Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यात निर्माण होतेय ‘टेक्नोटिचर्स’ची फळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अमुलाग्र बदल अनुभवणाऱ्या शिक्षणक्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राज्यात तंत्रज्ञानाच्या बळावर काम करणारी 'टेक्नोटिचर्स'ची फळी उभी राहात आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवरच्या शैक्षणिक चर्चा असोत, वा व्हिडिओ क्लिप निर्मितीतून अवघड विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठीचे प्रयत्न असोत, सर्वच पातळ्यांवर हे 'टेक्नोटिचर्स' तंत्रज्ञानाधारीत आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होत आहेत.

शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वाढता वापर विचारात घेता राज्यात शिक्षण खात्यानेही शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करू शकणाऱ्या शिक्षकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न 'टेक्नोटिचर्स'च्या माध्यमातून सुरू केला आहे. सध्या राज्यातील ३,३०६ शिक्षकांनी वेबसाइटवर नोंदणी केली आहे. यात राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग आहे. केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर दुर्गम आणि ग्रामीण समजल्या जाणाऱ्या भागातूनही तंत्रज्ञानाचा वापर करण्याची इच्छा असणारे शिक्षक या व्यासपीठावर एकत्र आले आहेत. आगामी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकप्रतिनिधींशी केलेल्या चर्चेमधून राज्यात शिक्षकांचीही जेन-नेक्स्ट निर्माण होत असल्याचे अनुभवायला मिळत आहे.

शिक्षण खात्यातील अधिकारी आणि राज्यातील शिक्षकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप असलेल्या 'टेकसेव्ही टिचर्स'' गटात एकूण ८९ शिक्षकांचा समावेश आहे. त्यासोबतच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) माध्यमातून सुरू झालेल्या व्हिडिओ क्लिप निर्मितीच्या गटात राज्यातील १२ शिक्षकांचा समावेश आहे. हे दोन्ही गट शिक्षकांच्या अध्यापन क्षमता उंचावण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या शिक्षकाने 'मटा'शी बोलताना मांडला. डिसले म्हणाले, 'व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर आम्ही शाळेमध्ये कोणत्या प्रकारचा प्रोजेक्टर वापरावा इथपासून ते शाळेत बंद पडलेला कम्प्युटर सुरू करण्यासाठी नेमके काय करावे इथपर्यंतच्या सर्व बाबींविषयी मोकळेपणाने चर्चा करतो. या ग्रुपमध्ये खात्यातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याने, त्यांच्या माध्यमातून आमच्या अडचणींवर प्रशासकीय मदतही तातडीने उपलब्ध होत आहे. ही बाब शिक्षकांसाठी खूपच प्रेरक ठरत आहे.'

म्हसवड येथील बालाजी जाधव या शिक्षकानेही असाच प्रकारचा अनुभव मांडला. जाधव स्वतःच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपले कार्य शाळेच्या नियमित वेळेनंतरही विद्यार्थी आणि गरजू शिक्षकांपर्यंत पोहोचवित आहेत. ते म्हणाले, 'शिक्षकांनी साध्या-सोप्या भाषेत कसे शिकवावे, प्रशासनाने विद्यार्थी- शिक्षकांसाठी सुलभ ठरेल अशा योजना कशा राबवाव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत.'

आमच्या ब्लॉग्स आणि वेबसाइटवर आम्हाला येणारे प्रश्न, त्यांची संख्या आणि त्यामधील प्रश्नांचे स्वरुप विचारात घेता, इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचे महत्त्व पटल्याचे ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्यप्रेमींचा प्रवाहो अंदमानात दाखल

$
0
0

chinmay.patankar @timesgroup.com

पोर्ट ब्लेअर (अंदमान) : स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेला आदर आणि अंदमानबाबत असलेल्या औत्सुक्यामुळे विविध प्रांतातील साहित्यप्रेमी विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल होत आहेत. ऑफबीट डेस्टिनेशन आणि महाराष्ट्र मंडळ यांच्यावतीने येत्या शनिवार आणि रविवारी विश्व साहित्य संमेलन आयोजिण्यात आले आहे. या संमेलनासाठी आतापर्यंत दीडशेहून अधिक साहित्यप्रेमी दाखल झाले असून, उर्वरित अजून दोनशे साहित्यप्रेमी लवकरच दाखल होणार आहेत. साहित्य आणि पर्यटन यांचा मिलाफ या संमेलनामुळे जुळून आल्याचा आनंद साहित्यप्रेमींनी व्यक्त केला. काही साहित्यप्रेमींशी संवाद साधून संमेलनाला येण्यामागील प्रेरणा जाणून घेतली.

