Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दलित वस्तीवर टोळक्याचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मावळ तालुक्यातील पवन मावळातील कोथुर्णे गावात किरकोळ कारण, तसेच राजकीय पार्श्वभूमीतून २५ ते ३० जणांच्या टोळक्याने गावातीलच दलित वस्तीवर हल्ला करून धुडगूस घातला. शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली.

सचिन दत्तू दळवी, शेखर मारुती दळवी, सोपान ज्ञानेश्वर दळवी, सूर्यकांत सतू दळवी, चंद्रकांत दत्तू दळवी, आकाश प्रकाश दळवी, दत्तू नारायण दळवी, भाऊ बाबू दळवी, वाघू येसु दळवी, सतीश राजाराम लोयरे, सचिन तुकाराम दळवी, सुनील तुकाराम कुंभार, काळू नथू दळवी, विठ्ठल बाळू दळवी, एकनाथ निंबळे, नंदू सतू दळवी, चंद्रकांत नथू दळवी, राजेश ज्ञानेश्वर दळवी, प्रवीण भाऊ दळवी, गणपत नारायण दळवी, स्वप्नील विठ्ठल दळवी, भगवान तुकाराम दळवी, दत्तू राजाराम लोयरे, नितीन शंकर दळवी, मास खान, योगेश वाघू दळवी, नितीन तुकाराम दळवी, विठ्ठल बाळू दळवी (सर्व रा. कोथुर्णे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिंद्र नाना सोनवणे (वय ४६, रा. समतानगर, कोथुर्णे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथुर्णे येथे नवरात्रीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देवीची मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी महेंद्र सोनवणे हे कामावरून घरी जात होते. वाटेत मिरवणूक असल्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून ते उभे राहिले होते. या वेळी मिरवणुकीत नाचणाऱ्या सचिन दत्तू दळवी हा सोनावणे यांच्याजवळ गेला व त्याला दुचाकीवरून खाली ओढत कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यानंतर सोनवणे यांचे पुतणे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असल्याची माहिती वरील तरुणांना मिळाली. त्यांनी अचानक दलित वस्तीतील सोनवणे यांच्या घरासह शेजारच्या घरांवर हल्ला करत धुडकूस घातला. घरातील महिला, पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ केली. टोळक्याने महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व घरातील रोख रक्कम लंपास केल्याचे सोनावणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक ढाकणे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच लाखांत दोन किलो सोने...!

$
0
0

बनावट सोने विकणाऱ्या भामट्याला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पितळ्याचे दागिने सोन्याचे असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने शनिवारी अटक केली. हा भामटा सोन्याचे दागिने खोदकाम करताना सापडले असून कर्ज असल्यामुळे कमी किंमतीत विकायचे म्हणून नागरिकांना फसवित असल्याचे समोर आले आहे.

गणेश नारायण सोळंकी (वय- ३५, रा. हडपसर, मूळगाव- इंदूर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बिजलीनगर परिसरात राहणाऱ्या शंकर मिसाळ यांना सोळंकी याने पाच लाख रुपयात दोन किलो वजनाची सोन्याची माळ विकली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी संतोष बर्गे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या पथकाने सोळंकी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी सोळंकीने त्याला इंदोर येथे खोदकाम करत असताना दोन किलो वजनाची सोन्याची माळ सापडल्याचे मिसाळ यांना सांगितले. त्याच्यावर पाच लाख रुपये कर्ज असल्याचे सांगून या सोन्याच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचा व्यवहार केला. सोळंकी याच्याकडील एक किलो ९७० ग्रॅम वजनाची माळ जप्त करून तपासणी केली असता ती नकली असल्याचे आढळून आले.

आपल्यावर काही लाखांचे कर्ज असून सोने कमी किंमतीमध्ये सोने विकायचे असल्याचे सोळंकी लोकांना सांगायचा. त्या दागिन्यातील एक तुकडा काढायला सांगून हातचालाखीने सोन्याचा तुकडा त्या लोकांकडे देऊन सराफाकडे तपासायला सांगायचा. सराफांनी सोने खरे असल्याचे सांगितल्यानंतर लोक त्याच्याकडून सोने विकत घेत असत. अशा पद्धतीने सोळंकी नागरिकांची फसवणूक करीत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या असून त्याच्यावर अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात सोमवारपासून पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवत आहे. शनिवारी शहरात पारा ३३.७ अंशांवर पोहोचला आहे. स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे शहरात सोमवारपासून दुपारनंतर मेघगर्जनेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोजागिरी सेलिब्रेशनच्या बेतावर पावसाचे पाणी फिरण्याची शक्यता आहे.

