Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बाप्पांचा प्रसाद पोहोचवा जगभर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विघ्नहर्त्या वरदविनायकाच्या उत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना, घरोघरचे उत्सवी वातावरण आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही केलेला खास पदार्थ, आता जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने वेबसाइटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे घराघरांतला उत्सव आता खऱ्या अर्थाने ग्लोबल होणार आहे.

येत्या गुरुवारी (१७ सप्टेंबर) शहरात ठिकठिकाणी बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन होणार आहे. स्वागताच्या पूर्वतयारीवर अखेरचा हात फिरविला जात असतानाच, बाप्पासाठी केलेली सजावट वेबसाइटद्वारे देश-विदेशांतील आप्तेष्टांनाही पाहता येणार आहे. त्याशिवाय, तुम्ही घरी केलेली सजावट वेबसाइटच्या माध्यमातून इतरांनाही समजू शकणार आहे. सजावटीसह नैवेद्यासाठी गृहिणींकडून विविध खाद्यपदार्थांची जय्यत तयारी केली जाते. या पदार्थांची चव इतरांनाही चाखता यावी, यासाठी त्याच्या रेसिपीही वेबसाइटवर अपलोड करता येणार आहेत. तेव्हा, आता जास्त वाट पाहू नका. मोबाइल हातात घ्या आणि रेसिपी जगभरात पोहोचवा.

'फोटो कॉन्टेस्ट'ची धमाल

या खास वेबसाइटवर विकसित केलेल्या पेजेसमध्ये एक आहे 'फोटो कॉन्टेस्ट'. गणेशमूर्ती, मंडळे, घरगुती गणेश, कुटुंबासह बाप्पा, बाप्पाचा फॅन या विभागांतर्गत तुम्ही विराजमान झालेल्या गणरायाचे फोटो अपलोड करू शकता. यंदा तुमच्या घरच्या बाप्पांची मूर्ती कशी आहे, ती कशी सजवली आहे, हे या निमित्ताने तुम्ही जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकाल. त्यासाठी ८८६६००१८३० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोटो पाठवा. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट फोटोंना 'मटा''डून आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. निवडक फोटोंचे प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.

रेसिपीज पोहोचवा जगभर

गणेशोत्सवातील महत्त्वाची बाब म्हणजे खाद्यपदार्थ! उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर बाप्पाला दाखवला जातोच; शिवाय या निमित्ताने विविध पदार्थही घरी तयार केले जातात. याच दिवसांत तुम्ही तयार केलेल्या काही नव्या पदार्थांची रेसिपी किंवा नेहमीचेच; पण वेगळ्या पद्धतीने केलेले पदार्थ तुम्हाला 'रेसिपीज' या पेजवर अपलोड करता येणार आहेत. फक्त पदार्थांच्या रेसिपीज नाहीत, तर त्यासह त्यांचे सुंदर फोटोही आवर्जून अपलोड करा आणि तुमची ही पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाट कुत्र्यांसाठी साडेसहाशे रुपये

0
0

पुणेः पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मोकाट श्वान पकडण्यासाठी बोर्डाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने हे काम आउटसोर्सिंगद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी बोर्डाला प्रत्येक श्वानामागे साडेसहाशे रुपये द्यावे लागत असल्याचे उघड झाले आहे. बोर्डाच्या परिसरात महात्मा गांधी रस्ता, वानवडी, घोरपडी, कुंभारबावडी, मोदीखाना आणि शिवाजी मार्केट आदी परिसरात श्वानांनी धुमाकूळ घातला होता. मात्र, श्वान पकडण्यासाठी बोर्डाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने ब्लू क्रॉस सोसायटीला हे काम देण्यात आले आहे. या कामासाठी प्रत्येक श्वानामागे बोर्डाला साडेसहाशे रुपये द्यावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांत सुमारे ४०० श्वान पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याने केला मजुरावर हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडाच्या पायथ्याथी बिबट्याचा वावर असल्याची घटना ताजी असतानाच आता वाघोली परिसरामध्ये मजुरावर बिबट्याने हल्ला केला आहे. वनाधिकाऱ्यांनाही या परिसरामध्ये बिबट्याचे ठसे, विष्ठा सापडली असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

जयप्रकाश द्विवेदी असे मजुराचे नाव असून, शनिवारी रात्री काम संपवून रानातून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर बिबट्याच्या नखांचे व्रण उमटले आहेत. जीव मुठीत धरून पळाल्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली नाही. ससूनमध्ये वैद्यकीय उपचार केल्यानंतर द्विवेदी यांना घरी सोडण्यात आले आहे. 'शनिवारी संध्याकाळी काम करून परतत असताना, झाडीतून बिबट्याच्या पिल्लाने माझ्यावर अंगावर उडी मारली. निर्मनुष्य ठिकाण असल्याने माझ्या मदतीला कोणी धावून येणे शक्यच नव्हते. त्यामुळे मी पळ काढला. जर तिथे मोठा बिबट्या असता, तर मी वाचलो नसतो,' अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.