इंदूरहून आलेले आर. एस. हर्देकर म्हणाले, 'या पूर्वी कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र, साहित्य, सावरकरांविषयीचे प्रेम आणि अंदमानविषयी असलेल्या औत्सुक्यामुळे विश्व संमेलनाला यावेसे वाटले. सावरकरांचे बरेचसे साहित्य वाचले आहे. सावरकरांच्या पुतळ्याचे इंदूरला अनावरण करण्याच्या कार्यक्रमालाही उपस्थित होतो. या संमेलनाच्या निमित्ताने भटकंती आणि साहित्य असा दुहेरी योग जुळून आला आहे.' नगरच्या स्नेहालय या स्वयंसेवी संस्थेशी निगडित मीरा क्षीरसागर, विद्या नाईक आणि ज्योती राठोड या तीन मैत्रिणी पुण्याहून संमेलनाला आल्या आहेत. 'आम्हाला वाचनाची आवड आहे. सावरकरांचे साहित्य पूर्वीच वाचलेले आहे. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन पाठवलेले अंदमान पाहायचे होते. संमेलनाला असलेली सावरकर आणि अंदमानची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. या संमेलनामुळे अंदमानमध्ये वास्तव्याला असलेल्या मराठी माणसांना प्रोत्साहन मिळेल. तसेच, येत्या काळात अंदमानमध्ये मराठी संस्कृती वाढीस लागेल,' अशी भावना त्यांनी

व्यक्त केली.

मुंबईच्या रवीन पाटील यांनी १९९२मध्ये अंदमान पाहिले आहे. त्यावेळी सावरकरांना ठेवलेल्या खोलीत बसून कविताही केल्याची आठवण ते सांगतात. या पूर्वी सॅन होजे आणि सिंगापूर येथे झालेल्या विश्व संमेलनांनाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. मात्र, अंदमानच्या संमेलनाला येण्याची त्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे. 'मराठीवर इंग्रजीचे आक्रमण होत असताना विश्व संमेलनातून इतर प्रांतातील मराठी भाषिक एकत्र येण्यास, भाषा टिकण्यास मदत होईल. संमेलनात मान्यवर काय विचार मांडतात त्यात मला रस आहे. घुमानच्या संमेलनाने संस्कृतीचे दर्शन घडले. आता अंदमानच्या संमेलनातून काय घडणार याची उत्सुकता आहे,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ मार्च ते २९ मार्च, २०१६ दरम्यान बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, राज्यातील नऊ विभागीय बोर्डांच्या माध्यमातून या परीक्षांचे आयोजन होणार आहे. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी १८ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात लेखी परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांवर परीक्षांचे दडपण येऊ नये, या पद्धतीने हे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले हे वेळापत्रक लेखी परीक्षेपूर्वी शाळा- कॉलेजकडे येणाऱ्या छापील वेळापत्रकानंतरच अंतिम समजावे. छापील वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन बोर्डाने गुरुवारी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रसारभारती’च्या नावे भरती

$
0
0

kuldeep.jadhav @timesgroup.com

पुणे- प्रसारभारतीच्या किसान वाहिनीसाठी 'पत्रकार' म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली येथे तुम्हाला एक महिन्याचे पत्रकारितेचे ट्रेनिंग दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान १८ हजार रुपये आणि कामावर रूजू झाल्यानंतर दरमहा २५,५०० रुपये वेतन दिले जाईल. तत्पूर्वी, सुरुवातीला प्रशिक्षण शुल्क आणि अनामत रक्कम म्हणून १२,५०० रुपये जमा करावेत... प्रसारभारतीच्या बनावट लेटरहेडवर अशा प्रकारची नियुक्तीपत्रे पाठवून नोकरीच्या शोधात असलेल्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे.

प्रसारभारतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी शेती विषयक घडामोडींसाठी देशपातळीवर 'किसान' ही हिंदी वाहिनी सुरू केली. त्यासाठीची भरती प्रक्रियाही त्याचवेळी पूर्ण करण्यात आली असून, कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची निवडही केली. भरतीप्रक्रियेवेळी देशातील सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता पुणे, नगर आणि राज्यातील नागरिकांना प्रसारभारतीची बनावट नियुक्ती पत्रे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी काहींनी नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर दूरदर्शनच्या पुणे केंद्रात संपर्क साधला, असता हा सर्व प्रकार बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, काही व्यक्तींनी पैसेही जमा केले आहेत. त्यानंतरही समोरून काहीच पत्रव्यवहार न झाल्याने त्यांनी दूरदर्शनशी संपर्क साधला. निवड झालेल्या उमेदवारांना पत्रकारितेचे प्रशिक्षण दिल्ली येथे दिले जाणार होते. त्यानंतर पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, दूरदर्शन 'किसान'चे ओळखपत्र दिले जाईल, असे बनावट नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. असाच प्रकार उत्तरप्रदेश, बिहार येथेही घडल्याचे प्रसारभारतीच्या दिल्ली येथील कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर कळाले. कोणत्याही प्रकारची नोकरभरती सुरू नसल्याचे प्रसारभारतीने स्पष्ट केले आहे.

