Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

$
0
0

पुणेः बेकायदेशीपणे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

अमीर कासम शेख (वय २५, रा. वैदवाडी झोपडपट्टी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. युनिट पाचचे कर्मचारी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईदनिमित्त पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अमीर हडपसर येथील रेल्वे फाटकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार शिवाजी घुले आणि पोलिस नाईक भरत रणसिंग यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून अमीरला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव, सहायक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. आशिष शांताराम आठल्ये (वय ४८, रा. धनकवडी) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठल्ये हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरगाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रवाशांना लुटले; तिघांना कोठडी

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील पैसे काढून खाली ढकलून दिल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी, दीपा उर्फ दीपक वामन भोसले (३५, रा. वारजे), बबली मोनिका दोडके उर्फ सागर रामदास वांजळे (२५) प्राची मोनिका दोडके उर्फ स्वप्नील रामदास माने (२१) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध जावेद तय्यब शेख (वय २४) याने रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. २५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेत दिलीप आकाराम गवई (वय २४) जखमी झाले होते. फिर्यादी आणि त्यांचे मित्र दिलीप गवई, मोबीन शेख हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यावेळी आरोपींनी डब्यातील प्रवाशांना धमकाविले. त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना गाडीतून ढकलून दिले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चेक क्लिअरिंग’साठी सोमवार दुपार उजाडणार

$
0
0

पुणेः शुक्रवारपासून रविवारपर्यंत सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस) ही बंद राहणार आहे़. त्यामुळे खातेदारांनी गुरुवारी भरलेले चेक क्लिअर व्हायला सोमवार दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शुक्रवारी ईदची सुटी असल्याने सीटीएसची वेस्टर्न ग्रीड (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश) बंद होती.

आज, चौथ्या शनिवारनिमित्त तर रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद राहतील. परिणामी गुरुवारी दुपारनंतर भरलेले चेक सोमवारी दुपारनंतर क्लिअर होतील, अशी माहिती कॉसमॉस बँकेचे मुख्य व्यवस्थापक (सीटीएस) किरण पाटोळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सफॉर्मर चोरणारे दरोडेखोर गजाआड

$
0
0

भादलवाडी, डाळज ग्रामस्थांची सिनेस्टाइल कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भिगवणजवळील डाळज, भादलवाडी गावात विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरण्यासाठी दरोडेखोर आल्याचा सुगावा लागल्यानंतर गावकऱ्यांनी पाठलाग करून पाच दरोडेखोरांना पकडले. या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांची मोटार आणि व ८० हजार रुपयांचे ऑइल असा साडेचार लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अनिल गुलाब मोरे (वय २०, रा. मठपिंपरी, ता. श्रीगोंदा), प्रकाश उर्फ अजय गुलाब माळी (वय १९, रा. टाकळीभान, श्रीरामपूर), दाऊद शाम शेख (वय २१, रा. चिखळी, कोरेगाव), मुरलीधर भाऊराव माळी (रा. मठपिंपरी, ता. श्रीगोंदा) आणि मोनिका भाऊसाहेब येवले (वय २०, रा. श्रीगोंदा) अशी पकडण्यात आलेल्यां दरोडेखोरांची नावे आहेत. पकडलेल्या एका दरोडेखोराला नागरिकांनी चांगला चोप दिल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळज, भादलवाडीतील ट्रान्सफॉर्मर चोरण्यासाठी गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काही दरोडेखोर गावात शिरले. त्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर दोन्ही गावचे गावकरी काठ्या, कुऱ्हाडी घेऊन दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेले. जमाव चालून आलेला पाहून दरोडेखोरांनी मोटार आणि ऑइल तेथेच सोडून पळ काढला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पहाटे पाचपर्यंत दरोखोरांचा शोध सुरू होता. त्यातील काही दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले, तर काहीजण उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक यादव, त्यांच्या पथकातील चौदा ते पंधरा कर्मचारी आणि गावकऱ्यांनी उसाच्या शेताला वेढा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेकऑफ’ उत्सवानंतर

