Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टर्मिनलशिवाय बीआरटी नाही

0
0

पुणे : संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) रस्त्यावर सुरू झालेल्या जलद बस वाहतूक सेवेत (बीआरटी) विश्रांतवाडी येथे कायमस्वरूपी टर्मिनल नसल्याने येणाऱ्या अडचणींपासून धडा घेत, नगर रोडवर टर्मिनलशिवाय बीआरटी सुरू होणार नाही, असा पवित्रा पीएमपीने घेतला आहे. खराडी अथवा वाघोली येथील जागांची चाचपणी केली जात असली, तरी तेथे प्रवाशांना आवश्यक सुविधा निर्माण केल्याखेरीज बीआरटी धावणे शक्य नाही, असे स्पष्ट करत महापालिकेने त्यादृष्टीने तयारी करावी, असा संदेशच पीएमपीने दिला.

गेल्या महिन्यात आळंदी रोडवर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली. महापालिकेने विश्रांतवाडी येथे बस टर्मिनल उभारणे गरजेचे असताना, त्यासाठी जागा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशांना बस बदलण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली. परंतु, त्यामुळे पीएमपीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, प्रवाशांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे.

आळंदी रोडपाठोपाठ नगर रोड येथील बीआरटी सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. नगर रोडवरही खराडी अथवा वाघोली परिसरात टर्मिनल होणे गरजेचे आहे, तरच प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल. ही जागा पालिकेने अद्याप निश्चित केलेली नाही.

पीएमपीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये २०१४-१५ साठीच्या १६७ कोटी रुपयांच्या संचलनातील तुटीला मान्यता देण्यात आली. ही तूट भरून देण्याची जबाबदारी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आहे. १६७ कोटींची तूट भरून देण्यासाठी पुणे पालिकेने आणखी ३ कोटी, तर पिंपरीने आणखी ६० लाख दर महिन्याला देण्याची गरज आहे.

२०१४ मध्ये पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न एक कोटी २५ लाख रुपयांच्या दरम्यान होते. ऑगस्ट २०१५ चे सरासरी उत्पन्न १ कोटी ५२ लाख रुपयांवर पोहोचले आहे. प्रवाशांमध्येही एक लाखांनी वाढ झाली असल्याचा दावा पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाखो लिटरची पाणीगळती रोखली

0
0

पुणे : डेक्कन जिमखाना येथील खंडुजीबाबा चौकात पाइपलाइन फुटून वारंवार लाखो लिटर पाणी वाया जात असल्याकडे लक्ष वेधताच अतिरिक्त आयुक्तांनी ही पाणीगळती थांबविण्यासाठी सोमवारी तातडीने पुढाकार घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून येथील पाइपलाइनमधून पाणीगळती होत होती. पाणीपुरवठा विभागाने त्याकडे लक्षच दिले नाही. दर तीन ते चार महिन्यांनी येथे गळती होत असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीच्या विलास लेले यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे सोमवारी सकाळीच केली. बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यामुळे, गळणाऱ्या पाइपलाइनची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून, आता टंचाईच्या काळात पुन्हा पाणी वाया जाणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे. फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने जंगली महाराज रस्त्यावर सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाच ‘हवाई’हट्टाचा

0
0

Parag.Karandikar@timesgroup.com

पुणे : लोहगाव विमानतळाच्या हद्दीजवळील बांधकामांसाठी हवाई दलाच्या ना प्रमाणपत्राची अट काढून टाकण्याबाबतचे स्पष्ट आदेश हवाई दलाच्या मुख्यालयाने दिल्यानंतरही गेले सहा महिने याबाबत कार्यवाही होत नसल्याने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात सध्या अस्वस्थता आहे.

लोहगाव विमानतळ किंवा संरक्षण खात्याच्या इतर मिळकतींपासून शंभर मीटरच्या आत चार मजली इमारतींचे बांधकाम करण्यास (त्यापेक्षा जास्त मजल्यांचे काम करण्यास पाचशे मीटरपर्यंतच्या अंतरामध्ये) संबंधित विभागाच्या प्रमुखांकडे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबतचे आदेश २०११मध्ये जारी करण्यात आले होते. लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाच्या प्रमुखांनी तसे पत्र महापालिकेला पाठवून संबंधित बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, असे कळविले होते. त्यामुळे या परिसरातील सर्व बांधकामाच्या परवानग्यांवर महापालिकेने निर्बंध आणले होते.

