Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

३५० मांडव रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हायकोर्टाचे आदेश धुडकावत ३५० मंडळांनी रस्त्यांवर मांडव घातले आहेत. याव्यतिरिक्त १०० कमानी नियमबाह्य आहेत. हायकोर्टाने राज्यातील महापालिकांना नियम मोडणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नावे-पत्ते प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी उपद्रवी मंडळांची माहिती घेतली असता ही आकडेवारी निष्पन्न झाली आहे.

नियमबाह्य मांडवांची गणती महापालिका आणि पोलिसांनी सुरू केली आहे. विनापरवाना घालण्यात आलेले मांडव, तसेच नियमापेक्षा अधिक रस्ता वापलेल्या मांडवांची मोजदाद करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीही उपद्रवी मंडळांची माहिती घेतली आहे. वाहतूक पोलिसांकडून ना हरकरत प्रमाणपत्र देताना मांडवाच्या आकाराबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतात. मात्र, मंडळांकडून परवानगी घेतल्यावर रस्त्यांवर मोठ्या आकाराचे मांडव घालण्यात येतात. याला आता हायकोर्टाने चाप लावला आहे.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत शहरातील ३५० मंडळांनी मांडव घालताना नियमापेक्षा जादा जागा व्यापली आहे; तसेच १०० कमानीही नियमबाह्य लावल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून गेल्या वर्षीही अशा प्रकारची माहिती गोळा करण्यात आली होती. पुढील वर्षी या मंडळांना परवानगी देताना जुन्या माहितीचा उपयोग होतो, अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.

रस्त्यांवर टाकण्यात येणाऱ्या मांडवाबाबत हायकोर्टात जनहीत याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने रस्त्यांवर मांडव टाकताना काही निकष घालून दिले आहेत. हे निकष पाळण्यात येतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महसूल, महापालिका आणि पोलिसांवर देण्यात आली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचा भंग करत मांडव घालणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नावे आणि पत्ते प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने सर्व महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मांडवाची माहिती गोळा करण्यात येत आहे.

नियमबाह्य मंडळांची संख्या मोठी

पुणे शहरात मोठ्या संख्येेने सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. यातील बहुतेक मंडळे ही रस्त्यांवर मांडव टाकतात. महापालिका आणि पोलिसांनी रस्त्यांवर टाकण्यात आलेले मांडव त्यांना दिलेल्या परवानगीला अनुसरून टाकलेत की नाही, याची माहिती घेतली जात आहे. ही माहिती हायकोर्टाला सादर करण्यात येणार आहे. उपनगरांतील माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ३५० मंडळे निष्पन्न झाली असली, तरी ही संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ तास उशिराने डेक्कन क्वीन दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कामशेत येथे शुक्रवारी पावसाने रेल्वेमार्ग ट्रॅक खालील वाळू वाहून गेल्यानंतर विस्कळित झालेली रेल्वेची सेवा शनिवारी पूर्ववत झाली. त्यानंतरही पुणे-मुंबई मार्गावरील गाड्या धीम्या गतीनेच धावत होत्या. शुक्रवारी झालेल्या प्रकारामुळे मुंबईहून येणारी डेक्कन क्वीन शनिवारी सकाळी आठ वाजता पुण्यात दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

कामशेत येथे शुक्रवारी झालेल्या तुफान पावसाने पवना नदीचे पाणी रेल्वे ट्रॅकमध्ये शिरल्याने वाळू वाहून गेली होती. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासून पुणे-लोणावळा लोकल सेवा आणि मुंबई मार्गावरील गाड्यांची सेवा विस्कळित झाली होती. रेल्वे ट्रॅक खचल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेच्या इंजिनीअर्सने तातडीने कामशेतला धाव घेतली आणि दुरुस्ती हाती घेतली. शनिवारी पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत त्यांचे काम सुरू होते. दरम्यान, या कामामुळे बहुतांश गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या. शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत पोहोचणारी डेक्कन क्वीन शनिवारी सकाळी आठ वाजता पोहोचली. त्यामुळे दररोज सकाळी पुण्याहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायलींवर सह्या करणाराच दोषी

$
0
0

अजित पवारांचे नाव न घेता उदयनराजेंचा टोला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'घोटाळ्याच्या चौकशीसाठी अँटि करप्शन विभागाने (एसीबी) बोलावले, तर वकिलाला न पाठवता स्वतः हजर राहिले पाहिजे. ज्याने फायलींवर सह्या केल्या, तोच या गोष्टीला जबाबदार आहे, त्यानेच चौकशीला सामोरे जावे', असा टोला साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता शनिवारी लगावला.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी 'एसीबी'ने चौकशीला बोलाविल्यावर पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी चौकशीला हजर न राहता आपल्या प्रतिनिधींना पाठविले होते. त्या पार्श्वभूमीवर चौकशीला स्वतः उपस्थित राहण्याचा सल्ला भोसले यांनी दिला. 'राज्यातील लोक देशात सर्वाधिक सहनशील आहेत; म्हणून त्यांचा अंत पाहू नका. राजकीय पुढारी दिसताच त्याला ठेचून काढण्यापर्यंत शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीन राज्यात दुष्काळ जाहीर करावा,' अशी मागणी भोसले यांनी केली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च आणि वीज बिल सरकारने भरावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

फडणवीसांची पाठराखण

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत का, असे विचारले असता त्यांना कामासाठी जरा वेळ द्या, असे भोसले म्हणाले. तसेच, या पूर्वीच्या गृहमंत्र्यांनी काय केले त्याचाही आढावा घेतला पाहिजे, अशीही टिप्पणी त्यांनी केली.या पूर्वी राज्यात आमच्या पक्षाचे सरकार होते. तेव्हा मला अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींबाबत मी नेहमीच घरचा आहेर दिला. त्या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली असती, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले.

