Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एक्स्प्रेस वे संथ; रेल्वे बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/लोणावळा

मावळ तालुक्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या पुणे-मुंबई हाय-वेवर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली. कामशेत येथे रेल्वेच्या ट्रॅक खालील वाळू वाहून गेल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवाही बाधित झाली होती. पुण्याहून सुटणाऱ्या लोकल तळेगावपर्यंत सोडण्यात येत होत्या. त्यामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले.

लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, कार्ला या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे ओढ्यांना-नाल्यांना पूर आला होता. कामशेत ते वडगाव दरम्यानचा आठ किलोमीटरचा मार्ग पाण्याखाली गेला होता. यामुळे यामार्गावरील दोन्ही ठिकाणची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कामशेत येथील रेल्वे ट्रॅक शेजारील नदीचे पाणी ट्रॅकवर घुसल्याने अनेक ठिकाणची वाळू वाहून गेली. त्यामुळे जुन्या हायवेवर वाहतूक संथ गतीने होती, तर रेल्वेची पुणे-लोणावळा लोकल सेवा तळेगावपर्यंतच सुरू ठेवण्यात आली. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.

रेल्वेच्या इंजिनीअर्सनी घटनास्थळी धाव घेऊन सहाच्या सुमारास रेल्वेचा मार्ग पूर्ववत केला. त्यामुळे पुणे-लोणावळा मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक तळेगावपर्यंतच सुरू होती. मुंबईहून सुटलेली व पुण्यात सव्वाचार वाजता पोहोचणारी हैदराबाद एक्स्प्रेस कामशेतला रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबून होती. पुणे-इंदूर एक्स्प्रेस तळेगाव स्टेशनजवळ तर लोणावळ्याच्या दिशेने जाणारी लोकल कामशेत स्टेशनजवळ थांबविण्यात आली होती.

अतिक्रमणांवर कारवाई गरजेची

जुन्या पुणे- मुंबई हायवेलगत देहूरोड ते खंडाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याचे मूळ नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. अनेक ठिकाणी ओढे-नाले बुजविल्याने पाणी रस्त्यावर आले. मार्गालगतच्या वाढत्या अतिक्रमणांची वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली, कार्ला आणि लोणावळा परिसरात अशा प्रकारचे मोठे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक्स्प्रेस वेवर एक फूट पाणी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगदा ते उर्से दरम्यान एक फुटाइतके पाणी वाहत होते. यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अर्धा तास धिम्या गतीने सुरू होती. पाणी ओसरल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सकाळपासून पडलेला मुसळधार पाऊस, त्यामुळे असखल भागांसह रस्त्यांवरून वाहणारे पाणी, कोलमडलेली सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांचा अभाव यामुळे शहरातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळी सहा वाजल्यापासून शहरात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बराच वेळ पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे असखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तसेच, ड्रेनेज तुंबल्याने बहुतांश रस्त्यांवर पाणी वाहत होते. परिणामी वाहतूक मंदावली होती.

सकाळी साडेसात ते आठ वाजल्यानंतर नोकरदार घराबाहेर पडू लागल्याने सर्वच रस्त्यांवर कोंडी झाली होती. त्यात शिवाजीनगर, डेक्कन, टिळक चौक, अभिनव चौक, सिंहगड रस्ता, अप्पा बळवंत चौक, पर्वती या भागात मुख्य चौकांतील सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. रस्त्यावर पाणी साचून तळे झाल्याने वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन वाहने बंद पडली होती. त्यामुळे अनेक नागरिकांवर गाड्या ढकलण्याची वेळ आली.

उपनगरांमध्ये जोरदार पावसाने रस्ते खड्डेमय झाले. रस्त्यावर सर्वत्र खडी पसरल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. आज, शनिवारी गौरींचे आगमन होत आहे. या गौरींच्या स्वागतासाठी व पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. त्याचाही वाहतुकीवर परिणाम झाला. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पावसाने झालेल्या चिखलातून मार्ग काढत खरेदी करावी लागली.

ससाणेनगरमधील नाल्याला पाणी

हडपसरः हडपसरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कोरडे पडलेले नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. ससाणेनगर येथील स्वप्नपूर्ती सोसायटी जवळील नाल्याला जोरदार पाणी आले आहे. या नाल्याला पूर आल्यास नाल्याचे पाणी स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये शिरते. या वर्षी महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या नाल्याचे काम केले होते आणि त्या ठिकाणी ड्रेनेज लाइनही टाकली आहे. त्यामुळे नाल्याला पाणी येऊनही स्वप्नपूर्ती सोसायटीत पाणी शिरले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पोळी भाजण्याचाच प्रयत्न

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : कोणतेही सरकार आपल्या मर्जीतील लोकांनाच महत्त्वाच्या पदावर नेमते. त्यात चुकीचे वाटावे असे काही नाही, कारण सर्वच पक्ष सत्तेवर आले की या वाटेने जातात. प्रश्न असतो तो फक्त गुणवत्तेचा. भाजपचे सरकार देशात आणि राज्यात आले. भाजपनेही हाच मार्ग अवलंबला आणि ते नेमके घडले पुण्याचे वैभव असलेल्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या अर्थात 'एफटीआयआय'च्या बाबतीत...

संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची वर्णी लागली आणि विद्यार्थ्यांच्या विरोधाला सुरुवात झाली. त्यानंतर 'एफटीआयआय' ही चित्रपट विषयक शिक्षण देणारी संस्था न राहता ते राजकारणाचे व्यासपीठ झाले. ज्यामध्ये प्रत्येकाने आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न केला. सरकारची बेफिकीर वृत्ती तर विद्यार्थ्यांचा आडदांडपणा त्यासाठी तेवढाच कारणीभूत ठरला.

गेले ९९ दिवस हे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून तयारी दर्शवण्यात आली असली, तरी गेले ९९ दिवस ठोस असे काहीच घडले नाही. एका अर्थी सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे ढुंकुनही पाहिले नाही. चित्रपटविषयक शिक्षण देणाऱ्या देशातील या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या बाबतीतला सरकारचा दृष्टिकोन सखेद आश्चर्य व्यक्त करायला लावणारा आहे, विद्यार्थ्यांचा चौहान यांच्यासह शैलेश गुप्ता, नरेंद्र पाठक, अनघा घैसास आणि राहुल सोलापूरकर या चार सदस्यांना विरोध आहे. एकाच विचारधारेचे लोक संस्थेच्या नियामक मंडळावर नेमण्यास विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज (शनिवार) शंभर दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही देशाचा विकास हा तेथील संस्थात्मक विकासावर अवलंबून असतो. 'एफटीआयआय'चा विचार केला तर देशाच्या सांस्कृतिक विकासात या संस्थेचे योगदान मोठे आहे, पण आता ही संस्था राजकारणाचे व्यासपीठ झाली आहे.

गेल्या ९९ दिवसात काय घडले नाही ? हा प्रश्न राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. जो येईल तो मतप्रदर्शन करू लागला. विद्यार्थ्यांचा सरकारला असलेला विरोध पाहून मरगळलेल्या काँग्रेसलाच जाग आली आणि साक्षात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी या वादात उडी घेऊन थेट संस्थाच गाठली. विद्यार्थ्यांना जर एका पक्षाशी संबंधित व्यक्ती अध्यक्षपदी नको आहे तर विरोधासाठी ढाल म्हणून तरी दुसऱ्या पक्षाची व्यक्ती कशी चालते? मुळात आपला शिक्षक ठरवण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असतो का? म्हटले तर ही चिकित्सा चांगली आहेच पण या स्वातंत्र्यवादी प्रौढ विचाराचा दुरूपयोग होण्याची भीतीही असते.

राहिला मुद्दा चौहान यांच्या पात्रतेचा. तर मोठ्या पदांवर ज्ञानी व्यक्तीच असणे महत्वाचे असते. महाभारत मालिकेतील युधिष्ठिराची भूमिका आणि बी ग्रेड चित्रपटातील काम यामुळे कलेचे जाणकार राज ठाकरे यांनी 'कोण हा गजेंद्र?' असा प्रश्न केला तीच हिम्मत विद्यार्थ्यांनी 'तुमची यत्ता कोणती?' असा सवाल करून केली. विद्यार्थी थेट शिक्षकालाच असा प्रश्न करतात, ही विचारांची प्रौढता मानायची की त्यांचा ढालगजपणा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी संस्था टिकणे आणि तेथील ज्ञानयज्ञ अविरतपणे सुरू राहणेच सर्वांच्या हिताचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या जागा बिल्डरच्या घशात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मालकीची हिराबाग येथील २९ गुंठे जागा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) अंतर्गत खासगी बिल्डरला देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. पालिकेच्या मालकीच्या जागा खासगी बिल्डरला न देता पालिकेनेच दोन वर्षांत 'एसआरए'ची योजना राबवावी, असा हायकोर्टाचा निकाल असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमुख विरोधक भाजप, शिवसेना यांनी एकत्र येऊन पालिकेच्या जागा खासगी बिल्डरला देण्याचा प्रस्ताव मान्य केला.

शुक्रवार पेठेतील हिराबाग चौकात असलेल्या सिटी सर्व्हे नंबर १०७७ येथील भूखंड क्रमांक ४७ अ ही २८ हजार ७३० चौरस फूट जागा पालिकेच्या मालकीची आहे. येथे झोपडपट्टी झाल्याने 'एसआरए' प्रकल्प राबविण्यासाठी संजीवनी शेल्टर यांनी प्रस्ताव दाखल केला होता. ही जागा खासगी बिल्डरला 'एसआरए'साठी दिल्यानंतर बिल्डरने प्रकल्प उभारण्यासाठी भरलेल्या २५ टक्के रक्कमेपैकी ९० टक्के रक्कम म्हाडाला, तर उर्वरित १० टक्के रक्कम 'एसआरए'ला मिळणार आहे. पालिकेच्या मालकीच्या जागा असूनही पालिकेच्या हाती धुपाटणेच येणार आहे. उलट या प्रकल्पांसाठी पालिकेला टीडीआर द्यावा लागणार असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे हा विषय मान्य करू नये, अशी भूमिका 'आरपीआय'चे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी घेतली.