दरम्यान, वाघोलीमधील आवळवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या वारंवार दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील एका फार्महाउसमध्ये शिरून त्याने कुत्र्याची शिकार केली.

आवळवाडी परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे मिळाले आहेत.द्विवेदी यांच्यावर बिबट्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपूर मुख्यालयाकडून बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळाल्याने पिंजरा लावला आहे.

- सत्यजीत गुजर, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावशेरी, खराडीत चार दिवसांनी पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी. पुणे

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात असला, तरी काही भागांतील नागरिकांना प्रत्यक्षात ते चार दिवसांनी पाणी मिळत आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी १० दिवस लागतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले गेले असले, तरी त्यानुसार पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. प्रामुख्याने कोंढवा, वडगावशेरी, खराडी, वानवडी भागांतील नागरिक अनियमित पाणीपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाणी नियोजनाचा आढावा घेण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. शहराच्या काही भागांत नियमित पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

'पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये हवा भरल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित आहे. पुढील १० दिवसांमध्ये पाणीपुरवठा निश्चित सुरळीत होईल,' असा विश्वास महापौर धनकवडे यांनी व्यक्त केला.

मुंढवा प्रकल्पाला ढापे

महापौर धनकवडे यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंढवा जॅकवेल प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्याला ढापे बसवावे लागणार आहेत. पुढील सोमवारपर्यंत ढापे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आले. त्यानंतर, मुंढवा प्रकल्पातून बेबी कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यासाठी काही चाचण्या घेण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएफ’बाबत पालिका गप्पच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (ईपीएफओ) दंड केल्याची नामुष्की महापालिकेवर ओढविल्यानंतरही प्रशासन जागे झाले नसल्याचे उघड झाले आहे. 'पीएफ'बाबत माहिती देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी ​दिल्यानंतर विविध ३५ विभागांपैकी महापालिकेच्या अवघ्या तीन क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती दिली असून, उर्वरित विभागांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांचा 'पीएफ' भरण्यात आला नसल्याने महापालिकेकडून 'पीएफ' वसुली केली जाणार असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले आहे. 'ईपीएफओ'ने महापालिकेला नोटीस पाठविली असल्याने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी महापालिकेच्या विविध ३५ कार्यालयांना 'पीएफ'बाबतची माहिती देण्याचे आदेश दिले. पाच सप्टेंबर रोजी या संदर्भातील परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये १४ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे म्हटले होते. मात्र, या कालावधीत घोले रोड, ढोले पाटील रोड आणि धनकवडी या तीन क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती दिली आहे. उर्वरित सर्व विभागांनी आदेशाचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसह आरोग्य विभाग, अतिक्रमण कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नागरवस्ती विकास योजना विभाग, कर आकारणी आणि कर संकलन विभाग, वाहतूक नियोजन विभाग, सुरक्षा विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, अतिरिक्त नगर अभियंता विभाग आदी प्रमुख विभागांमध्ये ठेकेदारांमार्फत विकासकामे करण्यात येतात. मात्र, तीन क्षेत्रीय कार्यालये वगळता अन्य सर्व विभागांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुदतीत माहिती न दिल्याने महापालिकेवर कारवाई झाल्यास संबंधित ठेकेदार आणि खातेप्रमुख यांच्याविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले असतानाही खातेप्रमुखांनी या आदेशाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचेही उघडकीस आले आहे.

विभागप्रमुखांवर कारवाई

विभागप्रमुखांनी आठ प्रकाराची माहिती देण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यामध्ये वर्षनिहाय कंत्राटदारांची नावे, पत्ते, ईपीएफओ नोंदणी क्रमांक आणि त्याचा पुरावा, टेंडरची प्रत आणि कार्यालयीन आदेश, वेतन रजिस्टर, हजेरीपत्रक, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद, कामगार संख्या आदींचा समावेश आहे. मात्र, विभागप्रमुखांनी ही माहिती घेण्याची तसदी घेतली नसल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाची मनमानी

0
0

कोणत्याही माहितीविना बदल्या केल्या रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेकडून अधिकार मिळताच शिक्षण मंडळाच्या सभासदांनी मनमानी कारभारास सुरुवात केली आहे. अडीच महिन्यांपूर्वी संपूर्ण अभ्यास करून प्रशासनाने शिक्षक-रखवालदारांच्या केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचा अजब ठराव मंडळातील सभासदांनी केला. विशेष म्हणजे, नक्की किती शिक्षकांच्या आणि रखवालदार यांच्या बदल्या रद्द करण्यात येणार आहेत, याची कोणतीही माहिती नसतानाही सर्व बदल्या रद्द करण्याचा पराक्रम सभासदांनी केला आहे.