'मला फक्त गृहखाते द्या'

गोविंद पानसरे यांच्या खुनाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत भोसले म्हणाले, की 'अशा काही घटनांमध्ये दोषी असल्याचे सिद्ध झालेल्या व्यक्तींना चौकांमध्ये सर्वांसमोर गोळ्या घातल्या पाहिजेत. समाजात पोलिस व कायद्याविषयी भीती राहिलेली नाही. मला सरकारने फक्त गृहखाते द्या; मग एकेकाला वठणीवर आणतो.'

राज्यात सिंचनाशी संबंधित कामे चांगल्या पद्धतीने हाताळली असती, तर आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण नसती झाली. धरणे बांधून तयार आहेत, तर कॅनॉलचे काम पूर्ण नाही. काही ठिकाणी कॅनॉलचे काम झाले आहे, तर धरणाचे काम अपूर्ण आहे.

- उदयनराजे भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन प्रभात’वर बंदी घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा संबंध असल्याचे पुढे आल्याने राज्य सरकारने तातडीने संस्थेवर बंदी घालावी,' अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. वैचारिक स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या अशा संस्थांमुळे राज्याच्या संस्कृतीला धोका निर्माण झाला असल्याने त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याने मुख्यमंत्र्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री म्हणून त्यांच्या विश्वासातील व्यक्तीची नेमणूक करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे चव्हाण यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर आणि सरचिटणीस योगीराज प्रभुणे या वेळी उपस्थित होते. 'शेतकऱ्यांना वारंवार कर्ममुक्ती दिली जावी, याच्याशी मी सहमत नाही. परंतु, काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. मुख्यमंत्री असताना आम्ही शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला होता. यंदाही राज्यात गंभीर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना कर्ममाफी मिळालीच पाहिजे, यावर काँग्रेस ठाम आहे,' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यातील अनेक नेत्यांच्या विदेशवाऱ्या सुरू आहेत; पण उद्योग आणि गुंतवणुकीत राज्य आठव्या स्थानावर घसरले आहे. उद्योगांसाठी एक खिडकी योजना, कमीत कमी परवानग्या याबद्दल घोषणा झाल्या, तरी अजून फरक पडलेला दिसत नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

राजकीय हेतूने एमआयएमचा वापर केला जात असून, भाजप त्यांच्या सोयीसाठी या पक्षाचा वापर करीत असल्याने काँग्रेसला त्याची चिंता नाही.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन साखळीचोर जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

तळेगाव दाभाडे येथे एका महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन साखळी चोरट्यांना नागरिकांनी पकडले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास तळेगाव येथील राव कॉलनी परिसरात घडली आहे.

मोहम्मद शहाबुद्दीन इराणी (२५, रा. शिवाजीनगर, पुणे), मोहम्मद हनू सय्यद (२५, रा. कर्जत, रायगड) अशी सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्या सुरेश मुंदरगी (५५, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) या राव कॉलनी परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी गेल्या होत्या. आरतीनंतर त्या घरी पाय जात असताना सायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मुंदरगी यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले आणि पळून गेले. मुंदरगी यांनी आरडाओरडा केल्याने गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला आणि त्यांची गाडी अडवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही चोरटे सराईत साखळीचोर असून, त्यांच्याकडून साखळीचोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

वृद्धाची आत्महत्या

पिंपरी : राहत्या घरात बाथरूममध्ये वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी खराळवाडी येथील आत्मनगर सोसायटीमध्ये रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली. मॅथ्यू भोसले (७८, रा. आत्मनगर, पिंपरी) असे वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू रविवारी सकाळी आंघोळीसाठी साडेसहा वाजता बाथरूमात गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत. घरातील अन्य व्यक्तींनी दार वाजवून देखील प्रतिसाद न मिळाल्याने पोलिस व अग्निशामकदलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बाथरूमचे दार तोडले असता, मॅथ्यू यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहायक निरीक्षक गजानन कडाळे तपास करीत आहेत.

विसर्जन घाटावर आढळला मृतदेह

पिंपरी : चिंचवड येथील विसर्जन घाटावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार शनिवारी (१९ सप्टेंबर) उघडकीस आला. शिवशंकर शरणप्पा मदार (वय २७, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील पवना नदी घाटावर शनिवारी सकाळी शिवशंकर याचा मृतदेह आढळून आला. शिवशंकर याला गांजा व दारूचे व्यसन होते. मात्र, मृत्यू कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत

$
0
0

लोणावळा : मावळात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळित झालेली जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक आणि रेल्वेसेवा शनिवारी पूर्ववत झाली.

कामशेत ते कान्हेफाटा या दरम्यान लोहमार्गाखालील खडीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विस्कळित झाली होती. शनिवारी पहाटे तीन वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.

शुक्रवारी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. त्यामुळे मावळातील जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेले होते. पवन मावळतील बेडसे ते उर्से व नाणे मावळातील चिखलसे ते वडगाव या पट्ट्यात दुपारी पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. कामशेत ते वडगाव दरम्यान जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ठप्प झाली होती. एक्स्प्रेस वेवरील बऊर ते ऊर्से टोलनाक्यापर्यंत एक फुटापर्यंत पाणी रस्त्यावर साचले होते. त्यामुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने होत होती.

