Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिस आयुक्तांच्या शुभेच्छांतही खो!

$
0
0

झारीतील शुक्राचार्यांमुळे 'हॅपी बर्थ डे' ठरताहेत 'बी लेटेड'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बर्थडे विश करण्यासाठी आयुक्त के. के. पाठक यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला काही झारीतील शुक्राचार्यांनी खो घातल्याने या शुभेच्छा वेळेत पोहोचू शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या शुभेच्छा 'बी लेटेड' ठरत आहेत.

आयुक्त पाठक यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, ही पत्रे संबंधितांना वेळेवर मिळत नसल्याची बाब पाठक यांच्या निदर्शनास आली आहे. त्याबाबत त्यांनी संबंधितांशी कानउघडणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया यांनी पोलिस ठाणी, विविध शाखा-विभागांच्या 'ड्यूटी' अमंलदारांना सूचना देत, प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या वाढदिवसांची माहिती नव्याने गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे पोलिसांचे एक गोपनीय गॅझेट दररोज प्रकाशित होते. या गॅझेटच्या शेवटच्या पानावर वाढदिवस असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे छापून त्यांना शुभेच्छा देण्यात येतात. ज्या कर्मचाऱ्यांनी आपली नावे गॅझेट रूममध्ये दिली आहेत, त्यांचीच नावे केवळ छापून येतात. या पार्श्वभूमीवर आयुक्त पाठक यांनी सर्वच कर्मचारी-अधिकाऱ्यांना शुभेच्छापत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. थेट आयुक्तांसारख्या सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा सर्वसामान्य पोलिसांसाठी मोलाच्या ठरतात आणि त्यातून पोलिस दलात आपुलकीची भावना निर्माण होते, असा अनुभ‍व असल्याने या उपक्रमाकडे पाठक हे जातीने लक्ष देत आहेत.

विभागप्रमुखावर जबाबदारी

आयुक्तांकडून पाठवण्यात येत असलेले शुभेच्छापत्रे त्या-त्या विभागाच्या ड्युटी अंमलदाराकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर ड्युटी अंमलदार संबंधितांपर्यंत ते पोहोचवणार आहेत. ही पत्रे वेळेत पोहोचतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची असेल, असे आदेश पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया यांनी काढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी महापौरांचे पालिकेसमोर आंदोलन

$
0
0

डीपीचे वाटोळे केला असल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने डीपीचे वाटोळे केला असल्याचा आरोप करत माजी महापौरांनी मंगळवारी पालिका भवनासमोर निदर्शने केली. या आंदोलनात सोळा माजी महापौर सहभागी झाले होते.

शहराचा विकासाचा दृष्टिकोन न ठेवता शासनाने नियुक्त केलेल्या विभाग‌ीय आयुक्तांच्या समितीने चुकीचा डीपी तयार केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक हिताची आरक्षणे उठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका निर्माण होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. सार्वजनिक हिताची आरक्षणे उठविण्यात येऊ नये, यासाठी माजी महापौर एकत्र येऊन पालिका भवनासमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत असल्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले.

माजी महापौर आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात अ‍ॅड. वंदना चव्हाण, बाळासाहेब शिरोळे, उल्हास ढोले पाटील, बाळासाहेब शिवरकर, शांतीलाल सुरतवाला, दत्ता एकबोटे, सुरेश शेवाळे, दत्ता गायकवाड, दिप्ती चवधरी, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, रजनी त्रिभुवन, मोहनसिंग राजपाल, विठ्ठलराव लडकत हे सहभागी झाले होते. तर कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड यांना कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आले नाही. मात्र, पत्राद्वारे त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, उपमहापौर आबा बागूल यांनी माजी महापौरांची भेट घेऊन डीपी तयार करण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याने आपणास आंदोलन करावे लागत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला मिळाले एलबीटीतून १३४ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून पालिकेला सलग दुसऱ्या महिन्यात १३४ कोटी रुपयांचे भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे. राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानामुळे एलबीटीने शंभर कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यात आल्याने पुढील महिन्यापासून एलबीटीच्या महसुलावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.

राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटीची उलाढाल मर्यादा वाढवून ५० कोटी रुपये केली. त्यामुळे, पालिकेचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी दर महिन्याला एलबीटीपोटी निश्चित अनुदान देण्याचा निर्णयही घेतला. ऑगस्ट महिन्याचे १४४ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले. 'सप्टेंबर महिन्यात पालिकेला १३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीत ३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभाराचे १५ कोटी, तर सरकारी अनुदानाचे ८१ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळेल,' अशी माहिती एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी दिली.

एक ऑक्टोबरपासून राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द केला आहे. त्यामुळे, पुढील महिन्यापासून त्यातून मिळणाऱ्या महसुलावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. त्याचा परिणाम एलबीटीच्या उत्पन्नावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

.... पुन्हा हाती धुपाटणेच

$
0
0

'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांची 'चौहान हटाव'ची मागणी फेटाळली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये मंगळवारी दिल्ली येथे बैठक झाली. भविष्यात चांगल्या हाती संस्था देऊ, असे आश्वासन देतानाच गजेंद्र चौहान यांची नियुक्ती मोठा मुद्दा वाटत नाही, असे वक्तव्य करून 'चौहान हटाव'ची मागणी राठोड यांनी फेटाळून लावली. कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय पार पडलेल्या या बैठकीमुळे विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा एकदा धुपाटणेच आले.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी आंदोलनाचा १३१ वा दिवस होता. एफटीआयआयप्रकरणी तोडगा निघत नसताना आता केवळ बैठकांचे सत्र सुरू असून कोणताही ठोस निष्कर्ष न निघता पार पडणाऱ्या या बैठकीतून केवळ पुढील बैठक निश्चित केली जाते. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वी चार बैठका झाल्या होत्या मात्र, त्यात संप मिटण्याबाबत कोणताही ठोस मार्ग निघू शकला नव्हता. मंगळवारी राठोड यांच्याबरोबर झालेल्या पाचव्या बैठकीतूनही विद्यार्थ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

राठोड यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. भविष्यात चांगल्या हाती संस्था देऊ, असे सांगतानाच चौहान यांची नियुक्ती हा मोठा मुद्दा नाही, असे सांगून राठोड यांनी चौहान मुद्द्याला बगल देत विद्यार्थ्यांची 'चौहान हटाव' ही मागणी फेटाळून लावली. मंत्रालयाशी चर्चा करू, असे केवळ आश्वासन राठोड यांनी दिल्याने आणखी एक बैठक होणार आहे. मात्र त्यामधूनही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता धूसरच आहे.