शहरात गेले अनेक दिवस कमाल तापमान ३२ अंशांपेक्षा अधिक आहे. शनिवारी शहरात ३३.७ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक होते. तर २१.४ अंश सेल्सियस हे किमान तापमानही सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक होते. परिणामी स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे शहराच्या काही भागात सोमवारी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सकाळी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर दुपारी गरम वाऱ्यांच्या झोतामुळे चांगलाच उकाडा जाणवत आहे. त्यामुळे सोमवारनंतर पावसाने हजेरी लावल्यास पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा विस्तार विमानतळापर्यंत?

$
0
0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मेट्रो प्रकल्पातील वनाज ते रामवाडी या मार्गाला होणाऱ्या विरोधावर तोडगा काढल्यानंतर आता त्याचा विस्तार विमानतळापर्यंत करण्याबाबत निर्णय आज, रविवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने मेट्रोचा विस्तार विमानतळापर्यंत करण्यास यापूर्वीच मंजुरी दिली असल्याने, गडकरी यांच्याकडूनही त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

अनेक महिन्यांपासून भुयारी की एलिव्हेटेड या चर्चेच्या ट्रॅकवर फसलेल्या मेट्रोला गेल्या महिन्यात गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गती मिळाली होती. बापट समितीच्या अहवालानुसार मेट्रो मार्गात बदल करण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मान्यता दिली. शहराच्या विमानतळाबाबत प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज, रविवारी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत रामवाडीपर्यंतच्या मेट्रोचा विमानतळापर्यंत विस्तार केला जावा, असा विषयही मांडण्यात येणार आहे.

रामवाडी ते विमानतळ हे अंतर साधारणतः अडीच किलोमीटरचे असून, मेट्रोच्या या विस्ताराला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) केलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) त्याचा समावेश नसल्याने पहिल्या टप्प्यात त्याचा विस्तार करण्यात अडचण असली, तरीही विमानतळापर्यंत मेट्रो झाल्यास त्याचा प्रवाशांना फायदाच होणार आहे. त्यादृष्टीने, गडकरींच्या बैठकीत मेट्रोच्या विस्ताराबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

'डीएमआरसी'कडून पाहणी

राज्य सरकारने बापट समितीने सुचविल्यानुसार मेट्रोच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यानुसार, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या सुधारित बदलांची पाहणी केली. जंगली महाराज रोडऐवजी नदीपात्राच्याकडेने जाणाऱ्या या संपूर्ण मार्गाची, त्यावरील संभाव्य स्टेशनची जागा पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. तसेच, याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांच्याशीही चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळीकडे ग्राहकांची पाठ

$
0
0

दर कमी होऊनही नवा साठा करण्यास व्यापारी अनुत्सुक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दर गगनाला भिडल्याने किरकोळ विक्रेत्यांसह ग्राहकांनी तूरडाळ खरेदीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या चोवीस तासांत तूरडाळीच्या दरांत क्विंटलमागे पाचशे रुपयांची घट झाल्याने एका किलोसाठी ग्राहकांना १७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या पाच दिवसांत तूरडाळीच्या दरांत क्विंटलमागे साडेतीन हजार रुपयांची घट झाली असली, तरी हे दरही चढेच असल्याने मागणी थंडावली आहे. परिणामी, ऐन दिवाळीसाठी डाळींचा नवा साठा खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डातील व्यापारी धाडस दाखवत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

साठेबाजीमुळे बाजारात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी, गेल्या आठवड्यात किलोचे दर २१० रुपयांपर्यंत वाढले होते. तूरडाळीने दीडशेचा टप्पा ओलांडला त्यावेळी डाळ खरेदीसाठी ग्राहकांनी आखडता हात घेण्यास सुरुवात केली. अनेक घरांसह खानावळ, हॉटेलच्या किचनमधूनही तूरडाळ हद्दपार होऊ लागली. व्यापाऱ्यांसह साठेबाजांवर छापे टाकून सुमारे सहा हजार टन डाळ राज्यातून जप्त करण्यात आली. साठा जप्त झाल्याने काही प्रमाणात गेल्या तीन ते चार दिवसांत डाळींच्या दरावर परिणाम झाला. पाच दिवसांत तूरडाळीच्या क्विंटलमागे साडेतीन हजारांची घसरण झाल्याने १७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर खाली आले. हरभराडाळ, मूगडाळ, मटकीडाळीत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने ताब्यात असलेली डाळ बाजारात लवकर आणल्यास येत्या सोमवारनंतर पुन्हा तूरडाळीच्या दर आणखी खाली येतील. सध्या डाळींचे दर चढे असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी तूरडाळ खरेदी करणे थांबविले आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील विक्रेत्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. डाळीचा उपलब्ध साठा नुकसान सोसून उधारीवर विकण्याची घाऊक व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली. आयात तूरडाळ मार्केटयार्डातील घाऊक बाजारात १३० रुपये किलो दराने विकली जात आहे. राज्यातील डाळ आणि आयात केलेल्या तूरडाळीच्या चवीत फरक आहे. आयात केलेली डाळ फारशी पसंतीस उतरत नसल्याने राज्यातील डाळी ग्राहक खरेदी करतात, याकडे लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच मागितल्याप्रकरणी भांडारपालाविरुद्ध गुन्हा

