Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तीनशे मीटर अंतरावर ‘पीएमपी’चे पाच बसथांबे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

मुंढवा-मनपा मार्गावर गांधी चौकापासून ३०० मीटरच्या अंतरामध्ये 'पीएमपी'कडून गरज नसताना पाच बसथांबे उभारण्यात आले आहे. या मार्गावर दोन जुने बसथांबे असतानाही तीन आधुनिक बसथांबे उभारण्यात आले आहेत. शहराच्या इतर भागातील बसथांब्यांची दुर्दशा झाली असताना एकाच मार्गावर पाच बसथांबे उभारल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बसथांब्यासाठी पैशाची उधळपट्टी का करण्यात आली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशासनाने नवीन स्टील बसथांबे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. एक किलोमीटर नंतर बसथांबा असावा, असा नियम आहे. मात्र, मुंढव्यातील गांधी चौक येथे प्रवाशांसाठी तीन बसथांबे आहेत. तर त्याच्यापुढे १०० मीटर अंतरावर दुसरा नवीन स्टीलचा बस थांबा उभारण्यात आला आहे. त्यानंतर पुढे पुन्हा १०० मीटर अंतरावर सरोदे वस्ती येथेही नवीन थांबा उभारण्यात आला आहे. मुंढवा गांधी चौक येथून मनपा व पुणे स्टेशन येथे जाण्यासाठी प्रवासी प्रवास करतात. या बसथांब्यांमुळे पीएमपी आणि महापालिकेचा निधी वाया जात असल्याची टीका या परिसरातील सामाजिक संघटनांनी केली आहे.

कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर एक बस थांबा असतो. या पाचही बसथांब्यांची पाहणी करण्यात येईल. त्यामागील कारण पीएमपी प्रशासनाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

- कैलास गावडे, पीएमपीचे व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी मुलींचा पुन्हा स्वप्नभंग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आदिवासी मुलींना 'हापकिडो बॉक्सिंगचे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत दाखविलेले स्वप्न आदिवासी विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे धुळीस मिळाले आहे. आता पुन्हा संरक्षणाच्या नावाखाली आदिवासी आश्रम शाळातील मुलींना 'हापकिडो बॉक्सिंग'चे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 'हापकिडो बॉक्सिंग'च्या प्रशिक्षणात आदिवासी विकास विभागाचे आर्थिक हितसंबंध आहेत का, असा आरोप आदिवासी कृती समितीने केला आहे.

आदिवासी विकास विभागाने नुकतीच राज्यातील आदिवासी भागातील आश्रमशाळातील मुलींसाठी विविध योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये संरक्षणासाठी 'हापकिडो बॉक्सिंग'चे प्रशिक्षण देण्याच्या योजनेचा समावेश आहे. वास्तविक पाहता राज्यातील बहुतांश आदिवासी आश्रमशाळा या दुर्गम डोंगरी भागात आहेत. भौगोलिक रचनेनुसार या भागातील मुली या शहरी मुलींच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात व स्वतःचे रक्षण करू शकतात. त्यामुळे या भागातील मुलांनी 'हापकिडो बॉक्सिंग'चे प्रशिक्षण देणे गरजेचे वाटत नाही. त्याऐवजी त्यांच्या शिक्षणावर, शैक्षणिक सोयीसुविधांवर जास्त निधी खर्च करावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी केली आहे.

गेल्या वर्षी आदिवासी वसतिगृहातील मुलींना हापकिडो बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची प्रलोभने दाखविण्यात आली. चार मुलींची थायलंड येथे होणाऱ्या एका स्पर्धेसाठी निवड देखील झाली. त्या मुलींनी पासपोर्ट काढून थायलंड जाण्याची तयारी केली असताना, सरकारने त्यांना अर्थसाह्य करण्यास असमर्थता दर्शविली. हापकिडो या खेळाचा प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्याने सरकारी पातळीवर अर्थसाह्य करता येत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते, अशी माहिती सीताराम जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम दात ‘महागात’

$
0
0

निष्काळजीपणा केल्याप्रकरणी डॉक्टरला १४ लाख भरपाईचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका डॉक्टर दाम्पत्याला चुकीच्या पद्धतीने कृत्रिम दात बसविल्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे डेंटिस्टला चांगलेच महागात पडले. उपचार करताना वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक निवारण मंचाने संबंधित डॉक्टरला १४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मंचाचे अध्यक्ष ए. झेड. तेलगोटे, सदस्य कीर्ती कुलकर्णी आणि एस. आर. सानप यांनी हा निकाल दिला.

संबंधित डॉक्टरांकडून वारंवार त्रास होत असल्याची तक्रार करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. उपचाराच्या वेळी परदेशात वास्तव्य असलेल्या दाम्पत्याला उपचारासाठी भारतात परत येण्याचा खर्चही सोसावा लागला होता. डॉ. अरुण चामरिया, रॉयल हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, मालाड आणि रॉयल हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध हा दावा दाखल करण्यात आला होता. डॉ. मधुकर जोगळेकर आणि त्यांच्या पत्नी वैशाली जोगळेकर यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता.