मंडळाचा कारभार पालिका प्रशसनामार्फत चालविला जात असताना मे महिन्यापासून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मंडळाच्या शाळेतील ३० टक्के, म्हणजे बाराशेहून अधिक शिक्षक-रखवालदारांच्या बदल्या केल्या. त्यानंतर शिक्षक संघटनांनी महापालिकेसमोर चार दिवस काम बंद आंदोलन केले आणि आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदने देण्यात आली होती. अनेक शिक्षकांच्या बदल्या लांबच्या ठिकाणी केल्याचा आरोप होऊन सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटले. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, अशी हमी देत प्रशासनाने पुन्हा या बदल्यांचा फेरविचार केला होता.

दरम्यानच्या काळात शिक्षणमंडळाला पूर्वीप्रमाणेच अधिकार देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करत प्रशासनाने काही अधिकार शिक्षणमंडळाला पूर्वी प्रमाणे देण्यात असल्याचे पत्र पालिका प्रशासनाने दिले आहे. हे शिक्षक तसेच रखवालदारांच्या बदल्यांचा विषय संपुष्टात येत असतानाच यापूर्वी प्रशासनाने केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचा ठराव मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. संपूर्ण आढावा घेऊन 'अभ्यासाअंती' हा निर्णय घेतल्याचे मंडळाच्या अध्यक्ष वासंती काकडे यांनी सांगितले. नक्की किती बदल्या रद्द केल्या असे काकडे तसेच शिक्षणप्रमुख विजय दहिफळे यांना विचारले असता, संबधित क्लार्क रजेवर असल्याने आकडेवारी सांगता येणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांब अंतरावर झाल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक येत‌ नव्हते. त्यामुळे संपूर्ण आढावा घेऊन 'अभ्यासाअंती' बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

- वासंती काकडे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी टोळी अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयटी इंजिनीअर्स, तसेच विद्यार्थ्यांना सायंकाळच्या वेळी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून त्यांना लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले. या टोळीने गेल्या दोन महिन्यांत पुणे शहरात १२, तर चाकण येथे दोन असे १४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच, या टोळीच्या म्होरक्याने दोन खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

ललित दीपक खोल्लम (२८, रा. मावळ), मयूर दिलीप राऊत (२०), आदेश कैलास नेटके (२१, रा. देहू रोड), युवराज नंदकुमार मगर (२८, रा. देहू रोड) आ​णि आकाश सु​नील कुंभार (२१) यांना अटक करण्यात आली आहे. खोल्लम या टोळीचा म्होरक्या असून, विविध गुन्ह्यांत त्याने वेगवेगळ्या साथीदारांचा उपयोग करून घेतला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली. या वेळी उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांत सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हिंजवडी, वाकड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चाकण, येरवडा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लुटमारीच्या घटना घडल्या होत्या.

गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणपत ​पिंगळे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. चोरण्यात आलेली कार, २० मोबाइल हँडसेट, एक एअर गन, चिली स्प्रे, एक टॅब, नऊ एटीएम कार्ड, एक पिस्तुल, दोन काडतुसे असा सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीचे पेशंट वाढताहेत

0
0

पेशंटच्या लक्षणांमध्ये दिसून येतोय बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्यंतरी शहरातील पाणीटंचाई आणि त्यानंतर होत असलेला पाऊस यामुळे शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या वाढली आहे. खासगी हॉस्पिटल तसेच क्लिनिकला पेशंटची ये-जा वाढली असून प्लेटलेट, पांढऱ्या पेशी देखील कमी होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

'गेल्या पंधरा दिवसांत शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पेशंट उपचार घेण्यासाठी येत आहेत. डेंगीच्या पेशंटमध्ये प्लेटलेट कमी होण्याबरोबरच पांढऱ्या पेशींचे देखील प्रमाण कमी होत आहे. ५० हजारांपर्यंत प्लेटलेट खाली येत आहेत. परंतु, तरीही हॉस्पिटलमध्ये पेशंटला दाखल कऱण्याची वेळ येण्यासारखी गंभीर परिस्थिती येत नाही. नदी किनार असलेल्या भागात डेंगीच्या पेशंटची संख्या अधिक दिसून येत आहे,' अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

तसेच, नागरिकांमधील रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. डेंगीच्या लक्षणामध्ये अंगावर पुरळ येण्याचा प्रकार मात्र पेशंटमध्ये दिसत नाही. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत नाही. उलट्या, ताप, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येत आहेत, असे फिजिशियन डॉ. प्रकाश महाजन यांनी सांगितले.

