Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षणहक्क कायद्यात सुधारणा शक्य

$
0
0

राष्ट्रीय विधी आयोगाकडून केंद्राला अहवाल सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय विधी आयोगाने शिक्षणहक्क कायद्यामध्ये सुधारणा सुचविणारा एक अहवाल केंद्रीय कायदे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना सादर केला आहे. राज्य सरकारांनी तीन वर्षांपासून पुढील बालकांनाही शिक्षणहक्क कायद्याला पूरक ठरणाऱ्या शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत.

'अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट अँड लिगल एन्टायटलमेंट्स' या विषयी कायदे आयोगाने गौडा यांना हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात शिक्षणहक्क कायद्याशी संबंधित असलेल्या मुद्द्यांचाही विचार करण्यात आल्याचे आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या अहवालाच्या प्रतीमधून सोमवारी स्पष्ट झाले. देशभरात सध्या सहा ते चौदा वयोगटासाठी शिक्षणहक्क कायद्याचे लाभ दिले जात आहेत. सहा वर्षांखालील बालकांचे हक्क विचारात घेता, या कायद्याचे लाभ तीन वर्षांपुढील बालकांनाही मिळावेत या विषयीची चर्चा या सूचनांमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षणहक्क कायद्यामध्ये योग्य ते बदल करून, वयाची अट तीन वर्षांपासून पुढील बालकांसाठीही लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षणहक्क कायद्याच्या ११ व्या कलमामध्ये राज्य सरकारांशी निगडीत बाबींमध्ये बदल करण्याच्या सूचना विधी आयोगाने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोतया ‘आयपीएस’कडे मिळाले बनावट प्रमाणपत्र

$
0
0

पुणेः कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्या तोतया आयपीएसकडे यूपीएससी पास झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने नोकरी लावून देण्याच्या अमिषाने दोघांची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या बनावट आयपीएसची पोलिस कोठडी दोन सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे आदेश कोर्टाने दिले.

श्रीकांत विलास पवार (वय २८, रा. क्लोअर पार्क सोसायटी, कोरेगाव पार्क, मूळ. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या तोतया आयपीएसचे नाव आहे. या बाबत पोलिस उपनिरीक्षक पंकज शिनगारे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा कोरेगाव पार्क परिसरात १९ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून वावरत होता. या काळात त्याने पोलिस चौकीत येऊन काही सूचनाही केल्या होत्या. मात्र, पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्यात तो तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर कोर्टाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, त्याच्याकडे तपास केला असता त्याने यूपीएससीचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी हे प्रमाणपत्र जप्त केले आहे. हे प्रमाणपत्र दाखवून त्याने किरण मोरे आणि सुभाष मोरे या काका-पुतण्याची दोन लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, तो वापरत असलेले खाकी रंगाचा गणवेश व इतर साहित्य हे भाड्याने घेतल्याचे उघडकीस आले आहे.

'लिफ्ट'च्या बहाण्याने लुटले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साताऱ्याला जाण्याच्या बहाण्याने 'लिफ्ट' देऊन पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी एका इसमाला सुमारे सव्वा लाख रुपयांना लुटले. ही घटना मुंबई-बेंगळुरू बायपासवर नवले पुलाजवळ शुक्रवारी रात्री घडली.

योगेश खैरे (वय ३५, रा. मुंबई) शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास साताऱ्याला जाण्यासाठी नवले पुलावर थांबले होते. या वेळी कात्रजकडून आलेल्या तीन चोरट्यांनी 'तुम्हाला लिफ्ट देतो', असे सांगून त्यांना गाडीत बसविले. थोड्याच अंतरावर चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये, अंगठी आणि मोबाइल असा ऐवज हिसकावून घेतला. तसेच, जवळच्या एका एटीएमवर गाडी थांबवून त्याद्वारे आणखी ९५ हजार रुपये बळकावले. त्यानंतर, संबंधित चोरट्यांनी खैरे यांना चांदणी चौकात ढकलून पोबारा केला.

विद्यार्थी, दोन मूर्तिकारांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर परिसरात सोमवारी दुपारी आणि रात्री झालेल्या रेल्वे अपघातांत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक विद्यार्थी असून, दोन जण मूर्तीकार आहेत. ससाणेनगर-रामटेकडीदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल शाळेसमोर झालेल्या अपघातात कृष्णा खंडू बिनवडे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) या विद्यार्थ्याचा अंत झाला. कृष्णा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता, तर रात्री १० च्या सुमारास गोसावी वस्तीजवळील रेल्वे ट्रॅकवर पिंटू भट (वय ३०) आणि गिरीधर भट (वय ३२, दोघे राहणार गोसावी वस्ती) या मूर्तिकारांचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या सर्व भागांत गुरुवारी पाणी बंद

$
0
0

पुणे : शहरातील सर्व जलकेंद्रांमध्ये पंपिंग, विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीची तातडीची कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (३ सप्टेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड, एसएनडीटी परिसर, एरंडवणे कोथरूड, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी व उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धिकरणाचा परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रोड, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता.