$
0
0

अधिकाऱ्याच्या घरासाठी मागितले पैसे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पीएमपी'च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या भांडारपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचीही पडताळणी केली होती.

'पीएमपी'चे भांडारपाल रमेश शामराव चव्हाण यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी टायर रिमोल्डिंग करणाऱ्या व्यावसा​यिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. 'पीएमपी'च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घराच्या अंतर्गत सजावटीचे काम करण्यात आले आहे. त्याचे बिल देण्यासाठी ८० हजार रुपयांची गरज होती. ते या व्यावसायिकाडून देण्याचा घाट 'पीएमपी'तील काही अधिकाऱ्यांनी घातला होता. 'पीएमपी'ने या व्यावसायिकाचे २० ते २५ लाख रुपयांचे बिल गेल्या अनेक महिन्यांपासून दिले नव्हते. हा व्यावसायिक पैशांसाठी हेलपाटे घालत असताना त्याला सजावटीचे बिल देण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे वैतागलेल्या या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष चव्हाण यांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्या वेळी चव्हाण यांनी ८० हजार रुपयांची मागणी केली. पैशांची मागणी त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घराच्या सजावटीचे बिल देण्यासाठी करण्यात आल्याने, साहजिकच त्या अधिकाऱ्याचीही पडताळणी करावी लागली.

लाच मागितल्याचे स्पष्ट

दरम्यान, त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यावसायिकाला बिल देण्यास सांगितल्याप्रकरणी संबंधित इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांनी त्या व्यावसयिकाकडून पैसे घेतले नाही. लाचेची रक्कम न स्वीकारल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापळा रचता आला नाही. मात्र, चव्हाण यांनी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीद्वारे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासाठी रस्ता खुला करा

$
0
0

खासदार अनिल शिरोळे यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रोडवरील फिनिक्स मार्केट सिटीपासून लोहगाव विमानतळाला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता महापालिकेने ताब्यात घेऊन वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी केली.

विमानतळ सल्लागार समितीची बैठक रविवारी लोहगाव विमानतळ येथे झाली. समितीचे उपाध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी सौरव राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार व विमानतळ संचालक अजय कुमार उपस्थित होते. फिनिक्स मार्केट सिटी येथे विमानतळाला जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या त्या रस्त्यावर मॉलमध्ये येणाऱ्या चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. हा रस्ता विमानतळ परिसरातील वाहतुकीसाठी नागरिकांना खुला झाल्यास त्यांची चांगली सोय होईल, शिरोळे व मुळीक यांनी सांगितले.

विमानतळाबाहेरील रोडवर गर्दीच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांना विमानतळापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. अनेकदा नागरिकांना सर्व सामान घेऊन चालत जाण्याची वेळ येते. त्यामुळे विमानतळाच्या अलीकडील ५०९ चौक ते विमानतळ या दरम्यान रोडचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी रुंदीकरण तातडीने करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रॉम्प्ट बिलिंग’ने वाचणार पालिकेचे २५ लाख रुपये

$
0
0

महावितरणतर्फे सॉफ्टवेअर उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिलेल्या मुदतीत महापालिकेला विजेचे बिल भरता यावे; तसेच विलंब शुल्क टाळण्यासाठी महावितरण कंपनीने महापालिकेला 'प्रॉम्प्ट बिलिंग'चे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. परिणामी पालिकेची दर महिन्याला तब्बल २५ लाख रुपयांची बचत होणार आहे.