$
0
0

विमानतळाच्या पर्यायी जागांचा अहवाल 'एमएडीसी'कडे सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ठेवण्यात आलेल्या तीन पर्यायांचा तुलनात्मक आढावा घेऊन त्यासंबंधीचा अहवाल 'एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया'कडून (एएआय) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. पैकी कोणती जागा विमानतळासाठी निश्चित करायची यावर गणोशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याबाबत गेली काही वर्षे चर्चा सुरू आहे. त्यासाठी चाकण, कडूस-पाईट, खेड एससीझेड येथील जागा निवडण्यात आल्या होत्या. या जागांवर विमानतळ होऊ शकतो, असे अहवालही तयार झाले होते. मात्र, शेतकरी आणि राजकीय विरोधामुळे या जागांवरील विमानतळाचे टेकऑफ होऊ शकले नाही. त्यामुळे राज्य सरकारने पर्यायी जागांचा विचार सुरू केला. खेड आणि चाकण वगळता नव्या तीन जागा विमानतळासाठी समोर आल्या आहेत. मध्यंतरी एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी भेटी देऊन जागांची पाहणीही केली. एअरपोर्ट अॅथॉरिटीने या नव्या पर्यायी जागांचा गुणदोषांसह तुलनात्मक अभ्यास करून त्याचे मूल्यमापन करणारा तक्ता तयार केला आहे. तो अहवाल महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएडीसी) सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. या अहवालावर निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहेत. त्यामध्ये या तीन पर्यायांपैकी एका जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित विमानतळाच्या जागेसाठी कमीतकमी लोकवस्ती असावी आणि बागायती शेतजमिनींचे प्रमाणही कमी असावे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे विमानतळासाठी भूसंपादनही कमीतकमी आणि योग्य मार्गाने होणार असल्याने विमानतळ लवकर उभा राहू शकतो, असेही सांगण्यात आले.

विमानतळासाठी बाराशे हेक्टरची आवश्यकता

प्रस्तावित विमानतळासाठी किमान बाराशे हेक्टर जमिनीची गरज आहे. तसेच, लोहगाव येथील विमानतळाचा रन-वे पूर्व-पश्चिम असल्याने नव्या विमानतळाचा रन-वेही त्याच दिशेने करावा लागणार आहे. त्यासाठी सहा किमी लांब आणि दोन किमी रूंद जागेची आवश्यकता आहे. त्यापुढे सुमारे वीस किलोमीटर अंतरावर टेकऑफ झोन तयार केला जाणार आहे. टेकऑफ झोनमध्ये उंच डोंगरांतील अडथळे येणार नाहीत, याचीही खातरजमा करण्यात येत आहे, असेही राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १४० ठिकाणी बॅरिकेडिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडच्या दिशेने येणारे सर्व रस्ते लोखंडी बॅरिकेड्स तसेच बांबूच्या साह्याने बंद करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून १४० ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही जगभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा मुद्दा असतो. लाखोंच्या संख्येने या मिरवणुकीसाठी भाविक गर्दी करतात. दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गासह पाचही मार्गांकडे येणारे छोटे रस्ते बंद करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी छोट्या-मोठ्या गल्ल्यांतील १४० ठिकाणांचा अभ्यास केला असून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. काही ठिकाणी बाबूंच्या मदतीने कायमस्वरूपी बॅरिकेडिंग असेल तर काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स टाकून वाहनांना अटकाव करण्याचा प्रयत्न असले. आणीबाणीची परिस्थितीती उद्भवली तर रस्ता खुला करण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्सचा वापर होणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मानाच्या पाच गणपतींसह गणपती मंडळांच्या दिमाखदार विसर्जन सोहळ्यासाठी होणारी गणेशभक्तांची अलोट गर्दी लक्षात घेऊन अनंत चतुर्दशीला सुरक्षिततेच्या कारणासाठी शहरातील प्रमुख रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र, या विसर्जन मिरवणुकांमुळे अन्य वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी शहरी पेठांबाहेरचा पर्यायी वर्तुळाकार मार्ग मोकळा ठेवण्यात आला आहे.