सोयी-सुविधांचे केवळ आश्वासन

या बैठकीत गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीपेक्षा शैक्षणिक मुद्द्यांवरच जास्त खल झाल्याचे समजते. २००८ च्या तुकडीतील काही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अद्यापही अपूर्ण आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे चार महिन्यांपासून आंदोलन ताणून संस्थेचे कामकाज ठप्प करणाऱ्या विद्यार्थ्यांची बोळवणच सरकारकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नेहरू स्टेडियम सज्ज

$
0
0

इंटरनॅशनल क्रिकेट मॅच पाहण्याची पुणेकरांना संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून स्वारगेटजवळील नेहरू स्टेडियम येथे 'इंटरनॅशनल दर्जाची खेळपट्टी' तयार केल्याने पुढील काही दिवसांतच पुणेकरांना या मैदानावर रणजी क्रिकेट मॅच पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या मैदानाचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून लवकरच याचे उद्घाटन केले जाणार आहे. पालिकेने याचे उद्घाटन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून हे स्टेडियम खेळासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात आयपीएल मॅचदेखील होऊ शकतात, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिकेच्या नेहरू स्टेडियमवर गेली अनेक वर्षे एकही इंटरनॅशनल क्रिकेटची स्पर्धा झालेली नाही. पुणे शहराचा नावलौकिक लक्षात घेता शहरात इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धा‍ घेण्यासाठी हक्काचे स्टेडियम असावे, या प्रमुख हेतूने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नेहरू स्टेडियमवर इंटरनॅशनल दर्जाची खेळपट्टी तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. यासाठी सुमारे अडीच ते तीन कोटींची तरतूदही करण्यात आली होती. बीसीसीआयच्या निमयाप्रमाणे खेळपट्टी तयार करणे, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी उभारणे, खेळाडूंना राहण्यासाठी खोल्या तयार करणे, युवा खेळाडूंना सरावासाठी खेळपट्ट्या तयार करणे अशी कामे या निधीतून करण्यात आली आहे. इंटरनॅशनल दर्जाची खेळपट्टी बनविण्यासाठी येथील संपूर्ण हिरवळ बदलण्यात आली असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. तसेच, रात्रीच्या वेळी खेळाडूंना सराव करता यावा, यासाठी मैदानावर विशेष प्रकारच्या प्रकाश व्यवस्थेची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालिकेचे क्रीडा अधिकारी सुभाष पुरी यांनी सांगितले. या कामासाठी पालिकेने विशेष सल्लागाराची नियुक्ती केली होती. या खेळपट्टीचे काम पूर्ण झाल्याने लवकरच याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

नेहरू स्टेडियममधील खेळपट्टीचे काम पूर्ण झाले असून उद्घाटन करावे, अशी विनंती क्रीडा अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, काही कामे अर्धवट असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण होताच याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळजाई माता

$
0
0

>> मंदार लवाटे

अजूनही टिकून असलेली झाडे आणि उत्तम रस्ता यामुळे तळजाई टेकडीचा परिसर निसर्गरम्य झाला आहे. साहजिकच येथे रोज येणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि वाढतच आहे. त्यामुळेच येथील मंदिरातही गर्दी वाढू लागली आहे. येथील मंदिर छोटे आहे. मंदिरात स्वयंभू रूपात पद्मावती, तळजाई व तुळजाभवानी अशा तीन मूर्ती आहेत. या मंदिराच्या मागेही तीन छोटी मंदिरे आहेत. परंतु, या कोणत्या देवता आहेत ते स्पष्ट होत नाही.

मटा नवरंग... येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि जिंका भरघोस बक्षिस!

मंदिराच्या पुढील बाजूस मारुतीचे मंदिर आहे. मारुतीची मूर्ती अलीकडील काळात बसवलेली आहे. देवीच्या मंदिराच्या मागे तळे आहे. या तीन देवी रावबहादूर ठुबे यांना सापडल्या. त्यानंतर अप्पा ऊर्फ गणपत विठोबा थोरात यांना येथे दृष्टांत होऊन त्यांनी १९६९-७०च्या सुमारास येथे मंदिर बांधले, असे अप्पा थोरात यांचे चिरंजीव, मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा ऊर्फ जनार्दन थोरात यांनी सांगितले.

१९७२ साली मोठा दुष्काळ पडला, तेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्याकडे लोकांचा ओघ सुरू होता. या लोकांची जेवण्याची व्यवस्था नव्हती. तेव्हा ५० पैशांत जेवण देण्याची कल्पना अप्पांना येथे सुचली, असेही अण्णा थोरात यांनी या संदर्भात सांगितले. ही योजना झुणका-भाकर या नावाने प्रसिद्ध होती. अण्णा थोरात या मंदिराचे विश्वस्त आहेत. तळजाई येथे येणाऱ्यांच्या संखेत वाढ झाल्याने मंदिरात नित्य व नवरात्रातही गर्दी वाढू लागली आहे. स्वत:हून सेवा करणारे येथे आवर्जून पुढे येत आहेत. यात भजनी मंडळे व उच्चशिक्षितांचाही समावेश आहे, असे सुचेता जनार्दन थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर एसटीला वीस कोटींचा भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर टोल आकारणीमध्ये राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) गेल्या दहा वर्षांत वीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एक्स्प्रेस वेच्या कंत्राटामध्ये एसटी बसकडून सवलतीच्या दरात टोल वसूल करण्याची तरतूद असताना प्रत्यक्षात टोलसंबंधी काढलेल्या अध्यादेशात एसटीची सवलत नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एक्स्प्रेस वे तयार करताना संबंधित कंत्राटदार व राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात झालेल्या करारात टोल आकारणी करताना वाहनांची वर्गवारी करण्यात आली होती. त्यामध्ये बस व एसटी बस असे दोन स्वतंत्र विभाग केले होते. एसटी बसला टोल मध्ये सवलतीचा दर देण्यासाठीच एसटी बसचा स्वतंत्र विभाग करण्यात आला होता. मात्र, एमएसआरडीसीने टोल संबंधी काढलेल्या अध्यादेशात एसटी बसचा स्वतंत्र विभाग ठेवला नाही. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी 'बीओटी' अंतर्गत बांधलेल्या सर्व रस्त्यांच्या कंत्राटांची माहिती प्रसिद्ध करण्यास सांगितली होती. त्या माहितीद्वारे ही बाब समोर आली आहे.