नवीन होळकर पंपिंग स्टेशन: विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा उचला; अन्यथा बांधकामे बंद

$
0
0

मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या पुणे महापालिकेला मुंबई हायकोर्टाने सोमवारी फटकारले आणि तोडगा न काढल्यास शहरातील बांधकामांवर निर्बंध घालण्यात येतील, असा इशारा दिला. येत्या दोन दिवसांत कचरा निर्मूलनाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, त्यानंतर बांधकाम बंदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लावण्यात पालिकेला अनेक वर्षांपासून अपयश येत असून, त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने विनित धांडा आणि नागरिक चेतना मंच यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्या. अभय ओक आणि न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सोमवारी त्याबाबत सुनावणी झाली. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली नाही, तर पुण्यातही बांधकामांवर प्रतिबंध घालण्यात येतील, असे सूतोवाच खंडपीठाने या वेळी केले.

घनकचरा व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे वर्गीकरण, गोळा करण्याची पद्धत, वाहतूक याबाबतचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. पुण्यात या निकषांची अंमलबजावणी होत नसल्याकडे कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले होते. कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली असून, पालिकेला येत्या बुधवारपर्यंत (२ सप्टेंबर) त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.

घनकचरा व्यवस्थापन कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी पालिका प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने पालिकेतर्फे घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती कोर्टाला देण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे वकील अभिजित कुलकर्णी यांनी खंडपीठाला दिली.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न २००७ पासून अधिक जटील बनला आहे. पालिकेतर्फे उरळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यात येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांतर्फे सातत्याने आंदोलन केले जात आहे. पालिकेने कचऱ्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारले आहेत. तरीही समस्या कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासाला दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतात दर तासाला दोघांचा मृत्यू हा हृदयविकाराने होत असल्याची धक्कादायक बाब 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड् स ब्यूरो'च्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतात गेल्या वर्षी झालेल्या एक लाख २६ हजार मृत्यूंची कारणे तपासण्यात आली. त्यात १८ हजार ३०९ नागरिकांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला. सुदैवाने, २०१३ च्या तुलनेत गेल्यावर्षी हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

'एनसीआरबी'ने गेल्यावर्षी झालेल्या अकस्मात आणि अपघाती मृत्यूंचा तौलनिक अभ्यास 'गुन्हे विषयक' अहवाल तयार करताना केला. त्यात अचानक झालेल्या मृत्यूंमध्ये हृदयविकाराचे कारण अधिक ठळकपणे जाणवले आहे. भारतात घडणाऱ्या नैसर्गिक आणि अनैसर्गिक मृत्यूच्या घटना यात तपासण्यात आल्या. अनैसर्गिक मृत्यूंमध्ये अचानक घडलेल्या मृत्यूंची कारणमीमांसा करण्यात आली. त्यामध्ये २६ हजार ५२६ व्यक्तींचा अचानक मृत्यू झाला असून त्यात हृदयविकाराने १८ हजार ३०९ नागरिक मृत्यू पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हृदयविकाराने झालेल्या मृत्यूंमध्ये १५ हजार ९१६ पुरुष; तर २ हजार ३९३ महिलांचा समावेश आहे.

भारताची लोकसंख्या वाढत असताना अनैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास चार टक्क्यांनी वाढले आहे. त्याउलट नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. 'एनसीआरबी'ने पहिल्यांदाच विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला.