डॉ. धेंडे यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देऊन हायकोर्टाने देखील काही महिन्यांपूर्वी निकाल देताना पालिकेने स्वतः 'एसआरए' प्रकल्प राबविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे फेरप्रस्ताव मांडून पालिकेचे आर्थिक नुकसान करणारा प्रस्ताव सभागृहाने मान्य करू नये, अशी भूमिका मनसेच्या किशोर शिंदे यांच्यासह इतर सभासदांनी मांडली. अखेर मतदान घेऊन ६० विरुद्ध १० मतांनी हा विषय मान्य करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरच्या पत्नीला घरात घुसून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वडगाव बुद्रुक येथे चेहऱ्याला मास्क लावलेल्या दोन आरोपींनी बिल्डरच्या पत्नीला धमकावून घरातील दीड लाख रुपयांचा ऐवज चोरला. फ्लॅटच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी कल्पना चव्हाण (४२, रा. वडगांव बुद्रुक) यांनी तक्रार दिली. चव्हाण यांचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे फ्लॅट देण्यावरून कोणाशी वाद झाले होते का, याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास मुंढे यांनी दिली.

चव्हाण यांचे घर वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर येथे आहे. आरोपींनी सकाळी घराची बेल वाजवली. चव्हाण घरात एकट्याच होत्या. मास्क घातलेल्या आरोपींनी चव्हाण कोठे आहे, तो फ्लॅट देणार होता' असे म्हणून घरात प्रवेश केला. कल्पना चव्हाण यांच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. कपाटातील चाळीस हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एक लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज हिसकावून त्यांनी पळ काढला.

सुरक्षितता धोक्यात?

सहकारनगर येथे आजींना मारहाण करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी विमाननगर येथे घरात एकट्या असलेल्या आजोबांचा खून करून घरातील ऐवज लुटण्यात आला. गुरुवारी सकाळी वडगाव बुद्रुक येथे महिलेला लुटल्याची घटना घडली. त्यामुळे कायदा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यावर अखंड पर्जन्याभिषेक...!

$
0
0

टीम मटा, पुणे/औरंगाबाद

साधारणतः गणरायांच्या आगमनाच्या आसपास पाऊस येणार हा हवामान विभागाचा अंदाज अखेर खरा ठरल्याने, दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक भागांनी शुक्रवारी यंदाच्या मोसमातील पहिलाच चिंब पावसाळी दिवस अनुभवला. पुणे शहरही याला अपवाद नव्हते. 'दुष्काळाच्या संकटाचे हरण कर,' असे भाविकांनी घातलेले साकडे जणू बाप्पांनी ऐकले, अशी भावना व्यक्त होत होती.

विदर्भ आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागावर असलेल्या खोल (न्यून) दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत. पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसभरात अंदाजे अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी वाढले.

गुरुवारी सकाळी साडेआठ ते साडेपाच या वेळेत राज्यातील सर्वाधिक पाऊस नाशिक येथे (४३ मिमी) नोंदला गेला. पुण्यात ४०.१ मिमी, बुलढाणा येथे २० मिमी, महाबळेश्वर येथे १८, तर नगरमध्ये १२ मिमी पाऊस झाला.

पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टीची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. पीसीएस राव यांनी सांगितले.

'एक्स्प्रेस-वे'वर ढगफुटी?

पुणे : लोणावळा-खंडाळा परिसरात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे डोंगरावरून वाहत आलेल्या पाण्यामुळे 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'ला नदीचे स्वरूप आले होते. तिथे ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी आठ तासांत पवना धरण परिसरात ९० मिलिमीटर आणि लोणावळा परिसरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रेल्वेसेवा विस्कळित

कामशेत येथे रेल्वेच्या ट्रॅकखालील वाळू वाहून गेल्याने पुणे-मुंबई रेल्वेसेवाही विस्कळित झाली होती. पुण्याहून सुटणाऱ्या लोकल तळेगावपर्यंत सोडण्यात येत होत्या. त्यामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास रेल्वेचा मार्ग पूर्ववत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसामुळे राज्यात दिलासा

$
0
0

टीम मटा, पुणे

राज्यभरात विविध जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात पाणी वाढले असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकऱ्यांची पिकांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे; तर काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

सोलापुरला पावसामुळे दिलासा

सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कुकडी खोऱ्यातील कासारसाई, वडज, माणिकडोह, पिंपळगावजोगे आदी धरणांवर झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. वडज धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्यामुळे उजनी धरणाला फायदा होत आहे. त्यामुळे धरणातील वजा साठा दोन दिवसांत प्लसमध्ये येण्याची आशा आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणे तुडुंब

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या संततधारेमुळे धरणांचा पाणीसाठा कमालीचा वाढला असून, सुकी, अभोरा, तोंडापूर, मंगरूळ ही चार धरणे १०० टक्के भरली, तर चार धरणांचा साठा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा ८४ टक्क्यांवर गेला असून, दोन दिवसांच्या पावसामुळे तो १६ टक्क्यांनी वाढला आहे.