जोगळेकर यांनी रॉयल हेल्थ केअरमध्ये ऑगस्ट २००५ मध्ये कृत्रिम दात बसविले होते. त्या वेळी ते अमेरिकेत वास्तव्यास होते. कृत्रिम दात बसविल्यानंतर ते परत अमेरिकेला गेले होते. दात बसविण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. याबद्दल त्यांनी डेंटिस्टकडे वारंवार तक्रार केली. तसेच ई-मेल करून त्यांना याबाबत कल्पना दिली होती. मात्र, डॉक्टराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना शेवटी परदेशातच दातावर उपचार करून घ्यावे लागले. तसेच उपचारांसाठी परत भारतात यावे लागले. संबंधित डेंटिस्टशी त्यांनी दीड ते दोन वर्षे वेळोवेळी संपर्क साधला. मात्र, त्याने दखल घेतली नाही. कृत्रिम दात बसविण्यासाठी लागलेला खर्च, दात बसविण्याची पद्धत चुकल्यामुळे झालेला खर्च आणि परदेशात दातावर करावा लागलेला खर्च यावर मोठा खर्च झाला. मात्र, डेंटिस्टकडून काही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे जोगळेकर यांनी ग्राहक मंचाकडे डॉ. चामरिया आणि आणि रॉयल हेल्थ केअर विरुद्ध दावा दाखल केला होता.

डॉ. जोगळेकर यांच्यातर्फे अॅड. शिरीष देशपांडे यांनी काम पाहिले. डॉ. जोगळेकर दाम्पत्याला उपचारासाठी आलेला खर्च, दाव्याचा खर्च, भरपाई आदींसाठी सुमारे १४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा मांडवांना दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मांडव उभारणाऱ्या गणेश मंडळांची माहिती घेण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या मांडवाचे फोटो काढून त्यांना नोटीस देऊन ही माहिती पुढील दोन दिवसात हायकोर्टासमोर सादर केली‌ जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मांडव उभारण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या होत्या. मांडव उभारताना पालिकेची परवानगी घेऊन त्यानंतरच मांडव उभारावेत, असे आवाहन यापूर्वी वारंवार पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून काही मंडळांनी बेकायदा पद्धतीने मांडव उभारले आहेत. परवानगी न घेता मांडव उभारणाऱ्या गणेश मंडळांची यादी तयार करून त्यांची माहिती देण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी कोर्टाने सर्व महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेकायदा पद्धतीने मांडव उभारणाऱ्या मंडळांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

परवानगी न घेता शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या मांडवांना नोटीस देऊन त्यांचे फोटो काढावा तसेच याची एक प्रत संबधित पोलिस स्टेशनला जमा करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत शहरातील बेकायदा मांडवांची माहिती गोळा करून ही माहिती पुढील दोन दिवसात हायकोर्टाकडे दिली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अतिक्रमण विभागातील अनेक कर्मचारी या कामात गुंतले होते.

कारवाईची टांगती तलवार

महापालिकेने गणेश मंडळांना मांडव उभारण्यासाठी १६ सप्टेंबरची मुदत दिली होती. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करणाऱ्या मंडळाच्या अर्जाची छाननी करून त्यांना येत्या मंगळवार (२२ सप्टेंबर) पर्यंत परवानगी दिली जाणार आहे. महापालिकेकडे यापूर्वी मांडवासाठी अर्ज केलेल्या मंडळांची यामधून सुटका होणार आहे. मात्र ज्या मंडळांनी पालिकेकडे अर्जच केला नाही, त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जा खात्याचे निरीक्षक सणासुदीत पगाराविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऊर्जा खात्याकडे वर्ग करण्यात आलेल्या विद्युत निरीक्षकांच्या विभागातील अधिकारी कर्मचारी गेले दोन ते तीन महिने पगाराविना आहेत. आर्थिक अडचण नसतानाही केवळ प्रशासकीय बेफिकिरीमुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐन सणासुदीतही या विभागातील राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. पूर्वी उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडे असलेल्या विद्युत निरीक्षक विभागाचे केडर ऊर्जा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. विद्युत संचमांडणीची वार्षिक तपासणी आणि वीज अपघातांची चौकशी या प्रमुख जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या या विभागाचे कामकाज सुरळीत आणि सुसूत्र पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

मात्र, या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया अद्यापही सुरळीत झालेली नाही. ऊर्जा विभागाकडे वर्ग झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांत नियमित पगार मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. विभागाकडे आर्थिक अडचण नाही, परंतु प्रशासकीय बेफिकिरी आणि गोंधळामुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. पगाराची बिले वेळेत न निघणे, संबंधित आर्थिक तरतुदी न होणे, अशा काही अडचणींमुळे पगाराला विलंब होणे नित्याचे बनल्याची टीका करण्यात आली.