दक्षिण पुण्यातील आंबेगाव, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, तसेच हडपसर, वानवडी भागात देखील डेंगीचे पेशंट वाढले आहेत. मोठ्या प्रमाणात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून येत असताना विषाणूंचा संसर्गदेखील होत असल्याचे दिसते. अनेकांना डेंगीची चाचणी 'निगेटिव्ह' आली तरी त्यांना तीन दिवसांपेक्षा ताप असल्याने 'टॅमी फ्लू' दिल्यास आजार बरा होत आहे. पंधरा दिवसांपासून डेंगीच्या पेशंटची संख्या वाढल्याचे निरीक्षण फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्यमाफिया गजाआड

0
0

पुण्यातील प​हिली, तर राज्यातील तिसरी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धान्याचा काळाबाजार करून यंत्रणेला न जुमानणाऱ्या माफियाला सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मार्केट यार्ड येथील बाळू उर्फ अरविंद रमेश रोकडे (वय ३४, रा. मार्केटयार्ड) या गुन्हेगाराला औरंगाबाद येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. राज्यातील ही तिसरी, तर पुण्यातील पहिली कारवाई आहे.

काळ्या बाजारास प्रतिबंध व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालू ठेवण्याबाबतच्या १९८०च्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या पूर्वी नागपूर आणि नाशिक पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली आहे. पुण्यात ही पहिलीच कारवाई असून, त्यानुसार रोकडेला सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. रोकडेच्या स्थानबद्धतेला पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी सोमवारी मंजुरी दिली. त्यानंतर त्याला औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.

रोकडे याच्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रोकडेने सरकारी अन्नधान्याचा मार्केट यार्ड परिसरातील गोडाउनमध्ये साठा केला होता. हे गोडाउन अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सील केले होते. रोकडेने गोडाउनची भिंत फोडून त्यातील सहाशे पोती धान्य सातारा येथे नेले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय त्याच्यावर ​डिसेंबर २०१४ मध्ये तसेच, ४ ​डिसेंबर २०१३मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१० मध्ये खुनाचा गुन्हा केल्याचेही त्याचे रेकॉर्ड आहे, अशी माहिती रामानंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाच्या स्वरूपात हवा बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ढोबळ स्वरूप बदलण्याची वेळ आली असून, नव्या पिढीला साहित्य संमेलनाकडे आकर्षित करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाचे कार्यक्रम ठरवण्याच्या प्रक्रियेत संमेलनाध्यक्षांचाही विचार घेण्यात यावा,' असा सूर अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलेल्या पाचही उमेदवारांनी सोमवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या व्यासपीठावर केला.

पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ, अरुण जाखडे, डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्रीपाल सबनील व श्रीनिवास वारुंजीकर हे सोमवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुण्यातील कार्यालयात 'राउंड टेबल कॉन्फरन्स' उपक्रमांतर्गत एकत्र आले होते. साहित्यव्यवहाराचे आजचे स्वरूप, त्यामधील अपेक्षित बदल, साहित्यातील प्रवाह, संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा सहभाग आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी या वेळी चर्चा केली. अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल सर्व उमेदवारांनी 'मटा'चे अभिनंदन केले.

'साहित्यक्षेत्राला आज थिजल्यासारखे स्वरूप आले आहे. मराठी साहित्य व्यवहार बदलाच्या टप्प्यावर आहे. साहित्य संमेलनात प्रकाशक-विक्रेत्यांनाही सामावून घेतले पाहिजे,' असे जाखडे यांनी सांगितले.

'नव्या पिढीचा विचार काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. आतापर्यंत अनेक संमेलने झाली. मात्र, त्यात नवोदितांसाठी काही होत नाही,' असे मत लिंबाळे यांनी मांडले. 'इतर भाषांचे मराठीवर आक्रमण होत असताना मराठीचे संपन्नत्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. कृतिशील असलेल्या साहित्यिकांच्या शब्दांना मोल येते,' असे वाघ म्हणाले.

