Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

छेडछाडही ऑनलाइन

$
0
0

सोशल मीडियाबाबतच्या तक्रारी वाढल्या

Prashant.Aher @timesgroup.com

पुणे : 'व्हॉटस्अॅप', फेसबुकसारख्या सोशल ​नेटवर्किंग साईटस् शाळकरी मुली किंवा तरुणींची छेडछाड करण्याचा अड्डा बनल्याचे पुण्यात तरी समोर आले आहे. मोबाइल, तसेच सोशल ​नेटवर्किंगच्या प्लॅटफॉर्मचा वापर करताना पुरेशी खबरदारी न घेतल्यानेच महिलांना अशा विपरीत अनुभवास सामोरे जावे लागत असल्याचे पोलिसांना आढळले आहे. सायबर सेलकडे यावर्षी आलेल्या ८२ तक्रारींमधून निष्कर्ष काढण्यात आला असून त्यात 'टीनएजर्स' मुली सर्वाधिक बळी पडत असल्याचे उघड झाले आहे.

मुलींकडून 'व्हॉटस्अॅप'चा वापर करताना पुरेशी काळजी न घेता अनोळखी व्यक्तींशीही संवादाचा रस्ता सहज खुला होतो. त्यामुळेच या मुली किंवा महिला अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करणे आणि त्यातूनच मोहांना बळी पडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही घटनांमध्ये मुली अशा व्यक्तींवर विश्वास ठेवत अनेकदा आपले फोटो पाठवतात. त्यात कधीकधी खासगी फोटोंचाही समावेश होतो आणि त्याआधारे अशा व्यक्तींकडून मुलींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडले आहेत.

सोशल मीडियाच्या 'व्हर्च्युअल' जगात मुलींना स्वप्नांच्या नगरीतच असल्याचे भासवण्यात येते आणि त्या आमिषांना मुली बळी पडतात. आपली गुपिते समोरील व्यक्तीला कळत-नकळत सांगितली जातात; तसेच त्या व्यक्ती मुलींच्या पालकांचीही माहिती काढतात. ही सर्व माहिती ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे निरीक्षण सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी नोंदवले.

फेसबुक; तसेच सोशल नेटवर्किंग साईटमुळे त्रास किंवा फसवणूक झाल्याच्या तब्बल ७७ घटना पुणे शहरात घडल्या आहेत. या सर्वच गुन्ह्यांतील आरोपी व्हाइट कॉलर असल्याने त्यांनी आपली खरी ओळख लपवलेली आहे. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना 'सोशल ​नेटवर्किंग साईटस्'कडून येणाऱ्या माहितीवर अवलंबून राहावे लागत असल्याने तपासासाठी विलंब होतो.

मुलीच्या नावे चॅटिंग

पुण्यातील एका नामांकित शाळेतील मुलींचा 'व्हॉटस्अॅप'वर एक ग्रुप होता. कर्नाटकातील एकजण आपण मुलगी असल्याचे भासवत या ग्रुपमध्ये अॅड झाला. त्याने नाव धारण केलेली मुलगीही पाच वर्षांपूर्वी त्या मुलींच्याच वर्गात होती. त्यामुळे इतर मुलींनीही तिची आस्थेने विचारपूस करत तिच्याबरोबर ग्रुपवर चर्चा केली. त्यानंतर या आरोपीने येथील मुलींशी 'वन-टू-वन' चॅटिंग सुरू केले आणि बहुतेक मुलींची गुपिते काढून घेतली. त्यानंतर त्याने या मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यांची गुपितेही पालकांना सांगण्याची धमकी त्याने दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

ई-मेल- ३२ फेसबुक, सोशल ​नेटवर्किंग साईटस्- ७७ मोबाइल- १५ बेवसाइट- १४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवड अयोग्य; पण विद्यार्थ्यांचीही चूकच

$
0
0

एफटीआयआय संपाबाबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे मत

Asawari.Chiplunkar@timesgroup.com

पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड अयोग्यच आहे,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी हा मुद्दा इतका ताणणेही चुकीचे आहे, असेही त्यांनी 'मटा'शी बोलताना नमूद केले.

'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांचा संप मिटण्याची चिन्हे नसताना खेर यांनी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी चौहान यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवितानाच विद्यार्थ्यांनाही टोला हाणला आहे. 'शैक्षणिक वर्षातील पाच-सहा महिने संप करण्यात घालवणे योग्य नाही,' अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना धारेवर धरले.

'मेरा वो मतलब नही था,' या हिंदी नाटकाच्या प्रयोगासाठी खेर शुक्रवारी पुण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, खास 'मटा'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या नाटकाच्या उत्पन्नातून कोरेगाव पार्कमधील दी पुणे ब्लाइंड स्कूलला मदत करण्यात येणार आहे. या वेळी त्यांनी एफटीआयआय, पुरस्कार परत करणारे साहित्यिक, सेन्सॉर बोर्ड, एनएसडी आदी मुद्द्यांवर मोकळेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली.

'एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड अयोग्यच आहे. या निवडीला वैयक्तिकरित्या माझाही विरोधच आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडून हा मुद्दा इतका ताणला जाणे चुकीचे आहे. वास्तविक पाहता, चौहान यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामात व संस्थेतील शैक्षणिक बाबींमध्ये थेट संबंध येणार नाही. मात्र, अनावश्यक लांबलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे,' असेही खेर म्हणाले.

'सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या शैक्षणिक संस्था या स्वतःच्याच विश्वात रममाण झालेल्या असतात. विशेषतः एनएसडीने बाहेर काय चालले आहे हे डोळे उघडून बघण्याची गरज आहे. दर पाच वर्षांनी प्रत्येक संस्थेचे 'सर्व्हिसिंग' केले पाहिजे,' असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार परत करून सेलिब्रिटी होण्याचा प्रयत्न

सरकारचा निषेध करण्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे साहित्यिक सेलिब्रिटी बनण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही खेर यांनी केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठीच हे पुरस्कार परत केले जात आहेत. पुरस्कार परत करणाऱ्या काही साहित्यिकांचे साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला असता, या साहित्यिकांना पुरस्कारच का दिला हा प्रश्न मला पडला. निषेध करण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र मार्ग असू शकतो. मात्र, यापूर्वी भीषण घटना घडल्या नाहीत का,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजाच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गांजामिश्रित तरंगच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन किलो गांजामिश्रित तरंगच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

प्रमोद त्रिभुवन झा (वय ४५, रा. कोंढवा बुद्रुक, मूळ बिहार) आणि किसन रंगलाल प्रजापती (वय ३२, रा. हनुमान सुपर मार्केट समोर, कोंढवा, मूळ राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे कर्मचारी विनायक जाधव यांना खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम आश्रम रोडवर गांजामिश्रित लहान गोळ्यांच्या पुड्या आणि गांजाची विक्री केली जात होती. सायबर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत नवले यांच्या पथकाने आरोपी झा याला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे तरंग मनुकायुक्त गांजाच्या गोळ्यांची एक किलो सहाशे ग्रॅमची पाकिटे सापडली. त्याच परिसरातील प्रजापती याच्या दुकानावर छापा टाकून त्याच्याकडून दोन किलो गांजायुक्त गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा पुन्हा एकदा ‘कॅम्पस मेकओव्हर’ची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व प्रयोगशाळा आणि विविध विभागांमधील वर्गखोल्या लवकरच अद्ययावत होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी नुकतीच दिली. या व्यापक 'कँपस मेकओव्हर'साठी विद्यापीठाने जवळपास ७० कोटी रुपये खर्चाची तयारी ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात नव्याने सुरू झालेल्या 'आयसर'सारख्या संस्थांमधील प्रयोगशाळा आणि वर्गखोल्यांमधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधांची विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांमध्येही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर, केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही उल्लेखनीय ठरणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही पहिल्यांदाच व्यापक स्तरावर 'कँपस मेकओव्हर' करणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

डॉ. गाडे म्हणाले, 'या प्रयत्नांतून विभागनिहाय वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. फर्निचरपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटीपर्यंतच्या सर्व बाबींचा त्यात विचार करण्यात येईल. त्यासाठीची निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. येत्या वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्यापीठातील ५०० आसनक्षमतेचे प्रेक्षागृह, नवे विश्रामगृह लवकरच पूर्ण होणार असून, विद्यापीठांतर्गत सुशोभीकरणाचे कामही सध्या वेगाने सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकीलाही ‘स्मार्ट’ करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी खडकी

खडकी शहराला स्मार्ट करण्यासाठी येत्या काळात प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन खडकीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. खडकीच्या प्रियदर्शनी मित्र मंडळ आणि मनीष आनंद हेल्प लाइन यांच्या वतीने खडकीमध्ये (२२ ऑक्टोबर) विजयादशमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या वेळी खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अनुराग भसीन, माजी पर्यटन राज्य मंत्री चंद्रकांत छाजेड, आयोजक नगरसेवक मनीष आनंद, पूजा आनंद आणि वैशाली पहिलवान उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान बोलताना बापट, म्हणाले, 'भविष्यात खडकीला सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.

राजकारण बाजूला ठेऊन विकासकामे केले जातील. कोण कोठून निवडून आला, यापेक्षा कोण कसे काम करतो, हे महत्त्वाचे आहे. 'स्मार्ट पुण्या'सह 'स्मार्ट खडकी'साठीही नक्कीच विचार केला जाईल.निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हण लक्षात ठेवून काम करणे महत्त्वाचे आहे.'