त्यात अचानक झालेले मृत्यू, गर्भवतींचे मृत्यू आणि विविध कारणांमुळे झालेला विषबाधेचा अभ्यास करण्यात आला. अचानक झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने झाले आहेत. पुण्यात विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा हा अडीच हजारांच्या घरात आहे. ​विविध प्रकारच्या विषबाधेमुळे देशात २० हजार ५८७ व्यक्ती मरण पावल्या आहेत. ​विषबाधा झाली मात्र कशामुळे झाली, याचे कारण स्पष्ट न झालेले जवळपास साडे आठ हजार मृत्यू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड रोडवर ‘धबधबा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी बचत करावी, असे आवाहन करून पालिका प्रशासनाने शहरातील स्वीमिंग टँक, वॉशिंग सेंटर यांच्या पाणी वापरावर अनेक निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र दिवसरात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले आहे. शहरातील काही भागांत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती असतानाच सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी भागात मात्र कालव्यातून गळती होणाऱ्या पाण्यामुळे धबधबा तयार झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवाला धरणातून पाणी उचलले जाते. पर्वती जलकेंद्रातून हे पाणी विविध उपकेंद्रांच्या माध्यमातून घरोघर पोहचविले जाते. हे पाणी नागरिकांपर्यंत पोहचत असताना त्यात होणाऱ्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त पाइपलाइनमुळे दिवसाला ३०० एमएलडी (३० कोटी लिटर), तर वर्षाला तब्बल चार टीएमसी (सुमारे ११३ अब्ज लिटर) पाणी वाया जात असल्याची माहिती समोर आली आहे. नादुरुस्त पाणीपाइपलाइनबरोबरच खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पर्वती जलकेंद्रापर्यंत पोहचणाऱ्या पाण्यालाही फाटे फुटत असल्याचे समोर आले आहे. कालव्याच्या बाजूला मोटारी लावून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी केली जाते.

धरणापासून पर्वतीपर्यंत येणारा कालवा अत्यंत जुनाट झाल्याने त्यामधून पाण्याची गळती होते असे कारण पुढे करून पालिका प्रशासन तसेच जलसंपदा विभाग आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले आहे. वडगाव बुद्रुक येथून कालव्याच्या बाजूच्या रोडने विठ्ठलवाडीपासून थोडे अंतर पुढे आल्यानंतर होणाऱ्या गळतीमुळे धबधबा तयार झाला असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये राहणारे अनेक नागरिक अंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी तसेच आपल्या दुचाकी धुण्यासाठी या पाण्याचा वापर करतात. दिवसरात्र हे पाणी असेच वाहात असून गेल्या काही वर्षांपासून ही पाणीगळती सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

महापालिका तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ही गळती थांबत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाने मारलेल्या दडीमुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट आले असताना आता तरी प्रशासन या गळतीकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

कालवा दुरुस्त करा

शेतीचे पाणी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने या काळात कालवा बंद राहणार आहे. त्यामुळे याचे औचित्य साधून महापालिका तसेच जलसंपदा विभागाने कालव्याची दुरुस्ती करावी. यामुळे पुढील काळात कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टने दिली ७२ ची आठवण

$
0
0

त्रेचाळीस वर्षांतील नीचांकी पर्जन्यमानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक पावसाचा महिन्यांपैकी एक असलेल्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात केवळ २४.७ मिलिमीटर पाऊस होऊन सरासरीच्या २२ टक्केच पावसाची नोंद झाली. हा पाऊस गेल्या अकरा वर्षातला ऑगस्टमधील सर्वात नीचांकी आहे. यापूर्वी सर्वात भीषण दुष्काळ असलेल्या १९७२ साली पुण्यात १२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरचा ऑगस्ट महिन्यातील हा सर्वात कमी पाऊस असण्याची शक्यता आहे.

देशभरात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळा असतो; परंतु यापैकी जुलै आणि ऑगस्ट हे सर्वाधिक पावसाचे महिने म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारणपणे पुण्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी ११७.५ मिलिमीटर पाऊस होतो. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पुण्यात ऑगस्टमध्ये २८०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती; परंतु यंदा पावसाने पाठ फिरवली. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये शहरात ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

यंदा ऑगस्टमध्ये दुपारी अंगाला चटका बसेल इतके ऊन जाणवत होते. तर रात्री उशीरा आणि पहाटे शहरात काहीशी थंडी जाणवत होती. सकाळी ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले तरीही पाऊस पडत नसल्याचेच चित्र होते. हवामान विभागातर्फे एका दिवसात २.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्या दिवसाची नोंद पावसाचा दिवस (रेनी डे) अशी होते. ऑगस्टमध्ये सर्वसाधारण १०.६ रेनी डेज असतात. यंदा केवळ चारच रेनी डेज नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसात एकदाच पाणी

$
0
0

दोन दिवसांत होणार शिक्कामोर्तब; १५ टक्के कपातीचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याने १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महापौर दत्तात्रय धनकवडे पुण्यात नसल्याने येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, पिण्याचे पाणी काटेकोरपणे वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरविल्याने खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ १४.७० टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. कालवा समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणीकपातीचा निर्णय १५ दिवस लांबणीवर टाकला होता. कालवा समितीच्या बैठकीनंतर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नाहीच; उलट घट झाली आहे. त्यामुळे, तातडीच्या उपाययोजना आवश्यक असल्याने सोमवारी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत शहरात पाणीकपात करून एकदाच पाणीपुरवठा करायचा झाल्यास काय नियोजन करावे लागेल, याचा आढावा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० ते १५ टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, ही कपात लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, महापौरांसह प्रमुख पदाधिकारी शहरात नसल्याने त्यांना विश्वासात घेऊन निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. १५ टक्के कपात लागू केल्यास शहरात केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जाणार असून, सप्टेंबरमध्येही पुरेसा पाऊस झाला नाही, तर पाणीकपातीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