महावितरणकडून दिले जाणारे बिल वेळेवर भरता येत नसल्याने पालिकेला विलंब शुल्क भरावे लागते. गेल्या काही वर्षांत पालिकेच्या विस्ताराबरोबरच नवीन इमारती, कार्यालये यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वीज वापराचा खर्चही वाढत आहे. महापालिकेला दरवर्षी सर्वसाधारणपणे १७५ कोटी रुपये वीज‌ बिल महावितरणकडे भरावे लागते. यामध्ये बचत करण्यासाठी तांत्रिक विभागाकडून प्रयत्न केला जात असून 'प्रॉम्प्ट बिलिंग' हा त्यावरील उपाय समोर आला आहे. प्रत्येकाने आपले वीज बिल वेळेवर भरावे, यासाठी महावितरणने प्राँट बिलिंग योजना सुरू केली आहे. यामध्ये ठरावीक मुदतीच्या आत बिल भरल्यास एक टक्का सूट मिळते. पालिकेच्या सर्व विभागांना मिळून दर महिन्याला सुमारे २५ कोटी रुपये बिल भरावे लागते. पालिकेची मुख्य इमारत, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृहे, स्मशानभूमी, नागरी सुविधा केंद्र, उड्डाणपूल, गार्डन, भुयारी मार्ग, जलशुद्धीकरण केंद्र, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र अशा विविध विभागांसाठी विजेचे बिल भरावे लागते.

महावितरणचे बिल पालिकेला मिळाल्यानंतर पालिकेकडून बिलाचे रिडिंग, रक्कम याची तपासणी केली जाते. त्यानंतर त्याची ऑडिट विभागाकडून तपासणी करून घेऊन बिल भरले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असल्याने अनेकदा पालिकेला विलंब शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. पालिकेला मुदतीत वीज बिल भरता यावे, यासाठी विशेष सॉफ्टवेअर महावितरणने तयार केले आहे. यामध्ये मीटर क्रमांक टाकल्यास रिडिंग, बिल यांची आपोआप तपासणी होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे मुदतीत पालिकेला बिल भरता येणार असल्याने पालिकेचे २५ लाख रुपये वाचणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीच्या आमिषाने ४० जणांना फसवले

$
0
0

दोन जणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उच्चशिक्षित तरुणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघांना फरासखाना पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपींनी तरुणांना नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटरहेड दिल्याचे तपासात समोर आले असून, त्यांनी अशाप्रकारे ३० ते ४० जणांना फसविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महादेव साहेबराव यादव (वय ३२, रा. गुळंब. ता. वाई, जि. सातारा) व अजित बाबासाहेब शेळके (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित माणिकराव जाधव (रा. रुपीनगर, भालेकर चाळ, निगडी) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधवचे बी. ई. कॉम्प्युटरचे शिक्षण झाले आहे. तो नोकरीच्या शोधात होता. आरोपी आणि त्याची भेट झाली. त्या वेळी आरोपींनी त्याला मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले आणि त्याचा विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडे एक लाख रुपये देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे अजितने त्यांना एक लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी त्याला बाणेर रस्त्यावरील एका नामांकित कंपनीत नोकरी लागल्याचे बनावट ऑफर लेटर दिले. त्याला दोन महिन्यानंतर कंपनीत जाण्यास सांगितले. त्यानुसार जाधव कंपनीत गेला असता त्याला दिलेले ऑफर लेटर बनावट असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

गेल्या महिन्यापासून आरोपी फरारी आहेत. पुण्यात अमित कुलकर्णी व सचिन जाधव या नावाने सतत जागा बदलून राहत होते. ते दोन महिने एका होस्टेलवर राहत होते. पोलिसांना त्यांची माहिती मिळाल्यानंतर ते या ठिकाणावरुनही फरारी झाले. त्यानंतर आरोपी बुधवार पेठेतील रेडलाइट भागात येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी शंकर कुंभार यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना या ठिकाणावरून त्यांना सापळा रचून अटक केली. आरोपींनी तीस ते चाळीस तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याची शक्यता आहे. दोघांना पुढील तपासासाठी चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएफएआय’ होणार ‘हायटेक’

$
0
0

'फिल्म हेरिटेज मिशन'मधून होणार कायापालट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'फिल्म हेरिटेज मिशन'च्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) हायटेक होणार आहे. डीसीपी प्रोजेक्ट, चित्रपट संवर्धनासाठी स्टोरेज व्हॉल्ट अशी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, त्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मान्यताही मिळाली आहे.

संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी 'मटा'ला ही माहिती दिली. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'फिल्म हेरिटेज मिशन'ची अंमलबजावणी एनएफएआयच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे संग्रहालय अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. या योजनेतून संग्रहालयाच्या लॉ कॉलेज रोड व कोथरूड या दोन्ही ठिकाणी नवीन यंत्रणा आणण्यात येणार आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या सल्लागार समितीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक जहानू बरुआ, संतोष सिवन, राजीव मेहरोत्रा यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला होता. सुमारे तीस कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

चित्रपटांत झालेल्या डिजिटल क्रांतीला अनुसरून चार डीसीपी प्रोजेक्टर्स, चित्रपट संग्रहित करण्याची क्षमता वाढवण्यासाठी स्टोरेज व्हॉल्ट बांधले जाणार आहेत. तसेच आयटी यंत्रणाही अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टोरेज व्हॉल्ट बांधण्यासाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटसारख्या मोठ्या संस्थांनी केलेल्या योजनेचाही अभ्यास केला जाणार आहे, असे मगदूम यांनी स्पष्ट केले.