पुणे वगळता राज्यभरात एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न यात गेल्या काही वर्षांत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे एसटीची वित्तीय घटही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. असे असताना दरवर्षी एसटीला टोलसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामु‍ळे एसटीला टोलमधून सवलत देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्याने या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

'रक्कम परत करावी'

गेल्या दहा वर्षांत एसटीकडून आकारण्यात आलेली टोलची रक्कम एसटीला परत करावी आणि एसटी हा स्वतंत्र विभाग वगळून अध्यादेश काढणाऱ्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरी मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या रडारवर आता पाकिस्तानी कलाकार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

गझल गायक गुलाम अली, पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी आणि क्रिकेटपटूंनंतर आता पाकिस्तानी कलाकार शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. आपल्या आगामी बॉलिवूडपटांच्या प्रमोशनसाठी मुंबईत येऊ घातलेल्या फवाद व माहिरा खान यांना महाराष्ट्रात पाय न ठेवू देण्याचा निर्धार शिवसेनेनं केला आहे. तसं पत्रच शिवसेना बॉलिवूडमधील संबंधित मंडळींना देणार आहे.

फवाद खान यानं २०१४मध्ये 'खूबसूरत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आताही त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. तर, माहिरा खान ही राहुल ढोलकिया याच्या 'रईस' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात शाहरुख खान आणि नवाझुद्दीन सिद्दिकी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माहिरा मुंबईत येणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं इशारा दिला आहे. पाकिस्तानी अभिनेते, खेळाडू वा अन्य कोणत्याही कलावंताला महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवू न देण्याची आमची भूमिका असल्याचं शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्ट केलं आहे. 'फवाद किंवा अन्य पाकिस्तानी कलाकारांशी करार-मदार कोण करतं याच्याशी आम्हाला काहीएक देणंघेणं नाही,' असं सांगतनाच, 'करण जोहर, शाहरुख खान, फरहान अख्तर हे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी पाकिस्तान्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान देता कामा नये,' अशी अपेक्षाही बर्दापूरकर यांनी व्यक्त केली.

फुड फेस्टिव्हललाही विरोध

येत्या ७ नोव्हेंबर रोजी पुण्यात होऊ घातलेल्या इंडो-पाकिस्तान फुड फेस्टिव्हललाही शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानी शेफचा समावेश असलेला हा फेस्टिव्हल पुण्यातील एक उद्योगपती तहसीन पुनावाला यांनी आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलदरम्यान गुलाम अली यांची मैफलही होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख अजय भोसले यांचे बंधू अमर भोसले यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या फेस्टिव्हलला विरोध केला आहे. भोसले यांनी पुनावालाच्या फेसबुक वॉलवर पोस्ट टाकून 'हिंमत असेल तर फेस्टिव्हल करून दाखव,' असं खुलं आव्हान दिलं आहे. तर, 'फेस्टिव्हलचं ठिकाण आधीच बुक झालं आहे. त्यामुळं कोणतेही अडथळे आले तरी फुड फेस्टिव्हल होणारच आणि गुलाम अली गाणारच, असं पुनावालांनी म्हटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी बंद करण्याचा इशारा

$
0
0

भोर : गेल्या वीस वर्षांपासून नीरा देवघर धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा येत्या २६ तारखेपासून पूर्व भागाला जाणारे पाणी बंद करू, असा इशारा नीरा देवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. २०००च्या अधिसूचनेप्रमाणे खातेदारांना 'कलम (२)२ अ'चे स्वतंत्र खातेदार म्हणून मयत वारसांच्या २९८ खातेदारांना फायदा मिळाला नाही, तो मिळावा; निगुडघर गाव खास बाब म्हणून पुनर्वसनासाठी पात्र धरावे; ज्या धरणग्रस्तांची 'गोला पेमेंट'प्रमाणे ६५ टक्के कापून गेली नाही त्यांची रक्कम कापून घेण्यासाठी अधिसूचना काढावी; प्रकल्पबाधित खातेदारांना मेळावे लावून धरणग्रस्त दाखले द्यावेत; नवीन पुनर्वसित गावठाणांत १४ नागरी सुविधा अपूर्ण आहेत त्यांची पूर्तता करावी, अशा धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रात अधिकारीच नाहीत

$
0
0

म. टा. प्रतनिधी, हडपसर

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हडपसर हांडेवाडी रोड येथे वाहन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र अधिकारी नियमित येत नसल्याने, तसेच चाचणी मैदान नियमानुसार नसल्याने लायन्सस काढणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे चाचणी केंद्रावर नियमित अधिकारी नेमण्याची मागणी केली जात आहे.

हडपसर उपनगरातील नागरिकांकरिता वाहन परवाना काढता यावा, याकरिता हांडेवाडी रोड येथे प्रादेशिक परिवहन चाचणी केंद्र सुरू केले आहे. तेथे दर महिन्याला वाहन परवाने देण्याचे, तसेच वाहन चाचणी करण्याचे काम केले जाते; मात्र कित्येक महिन्यांपासून येथे 'परिवहन'चा अधिकारी येत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. येथील चाचणी केंद्रावर वाहनाच्या चाचणीसाठी मैदान नाही. कार्यालयासमोरील मैदानावर गवत उगवले आहे. त्यामुळे कित्येक वेळा चाचणी रस्त्यावर केली जाते.