बनावट नियुक्तीपत्रे वाटतात अस्सल

स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छोट्या जाहिरातींमध्ये या बनावट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुकांनी जाहिरातीत नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर नाव आणि पत्ता मेसेज करण्यास सांगितले जाते. हा मेसेज पाठविल्यानंतर ठरावीक दिवसांनी त्यांच्या घरी थेट नियुक्तीपत्र प्राप्त होते. नियुक्ती पत्रासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांचा नमुना हा खऱ्या कागदपत्रांशी तंतोतंत जुळणारा आहे.

संपर्क क्रमांक 'किसान'च्या नावे

या बनावट जाहिरातीमध्ये देण्यात आलेला ०७०५३४७१०३८ हा क्रमांक एका अँड्रॉइड अॅप्लिकेशनवर शोधला असता, तो 'किसान' नावाने नोंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उमेदवारांचा चटकन विश्वास बसला. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन दूरदर्शनच्या पुणे केंद्राचे प्रमुख प्रमोद चोपडे यांनी केले.

शहरांनुसार अनामत रकमा

या फसवणूक प्रकरणात 'किसान'च्या पत्रकारासाठी देण्यात येणारे वेतन शहरानुसार भिन्न आहे. पुण्यात २२, ५०० रुपये, तर नगरला २५,५०० रुपये वेतन देऊ केले आहे. पुणे आणि नगरच्या उमेदवारांसाठी अनामत रक्कम अनुक्रमे १२, ५०० रुपये आणि १४, ५०० रुपये आकारण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसात १३ लाचखोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांवर बडगा उगारला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी एकाच दिवशी १३ ठिकाणी सापळे रचत लाचखोरांना गजाआड करण्यात आले. त्यात पुणे परिक्षेत्रात चार ठिकाणी कारवाई झाली. गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८५६ लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले असून, पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक १५९ गुन्हे दाखल झाले आहेत.

'एसीबी'ने लाचखोर सरकारी नोकरांना वठणीवर आणण्यासाठी सापळ्यांचा धडाका लावला आहे. तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, अॅप, हेल्पलाइनच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून गुरुवारी एकाच दिवसांत राज्यात १३ ठिकाणी सापळे रचून लाचखोरांना गजाआड करण्यात आले.

पुण्यात राज्य राखीव दलाच्या हवालदाराला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी डॉक्टरला गजाआड करण्यात आले. सांगली येथे गट फोडून त्याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी लाच मागणारा तलाठी गजाआड झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. विहीर नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणारा तलाठी गजाआड झाला; तसेच पंढरपूर तहसील कार्यालयातही सापळा रचण्यात आला. रस्त्यासाठी सहा गुंठे जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळावी, याचा अहवाल देण्यासाठी सर्कलने लाचेची मागणी केली होती. त्यालाही गजाआड करण्यात आले आहे.

राज्यात यावर्षी सर्वाधिक ८५६ सापळे रचून लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. सर्वाधिक लाचखोर पकडण्याचा मान पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाला आहे. गेल्या सात महिन्यांत १५९ सापळे रचण्यात आले आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद परिक्षेत्राने लाचखोरांना पकडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांत अंमली पदार्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मुंबईतील दोघा तस्करांनी पुण्यातील तीन कॉलेजांच्या आवारात 'मॅफेड्रॉन' (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा रोड, टिळक रोड आणि लष्कर परिसरातील कॉलेजांच्या आवारात 'एमडी'ची विक्री करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत पंधरा वेळा अंमली पदार्थांची विक्री झाली आहे. काही विद्यार्थ्यांनीच पोलिसांना ही माहिती दिल्याने आरोपी गजाआड झाले.

खडक पोलिसांनी अब्दुल हमीद अयुब काझी (वय ३७) व अब्दुल आहद फरीद अब्बासी (२४, दोघेही रा. मुंबई) यांना नुकतीच अटक केली. त्यांनी वरील तिन्ही कॉलेजच्या परिसरात 'एमडी'ची विक्री केल्याची कबुली दिली आहे. या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना 'एमडी'ची विक्री करणाऱ्या एजंटांचा शोध सुरू असल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. मुंबईत 'एमडी'ची तस्करी करणारा हनिफ नावाचा वितरक आहे. त्याच्याकडून काझी आणि अब्बासी 'एमडी' खरेदी करतात. खडक पोलिसांनी या आरोपींना शुक्रवार पेठेतील एका कॉलेज परिसरातूनच अटक केली होती. त्यांच्याकडून १७४ ग्रॅम वजनाचे, ५.५० लाख रुपयांचे 'एमडी' आणि दोन इलेक्ट्रिक वजनकाटे जप्तही केले होते.