डिजिटल इंडिया व स्कील इंडियाला जोडणार

फिल्म हेरिटेज मिशनच्या माध्यमातून अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याला डिजिटल इंडिया व स्कील इंडिया या केंद्र सरकारच्या योजनांशी जोडण्यात येणार आहे. चित्रपट संवर्धनाच्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आयटी यंत्रणा अद्ययावत करताना डिजिटल इंडियाचा विचार केला जाणार असल्याचे मिशनचे विशेष कार्य अधिकारी संतोष अजमेरा यांनी सांगितले.
........

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा विकास करणे गरजेचेच आहे. 'फिल्म हेरिटेज मिशन'च्या माध्यमातून तो होणे सकारात्मक पाऊल आहे. आतापर्यंत सेल्युलॉइड प्रिंटवर चित्रपटांचे जतन केले जात होते. बदलत्या काळात प्रिंटचे जतन करण्यासह डिजिटल तंत्रज्ञानाचीही व्यवस्था करावी लागणार आहे.
- अनिल झणकर, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजींकडे करा थेट तक्रारी

$
0
0

ई-मेल, एसएमएसद्वारे थेट तक्रारी, सूचना करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संवाद साधवा. तसेच, त्यांच्या काही सूचना, तक्रारीही ई-मेल, एसएमएस किंवा पत्राद्वारे पाठवाव्यात, असे आवाहन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी केले. जनताभिमुख पोलिस प्रशासन बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हे आवाहन केले. सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार, पोलिस महानिरीक्षक कृष्णकुमार व वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, 'नागरिकांनी त्यांच्या सूचना, तक्रारी पाठविल्या, तर त्याचे स्वागतच आहे. नागरिकांनी ई-मेल, पत्र, एसएमएसद्वारे संवाद साधला तर, नागरिकांना चांगली मदत करता येऊ शकेल. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी संवाद साधावा. जनताभिमूख पोलिस प्रशासन बनविण्यासाठी मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी या प्रयत्नांच्या पलिकडे जाऊन नागरिकांना पोलिसिंगमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.'

राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सशक्त, चांगल्या वर्तनाच्या व्यक्तींना पोलिस मित्र म्हणून घेतले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहनही दीक्षित यांनी केले. पोलिसांना बऱ्याच वेळा पंच साक्षीदार मिळत नाहीत. त्यामुळे आता पोलिस मित्र म्हणून येणाऱ्या व्यक्तीचा पंच म्हणून उपयोग होणार आहे. तसेच, या पोलिस मित्रांची प्रत्यक्ष पोलिसिंगमध्ये मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये वाहतूक नियमन, पेट्रोलिंग, नाकाबंदी, बेपत्ता असलेली मुले सापडल्यानंतर त्यांना घरी पोहचविणे या कामात साह्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलिस मित्रांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्तारीकरणाचे ‘टेक ऑफ’

$
0
0

लोहगाव विमानतळासाठी १५ एकर जागा देण्यास हवाई दलाची मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाने त्यांची १५ एकर जागा ३० वर्षांच्या भाडेकराराने देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणेकरांची हवाई वाहतुकीची गरज पूर्ण करू शकणाऱ्या विमानतळाचा प्रश्न येत्या सात ते दहा वर्षांसाठी मार्गी लागला आहे.

सध्याच्या विमानतळासमोरील दोन एकर जागा आणि १०० मीटरच्या परिसरातील खासगी जागा ताब्यात घेऊन संपूर्ण विमानतळाचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, दोन्ही महापालिकांचे आयुक्त, शहरातील आमदार आणि एआरपोर्ट अॅथरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, 'लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. हवाई दलाने जागा दिल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विस्तारीकरणाने हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. येत्या १० वर्षांत पुन्हा त्यावर मर्यादा येतील. त्यामुळे नवीन विमानतळ आवश्यक आहेच. त्यासाठी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर विमानतळ कामकाजासाठी कसा करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.'

'विमानतळाच्या समोरील बाजूस दोन एकर जागा उपलब्ध आहे. तेथे काही जागेवर बांधकाम असून, काही जागा वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जात आहे. या जागेचाही विस्तारीकरणासाठी वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरता भूमिगत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाचा विचार करण्याची सूचना केली आहे; तसेच विमानतळाच्या १०० मीटरच्या परिसरात खासगी जमिनी विकसन करण्यास बंदी आहे. त्यामुळे या १०० मीटरच्या परिघातील जागामालक त्यांच्या जागा देण्यास तयार असतील, तर त्या ताब्यात घेऊन त्यांना मोबदला द्यावा. त्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली आहे,' असेही त्यांनी नमूद केले.
.............