गेल्या १५ तारखेला जवळपास शंभर नागरिकांना वाहन परवान्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार नागरिक सकाळी आले; मात्र अचानक एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि आज काम होणार नाही असे सांगून केंद्र बंद करण्यात आले. यावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना फोनही लावण्यात आले; मात्र कोणीही परत संपर्क साधला नाही.

'मी वाहन चाचणीकरिता कामाला सुट्टी काढून आलो आणि अचानक सांगितले, की आज काम बंद आहे. हे काम असे अचानक बंद कसे होऊ शकते? असे प्रकार याच्या अगोदरही झाले आहे,' असे नागरिक अक्षय पालेकर यांनी सांगितले. 'नियमानुसार महिन्यातून एकदा हे केंद्र चालू असायला पाहिजे. महिनाभर वाट पाहून आल्यानंतर येथे अधिकारी भेटत नाहीत,' अशी भावना नागरिक उमेश अग्रवाल यांनी व्यक्त केली. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. त्यांनी मीटिंगमध्ये 'बिझी' असल्याचा मेसेज केला; मात्र अंतिमतः संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सात-बारा’ मिळाला २७ वर्षांनंतर

$
0
0

>> अॅड. भारत कदम

पुणे : इमारत पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता सोसायट्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या बिल्डरांमुळे जमिनीची मालकी सोसायट्यांच्या नावे होत नाही. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन मानीव हस्तांतराची सुलभ प्रक्रिया केली आहे. धनकवडीतील कोणार्क विहार सोसायटीला तब्बल २७ वर्षांनंतर मानीव हस्तांतरानंतर जमिनीची मालकी हक्क मिळाली आहे.

पुणे शहराच्या दक्षिण भागात गजबजलेल्या धनकवडी परिसरातील आमच्या कोणार्क विहार को. ऑप. हौसिंग सोसायटीची नोंदणी १९८८-९८ सालामध्ये झाली. विकसकाने मुळ १५ जमीन मालकाकडून विकसन करारनामा व मुख्यत्यारपत्रान्वये अधिकार घेऊन एकूण १०९ युनिट्सचे (सदनिका + रो-हाउस + दुकाने) बांधकाम अतिशय उत्तमरीत्या केले. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुर्णत्वाचा दाखला घेऊन विकसकाने संस्थेची नोंदणी केली. त्यानंतर सहकारी संस्थेची स्थापना करून सर्व इमारतीसह संस्थेने कामकाज सोसायटीच्या ताब्यात दिले. परंतु, जमीन हस्तांतराची प्रक्रिया न झाल्याने जमिनीची मालकी व साता-बारा उतारा मुळ १५ मालकांच्या नावावरच राहिला.

महाराष्ट्र सरकारने मानीव हस्तांतराचा कायदा प्रभावीपणे अंमलात आणल्यानंतर संस्थेच्या विद्यमान कमिटीने सर्वसाधारण सभेची परवानगी घेऊन जमिनीचे मानीव हस्तांतर करून घेण्याचा निर्धार केला. मी स्वतः वकील असल्याने कमिटीने या कामाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविली. सर्व सभासदांची १९८८-८९ पासूनची खरेदीखते, इंडेक्स II गोळा करून मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची कागदपत्रे तपासून पाहण्याचे काम मोठे जिकिरीचे होते. अनेक सदनिकांचे ३ ते ५ वेळा पुर्नहस्तांतर झाले होते. तसेच, १०९ सभासदांपैकी ३०-४० टक्के सभासद परगावी राहण्यास होते. त्यामुळे मुद्रांक शुल्क भरल्याचे कागदोपत्री पुरावे गोळा करणे अत्यंत अवघड व जिकिरीचे काम होते. विकसकाशी पुणे व मुंबई ऑफिसमध्ये संपर्क होत नव्हता. त्यांच्याबरोबर सातत्याने केलेला सर्व पत्रव्यवहार परत येत होता. त्यामुळे सदनिकेचे करारनामे व इंडेक्स II व्यतिरिक्त बांधकाम परवाने, पुणे मनपाचे मंजूर नकाशे, बिनशेती आदेश, आर्किटेक्ट दाखले व जमिनीची इतर कोणतीही कागदपत्रे मिळत नव्हती. अशी सर्व कागदपत्रे सभासदांच्या वैयक्तिक फायलीमधून व सरकारी कार्यलयांमधून गोळा करावी लागली.

मानीव हस्तांतरणाची केस दाखल करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करण्यात जवळ जवळ एक वर्षांचा कालावधी लागला. विकसकाला हस्तांतरण करून देण्याबाबत कायदेशीररित्या प्राथमिक नोटीस पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक पुणे, किरण सोनावणे यांच्या कार्यालयात मानीव हस्तां‌तराचा अर्ज दाखल केला. विकसक व जमीन मालकांना रीतसर पाठविलेल्या नोटिसा परत आल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनावणे यांनी वर्तमान पत्रातून विकसक व जमीन मालकाव‌िरुद्ध जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस बजावल्यानंतरही विकसक व जमीन मालक हजर न झाल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यासाठी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करून सोनवणे यांनी दि. २०जून २०१३ रोजी मानीव हस्तांतराचा आदेश जारी केला. याकामी सोनावणे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

त्यानंतर खरी कसोटी होती ती सर्व १०९ सदनिकांचे मुद्रांक शुल्क तपासणीसाठी सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे प्रकरण दाखल करून योग्य तो आदेश घेण्याची. हस्तांतरण दस्ताच्या मसुद्यासह संपूर्ण प्रकरण तपासणीसाठी दाखल केल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सर्व सदनिकाधारकांचे खरेदी दस्तास मुद्रांक शुल्क पूर्ण भरल्याबाबत कागदपत्रांसह पूर्ण तपासणी करून खात्री केली व २०सप्टेंबर २०१४ रोजी योग्य मुद्रांक भरण्याचे आदेश देऊन मानीव हस्तांतर दस्त नोंदणीस मंजुरी दिली. याकामी सह जिल्हानिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नीलिमा धायगुडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