'संमेलनाध्यक्षांच्या भाषणांतील मुद्द्यांची नंतर कधीच अंमलबजावणी होत नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना काहीच अधिकार नससतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी माध्यमे संमेलनाच्या व्यासपीठावर वापरली गेली पाहिजेत,' अशी भूमिका वारुंजीकर यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाद्वारे अभिव्यक्त होणाऱ्या तरुणाईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संमेलनाध्यक्षांच्या मताचा विचार कार्यक्रम ठरवताना व्हायला हवा. संमेलनातील विषय, वक्तेही बदलले पाहिजेत; तसेच प्रगल्भ राजकारण्यांचा विटाळ मानण्याची गरज नाही, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात मिळणार दररोज पाणी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणांतील पुरेशा पाणीसाठ्याअभावी शहरात दिवसाआड केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नुकतेच स्थिरावत असताना, सणासुदीचे कारण पुढे करून, पुन्हा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याचा घाट घालण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेत पुन्हा बदल करायचा झाल्यास, संपूर्ण व्यवस्था विस्कळित होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या बुधवारी (१६ सप्टेंबर) पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

अत्यल्प पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम ५० टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी पुढील वर्षी जुलैअखेर पुरावे, यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी गेल्या सोमवारपासून सुरू झाली. मात्र, आठच दिवसांत काही दिवसांकरिता पुन्हा दिवसातून एक वेळ पाणी देण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाचे निमित्त पुढे करून उत्सवातील चार दिवस एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात आहे.

महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी घेतलेल्या पाणी नियोजनाच्या आढावा बैठकीमध्ये त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होऊन अवघे आठ दिवस झाले आहेत. अजून नागरिकांच्या तक्रारी आहेत. ही व्यवस्था अजून रुळलेली नाही. त्यामुळे, पुन्हा त्यात बदल केला गेल्यास शहरातील पाणीपुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली गेली. गणेशचतुर्थी (१७ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (२७ सप्टेंबर) यासह रविवार (२० सप्टेंबर) आणि शुक्रवार (२५ सप्टेंबर) हे चार दिवस शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याबाबत चाचपणी केली गेली. मात्र, तांत्रिकदृष्ट्या पाणीवाटपाच्या सर्व व्यवस्थेचा पुन्हा फेरविचार करावा लागेल, हे निदर्शनास आणून देण्यात आले. अखेर महापौरांच्या बैठकीत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्या संदर्भातील तांत्रिक अहवाल बुधावरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज एक पाऊल पुढे टाकत 'नाम' फाउंडेशन या संस्थेची नोंदणी केली आहे. त्यामुळे नाना-मकरंदच्या सामाजिक कार्याला पाठबळ देऊ इच्छिणाऱ्या मंडळींना हक्काचं व्यासपीठच उपलब्ध झालं आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जे कुणी आर्थिक सहकार्य करू इच्छितात त्यांनी 'नाम' फाउंडेशनच्या एसबीआयमधील खात्यात आपली मदत जमा करावी, असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केल्यानंतर 'नाम'च्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली.

२०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत आपण देत होतो. पण आता 'नाम'च्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून, गेल्या तीन वर्षांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आपण आर्थिक आधार देऊ शकू. त्याशिवाय, दुष्काळी भागात कायमस्वरुपी रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठीही प्रयत्न करायचे आहेत, असं नानानं सांगितलं.

'नाम'च्या खाते क्रमांकाची सविस्तर माहितीः

करंट अकाउंट नंबरः 35226127148 आयएफसी कोडः SBIN 0006319 स्विफ्ट कोड नं: SBININBB238

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅबची किंमत द्या

0
0

दुरुस्ती न केल्याप्रकरणी ग्राहक मंचाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्राहकाने वारंवार तक्रार करुनही टॅब दुरुस्त न करून दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने एका कंपनीला फटकारले आहे. ग्राहकाला टॅबची सहा हजार रुपये किंमत परत देण्यात यावी. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी एक हजार रुपये द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला.

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी विनोद नांद्रे यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी आयबॉल इंडिया, सर्व्हिस मॅनेजर नवी पेठ, ऑयबॉल इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर मुंबई यांच्या विरुद्ध दावा दाखल केला होता.

तक्रारदार यांनी आयबॉल कंपनीकडून चार नोव्हेंबर २०१४ रोजी सहा हजार रुपयांना टॅब खरेदी केला होता. त्यांना त्यांच्या बहिणीला टॅब भेट द्यायचा होता. तक्रारदार यांनी दोन महिन्यांनी पॅकिंग उघडले, तेव्हा त्यामधील टॅबचे टच स्क्रीन कार्यरत नव्हते. टॅब वापरताही येत नव्हता. या प्रकरणी त्यांनी वितरकाकडे तक्रार करुन टॅब दुरुस्त करून देण्याची विनंती केली. टॅबमध्ये वारंवार समस्या येत होत्या.