'लोहगाव येथील विमानतळावर सकाळी आठ ते साडेदहा वाजेपर्यंत हवाई दलाच्या विमानांचे सराव सुरू असतात. या वेळेत प्रवासी विमानांना धावपट्टी उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र, त्यानंतर प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये आणि विमानाचे टेक ऑफ व लँडिंग वेगाने व्हावे, याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधनसामग्रीचा वापर करावा,' अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळ साठेबाजांवर कारवाई होणारच

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोकांच्या तोंडची तूर डाळ काढून मिलमध्ये जाणार असेल, तर त्या लोकांना आम्ही सोडणार, मुंब्रा-पनवेलमध्ये २२ गोडावूनचे मालकच सध्या गायब आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर निश्चित कारवाई करण्यात येईल,' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट केले आहे. 'साठेबाजांची नाव फेडरेशनेच द्यावी, म्हणजे सर्वांना त्रास होणार नाही. 'एक पुडी बांधताना कमळाला मत द्या,' असे लोकांना सांगा हीच आमची व्यापाऱ्यांना अट होती, असेही मिश्किलपणे त्यांनी सांगितले.

भाजपने जाहीरनाम्यात एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केल्याबद्दल व्यापारी फेडरेशनच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री गिरीश बापट यांचा रविवारी चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अर्थमंत्री मुनगंटीवार व व्यापाऱ्यांच्या फेडरेशनचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

'आम्ही लाल दिव्यातून फिरण्यासाठी मंत्री झालो नाही आणि आम्ही प्रॉपर्टीही केली नाही,' असा टोलाही बापट यांनी लगावला. व्यासपीठावरील फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी खासदार बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आणि यमुनानगर येथील महिला मेळाव्याला खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला २५ वर्षे राज्य द्या

$
0
0

एलबीटी रद्दचे आश्वासन पूर्ण केल्यावर मुनगंटीवारांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'एलबीटी हटाव, नही तो आप को हटाऐंगे,' असा व्यापाऱ्यांचा या पूर्वीच्या सरकारला नारा होता. आश्वासन दिल्यानुसार एलबीटी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे 'हमको २५ साल बिठाओ,' असा नारा व्यापाऱ्यांनी द्यावा,' असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 'टॅक्स भरायला जाताना कोणी डीजे लावून जात नाही. कमावलेल्या संपत्तीपैकी काही हिस्सा हा टॅक्सरूपी भरण्याची भारताची परंपरा आहे. यापुढे जास्तीत जास्त टॅक्स भरणाऱ्यांचा सत्कार अर्थखात्याकडून केला जाणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले, 'मी अर्थमंत्री आहे. पण राज्याती तिजोरी रिकामी आहे. काँग्रेस सरकारने महाराष्ट्राचा इथियोपिया करून आम्हांला दिला आहे. भाजपकडे व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून पाहिले जाते. याचा आम्हाला गर्व आहे.'

अॅड. आप्पासाहेब शिंदे लिखित 'एलबीटी आंदोलनाची यशोगाथा' व गोविंद पानसरे लिखित 'शासकीय योजनांची विकासगंगा' या पुस्तकांचे अर्थमत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गोविंद पानसरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन राजेंद्र गावडे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, व्यापाऱ्यांच्या फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष मोहन गुरनानी, पुण्याचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, माजी अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, सोलापूरचे अध्यक्ष राजू राठी, नागपूरचे अध्यक्ष दिपेन अगरवाल, भाजप पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शितल शिंदे, नगरसेविका सिमा सावळे, आशा शेंडगे, विलास मडिगेरी, व्यापारी फेडरेशनचे सरचिटणीस गोविंद पानसरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागरी करा आजच साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोमवारी (२६ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत चतुदर्शी असून, त्यानंतर पौर्णिमा सुरू होत असल्याने, कोजागरी पौर्णिमा सोमवारी रात्री साजरी करायची की मंगळवारी रात्री याबाबत अनेक जणांच्या मनात संभ्रम आहे. मात्र, कोजागरी पौर्णिमा सोमवारी मध्यरात्रीच साजरी करावी, असा सल्ला सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांनी दिला आहे.