'खडकीची जनता आपल्या बाजूने असल्यामुळे इतरांचा विचार करून नका. गेल्या सहा वर्षात झालेल्या विकासामुळे खडकीचे नावलौकिक वाढले आहे,' असे मत छाजेड यांनी व्यक्त केले. विजयादशमीच्या कार्यक्रमानिमित्त 'जागर स्त्री शक्ती'चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये स्त्री भ्रृण हत्या, नारी शक्तीचे महत्त्व पटविणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. विविध क्षेत्रात आपले नावलौकिक निर्माण करणाऱ्या आणि बिकट परिस्थितीवर मात करून परिवाराला मुलांना शिक्षण देणाऱ्या वीस माता, भगिनी आणि महिलांचा सत्कार करण्यात आला. पैठणी, गौरवचिन्ह आणि तुळस देऊन या महिलांचा सत्कार करण्यात आला.

तलवारीची भेट

'समाजात दुष्ट प्रवृत्ती त्यामुळे त्यांच्याशी लढा देण्यासाठी तलवारीची गरज होती,' असे बापट यांनी सांगितले. विजयादशमी कार्यक्रमाचे आयोजक मनीष आनंद यांनी बापट यांना चांदीची तलवार, प्रभू श्रीराम, सीता लक्ष्मण आणि हनुमानाची पंचधातूची मूर्ती भेट दिली. त्या वेळी बापट यांनी भेट दिलेली तलवार उगारून फोटोसाठी 'पोझ' दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली येथे एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान एक्स्प्रेस वेवरील मळवली येथील महामार्ग पोलिस ठाण्याच्या समोर घडली. राजू तुकाराम शिंदे (४५, रा. पाटण, मूळ गाव - इंदोरी मावळ) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शिंदे मळवली येथून पाटण येथील सुदामनगरी येथील त्यांच्या घरी निघाले होते. त्या वेळी रस्ता ओलांडताना त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. राजू शिंदे यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे शिंदे यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबा मंदिरातून मुखवटे चोरीला

$
0
0

पिंपरी : कामशेतजवळील कडधे गावात असलेल्या खंडोबा मंदिरातील देवांच्या मूर्तीं वरील सव्वाकिलो वजनाचे चांदीचे मुखवटे अज्ञात चोरट्याने लांबविली. बबन महादू तुपे (४९, रा. कडधे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

मावळ तालुक्यातील कडधे गावचे ग्रामदैवत खंडोबा असून, गावात खंडोबाचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात खंडोबा, म्हाळसादेवी, बानुबाईदेवी व द्वारपाल यांचे चांदीचे मुखवटे होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मंदिराच्या गाभाऱ्याच्या लोखंडी जाळीचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर सव्वा किलो वजनाचे देवाचे मुखवटे चोरट्यांनी लांबविले.

शेतीच्या वादातून चाकू हल्ला

तळेगाव : शेती वाटपाच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली. शंकर बाबूराव वीर (५५, रा. इंदोरी, ता. मावळ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोहर दशरथ वीर (२५, रा. इंदोरी, ता. मावळ) याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत अर्भक वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नवजात अर्भकावर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वेगाने खालावलत गेलेली प्रकृती... त्यातच त्याचा मृत्यू होणे आणि तेवढ्याच वेगाने त्याच्या नातेवाइकांचे गायब होणे... या सर्व गोष्टींमुळे महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमधील प्रशासन आणि पोलिसांची गुरुवारी (२२ ऑक्टोबर) चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, अर्भकाच्या आईची प्रकृती बिघडल्याने तिला अॅडमिट केलेल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निघून गेल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

तीन दिवसांच्या अर्भकाच्या आजोबांनी अर्भकाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बाब नातेवाइकांना सांगून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करायची होती. मात्र, अर्भकाला अॅडमिट करण्यासाठी घेऊन आलेले आजोबा हॉस्पिटलमध्ये नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे, हे सांगण्यासाठी नातेवाइकच सापडत नसल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.

पोलिस, सुरक्षारक्षक, परिचारिका, डॉक्टर आदींसह अनेकांनी नातेवाईकांचा शोध घेऊन ही ते सापडत नसल्याने हॉस्पिटलमधीलच चौकीत नातेवाइक निघून गेल्याची नोंद करण्यात आली. अॅडमिट करतेवेळी दिलेल्या संपर्क क्रमांकावरही संपर्क होत नव्हता. अखेर संततुकारामनगर पोलिस चौकीत याबाबत कायदेशीर प्रक्रिया करून प्रशासनाने तक्रार दिली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर नातेवाइकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह ताब्यात द्यावयाचा आहे असे पोलिसांनी नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर काही नातेवाईक वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्यावर आपण कुठे निघून गेला होतात असा सवाल पोलिसांनी नातेवाइकांना केला.