त्यानंतर १ नोव्हेंबरर २०१४ रोजी मानीव हस्तांतराचा दस्त नोंदविण्यात आला व अखेर संस्थेच्या नावाची नोंद सात-बारा उताऱ्यावर झाली. या सर्व कालावधीत संस्थेच्या कार्यकारणीने व सर्व सभासद यांनी माझेवर पूर्ण विश्वास टाकला व मोलाचे सहकार्य केले. ४ जानेवारी २०१५ रोजी सोनावणे यांच्या उपस्थित समारंभपूर्वक जमिनीचा सात-बारा उतारा संस्थेला सुपूर्त करण्यात आला. अशाप्रकारे १९८९ साली नोंदणी झाल्यानंतर २७ वर्षांनी संस्थेला जमिनीचा मालकीहक्क मिळाला आणि माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल मला अत्यंत समाधान लाभले. २७ वर्षांच्या कालखंडातील कागदपत्रे तपासणे, महानगरपालिकेकडून पूर्णत्वाचे दाखले मिळविणे, १०९ सभासदांशी सातत्याने संपर्क साधून सहकार्य मिळविणे यासाठी सर्वसभासदांकडून मोलाची साथ मिळाली. महाराष्ट्र सरकारची ही योजना अतिशय सुलभ असून, त्याचा फायदा ज्या संस्थेच्या नावे जमीनीचा मालकी हक्क अथवा सात-बारा उतारा नाही त्यांनी घेणे जरुरीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरत नाट्य संशोधन मंदिराची वाटचाल...

$
0
0

>> रवींद्र खरे

भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचा १२१वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने...

भरत नाट्य मंदिर म्हटले, की डोळ्यांपुढे येतो पुण्यातल्या रंगकर्मी तरुणाईचा राबता. संस्था आणि नाट्यगृह वयस्कर असूनही दिवसरात्र तालमी, एकांकिकांचे प्रयोग, तांत्रिक तालमींमध्ये रंगून गेलेली असते. विचार करता करता मन भूतकाळात जाते आणि लक्षात येते, की अरे 'भरत'ची स्थापनाच १६ वर्षांच्या मुलांनी १२१ वर्षांपूर्वी केली होती. त्याची प्रेरककथा अशी, की त्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आणून सोडत. थोडक्यात, वाया गेलेल्या मुलांचे क्षेत्र म्हणजे नाटक, असे सामाजिक समीकरण होते. त्या वेळी दत्तात्रेय फाटक, गोपाळ ज. वाड, वामन ब. काशीकर, दत्तात्रय परांजपे, दातार यांनी हुशार अभ्यासू तरुण वेगळ्या ‌उद्दिष्टांनी नाट्यक्षेत्रात काम करू शकतात हे दाखवून देण्यासाठी 'स्टुडंटस् सोशल क्लब' या नाट्य मंडळाची स्थापना, दसरा १८९४ या दिवशी केली. जवळ काहीही नसताना आणि प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर हळूहळू तरुण मंडळी जमा होऊ लागली. पालकांच्या विरोधापेक्षा मुलांचा निर्धार प्रबळ होता.

या पहिल्या हौशी नाट्य संस्थेला समाजमान्यता मिळू लागली. ही सगळी मुलेही ग्रॅज्युएट, वकील, शिक्षक अशा पेशात मान्यता मिळवू लागल्यावर नाटक हे हुशार मुलांचे क्षेत्र आहे, हे समाजाने १९०० सालानंतर मान्य करायला सुरुवात केली. पुढे तर सोशल क्लब नाट्य मंडळांचे सदस्य असणे, प्रतिष्ठेचे झाले. अनेक शिक्षकही सभासद होऊन नाटकात काम करू लागले. अनेक तरुण स्त्रिया प्रथम बॅकस्टेजला मदत करू लागल्या. 'नाटक्या' या तिरस्करणीय शब्दाला हळूहळू लोक विसरू लागले. या तरुणाईचा सर्वांत सुंदर उपयोग नाट्यसंमेलनांच्या सुरुवातीच्या काळात झाला. १९०५ सालापासून संमेलने सुरू झाली. त्या वेळी कोणतीच व्यावसायिक संघटना अस्तित्वात नसल्याने संमेलनांच्या छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या उचलून पहिल्या. १० पैकी ६ ते ७ नाट्य संमेलनांच्या यशात सोशल क्लबचा वाटा सिंहाचा होता. हे कार्य निश्चितच विधायक होते आणि म्हणूनच या संस्थेला, लोकमान्य टिळकांसारख्या संघटन सिंहाने आपले मानले. पाठोपाठ सावधगिरी म्हणून ब्रिटिश शासकांनी या संस्थेवर लोक ठेवणे ओघानेच आले. अर्थात, हे घडत होते तरुणांच्या सक्रिय सहभागामुळेच. स्वातंत्र्यानंतर 'स्टुडंटस् सोशल क्लब'चे नाव बदलून भरत मुनींना आदरांजली म्हणून 'भरत नाट्य संशोधन मंदिर' असे केले.

आजही तेच घडते आहे. एकांकिका ही अविष्कार पद्धती आजच्या तरुणांनी जवळची मानली आहे. 'भरत नाट्य मंदिर' या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात. त्यात आंतर बँक एकांकिका स्पर्धा, रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा, भरत करंडक, आयटी करंडक, कामगार कल्याण स्पर्धा, संस्कृत नाट्यस्पर्धा, एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा, मौनांतर (मूकनाट्य) स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा असे अनेक प्रयोग भरतमध्ये होतात. कुणी मानो अथवा न मानो, या मंचावर वावरलेल्या गतपिढ्यांची पुण्याईदेखील आहे. म्हणूनच पु.ल. देशपांडे, राजा परांजपे, राजाभाऊ नातू, राजा गोसावी, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे या साऱ्यांनी आणि अशा अनेकांनी भरतवर अपेक्षा विरहित प्रेम केले आहे.