पाणीकपात लागू केल्यानंतर काही भागांत अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्याची माहिती घेण्यात येणार आहे. सर्व भागांत एकसमान पाणी मिळावे, यादृष्टीने नियोजन केले जात असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी वॉर्डनिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे जिल्ह्यात दोन स्फोट, १ ठार

$
0
0

मटा ऑलनाइन वृत्त । पुणे

पुण्यातील कोंढवा भागात कमी क्षमतेचा स्फोट होऊन त्यात एक ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथेही एक स्फोट झाला असून एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौकाजवळ भंगारच्या दुकानात जुन्या तोफगोळ्याचा स्फोट होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृताचे नाव अस्लम निजामुद्दीन चौधरी (वय २०, रा. मरळनगर, कोंढवा, मुळ - उत्तर प्रदेश) असे आहे. तो भंगारव्यावसायिक असून, गेल्या पाच वर्षांपासून त्याचे भंगारचे दुकान आहे. त्याचे चुलते असीम मोहम्मद चौधरी (वय ६०, रा. मरळनगर, कोंढवा) व इस्माईल मुस्तफा चौधरी (वय १८) हे दोघेजण स्फोटात जखमी झाले आहेत.

भंगार दुकानात वजन काट्याजवळ तोफगोळ्याचे मागील कवच काढत असताना हा स्फोट झाला. स्फोटात अस्लमच्या छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाच्या ठिकाणी सात इंचाचा खड्डा पडला आहे. भंगारच्या दुकानात आणखी एक जिवंत तोफगोळा सापडला असून, तो तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून स्फोट

नारायणगावमधील नंबरवाडी येथे झालेला स्फोट पूर्ववैमनस्यातून घडवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका दुचाकीवर स्फोटकं प्लांट करण्यात आली होती. या स्फोटात देवीदास बबन काळे हा व्यक्ती जखमी झाला तसेच दुचाकीही ध्वस्त झाली. पोलिसांनी घटनास्थळाहून डेटोनेटर्स आणि जिलेटीनचा साठा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक जय जाधव आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ महिन्यांत ८३० लाचखोरांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांवर कारवाईचा धडाका लावला असून, गेल्या नऊ महिन्यांत आठशे तीस लाचखोरांना पकडले आहे. लाच घेण्यामध्ये महसूल व पोलिस विभाग आघाडीवर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईमध्ये ३२ प्रकरणांनी वाढ झाली आहे. लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे.

राज्यात 'एसीबी'चे एकूण आठ विभाग आहेत. या आठ विभागांत गेल्या नऊ महिन्यांत ८३० सापळे यशस्वी झाले आहेत. तर, ३४ जणांवर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. या सापळ्यांमध्ये एक कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. तर, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात बारा कोटी ७३ लाख ३६ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सापळा रचून ५२ क्लास वन अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. तर, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात २७ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या वर्षी सापळा रचून पकण्यात आलेल्यांमध्ये महसूल विभागाचे २५९, गृहविभागाचे २४६, ग्राम विकासचे १६३, नगरविकासचे ७२, शिक्षण विभागाचे ४७ महावितरणचे ४४, तर आरोग्य विभागाच्या २८ जणांचा समावेश आहे. नागरिकांकडून मोबाईल ऍप व हेल्पलाइन वरून तक्रारीचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे.

शिक्षेचे प्रमाण वाढले

गेल्या वर्षीच्या तुलनेत लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात यावर्षी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये ऑगस्ट महिना अखेरपर्यंत ५२ गुन्ह्यात लाचखोरांना शिक्षा झाली होती. तर, या वर्षी आतापर्यंत ८१ गुन्ह्यांत लाचखोरांना शिक्षा झाली आहे. राज्यातील विविध न्यायालयात अद्याप तीन हजार सातशे ५६ खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती 'एसीबी'ने दिली आहे.