नातेवाइकांचा हलगर्जीपणा

चिमुरड्याच्या आईची प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला तळेगाव दाभाडे येथील एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. चिमुरड्याच्या आईची प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी गुंतागुंत वाढत गेल्याने सर्व जण तेथील हॉस्पिटलमध्ये गेल्याचे अर्भकाचे नातेवाइक व्यंकटेश कोळी यांचे म्हणणे होते. कुटुंबीयांचा दावा कितपत खरा आहे, यापेक्षा त्यांनी दाखविलेल्या हलर्गीपणामुळे प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत प्रशासनाने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांकडे तक्रार

अर्भकाला अॅडमिट करण्यासाठी घेऊन आलेले आजोबा हॉस्पिटलमध्ये नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे, हे सांगण्यासाठी नातेवाइकच सापडत नसल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर संततुकारामनगर पोलिस चौकीत याबाबत कायदेशीर प्रक्रिया करून प्रशासनाने तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

$
0
0

पिंपरी : पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नीसह सासरच्या मंडळीविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर वासुदेव खैरनार (रा. शुभश्री सोसायटी, जय गणेश व्हिजन, आकुर्डी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्याचे वडील वासुदेव दामोदर खैरनार (वय ६०, रा. शिवमनगर, पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

पत्नी कांचन चंद्रशेखर खैरनार (रा. शुभश्री सोसायटी, जय गणेश व्हिजन, आकुर्डी), सासरे पोपट ताराचंद बोरसे, सासू मीना पोपट बोरसे व मेहुणा मयूर पोपट बोरसे (सर्व रा. साई आर्चिव्ह, पिंपळे सौदागर) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथे राहणाऱ्या चंद्रशेखर यांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) राहत्या घरात बेडशीटच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रशेखर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, 'मुलाला त्याची पत्नी व त्याच्या सासरची मंडळी किरकोळ कारणावरून तसेच घरगुती कारणातून मानसिक त्रास देत असे. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली' असे नमूद केले आहे. त्यामुळे चंद्रशेखर याची पत्नी व सासरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतपीठाला चालना

$
0
0

चिखलीतील जागा निश्चित करण्यासाठी पाहणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उभारणीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संत साहित्याचे अभ्यासक यांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) संयुक्त पाहणी दौरा केला.

विद्यार्थ्यांना ऐच्छिक शिक्षणाबरोबरच पारंपरिक सांप्रायिक शिक्षण मिळण्याच्या हेतून संत विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी चिखलीत जागेचा शोध चालू आहे. गायरान परंतु, महापालिकेचे आरक्षण असलेली तीन हेक्टर ४२ आर जागा संतपीठासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या पातळीवर यांच्याशी चर्चा चालू असून, हा प्रश्न येत्या महिन्याभरात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आयुक्त राजीव जाधव, स्थानिक नगरसेवक दत्ता साने, स्वाती साने, शहर अभियंता एम. टी. कांबळे यांनी पाहणी केली.

संगीत अकादमीच्या धर्तीवर संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संतपीठ उभारणार आहे. त्यामध्ये वादन, गायन, किर्तन आणि प्रवचन यांसारख्या सांप्रदायिक परंपरेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. यामध्ये मराठी व्याकरण, श्रीमद्भगवतगीता, गाथा, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी अध्याय व ओव्या आणि वारकरी भजन, विचारसागर, संपूर्ण गीता, ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय व ओवी, भजनसंग्रहातील वाराचे व जन्माचे संपूर्ण अभंग, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय, पंचदशी, ज्ञानेश्वरीतील १५ वा अध्याय, भजनसंग्रहातील नाटाचे अभंग आणि ज्ञानेश्वरी अध्याय १३ ते १८, पंचदशी, ज्ञानेश्वरी पाचवा व सातवा अध्याय, गाथेतील संतपर प्रकरणांचे पाठांतर आणि आठवड्यातून तीन दिवस किर्तन शिकविले जाईल, असे नियोजन आहे.

'संतपीठात शिक्षण, संशोधन आणि संस्कार त्रिसूत्रीचा प्रभावीपणे उपयोग व्हावा, अशी मुख्य सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे. याशिवाय वैष्णविक पातळीवरील आदर्श विद्यापीठ, सूत्रबद्ध अभ्यासक्रम, अध्यात्माचा प्रचार करणारे माध्यम, डोळस भक्तीचा जागर, संशोधनाला प्राधान्य, निवासी इमारत या बाबी विचारात घेऊन उभारणी करण्यात येणार आहे. या कामाला प्राधान्य देऊन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहे,' असे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.

संत साहित्य आणि कार्य यांची व्याप्ती खूप मोठी आहे. मराठी संस्कृतीचा गाभा संत विचारांमध्ये आहे. त्यामुळे संतपीठाची उभारणी केवळ वारकरी संप्रदायापुरती मर्यादित नसावी. ते समाजप्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे.

- डॉ. सदानंद मोरे

अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सल्लागारासाठी दीड कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या दिशेने एक पाऊल टाकणाऱ्या महापालिका प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत कोणताही स्मार्ट बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. सायकल वापराला प्राधान्य देण्यासाठी कॉम्प्रेन्सिव्ह सायकल प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे. यासाठी तब्बल एक कोटी १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याला मान्यता मिळावी, यासाठी हा प्रस्ताव स्थायी समित‌ीसमोर ठेवण्यात आला आहे.

शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आवश्यक असा आराखडा तयार करण्यासाठी यापूर्वी पालिकेने मॅकेन्झी कंपनीला दोन कोटी १५ लाख रुपयांची सल्लागार फी दिली असतानाही सायकल वापराला प्राधान्य देण्यासाठी नवीन सल्लागारासाठी प्रशासनाने एक कोटी १५ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी मागितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने नागरिकांचा सहभाग आणि तज्ज्ञांच्या मदतीने एकत्रित आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असतानाच पालिकेच्या पथ विभागाने शहरासाठी कॉम्प्रेन्सिव्ह सायकल प्लॅन तयार करण्याचा प्रस्ताव आणला आहे. पुढील २० वर्षांचे नियोजन करून सायकलचा वापर अधिक वाढविणे, सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करणे, या ट्रॅकवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सुविधा पुरविणे, सायकलस्वारांची मोजणी, सर्व्हे, डेमोग्राफी, सद्यस्थिती आणि भविष्यात लागणाऱ्या सुविधा आणि जनजागृती करणे या बाबींचा या प्लॅनमध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भांडारकर’ शोधणार तुकोबारायांचे अभंग

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी', 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' यांसारख्या असंख्य अभंगांमधून भेटणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अप्रकाशित अभंगांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा प्रकल्प भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तुकाराम महाराजांच्या अप्रकाशित अभंगांसह निरूपण न झालेल्या अभंगांवरही संशोधन केले जाणार असून, तुकाराम महाराजांचे वंशज आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखालीच हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

भांडारकर संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये हा प्रकल्प सर्वांत महत्त्वाचा असेल, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांनी 'मटा'ला दिली. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग वारकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही मुखोद्गत असले, तरी त्यांचे अनेक अभंग अद्याप अप्रकाशित आहेत; तसेच काही प्रकाशित अभंगांचेही निरूपण होणे आवश्यक असल्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे भांडार असलेल्या तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या निरूपणासह संस्थेकडे असलेल्या १८ हजार हस्तलिखितांचेही डिजिटायझेशन करण्यात येणार असल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले.

प्रार्थना समाजाने तुकाराम चर्चा सोसायटी या नावाची संस्था स्थापन केली होती. यातील सदस्यांच्या बैठकांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल चर्चा केली जात असे; तसेच ही माहिती लिहून काढली जात असे. १८०० अभंगांपैकी काही अभंग प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेतून प्रसिद्ध होत; तसेच १९३५ मध्ये एक पुस्तकही प्रसिद्ध झाले होते. या माध्यमातून १८०० पैकी ७५० अभंग प्रकाशित झाले. आता उर्वरित अभंगांचा शोध घेण्यात येणार असून त्यांचे निरूपण केले जाईल.

- डॉ. सदानंद मोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची फेरनोंदणी करा, जप्ती टाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंधरा वर्षे जुन्या वाहनांची फेरनोंदणी करा, पर्यावरण कर भरा आणि वाहनांची जप्ती टाळा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या वाहनांची युद्धपातळीवर तपासणी केली जाणार असून, फेरनोंदणी न झालेल्या व पर्यावरण कर थकित असलेल्या वाहनांची जप्ती करण्याचा इशाराही 'आरटीओ'ने दिला आहे.

पंधरा वर्षांपूर्वी पुण्यात सुमारे आठ लाख वाहने होती. आता ही संख्या २९ लाखांवर गेली आहे. याचाच अर्थ आठ लाख वाहनांची पुन्हा नोंदणी होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अशी फेरनोंदणी असलेल्या वाहनांची संख्या कमी आहे. अजूनही लाखाहून अधिक वाहनांची फेरनोंदणी झालेली नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अशा वाहनांच्या विरोधातील कारवाईचा फास आणखी आवळण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.

'आरटीओ'ने गेल्या आठवड्यापासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ४१० दुचाकी व २१ चारचाकी वाहने जप्त केली आहेत. ३१ ऑगस्ट २००० या तारखेपूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना फेरनोंदणी करून पर्यावरण कर भरावा लागेल.

नोंदणी न केलेली वाहनेही अधिक

पुणे आरटीओ आणि पिंपरी-चिंचवड आरटीओकडे नोंदणी झालेल्या दुचाकी वाहनांपैकी सन २००० पूर्वी नोंदणी झालेल्या ६४ सिरिजमधील वाहनांची फेरनोंदणी करावी लागणार आहे, तर १६ सिरिजमधील चारचाकी वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे. यातील काही नागरिकांनी नोंदणी केली आहे; मात्र, नोंदणी न केलेल्या वाहनांची संख्याही अधिक आहे.