विद्युत निरीक्षक, अभियंते यांच्यापासून ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळालेले नाही. काही विभागातील कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांनंतर वेतन मिळते, तर काही जणांचे वेतन अजूनही झालेले नाही. सणासुदीच्या काळात तरी वेळेत पगार द्यावेत आणि पूर्वीच्या पगाराची थकबाकी मिळावी, अशी मागणी या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पावसाचा जोर वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुढील दोन ते तीन दिवस राज्यासाठी पावसाचे असणार आहेत. विदर्भ आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागावर असलेल्या खोल (न्यून) दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात थांबून थांबून पावसाच्या सरी पडून एखाद्या वेळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ओडिशाचा दक्षिण भाग आणि लगतच्या परिसरावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढून त्याचे आता खोल कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र विदर्भ आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागावर होते. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील बाष्पाचे प्रमाण वाढून पावसाचे प्रमाणही वाढणार आहे.

गुरुवारी या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत वर्धा येथे ७४ मिलिमीटर, यवतमाळ येथे ६२ मिमी, चंद्रपूर येथे ५५, नागपूर येथे ३६ तर अमरावती येथे ४९ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी येथे ६ मिमी, नांदेड येथे ३ मिमी, सोलापूर येथे ३ मिमी, महाबळेश्वर येथे ८ मिमी पाऊस नोंदला गेला. पुण्यात मात्र, मध्यवर्ती भागात पावसाने विश्रांती घेतली. काही उपनगरांमध्ये अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.

पुढील दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टीची शक्यता आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुण्यात शुक्रवारी थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळतील, तर मध्येच एखादी मुसळधार सर हजेरी लावण्याची शक्यता आहे. शनिवारी थांबून थांबून पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी काम रोखणाऱ्यांंना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंदार युवराज रणदिवे (२५, रा. शिवाई कॉलनी, येरवडा), विकास अरुण गायकवाड (२३, रा. धानोरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या होमीसाइड सेलचे महेश साळवी यांनी​ फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी विश्रांतवाडी येथे तडीपार रविंद्र वाघमारे याची तपासणी करत होते. त्या वेळी त्यांनी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना हटकले. त्याचा राग आल्यामुळे अटक आरोपी रणदिवे, गायकवाड आणि आणि दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली. सरकारी गाडीला लाथा मारून पेट्रोलच्या टाकीचे नुकसान केले, अशी​ फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

साखळी चोरीप्रकरणी कोठडी

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून चोरल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गिरीश रामदास नायक (५०, रा. मार्केट यार्ड) याला अटक केली आहे. या प्रकरणी तारामती सूर्यवंशी (६६, रा. पुणे-सातारा रोड) यांनी फिर्याद दाखल केली होती.

१८ नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रोडवर हेरंब बंगल्यासमोर ही घटना घडली होती. फिर्यादी मुलांना येथे खेळू नका असे सांगत होत्या. त्या वेळी दुचाकीवरून एकजण त्याने मेहता कुठे राहतात अशी विचारणा त्यांना केली. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसका मारून तोडून चोरून नेली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली.

आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीकडे अधिक चौकशी करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार आरोपीला १९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

बेकायदा पिस्तुल बागळणाऱ्याला कोठडी

पुणे : गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजिंक्य अशोक पवार (२०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. अनिरुद्ध महादेव सावर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पवार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकाचा विमाननगरमध्ये खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

विमाननगर येथील लुंकड व्हॅलिंसिया या आलिशान सोसायटीत ८२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या नागरिकाच्या मानेत चाकू खुपसण्यात आला. घरातील व्यक्ती खरेदीसाठी; तसेच नातेवाइकांकडे जेवणासाठी गेल्या होत्या. रात्री आठच्या दरम्यान घरी परतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८२) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच ही घटना घडल्याने विमाननगर परिसरात गोंधळ उडाला होता. या घटनेची वार्ता पसरताच सोसायटीच्या आवारात गर्दी झाली होती.

द्रविड पेट्रोलियम कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांना तीन मुली आहेत. त्यातील एक मुलगी त्यांच्याकडे राहते, तर इतर दोन्ही मुली आपल्या सासरी असतात. त्यांची मुलगी आणि पत्नी दुपारी बाराच्या दरम्यान खरेदी; तसेच नातेवाइकांकडे जेवणासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरात दुपारी बाराच्या दरम्यान मोलकरणीने साफसफाईची कामे केली. त्यानंतर मोलकरीण दुपारी सव्वाएकच्या दरम्यान घरातून गेली. द्रविड यांची मुलगी आणि पत्नी रात्री आठच्या दरम्यान घरी परतली असता हा प्रकार उघडकीस आला.