कारवाईत पुणे आघाडीवर

राज्यात लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पुण्यात १५६ लाचखोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद विभाग असून, त्यांनी १२७ जणांवर कारवाई केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग असून त्यांनी १२६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर सर्वात कमी कारवाई मुंबई विभागाने (५०) केली आहे, अशी माहिती एसीबीने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावला करणार एक्स्पोर्ट हबः सक्सेना

$
0
0

पुणे : जनरल मोटर्स इंडियातर्फे भारत हे जागतिक निर्यात केंद्र बनविण्यात येणार आहे. त्यानुसार तळेगाव येथील एमआयडीसीमधील उत्पादन केंद्राला एक्स्पोर्ट हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे निर्यातीसाठी नव्या बाजारपेठांचा शोध घेण्यात येणार असून वार्षिक उत्पादनापैकी ३० टक्के निर्यात करण्यात येणार आहे. वर्षभरात २० हजार कार निर्यात करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.

कंपनीतर्फे पुढील महिन्यापासून शेवर्ले बीट कार मेक्सिकोमध्ये निर्यात करण्यात येणार आहेत. यातील पहिल्या कारची निर्मिती मंगळवारी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जनरल मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी ही माहिती दिली. कंपनीतर्फे गुजरातमधील हलोलमधील कारखान्यातील उत्पादन तळेगाव येथील कारखान्यात हलविण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. तळेगाव हेच कंपनीचे भारतातील प्रमुख उत्पादन केंद्र आणि पर्यायाने एक्स्पोर्ट हबही बनणार आहे. केंद्राची वर्षाला वाहननिर्मितीची क्षमता दोन लाख २० हजार कारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सक्सेना म्हणाले, निर्यात हा आमच्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा व विस्तारणारा भाग आहे. उत्पादन केंद्राच्या क्षमतेच्या पुरेपूर वापरासाठी आम्ही निर्यातीसाठी अन्य बाजारपेठांच्याही शोधात आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णालयाची सुरक्षा नावालाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

आशिया खंडातील सर्वात मोठ्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रशासनाकडून पेशंटकडे पुरेसे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा घेत मागील आठ महिन्यात बारा पेशंटने पलायन केले आहे. त्यातील तीन मनोरुग्णांना त्यांच्या गावी पकडण्यात आले; तर उर्वरित नऊ जण अद्याप फरार आहेत. दिवसाढवळ्या मनोरुग्ण पळून जात असल्याने मनोरुग्णालायाची सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरुग्णालयाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार असल्याच्या केवळ घोषणा झाल्या. पण आजतागायत एकही सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाही.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थापना १९१५ साली झाली असून सुमारे १२३ एकर जागेवर विस्तारलेले आहे. सध्या रुग्णालयात सोळाशे हून अधिक मनोरुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्यावर सुमारे साडे तीनशे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. पण, कर्मचाऱ्यांकडून कामावर दुर्लक्ष होत असल्याची संधी साधून आठ महिन्यांत बारा पेशंट पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णालयाच्या परिसराभोवताली असणाऱ्या सीमाभिंत कमी उंचीच्या आहेत. तर काही ठिकाणांहून सहजपणे कोणीलाही ये-जा करता येते. मनोरुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचारी दिवस-रात्र सुरक्षा ठेवतात. मात्र दिवसभर खुले असणाऱ्या फुले नगर रोडवरील प्रवेश द्वारावर एकही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही. तसेच, कॉमर झोन आयटी कंपनीच्या एका बाजूने सहजपणे महिलांच्या वार्डात शिरता येते. अशा विविध ठिकाणी पळून जाण्यास मोकळा मार्ग असल्याने त्याचा फायदा घेत बारा पेशंटनी पलायन केले आहे. असे असतानाही प्रशासनकडून केवळ स्थानिक पोलिस चौकीमध्ये पेशंट हरविल्याची नोंद केली जाते. जानेवारीपासून दर महिन्याला एका मनोरुग्ण पळून जात असतानाही प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेसाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षा व्यवस्था असतानादेखील मनोरुग्ण पळून जातात, ही बाब गंभीर आहे. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाही केली जाईल.

- जगदीश मुळीक, आमदार

येरवडा मनोरुग्णालय १२३ एकर एवढ्या मोठ्या परिसरात विस्तारले आहे. रुग्णालयातील सोळाशे पेशंटवर लक्ष ठेवण्यासाठी जेमतेम साडे तीनशे कर्मचारी लक्ष ठेवतात. त्यामुळे सगळ्या पेशंटवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. एवढ्या मोठ्या मनोरुग्णालयातून महिन्याला एक- दोन पेशंट पळून जाण्याच्या घटना घडू शकतात. अशा घटना सतत होत असल्याने त्या खूप गंभीर नाही.

- डॉ. भालचंद्र डोंगळीकर, अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोपटेंची घराणेशाही आता संपवाः कामठे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

'आपापसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून पक्षहितासाठी सर्वांनी एकविचाराने काम करून भोरच्या राजकारण व सहकारातील थोपटे पिता-पुत्रांची घराणेशाही, एकाधिकार शाही संपवा,' अशा सूचना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी नेते व कार्यकर्त्यांना दिल्या.