सातारा रोडवरील कॉलेज परिसरात या आरोपींनी नऊ वेळा 'एमडी'ची विक्री केली. येथील इस्माइल आणि शाकीर या दोघा एजंटांनी अंमली पदार्थ विकत घेतले. इस्माइल आणि शाकीर अंमली पदार्थ विद्यार्थ्यांना विकतात. काझी आणि अब्बासीने शुक्रवार पेठेतील ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात दोनदा, तर टिळक रोडवरील नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात तीनदा 'एमडी'ची विक्री केली आहे. या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या एजंटांनी 'एमडी' खरेदी केला. गेल्या तीन वर्षापासून अमली पदार्थांचा हा व्यापार सर्रास सुरू आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गीकरणातून करा रस्तेदुरुस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या पाणीपुरवठा, मल:निस्सारण, तसेच विविध विभागांच्या वतीने रस्त्यांची खोदाई केल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वर्गीकरणाच्या माध्यमातून तरतूद उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. येत्या मंगळवारी (८ सप्टेंबर) होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. डिफर्ड पेमेंट पद्धतीने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठीची बारा कोटी रुपयांची तरतूद या वर्गीकरणातून द्यावी, असे या प्रस्तावात प्रशासनाने म्हटले आहे. शहरातील विविध भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर शासकीय कंपन्यांबरोबरच महापालिकेचा पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागामार्फत अनेक कारणांसाठी रस्ते खोदाई केली जाते. यासाठी पालिकेच्या पथ विभागाकडून रितसर प्रस्तावाची छाननी करून प्रचलीत धोरणानुसार रस्ते खोदाईसाठी मान्यता देण्यात येते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागामार्फत दुरूस्तीची कामे पथ विभागाकडून केली जातात. सद्यस्थितीमध्ये पथ विभागाकडे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांबरोबरच पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागामार्फत अंदाजे दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाईबाबतचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यानुसार चालू वर्षी बारा कोटी रुपये रक्कम रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार असून, दुरुस्ती कामांसाठी पथ विभागाकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नाही‌.

रस्त्याची डागडुजी तसेच दुरुस्तीची कामे करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी बारा कोटी रुपयांची टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ही कामे क्षेत्रीय स्तरावरूनच करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सूचना दिल्याने हे टेंडर मान्य झाल्यानंतरच क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे विविध भागातील मुख्य रस्ते डिफर्ड पेमेंट पद्धतीने विकसित करण्याची तरतूद या कामांसाठी द्यावी, असे या प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. बारा कोटी रुपयांची तरतूद मान्य झाल्यास रस्ते दुरुस्तींची कामे तातडीने करता येणे शक्य असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचे बजेट ३३४.७७ कोटी रुपयांचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने चालू वर्षासाठी ३३४ कोटी ७७ लाख रुपयांचे बजेट स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळाने यंदा आपल्या बजेटमध्ये ४९ कोटींची वाढ केली असून, कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, कार्यालयीन खर्चात वाढ दाखविण्यात आली आहे. हे बजेट सादर करताना शिक्षण मंडळाने सेवकवर्गाच्या पगारासाठी वाढीव रक्कम प्रस्तावित केल्याने रजा मुदतीमधील शिक्षकांनाही पूर्ण वेतन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने कायद्यानुसार शिक्षण मंडळाचा कारभार महापालिकेकडे आला होता. त्यामुळे दरवर्षी शिक्षण मंडळ सदस्य करीत असलेले बजेटदेखील महापालिकेकडून तयार करण्यात आले होते. त्यानुसार २८५ कोटी ७८ लाख पन्नास हजार रुपयांचे शिक्षण मंडळाचे बजेट मान्य करण्यात आले होते. त्यामध्ये आता ४८ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांची वाढ शिक्षण मंडळाकडून सुचविण्यात आली आहे. इमारत खर्च, शैक्षणिक खर्च, सहली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजनासाठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या बजेटमध्ये १८९ कोटी रुपये सेवकवर्गाच्या पगारासाठी तर सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी ६५ कोटी रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी (८ सप्टेंबर) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव समितीसमोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बीचे क्षेत्र ७० लाख हेक्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाअभावी राज्यातील नापेर राहिलेले खरीपाचे साडेदहा लाख हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांकडे वळविण्याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. हे क्षेत्र वाढल्याने रब्बी पिकाच्या लागवडीखाली यंदा किमान ७० लाख हेक्टर क्षेत्र येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली.