या इमारतीत सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. त्याआधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. इमारतीत कोणी प्रवेश केला याचीही माहिती घेण्यात येत असून, खुनाचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धेला अमानुष मारहाण

$
0
0

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरात घुसून विटेने मारले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारनगर येथील तुळशीबाग कॉलनीत राहणाऱ्या एका ७४ वर्षांच्या आजींना विटेने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हा आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसला होता.

जयंत कुलकर्णी (४८, रा. सहकारनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जयंत यांच्या आई निर्मला यांना मारहाण झाली आहे. निर्मला कुलकर्णी या रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना तीन मुले आहेत. ही मुले सहकारनगर, तुळशीबाग कॉलनी आणि मुंबई येथे राहतात. त्या तुळशीबाग कॉलनीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात, अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.

आरोपी हा साधारण ४० वर्ष वयाचा, रंगाने काळा तसेच श​रीरयष्टी जाड असल्याचे वर्णन पोलिसांना मिळाले आहे. तुळशीबाग कॉलनीतील कांचनगंगा अपार्टमेंटमध्ये ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये निर्मला कुलकर्णी राहतात. आरोपी बुधवारी आठच्या सुमारास त्यांच्या घरी गेला होता. या ठिकाणी तनया कुलकर्णी राहतात का, अशी विचारणा त्याने केली.

आजींनी त्या पहिल्या मजल्यावर राहत असून, सध्या फ्लॅटमध्ये नसल्याचे आरोपीला सांगितले. मात्र, आरोपीने तनाया कुलकर्णी यांना फोन लावण्याच्या बहाण्याने आजींना सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. आरोपी घरात आल्यावर त्याने विटेने आजींना मारहाण केली. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले. तसेच त्यांना फरफटत बाथरूममध्ये नेले. तेथेही त्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आजी बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यावर त्याने घरातून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे जणांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील ४७४ जणांना गेल्या नऊ महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यातील ४७ जणांना जीव गवमावा लागला आहे. स्वाइन फ्लूच्या वाढत्या थैमानामुळे गरोदर महिलांचे बळी जाऊन नयेत,या साठी त्यांना मोफत स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील ९११ गरोदर महिलांना आत्तापर्यंत ही लस देण्यात आली आहे. शहरात साधारणतः दिवसाला सुमारे चार हजार रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूची बाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच रुग्णांच्या दगावणाच्या आकड्यातही सातत्याने वाढ होत आहे. गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्या स्वाइन फ्लूला बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांना स्वाइन फ्लूची लागण न होण्यासाठी विशेष उपाययोजना राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. राज्य सरकारने सर्व शहरांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या १४०० लस उपलब्ध आहेत. त्यामधून महापालिकेने आत्तापर्यंत शहरातील ९११ गरोदर महिलांना ही लस उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हॉस्पिटलबरोबरच तालेरा, आकुर्डी आणि भोसरी या चार हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील गरोदर महिलांचा स्वाइन फ्लूपासून बचाव होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिक हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत. मात्र, पालिकेच्या हॉस्पिटलांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजर नव्या तालांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वादनातील तोचतोचपणा घालवण्यासाठी ढोलताशा पथकांनी नव्या तालांची निर्मिती केली आहे. बाप्पांचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत नव्या तालांचा गजर केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत ढोलताशा पथक हा गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळेच ढोलताशा पथकांची संख्या दीडशेहून अधिक झाली आहे. मात्र, प्रत्येक पथकाचे वादन सारखेच वाटत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याने पथकांनी त्याचा गांभीर्याने विचार करून पारंपरिकतेला सर्जनशीलतेची जोड दिली आहे. मायकल जॅक्सनच्या गाण्यापासून ते 'होठों पे ऐसी बात' अशा गाण्यांवर आधारित ताल तयार करण्यात आले आहेत.

मायकल जॅक्सन ते लावणी

शिवसाम्राज्य पथकाने पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या 'वी वील रॉक यू' अशा काही गीतांवर आधारित तालाची निर्मिती केली आहे; तसेच गरबा, भांगडा, लावणी यांच्यावर आधारित तालांचेही वादन केले जाणार आहे. 'वादनातील साचेबद्धता मोडण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे वादकांनाही मजा येते,' असे पथकाचे सदस्य अक्षय बलकवडे यांनी सांगितले.

'होठों पे ऐसी बात'

समर्थ प्रतिष्ठान या पथकाने 'होठों पे ऐसी बात' या गाजलेल्या हिंदी गाण्यावरील तालाची निर्मिती केली आहे. त्याच्या जोडीला 'जैत रे जैत' या चित्रपटातील लोकसंगीताच्या धर्तीवरील ताल, भांगडाही वाजवला जाणार आहे. वादनातील तोचतोचपणा घालवण्यासाठी वेगळे प्रयोग आवश्यक ठरतात. पथकांची संख्या वाढली, तरी तितके वेगळेपण आलेले नाही. नवनिर्मितीच्या माध्यमातून पथकांना स्वतंत्रपणे काम करता येते, असे संजय सातपुते यांनी स्पष्ट केले.