या संदर्भात त्यांनी कंपनीकडे पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष पाठपुरावा केला. मात्र त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. संबंधित कंपनीकडून लेखी जबाब दाखल करण्यात आली. तक्रारदार यांना टॅब दुरुस्त करुन दिला होता. मात्र त्यांनी परत टॅब दुरुस्तीस पाठविला होता. टॅब दुरुस्त करून झाल्यानंतर त्यांना परत घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी परत नेण्यास नकार दिला असे जबाबात सांगण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलावरून उडी मारणाऱ्या वृद्धाला पोलिसांनी झेलले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घरगुती वादातून वाकड येथील सुमारे ३० फूट उंच उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला झेलून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. बाळासाहेब अर्जुन वाकडकर (रा. वाकड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सहायक पोलिस आयुक्त धनराज वाळुंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडकर सकाळी साडेनऊच्या सुमारास वाकड उड्डाणपुलावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. वरिष्ठ निरीक्षक एन. जे. शेख व सहायक निरीक्षक सी. व्ही. केंद्रे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे केंद्रे यांनी पुलावर धाव घेतली, तर कर्मचारी प्रकाश मोरे, महेश कांबळे यांना पुलाखाली थांबविण्यात आले.

वाकडर यांना रोखण्याचा प्रयत्न नागरिक व पोलिसांनी केला. ते पुलाच्या कठड्यावर जवळपास १० ते १५ मिनिटे थांबून होते. या वेळी केंद्रे यांनी द्रुतगती मार्गावरील वाहतुकही काही काळासाठी थांबवून ठेवली होती. वाकडकर यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुलावरून उडी मारली. मात्र, त्याच वेळी खाली उभे असणारे कर्मचारी कांबळे, मोरे यांनी वाकडकर यांना अलगद झेलले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.

वृद्धावर उपचार सुरू

दरम्यान, या घटनेत बाळासाहेब वाकडकर यांच्या पायाला दुखापत झाली असून उपचारांसाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वाकडकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, या मागचे नेमके कारण समजलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीतील आरोपी व्हॉट्सअॅपमुळे अटकेत

0
0

पुणेः वडगाव बुद्रुक येथील घरफोडी करताना तीन आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्या आरोपींची व्हिडीओ चित्रिकरण मिळाल्यानंतर ते व्हॉट्स अॅपवरून पसरविण्यात आले. त्यानंतर काही तासांतच आरोपींची माहिती मिळाली. दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून सात तासांमध्ये आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील माल जप्त केला आहे.

सुजित सुनील शेळके (वय २०), करण अंकुश जानराव (वय १९) आणि अक्षय मच्छिंद्र गोरे (वय २२, रा. तिघेही- दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील बालाजी प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात सोमवारी चोरी झाली होती. या घरफोडीची व्हिडीओ क्लिप मिळाल्यानंतर ती व्हॉट्सअॅपवर वरून प्रसारित करण्यात आली. त्यावरून चोरी करणार आरोपी हे सुजित शेळके आणि त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अशोक गवळी यांना मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धांगडधिंगा करणाऱ्या तरुण-तरुणींवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

सार्वजानिक ठिकाणी उघड्यावर अश्लील चाळे, तसेच धांगडधिंगा करीत आरडाओरडा करून शांततेचा भंग करणाऱ्या २४ तरुण-तरुणींवर कारवाई करण्यात आली आहे. लोणावळयाजवळील लायन्स पॉइंट येथे पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान विविध ठिकाणांहून लोणावळा शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे फौजदार नीलेश अपसुन्दे यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रात्र गस्तीदरम्यान मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही सर्व तरुणाई टायगर पॉइंट येथे मोठमोठ्या आवाजात, स्पीकर लाऊन धांगडधिंगाणा घालत असल्याचे कारवाईवेळी पथकाला आढळून आले.