शहराच्या कोणत्याही भागातून विसर्जन मिरवणूक मार्ग टाळून अन्य ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. 'नळस्टॉप ते नळस्टॉप' असा हा पर्यायी रिंग रस्ता वाहतुकीला फारसा अडथळा न येता प्रवासासाठी खुला राहणार आहे. नळस्टॉप, सेनापती बापट रोड, गणेशखिंड रोड, वेलस्ली रोड, नेहरू रोडमार्गे मुकुंदनगर; तसेच मित्रमंडळमार्गे दांडेकर पूल तेथून सेनादत्त पोलिस चौकी व म्हात्रे पूलमार्गे पुन्हा नळस्टॉप असा हा मार्ग असेल.

'रिंग रस्त्याचा वापर करून मध्यवस्तीमध्ये वाहने आणण्याचे टाळावे,' असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील लक्ष्मी रस्ता, केळकर, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर गणपती विसर्जन मिरवणूक असते. हे मार्ग अनंत चतुर्दशीला (२७ सप्टेंबर) सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. २८ सप्टेंबरला दुपारपर्यंत हे रस्ते सर्व वाहतुकीसाठी खुले करण्यात येतात. या विसर्जन मिरवणूक काळात महत्त्वाच्या कामांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांना फारसा त्रास होऊ नये यासाठी हा पर्यायी मार्ग करण्यात आला आहे; तसेच या रिंग रस्त्यावर येणारी वाहने शक्यतो विनाअडथळा मार्गक्रमण करतील, याचीही दक्षता वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिधाडांवर २४ तास वॉच

$
0
0

ट्रान्समीटर बसविण्यास केंद्र सरकारची परवानगी

chaitrali.chandorkar@timesgroup.com

पुणेः निसर्गाचे स्वच्छता कामगार असलेल्या गिधाडांचा अधिवास, त्यांचा प्रवास आणि वसतिस्थानांच्या संशोधनात्मक अभ्यासासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने गिधाडांना ट्रान्समीटर बसविण्यास परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ गिधाडांना ट्रान्समीटर बसविण्यात येणार असून, यामुळे गिधाडांच्या हालचालींवर चोवीस तास वॉच ठेवता येणार आहे.

जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या डायक्लोफिनॅक या औषधामुळे गेल्या दहा वर्षांत गिधाडांची संख्या झपाट्याने घटली आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्रजातीला टिकविण्यासाठी सरकारने डायक्लोफिनॅक या औषधावर बंदी घातली आहे; तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहभागातून पिंजर येथे गिधांडांचे कृत्रिमरित्या प्रजनन केंद्रही उभारण्यात आले आहे.

पुण्यातील इला फाउंडेशनने वन विभागाच्या सहभागातून वर्षभरापूर्वी गिधाड संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ भागात हा प्रकल्प सुरू असून, यात गिधाडांच्या वसाहतीचा अभ्यास करण्यात येतो आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या हालचालींवर दिवसरात्र लक्ष ठेवण्यासाठी घरट्यांजवळ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेऱ्यातील शुटिंगच्या साह्याने गिधाडांची सद्यस्थिती, त्यांचे जीवनचक्र, पिल्लांचे संगोपन आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती मिळाली आहे. या प्रकल्पाचा इतर जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याबरोबरच आता गिधाडांना टॅगिंगचा प्रयोग होणार आहे. यासाठी मंत्रालयाने राज्यातील आठ गिधाडांना कॉलर बसविण्याची परवानगी मिळविली आहे. पुण्याचे मुख्य वनंसरक्षक सुनील लिमये आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे या प्रकल्पाचे संयोजन करणार आहेत.

'महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील गिधाडांची घटती संख्या यावर आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून आमचे संशोधन सुरू आहे. डायक्लोफिनॅकबरोबरच शिकारींमुळेदेखील गिधाडांची संख्या वेगाने घटली आहे. या गिधाडांच्या अधिवासास इतरही कोणत्या प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे धोके आहेत का?, त्यांचे स्थलांतर कसे होते यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून चांगली माहिती पुढे आली आहे. आता ट्रान्समीटर बसविण्याने या अभ्यासात महत्त्वाची भर पडणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागातील गिधाडांना ट्रॉन्समीटर बसवायचे, याचा निर्णय लवकरच घेणार आहोत,' अशी माहिती डॉ. पांडे यांनी दिली.