पाश्चात्य ताल

शिवमुद्रा पथकाने पारंपरिक वादनाला पाश्चात्य तालांची जोड दिली आहे. त्यामुळे वेगळा नाद ऐकू येईल, असा विश्वास पथकाचे सदस्य आशुतोष देशपांडे यांनी व्यक्त केला. ढोल, ताशासह झांज, घुंगरू अशा वाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

बजंरग बलीची घोषणा

वादनादरम्यान 'बजरंग बली की जय'ची घोषणा करून तालपथक वेगळाच ताल वाजवणार आहे. शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा मिलाफ करण्यात आला असून, विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांसाठी सरप्राइज पॅकेज असल्याचे पथकाच्या परीक्षित फंड यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका करणार चाऱ्याची लागवड

$
0
0

पुणे : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागांतील जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पालिकेतर्फे मुंढव्यातील २५ एकर जागेवर चारा लागवड करण्यात येणार आहे.

यंदा पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांत राज्याच्या बऱ्याच भागांत अपुरा पाऊस पडला आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुष्काळाची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. या परिस्थितीत पाण्यासह जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशावेळी ग्रामीण भागाला मदत करण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंढव्यातील पालिकेच्या ताब्यात असलेल्या २५ एकर जागेवर तात्पुरत्या स्वरुपात चारा लागवड केली जावी, या प्रस्तावाला स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली. पालिकेचे सभागृह नेते बंडू केमसे, काँग्रेसचे चंदू कदम, मुकारी अलगुडे, भाजपचे राजेंद्र शिळीमकर आणि श्रीकांत जगताप यांनी हा प्रस्ताव दिला होता. दुष्काळाच्या परिस्थितीत पुणेकरांनी गोधन दत्तक घेऊन त्यासाठी येणारा खर्चाचा वाटा उचलावा, तसेच त्यासाठी पालिकेने बँकेत एक वेगळे खाते उघडून येणारी रक्कम जमा करावी, असेही सुचविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ योजनेतून लोकप्रतिनिधी डावलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी पालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांपासून ते कॉलेजमधील विद्यार्थी आणि पुणेकर नागरिकांचा सहभाग घेण्याचे निश्चित केले असले, तरी पालिकेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. यापूर्वीही, प्रभाग स्तरावर स्मार्ट सिटी योजनेची माहिती नगरसेवकांना देताना पालिकेने टाळाटाळ केली होती. त्यामुळे पालिकेतील धोरणकर्त्यांना डावलून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या उपक्रमांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारतर्फे नुकतीच संभाव्य स्मार्ट सिटीच्या यादीत पुण्याची निवड झाली. पुढील टप्प्यात शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्यासह नागरिकांच्या सहभागाला महत्त्व असल्याने पालिकेने शुक्रवारपासून त्यासाठी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेमध्ये स्थानिक नागरिकांशी सर्वाधिक संपर्कात असणाऱ्या पालिकेतील नगरसेवकांना मात्र चार हात दूरच ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कल्पनांना, त्यांच्या सूचनांना या आराखड्यात स्थान दिले जाणार की नाही, याबाबत पालिकेने कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. सर्व नगरसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याचा दावा महापौर आणि पालिका आयुक्तांकडून केला जात असला, तरी स्मार्ट सिटीबाबतच्या सर्व घडामोडींची माहिती पालिकेकडून दिली जात नसल्याची तक्रार केली जात आहे.

माहितीदेखील उशिरा कळविली

काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटीअंतर्गत शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश व्हावा, यासाठी प्रभाग स्तरावर पालिकेतर्फे बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीची माहितीदेखील पालिकेने उशिरा कळविल्याने अनेक नगरसेवकांना इच्छा असूनही त्या वेळी उपस्थित राहता आले नाही. आता पुन्हा इतर संस्था-संघटनांकडून मदतीसाठी हात पुढे केला जात असताना, नगरसेवकांचाच पालिकेला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी आठ वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळी​च्या सुट्टीसाठी घरी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला आठ वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी नरसप्पा मारुती कालकोटे (वय ३६, रा. मूळ सोलापूर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती. या मुलीचे आई वडील पुण्यात मजुरीचे काम करत होते. तिला शिक्षणासाठी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे ठेवण्यात आले होते. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे ती पुण्यात आई वडिलांकडे घरी आली होती. आरोपी फिर्यादीच्या शेजारी राहत होता. सहा डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला तिच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