मुंबईस्थित अंकित विजय आंबेकर, दामोदर व्यंकटेश कोणताला, सुहास अनिलकुमार गुप्ता, राहुल निर्मल कोपलानी, प्रतिक रवींद्र शेट्टी, मिभंग पेमपाक छिरींग भूटिया, दिव्यमप्रवीण महाना, यश नरसिंग मारविजा, अंकित प्रदीप महाजन, टोनी विनोदसिंग नेगी, अमन राकेश शंगारी, करण इंदरमोहन लॉ, धर्मेंद्र राजनाथ यादव, शिवांग उमेश जिंदाल, आर्यमान ब्रह्मसेन सिंह, हरित अनिल भटनागर, तन्मय संजय स्नेही, आदर्श देवदास राय, मोनिल दीपक शहा, महंमद अश्फाक आलम झैंन (रा. उत्तर प्रदेश), विक्रांत मदनगोपाल शर्मा (रा. हरियाणा), वृषभ राजनीभूषण जैन (रा. गुजरात), उत्कर्ष राम चौधरी, अंशुल पंकज गर्क (दोघे. रा. हडपसर, पुणे), यांच्यासह काही मुलींवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. सर्वांना वडगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. उपाधीक्षक विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार करणारा रेक्टर अटकेत

0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

पुणे विद्यार्थी वसतिगृहातील अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेक्टरला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. मोरेश्वर महादेव काणे (वय ६०, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या रेक्टरचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यार्थी वसतिगृहाचा मोरेश्वर काणे रेक्टर आहे. संबंधित मुलगा वसतिगृहात राहतो. काणे याने पीडीत मुलाला त्याच्या कार्यालयात बोलावून त्याच्यासोबत लैंगिक चाळे केले. हा प्रकार मुलाने सुरुवातीला कोणालाही सांगितला नाही. त्याने आजारी पडल्याचे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. त्याने घरच्यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी रेक्टरविरुद्ध तक्रार दिली. रेक्टर काणेला विशेष कोर्टासमोर मंगळवारी हजर केले. त्याने वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांना सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी बाकी आहे. त्याच्याकडे तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. कोर्टाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संस्थेने रेक्टरला निलंबित केले आहे. 'विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. याप्रकरणात पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य संस्था करेल. घडलेली घटना ही दुदैवी असून या घटनेचा संस्थेकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दोषींना संस्था कधीही पाठीशी घालणार नाही,' अशी माहिती पुणे विद्यार्थी गृहाकडून देण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणी अटक

पिंपरीः औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात पिंपरी पोलिसांनी आणखी एकास मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात तिघांना अटक झालेली आहे. गणेश काळे या लिपिकास मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. सीताराम पंडित आणि ज्योती भोळे या दोघांना रविवारी रात्री अटक केली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत.

डॉक्टर प्रशांत विठ्ठल देसाई (५४, रा. चिंचवड स्टेशन, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई कुटुंबीयांनी औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या चिंचवड, संभाजीनगर, आकुर्डी शाखेत सन २००६पासून मुदत ठेवी ठेवल्या होत्या. त्यापोटी चार कोटी १९ लाख ६७ हजार ५४२ रुपये येणे होते; मात्र पतसंस्थेतील आजी-माजी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून देसाई ठेवीदारांच्या नावाने खोटे कर्ज फॉर्म तयार केले.

मुलाची आत्महत्या

पिंपरीः चौदा वर्षांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रद्युम्न अल्लाभक्ष लंगोटी (वय १४, रा. श्रीकृष्णनगर, कोकणेनगर, काळेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न याने राहत्या घरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या विद्यार्थिनीची खडकीत आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सिद्धी संतोष जावळे (वय १७ रा. नर्सेस क्वार्टर, खडकी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्याने नैराष्य आल्याने तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धी जावळे ही खडकीच्या सी. के. गोयल महाविद्यालयात बारावी कॉमर्सला शिकत होती. सोमवारी संध्याकाळी ती शिकवणीहून घरी आली. घरात सर्वजण होते. कपडे बदलण्यासाठी ती बेडरूममध्ये गेली. बराचवेळ ती बाहेर आली नसल्याने तिच्या चुलत्यांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला, तेव्हा सिद्धीने छतावरील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

सिद्धीचे वडील संतोष हे खडकी कँटोन्मेंटमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत, तर चुलते अमित हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. आजोबा बोर्डाच्या अग्निशामक दलामध्ये कामाला होते, तर आई गृहीणी आहे. दहावीला तिला ६७ टक्के मार्क मिळाले होते. त्यानंतर तिने सी. के. गोयल महाविद्यालयात काँमर्समध्ये प्रवेश घेतला होता. अभ्यासामध्ये ती हुशार होती. कविता करण्याचाही तिला छंद होता. वडिलांच्या कष्टाचे चिज करण्याचे ध्येय तिने मनाशी बाळगले होते. ती नेहमीच तसे बोलून दाखवत असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