लोणावळाः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा येथील केवरे जवळील पुलाचे लोखंडी खांब व सळया मोकळ्या झाल्यामुळे एक्स्प्रेस वेवरून मुंबहून पुण्याकडे जाणारी वाहने या ठिकाणी पंक्चर होऊन कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. किलोमीटर क्रमांक ५७ जवळ हे ठिकाण असून, या ठिकाणापासून अवघ्या एक किलोमीटरवर आयआरबीचे कार्यालय व दुरुस्ती विभाग आहे. असे असतानाही रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. एखादा अपघात झाला की मगच आयआरबी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार का असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआयमध्ये ‘क्लायमॅक्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असतानाच, रविवारी दुपारी संस्थेच्या परिसरात अचानक 'प्रेतयात्रा' निघाली..., या प्रेतयात्रेमुळे थोड्याच वेळात गर्दी जमली..., काही वेळात पोलिसही दाखल झाले... अन् थेट 'प्रेत'च पोलिस ठाण्यात नेले गेले... संस्था ते पोलिस स्टेशनपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर अखेर ही खरीखुरी नव्हे, तर शूटिंगसाठीची 'प्रेतयात्रा' होती, याचा खुलासा झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

शहरातील एका नाट्यनिर्मिती संस्थेतील कलाकारांनी सामाजिक प्रश्नांविषयी भाष्य करणाऱ्या शॉर्टफिल्मसाठी ही 'प्रेतयात्रा' काढली होती. एक व्यक्ती आपलेच प्रेत घेऊन शहरात फिरते आणि त्या वेळी त्याला येणारे वेगवेगळे अनुभव या प्रयोगाद्वारे दाखविण्यात येणार होते. मात्र, पोलिसांच्या एन्ट्रीने या कार्यकर्त्यांना एका भलत्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. खऱ्या खुऱ्या पोलिस ठाण्यात जाऊन 'प्रेतयात्रे'बद्दल जबाबही नोंदवावा लागला.

'एफटीआयआय'मध्ये प्रेतयात्रा काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आधीच संस्थेत आंदोलनामुळे तणावाचे वातावरण असल्याने मुळातच खबरदारी घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. शहरात सगळीकडेच पोलिस बंदोबस्त तैनात आहे. त्यात ही माहिती मिळाल्याने पोलिस तत्काळ 'एफटीआयआय'मध्ये पोहोचले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अफवा पसरू नयेत यासाठी या विद्यार्थ्यांची प्रेतयात्रा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली.

'आम्ही सामाजिक प्रश्नांवर ही शॉर्टफिल्म करत आहोत. सध्याच्या परिस्थितीत वैतागलेला एक माणूस स्वतःच स्वतःची प्रेतयात्रा घेऊन फिरत असतो, अशी या शॉर्टफिल्मची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यामुळे असा गोंधळ होणे निश्चितच अपेक्षित नव्हते,' असे संबंधित नाट्यनिर्मिती संस्थेच्या कलाकारांनी 'मटा'ला सांगितले. शॉर्टफिल्मच्या अखेरच्या टप्प्यात आपल्या प्रेतासह ती व्यक्ती नदीत उडी मारते. ती व्यक्ती मरते, मात्र पाण्यावर तरंगणारी प्रेताची प्रतिकृती आजच्या धावपळीत जगणाऱ्या व्यक्तीचे वास्तव दर्शन घडविते, असा क्लायमॅक्स असल्याची माहिती 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी दिली.

पोलिसांची धांदल

आंदोलनामुळे संवेदनशील बनलेल्या 'एफटीआयआय'मध्ये प्रेत पोहोचल्याने पोलिसांची धांदल उडाली होती. दोन कर्मचारी धावतच त्या प्रेतयात्रेजवळ पोहोचले. त्यांनी प्रेताची कायदेशीर तपासणी केली. ते प्रेत ही एक प्रतिकृती असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि तशी माहितीही आपल्या वरिष्ठांना कळविली. त्यानंतर ती प्रतिकृती थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. शहरात ठिकठिकाणी शूटिंग झाले, तरी तिथे कोणतीच अडचण जाणवली नाही; पण 'एफटीआयआय'मध्ये प्रेतयात्रा पोहोचताच, संबंधितांना आपला बाडबिस्तारा गुंडाळावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या वतीने ‘मागेल त्याला पाणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

शिवसेनेच्या वतीने बाणेर, बालेवाडी परिसरात मोफत व मागेल त्याला पाणी देण्यासाठी बोअर सुरू करण्यात आल्याची माहिती, शिवसेना समन्वयक शिवलाल धनकुडे यांनी दिली. अनेकदा आंदोलने व निवदेने देऊनही नागरिकांचे प्रश्न प्रशासनाकडून सोडविले जात नसल्याने बाणेर बालेवाडी येथील प्रश्न शिवसेना आक्रमक पध्दतीने मांडणार असल्याचे शिवसेना समन्वयक शिवलाल धनकुडे यांनी सांगितले.