याबाबत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी, त्या पूर्वी मान्यता दिलेल्या बांधकामांना परवानगी मिळावी, असे निवेदन वारंवार संरक्षण मंत्रालयाकडे दिले होते. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामधील बांधकामे ही संरक्षण खात्याच्या संबंधित असलेल्या विविध कायद्यांनी नियंत्रित आहेत, त्या ठिकाणी या ना हरकत प्रमाणपत्राची जाचक अट रद्द करण्याची मागणीही केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती.

या मागण्यांची नोंद घेऊन हवाई दलाच्या मुख्यालयाने जानेवारी २०१५मध्ये एका आदेशाद्वारे ना हरकत प्रमाणपत्राची अट काढून टाकल्याचे आदेश सर्व विभागीय मुख्यालयांकडे पाठविले होते. फेब्रुवारी महिन्यात हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम मुख्यालयातून त्याबाबतचे आदेश पुणे हवाईदलाच्या तळप्रमुखांना पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून आजपर्यंत महापालिकेला ही अट काढून टाकण्यात आल्याविषयी कोणतीही माहिती कळविण्यात आलेली नाही.

त्यातच २५ मार्च २०१५ रोजी हवाई दलाच्या मुख्यालयातून आणखी एका आदेशाद्वारे या आदेशांचे स्पष्टीकरणही जारी करण्यात आले आहे. त्यानुसार १८ मे २०११ पूर्वी संबंधित महापालिकांनी परवानगी दिलेल्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्राची अट काढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा पत्रव्यवहार झाल्यानंतरही लोहगाव येथील हवाईदलाच्या तळाच्या प्रमुखांनी या बाबतची माहिती अद्यापही महापालिकेला कळविलेली नाही. त्यामुळे या परिसरातील सुमारे पाचशे हेक्टरहून अधिक क्षेत्रफळातील बांधकामे अडून पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी सांगवी, वाकडमध्ये पुन्हा सोनसाखळी चोऱ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना वाकड आणि सांगवी परिसरात रविवारी रात्री घडल्या. एका तासातच दोन ठिकाणी दागिने हिसकावले गेल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

नव्या सांगवीमध्ये राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात, तर पिंपळे सौदागर येथील महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत नवी सांगवी परिसरात राहणारी संबंधित महिला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास यशदा हॉटेलसमोरील रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले.

दुसऱ्या घटनेत रात्री पावणेनऊच्या सुमारास काळेवाडी फाटा परिसरातील तुषार रेसिडेन्सी येथून पायी जाणाऱ्या संबंधित महिलेच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी दुचाकीवरील दोन इसमांनी हिसकावली. तासाभराच्या कालावधीतच घडलेल्या या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वाकड आणि सांगवी पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक

0
0

पुणे : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांना लुटल्याची घटना हडपसर स्मशानभूमीजवळ सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

करण नवनाथ नाथ (१८, रा. काळेपडळ, हडपसर), शकील इलाणी बागवान (१८, रा. माळवाडी, हडपसर), शरद रावसाहेब अहिरे (२०, रा. बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संतोष साळवी (१८, रा. वेताळवाडी, मांजरी बुद्रुक) या तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवी आणि त्यांचा मित्र हृषीकेश बबन झाडे सीझन मॉल येथून सिनेमा बघून पायी घरी निघाले होते. त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी जीपमध्ये बसवले. हडपसर येथील स्मशानभूमीजवळ गेल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दोन मोबाइल, चांदीचे ब्रेसलेट असा २१ हजार ७०० रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. गोरे अधिक तपास करत आहेत.