महाराष्ट्राची सद्यस्थिती

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या सुमारे चारशे गिधाडे वास्तव्यास आहेत. गिधाडांची सविस्तर गणना अद्याप झालेली नाही. यामध्ये लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड, पांढरे गिधाड आणि किंग गिधाड अशा प्रजातींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात यातील पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे वास्तव्यास आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाई असूनही ‘कारंजे’

$
0
0

मंडळांकडून देखाव्यातून पाण्याची नासाडी


म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना काही गणेश मंडळांनी कारंजे उभारले आहे. मंडळांनी कारंज्याच्या देखाव्यातून पाण्याची नासाडी सुरू ठेवली आहे. त्याच वेळी काही मंडळांनी दुष्काळाच्या समस्येवर जागृती करण्यासाठी देखावे सादर केले आहेत, तर काही मंडळांनी थेट मदत देऊ केली आहे. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचा उत्सव सर्वजण साजरा करत आहेत, मात्र, पाणी टंचाई असताना पाण्याचा योग्य वापर करण्याची बुद्धी व जाणीव सर्व मंडळांमध्ये कधी येणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट गहिरे होऊ लागले आहे. पुण्यातही चार महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने चारही धरणे अद्याप निम्म्यावरच आहेत. अशात कारंजे कशासाठी असा सवाल देखावे पाहायला आलेल्या नागरिकांच्या तोंडून आपसूक विचारला जाऊ लागला आहे. यंदाच्या उत्सवावर दुष्काळाचे सावट असल्याने गणेश मंडळांकडून अधिक जबाबदार कृतीची अपेक्षा होती. मात्र 'आम्हाला काय दुष्काळाचे' अशा अविर्भावात मंडळांकडून डीजेच्या तालावर कारंजे नाचवले जात आहेत.

कारंज्यांच्या माध्यमातून पाण्याची नासाडी करण्यात सदाशिव पेठ, रास्ता पेठ, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, धनकवडी या भागातील मंडळे आघाडीवर आहेत. 'सामाजिक एकोप्यासाठी गणेशोत्सव' हा लोकमान्य टिळकांचा विचार ही मंडळे पुरता मोडीत काढत आहेत. कसबा, मंडई, आझाद अशा अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. अशीच बुद्धी सर्व मंडळांमध्ये गणराय देवो, असा नागरिकांचा सूर आहे.

पाणी जाते वाया

रस्ता अडवून कारंज्यासाठी हौद बांधण्यात आले असून, विटांच्या बांधकामामुळे पाण्याची नासाडी करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर हा हौद तोडून टाकतात. यंदाही रस्ता अडवून बांधण्यात आलेल्या हौदामुळे वाहतुकीची कोंडी होत असून दुष्काळात हा सोस कशासाठी, असा सवाल नागरिक करत आहेत. कारंज्याच्या पाण्याचा पुनर्वापर होतो, प्रत्येक वेळेला चांगले पाणी वापरले जात नाही, असा मंडळांचा दावा असला तरी पाणी वाया जाते हे तितकेच खरे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाळाला रुग्णालयात सोडून आईचे पलायन

$
0
0

पुणे : ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला सोडून आईने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाचे अधीक्षक मोहनीश निकम (वय ३१) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, ससून रुग्णालयात सोमवारी एक २५ वर्षीय महिला बाळातंपणासाठी आली. डॉक्टरांनी या महिलेला वार्ड क्रमांक २९ मध्ये अॅडमिट करून घेतले. त्यानंतर त्या महिलेला मुलगा झाला. मात्र, त्या मुलाचे वजन कमी होते. त्यामुळे त्या मुलाला आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.

दरम्यान, जन्मदात्या महिलेने त्या मुलाला सांभाळण्यास असमर्थता दाखवून कुणालाही काहीही न सांगता तिथून पळ काढला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. डी. गायकवाड अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा विसर्जन हौदात

$
0
0

मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांकडून घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे संकट ओळखून पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे; तसेच भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंडळांच्या गणपतींचे यंदा हौदात विसर्जन केले जाणार आहे. या मंडळांच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. पुण्यातील गणेशोत्सवाच्या १२३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडणार आहे.