बाणेर बालेवाडी येथील पाणी प्रश्न, रस्ते, बागा, आरोग्याचे प्रश्न, भाजी मंडई, कचरा समस्या याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत असताना काही सोसायट्य़ांना पाणी पुरवठाच होत नाही. दिवसाआड होत असलेल्या पाणी पुरठ्याचे नियोजन चुकीचे असल्याचा आरोप धनकु़डे यांनी पत्रकार परिषदेत केला. बाणेरमधील प्रश्न अनेकदा लोकशाही मार्गाने नागरिकांनी मांडले आहेत. परंतु, ते प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना बाणेर मधील प्रश्न आक्रमक पध्दतीने मांडणार आहे, असा इशारा देण्यात आला. या वेळी डॉ. दिपील मुरकुटे, तुळशीदास महाजन, युवा सेना सरचिटणीस राहूल धनकुडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगारपत्रक ‘ऑनलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ऑनलाइन ट्रान्स्फर होण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या पुढाकाराने ही प्रणाली सुरू होत आहे. या सॉफ्टवेअरमुळे पोलिसांना आता थेट त्यांच्या मोबाइलवर पगारपत्रक पाहता येणार आहे. त्याचबरोबर पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'समाधान कक्ष'ही सुरू करण्यात येणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांना अनेकदा आपल्याला मिळणारा पगार, त्यातून होणारी कपात, भत्ते, घरभाडे याबाबत फारशी माहिती होत नाही. जिल्ह्यातील ३१०७ पोलिस कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक काढताना संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर अधीक्षक जाधव यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर पगारपत्रक देण्यासाठी पुढाकार घेऊन सॉफ्टवेअर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांना पोलिस मुख्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. तालुक्याच्या ठिकाणी आणि त्यांच्या हद्दीत पोलिसिंगसाठी पोलिसांना अधिक वेळ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार थेट खात्यावर जमा होतात. येत्या काळात कर्मचाऱ्यांचा पीएफ, मागील देणे याबाबत थेट कर्मचाऱ्याला माहिती मिळण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदेवाडीत पुन्हा उद‍्भवली पूरस्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिंदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या तुफान पावसाने रस्त्यावर पाणी साठले होते आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी मायलेकींचा दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेची आठवण झाली. त्याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) व जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवल्याने या दोन्ही यंत्रणांनी 'त्या' घटनेतून काही बोध घेतला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिंदेवाडी येथील भूमिगत मोरीचे काम, नवीन बोगद्याजवळ कोसळलेला राडारोडा व बाजूला बोगद्यातील वळवलेली वाहतूक यामुळे बुधवारी येथे चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. शिंदेवाडी जकातनाका व गोगलवाडी फाटा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. नवीन बोगद्याकडून मोठ्या प्रमाणात पाणी गोगलवाडी फाट्यावर वाहत होते. या ठिकाणी रस्त्यालगत पाणी वाहून जाण्यासाठी मोरीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने रस्त्यावर पाणी आले. या पाण्यात अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. नवीन बोगद्याशेजारी असलेल्या धबधब्यातून प्रचंड राडारोडा आणि चिखल रस्त्यावर आला होता. नवीन बोगद्याजवळ दरडींचा व राडारोडा कोसळण्याचा धोका लक्षात आलेला असूनही रिलायन्सने याकडे दुर्लक्ष केले. पाणी वाहून जाण्यासाठी गोगलवाडी फाट्यावर एकच मार्ग असल्याचे सर्व पाणी तेथील मोरीत जमा झाले होते. शिंदेवाडी रस्त्यावर २०१३ मध्ये आलेल्या पुराप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी येथे सहा जून २०१३ रोजी झालेल्या दुर्घटनेत एका मायलेकींचा मृत्यू झाला होता. या भागात रस्त्यालगत करण्यात आलेल्या बेकायदा डोंगरफोडीमुळे रसत्यावर पाण्याचा मोठा लोंढा वाहून आला होता. त्यात अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तातडीने या भागातील बेकायदा डोंगरफोड केल्याप्रकरणी किसन राठोड याला अटक करण्यात आली होती. या

भागातील रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात पुन्हा या भागात अतिक्रमणे झाली. त्याबाबतचे वृत्तही प्रसिद्धीमाध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्ध केले. त्यानंतर संबंधित त्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. 'एनएचआय'ने कारवाईसाठी कोणताही पाठपुरावा केला नसल्याने दिसून येते. महामार्गाचे काम पाहणाऱ्या एनएचआय आणि रिलायन्स इन्फ्राने मागील दुर्घटनेतून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील पक्षी नोंदणीची ई-भरारी

$
0
0

Chaitrali.Chandorkar @timesgroup.com

पुणे : घराच्या खिडकीतून दिसणारा कावळा, चिमणी, कबुतरांबरोबरच शहरातील बागांमध्ये, माळरानांत, टेकड्यांवर, अगदी पाणवठ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांचे प्रकार आणि प्रतीकात्मक आकडेवारी सांगणारा 'बर्ड ऑफ पुणे' हा नकाशा लवकरच तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभ्यासकांनी या नकाशाचे नियोजन केले असून, हौशी पक्षीप्रेमी शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून पक्ष्यांची निरीक्षणे नोंदविणार आहेत.

दिवसेंदिवस वेगाने विकसित होत असलेल्या पुण्यातील जैववैविध्य नष्ट होत असून, अनेक पक्ष्यांनी शहराकडे पाठ फिरविली आहे, अशी टीका अभ्यासकांकडून सातत्याने ऐकायला मिळते. मात्र, आजपर्यंत शहरातील पक्ष्यांचे सखोल डॉक्युमेंटशनच झाले नाही. त्यामुळे पक्षिसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणारे अभ्यासक एकत्र आले आहेत. 'किकाज बर्ड क्लब'तर्फे या उपक्रमाचे संयोजन करण्यात येत आहे. प्रसिद्ध पक्षी अभ्यासक गिरीश जठार, किरण पुरंदरे, धर्मराज पाटील, चिन्मय रहाणे आणि हेमंत धागणेकर यांनी बर्ड मॅपिंगचे नियोजन केले आहे. सध्या चाळीसहून अधिक पक्षिमित्र या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

'आम्ही सगळे अभ्यासक ई-बर्ड या आंतरराष्ट्रीय पक्षिसंवर्धनाच्या इंटरनेटवरील व्यासपीठाबरोबर काम करीत आहोत. म्हैसूरमध्ये बर्ड मॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आम्ही पुण्यातही हा उपक्रम राबविणार आहोत. यासाठी 'गुगल'च्या माध्यमातून शहराचे ग्रीड केले आहेत. पक्षिमित्रांच्या टीमला हे विभाग वाटून दिले असून, पहिल्या टप्प्यात ही टीम भटकंती करून माहिती गोळी करणार आहे. यामध्ये गॅलरीच्या खिडकीतून दिसणाऱ्या पक्ष्यांपासून ते बागेत, माळरानात, टेकडीवर, पाणवठ्यांवरील सर्व पक्ष्यांचे प्रकार आणि संख्या अशी माहिती ते नोंदविणार आहेत, असे उपक्रमाचे समन्वयक धर्मराज पाटील यांनी दिली. या महिन्याच्या अखेरीस प्राथमिक फेरी घेणार आहोत. नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीचा पहिला अहवाल तयार होईल. डिसेंबरमध्ये स्थलांतरित पक्षी स्थिरावल्यानंतर पुन्हा पक्षिनिरीक्षणाची सखोल पाहणी होणार आहे. त्यानंतरच तौलनिक अभ्यास करून अंतिम यादी पुढे येईल, असे पाटील यांनी सांगितले.