रब्बी पिकांचे नियोजन करताना हरभरा डाळीवर अधिक भर देण्यात येणार आहे. डाळींच्या उत्पादनाला अपुऱ्या पावसाचा फटका बसल्याने डाळींचे भाव कडाडले आहेत. तसेच, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत कडधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी कडधान्याच्या लागवडीत वाढ करण्याची केंद्राची सूचना आहे. त्या पार्श्वभूमीवर डाळी लावण्यासंदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सल्ला दिला जाणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. पावसाळ्याचे अडीच महिने कोरडे गेल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. मात्र, हा पाऊस पुरेसा नसल्याने खरीपाचे १०.५० लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. या क्षेत्रावर आता रब्बी पिके लावण्यासाठी कृषी खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे. राज्यात रब्बीचे ६२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. खरीपामध्ये नापेर राहिलेल्या क्षेत्रामुळे यंदा रब्बीमध्ये सुमारे ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बियाणे, खतांचे नियोजन करण्यात आले असल्याचेही देशमुख म्हणाले.

यंदा खरीपाच्या ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तथापि, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पिकांची स्थिती फारशी चांगली नाही. विदर्भ, कोकणातील पिकांची स्थिती तुलनेने चांगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसाळ्यात हिवाळा मुक्कामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातून पाऊस गायब असला, तरी पारा घसरल्याने वातावरणात चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. शहरात गुरुवारी ३०.८ अंश सेल्सियस इतके कमाल तर १८ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले. परिणामी, दिवसा कडक ऊन तर रात्री गारवा असे विषम हवामान पुन्हा शहरात जाणवत आहे. शहरात शुक्रवारी पावसाच्या एक-दोन सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण असले, तरी शहरात क्वचितच पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. दिवसा अनेकदा कडक उन्हामुळे अंगाला चटके बसत असून हवेतही उकाडा जाणवत आहे. तर रात्री व पहाटे तापमानात घट झाल्याने गार वारे वाहून हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. गुरुवारी शहरात नोंदले गेलेले कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सियस हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक असून, कमाल तापमान १८ अंश सेल्सियस हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक आहे. राज्याबरोबर देशातही अनेक राज्यात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यात केवळ परभणी येथे ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात राज्यात विदर्भात तुरळक तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात पावसाच्या एक दोन सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यनिर्मितीचे पाणी तोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दुष्काळी परिस्थितीत आधी बीअर आणि मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी तोडा, मगच साखर कारखान्यांकडे वळा,' असा टोला सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी सरकारला लगावला. कर्जमाफी ही बँकांच्या फायद्यासाठी नको, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी साखर कारखान्यांना गाळप न देण्याची भूमिका कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मांडली आहे. त्यावर शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 'राज्यात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास धरणांतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची वेळ येणार आहे. मात्र, साखर कारखान्यांचे गाळप बंद करून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न आहे. मराठवाड्यात औरंगाबाद आणि राज्याच्या अन्यही भागांत बीअर आणि मद्यनिर्मितीचे अनेक कारखाने लाखो लिटर पाणी वापरत आहेत.

एक लिटर बीअर तयार करण्यासाठी ६७ लिटर पाणी लागते, तर एक किलो साखर बनविण्यासाठी अडीच लिटर पाणी लागते.

दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे, त्याला पाणी देऊन झाल्याने तेथे पाण्याची गरज नाही, त्यामुळे कारखान्यांचे गाळप बंद करणे, हा पहिला उपाय ठरू शकत नाही,' असे त्यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील खुनांना वाचा फुटेना

$
0
0

Shrikrishna.Kolhe @timesgroup.com

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या सात वर्षांत झालेल्या खुनांपैकी ७३ गुन्ह्यांचा तपास अद्याप उघडकीस आलेला नाही. त्यांपैकी ५६ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने, या गुन्ह्यांच्या फायली बंद करण्यात आल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लागत नसतानाच पुण्यात 'अनडिटेक्ड मर्डर'चे प्रमाणही लक्षणीय असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या सात वर्षांत सातशेहून अधिक खून झाले आहेत. त्यांपैकी बरेचशे गुन्हे दाखल होतानाच उघडकीस येतात. आपआपसांतील वैमन्यासातून खून होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, 'आयटी' इंजिनीअर दर्शना टोंगारे, अलुरकर म्युझिक हाऊसचे सुरेश अलुरकर, हरी ढमढेरे, निखिल राणे, आशा लगड; तसेच पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षकाचा खून, अशा विविध व्यक्तींचे खून उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