'यंदा दुष्काळी स्थिती असून, राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. याचा गणेश मंडळांनी करायला हवा. गणेशोत्सव प्रबोधनासाठी सुरू झाला असल्याने आम्ही पुढाकार घेतला आहे. यंदा आम्ही घाटांवरील महापालिकेच्या हौदात श्रींचे विसर्जन करणार आहोत. हिंदू शास्त्रानुसार श्रींचे विसर्जन जलतत्त्वामध्ये व्हावे, असे म्हटले आहे. त्यामुळे हा धर्मशास्त्राच्या विरोधातील निर्णय नाही,' असे मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट; तसेच महापौर, आयुक्त यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनीही या विचाराचे स्वागत केल्याचे त्यांनी नमूद केले,' असे शेटे यांनी सांगितले.

'पुणे 'स्मार्ट' होत असताना असाच स्मार्ट निर्णय घेण्याची आवश्यकता होती; ती आम्ही घेतली आहे,' असे शेटे यांनी नमूद केले. हौदात विसर्जन करण्याचा निर्णय यंदापुरता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्य गणेश मंडळांनी हौदातच श्रींचे विसर्जन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर दत्तात्रय धनकवडे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी या वेळी उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्याशी महेश सूर्यवंशी यांनी फोनवरून संपर्क करून मानाच्या मंडळांच्या निर्णयाचे अनुकरण करणार असल्याचे स्पष्ट केले; तसेच 'जय गणेश' व्यासपीठावरून एक हजार मंडळांना हा निर्णय तत्काळ पोचवणार असल्याचेही सांगितले. भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष मिलिंद डफळ यांनीही हौदातच विसर्जन करणार असल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांचे घर आता विद्यार्थ्यांना खुले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची कल्पना आहे. त्या बाबत सरकारी पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली; तसेच लंडन येथील घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांपासून डॉ. आंबेडकरांच्या लंडन स्थित घराच्या खरेदीची सुरू असलेली प्रक्रिया आज पूर्ण झाली. त्यासाठी एकूण ३४ कोटी ५० लाख रुपये खर्च आला. राज्य सरकारकडे त्या घराचा ताबा आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी त्यांच्याकडे किल्ल्या सुपूर्द करण्याचा विचार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

'आंबेडकर राहत असलेले हे घर तळमजला आणि तीन मजल्यांचे आहे. यामध्ये एका मजल्यावर ग्रंथालय, एका मजल्यावर त्यांच्या वस्तुंचे संग्रहालय करण्याचा प्राथमिक विचार आहे; तसेच उर्वरित दोन मजल्यांवर विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची कल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. योगेश यांना भटनागर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूळचे पुण्याचे आणि सध्या आयआयटी कानपूरमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत संशोधक डॉ. योगेश मोरेश्वर जोशी यांना वैज्ञानिक संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठीचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. केमिकल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंटस्ट्रिअल रिसर्चतर्फे (सीएसआयआर) त्यांना हा बहुमान मिळाल्याची माहिती त्यांचे वडील मोरेश्वर जोशी यांनी शनिवारी दिली.

डॉ. जोशी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये झाले. मॉडर्न कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर त्यांनी एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधून (एनसीएल) डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे संशोधन केले. पीएच डी केल्यावर तीन वर्षे अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिप अंतर्गत संशोधन करुन ते भारतात परतले. मायदेशी परतल्यानंतर २००४ पासून ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांना प्रोफेसर म्हणून मान्यता मिळाली. या दरम्यानच्या काळात त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्डनेही गौरविण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी ‘कोटा’ वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला स्मार्ट करण्यासाठी वाहतूक आणि दळणवळण सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याच्या सूचना नागरिकांकडून व्यक्त होत असतानाच, विकास आराखड्यामध्येही (डीपी) त्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रो, पीएमपी, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारी जागा आरक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी हीच शहरातील प्रमुख समस्या असल्याचे वेळोवेळी सिद्ध होऊनही त्यावर केले जाणारे उपाय कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, वाहतुकीच्या प्रश्नाचा समग्र विचार करून सर्व सुविधांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यास सरकारने नेमलेल्या समितीने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, मेट्रो रेल्वेच्या आखणीसह त्याच्या स्टेशनसाठीची आरक्षणे कायम ठेवण्यात आली आहेत. मेट्रोच्या सुधारित मार्गानुसार स्टेशनमध्ये काही बदल झाल्यास, त्यानुसार आवश्यक स्टेशनसाठी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