भोर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात भोर तालुका कृषिउत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करताना कामठे बोलत होते. या वेळी भालचंद्र जगताप, नितीन धारणे, चंद्रकांत बाठे, मानसिंग धुमाळ, रणजित शिवतारे, विक्रम खुटवड, प्रताप शिळीमकर, शिवाजी कोंडे, रवींद्र बांदल व इतर पदाधिकारी, निवडणुकीतील उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.

कामठे म्हणाले, 'थोपट्यांनी भोर परिसरातील अनेक जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. त्या जमिनीचे सातबारा बाहेर काढण्याचे काम आपल्याला भविष्यात करावयाचे आहे. बाजार समितीचे पक्षाचे सर्व १५ उमेदवार निवडून येण्यासाठी झटून काम करा. शेतकऱ्यांचे हित जपणारे शरद पवारांचे विचार गावोगावीच नव्हे; तर वाडीवस्तीवर जाऊन सांगा.' या वेळी उमेदवारांच्या परिचय पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. स्थानिक नेत्यांनीही आपले विचार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ६७८ गावे तंटामुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांर्गत २०१३-१४ या वर्षामध्ये राज्यातील ६७८ गावे तंटामुक्त झाली असून त्यामध्ये जिल्ह्यातील १४ गावांचा समावेश आहे. राज्यात १८ गावांना विशेष शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-पिंपळवाडी, तळेघर या गावांचा यात समावेश आहे.

अभियानांतील पुरस्कारप्राप्त गावांना १७ कोटी १३ लाख, २५ हजार रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. अभियानांत सहभागी झालेल्या गावात तंटे होऊ नयेत तसेच दाखल झालेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन गावाबरोबर राज्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने २००७ मध्ये हे अभियान राज्यभर सुरू करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यासाठी मोठा पुढाकार होता. १५ ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात केली जाते. २००७ ते २०१२-१३ पर्यंत राज्यातील एकूण १७ हजार ७४५ गावांना तंटामुक्त पुरस्कार; तर १,२७० गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आले आहेत.

तंटामुक्त गाव जाहीर होण्यासाठी २०० पैकी किमान १५० गुण आवश्यक आहेत. २०० पैकी १९० किंवा अधिक गुण मिळविणाऱ्या गावाला विशेष शांतता पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये त्या गावांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या रकमेपेक्षा २५ टक्के रक्कम अधिक दिली जाते. या अभियानात वर्धा व नांदेड जिल्ह्यातील एकही गाव पुरस्कारासाठी पात्र झालेले नाही; तर भंडारा, लातूर, गोंदिया जिल्ह्यातील गावे १०० टक्के तंटामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त १४ गावे

किकवी, रांजे (भोर), वरसगांव (वेल्हे) आगर, ओझर नंबर-२, सांगणोरे, बेल्हे (जुन्नर) लांडेवाडी : पिंपळवाडी, तळेघर, पांचाळे बुद्रूक, अडिवरे (आंबेगाव), भूगांव (मावळ), लाखेवाडी (इंदापूर), नाझरे कडेपठार (पुरंदर).

जिल्हानिहाय गावे

पुणे-१४, ठाणे-१६, रत्नागिरी-३, सिंधूदूर्ग-४, नाशिक-३८, अहमदनगर-१४, जळगाव-२४, धुले-६, नंदूरबार-१, कोल्हापूर-७, सातारा-१८, सोलापूर-६, औरंगाबाद-३२, जालना-३१, बीड-२, उस्मानाबाद-२०, परभणी-३६, हिंगोली- २०, अमरावती - १००, अकोला - ३६, वाशीम - ३२, बुलढाणा - २०, यवतमाळ - ५८, नागपूर-४३, चंद्रपू-९४,गडचिरोली-३.विशेष शांतता पुरस्कार गावांची संख्या पुढीलप्रमाणे.पुणे-२,रत्नागिरी-१, जळगाव- २, कोल्हापूर- २, सातारा- ३, अमरावती- ३, यवतमाळ- २, चंद्रपूर- ३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेल्ह्यातील शाळेत ७५ शिक्षक कमी

$
0
0

पुणे : वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर आवश्यकतेपेक्षा ७५ शिक्षक कमी असल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होत आहे. तसेच, उपलब्ध शिक्षकांवर अधिक ताण येत असून काही शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांना एकच शिक्षक आहे. परिणामी, शिक्षकांना कोणत्याही शासकीय कामासाठी जावे लागल्यास शाळा बंद ठेवावी लागत आहे.