आधुनिक युगात जाताना 'भरत'ची मूळ रचना बदलावी, असे कुणालाच वाटत नाही. परंतु, सुविधांमध्ये वाढ व्हायला होणेही गरजेचेच आहे. मूळचेच स्ट्रक्चर वर उचलून, पार्किंगची व्यवस्था करणे अथवा एअरकंडिशन बसवणे, नव्या जमान्याचे लाइट्स कंट्रोल अशा सुविधा करता येऊ शकतात. त्यासाठी सरकार मदत देऊ शकते. ग्रंथालयाच्या कम्प्युटरायझेशनचे काम पूर्ण होत आले असून, दुर्मिळ ग्रंथ डिजिटाइज करणे बाकी आहे. १२५व्या वर्षानिमित्त खास योजना

आखल्या जात आहेत. त्या वर्षी हौशी नाट्य संमेलन घडवण्याचा मनोदय आहे. त्याचेही नियोजन सुरू आहे. अर्थात, तरुणाईच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही आणि म्हणून लवकरच आम्ही तरुण रंगकर्मींना संपर्क करणार आहोत. दिवसरात्र 'भरत'मध्ये खळाळणारा तारुण्याच्या हा प्रसन्न निर्झर, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने एखाद्या प्रपातामध्ये रूपांतरित झाला, तर त्याहून मोठे यश कोणते असेल?

(लेखक संस्थेचे विश्वस्त आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोंधळी’ माननीयांवर महापौर नाराज

$
0
0

पुणे : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे पालिकेचे नाव खराब होते. अनेकदा प्रयत्न करूनही काही बेशिस्त नगरसेवकांमुळे सभागृह योग्य पद्धतीने चालविण्यात अडथळे निर्माण होतात. याला शिस्त लावण्यासाठी सभागृह कामकाज नियमावलीत बदल करण्याचा निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतला आहे. याचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा आम्हाला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगत सभासद विनाकारण कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलतात. यामुळे सभागृहाचा वेळ वाया जातो. तसेच, कार्यपत्रिकेवरील विषय देखील प्रलंबित राहतात. परिणामी, सहा ते सात महिने कार्यपत्रिकेवरील विषय संपत नाहीत. सभागृहात बेशिस्त वागणाऱ्या सभासदाला निलंबित करण्याचे अधिकार सध्या अस्तित्वात असलेल्या सभा कामकाज नियमावलीमध्ये महापौरांना नाहीत. कारवाई करायची‌ झाल्यास त्याने केलेल्या गैरवर्तनाची जाणीव दोन वेगवेगळ्या मुख्य सभांमध्ये त्याला करून द्यावी लागते. त्यानंतरच ही निलंबनाची कारवाई करता येते. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या सभासदावर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. ही सुधारणा करावी, यासाठीचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे महापौर धनकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

....नाही शॉपिंगला तोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहर आणि परिसरातही उत्साह दिसून आला. सोन्याचांदीच्या बाजारपेठेवर मंदीचे सावट असले, तरी ऑटोमोबाइल क्षेत्र मात्र, टॉप गिअरमध्ये राहिल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची खरेदी करण्यावरही पुणेकरांनी भर दिला; तर कपड्यांच्या खरेदीलाही पुणेकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.

साडेतीन मुहूर्तांपेकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गुरुवारी तीन हजार ७७३ नव्या वाहनांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यात आली. त्याद्वारे आरटीओला ११ कोटी पाच लाख ६५ हजार ६७० रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाहनांच्या नोंदणीतून गेल्या वर्षी आरटीओला दुप्पट महसूल प्राप्त झाला होता. फक्त वाहनांच्या नोंदणीतून चार लाख २५ हजार २२० रुपयांचे शुल्क आरटीओला मिळाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. गेल्या वर्षी दसऱ्याच्या आसपास आरटीओत दोन हजार ८९२ वाहनांची नोंद झाली होती. त्याद्वारे पाच कोटी ८५ लाख ४० हजार ८९१ रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला होता; तर वाहननोंदणीतून तीन लाख ७४ हजार २८० नोंदणी शुल्क मिळाले होते. आरटीओ कार्यालयात यंदा दसऱ्याच्या निमित्ताने १९ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत नोंद झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक होते. त्याखालोखाल चारचाकी वाहनांची विक्री झाली. डीएसके टोयोटा शोरूममधून ५००गाड्यांची विक्री करण्यात आली; तर बी. यू. भंडारी फोक्सवॅगन कंपनीकडून १०० वाहनांची विक्री झाली.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत गतवर्षीपेक्षा कमी गर्दी होती. या बाजारपेठेत स्मार्टफोन व फ्रीज, वॉशिंगमशिन या वस्तूंची चांगली विक्री झाली. त्याखालोखाल लॅपटॉप, टीव्ही, ओव्हन यासारख्या वस्तूंची विक्री झाली.

गतवर्षीपेक्षा गर्दी कमी असली, तरी विक्रीचे प्रमाण वाढले होते, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली. काही प्रमाणात मंदीचे सावटही बाजारपेठेवर दिसून आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करताना ग्राहकांनी सोन्याची वळी व तयार कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती दिल्याचे चित्र होते. गुरुवारी सोने प्रति दहा ग्रॅम २७ हजार १०० रुपये; तर चांदी प्रति किलो ३८ हजार रुपयांजवळ होती.

'दागिने व वेढणीला ग्राहकांकडून मागणी होती. यंदा दिवाळी महिन्याच्या सुरुवातीला येणार असल्याने सोन्या-चांदीला चांगली मागणी राहील,' असे रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका म्हणाले. 'अपेक्षेप्रमाणे दुष्काळाचा परिणाम सोने विक्रीवर जाणवला. मंदावलेली आर्थिक गती व मंदावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था याचा परिणाम सोन्याची विक्री कमी होण्यात झाला,' असे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी माहिती देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग शमविण्यात अडथळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी परिसरात लागलेल्या आगीनंतर स्थानिक नागरिकांनी जळीतग्रस्तांसाठी मदतीची धडपड केली; मात्र त्याच वेळी काही गोष्टींमुळे गैरसोय झाल्याने मदतकार्यात अनेक अडथळेही आले.

आग आटोक्यात आणणे, तसेच आग लागलेल्या झोपड्या 'कुलिंग' करण्यासाठी रात्र झाल्याने स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. आगीचा फटका बसलेल्या नागरिकांची राहण्याची सोय शेजारील शाळांमध्ये करण्यात आली होती. या परिसरातील वीज तोडण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यात चोऱ्या होत असल्याच्या वावड्या मोठ्या प्रमाणात उठल्या होत्या.