घरात खेळीमेळीचे वातावरण होते. मुलगी असे काही करेल यावर अद्यापही विश्वास बसत नाही. पोलिसांना तपास करताना त्यांच्या घरी शिकवणीतील परीक्षा पेपर सापडला, ज्यामध्ये तिला कमी मार्क पडल्याचे दिसून येते. त्यामुळे कदाचित परीक्षेत कमी मार्क पडल्याच्या नैराष्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मावळात अवैध धंदे चालू देणार नाही’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मावळ तालुक्यातील राजकीय व्यक्तींचे गेल्या चाळीस दिवसांत झालेले खून, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्याशी बुधवारी सविस्तर चर्चा करणार आहे. या भागात अवैध धंदे चालू देणार नाही, असे मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

शहर-जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्या खूनाच्या आणि मावळात चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत सविस्तर वृत्त 'पोलिस राउंड' या सदरात 'मटा'मध्ये मंगळवारी (१५ सप्टेंबर) प्रसिद्ध झाले. त्यानंतर भाजप आमदार बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले. लोणावळा ते देहूरोड पट्यातील अवैध धंदे चालू देणार नसल्याचेही आमदार भेगडे म्हणाले.

वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन कामशेत पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या वेळी तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिस अधीक्षकांची चर्चा करून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या सव्वा महिन्यात मावळात स्थानिक तीन, तर पिंपरी-चिंचवड आणि वडकीनाला या ठिकाणी प्रत्येकी एका स्थानिक नेत्याचा खून झाला. यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यातच लोणावळा येथे ग्रामपंचायत सदस्य आनंद शिंगाडे यांचा खून अवैध धंद्याला विरोध करण्यावरून झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे. दरम्यान, मावळातील अवैधधंद्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश डॉ. जय जाधव यांनी सर्व उपअधीक्षकांना दिले आहेत. तसेच ज्या उपाधीक्षकांच्या विभागात अवैध प्रकार चालत असतील, त्या अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी गमावण्याची भीती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'जेएनएनयूआरएम' अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीपैकी सुमारे सातशे कोटी रुपये प्रकल्प अपूर्णतेमुळे परत करण्याची भीती पिंपरी-चिंचवड महापालिकेला वाटू लागली आहे. त्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जाब विचारण्याची मागणी नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी केली आहे. मात्र, तूर्तास असे कोणत्याही प्रकारचे निर्देश नाहीत, असे प्रकल्पाचे समन्वयक नीळकंठ पोमण यांनी स्पष्ट केले आहे.

तत्कालिन काँग्रेस आघाडी सरकारने २००७मध्ये जाहीर केलेल्या 'जेएनएनयूआरएम' योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश झाला होता. त्यानुसार या शहरासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाचे १८ प्रकल्प मंजूर झाले. त्यापैकी झोपडपट्टी पुनर्वसन, स्वस्त घरकुल, बीआरटीएस, पावसाळी गटार, पवना थेट जलवाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, जलनिःस्सारण टप्पा क्रमांक एक आणि दोन हे प्रकल्प आजही पूर्णत्वास गेलेले नाहीत. या प्रकल्पांना २०१७पर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी स्वस्त घरकुल आणि पवना थेट जलवाहिनी प्रकल्पांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मंजूर आराखड्यानुसार केंद्र सरकारने एक हजार २३६ कोटी रुपये, राज्य सरकारने ७७१ कोटी ८४ लाख रुपये देणे अपेक्षित आहे; तसेच महापालिकेने स्वहिश्श्याचे ७२२ कोटी ५४ लाख रुपये खर्च करणे अपेक्षित आहेत. कामाच्या टप्प्यानुसार महापालिकेला केंद्र सरकारकडून एक हजार पाच कोटी रुपये, राज्य सरकारकडून ४६० कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, आठ वर्षांनंतरही यातील अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. केवळ भूमिपूजने उरकण्यात आली, याकडे सावळे आणि शेंडगे यांनी लक्ष वेधले आहे.

मंजूर प्रकल्पांच्या कामांना अपेक्षित गती नसल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने ३६१ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिलेला नाही. मुदतवाढीनंतरही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्यास हा निधी नऊ टक्के व्याजासह परत करावा लागण्याची भीती आहे. निगडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प 'रेडझोन'च्या कात्रीत अडकला आहे, तर पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी मिळालेला निधी व्याजासह परत करण्याची नामुष्की ओढवू शकते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या चिखली येथील जागेत १३ हजार २५० स्वस्त घरकुलांचा प्रकल्प गाजावाजा करीत जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात येथे सहा हजार ७२० घरेच बांधण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्प्याबाबत ठोस नियोजन नाही. त्यामुळे २०१७पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे या प्रकल्पांचाही निधी केंद्र आणि राज्य सरकारला परत करण्याची वेळ येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images