पीएमपीसाठी वाढीव जागा

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) डेपोसाठी आणि बस स्थानकांसाठीही डीपीमध्ये काही ठिकाणी आरक्षणे निश्चित करण्यात आली होती. ही आरक्षणे कायम ठेवतानाच, पीएमपीच्या विस्तारीकरणासाठी आणखी जागांची मागणी पीएमपीकडून केली जात होती. पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी त्याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त आरक्षणे प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमपीसाठी एकूण १० आरक्षणे प्रस्तावित केली गेली आहेत. पीएमपीच्या आरक्षणांसह पीएमपी आणि राज्य परिवहन (एसटी) यांचा एकत्रित विचार केला गेला आहे. स्थानिक प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी आणि बाहेरगावातून येणाऱ्या प्रवाशांना शहरात फिरण्यासाठी पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर येथे दोन्ही सेवासांठी एकत्रित आरक्षण ठेवण्यात आले आहे.

एचसीएमटीआर प्रस्ताव कायम

शहराच्या १९८७च्या मंजूर विकास योजनेत हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूटसाठी (एचसीएमटीआर) स्वतंत्र आखणी दर्शविण्यात आली होती. नव्या डीपीमध्येही हा रस्ता कायम दाखविण्यात आला आहे. मात्र, जागेवरील परिस्थिती आणि विकास योजनेतील इतर प्रस्तावित बदलांनुसार त्यात आवश्यक ते बदल करून हा प्रस्ताव कायम ठेवण्यात आला आहे.

हडपसर टर्मिनलचा प्रश्न सुटणार?

शहराच्या विकासात दळणवळणाचा खूप मोठा वाटा आहे. सर्व दिशांनी शहराची वाढ होत असूनसुद्धा रेल्वे वाहतुकीचा प्रमुख भार पुणे रेल्वे स्टेशनवरच पडत आहे. रेल्वे स्टेशनचा आणखी विस्तार करण्यासाठी जागा अपुरी असल्याने पर्यायी टर्मिनलचा विचार आवश्यक आहे. त्यादृष्टीने, हडपसर येथे नवे टर्मिनल विकसित करण्यासाठीचा विचार मांडला जात असून, सरकारनियुक्त समितीने त्याबाबत ठोस निर्णय घेतला आहे. हडपसर रेल्वे स्टेशनच्या विकसनासाठी सुमारे साडेआठ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. याच ठिकाणी पीएमपी आणि वाहनतळाचे नियोजनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणे ३५ टक्क्यांनी कमी

$
0
0

आरक्षणांची संख्या ५७९पर्यंत मर्यादित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणांवरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाल्याने महत्त्वाची आरक्षणे कायम ठेवून इतर छोटी-छोटी अनेक आरक्षणे कमी करण्याचा अथवा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीपीत सुचविण्यात आलेल्या तब्बल ३५ टक्के आरक्षणांमध्ये बदल करण्यात आला असून, एकाच भागांतील काही आरक्षणे एकत्र करण्याचा प्रयोगही करण्यात आला आहे.

शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या आरक्षणांची संख्या कायम ठेवून डीपीच्या मुदतीत विकसित होऊ न शकणारी आरक्षणे कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय समितीने घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी दिली. शहराच्या डीपीमध्ये तब्बल ९३७ आरक्षणे दर्शविण्यात आली होती. समितीने त्यातील अनेक आरक्षणे कमी अथवा एकत्र करून ही संख्या ५७९पर्यंत मर्यादित ठेवली आहे. डीपीच्या मुदतीमध्ये विकसित होऊ शकतील एवढीच आरक्षणे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

डीपीमध्ये सरकारी जागांवर काही आरक्षणे दर्शविण्यात आली होती. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारी संस्थांनाही त्यांच्या मालकीच्या जागा विकसित करण्यासाठी नियोजन केलेले असते. मात्र, आरक्षणामुळे त्यावर बंधने येऊ शकतात. त्यामुळे, मेट्रो, पीएमपी यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा अपवाद वगळता अशी आरक्षणे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, कृषी महाविद्यालयाच्या जागेवरील मेट्रोचे आरक्षण कायम राहू शकणार आहे.