भंडारदरा परिसरात पाऊस

शिर्डी : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने भंडारदरा धरणाची घागर भरण्यास मोठी मदत झाली असून गेल्या २४ तासांत धरण परिसरात तब्बल सहा इंच पाऊस बरसला. अकोले कोपरगावमध्ये ३ इंच पाऊस झाला तर जामखेड कर्जतमध्ये अल्प पाऊस झाला. नगर जिल्ह्याची लाइफलाइन म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारदा निळवंडे धरणाच्या परिसरात सहा इंच पाऊस झाला.

तब्बल तीन महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कागदोपत्री निकषानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती हटल्यात जमा आहे. सरकारने जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी जाहीर केलेल्या चारा छावण्यांचा आदेशही अद्याप येथे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यासाठीच्या हालचाली थांबल्या आहेत. पैसेवारीच्या आधारे खरिपातील नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असून त्याची आता प्रतीक्षा आहे.

नाशिकमधील धरणे भरली

नाशिक : जिल्ह्यात गंगापूर, दारणा, भाम भावली या धरण समूहाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. शनिवारी सकाळी नांदूर मदमेश्वर बंधाऱ्यातून २३ हजार २८५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र शनिवारी पाऊस थांबल्याने हा विसर्ग १० हजार क्युसेक्सने कमी करण्यात आला. दौड पुलाजवळ घोडन नदीचा विसर्ग ४५० क्युसेक्स सुरू होता.

जायकवाडीतील जलसाठ्यात वाढ

औरंगाबाद : दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यात एक टक्का पाण्याची भर पडला. शनिवारी सायंकाळी सहाला प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ५.४२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, बदनापूर या चार तालुक्यांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली.

औरंगाबादसह, नगर, नाशिक जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. नाथसागराच्या मुक्त पाणलोटात झालेल्या या पावसामुळे प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ होण्यास काही तासांत सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्येष्ठांना लवकरच ओळखपत्रे देणार’

$
0
0

पुणेः 'पुणे पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. पोलिसांकडे नोंदणी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लवकरच ओळखपत्रही दिले जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.

विमाननगर येथील ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर त्याची माहिती देताना पाठक बोलत होते. 'पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांचे ३७५ ग्रुप आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांकडून विशेष विभाग चालविला जातो. पोलिसांकडे सध्या २६०० ज्येष्ठ नागरिकांची नोंद आहे. त्यांना पोलिस मुख्यालयात बोलवून बैठक घेतली जाते. तसेच, पोलिस ठाण्याच्या स्तरावर ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. हा अधिकारी दर पंधरा दिवसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करीत आहे,' असे पाठक यांनी सांगितले.

नागरिकांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. पोलिसही सहभागी होतील. उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच, कोर्टाच्या नियमांची माहिती मंडळांना दिली आहे, असेही पाठक म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाण करून चालकाला लुटले

$
0
0

पुणेः पुणे स्टेशन येथील डीआरएम ऑफिससमोर मोटारीतील व्यक्तीला मारहाण करून लुटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या बाबत सचिन कोल्हे (वय २४, रा. चिखली) याने तक्रार दिली आहे. त्यावरून हाशीम महंमद स्वाले राहीन (वय ४०, रा. दिघी) याला अटक केली आहे. त्याच्या तीन साथीदारांना शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन येथून सचिन इंडिका कार मधून जात होता. त्याला फोन आल्यामुळे त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यावेळी रिक्षातून आलेल्या व्यक्तींनी सचिनला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाइल आणि रोख रक्कम असा २१ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी सचिन याने रिक्षाचा क्रमांक लिहून घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दी टाळण्यासाठी एकेरी मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात शहराच्या मध्यवस्तीत देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, या साठी उद्या, सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजल्यानंतर लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, टिळक रोड आणि बाजीराव रोडवरील वाहतूक अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे. पादचाऱ्यांसाठीही एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

लक्ष्मी रोडवर हमजेखान चौक ते टिळक चौक या दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. शिवाजी रोडवर काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक (स्वारगेट), बाजीराव रोडवर पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान, टिळक रोडवर मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक या दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी आवश्यकतेप्रमाणे बंद ठेवला जाणार आहे. नागरिकांनी या बदलांची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेने केले आहे.

बाजीराव रोडवर पुरम चौक ते काकासाहेब गाडगीळ पुतळ्यापर्यंत (शनिवारवाडा) एकेरी वाहतूक आहे. मात्र, या कालवधीत या मार्गावरील एकेरी वाहतूक काही काळ स्थगित करण्यात येणार आहे. त्याबरोबरच कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ रस्ता, फडके हौद रस्ता, एम. जी. रोड (कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक) या रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश २१ ते २६ सप्टेंबरपर्यंत शिथिल करण्यात येणार आहेत.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

लक्ष्मी रोड : हमजेखान चौक येथून लक्ष्मी रोडमार्गे डेक्कन परिसरात जाऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकांसाठी गणेश पेठेतील दुधभट्टी येथून नरपतगिरी चौक येथून जुना बाजारमार्गे डेंगळे पुलावरून जाणे शक्य आहे.