वेल्हे तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाच ते सहा किलोमीटरवरून पायी चालत जावे लागते. शाळा बंद असल्यास विद्यार्थ्यांची पायपीट वाया जात असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षक कमी असल्याने येथील नागरिक पंचायत समितीकडे वाढीव शिक्षकांची मागणी करत आहेत. याबाबत पंचायत समितीच्या सभापती सविता वाडघरे यांनी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. मात्र, परिषदेकडून प्रतिसाद मिळालेला नाही. शिक्षक भरती न केल्यास जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य राजेश निवंगुणे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन विभागाला दोन कोटींचा चेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी सांडस येथील वन विभागाची जागा ताब्यात घेण्यासाठी दोन कोटी रुपयांचा चेक वन विभागाला देण्यात आला आहे. जागा ताब्यात घेण्याचा हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने लवकरच ही जागा पालिकेच्या ताब्यात येईल, असा विश्वास घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देवाची उरळी, फुरसुंगी येथील कचराडेपोत कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कचरा डेपोत कचरा टाकण्यास होत असलेल्या विरोधामुळे शहरातील कचरा प्रश्न अधिकाधिक बिकट होत चालला आहे. उरळी, फुरसुंगी प्रमाणेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी पिंपरी सांडस येथ‌ील वन विभागाची २५ हेक्टर जागा मिळावी, अशी मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. ही जागा देण्यास केंद्रीय पर्यावरण विभागाने दोन महिन्यांपूर्वी तत्वत: मान्यता दिली आहे. पर्यावरण विभागाने घातलेल्या काही अटींची पुर्तता केल्यानंतर ही जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. दरम्यान, या जागेपोटी दोन कोटी रुपयांच्या रकमेचा चेक मंगळवारी महापालिकेकडून वन विभागाला देण्यात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापनासाठी ही जागा ताब्यात घेताना पालिकेने येथील काही जागेवर वनीकरण करावे, तसेच वन विभागाला पालिकेच्या मालकीची वढू तुळापूर येथील काही जागा वनीकरणासाठी द्यावी, अशी अट घालण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाला दोन कोटी १३ लाख रुपये उपलब्ध करून देण्याबरोबरच यासंबधीचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्याचा ठराव गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करून घेतला आहे. ही जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर कचरा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण व्यवस्था उद्‍‍ध्वस्त होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई याची सर्वांनाच जाणीव आहे; पण त्यासाठी साखर कारखान्यांच्या गाळपालाच परवानगी न देण्याची भूमिका घेतली, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल आणि 'दुष्काळात तेरावा महिना,' अशी स्थिती होईल, असा इशारा राज्य सहकारी साखर कारखाना संघाने सोमवारी दिला आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे राज्याच्या बहुसंख्य भागांतील धरणसाठे आटत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर धरणांमधील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवून उसाला पाणी न देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी दुष्काळसदृश स्थिती असलेल्या भागातील साखर कारखान्यांना गाळपालाच परवानगी न देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेवर साखर संघाने आक्षेप घेतला आहे. गाळपाला परवानगी न देण्याची भूमिका घेतली; तर लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होईल, अशी टिपण्णी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली.

अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पूर्वीच ऊस लावला आहे. तो वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला असून त्यासाठी मोठे कष्टही घेतले आहेत. आता गाळपालाच परवानगी दिली नाही, तर त्या उसाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होईल. या उसाची भरपाई राज्य सरकार देणार आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यासंदर्भात सरकारकडे भूमिका मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

'ठिबकला प्रोत्साहन हवे'

'दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाई याची सर्वांनाच जाणीव आहे. उसाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे, ही भूमिकाही आम्हाला मान्य आहे. सरकारने त्याबाबत घोषणा केली आहे, यापुढील काळात त्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठीही सरकारने पुढाकार घेतल्यास शेतकरी नक्कीच ठिबक सिंचनाचा वापर करतील,' असे नागवडे यांनी सांगितले.