प्रदूषणाला आळा बसेल

पंधरा वर्षे जुन्या वाहनांची फेरनोंदणी करताना, आरटीओमध्ये त्या वाहनाची यांत्रिक तपासणी केली जाते. ते वाहन वाहतुकीच्या दृष्टीने योग्य असले, तरच त्याची नोंदणी केली जाते. त्यामुळे साहजिकच प्रदूषणाला आळा बसेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शाळांतही ‘लव्हलेटर’

$
0
0

Siddharth.Kelkar@timesgroup.com

पुणे : मुलांमधील वर्तनसमस्येबाबत पालकांच्या समुपदेशन कार्यशाळा आयोजिण्याची वेळ आता शहरातील प्राथमिक शाळांवरही आली आहे. प्रचंड व्रात्यपणा, गैरवर्तन, शिव्या देणे, वर्गातील मुलगा-मुलगी यांच्या जोड्या लावणे असे प्रकार इयत्ता तिसरी-चौथीच्या वर्गांतही आता सर्रास दिसून येत आहेत.

पुण्यातील काही बालवाडी; तसेच प्राथमिक शाळांनी या प्रकारांची गंभीर दखल घेऊन पालकांच्याच समुपदेशन कार्यशाळा आयोजिण्याचे पाऊल उचलले आहे. पालक-मुलांचा संवाद कसा असावा, शालेय वर्तन कसे असावे, मुलांच्या वर्तनसमस्येबाबत तोडगा कसा काढावा, याबाबत तज्ज्ञ कौन्सेलरकडून या कार्यशाळांत मार्गदर्शन केले जात आहे.

'यंदा आम्ही प्रथमच तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली. मधल्या सुट्टीत मारामाऱ्यांचे वाढलेले प्रचंड प्रमाण, मुलगे एकमेकांना देत असलेल्या शिव्या, मुलगा-मुलगी यांची नावे जोडून चिठ्ठ्या पाठवणे अशा प्रकारांत झालेली वाढ चिंता करण्याजोगी आहे. आम्ही पालक सभेत वेळोवेळी पालकांना याबद्दल सांगितले आहे; पण तज्ज्ञ कौन्सेलरकडून याबाबत पालकांचे समुपदेशन करण्यासाठी; तसेच याबाबत काय उपाययोजना करता येतील, याची माहिती देण्यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित केल्या,' अशी माहिती शहरातील एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.

मुलांमध्ये आक्रस्ताळेपणा, हट्टीपणा, खोटे बोलण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे निरीक्षण या कार्यशाळांमध्ये पालकांनी नोंदवले. याची नेमकी कारणे काय, त्याबाबत पालकांनी मुलांशी कसा संवाद साधायला हवा, याचे मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले.

'विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कौन्सेलिंग करणे ही काळाची गरज आहे. आमच्याकडेही आम्ही त्यासाठी कौन्सेलर नेमला आहे. अभ्यासाचा ताण, आरोग्यसमस्या, विशेषतः मुलींसाठी 'गुड टच, बॅड टच'बाबतची जागरूकता आदी गोष्टींबाबत आम्ही पालकांशी संवाद साधतो आहोत,' असे हुजूरपागा प्रशालेच्या मुख्याध्यापक अलका काकतकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच आजारांसाठी बालकांना एकच लस

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com

लहान वयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पूर्वीच्या चार ऐवजी पाच रोगप्रतिबंधकांचा समावेश असलेली 'पेंटावॅलंट' लस नोव्हेंबरपासून राज्यातील बालकांना मोफत देण्यात येणार आहे. पूर्वीच्या डोसेसमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), तसेच हिपॅटायटिस बी या आजारांच्या रोगप्रतिबंधक लशीचा समावेश होता. 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी' या आजाराच्या प्रतिबंधक लसीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

येत्या नोव्हेंबरपासून 'पेंटावॅलंट' लस मोफतपणे प्रत्येक बालकाला दिली जाईल. राज्यात दर महिन्यात पावणेदोन लाख बालकाला ही लस देण्यात येणार आहे. त्यानुसार वर्षात २१ लाख बालकांना 'पेंटावॅलंट'चे तीन डोसेस दिले जाणार आहेत. त्याकरिता आरोग्य खात्याकडून ६३ लाख डोसेसची गरज आहे. परंतु, इतर पुरेसा साठा आवश्यक असल्याने एका वर्षासाठी ९० लाख डोसेसची आवश्यकता भासणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी अशा चार लशींचा समाविष्ट असलेले दोन प्रकारची इंजेक्शन एका वेळी दिली जात होती. बालकाच्या जन्माच्या पहिल्या दीड महिन्यात एक, अडीच महिने आणि नंतर साडेतीन महिन्यांच्या कालावधीत असे प्रत्येकी दोन इंजेक्शनचे डोस देण्यात येत होते. त्यामुळे एका वर्षापर्यंतच्या बालकाला तीन वेळा डोस देण्यासाठी सहा वेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0

१६४३ चालकांना बडगा; सहाशे रिक्षांचे परवाने रद्द करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी बडगा दाखविण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १६४३ रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. त्यांपैकी ६०० रिक्षांचे परवाने सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे.