पीएमपी वाहकावर प्रवाशाचा हल्ला

पुणे : पीएमपी बसच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाला आतमध्ये येण्यास सांगितले, म्हणून प्रवाशाने वाहकावर हल्ला केल्याची घटना फातिमानगर येथे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रवाशाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

सतीश रघुनाथ अडागळे (४९, रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र न्हावले (४९, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बसचे वाहक न्हावले सोमवारी सकाळी त्यांच्या ताब्यातील बसमधून प्रवासी घेऊन जात होते. त्या वेळी आरोपी अडागळे दरवाजामध्ये उभे होते. न्हावले यांनी त्यांना पाठीमागे सीटवर बसण्यास सांगितले. त्याचा राग येऊन अडागळे यांनी अपशब्द वापरले; तसेच धमकी देऊन कमरेच्या कापडामध्ये दगड गुंडाळून न्हावले यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. अडागळे यांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर. पी. बढे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमध्येही खड्ड्यांचे साम्राज्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

महादेवनगर-मांजरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्ता शोधत वाहने चालवावी लागत आहेत. चार दिवसांच्या मुसळधार पावसाने हडपसर परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

हडपसर उपनगरात घोरपडी गाव, भीमनगर, रामटेकडी, साडेसतरानळी, महादेवनगर-मांजरी रस्ता, भेकराई-फुरसुंगी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मांजरी रस्त्यावरील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीचे निवेदन दिले आहे. जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मगरपट्टा-भीमनगर या रस्त्याचीही चाळण झाली आहे. पावसाच्या जोरामुळे तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. हडपसरवरून पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो; मात्र या मार्गावरील शिंदेवस्ती-भीमनगर-घोरपडी या मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालक पुन्हा हडपसर-रेसकोर्स मार्गाचा वापर करत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका पावसाने रस्ते खड्ड्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांत पावसाने शहरात दडी मारली होती; पण गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चांगले आणि टिकाऊ रस्ते, रस्त्यांचे वेळेत पुनर्डांबरीकरण, त्यांची डागडुजी करण्याचे पालिकेचे दावे पूर्ण फोल ठरले आहेत. एका पावसाने ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली असून, जोरदार पाऊस कायम राहिला असता, तर नागरिकांची प्रचंड गैरसोय होण्याची भीती होती. त्यामुळे, किमान एक ऑक्टोबरपासून पालिकेच्या रस्ते खोदाईच्या नव्या नियमावलीनुसार काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दर वर्षी शहरात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे यंदा पालिकेने एप्रिल-मे महिन्यातच बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली होती. त्यानंतर, अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता ३० एप्रिलपासून रस्ते खोदण्यासाठी एकही परवानगी देण्यात आलेली नाही. जूनअखेरीस झालेल्या पावसानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाने पूर्ण पाठ फिरवली. त्यामुळे रस्ते सुस्थितीत राहिले होते; मात्र गेल्या आठवड्यात एका दिवसात झालेल्या दमदार पावसाने रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पालिकेच्या काही ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने काही दिवसांतच संबंधित भागांतील रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला होता. या भागांत पावसामुळे पुन्हा रस्त्याची पातळी बिघडली असून, पालिकेला तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे.

शहराच्या काही भागांमध्ये रस्त्यांच्या मधोमध, तर काही ठिकाणी कडेला खड्डे पडल्याने वाहनचालकांना रोजच कसरत करावी लागत आहे. पाऊस थांबला असूनही अजूनही या खड्ड्यांची दुरुस्ती का होत नाही, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. गणेशोत्सवासाठीचे मांडव काढल्यावर त्या जागी निर्माण होणाऱ्या खड्ड्यांची तातडीने डागडुजी करावी लागणार आहे.

कारवाई कधी?

काँक्रिटचे रस्ते खोदू नयेत, असे आवाहन पालिकेने केले होते. तसेच, असे रस्ते खोदणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गणेशोत्सवाच्या मांडवांसाठी शहराच्या अनेक भागांत सर्रास काँक्रिटच्या रस्त्यांची खोदाई झाली होती. गेल्या आठवड्यातच 'मटा'ने याच सदरातून त्याकडे लक्ष वेधले होते. गणेशोत्सव संपल्यानंतर तरी अशा मंडळांवर कारवाई होणार, की नेहमीप्रमाणे पालिकेचे दावे बोलाची कढीच ठरणार?