तिचे वडील घरी आले तेव्हा ती आपल्या घरी कोपऱ्यात थरथरत बसली असल्याचे त्यांनी पाहिले. तिने घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली. या केसमध्ये सरकारी वकील लीन पाठक यांनी कामकाज पाहिले. तपास अधिकारी म्हणून डी. व्ही. डोके यांनी काम पाहिले. पोलिस नाईक दयानंद गायकवाड यांनी या केसच्या कामकाजात सहकार्य केले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय रिपोर्ट आणि डॉक्टरांची केस या केसमध्ये महत्त्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाला आता आजचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परतीचा मान्सून नाही, तर किमान कृत्रिम पाऊस तरी पडेल, अशी आशा लागलेल्या पुणेकरांचा गुरुवारीही अपेक्षाभंग झाला. पावसासाठी अनुकूल ढगांची उपलब्धता असलेल्या खान्देशात कृत्रिम पाऊस पाडणारे विमान दिवसभर फिरल्याने ते पुण्याकडे फिरकू शकले नाही. मात्र, शुक्रवारी हे विमान पुण्यातील धरणांच्या परिसरात 'पाऊस पेरणी' करणार आहे.

कृत्रिम पावसाचा पुण्यातील पहिला प्रयोग बुधवारी केला जाणार होता; परंतु लोहगाव विमानतळावरून कृत्रिम पावसासाठी विमानोड्डाण करण्यास लष्कराच्या हवाई दलाने हिरवा कंदिल दाखविला नव्हता; तसेच पावसासाठी अनुकूल ढगांची निर्मिती झाली नसल्याने हा प्रयोग एक दिवसासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी दुपारनंतर हा प्रयोग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. हे विमान दुपारी औरंगाबादहून थेट खान्देशात पोहोचले. जळगाव, धुळे या जिल्ह्यांसह भुसावळ, बुलढाणा व लगतच्या परिसरात कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी चारनंतर हे विमान पुण्याच्या दिशेने आणण्याचा विचार करण्यात येत होता. मात्र, हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही.

दरम्यान, लोहगाव विमानतळावरून कृत्रिम पावसासाठी विमानाचे उड्डाण करण्यासाठी परवानगी मिळाली असल्याचे या प्रकल्पाचे समन्वयक व राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले. शुक्रवारी हे विमान पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आणले जाणार आहे. पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हे विमान जाणार असून धरण परिसरात पावसासाठी टार्गेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर दरम्यानच्या धरणांचे मॅप विमानाच्या पायलटकडे देण्यात आले आहेत, असेही दिवसे यांनी स्पष्ट केले.

धरणांत फक्त ५० टक्के साठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पावसाअभावी यंदा पुरेसा साठा झालेला नाही. अपुऱ्या पावसामुळे धरणांत फक्त ५० टक्के (१४.७४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. परिणामी, पुणे शहरात जवळपास तीस टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. धरण परिसरात कृत्रिम पाऊस पाडल्यास पाणीसाठा वाढण्यास त्याची मदत होणार आहे. परंतु त्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. आज, शुक्रवारी तरी हा प्रयोग होणार का याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेचा आवाज काढून व्यापाऱ्याची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हुबेहुब महिलेचा आवाज काढून चिंचवडमधील व्यापाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी औंधमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत संशयावरून तिघांना अटक करण्यात आली असून, व्यापाऱ्याला गंडविणारा ठकसेन नेमका कोण, हे अद्याप समोर आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी आलेल्या मिसकॉलवरून सुरू झालेला हा सिलसिला मात्र, पोलिसांनी तिघांना अटक केल्यावर थांबला आहे. आशुतोष सपन दास (वय २८, प्राधिकरण, निगडी), हेन्सल रिकी डायस (वय २०, रा. चिंचवड) आणि गोपाळ हरिदास पोतदार (वय ३०, रा. निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्याला दहा महिन्यांपूर्वी मोबाइलवर मिसकॉल आला होता. त्यानुसार व्यापाऱ्याने त्या क्रमांकावर फोन केला. पलीकडून फोन उचलणाऱ्याने आपले नाव अनुष्का मुशरवाला असल्याचे सांगितले. या घटनेनंतर या दोघांमध्ये सातत्याने संपर्क होऊ लागले. महिलेच्या आवाजात व्यापाऱ्याशी संवाद साधणाऱ्याने आपण अडचणीत असून, मदतीची याचना केली. दरम्यान, महिलेचा आवाज काढणाऱ्याने व्यापाऱ्याकडून दोन लाखांची रोकड उकळली. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्याने अधिक पैसे देण्यास नकार दिल्याने पोलिसांत तक्रार करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन समोरील व्यक्तीने दीड लाखांचे तीन आयफोन मागितले. मिळणारे पैसे आणि फोन घेण्यासाठी एक व्यक्ती व्यापाऱ्याकडून जात होती. सततच्या मागणीला आणि धमकीला कंटाळून संबंधित व्यापाऱ्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक सी. ए. सांगळे, सहायक निरीक्षक (गुन्हे) नितीन भोयर यांच्या पथकाने वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात चिंचवड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिंकन हाउस’च्या चाव्या ‘पूना’वालांच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईतील अमेरिकन दूतावासाच्या ऐतिहासिक 'लिंकन हाउस' इमारतीच्या किल्ल्या एका पुणेकराच्या हाती आल्या आहेत. 'सिरम इन्स्टिट्यूट'चे संस्थापक पद्मश्री डॉ. सायरस पूनावाला यांनी ही ऐतिहासिक मालमत्ता तब्बल साडेसातशे कोटी रुपये मोजून खरेदी केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दक्षिण मुंबईतील 'लिंकन हाउस' हा गुजरातमधील वाकानेरचे महाराज प्रतापसिंह यांचा पूर्वीचा राजवाडा. त्या वास्तूमध्ये कालांतराने अमेरिकन दूतावासाचे कार्यालय सुरू झाले. त्यानंतर हे कार्यालय अन्यत्र सुरू झाल्याने रिकामी झालेली ही दिमाखदार वास्तू पूनावाला यांनी खरेदी केली आहे. 'लिंकन हाउस खरेदी करण्याची ही मोठी संधी होती. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदी आहे. चांगल्या शानदार घरात राहू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी ही प्रॉपर्टी योग्य आहे. महाराष्ट्रात नव्हे, तर देशातील एकमेव अशी