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. भाडे नाकारण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, याबाबतच्या तक्रारी वाहतूक विभागाडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात. त्याचबरोबर दूरच्या अंतराचे भाडेही दीडपट वा दुप्पट दराने नेण्याचे मान्य झाल्यावरच स्वीकारतात, असा अनुभव आहे. अशा रिक्षाचालकांवर वचक ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. रेल्वे स्टेशन आणि एसटी बस स्टँडच्या परिसरात मुख्यत्वे ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

शाळा, कॉलेजांना लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्यांबरोबरच शहरात दाखल होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहुतकीच्या साधनांना प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे या सणांच्या काळात जवळचे भाडे नाकारण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्याचे प्राप्त तक्रारींवरून दिसते. त्यामुळे ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहाणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात आरटीओच्या माध्यमातूनही भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. त्यासाठी प्रवाशांनी त्या संबंधीची तक्रार आरटीओकडे नोंदविणे गरजेचे आहे. आरटीओ संबंधीत रिक्षाचालकाला नोटीस पाठवून त्याची बाजू मांडण्यास सांगते. त्यानंतर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देते.

तक्रारींना प्रतिसाद कमी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रिक्षाचालकांच्या विरोधात प्राप्त होणाऱ्या एकूण तक्रारींपैकी केवळ दहा टक्के तक्रारींना रिक्षाचालक प्रतिसाद देत असल्याचे आरटीओने जाहीर केलेल्या माहितीतून उघड झाले आहे. तक्रार प्राप्त झालेल्यांपैकी ९० टक्के रिक्षाचालक परमिट रिक्षा पासिंग किंवा परमिट नूतनीकरणाच्या वेळी दंडाची रक्कम भरतात.

येथे नोंदवा तक्रारी

भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकाविषयी; तसेच रिक्षांबाबत अन्य तक्रारी पुढील क्रमांकावर नोंदविता येतात.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे - ०२०- २६०५८०८० किंवा २६०५८२८२
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड - ०२०- २७४९२८२८२
पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा - ०२०-२६१२२०००

वेबसाइट :
आरटीओ - mh12@mahatranscom.in
वाहतूक पोलिस - punepolicetraffic@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासन प्रत्यक्षात येणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, ही पुणेकरांच्या मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनामुळे मार्गी लागणार, की पुन्हा केवळ आणखी एक नवे आश्वासन पदरात पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई हायकोर्टाचे पुण्यात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी यापूर्वी वेळोवेळी अनेक आंदोलने, शिष्टमंडळांच्या भेटी आणि चर्चा झाल्या आहेत. काही काळापूर्वी पुण्यातील सर्व वकिलांनी तब्बल १६ दिवस कोर्टाचे कामकाज बंद ठेवून मोठे आंदोलन पुकारले होते. मात्र, राज्य सरकारकडून पुणेकरांच्या पदरात काहीही पडले नाही. पुण्यापासून मुंबई जवळ असल्याचे कारण यापूर्वी या मागणीच्या विरोधकांकडून देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मुंबई हायकोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये गेली अनेक वर्षे पुण्यातील खटल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सर्व पक्षकारांना मुंबईत प्रत्येक तारखेला पडणारा हेलपाटा, खर्च आणि पुन्हा नवी तारीख यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुण्यातच खंडपीठ व्हावे, अशी केवळ वकीलच नव्हे, तर सर्व क्षेत्रांमधून जोरदार मागणी आहे. आता राज्य सरकार तशी शिफारस कधी करणार आणि खंडपीठ कधी सुरू होणार याची पुणेकरांना प्रतिक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औंध - बाणेर स्मार्ट

$
0
0

क्षेत्रनिहाय विकासासाठी पसंती; स्मार्ट सिटी योजनेत समावेशाची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील क्षेत्रनिहाय विकासाकरिता औंध-बाणेर परिसराची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, स्मार्ट सिटीच्या निकषांनुसार संबंधित भागाच्या विकासाचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी शहरातील सर्व आमदार-खासदारांची बैठक घेतली. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह शहरातील सर्व आमदार आणि पालिकेतील पक्षांचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण शहराबरोबरच (पॅन सिटी) शहरांतर्गत क्षेत्र विकास (एरिया डेव्हलपमेंट) यावरदेखील भर दिला जाणार आहे. केंद्राने दिलेल्या सूचनांनुसारच शहरातील एका भागाची त्यासाठी निवड करणे अपेक्षित आहे. या भागांत पथदर्शी प्रकल्प राबवून, पुढील टप्प्यात शहराच्या इतर भागांत त्याचा विस्तार केला जाणार आहे. शहरातील अशा दहा ते बारा भागांचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतर औंध-बाणेर या परिसरात असा प्रकल्प उभा करता येऊ शकतो, अशी कल्पना कुणाल कुमार यांनी मांडली. बहुतेक राजकीय पक्षांनी त्याला तत्त्वतः पाठिंबा दिला असून, येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा अंतिम निर्णय कळविण्यात येईल, असे सांगितले आहे.