पुणे शहरात दरवर्षी सरासरी १०० ते १२० खुनाचे गुन्हे घडतात. गेल्या काही वर्षांत खुनाचे गुन्हे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपसातील वादामुळे होणारे गुन्हे लगेचच उघडकीस येतात. मात्र, ​गुन्हेगारांकडून नियोजनबद्ध केलेल्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याचेही उघडकीस येत आहे. 'अनडिटेक्ट मर्डर' उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेत हो​मिसाइड पथक तयार करण्यात आले आहे. मात्र, या पथकाकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नाही.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण आटले; निर्णय लटकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाचे सावट दिवसागणिक गडद होत असताना पुण्याचे कारभारी पाणीकपातीचा निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने धरणांमधील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन करण्याऐवजी पाणीकपातीचा निर्णय टाळण्याच्या भूमिकेमुळे परवाचे पाणीसंकट उद्याच ओढवून घेण्याची वेळ पुण्यावर येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत तरी पाणीकपातीबाबत निर्णय होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतच पाणीकपातीचा निर्णय घेण्यास बगल देऊन 'आणखी पंधरा दिवस वाट पाहू,' अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली होती. तर महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या गैरहजेरीत पाणीकपातीचा निर्णय घेणे महापालिका प्रशासनाने टाळले होते. पाऊस नसल्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास पुढील जुलैपर्यंत पुणेकरांना पाणी पिण्यासाठीही पुरणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत पाणीकपात करावी, अशी मागणी शहरातील संस्था, संघटना तसेच नागरिकांकडून होत आहे.

'पालकमंत्री बापट यांनी ऑगस्टमधील बैठकीत पाणीसाठ्याचा आढावा घेतला. याच बैठकीत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज दिला. मात्र, अजून काही दिवस वाट पाहू, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याने इच्छा असूनही प्रशासनाला निर्णय घेता आला नाही,' असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला. 'महापौर धनकवडे सध्या परदेश दौऱ्यावर गेल्याने गंभीर परिस्थितीत प्रशासनाने कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता तातडीने पाणीकपात सुरू करावी, अशी मागणी आपण आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. मात्र महापौरांच्या अनुपस्थितीत निर्णय घेण्याची धमक प्रशासनाकडे नसल्याने एक आठवडा कोणताही निर्णय झाला नाही,' असे उपमहापौर आबा बागूल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकवडे हत्या: कट रचून सूत्रधार 'बालाजी'चरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येचा कट रचणारा आरोपी अमोल वहिले हा टेकवडे यांना संपवण्याचा प्लान करून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला होता, असं तपासात उघड झालं आहे.

पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखेने पुणे एअरपोर्टवरून आज पहाटे तीनच्या सुमारास वहिले याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर लवकरात लवकर जामीन मिळावा, असं साकडं घालण्यासाठी चार दिवसांपूर्वीच तो तिरुपतीच्या दर्शनाला गेला होता, असं सांगितलं जात आहे. टेकवडे यांची गुरुवारी हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. त्यावेळी या कटाचा सूत्रधार वहिले हा तिरूपतीला असल्याचं व शुक्रवारी पहाटे विमानानं पुण्यात दाखल होणार असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला विमानतळावरच गाठून अटक केली. टेकवडे यांचे हल्लेखोर मात्र अद्याप फरार आहेत.

गोठ्यावरून झाला खून?

वहिले हा पूर्वी टेकवडे यांचाच कार्यकर्ता होता. कालांतराने त्यांच्याच वितुष्ट आले होते. वहिले याचा दूधाचा व्यवसाय होता. मोहननगरमध्ये त्याच्या जनावरांचा गोठा होता. काही दिवसांपासून हा गोठा येथून हलवावा यासाठी महापालिकेचे अधिकारी वहिले याच्याकडे जात होते. टेकवडे यांच्याशी संबंध बिघडल्यानं तेच ही कारवाई करायला सांगत असल्याची शंका वहिलेनं बोलून दाखविली होती. या रागातूनच त्यानं टेकवडे यांचा खून केला असावा, असं बोललं जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा

$
0
0

मटा ऑनलाइन । पुणे

पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाचे सावट दिवसागणिक गडद होत असून पुण्यात आता दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आल्याचे अखेर पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

पुण्यात चार धरणांमध्ये सध्या १४ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी कपातीचा निर्णय न घेतल्यास पुढील जुलैपर्यंत देखील हा पाणी पुरणार नाही, असे चित्र होते. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुण्यात ४० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ७ सप्टेंबरपासून ही कपात लागू होणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतच पाणीकपातीचा निर्णय घेण्यास बगल देऊन 'आणखी पंधरा दिवस वाट पाहू,' अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली होती. तर महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या गैरहजेरीत पाणीकपातीचा निर्णय घेणे महापालिका प्रशासनाने टाळले होते. पाऊस नसल्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास पुढील जुलैपर्यंत पुणेकरांना पाणी पिण्यासाठीही पुरणार नाही असे चित्र होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत पाणीकपात करावी, अशी मागणी शहरातील संस्था, संघटना तसेच नागरिकांकडून होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्याने झाली दारूचे अड्डे

$
0
0

राजेश माने, खडकी

देशाच्या संरक्षणासाठी दारूगोळा तयार करणाऱ्या कामगारांसाठी खडकी कँटोन्मेंटच्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये वसाहत उभारण्यात आली होती. या भागाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी दारूगोळा कारखान्याची आहे. मात्र, येथील साफसफाई, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बसस्थानकांची दुरुस्ती यासारखी कामे कँटोन्मेंटकडे आहेत.

