पुरविण्याची क्षमता अशा विविध निकषांवर पुणे महापालिकेच्या 'पत मानांकना'त (क्रेडिट रेटिंग) सुधारणा झाली असून, AA/Stable असे मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार महापालिकेने प्रथमच 'क्रेडिट रेटिंग' करून घेतले असून, विश्वासार्हता वाढविण्यासाठी; तसेच कर्ज/कर्जरोखे उभारण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.

स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत सहभागी झालेल्या सर्व शहरांनी 'क्रेडिट रेटिंग' करून घ्यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.'इंडिया रेटिंग अँड रिसर्च प्रा. लि.' (फिच) यांच्यातर्फे हे रेटिंग करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) पालिकेला मिळालेल्या AA- या रेटिंगमध्ये सुधारणा झाली असून, मुंबईनंतर केवळ पुणे महापालिकेलाच AA असे रेटिंग मिळाल्याचा दावा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी केला.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया अशा विविध योजनांमध्ये सहभागी होताना, खासगी-सार्वजनिक सहभागावर (पीपीपी) भर देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. अशा वेळी, पालिकेला प्राप्त झालेल्या 'क्रेडिट रेटिंग'मुळे शहरात अतिरिक्त गुंतवणूक होण्यात मदत होऊ शकेल, असा विश्वास धनकवडे यांनी व्यक्त केला.

पालिकेचे रेटिंग निश्चित करण्याची प्रक्रिया एप्रिलपासूनच सुरू होती. गेल्या पाच वर्षांचा ताळेबंद, पालिकेच्या मालमत्ता, पुढील पाच वर्षांच्या खर्च आणि उत्पन्नाचा संभाव्य आढावा; तसेच पालिकेवरील कर्जे आणि गुंतवणूक, पालिकेचे सद्यस्थितीत सुरू असलेले आणि नियोजित भांडवली प्रकल्प, अशा विविध निकषांवर ही तपासणी करण्यात आली. त्यावर आधारित हे रेटिंग जाहीर करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी दिली.

महापालिकेला एलबीटीतून पाच वर्षांत ३५ टक्के उत्पन्न

राज्य सरकारने पालिकेचा मुख्य उत्पन्न स्रोत असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) जवळपास रद्द केल्याने भविष्यात सरकारी अनुदानावरच विसंबून राहावे लागणार असल्याची भीती या 'क्रेडिट रेटिंग' अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून एलबीटीपोटी मिळणारे अनुदान वेळेत प्राप्त झाले नाही, तर पालिकेसमोरच्या अडचणी वाढू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या गेल्या पाच वर्षांच्या ताळेबंदात सरासरी ३५ टक्के उत्पन्न एलबीटी/जकात यातून प्राप्त झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images