सर्व झोपड्यांना पत्रे लावण्यात आले आहेत. त्यात अरुंद रस्ते असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. वसाहत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांवरून पाइप आंथरून आगीच्या ठिकाणी पाणी मारण्यात आले. त्यासाठी १३ फायर गाड्या आणि तीन वॉटर टँकर वापरण्यात आले. फायर ब्रिगेडचे चार अधिकारी आणि ५०-६० कर्मचारी बचावकार्यात सहभागी झाले होते. आग लागलेल्या झोपड्या तसेच आजूबाजूच्या झोपड्यांमधील नागरिक साहित्य काढण्यासाठी गर्दी करत असल्याने त्यांची आणि जवानांची बाचाबाचीही झाली.

स्थानिक नागरिक साबीर शेख, संकेत होरा, भरत सुराणा, संतोष मोरे यांच्यासह अनेक तरुणांनी युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. फायर ब्रिगेडचे प्रमुख प्रशांत रणपिसे, समीर शेख, शिवाजी मेमाने, विजय भिलारे, कैलास शिंदे, दीपक माने, सुनील गिलगिले, सुभाष जाधव आदी अधिकारी मदतकार्य करीत होते. स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम, सर्जेराव बाबर घटनास्थळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुरुवारी शहराच्या विविध भागांत संचलन करण्यात आले. संघाने काढलेल्या ३९ भागातून संचलनांमध्ये सात हजार संघस्वयंसेवक सहभागी झाले होते. घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांचे पुणेकरांनी ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्यांनी स्वागत केले.

येत्या ३ जानेवारीला संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे मारुंजी (हिंजवडी) येथे शिवशक्ती संगम हे संघाचे महासांघिक शिबिर होणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी यंदा ३९ भागांमधून संचलन आयोजित करण्यात आले होते. संघाच्या घोष पथकाने एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे, महानगर संघचालक शरद घाटपांडे, सहसंघचालक रवींद्र वंजारवाडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट या वेळी उपस्थित होते.

विविध भागांमध्ये काढण्यात आलेल्या संघ संचलनाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गोखलेनगरमधील संचलनापूर्वी स्वयंसेवकांनी बौद्धविहारात जाऊन सामूहिक बौद्धवंदनेचा कार्यक्रम केला व संचलनाचा प्रारंभ झाला. कसबा भागातील संचलनामध्ये १ हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

कोथरूड, पर्वती, लष्कर आदी भागांसह यंदा पाषाण, खराडी, विमाननगर, वडगावशेरी, वाघोली, विश्रांतवाडी, मांजरी, धायरी, वारजे, कोंढवा आदी अनेक भागांमध्ये संचलनांचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरीतही संघाचे संचलन

पिंपरी : दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपळे गुरव येथे संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर शंकुतला धराडे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते. शस्त्रपूजेनंतर संचलनाला सुरुवात करण्यात आली. हे संचलन पिंपळे गुरव येथील जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणातून सुरू करण्यात आले. बोपोडी नगराचे संचलन खडकीमध्ये आयोजित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी-ठेकेदारांत शीतयुद्ध

$
0
0

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बस पुरविणाऱ्या खासगी ठेकेदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली आहे. पीएमपीने थकबाकी देण्याच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता केली नसल्याने दोन्ही महापालिकांच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनाच सविस्तर पत्र पाठवून थकित रक्कम तातडीने देण्याचा आग्रह धरला आहे.

पीएमपी आणि खासगी ठेकेदारांमध्ये थकित रकमेवरून वाद सुरू आहेत. एक ऑक्टोबरला ठेकेदारांनी बस बंद केली. त्या वेळी, पीएमपी आणि खासगी ठेकेदारांमध्ये झालेल्या चर्चेत त्यांची थकबाकी तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांमध्ये त्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसून, पीएमपीने एक रुपयाही दिलेला नाही, असे गाऱ्हाणे या ठेकेदारांकडून मांडण्यात येत आहे. पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च करता येत नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे. त्यामुळे, पीएमपीकडून तातडीने निधी उपलब्ध व्हावा, या मागणीसाठी पुणे व पिंपरीच्या महापौरांसह स्थायी समिती अध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले आहे. पीएमपीची संचलन तूट भरून देण्याची जबाबदारी दोन्ही महापालिकांवर असून, निधी प्राप्त झाल्याशिवाय ठेकेदारांची देणी देता येणार नसल्याचे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. पुणे पालिकेकडून निधी लवकर मिळेल, अशी अपेक्षा असल्याने थकित रक्कम फेडण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. महापालिकेसोबत चर्चा सुरू असून, लवकरच त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पीएमपीने आम्हांला आतापर्यंत केवळ आश्वासनेच दिली आहेत. आम्ही घेतलेले कर्ज फेडण्यात अडचणी येत असून, हप्ते थकल्यास बस जप्त करण्याचा इशारा बँकांनी दिला आहे. - शैलेश काळकर, ट्रॅव्हलटाइम कार, पीएमपी कंत्राटदार

महापालिकांकडून प्राप्त होणाऱ्या निधीतूनच कंत्राटदारांची देणी दिली जातात. हा निधीच अद्याप प्राप्त झालेला नाही. पुणे महापालिकेचा निधी त्वरेने मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अभिषेक कृष्णा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरमध्ये नवीन महापौर?

$
0
0

सव्वा वर्षांसाठी नवा चेहरा देण्याचे राष्ट्रवादीचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच्या सूत्रानुसार सव्वा वर्षाने महापौर बदलण्याचे निश्चित केले असून, विद्यमान महापौरांच्या जागी पालिकेला डिसेंबरनंतर नवा महापौर मिळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षनेतृत्वाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार, याबद्दल उत्सुकता आहे.

पालिकेत २०१२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीने दर सव्वा वर्षाने महापौर बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पहिल्या अडीच वर्षांत वैशाली बनकर आणि चंचला कोद्रे यांना महापौरपदाची संधी मिळाली. पुढच्या अडीच वर्षांसाठी शहराचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव झाले. त्या वेळी, राष्ट्रवादीने दत्तात्रय धनकवडे यांना संधी दिली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये धनकवडे यांची महापौरपदी वर्णी लागली. त्यांचे सव्वा वर्ष डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे, डिसेंबरनंतर नव्या महापौरांची निवड करण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केले आहे.