धोरणाची काटेकोर अंमलबजावणी हवी

पुढील १०-१५ दिवसांमध्ये पुन्हा नव्याने रस्ते खोदाईसाठी परवानगी देण्यास सुरुवात होईल. नव्याने परवानगी देताना पालिकेने खोदाईसाठीचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार, ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत किती खोदाई करायची, याची एकत्र माहिती संबंधित कंपन्यांकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार, त्यांना परवानगी देण्यात येणार असून, दिलेल्या परवानगीपेक्षा पाच टक्के अधिक खोदाई करण्याची अनुमती असेल; मात्र त्यापेक्षा अधिक खोदाई केल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, यापूर्वी खोदाई करताना ती कोणत्या कारणासाठी केली जात आहे, याची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना वारंवार केल्या गेल्या; मात्र आता खोदाईच्या दोन्ही बाजूंना असे फलक लावण्याचे बंधनच घालण्यात आले आहे. पालिकेने फक्त आता या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यासाठी द्या औषधांचे दान

0
0

पुणेः अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीने सुरू केलेल्या 'औषंधांचे दान करा' या मोहिमेत गणेश मंडळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. समितीच्यावतीने मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांत आरोग्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी त्या औषधांचा उपयोग केला जाणार आहे.

मराठवाड्यात पाणी प्रश्नाबरोबरच वैद्यकीय सेवांचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत घरातील किंवा दवाखान्यातील शिल्लक औषधे गोळा करून आवश्यकतेनुसार वाटप केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे जिल्हा नियंत्रक डॉ. किशोर शहाणे यांनी निवेदनाद्वारे दिली. अभियानात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी ९८२२३९४५७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून ध्वनिक्षेपक बारापर्यंत

0
0

पुणेः गणेशोत्सवात आजपासून (बुधवार) पुढील पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीसुद्धा ही परवानगी रात्री बारापर्यंतच असणार आहे. त्यामळे बुधवार ते शुक्रवार देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून बंदोबस्त वाढवला आहे.

सार्वजनिक गणपती मंडळांना गणेशोत्सवामध्ये कोणत्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात यावी, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली होती. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार मीनल कळसकर, यांच्यासह शहर व ग्रामीण विभागाचे पोलिस अधिकारी, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. त्यात उत्सव काळातील शेवटच्या पाच दिवसांत रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपक व पारंपरिक वाद्ये वाजवण्यावरून काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीही रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथीसाठी ‘मराठी ऑलिम्पियाड’

0
0

पुणेः शाळा-महाविद्यालयात शिकणारी मुले मराठी बोलत नाहीत, त्यामुळे मराठीचे भवितव्य काय, असे गळे काढले जात असतानाच भाषा संस्थेतर्फे मराठी भाषा कसदार लिहिता-वाचता येणारी पिढी घडावी, यासाठी 'मराठी भाषा ऑलिम्पियाड' हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अतिशय रंजक पद्धतीने घेण्यात येणारी ही परीक्षा यंदा चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्रवण, भाषण, वाचन व संभाषण या चार पद्धतीनुसार ही परीक्षा घेण्यात येणार असून शालेय परीक्षेसारखे ठोकळेबाज स्वरूप या परीक्षेचे नसेल. यंदा फक्त पुण्यात ही परीक्षा होणार असून पुढील वर्षीपासून राज्यात, तसेच अमेरिका व कुवेत या देशामधील मराठी मंडळांच्या सहाय्याने तेथेही परीक्षा हाणार आहे. पुण्यात ११ ऑक्टोबर रोजी भारतीय विद्या भवन येथे ही परीक्षा घेतली जाणार असून 'भाषा परिचय' ही पहिली पायरी असेल, तर दोनशे विद्यार्थी 'भाषा प्रगती' या टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी

रोजच्या वापरातील शब्द, म्हणी, वाकप्रचार आदी प्रकार गमती-जमतीतून , रंजक पद्धतीने व खेळाच्या स्वरूपातून विचारण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत पाचशे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्तीने वर्गणी वसूल केल्यास कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारात शेतकरी किंवा माल वाहतूकदारांकडून गणपती मंडळाचे कार्यकर्ते किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने सक्तीने पैशांची वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे.