कॅलेंडरमध्ये सोमवार आणि मंगळवार अशा दोन्ही दिवशी पौर्णिमा लिहिली आहे; तसेच सामान्यपणे सूर्यादयापूर्वीची तिथी त्या दिवसाची तिथी समजली जाते, त्यामुळे मंगळवारीच पौर्णिमा साजरी करावी का, याबाबत संभ्रम आहे. मात्र, हा नियम योग्य असला, तरी कोजागरी ही रात्रीच साजरी केली जात असल्याने ज्या मध्यरात्री पौर्णिमा सुरू असेल तेव्हाच ती साजरी करायला हवी, असे देशपांडे यांनी सांगितले आहे.

'या पौर्णिमेस कौमुदी पौर्णिमा, तसेच शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. शरद ऋतुमध्ये शरीरातील सप्तधातू दुर्बल झालेले असतात, ते बलवान व्हावेत हा दुग्धपानामागील हेतू आहे. दुधाऐवजी 'पायस' म्हणजे तांदळाची खीर भक्षण करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या चंद्र हा या दिवशी पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो, त्यामुळे मानवी मनावर त्याचा होणारा परिणाम अधिक असतो. या रात्री दूध किंवा खीर अर्धा ते एक तास चंद्रप्रकाशात ठेवून नंतर त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर या देवतांचे पूजन मध्यरात्री करून त्यांना नैवेद्य दाखवून दुग्धपान करावे,' अशी माहिती देशपांडे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिरीश बापटांचे वादग्रस्त वक्तव्य?

$
0
0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. 'ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोंची भांडणं होणारच,' असे विधान बापट यांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात केले.

व्यापारी फेडरेशनच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री गिरीश बापट यांचा रविवारी चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 'रेशन व्यापारी व सरकार हे नवरा-बायकोसारखे असतात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो,' असे माजी खासदार गजाजन बाबर भाषणात म्हणाले होते. त्यावर बापट यांनी वरील विधान केले. 'अर्थमंत्री मुनगंटीवार यांना कामाचा खूप लोड असतो. अनेक फायली आणि 'चिठ्ठ्या' असतात. पण या चिठ्ठ्या तसल्या नाहीत. ते वय गेले,' असेही बापट म्हणाले. 'चिठ्ठी' या शब्दावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात 'हिरवा देठ..' या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रो ‘एलिव्हेटेड’

$
0
0

वाद संपुष्टात आल्याची गडकरी यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याची मेट्रो भुयारी व्हावी, की एलिव्हेटेड याबाबतचे सर्व वाद संपुष्टात आले आहेत, अशी निःसंदिग्ध ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. या प्रकल्पास लवकरच केंद्राची मान्यता मिळेल; तसेच नागपूर मेट्रोला अर्थसाह्य करणाऱ्या कंपनीने पुणे मेट्रोसाठीही सात ते साडेसात टक्के व्याजदराने अर्थपुरवठा करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती त्यांनी दिली.

विमानतळासंदर्भातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे मेट्रोशी संबंधित सर्व कामे पार पडली असून, मेट्रोचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट केले. गेली काही वर्षे ही मेट्रो भुयारी की एलिव्हेटेड, या वादात अडकून पडली होती; परंतु हे सर्व वाद आता संपुष्टात आले आहेत, असे सांगून गडकरी यांनी या विषयावर पडदा टाकला आहे. 'येत्या काही काळात महापालिकेच्या आयुक्तांनी काही बाबींची पूर्तता केल्यानंतर कॅबिनेट नोट तयार होऊन मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल,' असे गडकरी यांनी सांगितले. याच काळात मेट्रोचा आर्थिक पॅटर्न निश्चित होणार आहे. या संदर्भात आपण नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याशीही चर्चा केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा सहभाग असलेली कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पाला केडब्लूएफ या कंपनीने सात ते साडेसात टक्के व्याजदराने अर्थपुरवठा करण्याचे निश्चित झाले आहे. त्याच धर्तीवर त्या कंपनीकडून पुणे मेट्रोसाठी अर्थपुरवठा करण्याबाबत आपली चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवी कंपनी शोधण्याचा आणि अन्य प्रक्रियांसाठीचा वेळ वाचेल, असे ते म्हणाले.

'तुम्ही पुण्यात अडकवू नका'

मेट्रो प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्याचे गडकरी यांनी सांगितले, तेव्हा नेमकी अडचण कोठे होती, असे पत्रकारांनी विचारले. तेव्हा 'मी हा प्रकल्प दिल्लीमध्ये अडू देणार नाही, तुम्ही पुण्यात अडकवू नका,' अशी टिप्पणी त्यांनी केली.