ऐतिहासिक वास्तू खरेदी केल्याचा विशेष आनंद आहे. जगात जे सर्वच घेतात, त्या वस्तूंपेक्षा अशा आयकॉनिक, युनिक गोष्टी खरेदी करणे यात मला रस आहे,' अशा भावना डॉ. सायरस पूनावाला यांनी 'मटा'शी शेअर केल्या.

'नव्या वास्तूत आम्ही कुटुंबीय आनंदाने राहणार आहोत. बिल्डरप्रमाणे आम्हाला वास्तूत बदल करायचा नाही किंवा नवे बांधकामदेखील करायचे नाही,' असेही ते सांगतात. विविध प्रकारच्या गाड्या, तसेच घोडे खरेदीचाही त्यांना छंद आहे. त्याबद्दल विचारले असता त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या आवडीबद्दल सांगितले. 'मला स्पोर्ट्स कार खरेदी करण्याचा पूर्वीपासून शौक. कॉलेजला होतो त्यावेळी जॅग्वार गाडीसारखी गाडी तयार केली होती. अॅल्युमिनिअच्या साह्याने तयार केलेली ती गाडी आजही माझ्याजवळ आहे. १९६०-६५ साली त्या गाडीला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. गाड्यांचा शौक असल्याने पैसे कमवत गेलो, तसा गाड्यांची खरेदी करत गेलो. तत्कालीन राष्ट्रपतींचीही कार माझ्या व्हिंटेज कारच्या संग्रहात आहे,' असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

दोस्त माझा मस्त...!

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, डॉ. पूनावाला आणि विठ्ठल मणियार हे तिघे बीएमसीसी कॉलेजातील जवळचे मित्र. 'कॉलेज जीवनापासूनच सायरस हा स्वच्छंदी स्वभावाचा माणूस. तेव्हापासून वेगळे काही तरी करायचे त्याच्या डोक्यात नेहमीच असायचे. 'सिरम'सारखी आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी चालवण्याबरोबरच असे आगळे छंद जोपासणारा हा आमचा दोस्त एकदम मस्त आहे,' असे मणियार यांनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ हटवण्याचे भक्तांचे साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा आसमंत व्यापणारा निनाद, बाप्पाच्या आगमनासाठी फुलांनी सजवलेले आकर्षक रथ, ढोल-ताशांचा गजर अन् पारंपरिक बँडचा ताल, ज्येष्ठांसोबत पारंपरिक पोशाख धारण करून आलेली तरुणाई... अशा उत्साही वातावरणात, राज्यावरील दुष्काळाची छाया कमी करण्याचे साकडे घालत गुरुवारी पुण्यनगरीत लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मानाच्या गणपतींसह अनेक मंडळांनी गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळचा मुहूर्त साधला. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीसाठी बहुतांश मंडळांनी विविधरंगी फुलांनी सजावट केली होती. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळ आणि तुळशीबाग गणपती या मानाच्या गणपतींसह भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, बाबू गेनू मंडळ आणि जिलब्या मारुती मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहराच्या मध्य भागांत मिरवणुकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

मोठ्या मंडळांच्या मिरवणुकांबरोबर घरगुती गणपती घेऊन जाणाऱ्यांची संख्याही बरीच होती. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण जल्लोषात 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करत बाप्पाला घरी घेऊन जात होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात रोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने अनेक कुटुंबांनी सकाळीच प्रतिष्ठापना करण्यास प्राधान्य दिले. आतापर्यंत रुसलेला पाऊस आता तरी प्रसन्न व्हावा, अशी प्रार्थना केली जात होती.