नियामक मंडळाची बैठक आता ९ सप्टेंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारी ऊस दर नियामक मंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी ही बैठक होणार होती. आता येत्या बुधवारी (९ सप्टेंबर) मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून गेल्या हंगामातील अंतिम ऊसदर आणि एफआरपीसंदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहास नकार दिल्याने महिलेचा तळेगावात खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विवाहास नकार दिल्यामुळे महिलेचा खून करून स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शिक्रापूरजवळील तळेगाव ढमढेरे येथे घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी खून करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

वैशाली संतोष कांबळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राहुल बाळासाहेब उंब्रे (वय ३४, रा. घाटगे आळी, चाकण) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली व राहुल हे नातेवाईक आहेत. वैशालीच्या पतीचा मृत्यू झाला असून तिला एक मुलगी आहे. राहुल याचाही विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. तरीही दोघांचे प्रेमसंबंध होते. ३० ऑगस्टला राहुल हा वैशालीकडे आला आणि तिला विवाह करण्यासाठी गळ घालू लागला. पण, वैशालीने तिला मुलगी आहे, तसेच त्यालाही मुले असल्याने आपल्याला विवाह करता येणार नसल्याचे सांगितले. तरीही विवाह न केल्यास जीवे मारण्याची धमकी राहुलने वैशालीला दिली. त्याच दिवशी रात्री सातच्या सुमारास राहुलने धारदार चाकूने वैशालीच्या अंगावर वार करून खून केला. त्यानंतर स्वतःच्या अंगावर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. राहुलला शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस एच. बी. खोपडे हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक विक्रेत्यांना ७० हजारांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विविध भागांत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करून ५३२ किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, या पिशव्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विश्रामबागवाडा, नगर रोड आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मंगळवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई केली गेली. मार्केट यार्डातील पाच व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या कारवाईत पाचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या व्यापाऱ्यांकडून १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईसाठी विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने सकाळी ११ ते दुपारी ३ अशी चार तासांची मोहीम राबविली. प्रामुख्याने बोहरी आळी परिसरातील घाऊक विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईतून २२ किलो प्लास्टिक जप्त केले असून, साडेअकरा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त माधव देशपांडे यांनी दिली. नगररोड परिसरातील पाच व्यापाऱ्यांवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली.

प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी कारवाई

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि नागरिकांवर होणारी कारवाई पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्यासाठी होत आहे, असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जुने ते सोने’ ठरतेय पर्यावरणपूरक

$
0
0

सेकंडहँड वस्तूंमुळे २० लाख टन वायूउत्सर्जनाची बचत

Chaitrali.chandorkar@timesgroup.com

पिढ्यानपिढ्या जुन्या वस्तू वापरण्याच्या सवयीमुळे भारतीय दर वर्षी पर्यावरण संवर्धनात मोठा वाटा उचलत आहेत. जुन्या अर्थात सेकंडहँड वस्तूंच्या खरेदीमुळे प्रतिवर्षी २०.४० लाख टन हरित वायूंचे उत्सर्जन थांबवण्यात यश आले आहे. राजधानी नवी दिल्लीतील पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या वर्षभरात रस्त्यावर फिरल्यानंतर जेवढे हरित वायूंचे उत्सर्जन होईल तितकी बचत भारतीयांच्या चांगल्या सवयीमुळे करण्यात आली आहे.

लहान अथवा मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, कार काही वर्षांनंतर थेट भंगारात काढण्याची मानसिकता अनेक प्रगत देशांमध्ये पाहायला मिळते. एकदा वापरलेली वस्तू पुन्हा वापरणे तेथे कमीपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे जुन्या वस्तूंची बाजारपेठ तेथे उपलब्ध नाही. त्यामुळे ई-कचऱ्याची निर्मिती होत असून, पर्यायाने हरित वायुंच्या उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 'सेंटर ऑफ एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन' (सीईई) या संस्थेतर्फे 'ओएलएक्स'साठी नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. जुन्या वस्तू खरेदी करून त्यांना ग्राहक मिळवून देणाऱ्या या नव्या बाजारपेठेमुळे पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा वाटा उचलला जात असल्याचा निष्कर्षही 'सीईई'ने काढला आहे.

'कोणत्याही उत्पादनाचा जास्तीत जास्त काळ वापर करणे, हा शाश्वत जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपाय ठरला आहे. जुन्या वस्तू पुढच्या पिढीला देऊन त्यांचे संवर्धन करण्याची परंपरा अद्याप आपल्या देशाने जपली आहे. त्यामुळेच सेकंडहँड वस्तूंची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करीत असतानाही आपण पर्यावरण संवर्धनाची कास सोडलेली नाही,' अशी प्रतिक्रिया 'सीईई'चे संचालक कार्तिकेय साराभाई यांनी दिली.

सेकंडहँड वस्तूंच्या वापरामुळे दर वर्षी देशातील वीस लाख चाळीस हजार टन हरित वायूंचे उत्सर्जन घटण्यास मदत झाली आहे. दिल्लीमध्ये वर्षभर पेट्रोलच्या सगळ्या गाड्या धावल्यानंतर जेवढे हरित वायूंचे उत्सर्जन होते तेवढे प्रदूषण वस्तूंच्या पुनर्वापरातून कमी करण्यात यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images