'पुण्याकडे दुर्लक्ष नाही'

नागपूरच्या विकासप्रकल्पांना गतीने मान्यता मिळते आणि पुण्याचे प्रकल्प रखडतात, असे चित्र निर्माण झाले होते. त्याबाबत गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले. 'नागपूरच्या विकासाचा बॅक्लॉग होता, मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकल्प मार्गी लावले, तेव्हा अशी टीका झाली होती; पण आमचे पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही, पुण्याचे प्रकल्पही मार्गी लावण्यात येतील,' असे ते म्हणाले.

नव्या विमानतळासाठी प्रतीक्षाच

पुण्यातील नियोजित विमानतळासंदर्भातील निर्णयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 'हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १५ दिवसांनी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारतीवरून उडी, विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

पुण्यामध्ये बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कोथरूडमधील आपल्या क्लासच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीची घटना घडली. सौरभ भरेकर (वय १७ वर्ष) असं त्याचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप कळलेलं नाही.

सौरभला सकाळी सातच्या सुमारास त्याचे वडील कोथरूडमधील मयुर कॉलनीत असलेल्या दीपा पाठक केमेस्ट्री क्लासच्या इमारतीजवळ सोडून केले. मात्र तो क्लासमध्ये गेला नाही. त्याच्या क्लासची इमारत सहा मजल्याची आहे. या इमारतीच्या टेरेसवर सौरभ गेला आणि टेरेसवरून त्याने उडी मारली. सकाळी ८ वाजता ही घटना घडला. यानंतर ८ वाजून २० मिनिटांत पोलीस आले. पोलिसांनी त्याला पौडरोडच्या रुग्णालयात दाखल केले. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू झाले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘जीआर’ काढला

$
0
0

'सामाजिक न्याय वर्ष' निम्मे संपल्यानंतर सरकारची कार्यवाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त 'सामाजिक न्याय वर्ष' साजरे करण्याच्या घोषणेनंतर तब्बल सहा महिन्यांनी त्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६) 'सामाजिक न्याय वर्ष' म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध कार्यक्रमांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर कामे करण्यास मर्यादा निर्माण झाल्या होत्या. आता जीआर काढण्यात आल्याने कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारतर्फेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जात असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती राज्य सरकारने निश्चित केलेल्या कामांची अंमलबजावणी करणार आहे.

सामाजिक न्याय राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, समाजकल्याण आयुक्त व सामाजिक न्याय विभागाचे (बांधकामे) उपसचिव यांचा या समितीत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लॅकलिस्ट’ ठेकेदारालाच काम?

$
0
0

ई-टेंडरिंग कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ई-टेंडरिंग प्रक्रियेत केंद्र सरकारच्या विविध संस्था आणि राज्यातील इतर महापालिकांनी 'ब्लॅकलिस्ट' केलेल्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याचा घाट महापालिकेतर्फे घातला जात आहे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीच्या कामाबाद्दल राष्ट्रीय स्तरावर तक्रारी आणि शंका घेतल्या जात असतानाही, पालिकेने पुन्हा पुढील पाच वर्षांचे टेंडरिंगचे काम त्यांनाच देण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पालिकेच्या विविध विभागांमार्फत आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या विविध कामांच्या निविदा गेल्या काही वर्षांपासून ई-निविदा (ई-टेंडर) स्वरूपात काढल्या जातात. पालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून याच स्वरूपात टेंडर काढली जात आहेत. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीचा एक भाग असणाऱ्या एबीसी प्रोक्युअर कंपनीतर्फे गेल्या काही वर्षांपासून हे काम केले जात आहे. त्यांच्या कामाची मुदत गेल्यावर्षीच संपली होती, तरीही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. आत्ताही, पालिकेने अशा स्वरूपाचे काम देण्यासाठी टेंडर काढले असले, तरी पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी हे काम त्यांच्याकडेच सोपविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांनी दीड वर्षांपूर्वीच संबंधित कंपनीला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट केले आहे. तत्पूर्वीच, ठाणे महापालिकेचे कामही त्यांच्यामार्फत करण्यात आले होते; तरीही, नव्याने काम देताना जाहिरातीमध्येच संबंधित ई-प्रोक्युअरमेंट कंपनीला वगळून, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे, अनेक प्रख्यात संस्था-संघटना, इतर महापालिकांकडून संबंधित कंपनी ब्लॅकलिस्ट केली गेली असतानाही, पुणे पालिका मात्र त्यासाठी विशेष आग्रही असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ई-टेंडरिंगसाठी पालिकेने निवडलेल्या कंपनीचा 'ट्रॅक रेकॉर्ड' चांगला नाही. त्यांच्या कामाबाबत असमाधानी असल्याचा ठपका काही संस्थांतर्फे यापूर्वीच त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशावेळी, पालिकेने त्याच कंपनीला परत काम देण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images