पहिल्याच दिवशी रांगा

बहुतांश सर्व मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२पर्यंतच झाल्याने सायंकाळी बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मानाचे पाचही गणपती आणि अन्य महत्त्वाच्या मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यास भाविकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने उभारलेला 'श्री गणेश स्वानंदलोक' देखावा आणि त्याची रोषणाई पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपन्यांनी बुडवला पीएफ

$
0
0

Sujit.Tambade @timesgroup.com

पुणेः कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडच्या (पीएफ) संरक्षणापासून वंचित ठेवून त्यांचे भविष्य अधांतरी करणाऱ्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील १५१ कंपन्या, संस्था एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) रडारवर आल्या आहेत. या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा 'पीएफ' बुडविल्याने त्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कंपन्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जाणार असून, मालकांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

'पीएफ' बुडविणाऱ्या कंपन्यांविरुद्ध 'ईपीएफओ'ने एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत विशेष मो​हीम उघडली आहे. त्यामध्ये १५१ संस्था आणि कंपन्या आढळल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा 'पीएफ' बुडविणाऱ्या या कंपन्या आणि संस्थांमध्ये मॉल, केमिकल कंपन्या, सिक्युरिटी एजन्सी, शाळा आदींचा समावेश आहे. त्यांना डिफॉल्टर म्हणून जाहीर करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त (वसुली) हनुमंत प्रसाद यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.

डिफॉल्टर म्हणून घोषित केलेल्या कंपन्या आणि संस्थांनी थकबाकी भरली नाही, तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे; तसेच मालमत्ता जप्त करणे किंवा मालमत्तेचा लिलाव होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरली गेली नाही, तर कंपन्यांच्या मालकांना तुरुंगात जाण्याची वेळ येणार असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही कंपनी किंवा संस्थेत २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करीत असतील, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला 'पीएफ'चे संरक्षण देण्याची सक्ती आहे. मात्र, डिफॉल्टर म्हणून घोषित केलेल्या १५१ कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 'पीएफ'ची कपात केलेली नाही, तर काहींनी कपात करूनही 'ईपीएफओ'च्या कार्यालयाकडे 'पीएफ' जमा केला नसल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणासाठीही विकास आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर विकासासाठीच्या विकास आराखड्यासारखाच शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. बालभारती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थांची जबाबदारी निश्चित करून सरकारने त्याची सुरुवात केली आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने जून महिन्यात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या 'पुणे सुपरफास्ट एज्युकेशन' या उपक्रमामध्ये राज्यासाठी स्वतंत्र शिक्षण विकास आराखड्याची गरज व्यक्त केली होती. त्या वेळी तावडे यांनी असा आराखडा तयार करण्याचे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारचे अवर सचिव री. वि. फणसेकर यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये शिक्षण खात्यासाठीच्या विकास आराखड्याचा उल्लेख केला आहे.

'विद्या परिषद ही सरकारची 'थिंक टँक' म्हणून काम करणे अपेक्षित आहे. सध्या पहिलीत असलेले मूल बारावीत पोहोचेपर्यंत शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा विचार करून, कोणत्या बदलाची आवश्यकता आहे व तो कशा पद्धतीने, कोणत्या टप्प्यांवर करणे आवश्यक आहे, याचा विकास आराखडा तयार करणे, त्यात सातत्याने सुधारणा व बदल करणे व आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकणारा विद्यार्थी घडवण्यासाठी विकास

आराखडा सातत्याने अद्ययावत करणारी यंत्रणा उभारण्यासाठी परिषदेने काम करावे. त्यासाठी 'एससीईआरटी'ने गुणवत्तेशी संबंधित सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करणे अपेक्षित असेल,' असे या पत्रात म्हटले आहे.

बालभारती, राज्य बोर्ड आणि 'एससीईआरटी'च्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करून, या तिन्ही संस्थांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या पत्रामध्ये देण्यात आले आहेत. 'एससीईआरटी'च्या औरंगाबाद आणि नागपूर येथील विभागीय परिषदांच्या निर्मितीतून या विकास आराखड्याचे काम पुढे जाणार आहे.

उच्च शिक्षणाबाबत बृहद् आराखडा असायला हवा, अशी संकल्पना महाराष्ट्र टाइम्सने 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात मांडली होती. ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उचलून धरली. त्याच संकल्पनेवर आता शालेय शिक्षणासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.

सरकारच्या विचाराधीन असलेले मुद्दे

बालभारती केवळ मुद्रणालय

एससीईआरटी 'थिंक टँक'

बोर्डाची जबाबदारी परीक्षा मंडळाची

औरंगाबाद आणि नागपूरमध्ये विभागीय 'एससीईआरटी'ची निर्मिती

'एससीईआरटी'ने पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करणे अपेक्षित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images