शिवाजी रोड : सूर्या हॉस्पिटल येथून पवळे चौक, साततोटी पोलिस चौकी येथून देवजी बाबा चौकमार्गे घोरपडे पेठ येथे जाऊन शंकरशेठ रस्त्याने स्वारगेटला जाता येणार आहे.

बाजीराव रोड : टिळक रोडवरून पुणे विद्यार्थी गृहाच्या येथून नागनाथ पार, शगून चौकामार्गे केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकाकडे जाता येईल.

पादचाऱ्यांसाठी विशेष रस्ते

वाहतुकीसाठी २१ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात आलेले रस्ते पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्येही पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठीही एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. बाजीराव रोडवरील सेवासदन चौकाकडून बेलबाग चौकाकडे जाता येणार नाही. गणपती चौकाकडून तांबडी जोगेश्वरीकडे, जिजामाता चौकाकडून फडके हौद चौकाकडे, दत्तमंदिरापासून शुक्रवार पेठ पोलिस चौकीकडे, सोन्या मारूती चौकाकडून बेलबाग चौकाकडे, फडके हौद चौकाकडून सोन्या मारुती चौकाकडे पादचाऱ्यांना जाता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकाच्या मारेकऱ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमाननगरमध्ये झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाला वाचा फोडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सोसायटीत कपडे धुलाई आणि इस्त्रीची कामे करणाऱ्या तरुणानेच चोरीच्या उद्देशाने हा खून केल्याचे समोर आले आहे. त्याला मदत केल्याच्या शक्यतेवरून आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

राहुल जग्गुलाल विश्वकर्मा (वय २०, रा. सम्राट चौक, पवन सुपर मार्केट, विमाननगर, मूळ- उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील काही ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. यावेळी सहआयुक्त सुनील रामानंद उपस्थित होते.

विमानगर येथील लुंकड व्हॅले​न्सिया इमारतीत राहणारे सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८६) यांचा दोन दिवसांपूर्वी खून झाला होता. ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा गुन्हा असल्यामुळे स्थानिक पोलिसांसोबत अतिरक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके कार्यरत होती. त्यांनी सोसायटीत येणाऱ्या शंभर ते दीडशे लोकांची पडताळणी केली. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही पाहिले. सोसायटीत इस्त्री आणि धुण्याचे कपडे ने-आण करणाऱ्या तरुणानेच हा खून केल्याची माहिती युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि कर्मचारी प्रमोद घाडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त बी. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली तपास सुरू झाला. जवळ इस्त्रीच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाकडे चौकशीसाठी गेल्यानंतर तो पळून जाऊ लागला, पकडल्यावर त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. या प्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पाच वर्षांत २४ ज्येष्ठ नागरिकांचे खून

गेल्या पाच वर्षांत शहरात २४ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत. यापैकी २१ गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास न लागलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन पुन्हा तपासाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आयुक्त पाठक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या संपाला शंभर दिवस पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपाला शनिवारी शंभर दिवस पूर्ण झाले. यानिमित्त 'एफटीआयआय'चे काही माजी विद्यार्थी, परिवर्तनवादी संघटनांसह काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 'एफटीआयआय'मध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

'एफटीआयआय'च्या काही माजी विद्यार्थ्यांसह रिपब्लिकन पँथर्स पार्टी, समता विद्यार्थी आघाडी, पुणेकर नागरिक समर्थन समिती, श्रमिक एकता महासंघ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांबरोबरच हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

लाल निशाण पक्षाचे भालचंद्र केरकर, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, चंद्रकांत तिवारी, माजी विद्यार्थी यशस्वी मिश्रा, प्रतीक वत्स, अजितकुमार आदी या वेळी उपस्थित होते. 'एफटीआयआय' के विद्यार्थी लढते रहो, हम आपके साथ है', 'जो हिटलर की चाल चलेगा...', 'विद्यार्थी आंदोलनाला लाल सलाम', 'नही चाहिये, नही चाहिये, गजेंद्र चौहान नही चाहिये', अशा घोषणाही देण्यात आल्या. 'टोलवाटोलवी करू नका, आमच्या नादी लागू नका' हे गीतही या वेळी सादर करण्यात आले.

'सरकार नको त्या मुद्द्यांवर अडून बसले आहे. दिग्गज कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊनही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना कमी लेखत आहे,' असे मिश्रा यांनी सांगितले. 'केंद्र सरकारची समिती येऊन गेल्यानंतर ही समिती २००८च्या अभ्यासक्रमाच्या तुकडीबाबतच चर्चा करण्यासाठी आली, असे म्हणणाऱ्या सरकारवर विश्वास ठेवणे कठीण आहे. नियामक मंडळाच्या नियुक्त्या हा संस्थेवरील हल्ला असून संस्थेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे,' असे वत्स यांनी सांगितले. 'सतत विविध विषयांवर मोठमोठी भाषणे देणाऱ्या पंतप्रधानांनी या महत्त्वाच्या विषयावर बाळगलेले मौन घातक आहे,' असे अजितकुमार म्हणाले.