क्षेत्रनिहाय विकासासाठी नागरिकांकडूनही सूचना मागवून घेण्यात आल्या आहेत. त्याचा आणि लोकप्रतिनिधींच्या मतांवर आधारित भागाची निवड केली जाईल. त्यानुसार या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असून, 'पॅन सिटी' प्रकल्पासह एकत्रित आराखडा केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, असे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.

तीन समस्या प्रमुख

स्मार्ट सिटी अंतर्गत नागरी सहभागातून वाहतूक व दळणवळण, पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन अशा तीन शहराच्या प्रमुख समस्या असल्याचे मत व्यक्त झाले आहे. या समस्यांच्या सोडवणुकीचा प्रकल्प 'पॅन सिटी' अंतर्गत तयार केला जाणार आहे. 'रेट्रो फिटिंग'मध्ये एका भागाचा सर्वंकष विकास साधण्यावर भर असेल. यात झोपडपट्टी सुधारणेपासून ते युवकांच्या विकासापर्यंत अनेक प्रकल्पांचा समावेश होऊ शकतो.
.....................

'पालिकेने केलेल्या विश्लेषणात झोपडपट्टी, नदीपात्र, आर्थिक विकासापासून ते वाहतुकीपर्यंतचे अनेक प्रकल्प औंध-बाणेर परिसरात उभे राहू शकतात. त्यासाठी, सुमारे एक हजार एकर जागा उपलब्ध होऊ शकेल. त्याद्वारे, भविष्यातील विकासाचा चालना मिळेल.'
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोमांस टाकण्यास औंधमध्ये विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

औंध परिसरात जप्त करण्यात आलेल्या गोमांसाची विल्हेवाट लावण्यास स्थानिक नागरिक व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध करत पालिकेला मांस परत घेऊन जाण्यास भाग पाडले.

दोन दिवसांपूर्वी जप्त केलेले गोमांस कोर्टाच्या आदेशप्रमाणे पालिका हद्दीमध्ये विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी औंधमध्ये दाखल झाले. मात्र, ट्रकमध्ये मांस योग्य पद्धतीने भरून आणले नसल्याने परिहार चौक ते मेडी पॉइंट हॉस्पिटल परिसरात अनेक ठिकाणी हे मांस पडले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. यानंतर मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औंध परिसरात गोमांस टाकण्यास विरोध केला.

मांसाची विल्हेवाट कोणत्या ठिकाणी लावयाची याचे पालिकेचे आदेश अधिकाऱ्यांकडे नसल्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना हे मांस परत न्यावे लागले. संबंधित जागा खासगी मालकीची असल्याने मालकांनीही त्याला विरोध केला. अखेर पोलिसांनी संतप्त जमावाला समजावत परिस्थिती सावरली. या वेळी मनसे उपाध्यक्ष नाना वाळके, भाजप उपाध्यक्ष सचिन वाडेकर, सचिन गायकवाड, आनंद जुनवणे, गणेश कलापुरे, विशाल विधाते, निलेश जुनवणे, स्वीकृत सदस्य बाळासाहेब रानवडे, शिवसेना प्रभागप्रमुख राहुल जुनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळी सदस्यांच्या निलंबनाचे अधिकार द्या

$
0
0

महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार गोंधळ घालणाऱ्या सभासदांवर वचक राहावा, याकरिता अशा सभासदांचे दोन महिन्यांसाठी निलंबन करण्याचे अधिकार सभापतींना दिले जावे, अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्यासही अनुमती द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये पालिकेच्या सभेमध्ये विविध पक्षांतर्फे सातत्याने गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळे, पालिकेतील अनेक महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय प्रलंबित राहत आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज व्यवस्थित चालावे, यासाठी गोंधळ-गडबड करणाऱ्या सदस्यांचे निलंबन करण्याचे अधिकार सभापतींना द्यावे, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार सध्या गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे अधिकार सभापतींना आहेत. परंतु, सभापतींचा आदेश डावलूनही संबंधित सदस्यांकडून गैरवर्तन सुरूच असेल, तर काय करावे, हे त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. संबंधित सदस्याने दुसऱ्या वेळीही गैरवर्तन केले, तर त्यांना १५ दिवस निलंबित करण्याचे अधिकार आहेत. पालिकेच्या सभा महिन्यातून दोन किंवा तीनच दिवस होत असल्याने या तरतुदीचाही वापर केला जात नाही. म्हणून, गैरवर्तन करणाऱ्या सभासदांना किमान दोन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे अधिकार दिले जावे, अशी विनंती महापौरांनी केली आहे.

लोकसभा आणि विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात येते. महापालिका कायद्यात तशी तरतूद नाही. गोंधळ घालणाऱ्या सभासदांवर वचक राहण्यासाठी पालिका नियमांतही मार्शलची नियुक्ती केली जावी आणि गैरवर्तन करणाऱ्या सभासदांना त्यांच्याकरवी बाहेर काढण्याचे अधिकार सभापतींना देण्याची दुरुस्ती केली जावी, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्र्‍यांसह विधिमंडळ आणि विधान परिषदेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनाही महापौरांनी हे पत्र पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images