'आत्ता आम्ही केवळ पुणे शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. ही प्रकिया एकदा होऊन थांबणार नसून दर काही कालावधीनंतर आम्ही परत हा उपक्रम राबवविणार आहोत. यातून पक्ष्यांच्या संख्येवर झालेल्या परिणामाचा निष्कर्ष काढण्यास मदत होईल,' असे किरण पुरंदरे यांनी सांगितले. यामध्ये सहभागी होण्यास इच्छुकांनी punecitybirdatlas@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

'ई-बर्ड'चे जागतिक व्यासपीठ

ई-बर्ड हे एक जागतिक पातळीवरील व्यासपीठ असून या वेबसाइटशी जगभरातील पक्षिनिरीक्षक जोडले गेले आहेत. पक्ष्यांसंदर्भातील सर्व घडामोडींचे अभ्यासकांमध्ये आदान-प्रदान व्हावे. जागतिक पातळीवर पक्ष्यांच्या डॉक्युमेंटेशनला अधिक महत्त्व मिळावे, या उद्देशाने ई-व्यासपीठ कार्यरत आहेत. लाखो पक्षी अभ्यासक या वेबसाइटशी जोडलेले असून, आत्तापर्यंत २० कोटी पक्ष्यांच्या माहितीचा संग्रह 'ई-बर्ड'वर जमा झाला आहे. भारतातील अभ्यासक दोन वर्षांपूर्वी यामध्ये सहभागी झाले. त्यांनी अल्पावधीत सहा लाख पक्ष्यांच्या नोंदी केल्या असून, ही संख्या वेगाने वाढते आहे. यातूनच प्रत्येक शहराचा वैयक्तिक पक्ष्यांचा नकाशा उपलब्ध असावा, अशी संकल्पना पुढे आली आहे. भारतात सर्वांत प्रथम म्हैसूर शहरातील पक्षिमित्रांनी यात पुढाकार घेतला असून नकाशाही तयार झाला आहे.

म्हैसूरचा पुढाकार

पक्षिगणनेच्या उपक्रमांतर्गत म्हैसूर या शहराने देशात पहिल्या बर्ड मॅपिंग केले आहे. या उपक्रमात दीडशेहून अधिक पक्षिमित्र सहभागी झाले होते. दोन फेऱ्यांमध्ये त्यांना अनुक्रमे २७ हजार ४४७ आणि १९ हजार २६६ पक्ष्यांच्या नोंदी मिळाल्या दुसऱ्या टप्प्यातील निरीक्षणामध्ये घारी, मैना, कोकिळा, पोपट, अॅशिप्रिनिया हे पक्षी जास्त संख्येने आढळून आले.

पुण्यातील पक्षिजीवन समृद्ध

पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालानुसार पुण्यामध्ये सध्या ३०७ प्रजातींचे पक्षी आढळतात. शहरातील जंगले आणि कुरणे, झाडे, पाणथळ जमिनी असे विविध अधिवास असल्याने पक्ष्यांच्या प्रकारातही वैविध्य आढळते. याशिवाय हिवाळ्यामध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी पुण्यात मुक्कामाला येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयासाठी पालिकेचे अनुदान

$
0
0

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत शहरात वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात १६ हजार ८११ शौचालये बांधण्यात येणार असून या योजनेच्या अनुदानापोटी पाच कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शौचालय बांधण्यासाठी केंद्र, राज्य, महापालिकांच्या वतीने अनुदान दिले जाणार आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ज्या नागरिकांच्या घरी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक घरगुती शौचालय तसेच सामुदायिक शौचलयाची सुविधा योजनेअंतर्गत हे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेच्या २०११ च्या जनगणनेनुसार शहरात उघड्यावर शौचास जात असलेल्या कुटूंबाची संख्या १६ हजार ८११ इतकी आहे. मात्र, जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात २८ हजार ५७२ कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले होते. या सर्वेक्षणानुसार एकूण ५ हजार ७०० शौचालये बांधण्याची आवश्यका असून, यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून अनुक्रमे चार हजार आणि आठ हजार रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.

या योजनेअंतर्गत पहिला हिस्सा म्हणून महापालिकेला दोन कोटी ५२ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासाठी महापालिकेचा हिस्सा पुढील अडीच वर्षांसाठी २८ हजार ५७२ शौचालयांसाठी प्रती ६ हजार रुपयांनुसार १७ कोटी १४ लाख ३२ हजार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात शौचालयांसाठी सरकारची मोहीम यशस्वी होत आहे. त्यामुळे शहरातही त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल, असे वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनाही ‘सनातन’च्या धमक्या

$
0
0

मुक्ता दाभोलकरांचा आरोप; बंदीच्या मागणीचा पुनरुच्चार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सनातन संस्थेचे कार्यकर्ते धर्माचे नाव घेऊन अधर्माची कृती करत आहेत. उघडपणे हिंसेचे समर्थन आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करीत असून, खुद्द पोलिसांनाही धमकावत आहेत. त्यामुळे 'सनातन'वर बंदी घालण्याची गरज आहे,' अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता यांनी केली आहे.