मार्केटयार्डाच्या आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केल्याचे रविवारी निदर्शनास आले. तसेच, त्यानंतरही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर बाजार समितीने अशा घटना निदर्शनास आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती समितीचे सभापती एकनाथ टिळे, उपसभापती दिलीप खैरे व सचिव धनंजय डोईफोडे यांनी दिली. सक्तीने वर्गणी वसूल केल्याबाबत मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्याकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली. कोणत्याही वाहनचालकाकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली नाही. सर्व वाहनचालक स्वखुशीने मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे वर्गणी जमा करत होते. त्याची त्यांना रीतसर पावतीही लगेच देण्यात आली, असे स्पष्टीकरण पठारे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेसवर दगडफेक

0
0

केडगावातील घटना; गाड्या उशिरा धावल्याने प्रवासी संतप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दौंड रेल्वेमार्गावरून पुण्याला येणाऱ्या पॅसेंजर केडगाव स्टेशनवर मंगळवारी नियोजित वेळेपेक्षा उशिरा दाखल झाल्या. त्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले. त्यानंतर हैदराबाद एक्स्प्रेसही साडेचार ते पाच तास उशिराने धावत असल्याचे समजल्यावर, संतापलेल्या नागरिकांनी निझामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेसवर दगडफेक केली. त्यामध्ये गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला, तर इंजिनच्या काचा फुटल्या. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांकडे १०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दौंड रेल्वे मार्गावर केडगाव हे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून पुण्याला नोकरीनिमित्त किंवा शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असते. दररोज पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांपासून आठ वाजेपर्यंत चार पॅसेंजर व एक एक्स्प्रेस गाडी सेवेत आहे. मंगळवारी या सर्व गाड्या उशिराने धावत होत्या. सोलापूर-पुणे पॅसेंजर १५ मिनिटे उशिराने केडगावला दाखल झाली. त्यानंतर मनमाड-पुणे पॅसेंजर व बारामती-दौंड-पुणे पॅसेंजर ४५ मिनिटे उशिरा आली. बारामती पॅसेंजर ही सकाळच्या सत्रातील शेवटची पॅसेंजर गाडी आहे. ही गाडी सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी केडगावहून निघते. त्यापूर्वी हैदराबाद एक्स्प्रेस गाडी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटते. मात्र, ती गाडी सुरुवातीला तासभर उशिराने असल्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे बारामती पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस एकाचवेळी केडगावहून सुटण्याची शक्यता होती. बारामती पॅसेंजरने जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी या गाडीऐवजी एक्स्प्रेसने जाणे पसंत केले. मात्र, बारामती पॅसेंजर केडगावहून निघाल्यानंतर हैदराबाद एक्स्प्रेसला पाच तास उशिर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे प्रवासी संतापले व रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यावेळी सुवर्णजयंती एक्स्प्रेस तेथून जात होती. त्या गाडीवर संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली.

या गाड्यांना झालेल्या उशिरामुळे सकाळच्या सत्रात नोकरी किंवा शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्यांचे पुढील नियोजन विस्कळित झाले. अनेक तरुण पुण्यातून चाकण, भोसरी, हिंजवडी या ठिकाणी आयटी कंपन्यांमध्ये कामाला जातात. त्यांना पुण्यात दाखल होण्यास उशीर झाला. या पॅसेंजर गाड्यांना होणारा उशीर आमची डोकेदुखी झाली आहे, अशी भावना केडगावकरांनी व्यक्त केली.

निझामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेस या गाडीच्या चालकांनी पुण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या जबाबानुसार १०० प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दौंड रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

- अभय परमार, वरिष्ठ लोहमार्ग पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजा मारणे टोळीतील सराईत गुंडाला अटक

0
0

पुणेः कुख्यात गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी शास्त्रीनगर येथून सोमवारी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणी दोन जिवंत काडतुसे असा २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शेखर दत्तात्रय आडकर (वय २६, रा. राजहंस कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणपती उत्सवाच्या अनुषंगाने कोथरूड पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार आडकर हा शास्त्रीनगर येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या पथकाने शास्त्रीनगर येथील दत्तमंदिराजवळ आडकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. या पिस्तुलाबाबत चौकशी केली असता किरण पडवळने त्याला हे पिस्तुल दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पडवळचा कोथरूड पोलिसांकडून शोध सुरू आहे. आडकरवर विविध पोलिस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कोठडी