डिसेंबरमधील महापौर बदलानंतर वर्षभरातच पालिका निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यादृष्टीने शहराच्या प्रथम नागरिकाची निवड केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हडपसर आणि धनकवडी या दोन भागांना नेतृत्वाची संधी दिल्यानंतर आता सिंहगड रोड, कोथरूड, सहकारनगर, औंध-बाणेर की शहराच्या मध्य भागातील नेत्याकडे पक्षनेतृत्वाला कल असेल, हे डिसेंबरमध्येच स्पष्ट होऊ शकणार आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी

महापौरपद खुल्या गटासाठी राखीव असल्याने विकास दांगट, बाळासाहेब बोडके, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे यांच्यासह माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी उपमहापौर दीपक मानकर अशा अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्यासह माजी सभागृहनेते सुभाष जगताप आणि विद्यमान सभागृहनेते बंडू केमसे यांच्या नावाचीही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिंगरोड’च्या कामाला गती

$
0
0

'पीएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; अंतिम आखणी लवकरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या १७० किलोमीटर लांबीच्या रिंगरोडची पाहणी पीएमआरडीएमार्फत करण्यात आली. रिंगरोडसाठी करावे लागणारे भूसंपादन, प्रस्तावित मार्गावरील बांधकामे आणि अतिक्रमणांची माहिती या पाहणीत घेण्यात आली. आता रिंगरोडची अंतिम आखणी लवकरच निश्चित केली जाणार आहे.

वाहतुकीची होणारी कोंडी सोडण्यासाठी शहराभोवती रिंगरोड करण्याचा निर्णय राज्य सरकारने २००७ मध्ये घेतला. मात्र, गेली आठ वर्षे हा रस्ता विविध वादांमुळे कागदावरच होता. त्यानंतर या रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम एईकॉम एशिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने आपला प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादरही केला.

दरम्यान, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या रिंगरोडच्या कामाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामध्ये रिंगरोड फेरसर्व्हेक्षण करून मार्गाची आखणी करावी आणि त्याचा अहवाल सरकारकडे पाठवावा, असे आदेश देण्यात आले. त्यावर एईकॉम कंपनीने दिलेल्या अहवालानुसार रिंगरोड अस्तित्वात येणे शक्य आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय पीएमआरडीने घेतला होता. पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.

नियोजित रिंगरोडची खेड-शिवापूरमधून वडकीनाका, उरळी कांचन ते केसनंदपर्यंत पाहणी करण्यात आली. आता पुढील आठवड्यात लोणीकंद ते पुणे- मुंबई महामार्ग या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली जाणार आहे. हा रिंगरोड चार टप्प्यात प्रस्तावित असल्याने त्यानुसार मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे.

या प्रस्तावित रिंगरोडसाठी किती भूसंपादन करावे लागेल, तसेच या मार्गावर मोठी बांधकामे झाली आहेत का, अतिक्रमण आहे का, रस्ता उंच-सखल आहे का आणि शहरात येणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांना हा रिंगरोड कसा जोडता येईल, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याचे झगडे यांनी सांगितले. या संपूर्ण रिंगरोडच्या पाहणीनंतर त्याचा अंतिम प्रस्ताव करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खर्च वाढता वाढता वाढे...

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००७ मध्ये प्रस्तावित केलेल्या रिंगरोडचा सुरुवातीचा खर्च तीन हजार कोटी रुपये होता. या रिंगरोडची आखणी चार वेळा बदलल्याने त्यामध्ये बराच कालावधी गेला. १६९.७३ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्त्यासाठी आता १२ ते १५ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. रिंगरोडसाठी प्रत्यक्ष १५१ किलोमीटरचे रस्ते करावे लागणार आहेत. त्यात १२ किलोमीटर लांबीचे बोगदे व ७.५ किलोमीटर लांबीचे इलेव्हेटेड रस्ते प्रस्तावित असल्याचे समजते.

प्रस्तावित मार्ग

वाघोली - केसनंद - लोणीकंद मार्ग

मांजरी बुद्रूक - लोणी काळभोर

खेड - शिवापूर - दिवे

खडकवासला - येवलेवाडी

भूगाव - नऱ्हे - नांदे

पिरंगुट - घोटावडे - उरवडे

वडगाव- उर्से - बेबडओहोळ

वार्ली- सुदुंबरे- देहू - खालुम्ब्रे

चऱ्होली -चाकण

दृष्टिक्षेप...

१७० किमीचा प्रस्तावित मार्ग

९० मीटर रुंद रस्ता

शहराच्या हद्दीच्या दहा किमीपासून लांब

१२ ते १५ हजार कोटी रुपये खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलटेकडी परिसरात मोठी आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी येथील कै. मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये (इंदिरानगर खड्डा) गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत चार ते पाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि वाऱ्याच्या झोताबरोबर आग पसरत गेली. त्यात ४० ते ५० झोपड्या खाक झाल्या आहेत. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुमारे दीड तासांत आग आटोक्यात आणली. आग विझवताना फायर ब्रिगेडचे जवान तसेच स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाले.

वसाहतीमध्ये बेकरी शेजारील एका झोपडीस शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग पसरत असताना अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला. वाऱ्याच्या झोतात सिलिंडरच्या स्फोटाने आग पसरली आणि शेजारील झोपड्यांनाही पेट घेतला. स्थानिकांनी आजुबाजूच्या झोपड्यांच्या छतावरून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच इतर सिलिंडरचा स्फोट होवू लागले होते. स्थानिकांनी आप-आपल्या घरातील सिलिंडर काढून सुरक्षित ठिकाणी हालवले तर इतर नागरिक फायर ब्रिगेडची मदत पोहोचेपर्यंत आपआपल्या कुवतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. सर्व झोपड्यांना पत्रे लावण्यात आले आहेत. त्यात अरुंद रस्ते असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते.

संत नामदेव शाळेत जळीतग्रस्तांची निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. पोलिस तसेच महापालिकेकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. जळीतग्रस्तांना मदतकार्य सुरू आहे.

- अॅड. अभय छाजेड, स्थानिक नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images