यापूर्वी महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात आरक्षणे सुचविणे आणि वगळणे, या विषयावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या समितीने तयार केलेल्या आराखड्यात आरक्षणांची स्थिती काय राहणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता आराखड्याविषयी अंतिम निर्णय घेताना राज्य सरकार यापैकी कोणती आरक्षणे कायम ठेवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख रस्ते होणार रुंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे त्रिसदस्यीय समितीच्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. अंतर्गत व गौण रस्त्यांची रुंदी मात्र कमी करण्याचे समितीने सुचविले आहे.

रुंद होणाऱ्या रस्त्यांमध्ये लक्ष्मी रस्ता व टिळक रस्त्यासह शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, नेहरू रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता, तसेच कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता व गणेशखिंड रस्त्याचा समावेश आहे. जड वाहनांची वर्दळ असलेल्या पुणे-मुंबई व पुणे सोलापूर रस्त्याचे रूंदीकरणही प्रस्तावित करण्यात आले आहे.

महापालिकेने केलेल्या डीपीमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ता रूंदीकरण प्रस्तावित करण्यात आले होते. त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्या. त्यासंबंधी या त्रिसदस्यीय समितीने उहापोह केला. रस्ते ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रस्ता रुंदीकरणामुळे मालमत्ता बाधित होणार असल्याची परिस्थिती असली, तरी मुख्य रस्ते रुंद करणे ही काळाची गरज असल्याचे समितीचे मत झाले. वाहतूक सुलभ होण्यासाठी काही प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची निकड असल्याने त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले.

शहरातील काही अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्यात आले आहे. त्यांचे रुंदीकरण १९८७च्या मंजूर विकास योजनेनुसार करण्याचे या समितीने प्रस्तावित केले आहे. ले-आऊटमधील रस्त्यांचे रुंदीकरण सर्वसाधारणपणे रद्द करण्यात आले आहे; तसेच रस्त्याच्या जंक्शनला महापालिकेच्या डीपीत चॅम्पर दर्शविण्यात आले होते. त्यात बदल करून चॅम्परऐवजी गोलाई ही वाहतुकीच्या दृष्टीने प्रस्तावित करण्यात आली आहे. पालिकेच्या डीपीमध्ये सुचवल्यापैकी ३० टक्के रुंदीकरण या समितीने प्रस्तावित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरवणुकीवर ‘सीसीटीव्हीं’चा वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रमुख मिरवणूक मार्गांवरून शहरात रविवारी साडेपाचशे सार्वजिनक गणेशमंडळाचे विसर्जन होणार असून, त्यासाठी पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा शहरात प्रथमच सीसीटीव्हीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे.

'विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रत्येक मंडळांना केवळ चारच ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभारणाऱ्या मंडळाविरुद्ध कारवाई करण्यात येईल,' अशी माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक, तुषार दोशी उपस्थित होते. रामानंद म्हणाले, की 'शहरातील मुख्य रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुरुवात होईल. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तीन हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात साधारणतः ४,१०० सार्वजनिक गणेशमंडळांची स्थापना झाली आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर १३२ स्थिर आणि ३३ फिरत्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरून २७८, टिळक रोडहून १७७, केळकर रस्त्यावरून ७०, तर कुमठेकर रस्त्यावरून ३८ गणेश मंडळांनी विसर्जनासाठी पास घेतले आहेत. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींपुढे तीन पथके, तर अन्य गणपतींपुढे दोन पथके ठेवण्याची परवानगी दिली आहे.'