या वॉर्डमध्ये टाइप थ्री, टाइप सी, टाइप जे, टाइप वन, टाइप टू, टाइप टी, पॅराप्लाजिक होम, क्यूएमटीआय, बॉम्ब डिस्पोजल कंपनी वसाहत, सीएसडी डेपो, रेंजहिल्स मार्केट हा भाग येतो. दारूगोळा कारखाना व्यवस्थापन आणि खडकी कँटोन्मेंट यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि कामगार संघटनांच्या दुर्लक्षामुळे या वसाहतीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे येथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. डासांची संख्या वाढत आहे. ड्रेनेजचे घाण पाणी मोकळ्या मैदानात सोडले जात आहे. मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे येथील सांडपाणी थेट नदीमध्ये जात असल्याने नदीचेही प्रदूषण होत आहे.

गेल्या वेळी वॉर्डातून भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, यंदा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश हिवरकर यांची कन्या कार्तिकी हिवरकर यांना भाजपने संधी दिली. त्या विजयी झाल्यामुळे भाजपला खडकी कँटोन्मेंटमध्ये खाते उघडता आले.

वॉर्डातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील उद्यानांचे रूपांतर दारूच्या अड्यांमध्ये झाले आहे. भर दुपारीसुद्धा उद्यानांमध्ये लोक दारू पिताना बसलेले दिसतात. दोन इमारतींमध्ये असलेल्या भागाची साफसफाई करण्याची जबाबदारी कँटोन्मेंटकडे असली तरीही येथे साफसफाई होताना दिसत नाही. त्यामुळे जागोजागी घाण साचली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.

नगरसेवक म्हणतात...

दारूगोळा कारखआन्यातील कामगारांची वसाहत येथे आहे. त्यामुळे मोठी सर्व कामे कारखाना प्रशासन करत असते. फक्त साफसफाईचे काम बोर्डाकडे आहे. गेल्या सहा महिन्यांत बोर्डाची एकमेव बैठक झाली. त्यात वॉर्डाच्या विकासासाठी जास्त कामे मंजूर झाली नाहीत. बोर्डाचे अनेक टेंडर प्रलंबित आहेत. उन्हाळा असल्याने जागोजागी पाणपोई सुरू केल्या होत्या. उद्यान दुरुस्ती, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्ती, बुद्धविहार दुरुस्ती आदी प्रस्ताव प्रलंबित आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दारूगोळा कारखान्याबरोबर चर्चा करणे गरजेचे आहे.

- कार्तिकी हिवरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

येरवडा : इंदिरानगर झोपडपट्टीतील लाभार्थींना बीएसयूपी योजनेत घरे देण्याची मागणी करणाऱ्यांकडे पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने एका नागरिकाने पालिका उपभियंत्याच्या दालनात विष प‌िऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयात ही घटना घडल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.यासीन तांबोळी या नागरिकाने विषारी औषध प्राशन केले होते. सध्या त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. फुलेनगर भागातील इंदिरानगर झोपडपट्टीत काही वर्षांपूर्वी बीएसयूपी योजना राबविण्यात आली होती. ज्यांच्याकडे पुरेसे पुरावे होते अशा लाभार्थींना घरांचे वाटप झाले. या योजनेंतर्गत घरे मिळण्यासाठी परिसरातील नागरिक आणि आई प्रतिष्ठानचे पदाधिकारी पाठपुरावा करीत होते. मात्र, दाखल्यांअभावी योजनेचा लाभ मिळणार नसल्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी नागरिक गेले होते.

इंदिरानगर झोपडपट्टीत बाधित होणाऱ्या २९ लाभार्थींचे पालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत त्यांना बीएसयूपी योनजेचा लाभ मिळू शकत नाही.

- संध्या गागरे, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हल्लेखोरांसह सूत्रधार अटकेत

$
0
0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक अविनाश टेकवडे यांची हत्या म्हशीचा गोठा आणि केबल व्यवसायातील वादातून केल्याची कबुली या प्रकरणातील मास्टर माइंड अमोल वहिले याने पोलिसांना दिली आहे. हत्येचा कट रचून अमोल तिरुपती बालाजी दर्शनाला गेल्याचे तपासात उघड झाले आहे. अमोल याला पुणे विमानतळावरून अटक करण्यात पिंपरी पोलिस आणि गुन्हे शाखेला यश आले. हल्लेखोर घुल्या ऊर्फ किशोर विजय कुंभार (वय २२, रा. रूपीनगर) आणि बालाजी दामोदर शिंदे (वय २३, रा. चिंचवड) यांना आकुर्डीतून सहाय्यक निरीक्षक महेश सागडे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली.