दाभोलकर यांच्या हत्येला २५ महिने लोटले, तरी त्यांचे मारेकरी न सापडल्याने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलावर निदर्शने करण्यात आली. त्या वेळी मुक्ता दाभोलकर बोलत होत्या. समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, सचिव विवेक सांबरे, शहराध्यक्ष माधव गांधी, सचिव संदिप कांबळे, नितीन हांडे, अनिस पटवर्धन, संदिप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यातून डॉ. दाभोलकर आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यास मदत होणार आहे, असेही मुक्ता म्हणाल्या. अंनिसच्या कार्यकर्त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मारले पाहिजे, असे सनातनचे कार्यकर्ते म्हणातात; पण ते आमचे कार्यकर्ते नसल्याचे सनातन म्हणत नाही. त्यांचे कार्यकर्ते राज्यघटना आणि कायदा गुंडाळून ठेवत आहेत, असेही मुक्ता म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी

साधनेच्या पद्धतीने पोलिसांनाही शिक्षा देण्याची धमकी सनातनकडून दिली जात असेल, तर सामान्य माणसांचे काय? असा सवाल मुक्ता यांनी केला. या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे आहे; पण केवळ बंदी घालून प्रश्न सुटणार नाही, तर विखारी प्रचार आणि विद्वेष पसरविला जात असल्याचे थांबले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनेसंबंधी स्वत:ची भूमिका जाहीर करावी, असेही मुक्ता म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धवट नागरी सहभाग काय कामाचा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत नागरी सहभाग वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असली, तरी दुसरीकडे संपूर्ण देशात केवळ पुणे महापालिकेनेच सुरू केलेल्या 'बजेटमधील नागरी सहभाग' योजनेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांचा सहभाग केवळ एखाद्या योजनेपुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्येक ठिकाणी घेतला गेला आणि त्यानुसार अंमलबजावणी झाली, तरच खऱ्या अर्थाने पुण्याची वाटचाल स्मार्ट शहराकडे होऊ शकेल.

आपल्या परिसरात काही महत्त्वाच्या सुधारणा होणे आवश्यक आहे, असे नागरिकांना नेहमी वाटत असते. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडे ते पाठपुरावाही करतात. परंतु, काही वेळा एखादे काम होण्यास वेळ लागत असल्यास असे काम थेट पालिकेलाच सुचवण्याची अनोखी योजना पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष रशीद शेख यांनी मांडली होती. बजेटमध्ये नागरिकांचा सहभाग या अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे एखादे काम सुचवण्याची मुभा होती. सुरुवातीला या योजनेला प्रतिसादही चांगला मिळाला. परंतु, नागरिकांचा पालिकेतील कामकाजात थेट सहभाग वाढवण्याची ही आदर्श योजना आता पूर्णतः बाजूला पडली आहे. आता, नागरिकांकडून काही कामे सुचवण्यात आली, तरी स्थानिक लोकप्रतिनिधींची मान्यता असेल, तरच अशी कामे प्रत्यक्षात येतात. त्यामुळे, असा अर्धवट नागरी सहभाग काय कामाचा, अशी विचारणा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ उपाययोजनांचा समावेश असला पाहिजे

$
0
0

पुणेः मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पायाभूत सेवा, सुविधा आणि 'स्मार्ट' उपाय यांचा समावेश 'स्मार्ट सिटी'मध्ये असणार आहे. 'स्मार्ट सिटी'मध्ये केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामधील कमीत कमी दहा टक्के वीज सौर ऊर्जेपासून आलेली असली पाहिजे. 'स्मार्ट सिटी'मध्ये केला जाणारा पाणीपुरवठा पुरेसा प्रमाणात असला पाहिजे. यामध्ये सांडपाण्याच्या पुनर्वापराबरोबर पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणे महत्त्वाचे आहे. शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, आयटी कनेक्टिव्हिटी, डिजिटायझेशन, रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग, मोटाररहित वाह‌तुकीला प्रोत्साहन देणे, नो व्हेइकल झोन, स्मार्ट पार्किंग, ऊर्जा सक्षम रस्ते प्रकाश योजना, शहरातील मोकळ्या जागांचा कल्पक वापर, रस्त्यावर उभारण्यात येणारी बेकायदा होर्डिंग, अतिक्रमणे यावर कारवाई, सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता करणे 'स्मार्ट सिटी'च्या (एससीपी) प्रस्तावावर अवलंबून असल्याने हा प्रस्ताव तयार करताना विशेष काळजी घेऊन या उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश करण्यावर भर दिला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दिवसांत पुन्हा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात रविवारी दिवसभरात पावसाच्या काही हलक्या सरी पडल्या. पुढील दोन दिवसांत शहराच्या काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या दोन दिवसांत शहरासह राज्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला. शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला असून, रविवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. रविवारच्या सुट्टीमुळे नागरिक मोठ्या संख्येने गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे, पाऊस येत असूनही गर्दीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. थोड्याच वेळात पावसानेही विश्रांती घेतली. पुढील दोन दिवसांत शहरात तुरळक स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

डेक्कन-प्रगती उशिराच

कामशेत येथे रेल्वे ट्रॅक काम पूर्ण झाल्यानंतर देखील पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील काही गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, शुक्रवारी तब्बल १२ तास उशिराने पुण्यात दाखल झालेली डेक्कन क्वीन एक्स्प्रेस व प्रगती एक्स्प्रेस शनिवारी पुन्हा रात्री चार ते पाच तास उशिराने, म्हणजे मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाली. कामशेत परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शुक्रवारी येथे रेल्वेच्या ट्रॅक खालील वाळू वाहून गेल्याने वाहतूक मंदावली होती. कामशेत येथे रेल्वेच्या ट्रॅकचे काम करण्यात आल्याने त्या भागात रेल्वे नेहमीपेक्षा कमी वेगात धावत होत्या. त्यामुळे साधारण बहुतांश गाड्यांना १५ ते २० मिनिटे उशीर झाला. ट्रॅकचे काम नुकतेच झाल्याने खबरदारी म्हणून गाड्या दुर्घटनाग्रस्त भागात कमी वेगाने सोडण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत गाड्या पूर्वीप्रमाणे धावतील.