0
0

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सुशील शर्मा आणि सचिन कुमार यांना अटक करण्यात आली आहे. नगर येथील सुधाकर पवार या व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार केली होती. पवार यांनी २० लाख रुपयांना मशिन विकत घेतले होते. हे मशिन त्यांनी १३ लाखांना विकले. मोठी रक्कम असल्यामुळे त्याचा तपास करण्यात आला. आठ लाख रुपये दंड भरण्यास सांगण्यात आला. तडजोड करण्यासाठी कुमार यांनी पवार यांच्याकडे दाेन लाखांची लाच मागितली. ५० हजारावर तडजोड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जनासाठी विसर्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणांतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करून पाणीकपात केली जात असतानाच गणपती विसर्जनासाठी मुठा नदीत पाणी सोडण्याचे सूतोवाच जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी केले. शहराला साधारणतः दीड ते दोन दिवस पुरेल एवढे पाणी नदीत सोडण्याचे नियोजन आहे.

'विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न पडल्यास निर्णय घ्यावा लागणार आहे,' असे राव यांनी स्पष्ट केले. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचे अधिकारी व महापालिका आयुक्तांची राव यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीत अनंत चतुदर्शीच्या दिवशी धरणातून नदीत पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली. शहरात साधारणतः चार लाख गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यातील काही मूर्तींचे विसर्जन महापालिकेने बांधलेले हौद तसेच कालव्याच्या पाण्यात केले जाते. परंतु, बहुतांश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात केले जाते. त्यामुळे नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी खडकवासला धरणातून एकूण दोनशे दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाणी सोडावे लागेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला होता. परंतु, पाचव्या दिवशी पावसामुळे नदीमध्ये पाण्याचा प्रवाह होता. त्यामुळे तेव्हा पाणी सोडावे लागले नाही. आजच्या सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. २३) नदीत प्रवाह कायम असल्याने पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. त्यामुळे पाणी सोडावे लागणार नसल्याचे राव यांनी सांगितले.

खडकवासला धरण प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ५३ टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पाणी सोडणे योग्य होणार नाही. तथापि, येत्या तीन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर अनंत चतुदर्शीच्या दिवशी धरणातून पाणी सोडावे लागेल असे राव यांनी सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वगळलेली मतदारयादी नगरसेवकांना देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या तीन लाख बारा हजार मतदारांच्या नावांची यादी राजकीय पक्ष आणि महापालिकांतील नगरसेवकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली. मतदारयादीतून वगळलेल्या नावांविषयी तक्रारी येऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बोगस मतदारांमुळे पुण्याची मतदारयादी फुगल्याकडे 'मटा'ने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने दुबार, मृत व स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन बोगस नावे कमी करण्याची सूचना केली होती.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अधिक अचूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीतून नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. नावे वगळली गेल्याबद्दल काही मंडळींनी हायकोर्टातही याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने दिलेले निर्देश व निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांधारे मतदार नोंदणीसह दुबार, मृत व स्थलांतरीत नावे कमी करण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या. तसेच संबंधित मतदार या ठिकाणी राहात नसल्याचे पंचनामे करून नावे वगळण्यात आली आहेत, असेही राव यांनी सांगितले.

मतदारयादीतून सर्वाधिक चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ८१ हजार नावे वगळण्यात आली आहेत. भोसरी मतदारसंघातून ४२ हजार, तर खडकवासला मतदारसंघातून ३७ हजार मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नावे वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावांची यादी असलेली सीडी राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे, असे राव यांनी स्पष्ट केले. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनासुद्धा सीडी दिली जाणार आहे.

यादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध

नावे वगळल्यानंतर अद्ययावत करण्यात आलेली मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदारयादीतून नाव वगळलेल्या मतदारांना १६ जानेवारी २०१६ पर्यंत नावनोंदणी करण्याची संधी दिली जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिंपरीचे नाव वगळणे अपमानास्पद’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये असतानाही केवळ पुण्याचा समावेश या योजनेत करून पिंपरी-चिंचवडला वगळणे हा दोन्ही शहरातील नागरिकांचा अपमान आहे. भाजप सरकारने राजकारण करत हा अपमान केला असल्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात केली.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद‍्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, विरोधीपक्ष नेते अरविंद शिंदे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेविका शारदा ओरसे, लक्ष्मी घोडके, सुनंदा गडाळे या वेळी उपस्थित होत्या.