'गेल्या दहा दिवसांपासून आमचे सहकारी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. हा काळ आमच्यासाठी वेदनादायी आहे. परंतु, आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे,' असे राकेश शुक्ला या विद्यार्थ्याने सांगितले. 'सरकार दुर्लक्ष करत असतानाही संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे', असे केरकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची, तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळात शहराच्या मध्यवर्ती भागात चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुण्यात शुक्रवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. शनिवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातून पाऊस गायब झाला होता. त्यानंतर काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सातच्या सुमारास मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांमध्येही पावसाने जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. शहराबरोबर कात्रज, कोथरूड, हडपसर, नगररोड, कर्वेनगर, औंध यासारख्या उपनगरांमध्येही सायंकाळी उशिरा काही वेळ जोरदार पाऊस झाला.

पावसाला जोर असल्याने काही क्षणातच अनेक ठिकाणी पाणी साचले. गौरीपूजनासाठीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. ठळक कमी दाबाचे क्षेत्र राज्यातून गुजरातकडे पाकिस्तानच्या दिशेने सरकल्याने शनिवारी राज्यातील पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यात केवळ कोकणात डहाणू (३६ मिमी), भीरा सहा मिमी तर अहमदनगर येथे एक मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सध्या हे ठळक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजरात व लगतच्या परिसरावर आहे. त्यामुळे गुजरातसह लगतच्या पाकिस्तानच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागराच्या मध्य भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते राज्याकडे सरकल्यास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मावळात शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळित झालेली जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील वाहतूक, तसेच रेल्वेसेवा शनिवारी हळूहळू पूर्वपदावर आली.

कामशेत ते कान्हेफाटा दरम्यान लोहमार्गाखालील खडीचा भराव मोठ्याप्रमाणात वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विस्कळित झाली होती. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान भरावाचे काम केल्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे. शनिवारी मावळ परिसरात पावसाने उघडीप दिली होती.

मावळातील पवन मावळतील बेडसे ते उर्से व नाणे मावळातील चिखलसे ते वडगाव या पट्ट्यात दुपारी ढगफुटी असल्याप्रमाणे पाऊस कोसळल्याने मावळात महापूर आला होता. यामुळे कामशेत ते वडगाव दरम्यान जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ठप्प झाली होती. ू-पुणे एक्स्प्रेस वेवर बऊर ते उर्से टोलनाक्यापर्यंत काही ठिकाणी फूटभर पाणी अर्धा ते पाऊण तास वाहत होते. यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूकही काही काळ संथगतीने सुरू होती.

कामशेत रेल्वेस्थानक्यानजीक लोहमार्गाच्या रूळाखालील खडी वाहून गेल्यामळे वाहतूक विस्कळित झाली होती. रेल्वे प्रशासनाने खडी वाहून गेलेल्या ठिकाणी भराव टाकून शनिवारी साडेबारा ते एकच्या दरम्यान ट्रॅक दुरुस्तीचे काम पूर्ण केले.

वाहने आढळली

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर साते गावच्या हद्दीत पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली दोन दुचाकी वाहने शनिवारी पूर ओसरल्यानंतर मातीच्या व वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या अवस्थेत आढळली. स्थानिक नागरिकांनी त्या वाहनांवरील माती बाजूला करून दोन्ही वाहने बाहेर काढली.

ऊन-सावल्यांचा खेळ

मावळाला शुक्रवारी दिवसभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले होते. मात्र, शनिवारी दिवसभर चक्क ऊन पडले असून पावसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातही दिवसभर पाऊस पडला नाही. दिवसभर ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाचा माग काढणारे सॉफ्टवेअर गुन्हे शाखेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्ह्यांत वापरलेली तसेच संशयास्पद वाहनांच्या नंबरवरून त्या वाहनाचा मालक, त्याचा पत्ता तसेच वाहनाचा 'मेक' तपासण्यासाठी 'ट्रॅफिकॉप नाकाबंदी' नामक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. वाहतूक शाखेत या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत होता. आता हे सॉफ्टवेअर गुन्हे शाखेतील १२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे.

'सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क'चे नितीन शरद वैद्य यांनी हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नोंदणीकृत झालेली जवळपास ३० लाख वाहनांची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये वाहनाचा क्रमांक टाकल्यानंतर लगेचच त्या वाहनाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

या पूर्वी कुठल्याही संशयास्पद वाहनाची माहिती मिळण्यासाठी परिवहन विभागाशी संपर्क साधावा लागत होता. या सॉफ्टवेअरमुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर उपयुक्त माहिती मिळणार आहे. गुन्ह्यांचा तपास करताना या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश मूर्तिदानाला पुणेकरांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशभक्तांनी यंदा गणपतीची मूर्तिदान करावी, या रोटरी क्लबने केलेल्या आवाहनाला भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दीड दिवसांच्या गणपतींच्या नागरिकांनी संस्थेकडे १४६० मूर्ती दान केल्या आहेत.