धरणक्षेत्रात थांबला

गेल्या दोन दिवसांत पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या उपयुक्त साठ्यात अर्ध्या टीएमसीने वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत पुणेकरांना पंधरा दिवस पुरेल, इतका हा साठा आहे. रविवारी मात्र या धरणांच्या क्षेत्रातील पाऊस पुन्हा थांबला आहे. जूनमध्ये मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांच्या साठ्यात वाढ होऊ लागली होती. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारली आणि जुलै, ऑगस्टसह सप्टेंबरमध्येही पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे धरणसाठे आटू लागले आणि अखेर शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शुक्रवारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या चारही धरणांच्या क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. तसेच आसपासच्या ओढ्यानाल्यांमधील पाणीही धरणांमध्ये जमा झाले. त्यामुळे या दोन दिवसांत अर्धा टीएमसी पाणी जमा झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईने जिंकली न्यायाची लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन्ही मुले आणि सुना मारहाण करतात.... घरात राहू देत नाहीत...., अशा वारंवार होणाऱ्या घटनांनी त्रस्त झालेल्या आणि उपजिविकेसाठी कुठलेही साधन नसलेल्या ५५ वर्षांच्या आईने आपली मुले आणि सुनांविरुद्ध कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या आईची करुण कहाणी ऐकली आणि दोन्ही मुलांना प्रत्येकी अडीच हजार असे दरमहा पाच हजार रुपये आणि राहण्यासाठी घर देण्याचे आदेश मुलांना दिले; तसेच कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही येरवडा पोलिसांवर सोपवली.

खराडी येथील थिटेवस्तीत राहणाऱ्या नीला संदीपान पाखरे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सं. आ. सरदार यांच्या कोर्टात धाव घेतली होती. पाखरे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यानुसार मुले आणि सुनांविरुद्ध कोर्टात दाद मागितली होती. एरवी या कायद्यानुसार सुनाच आपला पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध कोर्टात तक्रारी दाखल करतात. मात्र, या प्रकरणामध्ये एका आईने आपल्या मुलांकडून संरक्षण मागितले आहे, अशी माहिती पाखरे यांच्या वकील चेतना आगरवाल यांनी दिली.

'पाखरे यांच्या मुलांनी आईच्या उदरनिर्वाहाची कुठलीही व्यवस्था केलेली नाही. उलट आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आईला मारहाण केली आहे. आर्थिक छळवणूक केली आहे. त्यामुळे तिला उदरनिर्वाह भत्ता देणे आवश्यक आहे,' असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले आहे. कोर्टाने दोन्ही मुलांना प्रत्येकी अडीच हजार असे पाच हजार रुपये आईला उदरनिर्वाहासाठी देण्यात यावेत; तसेच थिटेवस्तीतील घरातील पहिल्या मजल्यावरील एक खोली आईला राहण्यासाठी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

धाकट्या मुलाचाही जाच

नीला यांच्या पतीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या बहिणीसोबत थिटेवस्ती येथे २००२ मध्ये अर्धा गुंठा जमीन विकत घेतली होती. तेथेच पत्र्याचे शेड टाकून ते राहत होते. पाखरे यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर तो स्वतंत्र राहत होता. दोन वर्षांपूर्वी मोठा मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्याकडे आले होते. पत्र्याची शेड पाडून तेथे पक्के घर बांधण्याचा विचार असल्याचे सां​गितले. त्या त्यासाठी तयार झाल्या. तेथे चार खोल्यांचे घर बांधण्यात आले. त्यानंतर धाकटा मुलगा आ​णि त्याची पत्नीही तेथे राहण्यास आली. दरम्यान, मोठ्या मुलाने पाखरे यांना काठीने मारहाण करून कोंडून ठेवले होते. हीच पुनरावृत्ती धाकट्या मुलानेही केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या विरोधात पाखरे यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने थोरल्या मुलांचा जबाब नोंदविला. धाकटा मुलगा कोर्टात आलाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ पुणेकरांचीच

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पुण्याचा समावेश होण्यासाठी सध्या महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असली, तरीही नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग त्यामध्ये किती आणि कसा असणार यावरच त्याचे यश अवलंबून राहणार आहे; अन्यथा पुन्हा एकदा विकासाची स्वप्ने कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये पहिल्या शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला. आता पुढील टप्प्यामध्ये शहराने नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत या विषयाची सविस्तर योजना तयार करायची आहे. त्यामध्ये खरे तर लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ही स्पर्धा देशातील शंभर महापालिकांमधील अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. साहजिकच या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

पुण्यामध्ये महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यामध्ये चांगला पुढाकार घेतला आहे. पण अजूनही पुण्यातील लोकप्रतिनिधींना ते या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी पोचतानाही, नागरिकांनी नक्की काय करायचे आहे, कोणत्या सूचना करायच्या आहेत याचेही सविस्तर विवेचन अजून करण्यात आलेले नाही. 'महाराष्ट्र टाइम्स'ने आज याबाबत अधिक तपशील आतील पानावर प्रसिद्ध करून नक्की नागरिकांनी कोणत्या विभागामध्ये सूचना करायच्या आहेत याची माहिती दिली आहे. ही योजना संपूर्ण शहराची असून ती राबविण्यासाठी पुणे महापालिका ही एकच अधिकृत यंत्रणा आहे, याचे भानही पुणेकरांनी ठेवले पाहिजे. उगाचच शहर चालविण्याचा ठेका आपल्याकडेच आहे, असा आभास निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागण्यात फारसा अर्थ नाही.

या सूचनांनंतर नक्की काय होणार, हा प्रश्नही या निमित्ताने अनेक जण विचारत आहेत. कारण सध्या जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार केंद्र सरकारकडून दर वर्षी शंभर कोटी रुपये या योजनेसाठी मिळणार आहेत. त्यामध्ये राज्य सरकार शंभर कोटी रुपयांची भर घालणार आहे. अर्थात दर वर्षी सुमारे दोन हजार कोटी रुपये विकासकामांवर खर्च करणाऱ्या पुणे महापालिकेच्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी नाही. पण ही योजना फक्त एवढ्यापुरती मर्यादित नाही; तर स्मार्ट बनलेल्या शहराला केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर स्मार्ट पुण्याला डिजिटल इंडिया योजनेतून विविध माहिती तंत्रज्ञानविषयक उपक्रमांसाठी मोठी मदत मिळू शकेल. म्हणून या यादीमध्ये पुण्याचा समावेश होणे आवश्यक आहे.