मुंडे म्हणाले की, पुण्याची ओळ्ख देशाला नव्हे; तर जगाला आहे. वेगाने विकसित होणारी शहरे म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड आहे. पिंपरी-चिंचवड तर देशाची औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते असे असतानाही, राज्य सरकारने ही दोन्ही शहरे एकत्रितपणे स्मार्ट सिटीसाठी पाठविली.

'पुणेकरांनी भान सोडले'

पुणेकरांसमोर बोलताना भल्याभल्यांची तारांबळ उडते. त्यांच्यासमोर जपूनच बोलावे लागत. पण आजकाल बोलण्यात पुणेकरांनीही भान सोडली असल्याची टीका मुंडे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता केली. त्यामुळे आता शनिवारवाड्यावर बोलताना आपणही मोकळेपणाने बोलू शकतो असा टोलाही त्यांनी हाणला.

'विखेंच्या पोटात दुखण्याचे कारण काय?'

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने दृष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावर उतरले असतील; त़र या वयात विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण काय अशी विचारणा धनंजय मुंडे यांनी केली. काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचे पाणी बारामतीला पळविल्यामुळे मराठवाड्यावरील दुष्काळ आला असून याला पवारच जबाबदार असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. त्याला मुंडे यांनी आपल्या स्टाइलने उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोमिओंवर गणेशोत्सवात चाप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात महिलांची टिंगलटवाळी रोखण्यासाठी गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी हे कर्मचारी पायी गस्त घालणार असून महिलांच्या तक्रारीची वाट न पाहता संशय असलेल्या व्यक्तींना धडा शिकवणार आहेत.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी बाहेरून अनेक नागरिक येतात. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय असते. गर्दीमध्ये अनेकदा टोळक्यांकडून तरुणींची टिंगलटवाळी, शेरेबाजी करण्यात येते. त्यामुळे महिला व तरुणींना त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्यासाठी शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून चार पथके तयार करण्यात आली आहेत. गर्दीचे देखावे, गणपती मंडळे, रस्ते अशा ठिकाणी ही पथके पायी गस्त घालणार आहेत. या पथकामध्ये तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि चाळीस कर्मचारी देण्यात आले आहेत. यामध्ये चार महिला पोलिस अधिकारी राहणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी तरुणांकडून मुलींच्या पाठीमागे फिरणे, महिलांना धक्का देणे तसेच गर्दीचा फायदा घेऊन त्यांना त्रास देत असल्याचा संशय पथकाला आला तरी त्या व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. आतापर्यंत पथकाकडे अशा प्रकराच्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे ही पाटील यांनी सांगितले.

गुन्हे रोखण्यासाठी सात पथके

साखळीचोरी, पाकीट चोरी व इतर गंभीर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेची सात पथके बंदोबस्तात तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये सात पोलिस निरीक्षक, बारा सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि ७० गुन्हेशाखेतील कर्मचारी राहणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांच्या देखरेखेखाली ही पथके काम करणार आहेत. शहरातील डेक्कन, विश्रामबाग आणि फरासखाना या चार सहायक पोलिस आयुक्तांना सातपैकी चार पथके मदत करणार आहेत. मध्यवर्ती भागाबरोबरच इतर भागतही गुन्हे शाखेचे पथक मदत करणार आहे, असे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनजीओ, हमाल पंचायत, बिल्डरांचाही सहभाग

0
0

पुणे : शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभियानात सहभागी होण्याचा निर्धार शहरातील विविध स्वयंसेवी संस्था (एनजीओ), बांधकाम व्यावसायिक, हमाल पंचायत, रिक्षा संघटना, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, नेहरू युवा केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, क्रेडाई, माहेर चितपावन संघ, स्वच्छ भारत, कागद काच पत्रा या संघटनांच्या वतीने करण्यात आला. महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीबाबत बोलाविण्यात आलेल्या बैठकीत या संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांनी सहभाग घेत हा निर्धार केला.

महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक बोलाविण्यात आली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटी योजनेचे समन्वयक आणि उपायुक्त अनिल पवार, क्रेडाईचे संजय देशपांडे, आय. पी. इनामदार, तेजराज पाटील, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, अेईएसएचे दिवाकर निमकर, नेहरू युवा केंद्राचे भारत गांधी, विनीत मलापुरे, माहेर चितपावन संघाचे बळवंत रानडे, स्वच्छ भारत संस्थेचे अनिल मंद्रूपकर, कागद काच पत्रा संघटनेचे हर्षद बर्डे, रिक्षा संघटनांचे बाबा शिंदे यांच्यासह सूर्यकांत जगताप, प्रदीप भालेराव, रावसाहेब कदम, नंदन बिल्डकॉनचे शामकांत कोटकर तसेच इतर सभासद उपस्थित होते.

उपायुक्त पवार यांनी स्मार्ट सिटी अभियानाची संपूर्ण माहिती देत शहराच्या विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्या नक्की कोणत्या त्यावर उपाययोजना कशा कराव्या लागणार आहेत. याची सविस्तर माहिती दिल‌ी.

शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचण्यासाठी पालिका राबवित असलेल्या उपक्रमाची माहितीही या वेळी देण्यात आली. पालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पालिकेच्या या उपक्रमासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन उपस्थित संस्थांच्या प्रतिनिध‌ींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’मुळे पालिकेत खामोशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यासाठी पालिकेने तब्बल अडीच हजार कर्मचाऱ्यांना पुणेकरांकडून माहिती गोळा करण्यासाठी जुंपल्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊ लागला आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीतील खात्यांसह क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारीही सध्या स्मार्ट सिटीसाठी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेत असल्याने पालिकेच्या खात्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमधील समावेशासाठी नागरी सहभाग आवश्यक आहे. यापूर्वी, पालिकेने ऑनलाइन स्वरूपात नागरिकांच्या सूचना मागविल्या होत्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असतानाही, आता मात्र घरोघरी जाऊन नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या कामाची जबाबदारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरच ढकलण्यात आली आहे. पालिकेच्या अनेक विभागांतील कर्मचारी या कामात गुंतल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याकडे स्थायी समितीतील अनेक सदस्यांनी लक्ष वेधले. हे काम केवळ १० दिवसांचे असून, तात्पुरत्या स्वरूपातच कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते काम संपताच, सर्वजण आपल्या विभागात हजर होतील, असा खुलासा प्रशानातर्फे करण्यात आला. मात्र, तरीही स्थायी समितीतील सदस्यांचे समाधान झाले नाही. खातेप्रमुख अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी वर्ग-२ चे बहुसंख्य अधिकारी यात समाविष्ट असल्याने दैनंदिन स्वरूपाची कामे करून घेण्यात अडथळे येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

कर्मचाऱ्यांवर सक्ती

स्मार्ट सिटीचे अर्ज भरून घेण्यासाठी आठशे ते नऊशे कर्मचारी नेमण्यात आल्याचा दावा प्रशानामार्फत करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात दोन हजार तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे. गणेश चतुर्थीपासून हे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी अर्ज भरून घेण्यासाठी हिंडत आहेत. येत्या २९ सप्टेंबरपर्यंत त्यांना हे काम करावे लागणार आहे. या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाला किमान २५० अर्ज भरून आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामापेक्षा हे काम अधिक खडतर असल्याची कबुली त्यांच्याकडूनही दिली जात आहे.

आयुक्तांना वेळच नाही...

शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, कंपन्या यांच्याबरोबर घेण्यात येत असलेल्या बैठका; तसेच शहराच्या विकास आराखड्याबाबत (डीपी) घेतल्या जाणाऱ्या बैठकांमुळे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना वेळ मिळत नसल्याने शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नावर कोणताही निर्णय घेतला जात नाही. शहरातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देऊन ते तातडीने मार्गी लावावेत, यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन मंगळवारी आयुक्तांची भेट घेण्याची वेळ आली. स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी महापालिका आयुक्त कुमार यांनी कंबर कसली आहे. आठवड्यातील चार दिवस दिल्ली येथे बैठका, तर उर्वरित दिवस शहरातील विविध संस्था, संघटना, कंपन्या यांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेण्याचा दिनक्रम आयुक्तांनी सुरू केला आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत आयुक्त भेटणार नाहीत, काही काम असेल तर अतिरिक्त आयुक्तांना भेटा, असे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images