मातोश्री वृद्धाश्रम, एस. एम. जोशी पुलाखाली आणि नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ संस्थेने तीन स्टॉल उभारले होते. येत्या २१ आणि २७ सप्टेंबरला देखील या तिन्ही ठिकाणी संस्थेचे स्वयंसेवक मूर्तिदान स्वीकारण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. गणेशोत्सवानंतर या मूर्तींची विक्री करून मिळणारी रक्कम मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी वापरणार आहोत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या अध्यक्षा मधुमिता बर्वे यांनी दिली.

'दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरुण मंडळी नव्हे तर आजी-आजोबांनीही आम्हाला मूर्ती दान करायची असल्याचे सांगितले. संध्याकाळच्या काही तासांत आमच्याकडे १४६० मूर्ती जमा झाल्या. पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जागृती वाढत असल्याचे दिसून आले आहे,' असे बर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश वाटप अद्याप नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपूर्वी गणवेश वाटप करण्याची​ घोषणा हवेतच विरली आहे. या मुदतीत बोर्डाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकलेले नाहीत. टेंडर प्रक्रिया उशिरा राबवल्याने १५ ऑगस्टला विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नव्हते. त्यावरून तक्रारी आल्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत गणवेश वाटप केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात बोर्डाला अपयश आले आहे.

बोर्डाकडून गणवेश खरेदी करण्यात हलगर्जीपणा करण्यात येतो. त्यामुळे या वर्षी रेडिमेड गणवेश देण्याचे ठरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत, हा त्यामागील उद्देश होता. बोर्डाच्या नऊ शाळा असून, त्यामध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी आहेत. घोरपडी व्हिलेज हायस्कूल ही शाळा वगळता अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाणांच्या भेटीत सुंदोपसुंदी उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराध्यक्ष निवडीसाठी शक्तिप्रदर्शनापासून ते पालिका आणि जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या राजकारणाबद्दलची नाराजी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शहरातील पहिल्या भेटीत ठिकठिकाणी उघड झली. काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्षपदासाठी सुरू असलेली घोषणाबाजी बंद करण्याची तंबी प्रदेशाध्यक्षांना द्यावी लागली. तर, पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्षांशी संवाद न साधताच प्रदेशाध्यक्ष निघून गेल्याने त्यांच्यामध्येही नाराजी पसरली आहे.

गणेशोत्सवानिमित्त काही महत्त्वाच्या मंडळांना भेटी देण्यासाठी चव्हाण शनिवारी दिवसभर पुण्यात होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसच्या शहरांतर्गत संघटनात्मक बांधणीसाठी विविध बैठका घेतल्या आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बैठकांमध्ये निष्ठावंत काँग्रेसजनांना डावलण्यात आल्याचा आरोप काहींनी केला, तर काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी, नगरसेवकांपेक्षा समर्थकांचा भरणा अधिक असल्याचे चित्र दिसून आले.

शहरातील एका हॉटेलमध्ये आजी-माजी आमदारांसह शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चव्हाण यांनी घेतली. या बैठकीत पक्षाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय सुचविण्याऐवजी अनेकांनी एकमेकांविषयी तक्रारीच केल्याचे समजते. पक्षाची भूमिका सतत बदलत असल्याने त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली गेली. त्यानंतर, काँग्रेस भवनमध्ये संवाद साधण्यासाठी आलेल्या चव्हाण यांच्यासमोर शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांनीच जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ही संधी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समर्थकांची गर्दी जमविण्यात आली होती. तसेच, घोषणाबाजी केली जात होती. या सर्व गोंधळामुळे काँग्रेस भवनमध्ये जमलेल्या पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्षांची भेट न घेताच थोड्याच वेळात चव्हाण यांनी तिथून काढता पाय घेतला.

'शहराध्यक्षांचे काम चांगले'

काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यामुळे, काँग्रेसच्या नव्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी, माजी आमदार रमेश बागवे, उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी नगरसेवक मुक्तार शेख यांच्यातर्फे तयारीही सुरू होती. मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांचे काम चांगले असून, कोणताही बदल करायचा झाल्यास त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले; पण त्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे, तूर्तास शहराध्यक्षपद छाजेड यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनरेटर’मधून चौपट ड्युटीचे ‘जनरेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विरोधी पक्षात असताना रद्द करण्याची मागणी केलेली जनरेटरवरील ड्यूटी सत्तेत आल्यानंतर मात्र रद्द करण्याचे दूरच, ती चौपटीने वाढविण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. एकीकडे 'इझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या घोषणा होत असताना दुसरीकडे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे व्यावसायिक आणि उद्योग जगतामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