नागरिकांचा सहभाग नक्की कशासाठी?

नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये महापालिकेने प्राधान्याने काम करायचे आहे, त्याचा क्रम ठरविण्यासाठी (मुदत २९ सप्टेंबरपर्यंत)

संपूर्ण पुण्यासाठी कोणत्या योजना राबविल्या जाव्यात, याबद्दलच्या सूचना.

त्याचप्रमाणे पुणे महापालिकेने नव्याने एखादे शहर वसवायचे, आहे त्या भागांचा पुन्हा विकास करायचा का, जुन्हा शहराला पु्न्हा नवे रूप द्यायचे यातील एक प्रकल्प निश्चित करण्यासाठी.

यासाठी कोणीही तुमच्यापर्यंत येण्याची वाट पाहू नका. महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा www. smartcitypune.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सुचना देऊ शकता. त्याचप्रमाणे punemata1@gmail.com या ई-मेलवर तुम्ही सूचना पाठविल्यात तर त्यातील निवडक सूचनांना महाराष्ट्र टाइम्स प्रसिद्धी देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने मूर्तींच्या विसर्जनाची गैरसोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

कॅनॉलमध्ये पाणी न सोडल्यामुळे हडपसरमध्ये गणपती विसर्जनासाठी मोठी गैरसोय झाली आहे. महापालिकेने परिसरात कृत्रिम पाण्याच्या टँकचीही व्यवस्था केलेली नसल्याने विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला होता. कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने भाविकांनी परिसरातील डबकी आणि लांब विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हडपसर उपनगरामध्ये मुळा-मुठा कालवा जातो. दर वर्षी गाडीतळ उत्कर्ष नगर व हिंगणे मळा येथून जाणाऱ्या कालव्यामध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते. या वर्षी पाऊस न पडल्यामुळे मुळा-मुठा कालव्यात पाणी सोडले नाही. त्यामुळे परिसरातील गणेशभक्तांना पाच दिवसांचा गणपती विसर्जन करताना धावपळ करावी लागली.

गेल्या वर्षी कॅनॉलमध्ये पाणी होते. मात्र, या वर्षी पाणीटंचाई असल्याने हिंगणे मळा आणि गाडीतळ, उत्कर्ष नगर येथे लोखंडी टँक ठेवणार आहोत. या ठिकाणी निर्माल्यकलशही ठेवण्यात येणार आहे.

- सुनील गायकवाड, प्रमुख, सहायक आयुक्त कार्यालय, हडपसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांची वीजचोरी सुरूच

$
0
0

अधिकृत जोडणी घेतलेली मंडळे अल्पच; कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवड्यात असलेल्या चारशे गणेशोत्सव मंडळांपैकी केवळ ३८ मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याची माहिती उघड झाली आहे. उर्वरित सर्व मंडळांनी अनधिकृत वीज कनेक्शन घेतले असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरासह येरवडा उपनगरात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. येरवडा, विश्रांतवाडी, नगर रोड आणि लोहगांव परिसरात चारशेहून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक मंडळानी अधिकृत वीज जोडणी न घेता चोरीची वीज वापरणे सुरू केले आहे. या गोष्टीची माहिती असूनही महावितरणने अद्याप कोणतेही ठोस पाऊस उचलले नसल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येक गणेश मंडळ गणेशमूर्ती आणि देखाव्यांसाठी सजावट, विद्युत रोषणाई, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पीकरवर सतत लावण्यात येणारी गाणी आदी गोष्टींसाठी दहा दिवसांत हजारो युनिट वीज वापरतात. त्यासाठी मंडळे जवळच्या विद्युतवाहिन्यांच्या खांबांवरून आकडा अथवा वीज जोड घेऊन वीजचोरी केली जाते. त्यामुळे गणेशोत्सव काळात महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

वीजचोरी होऊ नये यासाठी महावितरण गणेशोत्सवाच्या काळात सवलतीच्या दरात वीज पुरवठा करते. मात्र, असे असतानाही अनेक मंडळे अधिकृत वीजजोडणी घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. अनेक मंडळे सर्रास वीजचोरी करताना दिसून येतात. हजारो रुपयांची वर्गणी वसूल करणारे मंडळ वीजबिल देण्यास नाखूश असते.

सुमारे दोनशे मंडळे असणाऱ्या नगररोड भागातील केवळ चार मंडळानी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. विश्रांतवाडीत १४ आणि वडगांव शेरीमध्ये २० मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. पौराणिक, सामाजिक आणि समाजात जनजागृती करणारे देखावे उभारण्यासाठी मंडळे अनधिकृत वीज जोडणी घेतात. जनजागृती करण्यासाठी देखावे आणि त्या देखाव्यांसाठी वीज मात्र, चोरीची, हे चित्र बदलले पाहिजे, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काही लहान मंडळे शेजारील घरांमधून वीजजोडणी घेतात. मोठ्या मंडळांनी वीजवितरणाच्या खांबावर आकडे टाकून वीजजोडणी घेतली आहे. याबाबतची माहिती स्थानिक महावितरण कार्यालय आणि पालिकेला असूनही यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही.

प्रत्येक गणेश मंडळ गणेशमूर्ती आणि देखाव्यांसाठी सजावट, विद्युत रोषणाई, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पीकरवर सतत लावण्यात येणारी गाणी आदी गोष्टींसाठी दहा दिवसांत हजारो युनिट वीज वापरतात. एकीकडे जनजागृती करणारी ही मंडळे जनजागृतीसाठीच वीजचोरी करतात, हा विरोधाभासच आहे. हे चित्र बदलले पाहिजे, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images