पोलिस यंत्रणा कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ १०० क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही रामानंद यांनी केले आहे. गेल्या वर्षी टिळक रस्त्यावरील मिरवणूक संपण्यास वेळ लागला होता. त्यामुळे यंदा टिळक रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे. मंडळे सकाळी लवकर आली, तर टिळक रस्ता सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल, असे उपायुक्त तुषार दोशी यांनी स्पष्ट केले.

साडेपाच हजार गुन्हेगारांवर कारवाई

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ५,४३८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई केवळ कागदोपत्री नसून संबंधितांच्या हमीदारांकडून बंदपत्रे घेण्यात आल्याचेही रामानंद म्हणाले.

दोन मंडळांची एकत्र मिरवणूक

मिरवणूक लवकर संपावी म्हणून लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळांनी एकत्र मिरवणूक काढल्याचा निर्णय घेतला आहे. सह आयुक्त सुनील रामानंद यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन गजानन मंडळाचे देवेंद्र जैन, राकेश गाडे-पाटील, तसेच गरूड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी एकत्र मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

भाविकांनी घ्यावयाची काळजी

संशयित वस्तू, बेवारस वाहन, संशयित व्यक्तिंची माहिती त्वरित १०० नंबरवर कळवा.

पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

प्रमुख चौकांमध्ये गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी.

मंडळांनी रात्री १२नंतर स्पीकर वाजवू नये.

फटाके, गुलालाचा वापर टाळावा.

प्रत्येकाने आपापले मोबाइल सांभाळावेत.

विसर्जनासाठी परवानाप्राप्त मंडळे

लक्ष्मी रस्ता २७८

टिळक रस्ता १७७

केळकर रस्ता ७०

कुमठेकर रस्ता ३८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल जप्त

$
0
0

पुणेः बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सतेज सुहास यावले (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) आणि विनोद गोपाळ रोहिटे (रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द बेकायदा अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी बकरी ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूच्या वादातून दोघांवर गोळीबार

$
0
0

पुणेः इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे वाळूच्या वादातून वाळूमाफियांनी केलेल्या गोळीबारात दोन तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

विनोद गुणवंत बंडगर (रा. मदनवाडी, इंदापूर) आणि महेंद्र जगताप (रा. डाळज, इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या काही व्यक्तींसोबत या दोघांचा वाद झाला. वादाचे पर्यवसान भांडणात झाले. यावेळी हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. दौंड तालुक्यातील खामोटा येथे वाळू व्यवसायाचा नुकताच ठेका सुरू झाला आहे. वाळू व्यवहारातील देवाण-घेवाण यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरोल संपवून संजय परतला

$
0
0

पुणेः मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त तीस दिवसांची पॅरोलची सुट्टी संपवून शनिवारी दुपारी येरवडा जेलमध्ये परतला, अशी माहिती येरवडा जेलचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.

संजय दत्तने मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पॅरोल देण्याची मागणी २६ मार्च २०१५ला विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी २६ ऑगस्ट रोजी तीस दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. संजय दत्त पूर्वीचे प्रलंबित अर्ज असतानाही त्याला पॅरोल दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच त्याला वारंवार पॅरोल आणि फर्लोच्या सुट्टी दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तीस दिवसांची सुट्टी संपवून दत्त शनिवारी दुपारी कारागृहात परतला. २१ मे २०१३ पासून संजय येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ लाखांची फसवणूक; दोन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शंभर आयफोन खरेदी केल्यावर ५० फोन फ्री मिळतील असे सांगून एकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रदीप सुरेश मगरे (वय २६, चेंबुर), इफयानी उर्फ माईक मायकल ओगु (३५) या दोघांना अटक केली आहे. अनुभव नवीनबाबु गुप्ता (२१, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्याद यांच्या ई-मेल आयडीवर आरोपींनी ई-मेल पाठविला. तसेच त्यांच्याकडे मोबाइलद्वारे संपर्क साधला. शंभर आय फोन सिक्स खरेदी केल्यावर ५० आय फोन फ्री मिळतील असे अमिष दाखविले. फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट नंबरवर पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे पैसे भरले; परंतु त्यांना आरोपींनी मोबाइल पाठविले नाहीत. तसेच, त्यांचे पैसे परतही दिले नाहीत. फिर्यादी यांची १८ लाख १०,७४५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images