अमोल विठ्ठल वहिले (वय २६, रा. वहिले चाळ, मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता अविनाश टेकवडे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश टेकवडे यांच्या हत्येचा कट पंधरा दिवसांपूर्वी वहिले याने रचला होता. तसेच घटनेच्या दिवशी शहरात न राहण्यासाठी तो एक सप्टेंबरला तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी निघून गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या खोलीत ‘स्वतंत्रते भगवती’

$
0
0

साहित्यप्रेमींची सेल्युलर जेलला भेट

पोर्ट ब्लेअर ( अंदमानः आजही पोटात गोळा आणणारे सेल्युलर जेलचे रौद्र रूप... सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी भोगलेल्या अनन्वित छळाचा इतिहास.. सावरकरांची कोठडी पाहून मनात दाटून आलेला हुंदका... स्वतंत्रते भगवतीच्या घुमलेल्या ओळी...

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंदमानात आलेल्या साहित्यप्रेमींनी शुक्रवारी सेल्युलर जेलला भेट दिली. गाइडने सांगितलेल्या माहितीतून आणि सावरकरप्रेमींच्या अभ्यासातून जेलमधील थरारक इतिहास पुन्हा जिवंत झाला. जेलमधील फाशी खोली, अंधार कोठडी, एकांतवास, जुन्या अंदमानचे फोटो साहित्यप्रेमींनी पाहिले. त्यानंतर सावरकरांची खोली पाहून भारावलेल्या साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्तपणे 'स्वतंत्रते भगवती' या गीताचे समूहगायन करून सावरकरांना मानवंदना दिली.

'स्वातंत्र्य कशाला म्हणतात याची प्रचिती सेल्युलर जेल पाहून आली. सावरकरांची खोली पाहून भारावून गेलो. स्वातंत्र्याची आजची व्याख्या किती बदलली आहे, हे अंदमानला भेट दिल्यावर कळते. सेल्युलर जेलसमोर वगळता सावरकरांचा एकही पूर्णाकृती पुतळा अंदमानात नाही. त्याचा सरकारने विचार करावा,' अशी भावना रवीकिरण डहाळे, हिंमतलाल शहा यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदमाननगरी सज्ज

$
0
0

नारळ वाढवून आज वाजणार संमेलनाचे बिगुल

Chinmay.Patankar @timesgroup.com

पोर्ट ब्लेअर (अंदमान) : अखेर चार वर्षांच्या खंडानंतर साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलनाचा योग जुळवून आणला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवाच्या वर्षात अंदमानभूमीत मराठी सारस्वतांचा जागर आयोजित केला आहे. ज्येष्ठ लेखक प्रा. शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात आजपासून, शनिवारी नारळ वाढवून होणार आहे.

ऑफबीट डेस्टिनेशन आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार आणि रविवारी विश्व संमेलन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद‍्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर निवृत्त लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी आर्थिक मदत केल्यानंतर अंदमानात संस्कृती व भाषा संवर्धन करणाऱ्या मराठीजनांसाठी शिवसेनेकडून काय घोषणा करण्यात येणार, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद‍्घाटनानंतर, सावरकरांच्या 'तेजस्वी तारे' या पुस्तकावर आधारीत कार्यक्रम, निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य, सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान, 'मला उमगलेले सावरकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावरील परिसंवाद हे कार्यक्रम दिवसभरात होणार आहेत.

'संस्कारभारती'चे आकर्षण

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संस्कारभारतीच्या वतीने रांगोळी काढण्यात आली आहे. त्यामुळे अंदमानातील मराठीजनांचा आनंद द्विगुणित झाला आहे. कित्येकजण प्रथमच रांगोळी पाहात आहेत, असे आयोजक अरविंद पाटील यांनी सांगितले. रांगोळी काढण्याबाबत संस्कारभारतीच्या वतीने पोर्ट ब्लेअरमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पारंपरिक पद्धतीने रंगणार ग्रंथदिंडी

उद‍्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघड्याच्या निनादात, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. स्थानिक मराठीजनांसह विविध ठिकाणांहून आलेले साहित्यप्रेमी मराठमोळ्या पोषाखात दिंडीत सहभागी होणार आहेत. सध्या अंदमानात निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, त्याचा भंग न करण्याची सूचना प्रशासनाने जारी केली आहे. संमेलनाला पोलिस सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था प्रशासनाकडून पुरवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images