जनरेटरवर निर्माण करण्यात येणाऱ्या विजेवर पूर्वी आकारण्यात येत असलेल्या प्रतियुनिट तीस पैसे दरात चौपट वाढ झाली असून आता प्रतियुनिट एक रुपया वीस पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एकीकडे सरकार पुरेसा विश्वासार्ह वीजपुरवठाही करीत नाही, आणि आम्हा उद्योजकांना जनरेटरवरही वीज घेऊ देत नाही, अशी भावना उद्योग जगतातून व्यक्त करण्यात आली आहे. पूर्वीच्या बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अॅक्ट (१९५८)नुसार ही ड्यूटी आकारण्यात येते. विजेचे उत्पादन अधिक आणि मागणी कमी असताना जनरेटरचा वापर कमी करण्यासाठी ही ड्यूटी आकारण्यात येत असे. परंतु, कालांतराने महाराष्ट्रात उद्योगधंद्यांचा विस्तार झाला आणि वीजपुरवठा कमी होऊन विजेची मागणी वाढू लागली. त्यामुळेच राज्यात लोडशेडिंगही सुरू झाल्याने स्थिती बदलली आहे. जनरेटरवरील विजेसाठी प्रतियुनिट बारा ते तेरा रुपये अशी महाग असूनही केवळ सरकार वीज पुरवू शकत नसल्याने अनेक उद्योगांमध्ये नाइलाजाने त्याचा वापर होतो. मात्र, पूर्वीची स्थिती बदलली, तरी हा प्रतियुनिट तीस पैशांचा बोजा कायम आहे. यावरून अनेकांनी तक्रारी केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दखल घेतली आणि त्यांच्या सूचनेवरून पाच वर्षांसाठी ही ड्यूटी रद्द करण्यात आली. पाच वर्षांनी ही ड्यूटी सुरू झाल्याने पुन्हा उद्योगांमध्ये नाराजी पसरली, तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी याविरोधात आवाज उठविला आणि ही ड्यूटी रद्द करण्याची मागणी केली होती.

मात्र, नवे सरकार आल्यानंतर ही ड्यूटी रद्द झालेली नाही, त्याउलट त्यात नुकतीच चौपट वाढ करण्यात आली आहे. हा जिझिया कर रद्द करावा, अशी मागणी भीमसेन खेडकर आणि सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यावर वरुणकृपा

$
0
0

धरणसाठ्यात वाढ; पाणीसाठा चार टक्क्यांनी वाढून ५२वर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या अडीच महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर जोरदार बरसलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा वाढून ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी भागांत झालेल्या या पावसाने मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राज्यात सर्वदूर हा पाऊस झाला असला तरी धरणसाठ्याची तूट अद्याप भरून निघालेली नाही.

राज्यातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी याच काळामध्ये सुमारे ७९ टक्के पाणीसाठा होता. मागील आठवड्यामध्ये या धरणांमध्ये ४८ टक्के पाणी होते. या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील अडीच हजार मोठ्या, मध्यम व लघु धरण प्रकल्पांची प्रकल्पीय साठवण क्षमता १,३३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. या धरणांमध्ये सद्यस्थितीत ५२ टक्के म्हणजे ६९२ टीएमसी पाणी साठले आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावत होता. सलग तीन वर्षे दुष्काळाचे चटके सहन करावे लागल्यामुळे मराठवाड्यातून राज्यातील अन्य भागांत स्थलांतरही होऊ लागले होते. मराठवाड्यातील धरणांत फक्त आठ टक्के पाणी होते. त्यात वाढ होण्याची शाश्वती नव्हती. पाणीसाठ्यासाठी परतीच्या मान्सूनवरच सगळी भिस्त होती. शुक्रवारी झालेल्या पावसाने पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर (२८ टीएमसी) पोहोचला आहे.

मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा व निम्न तेरणा ही धरणे वगळता अन्य धरणांत उपयुक्त पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. विष्णूपुरी धरणात ३६ टक्के, दुधना धरणात ४८ टक्के, उर्ध्व पेनगंगा धरणात ३२ टक्के, पूर्णा येलदरी व पूर्णा सिद्धेश्वर या धरणांत अनुक्रमे सात व अकरा टक्के साठा झाला आहे. जायकवाडी धरणामध्ये पाच टक्के उपयुक्त साठा आहे.

नाशिक व अमरावती विभागातील धरणांमध्ये अनुक्रमे ५० व ६९ टक्के जलसाठा झाला आहे. अमरावतीमधील उर्ध्व वर्धा, बेंबळा ही धरणे ९८ टक्के भरली आहेत. खडकपूर्णा व वाण धरणांत ८० टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. काटेपूर्णा, नळगंगा ही धरणे ३० ते ३५ टक्के भरली आहेत. नाशिकमधील दारणा धरणात ६९, गंगापूरमध्ये ६७, कडवा ८८ टक्के, भावली ९५ टक्के व पालखेड धरण ८६ टक्के भरले आहे. गिरणा धरणात फक्त चार टक्के पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात ७२ टक्के, मुळा ४५ टक्के, निळवंडे ४३ टक्के व हातनूर धरण ५१ टक्के भरले आहे.

पुणे विभागातील राधानगरी ९९ टक्के, वारणा ९२ टक्के, दुधगंगा ७५ टक्के, धोमबलकवडी ८२ टक्के व कोयना धरण ७५ टक्के भरले आहे. निरादेवघर व भाटघर ही धरणे प्रत्येकी ६४ टक्के, पानशेत ६३ टक्के, वरसगाव ४९ टक्के व पवना धरणात ७६ टक्के साठा झाला आहे. माणिकडोह, पिंपळगाव जोगे, घोड, चासकमान या धरणांत तुलनेने कमी पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images